Sunday, February 13, 2022

साहसी पर्यटकांना साद घालतोय कशेळीतील सुळ्या; ’जिद्दीची चढाई

 रत्नागिरी : कनकादित्य मंदिर आणि नयनरम्य किनार्‍यावरुन सुर्यास्ताचे दर्शन घेण्यासाठी प्रसिध्द असलेले कशेळीत (rajapur) साहसी पर्यटकांसाठीचे मुख्य ठिकाण बनणार आहे. येथील किनार्‍यावर समुद्रामध्ये उभा असलेला साठ फुट उंच ‘सुळ्या’ हा उभाच्या उभा सुळका साहसी पर्यटकांना आव्हान देत आहे. हा अपरिचित ‘सुळ्या’ जिद्दी माउंटेनेरिंगच्या सदस्यांनी सर केला आहे.

सुर्यास्त दर्शनासाठी कशेळी ग्रामपंचायतीने किनार्‍यावर विकसित केलेल्या पर्यटन किनार्‍यापासून डोंगराच्या कडेने साधारण पाऊणतास चालत गेल्यावर समुद्राच्या पाण्यात वेढलेला ‘सुळया’ नावाचा 60 फुटाचा उंच सुळका आहे. याचा शोध स्थानिक ग्रामस्थ संदीप राडये यांनी घेतला होता. त्यांच्याकडून जिद्दी माउंटेनेरिंग संस्थेचे क्लायंबर अरविंद नवेले यांना माहिती मिळाली. अपरिचित असा हा सुळका सर करण्यासाठी जिद्दीच्या पथकाने रेकी केली. रविवारी (ता. 30) सकाळी जिद्दीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुळक्यावर चार ते पाच ठिकाणी रोप लावण्यासाठी दगडात बोल्ट, हँगर ड्रिलिंग करुन लावण्यात आले. दगडाला ड्रिल होत नसल्यामुळे आयत्यावेळी मोहीम थांबेल की काय अशी स्थिती होती. इलेक्ट्रीक हॅमर ड्रिल मशिन उपलब्ध होते; परंतु ते विजेवर चालवले जाते. अडचणींवर मात करत 1000 केव्हीचा एक जनरेटर सुळक्या जवळ नेण्यात आला. सकाळी 7 वाजता सुळक्यावरील चढाईसाठी पहिले पाऊल टाकले.

समुद्राच्या भरतीच्या पाण्याचा त्रास सहन करत जिद्दीची टिम सरसावू लागली. अरविंद नवेले यांनी नेतृत्त्व केले होते. जनरेटरच्या माध्यमातुन इलेक्ट्रीक ड्रिलने चढाईत दगडांना बोल्ट लावत या सुळक्याच्या माथ्यावर साधारण तिन तासाने अरविंद यांनी तिरंगा फडकवत सुळका सर केला. सुळक्याच्या माथ्यावर फक्त एकच व्यक्ती उभी राहू शकेल एवढीच जागा आहे. त्यामुळे एका वेळी एक जणच चढाई करून पुन्हा रॅपलिंग करत खाली येऊ शकतो. त्यानंतर दुस-या व्यक्तीला चढाई करता येते. नवेले यांच्यानंतर प्रसाद शिगवण, राकेश हर्डीकर, सतीश पटवर्धन, उमेश गोठीवरेकर, आकाश नाईक, वैभव कांबळे, आशिष शेवडे, ओंकार सागवेकर यांनी सुळक्यावर यशस्वी चाढाई केली. कोकणात पर्यटन वाढीसाठी मनापासून धडपडणारी जिद्दीच्या पथकात 21 ते 40 वयोगटातील तरुण आहेत. उमेश गोठीवरेकर हे एकावन्न वर्षीय एकमेव वरीष्ठ व्यक्ती आहेत. या मोहिमे दरम्यात स्थानिक हॉटेल व्यावसायीक संदीप राडये यांनी मदत केली.

कशेळीतील सुळक्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचवुन या गावातील पर्यटनाच्यादृष्टीने अशा ठिकाणांची माहिती अनेकांपर्यंत पोहोचावी आणि पर्यटन वाढीसाठीचा प्रामाणीक प्रयत्न जिद्दीच्या माध्यमातून केला जात आहे.

- उमेश गोठीवरेकर, जिद्दी माऊंटेनिअरींग

सुर्यास्त पॉईटमुळे पर्यटनदृष्ट्या कशेळीला(kasheli) महत्त्व प्राप्त झाले आहे. परजिल्ह्यातून येणारा पर्यटक मुक्कामी राहील्यास रोजगार वाढेेल. त्यासाठी सुळ्यासारखी नवनवीन ठिकाणे पर्यटकांपर्यंत(tourist) पोचवण्यात येत आहेत.

- संदीप राडये, ग्रामस्थ

 

 

 

Monday, February 7, 2022

कोकणकडा चढाई- सह्याद्रीने प्रसवलेलं रौद्रभीषण सौंदर्य

 

कोकणकडा चढाई- सह्याद्रीने प्रसवलेलं रौद्रभीषण सौंदर्य

From Kokankada 2006

पच्छिम घाटाचा विस्तार महाराष्ट्राच्या उत्तरेपासून थेट केरळ पर्यंत पसरलेला. त्यात कर्नाटक आणि केरळ मधील भाग हिरवाईने नटलेला, याउलट महाराष्ट्रातला सह्याद्री मात्र खडकाळ रांगडेपणाच काळकभिन्न सौंदर्य मिरवतोय. आपल्या इतिहासाशी जवळीक साधणाऱ्या सह्यकड्याने हजारो वर्ष उन-पावसाच्या अभिषेकात कितीतरी प्रसववेदना सहन करून अनघड सुळके आणि उंचच उंच कातळ भिंतींची रचना केली आहे.

सह्याद्रीतील अशाच डोंगररांगेपैकी एक माळशेज घाट परिसर आणि दुर्गवेड्यांचा सखा हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगडावर सह्याद्रीचा मालक देवाधिदेव शंभूमहादेवाच दर्शन घेतल्यावर पाय आपोआप कोकणकड्याच्या दिशेने वळतात. कोकणकड्यावर लोटांगण घालून याची रौद्रता डोळ्यात साठवण्यासाठी तर झुंबड उडते. त्याची खोल भीषणता पाहून त्यातीलच काही जणांच्या मुठीची घट्ट पकड सोबतच्या संवंगड्यांच्या मनगटावर आवळली जाते. इथून दरी इतकी खोल आणि भयाण असूनही आपल्या डोळ्यात मात्र त्याच फक्त सौंदर्यच भरत. याची संपूर्ण छबी डोळ्यात साठवण्यासाठी माळशेज घाटाच्या पायथ्याखालील तळ कोकणातलं बेलपाडा गाव गाठायचं आणि रोहिदासच्या शिखरापासून ते नळीच्या वाटेपर्यंत दीड ते दोन किलोमीटरचा विस्तार असलेल्या संपूर्ण कोकणकड्याला आपल्या डोळ्यात साठवायचं.

From Kokankada 2006

प्रस्तरारोहकांच्या कितीतरी पिढ्या याच्यावर चढाई करण्याच स्वप्न बाळगून असतात, पण यशस्वी झालेल्यांपेक्षा अयशस्वी मोहिमांचीच संख्या जास्त आहे. अयशस्वी झालात तरी हरकत नाही, कारण यावर चढाई करण्याचा प्रयत्नसुद्धा प्रशंसेस प्राप्त आहे. कोकणकड्यावर विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला हवी कणखर सवंगड्यांची साथ आणि अनुभवी संघ.

महाराष्ट्रात १९८३ साली प्रथमच कृत्रिम चढाईच तंत्र (खिळे-बोल्ट) गिर्यारोहकांना अवगत झाल आणि ठाणे येथील चारूहास जोशी यांच्या गिरीविहार संस्थेने प्रथमच कृत्रिम चढाईच तंत्र वापरून जीवधनची वानरलिंगी सर केली. त्यानंतर असंख्य सुळक्यांच्या वाटा खुल्या होत गेल्या. पण कोकणकडा अजूनही आव्हानच ठरलेला. १९८५ मध्ये आयआयटी- मुंबईच्या गिर्यारोहकांनी वसंत लिमयेच्या नेतृत्वाखाली प्रथमच कोकणकडा सर केला. त्यांनी सुरुवात तर मध्यावरून केली होती पण पुढे डावीकडे सरकत ते मध्यावरून खूप दूरवरून कोकणकड्याच्या माथ्यावर पोहोचले, त्याला Left Route म्हणून ओळखले जाते. अद्यापही कोकणकड्याची मध्यवर्ती चढाई अभेद्यच होती. पण तत्कालीन मर्यादित उपलब्ध साहित्याच्या साहाय्याने यावर चढाई करण्याचा नुसता प्रयत्नसुद्धा कौतुकास पात्र आहे.

पण हार मानेल तो माणूस कसला, १९८७ मध्ये मिलिंद पाठक यांच्या नेतृत्वाखाली 'समिट हायकर्स' आणि 'पुणे व्हेंचर्स' (टेल्को) या मुंबई-पुण्याच्या दोन संस्थांनी मिळून याच्या मध्यावरून कोकणकड्यावर विजय मिळवला आणि खऱ्या अर्थाने कोकणकडा पादाक्रांत झाला. “किरण, तुमच्यासारखी क्लाईम्बिंग टीम नसल्याने कड्यावरचा २-२ रुफ (दगडी छत) असलेला भाग मला सोडून द्यावा लागला” अशी खंत मिलिंद पाठक यांनी किरण अडफडकरांकडे एका भेटी दरम्यान व्यक्त केली होती. यावरून कोकणकड्याची भव्यता आणि अवघडपणा लक्षात यावा.

मर्यादित साहित्य आणि प्रवासाची मर्यादित साधनं, यामुळे त्यांना जवळपास साडेतीन महिन्यांचा काळ लागला. यानंतर याच मार्गावरून उपलब्ध खिळ्यांच्या सहाय्याने कोकणकडा सर करण्यासाठी प्रस्तारारोह्कांची रीघ लागली. पण त्यात अयशस्वी प्रस्तारारोह्कांचीच संख्या जास्त होती. त्यानंतरही कोकणकड्यावर खूप दुर्दैवी घटना घडत होत्या. एका संस्थेने आयोजित केलेल्या कोकणकडा रॅपलिंग दरम्यान एक मुलगी गंभीररीत्या जखमी झाली होती. २००४ साली चढाईचा प्रयत्न करताना मार्गातील जीर्ण व कमकुवत झालेले खिळे तुटल्यामुळे कल्याणमधील एका संस्थेला दोर आणि मौल्यवान सामान कड्यावरच सोडून यशस्वी माघार घेण्यास भाग पडलं होत. एका वर्षी मोठा शिलाखंड कड्यापासून विलग होऊन खाली कोसळून मार्ग आणखी खडतर बनला होता.

एव्हढ्या मोठ्या संख्येने मोहिमा अयशस्वी झाल्याने आम्हालाही याचे कुतूहल होतेच. २००६ साली गिरीविराजच्या मोहिमेच्या पूर्वतयारी दरम्यान जून-२००६ मध्ये याचा मागोवा घेण्याच काम आम्ही केल आणि एव्हढ्या मोठ्या संख्येने मोहिमा का अयशस्वी झाल्या त्याची कारण सुद्धा कळली.

कोकणकड्याच्या प्रत्यक्ष भिंतीची मध्यवर्ती उंची १८०० फुट आहे. सुरुवातीला ३०० फुटी मध्यम कातळ चढाई करावी लागते. त्यापुढे ५०० फुट तिरकस रेषेतील सोपी चढाई आणि त्यापुढे मात्र भयानक परिस्थिती आहे. कोकणकडा कशाशी खातात त्याची प्रचीती इथून यावयास लागते. ३५० फुटांची चढाई अवघड प्रकारातली, इथपर्यंत म्हणजे ११५० फुट उंचीवर पोहोचल्यावर डावीकडे सरकणारी आडव्या रेषेतली लांबलचक अर्ध वर्तुळाकर परंतु अतिशय अरुंद लेज आहे, थोडस दुर्लक्षही जिवावर बेतेल. या लेजवरचा सुमारे ६५० फुट कडा हा या मार्गातला मुख्य अडसर. इथून मात्र याची भयानकता आणखी वाढते. तुमच्या शरीराचे हाल व्हायला इथूनच सुरुवात होते. त्यातही सुरूवातीच ३०० फुट अंतर पट्टीच्या प्रस्तरारोहकाला घाम फोडत. इथपर्यंत तो कसाबसा पोहोचेलही पण इथून वरची ३५० फुटी चढाई महाभयंकर. कारण इथून वरचा कडा ओव्हरहॅन्गच्या रूपाने सुमारे १४० ते १६० अंशाच्या कोनात असा काही बाहेर पडतो कि फक्त पाहतानाही भल्याभल्यांची तारांबळ उडावी. आजवरच्या बहुतेक मोहिमा इथूनच अयशस्वी झाल्या आहेत. या शेवटच्या टप्प्यातील मध्यभागात एकुलती एक ससाण्याची लेज आहे, पण इथेही स्वतःला दोर बांधून सर्व व्यवहार करावे लागतात. त्यामुळे इथे बेसकॅंप स्थापित करता येत नाही आणि सर्व व्यवहार माथ्यावरूनच नियंत्रित करावे लागतात. खाली पहाव तर आपण चढून आलेला रॉकपॅच दिसतच नाही आणि तिरकस ओव्हरहॅन्गमुळे वरचाही थांगपत्ता लागत नाही.

सुमारे १४-१५ वर्षे सर्व साहसी प्रस्तरारोहक याच मार्गाचा अवलंब करून कोकणकड्यावर झेंडा रोवत होते. आता अखंड कडाच कोसळून खाली पडल्यामुळे, मार्ग आणखी खडतर बनला होता, जवळ जवळ बंदच झाला होता. कोकणकडा परत गिर्यारोहकांची परीक्षा पाहत होता. एकतर जुन्या खिळ्यांच्या जागी नवीन खिळे ठोकणे अथवा नवीन मार्ग शोधणे असे दोनच पर्याय उपलब्ध होते. त्या दृष्टीने मुंबई-पुण्याच्या विविध संस्थांनी प्रयत्नसुद्धा केले पण सारे विफल झाले.

नेमक्या अशाच वेळेस गिरीविराज हायकर्सचा (डोंबिवली) पुनर्जन्म झाला होता. जुने सगळे साथीदार निवृत्त झाल्याने जवळपास १० वर्षांचा काळ अज्ञातवासात गेला. २००२ साली संस्थेला परत उर्जितावस्था प्राप्त झाली. किरण अडफडकरांनी आशिष पालांडे, राहुल शिंदे, दिवाकर भाटवडेकर, प्रदीप म्हात्रे, योगेश सदरे आदीं तरुण मंडळींची सक्षम टीम बांधून वजीर, तावली, भैरवगड, बाण, नानाचा अंगठा आदींवर नवीनच मार्गाने चढाई करून भरपूर अनुभव नवीन टीमच्या पाठीशी गोळा केला आणि कोकणकड्याला हात घालण्याचा निर्णय घेण्यात आला, तोही कोणताही गाजावाजा न करता. त्यासाठी दर शनिवार-रविवार तळोजा येथील पांडवकड्याला भेट देऊन १९८८ साली आम्हीच सर केलेल्या मार्गावर रुफ बोल्टिंग, लॅडर शिफ्टिंगचा कसून सराव करून घेतला. कारण कोकणकड्यावर चढाईसाठी आम्ही सर्वात अवघड मार्ग निवडला होता आणि दोन ठिकाणी १८० अंशाच्या कोनातील दोन दगडी छतांचा समावेश होता.

From Kokankada 2006

संस्थेची आर्थिक परिस्थिती तोळामासाच असल्याने सर्व प्रथम पैशांची जमवाजमव करावी लागणार होती. त्यावेळी ठाण्याचे चारुहास जोशी मदतीसाठी आले आणि त्यांच्या 'हिल्स अॅगण्ड ट्रेल्स' या कंपनीच्या वतीने छायाचित्रण आणि चलतचित्रणासाठी आर्थिक खर्चाचा काही भार उचलला. उर्वरित खर्चाची जबाबदारी संस्थेच्याच सभासदांनी विभागून घेतली.

