Wednesday, May 20, 2026

किल्ले बहुला.

 आयुष्यात पाहिल्यांदा आपल्या आर्मीला घाबरून जीव मुठीत धरून केलेला एक अविस्मरणीय ट्रेक - किल्ले बहुला.
  ✍️ मेघन तारिहाळकर पाटील
(चौफेर भटकंती सह्याद्रीच्या कुशीत)
 ● या किल्ल्यावर जाण्याचा प्रवास जितका रोमांचकारी आहे त्याहून तिथून मूळ रस्त्यावर येईपर्यंतचा प्रवास भयंकर आहे त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. अनेकांना हा किल्ला माहीतही नसेल, किंवा कधीच याबद्दल ऐकलं-वाचलं नसेल. या किल्ल्यावर खूप कमी प्रमाणात ट्रेकर्स वळतात. कारण या किल्ल्यावर जायला सक्त मनाई आहे.  का मनाई असेल बरं या किल्ल्यावर?? चला तर मग जाणून घेऊयात या अपरिचित किल्ल्याच्या भटकंती बद्दल .
●  नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील एक दुर्लक्षित व दुर्गम गिरिदुर्ग बहुला.. हा देवळाली डोंगर रांगेत येतो. किल्ल्याच्या परिसरात गुळने, आंबेबहुला, राजूरबहुला, देवळाली अशी गावं आहेत. थळघाटाच्या पुरातन व्यापारी मार्गावरील हा सातवाहन कालीन टेहळणीचा किल्ला आहे. या किल्ल्याची उंची जवळपास ३१६० फूट इतकी असून किल्ल्याचा माथा खूपच लहान निमुळता आहे. जेमतेम किल्ल्याचे गडपण हे सुकलेले टाके, बुरुज व काही ठिकाणी तटबंदीच्या अवशेषातून दिसून येते.  पण ज्याने हा किल्ला पाहिला असेल त्याने, वाह हा तर हरिहर पेक्षाही भयंकर आहे असे उदगार नक्कीच काढले असतील. किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे पश्चिमेला किल्ल्याच्या कातळात खोदलेल्या थरारक पायऱ्या होय. या पायऱ्या हरिहर किल्ल्याच्या पायऱ्यापेक्षाही खूपच थरारक आहेत. प्रारंभी पायऱ्यांच्या खोबण्याही हरिहरपेक्षा वेगळ्या आहेत, त्या बाजूच्या दगडी भिंतीत आहेत.  मी जेव्हा बहुल्याच्या पायऱ्यांपाशी आलो तेव्हा मनात वाटून गेलं की, "उगाचच लोक हरिहरवर इतकी गर्दी करतात. हा दुर्लक्षित बहुला तर त्याहुनी सुंदर व थरारक आहे."  पश्चिमेला गडाच्या पोटात काही लेणी खोदलेल्या असून त्यांचा वापर सैन्यास राहण्यासाठी केला जात असावा. उत्तरेला मूळ गडाच्या बाहेर असणाऱ्या बुरुजाचा पाया दिसतो. येथे भल्या मोठ्या दगडांमध्ये गोलाकार बुरुजाच्या पायाचे दगड बसविण्यासाठी खोदलेले चौकोनी खड्डे दिसतात. लष्करी तोफांच्या दररोजच्या माऱ्यामुळे किल्ल्यावरील सर्वच अवशेष जवळपास नष्टच झाले आहेत. किल्ल्याच्या परिसरात पायथ्याला भवानी मंदिर,  विरगळी, समाधी व अवशेष आढळतात. त्यामुळे येथे नक्कीच लढाया झाल्या असाव्यात. गडावरुन औंढा ते कळसूबाई पर्यंतचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. महांकाळ डोंगर, औंढा, पट्टा, बितनगड, शेणीत सुळका, पश्चिमेला अलंग-मदन-कुलंग, कळसूबाई, वायव्येला गडगडा, डांग्या सुळका. उत्तरेला अंजनेरी व रांजणगिरी व पलीकडे ब्रह्मगिरी पर्वत इतका पसारा नजरेसमोर येतो. किल्ल्याचा काळ सांगायचा झाल्यास खोदीव लेणी, टाक्या व खोदीव पायरीमार्ग पाहता किल्ला सातवाहन कालीन असल्याचे जाणवते. किल्ला जरी दुर्लक्षित व छोटासा असला तरी नाशिकमध्ये आपले एक वेगळे स्थान जपून आहे. 
● आज ट्रेकचा ५ वा दिवस होता. रामशेज वरून परतताना अचानक माझ्या डोक्यात बहुलाचं प्लॅन झालं. बहुलावर जायला परमिशन नाही, कारण हा किल्ला व परिसर आर्मीच्या ताब्यात आहे. पायथ्याशी देवळाली आर्मी कॅम्प आहे, आणि त्यातही महत्वाचं म्हणजे बहुला किल्ला हा आर्मीच्या आर्टिलरी फायरिंग रेंज मध्ये येतो. त्यामुळे रविवार सोडलं की बाकीचे दिवस ट्रेनिंगचा एक भाग म्हणून बहुला किल्ला व बाजूच्या डोंगरावर फायरिंग चालू असते. जरी रविवारी फायरिंग बंद असले तरी आठवडाभर तोफेतून उडालेले आधुनिक तोफ गोळे(बॉम्ब )कधी स्फोट होतील सांगता येत नाहीत. याच कारणामुळे बहुलावर जाण्यास सक्त मनाई आहे. रविवारी आर्मीची गस्त असते, जर गस्तीवेळी आर्मीच्या हाती सापडल्यास त्यांचा मार खाणे, दंड व कायदेशीर कारवाई झालीच म्हणून समजा. दुसरी गोष्ट म्हणजे गुगल मॅपवर या किल्ल्याचे स्थान वेगळीकडे दाखवते कारण आर्मीची गुप्तता, त्यामुळे किल्ला नेमका कुठं आहे हे आमच्या ग्रुपमध्ये फक्त मलाच माहिती होतं.
        ट्रॅव्हलर नाशिक -मुंबई हायवे वरच थांबवून सर्व १४ जण उतरलो. आर्मीने किल्ल्याच्या परिसरात सर्वत्र काटेरी झुडपे वाढवली आहेत. ११ वाजून गेले आम्ही ट्रेकला सुरुवात केली. गड म्हणून मॅप वर दिसतो तो समोरचा पहिला डोंगर, या डोंगराच्या पहिल्या टप्प्यावर काळभैरवाचे मंदिर आहे. ट्रॅव्हलर हायवेलाच लावून तिथूनच सुरुवात केली, हायवे पासून हा पहिला डोंगर बराच लांब आहे. सर्वजण चालत चालत डोंगराच्या पायथ्यापाशी आलो. तिथे एक लहान मुलगा व आई बाबा भैरवाच्या मंदिरात जाऊन खाली उतरून आले होते. त्यांच्या जवळ जेवणाची पिशवी होती. वरच जेवण करून ते तिघे खाली उतरले होते. आम्ही 4 जण मागे होतो बाकीचे अर्ध्यावर जाऊन पोचलेही होते.  त्यांना मी किल्ल्याबद्दल विचारलं, किल्ला अजून खूप लांब आहे असं सरळ जावा मंदिर लागेल तिथून पुढे उतरून गेल्यावर तलाव लागेल तिथून सरळ जावा असं त्यांनी सांगितलं व ते पुढे गेले. आम्हीही निघणार तोच त्या ताईंनी ओरडल, आम्ही थांबलो. त्यांनी आपल्या जवळील एक भरलेली पाण्याची बाटली माझ्याकडे दिली. मी ती धन्यवाद म्हणून गप्प घेतली. बाकीचे लोक जरा शंकेने पाहू लागले समोरच तर गड आहे, तरी काळजीने दिली असावी म्हणून डोंगर चढू लागले. पण त्यांनी पाण्याची बाटली का दिली हे मला समजलं होतं. आम्ही सर्वजण भैरव मंदिरात आलो. तिथे नमस्कार करून सोबत असलेले द्राक्षे, संत्री व देवळात फोडलेला अर्धा नारळ खात बसलो होतो इतक्यात एक वयस्कर काका दिवा लावण्यासाठी मंदिरात आले होते. मागणी मागितल्यास हा काळभैरव ती पूर्ण करतो, पण पूर्ण झाल्यावर परत इथे दर्शनाला यायला लागते असे ते तिथली माहिती सांगू लागले. गड कुठं आहे असे विचारताच या डोंगराच्या पलीकडे आहे असे ते म्हणाले. एव्हाना काहीजणांनी समोरील मोठा डोंगर अर्धा चढून संपवला होता. दिवाबत्तीसाठी आम्ही त्या काकांना काही पैसे देऊन तिथून निघालो. मार्च महिना संपत आलेला उन्हाच्या झळा खूप बसत होत्या. आम्ही डोंगर चढून वर येईपर्यंत बाकीच्या मुलांनी संपूर्ण डोंगर पालथा घातला. 
        कसला किल्ला हा एक दगड पण नाही या पेक्षा तो मागच्या वर्षीचा सिंदोळा बरा होता असे उदगार मुलांनी काढले. मी म्हणालो अरे खूप भारी किल्ला आहे, हरिहर सारख्या पायऱ्या आहेत चला दाखवतो..  आम्ही डोंगराच्या दुसऱ्या टोकावर आलो. कुठं हाय रे किल्ला.... बोट करून दाखवलं तो बघा किल्ला. सर्वांनी तोंडात बोटं घातली. आम्ही पहिल्या डोंगरावर होतो, तर किल्ला होता खूप खूप दूर. सहा-सात डोंगर पार करायचे होते. प्रत्येक डोंगर अर्धा चढायचा-उतरायचा मग आम्ही किल्ल्यावर पोचणार होतो. मी म्हणालो, कळलं का त्या ताईंनी पाण्याची बॉटल का दिली ते.??? सारेजण हसले... सोबत जेवण नव्हतं पुरेसं पाणी नव्हतं, सर्वांनी यायला नकार दिला. मी म्हणालो मी तरी किल्ला बघायला आलोय मी जाणार तुम्ही बाकीचे गाडीकडे जाऊन बसा. माझ्यासोबत आणखी तिघेजण यायला तयार झाले. मी मंगेश, आकाश व विशाल चौघेजण बहुला सर करायला निघालो. इथून तिथपर्यंत डोंगर सोंडेवरून जायचे इतकेच आम्हाला माहीत होते. मध्ये पायवाट कशी असेल, असेल तर की नाही हे काहीच माहीत नव्हतं कारण ही गडाची मुख्य वाट नव्हती. मुख्य वाट ही आंबेबहुला गावातून व दक्षिणेकडून होती. (टीप- या दोन्ही सोप्या व जवळील वाटा आहेत.) आर्मीवाल्यांच्या हाती सापडू नये म्हणून या आडवाटेने आम्ही निघालो होतो. समोर जे दिसत होतं ते सगळं फसवं होतं हे पुढे पुढे जाईल तसं आम्हाला कळणार होतं. प्रारंभी बघितल्यास दोनच उंच सुळके दिसत होते व तिसरा सुळका म्हणजे बहुला (पहा फोटो, डोंगर क्र. ४,५ व ७) ... पण प्रत्यक्षात हे सारं फसवं होतं.  आम्ही २ डोंगर धरले होते, पण जेव्हा सात मधील दुसरा डोंगर पार केला तेव्हा त्या पुढे (शिवपिंडी डोंगराआधी) आणखी एक डोंगर लागला.  तोही चढून उतरून आम्ही एका खिंडीत पोचलो. खिंडीत दोन्ही बाजुंनी आलेले दोन मार्ग होते. समोर आता तीन बाजूला तीन पायवाटा होत्या. 

























