Tuesday, December 5, 2023

पुन्हा एकदा राजगड-तोरणा

 http://www.misalpav.com/node/51820

नमस्कार मंडळी आज पहिल्यांदा एक प्रयत्न करून बघतो आहे टायपिंग ऐवजी स्पीच टू टेक्स्ट वापरायचा. बघुया कसे जमतेय.
===============================

राजगड तोरणा हा रेंज ट्रेक मी याच्या आधी पण केलाय. साधारण २०१५ मध्ये हा ट्रेक मी एकदा केला होता आणि त्याच्या आधी एकदा २००४ मध्ये तोरणा ते राजगड असा उलट ट्रेक केला होता पण त्यावेळेला आम्ही आदल्या दिवशी रात्री मुंबईहून निघून वेल्ह्यापर्यंत गेलो होतो. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी वेल्ह्यातून तोरण्यावर गेलो होतो. लगेच तोरण्यावरून मागच्या बाजूला बुधला माचीने खाली उतरलो होतो आणि मग पूर्ण डोंगराची रांग पार करून संध्याकाळपर्यंत अळू दरवाजापर्यंत पोचलो होतो आणि तिकडून अळू दरवाजातून संजीवनी माचीवरून पुढे गेलो होतो . रात्री राजगडला पद्मावती माचीवरती पद्मावतीच्या देवळात मुक्काम केला होता पण यावेळी पुणे ते पुणे ट्रेक करायचा असल्यामुळे दोन्ही पर्याय उपलब्ध होते. एक म्हणजे वेल्ह्यातून तोरण्यावर जाऊन तोरण्यावरून खाली बुधलामाची उतरून मग राजगड ला जायचं हा एक पर्याय होता आणि दुसरा म्हणजे प्रथम राजगड ला जायचं आणि मग तिकडून संजीवनी माचीवरून अळू दरवाजातून खाली उतरून डोंगराची पूर्ण धार पार करून धारेवरून बुधला माचीला भेटायचं हा पर्याय होता . पण त्याच्यात एक अडचण अशी होती की आम्ही जेव्हा फेब्रुवारीमध्ये फक्त एक दिवसाचा तोरणा ट्रेक केला होता तेव्हा तोरण्याच्या मुख्य दरवाजामध्ये भरपूर काम चालू असल्यामुळे तो दरवाज्याचा मार्ग बंद केला होता आणि त्याच्यामुळे आम्हाला एकदम शेवटच्या टोकापर्यंत जाऊन अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये जाऊन परत यायला लागलं होतं आणि तोरण्यात प्रवेश करता आला नव्हता. तर या वेळेला असं काही होऊ नये ही एक धाकधूक मनामध्ये होती .कारण दिवसभर चालल्यानंतर राजगडावरून तोरण्यावर आल्यावर समजा पुढचा दरवाजा बंद असेल आणि खाली उतरता न आल्यामुळे अडकायला झालं तर त्यावेळेला काही खटपट करायची ताकद सुद्धा नसणार त्यामुळे त्या एका गोष्टीची धास्ती होती

म्हणून पहिले दोन-तीन ट्रेकिंग ग्रुप वरती मेसेज टाकला आणि विचारलं की सध्या कोणी लेटेस्ट तोरण्यावरती जाऊन आला आहे का? आणि पुढचा दरवाजा उघडा आहे का? हे करेपर्यंत रात्रीचे दहा वाजून गेले होते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे निघायचं होतं त्याच्यामुळे मला थोडीशी धाकधूक होती की कोणी उत्तर देईल की नाही. पण नशिबाने दोन्ही ग्रुप वर किंवा एकेका माणसाने कन्फर्म सांगितलं की तोरण्याचा पुढचा दरवाजा उघडा आहे त्याच्यामुळे बिनधास्त जा त्यामुळे हूरूप आला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हर हर महादेव करून घराच्या बाहेर पडलो प्रथम रीक्षाने स्वारगेटला पोचलो. स्वारगेट एसटी स्टँड वरचा नेहमीचा सावळा गोंधळ बघत बघत डायरेक्ट वेल्हे बस मिळेल किंवा डायरेक्ट गुंजवणी बस मिळेल याचा काहीच अंदाज नसताना तिथेच घोटाळत उभा राहिलो .शेवटी एक दोन कण्डक्टरशी बोलल्यावर ती असं समजलं की भोर बस लगेच लागणार आहे आणि भोर बसने आम्हाला नसरापूर फाट्याला उतरता येईल म्हणजे थोडक्यात आता आमच्या पुढे दोन्ही पर्याय उपलब्ध होते .पहिले तोरण्यावर जायचं किंवा पहिले राजगडावर जायचं .पटापट तिकीट काढून आम्ही बसमध्ये स्थानापन्न झालो आणि यथावकाश अर्धा पाऊण तासाच्या अंतराने नसरापूर फाट्याला त्या बसने आम्हाला उतरवलं फाटा पार करून चेलाडी गावाच्या तोंडाशी सगळ्या जीप उभ्या असतात तिथे गेलो. लगेच जीपवाल्या काकांनी आम्हाला गराडा घातला पण त्यांच्याशी बोलताना मला ही गोष्ट प्रथम क्लिअर करून घ्यायची होती की पहिले तोरण्याला जावं का पहिले राजगडला जावं ?कुठला पर्याय चांगला आहे ? याचं कारण म्हणजे आम्हाला एकाच दिवसात ट्रेक पूर्ण करून घरी परतसुद्धा यायचं होतं आणि परत येताना कुठल्यातरी एका अशा गावात उतरायचं होतं की जिकडून आम्हाला पुन्हा नसरापूर फाट्याला परतीची जीप किंवा बस किंवा काहीतरी सोय मिळेल. त्यावर त्या सगळ्या लोकांनी आपापसात चर्चा केली एक-दोन जाणकारांचा सल्ला आणि त्यांच म्हणणं असं पडलं की पाली दरवाज्याच्या खालती भोसलेवाडी म्हणून जे ठिकाण आहे तिकडे जर आम्हाला सोडलं तर आम्हाला सोयीस्कर पडेल. याचं कारण म्हणजे भोसलेवाडीत सोडल्यानंतर चढाईचा जवळजवळ अर्धा टप्पा कमी होतो आणि पुढच्या एक तासभरामध्ये आपण गडावरती पोहोचतो .
आता हे सांगण्याआधी थोडीशी राजगडाची रचना सांगतो. राजगड ३ बाजूनी पसरलेला गड आहे. त्याच्या पूर्वेच्या बाजूला सुवेळा माची आहे त्याच्यातून एक वरती येणारा दरवाजा आहे जो फारसा वापरात नाहीये .त्याच्यानंतर पश्चिमेला संजीवनी माची आहे जी भूतोंडेच्या बाजूला पसरलेली आहे आणि भूतोंडे गावातून अळू दरवाजातून तिकडे वरती रस्ता येतो . तिसरी पद्मावती माची आहे जी सगळ्यात प्रशस्त माची आहे आणि त्याच्यातून चोर दरवाजांनी गुंजवणी गावातून मार्ग वरती येतो. याशिवाय पाली दरवाज्यातून सुद्धा राजगडावरती प्रवेश करता येतो जो प्रशस्त पायऱ्यांचा मार्ग आहे . तिन्ही माच्यांच्या मधोमध बालेकिल्ला आहे. बहुतेक वेळा राजगडला येताना मी गुंजवणी गावात येऊन चोर दरवाजांनी वरती येणारा मार्ग वापरला होता आणि अळू दरवाजावरून खाली उतरलो होतो .पण यावेळी जीपवाल्यांच्या सूचनेनुसार आम्ही भोसलेवाडीत आलो. भोसलेवाडीत त्यांनी आम्हाला ड्रॉप केलं आणि तिकडून निघताना स्वतःचा फोन नंबर सुद्धा देऊन ठेवला जेणेकरून संध्याकाळी आमची अडचण होऊ नये. वेल्हे गावांमध्ये उतरल्यानंतर ते स्वतः आम्हाला घ्यायला येतील किंवा एखाद्या गाडीवाल्याला फोन करून तिकडे थांबायला सांगतील हेही सांगितले.

