Monday, January 23, 2023

भाग १ - प्रबळगड़ - कलावंतीण सूळका ... !

 http://mazisahyabhramanti.blogspot.com/2009/02/blog-post_19.html


भाग १ - प्रबळगड़ - कलावंतीण सूळका ... !

५ फेब. ला मी, अभिजित, अमृता आणि ऐश्वर्या पनवेल जवळ असणाऱ्या प्रबळगड़ - कलावंतीण सूळका येथे गेलो होतो. सवयीप्रमाणे बाइक्स काढल्या आणि सकाळी ६ला ठाण्यावरुन निघालो. तस ऐश्वर्याला ५च्याही आधी निघावा लागल होत. ही पोरगी ग्रेट आहे. कसला तो उत्साह आणि आवड. खाण्याच नाही बोलत आहे इथे; ट्रेकबद्दल बोलतोय. हा.. हा.. खाण्याच नंतर बोलूयात. आता त्याच लाइनला अमृता सुद्धा येउन पोचली आहे. त्याच लाइनला म्हणजे ट्रेकच्या. मी आणि अभिजितने २००० पासून एकत्रच भ्रमंती सुरु केली. अभि आणि मी एकदम 'बेस्ट ट्रेक बड़ी'.

पनवेल नंतर पळस्पे फाटयाला नेहमीप्रमाणे नाश्ता आटोपला आणि सुसाट निघालो ते थेट शेडुंग फाटयाला डावीकड़े वळालो, कर्जत - पनवेल रेलवेचा बोगदा लागला त्यापलीकडे प्रबळगड़ दिसत होता. पायथ्याला ठाकुरवाडीला पोचलो. ठाकुरवाडीच्या डाव्या हाताला असलेल्या टेकाडावरुन कलावंतीण सुळक्याकड़े रस्ता वर जातो. त्या टेकाडाच्या पायथ्याला गाडया लावून निघालो. माथ्यावर जाउन झेंडा लावणे आमचे उदिष्ट कधीच नसते. त्यामुळे आम्ही एकदम सावकाश ट्रेक करतो, अर्थात किमान वेळेचे गणित मांडून. प्रत्येक डोंग़रावर एक फोटोस्पॉट असतो. तसा एक मस्त फोटोस्पॉट आम्हाला लगेच मिळाला. तिकडे थोडी फोटोग्राफी झाली आणि आम्ही पुढे निघालो. प्रबळगड़माची लागली. साधारण ९ वाजत आले होते. चढ़ सुरु झाला आणि पाणी संपायला लागल. प्रबळगड़ला जाताना नेहमी जास्त पाणी घेउन जावे, एकदा का माची सोडली की कुठे पाणी नाही. गडावर असलेल पाणी पिण्यायोग्य राहिलेला नाही.

प्रबळगड़ आणि कलावंतीण सूळक्या मधल्या 'V' आकाराच्या खिंडी मध्ये पोचलो तेंव्हा जवळजवळ ११वाजून गेले होते. तिकडे एक मस्त फ़ूड ब्रेक घेतला आणि मग कलावंतीण सुळक्याच्या त्या सुंदर आणि लांबून नजर रोखून धरायला लावणाऱ्या कोरीव पायऱ्या चढायला लागलो. ज्या अपेक्षेने गेलो होतो त्यापेक्षा सोप्या निघाल्या त्यामुळे फारसा त्रास झाला नाही. ३०मी. मध्ये कलावंतीण सुळक्याच्या माथ्यावर होतो. तिकडून माथेरान, इर्शाळगड़ आणि धुरकट मलंगगड़ दिसत होता. पावसाळ्यात मात्र एकडे यायला जास्त मज्जा येइल. पुन्हा येऊ अस ठरल आणि आम्ही उतरायला सुरवात केली. माझी तब्येत २ दिवस आधीपासून थोडी ख़राब होती आणि ट्रेक सुरु केल्यापासून जास्तच बिघडत चालली होती. कोणी आठवण काढत होत का माहीत नाही पण उचक्या काही थांबत नव्हत्या.

(मी, अभिजीत, अमृता आणि ऐश्वर्या - कलावंतीण सुळक्याच्या माथ्यावर)

खिंडीमध्ये परत आलो तेंव्हा १ वाजत आला होता आणि आम्ही उन्हाने करपत होतो. पाणी धडाधड संपत होत आणि अजून आख्खा प्रबळगड़ करायचा राहिला होता. खिंडीमध्ये पायथ्याला एक मस्त गुहा आहे. जो कोणी प्रबळगड़ - कलावंतीणला जाइल त्याने ही गुहा चुकवू नये. ५०फुट सरकत सरकत आत जावे. शेवटपर्यंत पुढचा रस्ता कळत नाही. शेवटी डावीकड़े जायला वाट दिसते. डावीकड़े वळून ७-८ फुट गेले की परत उजवीकडे वाट वळते. पुन्हा २-४ फुट आत गेला की एक प्रशस्त गुहा लागते. चांगली १०-१५ फुट लांब आणि १५-२० फुट रुंद. ज्यांना श्वास घायला त्रास होतो अश्यांनी आत जाणे टाळावे. एक वेळेला ५ पेक्षा जास्त व्यक्तींनी आत जाऊ नये. टॉर्च न्यायला विसरु नका बरे. नाहीतर आत दिसणार काय आणि तुम्ही बघणार काय...

क्रमशः ... 

भाग १ वरुन पुढे सुरु ...