२५ ऑक्टोबर, २००६ - हरिश्चंद्रगडाचा पायथा - खिरेश्वर
जवळपास वीस दिवसांचा शिधा, तंबू, स्वतः तयार केलेले २०० एक्स्पान्शन बोल्ट, दोर, इतर चढाई करण्यासाठीचे सामान घेऊन उत्साहाने भरलेली सगळी मंडळी सामानासोबत गडाच्या पायथ्याशी गोळा झाली. सामान खूपच असल्याने गावातील मंडळींकडे मदतीसाठी 'अर्थपूर्ण' विचारणा केली पण ते अवजड सामान पाहून त्यांनी काढता पाय घेतला. शेवटी आम्हीच सामान पाठीवरून वाहुन न्यायचा निश्चय केला. तोलार खिंडीतून हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी साधारण ४-५ तास लागतात, पण आम्हाला त्या दिवशी मात्र तब्बल ९ तास लागले, यावरून आमच्याकडे असलेल्या सामानाची प्रचीती आली असेल. गडावरील शंभू महादेवच दर्शन घेऊन थेट कोकणकड्याच्या धुंद वातावरणात प्रवेश केला. आता आमच मुख्यालय इथेच असणार होत, अर्थात कॅम्प नं.१. योग्य जागा पाहून साफसफाई करून तंबू ठोकून दिले.

From Kokankada 2006

२७ ऑक्टोबर, २००६ (पहिला दिवस):
सकाळी लवकर उठून किरण आणि मंडळी नळीच्या वाटेने कोकणकड्याच्या पायथ्याशी पोहोचले. आज त्यांना इथे कॅम्प नं. २ ची स्थापना करायची होती. कोकणकड्याच्या पायथ्याला जाणारा शॉर्टकट शोधण्याच्या नादात सुर्य कधी डोगरापल्याड गेला ते कळलंच नाही. रात्रीचे अंधारात धडपडण्यापेक्षा नळीच्या वाटेतच उघड्यावर मुक्काम करावा लागला.

२८ ऑक्टोबर, २००६ (दुसरा दिवस)
आज कसेही करून चढाईचा मुहूर्त साधायचा होता. रात्री उघड्यावरच झोपलेलो असल्याने लवकरच जाग आली. पहिल्याच दिवशी वेळापत्रक बिघडण्याची चिन्ह दिसत होती, त्यामुळे धावतपळत तडक कोकणकड्याचा पायथा गाठला. कॅंप नं. २ ची स्थापना करून चढाईसाठी सज्ज होण्यास तरीही दुपारचे बारा वाजलेच. शेवटी आज एवढ्या वर्षांपासून हृदयाशी जपून ठेवलेला क्षण प्रत्यक्षात साकार होणार होता. अपघातविरहीत यशासाठी सह्याद्रीचा धावा केला आणि सुरुवातीला चढाईचा मार्ग सोपा असल्याने नव-प्रशिक्षित मनीष पिंपळे आणि राहुल शिंदेने या महात्वाकांक्षी मोहिमेचा श्रीगणेशा केला. आज प्रत्यक्ष चढाईसाठी वेळ कमी मिळाला. तरीही मिळालेल्या वेळात या दोघांनी सुरुवातीची ३०० फुटी साधारण चढाई पूर्ण करून दोर तिथेच बांधला आणि पुन्हा पायथ्याला कॅंप नं.२ वर परत आले.

From Kokankada 2006
From Kokankada 2006

२९ ऑक्टोबर, २००६ (तिसरा दिवस)
तिसऱ्या दिवशी दिवाकर भाटवडेकर आणि प्रकाश म्हात्रे यांनी काल चढाई थांबवलेल्या ठिकाणी पोहोचून जवळपास ८५० फुट चढाई दिवसभरात केली. यातील सुरुवातीची ५०० फुट चढाई तिरकस रेषेत सोपी होती आणि त्याच्यावरील ३५० फुट चढाई थोडीशी अवघड स्वरूपातील होती. आता आम्ही ११५० फुटी रुंद लेजवर पोहोचलो होतो. खरतर आजच इथे कॅंप नं.३ ची स्थापना करायची होती पण संध्याकाळ झाल्याने परत ११५० फुट खाली पायथ्याला जाण्यास भाग पडले. चढाईचा पहिला टप्पा संपला होता पण कोकणकड्याची खरी लढाई यानंतरच सुरु होणार होती. आता पर्यंतच्या बहुतेक मोहिमा अयशस्वी का झाल्यात त्याची प्रचीती इथूनच येणार होती.

From Kokankada 2006
From Kokankada 2006

३० ऑक्टोबर, २००६ (चवथा दिवस):
या पुढच्या मोहिमेसाठी पायथ्याला असलेल्या कॅंप नं.२ ची आवश्यकता नसल्याने त्याचा गाशा गुंडाळून प्रकाश आणि मंगेश सदरे नळीच्या वाटेने कोकणकड्यावर परत कॅंप नं.१ वर निघून गेले. तर किरण, दिवाकर, मनीष आणि राहुल काल बांधून ठेवलेल्या दोराच्या साहाय्याने ११५० फुटी लेजवर पोहोचले. त्याच वेळेस पुढच्या मोहिमेची रूपरेषा ठरवण्यासाठी आशिष पालांडे आणि योगेश सदरे यांनी कोकणकड्याच्या माथ्यावरून रॅपलिंग करत ११५० फुटी लेजवर खाली असलेल्या टीमला येऊन सामील झाले. आता पुढच्या चढाईचे नियोजन याच ११५० फुटी लेज वरून होणार होते. तंबूसाठीची जागा हेरून पुन्हा सगळे जण आशिष आणि योगेशने माथ्यावरून आणलेल्या दोरावर झुमारिंग (सुमारे ६५० फुट) करत कोकण कड्याच्या माथ्यावर म्हणजेच कॅंप नं.१ वर आले.

From Kokankada 2006
From Kokankada 2006
From Kokankada 2006

३१ ऑक्टोबर, २००६ (पाचवा दिवस):
अर्धी लढाई जिंकलेली असल्यामुळे उत्साहाच्या भरात पाच जणांची टीम काल बांधून ठेवलेल्या दोराच्या साहाय्याने कोकणकड्याच्या माथ्यावरून रॅपलिंग करत ११५० फुटी लेजवर पोहोचली. या ऐसपैस लेजवर तंबू ठोकण्यासाठी आम्ही कालच जागा हेरून ठेवली होती, त्या जागेवर रात्रीच्या निवासाकरिता २ तंबू ठोकून कॅंप ३ ची स्थापना करण्यात आली. आता कृत्रिम चढाई (अर्थात खिळ्यांच्या मदतीने) सुरु होणार होती आणि आमच्या सहनशक्तीची परीक्षा घेणार होती.
दरम्यान जेवणपाणी आणि सामान पुरवठ्यासाठी किरणने एक वेगळा नायलॉनचा दोर (६५० फुट) माथ्यापासून या ११५० फुटी लेजपर्यंत बांधून सप्लाई लाईन फॉर्म केली.

आज प्रदीप म्हात्रेने पायथ्यापासून १२०० फुट उंचीवर मुक्त चढाईचा सुंदर नमुना पेश करत जवळपास २०० फुटांची उंची गाठली. कॅंप ३ अर्थात ११५० फुटी लेजवरच मुक्काम असल्याने किरणने बांधलेल्या दोरावरूनच कॅंप १ वरून टीमसाठी जेवणपाणी पुरविण्यात आल.

From Kokankada 2006

०१ नोव्हेंबर, २००६ (सहावा दिवस)
आशिष आणि योगेशने, काल प्रदीपने चढाई थांबवलेल्या ठिकाणापासून आरंभ केला. आता मात्र कोकणकडा आपले रंग दाखवायला लागला. दुर्दैवाने त्यांच्या मार्गात अत्यंत ठिसूळ खडक लागल्याने मारलेला खिळा (बोल्ट) केवळ हातानेच हलत होता. तरीही त्यांनी थोडा धोका पत्करून या हलणाऱ्या खिळ्यांच्या सहाय्याने चढाई चालू ठेवली पण अचानक आलेल्या संकटाने भांबावून चढाईचा वेग खूपच मंदावला.

From Kokankada 2006

०२ नोव्हेंबर, २००६ (सातवा दिवस):
आज प्रदीप आणि अविन्द्र म्हात्रे त्या ठिसूळ कड्याला भिडले पण त्यांचे सुद्धा ठिसूळ खडकामुळे कालच्यासारखेच हाल झाले. परिस्थिती खूपच कठीण होती. आता मात्र आमचीही इतर मोहिमांसारखीच गत होते कि काय याची शंका यायला लागली. नाईलाजाने प्रदीप आणि अविन्द्र ११५० फुटी लेजवर (कॅंप नं.३) परत आले. २ मौल्यवान दिवस वाया गेले होते, अगदीच आणिबाणीचा प्रसंग उभा ठाकला होता. वॉकीटोकीच्या साहाय्याने आलेल्या प्रसंगाची चर्चा करून किरणने कॅंप १ वरून खाली ११५० फुटी लेजवर (कॅंप ३) वर उतरण्याचा निर्णय घेतला.

From Kokankada 2006

०३ नोव्हेंबर, २००६ (आठवा दिवस):
आता अनुभवच कामी येणार होता आणि कॅम्पवर किरण एव्हढा प्रस्तरारोहणाचा अनुभव कोणाच्याच गाठीशी नव्हता. किरणने प्रदीपला सोबत घेतलं आणि त्या ठिसूळ कड्याला सामोरा गेला. प्रदीप साहस एकवटून अर्धवट मारलेल्या खिळ्यावर लटकून किरणला बिले देत होता. ठोकलेल्या खिळ्यावर भरोसा ठेवण्यासारखा नव्हताच, कुठल्याही क्षणी ते बाहेर येउन खाली पडण्याचीच भीती अधिक होती. ठोकलेला खिळा भसकन भिंतीच्या आत जात होता. शेवटी किरणने नवीनच युक्ती वापरली. भिंतीमध्ये छिंद्र करण्यासाठी जो पंच वापरतात, तो पंचच त्या ठिसूळ खडकात पूर्ण ठोकायचा आणि प्रदीपला सावध रहायला सांगून त्या हलत असलेल्या पंचच्या आधाराने वर सरकायचा. असे करत करत त्याने एव्हढ्या वर्षांच्या अनुभवातून कमवलेल्या शिदोरीवर दिवसभरात त्या ठिसूळ कड्यावर मात करत पालीची लेज गाठली (पालीच्या आकाराचा खडक). मग तिथेच दोर बांधून तो परत खाली ११५० फुटी लेज वर रात्रीच्या मुक्कामासाठी उतरला. ठिसूळ पॅचवर मात केल्यामुळे रात्री कॅम्पवर उत्साहाचे वातावरण होते.

From Kokankada 2006

पण त्या उत्साहावर विरजण घालण्यासाठी परतीच्या पावसाने आपली हजेरी लावली. संपूर्ण कॅंप पाण्याने भिजून गेला, त्यामुळे रात्र लेजवर असलेल्या एका कपारीत काढावी लागली. पुढे आठवडभर वेळी अवेळी पाऊस हजेरी लावून आमच्या सहनशक्तीचा अंत पाहत होता, त्यातच पावसामुळे वरून घरंगळत खाली पडण्याऱ्या दगडांमुळे, अपघात टाळण्यासाठी सारखी कपारीकडे धाव घ्यावी लागत होती.

०४ नोव्हेंबर, २००६ (नववा दिवस):
४ दिवसांमध्ये ११५० फुटी लेजच्या वर खिळ्यांच्या साहाय्याने साधारण ३०० फुट चढाई केली होती. आता खरी परीक्षा सुरु होणार होती कारण १४०-१६० अंशाच्या कोनातला मुख्य ओव्हरहेंग सुरु होत होता ज्यात दोन रुफचा (दगडी छत) समावेश होता. इथूनच खूप मोहिमा अयशस्वी होऊन माघारी गेल्या आहेत. आज योगेश आणि आशिषने १५ बोल्टच्या साहाय्याने ओव्हरहेंगपर्यंत मजल मारली.

From Kokankada 2006
From Kokankada 2006

०५ नोव्हेंबर, २००६ (दहावा दिवस):
प्रदीप व दिवाकरने १६० अंशाच्या कोनात बाहेर पडलेल्या ओव्हरहेंगवर बोल्टिंगचा श्रीगणेशा केला. ओव्हरहेंगवर बोल्टिंग करणे सगळ्यात कठीण काम. ओव्हरहेंगवर बोल्टिंग करताना शरीर मागे फेकले जात असल्याने संपूर्ण शरीरावर अतिरिक्त भार पडतो आणि खिळा ठोकण्याचा वेगही मंदावतो.

From Kokankada 2006

०६ नोव्हेंबर, २००६ (अकरावा दिवस):
आशिषने एकट्यानेच ओव्हरहेंगवर दिवसभरात ११ बोल्ट ठोकले.

From Kokankada 2006

०७ नोव्हेंबर, २००६ (बारावा दिवस):
योगेशने एकट्यानेच ओव्हरहेंगवर दिवसभरात १० बोल्ट ठोकले.

From Kokankada 2006

०८ नोव्हेंबर, २००६ (तेरावा दिवस):
आता मार्गात पहिलं दगडी छत लागल. दगडी छत हा ओव्हरहेंगपेक्षाहि भयानक प्रकार. इथे डोक्यावर १८० अंशाच्या कोनात खिळा ठोकावा लागतो. वेदनेमुळे आपल्याला मान आहे हेच आपण विसरून जातो. जवळपास झोपूनच खिळे मारावे लागतात. पण वेदनेने शरीर गलितगात्र होऊन सुद्धा किरणने दिवसभरात छताला लटकून ९ बोल्टच्या सहाय्याने त्या ३५ फुट रुंदी असलेल्या छताचा फडशा पाडला.

From Kokankada 2006

०९ नोव्हेंबर, २००६ (चौदावा दिवस):
प्रदीपने आज एकट्यानेच बोल्टिंग करत तब्बल १२ खिळे ठोकून तो सुद्धा शर्यतीत असल्याच दाखवून दिल.

From Kokankada 2006
From Kokankada 2006

प्रत्येक जण आता इतका तयार झाला होता कि रोज ११५० फुटी लेज वरून सुमारे ३००-४०० फुट झुमारिंग केल्यानंतर (तेही ओव्हरहेंगमुळे भिंतीपासून दीडेकशे फुट बाहेर हवेत लटकून) इच्छितस्थळी पोहोचल्यावर एकट्यानेच पंचिंग करून १०-१२ खिळे ठोकत होता. ते गरजेचही होत. तिथे वारंवार चढाईपटू बदलून वेळ वाया गेला असता. त्यात झुमारिंगला दीड दोन तास लागत होते. त्यामुळे एकट्यालाच संपूर्ण दिवस निभावून न्यावा लागत होता.

१० नोव्हेंबर, २००६ (पंधरावा दिवस):
आज किरणने चढाईला सुरुवात केली. त्याला मदतनीस म्हणून दिवाकर आणि त्याखाली दूरवर पालीच्या लेजवर प्रकाश होता. दरम्यान एक अजब प्रकार त्यांना अनुभवास आला. ओव्हरहेंगवर शेवटच्या टप्प्यात बोल्टिंग करताना अचानक प्रचंड गडगडाट होऊन धुरळ्याचे लोट जमा झाले. आसपासच काहीच दिसेनास झाल. या प्रकाराने किरण आणि दिवाकर गांगरूनच गेले. धुरळा विरताच, प्रकाश ज्या लेजवर होता त्या ठीकाणी थोड खाली एक मोठा खडक निखळून पडल्याच लक्षात आल. सुदैवाने प्रकाश सहीसलामत होता पण या पडझडीत एक भलामोठा धोंडा नेमका आमच्या अतिरीक्त दोरावर पडला आणि त्याचे दोन तुकडे झाले. झाल्याप्रकारातून सावरत एकंदर नऊ खिळे आणि एक पाचर यांच्या मदतीने किरणने दिवसभरात चढाईचा अर्धा टप्पा म्हणजेच ससाण्याची लेज गाठली. जेमतेम दीड-दोन फुट रुंद असलेल्या लेजवर असंख्य दगड तुटून पडले होते. दगड इकडे तिकडे हलवून किरण आणि दिवाकरने दोन माणसांना झोपता येईल इतकी जागा तयार करून तिथे एक खिळा ठोकून त्याला दोर बांधला आणि परत खाली ११५० फुटी लेजवर परतले. दुसऱ्या दिवसापासून ११५० फुटी लेजला राम राम करायचा होता. खरतर आजच हि लेज सोडणार होतो, पण वाइंडअप अर्थात आवराआवर करण्यात वेळ गेला आणि अंधार पडल्याने सगळी काम दुसऱ्या दिवसावर ढकलण्यात आली.

