Saturday, July 17, 2021

 नेहमीप्रमाणेच कामानिमित्त परदेश योग जुळून आला आणि मलेशियाची वारी घडली. यापूर्वी मलयभूमीला फक्त पदस्पर्श केला होता. एकदा चीनला जाताना काही काळ थांबलो होतो तेवढेच. त्यामुळे ‘क्वालालुंपुर’ विमानतळ तसा परिचित होता; पण देशात प्रवेश केला नव्हता. त्या प्रवासादरम्यान विमानतळावर वाद्यवॄंद पाहायला मिळाला होता. पारंपरिक वाद्यांचा उत्तम मेळ होता. आपल्याकडच्या सारंगी, संतुरसारखीच वाद्ये होती त्यांचे चलचित्रण केले होते; पण नंतरच्या काळात ते कुठे गेले कळलेच नाही, असो ! २४ ते २८ जून २०१३ दरम्यान हा दौरा होता. कंपनीतील आठजण एकत्र होतो. त्यामुळे एक प्रकारे ती सहलच वाटत होती.

क्वालालुंपुरमधील ( केएलमधील ) कामे आटोपून मी आणि आमचा विरलभाई ‘क्वांटनला’ मिटींगसाठी जाणार होतो. बाकीचे सगळे थेट ‘क्वांटन’ गाठणार होते. प्रगत राष्ट्रांचे एक वैशिष्ट्य म्हणजे विमानतळाशी शहराची केलेली जोडणी. केएल विमानतळातच घुसलेली रेल्वे व बसेसही आहेत. शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात थेट नेणाऱ्या सेवा आहेत. २५ तारखेला सकाळी उतरल्यावर आमची पहिली गरज होती- स्वच्छ अंघोळपांघोळ करून मग कस्टमरकडे जाणे.  शोध घेताघेता ‘समासमा’ नावाच्या ‘स्पा’पर्यंत पोहोचलो. ६० रिंगिटमध्ये आमची गरज पूर्ण झाली. दिवसभर बॅगा सुरक्षित ठेवण्यासाठी क्लोकरूमपण त्याच पैशात. मग काय, वा:! आपल्या खणाची चावी म्हणजे स्पाच्या माणसाने एक प्रकारचे प्लॅस्टिकचे घड्याळ मनगटावर बांधायला दिले. अंघेाळीचे वेळेस भिजले तरी प्रश्न नाही आणि चावी हरवण्याची भानगड नाही. खणासमोर घड्याळ धरले की खण उघडतो. मजा होती ! तिथल्या व्यवस्थापकाने सांगितले, दुपारी परत अंघोळ करायची असल्यास वेगळे पैसे आकारले जाणार नाहीत. त्याने केएलचे मानचित्रही ( नकाशा ) दिले; सगळे आवरून झाल्यावर निघालो.

आखीव रेखीव चौक

‘टेक्सी’ ( टॅक्सी ) असे लिहिलेल्या ठिकाणी गाडी बुक केली कामे आटोपल्यावर थोडा वेळ होता. ( साधारण अर्धा दिवस ). त्यानुसार ठरवले, जे काही बघणे शक्य आहे ते बघूनच जाऊया. मी यादी काढूनच गेलो होतो. ‘मलेशिया टुरिझम’ असे आंतरजालावर टाकल्यावर ‘पेनिन्सुला व बॉर्निओ’ अशी दोन नावे पुढे येतात. त्या अंतर्गत पेट्रोनास टॉवर, कॅमेरून आयर्लंड, तमान नेगरा असे बरेच काही वाचायला मिळते. गाडीत बसतानाच चालकाचे नाव कळले, ‘रवि.’ मी आपले हिंदीत सुरू केले; पण तो म्हणाला, “स्सार नो हिंदी. ओन्ली इंग्लिश.” मग त्याच्याशी बोलताना कळले, त्याचे वडील मूळचे भारतातले. ब्रिटिशांच्या काळात रेल्वे व खाणीत काम करण्यासाठी आलेल्या भारतीयांपैकी ते एक होते. आताही त्याच्या घरात तमिळ किंवा मलय भाषाच बोलली जाते. तमिळ भाषेत ‘मलई’ म्हणजे टेकड्यांचा प्रदेश’. ही लोकं पर्यटकांशी बहुतकरून इंग्रजीतच संवाद साधतात. इंग्रजांच्या काळात हे भारतीय आले, ते इथेच रूजले. छान रस्त्यांवरून आमची गाडी धावू लागली. सगळीकडे आखीव-रेखीव चौक, पल्लेदार रस्ते आणि स्वच्छता मनाला सुखावत होती. या देशात पेटतेल ( पेट्रोल ) आपल्या तुलनेत स्वस्त आहे. साधारणपणे आपल्याकडच्या किमतीच्या तीसेक टक्के कमी किंमतीत उपलब्ध आहे. घरांच्या किंमती मात्र बऱ्याच ठिकाणी आपल्या तुलनेत जास्त आहेत. अर्थात् घरांच्या किंमती सापेक्ष आहेत हेही विसरून चालणार नाही. कुठल्या शहरात कुठल्या भागात आहे ह्यावरही बरेच काही अवलंबून असते.

सर्वप्रथम आम्ही एका संग्रहालयाकडे निघालो. रविने सांगितले तो पूर्वाश्रमीचा राजवाडा होता. त्या वास्तूसमोर भव्य अशी हिरवळ राखलेली होती. रबराची अनेक झाडे हिरवळीलगत किनाऱ्यावर दिमाखात उभी राहून शोभा वाढवत होती. शांत परिसर रस्त्यावरची वाहतूकही मुकाटपणे वाहत होती. मुख्य प्रवेशद्वाराकडे जाताना दिसले ‘म्युझियम दी राजा.’ ‘पप्पू दी गड्डी’प्रमाणेच राजाचे संग्रहालय असा अर्थ. ९ पागी हिंगा ५ पेतांग हेही लक्षांत आले. ९ पासून ते ५ वाजेपर्यंत खुले राहील. व्हिसाचा अर्ज भरताना ‘तारीख’ असा शब्द दिसला होता. तेव्हाच या भाषेविषयी एक ओढ निर्माण व्हायला लागली होती. रोमन लिपीत स्थानिक उच्चार लिहिले असल्याने अर्थ लावण्याचा प्रयत्न चालू केला. उदा. TEXI, BANDAR, MUSIUM DI RAJA.