            आता इथून एकतर समोरील शिवपिंडी आकाराचा डोंगर चढून वरूनच किल्ल्यावर जायचं. नाहीतर उजव्या हाताला खाली उतरून दक्षिणेकडून पूर्ण वळसा घालून किंवा डाव्या हाताला खाली उतरून जमिनीवरून उत्तरेकडून जायचं. इथून पुढचं मलाही माहीत नव्हतं पण वरूनच जाता येईल असे मला वाटत होते त्यामुळे मी मार्गाची रेखी केली व वरूनच जायचं ठरवलं. तिथं थोडावेळ पाणी पिऊन उठलो व तीन दिशांचे प्रतिनिधित्व करणारे  तिघांनी हातावर हात ठेवून लपंडावसाठी जसं छापतात तसं छापलं.  पण शेवटी वरच्या वरच किल्ल्यावर जायचं हे पक्क करून आम्ही निघालो. कमरे एवढ्या उंच सुकलेल्या गवतातून काठी आपटत मार्ग काढीत निघालो, शिवपिंडी डोंगर आम्ही सर केला. (दुरून डोंगराच्या माथ्यावर नैसर्गिक शिवपिंडी असल्यासारखे दिसते म्हणून मी याला हे नाव दिले आहे.) येथून पुढे जायला वाटच नव्हती. शिवपिंडीच्या मागील बाजूने उतारावरूनच डाव्या बाजूला दगडांना हात धरत आम्ही त्याबाजूला पोचलो. कोठेच वाट नव्हती, वाट करत करत आम्ही समोरील ५ व्या डोंगरावर पोचलो. या सर्व डोंगरांच्या माथ्यावर भले मोठे दगड आहेत. दरीच्या कडेकडेने डाव्या बाजूच्या डोंगराचा आधार घेत आम्ही मार्गक्रमण करीत होतो. एकेक ठिकाणी आधाराला काहीच नव्हते, जर तोल गेला तर सरळ दरीत.  हातापायाला काटे टोचत होते. आम्ही हा ५वा डोंगर चढून पुढच्या दिशेला आलो तोच समोरचे दृष्य पाहून दुरून डोंगर साजरे असेच वाटू लागले. इथं येईपर्यंत ५ वा डोंगर व बहुला किल्ला यामध्ये आणखी एक डोंगर आहे हे आम्हाला माहीतच नव्हतं. कारण दुरून हे दोन्ही डोंगर माथे एकच असल्याचा भास होतो. इथून पुढचा परिसर आर्मीच्या फायरिंगमुळे उध्वस्त झाला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत व येथील माती आणि दगड फायरिंगमुळे ठिसूळ बनले आहेत. 
        आता पर्यंत आम्ही डोंगरांच्या मागील बाजूने उजव्या बाजूला दरी ठेवून चालत आलो होतो. काही ठिकाणी घसरगुंडी होत होती तर काही ठिकाणी पोटरी दुःखेपर्यंत चढ लागत होता. इथून पुढे जाण्यासाठी वाट नव्हती. काटेरी झुडुपातून चालून कातडी चुरचुरत होती. उन्हाळा असल्याने सर्व डोंगर भकास झाले होते, धुळीने चेहरा मान माखले होते. वाट नसल्याने पुढे डाव्या बाजूला दरी ठेवून दरीतूनच जायचे ठरवले. आता आम्ही आर्मी कॅम्पच्या दिशेने चाललो होतो, अन् आम्ही कोणाच्यातरी नजरेस  पडलोच. खालून ओरडण्याचे आवाज येऊ लागले. पण आम्ही त्यांना काहीच उत्तर न देता मार्गक्रमण करत राहिलो. संध्याकाळ होत आली होती अंधार पडायच्या आत गड गाठणे जरुरीचे होते कारण इथून आलो त्या मार्गे जाणे आता अंधारात कठीण होते. मुरूमाड मातीच्या डोंगराच्या पदारातून आम्ही आडवे जात होतो. माझे जे ट्रेकिंग बूट आहेत ते दगडांवर उत्तम ग्रीप पकडतात. त्याला छोटे छोटे बटन्स आहेत. पण मातीवर घसरतात आणि हेच मला खूप त्रास देऊ लागलं. दरीत कोठेही आधार नव्हता संपूर्ण मातीचा उतार होता, चालता चालता अचानक  पाय सररर करून घसरायचा अन् छातीत एकदम धस्सस व्हायचं. खालून आम्हाला ओरडण्याचा आवाज येत होता. मी सर्वात मागे होतो. पुढचे दोघे तर माझ्या दृष्टीक्षेपाच्या पुढे गेलेले. माझ्या समोरील ५० ६० फुटावरील विशाल इतकाच मला दिसत होता. आता अनेक ठिकाणी आर्टिलरी फायरिंग मुळे तोफगोळे फुटून मोठे मोठे खड्डे पडलेले दिसत होते आणि फुटके गोळे सुद्धा.. दूरवरून कुठून तरी फायरिंगचा आवाज येऊ लागला पण आज रविवार होता त्यामुळे दुसरीकडे कोठेतरी फायरिंग चालू असावं. 
        माझ्या बूट मुळे मी सावधपणे पाऊले टाकीत होतो. आता आम्ही अशा टप्प्यावर येऊन पोचलो होतो जिथून पदारातून आडवे न जाता आता मातीतून थेट उभं चढायचं होतं. डोंगराला लगट करून मी वर चढू लागलो. बाकीच्या दोघांनी पुढून डोंगर पार केला होता. माझ्या समोर विशाल होता तो ही थेट वर चढला. आमचा दोर सुद्धा गाडीतच राहिला होता. ही मातीची सरळसोट चढण अक्षरशः डोंगरावर मी झोपून चढत होतो. चढताना एकेक पाऊल सावधपणे ठेवावे लागत होते कारण माती कधी घसरले आणि आपण मागील बाजूला दरीत कोसळू अशी परिस्थिती होती. आणि उतारावर एकही झाड नव्हतं दरीत पडल्यास मध्ये कोठेही आधार नव्हता. त्यामुळे घसरलं की सरळ खालीच..... 
         अंधार व्हायच्या आत डोंगर पार करणे जरुरीचे होते.. आता इथून माघार नाही. आयुष्यात पाहिलेंदा मला आई बाबा आठवू लागले, घरच्यांची व मित्रांचे चेहरे आठवू लागले. अन् पहिल्या डोंगरावरील वेताळाला नमस्कार केला की बाबा सुखरूप किल्ल्यावर पोचव रं. त्यात मी सारखं घड्याळाकडे पाहत होतो. ६ वाजत आले होते.   हुश्श... तोल सांभाळीत कसाबसा हा उतार पार केला कपडे तोंड सगळं धुळीने माखलं होतं. आता दगडी टप्पा पार करायचा होता. मी माझी काठी जोरात विशाल कडे वर फेकली. रॉक पॅच खूप मोठा होता कसंबस चढून वर आलो आणि मन समोरील बहुला किल्ल्याचा शेवटचा डोंगर पाहून आनंदात नाचू लागलं. आमच्याकडे आता एकच तास उरला होता. ७ वाजले की अंधार होणार अन् दूरवर सूर्य डोंगराआड लपण्यास सुरुवात झाली. आता वाट अवघड नव्हती त्यामुळे आम्ही डोंगर सोंडेवरून पळत पळत सुटलो. वाटेत अनेक फुटलेले तोफगोळे दिसत होते.  