तिथून निघालो ते थेट प्रबळगडाच्या कड्याखालून सरकत सरकत मुळ वाटेवर येउन पोचलो. एकडे मध्ये अमृता धडपडली. जास्त काही झाल नाही. ह्या वाटेने आमचा थोडा वेळ वाचला होता. आता खरी चढाई सुरु होणार होती. किती वाजले, पाणी किती बाकी आहे हे सगळ पाहील आणि फटाफट पल्ला मारायचा अस ठरवून सुटलो. पुढे जाउन पुन्हा एक क्षणभर विश्रांती झाली. माझी तब्येत आता टोटल डाउन होत चालली होती. पण आता थांबायचे नाही असे ठरवून आम्ही निघालो ते थेट प्रबळगड़चा ढासळलेला दरवाजा आणि तटबंदी ओलांडून माथ्यावर पोचलो. आमच्याकडचे पाणी संपले होते. तितक्यात वरती एका दगडावर 'पाणी' अस खडूच निशाण आणि मार्ग दाख़वणारा बाण दिसला. खर तर गडावर असलेल पाणी पिण्यायोग्य राहिलेल नाही पण त्या वेळी आम्ही ते पाणी प्यालो.

अभि आणि ऐश्वर्या पाणी आणायला गेले तर मी आणि अमृताने चक्क सुक्या गवतावर मस्त लोळण घेतली. हा.. हा.. मी बरेच दिवसांनी असा पहुडलो होतो. बिछान्यात लागणार नाही अशी झोप मला त्या ५-१० मी. मध्ये लागली होती. दोघे परत आले आणि मग आम्ही प्रबळगडाच्या टोकाशी जायला निघालो. तिकडून कलावंतीण सूळका एकदम जबरी दिसतो. त्यासाठी तर इतकी पायपिट केली होती. अखेर टोकाला पोचलो. ते दृश्य बघून भरून पावलो. सगळे श्रम एक क्षणात विसरलो.

'ह्याच त्या कलावंतीण सुळक्याच्या सुंदर आणि लांबून नजर रोखून धरायला लावणाऱ्या कोरीव पायऱ्या'


पुन्हा तिकडून पाण्याकड़े गेलो आणि आमचा लेट लंच उरकला. खायला काय होत ह्याचे डिटेल्स एकडे नको नाही का. कस असत की बरेच जणांना ते वाचूनच भूक लागते. आता ४:३० वाजून गेले होते आणि अंधार व्हायच्या आत आम्हाला किमान खाली गाडयांपर्यंत पोचयचे होते. पुन्हा सुसाट निघालो ते कुठेही न थांबता उतरायला सुरवात केली. माचीवर पोचलो आणि तिकडून खाली ठाकुरवाडीला. दिवसभर सुरु असलेली अमृताची फोटोग्राफी सुरूच होती. मावळत्या सुर्याचे काही मस्त फोटो तिने टिपले. खाली गाडयांपर्यंत पोचलो तोपर्यंत पूर्ण अंधार झाला होता. त्यात कोणीतरी गाड़ीचा स्पार्कप्लग काढून टाकला होता. नशीब तो नीट लागला आणि गाड़ी सुरु झाली. आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. हा माझा ह्या सुट्टीमधला शेवटचा ट्रेक होता. बरेच दिवसांपासून डोक्यात असलेला एक ट्रेक एकदम मस्तपैकी पार पडला होता.

कलावंतीण सुळक्याच्या कोरीव पायऱ्या आणि खिंडीमध्ये पायथ्याला असलेली गुहा हे ह्या ट्रेकचे मुळ उदिष्ट होते. नेहमी खातो त्याप्रमाणे मी आणि ऐश्वर्याने फारसे खाल्ले पण नाही. तरीपण हा ट्रेक माझ्या बेस्ट ट्रेक्स पैकी झाला. पुढच्या महिन्यात करायचे ट्रेक्सचे प्लान बनवत बनवत परतीच्या वाटेला लागलो. 


राजगड प्रदक्षिणेच्या वाटेवर ...

 http://mazisahyabhramanti.blogspot.com/2010/11/blog-post_08.html

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. डिसेंबरचा महिना होता. रात्रीच्या मुंबई - पंढरपूर गाडीने मी एकटाच पुण्याच्या दिशेने निघालो होतो. पाठीवर असलेल्या मोठ्या सॅकमूळे ठाण्याला जनरल डब्यात कसाबसा घुसलो होतो. रात्रीच्या शांततेत ट्रेनची धड-धड अधिकच जोरात जाणवत होती. तितकीच जोरात होती माझी उत्कंठा. कारण मी जात होतो स्वराज्याच्या पहिल्या राजधानीवर... राजगडावर... :)


ह्या आधी २-३ वेळा राजगड दर्शन झालेले होते. ह्यावेळी मात्र राजगडाला प्रदक्षिणा मारायची योजना होती. महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून २२५ दुर्गप्रेमी राजगडावर हजेरी लावणार होते. मालाड येथील नेचर लवर्स या संस्थेने हा कार्यक्रम ठरवला होता. माहिती द्यायला सोबत असणार होते इतिहासतज्ञ आप्पा परब. पहाटे ५ च्या आसपास पुण्याला पोचलो आणि मी लगेच माझा मोर्चा एस.टी. स्थानकासमोरच्या चहावाल्याकडे वळवला. सोबत एक क्रीम रोल खाल्ला आणि ६ च्या वेल्हे गाडीची वाट बघत बसलो. गाडी आल्यावर माझी सर्वात आवडती जागा पकडली. इथे-तिथे कुठे नाही तर  थेट ड्रायव्हरच्या बाजूला, गियर बॉक्सच्या शेजारी. एस.टी. मधून प्रवास करताना मला नेहमीच ही जागा आवडते. २ तासात साखरला पोचलो. एस.टी. ला टाटा केला आणि गुंजवणेची वाट पकडली. आता पुणे-सातारा महामार्ग सोडून गाडी आत वळली आणि काही वेळातच दूरवर राजगड साद घालू लागला होता.



