Sunday, September 4, 2022

किल्ले ढाकची भरकटलेली भटकंती

 खंडाळयाच्या घाटातील राजमाची किल्ला तसा ब-याच जणांच्या परिचयाचा आहे. राजमाची किल्ला हा श्रीवर्धन आणि मनोरंजन ह्या दोन वेगळ्या दुर्गांचा मिळून बनलेला आहे. सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार हा किल्ला अजूनही मजबुतीने उभा आहे . घनदाट जंगलात वसलेल हे ठिकाण एकदा अवश्य भेट देण्यासारख आहे. दुरून ही जोडगोळी जितकी आक्राळ विक्राळ वाटते तितकी मात्र ती नाही. एखाद्या धष्टपुष्ट पाहिलवानाने अदबीने आणि नम्रतेने मृदु आवाजात बोलल्यास आपल्याला त्याच्याबद्दल जो आदर निर्माण होतो तोच अनुभव गडाजवळ गेल्यावर येतो.

राजमाची सर करायला आम्ही चौघा मित्रांनी सायंकाळी सात वाजता लोणावळयातुन सुरुवात केली. २००५ चा मार्च महिना होता. वन्य प्राणी पाहायला मिळावे म्हणून अंधाराची वेळ मुकरर केली होती. पोर्णिमा दोन तीन दिवसांवर होती, तसा चंद्रप्रकाश भरपुर होता त्यामुळे बॅटरी घेतली नव्हती. आणि त्याकाळी आमच्यापर्यंत मोबाईल पण पोहोचले नव्हते.आमची सहल वेळेवर ठरल्याममुळे मावळे कसेबसे कॉलेज उरकून हाताला येईल ते सामान आणि कपडे घेउन आले होते. लोणावळा स्टेशन वरून काही अंतर चालून तुंगार्ली धरणा नंतर एक घळ आहे तिथून खरा जंगल प्रवास सुरु होतो. घळीत जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा डोळे उघडे आहे हे पाहायला डोळ्यात बोट घालून पाहाव लागाव इतका काळाकुट्ट अंधार होता. दाट झाडी होती. हे अंतर कसंबसं धडपडत पार पडलं. पुढे दोन तीन तास आंधळी कोशिंबीर खेळत आणि छत्रपती शिवरायांचा जयघोष करत रात्री एक वाजता आम्ही उधेवाडी या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात पोहोचलो. कुत्र्यांच्या संरक्षक टोळीने आमचं धडाक्यात स्वागत केल. सुदैवाने गावातली एक व्यक्ती जागी होती.त्यामुळे एका घरात पथारी टाकायला जागा आणि प्यायला पाणी मिळाले.
सकाळी मावळे निवांत उठले. रात्रीच्या प्रवासाच्या गप्पा मारत मारत चहा नाश्ता झाला मग श्रीवर्धन आणि मनोरंजन च्या देशेने कूच केल. गडांवरून सभोवतालचा परिसर खूप सुंदर दिसतो . खंडाळ्याच्या घाटातली रेल्वे तर खेळण्या सारखीच दिसते. गडावरील वास्तू पाहत आणि वेगवेगळे ऐतिहासिक प्रसंग आठवत वेळ कसा जातो कळत नाही. श्रीवर्धन गडावर एक विस्तीर्ण गुफा आहे त्यासमोर मोठा पाण्याचा हौद आहे. चांगला दोन तीन पुरूस खोल. त्यात दोन तोफा पडलेल्या आहेत. या गुहेत बरेच ट्रेकर्स मुक्काम करतात. बाले किल्ल्यावरून पूर्वेला ढाकचा बहिरी दक्षिणेला लोहगड आणि विसापूर किल्ले दिसतात. ढाकचा बहिरी त्यामानाने जवळ वाटतो. आमच्यातल्या एका मावळ्याने ताबडतोब ढाकच्या स्वारीचा प्रस्ताव मांडला आणि तो सर्वानुमते संमत झाला. त्यानंतर एक तासाच्या आत जेवणाच्या भाकरी घेऊन आम्ही ढाकसाठी निघालो. उन चांगलच तापल होत. चार पाच तासांची पायपीट करून दाट जंगलात हा किल्ला आहे . वाचून या गडाबद्दल थोडीफार माहिती होती. वरवंड गावातुन पुढील वाटेची खातरजमा केली. “वाट चांगली हाय पण जंगलात चुकू नका अन गडाच्या टाक्याशिवाय रस्त्यात कुठंच पाणी गावायच नाय “ असा मोलाचा सल्ला एका गावकरीने दिला.