गडाच्या तोंडाला आलो, काटेरी झुडुपातून वाट काढत निघालो. मंगेश पुढे जाऊन आला पण त्याला गडावर जायचा पायरीमार्ग सापडला नव्हता. त्याने तिथंच वाट आहे का बघा म्हणून सांगितले व तोही माघारी येऊ लागला अन्  तो दगडात लपलेला डोंगरात छिन्नी हातोडीने फोडून काढलेला सुंदर पायरी मार्ग सापडला. झालं संपूर्ण दिवस पायपीट करून जीव मुठीत धरून इथवर आल्याचं सार्थक झालं. कोठेही मला फोटो काढता आले नव्हते पण इथे मी वाटेचे फोटो घेतले, वेळ खूप कमी होता आम्ही वर चढून आलो. हा पायरी मार्ग खूपच खतरनाक आहे. हरिहर वर जरी तुम्ही पायऱ्यांवरून पडलात तरी खाली दरीत कोसळत नाही पण इथे तसं नाही. जर का पायऱ्यांवरून पडला तर सरळ खाली दरीत कारण इथे खाली कुठंही सपाट जागा नाही. दरीतूनच हा मार्ग वर आला आहे. अंधार पडायला लागला होता. पटकन माथ्यावर फिरून काही अवशेष दिसतात का पाहिले. अवशेषांचे फोटो घेतले. दक्षिणेकडे कड्यावर उभारून आलेल्या मार्गाची पाहणी केली. दूरवर डोंगराआड होणारा सूर्यास्त कॅमेरात कैद केला आणि दिवसभर उपाशी असलेल्या पोटात गडावर बसून उरलं सूरलं पाणी व दिलखूष ढकललं. बाकी काहीच खायला प्यायला नव्हतं. तोफांच्या माऱ्यामुळे इथे टाक्यात पाणी नव्हते सर्व परिसर भक्कास दिसत होता. आता आलेल्या मार्गाने आपण परत जाऊ शकणार नव्हतो त्यामुळे आर्मीच्या छावनीच्या बाजूने उतरने आता भाग होते. पायऱ्या उतरून खाली असलेल्या लेणी व सुकलेलं टाकं पाहिलं.  गडाबाहेरील एका मोठ्या दगडावर बुरुजासाठी खोदलेला पाया पाहून विरुद्ध बाजूने  गड उतार होण्यास सुरुवात केली. इथेच एक चोरमार्गही आहे. उतरताना विचार करू लागलो पुढील काळात हा किल्ला किल्ला म्हणून उरेल का?? उरल्या सुरल्या पायऱ्या नष्ट झाल्यास पुढच्या पिढीला हा किल्ला आहे म्हणून समजण्यास खुणा शिल्लक राहतील का??  फायरींगमुळे गडाचे खूप नुकसान झाले आहे त्यामुळे मनात येथील आर्मीवाल्यांबद्दल थोडा रागच आला. आर्मी कॅम्प व फायरिंग करिता आजूबाजूच्या गावातील लोकांची शेती काढून घेतली आहे पण त्यांना अजूनही त्याचा मोबदला दिला गेलेला नाही.
                आम्ही चारही जण गडउतार झालो, पायथ्याला उघड्यावरच एक भवानी देवीचं मंदिर आहे, तिथून खालच्या दिशेने वळून पुढे आल्यास एक टाकं आहे त्यात पाणी होतं पण ते अ अस्वच्छ होतं, पण आमच्याकडे पर्याय नव्हता. धुळीने माखकेले तोंड, मान, हात धुवून आम्ही त्या पाण्याची चव चाखली. हायवेला आमची गाडी व बाकीचे वाट पाहत होते. हायवे इथून बराच दूर होता, आता इथून कोणाच्याही दृष्टीस न पडता लवकर बाहेर पडणे गरजेचे होते. मी गुगल मॅपवर जीपीएसच्या साहाय्याने आम्ही कुठं आहोत आणि कसं जायचं आहे हे पाहत पाहत चालू लागलो. मॅपवर जवळच एक रस्ता असल्याचे दिसले. आम्ही त्या रस्त्याच्या दिशेने चालू लागलो. सर्वत्र अंधार, साधं चिटपाखरूही नव्हतं. आम्ही रस्त्यावर आलो. पण आम्हाला कळून चुकलं होतं की हा आर्मी कॅम्पकडे जाणार त्यांचा रस्ता आहे. थोडं दूर चालल्यावर अचानक गाडीचा आवाज येऊ लागला, दूरवरून लाईट दिसले तेवढ्यात लगेच आम्ही रस्ता सोडून बाजूला जाऊन जंगलात पालथे पडलो. आर्मीचा मोठा ट्रक शहरातून कॅम्पकडे येत होता. आमच्या जवळ येताच ड्रायव्हरने ट्रकचा वेग अत्यंत कमी केला.  आता मात्र वाटलं आता आपण मेलो, सापडलो.... सर्वांच्या काळजात धस्सस झालं. पण नंतर लक्षात आलं की तिथे स्पीड ब्रेकर होता व त्यावरून चढवून नंतर ड्रायव्हरने आल्या स्पीडने ट्रक मारला... आम्ही सर्वजण खूप घाबरलो होतो. आता रस्त्यावरून न जाता जंगलातून जायचं ठरवलं. इकडे कोणी येऊ नये म्हणून आर्मीने काटेरी झुडुपाचे जंगल वाढवले आहे. त्यातून वाट काढताना अंधारात फांध्या हाताला तोंडाला लागत होत्या. आयुष्यात पहिलेंदा आपल्याच देशाच्या आर्मीला घाबरण्याची पाळी आली होती. सरळ हायवेला न जाता आडवे गुळने गावाच्या दिशेने जायचं आम्ही ठरवलं, कितीही चाललं तरी आम्ही तिथंच होतो. वाटेत एक नदी लागली. काटेरी जंगलात अंधारात रोड काढणं खूप कठीण जातं होतं. त्यात कोठुनतरी आमच्या दिशेने जोरात कुत्री भुंकू लागली.  त्यांना आमची चाहूल लागली होती. आम्ही परत आता रस्ता धरूनच जायचं, आर्मीची गाडी आलीच तर लपून बसायचं, सापडल्यास "काळभैरवाच्या मंदिराकडून खाली उतरलो वाट चुकलो असे सांगायचं". मग जे होईल ते होईल असं आमचं ठरलं. व परत माघारी फिरून रस्त्यावर आलो. अंतर बरंच होतं, कितीही चाललं तरी रस्ता संपत नव्हता. रात्रीचे नऊ वाजायला आले होते, आम्ही सकाळ  पासून चालतच होतो. गडावर जेवढा  वेळ थांबलो तीच काय ती विश्रांती, जेवण नाही पाणी नाही. गळा सुकला होता.. आता दुरून हायवेवरचा गाड्यांचा आवाज ऐकू येऊ लागला.. पण वातावरण शांत होते म्हणून आवाज येत होता अजून आम्ही खूप दूर होतो. गडाला शत्रूने घातलेल्या वेढ्यातून निसटताना जितकं छातीत धडधड होतं तितकंच आम्हाला हायवेला पोहोचेपर्यंत होत होतं. बराच वेळ चालून आम्ही आता जवळ पोचलो होतो, इतक्यात मंगेशला छावणीकडून येणारा रस्ता जिथं हायवेला मिळतो तिथं आर्मीचे लोक असल्याचं दिसलं. मग आम्ही जंगलात शिरलो व उजव्या बाजूला तिरपे हायवेच्या दिशेने जायचं ठरवलं. अन् शेवटी आम्ही हायवेच्या खालून पलीकडे रायगडनगर येथे जाऊन पोचलो.... १० वाजून गेले होते. आता कुठं जिवात जीव आला. तिथं एका दुकानात आम्ही ४ कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या घेतल्या व बॅग काठी रस्त्यावरच ठेवून कडेला पीत बसलो. हायवेच्या ब्रिजखालून हातात काठी व बॅग बघून तिथल्या लोकांना समजलं होतं की हे चौघे किल्ल्यावर जाऊन आलेत आणि त्यांना आम्ही तिथून इथपर्यंत असे अंधारात कोणाला न सापडता येऊन पोचलो हे पाहून ते आश्चर्याने विचारू लागले. कोठून आलात?? गडावर गेलेला का???  आम्ही नाही हो इथं काळभैरव मंदिराकडे गेलो होतो चुकून या बाजूने उतरलो अंधारात समजलं नाही, इकडून आलो असेच सांगू लागलो... पण आमच्या उत्तराने त्यांचे समाधान झाले नाही. उलट सुलट प्रश्न विचारू लागले.. शेवटी ते गाववाले होते ना... 
असा हा जवळजवळ १०-११ तासांचा ट्रेक आयुष्यात कायम आठवत राहील. 
● जाण्याची वाट- इगतपुरी- गुळणे-आंबेबहुला - बहुला किल्ला.
● आमची वाट - लाहामगेवाडी हायवे- पायवाटेने काळभैरव डोंगर - शिवपिंडी डोंगर - बहुला किल्ला
● किल्ल्यावर जायचंच झाल्यास रविवारी स्थानिकांचा सल्ला घेऊन जावे. उन्हाळ्यात पाणी घेऊन जावे.
- मेघन तारिहाळकर पाटील
      बेळगांव
