गुंजवणेला नेचर लवर्स संस्थेच्या सदस्यांकडे आल्याची नोंदणी केली. राजगडला आले की बेधुंद व्हायला होते. मनात अनेक विचार दौडत असतात. त्या विचारांवर स्वार होत गड चढणीला लागलो. जरा वरच्या टप्याला गेलो की डाव्याबाजूला प्रचंड सुवेळा माची, त्यात असलेले नैसर्गिक नेढ, झुंझार बुरुज, समोर पद्मावती माची आणि त्यामागे असलेला अभेद्य बालेकिल्ला असे राजगडाचे अप्रतिम दृश्य दिसते. ते बघत वरच्या चढणीला लागलो. मध्ये लागणाऱ्या सपाटीनंतर वाट निमुळती होत अधिक चढणीला लागते आणि चोरवाट असल्याची साक्ष देत राहते. तासा - दीडतासाने शेवटच्या टप्प्यामध्ये वाट कड्याखालून गर्द कारवीच्या झाडीमधून पुढे जाते आणि मग डावीकड़े कड्यावरुन वर चढते. ह्याच वाटेवर सुरु होतो 'राजगड प्रदक्षिणेचा मार्ग'. कारवी जिथे सुरु होते तिथून चोर दरवाज्याकडे येण्याऐवजी जर तिकडून झाडीमध्ये डावी मारली तर एक बारीक पायवाट गुंजवणे दरवाजाच्या दिशेने जाते. ही वाट फारशी मळलेली नाही. मी कड्यावरून चढून चोर दरवाज्यामधून प्रवेश करता झालो आणि पद्मावतीमाची वरच्या आई पद्मावतीच्या देवळाच्या बाजूला एका टेन्टमध्ये विसावलो. अनेक जण येऊन पोचले होते. अनेक गड चढून येत होते. ६ वर्षाच्या चिमुरड्यापासून ते ६६ वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सर्व वयोगटाच्या लोकांचा उत्साह बघण्याजोगा होता. आजच्या दिवसात जमेल तितका राजगड बघणे आणि उद्या गडाची प्रदक्षिणा मारणे असा २ दिवसाचा कार्यक्रम नक्की होता.

पद्मावती तलाव

राजगड - ज्या ठिकाणी राजांचे २५-२६ वर्ष वास्तव्य होते.(१६४६ - १६७१-७२) काय नाही पाहिले राजगडाने ह्या २५-२६ वर्षांमध्ये. त्याने पाहिले १६४८ मध्ये शहाजी राजांच्या अटकेची आणि मग सुटकेची बातमी, १२ मावळची व्यवस्था लावताना राजांनी घेतलेले परिश्रम, १६५५ मध्ये जावळी संदर्भामधील बोलणी आणि आरमाराची केलेली सुरवात सुद्धा राजगडाने अनुभवली. १६५९ ला अफझलखान आक्रमण करून आला तेंव्हाची काळजी आणि त्याचवेळी महाराणी सईबाई यांचे निधन राजगडाला सुद्धा वेदना देउन गेले. १६६१ राजे पन्हाळ गडावर अडकले असताना मासाहेबांच्या जिवाची घालमेल पाहिली. शाहिस्तेखानाला झालेली शास्त आणि सूरत लुटीसारख्या आनंदी बातम्या राजगडाने ऐकल्या तर त्या मागोमाग लगेच शहाजीराजांच्या अपघाती निधनाची दु:खद बातमी सुद्धा ऐकली. १६६५ मध्ये पुरंदरचा तह करण्यासाठी आणि त्यानंतर आग्रा येथे जाण्यासाठी राजे येथूनच निघाले. सुटून आले ते सुद्धा राजगडावरच. राजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा जन्म १६७० मध्ये राजगडावरचं झाला. १६७१ मध्ये मात्र स्वराज्याचा वाढता विस्तार आणि राजगड परिसरात शत्रूचा वाढता धोका पाहून राजांनी १६७१ मध्ये राजधानी 'रायगड' येथे हलवण्याचा निर्णय घेतला. स्वराज्याने बाळसे धरल्यापासून ते वाढेपर्यंत राजगडाने काय-काय नाही पाहिले. अनेक बरे- वाइट प्रसंग. म्हणून तर तो 'गडांचा राजा आणि राजांचा गड' आहे.

आई पद्मावती



दुपारच्या जेवणापर्यंत सर्व दुर्गयात्री गडावर येऊन पोचले होते. संस्थेचे काही मुख्य सदस्य आणि आप्पांची मुलगी शिल्पा हीच्यासोबत सर्वजण गडफेरीला निघाले. मी मात्र देवळात आप्पांबरोबर थांबलो होतो. राजगड तसा २-३ वेळा बघून झाला होता. आज मात्र आप्पांबरोबर अधिक वेळ राहून काही अधिक ऐतिहासिक माहिती घेणे ही इच्छा होती. त्यामुळे पटापट सुवेळा माची आणि आसपासचे फोटो घेऊन पुन्हा देवळाबाहेर येऊन बसलो. त्या १-२ तासात ज्ञानात खूप भर पडली. राजगडाचे मूळ नाव मुरुमदेवाचा डोंगर. राजगड नाव दिले शिवरायांनी. आप्पांच्या मते खरेतर 'मुरूमदेव' हा 'बुहृमदेव' याचा अपभ्रंश असावा. बुहृमदेव म्हणजेच ब्रह्मदेव. राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आजही ब्रह्मश्रीचे मंदीर आहे. शिवाय पद्मावती माचीवर पद्मावती देवीचे मंदिर सुद्धा संयुक्तिक वाटते. खुद्द नावावरूनच राजगडाचे प्राचीनत्व समोर येते. राजगडाच्या बाबतीत आप्पांनी सांगितलेली अजून एक गोष्ट म्हणजे तोरणा प्रमाणे इथे सुद्धा शिवरायांना झालेला धनलाभ. गडाच्या गुंजवणे दरवाज्याची काम सुरु असताना एके ठिकाणी अचानक गुप्त धन सापडल्याची काही माहिती 'सप्त प्रकाराणात्मक' बखरी मध्ये दिलेली आहे. राजगडाच्या दोन्ही माच्या म्हणजे सुवेळा आणि संजीवनी यांच्या नावाबाबत सुद्धा काही माहिती ह्या बखरीमध्ये आढळते.