From Kokankada 2006

११ नोव्हेंबर, २००६ (सोळावा दिवस):
आज कॅंप ३ चा अर्थात ११५० फुटी लेजवरचा गाशा गुंडाळून आम्ही माथ्यावर असलेल्या कॅंप १ वर दाखल झालो. तसेच ससाण्याच्या लेजवर असलेल्या दोराचे एक टोक माथ्यावर नेऊन तिथे असलेल्या कारवीच्या झुडुपात ते टोक बांधल. यानंतरची मोहीमेच नियोजन माथ्यावरूनच करणार होतो. दुपारी योगेश आणि आशिष टायरोलीन (व्हॅली क्रॉसिंग) पद्धतीने कारवीत बांधलेल्या दोराच्या साहाय्याने ससाण्याच्या लेजवरील कॅंप ४ वर उतरले. आज वेळ खूपच कमी मिळाल्याने फक्त २० फुट चढाई होऊ शकली. आज त्यांचा मुक्काम या दीड फुट रुंद लेजवरच असल्याने संध्याकाळी दोराच्या साहाय्याने त्यांना जेवण व पाणी पुरवण्यात आले.

From Kokankada 2006

१२ नोव्हेंबर, २००६ (सतरावा दिवस):
फक्त दीड फुट रुंद लेजवर अंग अवघडून संपूर्ण रात्र काढावी लागल्याने झोप आलीच नाही. योगेशने सकाळीच चढाईला सुरुवात केली आणि दिवसभरात अथक परिश्रमाने तब्बल १८ खिळे ठोकून नवीन विक्रम केला.

दुसऱ्या दिवशी किरण, दिवाकर आणि प्रदीप कॅंप ४ (ससाण्याची लेज) वर जाणार होते, त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी संध्याकाळी प्रथम आशिषला दोराच्या सहाय्याने वरून बिले देऊन माथ्यावर खेचून घेतलं. पण या सर्व उपद्द्व्यापात रात्रीचे ८ वाजले. त्यामुळे नाईलाजाने योगेशला सलग दुसरा दिवस एकट्यालाच ससाण्याच्या लेजवर मुक्काम करावा लागणार होता. मानसिकता, सुरक्षितता, संपर्क अशा सर्वच दृष्टीने ते चुकीच होत पण नाईलाज होता. मनावर धोंडा ठेऊन ती रात्र आम्ही सर्वांनी अक्षरशः चिंतेत काढली. उजाडताच वॉकीटोकीवरून योगेशशी संपर्क करून तो सुरक्षित असल्याच कळल्यावर जीव भांड्यात पडला.

From Kokankada 2006
From Kokankada 2006

१३ नोव्हेंबर, २००६ (अठरावा दिवस):
सकाळी योगेश परत माथ्यावरच्या कॅंप १ वर येताच, प्रदीप, दिवाकर आणि किरण ससाण्याच्या लेज वर (कॅंप ४) पोहोचले. प्रदीपने चढाई सुरु केली, किरण सेकंड मेन आणि दिवाकर लेजवर. दुपारी दोनच्या सुमारास योगेशचा संदेश मिळाला 'आग्यामाशांच भलमोठ मोहोळ खालच्या (दरीच्या) बाजूला गेल आहे, तुम्हाला दिसलं का?' त्यांना काहीच कल्पना नव्हती. साडेतीनच्या सुमारास किरण दिवाकरशी बोलत असताना खाली दरीत काळ्याकभिन्न आग्यामाशांच भलमोठ मोहोळ त्यांच्याच दिशेने येत होत. किरणने, दिवाकर आणि प्रदीपला लागलीच सावध केल आणि कोणतीही हालचाल न करण्याची सूचना केली. माशा डसल्या तर त्यांच्या बचावासाठी कोणतच साधन नव्हत. डोळे मिटून, शिडीवर लटकत त्याची प्रतीक्षा करत असतानाच ते भलमोठ मोहोळ चक्क त्यांच्या शरीरावरून जाताना जाणवत होत. त्या माशांचे स्पर्श शहारून टाकणारे होते. क्षणार्धात ते मोहोळ, काळे काळे ठिपके वर वर जात नाहीसे झाले. त्यांची जवळपास बंद पडलेली हृदय परत धडधडायला लागली. एव्हढा बाका प्रसंग घडून सुद्धा प्रदीपने जबरदस्तपणे १६ खिळे ठोकलेच.

परत संध्याकाळी वर येताना एक अपघात होता होता वाचला. नेहमीप्रमाणे प्रदीपने संध्याकाळी चढाई थांबवली आणि माथ्यावर कॅंप नं. १ वर जाण्यास तयार झाला. माथ्यावरून जो दोर खाली सोडण्यात आला होता तो चढाईच्या रेषेत नव्हता. त्याचा मध्य चढाईपटूच्या डाव्या हाताला १०० फुट दूरवर होता. त्यामुळे चढाईपटूला त्या दोराच्या रेषेत येण्यासाठी एकतर स्विंग घ्यावा लागला असता, अथवा कोणीतरी त्याचा स्विंग नियंत्रीत करण जरुरी होत. सेकंड मेंन नियंत्रकाच काम करायचा. पण दुर्दैवाने किरणच्या हातून त्या दोराचे नियंत्रण सुटल्यामुळे प्रदीपला १०० फुटांचा जोरदार स्विंग आला आणि प्रदीप हवेत हेलखावे खाऊ लागला. त्या दोरावर परत नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात किरणचा हातसुद्धा चांगलाच भाजून निघाला. सुदैवाने कोणताही अपघात न होता प्रदीप सुखरूपपणे कॅंपवर पोहोचला.

From Kokankada 2006

१४ नोव्हेंबर, २००६ (एकोणिसावा दिवस):
चढाई पूर्णपणे आटोक्यात आली होती. आता शेवटच एक दगडी छत उरल होत. प्रस्तरारोहणातील सर्वात कठीण प्रकार. योगेश आणि आशिषने कामगिरी फत्ते करण्याचा विडा उचलला. ईथेच गिरीविराज हायकर्सच्या नावाची एक स्मरणिका ठोकण्यात आली. दुपारी तीन वाजेपर्यंत योगेशने १५ खिळे ठोकून त्या छताचा निकाल लावला.

From Kokankada 2006
From Kokankada 2006

त्याला आता माथा एकदम आवाक्यात आला होता. आता आणखी थोडासा जोर लावून योगेश माथ्यावर पोहोचू शकत होता. जीवनात एकदाच मिळणारी संधी. कोकणकड्यावर पाय ठेवून इतिहासात आपलं नाव अजरामर करू शकत होता. पण गिरीविराजच्या सर्व तरुण मंडळीने हा मान सह्याद्रीचा शिलेदार किरण अडफडकरांना द्यायचा हे आधीच निश्चित केले होते. म्हणून योगेशने चढाई थांबवून पुढची सूत्रे किरणच्या हाती दिली. किरणने सलग चार खिळे ठोकून शेवटची शिडी सोडली, ३५ फुटांची मुक्त चढाई करत मातीची ढेकळ आणि गवत यातून सावधपणे हालचाली करत संध्याकाळी सव्वा सहा वाजता कोकणकड्याच्या माथ्यावर पाऊल ठेवलं.

From Kokankada 2006
From Kokankada 2006

आयुष्यभराच स्वप्न साकार झाल होत. कोकणकड्याच्या सर्वात अवघड आणि अभेद्य मार्गावर १७० expansion bolt च्या सहाय्याने गिरीविराज हायकर्सच नाव कोरल गेल होत.

अवांतर:
एव्हढी मोठी मोहीम यशस्वी करण्यासाठी तेव्हढीच मजबूत बेसकॅंप टीम हवी. संस्थेचे संस्थापक सदस्य सुभाष पांडीयन, कै. संजय रेडकर आणि संदीप रहाटवळ यांनी इतरांच्या मदतीने ते आव्हान लीलया पार केले. अथक शारीरिक त्रासामुळे मोहीम अर्धवट राहण्याचीच चिन्हे दिसत होती, अशा वेळेस संजय नेहमीच धाऊन आला आणि चढाईपटूना मानसिक बळ देण्याच काम सुद्धा समर्थपणे पेललं. प्रवीण घुडे, अमृता राजे, योगेश आंब्रे, जेम्स, राजेश, हर्षद यांचेही बहुमोलाचे सहकार्य लाभले.

दुखः एकाच गोष्टीच आहे कि प्रायोजक मिळून सुद्धा या मोहिमेचे योग्य प्रकारे चलतचित्रण करू शकलो नाही. तत्कालीन उपलब्ध व्हिडीओ कॅमेऱ्याने (कॅसेटवाला) याचे चलतचित्रण केले आहे, पण दुर्दैव असे कि ज्याला हे काम सोपवले होते त्याने पहिल्या दिवशी हजेरी लावल्यानंतर तो जो घरी गेला तो थेट मोहिमेच्या शेवटच्या दिवशी परत हजर झाला त्यामुळे चलतचित्रणाची जबाबदारी सर्व नवशिक्यानीच पार पाडली.
या मोहिमेचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणजे खूपस साहित्य स्वतःच तयार करण्यात आले होते, अगदी बोल्ट आणि कॅराबिनर्ससुद्धा.

आपला नम्र
गिरीविराज हायकर्स - डोंबिवली


Thursday, February 3, 2022

गोएचला उर्फ कांचनगंगा बेस कँप ट्रेकची कहाणी

 1:12

सह्याद्रीत अनेक वर्षे भटकल्यावर आणि १०० च्या वर किल्ले फिरल्यावर हिमालयाचे वेध लागले होते. पण योग काही लवकर येईना. नाही म्हणायला तीन वर्षांपू्वी आमच्या सायकल ग्रुपसोबतच (ओबी, शिरीष इ. इ.) व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि हेमकुंडचा ट्रेक केला. गेली दोन वर्षे तर काय कोरोनानेच खाल्ली. पण गेल्या वर्षी माझा मामेभाऊ अमेय (यालाही तुम्ही ओळखता, कोकण, कोल्हापूर, जंगल भटकंती दरम्यानचा माझा साथी - या सगळ्याच्या लिंका खाली जोडणार आहे Happy ) याने उचल खाल्ली. कुठेतरी जाऊच या म्हणायला लागला. मलाही दोन वर्षे घरात बसून कोंब आलेले. म्हणलं, जावानू तो जावानू, मग घनघोर चर्चा आणि ती पुणे ते गोवा सायकल प्रवासापासून ते ह्षिकेशला जाऊन व्हाईट वॉटर राफ्टिंग, बंजी जंपीग पर्यंत कुठेही सरकत होती.

शेवटी एखादा मस्त हिमालयन ट्रेक करावा या निष्कर्षावर आलो. पण त्यांनतरही काही ठरेना. हर की दुन टाईप्स एखादा सोप्पा ट्रेक करावा का एकदम एव्हरेस्ट बेस कँपसारख्या धनुष्याला हात घालावा हे ठरेना. नोव्हेंबर म्हणजे दिवाळीच्या सुमारास जायचे ठरत होते आणि त्यावेळी फारसे हिमायलन ट्रेक्स नसतील असे वाटत होते पण जेव्हा शोधायला सुरुवात केली तेव्हा कळलं की नोव्हेंबर डिसेंबर मध्येही भरपूर हिमायलन ट्रेक्स असतात.

हा नको तो, तो नको हा, इथे जायला सोयीचे नाहीये, हा फारच सोप्पा आहे, हा फारच अवघड वाटतोय असे करत करत अक्षरश डोकी क्रॅक झाली. शेवटी अन्नपूर्णा बेस कँप किंवा गोएचला उर्फ कांचनगंगा बेस कँप या दोनवर येऊन स्थिरावलो. तरीही मनाची खात्री नव्हती आणि मग एक दिवस बसून दे दणादण फोनाफोनी केली.

गिरीप्रेमी संस्थेचे अध्यक्ष उमेश झिरपे, एकट्याच्या जीवावर एव्हरेस्ट मोहीम आखून ती यशस्वी करणारा भगवान चावले, सगरमाथाच्या एव्हरेस्ट मोहीमेदरम्यान कँपवर सपोर्ट स्टाफ असेलला माझा मित्र कुशल देशमुख, नाशिकचा अव्वल ट्रेकर राहुल सोनावणे आणि आपला मायबोलीकर हर्पेन. सगळ्यांना माझे दोनच प्रश्न होते, की किती अवघड आहे आणि मला जमेल का. यातले सगळेच जण मला व्यक्तिगतरित्या ओळखत होते. गेल्या तीन चार वर्षात मी एकही ट्रेक केला नव्हता, व्हॅली ऑफ फ्लॉवर तसा फार काही आव्हानात्मक वगैरे वाटला नव्हता. आणि सायकलवरून कन्याकुमारी ते पॉंडीचेरी व्हाया रामेश्वरम केले होते, पण त्यालाही कैक काळ लोटला होता. लॉकडाऊन नंतर अतिप्रचंड शैथिल्य आलेले होते.

सगळ्यांचे हेच म्हणणे पडले अवघड आहे पण अशक्य नाही, व्यवस्थित तयार केलीस तर करु शकशील. राहुल आणि कुशल खुप वर्षांपूर्वी हा ट्रेक केला होता त्यामुळे त्यांनी अगदी तपशीलवार माहीती दिली. पण नोव्हेंबर मध्ये थंडीने वाट लागेल असेही सांगितले. झिरपे मामा आणि भगवानने सिंहगड चढाई उतराईचा सराव कर म्हणजे रिदम मध्ये येशील असा मोलाचा सल्ला दिला. आता इतक्या दिग्गज मंडळींचे ऐकल्यावर माघार घेणे शक्यच नव्हते. त्यामुळे देवाचे नाव घेतले आणि ट्रेक द हिमालयाज संस्थेकडे बुकिंग करून टाकले. ६ नोव्हेंबर रोजी युकसुम पासून ट्रेकची सुरुवात होणार होती.

आता थोडक्यात ट्रेक विषयी -

कांचनजंगा (स्थानिक भाषेत खांगचेंगझुंगा म्हणजे पाच पवित्र, खजिन्याची शिखरे असलेला हिमपर्वत) हा जगातला तिसरा सर्वात उंच पर्वत (८,५८६ मी, २८,१६९ फुट). कांचनजंगाचा भाग ६०३२ चौ किमी एवढा प्रचंड आहे आणि हा भाग भारत, नेपाळ, भूतान, चीन या देशात पसरलेला आहे. कांचनजंगा अभयारण्य म्हणून हा सर्व भाग सुरक्षित आहे. कांचनजंगा बेस कँपला जाण्याचे दोन ट्रेक आहेत. एक नेपाळहून आणि दुसरा सिक्कीमहून. नेपाळमार्गे सोप्पा असला तर खर्चिक आहे. सिक्कीमकडून बेस कँपपर्यंत जायला तब्बल ११ दिवस लागतात आणि एकूण ९० किमी चे प्रचंड चढ उतार पार करावे लागतात. ट्रेक म्हणायला कांचनगंगा बेस कँप म्हणत असले तरी प्रत्यक्षात बेसकँप पर्यंत जात नाही. गोएचला पास इथवरच जाता येते.
युकसुम या सिक्कीम मधल्या गावापासून सुरु होणारा हा ट्रेक ५६७० फुटांवरून पुढे झोंगरी (१३,६०० फुट) आणि गोएचला पास (१५,१०० फुट) वर जाऊन पुन्हा आलेल्या मार्गाने युकसुमला येऊन संपतो. कुमाऊ, गढवाल सारखा इथल्या हिमालयाला पर्यटकांच्या गर्दीचे ग्रहण लागलेले नाही त्यामुळे इथला निसर्ग जास्त लोभसवाणा आहे.पण त्याचबरोबर सोयींचीही वानवा आहे. युकसुमनंतरचा पूर्ण प्रवास हा दऱ्याखोऱ्यातून होतो आणि मुक्काम तंबूतच करावा लागतो. त्यामुळे चार्जिंगला सोकावलेल्या जनतेची प्रचंड कुचंबणा होते. तसेच सामान वाहून नेण्यासाठी खेचर मिळू शकते पण अमरनाथ, कैलास मानस किंवा हेमकुंडसारखे त्यावर बसून जायला नाही. त्यामुळे पूर्ण ट्रेक हा पायीच करावा लागतो.
गोएचला ट्रेकचे अजून दुसरे महत्व म्हणजे हा ट्रेक करताना कांचनजंगाचे सुंदर दर्शन तर होतेच तसेच माऊंट पंडीम आणि इतर उंच अश्या पर्वतांचे दर्शन हा पास करताना होते. ऑक्टोबर-नोव्हेंबर हा ट्रेकिंग साठी तिथला सर्वात चांगला काळ.