राजाचे संग्रहालय

राजवाड्यात रुपित्र ( कॅमेरा ) नेण्यास परवानगी नव्हती. आतमध्ये अनेक छायाचित्रांचा संग्रह होता. बरीचशी छायाचित्रे ब्रिटिशांच्या राजवटीतली होती. ग्वाल्हेर, मैसूरच्या अंकित राजांप्रमाणेच सगळा थाटमाट होता. ती दालनं, वापरावयाच्या वस्तू, बेल्जियम ग्लासची चहापानाची भांडी, भलीमोठी न्हाणीघरे इ. सगळं तसंच होतं. इंग्लंडच्या राजा-राणीला आज जसा मान आहे तसाच इथल्यांना; पण ते सत्ताधीश नाहीत, लोकशाहीच नांदते. या सगळ्यात माझं मन फार रमलं नाही. काय आवडलं  आणि काय नाही याचं उत्तर नाही माझ्याकडे. पुढच्या टप्प्याकडे निघालो. जाता-जाता रविशी गप्पा घडत होत्या त्याला भारताविषयी ओढ असेल का हा प्रश्न मनात डोकावत होता. तो म्हणाला, भारतातले लोक येतात, त्यांच्याशी बोलतो तेव्हा बरं वाटतं. कदाचित् मला बरं वाटावं म्हणूनही बोलला असेल. वाटेत एक क्रीडासंकुल लागलं. “बॅडमिंटनमध्ये आमच्या देशाचा चांगला ठसा आहे -” इति रवि. मला आपली शटल क्वीन ‘सायना नेहवाल’ आठवली. खेळात पुढे जाण्यासाठी मलय सरकार बरंच प्राधान्य देते असंही कळलं. इथेही इंटरनॅशनल स्कूल नावाचा महागडा प्रकार आहे.  शिक्षणासाठी माध्यम म्हणून मलय भाषा वा इंग्रजीच. रवि एक एक गोष्ट सांगत होता आणि मी निरीक्षणात गुंतत होतो.

के एल संग्रहालय

पुढचं ठिकाण होतं ‘के एल्’ म्युझियम. इथे अनेक गोष्टींना ‘नगर’ असा शब्द जोडण्याची पद्धत आहे. नगर म्हणजे प्रांत, इलाका, विभाग असं काहीतरी असावं, असा ढोबळ अंदाज लावला. पण १ रिंगिटच्या नोटेवरही ‘बँक नगर मलेशिया’ पाहून मी गोंधळलो. इतर बाबतीत माझा तर्क जुळत होता, म्हणजे म्युझियम नगर, पुत्रनगर (चक्क राजपुत्र नगर असाच अर्थ आहे, बरं का !) मात्र नगरचे स्पेलिंग Negera करतात. इथल्या भाषेवर संस्कृत व अरबीचा प्रभाव आहे.  इथे भूमीला ‘बूमी’ म्हणतात.  ‘वर्ण म्हणजे रंग’ असाच अर्थ धरला जातो. ‘दारूल एहसान’ असाही शब्द कुठेतरी बघायला मिळाला. मूळ शब्द ‘दर् –उल-एहसान’ असा आहे. त्याचा अर्थ अल्लाचे उपकार असलेली भूमी. टांझानियाची राजधानी ‘दारेस्सलाम’ ‘( दर्–उल-इस्लाम )’ नांवही असंच रूढ झालेलं आहे. मनाशी असे तर्क जुळवत म्युझियमनगराच्या दाराशी पोहोचलो तेव्हा दुपारचे साडेबारा वाजून गेले होते.

रविने सांगितलं, जर ‘बातू केव्हज्’ बघायच्या असतील तर बाहेरूनच काही वस्तू बघा आणि चला. माझा नेहमीचा एक अनुभव आहे, प्रत्येक दर्शनीय ठिकाणी गेलं की हुरहुर लावणाऱ्या एखाद्या गोष्टीवर पाणी सोडूनच यावं लागतं. राजवाड्याच्या संग्रहालयाप्रमाणेच इथे असंच काही असलं तर असा थोडासा साधक-बाधक विचार केला. बाहेर ठेवलेली रेल्वे इंजिनं बघायला मिळाली. समोरच ‘बी. जी. बाग्नल’ कंपनीने बनवलेलं वाफेवर चालणारं इंजिन होतं. १९२९-साली मलेशियातल्या डॉक सेवेसाठी बनवलेल्या इंजिनचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची भट्टी पोलादाची बनलेली होती. एकतीस टनी इंजिनाने १९६४ पर्यंत ‘केलांग’ बंदराजवळ सेवा केली आणि १९७५ साली मलय रेल्वेने संग्रहालयाला ते देऊ केलं. त्याच्याच बाजूला ‘इंग्लिश इलेक्ट्रिक ऑफ ग्रेट ब्रिटन’ कंपनीने बनविलेलं ‘डिझेल इंजिन’ होतं. १२०० टन वजन वाहून नेण्याची क्षमता असलेलं एंजिन सिमेंट, लाकूडफाटा आणि इंधन वाहून नेण्याच्या सेवेत १९७१ साली रुजू झालं. अजून एक इंजिन होतं. ‘किटसन आणि कंपनीने’ बनवलेलं  हे यंत्र १९२१ ते १९६९ या कालावधीत सेवारत होतं. १० लाखाहून अधिक मैल प्रवास करूनही ते थकलेलं नव्हतं. सुस्थितीत होतं. दिल्लीचं रेल्वे संग्रहालय पाहिलं असेल तर या सगळ्याची सहज कल्पना येईल.

हे संग्रहालय म्हणजे एके काळचा किल्ला होता. १७८० साली दगड-विटांचा वापर करून बांधलेला किल्ला आजवर टिकलाय. त्या काळी बांधकामास नऊ वर्षे लागली. दरवाज्यापाशी नांव होतं. ‘कोट क्वाला केदाह’ कोट म्हणजे गडकोट, क्वाला म्हणजे किल्ल्याचा अपभ्रंश ( हा शोध माझा आहे ) व ‘केदाह’ या नदीकाठी वसवला हा किल्ला म्हणून ‘कोट क्वाला केदाह. ’आपण किल्ले रायगड म्हणतो तसे ! नदी व समुद्राच्या बाजूची तटबंदी दुहेरी भिंतीची आणि त्याच्याविरुद्ध बाजूस एकपदरी भिंत आहे. दोन एकर परिसरात पसरलेल्या किल्ल्यावर ‘बदाक बेरेंन्दाम’ व ‘काटक पुरु’ नावाच्या दोन तोफा आहेत.  समुद्रमार्गे येऊ पाहणाऱ्या शत्रूला रोखण्यासाठी या सज्ज ठेवल्या जात. त्या इंग्रजांकडून खरेदी केल्या होत्या. १७६० साली तख्ताधिपती बनलेल्या ‘सुलतान अब्दुल्ला मुकर्रम शेखच्या’ राजवटीत किल्ला बांधला गेला. सयामी लोकांच्या आक्रमणापासून संरक्षण करता यावं हा मूळ उद्देश होता. ‘दातोक मजाराजा’ आणि त्याचा पुतण्या ‘मौलाना इब्राहीमने’ किल्ल्याचा आराखडा बनवला. विशेष म्हणजे हे दोघे भारतीय होते व किल्ल्याच्या बांधणीचे दगडही भारतातून आणले गेले होते. ( यातली बरीचशी नावं, विशेषत: विशेषनामं, माझ्या समजुतीनुसार लिहिली आहेत. त्यांचे स्थानिक भाषेतले उच्चार तपासून घ्यायची संधीच मिळाली नाही. त्यामुळे ते थोडे वेगळे असू शकतात ).  महाराष्ट्रातल्या दुहेरी तटबंदी असलेल्या राजगडासमोर ही लिंबू-टिंबू गढीच वाटली मला.