 सुवेळा माचीचा विस्तार!

 झुंजार बुरूज

 हत्ती प्रस्तर



सूर्य कलायला लागला तसे सर्वजण परतू लागले. संध्याकाळी आप्पांचे छोटेसे व्याख्यान होते. शिवाय त्यांच्या 'राजगड प्रदक्षिणेच्या वाटेवर' ह्या पुस्तकाचे प्रकाशन देखील होते. वयाची सत्तरी गाठलेल्या आप्पांचा खणखणीत आवाज राजगडाच्या पद्मावती माचीवर निनादत होता. राजगडाचे सखे-शेजारी सिंहगड, तोरणा आणि दुरून रायगड ह्या सर्वांचेच आज राजगडाकडे लक्ष्य लागले होते बहुदा. म्हणता म्हणता आप्पांनी १७व्या शतकातला राबता राजगड आमच्या डोळ्यासमोर उभा केला. ते देऊळ, माची, ते बुरुज, सदरं सारे सारे काही पुन्हा शहारून जागे झाले होते. भारावलेले काही क्षण ते पुन्हा नक्कीच जगले असतील. व्याख्यान संपले तसा गडही शांत झाला. आम्ही जेवून निद्रिस्त व्हायची तयारी केली आणि आपापल्या टेन्टमध्ये जाऊन पहुडलो. मी कपाळावर हेडटोर्च चढवला आणि नुकतेच प्रकाशित झालेले ते छोटेखानी पुस्तक अर्ध्या तासात पूर्ण वाचून काढले. रात्रीच्या ११ नंतर पुन्हा एकदा टेन्ट बाहेर आलो तर सर्वत्र सामसूम होती. वारा मोकाट सुटला होता आणि दूरवर फडकणाऱ्या जरीपटक्याला जोराने फडकावत होता. मी पुन्हा आत येऊन झोपी गेलो. उद्या पहाटे ६ वाजता गड सोडायचा होता. प्रदक्षिणेच्या वाटेवर लागायचे होते.


पहाटे ६ वाजता उठून तयार झालो. बरोबर ७ वाजता पद्मावती माचीवरच्या चोर दरवाज्याने प्रदक्षिणेसाठी गड सोडला आणि तो छोटासा कडा उतरून कारवीच्या वाटेवर लागलो. पुढे-मागे सोबत प्रदक्षिणार्थी होतेच. कारवी संपली तिथून उजव्या हाताला आत शिरलो आणि प्रदक्षिणा सुरु झाली. समोर दूरवर सुवेळा माचीचे टोक दिसत होते. अंदाज बांधला. तिथपर्यंत पोचायला किमान २ तास तरी लागणार. आता झाडी कमी झाली होती आणि उंच वृक्षातून डोकावणारे सकाळचे कोवळे उन आल्हाददायक वाटत होते.





मध्येच एके ठिकाणी कड्यावर अनेक मधमाश्यांची पोळी लटकलेली दिसली. त्यांच्या वाटेला कोण जाणार! गुपचूप आवाज न करता सर्वजण पुढे सरकलो.अधून मधून हळू आवाजात गप्पा सुरु होत्या. कोण कुठून आलाय. वगैरे वगैरे. बहुतेक लोक पुण्या-मुंबई आणि सातारा-कोल्हापूरचे होते. काही रत्नागिरी-रायगड तर काही नाशिक आणि पार नगर-औरंगाबादहून देखील आलेले होते. मोजके २-३ लोक तर थेट नागपूरवरून आलेले होते. तासभराच्या चाली नंतर मध्ये एके ठिकाणी पाणी प्यायला थांबलो. तिकडे कोपऱ्यात एक छोटूसे घरटे दिसले. पण घरात कोणीच नव्हते. सकाळी-सकाळी बहुदा कामावर निघून गेले घरातले लोक!!!



आम्ही पूर्व दिशेने निघालो होतो तेंव्हा आता उन समोरून यायला लागले होते. सुवेळामाचीच्या उतरत जाणाऱ्या डोंगरसरी एक-एक करून पार करत आम्ही त्या टोकाकडे निघालो होतो. माझे लक्ष्य चौफेर होते. एक तर अशी भ्रमंती पुन्हा सहसा होणार नव्हती. तेंव्हा जे दिसेल ते डोळ्याने आणि कॅमेऱ्याने टिपणे हे माझे लक्ष्य होते. दर काही पावलांनी मी वळून मागे बघत असे. अश्याच एका वेळी टिपलेला हा बालेकिल्ल्याच्या महादरवाज्याचा फोटो.

राजगडाचा बालेकिल्ला का अभेद्य आहे त्याचा एक प्रत्यय... आहे कोणाची हिंमत तिथवर पोचायची?



सुवेळा माचीपर्यंत पोचायचे अर्धे लक्ष्य पूर्ण झाले होते. आता वाट अधिक वाट लावत होती. आम्ही आता झुंझार बुरुजाच्या खाली होतो. वाटेत एकेठिकाणी छोटीशी खोदीव गुहा लागली. आत्तापर्यंत राजगड बाबतीत मी ह्या गुहेचा उल्लेख कुठेच वाचलेला नाही. सुवेळा माचीच्या झुंझार बुरुजाच्या बरोबर खाली असलेल्या ह्या गुहेबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण काही माहिती हाती लागली नाही. संरक्षणाच्या दृष्टीने त्याचे निश्चित काही महत्व असू शकेल असे वाटते.

