Tuesday, March 28, 2023

रडतोंडी, निसणी - जावळी खोरयातील ऐतिहासिक वाटा!

 




"तेजतम अंसपर , कन्हजिमि कंसपर |
तो म्लेंछ बंसपर, शेर सिवराज है ||
-कवी भूषण


ऐतिहासिक महत्व -

जावळी - आधुनिक महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वरच्या पश्चिमेस पसरलेला सदाहरित वनराजीने नटलेला प्रदेश!निसर्गाच्या सौंदर्याबरोबरच अनेक ज्ञात अज्ञात ऐतिहासिक घटनांचा मूक साक्षीदार! १६४८ नंतर छत्रपती शिवरायांची सार्वभौम राजा म्हणून ईतिहासाने नोंद घ्यावी अशा ज्ञात दोन ठळक घटना म्हणजे जावळीचे तत्कालिन राज्यकर्ते चंद्रराव मोरेंवर महाराजांनी केलेली कारवाई व त्यात जावळीचा स्वराज्यात केलेला समावेश आणि आदिलशाहीचा बलदंड सरदार आणि वाईचा सुभेदार अफजलखानाचा महाराजांनी केलेला कायमचा बंदोबस्त!




यात अफजलखानाने जावळीच्या चक्रव्यूहात  ज्या वाटेने प्रवेश केला ती वाट म्हणजे रडतोंडी घाट! आणि चंद्रराव मोरेंना जावळीत धडा शिकवताना महाराजांनी वापरली ती निसणीची वाट!

ईतीहासाचा धांडोळा घेण्याकरता यावेळी आम्ही निघालो याच वाटांच्या शोधात! शनिवारी सकाळी ६ वाजता महाबळेश्वरकडे प्रस्थान केले. वाईला पोटभर न्याहारी ऊरकून पसरणीच्या वळणदार वाटेने पाचगणी व नंतर महाबळेश्वरच्या मुंबई पाँईंटच्या अलिकडे राजभवनच्या आत गाडी सुरक्षित पार्क केली. (रखवालदारास कल्पना देऊन) सर्व जण मोहीमेसाठी तयार झाले.


राजभवनापासून साधारण १.३० ते २ कि.मी.वर महाबळेश्वरचा सुप्रसिद्ध मुंबई पाँईंट पर्यटकांचे मोठे आकर्षण.याच मुंबई पाँईंटच्या आधी डावीकडे जंगलात एक ठळक वाट दक्षिणेकडे जाते. ५ मिनीटे चालल्यावर ऊजवीकडे ती वाट खाली ऊतरली.मस्त दाट झाडीतून थोडे ऊतरल्यावर डांबरी सडक ओलांडून हीच वाट एका फार्महाऊसला लागून मेटतळे या गावात ऊतरते.हनुमान मंदीराच्या पुढे बसस्थानकाच्या शेजारून ओंकार हाँटेल समोरून डावीकडे रडतोंडी घाट पारसोंडसाठी ऊतरतो.



थोडं पुढं गेल्यावर समोर मधुमकरंदडापासून प्रतापगडापर्यंत पसरलेल सदाहरित रान डोळ्याच पारण फेडणारं! आजही दुर्गमता जपणारा हा प्रदेश! ३६० वर्षापूर्वी अफजलखानाला या प्रदेशात वाईतून महाराजांनी काय विचाराने आणि किती अफलातून नियोजनाने खेचून आणले असावे!



समोरच्या सुखद नजारयाच्या साथीने हिरव्यागर्द वनराजीतून खाली ऊतरताना सगळे खुशीत होते.साधारण तासाभरात मधुमकरंद जास्तच जवळ वाटायला लागला आणि काहीतरी चुकतेय अस वाटत असतानाच एक गावकरी दादा त्यांच्या सहचारिणीसोबत वर येताना दिसले.त्यांच्याशी बोलताना चूक लक्षात आली आम्ही सरळ ऊजव्या वाटेऐवजी डावीकडची वाट धरली होती.ही वाट शिरवली गावात ऊतरते.आता परत फिरण्याऐवजी आम्ही खाली असणारया गावातून जननी मातेचे मंदीर पाहून पारकडे जाण्याचा निर्णय घेतला.गावातल्या मूळच्या उमरठच्या मालुसरे दादांनी मंदीर दाखवून रस्ता समजवला.



हे जननी आणि कुंभळजाईचे  संयुक्त पुरातन पण नव्याने बांधकाम केलेले मंदीर त्याच्या आतल्या विहीरीमुळे वैशिष्ट्यपूर्ण आहे.आवारात सुस्थितील वीरगळ आणि बाहेर ठेवलेल्या रेखीव मूर्तीही बघण्यासारख्या!








थोडे पाणी पिऊन ताजेतवाने होऊन पारचा मार्ग धरला.डांबरी पण वळणदार मार्ग पूर्ण जंगलाने वेढलेला.मागे काही वेळेला हातलोटच्या फेरया केल्या असल्याने तसा परिचीत आणि मनात घर करून राहीलेला.३ कि मी गेलो आणि एक सिमेंटचा ट्रक आला त्याला हात करुन मागे बसून पारफाटा गाठला.वाटेत एक शिवकालीन पुल लागतो.परत आत २ कि मी पारमध्ये प्रसिद्ध रामवरदायिनीच्या अतिसुंदर राऊळात भोजन, वामकुक्षी असा कार्यक्रम पार पडला.याचे मूळस्थान पश्चिमेकडील प्रतापगडाच्या पलिकडे पारघाटात आहे.
अफजलखानाची छावणी ईथे पारमध्येच होती.आता दुपारचे २ वाजलेले!




परत सामान आवरून समोर दिसणारया प्रतापगडाकडे कूच केली.मार्ग ऊभ्या चढाचा!



सरळ सध्या प्रतिबंधित अफजलखानाच्या कबरीकडे घेऊन जाणारा.कबरीपाशी पोहचलो आणि प्रतापगड स्वच्छ आणि संपूर्ण ऊभा ठाकला पण पार गाव दिसेना.ईथेही महाराजांचे नियोजन ध्यानात आले.शामियानाची जागा आपल्या लोकांच्या नजरेच्या टप्प्यात रहावी पण खालून पारमधून अफजलसेनेच्या नजरेतून दूर!!