बातु केव्हजकडे जाताना सध्याचा राजवाडा लागतो. राजा राहत असल्याने तो आतून पाहवयास मिळत नाही; पण त्याचं बाह्यावलोकनही सुखद होतं. सोनेरी कळस लांबूनच दिसतो. प्रवेशद्वारापाशी एका मोठ्या व छोट्या खांबांची जोडगोळी दिसली. या जोडगोळीने आपल्या डोक्यावर घुमट तोलून धरले आहेत. त्यावरच्या कमानीतून तीन मजली राजवाडा दिसतो. प्रत्येक मजल्याच्या डोक्यावर मोठा घुमट व बाजूचे छोटे घुमट आणि वेलबुट्टीची नक्षी त्याची शोभा वाढवते. कमानीवर मधमाशांच्या पोळ्यासारख्या छोट्या छोट्या कोनांची नक्षी भलतीच सुंदर दिसते. तैनातीला दोन-दोन दरवान समोर असतात. एक उभा तर एक घोड्यावर! तुकतुकीत कांतीचे उंचेपुरे घोडे बघून मजा वाटली. राजाचं राजेपण आजही टिकून आहे असं वाटत राहतं. राजवाड्याचं नाव मोठं गमतीशीर‘स्थान नगर’ स्पेलिंग होतं – Istana Negara.

शेवटी एकदाचे बातु केव्हजपाशी पोचलो.  केएल उत्तरेला १३ किमीवर असलेल्या केव्हजचा बोलवा बराच आहे.  एका खाद्यपेयाच्या दुकानात विचारलं, ही गुंफा चढून जायला किती वेळ लागेल? त्याने सांगितलं, या २७२ पायऱ्या चढलात की लगेच. उभ्या चढणीच्या पायऱ्या एका दमात चढताना चांगलीच दमछाक करतात. आसपास बरीच झाडी होती; पण ओळखीची झाडं काही दिसेनात. उगाचच कुतूहल होतं  ते चंदनाच्या झाडाचं ! प्रवासाला  सुरूवात झाली तेव्हापासून मनात एक सुभाषित रेंगाळत होतं,

अतिपरिचयात् अवज्ञा संतत गमनातनादरो भवति ।
मलये भिल्लपुरंध्री चंदनतरुकाष्ठमिंधनं कुरुते ।।
अर्थात् आताच्या काळात भिल्लीण कुठून येणार? आणि ती तरी सरपणासाठी काय चंदन थोडीच वापरू शकणार आहे?
बातु केव्हजकडे वर जाताना माकडं आपल्या मागावरच असतात. हातात काही ठेवायचं नाही. टोपीवर पण लक्ष ठेवून चालत रहायचं. अशा परिस्थितीत नेहमीच स्वामी विवेकानंदांचा एक किस्सा आठवतो. विवेकानंद दक्षिण भारतातल्या एका मंदिरात जात होते आणि माकडं त्यांच्या मागे लागली. कफनी, झोळी याचं माकडांना विशेष आकर्षण वाटलं असावं. स्वामीजी भराभर पावलं टाकीत जाऊ लागले. माकडांनीही पिच्छा पुरवायला  सुरुवात केली. करता-करता स्वामीजी चक्क पळू लागले आणि माकडांची टोळीच मागे लागली. वर एका जागी बसलेला संन्यासी हसून त्यांना म्हणाला, “भल्या संन्याशा, पळालास तर संपलास”. स्वामीजी गपकन थांबले आणि माकडांना सामोरे झाले. माकडांनी चटकन माघार घेतली. पुढल्या आयुष्यात स्वामीजींनी लिहिलं, मी या घटनेतून एक शिकलो-आयुष्यात संकटांना घाबरून पळू नका. सामोरे जा. संकटे शमतील. किती सुंदर विचार दिला नाही!
 

मुरूगनची सोनेरी मूर्ती

तर काय सांगत होतो, केव्हजच्या पायऱ्या चढताना उजव्या बाजूस मुरूगनची भली मोठी  सोनेरी मूर्ती दिसते. अंदाजे शंभरेक फूट उंच मूर्ती अतिशय सुंदर आहे. तमिळ भाषेत ‘मुरूगन’ म्हणजे ‘कार्तिकस्वामी.’ त्यालाच कानडी व तेलुगु भाषेत ‘सुब्रमण्यम्’ म्हणतात. याची इतर नावं आहेत ‘सर्वण्णा, षण्मुग वा षण्मुख वा षडानन.’ अतिशय देखणी मूर्ती आहे. गुंफेपाशी पोचलो आणि अचानक गारवा जाणवायला लागला. बऱ्याच ठिकाणी गुहांतून कुबट वास येतो तसा इथे येत नव्हता कारण ती वरच्या बाजूने उघडी होती. चुनखडीच्या दगडांतून पाणी झिरपून निसर्गाने वरच्या भागातून खोदून काढलेली जागा म्हणजे एक चमत्कारच बघायला मिळाला. आपल्या डोक्यावर ताशीव सुळके टांगलेले दिसतात. बाजूला हनुमानाची ५० फूटी मूर्तीही आहे. इथेही माकडांचे चीत्कार येतच असतात. प्रसादाच्या आसपास माकडं घोटाळत असतात. त्या परिसरात छोटी मोठी पाच-दहा देवळं आहेत. मुख्य गुंफेचं छत, तिथल्या जमिनीपासून साधारण १०० मी.उंच आहे. रामायणकाळातील ही गुंफा अशी श्रद्धा म्हणून इथल्या माकडांनाही अभय आहे.

मुख्य गुंफेलगतच एक छोटी गुंफा आहे. तिथे दुर्मीळ कोळी (Trapdoor Spider) बघायला मिळतात. हा कोळी रेशमाच्या किड्यांना खातो. त्याचं विष फार जहाल असतं. या कोळ्याचं आयुष्यमान २० वर्षांपर्यंतही असू शकतं. इतर बऱ्याच कीटकांच्या, जीवांच्या जाती-प्रजातीही बघायला मिळतात. ती एक वेगळी सफरच होती; पण वेळेअभावी मी काही जाऊ शकलो नाही. या गोम्बकाला (म्हणजेच गुंबज) धावती भेट देऊन काढता पाय घेणं जीवावर आलं होतं; पण नाईलाज होता.