 

हत्तीप्रस्तरच्या खालच्या बाजूने. वाघाचा डोळा म्हणजेच 'नेढं' पण दिसतंय!



वर पहिले तर लक्ष्य थेट 'हत्तीप्रस्तर' आणि 'वाघाचा डोळा' उर्फ नेढ्याकडे गेले. जबरदस्त नजारा होता. आता आम्ही सुवेळा माचीच्या शेवटच्या टप्प्याचे अंतर बाहेरून पूर्ण करत होतो. जेंव्हा मी माचीच्या बाहेरील बाजूस पोचलो तेंव्हा जे पहिले ते थक्क करणारे होते.



 

सुवेळा माचीची बाहेरील बाजू.. जणू राजगड सांगतोय, 'लढलो जरि, ना पडलो मी!'

जेंव्हा औरंगजेब खुद्द राजगडावर चालून आला तेंव्हा मुघलांनी सुवेळा माचीच्या बाजूने मोर्चे बांधून तोफांचे  प्रचंड हल्ले केले होते. खासा बादशाहा जातीने उभा राहून तोफा कुठे डागायच्या ते सांगत होता. त्याच्या खुणा आजही तिथे स्पष्ट दिसतात. ह्या लढाईमध्ये संताजी शिळीमकर यांनी वीर पराक्रम केला. मराठ्यांनी तोफांचा असा काही प्रतिहल्ला केला कि खुद्द बादशाहा उभा असलेला धमधमा पडला आणि अर्थात औरंगजेब सुद्धा पडला होता. परंतु अखेरीस ह्या लढाईमध्ये संताजी शिळीमकर यांना वीरमरण आले. तोफेचा गोळा लागून हा वीर मराठा धारातीर्थी पडला. सुवेळा माचीच्या झुंझार बुरुजाच्या जरा पुढे उजव्या हाताला असलेला गणपतीच्या जागी आधी संताजींची वीरगळ होती असे म्हणतात.


इकडे काहीवेळ उसंत घेतली आणि सुवेळा माचीला वळसा घालत. काळकाई बुरुजाच्या दिशेने निघालो. वाट अधिकच घसरत होती. जमेल तिथे हाताला जे सापडते ते पकडून पुढे सरकावे लागत होते. १० वाजून गेले होते आणि उन आता पाठीवर हल्लाबोल करत होते. कधी एकदा काळकाई बुरुजाच्या खालच्या गर्द झाडीत शिरतोय असे झाले होते. तिथे पोचायला तरी तासभर लागलाच. सावली मिळाल्यावर जरा निवांत बसलो. वर बघतो तर संस्थेचे काही कार्यकर्ते काळकाई बुरुजावरून दोराच्या सहाय्याने पाण्याचे ड्रम खाली पोचवत होते. कोणालाही उनाचा त्रास होऊ नये ह्याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली होती. सुवेळा माचीला देखील त्यांनी असेच केले होते. हवे तितके पाणी प्यायचे आणि बाकी भरून घ्यायचे. आता आम्ही सावलीतून पुढे निघालो. इकडे २ ठिकाणी दोराच्या सह्हायाने खाली उतरायचे होते. खरेतर इतके कठीण नव्हते पण काहीजण नवखे असल्याने जास्त वेळ घेत होते. ज्यांना जमत नव्हते त्यांना धीर देत पुढे न्यावे लागे. पण महत्वाचे म्हणजे कोणी मागे हटत नव्हते. वेळ लागला तरी हे करायचेच आहे हा निर्धार प्रत्येकाने केलेला होता. इतक्या मोठ्या संखेने लोकांबरोबर ट्रेक करायचा हा माझा पहिलाच अनुभव होता. मी सुद्धा एकटाच ह्या ट्रेकला आलेलो होतो. मला थेट ओळखणारे असे कोणीही ह्या २२५ लोकांमध्ये नव्हते. तरी सुद्धा सर्वजण एकमेकांना सांभाळत, काळजी घेत ट्रेक करत पुढे सरकत होते. आमच्यात असणारा एकमेव समान दुवा म्हणजे शिवरायांवर असणारी निस्सीम भक्ती, आदर आणि देवतुल्य भावना. हा एक दुवा आमच्यात नवे बंध निर्माण करायला पुरेसा होता.


काळकाई बुरुजाच्या खालचा हा छोटासा टप्पा पार करायला चांगले २ तास लागले. वळसा मारून आता आम्ही संजीवनी माचीच्या दिशेने निघालो. १२ वाजून गेले होते आणि पोटात भूक जाणवायला सुरवात झाली होती. उजव्या बाजूला वरती अळू दरवाजा आणि तिथून दोराच्या सह्हायाने खाली पाठवले जाणारे साहित्य पाहिले आणि खात्री पटली की चला जेवाय-जेवाय करायचे आहे. बरेच दिवसांनी वनभोजनाचा आनंद लुटला आणि जरा निवांत झालो. आता पुढची वाट बरीच सोपी होती. राजगडवरून तोरणाला ज्या वाटेने जातात तीच वाट आता घ्यायची. उजव्या बाजूला संजीवनी माचीचे दुहेरी संरक्षण बुरुज अगदी जवळ दिसत होते.