पोलिसांनी निरूपद्रवी भटक्यांना प्रेमाने आतून बाहेरचा रस्ता दाखवला.मग प्रतापगडाचा बुरूज गाठून जावळीचे रुप डोळ्यात साठवले.खाली पार्कींगपाशी येऊन कोकम सरबत ,जलजीरा यांनी शरिरातील पाण्याची पातळी संतुलित केली आणि प्रतापगड म.श्वर एस टी ने जावळी फाटा गाठला.६ वाजलेले.



आम्हाला मुक्कामास दरे गाव गाठायचे असल्याने लगेच चालायला सुरूवात केली.साधारण २ कि मी वर जावळीतील मंदीर लागले. त्याशेजारीच जावळीचे राज्यकर्ते चंद्रराव मोरेंचा वाडा होता.आता मात्र झुडूपांचे माजलेले रान आणि शेतावरल्या बांधास्वरूप चौथरा ईतकेच त्याचे अस्तित्व ऊरलेय.काळाचा महिमा अगाध आहे ज्या चंद्रराव मोरेंच्या अधिपत्याखाली जावळीचा तत्कालिन एवढा महत्वाचा प्रदेश आणि रायगड, चंद्रगडसारखे गड होते त्यांची साधी पाऊलखूणही शिल्लक नाही!! आणि ज्या महाराजांना त्यांनी राजा मानायला नकार दिला त्या छत्रपतींच्या नावावर आजही ३७० वर्षांनंतर राज्यकर्ते गादीवर बसतात.(शिवछत्रपती का आशिर्वाद).असो.



जावळीच्या  दोन तीन वाड्या ओलांडून रस्त्याच्या शेवटी असणारे दरे गाठेपर्यंत अंधार दाटला होता.मुक्कामासाठी शाळेच्या आवारात पथारया पसरल्या.शेजारील काकांनी जेवणाचे विचारले आणि झणझणीत पिठल भातावर ताव मारुन ९ च्या सुमारास स्लिपींग बँगमध्ये शिरलो.आजचा मोठा दिवस संपला होता.



दुर्गम गावातील पहाटही तेवढीच नयनरम्य! पहिला गजर गावातील कोंबड्यांचा.आश्चर्य म्हणजे एकाच वेळी रानकोंबड्या आणि गावातील कोंबड्याचा आरवल्याचा आवाज ऐकू येत होता.रात्री झोपायच्या वेळी जोर गावात क्रिकेटची मँच खेळायला गेलेली पोर निसणीच्या वाटेन ऊतरली होती.वरून येताना पडणारया टाँर्चच्या प्रकाशझोतात वाटेचा अंदाज येत होता.सर्व सकाळचे विधी ऊरकून चहा घेऊन बरोबर ७ वाजता मोरे मामांचा निरोप घेतला.



गावच्या शेजारचे कोरडे सावित्री नदीचे पात्र ओलांडून सरळ वर ऊत्तरेला निसणीची वाट आहे.एक छोटी टेकडी चढून एक टप्पा पार करताना मागे वळून टुमदार दरे गाव मागे लोडविक पाँईंट आणि जावळीच्या वाड्या पूर्ण घनदाट जंगलात ऊठून दिसत होत्या.



परत एक टेकडी मागे टाकून वरच्या निसणीच्या दांडाला लागलो.आता चढ अतितीव्र होत होता.



थोड्या अवघड प्रकारच्या घसारयाचा टप्पा पार करताना एक जीर्ण घाटदेवतीची घुमटी ऊनंपावसाचा मारा सहन करत ऊभी होती.



सर्व सुरक्षित वर आल्यावर पुढे एक अरुंद ट्रँव्हर्सवरुन वरच्या पठारावर जोडणारया जंगलाच्या वाटेला लागलो.



अगदी काही मिनीटात वरच्या पठारावर पोहचलो.वरुन खाली जावळीचे खोरे, मागे महाराजांनी जावळी ताब्यात घेतल्यावर निर्मीत प्रतापगड आणि पलिकडे मधुमकरंदगडपर्यंतचा परिसर! काही नजारे ह्रदयाच्या कोपरयात कायमचे कोरले जातात त्यापैकीच हा एक!

क्षणभर विश्रांतीनंतर क्षेत्र महाबळेश्वरची वाट पकडली पण ही वाट घनदाट अरण्यात जाऊन हरवली.आता काय करावे? मागे जावे? पण एकमताने पुढे जायचा निर्णय घेतला.आता थोडाफार अनुभव आणि सक्षम सवंगडी असताना कठीण प्रसंगावर मात करण्यास फार वेळ लागत नाही.जंगलात कुठे चाललोय हे समजेना अधूनमधून जंगली जनावरांच्या पायवाटा ओलांडत, कुठे वाकून, कुठे काटेरी झुडूपं चुकवत पूर्वेच्या दिशेन चालत राहीलो आणि अचानक वाहनाचा आवाज आला.जल्लोषात सर्व जवळजवळ पळत आर्थर सीट क्षेत्र महाबळेश्वर या डांबरी सडकेला लागलो.४ कि मी चालत मंदीरापाशी पोहचलो.तिथून एका जीपने राजभवन आणि कपडे बदलून वाईकडे प्रस्थान ठेवले.वाईत शिवशाहीमध्ये सुग्रास भोजन करून दुपारी ३ ला पुणे गाठले.

अनेक घाटवाटा पालथ्या घातल्या पण ह्या भटकंतीने छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाटा आणि ह्या लोकातित राजाच्या पराक्रमाची साक्षीदार असलेली भूमी अनुभवायला मिळाली ही फार मोठी जमेची बाजू!

धन्यवाद मित्रांनो! भेटू परत एखाद्या भन्नाट घाटवाटेसह!



भौगोलिक स्थान आणि अंतर :

पुण्यापासून महाबळेश्वर १२० कि मी अंदाजे.

सुरूवात : बाँबे पाँईंट  ; शेवट : क्षेत्र महाबळेश्वर.