पेट्रोनास टॉवर्स

पुढचा प्रवास सुरू झाला त्या दिवशी पौराणिक आणि आधुनिक गोष्टींचा संगम बघायचा योग असावा. पुढला आणि शेवटचा टप्पा होता-मेनारा पेट्रोनास, जुळे मनोरे म्हणजेच पेट्रोनास टॉवर्स. १४८३ फूट उंच बांधलेल्या मनोऱ्यात ८८ मजले आहेत. साधारण सहा-सात वर्षे बांधकाम चाललं. उभारणीच्या वेळेस जमिनीखाली ९८ फूट खोल पाया खणला. फ्रेंच स्थपतीने याचा आराखडा तयार केला. ४१ व ४२व्या मजल्यांदरम्यान स्काय ब्रिजने दोन्ही मनोरे जोडलेले आहेत. या जोडगोळीने सर्वोच्च उंचीचा उच्चांक सहा वर्षे टिकवला. नंतर ‘ताइपेइ १०१’ ने त्याला मागे टाकलं. यांत एकूण २९ उद्वाहने (लिफ्टस्) आहेत. विज्ञानाचा चमत्कार आपल्याला थक्क केल्याशिवाय राहत नाही. ही उद्वाहने दुमजली आहेत. उद्वाहनाचा खालचा मजला सम मजल्यावर तर वरचा विषम मजल्यावर थांबतो. या जुळ्या भावांच्या बांधकामाच्या वेळेस एवढ्या उंचीपर्यंत सिमेंट काँक्रीट कसं चढवायचे, भूकंपाचा धोका विचारात घेऊन काय योजना करायची, अशा अनेक आव्हानांना तोंड देत ते उभारले गेलं. या उभारणीच्या कामात ज्या कंपन्यांनी स्वतःची उत्पादनं पुरवली त्या आजही मिरवतात, बघा आमच्या दर्जेदार मालामुळे आजही कसा दिमाखात उभा आहे. माझ्या कंपनीचाही त्यात सहभाग आहे. अॅल्युमिनियमवर लावलेल्या रंगात आमचे ‘बहुलक’ (पॉलीमर) वापरले गेलेत. असाच अजून एक टॉवर म्हणजे के. एल्. टॉवर १३८१ फूट उंच ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ ग्रेट टॉवर्स’चा सभासद. जाता-जाता रस्त्यावरूनच बघून क्वांटनकडे जाणाऱ्या बसच्या दिशेने निघालो. केएल् टॉवर आणि शांघायचा पर्ल टॉवर यांत थोडं फार साम्य वाटलं.

‘पाहांग’ राज्याची राजधानी क्वांटनकडे निघालो पुढचे दोन दिवस तिथेच मिटिंग होती. केएल पासून ईशान्येकडे वसलेलं एक बेटच म्हणा ना ! केएल् विमानतळापासून अडीच तीन तासांच्या अंतरावर ही जागा आहे असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. आमची बस केएलमधून बाहेर पडेस्तोवरच एक-दीड तास गेला. वाटेत धो-धो पावसाची सलामी अनुभवली; पण रस्त्यात पाणी कुठेही साठत नव्हतं.  नंतर बस चक्क बंदच पडली. मग जो तो आपापल्या पद्धतीने वेळ घालवू लागला. माझ्या निरीक्षणात आणखी काही गोष्टी येत गेल्या. कारणाशिवाय रस्त्यावर जास्त काळ गाडी थांबवायला परवानगी नाही. पाऊण तासापेक्षा जास्त काळ थांबलात तर पोलीसांची गाडी येते. आधुनिक यंत्रणेद्वारे त्यांना तात्काळ कळतं. बस बंद पडली तिथे स्वच्छतागृह वगैरे होतं हे सुदैव! आजूबाजूला छोट्या टपऱ्याही पाहिल्या; पण काही कळेनात. थोड्या वेळाने दिसून आलं, मोटरसायकलस्वारांना रेनकोट घालायला, सिगरेट प्यायला केलेली ती सोय होती. बस दुरूस्त होण्याची चिन्हं काही दिसेनात म्हणून शेवटी दुसरी बस आणण्यात आली. एकदाचे सातेक तासांनी आम्ही इप्सित स्थळी पोचलो. आमच्या आधीच पोहोचलेल्यांकडे दुसऱ्या दिवशी चौकशी केली तर ती मंडळीही गाडीत बिघाड नसूनसुद्धा पांच सहा तासांनी पोचली होती. आपल्या गावाकडची लोकं कशी सांगतात ना, “हे आले पघा गांव” तशातला प्रकार होता सगळा. पुलं असते तर ‘म्हैस’ची नवीन आवृत्ती लिहून मोकळे झाले असते. अर्ध्या दिवसाचे मलेशियादर्शन हे असं होतं.

अवांतर निरीक्षण :- या देशात ‘प्रोटोन’ नावाची स्थानिक कार कंपनी आहे. बाहेरून दिसायला चांगल्या   वाटणाऱ्या या गाड्या फार खास नाहीत. पळताना फार लवकर धापा टाकू लागतात; पण रस्ते चांगले असल्याने तेवढं जाणवत नाही. ३१ ऑगस्ट १९५७ ला मलेशियाला स्वातंत्र्य मिळालं. मात्र नंतर केलेली प्रगती नजरेत भरण्यासारखी आहे. देशाचं क्षेत्रफळ कमी आहे, लोकसंख्यादेखील आपल्या तुलनेत कमी आहे हे मान्य आहे; पण केलेली प्रगती लोभविते.

क्वांटनचं आमचं हॉटेल समुद्रकिनारी होतं. नाष्टा व जेवणाची जागा समुद्रकिनारी होती. पदार्थांचा आस्वाद घेताघेता दिसे – पिवळसर वाळूवर येणाऱ्या लाटा मऊ पावलांनी वर्दी देत होत्या. ज्या भागात फिरलो तिथे खूप टोलेजंग इमारती दिसल्या नाहीत.  इथला पेहराव वर्णन करायचा झाला तर डोक्यावर रुमाल बांधून मुसलमानी स्त्रिया वावरतात. डोक्यावरचा रुमाल साधा किंवा नक्षीदार असतो. रुमालावरची नक्षी, त्याचे रंग, आकार याद्वारेच काय ती फॅशन करतात; पण सक्तीचा पोशाख असेल असं  वाटत नाही. मुस्लीमेतर बायका पॅन्टशर्ट वगैरे घालतात. पुरुषांना विविधतेला फारसा वावच नाही. आमच्या हॉटेलात तरी दारूबंदी होती. कडक प्रकारातली कुठलीही मद्यविक्री नव्हती. कदाचित् मलेशियाचा घोषित धर्म ‘ईस्लाम’ असल्याने ही बंदी सर्वत्र असावी.

रबर व पामची झाडं खूप असल्याने संबंधित उद्योगधंदे फोफावले आहेत. मलेशियाची अर्थव्यवस्था सशक्त आहे. रुपयाची तुलना करता डॉलरसमोर रिंगिट बलवान आहे. ३ रिंगिट म्हणजे १ डॉलर. मलेशियातल्या माणसांच्या सवयी, स्वभाव याचं म्हणावं  तसं दर्शन नाही झालं.

परतीच्या प्रवासाची वेळ येऊन ठेपली. आधीच्या अनुभवावरून ६ तासाची खूणगांठ बांधून निघालो. साधारण दोन-अडीच तास प्रवास झाल्यावर विरलभाईने एक झटका दिला. तो हॉटेलवरच पासपोर्ट विसरला, मग आमची पळापळ, फोनाफोनी झाली. दुसऱ्या गाडीने पासपोर्ट मागवला; पण आमच्या वेळेत पासपोर्ट काही पोचला नाही. विरलभाईला मागे सोडून आम्ही ठरलेल्या विमानाने परतलो. तो नंतरच्या विमानाने पोहोचला. ‘भारताचे या देशाशी असलेलं सांस्कृतिक नातं ’ याबाबत बरंच कुतूहल अजूनही दाटून आहे. कदाचित् परत कधी जायची वेळ आल्यावर उलगडेल. आठवणींचा दरवळ काळाच्या झुळुकीने विरल व्हायच्या आत, कागदावर उतरवायला घेतला. लिहिता-लिहिता पहाट झाली. लांबून कुठून तरी कानावर ओळी पडू लागल्या,

मलयगिरीचा चंदनगंधित
धूप तुला दाविला
स्वीकारावी पूजा आता
उठी उठी गोपाला । उठी उठी गोपाला ।

पानफुटीचं एक झाड असतं. एका पानालाच दुसरं पान फुटतं, तसं मलेशिया दौऱ्यावर अजून एक दौरा निश्चित झाला. एका छोट्याशा विरामानंतर त्याचं वर्णन तुमच्यापर्यंत येईलच.