Sunday, May 3, 2026

सुमार, महिपत ची रसाळ भटकंती

 https://trekhunt.blogspot.com/2017/06/blog-post.html








थंडी, ऑफबीट ट्रेक, त्यात सोबत जिवाभावाची मंडळी म्हणजे एकूणच दुग्धशर्कारा योग. एखाद्या जातिवंत भटक्याला अजून तरी काय हवं असतं हो?? त्यात एखाद्या ट्रेक ची गेली कित्त्येक वर्ष वाट पाहणारा अवलिया, ट्रेकची वेळ आली कि तो ट्रेक करण्यासाठी आतुर होतो, मग विकीमॅपिया, गुगल मॅप, ट्रेकक्षितिज, डोंगरयात्रा, चढाई उतराई, सांगाती सह्याद्रीचा अशा विविध ठिकाणहून माहिती गोळा करण्यास सुरुवात करतो, अन अखेर मोहीम आखणी पूर्ण होते. अशाच प्रकारे या थंडीतली "ऑफबीट" मोहीम निघाली ती सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोडी खाली असलेल्या रसाळ - सुमार - महीपत कडे. हे किल्ले रत्नागिरी जिल्ह्यात येतात. कोकणातले डोंगरी किल्ले म्हणजे शरीराची अक्षरशः लाही लाही होणार हे कळून चुकले होते. ह्या किल्ल्यांवर फारसं कुणी भटकत नाही त्याचे मूळ कारण म्हणजे श्रेणीने कठीण व प्रचंड जंगल. गावकर्यांच्या मदतीशिवाय वेडे धाडस करणे इथे महागात पडते आणि जिथे खरंच गरज आहे तिथे वटाड्या घेण्यात लाज ती कसली?? 