गड : प्रतापगड

घाटवाटा : रडतोंडी आणि निसणी

श्रेणी : मध्यम 

काय पहाल : शिरवली मंदीर, जुना शिवकालीन पुल, रामवरदायिनी मंदीर पार, प्रतापगड, जावळीचे चंद्रराव मोरेंच्या वाड्याचा चौथरा आणि जुने महाबळेश्वर मंदीर.

मुक्काम : दरे गावातील प्राथमिक शाळा.

Link for article published in saptahik sakal.

http://www.saptahiksakal.com/SaptahikSakal/20170227/4855103307649065500.htm

रोहिदास शिखर परिक्रमा , माकडनाळ मार्गे...

 https://gdbhatkanti.blogspot.com/2020/12/blog-post.html

पहाटे बेलपाड्याकडे जाताना


Add caption

सकाळी बेलपाड्यातून दिसणारा हरिश्चंद्र गड

भाग पहिला ...

बऱ्याच दिवसापासून गड किल्ले , फोटोग्राफी , सायकलिंग साठी भटकंती होत असते. खूप साऱ्या गोष्टी मनाला भावतात त्या शब्द रुपात ब्लॉगमध्ये उतरल्या तर चिरकाल लक्षात राहतील . या हेतूने व बऱ्याच जवळच्या मित्रांनी आग्रह केल्या मुळे ब्लॉग चे लिखाण सुरू करत आहे.

नुकताच २८ व २९ नोव्हेंबर २०२० रोजी रोहिदास शिखर परिक्रमा ट्रेक पूर्ण केला. त्या ट्रेकच्या दरम्यान घडलेले प्रसंग , फोटो या ब्लॉग मध्ये मी लिहीत आहे. 

ट्रेकर लोकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. नाशिककरांना राजूर , पाचनई मार्गे सोपा आणि सोईस्कर आहे. त्याशिवाय टोलरखिंड, खिरेश्वर मार्ग मुंबई , पुणे कर जास्त वापरतात. 

हे मार्ग पाहून झाले की ट्रेकर लोकांना नळीची वाट , माकड नाळ हे अवघड, रोमांचकारी मार्ग खुणावू लागतात. मागच्या वर्षी आम्ही एकाच दिवसात नळीच्या वाटेने चढाई करून कोकणकडा फेर फटका मारून बैल घाट व साधले घाट मार्गे ट्रेक पूर्ण केला होता. पहाटे पाच वाजता चालू केलेला ट्रेक संध्याकाळी १०=३० वाजता संपला होता. त्याच वेळी आमचा गाईड कमळू ने समोरची माकड नाळ दाखवली होती. तेव्हा पासून ह्या मार्गे कधीतरी नक्की जाऊ असे ठरवले होते. 

त्यानंतर सह्याद्रीची घोरपड, कोकणकडा पुत्र अशी ओळख असलेले स्वर्गीय अरुण सावंत सर, सूरज मालुसरे, संजय अमृतकर, तुषार कोठावदे व ग्रुप यांनी माकडनाळ मार्गे हा ट्रेक केला होता. त्यावेळी त्यांनी माकड नाळेतील एका अवघड अशा रॉक पॅच ला बोल्ट मारले होते. जेणे करून इतर ट्रेकर सुरक्षित नाळ चढू शकतील. त्यानंतरच्या कोकणकडा रॅपलिंग व ट्रॅव्हर्स करतांना अरुण सावंत सरांचा दुर्दैवी अंत झाला, अरुण सावंत सर कोकणकड्यात कायमचे सामावले ... 😢 

जी व्यक्तीने दुसऱ्या ट्रेकरचा जीव जोखिमेत अडकू नये म्हणून स्वखर्चाने बोलटिंग करते. पण त्यांच्यावरच असा वाईट प्रसंग ओढावला यासारखे दुसरे दुर्दैव ते काय असू शकते.  याच घटनेच्या पार्श्वभूमीवर  त्यांचे पाऊल ज्या नाळेतून गेले त्याच मार्गे जाऊन स्वर्गीय अरुण सावंत सरांना श्रद्धांजली अर्पण करायची असे मनोमन ठरविले होते. हा माझा पहिला ब्लॉग त्यांच्या स्मृतीस समर्पित ...

त्यानंतर जगभर कोविड चा हाहाकार माजला, पावसाळा चालू झाला. त्यामुळे आमची ही मोहीम थंडावली होती. पावसाळा संपला , रस्ते , वाहतूक , ट्रेक चालू झाले आणि परत एकदा माकड नाळ मार्गे रोहिदास शिखर परिक्रमा करायची असे ठरले. 

२७ तारखेला शुक्रवारी रात्री ८ वाजता निघून १२ ते १ वाजे पर्यंत बेलपाड्याला पोहचून आराम करायचा व पहाटे पाच / सहा वाजता ट्रेक चालू करायचा असे ठरले होते. आमच्या गिरिदुर्ग भटकंती ग्रुपवर तशी पोस्ट टाकली गेली. ट्रेक अवघड आहे फक्त अनुभवी लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले होते. जास्तीत जास्त १५ लोक बरोबर घ्यायचे असे ठरविले होते. तरीही २३ लोकांनी येण्यासाठी होकार दिला. 

२५ सीटर बस सांगितली होती. रात्री ८ वाजता येणारी बस १०=१५ वाजता आली. चला हरकत नाही सर्व जण बसले, गणपती बाप्पा मोरया, शिवाजी महाराज की जय घोषणा दिल्या गेल्या. वाडीवर्हे च्या पुढे निघालो आणि ड्रायव्हर ने बस एका बाजूला घेतली. बसचे मागचे एका बाजूने दोन्ही टायर पंचर झाले होते. बस मध्ये एकच स्टेपनी होती. पंचर चे दुकान दीड किमी लांब होते. आमच्या काही तरुण सदस्य ते टायर हायवे वरून लोटत पंचर च्या दुकानाकडे निघाले. पंचर वाला आजारी होता त्याने पंचर काढायला नकार दिला. परत पुढच्या १ किमी वर पंचर दुकान होते तेथपर्यंत जाणे भाग होते. बस ला एका बाजूला एकच टायर लावून रिकामी बस कशी तरी त्या पंचर दुकानात पोहचली. रात्री चे बारा वाजून गेले होते. पंचर वाला तर्राट होऊन झोपला होता. त्याने पंचर काढायला अगोदर होकार देऊन नंतर नकार दिला. रात्रीचे दीड वाजला होता. आमच्या कंपनीची सहन शिलता संपत आली होती. विनंती करूनही पंचर काढून ऐकत नाही म्हणल्यावर प्रकरण हातघाई वर गेले. आजू बाजूचे लोक जमा झाले प्रकरण चिघळत चालले होते. वाद नको म्हणून मध्यस्थी करून प्रकरण मिटवले , परत पुढच्या एका दुकानात वरात निघाली. 