तर वेळ साधारण सकाळी सव्वानऊ ची ज्या वेळेला आम्हाला त्यांनी भोसलेवाडी मध्ये सोडलं .भोसलेवाडी मध्ये सरप्राईज म्हणजे भरपूर मोकळ पठार होतं आणि त्या पठारावरती ५० -७० गाड्या ऑलरेडी लागलेल्या होत्या म्हणजे लोक सकाळपासून किल्ल्यावरती आलेले होते .खालती अर्थातच त्यांची सोय करण्यासाठी सात-आठ चहा दुकानात चहा- नाश्ता अशी सोय होती .बरोबर थोडासा खाऊ आणलेला होता. पाण्याच्या बाटल्यांचा व्यवस्थित नियोजन केलेलं होतं .पण आयता नाश्ता मिळतोय म्हटल्यावर नाश्ता करावा आणि मगच ट्रेक चालू करावा असा विचार करून चहा पोह्यांचा भरगच्च नाश्ता केला आणि त्याच्यानंतर चालायला सुरुवात केली वेळ सकाळी ९:५०.
a

चालायला सुरुवात केली आणि किल्ले राजगड या फलकाने आमचे स्वागत केले ज्यावर राजगडा जी बरीच चांगली माहिती लिहीलेली होती. रास्ता दात झाडीतून होता. पण थोड्याच वेळात दाट झाडी रस्ता संपला. आणि थोडासा खडकाळ भाग लागला. पण रस्ता चांगला होता अन अजून ऊन लागत नव्हते. त्यामुळे छान वाटत होतं. सकाळची सूर्याची किरणे झाडातून पास होत आमच्यापर्यंत पोचत होती आणि छान. नॉस्टॅल्जिक वातावरण तयार झालं होतं. आधी केलेल्या ट्रेकच्या आठवणी मनात जाग्या होत होत्या. हळूहळू कारवीची झाडी संपली. आणि त्याच्यानंतर थोडासा उघड भाग लागला. वाटेत रमत गमत फोटो काढत प्रवास पुढे चालला होता.

a

कुठे कारवीच्या फुलांचा फोटो कधी, तर कुठे पावसाने माती वाहून गेलेल्या खड्ड्यांमध्ये मुळांवर बसून फोटो काढ. असं करता करता रमत गमत पुढे पुढे चाललो होतो. जिथे चढ लागत होता तिथे थोडीशी कसोटी लागत होती. हाश हूश करत करत. प्रवास पुढे चालू होता. एका मोकळवनात आलो आणि खालती नजर टाकली. वा! जिथून सुरुवात केली ते भोसलेवाडी गाव. खाली दूरवर दिसत होते. उभ्या असलेल्या गाड्या एकदम छोट्या चिमटीत मावतील अशा दिसत होत्या. वरच्या बाजूला नजर टाकली तर सूर्य तळपायला लागला होता. आणि त्याचीच थोडीशी चिंता होती. कारण आजच्या दिवसात पूर्ण राजगड तोरणा ही रेंज करायची असल्याने उन्हाचा त्रास नक्कीच होणार होता. आणि तो कमीत कमी व्हावा. अशी इच्छा होती. पण वेळ नव्हता. पुढे मजल मारत राहिलो. कारवीचा टप्पा आता पूर्ण संपला. आणि मोठ मोठ्या दगडांचा टप्पा सुरू झाला. राज गडाची तटबंदी थोडीही जवळ वाटू लागली. तटबंदीमधली छिद्रे, काही बुरुज,जंग्या या गोष्टी दिसू लागल्या. एका बाजूला राजगढच्या. पाली दरवाज्याच्या बाजूला जे काम चालू होतं. तिकडे सामानाची ने आण करण्यासाठी. लावलेली ट्रॉली दिसत होती. ती वर खाली जात होती आणि वाळू दगड आणि बाकी सामानाची ने आण करत होती. वरती वरती वरती जात असताना. एका ठिकाणी वळण घेतलं आणि सुंदर असा पाली दरवाजाच्या रांगेतला पहिला दरवाजा समोर आला. एक चढण पार करून त्या दरवाज्यामध्ये पोचलो. दरवाजा अतिशय अवघड ठिकाणी बांधलेला आहे. शत्रूला सरळ रेषेत वर येता येणार नाही. पूर्ण वळण घेऊनच दरवाजाला तोंड मिळेल अशी रचना केलेली आहे. बरेच ठिकाणी शासनाची दुरुस्तीची कामे चालू असलेली दिसली. नुकताच या कामांमध्ये या दरवाजाचा आतला भाग आणि लाकडी दरवाजा याची रंगरंगोटी आणि दुरुस्ती केलेली दिसली . दरवाजा सुस्थितीत बघून बरं वाटलं.

a

एका दादाकडे लिंबू सरबत प्यायलं. १० मिनिटे थांबून पुढे निघालो. पाली दरवाजाचा बुरुज. आणि आतली तटबंदी अतिशय देखणी दगडी आणि अजूनपर्यंत टिकून असलेली दिसली.

a

काही पायऱ्या चढून. जिथे काम चालू होते तेथे आलो. तिकडे डावीकडे गेलो असतो तर पद्मावती माची लागली असती. पण आज काही बघायला वेळ नव्हता. त्यामुळे लगेच उजवीकडे वळून सरळ बालेकिल्ल्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली. बालेकिल्ला आता नजरेच्या टप्प्यात दिसत होता. थोडा वेळ चालल्यानंतर बालेकिल्ल्याला सरळ नाकाला नाक लावून भेटलो. जर डाव्या बाजूने गेलो असतो तो सुवेळा माचीकडे जाता आले असते. पण आम्हाला उजवीकडे जाऊन संजीवनी माचीचा रस्ता पकडायचा होता. कारण संजीवनी माचीवरूनच अळू दरवाजातून खाली उतरून डोंगरधार चालायला सुरुवात करायची होती.

a

वेळ सकाळी १०.५० . तासाभरात आम्ही भोसलेवाडीतून गडावर पोचून संजीवनी माचीकडे कुच सुद्धा केला होता. हाच वेग पकडून चालत राहणे भाग होते. पुढे एक छोटी शी पडकी कमान पार केली आणि कारवीच्या दाट झाडीत उतरलो. अजून सकाळचा थंडावा होता.

b

गडाची पश्चिमेकडची बाजू असल्यामुळे ऊन अजून इथे पोचले नव्हते. दाट कारवीतून चालायला छान वाटत होते. पाणीही कमी लागत होतो. कारवीतून पुढे पुढे येत एका ठिकाणी बालेकिल्ल्याचा डोंगर संपला. आणि मोकळवनात आलो. नाकासमोर सरळ चालायला सुरुवात केली संजीवनी माचीकडे. संजीवनी माचीकडे जाताना दोन्ही बाजूलाअतिशय सुंदर असा चिलखती बुरुज आहे. मध्ये साधारण २-३ मीटर खोल आणि काहीशे मीटर लांब खंदक आहे. दोन माणसे एका वेळी चालू शकतील असा हा खंदक आहे. माचीकडे जाताना पाण्याची चांगली व्यवस्था केलेली कुंड आहेत. टाक्या आहेत. या टाक्यांच्या बाजूनेच पुढे जात राहिलो. पण तिथे थोडी गफलत झाली. संजीवनी. माचीच्या टोकापर्यंत गेलो तरी अळू दरवाजा काही सापडेना.
b