– ©️  सचिन उपाध्ये 
sachinupadhye26@gmail.com

Saturday, July 10, 2021

दूधसागरास

 गणेशचतुर्थिनिमित्त कोकणात जाण्याचे शेवटच्या क्षणी ठरले.. गेलो ते मनाशी भटकंतीचा प्लान पक्के करून.. कुठे भटकायचे ठरवले नव्हते पण एका ठिकाणाला सर्वात जास्त पसंती होती ती म्हणजे दूधसागर धबधबा ! गोवा-कर्नाटक सीमेवर ‘ब्रीगांझा’ Briganza घाटात असलेला हा धबधबा बरीच वर्ष खुणावत होता.. फारसा परिचित नसलेला हा धबधबा ‘चेन्नई एक्सप्रेस’ सिनेमातील दृश्यामुळे प्रकाशझोतात झाला…

घरचे गणपती गावी गेले नि सहाव्या दिवशी आम्हीपण घराच्यांचा निरोप घेउन बाहेर पडलो.. आम्ही म्हणजे मी व बायकोच ! निघालेलो निवतीचा किल्ला बघण्यासाठी.. तो बघून एक दिवस राहून मग ‘दूधसागर’साठी जाणार होतो.. पण कुडाळ बसस्थानाकातून सकाळी जाणारी बस चुकली सो प्लान बदलला ! त्यात पाऊस अधुनमधुन दमदार सरींचा कार्यक्रम दाखवत होता तेव्हा नकोच म्हणत आम्ही थेट कुडाळ रेल्वेस्थानक गाठले..

सकाळची साडेनऊची मडगाव एक्सप्रेस ‘कोकणकन्या’ वेळेप्रमाणे वीस मिनिटे उशिराने आली नि आम्ही मडगावच्या दिशेने कूच केले.. लख्ख उनात चमचमणारे हिरव्या भातशेतीचे किनारे दाखवत ‘कोकणकन्या’ने नारळाच्या बागेत आणले नि गोव्यात दाखल झाल्याची जाणीव झाली..

आपला प्रवास नेहमी कुडाळ- सावंतवाडी पर्यंतच मर्यादीत असल्याने ‘मडगाव’ला पहिल्यांदाच भेट देत होतो.. रेल्वेस्थानक अगदी सोयीचे.. रिटायरिंग रूम्स, २४ तास सुरु असणारी लॉकर सुविधा इत्यादी सोयींनी उपयुक्त.. तिथेच असणाऱ्या ‘बेंजो’ हॉटेलमध्ये नॉन-वेज खाऊन श्रावण-भाद्रपद सोडला ! आम्ही दुपारी पोहोचलेलो नि दूधसागर साठी योग्य वेळ व ट्रेन उपलब्ध नसल्याने मडगावलाच रेल्वेस्थानकाजवळील एका  हॉटेलात मुक्काम केला.. त्या दिवसाची संध्या ‘कोलवा’ बीचवर व्यतीत केली.. जास्त गर्दी नसलेला शांत किनारा.. किनाऱ्याच्या वाळुत चालताना वेळ कसा गेला ते कळलेच नाही..

दिवस उजाडला… मडगावहून सकाळची पावणे आठची वास्को हावड़ा – अमरावती एक्प्रेस  (क्र.१८०४८) पकडायची होती.. लक्ष्य एकच दूधसागर !

‘भारतातील सर्वात मोठ्या धबधब्यांमध्ये ‘दूधसागर’ हा सहाव्या क्रमांकावर आहे.. चार टप्प्यात कोसळणाऱ्या या जलप्रतापाची ऊंची सुमारे ११२० फुट.. पावसाळ्यात याचे पात्र १०० फूटी रुंद असते आणि म्हणुनच हा धबधबा पावसात एकदम बघेबल ठरतो !  गोवा-कर्नाटक सीमेवर ‘ब्रीगांझा’ घाटाचे नंदनवन आहे..  या घाटाच्या डोंगरमाथ्यावरूनच हा धबधबा झेप घेतो.. हा सारा परिसर भगवान महावीर अभयारण्यात येत असल्याने सभोवताली घनदाट हिरवे जंगल.. पावसात उधाण आलेल्या या विशाल धबधाब्याची धार अगदी दुधासारखी शुभ्र भासते नि म्हणूनच ‘दूधसागर’ नाव पडले असावे.

इथे पोचायाचे तर कॅस्टलरॉक नि कुलेम ही जवळची रेल्वेस्थानकं.. ‘दूधसागर’ नावाचे पण स्थानक आहे पण तिथे कुठलीही गाडी ऑफ़िशिअलि थांबत नाही वा या स्थानकासाठी तिकीट मिळत नाही.. कॅस्टलरॉक व कुलेमच्या मध्ये तीन स्थानकं लागतात.. कुलेम पासून सुरवात केली तर सोनालिम- दूधसागर-करंजोल नि मग कॅस्टलरॉक. या तिन्ही स्थानकांवर कुठलीच गाडी थांबत नाही पण तांत्रिक कारणासाठी ‘दूधसागर’ला एक- दोन मिनिटे गाडी थांबवली जाते.. हा ब्रेक फक्त कॅस्टलरॉकहून कुलेमला येतानाच असतो मग ती मालगाड़ी असो वा एक्सप्रेस… याउलट कुलेमहून येणारी संध्याकाळची गोवा-पुणे एक्सप्रेस फ़क्त दोनेक मिनीटासाठी थांबते…

इथे ट्रेक करायचा तर ३-४ पर्याय आहेत.. त्यात जास्त पसंती कॅस्टलरॉक वरून जाणाऱ्या मार्गाला दिली जाते.. मुंबई पुण्याचा पब्लिक पुण्याहून शक्यतो ‘गोवा एक्सप्रेस’ पकडून इथे येतात.. (पण गाड्यांचे वेळापत्रक बघुनच.. दोन गाड्या आहेत क्र. १२७८० व ११०९७ ) कॅस्टलरॉक स्टेशनहून चालायचे तर अंतर १४ किमी नि जवळपास ११ बोगदे !! तेव्हा कॅस्टलरॉकला न उतरता दूधसागर स्टेशनलाच गाडी थांबली की पटकन उतरून घ्यायचे इथून पुढे १ किमी अंतरावर धबधबा लागतो !

अजुन एक फारसा वापरत नसलेला पर्याय म्हणजे  कुलेमवरुन चालत.. अंतर अंदाजे १२ किमी ! लागणारे बोगदे ५ ! आम्ही ‘मडगाव’ या कुलेमच्या आधी असलेल्या स्टेशनाला असल्याने माझा ट्रेक प्लॅन हाच होता.. पण सौ. रॉक्स बरोबर होत्या.. ती कितपत चालेल याबद्दल साशंक होतो.. शिवाय घनदाट जंगल नि आम्ही दोघेच अशा सुरक्षेच्या दृष्टीने नकारात्मक अडचणी होत्याच ! म्हणून मडगावहून अमरावती एक्सप्रेस पकडायची.. कुलेमच्या पुढे दूधसागरला थांबली तर ठीक नाहीतर थेट कॅस्टलरॉक.. मग तिथून मिळेल त्या गाडीने दूधसागर स्थानक ! धबधबा बघून परत दूधसागर स्थानक नि मिळेल त्या गाडीने कुलेम नि तिथून पेसेंजरने मडगाव..इति तंगडतोड बचाव प्लॅन होता..