रसाळगड व् कोकणातील छोट्या वाड्या
प्रसाद वाघ ने ह्या किल्ल्यांची पायलट मोहीम आखली. बराचसा सह्याद्री, ऑफबीट घाटवाटा, किल्ले, प्रस्तरारोहणाचे कौशल्य असणारा प्रसाद आमच्या मोहिमेचा चमू होता. माझी आणि प्रसाद ची भेट ३१ जानेवारी २०१६ लिंगाण्याच्या वेळेस झाली.१६ डिसेंबर २०१६ रोजी आमची १७ जणांचा गोतवळा रसाळवाडी कडे मार्गस्थ झाला . पुणे - ताम्हिणी - माणगाव - महाड - पोलादपूर - कशेडी - तळे  मार्गे पहाटे  रसाळवाडीत पोहोचलो. मार्गशीर्षाचे दिवस चालू होते, पौर्णिमा अगदी उंबरठ्यावर असल्याने "तोच चंद्रमा नभात" आपले अस्तित्व झळकावत मोठ्या दिमाखात वावरत होता.





अंतराळ पिठूर चांदण्याने व्यापून गेले होते. मृग, कृत्तिका, सप्तर्षी अशा नाना तर्हेच्या नक्षत्रांचे देणे आम्हास लाभले होते. देशवारुन कोकणात आल्यामुळे थंडी तशी फारशी जाणवत नव्हती परंतु वातावरणात किंचितसा गारवा जाणवत होता. खेड सोडल्यावर त्या वळणदार छोट्या रस्त्यावरून आमची गाडी रसाळवाडी पाशी पोहोचली. तांबडं फुटायला अजून अर्धा तास होता तोपर्यंत मी, प्रसाद, निलेश, ब्रम्हानंद, श्री अशी ४-५ कधीही शांत न बसणारी टाळकी चुलीसाठी लाकडं गोळा करायला गेलो, चांगली ४-५ किलोभर जाड लाकडं आता पेट घेऊ लागली होती, मस्तपैकी विस्तव तयार झाला. तिकडे मंडळी चहा-पोह्या च्या तयारीत गुंतलेली असताना मी अन प्रसाद रसाळवाडी गावात महीपत पर्यंत कुणी वाटाड्या मिळतोय का हे पाहण्यासाठी रवाना  झालो. "गजानन जाधव" ह्याच्या वडलांना आधी विनवणी केली परंतु त्यांनी साफ नकार दिला. मग गजानन ला अर्धा तास विनवणी करत शेवटी त्यांचा होकार घेऊनच आम्ही एखाद्या विजयी उमेदवारासारखे चुलीपाशी परतलो. न्याहारी झाल्यावर तडख आमचा मोर्चा आजच्या पहिल्या किल्ल्याकडे म्हणजेच रसाळगडाकडे निघाला. १५-२० मिनटात नुकत्याच बांधून काढलेल्या पायऱ्यांवरून २ दरवाजे ओलांडत गडमाथा गाठला. 

झोलाई देवीचे मंदिर अणि दीपमाळ 
झोलाई देवीच्या मंदिराकडे पाठ करून उभे राहिले असता किंचित उजव्या हाताला वाडी बीड गाव, पर्बत, चकदेव आंबिवली घाट, मंदिराच्या मागच्या बाजूला निमणी, झापड वाडी, भरडे, सुतारवाडी अशा कोकणातल्या अनेक छोटया मोठ्या वाड्या नजरी पडल्या. उजव्या हाताला असलेलं घनदाट जंगल पाहून चटकन कोल्हापूर जिल्ह्यातील पारगड किल्ल्याची आठवण झाली. किंचित डाव्या हाताला  मान वर काढलेला मधू-मकरंद, जावळीचा मुलुख डोळ्याचे पारणं फेडत होता. रसाळगडाचा पसारा आटोपशीर असल्याने माथा फिरण्यास अर्धा तास पुष्कळ ठरला. माथ्यावर १६ तोफा, झोलाई देवीचे मंदिर, दीपमाळ, तुळशी वृंदावन, छोटासा असलेला बालेकिल्ला, बालेकिल्ल्यावरचे वाड्याचे अवशेष, धान्य कोठार, २ तलाव, पाण्याची टाकी ह्यावरून पूर्वीच्या काळी ह्या किल्ल्यावर बरीच वस्ती असल्याचे लक्षात येते.

रसाळगडावरील तोफ 
सकाळचे साधारण ८.४५ वाजत आले होते, लोहगोल हळू हळू वर सरकत होता. पाठीवर वजनदार सॅक घेऊन आमचा गोतावळा ९ च्या सुमारास सुमार गडाकडे निघाला. उत्तरेकडचा सुमारगड अजून साडेचार तासांवर होता, रसाळवाडी सोडल्यावर १० च मिनटात छातीवर ची चढाई सुरु झाली, चढाई हळू हळू तीव्र होत गेली. वाढणारे ऊन आणि तीव्र चढाई अस गणित पुढचा तासभर तरी सुरु राहिलं. चढाईवर असलेल्या वाळलेल्या गवंतामुळं पायाची आपली घसरगुंडी चालू होती.
सुमार गडाकडे जाताना  
सकाळचे १०.१५ वाजले होते, विश्रांतीची थोडी आवश्यकता होतीच. २० मिनिटांच्या विश्रांती नंतर पायपीट पुन्हा सुरु झाली. परत एकदा छातीवर चढ पार करून आता जरा एक फुटी रुंदीच्या ट्रॅव्हर्स कडे हळू हळू सरकू लागलो, उजव्या वाजूला तीव घसारा व अरुंद वाट हे समीकरण मोठ्या एकाग्रतेने सोडवत आमचा मोर्चा आता हळू हळू एका झापाकडे वळू लागला.
इथे  चुकिला माफ़ी नहीं 
आता सकाळचे ११.३० वाजले होते. गेले अडीच तास वाटेत सावलीच नसल्यामुळे ह्या झापामधल्या शीतल छायेत विसावा घेताना एक वेगळाच आनंद मिळत होता. 
दमलेले चेहरे
सुमारगड अजून २ तासांवर होता.  ह्याच्या पुढचे २ तास मात्र सुखावह होते. घनदाट जंगलातल्या पायवाटेवर फक्त पाचोळ्याचे आवाज येत होते. वाट तशी झाडाझुडुपातुन असल्यामुळे उन्हाचा त्रास आता जाणवत नव्हता. 
हा खेळ उन सावल्यांचा!! 
सुखावह अशा असणाऱ्या वाटेवर "बांबू पिट वायपर" ने आमची वाट आडवली, त्याच्या वाटेल कुणीही न जाता शांतपणे दुसऱ्या वाटेने जायचा निर्णय आम्ही घेतला, कारण हे जंगल त्याच घर आहे आणि आपण पाहुणे.