मला इथे येऊन काही वर्षे. झाली असल्यामुळे स्मरण शक्ती थोडी दगा देत होती. पण अखेर थोडे मागे येऊन शोधाशोध केल्यावर संजीवनी माचीच्या डाव्या बगलेत असलेला अळू दरवाजाचा रस्ता सापडला. आणि खाली खाली उतरत आलोअळू दरवाजापर्यंत पोचलो. दरवाजातून पाठीमागे अतिशय सुंदर खोऱ्यांचे दृष्य दिसत होते. पण त्याचबरोबर आता आपण उन्हामध्ये जाणार असल्याचे लक्षात येत होते. दरवाजातून खाली उतरलो. लवकरच पायऱ्या संपल्या, बुरुजाची तटबंदी संपली. आणि एक वळसा घेऊन आम्ही पुन्हा तटाला भिडलेल्या कारवीमध्ये उतरलो.
a

आता मात्र आम्ही पूर्वेच्या बाजूला असल्यामुळे. उन्हाचा चटका डाव्या बाजूने लागत होता. ट्रेकला खरी सुरुवात झाली होती. उजव्या बाजूला राजगडाची दूरवर पसरलेली तटबंदी आमची साथ करत होती. मधले बुरुज अतिशय सुंदर दिसत होते. ही तीच संजीवनी माचीची चिलखती बुरुजाची तटबंदी होती जी आम्ही आता खालून बघ होतो.

a

लवकरच वाटेत मोठे मोठे दगड धोंडे पडलेले दिसू लागले. आणि रस्त्याने एक उजवीकडे वळण घेतले. इथे भुतोंडे गावातून बिस्लेरीच्या बाटल्यांचे खोके डोक्यावर घेऊन आलेला एक दादा भेटला. त्याला पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी तोरण्याचा रस्ता विचारला. त्यांनी खात्री दिली की तुम्ही बरोबर रस्त्याने जात आहात. संध्याकाळ पर्यंत तोरण्याला पोहोचाल.

a

फक्त मध्ये एक खिंड आहे. या खिंडीत चुकू नका. परंतु चालण्याच्या नादात त्याच्या या ईशाऱ्याकडे आमचे लक्ष राहिले नाही. आणि त्याचा फटका आम्हाला नंतर बसला.
आता रस्त्याला उतार लागला. घसाऱ्याची वाट आणि नंतर एक रॉक पॅच. संजीवनी माचीवर बसलेल्या लोकांचे आकार लहान होत चालले . त्यांनी आमच्याकडे बघून केलेली बडबड आता कुजबूज केल्यासारखी ऐकू येऊ लागली. थोडासा सावधगिरी बाळगून रॉक पॅच पारसुद्धा केला. ऊन तापायला लागलं होतं. धुक्यामुळे तोरणा अजूनही नीटसा दिसत नव्हता. पण आधी येऊन गेलेले असल्याने. ओळखीच्या खाणाखुणा सापडत होत्या. उन्हातच पुढची वाटचाल चालू ठेवली. अजूनही ऊन असले तरी ते फार टोचत नसल्याने जितकी मजल मारता येईल. तेवढी मारायची ठरवली.

a

पुढे जात. राहिलो आणि उतार संपून सपाट रस्ता सुरू झाला. पुन्हा एकदा दाट कारवीने आम्हाला कवेत घेतले. दोन्ही बाजूला थोडा थोडा उतार असला तरी कारवीची पुरुषभर उंचीची झाडे असल्याने भीती वाटत नव्हती. मधली पायवाट फक्त सरळ पायाखाली ठेवायची एवढेच. साधारण असेच चालत राहिलो. आणि साडेबाराच्या सुमारास ती खिंड लागली. खिंडीत जरा दम खायला बसलो आणि इकडे तिकडे बघितले. रस्ता थोडा फसवा होता. उजवी आणि डावी दोन्हीकडे वाट उतरत होती. आम्ही अंदाजे डावीकडची वाट धरली आणि वेलींना धरून धसक फसक करत खाली उतरू लागलो. पण सुदैवाने दहाच मिनिटात लक्षात आले. की आपली फसगत झालेली आहे. असेच जात राहिलो तर आपण दरीत खाली उतरू. डोक्यावर हात मारला आणि पुन्हा उलट रस्त्याने खिंडीत आलो. त्या पाणीवाल्या दादाचे शब्द आठवायचा प्रयत्न केला. थोडे इथे तिथे बघितले आणि नाकासमोर सरळ वर चढणारी वाट दिसली. अंदाजे ती वाट धरली , सरळ वरती आलो. आणि नजरेसमोर पुन्हा तोरणा दिसू लागला. देवाचे आभार मानले. जर इथे चुकलो असतो. तर ट्रेक इथेच समाप्त झाला असता. वेळ न घालवता पटापट पावले उचलली आणि पुन्हा एकदा विरळ कारवीतून दाट कारवी आणि पुन्हा विरळ असे करत करत पुढे जाऊ लागलो. राजगड आता दूर दूर सरकत होता आणि आमचे लक्ष्य तोरणा पावलापावलाने जवळ येत होता.
,
a

साधारण एक वाजताच्या सुमाराला खिंडीतून जाणारा डांबरी रस्ता लागला. त्याच्या एका बाजूला भोर तर दुसऱ्या बाजूला वेल्हा हा तालूका आहे. तसे फलक लावले आहेत. थोडावेळ डांबरी रस्त्यावर बसून दम खाल्ला आणि पुन्हा समोरचा झाडीचा रस्ता पकडला. वरती गेल्यावर. एक अनगड देऊळ लागले. नऊ सिमेंटच्या खांबावर पत्रे मारून तयार केलेले कोणतेसे देवस्थान दिसत होते. अडीनडीला रात्री २-४ जण वस्ती करायला उत्तम जागा होती. एक चूलसुद्धा लावलेली दिसत होती. पाणी पिण्यासाठी थांबून लगेच पुढची वाट धरली. मला आता जरा टेन्शन येऊ लागले होते कारण उन्हाचा चटका वाढला होता. तोवर साधारण मध्यावर असलेली एक खूण बघायची मला घाई झाली होती. ही म्हणजे पत्र्याची झोपडी जिथे कुणीच राहत नाही. फक्त विकांताला एक मावशी ताक विकायला तिथे येऊन बसतात. साधारण सव्वा वाजण्याच्या सुमाराला ती झोपडी दिसली आणि जीवात जीव आला. अर्धी शर्यत पार केल्याच्या आनंदात बरोबर आणलेला शिधा झोपडीत बसून खाल्ला .