टीटीएच च्या साईटवर या ट्रेकची विभागणी मॉडरेट ते डिफिकल्ट मध्ये करण्यात आली आहे आणि त्यासाठी फिटनेस आवश्यकता लागणार असल्याचेही दिसले. तातडीने काय फिटनेस लागेल ते पाहिलं आणि पोटात गोळाच आला. त्यात पहिलीच टेस्ट म्हणजे ४० मिनिटाच्या आत पाच किमी पळणे ही होती. बोंबला. मी तसा अधून मधून रन करतो आणि एकदा हाफ मॅरेथॉन पण पळालो होतो दोन वर्षांपूर्वी पण त्याला आता कैक युगे लोटली आहेत असे वाटत होते आणि मी अतिशय संथ गतीने पळतो, म्हणजे बघणाऱ्यांना कळणारच नाही की मी पळतोय, चालतोय का रांगतोय.
म्हणलं चला आपण कुठे आहोत ते चेक करूया म्हणून लगेच पाच किमी पळायलो गेलो तर जेमतेम ३ च किमी पळू शकलो. तेही निम्मावेळ चालत. झालं कल्याण, मी लगेच अमेयला फोन लावला म्हणलं मला नाही जमणार हा ट्रेक. तो शॉकमध्ये, म्हणे काय झालं, म्हणलं मी जेमतेम ३ किमी पळू शकलोय. तो म्हणे दादा अरे अजून एक महिना आहे आपल्याला जायला तोवर हळूहळू कर तयारी. पण मला माझी काही खात्रीच वाटेना.

एक दोन दिवस तसेच जाऊ दिले, थोडाफार व्यायाम, सूर्यनमस्कार घातले आणि परत एकदा रन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ४ किमी वर थांबलो. परत एक दिवस ब्रेक घेऊन पुन्हा एकदा पळालो आणि एकदाचे ५ किमी पूर्ण झाले आणि वेळ लागला ४९ मिनिटे. हायला, आता ही जास्तीची ९ मिनिटे कशी कमी करायची. पुन्हा एकदा अमेयला फोन, परत त्याने पेप टॉक देऊन मनाला उभारी आणली.

म्हणलं हे रनिंग काय आपल्या कपातला चहा नाही. आपण ट्रेकर आहोत तर ट्रेक करून स्टॅमिना वाढवू म्हणून सिंहगडला जायचे ठरवले. आणि त्याच दरम्यान झाली सपाटून सर्दी, घशात कफ साचला की बोलणे अशक्य व्हायला लागले. पण आता ठरवलं आहे तर माघार नको म्हणून शनी-रवि हे गर्दीचे वार टाळून सोमवारी सिंहगडला गेलो. सुरुवात तर व्यवस्थित झाली पण जिथे चढ खरा सुरु होतो तिथे फाफललो. विचार होता ५० मिनिटात होईल आपला. प्रत्यक्षात ४५ व्या मिनिटाला मी निम्मा गडही नव्हतो चढलो. ऑड दिवस असल्याने कुणीही नव्हते एकदम शांतता आणि त्याचवेळी मला जाम कफ साचून आला. इतका की श्वास घेता येईना, छातीवर प्रचंड दडपण आले. मला फुल्ल टेन्शन म्हणलं मला इथे हार्ट अटॅक आला आणि मी मेलो तर घरच्यांना कधी कळणार. मग ते टायमिंग गेले (फुल्या फुल्या) म्हणत बसलो, पाणी प्यायलो आणि श्वास नॉर्मलला येईपर्यंत वाऱ्याची सळसळ, पक्ष्यांचे आवाज वगैरे ऐकत बसलो. नॉर्मलला आल्यावर परत एकदा चालू लागलो आणि कसेतरी मरत मरत वरपर्यंत पोचलो. वेळ लागला दिड तास. अगदीच भिकार कामगिरी. तिथे रेंज नव्हती नैतर तिथूनच परत अमेयला फोन गेला असता. Happy

नंतर नंतर मी त्याला इतका पिडला की मी काही हा ट्रेक पूर्ण करणार नाही, निम्म्या वाटेत झोंगरी येथे थांबेन तुम्ही परत येताना तुमच्यासोबत परत येईन इथवर सांगून झाले. अर्थात बोलत असलो तरी प्रयत्न सोडले नव्हते. नेमाने रनिंग, पायाचे व्यायाम, टेकडी चढणे आणि दर आठवड्याला कितीही कंटाळा आला तरी सिंहगड. दरम्यान झिरपे मामांना भेटायला गेलो.

आता या व्यक्तीबद्दल थोडं सांगितले पाहिजे. उमेश झिरपे यांनी माऊंट एव्हरेस्टसह जगातील आठ अष्टहजारी शिखरांवरील यशस्वी मोहिमांचे नेतृत्व केले आहे. अशा या आठ अष्टहजारी मोहिमांचे नेतृत्व करून त्या मोहीमा यशस्वी करणारे गिर्यारोहक उमेश झिरपे हे भारतातील एकमेव मोहीम नेते आहेत. त्यांच्या बद्दल खूप काही लिहीता येईल पण एक गोष्ट मनाला भिडली ती म्हणजे त्यांच्या एव्हरेस्टच्या मोहीमेदरम्यान खराब वातावरणामुळे कँप ३ वर जास्त काळ राहावे लागणार ही गोष्ट स्पष्ट झाली आणि विचित्र परिस्थिती ओढवली. तुकडीतील सर्वांना जास्तीचे दिवस पुरेल इतके ऑक्सिजन सिलेंडर सोबत नव्हते आणि खाली बेस कँपवर येऊन परत घेऊन जाणेही शक्य नव्हते. अशा वेळी झिरपे मामांनी आपल्या वाटचे सिलेंडर आपल्या युवा सहकाऱ्यांकडे दिले आणि एव्हरेस्ट चढाईचे स्वप्न शक्य असताना अतिशय मोठ्या मनाने ते बेस कँपला परतले. इतक्या वर्षांची मेहनत, आर्थिक, शारिरिक अडथळे पार करून इथवर आल्यावर इतक्या दिलदारपणे हक्क सोडून द्यायला खरेच खूप मोठे काळीज लागते.

तर त्यांनी सगळी माहीती वगैरे घेतली आणि थंडीची काय तयारी केली आहेस विचारलं. खरं सांगायचे तर मी काहीच तयारी केली नव्हती. कारण तसा काही अंदाजच नव्हता किती असेल थंडी याचा. मी आपले स्वेटर आणि एक जाकिट वगैरे नेऊ असले काहीतरी थातूरमातूर उत्तर दिले. मग त्यांच्या लक्षात आले की माझी शून्य तयारी आहे. म्हणाले तिथे मायनस मध्ये असणारे तापमान आणि पुरेशी तयारी न करता गेलास तर आजारी पडशील, ट्रेक सोडून परत यावं लागेल. हायला मी बिचकलोच हे ऐकून. मग त्यांनी त्यांच्याकडचा थर्मलचा एक सेट, ग्लोव्ज आणि एक डाऊन फेदर जॅकेट दिले. शिवाय त्यांच्या नेहमीच्या वापरातली ट्रेकिंग सॅक (खरे तर तिच घ्यायला म्हणून मी गेलो होतो कारण माझ्याकडे इतकी मोठी सॅकच नव्हती. आपल्या सह्याद्रीत इतक्या मोठ्या सॅक कधी लागतच नाही आणि नव्या सॅक पाच सहा हजार वगैरे ला होत्या) आणि ट्रेकिंग पोल दिले. मला ते घेताना अक्षरश लाजल्यासारखेच झाले. मी काय असा मोठा पराक्रम वगैरे करायला चाललो नव्हतो पण मी चाललोय याचा माझ्यापेक्षा त्यांनाच जास्त आनंद झाल्याचे जाणवत होते.

त्यांनी विचारले सिंहगड करतोय ना, म्हणलं हो हो, तर म्हणे किती वेळात, म्हणलं तेवढं विचारू नका. म्हणे करत रहा सवय झाली की होईल. आणि मी तो सल्ला मानल्याचा खरेच खूप फायदा झाला. पुढच्या तीन आठवड्यात नेमाने सिंहगड वारी करत राहीलो. ट्रेकिंग पोल हाही एक नवा प्रकार माझ्या मदतीला आला होता. खरे तर नुसती काठी, पण तिच्या व्यवस्थित वापराने गुढग्यांवर येणारा ताण बराच कमी होतो. हे अधीच का नाही वापरले असे झाले मला. आणि त्याने वेगात चढताही यायला लागले. पहिल्या वेळेपेक्षा बऱ्याच कमी वेळात चढून व्हायला लागला सिंहगड.

नंतर एकदा खच्चून भरलेली सॅक घेऊन पण सिंहगड केला. त्यावेळी एक काकू-ताई भेटल्या. त्यांनी माझे शूज, सॅक आणि पोल बघून ओळखलंच. म्हणे कुठल्या मोहीमेची तयारी. मग सगळे सांगितले तर म्हणाल्या पहिल्यांदाच हिमालयन ट्रेक करणार असला तर अजिबात न लाजता खेचर करा सामानासाठी. इतके वजन घेऊन एक दोन दिवस उत्साहात चालतो नंतर पार जीव जातो. एकदा तुम्हाला तुमच्या फिटनेस चा अंदाज आला की मग पुढचे ट्रेक तुम्ही ठरवू शकाल किती वजन घेऊन चालायचे. आणि हाही सल्ला मानला आणि त्याचाही अफाट फायदा झाला. त्या मायबोलीवर असल्या तर मला मनापासून त्यांना धन्यवाद म्हणयाचे आहे. कारण त्या गडबडीत मी त्यांचे नाव विचारायचे विसरलो.

दरम्यान रन पण करत होतोच. रनिंगच्या मित्रांनाही पिडून झाले की ४० मिनिटांच्या आत ५ किमी करायचे आहेत काय करू. ते म्हणाले ती काय जादूची छडी नाही, सराव आणि व्यायामाने आपोआप वाढेल पेस, घाई करू नको. म्हणलं आठवड्यावर ट्रेक आलाय आता नाही तर कधी करू घाई. पण ४९ वरून जवळजवळ ४२ मिनिटांवर आणली होती वेळ. म्हणलं ठिके अगदी काठावर नापास. नेऊ रेटून कसे तरी. आणि ट्रेक होईपर्यंत मला एकदाही ४० मिनिटांच्या आत जमले नाही.

त्यामुळे शेवटपर्यंत मला हा ट्रेक काही जमणार नाही. उगाच उत्साहाच्या भरात पैसे भरले आणि आता ते वाया जाणार आणि अर्धवट ट्रेक करून येण्याची नामुष्की ओढवणार असेच वाटत होते. पण आता आलीया भोगासी म्हणत सामान प्रचंड सॅकमध्ये भरले आणि मुंबईला जायला निघालो. आम्ही मुंबईवरून दुरान्तोने कोलकता, तिथे एक दिवस मुक्काम करून दुसरे दिवशी ट्रेननेच रात्रभराचा प्रवास करून पहाटे न्यू जयपायगुरी स्टेशन गाठणार होतो. तिथे आम्हाला टीटीएच्या जीप येणार होत्या. हा प्रवास ट्रेक इतकाच भन्नाट झाला आणि त्यात काय गोंधळ गमतीजमती झाल्या ते पुढच्या भागात लिहीतो.


दार्जिलिंग वरून खूप अस्पष्ट दिसतं. आम्हाला मसुरीला फसवले होते ते बघा कांचनजुंगा म्हणून Lol
Kanchajunga.jpg


मुंबईला मामा-मामी कडे पोचलो तर वेगळाच प्रश्न समोर उभा होता. आमच्या आज्जी - आजोबांना आम्ही ट्रेकला चाललोय हे सांगितले होतो पण कधी ते नव्हतेच सांगितले. आणि ६ नोव्हेंबरला युकसुमला पोचायचे तर ट्रेनचा प्रवास लक्षात घेऊन आम्हाला ऐन दिवाळीतच बाहेर पडावे लागणार होते. ते कळताच आज्जीने मोडता घातला. काय कसलं सोन्यासारखी दिवाळी करायची आपल्या लोकांच्यात तर घर दार नसल्यासारखे बाहेर कसले जाता, डोंगरात. अजिबात जायचं नाही दिवाळी संपेपर्यंत. अरे देवा, तिची समजूत काढेपर्यंत नाकी नऊ आले. शेवटी आम्ही मित्राच्या घरी दिवाळी करणार आहोत ते खूप वर्षे बोलावत आहेत असे काहीतरी सांगून आम्ही तिला मनवले.

दरम्यान, ती दळभद्री आरपीसीटीआर टेस्ट केली. कारण ट्रेकच्या वेबसाईटवर आणि त्यांनी पाठवलेल्या मेलमध्ये पुणे मुंबईवरून येणाऱ्यांना ती अनिवार्य असे लिहीले होते. उगाच त्यावरून राडा नको म्हणून बळच केल्या आणि त्या शेवटपर्यंत कुणी विचारल्या पण नाहीत. आम्हीच उगाच त्या टेस्टच्या प्रिंट काढून कुठे द्यायच्या ते विचारत होतो. आता आणल्याच आहेत तर ठेवा म्हणाले. त्या दरम्यान मला लक्षात आले की मी माझ्या एसएलआरची बॅटरी घरीच विसरुन आलोय. हाय रे दैवा हा काय घोळ झाला. आता काही करणेही शक्य नव्हते. नविन बॅटरी विकत आणणे किवा कॅमेरा घरी ठेऊन जाणे. बरे त्यांच्या बॅटर्याही स्वस्तात येत नाहीत. बरे घेऊन ती डबल बॅटरी बळच घरी पडून राहणार. नसता वैताग झाला. मग इकडे तिकडे कुणाकडे आहे का तात्पुरती घेऊन जायला बॅटरी अशी शोधाशोध केली तर आपल्या मायबोलीकर जिप्स्याने धक्काच दिला. मला म्हणाला, माझ्याकडे नाहीय तुझ्या कॅमेराची पण तुला हवा असेल तर माझा कॅमेरा घेऊन जा. बापरे त्याचा नवा कोरा लाखभराचा कॅमेरा तो इतक्या विश्वासाने मला हिमालयात घेऊन जा सांगत होता. मला त्या विचाराचेच दडपण आले. मी म्हणलं मी नसतो देऊ शकलो इतक्या सहजपणे कुणाला. तर म्हणे, मला विश्वास आहे तु नीट वापरशील, एरवी कुणाला नसता दिला. मला असले बावनकशी मित्र जोडल्याबद्दल खरेच खूप बरे वाटले.

बावनकशी वरून आठवले. ट्रेकची तयारी सुरु असताना कुशलने त्याचे एक हिवाळी जॅकेट आणून दिले, एकदम जाडजूड. त्याचे वजन बघूनच मी ते न्यावं का न न्यावं असा विचार करत होतो. पण मुंबईपर्यंत नेलं आणि तिकडे जाऊन अमेयला विचारले हे घेऊ का रे सोबत. तो एकदम उडालाच, म्हणाला अरे हे मामुट चे जॅकेट आहे, कुणी दिले, म्हणलं मित्राने. मला म्हणाला उच्च दर्जा. इथल्या मार्केट मध्ये १०-१२ हजारला असेल हे आरामात. हायला मी उडालोच. मग कुशलला फोन केला म्हणलं भावा अरे सांगशील का नाही, महागातले आहे जॅकेट म्हणून, तर म्हणे त्यात काय सांगायचे. तोच प्रकार आपल्या हर्पेनचा - त्याच्या चादर ट्रेक दरम्यान त्याला पोंचो चे महत्व कळले होते त्यामुळे त्याने मला आधीच बजावून ठेवले होते की त्याच्याकडचे पोंचो घेऊन जा म्हणून आणि मी आळस करीन अशी खात्री वाटल्याने मित्रासोबत तो पोंचो, हेडलँप, आणि अँटी फंगल पावडरचा अक्खा डबा पाठवून दिला घरी. म्हणाला तिथे १२ दिवस हीच अंघोळ, भरपूर पावडर लाव सगळीकडे. आणि त्याची सूचना शिरोधार्ध मानून रोज पावडरने अंघोळ करत होतो आणि एरवी ट्रेक दरम्याने जे रॅशेस येत यायचे ते अजिबातच आले नाहीत. आणि या सगळ्या मित्रांचे आभार मानण्यापेक्षा त्यांच्या ऋणातच रहायला आवडेल मला.