बाम्बू पिट वाइपर (चापड़ा)
 दुपारचे १२.३० होत आले होते, आणि आता आम्ही पठारावर पोहोचलो. समोरच ताठ मानेचा सुमारगड मोठ्या दिमाखात उभा होता. १.३० च्या सुमारास आम्ही महीपत-सुमार च्या खिंडीत जाऊन पोहोचलो. 
अजस्त्र सुमार
आता भूक मी म्हणत होती. चटण्यांचा व ठेच्याचा खमंग वास जिभेचे चोचले पुरवत होता. पोटाची आग शमवल्यावर आता अवघड अशा सुमारगडाकडे आम्ही कूच केली. खिंडीतून घसारायुक्त वाटेने सुमार च्या खालच्या पठारावर येऊन दाखल झालो. सरळसोट सुमार,आपल्या नावाप्रमाणेच सुमार आहे. "उगवतीच्या कड्यावर एका झाडाला धरून वर येंगाव लागतं." असा गोनीदांनी या किल्ल्याबद्दलच्या वर्णनात म्हटलेले आहे. किल्ल्यावर जाणारी अवघड वाट व जंगल यामुळे हा किल्ला फारच दुर्लक्षित राहिलेला आढळतो, परंतु याच वर्षी गावकर्यांनी सुमार चा रॉक पॅच शिडी बसवून सुरक्षित केला आहे. 
सुमारगडावरील शीडी 
परंतु कातळ पोटातल्या अवघड ट्रॅव्हर्स वरती मात्र चिंचोळ्या वाटेवरून शिडीपाशी पोहोचावे लागते.
बुडाचे महत्व :) 


शिडी पार करून वर गेल्यावर छोटीशी गुहा, गुहे मध्ये एक वीरगळ आढळते, तिथून पुढे २ मोट्ठी पाण्याची टाकी, एक छोट पिण्याच्या पाण्याचं टाकं, गुहा, शंकराची पिंड, थोडं वर गेल्यावर एक खांब टाकं, थोडी फार जोती एवढाच काय तो अवशेष साठा आढळतो. 

सुमार गडावरील टाक 
आल्या वाटेने हळू हळू सुमार उतारायला सुरुवात केली, कोकणात उतरणाऱ्या त्या डोंगरांच्या सोंडा, माजलेलं गवत, चिंचोळी पाऊलवाट, घनदाट जंगलाचं अभेद्य अस कवच, वरून रणरणतं ऊन, अवघड वाटेवर लावलेली शिडी, पश्चिमेला कोकण तर पूर्वेला देशावर अस्ताव्यस्त पसरलेली सह्याद्रीची मुख्य रांग, जावळीच्या खोऱ्यातली ती निरव शांतता, प्रतापगडाच्या रक्षक मधू-मकरंद चे दिसणारे मनमोहक रूप, पुसट अशी दिसणारी महाबळेश्वर ची रांग... अशा ह्या आडवाटेवरच्या परंतु सह्याद्री आणि कोकणाची साद घालणाऱ्या ह्या सुमार गडावर फार कमी भटके फिरकतात ह्याचे काय ते दुःख आहे. आता साधारण दुपारचे ४ वाजत आले होते, आणि संध्याकाळी ७ वाजेपर्यंत महीपत च्या मंदिरात पोहोचायचे असे प्रयोजन होते. ह्या खिंडीपासून उतार असल्यामुळे आता जरा हायसे वाटत होते. जंगलातून बाहेर पडल्यावर आम्हाला एका वेगळ्याच विश्वात आल्याचा भास झाला. झपझप पाऊलं टाकत आता आम्ही वाडी बेलदार च्या खाली असलेल्या ओढ्या पाशी येऊन पोहोचलो. साधारण अर्धा तास विश्रांती ची नितांत गरज होती. पायाची बोटं व पाठीवरची सॅक हि जणू शरीराला जडलेली व्याधी आहे अशी खात्री पटत होती. पायाची बोटं तर काही विचारू नका, ती इतकी शिजून निघाली होती कि अलगद सुरु लावली असता हळूच तुटून पडावीत. आता आमचा गजानन वाटाड्या इथपर्यंतच आमचा साथीदार होता. 





त्याने आता आमची राया भंडारी(धनगर) ह्या इसमाशी गाठ घालून दिली. साधारण ७० च्या आसपास झुकलेलं वय, खेडेगावा कडचा टिपिकल सडपातळ बांधा, काळाकभिन्न चेहरा, डोक्यावर अर्धी केलेली माकडटोपी, अंगावर शाल, अर्धी विजार, पायात कधीच्या काळी घेतलेली फटफट वाजणारी चप्पल, हातात काठी, वर्षानुवर्षे जावळीच्या भागातल्या डोंगरदऱ्यात भटकणारा असा हा अवलिया. राया आम्हाला पूर्ण किल्ला दाखवणार होते.

राया 
छातीवरचा चढ पार करीत आम्ही वाडी बेलदार च्या वर च्या लाईट पोल पाशी येऊन पोहोचलो. लोहगोल अस्ताला जात असताना अवकाश तांबूस करून गेला, निरनिराळ्या छटा अवकाशात उमटत होत्या, हात फोटोंसाठी शिवशिवत होते परंतु अंगात त्राण नसल्यामुळे ते क्षण लोचन समर्पित करून महीपत च्या जंगलात प्रवेश केला, आता पुढल्या ५ -१० मिनटातच काळोखाने उजेडावर मात केली व आम्ही महीपत च्या मंदिरात जाऊन विराजमान झालो. 

पारेश्वर मंदिर 
जंगलाच्या मध्यावर असलेल्या पारेश्वर मंदिरावर आता काळोखाची शाल पांघरली होती. हवेत गारवा जाणवत होता, मधूनच एखादी वाऱ्याची झुळूक आता मंदिरात शिरून हुडहुडी आणत होती. प्रसाद आणि निलेश ने पिठलं - भाताचं म्हाउंद घाऊन समस्त ट्रेकर जनतेस आकंठ तृप्त केले. एवढं चविष्ट जेवण झाल्यावर आता हळू हळू घोरण्याचे आवाज कानी पडू लागले
सकाळचे ६ वाजताच प्रसादाच्या हाकेने सगळे जण जागे झालो. सगळा राडारोडा आवरत ७ च्या सुमारास महीपत चे दर्शन घेण्यास आमची पाऊल पुन्हा चालू लागली. जंगलात हरवलेली एक न एक पायवाट राया मोठ्या कौशल्याने शोधात होते, थोडा चढ चढून गेल्यावर एका बाजूला कोकणात सरसोट तुटलेले कडे तर दुसऱ्या बाजूला देशावरचे विहंगम दृष्य, सुमार चे टोक, महाबळेश्वर, मधू-मकरंद, वडगाव, हातलोट चा घाट, घोणसपूर, सह्याद्रीची मुख्य रांग असा चौफेर प्रदेश नजर पडत होता. 



हा नजारा पाहिल्यावर आम्ही यशवंत दरवाज्याकडे पाऊल वळवली, तो पाहून झाल्यावर आम्ही कोतवाल बुरुजाच्या दिशेने कूच केली. घनदाट जंगलातल्या पाऊलवाटेने १५ मिनटात कोतवाल बुरुजा पाशी पोहोचलो. कोतवाल बुरुजावरून दिसणारा नजारा हा मनमोहक आहे. महीपत गडावरचे सर्वच अवशेष हे गर्द झाडीत हरवून गेल्यामुळे त्याचा शोध घेणे खरंच गरजेचे आहे. १२० एकर मध्ये पसरलेला हा किल्ला गर्द झाडीत हरवला आहे. ह्या किल्ल्याला एकूण ६ दरवाजे आहेत: लालदेवडी दरवाजा, पूर्वेस पुसाटी दरवाजा, दक्षिणेकडे खेड दरवाजा, पश्चिमेस शिवगंगा दरवाजा, उत्तरेकडे कोतवाल दरवाजा, आग्नेयेस यशवंत दरवाजा आहे. सद्य…स्थितीला हे सर्व दरवाजे होते परंतु कालानुरूप गर्द झाडीत हे दरवाजे स्वतःचे च अस्तिस्त्व शोधू पाहत आहेत. परतीच्या वाटेवर वाडी बेलदार कडे उतरताना शिवगंगा बुरुज नजरेस पडतो. वाडी जैतापूर ते वाडी बेलदार असा कच्च गाडी रस्ता वाडी बेलदार च्या अगदी जवळपर्यँत येऊन पोहोचलेला आहे, कदाचित पुढच्या वर्षी पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण होईल. आम्ही वाडी बेलदार ला न जाता मधल्या पाय वाटेने वाडी जैतापूर ला उतरलो. थोड्या तीव्र अशा उतारामुळे २ दिवस सरळ रेषेत पडणारी पाऊल आता फुरश्या सारखी गिरकी घेत पडत होती...बऱ्याच वर्षांपूर्वीचे जावळीच्या खोऱ्यातील रसाळ - सुमार - महीपत चे स्वप्न अखेर पूर्ण झाले. कोकणातल्या सागरी किल्ल्यांप्रमाणेच गर्द झाडीत हरवलेल्या गिरिदुर्गांकडे हि आपण लक्ष देणे हे तितकेच गरजेचे आहे.