a

पाणी प्यायलो आणि पुढे निघालो. वाट पुन्हा दाट कारवीत घुसली. जेवण नुकतेच झाले होते. पण भरगच्च पोट भरले नव्हते. कारवीची सुंदर सावली साथ करत होती. त्यामुळे चालण्याचे श्रम कमी होत होती. रस्तासुद्धा सपाट होता. त्यामुळे छान वाटत होते. आयुष्यभर असेच चालत रहावे. असेही एक सुंदर फिलिंग मनात येत होते. पुन्हा एकदा एक ओळखीची खूण लागली. कुठल्यातरी स्थानिक देवाचे झाडाखाली तयार केलेले मंदिर होते २ मिनिटे तिथे विश्रांती घेतली. देवासमोर माथा टेकला. आणि पुढे झालो. दुपारचे दोन वाजून गेले होते. पुन्हा रस्ता कारवीतून बाहेर पडला आणि. तोरण्याचा बुधला आता एकदम नाकासमोर दिसू लागला. उजवीकडे झुंजारमाची ची तटबंदीसुद्धा शेवटपर्यंत दिसत होती. एका हुप्प्याचे खूप खूप असे बोल दरीत घुमत होते. मात्र आता वाट डावीकडे वळली. आणि मला पुन्हा वाट चुकल्यासारखे वाटू लागले. पण इथे ही एकच वाट होती आणि दुसऱ्या चोर वाटा दिसत नव्हत्या. त्यामुळे अंदाजे अंदाजे पुढे चालत राहिलो. लवकरच ती वाट पुन्हा उजवीकडे वळली आणि एक मोठा चढ चढून आम्ही मुख्य रस्त्याला लागलो. दुपारचे तीन वाजून गेले होते.

a

तोरणा आता एकदम. टप्यात आला होता असे वाटत होते. पण ते अतिशय फसवे होते. लवकरच रस्त्याला एक चढणीचा रॉक पॅच आला. तापलेला दगड आणि उन्हाचा कहार. तो. रॉक पॅच कसा बसा थांबत थांबत चढलो. थोडी विश्रांती घेऊन पुढे चालू. लागलो आणि तसेच निर्धाराने पुढे जात राहिलो. जवळचे पाणी आता संपायला आले होते. पण त्याच बरोबर बुधला माचीचे खालचे मोकळवण जवळ येत चालले होते. वेळ दुपारी पावणेचार .बुधला माचीच्या खालच्या आसमंतात जरा वेळ टेकलो आणि पुन्हा उजवा रस्ता धरला. अजून एक रॉक पॅच चढून वरती आलो आणि अखेर तोरण्यावर जायची मुख्य खूण, म्हणजे लोखंडी शिडी दिसली.

a

लोखंडी शिडीवरून वर गेलो आणि तोरण्याच्या तटबंदीवर आमचा प्रवेश झाला. लक्ष आता अगदी टप्प्यात आल्यासारखे वाटत होते. पण हासुद्धा भ्रमच होता. तटबंदीवरून उजवीकडे वळून वर. चढायला सुरुवात केली. घशाला कोरड पडली होती. पाण्याचे अतिशय काटेकोर नियोजन. करायला लागत होते. वरची दिशा पकडून, बुधला डावीकडे ठेवत, चालत राहिलो. साधारण. वीसेक मिनिटे चालल्यावर तोरण्याच्या मागचा दरवाजाकडे जाणारी रेलिंग दिसू लागली. परंतु तिथे पोहोचण्याआधी एक अतिशय अवघड टप्पा आ वासून आमची वाट पाहत होता.तो पार पाडायचा होता. हा अजून एक कातळ आहे. जिथे दोन्ही बाजूला दरी आहे. एकमेकांना धीर देत, पायात पेटके आल्यासारखे वाटत असताना, तो टप्पा कसाबसा पार केला. आणि रेलिंगच्या सुरक्षित टप्प्यावरती येऊन एकदाचे हुश्श केले. अजून चाल जरी. संपली नसली. तरी आता सुरक्षित ठिकाणी येऊन पोहोचलो होतो. वेळ संध्याकाळचे साडेचार मागे मावळत्या सूर्याच्या पार्श्वभूमीवर बुधल्याचे सुंदर दर्शन घडत होते. काही फोटो काढले .

a

आता मुख्य आव्हान जरी संपले असले. तरी वेळेत वेल्हे गावात पोचून जीप पकडण्याचे वेगळे आव्हान होते. मागच्या दरवाजात पोचून किल्ल्यात प्रवेश केला. ठिकठिकाणी पुरातत्व विभाग आणि सरकारतर्फे डागडूजीची कामे चालू होती. इतक्या वेळात प्रथमच माणसांचे दर्शन झाले. मेंगाई देवीच्या देवळात पोचलो आणि तिथे काम करणाऱ्या मजुरांना विनंती करून त्यांच्या कडचे पाणी पोट भर प्यायलो. शिवाय बाटल्या सुद्धा भरून घेतल्या आणि तडक खालची वाट पकडली. २० मिनिटांत खाली उतरून तोरण्याच्या मुख्य दरवाजात आलो आणि ट्रेकची जवळपास सांगता झाली. घड्याळात ५ वाजले होते. झकासपैकी फोटो काढले आणि भरल्या मनाने तोरणा उतरायला सुरुवात केली.

a

एक दिवसात राजगड ते तोरणा हा कठीण टप्पा पार पाडल्याचे समाधान मनात भरून राहिले होते. खाली पहिल्या टप्प्यानंतर एका एका काकांकडे लिंबू सरबत पिऊन ताजे तवाने झालो. समोर पसरलेला अथांग जलाशय बघत झपाट्याने खाली उतरू लागलो. आणि सव्वा सहाच्या सुमारास वेल्ह्यात उतरलो. फोन करून कळवले असल्याने जीपवाले काका आमची वाटच बघत होते. थकली शरीरे आणि सॅक जीपमध्ये कोंबल्या आणि. त्याला धन्यवाद देत नसरापूर फाटय़ाकडे आमचा परतीचा प्रवास चालू झाला.(समाप्त)

 

 

 

 

Monday, October 30, 2023

बाली पास ट्रेक

 https://www.maayboli.com/node/84264

पुनःश्च हरिओम - बाली पास ट्रेक

Submitted by धनश्री. on 16 October, 2023 - 02:16

" आप बाली पास करके आये है लगता है " यमुनोत्रीच्या मंदिरातले पुजारी आम्हाला विचारत होते. आम्ही सकाळी सकाळी सहा वाजता मंदिर उघडायची वाट पहात थांबलो होतो. ह्यांना कसं कळलं ? हाच प्रश्न खाली उतरतांना वाटेत लागणार्‍या दुकानातून विचारला गेला, तेव्हाही फार आश्चर्य वाटलं. शेवटी आपले रापलेले चेहरे बघून ह्यांना कळलं असावं अशी समजून करुन घेत होतो ते आमचा एक गाईड म्हणाला, सिर्फ बाली पास करके आने वाले लोग इतने जल्दी यहा पोहोच सकते है. नाहीतर खालून वर चढायला सहा शिवाय सुरुवात करता येत नाही.

२०१७ साली स्टोक कांगरी तर झाला पण पुढे काही ना काही कारणांनी ट्रेकचे प्लॅन्स कॅन्सल होत गेले. शेवटी मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये महेश आणि केदार दोघे ट्रेक द हिमालयाज बरोबर 'केदारकांथा/ केदारकंठा' ह्या ट्रेकला जाऊन आले आणि मी २ महीन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये व्हॅली ऑफ फ्लॉवर, हेमकुंड साहेबला जाऊन आले.

तरी ट्रेक केल्याचं समाधान झालं नव्हतं कारण हे दोन्हीही ट्रेक्स तसे सोपे होते.

तोवर ट्रेकींगचा सिझन संपत आला होता. आता पुढच्या वर्षी बघू असा विचार करतांना अचानकपणे महेशला सुट्टी मिळाली. रोड ट्रीप वगैरे करण्याचा विचार कॅन्सल करुन आम्ही परत ट्रेक करायचं ठरवलं आणि आमच्या सुदैवाने ट्रेक द हिमालयाज मधल्या बाली पासच्या तारखा जमल्या आणि मिळाल्या. महेशच्या बाबांमुळे घरातली सोय झाली आणि आम्ही बुकींग करुन टाकलं.आमच्या ट्रेकची तारीख होती ३० सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर. ही ह्या सीझनची शेवटून दुसरी बॅच होती. ह्या तारखा सुट्टीशी जमणार्‍या होत्या म्हणून निवडल्या. पण ही निवड किती योग्य ठरली हे नंतर समजलं. blessing in disguise !