 

दुहेरी बुरूज संरक्षण... अद्वितीय तटबंदी... संजीवनी माची





संजीवनी माचीच्या तिसऱ्या टप्यामध्ये आहे 'दुर्गरचनेचा परमोच्च अविष्कार'. दोन्ही बाजुस असलेली दुहेरी तटबंदी, त्यामधून विस्मयजनकरित्या खाली उतरणारे दोन्ही बाजुस ३-३ असे एकुण ६ दुहेरी बुरुज आणि टोकाला असणारा चिलखती बुरुज. असे अद्वितीय बांधकाम ना कधी कोणी केले. ना कोणी करू शकेल. मागे कधी तरी (बहुदा १९८७ मध्ये) स्वित्झरलैंड येथील जागतिक किल्ले प्रदर्शनामध्ये राजगडाला 'जगातील सर्वोत्कृष्ट डोंगरी किल्ला' तर जिब्राल्टरनंतर दुसऱ्या क्रमांकाचा किल्ला असे पारितोषिक मिळाले होते. आम्ही आता एका बाजूचे ३ दुहेरी बुरुज बघत होतो. आत जाणे आत्ता शक्य नव्हते पण त्यासाठी मी उद्याचा दिवस हातात ठेवला होता. काही मिनिटात संजीवनी माचीला वळसा मारत पुन्हा राजगडाच्या राजमार्ग म्हणजे पाली दरवाज्याच्या दिशेने निघालो. वाट आता  होती आणि इथून संजीवनी माचीचे ३ टप्प्यात केलेले बांधकाम स्पष्ट दिसत होते.

संजीवनी माचीचे तीन टप्प्यांमधले घडीव देखणे बांधकाम!

 पाली दरवाजा- दुहेरी रचना!



वाटले नव्हते पण जेवून निघाल्यावर सुद्धा चांगले ३ तास लागले होते पाली दरवाज्यापर्यंत यायला. संजीवनी माचीची लांबी किती आहे ह्याचा प्रत्यय नेमका येत होता. गडाची प्रदक्षिणा पूर्ण झाली होती. तब्बल ११ तास लागले होते प्रदक्षिणेला. पण एक इच्छा पूर्ण झाली होती. सूर्य पुन्हा एकदा निरोप द्यायला तयार झाला होता. मी पुन्हा राजमार्गाने गड चढून पद्मावती माचीकडे पोचलो आणि सदरेमागच्या तटबंदीवरून सूर्यास्त बघू लागलो.





दिवसा अखेरीस प्रदक्षिणा संपली असली तरी जेवणाआधी अजून एक कार्यक्रम बाकी होता. शिवरायांची पालखी नाचवायचा. पेटत्या मशाली, फडकणारे जरीपटके आणि मधोमध श्री शिवछत्रपतींची पालखी. वा!!!



ह्यापेक्षा अधिक उल्हासित करणारा सोहळा कुठला? आज संपूर्ण भरून पावलो. शिवरायांच्या जयजयकाराने संपूर्ण गड दुमदुमून गेला होता. गड पुन्हा एकदा जागा झाला होता. बऱ्याच काळाने शहारून उठला होता तो. आपली माणसे भेटली की जसा आपल्याला आनंद होतो तसा आनंद राजगडाला झालेला होता. बऱ्याच काळाने गड शांत झाला. सर्वजण पांगले. जेवणे आटोपली. निवांत पडले. पहाटे उठून पुन्हा परतीच्या मार्गाला लागायचे होते ना.


मी सकाळी जरा उशिराने उठलो. सर्वांची आवरा-आवरी सुरु होती. सर्वत्र साफसफाई करून गड सोडायचा होता. आणि मग तिथून आपापल्या घरी. मी मात्र मागे थांबणार होतो. गड जरा उशिराने सोडायचा मी ठरवले होते. स्वतःचे सामान पाठीवर मारले, आप्पांना नमस्कार केला आणि निरोप घेऊन मी बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. सकाळी-सकाळी बालेकिल्ल्याच्या दरवाजातून मला एक फोटो घ्यायचा होता.

 बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार आतील बाजूने. समोर दिसतोय सुवेळा माचीचा विस्तार!

संजीवनी माची ... !



बालेकिल्ल्यावर एक धावती चक्कर मारली आणि उतरून संजीवनी माचीच्या दिशेने निघालो. संजीवनी माचीची रुंदी अतिशय कमी असून लांबी प्रचंड आहे. माची एकुण ३ टप्यात विभागली आहे. जमेल तितके पुढे जाऊन मला काही फोटो घ्यायचे होते.

मोजके फोटो घेतले आणि परतीच्या मार्गाला लागलो. खरेतर दुहेरी बुरुजांपर्यंत जाऊन काही फोटो घ्यायचे होते पण ते शक्य झाले नाही. मी वळून पुन्हा पाली दरवाज्याच्या दिशेने निघालो. तिथे काही वेळ घालवून मी पुन्हा पद्मावती माचीकडे निघालो. खरेतर तिकडून उतरून वाजेघर मार्गे जाता आले असते पण मी पुन्हा गुंजवणे मार्गेच उतरायचा निर्णय घेतला. पद्मावती आईच्या मंदिरापाशी आलो. सर्वत्र सामसूम होती. सर्व निघून गेले होते. गडावर बहुदा मी एकटाच होतो. नाही म्हणायला एक कुत्रा समोर स्तंभापाशी बसला होता. मंदिरात जाऊन आईला नमस्कार केला. बाहेर येऊन उजव्या बाजूला पहिले तो बालेकिल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जरीपटका अजूनही डौलाने फडकत होता. नकळत एक हात छातीवर गेला. राजांचे स्मरण झाले. मी दोन्ही हाताने सॅक टाईट केली आणि झपाझप पावले टाकत परतीच्या वाटेला लागलो. चोर दरवाजाच्या पायऱ्या उतरायच्या आधी पुन्हा एकदा नजर मागे वळलीच. मनातच म्हणालो,"राजगडा... मी पुन्हा येणार आहे. लवकरच...