पण डाव फसला.. वेळ माहीत असुनही माहिती केंद्रावर चौकशी करताना गैरसमज झाला.. गाडी येण्यास अजुन १५ मिनिटे आहेत या भ्रमात आम्ही आवश्यक फलाटावर न जाता खादाडीसाठी टिपी करत बसलो.. परिणामी गाडी समोरच्या फलाटावरून निघून गेली !!! चुक लक्षात आली नि जोराचा झटका लागला ! आदल्या रात्री केलेल्या प्लॅनचा चुराडा झाला ! आता काय करायचे प्रश्ण पडला… मडगावहून पुढे कुलें ला जाणारी ८ ची पेसेंजर होती.. पण कुलेमपासून पुढे जायला काही पर्याय दिसत नव्हता..

पंधरा मिनिटांनी सव्वा आठची ‘वास्को-कुलेम’ धावणारी पेसेंजर आली नि ‘काय होईल ते बघू’ म्हणत बेभरवश्यावर आम्ही मडगाव सोडले.. जेमतेम पाउण तासाचा प्रवास.. खिडकीतून फ़क्त नि फ़क्त ताडमाडच दिसतात.. या प्रवासात लागणाऱ्या स्थानकांपैंकी ‘चांदरगाव’ नि ‘कालेम’ हीच काय ती नाव उच्चारण्यासारखी.. बाकी जल्ला एकही नाव धड नाही.. कुलेमला पेसेंजर खाली झाली नि समोर पावसाचे लक्षण  दिसू लागले.. कुलेमला उतरलो तर समोरच एक माणूस शेवाळ्य़ावरुन घसरला.. उठायला गेला तर पुन्हा घसरला ! सांगण्याचे तात्पर्य ही पेसेंजर ज्या उघड्या फलाटावर येते तो संपुर्ण शेवाळाच्छादीत होता ! तेव्हा जपून जपून चाल !

आम्ही लगेच गार्ड कार्यालय गाठले पण आता संध्याकाळपर्यंत कुठलीच ट्रेन नसल्याचे कळले ! आता एकच पर्याय होता चालत जाण्याचा.. रेल्वे रुळ पाहीला तर जंगलात घुसून गायब झालेला..

जायचे की नाही ह्या द्विधामनस्थितित होतो.. एका प्रवाशाला विचारले तर बोगदे लागत नाहीत म्हणाला पण गार्डकडे चौकशी केली नि बोगदे असल्याची खात्री झाली.. म्हटले आता टॉर्च असलेला बरा म्हणुन कुलेम स्टेशन बाहेर पडलो.. बाहेर दुकानं आहेत.. छोटी हॉटेल्स पण आहेत.. एक टॉर्च, जळवांचा त्रास नको म्हणुन मीठाची पुडी, खायला गोव्याची पेशल नारळाची बिस्किट इति घाइघाइत खरेदी केली.. सकाळी सव्वादहालाच दालफ्राय खाऊन पोट पण भरुन घेतले.. एव्हाना नकारात्मक विचार मागे पडून आगळा हुरूप चढला सो लेट्स गो केले.. स्टेशनबाहेरच दूधसागर नावाचा टॅक्सी स्टॅंड आहे पण पावसात एकतर गाडीचा रस्ता बंद असतो आणि नेलेच तर एक किमी अंतर आधी नेउन सोडतात.. पण हा मार्ग धबधाब्याच्या तळाकडे घेउन जातो.. तिकडून पुन्हा जंगलातून वरती चढ़ावे लागते.. तरी हुकमी जागा पहायची तर रेल्वे ट्रॅक वरूनच जायचे ! पावसात जीप नसल्या तरी बाइक- टॅक्सी (बाइकवरुन घेउन जाणारे) उपलब्ध होत्या.. तिथे दुर्लक्ष करत आम्ही लेटस गो केले..

रेल्वे रुळावर आलो.. वाटले आम्ही दोघेच दूधसागरला जाणारे तोच मागोमाग कुण्या गावचे सात-आठ गावकरी आले.. पुढे सुनसान जंगल नि त्यात हा घोळका.. थोडे टेंशन आलेच.. तेव्हा पुढे यांचा आपल्यावर watch नको म्हणत मुद्दाम मागे राहिलो.. पण त्या घोळक्यात दोन वयस्कर माणसांचा  चालण्याचा वेग पाहून पुन्हा त्यांना मागे टाकले नि सुसाट निघालो…

त्यात धो- धो पाउस सुरु झाला.. सौ. कड़े विण्ड्चिटर नि टोपी सोपवली होतीच.. तर मी छत्री नि सॅक सांभाळत  चालू लागलो.. त्या ग्रुपकडे काहीच नसल्याने ते लोक्स मग पावसात मागच्या मागे राहूनच गेले..

आता भर पावसात निसर्गाचा आनंद घेत आमच्या दोघांची वाटचाल सुरु झाली.. संपूर्ण ट्रेक रुळ मार्गावरून चालत करण्यात एक वेगळीच मजा येत होती.. पण चालणे तितके सोप्पे नव्हते..  कुलेम पासून अंदाजे ३ किमी अंतर तरी रुळाच्या बाजूने पाउलवाट आहे तेव्हा आम्ही आलटून पालटून मार्ग बदलत होतो.. काही मिनिटातच बाइकचा आवाज ऐकू आला.. मागे वळून पाहिले तर बाइक-टॅक्सीवाले… चक्क रुळाच्या बाजूने येणाऱ्या अरुंद वाटेने चालवत होते..!!  एका बाइकवर एक नि लहान मूल असतील तर ट्रिपल सिट.. आयडिया भारी होती पण भर पावसात अश्या खडबडी नि छोट्या रस्त्यातून जायचे तरी कसे… ते कितपर्यंत नि भोगद्यात कसे जात असतील असे अनेक प्रश्न पडले.. नंतर कळले की पुढे रेल्वेरुळ ओलांडून एका वाटेने जंगलात उतरतात नि पुढचा रस्ता एकदम खराब नि दोन तीन वेळा ओढा पार करावा लागतो. थोडक्यात पाठदुखीला आमंत्रण !! शिवाय पैसे पण म्हणे अव्वाच्या सव्वा घेतात..

बाइक अडखळत अडखळत पुढे निघून गेल्या नि पुन्हा नीरव शांतता..  दोन्ही बाजुला उंच झाडीचे घनदाट जंगल.. आभाळ भरुन आल्याने अंधुकसा प्रकाश नि अधुन मधून गाजावाजा करत येणारी पावसाची मोठी सर.. सर येउन गेल्यावर पानांवरून टपकणाऱ्या थेंबांची टिपटिप..नि मध्येच ऐकू येणारा झऱ्याचा खळखळाट.. जंगलातला पाऊस किती आल्हाददायक असतो ते अनुभवत होतो.. असे मस्त वातावरण एन्जॉय करण्यासारखे.. पण ते सोडून आमच्या सौ. सारख्या मागे-पुढे कुणी दिसतय का पाहत होत्या.. भर जंगलात दोघेच असल्याने तिची टरकली होती..