आता पुढचा धक्का होता प्रवासाचा. आम्हाला दोघांनाही प्रवासाची आणि त्यातूनही ट्रेन प्रवासाची विलक्षण आवड आहे. त्यामुळे आम्ही विमानाचे न करता मुद्दाम इतका लांब प्रवास डुरांतोने करायचे ठरवले. मस्त खायचे प्यायचे, ब्लॅंकेट घेऊन पडून रहायचे अशी सुखस्वप्ने बघत स्टेशनवर पोचलो तेव्हा शॉक. कोविड मुले आता गाडीत खायला प्यायला, चादर ब्लॅंकेट उशी काहीही देत नाहीत आणि हे तसे बुकींग करताना मेसेज केलेला होता म्हणे, आम्ही दोघांनीही तो पाहिला नाही आणि हा प्रवास एन्जॉय करायला म्हणून रेल्वे निवडलेली तिकडेच असा पचका झाला तयामुळे बेक्कार मूड ऑफ झाला. सगळी मज्जाच गेली राव. भयानक चिडचिड आणि स्वताचच राग येत होता की असा कसा बावळटपणा केला आपण. कितीतरी वेळ कोणाशी बोलू नये असे वाटत होते. आता रात्री अंगावर काय हा प्रश्न होताच. मला झोपताना पातळ का होईना चादर लागते अंगावर त्याशिवाय विचित्र वाटते. आणि त्या एसी डब्यात चांगलेच गार झालेले. त्यात दरवाजाला लागूनचा साईड बर्थ माझ्या वाट्याला. सतत कोणीतरी खडाड करून दार उघडून यायचे किंवा जायचे. त्यात एक भक्कम बाईने झोपेच्या अंमलात इलेक्ट्रिक पॅनेल का काहीतरी होते तेच दार जोर लावून उघडले. त्याच्या खिट्टीसकट ते खाली आले. मग मी आणि अजून एकाने ते कसेतरी खटपट करून जागेवर बसवले पण गाडीच्या हेलकाव्याने ते मधेच खाली यायचे आणि मला त्या आवाजाने जाग यायची. एकूणात फारच वैताग झाला.

शेवटी सॅकमधले गरम कपडे अंगावर घालून तसाच गुरफटून कसा तरी वेळ काढला. रात्री एक स्टेशन वर जेवण मिळाले पण दुसऱ्या दिवशीचा प्रश्न होताच. तो दिवस होता नरकचर्तुदशीचा. अभ्यंगस्नान वगैरे विषयच नव्हता पण भल्या पहाटे उठून मस्त ब्रश वगैरे करून फराळ करायला घेतला. आई आणि माझ्या मामीने आम्हाला बॅग भरेल इतका फराळ दिला होता, तो असा उपयोगी पडला, चकल्या, करंजी, लाडू, चिवडा - वाह वा, घरापासून दुर असूनही घरी असल्याचा फिल आला.

आणि त्या अख्ख्या दिवसभर आम्हाला काहीही मिळाले नाही दुसरे. एका सहप्रवाशाने सांगितल्यानुसार अॅप डाऊनलोड करून त्यावर जेवण ऑर्डर केले. ते आपल्या डब्यात, जागेवर आणून देतात म्हणे. कुणीही आले नाही. नशिबाने पैसे भरले नव्हते. दिवसभर फक्त फराळ खात राहीलो, आणि अधून मधून चहा कॉफी वाले फिरत होते त्यांच्याकडची कॉफी रिचवत राहीलो.

अशाच अंबलेल्या चिंबलेल्या अंगाने कोलकाता गाठले. रुमवर बॅगा टाकून तडक जेवायला गेलो.

माझी एक मैत्रीण कोलकतावासी आहे, तिने सजेस्ट केलेले हॉटेल अर्सलान जवळच होते आणि खूप प्रसिद्ध होते म्हणे. बरेचदा ही अशी ठीकाणी ओव्हरहाईप्ड असतात असा अनुभव, पण हे अपवाद निघाले. अक्षरक्ष जिभ आणि पोट तृप्त झाले इतके सुंदर चिकन, बिर्याणी आणि वरती फिरनी. तुडुंब पोटाने रुमवर आलो तर वेगळा वैताग. बेसिन तुंबलेले. मग मॅनेजर ला कळवले तर त्याने माणूस पाठवला. त्याने खिटपिट करूनही काही जमेना तासभर, तेव्हा म्हणाला रुम बदलून देतो. मग त्या अजस्त्र सॅक घेऊन गेलो दोन मजले उतरून तर त्या खोलीची कळा आधीच्या खोलीपेक्षा वाईट, कसला तरी वास मारत होता. म्हणलं आधीची चालेल निदान झोपायला बेड तरी चांगला होता. मग परत त्या खोलीत. मग कळलं गरम पाणी येत नाहीये . परत खटपट किटकीट, मग मॅनेजर म्हणाला परत रूम वेगळी देतो, आता अमेय जाऊन बघून आला दोन तीन रूम पण सगळ्या भयानक आहेत म्हणाला. यात साडेबारा वाजून गेले म्हणलं एक एके बादली गरम पाणी आणून दे कसेतरी. हो हो म्हणत त्याने शेवटी रात्री एक वाजता कोमट पाणी आणून दिले त्यात केल्या कशातरी अंघोळी आणि झोपलो.

दुसरा दिवस काही विशेष नाही. रहायला पार्क स्ट्रीटला होतो, तिथे फिरलो चालत, खादाडी केली, व्हिक्टोरिया मेमोरियल, प्रिन्सेप घाट असं काहीबाही पाहिलं.

माझी मैत्रीण भेटायला आलेली, ती काही काळ पुण्याला राहीली होती आणि तीला मग सांभाळून आणलेली चितळे बाकरवाडी दिली, जाम खुष. जेवायला गेलो, भरपूर गप्पा आणि बियर आणि जेवणाच्या नादात किती वाजलेत लक्षातच नाही, 10 वाजता ट्रेन होती आणि 9.30 ला आमची जेवणे सुरू होती. घडाळ्याकडे नजर गेली तर हबकलोच. पटापट पुढचं जेवण पार्सल केलं आणि टॅक्सी शोधायला धावत सुटलो. कसेतरी एकाला पटवला, वाटेत आमची रूम होती तिथून बॅगा उचलल्या टॅक्सीत टाकून स्टेशन गाठायचं आटापिटा. आता तुफान वेळेची शर्यत. एकेक मिनिटं इतका महत्वाचा होता, ही ट्रेन मिस झाली असती तर ट्रेकच बोंबल्ला असता. आपण इतके कसे निवांत बसलो म्हणून चिडचिड होत होती. अक्षरशः गाडी सुटायला एक मिनिटं बाकी असताना स्टेशन मध्ये आलो आणि फुल्ल स्पीड ने सॅक पाठीवर घेऊन दौड मारली. वाटेत सरको खिसको असा आरडाओरडा सुरुच होता. वाटेत येणाऱ्या लोकांना ढकलत कसेतरी गाडीपर्यंत आलो तर ती सुटलीच होती. अमेय माझ्यापेक्षा फास्ट, तो पळत गेला स्पीडने आणि गाडीत चढला आणि त्याला मी ओरडून म्हणलं हात दे. माझा श्वास पार गेला होता, ते वजन घेऊन मी अजून पाच पावले पळू शकलो असतो जास्तीतजास्त. मग तो दारातून बाहेर आला अर्धा आणि हात पुढे केला आणि तो धरुन मी कसाबसा आत घुसलो. डीडीएलजे चा सिन झाला पार, फक्त काजोल ऐवजी दाढीवला मी. आणि त्यावर बेक्कार हसलो. Happy

या गाडीत पण तोच वैताग होता, ना ब्लँकेट ना काही, पण यावेळी मानसिक तयारी होती. कशीतरी रात्र काढली. म्हणजे माझ्या मते कशीतरी कारण अमेय म्हणाला तु छानपैकी घोरत होतास. म्हणलं असेल बाबा. सकाळी न्यु जैपैगुरीला पोचलो. तिथेच आम्हाला ट्रेक वाल्यांच्या गाड्या न्यायला येणार होत्या. पण नंतर कळलं की त्यानी हे काम स्थानिक जीपचालकांना आऊटसोर्स केलं होतं त्यामुळे सगळेच इथे जमून मग युकसुम ला जाणार नव्हते तर काही थेट युकसुमला पोचणार होते. मग त्या प्रचंड गर्दीत आणि बाहेर पार्किंगमध्ये त्या जीपवाल्यांना शोधायची खटपट. समोरच आमच्यासारखी भली थोरली सॅक घेऊन जाणारी मुलगी दिसली. म्हणलं तिला फॉलो करू तर ती फोन लावत होती आणि माझाच फोन वाजला. आयोजकांनी येणाऱ्या सगळ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप केला होता. त्यात बहुदा आशिष म्हणून माझं पहिलं नाव असाव. तिने मलाच विचारलं ये कहा पै जाना ना गाडी के लिये. मला त्यावेळी अक्षरश फिल्मी डायलॉग मारायाची प्रचंड उबळ आलेली. की पलट म्हणून. पण ओळख ना पाळख, उगाच आपदा, म्हणून म्हणलं आम्ही इथे इथे उभे आहोत. हो ना भलतीच कुणीतरी असली तर काय घ्या. पण तीच निघाली.

मग अजूनही बाकीचे इकडे तिकडे गोंधळलेल्या चेहऱ्याने उभे ट्रेकर दिसले. त्यांना सगळ्यांना जमा करून आणि जीपवाल्याला शोधून आम्ही निघालो. न्यु जैपैगुरी ते युकसुम अंतर आहे २५० किमी. पण हिमालयात अंतरावर कधीच ठरवता येत नाही. आणि अपेक्षीत होते तसेच झाले. या प्रवासात अक्षरश अख्खा दिवस गेला.

वाटेत कुठल्यातरी ठेल्यावर मोमो, आणि महास्फोटक चवीची चटणी खाल्ली. लेमन टी प्यायलो आणि जीपमध्ये कोंबुन प्रवास संपायची वाट बघू लागलो. सहप्रवासी ट्रेकर सगळे बंगाली होते आणि त्यांची अखंड टकळी सुरु होती. टकळी थांबली की पेंगायचे, उठले की परत बडबड सुरुच.

मला ओड्याची आठवण येत होतीच. एके ठिकाणी थांबलो होतो तिथे हा भुभ्या होता, त्याला ये म्हणलं जवळ तर येउन चिटकलाच. मलाही इतकं बरं वाटलं आणि त्यालाही

युकसुमला पोचलो तो पार अंधार झालेला. तिथे आमच्या स्वागताला एकजण उभा होता. त्यांना विचारलो ट्रेक लीडर किधर है, तर म्हणे मै ही हू, मेरा नाम है राहुल, नाम तो सुना ही होगा..... च्या मायला या शारुखच्या सगळीकडे फिल्मीपणा करत पोचलाय. कालपासून त्याला नुसत्या उचक्या लागत असणार.

असो, तर गेल्या गेल्या रुमचे वाटप झाले. चार पाच जणांना मिळून एक खोली दिली होती. त्यामुळे चार्जिंगसाठी जोरदार मारामारी झाली. एक बंगलोर वरुन आलेला त्याने पार आयोजकांना धारेवरच धरले. म्हणे साधे चार्जिंग नाही देता येत. त्यावर ट्रेक लीडर म्हणाला, ट्रेकला आलाय पिकनीकला नाही, इथे गैरसोय होणारच. तर म्हणे, ट्रेक उद्यापासून सुरु आहे, आज मला चार्जिंग मिळालंच पाहिजे. यावर ट्रेक लिडर हरलाच. मग जेवणाच्या वेळी ओळख परेड झाली. टोटल २४ जणांचा ग्रुप होता आणि बहुसंख्य २०-३० वयोगटातले होते. चाळीशी पार केलेले आम्ही तिघेच. त्यातले दोन डॉक्टर होते. बऱ्याच लोकांनी या आधी हिमालायातले ट्रेक केले होते. आमच्यासारखे पहिल्यांदाच उठून गोएचला करणारे अगदी कमी होते. ट्रेकसाठी कुणी काय काय तयारी केली हे पण सांगा असे लीडर म्हणल्यावर एकीने सांगितले मला कामातून जास्त वेळ मिळत नाही त्यामुळे मी बॉडीला रेस्ट देण्यासाठी भरपूर झोपले. यावर लीडर ने बहुदा मनात डोक्यावर हात मारुन घेतला असावा. मी मात्र खुष झालो, असाच वल्ली ग्रुप हवा ट्रेक करायला, तर धमाल येते. थंडी होती तशी बऱ्यापैकी पण लीडर म्हणाला हे ट्रेकमधले सर्वात उबदार ठिकाण आहे. जसेजसे आपण जाऊ वरती तशी थंडी वाढत जाणार आहे. झोंगरीला मायनस ८ आहे तापमान आत्ता. ते ऐकून पोटात गोळाच आला. पण म्हणलं आता आलोय तर जायचं. इतके लांब आलोय तर माघार नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघायचे म्हणून सगळी आवराआवरी केली आणि रुममधल्या उबदार रजाया घेऊन गपगार झोपलो.

 

दिवस पहिला - साचेन

Submitted by आशुचँप on 5 February, 2022 - 13:48

दुसऱ्या दिवशीची पहाट उगवली तीच लगबगीने. कुणीतरी दार ठोठावत होते. कुणीतरी उघडले, कुणीतरी सांगितले सब को तयार होने के लिये बोला है, ओर चाय पिने के लीये आ जाव. कुणीतरी म्हणाले, ठीक है आते है. परत दार लावल्याचा आवाज. पण त्यातल्या चाय शब्दाने माझी झोप उडाली. एरवी मी तसा कॉफी प्रेमी पण बाहेर गेल्यावर विशेषत ट्रेकला तर मग चहा ( त्याचे कारण ट्रेकवर कधीच चांगली कॉफी मिळत नाही हेही आहे). मोठ्या अनिच्छेने ते उबदार पांघरूण दूर करून उठलो, आणि रुमबाहेर आलो तर एकदम शिरशीरी आली. चांगलाच गारठा होता बाहेर. तसाच हाताची घडी करून कँटीन कडे गेलो, तिथे एकजण गरमागरम चहा स्टीलच्या कपात ओतून देत होता. दोन्ही हातात तो कप पकडून मी त्या उबदार द्रव्याचा आनंद घेऊ लागलो. बाकीचे एकेक जण येत होते, काही तिकडेच झोपले होते का काय अशा आरामात बसले होते. गुड मॉर्निंग वगैरे करून झालं.

मग लीडर उगवला आणि म्हणाला जे लोकं सामान खेचरावर देणार आहेत त्यांनी द्या पटकन, कारण पोर्टर आणि खेचर आधी निघणार. मला आठवलं आपण याचे पैसे भरले आहेत आणि आपल्याला द्यायचं आहे. मग पळत पळत रुमवर गेलो. माझी एक चांगली सवय म्हणजे मी कपडे, गरम कपडे, बाकी कपडे, आणि इन जनरल सगळ्याच वस्तु कॅटेगिरी करून वेगवेगळ्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये भरून ठेवतो. त्यामुळे ऐन वेळी सॉर्टिंग करणे वगैरे करावे लागत नाही. आणि वाईट सवय म्हणजे मी कुठल्या पिशवीत काय भरून ठेवलं आहे ते विसरतो, त्यामुळे मला प्रत्येक पिशवी उघडून चेक करावं लागतं यात काय आहे. आणि कुठल्या पिशवीत काय आहे हे पाठ होईहोईपर्यंत ट्रेक संपतो.

तर ठरल्याप्रमाणे मी मोठी सॅक खेचरावर द्यायला तयार केली. अमेय आधी म्हणाला होता की तो पूर्ण सॅक घेऊन करणार पूर्ण ट्रेक. मग त्याला कसेतरी मनवले आणि त्याच्या सामानातले वजनी सामान माझ्या सॅकमध्ये कोंबले. एकूण ११ किलोपेक्षा जास्त वजन असता कामा नये असे आम्हाला बजवाण्यात आले होते. माझ्या मते ते कमीच होते. मग माझ्या छोट्या सॅकमध्ये वस्तु कोंबल्या. ट्रेकला आणि तोही हिमालयातल्या कधीही हलक्यात घेऊ नये हे अनेक जणांनी सांगितल्याने आणि वाचल्याने मी जय्यत तयारी केली होती. त्यामुळे माझ्या डे सॅकमध्ये एक पोंचो, एक थंडीचे जॅकेट, एक स्पेअर टीशर्ट, मोजे, एक कानटोपी, थोडं खाऊ पिउचे सामान, माझा अवजड एसलेरआर आणि दोन पाण्याच्या बाटल्या. इतकं भरल्यावर ती सॅकसुद्धा पाच किलोच्या वरती गेली.