Thursday, January 19, 2023

सी अॅनिमोन्स (Sea Anemones)

 https://divakarsatam.com/2022/05/27/sea-anemones/

डोंगरावर माझे विशेष प्रेम जरी असले तरी वेळासच्या समुद्र किनाऱ्यावर गेली अनेक वर्ष समुद्र कासवे पाहण्यासाठी जाणे होते आहे. पण गेल्या दोन वर्षात अभिषेक सोबत येत असल्याने समुद्रातील एक अद्भूत अशी वेगळी दुनिया समोर येत आहे. त्यातील असा हा सुंदर प्राणी जो फोटो मध्ये दिसतो आहे तो प्राणीच आहे. सी अॅनिमोन्स (Sea Anemones) नावाचा.

याला  ‘समुद्राची फुले’ असे म्हणून देखील ओळखले जाते, समुद्रातील अॅनिमोन्स हे खरोखर सुंदर प्राणी आहेत, जेलीफिश आणि कोरल यांच्याशी अगदीच घरोबा असलेला.

जेलीफिश आणि कोरल प्रमाणेच, अॅनिमोन्स Cnidarians गटातील आहेत. Cnidaria हे नाव लॅटिन cnidae वरून आले आहे ज्याचा अर्थ ‘चिडवणे’ आहे. या गटातील सर्व प्राण्यांमध्ये स्टिंगिंग पेशी असतात ज्याचा वापर ते शिकार पकडण्यासाठी आणि भक्षकांपासून संरक्षण करण्यासाठी करतात. सी अॅनिमोन्स हे साधे प्राणी आहेत, जे अनेकदा खडक आणि दगडांसारख्या कठीण पृष्ठभागांशी जोडलेले असतात. तथापि, समुद्राच्या तळावरील वाळू, चिखल किंवा खडीमध्ये स्वत: ला गाडणारे अ‍ॅनिमोन देखील आहेत.

सी अॅनिमोन्समध्ये अनेक वेगवेगळ्या तंत्रांच्या संयोजनाचा वापर करून काही प्रजातींसह पुनरुत्पादनाच्या अनेक आकर्षक पद्धती आहेत. बीडलेट आणि डेझी अॅनिमोन्ससह काही वाष्पयुक्त असतात आणि अंतर्गत गर्भाधानाद्वारे पुनरुत्पादन करतात, त्यांच्या तोंडातून पूर्णतः तयार झालेले तरुण अॅनिमोन्स सोडतात. बहुतेक अॅनिमोन्स नवोदितांद्वारे अलैंगिकपणे पुनरुत्पादन करू शकतात, जेथे तुकडे तुटतात आणि नवीन व्यक्तींमध्ये विकसित होतात. काही त्यांच्या पायथ्याशी पसरतात आणि मध्यभागी विभाजित होतात परिणामी समान आकाराचे दोन नवीन अॅनिमोन तयार होतात. या पद्धतीला अनुदैर्ध्य विखंडन म्हणतात. इतरांमध्ये, ऊतींचे लहान तुकडे बेसपासून फुटतात आणि लहान अॅनिमोन्स तयार करतात. या पद्धतीला बेसल लेसरेशन म्हणतात.

आश्चर्यकारक गोष्टी

  • काही अॅनिमोन्स जसे की स्नेकलॉक अॅनिमोन अल्ट्रा व्हायोलेट प्रकाशाखाली फ्लोरोसेंट हिरव्या रंगात चमकतात.
  • मासे आणि कोळंबी अनेकदा अ‍ॅनिमोनच्या तरंगत्या तंतुमध्ये भक्षकांपासून लपलेले आढळतात.
  • समुद्रातील अॅनिमोन्सचे तोंड तळ  भागाला असते !
  • काही अॅनिमोन्समध्ये लहान शैवाल राहतात, ज्यामुळे त्यांना सूर्यापासून अतिरिक्त ऊर्जा मिळू शकते!

ते कसे हलतात?

बहुतेक सागरी अॅनिमोन्स कशाला ना कशाला तरी जोडलेले राहतात, त्यांच्या तंतुने जात असलेले अन्न पकडतात. समुद्रातील अॅनिमोन्स त्यांच्या तळावर सरकत हळू हळू जाऊ शकतात. विलग करून, विद्युतप्रवाह पकडणे आणि इतरत्र पुन्हा संलग्न करून शिकार किंवा स्पर्धा टाळण्यासाठी वेगवान हालचाल करण्यास देखील बरेच जण सक्षम आहेत.

ते काय खातात?

बहुतेक ऍनिमोन्सच्या आहारामध्ये प्लँक्टन, खेकडे आणि मासे यांसारख्या लहान प्राण्यांचा समावेश असतो, तथापि अनेक मोठे समुद्री ऍनिमोन्स जास्त मोठे शिकार खातात. उदाहरणार्थ, डहलिया अॅनिमोन्स लोभी स्टारफिश आणि जेलीफिशची शिकार करतात.

ते कसे खायला देतात?

अॅनिमोन्सच्या मध्यवर्ती तोंडाभोवती तंतुच्या वलय असतात. तंतुमध्ये नेमॅटोसिस्ट नावाच्या विशिष्ट स्टिंगिंग पेशी असतात. ते त्यांचा शिकार स्थिर करण्यासाठी त्यांचा वापर करतात जेणेकरून तंतु अन्न तोंडात हलवू शकतील.  तंतुचा वापर अन्नपदार्थ पकडण्यासाठी देखील केला जाऊ शकतो कारण ते पुढे सरकते.

ते कुठे राहतात?