कसला गड आणि कसली गुफा. तीन एक तासाची पायपीट बाकी होती. सहयाद्रीच रौद्र रूप,घनदाट जंगल, ती सगळी निरव शांतता, किडयांचा विचित्र आवाज, चढ उतारांची ती वाट, कुठल्या तरी नवीन जगात आल्यासारखं वाटत होत . मधुनच कुठल्यातरी जंगली वनस्पतीचा सुगंध दरवळुन जायचा. तो आजही आठवल कि नाकात दरवळतो. संध्याकाळ जवळजवळ झालीच होती. साक्षात शिवरायांनी दोनदा भेट दिलेल्या जांबोली गावाजवळ असलेल्या कुंडेश्वर शिव मंदिरात आम्ही पोहचलो. आधी विचार होता मंदिरातच मुक्काम करावा परंतु तिथे थांबायची कुणाची हिम्मत होत नव्हती. सोमवार असल्याने पूजा वगैरे कुणीतरी करून गेलेले होते पण बाकी भयाण वाटत होते. इथुन दोन तीन वाटा फुटतात नशिबाने आम्ही जी पकडली तीच वाट बरोबर होती. थोडा वेळ चालल्यावर ढाकच्या डोंगराच्या अलीकडे एक दरी पार करावी लागते.संपुर्ण पश्चिम दिशा हया डोंगराने अडवल्यामुळे सुर्यनारायणाने आम्हाला तासभर आधीच निरोप दिला होता. त्या दरीत खुप दाट झाडी होती. हळु हळु अंधार पडायला लागला आणि पक्षांचे विचित्र आवाज यायला लागले.वाटेत एखादा वाटसरू भेटेल हा आमचा अंदाज साफ चुकला.राजमाची किल्ला आणि ढाक यात खुप जास्त फरक आहे हे कळायला आम्हाला फार उशीर लागला.
ढाकचा किल्ला म्हणजे एक महाकाय डोंगर.सभोवती घनदाट जंगल आणि नसल्यात जमा असलेली मानव वस्ती. गडाचा एकीकडचा संपुर्ण भाग म्हणजे केक कापल्याप्रमाणे सरळसोट कातळकडा ज्यात बहिरोबाची गुफा आहे आणि दुसरीकडे नावापुरती वाट असलेला पण त्यामानाने जरा बरा डोंगराचा भाग. दोन पावलांपुरतीच जागा असलेली ही वाट सरळ गडावर जाते. आजमितीस गडावर किल्याचा एकही अवशेष शिल्लक नाही. बहिरोबाच्या गुफेकडे जाण्यासाठी घळी उतरल्यावर पाउलवाटेने एका गुफेपर्यंत जाता येते.ती पण नावापुरतीच गुफा आहे. इथुन झाडाच्या मुळा टांगलेल्या आहेत. त्यांना पकडुन अंदाजे पन्नास साठ फुट चढल्यावर एक दुसरी मोठी गुफा आहे हेच आहे भैरोबाचे मंदीर. हया मंदीरावरूनच गडाला ढाकचा बहीरी हे नाव पडले आहे. हय गुफेतच कधीही न आटणारी पाण्याचे दोन टाके आहेत. अर्थात हि सगळी माहिती नंतर कळाली.
आम्ही जिथे उभे होतो तिथून एक वाट दरीत आणि दुसरी वाट डोंगरावर जात होती . दरीतल्या वाटेने थोड पुढे जाऊन पहिल पण पावलागणिक ती अवघड होत होती त्यामुळे ती फसवी वाट असावी म्हणून दुसऱ्या वाटेने गडावर चढायला सुरुवात केली . सुरुवातीला मोठी वाटणारी ती वाट हळूहळू खूप निसरडी आणि अदृश्य व्हायला लागली . पुढे तर एक पाय ठेवण्य पुरती पण जागा नव्हती . आम्ही गडबडलो . आपण चुकलो हे लक्षात आलं. सगळा धीर सुटला . दुरून आकर्षक वाटणाऱ्या ह्या जंगलात संध्याकाळ इतकी भयाण असते अस कधी वाटल नव्हत . अंगातले त्राण गेले . आता कुठलीही वाट पकडणे म्हणजे आत्महत्या करण्यासारख होत . तिथे थांबणे म्हणजे वन्य प्राण्यांची भीती . कसबस धीर एकवटून रात्र इथेच घालवायची अस मावळ्यांनी ठरवलं . दाट झाडी पासून दूर डोंगराच्या एका कड्यावर जागा शोधली. आम्ही जिथे बसलो होतो तिथून समोर तीन चार फुटाचं अंतर होतं व पुढे खोल दरी. बसायला आणि टेकायला त्यातल्या त्यात ही बरी जागा होती. आसपास झाडी नसल्यामुळे प्राण्यांची भीती नव्हती. जंगलातुन चित्रविचित्र आवाज येत होते.सभोवतालचं भयानक जंगल, आक्राळ विक्राळ डोंगर , नजर न पुरणारी दरी आणि विचित्र आवाजांचं पार्श्वसंगीत असा डोळयासमोर हॉलीवूड पिक्चरचा खराखुरा सेट तयार झाला.