या ट्रेकचा वैताग म्हणजे वाटेत खूप झरे, ओढे वगैरे नाही लागत, अगदीच कमी आहेत. त्यामुळे पाणी सोबत कॅरी करावेच लागते. आणि त्रास होऊ नये आणि लवकर अक्लटमाईज व्हायला भरपूर पाणी पीत रहा, तहान लागलेली नसतानाही असा सल्ला अनेकांनी दिलेला. त्यामुळे दोन लीटर पाणी मी कायम सोबत ठेवत होतो. नंतर नंतर मग थंडी वाढू लागली तसे फ्लास्कमध्ये गरम पाणीही नेऊ लागलो. तर अशा रितीने अवजड सामान खेचरावर आणि थोडेसे जड सामान पाठीवर लादून सज्ज झालो. त्याआधी नाष्ट्याला जॅम सँडविच आणि परत वरती चहा असे रिचवले. ट्रेकला काय काय आणायचं या यादीत एक टिफीन बॉक्सपण होता म्हणे, तो काही आम्हाला दिसला नाही पण तिकडे गेल्यावर सगळ्यानी आणलेला दिसला. नशिबाने आम्ही ज्या हॉटेलवजा लॉजमध्ये उतरलो होतो त्याच मालकाकडे काही सोवेनियर विकायला होते त्यात एक खाऊचा डब्बा दिसला. अक्षरश केजीच्या बाळांना देतात तसला, म्हणलं काम भागलं.

ट्रेक सुरु होण्यापूर्वी लीडरने सर्वांना एका गोलात उभे करून बऱ्याच सूचना केल्या. त्यात मुख्य म्हणजे, हा ट्रेक आहे पिकनिक नाही, वाटेत कचरा करू नका, चढ आणि उतार असतील तिथे सांभाळून चाला, फोटोच्या नादात सुरक्षीतता फाट्यावर मारू नका, खेचरे किंवा पोर्टर क्रॉस होत असतील तर डोंगराच्या बाजूला सरकून त्यांना जायला जागा द्या इ. इ. मग High-altitude pulmonary edema (HAPE) आणि High-altitude cerebral edema (HACE) बद्दल सांगूनही बरेच घाबरवले. कुणालाही कसलाही त्रास होत असेल तर लपवू नका, आणि तातडीने लीडर किंवा स्टाफ ला सांगा. या भागात हेलिकॉप्टर नाहीत त्यामुळे रेस्क्यु सुद्धा पायीच करावे लागते आणि त्यात काहीही होऊ शकते. वगैरे वगेरे. काहींनी सिरियसली ऐकले काहींना टिवल्या बावल्या केल्या. मी याबद्दल बरेच वाचले होते त्यामुळे मीही कर्तव्यभावना म्हणून ऐकले. सगळ्यांना कधी एकदा ट्रेक सुरु होतोय असे झालेलं. मग बजरंगबली की जय म्हणत सगळे चालू पडले.

लीडर सगळ्यात पुढे आणि बुधाभाई नावाचा एक शेर्पा सगळ्यात मागे, यामध्ये आमची २४ डब्ब्यांची ट्रेन. कुणीही लीडरच्या पुढे जायचं नाही आणि बुधाभाईच्या मागे रहायचे नाही असे सांगण्यात आले आणि प्रत्येकजण आपापला पेस पकडून चालू लागला. उत्साही मंडळी लीडरच्या पावलावर पाऊल टाकून पुढे सरकली तर आमच्यासारखी मध्यम गटातली त्यांच्या मागे आणि एकदम निवांत कारभार असलेले सगळ्यात शेवटी असे करत ट्रेक एकदाचा सुरु झाला. युकसुम गाव जसे मागे पडले तसा वळणावळणांनी रस्ता थेट डोंगरात आणि दाट झाडीत घुसला. हा सगळा भाग कांचनगंगा अभयारण्यात येतो, त्यामुळे अगदी सह्याद्रीतलाच जंगल ट्रेक करतोय का काय असे वाटावे अशी परिस्थिती. तशाच बारक्या वाटा, दोन्ही बाजूला घनटाट झुडपे, मधूनच वाहणारे ओढे आणि वर गेल्यावर दिसणाऱ्या खोलवर दऱ्या आणि डोंगरांचे विहंगम दृश्य. फक्त इथे जाणवण्याइतपत थंडी होती आणि डोंगरांवर बर्फाचे खोबरे शिवरले होते.

वाटेत पहिला झुलता पूल आणि कांचनगंगा अभयारण्याचे गेट लागले.

आणि तिथे काळा कुत्राही नव्हता असे कोणी म्हणू नये म्हणून अक्षरश तिथे एक काळा कुत्रा होता. तो नंतर आमच्यासोबत सगळीकडे हिंडला त्याचे नाव कालू. मी आपला बेबी स्टेप्स टाकत, श्वासावर नियंत्रण ठेवत एकेक पाऊल टाकत निवांत चालत होतो. युकसुम समुद्रसपाटीहून ५६७० मी आहे आणि आम्ही ८ किमी चा ट्रेक करून ७२०० फुटांवर पोचणार होतो. एलेव्हेशन गेन व्यवस्थित होता त्यामुळे लीडर कितीही म्हणाला ज्यादा चढाई नही है तरी मला माहीती होते की असणारे व्यवस्थित. आणि तो अंदाज खरा ठरला, तब्येतीत चढ आणि तितकेच खोल उतार होते.

मध्ये शुशे धबधबा लागला. आणि तो पर्क नदीला जाऊन मिळतो असे लीडर म्हणाला. मग परत प्रचंड चढ आणि दुसऱ्या झुलत्या पुलावर जायला तितकाच खोल उतार.

दरम्यान, एकेक सहप्रवासी कळत चालले होते. एक माऊंटन कपल म्हणता येईल असे जोडपे होते. दोघांच्या अंगावर गुंजभरही फॅट्स नसतील. दोघेही प्रचंड काटक आहेत दिसत होतेच आणि तितक्याच सफाईदारपणे चालत होते. दोघांनाही ट्रेकिंगचा खूपच अनुभव होता हे त्यांनी ओळख परेडच्या वेळी सांगितले होते. त्यांची चांगली ओळख करून घ्यावी असा एकदा विचार आलेला पण त्यांनी तशी काही संधीच दिली नाही. दोघे एकमेकांच्या आकंठ प्रेमात होते आणि सतत आपल्याच विश्वात होते. म्हणजे तसे असायलाही हरकतही नव्हती पण त्यांच्या पीडीए ने वैताग आणला. सतत चिकटाचिकटी आणि एकमेकांच्या गळ्यात पडून फोटो. आणि पूर्ण ट्रेकभर जागोजागी हेच.

आजूबाजूचा निसर्ग इतका सुंदर आणि हवा बेतशीर गार त्यामुळे श्रम असे फार जाणवलेच नाहीत आणि म्हणे म्हणेपर्यंत पहिल्या मुक्कामाची जागा आलीच. आकाश ढगाळलेले होते आणि दाट झाडी, जंगलच होते त्यामुळे वेळेचा काही अंदाजच नव्हता. वेळ बघितली तर दोनच वाजले होते. मला संध्याकाळचे पाच सहा वाजल्यासारखे वाटत होते. आता इतक्या दुपारीच येऊन पोचल्यामुळे पुढे आता दिवसभर काय करावे हा प्रश्न मनात आला. पण करायला भरपूर गोष्टी होत्या. आमच्या आधी पोचलेल्या कुकिंग स्टाफने तयारी करून सर्वांसाठी गरमागरम चहा उकळत ठेवला होता. गेल्या गेल्या सर्वांना ग्लासभरून चहा आणि सोबत बिस्किटे. म्हणलं हे बेस्ट आहे. कारण सह्याद्रीत मी कुठल्या संस्थेसोबत फारसे ट्रेक कधीच केले नव्हते. एक लिंगाणाचा अपवाद वगळता. त्यामुळे गेल्या गेल्या आम्हालाच चूल, स्टोव्ह पेटवून बाकी उद्योग करावे लागायचे. इथे सगळं रेडीमेड हातात त्यामुळे सुख सुख म्हणतात ते हेच असावं. तोवर लीडर आणि बाकी टेंट उभारणीला लागले. आम्हीही फारसे दमलो नव्हतो त्यामुळे आम्हीही हातभार लावला. टेंट आम्ही एरवी वापरतो तसलेच होते पण चांगल्या क्वालिटीचे होते त्यामुळे पटापट उभारायला लागलो. ज्याना माहीती नव्हते त्यांना लीडरने एक टेंट लावून दाखवला त्याप्रमाणे बाकी जण करू लागले.

तोवर एकेक करत मेंबर येतच होते. सगळे टेंट लावून झाले प्रत्येकाला ते अलॉट झाले. त्याप्रमाणे स्लिपींग बॅगचे वाटप झाले आणि एकेक लायनर, म्हणजे उत्कृष्ठ ब्लँकेट होते, त्याची घोळदार पिशवी होती, ती आत पांघरून मग स्लिपींग बॅगमध्ये घुसायचे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने दिलेली स्लिपींग बॅगचा नंबर लक्षात ठेऊन ट्रेक संपेपर्यंत तेच वापरायचे होते तर लायनर सोबत बाळगायचे होते. त्याची भली थोरली गुंडाळी होत होती, म्हणलं आता हे सोबत म्हणजे बाकी सामानाला जागाच उरणार नाही. टेंट अलॉट करतानाची पण एक गंमत. दोघात एक टेंट दिला जात होता. नवरा बायको असतील तर त्यांना एक. अशा तीन जोड्या होत्या नवरा बायकोच्या. एक निलांजन म्हणून गमत्या ट्रेकर होता. एकदम धमाल आणि दिलखुलास व्यक्तिमत्व. तो आला होता त्याच्या मैत्रीणीसोबत आणि त्यांनी काही सामान शेरींगमधे आणले होते त्यामुळे त्यांनाही एकच टेंट मिळाला तर हवा होता. पण तोवर लीडरच्या लक्षात आले की एकच मुलगी एकटी उरत आहे त्यामुळे मग त्याने नाईलाजाने ही जोडी फोडून मैत्रीणीला तिच्या टेंटमध्ये पाठवले. सगळ्यांच्या समोरच हा प्रकार झाल्याने आम्हाला वाटले की ते नवरा बायकोच आहेत. आणि मग तो इकडे तिकडे भटकत असताना तिला काहीतरी हवे म्हणून ती त्याला शोधत होती तर एकाने आवाज दिला, अरे भाई तेरी बिवी बुला रही है तुझे. झालं, यावर ती चवताळून बाहेर आली, ओय मै बिवी नही हूं उसकी. तेवढ्यात तो आलाच आणि त्यावरही बरसली, तुने क्या हम शादीशुदा है करके बोल रहा है क्या. तो बिचारा इतका गांगरला. आम्ही अक्षरश तोंड फिरवून कसेतरी हसू दाबत होतो.

तोवर पाच वाजत आलेले, पुन्हा एकदा चहाची फैर झडली. आणि लीडरने सर्वांना रोजचे टाईमटेबल सांगितले. म्हणाला, पहाटे लवकर सुरु करायचे चालायला. सहा वाजता चहा आणि सात वाजता नाष्टा आणि त्यादरम्यान आवरून साडेसात किंवा आठला चालू पडायचे. आज पहिलाच दिवस असल्याने काहीजण निवांत आटपून आलेत हे उद्यापासून चालणार नाही. सगळ्यांनी वेळेत हजर रहायचे. संध्याकाळी पाच वाजता चहा, सहा वाजता सूप आणि रात्रीचे जेवण सात वाजता. आणि आठ वाजता गुड नाईट. हे ऐकल्यावर मी हबकलोच. मी म्हणजे निशाचर माणूस आणि रात्रीचे जेवण नउ किंवा दहाच्या आत कधी होत नाही. म्हणलं सातला जेवण झाल्यावर परत दहाला भूक लागली तर काय. आणि आठला कसली झोप लागतीय मला. पण माझ्या सगळ्या शंका निर्रथक ठरल्या. कारण तासभर आधी सूप घेतल्यावर आणि दिवसभर चालून आल्यावर कडकडून भूक लागलेली असायची. तब्येतीत जेवण केल्यावर थंडी वाढलेली असायची आणि कधी एकदा टेंट मध्ये जाऊन स्लिपिंग बॅग मध्ये गुरफटून घेतोय असे व्हायचे. आणि दिवसभराच्या श्रमाने कधी डोळे मिटायचे कळायचं देखील नाही. असेही तिथे शून्य रेंज होती त्यामुळे सगळ्यांचे मोबाईल एरोप्लेन मोडमध्ये होते त्यामुळे ते डिस्ट्रॅक्शनदेखील नव्हते. एकदम आदर्श टायमिंग होते आणि माझ्यासारख्या सगळ्या वाईट सवयी असलेल्या माणसाला तर डॉटॉक्सचेच फिलींग आले आणि मला या ट्रेकला आल्याबद्दल मनापासून आनंद झाला.

 

दिवस २ - छोका

Submitted by आशुचँप on 19 February, 2022 - 13:08

https://www.maayboli.com/node/81025
दिवस पहिला - साचेन

====================================================================================

सकाळी जाग आली तीच कुणीतरी गदागद तंबु हलवण्याने. वर बाहेरून उठो उठो चा आवाज. ए म्हणलं काय त्रास आहे. त्या स्लिपिंग बॅगमधून कसेतरी उठत तंबूची चेन उघडली तर आमचा किचन स्टाफ. हातात चहाचा ट्रे आणि किटली आणि दे दणादण प्रत्येकाला हातात चहाचा पेला कोंबत चालले होते. चहा म्हणजे बिनदुधाचा कोरा चहा. आयुष्यात पहिल्यांदाच बेड टी मिळत होता, तोही असा डोंगरात. मज्जाय म्हणलं.
त्या स्लिपिंग बॅगमध्ये घुसणे आणि त्यातून बाहेर येणे, तेही तंबुतल्या टिचभर जागेत ही एक मोठी कसरत होती. ती कशीबशी करून बाहेर आलो तर काहीजण माझ्यासारखेच आळोखेपिळोखे देत बाहेर येत होते. काहीजण पोर्टेबल टॉयलेट टेंट च्या बाहेर संचित मुद्रेने उभे होते. काही अजून झोपेतच पेंगल्यासारखे हँग झालेले उभे होते.
लीडर आणि स्टाफ मात्र कोणत्याही क्षणी प्रलय येईल अशा आवेशाने पळापळ करत होते. त्यांचेही बरोबर होते. त्यांना आम्हाला इथे चहा नाष्टा देऊन, सगळी आवराआवरी करून, सामान खेचरांवर लादून आमच्या आधी पुढच्या मुक्कामाला जाऊन तिथे जेवण खाण्याची तयारी करायची असे. आमच्यासारखे राजेशाही थोडीच होते. त्या अख्ख्या ट्रेकमध्ये त्यांनी जी काही सर्विस दिली आम्हाला ती अक्षरश लाजवणारी होती. म्हणजे अक्षरश पंचतारांकित सुविधा असाव्यात इतपत (ट्रेकच्या तुलनेत). शेवटी आम्ही सर्वांनी वेगळी वर्गणी काढून प्रत्येकाला थोडी थोडी रक्कम सदिच्छाभेट म्हणून दिली. त्यांचे कष्ट खरेच हॅट्स ऑफ आणि सदैव हसतमुख. त्यांच्याकडे बघूनच छान वाटायचे.

सगळे विधी आटपून, टेंट काढले, स्लिपिंग बॅगची गुंडाळी करून ती त्याच्या बॅगेत कोंबण्याचा त्रासदायक प्रकार पार पाडला, सामान फारसे बाहेर काढले नव्हतेच त्यामुळे बॅग फारशी भरण्याचा त्रास नव्हता. आणि मग नाष्ट्याला गेलो. तर बघुन उडालोच, नाष्ट्याला या बहाद्दरांनी चक्क पॅन केक दिलेले, सोबत जॅम आणि मध, आणि पास्ता. होय पास्ता. मी शेवटी कुणाला तरी म्हणालो आपल्या ट्रेकच्या रकमेत खाण्यापिण्याचे पैसे धरलेत ना, का नंतर वेगळे घेणारेत. आजवर आमच्या ट्रेकचा नाष्टा म्हणजे आदले दिवशी उरलेली मुगाची खिचडी गरम करून परत खाणे. असला नाष्टा मी बापजन्मात कधी ट्रेकला खाल्ला नव्हता.