तेथे एक १७ /१८ वर्षाचा मुलगा होता. त्याने पंचर काढायला लगेच तयार झाला. आमचा बस ड्रायव्हर दिवस भर ड्राइविंग करून थकला होता. तो झोपून गेला. आमचे तरुण तुर्क पंचर काढणाऱ्या राजुच्या मदतीला सरसावले. त्याने दोन्ही टायर पंचर काढून व्यवस्थित बसवून दिले . घडयाळात तीन वाजले होते. आराम , झोप तर नाहीच नाही पण ट्रेक होईल की नाही या बाबत शंका येऊ लागली होती. पंचर वाल्या राजुचे बिल ३०० रुपये झाले होते. आमच्या मंडळीने ४०० रुपये दिले व त्याचे आभार मानले.

अशा प्रकारे पहाटे साडे तीन वाजता निघून आम्ही बेल पाड्यात सकाळी ७ वाजता पोहचलो. अवघड ट्रेकची सुरुवात अशी अवघड होईल अशी कोणी कल्पना केली नव्हती. मात्र आम्ही पोहचलो आणि ट्रेक होऊ शकतो या कल्पनेने सर्व त्रास विसरून आनंदी झालो होतो. 

दिनांक - २८ नोव्हेम्बर २०२० , शनिवार .

बेलपाड्यात पोहचता पोहचता सकाळचे ७ वाजून गेले होते . नाशिक पासून अवघ्या १३० की मी. अंतरासाठी आम्हाला तब्बल ९ तास लागले होते. अवघड ट्रेकची अशी अवघड सुरुवात होईल हे कोणाच्या ध्यानी मनी नव्हते. तरीही आमचा ट्रेक होऊ शकेल हाच आनंद मोठा होता. 

सूर्य देवता तारामती शिखराच्या आडून वर येऊ पाहत होती. बेलपाडा हे गाव कोकणकड्याच्या अगदी समोर पश्चिमेला वसलेले आहे. त्यामुळे  सूर्य दर्शन येथे नेहमी उशीरा होत असते. कोकणकड्याचे दर्शन येथून खूपच विलोभनीय होते. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर  पांढरे ढग पिंजून पसरलेले होते. लांबच लांब  व  उंचच उंच पसरलेला हरिश्चंद्र गड छाती दडपून टाकत होता.

 


आम्ही २३ जण गावात पोहचलो. नैसर्गिक विधी आटोपुन चहा , नाश्ता करून कोकणकड्याच्या दिशेने चालू लागलो. शेत, जंगल तुडवत जाणारा रस्ता पुढे ओढ्याला जाऊन मिळतो . पावसाळ्यात हा ओढा दुधडी भरून वाहतो . तेव्हा या वाटेने जायचे धाडस कोणी करत नाही. ओढा आत्ता कोरडा झाला होता मात्र काही ठिकाणी पाणी साचलेले दिसत होते. या नितळ पाण्यात छोटे मासे मस्त विहार करत होते. आम्ही मोठं मोठे दगड धोंडे ओलांडत पुढे पुढे जात होतो. 

धबधब्याची जागा , मागे कोकणकडा


हरिश्चंद्रगडाचा परिसर फार मोठा आहे. पूर्ण गड फिरायचा दोन तीन दिवस कमी पडतील . या गडाला तीन शिखर आहेत हरिश्चंद्र बालेकिल्ला , तारामती , रोहिदास शिखर यातील तारामती शिखर सर्वात उंच म्हणजे ४८०० फूट आहे. हा गड माळशेजच्या डोंगर रांगेत नगर , पुणे व ठाणे जिल्ह्याच्या सिमेवर स्थित  आहे. मात्र गड नगर जिल्ह्यात मोडतो. तर कोकणकडा च्या खालचा भाग ठाणे जिल्ह्यात येतो. 

आमचा हा ट्रेक कोकणकड्याच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या नाळेतून जाणार होता. हिलाच माकड नाळ असे म्हणतात. पूर्वी या ठिकाणी खूप माकड असायची असे स्थनिक सांगतात. ट्रेकिंग चा दांडगा अनुभव असल्याशिवाय या नाळेच्या वाटेला शक्यतो कोणी जात नाही. तसेच आरोहन चे तंत्र अवगत असल्या शिवाय जाणे धोक्याचे आहे. 

वाटेत एक बंद असलेला वॉटर फॉल येतो याठिकाणी नळीची वाट व माकड नाळ या दोन्ही येऊन मिळतात.  पावसाळ्यात दोन्ही बाजूने पाणी एकत्र येऊन मोठा ओढा तयार होतो. हाच ओढा पुढे काळू नदीला जाऊन मिळतो. या भागातून मंगळगंगा व काळू या दोन नद्या उगम पावतात. 

पावसाच्या जोरदार प्रवाहा मुळे या नाळा खडक फोडून तयार झाल्या असाव्यात . याच नाळेचा वापर पूर्वी पासून लोक जाण्या येण्यासाठी करत होते. आत्ता रस्ते , दळण वळण चे साधने  झाल्यामुळे यांचा वापर बंद झाला आहे. मात्र ट्रेकिंग करणारी मंडळीना सर्व गड किल्ले पाहून झाले की या आड मार्गाचा घाट वाटा खुणावू लागतात.  



हरिश्चंद्रगडाला ऐतिहासिक तसेच पौराणिक महत्व पण आहे. या किल्ल्यावर यादवांचे राज्य होते तसेच १७५० नंतर मोगलांकडून मराठयांनी हा किल्ला जिंकून घेतला, असा इतिहास आहे. 