पुण्यावरून निघाल्यापासून आम्ही मित्र एकमेकांशी ऐतिहासिक भाषेतच बोलत होतो. अविश्रांत बडबड करणार आमचं सैन्य आता मात्र केंव्हाचं चिडीचूप होत. आसपासच्या वाळलेल्या काड्या ,गवत गोळा करून आग पेटवली. प्रकाशाने धीर वाटला. आता एकाच गोष्टीची फिकीर होती ती म्हणजे आमच्याकडे फक्त अर्धी बाटली पाणी,दीड नाचणीची भाकरी आणि दोन बिस्किटचे पुडे एवढंच सामान शिल्लक होते. दिवसभराच्या चालण्याने खूप भुका लागल्या होत्या. उपाय म्हणून दर एक दीड तासाने प्रत्येकाने अर्धा अर्धा बिस्किट खायचं असा इर्मजन्सी प्लान ठरला. रात्रभर सगळयांनी जे जे येईल ते सांगायचं , गायचं आणि जागत राहायचं. प्राणी आल्यास कुठल्या बाजुला पळायच , ओरडायच कसं हयावर चर्चा करून आम्ही एक दोन तास अजुन ढकलले. मधुनच चंद्र आमची थट्टा करायला यायचा आणि परत ढगामध्ये लपून जायचा. कुणीतरी खटयाळपणे जोक करायचे. कुणी डुलक्या मारत होते.कुणी झोपेत बोलत होते,असं वाटत होतं की आडवं पडायला तरी मिळावं किंवा निदान पाय पसरावे पण समोर मोठी दरी.त्यातच दुर कुठल्यातरी डोंगरात वणवा पेटला होता.त्यामुळे ती पण भीती मनात घर करायला लागली होती. एक दोनदा प्राण्यांचे भास झाले. ती भयाण रात्र आपला एक एक डाव मांडत होती.
सुर्यनारायणा च्या स्वागताची रांगोळी पूर्वेला क्षितिजावर दिसू लागली . मोरांचे आवाज यायला लागले आणि जीव भांड्यात पडला. सकाळी येणाऱ्या पक्ष्यांचा किलबिल आवाज आणि रात्रीच्या पक्ष्यांचा भेसूर आवाज यात जीवन आणि मृत्यूचे सूर आहेत अस त्यादिवशी जाणवल. वेळ न घालवता सगळयांनी आधी शेकोटी नीट विझवली ,चतकोर भाकरी आणि पाण्याचा घोट घेऊन परतीच्या वाटेला लागलो. किल्ला बघण्याचा विचार देखील कुणी केला नाही. उन लगेच चढायला लागले होते. प्रचंड तहान लागत होती.बाटलीत फक्त चार घोट पाणी शि ल्लक होत आणि तेही जर कुणाला फारच त्रास झाला तर देण्यासाठी. कण्हतं कुथत पावलं मोजत आम्ही चालत होतो पण पाण्याविना चालवत नव्हत. कधी आपण पोटभर पाणी प्यू अस वाटत होत. निर्जळी चे संकट सोसायची ताकद उरली नव्हती. एक दोन ठिकाणी वाळूत झीरे उकरण्याचा प्रयत्न केला पण जमल नाही. पुढे एका ठिकाणी सुकलेला ओढा होता. त्यात एक घाण पाण्याचे डबके होते. जेमतेम टोपल्यात मावेल एवढे पाणी .त्या पाण्याची अवस्था वेगळी सांगायला नको , पण ती काही आम्हाला ते हिरवेगार पाणी पिण्यापासुन थांबवु शकली नाही.त्या पाण्याचा दुष्परिणाम नंतर बरेच दिवस जाणवला पण त्यावेळी आम्हाला जिवंत ठेवण्याचं काम त्या पाण्याने केलं. सगळे निमुटपणे चालत होते. काही वेळाने एकदाच वरवंड गाव आलं. गावातल्या एका घरात भरपेट पाणी प्यालो.तिथल्याच एका दुकानातुन बिस्किटचे पुडे मागवले आणि उन शांत होईपर्यंत तसेच बसुन राहिलो. मजल दरमजल करत कसेबसे मावळे एकदाचे घरी पोहोचले आणि आमची भरकटलेली भटकंती संपली.
लोक नियोजन करून अविस्मरणीय ठिकाणी फिरायला जात असतात पण विना नियोजनाची आमची ट्रीप अविस्मरणीय झाली . आजही कुणी ढाक चे नाव काढल्यास आम्हाला आधी पाणी आठवतं आणि मग ढाकचा किल्ला.