बाली पास, सुपीन आणि यमुनोत्री रेंज मध्ये असलेला एक ट्रेक आहे. हा पास आहे, म्हणजे एका बाजूने चढून दुसरीकडून उतरायचं. बाकी ट्रेक्स मध्ये ज्या रस्त्याने समीट करतात, तिथूनच उतरतात. इथेही अर्थात हवा खराब असेल, जास्त बर्फ असेल तर क्वचित त्याच रस्त्याने उतरवतात. हा ट्रेक ' डिफीकल्ट ' ह्या कॅटेगरीत येतो. बाली पासच्या समीटची ऊंची १६,२०० फूट आहे. म्हणजे लेह पेक्षा जवळजवळ ५००० फूट वर. शिवाय इतक्या ऊंचावर असणारी बर्फाची शक्यता. ट्रेक सुरु होतो ते तालुका हे गाव, ( तसा तो सांकरीपासून सुरु होतो, पण चालण्याची सुरुवात होते ती तालुका पासून ) ६५०० फुटावर आहे. तिथून ट्रेक संपतो ते जानकी चट्टी ( जे यमुनोत्री दर्शनाचे सुरुवातीचे ठिकाण आहे ) ते अंतर जवळजवळ ६५ किमी आहे.

ट्रेकींगचं ऑलमोस्ट सगळं सामान होतचं. फक्त प्रवासासाठी खाऊ, चहाचे सॅशे, नेहमीची औषधं वगैरे खरेदी केली. आदल्या दिवशी बॅग भरतांना लक्षात आलं की महेशचा हेड टॉर्च सापडत नाहीये, लकिली जवळच्या एका दुकानात मिळाला आणि तो आणल्यावर अर्ध्या तासात हरवलेलाही सापडला.

ट्रेकची सुरुवात होते डेहराडूनपासून २००/२२५ किमी अंतरावर असलेल्या सांकरी ह्या गावापासून. इथून लहानमोठे असे ७/८ ट्रेक्स सुरु होतात, त्यातले महत्त्वाचे किंवा प्रसिद्ध म्हणजे केदारकंठा, बाली पास, हर की दून, रुईनसारा, ब्लॅक पिक, देव बुग्याल वगैरे.

आदल्या दिवशी डेहराडूनला पोहोचलो आणि TTH (trek the himalayas) च्या नेहमीच्या पिक अप पॉइंटच्या अगदी जवळ असलेल्या सिद्धार्थ पॅलेस मध्ये उतरलो. हॉटेल एका रात्री राहण्यापुरतं चांगलं होतं. दुसर्‍या दिवशी सहा वाजताचं रिपोर्टींग होतं. आधीचा अनुभव असल्याने पाच मिनीटं उशीरा निघालो. टपरीवर चहा घेतला. काही लोक आलेलेच होते. उरलेले जमून निघेपर्यंत पावणे सात वाजले. एक मिनि बस आणि एक इनोव्हा अशात मिळून आम्ही १८ जण होतो. ब्रेकफास्ट, जेवण वगैरे करत सांकरीला पोहोचायला साडेचार वाजले. ब्रेफा, जेवण सोडल्यास प्रवासात कोणी कोणाशी फारसं बोललं नाही. मी तर अ‍ॅव्होमीन घेऊन बराच वेळ डुलक्याच काढल्या.

सांकरीला पोहोचत आलो तसा हवेतला गारवा वाढला. आणि मग पाऊसच सुरु झाला. खरं मला जरा वैताग आला कारण पाऊस म्हणजे चालतांना पाँचो घालावा लागणार आणि गारवाही वाढणार. ड्रायव्हरने घाईने वर ठेवलेल्या बॅगांवर प्लॅस्टीक घातलं. आमच्या ट्रेकींग सॅक्सवर कव्हर्स होतीच म्हणून बरं. शिवाय आम्ही सगळं सामान, कपडे प्लॅस्टीकच्या पिशव्यांमध्ये ठेवले होतं.

सांकरीला पोहोचेपर्यंत पाऊस थांबला. तिथे गेल्यागेल्या आमच्या टुर लिडरनी स्वागत करुन सामान खोल्यांमध्ये टाकून लगेच ब्रिफींग साठी बोलावलं.

सांकरीहून अनेक ट्रेक्स जात असल्याने TTH नी तिथे एक गेस्ट हाऊस लिजवर घेतलं आहे. त्यात ट्रिपल , चार शेअरींगवर खोल्या आहेत. आमच्या १८ च्या ग्रुप मध्ये आम्ही ४ जणी होतो. आम्हाला एक खोली मिळाली. बाकीच्या तिघी माझ्यापेक्षा १५-२० वर्षांनी लहान होत्या.

हे ते गेस्ट हाऊस.

sankri guest house.jpeg

ब्रिफींगसाठी वर आलो. तिथे चहा वगैरे होता. आधी लिडरनी स्वतःची आणि इतर ३ गाईड्सची ओळख करुन दिली. मग सगळ्यांनी आपापली ओळख करुन देतांना किती ट्रेक्स केलेत हे सांगायचं होतं. प्रत्येकानी किमान ३ तरी केले होतेच. म्हणजे सगळे अनुभवी होते.

आमच्यापैकी तिघांनी BMC ( Basic mountaineering course ) केला होता. अजून दोघांचे नंबर लागले होते. हा कोर्स ३ आठवड्यांचा असतो आणि बराच कठीण असतो.

तिघे जण ( दोन मुली आणि त्यातल्या एकीचा नवरा नॅशनल लेव्हलवर खेळणारे होते. एकीला तर गोल्डही मिळालं आहे. हे दोघे कलकत्त्याहून आले होते, तिथल्या डिकॅथलॉनमध्ये तिचे फोटो आहेत. अर्थात ही माहिती आम्हाला नंतर कळत गेली ) आणि हे सगळे जेमतेम तिशीचे होते. नॅशनल लेव्हलवर सायकलींग करणारी तर वीसच वर्षांची आहे. आम्ही १८ पैकी आम्ही पाच जण चाळिशीपुढचे. आमच्यातला एकजण सिम , कोरीयाहून आला होता आणि तो साठ वर्षांचा होता.

तर आमचा लीडर नविन राणा ह्याने आम्हाला बेसिक नियम सांगीतले. कधिही उशीर करु नका, चहा जेवणालाही नाही कारण ते लगेच थंड होतं. इतरांना त्रास होईल असं वागू नका, स्वच्छता पाळायची आणि मुख्य म्हणजे थोडा जरी त्रास होत असला तर लीडर, गाईड्सपैकी कोणालातरी सांगा म्हणजे वेळेवर मदत करता येईल.

बाकी जुजबी बोलून सात वाजता जेवण आणि दुसर्‍या दिवशी, रविवारी सकाळी ६ वाजता चहा, ७ ला ब्रेफा आणि ८ ला निघायचं असं सांगून बैठक संपली. ६, ७, ८ हा पॅटर्न पुढच्या दिवासात कायम राहीला, वेळेत थोडाफार बदल होऊन.

सांकरी छोटंस गाव असलं तरी ट्रेकींगला लागणारं ए टु झेड सगळं साहीत्य तिथे मिळतं. विकत आणि रेंटवरही.