मकरंद 

साम्रद-रतनगड-कात्राबाई-आजोबा-कुमशेत-पेठेची वाडी-कलाडगड-सादडे घाट-केळेवाडी

 https://trekhunt.blogspot.com/2017/11/blog-post_26.html


भटके आणि भटक्यांची जमात हि ठार वेडी असते..शनिवार-रविवार आला रे आला कि ह्यांच्या अंगात संचारत..मग ते आपल्याला कधी धोडप वर, कधी राजगड वर तर कधी सांधण च्या दरीत अथवा कळसुबाई वर, कधी घाटवाटांवर वर सह्याद्रीच्या दर्या खोर्यांमध्ये सापडतात.. ह्यांना उन, पावसाळा, हिवाळा ह्याच्याशी काही घेणं देणं नसत.. ह्यांना इतिहासात रमून जायचं असतं, अफाट सह्याद्रीच्या बेलाग कड्या-कपार्यान मधली शांततेत बुडून जायचं असतं तर कधी सह्याद्रीचे अद्वितीय रूप मनात साठवायचं असत.. मी हि असाच एक वेडा..

साम्रद कडून रतनगड कडे जाताना, समोर रतनगडाचा खुटा  
भंडारदरा भागातील किल्ले आणि अजस्त्र डोंगरांवर प्रत्येक भटक्याचे प्रेम होते, आहे आणि कायमच राहणार आहे यात काहीच शंका नाही.. याच भागात श्री अरुण सावंत सर यांनी रतनगड-कात्राबाई-आजोबा-हरिश्चंद्र-बैल घाट-सादडे घाट असा लांबलचक ट्रेक आयोजित केला होता.. अरुण सर म्हणजे सह्याद्री भक्त त्यांच्या सोबत चा ट्रेक म्हणजे नुसता ट्रेक नसून दर वेळेला १०० गोष्टी नवीन शिकायला मिळतात. 

रतनगड चढताना सांधण दरी, शिपणूर, घाटघर धरण व साम्रद गाव
पुण्यातून मी, निलेश, मंदार, मनोज, हिमांशू, सुनील, सागर, संजय, ब्रम्हानंद आणि इतर अशी १२-१३ टाळकी ५ मार्च ला रात्री निघालो आणि थेट साम्रद गावात जाउन पोहोचलो...पहाटेचे ४ वाजले होते.. तड्ख झोपी गेलो आणि सकाळी ६.३० वाजता शिट्टी वाजल्यावर जागे झालो.. गुलाबी थंडी मूळे सगळे कुडकुडत होते. अर्ध्या तासात तांबड फुटलं.. चहा नाश्ता झाला.. सगळ्यांनीच ट्रेक सुरु करण्याआधी १.५ लिटर पाणी पिल्यामुळे पुढचे ३ तास तरी तहान लागली नाही.. हा ट्रेक मुळात औघड असल्या कारणामुळे पाठीवर जास्त वजन घेऊन सर्वसामान्य सहभागींना ट्रेक करणे अवघड होते. म्हणून जेवढे लागेल तेवढेच समान सोबत ठेऊन आम्ही रतनगडाकडे रवाना झालो. साबळे मामा आज पूर्ण दिवसाचे नैतृत्व करणार होते.. 

रतनगड त्रिंबक दरवाजा
रतनगड आणि कात्राबाई करून कुमशेत मध्ये उतरणार होतो. पल्ला मोठा होता. पण पाठीवर वजन नसल्याने माझ्यासारख्या नियमित भटक्याला जरास पिकनिक वाटत होतं.. ३ तासाच्या पायपिटी नंतर त्र्यंबक दरवाजात येउन पोहोचलो. छातीवर येणाऱ्या पायर्या चढून आम्ही नेढ्यात जाऊन विराजमान झालो. नेढ्यामध्ये येणारा वारा हा उन्हामुळे झालेली अंगाची लाहीलाही नाहीशी करत होता..समोरच घनचक्कर, गवळदेव , आजोबा , खुटा, भंडारदरा परिसर आता अतिशय सुंदर दिसत होते. थोडी विश्रांती झाल्यावर नेढ्यातून आता आम्ही रतनगडाच्या गुहेकडे निघालो.. उजवीकडे बाण सुळक्याचं तर समोर कात्रा-कड्याच रौद्र रूप बघून सारेच थक्क झाले होते. त्यात सुरज ने बारा पायर्यांची वाट व कात्राबाई च्या घळीमधील रांजण सुळकयाचे दुरून दर्शन घडवले.. कात्राबाई ची घळ बघून अंगावर शहारे आले..मन अचंबित झाले..शेजारी भव्य आजोबा डोळ्याचे पारण फेडत होता.. 

रतनगड नेढ्यातून गुहेकडे जाताना
आता ऊन चांगलच माथ्यावर आला होतं.. तडख रतनगडाच्या गुहेत जाऊन पोटातील आग शमवली..जेवणानंतर अरुण सरांनी कमालाच केली, अनलिमिटेड मठ्ठ्याचा आमच्यावर वर्षाव केला.. पहिला राउंड, दुसरा राउंड करता करता ६-७ राउंड मध्ये सगळे गारद झाले..तरी अजून अरुण सरांकडे ताकाचा बराच साठा शिल्लक होता. आता दुपारचे १.३० वाजले आता आम्ही रतनगड उतरण्यास सुरुवात केली व ३ तासाच्या पायपिटीनंतर कात्राबाई च्या खिंडीत येउन पोहोचलो.. 

कात्राबाई खिंडीतून डावीकडे अग्निबाण, समोर डावीकडून अलंग, साकीरडा, किरडा
आमचा आचारी मुंबई वरून आलाच नाही असे कळल्यावर अरुण सर 
कात्राबाई च्या खिंडीतून तडख खालती कुमशेत ला स्वयंपाकासाठी रवाना 
झाले. खिंडीतून अर्ध्या तासातच आम्ही कात्राबाईच्या माथ्यावर आलो..माथ्यावरून शिपणूर, रतनगड, खुटा, अलंग, मदन, कुलंग, साकीरा, किरडा, कळसुबाई, भंडारदरा, गवळदेव, घनचक्कर, पाबरगड, आजोबा, हरिश्चंद्र, कोंबडा, नाफ्ता, कलाडगड परिसराचा मनमुराद आनंद घेऊन झटझट परत खिंडीत येउन कुमशेत ला उतरलो..उतरायला तसा अंधार झाला. संध्याकाळी ७.३० वाजता आम्ही कुमशेत च्या अलीकडे पोहोचलो. अरुण सर व स्वागतोत्सुक श्वेता, भोरु हजर होते. चहा घेतल्यावर लोकांनी जेवणावर ताव मारला...आणि अर्ध्या तासात सगळे जण घोरायला लागलो..