 हृषीकेश पालोदकर

थळ घाट ते भोर घाट परिसरातील घाटवाटा व किल्ले

 4 minutes


थळ घाट ते भोर घाट | घाटवाटा

थळ घाट(कसारा घाट,नाशिक) ते भोर घाट(खंडाळा घाट,लोणावळा) परिसरातील घाटवाटा व किल्ले

ठाणे,नाशिक व नगर या जिल्ह्यांच्या सिमा कळसूबाईच्या डोंगरांत एकीमेकींना भिडतात.कळसूबाईच्या दक्षिणेस हरिश्चंद्रगडाचे पहाड आहेत.तेथ पासून फोंडा घाटा पर्यंत सह्याद्रीच्या अत्तुच्च्य शिखरांच्या व पठारांच्या प्रदेशाला घाटमाथा म्हणतात या दरम्यान असंख्य घाटवाटा आहेत.घाटमाथ्याहून कोकणात उतरण्यासाठी ज्या घाटवाटा आहेत.त्यातील काही घाटवाटा आजही वापरात आहेत.थळ घाट(कसारा घाट),म्हाळशेज घाट,खंडाळा उर्फ भोर घाट,ताम्हिणी घाट,वरंधा घाट,बावडा घाट,फोंडा घाट असे आजही वापरात असणारे मुख्य घाट आहेत.चौल व सोपारा या प्राचिन बंदरांना जोडणारा नाणेघाट हा पुर्वीचा सर्वाधिक वापरला जाणारा घाटमार्ग होता.नाणा व गुना या दोन आधिकार्यांनी किंवा ठेकेदारांनी परस्परांशी स्पर्धा करुन दोन घाट बांधले त्यातील नाणेघाट प्रथम पुर्ण झाला म्हणून सरकार दरबारी तो प्रथम जाहिर झाला अशी दंतकथा आहे.ती खरी की खोटी यात आपण पडायच नाही मात्र नाणेघाट हा आधिक सोईस्कर आहे.मी नाशिकजवळीळ वाघेरा या किल्ल्याजवळील सत्ती घाट जो दमण व जव्हार परिसरातून नाशिक परिसरांत डोंगररांग ओलांडून वाहतूक करण्यासाठी वापरला जात होता ते खंडाळा घाटा पर्यंतच्या परिसराची माहिती या लेखात सामिल करतो आहे.तेव्हा त्याची सुरुवात हि अंबोली घाटाजवळून जवळून केली आहे.

१)कोंकणातील डहाणू,वाडें,सोपारा,चौल या परिसरातील दळणवळण हे अनुक्रमे अंबोली घाट,अव्हाट घाट,शिर घाट,थळ घाट(आताचा कसारा घाट) या घाटांतून होत असे हे सर्व घाट घाटमाथ्यावर नाशिक परिसरात वर चढतात.

२)कोंकणातील कल्याण व शहापूर भागातील दळणवळण हे अनुक्रमे पिंप्री(बोर घाट),तोरण घाट,मेंढ्या घाट,चेंढ्या घाट या घाटांमार्गे होत होते. हे सर्व घाट घाटमाथ्यावर ‘आकोला’ तालुक्यातील परिसरांत वर चढतात.

३)कोंकणातील मुरबाड परिसरातील दळणवळण हे अनुक्रमे माळसेज घाटामार्गे होत होते.हा घाट घाटमाथ्यावर ‘ओतूर’ परिसरात घाटमाथ्यावर चढतो.
या परिसरात हरिश्चंद्रगडाच्या आसपास अनेक छोट्या घाटवाटा आहेत.जसे नळीची वाट,सादले(सादडे) घाट,करपदरा घाट आहेत.