माकड नाळ बाहेरून इतकी मोठी असेल हे लक्षात येत नाही. पण जसा आपण तिच्यात प्रवेश करतो तसा तिची लांबी आणि भव्यता लक्षात येते. मोठं मोठे दगड ओलांडत आपला मार्ग वर वर जात राहतो. काही ठिकाणी मोठया आकाराच्या खडकवरून चढतांना चांगलाच दम निघतो.

'एकमेका साह्य करू,  अवघे चढू माकड नाळ'  या प्रमाणे एकमेकाला साथ करत होते.  नाळेच्या एका ठिकाणी जिवंत झरा वाहतो त्याचे पाणी अतिशय थंड व चवदार होते. तेथे पाणी पिऊन रिकाम्या झालेल्या बाटल्या भरून घेतल्या. 

विरुद्ध बाजूला नळीची वाट स्पष्ट दिसत होती . तिच्यावर ऊन पडल्यामुळे त्या मार्गाने चढणारी ट्रेकर मंडळी मुंगी सारखी भासत होती. 

वातावरण स्वच्छ असल्याने फोटोची आवड असणाऱ्यांना पर्वणीच लाभली होती. 

माकड नाळेतील ७० फुटाचा रॉक पॅच


मजल दर मजल करत आम्ही एका ७० फुटाचा रॉक पॅच जवळ येऊन पोहचलो. हा टप्पा चढणे तांत्रिक अवजार असल्या शिवाय अवघड आहे. रोप च्या साहय्याने सेट अप लावला गेला. हर्णेस कमरेला बांधून, हेल्मेट घालून एक एक जण दोराच्या साहाय्याने कातळ कडा चढू लागला. या ठिकाणी दगड निसटून डोक्यावर पडण्याची भीती असते म्हणून हेल्मेट घातल्या शिवाय वर चढू नये. आम्हाला हा टप्पा पार पाडायला दोन तास लागले. त्यानंतर साधारण पाऊण तासाच्या चढाई नंतर आम्ही रोहिदास च्या पायथ्याच्या खिंडीत पोहचलो. ही खिंड तारामती व रोहिदास यांना जोडते. ह्या खिंडीत असलेला शेंडी सुळका लक्ष वेधुन घेतो. हा सुळका सर्वात प्रथम स्वर्गीय अरुण सावंत सरांनी १९८४ साली आरोहन केला होता. 

तेथे त्यांच्या स्मृती जाग्या झाल्या व त्यांना मनोभावे  श्रद्धांजली अर्पण केली. 

शेंडी सुळका


आत्ता दुपार चे दोन वाजले होते . आम्ही २३ जणांनी सकाळी ८=३०  वाजता चालू केलेली माकड नाळ चढाई  दुपारी २ वाजता यशस्वी रित्या पूर्ण केली होती. सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते . मनावरचा ताण हलका झाला होता.शेंडी सुळक्याचे वेग वेगळ्या अँगल ने फोटो काढले जात होते. सभोवतालचा नजारा इतका प्रसन्न करणारा होता की मंडळीना जेवणाचा विसर पडला होता. फोटो सेशन झाल्यावर सर्वानी तांदळाच्या भाकरी आणि बटाट्याच्या भाजीवर यथेच्छ ताव मारला . 

एव्हाना दुपारचे साडे तीन वाजले होते रोहिदास शिखर चढाई करायचे बाकी होते , वेळ फार कमी राहिला होता. रोहिदास शिखर चढणे घसारा असल्याने जिकरीचे होते . शिवाय अंधार पडायच्या आत परत येणे गरजेचे होते. शेवटी आम्ही १० जणांनी शिखरावर जाण्याचा निर्णय घेतला. अगदी छोटीशी कसा बसा पाय बसेल इतकी जागा असलेली वाट.  थोडासा अंदाज चुकला तर थेट दरी .... अतिशय काळजी पूर्वक चालावे लागत होते. त्यानंतर जंगलातुन वर चढावे लागते. वेळ कमी असल्याने झाडांच्या खोड , फांद्यांचा आधार घेत पळत पळतच वर चढत होतो. पुढे कारवी चे दाट जंगल लागते.  वाट अगदी निसरडी खूप दमछाक होत होती. पुढचा टप्पा खडकातून वर जात होता. अनेक रिस्की पॅच चढून एकदाचा  रोहिदास शिखर गाठले. समोरचा नजारा देहभान विसरायला लावेल असा होता. सह्याद्रीचे हे विराट रूप डोळ्यात साठवून घेत होतो. अक्षरक्षा फोटो काढायचे विसरून गेलो होतो. शिखरावर उभे राहायला एकदम कमी जागा होती .  जोरदार हवा वाहत होती . वातावरण अतिशय प्रसन्न होते . सूर्य मावळतीला निघाला होता. ढगांचा आडून सूर्य किरण खालच्या बेलपाड्यात sun ray shower ने आंघोळ घालत होते. उत्तरेला सीतेचा डोंगर , अजस्र  कोकणकडा , नाप्तां , आजोबा या ठिकाणाहून सह्याद्री चे रौद्र भीषण रूप डोळ्याचे पारणे फेडत होते. 

रोहिदास वरून दिसणारा नजारा, कोकणकडा, सीतेचा डोंगर, नाफ्ता.


तर दक्षिणेला उधळ्या, सिंदोळा, निमगिरी, भैरवगड, जीवधन , हडसर, खिरेश्वर, पिपळगाव जोग चे धरण मनमोहक नजारा दिसत होता. या ठिकाणाहून निघूच नये असे वाटत होते . पाच वाजले होते अंधार पडायच्या आत मुक्कामी ठिकाणी सुरक्षित पोहचणे महत्वाचे होते. आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. खाली उतरतांना चांगलीच पंचायत होत होती. आपण वर कसे आलो हेही कळत नव्हते. ७० ते ८० कोणातील उतरण होती. थोडीशी चूक खूप महागात पडू शकते. शेवटी एका झाडाला दोर बांधून त्याचा साहाय्याने एक मोठा रॉक पॅच उतरलो.