तर भरपेट नाष्टा करून निघालो. आजही पॅकलंच नव्हता कारण आपण दुपारपर्यंत पोचू असे लीडर म्हणाला. आजचा ट्रेक होता ७ किमीचा. साचेन (७,२०० फूट) वरून बाखीम (८,६०० फूट) आणि तिथून पुढे शोका किंवा छोका (Tshokha) होते ९,७०० फूट. म्हणजे आजही दमदार चढ असणार होते. लीडर म्हणाला काही ट्रेक आयोजक पहिल्याच दिवशी छोका गाठायला बघतात, पण मग ट्रेकरची पार दमछाक होते हे बघून आम्ही आता साचेन ला पहिला मुक्काम करतो. म्हणलं नशिब, पहिल्याच दिवशी इतकं चालून फाफललोच असतो. तर हुप्पा हुय्या करून निघालो. कालच्या चालण्यामुळे एक रिदम सेट झाला होता तो धागा तसाच खेचून त्याच चालीत निघालो. आजची वाटही घनदाट जंगलातून जात होत होती आणि साधारण एक किमी नंतर तर मस्त पायऱ्या, म्हणजे दगडी नाही तर चक्क लाकडी ओंडके आणि फळ्या टाकून. वळणावळांनी ती वाट वरती चढत चालली होती. या वाटेवर चालणे अगदी सोप्पे होते पण चढ दमछाक करणारा होता. शेवटी मी लीडरला विचारलेच ही कुणी इतकं काम केलं आहे तर म्हणाला पावसाळ्यात या वाटेची अगदी वाट लागते, खेचरांना पण चालणे मुश्किल होते त्यामुळे इथल्याच स्थानिक लोकांनी स्वकष्टाने ही वाट बांधली आहे नैतर पावसाळ्यात वरच्या कँपला जाणेच अशक्य व्हायचे. म्हणलं कमाल आहे.

माझ्या मते ट्रेकमधला सर्वात बेस्ट रुट हाच होता. दोन्ही बाजूला किंवा जिथे नजर जाईल तिथे ओक, देवदार आणि रोऱ्होडेंड्रॉनचे वृक्ष. आणि आभाळाला भिडलेले डोंगर आणि मध्येच लांबवर दिसणारे पंडीम आणि टेंझीखाय डोंगरांची बर्फाच्छदित शिखरे. काही ठिकाणी मेपलची पण झाडे दिसली. त्यांची मस्त पानगळ झालेली आणि वाटेवर पानांचा खच पडलेला. हवेत चांगलाच गारवा होता आणि चालायला धमाल येत होती. चढावर दम लागला की थांबून निसर्ग न्याहाळावा आणि पाण्याचा एक घोट घेऊन पुन्हा चालू पडावे.

अशा सुंदर वाटचालीतच बाखिम कधी आले ते कळलंच नाही. लीडर सगळ्यांना थांबले की यहां नही अभी बाखिम मै रुकेंगे, असे सांगतच चालवत होता. त्यामुळे मला वाटलेलं की गाव वगैरे असेल. पण प्रत्यक्षात तिथे एक झोपडी होती. पण हा सगळ्याच ट्रेकर, पोर्टर यांचा हक्काचा थांबा होता. तिथेच त्यांनी चहा, मॅगी, कोल्ड्रींग वगैर विकायला ठेवली होती. आणि मुख्य म्हणजे अख्ख्या ट्रेकमध्ये फक्त याच ठिकाणी मोबाईलला रेंज असते. हे लीडरने सांगायचा अवकाश, सगळ्यांचे मोबाईल बाहेर आहे. लोकांनी दे दणादण घरी फोन लावले, काहींनी तर व्हिडीओ कॉल वगैरे केले. मी असले काही केलं असतं तर घरच्यांना टेन्शनच आले असते त्यामुळे आम्ही सुखरुप आहोत, ट्रेक व्यवस्थित सुरु आहे आता एकदम १० दिवसांनी फोन करीन ट्रेक संपल्यावर एवढा मेसेज टाकला. अमेयने तेवढेही केलं नाही त्यामुळे त्याच्या वतीने मीच मामाला मेसेज केला.

तोवर एक मुलगी कुणाला कॉफी हवीय का, मी ऑर्डर करतेय, एकत्र केलं तर पटकन मिळेल असे विचारत फिरत होती. मला एकदम आनंदाचे भरते आले. म्हणलं मी मी. ती पण खुष झाली आणि आमचे चांगले सूर जमले. तीही पट्टीची ट्रेकर होती आणि याआधी बरेच ट्रेक्स केलेले तिने.
कॉफी येईपर्यंत तिथेच एक गुबगुबीत भुभ्या उन्हे खात मस्तपैकी पहुडला होता. मी त्याला ये म्हणलं लाड करतो, मग काय गडी खुष.

तोवर सगळे येऊन ठेपलेच होते. इथे खायला मिळतयं म्हणल्यावर लोकांच्या दणादण ऑर्डर सुटु लागल्या, ऑम्लेट, मॅगी. लीडर पण वैतागला, म्हणे आपण नाष्टा करून निघालोय, जेवायला पोचणार आहोत. पण त्यालाही काही बोलता येण्यासारखे नव्हते कारण हे मधल्या वेळचे खाणे ट्रेकच्या खर्चात नव्हते आणि चहा कॉफी सकट आपपाल्या खर्चाने घ्यायचे होते. मी त्या मुलीला कॉफीचे पैसे द्यायला गेलो तर घेतलेच नाहीत, म्हणलं ठिके येताना परत इथेच अशीच कॉफी घेऊ, ती माझ्याकडून.

तर सगळ्यांचे खाऊन पिऊन उरकल्यावर पुढे निघालो तर वळणावरच एक सुंदरशी झोपडी. ते दृश्य इतकं सुंदर होते की बस. निळे आकाश, त्याच्याशी सलगी करणाऱ्या डोंगर रांगा, समोर खोलवर दरी, घनदाट वृक्षांची दाटी आणि त्यातून मुरके घेत चाललेली वाट आणि त्या वळणावर मोकळ्या जागेत ही झोपडी. असं वाटलं की कधीतरी नुसतेच यावे आणि इथे मस्त मुक्काम करून रहावं, बाकी काही करू नये. कुठं जायची यायची घाई नको, काही अचिव्ह करण्याचे प्रेशर नको, बस निसर्गाच्या कवेत असेच पडून रहावं निवांत. रात्री शेकोटी पेटवून, लखलख चांदण्या मोजत अंगणात बसावं आणि थंडी वाढू लागताच त्या लाकडी खोपटात झोपायला जावं. सकाळच्या झुंजुमुंजु धुक्यात पुन्हा बाहेर यावं.

सगळ्यांचे आटपत आले तसे लीडरने पुन्हा एकदा घाई करायला सुरुवात केली. मला कळतच नव्हती त्याची घाई, आता त्यांच्या म्हणण्यानुसार दोन तीन किमीच अंतर शिल्लक होते. आणि जवळपास अख्खा दिवस होता हातात. पण नंतर कधीतरी तो बोलताना म्हणाला, की हिमालायात असं हवामानावर विसंबुन राहता येत नाही, कोणत्याही क्षणी ढग येतात आणि बेदम पाऊस पडायला लागतो. त्यामुळे शक्य तितक्या लवकर लोकांना मुक्कामाच्या ठिकाणी पोचता येईल असे बघतो. स्पेशली दुपारनंतर हवामान फार अनस्टेबल राहते. आता इथून पुढचा रस्ताही मध्येच सपाट, मध्येच एकदम चढ तर कधी थोडे उतार पण चक्क. त्यामुळे मस्त रमत गमत, फोटो काढत छोका ला पोचलो. ते म्हणजे मोठे गावच असल्यासारखे होते. लाकडी बांधकाम केलेल्या झोपड्या आणि इमारती, एक तर दुमजली होती, लाकडी टॉयलेट्स, अनेक ठिकाणी ट्रेकर टेन्ट दिसत होते. आम्ही जिथे राहणार होतो तिथे एक कंबरेच्या उंचीचे लाकडी कुंपण होते, त्याला ढकलते दार वगैरे आणि दारात आमचा स्टाफ हातात चहाची किटली घेऊन उभा. एकेक जण हातात चहाचा ग्लास घेऊनच पुढे सरकत होता. ती लाकडी खोपटे चांगलीच प्रशस्त होती, म्हणजे एक भला मोठा हॉल, त्याला लागून दोन खोल्या, थोडेसे अंतर सोडून अजून एक वेगळी खोपटे आणि तिथे किचन. खरे तर त्या सगळ्याला खोपटे म्हणणे चुकीचेच आहे. पूर्ण म्हणजे फ्लोरींग ते छत, भिंती खुर्च्या, टेबल, खिडकीपाशी टेकायला सगळं काही लाकडात बनवले होते.

तोवर टेन्ट उभे करायची तयारी सुरुच झाली होती. कालच्या तुलनेत आजची जागा खूपच प्रशस्त होती. काल म्हणजे दरीत, जंगलात थोडीशी जागा मोकळी करून राहीलो होतो. आज जवळजवळ डोंगरमाथा म्हणता येईल अशी जागा होती. समोरच लांबवर गेलेल्या डोंगररांगा दिसत होत्या.

सह्याद्रीत गडमाथा गाठल्यावर दिसते तसेच दृश्य होते हे. मी आणि अमेयने चपळाई करून चांगल्या जागेवरचा टेंट पटकावला. मुक्कामी लवकरच पोचण्याचा हा फायदा, कारण निवांत मंडळी अगदीच निवांतपणे यायची, तोवर आम्ही टेन्ट उभारून आत संसार पण थाटून मोकळे व्हायचो. तोवर जेवणाची वर्दी आली. मस्त गरमागरम जेवणावर ताव मारला. आता जाऊन पडावं असा विचार करत असतानाच लीडर म्हणाला आपल्याला आता एक छोट्या हाईकवर जायचं आहे. म्हणलं इतका वेळ तेच तर करत होतो की. पण तो सांगतो आता अक्लमाटझेशन ची प्रोसेस सुरु करायची आहे. आपण आता थोडं उंचीवर जाऊ, थोडावेळ थांबू आणि परत येऊ. म्हणजे रात्री कुणाला त्रास होणार नाही. त्यामुळे कुणालाच काही हरकत नाहीये, सगळे तयार होऊन निघतात, आता सॅक नाही काही नाही, जस्ट एक अर्ध्या तासाची चक्कर. त्यामुळे पाणीही घेतले नाही सोबत. आणि थोडा चढ चढून जाताच कष्ट वसूल. अतिशय सुंदर लँडस्केप, एक दृष्ट लावणारे सुंदर तळे, त्याच्या भोवती सगळीकडे तिबेटी पताका लावलेल्या आणि समोरच एका डोंगरावर उभे असेलली तिबेटी मॉनेस्ट्री. इतके तिकडे चरणारे घोडे (खेचर) आणि याक. अरुंद पायवाटेने वरती जाताच थंडी जाणवायला लागली आणि लगेच जॅकेट कानटोपी चढवली.


मग तिथेच थोड्या गप्पा टप्पा झाल्या, ओळखी वाढू लागल्या, समान आवडी निवडी कळू लागल्या. अंधार पडू लागला तसे परतलो. गरमागरम सूप घेतले आणि जेवायची वेळ होईपर्यंत कुणालाच तंबुत जायचे नव्हते त्यामुळे काही जण गाण्याच्या भेंड्या, काही डंबशेरज असलं काहीबाही खेळत बसले. सगळ्यांचे फोन सक्तीने बंद असल्याने कुणाला आत्ममग्न राहायची काही सोयच नव्हती. एका मुलीने चेस बोर्ड आणलेला. तो बघताच मी तुडुंब खुष झालो. मी सतत मोबाईल वर ऑनलाईन चेस खेळत असतो त्यामुळे मला म्हणजे अगदी हक्काची एंटरटेनमेंट मिळाली. मग जेवणाचा ब्रेक घेतल्यावरही ती आणि मी रात्री उशीरापर्यंत खेळत बसलेलो. शेवटी लीडरने उद्या आपल्याला मोठा पल्ला गाठायचा आहे, विश्रांती घ्या म्हणून झोपायला पिटाळले. एकुणच आजचा दिवस फारच धमाल गेला. आणि हळूहळू या वातावरणाला, हवामानाला आणि ग्रुपला सरावू लागलो होतो. हा ट्रेक फारच मस्त होणार याची जणू खात्रीच या पहिल्या दोन दिवसांनी मला दिली. त्याच आनंदात तंबूत जाऊन पडी टाकली.

(इथे दिलेले सगळे फोटो मी काढलेले नाहीत. पण सगळ्यांनी ग्रुपवर टाकलेले त्यातले काही चांगले
निवडले आहेत. आणि आता कुणाचे कुठले ते शोधणे फार वैताग काम आहे. त्यामुळे फोटोचे क्रेडीट मित्रमैत्रीणींचे, माझे नव्हे. )

दिवस ३ झोंगरी

Submitted by आशुचँप on 10 March, 2022 - 15:18

https://www.maayboli.com/node/80987
पूर्वार्ध १
https://www.maayboli.com/node/80996
पूर्वार्ध २
https://www.maayboli.com/node/81025
दिवस पहिला - साचेन
https://www.maayboli.com/node/81122
दिवस २ - छोका

================================================================

छोकाची पहाट अपेक्षेप्रमाणेच प्रसन्न अशीच होती. पर्वतांच्या सानिध्ध्यात सगळ्या गोष्टी सुंदर होऊन जातात. पहाट काय किंवा लालरक्तीम सूर्यास्त काय, फारच लोभसवाणे वाटू लागते. त्यामुळे छोकाची पहाट त्याला अपवाद नव्हतीच.

रोजच्या प्रमाणे बेड टी घेतला आणि बाहेर आलो तर शिरशीरीच आली एकदम. बाहेर चांगलेच गार होते. आत मस्त स्लिपींग बॅगमध्ये काही जाणवले नव्हते जास्त. इथे मोठे गाव असल्याने व्यवस्थित बांधीव टॉयलेट्स होती आणि पाण्याची सोय होती. म्हणलं चला हेही उत्तम झाले. टॉयलेट पेपर वापरणे मला अद्याप जमलं नाही आणि आवडलंही नाही. नंतरच्या मुक्कामात मग त्याचा वापर केल्याशिवाय पर्याय नव्हता त्यामुळे एक दोन रोल आम्ही सामानात ठेवले होतेच. पण जोवर शक्य होते तोवर तरी पाणीच.

सगळं उरकून नाष्ट्याला जमलो तर सगळ्यांची किती बाई थंडी हीच चर्चा सुरु होती. रात्री चांगलेच गारठले होते म्हणे, कित्येकांना झोप पण लागली नाही म्हणे. हायला म्हणलं आपल्याला कशी काय जाणवली नाही थंडी. तोवर एकजण म्हणालाच, तुम्हाला कसल्या भारी झोपा लागल्या. म्हणलं होय का?
"फिर क्या, ऐसा लग रहा था की दोनोंकी खर्राटे लेने की कॉम्पिटीशन चल रही थी.."

म्हणलं, हम लोग खर्राटे ले रहे थे???

"फिर क्या, पूरा कँप गुंज उठा आपकी वजह से, हम लोगोने बाहर आके देखा इतने जोर से कौन आवाज कर रहा है. कैसे सोते हो यार तुम दोनो भाई ?"

आता आम्ही दोघेही झोपेसाठी बदनाम आहोत हे खरे. आम्ही कुठेही आणि कसेही झोपू शकतो. पण आमच्या घोरण्याने लोकांच्या झोपा मोडत असतील हे काय खरे वाटेना. आधी वाटलं आमची खेचत आहेत. पण एक दोन मुलींनी पण सांगितले की तुमच्या टेंटमधून फारच मोठ्याने घोरण्याचे आवाज येत होते.
तोवर लीडर आलाच. त्याने सांगितले की आजचा पल्ला मोठा आहे. मोठा म्हणजे चांगलाच, म्हणाला या आख्ख्या ट्रेकमधले सगळ्यात कस लावणारे जे दोन दिवस आहेत त्यातला आजचा एक. दुसरा आपण ज्या दिवशी समीट चढणार तो. त्यामुळे सगळ्यांनी भरपूर नाष्टा करा. आपल्याला पोचायला संध्याकाळ होईल आणि वाटेत लंच कॅरी करायचे आहे. आपण चांगली उंची गाठणार आहोत त्यामुळे वाटेत कुणाला त्रास व्हायला लागला तर उगाच अंगावर न काढता तातडीने आम्हाला कोणाला तरी सांगा.