४)कोंकणातील मुरबाड व वैशाखर्यावरुन दळणवळणासाठी ‘नाणेघाट’ हा घाट वापरात होता.हा घाट घाटमाथ्यावर जुन्नर परिसरात वर चढतो.

५)कोंकणातील मुरबाड,पुलु -सोनावळे ‘कोपोली घाट,दर्या घाट,साकुर्डी घाट,’मार्गे दळणवळण केले जात होते.हे घाट घाटमाथ्यावर घोडें,आंबेगाव परिसरात वर चढतात.

६)कोंकणातील नेरळ,पनवेल या परिसरातील दळणवळण भिमाशंकर घाटातून होत होते.हा घाट घाटमाथ्यावर खेड व कडूस परिसरांत घाटमाथ्यावर चढत होता.(याच परिसरात अहुपे घाट आहे.)

७)कोंकण परिसरातील ‘कर्जत’ भागातील दळणवळण हे ‘कोलिंबा घाट,सावळ घाट,कुसूर घाट’ या घाटांमार्गे होत असे.हे घाट घाटमाथ्यावर खेड व कडूस,आंध्रचे खोरे,नवलाख उंबरे परिसरांत वर चढतात.(या परिसरात पाली घाट, १८ नंबरची वाट, फ्यानदी घाट, नाखिंदे घाट , कौल्याची धार, वाजंत्री घाट आदी घाटही आहेत.)

८)कोंकणातील खालापूर परिसरातील दळणवळण हे कोंकण दरवाजा(राजमाची) परिसरातून होत होते.हा घाट घाटमाथ्यावर नाणें परिसरात चढतो.

९)कोंकणातील खोपोली परिसरातील दळणवळण हे ‘भोर घाट’ आताचा खंडाळा घाट मार्गे होत होते.हा घाट कार्ले व लोणावळें परिसरात घाटमाथ्यावर चढतो.

१०)त्याच्या पलिकडील वस्ती म्हणजे ‘पेण’ या परिसरातील दळणवळण हे उंबरखिंड परिसरातून होत होते.यांतील घाटवाटा या लोहगड परिसरात घाटमाथ्यावर चढत होत्या.

पुढेही वाघजाई घाट,ताम्हण घाट,लिंग्या घाट,देव घाट,कुंभा घाट,कावळ्या घाट,शेवत्या घाट,मढ्या घाट,भोपे घाट,वरंध घाट,कामथा घाट,ढवळ्या घाट,आंबेनळी उर्फ रडतोंडी घाट,हातलोट घाट,आंबोली घाट,तिवरा घाट,कुंभारली घाट,मळा घाट,कुंडी घाट,अंबा घाट,विशाळगड घाट,अणुस्कुरा घाट,बावडा घाट,फोंडा घाट,नरदावा घाट,घोटगीचा घाट,रांगणा घाट,आंबवली घाट,राम घाट,केळ घाट,तिन्नई घाट असे असंख्य घाट आहेत.
बाकी घाटवाटा पुढील लेखात कधीतरी…!