थंडी वाढायला लागली होती. एक चक्कर मारुन, जेऊन साडेआठच्या दरम्यान आम्ही पडलो. रात्रीच्या जेवणात रोटी आणि भाताबरोबर दाल मखनी, मिक्स व्हेज आणि गोडात शाही तुकडा असं होतं. त्यापुढे रोज रात्रीच्या जेवणात एक गोड पदार्थ असेच. आणि तो ही रिपीट न होता.

उद्या पहिला मुक्काम सीमा. सगळं मिळून ८/९ किमी चालायचं होतं. पहाडात अंतर किलोमीटर मध्ये नाही तर वेळात मोजतात. त्यामुळे उद्या चार किमी चालायचं आहे असं न म्हणता पाच तास चालायचं आहे असं सांगतात. त्या हिशोबाने उद्या ६/७ तास चालायचं होतं. अंतर जास्त असलं तरी वेळ ओके लागणार होता कारण सुरुवातीचा टप्पा होता. आम्ही सध्या ६००० फुट ऊंचीवर होतो ते उद्या ७००० वर जाणार होतो.

रात्री थंडी चांगलीच वाढली. दोन दोन ब्लँकेट असूनही झेपेना. उद्यापासून टेंट आणि स्लीपींग बॅग्ज. कसं होणार !

रविवारी सगळे वेळेवर तयार होऊन निघालो. अनुभवी लोक बरोबर असल्याचा हा मोठा फायदा असतो. एकही दिवस, एकानेही एक मिनीटही उशीर केला नाही. सगळेच्या सगळे वेळेआधी तयार असत.

आज सुरुवातीला तासभर ट्रॅक्स सदृश्य गाड्यांनी जायचं होतं. मग चालणं सुरु. प्रत्येक गाडीत आत आम्ही ६/७ जण आणि वर गाईड्स, सपोर्ट स्टाफ, सामान आणि चक्क पोतं भरुन कांदे बटाटे भाज्या आणि इतर वस्तू. रस्ता अगदी अरुंद, वळणावळ्णाचा ट्रिकी होता. ड्रायव्हर्स तयारीचे होते. पूर्णवेळ मी, आपल्याला इकडे कधी ड्राईव्ह करता येईल ह्या विचारात मग्न होते.

इकडे सगळीकडे पंतप्रधान ग्रामसडक योजनेची कामं जोरात सुरु आहेत. ह्या पट्ट्यावरच्या ओस्ला नावाच्या शेवटच्या गावापर्यंत हा रस्ता जाणार आहे. त्यामुळे येत्या १/२ वर्षात ह्या ट्रेकचा एक दिवस कमी होईल कारण तिथवर गाडी जाऊ शकेल. ही गावं एवढ्या दुर्गम भागात आहेत की आजवर हे लोक बाहेरच्या जगाशी कसे कनेक्टेड होते हा प्रश्न पडतोच.

jeep 1.JPG

तास सव्वा तासाने थांबलो. इथून पुढे चालणे. सगळ्यांना जमा करुन, फार पुढे मागे राहू नका वगैरे सांगून चालायला सुरुवात करायला सांगीतली. गाईड्सपैकी एक जण सगळ्यात पुढे. त्याच्या पुढे जायचं नाही. मुख्य लीडर सगळ्यात मागे, बाकी उरलेले दोघे मधल्या पट्ट्यात असत. सगळ्यात पुढे जो हितेश भाई गाईड होता, त्याच्याकडे त्याच्या स्वतःच्या सॅकव्यतिरीक्त १० किलो वजनाचा ऑक्सीजन सिलींडरही होता. तो त्याने पहील्या दिवसापासून शेवटपर्यंट बाळगला आणि हे आम्हाला शेवटच्या दिवशी कळलं.

आम्ही दोघांनी आणि इतर ४ जणांनी आमच्या मोठ्या सॅक्स ऑफलोडींगसाठी दिल्या होत्या ऑफलोडींग म्हणजे घोड्यावरुन सामान येतं. ह्या ट्रेकमध्ये बेस कँपपर्यंत घोडे असणार होते. पुढे पोर्टर्स. आमच्याकडे छोटी सॅक असे, ज्यात पाणी, थोडा खाऊ, कॅप, गॉगल आणि पॅक्ड लंच असेल तर डबा असायचा. शिवाय फोन, माझा किंडलही माझ्याच सॅक मध्ये असत.

बाकीच्यांनी मात्र थ्रू आऊट स्वतःच्या सॅक्स उचलल्या. त्याबद्दल सतत त्यांचं कौतुक वाटे. खरं म्हणजे हे असं करता येईल हे आमच्या लक्षातही आलं नव्हतं. सुरुवातीला आपल्याला शक्य नाही हा विचार केला कारण कपडे आणि इतर सामानामुळे सॅकच वजन ९/१० किलो तरी भरतं. एवढं वजन उचलून इतकं चालायच आपल्याला जमणार नाही. तरी शेवटी शेवटी, नीट सवय, प्रॅक्टीस केली, सामान कमी केलं तर जमू शकेल ह्या विचारावर आलो आहोत. बघू कसं जमेल ते. ( सामानावरुन, आम्ही नेलेले निम्मे कपडे वापरले गेलेच नाहीत. अगदी फ्लीज जॅकॅट्सही नाहीत. तशीच परत आणली. आता नीट अंदाज आला आहे काय घ्यावं काय नाही याचा. त्यामुळेही सामान कमी होईल. )

तर चालायला सुरुवात केली. रस्त्यात कामे सुरु होती. बुलडोझर वगैरे मुळे काही ठिकाणी थांबायला लागे. साधारण अर्ध्या तासानंतर मोकळा रस्ता लागला. आजचा संपूर्ण रस्ता मोस्टली झाडी असणार होती. सावली, ऊन, सावली.. हळू हळू पुढे जात होतो. एव्हाना थोड्या ओळखी होऊ लागल्या होत्या. पुढे एका गावात एक भुभू आमच्या बरोबर चालू लागला. त्याला बिस्कीटं दिली. काही वेळाने रस्त्याकडेला असलेल्या एका टपरीवर चहा ब्रेक घेतला. खरं तर माझ्या दुसर्या चहाची वेळ होऊन गेली होती तरी मी चक्क चहा घेतला नाही.

buldozer.JPG

रस्त्याच्या कडेला ऊतारांवर कसले कसले मळे होते, वर डोंगरावर तुरळक घरं दिसत होती. मध्ये मध्ये लाल रंगांचे पट्टे असलेली झाडे असत. त्याच्या तुर्‍यांना वाळवून पीठ काढतात, जे स्वयंपाकात वापरतात.

red plants.JPG

दररोज ब्रिफींगमध्ये आम्हाला इतर गोष्टींबरोबर उद्या रस्त्यात पाणी मिळेल का तेही सांगत. झरे, पाईप्स मधून येणारं ताजं पाणी.