रेल्वेरुळ टप्प्याटप्प्याने वळण घेत होती.. एव्हाना त्या एकट्या रेल्वेरुळाशी सलगी झालेली.. बरीच चाल झाली तेव्हा कुठे या निर्मनुष्य परिसरात रुळावर काम करणारे गार्ड भेटले.. त्यांना विचारले तेव्हा अजुन ८ किमी अंतर बाकी होते !!!

पुढे काही अंतरावर रेल्वेचा भोंगा ऐकू आला.. जंगलात आवाज दुमदुमणारच ! ट्रेनचा भोंगा दुरदुरवरुन  कानावर पडत असतोच.. पण ट्रेन पुढून येणार की मागून हे कळत नाही… पण पाचेक मिनिटांतच मालडबे घेउन इंजिन समोरून आले.. आम्ही ट्रेनसाठी आधीच वाट मोकळी करून दिलेली.. या मार्गावर काही निवडक ट्रेन सोडल्या तर मालवाहतुकच जास्त प्रमाणात चालते.. घाटमार्ग असल्याने ट्रेनचा वेग अगदी नगण्य असतो.. त्यामुळे ट्रेन आली तरी घाबरण्याचे कारण नाही..

– – –

फ़क्त नीट काळजी घ्यायची ती बोगदा आला की.. काही अंतरानंतर पहिला बोगदा समोर आलाच.. आमच्या सोबतीचा रुळ पुढे जात थेट पहाडातच खुपसले होते.. दाट जंगलामध्ये नीरव शांततेत पहाडाला पाडलेल्या या बोगद्याचे तोंड मात्र विलक्षण गुढमय वाटत होते..

साहाजिकच सौ.ला तो बोगदा पाहून धडकीच भरली.. पुढे सरावण्यास तयारच नाही.. ‘बस झाले इथूनच परत जाउया..’  चा नारा सुरु झाला.. बोगद्याची लांबी किती आहे ते माहीत नव्हते.. शिवाय कुठली ट्रेन जवळपास असल्याची चाहुल नव्हती तेव्हा पटकन बोगदा पार करणे उचित होते.. पण मिट्ट काळोख बघून तिला काही धीर होत नव्हता.. अगदी रडकुंडीलाच आलेली..क्षणभर मलाही सुचेनासे झाले.. शेवटी मोबाइलचा टॉर्च व घेतलेला टॉर्च यांच्या संमिश्र प्रकाशात तीला जवळपास ओढत कसेबसे बोगद्यात प्रवेश केला.. बोगदा ऐसपैस असला तरी वळण असल्यामुळे अंधाराचे साम्राज्य होते..  नशिबाने फार लांबीचा नव्हता.. घाबरून गांगरलेल्या सौ.ला धीर देत बोगदा एकदाचा पार केला.. नि एक मोठा टप्पाच पार केलाय असे वाटून गेले..

वातावरण पण अगदी धुंदमय होते..  ढगांचा थवा वॄक्षराजींच्या पहाडावर डोलत होता… पाऊस अगदीच हलके तुषार उडवत हवेत गारवा आणू पाहत होता.. पक्ष्यांची नजरभेट नाही झाली तरी त्यांचे गुणगान साद घालतच होते.. इथला परिसर बऱ्यापैंकी मोकळा होता.. एकट्या रुळाला देखील आता इतर रुळांची साथ लाभलेली.

अर्थात हे रुळ म्हणजे बोगद्यातून रेल्वे पास होउ देण्यासाठी केलेली सोय होती.. तशी एक कुलेमच्या दिशेने जाणारी मालगाड़ी येउन उभी पण राहिली.. इथेच ‘सोनालिम’  नावाचे स्टेशन लागले नि हायसे वाटले..

वाटले होते फलाट वगैरे असेल.. बसून पेटपूजा करू असा विचार केलेला पण सोनालिम नावाचा फलक सोडला तर जल्ला बाकी काहीच नाही.. !!! एक गार्ड लोकांची खोली आहे जिथे चार पाच कामगार लोक होते.. हे सगळ ठीक होत पण ‘दूधसागर ५ किमी’ हे लिहिलेले पाहून मात्र त्रास झाला…

पुन्हा रुळ जंगलात घुसला नि एकटा पडला… पुन्हा तेच जंगल.. पण आता जाणवत होते की घाटातून जातोय म्हणून.. झाडीच्या पलिकडे दरी असल्याचे जाणवत होते.. पुढे मार्गात रुळाचे काम करण्यात मग्न असलेले कामगार दिसले.. घाटातून इतक्या वजनदार मालगाड्यांची वाहतुक सुरळीत चालण्यात यांचाच हातभर असतो.

पुढे दूसरा बोगदा लागला पण हा नावाला होता.. फारच छोटा त्यात बोगद्याच्या तोंडाशी दोन-तीन कामगार विश्रांती करत होते.. तेव्हा इथे सौ. ने पुनरावृत्ति केली नाही.. पुढे काही मिनिटातच तिसरा बोगदा लागला.. पण रेल्वेचा भोंगा ऐकू आला नि तिथेच थांबलो.. बोगद्यात अंधारात बाजूला उभे राहण्यापेक्षा बाहेरच वाट पाहिलेली बरी.. पुन्हा मालगाडीच मागून आली नि मघाशी सोनालिम ला कुलेमाच्या दिशेने जाणारी मालगाडी ह्या गाडीसाठीच थांबली असावी हे समजले..

– – –

तिसऱ्या बोगद्यातसुद्धा पलिकडचे तोंड दिसत असल्याने फारशी अडचण वाटली नाही.. इथून बाहेर आलो नि दुरवर धबधबा कोसळतोय याची पहिल्यांदा चाहुल लागली.. आवाज कानी पडत होता..

काही मिनिटातच गर्द हिरव्या झाडी पलिकडे पांढरट पडदा दिसला नि आमची पावल पटापट पडू लागली.. वाचून होतो की कुलेम वरुन जाणाऱ्या मार्गाने दूधसागराचे विहंगमय दृश्य नजरेस पडते.. या धबधब्याखालून ट्रेन जाताना दिसली तर सोने पे सुहागा ! शेवटी ती जागा आलीच जिथून संपूर्ण दूधसागर नजरेस पडला… आणि काय नशीब म्हणावे..  त्याचवेळी ट्रेनसुद्धा हजर झाली.. आतापर्यंत नेट वर फोटो पाहीले होते पण आज प्रत्यक्षात पाहत होतो..

– – –

– – –

– – –

खरच निसर्गाची किमया ! आभाळाला भिडलेल्या डोंगरमाथ्यावरून कोसळणारा हा पांढराशुभ्र धबधबा जणु हिरव्या सृष्टीवर केलेला दुधाचा अभिषेकच भासतो.. असेल त्या पाण्याला वेग पण दुरून बघताना खरच एका सुंदर लयीत पडताना दिसते..