https://www.discovermh.com/thal-ghat-and-bhor-ghat-part-1/

सफर भीमाशंकरच्या कुशीतील घाटवाटांची खेतोबा आणि वाजंत्री घाट

  खेतोबा आणि वाजंत्री घाट

डोंगरदर्यातील वनश्रीने नटलेले रम्य ठिकाणे ट्रेकर्स मंडळींना कायम खुणावत असतात. गाव,वाड्या,वस्त्या त्यांच्या दळणवळणाचे साधन म्हणजे घाटवाटा. या घाटवाटा पायाखाली घालून निसर्गाचा मनमुराद आनंद घेणारे ट्रेकर्स खऱ्या अर्थाने भाग्यवान म्हणायला हरकत नाही. अश्याच एका निसर्गरम्य भटकंतीसाठी माझ्या डोक्यात घाटवाटांचा भन्नाट हटके प्लॅन तयार होता यावेळी ट्रेकिंग मधले माझे खास मित्र विश्राम आणि रुप्या (मित्रच कश्याला सखे भाऊच म्हणा) या दोघांनी टांग दिली. मग काय सचिन आणि राकेश या दुसऱ्या जोडगोळीला बरोबर घेऊन प्लॅन सार्थकी लावायचा मनसुभा आखला. तसे या दोघांनी या आधी हि माझ्या बरोबर बहुतेक ट्रेक केलेले पण घाटवाटा मध्ये कधी कोणत्या क्षणी बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागेल आणि त्या परिस्थितीला कसं सांभाळायच यात विश्राम आणि रुप्या दोघेही माहीर. २२ जुनला विश्रामच्या नवी मुंबईच्या रूमवर आम्ही तिघे रात्री जरा उशिराच पोचलो मग रात्री २ वाजेपर्यंत पुढील प्लॅनबद्दल गप्पागोष्टी करता करता कधी निद्रादेवीच्या आधीन गेलो कळलंच नाही. सकाळी ५ ला विश्रामने आम्हां तिघांना उठवले सकाळीच सकाळी सचिनची किरकिर चालू झाली एका गाडीवरून तिघे कसे जाऊ कोणी पकडलं तर. राकेश तर खूप वैतागला होता त्याच्यावर मग विश्रामने सचिनला त्याच्या कानात सातारी भाषेत चारोळ्या वाहल्या तेव्हा कुठे ह्याच तोंड कायमच बंद झालं. सकाळी ५:३० ला विश्रामच नवी मुंबई मधील घर सोडलं पाऊसाची रिपरिप चालूच होती पण आम्हाला त्याची तमा नव्हती. कर्जतच्या स्टेशन जवळील एका हॉटेल मध्ये भरपेट न्याहरी करून आंबिवली मध्ये पोहचेपर्यंत तिघेही ओलेचिंब भिजलो होतो. 
पाऊसच्या मधीच जोरदार सरीवर सरी येत मग अचानक गायब होत असा लपाछुपीचा डाव चालला होता जणू आंबिवलीच्या पुढे काही पिकनिक छाप लोकांच्या गाड्या नजरेस आल्या त्याच्याकडे कानाडोळा करत कामतपाड्यात पोचलो तेव्हा सकाळचे ८:१५ वाजले होते. गावात वाटेची माहिती घेण्यासाठी राकेशला पाठवले पण गडी खाली हात आला बहुतेक घरांना कड्या आणि कुलुपे होती २छोट्या मुलांना विचारलं तर सर्व मंडळी शेतीच्या कामासाठी शेतावर गेले आहेत कळलं. मग एका घरासमोर गाडी पार्किंग करणार तेच आतून एका ताईंचा आवाज आला "कुठे वाजंत्री ने खेतोबाला जाणार का" मी बोललो "शिडीने धनगरवाडा मग पुढे खेतोबा आणि परत येताना वाजंत्री ने येऊ" तसा ताईने शिडी ने नका जाऊ असा नन्हा चा पाढा पाठ करून दाखिवला. ताईची समजूत काढत त्याना बोललो "जर आम्हाला जमल नाही तर परत आल्या मार्गी मागे येऊ" असं आश्वासन दिलं. तेव्हा कुठे ताईं वाट दाखवण्यास तयार झाल्या वाट कामतपाड्यातील डांबरी रस्ता संपतो तेथील शेवटचं घर आहे त्याच्या मागून वाट डोंगर रांगेवर जाते समोर तुम्हांला जामरुंगचा डोंगर दिसतो. त्यांच्या डावीकडून वाट 
जामरुंगचा डोगर 

पेठचा किल्ला 
शिडीच्या वाटेला मिळते मजल दरमजल करत पठारावर आलो इथे २वाटा फुटतात एक डावीकडे जामरुंगच्या डोंगराला वळसा मारायला जाते तर दुसरी उजवीकडे आपण डावीकडील सौम्य चढणीची वाट पकडून पुढे निघायचं. पठारावरून सह्याद्रीचा अफाट नजारा दिसत होता डावीकडे पदरगड ते खेतोबाची क्रेस्टलाइन तर उजिवीकडे अंधारी घाट ते पेठ किल्ला असा प्रदेश उलगडत होता. 

इथे डावीकडील वाट पकडावी 

जामरुंग डोंगर पार करून खेतोबाच्या शिडी कडे जाताना 


पाऊसाची रिपरिप चालूच होते सचिन आणि राकेश फोटोग्राफी चा भरपूर आनंद लुटत माहिती घेत पुढे चालले होते. जामरुंगच्या डोंगराला वळसा घेत आमची पायगाडी पहिल्या शिडी जवळ आलो थोडी दक्षता घेत पहिली शिडी चढलो एव्हाना पाऊस थांबला होता.