आमच्या इतर खाली थांबलेल्या मंडळींनी आडराई  मधील पाण्याच्या ठिकाणी मुक्कामाची जागा शोधली होती. या ठिकाणी पाण्याचा निर्मळ झरा वाहतो. खडकावरच पथाऱ्या मांडल्या गेल्या. जसा अंधार पडायला सुरुवात झाली तशी थंडी पडायला सुरुवात झाली शेकोटी पेटवली गेली. येथे विपुल प्रमाणात झाडे असल्याने सरपणाला तोटा नव्हता. फक्कड चहा बनवला गेला. माळशेज घाटातून जाणाऱ्या गाड्यांचा लाईट मुळे नागमोडी वळण उजळून निघत होता. जणू दिवाळीत टांगलेल्या दिव्यांच्या माळा दिसत होत्या. इतका मोठा नजारा या अगोदर कधी पाहिला नव्हता.


दगडाच्या चुलीवर स्वयंपाकाची तयारी चालू झाली . गप्पांची मैफल जमली होती. अचानक काळे ढग जमायला सुरुवात झाली पौर्णिमेचा चंद्र झाकोळला गेला. एक दोन थेंब अंगावर पडले . आत्ता जर पाऊस आला तर काय हाल होतील याचा विचार करू लागलो. पण देवालाच काळजी...  जोरदार हवा सुटली व ढग दूर सारले गेले. स्वयंपाक होई पर्यंत माळशेज घाटातील गाड्यांचा लाईटचा ट्रेल चा फोटो काढायला जागा शोधत फिरत होतो. स्लो शटर स्पीड वर फोटो काढायचा होता पण ट्रायपॉड आणलेला नव्हता . शेवटी एक मोठा दगड सापडला त्याच्या वर कॅमेरा ठेऊन काही long exposer चे शॉट क्लीक केले. 

माळशेज घाटातील गाड्यांची रोषणाई


स्वयंपाक तयार झाला होता. वरण भात व भाजी चा बेत होता. जेवण अतिशय रुचकर होते .  जेवण झाल्यानंतर सर्व जण झोपेेेच्या तयारी ला लागले.          अगोदरच्या रात्री बस पंचर प्रकरणा मुुुळे सर्वां.  खडकावर झोपुन सुद्धा रात्रीची शांतता भंग करणारे भाते जोर जोरात सुरू झाले. एकाच्या सुरात दुसरा सूर मिसळत होता.😊 

गाढ झोपेत असतांना पुण्याहून आलेल्या ग्रुपने जंगलात आग लागली उठा... उठा...  आग विझवा...  म्हणून आरडा ओरड चालू केली . तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते. 

बरेच जण खडबडून जागे झाले . जंगलात आग लागलेली दिसत होती . ती आग कशी विझवायची हा यक्ष प्रश्न डोळ्यासमोर उभा राहिला. तेथे पाण्याचा साठा मुबकल नव्हता . आजू बाजुचे गवत वाळलेले होते आग पसरली तर बाका प्रसंग उभा राहील याची जाणीव झाली. शूज घालून बरेच जण सज्ज झाले. आमच्या कडे पाणी टाकायला कोणतेही साधन नव्हते. म्हणून आमच्या वाटाड्या कमळूला जोर जोरात आवाज दिला .  ज्या बाजूला आग लागलेली दिसत होती तिकडूनच त्याचा आवाज आला. त्याला आग लागली आहे का ? असे विचारले असता तोच मोठी शेकोटी पेटवून  झोपला होता असे लक्षात आले. 

हे ऐकून जीव भांड्यात पडला पण झोपेचे खोबरे झाले होते. चंद्राचा टिपूर प्रकाशात सर्व परिसर जणू न्हाऊन निघाला होता. रात्र आहे की दिवस असा प्रश्न पडावा इतका सारा परिसर उजळून निघाला होता. शहरात आपल्याला असे क्षण नशिबी नसतात . ते उपभोगायचे असतील तर डोंगर , दऱ्या , निसर्गा तच यावे लागते . जेथे कोणताही कृत्रिम प्रकाश नसेल तेथे ... 

हा देखावा बघून मन तृप्त झाले. थकव्यामुळे झोप पण येत होती, थंडीनेही उचल खाल्ली स्लीपिंग बॅगमध्ये स्वतःला कोंबून पुन्हा एकदा निद्रा देवीच्या स्वाधीन झालो.

                   - दिलीप गिते (7020100445)                                 

                                               - क्रमशः 

रोहिदास च्या दिशेने वाटचाल


माकड नाळ


Sun shower बाथ


रोहिदास वरून दिसणारा , कोकण कडा, सीतेचा डोंगर


रोहिदास शिखर


जय गिरिदुर्ग , जय शिवराय !




स्वराज्याच्या राजधानीच्या नाळा - सिंगापूर आणि आग्या!



http://tkothawade.blogspot.com/2017/03/blog-post_14.html





सह्याद्रीच्या ऊत्तर दक्षिण अशा पसरलेल्या पर्वतरांगांमध्ये कोकण आणि पठार यांना जोडणारया वाटांना अनन्यसाधारण महत्व आहे. अनेक घाटवाटा, नाळा, दारं, घळा यांनी सह्याद्री माथा आणि पायथा जोडलेला आहे. व्यापार, ऊद्यम, सैनिकी महत्व किंवा दैनंदिन कामकाज या वेगवेगळ्या हेतूकरिता वापरात असणारया ह्या वाटा अगदी आजही वापरात आहेत.दुर्दैवाने काही वाटा मात्र बदलत्या काळानुरुप लयास जाण्याच्या मार्गावर आहेत.पण ईतीहासात पुरातन काळापासून नोंद असणार्या बहुसंख्य वाटांची सद्यस्थिती जाणून घेण्याच्या ईराद्याने आणि नवीन पिढीने त्याची किमान नोंद ठेवावी म्हणून आमच्यासारखे काही सातत्याने त्या धुंडाळायचा प्रयत्न करत आहेत.