अॅनिमोन्सने समुद्राच्या चिखलाच्या खोलीपासून, समुद्रकिनारी, भंगार आणि ऑफशोअर रीफ्सपर्यंत, निवासस्थानांच्या विस्तृत श्रेणीशी जुळवून घेतले आहे. काही जण इतर सजीव प्राण्यांनाही जोडतात. बीडलेट अॅनिमोन हे किनार्‍यावर आढळणार्‍या स्पेसिसचे उदाहरण आहे, जे भरती ओहोटीच्या वेळी, शरीराच्या आत मंडप ओढून पाण्याबाहेर जगू शकते.

ते किती दिवस जगतात?

काही समुद्रातील अॅनिमोन्स खूप दीर्घकाळ जगतात आणि 60-80 वर्षांपर्यंत पोहोचतात. अॅनिमोन्स स्वतःचे क्लोन करण्यास सक्षम असल्यामुळे त्यांचे वय होत नाही आणि त्यामुळे भक्षक किंवा रोग नसतानाही अनिश्चित काळ जगण्याची क्षमता असते.

गांजाचा चहा!

 https://divakarsatam.com/2020/08/31/tahulifort/

सह्याद्रीतील भटकंतीचा पर्वणीचा हंगाम म्हणजे पावसाळा.  भटकंतीच्या प्रेमात आकंठ बुडालेलो आम्ही प्रत्येक शनिवार, रविवारी डोंगरदऱ्यामध्ये मनसोक्त भटकायचो. दिनांक २८ जुलै २०१३, रविवारी संस्थेचा ट्रेक ठरला होता. त्याला बगल देऊन दोन दिवसाची मोहीम आखणे शक्य नव्हते पण शनिवारचा दिवस मात्र वाया जाऊ नये म्हणून मी आणि लक्ष्मणने  मिळून आडवाटेवरच्या ताहुली किल्लावर आखली. 


ताहुलीला जाण्यासाठी दोन मार्ग एक म्हणजे अंबरनाथच्या काकुली तलावाच्या कडेने जाणार तर दुसरा कल्याण मलंगड रस्त्यावर येणाऱ्या कुशिवली मधून जाणारा… आम्ही कुशिवलीचा मार्ग निवडला कारण तो थोडा जवळचा. (कारण आजच्या ट्रेकमुळे उद्याचा संस्थेचा ट्रेक चुकवायचा नव्हता.) 


ताहुलीला किल्ला म्हणणे योग्य नाही ठरणार कारण किल्लेसदृश्य असे तिथे काही दिसले नाही.  वाटेत गाडगेबाबांचा मठ आणि दोन छोटे आश्रम लागले. डोंगरमाथ्यावर एक छोटी झोपडी, जवळच पाच पीर आणि ढगांशी लापछपी खेळणारे ‘दाऊद’ आणि ‘बामण’ नामक दोन सुळके. त्यामुळचे की काय डोंगर भटकेसुद्धा जास्त या आडवाटेला फिरकत नाहीत.


गावातून बैलगाडीच्या रस्त्याने आम्ही ताहुलीकडे कूच केले. सुरुवातीला सोप्पी वाटणारी वाट पुढे ढोरवाटेमध्ये हरवून गेली. धुके आणि पावसाचा खेळ सुरूच होता त्यामुळे डोंगरावरून अंदाज येत नव्हता. नकाशा आणि दिशा याचा ताळमेळ बसवत आम्ही डोंगरात वाट काढत पुढे चालत होतो.

ताहुली वरून दिसणारे मलंग गडाचे नेढे

मध्ये वाहणारे पाण्याचे झरे अचानक येणाऱ्या पावसाच्या जोराने रुद्र रूप धारण करत होत. दोन डोंगराच्या बेचक्यामधून आम्ही तब्बल तीन तासाच्या चढाईने ताहुलीच्या पठारावर पोहोचलो. आणि वरती  एक रुळलेलली वाट आम्हाला एका झोपडीपाशी घेऊन गेली.

झोपडीत एक बाबा बसले होते. पुढला रस्ता त्यांना विचारून वाट धरली. ढगांच्या आड दडलेले डोंगराचे सुळके मधूनच डोकावून आम्हाला पहात होते.

एका कड्यावर निसर्गाचा हा अदभुत चमत्कार पाहून आम्ही खिळून बसलो होतो. हवेच्या जोरामुळे जमिनीकडे झोकावणारे धबधब्याचे पाणी आकाशाकडे उडून एक उलटा धबधबा आम्ही पाहत होतो.

त्यावेळी हे सारे कॅमेरात कैद करून निघालो वाटते परत जाताना झोपडीतल्या बाबांना जवळचे दोन बिस्कीटचे पुडे दिले आणि त्यांनीही चहाचा आग्रह केला.

खरे सांगायचे तर पावसात भिजून ट्रेक केल्यावर असा चुलीवरचा चहाला कोण नाही म्हणणार. बाबांनी अगदी झाडपाला टाकून मस्त चहा दिला. आणि आम्हीही आवडीने तो घेतला. पण काही वेळातच लक्षात आले की चहामध्ये ‘काही तरी’होते. खूप नाही पण थोडी फार झिंग जाणवत होती.

तेव्हा चहामध्ये काही गौडबंगाल असल्याचे जाणवले.  गावात पोहोचल्यावर याबाबत बोलणे झाले तेव्हा कळले चहात गांजा बाबा सर्रास घालून पितात… म्हणे शिवशंभोचा आशीर्वाद !🙏

Fort, Knowledge, Trekking

किल्ले बहुला.

 आयुष्यात पाहिल्यांदा आपल्या आर्मीला घाबरून जीव मुठीत धरून केलेला एक अविस्मरणीय ट्रेक - किल्ले बहुला.   ✍️ मेघन तारिहाळकर पाटील (चौफेर भटकंत...