सकाळचे ९:३० वाजले होते मस्त गार वारा सुटला होता. सचिन ने जरी गड किल्ल्याचे ट्रेक असले तरी घाटवाटांन मध्ये नवखा होता त्यामुळे राकेशला पुढे ठेवून सचिनला मध्ये ठेवले होते आणि मी शेवटी राहिलो होतो. शिडीच्या वाटेवरील कातळकडा शेवाळं मुळे निसरडा झाला होता त्यामुळे एकमेकांची काळजी घेत दुसऱ्या लोखंडी शिडी जवळ आलो. 
पहिली शिडी

दुसरी शिडी
मागे पदरगड, तुंगी त्यावर पडणारा जोरदार पाऊस अस निसर्गरम्य वार्तावरण निर्माण झालं होतं. दुसरी शिडी पार करून तिसऱ्या शिडी जवळ आलो ती आरामात पार करत पदरात आलो आता सचिन बोलू लागला पोचलो पण खरी मज्जा तर पुढे होती. 

तिसरी शिडी 
उजवीकडे खेतोबाची घळ 
मी बोललो त्या घळीतून त्या टोकावर जायचं तसं त्यांचा चेहरा पाहण्यालायक होता. राकेश तर पोट धरून पठारावर लोळत होता एक निर्मळ पाण्याचा ओढा बघून मस्त पेट पूजा केली आणि पुढील वाटेला लागलो.  खेतोबाच्या या पठारावर असंख्य खेकडे आणि त्याची बिळे आहेत त्यांना लंगडी घालून वाचवत पुढील वाटेला लागलो. आम्ही धनगरवाडा शोधात होतो पण तो काही कुठे दिसेना अचानक एका ठिकाणी वाट हरवली मग थोडी शोधाशोध केल्यावर सापडली. वाटेवर भगव्या रंगाचे रिबीन झाडाला लावलेले आढळले. आम्ही योग्य मार्गावर आहोत याची खबरदारी घेत पुढे निघालो वाटेत एका झाडाच्या खोडावर खेतोबा मंदिर असा फलक दिसला.

 या फलकाच्या डावीकडे खेतोबाची वाट आणि उजवीकडे वाजंत्री घाटाची वाट गेली आहे 
खेतोबाची घाटाची चढाई 
या फलकाच्या उजवीकडे जाणारी वाट वाजंत्री घाटाकडे जाते हे नंतर कळलं कारण ती वाट सहसा दिसत नाही आम्ही फलकाजवळून डावीकडे खेतोबाच्या घळीकडे वळलो. आता छातीवर येणारी चढाई चालू झाली त्यात पाऊसाने जोर धरला पूर्ण ओलेचिंब भिजलो होतो त्यात मधेच धुकं ते एवढं कि ४ ते ५ फुटावरील माणूस दिसत नव्हता. 
 खेतोबाच्या शेवटच्या चढाई दरम्यान मागे दिसणारा सह्याद्रीचा अफाट नजारा 

 खेतोबाची घळ 

एका छोट्या कातळटप्प्याला हाशहुश करत पार करून खेतोबा घाटाच्या माथ्यावर आलो आणि बॅग बाजूला फेकून कातळावर मस्त ताणून दिली. सह्याद्रीच्या सह्य धारेवर मस्त थंडगार वारा पिऊन पेठच्या किल्ल्यावर नजर फेकली गेली तेव्हा असं वाटलं कि शिवलिंगावर आकाशातील असंख्य नभ जलअभिषेक करत आहेत कि काय जणू असं वाटत होते तो देखावा डोळ्यात साठवत आम्ही तिघेही खूप वेळ एकाच ठिकाणी स्तब्ध बसून होतो.
धुक्यात हरवलेला पेठचा किल्ला 

तेच जोरदार पाऊसाने दगड फेक केल्यागत आम्हा तिघांना एवढे झोडपले कि पळत पळत खेतोबाचे मंदिर गाठले पावसाच्या सरीवर सरी येत होत्या. मग घरून आणलेली शिदोरी मंदिरातच सोडल्या भरपेट खाल्यावर शरीरात थोडी तरतरी आली 