यावेळी आमची मोहीम निघाली ती थेट दुर्गदुर्गेश्वर बा रायगडाच्या कुशीत ऊतरणार्या सिंगापूर नाळ आणि आग्या नाळ यांच्या शोधात! सह्याद्री पठारावर अतिदुर्गम अशा परिसरात वसलेले सिंगापूर ( त्यांना या नावाचा प्रगत देश आहे हे बहुदा नुकतेच समजले असावे ).ह्या गावातून थोड्या कमी अवघड श्रेणीत समजली जाणारी सिंगापूर नाळ! कोकणातल्या रायगडाच्या मागच्या दापोली या छोठ्या गावाला जोडणारी.आणि ह्याच दापोलीतून परत घाटमाथ्यावरच्या एकलगावला जोडणारी थोडी अवघड, कमी किंवा वापर बंद झालेली दुर्गम अशी आग्या नाळ!

शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास ही मोहीम निश्चित झाली.यावेळी फक्त ४ एवढीच गणसंख्या! शनिवारी दुपारी १२.३० ला पुणे सोडून खानापूर, पाबे, वेल्हा, भट्टी, केळद खिंड असे मार्गाक्रमण करत मोहरीच्या दिशेने जात त्याअलिकडच्या सिंगापूरला गाडी पोटेंच्या घरासमोर पार्क केली तेव्हा दुपार टळली होती आणि ४ वाजले होते.घरच्या आजींकडे वाटाड्यासाठी विचारणा केली तेव्हा कोणीही नसल्याचे समजले.मग  अंधाराच्या आत दापोली गाठण्यासाठी नाईलाजाने आमचा स्थानिक माणूस नेण्याचा नियम बाजूला ठेवून सँक पाठीला लावल्या आणि थोडा वाटेचा अंदाज आजींकडून घेत निघालो.अभ्यासानुसार २ ते २.३० तास पुरेसे होते.



सुरूवातीला गावाच्या मागून ऊत्तरेला एक ओढा आणि त्याशेजारची नवीन खाचरं यांना वळसा घालत पुढे जात असताना वाट पुसट होत चालली.



पण पश्चिमेकडे जात राहीलो तर घळीशी पोहचू या अंदाजाने जंगलातील वाटा तुडवत चाल सुरु ठेवली.कधी वर तर कधी खाली असे जात असताना हळूहळू ३ ते ४ कि मी चालून वाट खाली एका मोठ्या ओढ्यात ऊतरली.



ओढा ओलांडून एका कड्याच्या दिशेने जाणारया छोट्या ट्रँव्हर्सवरून जाताना एकदम कड्याच्या टोकाला ऊजवीकडे वळत असताना लिंगाण्याच्या दक्षिणेच्या टोकाचे दर्शन झाले.



रायलिंगच्या पठाराच्या अलिकडे खाली असल्याची खात्री झाली.ईथे एक अवघड किंवा जपून ऊतरावा असा कातळ आहे त्यावरून खाली जंगलात ऊतरलो.





दाट झाडीतून १ ते १.३० कि मी गेल्यावर अचानक समोर बोजा घेऊन वर येत असणारया दगडू मोरेंची भेट झाली आणि वाट बरोबर असल्याची खात्री झाली.



त्यांनी आपुलकीने चौकशी करत परत ऊलटे १ कि मी येत रस्ता खालपर्यंत समजावला आणि आम्ही नाळेला लागेपर्यंत वरून मार्गदर्शन केले. नाळेला लागण्याच्या आधी थोडी घसारा आणि कातळाची वाट आहे.



नाळ लागल्यावर सरळ खाली वेगात ऊतरत असताना मनात वेळेचे गणित चालू होते.नाळ संपताना जंगल लागले आणि पुढे एक पठार.



लिंगाण्याची अजस्र दक्षिण कातळभिंत मावळतीच्या ऊन्हात सोनेरी झाली होती.त्याशेजारी बोराट्याची नाळ अगदी जवळ भासत होती.एका पठारावरून लिंगाणा पूर्ण पूर्व पश्चिम पसरलेला पाहून डोळे सुखावले.ऊंचच ऊंच कातळभिंतींनी सजलेला लिंगाणा प्रत्येक गिर्यारोहकाच्या यादीतील माथा गाठावा असा अतिकठीण श्रेणीतील गड! पण प्रस्तरारोहण करणार्या मोजक्या सह्यसवंगड्यांशिवाय त्याच्या कडे दुरून डोंगर साजरे म्हणूनच पहावे असा.



आता मात्र सुर्यास्त झाला होता आणि संधीप्रकाशाचा फायदा ऊठवत दापोली गाठणे अनिवार्य असल्याने अजून रेंगाळण्याचा मोह टाळून टेकडीचा ऊतार ऊतरण्यास सुरूवात केली.



साधारण १/२ तासात खाली एक ओढा लागला.



येथून पश्चिमेकडे ओढ्याच्या शेजारून पायवाट आहे.अंधाराने पूर्ण वेढण्याच्या आत आम्ही दापोली या रायगडाच्या कुशीतील टुमदार गावात प्रवेश केला.गावात शिरताच छत्रपती शिवरायांचा पुतळा दिमाखात ऊभा.त्याशेजारील मोरेंच्या ऊभ्या गल्लीत काही वयस्कर मंडळी विरंगुळा म्हणून गप्पांचा अड्डा जमवून बसलेली.रामराम करून मुक्कामाची आणि जेवणाची सोय लावली.मोरे मामांच्या ओसरीतच पथारया पसरल्या.जेवण तयार होईस्तोवर आम्ही गावकरयांबरोबर गप्पांचा अड्डा जमवला आणि मग आधी ठरवलेल्या निसणीच्या वाटेवर माहीतीअभावी कोणी येणार नाही याची जाणीव झाली .आता गावकरयांनी सुचवले की आग्या नाळ समोरच आहे त्याने जाता येईल.मग वाटाड्या म्हणून कोणी येत का? नाळेला लावून द्यायला तरी कोणीतरी येईल हे आश्वासन घेऊन जेवण करून थोडी शतपावली करून निद्राधीन झालो.आजचा दिवस पूर्ण झाला होता आता ऊद्याच्या आग्या नाळीच्या स्वप्नांनी वेढले!