कात्राबाई च्या माथ्यावरून(पठार) आजोबा
दिवस दुसरा,

आजच्या दिवशी आमचा आजोबा करून हरिश्चंद्र वर राहायला जायचा बेत होता. सकाळी सरांच्या हातचं चविष्ठ उपीट हादडल आणि ते पोटात सिमेंटसारखं विराजमान झालं..आता ४-५ तास तरी काही काळजी नव्हती ..ठाकरवाडी मधून आजोबा च्या सोमोरील डोंगराला वळसा घालून आम्ही आजोबा च्या पायथ्याला येऊन पोहोचलो. 

गुहेरीचे दार आणि उजवीकडे करंडा
सुरज आणि अरुण सर वाट शोधत आम्हा सगळ्यांना सोबत नेत होते..खड्या चढाई ने ७०% वर आलो आणि आता आजोबा च्या पोटातून उजवीकडे खोल दरी असलेला वळसा घालून आजोबा च्या मधल्या पठारावर येउन पोहोचलो. मागीलाच आठवड्यात पावसाने कृपा केल्याने आम्हाला आजोबा वरील रांजण-खळग्या मध्ये पाणी मिळाले..

रांजण खळगे आणि वर आजोबा
इथून अजून तासाभराच्या चढाई नंतर आम्ही आजोबा चा माथा गाठला..दुपारचे १२.३० वाजले होते. माथ्यावर सगळ्यांनीच संत्र्याचा आस्वाद घेतला व संत्र्याची साल फेकून न देता चेहर्याला आणि हाताला चोळली असता हाल उन्हामुळे हात काळे पडत नाहीत अशी शिकवण अरुण सरांकडून मिळाली.. आजोबा वरून अजब नजारा अनुभवला..ह्याला आजोबा का म्हणतात ह्याची आम्हाला खात्री पटली होती..खालती ठाणे जिल्हा व शेजारी नगर अश्या देश आणि कोकणात पसरलेल्या आजोबा ला प्रणाम करून आम्ही कुमशेत च्या ठाकरवाडी ला खाली उतरलो..ठाकरवाडीतून ३ किलोमीटर पायपिटीनंतर कुमशेत ला पोहोचलो.संध्याकाळचे ५ वाजले होते..भूक मी म्हणत होती..पुलाव ,पापड, कोशिंबीर, ताक असा बेत होता. अरुण सरांने श्वेताकडे स्वयंपाकाची धुरा सोपवली होती..तिच्या हाताला कमालीची चव होती.. सुंदर असे जेवण झाल्यावर आता आम्हाला दोन-तीन तासांची पायपीट करून पेठेच्या वाडीला पोहोचायचे होते..बर्याच जणांच्या अंगात त्राण शिल्लक नव्हते.. मग अरुण सर आणि इतर इच्छुक मंडळी मुळा नदीचे पात्र ओलांडून(उन्हाळा असल्याने नदीला पाणी कमी असते) चालत पेठेच्या वाडीला गेले व उरले-सुरले १७ जण गाडीतून पेठेच्या वाडीला पोहोचलो..बरीच रात्र झाली होती..आमची गाडी पेठेच्या वाडी ला होती. पेठेची वाडी-पाचनइ-राजूर-कुमशेत असा वळसा मारून गाडीला यावे लागणार होते.. रात्री पेठेच्या वाडी ला पोहोचलो आणि मटकी ची उसळ, पुरणपोळी चा बेत जेवलो.. आता हरिश्चंद्र आम्हाला वेळेअभावी जमणार नाही हे कळून चुकले. आज पाहिलेला भलामोठा आजोबा स्वप्नात आला नसता तरच नवल!!!!

रतनगड नेढ्यातून आजूबाजूचा परिसर
दिवस तिसरा..
आता आज आम्ही कलाडगड करून सादडे घाट उतरून केळेवाडी ला पोहोचणार होतो.. ठरल्याप्रमाणे तासाभरात आम्ही कलाडगडा वर पोहोचलो.. वाटेत किंचित कठीण स्वरूपाचा कातळटप्पा पार करत माथ्यावर पोहोचलो. कलाडच्या भैरोबाचे दर्शन घेतले. 

कलाडगड
कलाडगडावरून नाफ्ता, निमगिरी, रोहिदास, नाणेघाट, जीवधन, ढाकोबा, मोरोशी चा भैरवगड,वानरलिंगी, वर्हाडाचा डोंगर, हरिश्चंद्र चा बालेकिल्ला असा परिसर न्याहाळला व खाली उतरलो.. 



नाफ्ता
आता शेवटचा ६-७ तासांचा सादडे घाटाचा टप्पा उरला होता.. पेठेच्या वाडीतून १.३० तास चालल्यावर सादडे घाटाच्या मुखाशी येउन पोहोचलो


बैल घाट हरिश्चंद्र गड 
तोल सांभाळत सगळे हळू हळू खाली उतरू लागले..घाटाचा तीव्र उतार व बारीक खडी हि आता पायाचा निकाल लावत होती त्यात वरून सूर्यदेव आग ओकत होता..


सगळ्यांची पायाची बोट आता शिजून निघाली होती.. सावली आली कि हायसे वाटायचे..त्यात पाठीवर वजन..असा सगळा राडारोडा सांभाळत आमचा गोतावळा ५ वाजता केळेवाडीत येउन पोहोचलो.. समोरच रोहिदास, कोकणकडा तर डावीकडे नाफ्ता ताठ मानेने उभे होते. 

नाफ्ता
असा एकंदर अवघड ट्रेक एकूण ३२ पुणे-मुंबईकरांने मोठ्या जिद्दीने पार पाडला..केळेवाडी मधून आम्ही जेवयला एका नदीच्या आडोश्याला गेलो.. नदीमध्ये पोहायचा मोह मात्र कुणालाही आवरला नाही. परत एकदा श्वेता आणि सागर ने अफलातून छोले उसळ, खीर, वरण, भात असा साग्र-संगीत बेत आखला होता. अरे कधी चिकन, मटकीची उसळ, पुरणपोळी, छोले, खीर, संत्री आम्ही ट्रेक ला आलोय कि पिकनिक ला तेच उमजत नव्हते.. आता संध्याकाळचे ७ वाजले होते..अरुण सर घाई करत होते कारण ट्रेक सहभागी झालेल्या मुली ह्या रात्री १० वाजायच्या आत घरी पोहोचायला हव्यात असा त्यांचा अट्टहास होता. आता निघायची वेळ आली होती.. सगळे जण एकमेकांना गळाभेट करून राम-राम करत होते.. परत कधी भेट होइल याची खात्री नाही म्हणून फेसबुक वर आहेस का रे अशा चर्चांना वाव आला..ट्रेक मध्ये सुंदर आठवणी उराशी बाळगून आम्ही पुणे-मुंबईकर आपापल्या दिशेने घराकडे रवाना झालो.
























किल्ले बहुला.

 आयुष्यात पाहिल्यांदा आपल्या आर्मीला घाबरून जीव मुठीत धरून केलेला एक अविस्मरणीय ट्रेक - किल्ले बहुला.   ✍️ मेघन तारिहाळकर पाटील (चौफेर भटकंत...