खेतोबा मंदिर 
एव्हाना घडाळ्यात १२:०० वाजले होते आता पाऊले परतीच्या मार्गाला लागली पण कितीही झालं तरी तिथून पाय काही हलेना. सहयाद्रीचे वेड आम्हाला का लागते ते अश्या अनगड, अनवट जागी जाऊन ते कधीतरी अनुभवा तुम्हांलाही नक्कीच लागेल. आता उतराई करायची असल्याने सचिन भाऊ जोमात होते पटापट खेतोबाची घळ पार करून साहेब एक दगडावर मस्त झोपले होते तेच आम्ही दोघे त्याच्याजवळ जाणार तर मागे सुरुंग लावल्यागत भयानक आवाज आला पाहतोतर १० ते १५ फुटाचा कडा तुटून दरड कोसळली होती. सचिन दादा तर झोपायचं सोडून टूणकण उडून धावतच वाजंत्री घाटाच्या फाट्यावर आले राकेश पुन्हा एकदा पोटधरून हसू लागला.  
खेतोबा घाट उतरताना
वाजंत्री घाटाकडे जाणारा उजवीकडील फाटा या फलकाजवळून जातो 
फलक लावलेल्या झाडापासून पुढे वाट या दोघांना काही मिळेना मग मीच थोडे पुढे जाऊन वाट पाहून आलो तेच एका झाडाला भगवे रिबीन सापडले तसे या दोघाना बोलवून पुढील वाटेला लागलो. वाजंत्री घाटाची पुढील वाट रुळलेली असल्याने आरामात फोटोग्राफी करत चाललो होतो. भीमाशंकरच्या सर्व घाटवाटांची चाल दोन टप्यात असतात हे दोन्ही टप्पे साधारण एकाच ५०० ते ६०० मीटर उंचीचे आहेत. 
 वाजंत्री घाटाकडे जाणारी मळलेली पायवाट 
वाट रुळलेली असल्याने कुठेही चुकण्याचा संभव येत नाही आता वाट झाडाझुडपातून मोकळया वाटेवर आलो तेच समोर धबधब्यांची जत्राच होती जणू डावीकडे पाहिलं तर रणतोंडीचा धबधबा फेसाळत वाहत होता. चोहीकडे रौद्रप्रतापी धबधबेचं धबधबे आणि त्यांचा जोरदार आवाज कदाचित याचंमुळे या घाटवाटेला वाजंत्री घाट म्हणत असतील. 
रणतोंडीचा धबधबा  

ते सह्याद्रीचं रांगडं रूप डोळ्यात साठवत पुढे निघालो वाजंत्री घाटाची वाट आता सौम्य झाली होती रणतोंडीच्या धबधब्याला असंख्य धबधबे येऊन मिळतात आणि त्याच ओढ्याच्या उजवीकडून हि वाजंत्री घाटाची वाट खाली कामतपाडयात येते. 
वाजंत्री घाटात पडणारा जोरदार पाऊस
उजवीकडे दिसणारा जामरुंगचा डोंगर 
आम्ही आरामात उतरत दुपारचे ३ ला कामतपाडया गाडीजवळ आलो आणि गाडी चालू करणार तेच आतून ताईने हाक दिली "चहा ठेवली आहे पोरांनो ती तेवढी घेऊन मग पुढे जा" किती ते आदरतिर्थ मन भरून आल. 


 कामतपाड्याकडे जाणारी वाट 
थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असताना पुढील ५मिनिटात गरमागरम चहा समोर आला. ताईचे मनोमन आभार मानत तेथून निघालो वाटेत परत एकदा पिकनिक छाप मंडळी हुल्लड बाजी करताना दिसली आंबिवली मध्ये आलो. तेच पेठच्या किल्ल्यावरून येणारा १५० ते १६० माणसाचा गलका दिसला त्यातील बहुतेकाची चाल बदकावाणी झाली होती. सचिन दादाना जास्त त्रास होऊ नये म्हणून मी त्याला कर्जत स्टेशनला मला आणि राकेशला ड्रॉप करण्यासाठी सांगितलं मग पुढील प्रवास ट्रेन करणार होतो. ट्रेन तशी भरलेली होती पण कसेतरी आम्हां दोघांना बसायला जागा भेटली पुढे डिकसळ आणि नेरळला तर पिकनिक छाप माणसाची गर्दी ने तर जीव गुदमरायला आल्यासारखा वाटू लागला होता कसेतरी कढ काढत घाटकोपर स्टेशन वर उतरलो तेव्हा कुठे या पुर्थ्वी तलावावर आपण जिवंत आहोत याची जाणीव झाली. 

------------तूर्तास रजा घेतो भेटू पुन्हा एकदा सह्याद्रीतील अनगड आणि अनवट वाटेवर-------      

फोटो साभार:- राकेश पवार, सचिन कदम

https://smaranyatras.blogspot.com/2019/06/blog-post.html

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...