पहाटे ६ वाजता उठून तयार होऊन १/२ तासात चहा झाल्यावर निघालो. आज दुर्गम आणि वापर बंद झाल्यात जमा असलेली आग्या नाळ चढून घाटमाथ्यावरच्या एकलगावला पोहचायचे होते. मोरे मामा आमच्याबरोबर येण्यास निघाले तेही जवळ जवळ २२ वर्षांनी आग्या नाळेतून येणार होते. बहुदा आम्ही  वाट चुकणार याची त्यांना खात्री असावी! 



कमरेला कोयता खोचून आणि जनावरांना रानात लावून मग आम्ही दापोलीच्या पूर्वेस दुर्गाच्या डोंगराच्या आणि सिंगापूर नाळेच्या मधल्या आग्या नाळेत जाण्यास निघालो.



सुरुवातीला काही खाचरं पार करीत नदीच्या कोरड्या पात्रास ओलांडत एका तिन्ही  बाजूनी बंद अशा  नदीपात्रात पोहचलो.



येथून अनेक लहान मोठ्या मधून शिळांमधून मार्गक्रमण करत हळूहळू कड्याच्या जवळ पोहचत होतो.  नदीपात्र पूर्णपणे कोरडे होते पण शिळांचा आकार पाहता पावसात किती वेगाने हि नदी प्रवाहित असेल याचा अंदाज येत होता. पुढे हे पात्र थोडे उत्तरेला वळते. मग एका ठिकाणी छोटा डोह आणि त्यातून खाली वाहणारे पाणी लागले. ह्या पाण्याच्या डोहात आमच्या उरलेल्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या आणि पोटभर पाणीही प्यालो. 



अजून काही अंतर वर चढल्यावर एक मोठा पण कोरडा  धबधबा समोर उभा ठाकला.



 त्याशेजारून डावीकडे वर एक घसारा आणि कातळकडा चढून वाट आग्या नाळीकडे जाते.



वरून  धबधबा आणि  त्यामुळे तयार झालेला डोह एकदम झक्कास दिसत होता. आता त्याच धबधब्यावर असणाऱ्या पात्रातून जाण्यास मार्ग  आहे.



थोड्या अंतरावरच हा मार्ग दाट झुडुपात शिरला. मोरे मामा झुडूप वेली  साफ करत मोठ्या कष्टाने वाट  बनवत पुढे आणि आम्ही काटेकुटे टाळण्याचा प्रयत्न करत मागे अशी बरीच कसरत केली. शेवटी एकदाचे मुख्य  नाळीच्या मुखात प्रवेश झाला. 





बऱ्याच वेगात चालूनही साधारण २  लागले होते. येथून एकदम छातीवर येणारी चढाई होती. दोन्ही बाजूला आकाशात भिडणारे कडे, अस्थिर दगडगोट्यांचा साधारण ८० अं. तला उभा चढ आणि आम्ही ४ जण. तेथील रौद्रभीषण शांतता थकलेल्या आणि वाट चुकलेल्या भटक्यांची परीक्षा बघू शकते. आज मोरे मामा स्वतःहून यायला तयार झाले ते किती बरे झाले याची प्रचिती आली.     




 उभा चढ संपत आल्यावर आम्ही न्याहारीसाठी विश्रांती घेतली. साधारण ३  तास अथकपणे आम्ही चालत होतो.





थोडे ताजेतवाने झाल्यावर उजवीकडून नाळ सोडून घसाऱ्यावरून साधारण १५ मिनिटे चालल्यावर वाट कड्याच्या पोटातून पण झाडीतून उजवीकडे वळाली. अतिशय जपून चालावे एवढीच वाट त्यात कारवी, काटेरी झुडूप अतिक्रमण करत अडथळा निर्माण करत होती. परत मामानी कोयता काढला आणि साफ सफाई करत वाट मोकळी केली. 



काही क्षणात आम्ही वर पोहचलो. १० मी. दम खाऊन अजून ३०० मीटर उंचावर असणाऱ्या एकलगावच्या शाळेच्या प्रांगणात पोहचायला १/२ तास लागला.उन्हाचे चटके आता जाणवू लागले होते.



बाकी भिडूना तेथेच वर वाट बघायला सांगून मोरे मामा आणि मी वाहन घेण्यासाठी रणरणत्या उन्हात गाडी  रस्त्याने सिंगापूरकडे निघालो. ५ किमी  टेकडीपलीकडे सिंगापूरला पोहचलो. 





तेथे काल  सिंगापूर नाळीत मार्ग दाखवणाऱ्या दगडू मोरे दादांना  भेटून आणि आमच्या वाटाड्या मोरे दादाचे आभार मानून  गाडी काढली आणि मुख्य रस्त्यावर येऊन विसावलेल्या सवंगड्याना घेऊन तासाभरात वेल्हे गाठले. हॉटेल स्वप्नील मध्ये रुचकर मेजवानी उरकून पाबे खिंडीतून पुणे गाठले. 



घाटवाटांच्या वेडात असणाऱ्या माझ्यासारख्या भटक्यांच्या यादीत अग्रक्रमाने असाव्या अशा ह्या दोन नाळा पालथ्या घातल्याचे समाधान पुढे खूप काळ टिकणारे आहे. 

धन्यवाद मित्रानो! 
भेटू परत  अशाच भन्नाट वाटांसह!

दिनांक : २५/२६ फेब्रुवारी. 

मार्ग : 

सिंगापूर नाळ  :  पुणे -खानापूर-पाबे -वेल्हे- केळद खिंड - सिंगापूर [घाटमाथ्याचे गाव] 
लागणारा  वेळ : उतरण्यास ३ ते ३ १/२ तास . 
पायथ्याचे गाव : दापोली . 
श्रेणी : मध्यम 

आग्या नाळ : दापोली - एकलगाव [ घाटमाथ्याचे गाव]
लागणारा  वेळ : चढाई ४ ते ५ तास. 
श्रेणी : मध्यम कठिण. 

विशेष सूचना : वाटाड्या आवश्यक. कालावधी : पावसाळा सोडून इतर वेळी.. 

CARRY 3 LTRS WATER AS A PRACTICE IN SUMMER WITH SOME INDIVIDUAL SNACKS.

सह्याद्री हे जैववैविध्याने नटलेले पर्यावरण स्थळ असून आपण ते जपायला हवे.  

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...