एका ठिकाणी अजून एक ब्रेक घेतला. हे एक छोटे हॉटेल होते. इथे कोकम सरबत मिळालं. आमच्यात दोन जण कन्नड भाषीक होते, त्यांच्याकडून भाषेचे धडे घेतांना

DSC04930.JPG

अख्खा रस्ता नदीच्या कडेने, झाडांच्या सावलीत वर, खाली चढत उतरत जात होता. हवेत मस्त गारवा होता.

day 1 walk 2.JPGday 1 walk.JPGday 1 walk 4.JPG

साडेबारा दरम्यान जेवायला थांबलो. इकडे चक्क अमूल ताकही मिळालं. मला ह्या बाकड्यांवर बसून झोपून जावंसं वाटत होतं. आज डब्यात पोळ्या आणि कोबीची मस्त भाजी होती. डबे खाल्ले आणि तिथेच झर्‍यावर धुतले.

lunch break.JPG

हिमाचलमध्ये डोंगराळ भागात आढळणारी अजून एक नवलाईची वास्तू म्हणजे पाण्यावर चालणार्‍या गिरण्या. अशीच एक गिरणी आम्हाला बघायला मिळाली. पाण्याच्या जोरावर पाती फिरतात आणि दळण दळलं जातं. ती बंद होती म्हणून आतून फोटो घेता आले नाहीत. ही ती गिरणी

DSC04940.JPG

अखेरीस अडीचच्या दरम्यान आमची पहिली 'सीमा' कॅंपसाईट आली. दरम्यानच्या काळात घोडे पुढे गेले होते आणि जरा वेळाने, टिम टीटीएच असे टी शर्ट घातलेले दोघे जण, पायात फक्त स्लीपर्स घालून आमच्या पुढे वेगात निघून गेले. ते आमचे मुख्य कुक आणि मदतनीस होते.

campsite.JPG

आज बाकी स्टाफ पुढे आल्याने तयार सेट केलेले टेंट्स मिळाले. हे टेंट्स अगदी लहान असतात. आत जेमतेम तीन माणसे झोपू शकतात. आणि ऊभं राहीलं तर ते डोक्यावर उचलेले जा ऊ शकतात. सो पँट्स घालणं हे जिकरीचं काम होतं. आमचे डबल शेअरींग होते. सॅक्स आम्ही आतच ठेवल्या कारण मध्येच पाऊस पडत होता. नियमानुसार लगेच टेंटमध्ये जाऊन झोपायचं नव्हतं कारण आत गुदमरल्यासारखं होऊ शकतं. बाहेरच जरा बसून मग आत गेलो. मोठ्या सॅक्सही आत नेल्या . बदललेले कपडे टेंटवर उन्हात पसरून ठेवले. दररोज कँपवर पोहोचल्यावर अंधार पडायच्या आधी आम्ही दुसर्‍या दिवशीची तयारी करुन ठेवत असू. सांगीतल्याप्रमाणे कपड्यांचे लेयर्स काढून ठेवणे आणि खाऊच्या पिशव्या भरुन घेणे. मी मिक्स ड्रायफ्रुट्स, स्नीकर्सची छोटी चॉकलेट्स, पेपर बोट्सची चिक्की, ड्राईड फ्रुट्स नेले होते. मोठ्या पिशव्यांमधून काढून आमच्या पाठीवरच्या सॅक्समध्ये लहान झिपलॉक पिशवीत ठेवत होतो. चालतांना कधी फारसं खाल्लं नाही, पण कँपवर आल्यावर मात्र भूक लागायची तेव्हा उपयोग व्हायचा.

दुपारी चार वाजता चहा आणि स्नॅक्स, रोज वेगळं काहीतरी आणि गरमागरम. आज भजी होती. त्यानंतर अ‍ॅक्लमटायझेशन वॉक म्हणजे आहोत तिथून अजून पुढे, ऊंचावर अर्धा पाऊण तास जाऊन यायचं. हे गरजेचं असतं कारण एव्हाना तुम्ही आहात त्या ऊंचीला सरावले असता. त्याहीपेक्षा ऊंचावर जाऊन खाली आलं की अजून थोडा सराव होतो. climb high, sleep low हा नियम आहे. आल्यावर सूप असे. रोज वेगळं, गरमागरम. ते पित असतांना आमचा ऑक्सीजन, पल्स रेट चेक करत आणि नोंद करत. त्यानंतर दुसर्‍या दिवसाचं ब्रिफींग ज्यात मुक्काम कुठे, किती अंतर, किती वेळ लागू शकतो, कधी निघायचं, रस्त्यात पाण्याची सोय काय, लेयरींग कसं करायचं आणि इतर महत्त्वाच्या सुचना. त्यानंतर जरा ब्रेक घेऊन साडेसातला रात्रीचं जेवण आणि मग झोप. हे असं जनरल schedule असे.

आज अ‍ॅक्लमटायझेशन वॉकला जातांना आमच्या कॅंपच्या पुढे बिकट अ‍ॅडव्हेंचरचा कँप दिसला. येतांना पुणे एअरपोर्टवर आमच्या मागच्या खुर्च्यांवर बसलेल्या मुलींच्या बोलण्यात, सांकरी सांकरी ऐकलं आणि न राहवून त्यांना विचारलं की तुम्हीही ट्रेकला जात आहात का ? त्या बिकट बरोबर ' हर की दुन' ला जात होत्या. त्या कदाचिक इकडे असतील म्हणून बघायचा प्रयत्न केला पण कँपवर शांतता होती. कदाचित अजून आल्या नसतील.

वरुन आमचे टेंट्स दिसत आहेत.

acclamatisation walk photo.JPG

परत आल्यावर रोजचं जर्नल लिहून आजचं राहीलेलं वाचन केलं.

me reading.JPG

आता इकडे, पाण्यात जाऊन वाचायची गरज होती का असं विचारू नका, कारण होती. : फिदी: रोज रोज थोडीच असं मिळणार आहे !

आज माझा ऑक्सीजन ९८ आला. आणि पल्स ७०.

थंडी चांगलीच वाढली होती. आज जेवणात गोड म्हणून गाजराचा हलवा होता.जेवण झाल्यावर मी लगेच जाऊन आडवी झाले पण गारव्याचा चांगलाच त्रास होत होता. काही वेळानी महेश येऊन मला जरा जबरदस्तीनेच बाहेर घेऊन गेला. बाहेर चक्क आतल्यापेक्षा कंफर्टेबल वाटत होतं शिवाय पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश. बाहेर १५/२० मिनीटे फेर्‍या मारायला लावल्या आणि मग आता जाऊन झोप म्हणाला. हालचाल करुन शरीरात ऊब निर्माण होते आणि मग झोपलं की ती ऊब स्लिपींग बॅगमध्ये ट्रॅप होते आणि थंडी वाजत नाही. खरोखर मला बर्‍यापैकी शांत झोप लागली. जाग येत होतीच पण तरीही थंडी कमी वाजली. मी स्लिपींग बॅगमध्ये गुरफटून घेऊन किंडल वाचायची ट्रीक शोधली, फक्त एका हातातला हातमोजा काढावा लागत होता, पण तरी जमलं.

रात्री दिड पावणे दोन दरम्यान टॉयलेट टेंट गाठावा असं वाटू लागलं. वर वर जातांना ams ( altitude mountain sickness ) चा त्रास होऊ नये म्हणून सतत म्हणजे अगदी स त त पाणी पिणे हाच एक ऊपाय आहे. आम्ही डायमॉक्स नेल्या होत्या पण एकदाही घेतल्या नाहीत. पाणी प्यायल्याने आणि जनरलच थंडी असल्याने जावसं वाटणं सहाजिकच होतं. इकडे गेल्या काही आठवड्यात अस्वलाचं सायटींग झाल्याने रात्री एकट्याने बाहेर पडायचं नाही अशी ताकीद मिळाली होती.