छोका आहे ९७०० फुटांवर आणि आम्ही वाटेत फेडांग (१०,५०० फुट) मार्गे झोंगरी (Dzongri ; १२,९८० फुट) गाठणार होतो. थोडक्यात चांगलीच चढाई होती. एकच चांगली गोष्ट होती ती म्हणजे झोंगरी ला पोचल्यावर दुसरा दिवस पुर्ण आराम होता. अक्लामटाईज होण्यासाठी असे केले जाते. सर्वसाधारणपणे ८ हजार ते १२ हजारापर्यंत हाय अल्टीट्युट मानले जाते, १२ हजारच्या पुढे व्हेरी हाय अल्टीट्युट आणि १८ हजारच्या पुढे एक्स्ट्रीम हाय. त्यामुळे लीडरने अजिबातच बेपर्वाइ करायची नाही हे तीन तीनदा निक्षून सांगितले.

आजही नाष्ट्याला पॅन केक्स होते आणि सोबत पॉरेज (मी हा प्रकार पहिल्यांदाच खाल्ला, पण त्याला खीर म्हणणे डाऊनमार्केट असतं म्हणे, त्यामुळे त्याला पॉरेजच म्हणायचं). कहर म्हणजे इतक्या बेस्ट खाण्याला नाके मुरडणारेही होते. स्पेशली बंगलोरचे ट्रेकर्स. रोज रोज काय तेच म्हणे. म्हणलं याना काय आता इडली डोसा सांबर हवं का काय नाष्ट्याला. म्हणजे जरी पैसे भरले असले तरी इतक्या उंचीवर गरमागरम आयते खायला मिळते आहे हेच मला आणि अमेयला भारी वाटत होते. त्याला नावं ठेवणे वगैरे म्हणजे आमच्या आकलनापलीकडचे होते. सह्याद्रीत ट्रेक करताना आपल्याला काहीही मिळेल ते आनंदाने पोटात ढकलायची चांगली सवय लागलेली असते त्यामुळे असले चोचले कधी केल्याचे आठवतच नाही. असो. तर सामान पॅक केले, तोवर स्टाफने आमचे भरलेले डबे हातात दिले.

हे आता फाडिंगला रेस्ट घेऊ दुपारी तिकडे खायचे असे सांगितले. आजचा ट्रेक होता ९ किमीचा. बरोबर निम्म्या वाटेत म्हणजे ४.५ किमीवर फाडिंग आणि तेवढ्याच अंतरावर झोंगरी. तर हुप्पा हुय्या करत निघालो.
सुरुवातीला जरा ग्रॅज्युअल चढ होता पण त्याचा रिदम येईपर्यंतच दमदार चढ सुरु झाला आणि लक्षात आले आज कस लागणार खरा. दोन दिवस सगळे मस्त बागडत वगैरे ट्रेक करत होते पण टूर दी फ्रान्स मध्ये कसे माउंटन स्टेज आली की अव्वल सायकलपटू मुसंडी मारतात तसे फक्त दमाचे भिडू पुढे सरकले लीडर सोबत, बाकी आमच्यासारखे हिले डुले करत थांबत दम घेत वाट कापू लागलो.

तो रूट होताही मस्त. मस्त घनदाट जंगलातून जाणारी पायवाट, दुतर्फा डेरेदार वृक्ष आणि त्यांचे आभाळाला भिडणारे शेंडे, बघायला जावं तर टोपी पडावी इतके उंच. काही ठिकाणी तर एखादे वठलेले झाड आडवे पडलेले असायचे त्याच्या खालून वाकून जावं लागत होतं. मला तर तिथून जाताना हरिश्चंद्रगडाची टोलारखिंडीतून जाणाऱ्या वाटेची आठवण झाली. थंडी मस्तच होती पण चढ चांगले घामटे काढत होता. बघता बघता सगळ्यांचे जॅकेट्स, लोकरी टोप्या सॅकमध्ये गेल्या आणि हाशहुश करत एकेक पाऊल नेटाने टाकू लागलो.

अर्थात त्यातही बंगाली ट्रेकर काही स्वस्थ नव्हतेच, त्यांची अखंड टकळी सुरुच होती. इतक्या चढावरही ते कसे काय इतकं बोलू शकत होते देव जाणे. त्यांना मला एकदा थांबून सांगावे वाटले बाबांनो मध्ये श्वास तरी घ्या आणि मग बोला.

फाडिंग येता येता चढ अजूनच तीव्र झाला. एक वळणावर चढलो आणि खिंड आल्यासारखे वाटले, थोडे वरती जाताच सगळे श्रम वसूल व्हावेत असे दृश्य अचानक समोर आले. मस्त मोकळे पटांगण आणि त्यासमोर विस्तिर्ण अशी पसरलेली बर्फाच्छदित डोंगरांची रांग. अहाहा, इतकं विलोभनीय होतं ते सगळं. केवळ तोच अनुभव पुन्हा घेण्यासाठी काही पावले परत खाली उतरलो आणि परत त्या खिंडीतून वर येताना डोळे भरून ती रांग पाहीली.

तोवर पुढे आलेले मस्त हिरवळीवर पसरले होते आणि डबे वगैरे उघडून जेवणाची तयारी सुरु केली होती. मीही उत्सुकतेने डबा उघडला तर काय, एक जॅम सँडविच, उकडलेले अंडे आणि एक फ्रुटीचा पॅक. हायला म्हणलं हा पॅक लंच होय. त्या वेळी तेही अमृतासमान वाटलं पण पोटाच्या कुठल्या कोपऱ्यात गडप झालं कळलंच नाही. म्हणलं ठिके, पोटाला आधार मिळाला हेही नसे थोडके. तोवर स्लो गँग एकेक करत येऊ लागली होती. मग वॉव कितना बढीया है, फोटो, सेल्फि वगैरे सुरु झालं.

लीडर म्हणाला अभी ये आधा रस्ताही हुवा है, चलो जो रेडी है वो चलना शुरु करे

मला अजून थोडं थांबून चालणार होते पण माझ्या स्पीडचा मला चांगलाच अंदाज असल्याने म्हणलं एकदम मागे राहण्यापेक्षा वाटेत थांबत थांबत जाऊ. ते एकप्रकारे बरेच झाले कारण इथून पुढे तर रस्ताच नव्हता. दगडधोंड्याने, घसाऱ्याने सजलेली वाट एकदम आभाळात जात होती. मध्ये एक ठिकाणी थांबून पाणी प्यायलो आणि पुढे पाहिले तर लांबवर एक उंच डोंगर दिसला आणि त्यावर काही ठिपके. निरखून पाहिले तर पोर्टर आणि खेचरांची रांग. म्हणलं बापरे आपल्याला आता तिथून जायचं आहे का काय. हे म्हणजे इतका वेळचा चढ काहीच नव्हता इतकी चढण होती. पोटात गोळाच आला आणि तो कमी करायला एकच मार्ग होता, शेअर करणे. मागूनच एक त्रिपाठी म्हणून येत होता, त्याला ते दाखवलं म्हणलं वो देखो वहांं जाना है. तर तो वैतागलाच. म्हणे चुपचाप चल रहा था, अभी टेन्शन आ गया. म्हणलं मलाही आलं आहे म्हणन तुला सांगितले तर अजूनच वैतागला.

तो चढ खरेच फार वाईट होता आणि त्यापेक्षा वाईट होते आम्हाला ओव्हरटेक करत आरामात पुढे चालणारे पोर्टर. ते अवाढव्य बोजे पाठीवर घेऊन, सरळ रस्त्यावरून जावं तितक्या आरामात गप्पा मारत, गाणी म्हणत जायचे. आम्ही आपले पाच पावले चालून थांबायचो तर हे बघता बघता दिसेनासे होत. शेवटी एकाला थांबवून विचारलेच भाई और कितना है, तर म्हणे ये क्या आ गया, अभी थोडी देर. एक सेकंद बरे वाटले पण लक्षात आले हे काही खऱ्यातले नाही. अजून भरपूर असणारे आणि तसेच झाले.

त्यावरून मला सिंहगड वारी दरम्यान एक किस्सा झालेला आठवला. गड चढून खाली उतरत होतो तर नेहमीची गर्दी होतीच. जीन्स आणि हिल्स मध्ये टळटळीत उन्हात पायवाट चढणाऱ्या धाडसी कॉलेज कुमारिका आणि त्यांना बस अभी थोडा ही रह गया है अशी पट्टी पढवणारे त्यांचे हिरो, दादा अजून किती आहे चढायला अशी केविलवाणी प्रश्नमालिका
एक येरुतर इतका पेटला
त्याला मी नेहमीच्या पद्धतीने झालं आता आलंच दहा मिनिटे लागतील म्हणालो तर
"साला पीछले एक घंटेसे सब लोग बस आया दस मिनिटं बोल के चुत्या बना रहे, सच्ची मैं बताव कितना बाकी है?"
मी त्याला एक तास म्हणल्यावर भेलकंडला जागीच. बिचारा निम्या वाटेतच होता, जीन्स, स्पोर्ट्स शूज आणि हातात पेप्सी ची बाटली घेऊन साहेब चढत होते, त्याच्या स्पीडने तो संध्याकाळीच पोचला असणार. Happy

त्रिपाठी पण अफाट हैराण झाला होता. तो आणि त्याच्या सोबत अजून काही जणी आणि मी असा ग्रुप करून चालू लागलो. आणि आता एक पाऊलही उचलणार नाही अशा स्थितीत येईपर्यंत अखेरीस डोंगरमाथा गाठला. इथे गेल्यावर कळलं हा देवराली टॉप.

इथे तर अजूनच रमणीय दृश्य होते. म्हणजे फाडिंगचे काहीच नाही म्हणावं इतकं. इतक्या उंचीवर आल्याने बाकी डोंगर आता खुजे दिसत होते आणि त्यावरून जाणारी ढगांची रांग. अक्षरश स्वर्गात आल्याचा फिल होता तो. समोरच अवाढव्य पसरलेली कांचनगंगा पर्वतरांग दिसत होती.

बस्स, याचसाठी केला होता अट्टाहास. जगातील तिसऱ्या क्रमांकाचा पर्वत आमच्यासमोर त्याचे विस्तृत रुप घेऊन उभा ठाकला होता. त्यावेळी हे मनातून माहीती होते की आपली अजिबात शारिरीक आणि आर्थिक कुवत नाहीये पण तरीही मनापासून वाटलं की एकदा तरी या नगाधिराजावर आरोहण करण्याची संधी मिळावी.

तिथे उंचीवर चांगलेच गार वारे वाहत होते, आणि इतका वेळ घामाने थबथबून निघाल्यावर तर जास्तच. पटापटा सगळ्यांचे जॅकेट्स बाहेर आले. त्यावेळी मस्त गरमागरम चहा मिळायला हवा होता यार. थोडे फोटोसेशन वगैरे झाले तोवर लीडरने एक भारी गोष्ट सांगितली की आपल्या जुन्या १०० च्या नोटेवर जो फोटो आहे तो इथलाच आहे. नशिबाने एकाकडे ती नोट होती आणि आम्ही ताडून पाहिले तर हुबेहुब. तोच स्पॉट. असलं भारी वाटलं ना त्यावेळी.

पुरेसा वेळ दिल्यावर लीडरने पुन्हा सगळ्यांना हाकलायला सुरुवात केली. अभी झोंगरी आया नही है करत. अनिच्छेनेच तिथून निघालो आणि पुन्हा ती वाट तुडवायला सुरु केली. आता नशिबाने चढ फारसे नव्हते. सरळ रस्ता होता आणि मधे मधे थोडेसे चढ मग परत उतार. पण आता पाय बोलू लागले होते आणि नको वाटत होतं ते सरळ रस्त्यावरून चालणेही. देवराली टॉपच्या चढणीने सगळ्यांचांच दम उखडला होता आणि कधी एकदा कॅंपवर जाऊन गरमागरम चहा ढोसतोय असे वाटत होते.

पण वाटेतली दृश्ये थांबून फोटो काढायला भाग पाडत होती. ते म्हणजे किती घेशील दोन्ही कराने असा प्रकार होता. जिकडे नजर जावी तिथे सिनीक लोकेशन. वाटेत तर एक चक्क बांधीव वाट आली. म्हणलं इतक्या सुंदर ठिकाणी वाटही तितकीच सुंदर असावी हा योगायोग का कुणी सौंदर्यदृष्टी असणाऱ्याने बांधली असावी.

थोडे पुढे जाताच एक गोठलेला झरा दिसला आणि बर्फाचे क्रिस्टल. इतक्या दुपारी कडकडीत उन्हात देखील बर्फ बघून जाणवलं की भौ रात्री तर सॉलीड वाट लागणारे. लीडरच्या मते झोंगरीचे तापमान मायनसमध्येच असते बरेचदा. ते बर्फ बघून चहाची अजूनच तल्लफ आली आणि फोटोचे मोह टाळून भराभर पावले उचलायला लागलो.

झोंगरी काय येता येईना पण. आणि त्यात एका पोर्टरने सॉलीड प्रॅँक केला. मी आपलं दीनवाणा होऊन विचारले की झोंगरी कितना दूर है, तर म्हणे वो क्या रहा सामने, आणि एका डोंगराकडे बोट दाखवले. तिकडे दूरवर उंचावर एक झोपडीवजा काहीतरी दिसत होतं. मला वाटलं की आपण आता आलोच असू, आता अजून इतकं चढायचं आहे म्हणल्यावर पाय गळाले. तिथेच बसून पाणी प्यायलो, शेवटचाच घोट उरला होता. दहा मिनीटे कसातरी फरफट करत चालत राहीलो तर समोर दगडावर लीडर सुस्वागतम करता झाला. मी अत्यंत मेणचट सुरात, अभी है ना और. तर म्हणे नही आ गया. मी त्या झोपडीकडे बोट दाखवून म्हणालो वो ना. तर म्हणे, नही वो तो किसी लोकल बंदोका घर है, हमारा कँप ये हे, म्हणत दगडाच्या मागे दाखवलं तर तिकडे झकास लाकडी केबीन आणि त्याच्या मागेच आमचे निळे तंबू.

हायला, मला इतकं हसू आलं आणि त्या पोर्टरचा राग यायच्या ऐवजी मजाच वाटली. सॉलीड फिरकी घेतली भाऊने.
गेलो तो अमेयने तंबू पकडला होताच, सॅक तिथेच टाकली आणि तसाच चहा प्यायला पळालो. ते गरमागरम पेय घोटाघोटाने घशाखाली जाताना जाणवलं की सुख सुख म्हणतात ते हेच.

रात्री जेवणाच्या वेळी लीडरने घोषणा केली की उद्या आपला विश्रांतीचा दिवस आहे पण पहाटे उठून आपण झोंगरी टॉपला जाणार आहोत. पण जे फिट असतील त्यांनाच परवानगी मिळेल. मग फिटनेस टेस्ट म्हणजे काय तर सगळ्यांची ऑक्सिजन लेवल तपासली. कित्येकजण त्यातच नापास झाले. मी अगदी काठावर होतो पण मला किंचित डोके दुखल्यासारखे वाटत होते. पण मला वाटत होतं की ते अल्टीट्युड नाही तर थंडीमुळे कारण देवराली टॉपच्या इथून निघताना मी टोपी काढून ठेवली होती आणि नंतर दमणूकीमुळे ती घालायची विसरलो. गार वारे कानात जाऊन माझी ट्रेकच्या आधीची सर्दी पुन्हा डोके वर काढू लागली होती आणि त्यानेच डोके दुखत असावे. पण लीडर काही ऐकून घेईना, म्हणे आप नही जायेंगे, रेस्ट करेंगे. अमेय फिट अँड फाईन होता पण मला बाद केल्यावर त्याने स्वखुशीनेच न जाण्याचा निर्णय घेतला. म्हणलं अरे तू जा की. नकोच म्हणला.

दरम्यान, बऱ्याच लोकांना श्वास घेताना त्रास होत होता, काही जण थंडीने बेजार झाले होते, दोघांच्या पावलांना सूज आलेली तर रचीत कुठेतरी धडपडला होता आणि त्याच्या पायाला चांगलेच लागले होते. तरी पठ्ठ्या निवांत होता. पण एकेक जण बाद करत शेवटी मोजकेच लोकं झोंगरी टॉपला जातील असे ठरले आणि त्यांना मग मस्त फोटो काढा वगैरे सांगून आम्ही आमच्या शयनकक्षात झोपायला गेलो.

 

 

 

 

 

 

 

 

 

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...