कविवर्य बा. भ. बोरकरांनी ‘दूधसागरास’ या कवितेत म्हटलेच आहे..

“हास खदखदून हास असा दूधसागरा, लासल्या गिरिदरीत फेक फेस पांढरा..

हास्यी तव वेदघोष सृजनाचा दिव्यतोष जीवनकल्लोळहर्ष वर्षवी शुभंकरा..

हास्यध्वनी तव उठोत कंठ प्रस्तरां फुटोत हिरवळो नटो फुलांत माउली वसुंधरा..”

यापुढे आपण काय बोलावे..

– – –

– – –

– – –

या धबधब्याला पाहताना शुद्ध आली जेव्हा रेल्वेने भोंगा वाजवला.. हीच रेल्वे मघाशी धबधब्यासमोरून जाताना दिसलेली.. ! भानावर आलो कारण ही अमरावती एक्सप्रेस होती !! तासभर लवकर आलो असतो तर दूधसागर स्टेशनवरुन हमखास कुलेमपर्यंत लिफ्ट मिळाली असती.. इथे आम्ही अजुन त्या धबधब्यापर्यंत पोचलोदेखिल नव्हतो.. चालून तीन तास उलटत होते नि अजुन एक किमी अंतर बाकी होते..!!

– – –

आता दोन वळण पार केली की आम्ही पोचणार होतो.. दरीत खळखळाट दुमदुमत होता.. पुढेच वाटेत उजवीकडे छोटा धबधबा लागला.. यथेच्छ डुंबण्यासाठी मस्त जागा.. पण आता वेळ नव्हता.. पुढे लगेच छोट्या अंतराचा चौथा बोगदा लागला… तो संपला की सात -आठ फुटाच्या अंतराने लागुनच पाचवा छोटा बोगदा.. ! या रचनेमुळे ही जागा लक्ष वेधून घेते.. दोन्ही छोट्या बोगद्यांमधील अंतर फारच कमी असल्याने काळोख्या वाटेत मध्येच दिसणारा प्रकाशझोत अगदीच तेजस्वी वाटतो नि बोगद्याच्या तोंडावरून ओघळणारे पाणी त्यावर साज चढवतो..

– – –

– – –

पाचव्या बोगद्यातून बाहेर पडलो नि पांढराशुभ्र धबधबा सामोरा आला.. ऊंचीवरुन कोसळणारा हा अवाढव्य पांढराशुभ्र जलप्रताप पाहून या धबधब्यास ‘दूधसागर’ का म्हणतात याची प्रचिती आली… वाऱ्यासोबत उडणारे धबधाब्याचे शुभ्रकण आमचे भिजवून स्वागत करत होते… ह्या धबधाब्याचे पाणी जिथे पडते तिथे अगदी जवळच रेल्वेचा पूल आहे व या पुलाखालूनच मग दूधसागर पुढील वाटचाल चालू ठेवतो.. पुलाच्या एका बाजूस पहाडावरून धबधब्याचे पाणी पडताना दिसते तर दुसऱ्या बाजूस खोल दरीत तेच पाणी झेपावताना दिसते.. हा पूल म्हणजे धबधब्याचा मध्यबिंदूच.. म्हणुनच या पूलावरून रेल्वे जातानाचे दृश्य दुरून नयनरम्य ठरते.. या पूलावरूनच दुधसागराची अनुभति घ्यावी..  ‘फक्त दर्शनच घ्या, हात मात्र लावायला येउ नका’ असाच काहीसा त्याचा दरारा..!

 – – –

गुरूवार असला तरी त्यामानाने गर्दी बऱ्यापैंकि होती.. म्हणजे शनि-रविवारी पर्यटक व ट्रेकर्स यांची फार वर्दळ असावी..धबधब्याच्या दोन्ही बाजुस दोन आडोशे आहेत त्यात एकीकडे चायनाश्त्याची टपरी आहे नि खाण म्हटलं की माकडं पण हजर.. आल्यापासून आमच लक्ष फक्त धबधब्याकडे होत.. उडणाऱ्या शिंतोडयामुळे कॅमेरावरचा हात मात्र आखडता घ्यावा लागला.. पोहोचून जेमतेम पाचेक मिनिटेच झाली असतील नि समोरून कुलेमच्या दिशेने जाणारे इंजिन येउन थांबले.. त्यातून लिफ्ट घेतलेल्या पाच-सहा पोरांचा घोळका उतरला.. ते पाहून सौ. ना पटकन लक्षात आले नि ‘आपण जाऊया; विचारा त्यांना ‘ म्हणू लागली.. धुंदमंद वातावरणातून इतक्या लवकर निघणे शक्य नव्हते.. पण वेळीच भानावर आलो नि धावत इंजिनापाशी गेलो.. मोटोरमन ने चला लवकरचा इशारा केला नि आमचा मोठा प्रश्ण मिटला… ! नंतर कुलेमला जाण्यास कुठली गाडी असेल याचा अंदाज नव्हता.. दुपारचे दोन वाजलेले नि कुलेमहून परत मडगावला जाण्यास संध्याकाळी पाचची शेवटची पॅसेंजर होती.. तेव्हा त्या वेळेत कुलेमपर्यंतचे अंतर पुन्हा चालून जाणे सौ. ला तरी शक्य नव्हते..थोडक्यात मडगाव गाठायचे तर हा शेवटचा पर्याय होता !

गंमत अशी की इंजिन सुरु होण्याअगोदर आम्ही धावत जाउन मोटरमनला विनंती केलेली.. एकदा इंजिन निघाले नि पुढे काही जणांनी पुन्हा थांबवायची विनंती केली तेव्हा मात्र मोटरमन थांबला नाही.. तात्पर्य ते ड्यूटीवर असुनही जर मदत करत असतील तर तो आपला हक्क समजू नका.. ! Respect them !

जे अंतर चालून जाण्यास जवळपास तीन तास लागले होते तेच अंतर आता वीसेक मिनीटात पार पडले !!! इंजिन मध्ये पहिल्यांदाच प्रवेश मिळालेला त्यामुळे मस्त वाटले.. एक जण इंजिन चालवत होता तर एक भोंगा वाजवत होता.. त्यांची गोयाची भाषा थोडीफार समजत होती.. आम्ही कुडाळचे समजल्यावर जास्त विचारपूस झाली.. पण खरच योगायोग होता अन्यथा कुलेम वरून मडगावला जाणारी शेवटची पॅसेंजर गाठणे पुरते अवघड बनले असते.. पण आता आम्ही दुपारीच अडीचला कुलेम गाठलेले.. अचानक मदतीचा हात पुढे केलेल्या त्या देवमाणसांचे आभार मानले.. आता दोन तास मुक्काम कुलेमलाच.. खरे तर स्थानकाजवळच ‘Elephant Village’ असल्याची माहिती नेटवर काढली होती पण हत्ती बघण्याऐवजी  ‘जेवण नि आराम’ करण्यास प्राधान्य दिले..

कुलेमला शेवटचा चहा घेतला नि बरोबर पाचला मडगावसाठी परतीची गाडी सुटली..पुन्हा आभाळ भरून आले.. पावसाने शिडकावा सुरु केला.. त्याच्या निरोपाचा आनंदाने स्विकार करत मनोमनी ‘दूधसागरा’स देखील हात जोडले !

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...