मला जायचं होतं आणि महेश गाढ झोपला होता. साडेचारपर्यंत वाट पाहिली आणि मग शेवटी हाक मारलीच त्याला. टेंटच्या बाहेर पडणं हेही एक ड्रीलच असतं. आधी तर (त्यातल्या त्यात ) ऊबदार स्लिपींग बॅगमधून हात बाहेर काढून चाचपून हेडटॉर्च लावायचा, डोक्याचा रुमाल/ टोपी नीट करायची. मग जीवावर येऊन अर्धवट झोपेत बाहेर यायचं, मग टेंटच्या दाराची चेन ऊघडून, ग्लोव्ज काढून फ्लोटर्स घालायचे. पायात वुलन सॉक्स असतात ते फ्लोटर्सच्या वेलक्रो मध्ये अडकतात , ते ओढाताण करत काढायचे, फ्लोटर्स जेमतेम अडकवून, बाहेरची कनात ऊघडून रांगत भेलकांडत बाहेर पडायचं. : राग:

बाहेर थंडीचा जोरदार फटका बसतो.

पण बाहेर चंद्राचा चमकदार प्रकाश पडला होता. गवतातून धडपडत टॉयलेट टेंट गाठला.

हे टेंट म्हणजे एक खड्डा खणलेला असतो, त्यावर लावलेला आडोसा. आमचे २ असत. त्यातल्या एकाची चेन खराब झाली होती, ती एका विशिष्ट जागेपेक्षा जास्त उघडली की पुन्हा लागायची नाही आणि दररोज कोणीतरी एक जण ती पूर्ण उघडायचाच. मग तो टेंट बाद व्हायचा आणि दुसर्‍यावर सगळी जवाबदारी यायची.

आपलं काम झालं की तो खड्डा खोदतांना जी माती बाजूला काढलेली असे त्यातली थोडी, तिथेच ठेवलेल्या लहानश्या फावड्यानी खड्ड्यात ढकलून द्यायची. फिदी:

आता उठलो आहोतच तर दातही घासून घ्यावेत. दात घासणं पण दिव्य असतं कारण तेच. ग्लोव्ज काढावे लागतात आणि थंडगार पाण्याने चुळा भरणं अवघड होतं. ह्यावर आम्हाला एक उपाय सापडला म्हणजे आमच्या ग्रुपमधल्या एकाने सांगितला, तो म्हणजे माऊथवॉश.

आज आम्ही होतो तिथे जरा मॅनेजेबल होतं. पण जशी थंडी वाढेल तसं हे कठीण होणार होतं. शिवाय प्रत्येक कॅंपवर पाणी मिळेल्च, असलं तरी बर्फ झाला असू शकेल ही शक्यता असते. त्यामुळे आता आमच्या ट्रेकच्या मास्टर लिस्ट मध्ये माऊथवॉश घातला आहे.

बाहेर खूप प्रसन्न वाटत होतं. पण चहाला अजून तासभर होता म्हणून पुन्हा जाऊन झोपलो. एव्हाना २/३ जण उठले होते पण ते कोण आहेत हे कळत नव्हतं. कारण टोप्या, जॅकेट्स मध्ये चेहरा दिसत नव्हता. पुढे पुढे जॅकेट्स बघून कोण आहे हे लक्षात येऊ लागलं.

लवकर उठण्याचा फायदा झाला की टॉयलेट टेंटच्या बाहेर लाईनमध्ये उभं रहायला लागलं नाही. फिदी:

आता आजचा मुक्काम असेल डायरेक्ट १०,२०० फुटावर. देवसु बुग्याल

क्रमश :

 

बाली पास - पुढचे दिवस

Submitted by धनश्री. on 26 October, 2023 - 04:40

ट्रेकचा दुसरा दिवस - मुक्काम देवसु बुग्याल.

७००० वरुन १०,२०० फूट. अंतर साधारण ८/९ किमी. वेळ ५/६ तास.

आज आम्हाला हॉट लंच होतं. एव्हाना हॉट लंच म्हणजे जास्त चालायचं नाहीये हे लक्षात आलेलं होतं. बरोबर ८ वाजता निघालो.

निघाल्या निघाल्या आमच्या रस्त्यावरचं शेवटचं दुकान लागलं. आणि पाऊसही सुरु झाला म्हणून आम्हाला थोडा वेळ आडोश्याला ऊभं रहायला सांगीतलं आजचाही रस्ता कालसारखाच. फक्त जरा जास्त दाट झाडी लागत होती. बाजूला कालचेच लाल तुरे होतेच. बरोबर खळाळत वाहणारी नदी होतीच. ती कधी डावीकडे, कधी उजवीकडे.

on the way.jpeg

चढ, उतार, लहानमोठे ओढे, दगड , माती चिखल पार करत हळू चालत, मध्ये ब्रेक घेत कँपसाईटवर पोहोचलो. आम्ही वर वर जात होतो. त्यामुळे उतार आला की आता दुप्पट चढ येणार ह्याची धडकी भरायची. इथेच रस्त्यात एका ठिकाणी एका पुलावरुन हर की दुन ट्रेकचा रस्ता वेगळा होतो.

DSC04967.JPG

आजपासूनच्या चालण्याचं एक सुख होतं ते म्हणजे स्वर्गरोहिणी पिकचं होणारं दर्शन. पांडव ज्या मार्गावरुन स्वर्गात गेले ते शिखर आजपासून आमच्या बरोबरीने असणार होतं. हे अजून कोणीही सर करु शकलेलं नाहीये, ज्यांनी प्रयत्न केला ते परत आले किंवा नाहीसे झाले.

svargrohini.JPG

एका ठिकाणी सरळ उतार उतरुन पुढे तसाच उभा चढ चढून जायचं होतं. उताराच्या टोकाला तळाशी गर्द झाडी आणि प्रचंड गारठा होता आणि बाजूला ऊंच सुळके. तिथे वर मधमाश्यांचा एक मोठ्ठा थवा (?) भिरभिरत होता. हजार दिड हजार तरी असतील आणि प्रचंड मोठी पोळी लागली होती. त्या वरच राहू देत अशी प्रार्थना करत घाईघाईने तो भाग ओलांडला. शेवटचा चढ बराच कठीण होता. त्यानंतर आलेलं पठार कसंबसं पार केलं आणि कँपसाईटवर पोहोचलो.

घळीकडे जाणारा रस्ता

DSC04986.JPG

आज रस्त्यात एक गंमत झाली. एका ठिकाणी खूप अरुंद अश्या घळीतून खाली उतरायचं होतं. खूप अंधारी आणि झुडूपांनी गच्च भरलेली. आमचा सगळ्यात पुढचा गाईड आत शिरला आणि लगेच बाहेर आला. जरा थांबा म्हणे. तर दोनच मिनीटात आतून आणि बाकी सगळीकडूनच शेळ्याच शेळ्या बाहेर पडू लागल्या. आणि बाहेर आम्ही सगळे तर त्या बिचकून पुन्हा उलट्या वळून जाऊ लागल्या. मग आम्हाला मागे जा मागे जा करत त्यांना रस्ता दाखवला. जवळजवळ हजाराच्या आसपास असतील. आणि त्यांना सांभाळायला ३/४ जण. मध्येच एक माणूस बाहेर आला तो त्याच्याकडे हे

DSC04982.JPGDSC04979.JPG

ह्या बॅगेत किमान ४/५ पिल्ले होती, ती तीन दिवसांची होती. त्यांना आता वर थंडी सहन होणार नाही म्हणून खाली नेत होते. खरं सांगते, ती पिल्ले आणि घाबरुन भराभरा जाणार्‍या त्या शेळ्या बघून माझा नॉनव्हेज न खाण्याचा निर्णय अजून अजून पक्का होऊ लागला. आणि मी सिरीयसली ह्यावर विचार करते आहे.

कँपवर पोहोचलो . आमच्या पुढे मागे बिकट अ‍ॅडव्हेंचर टिम होती. त्यांचा एक ग्रुप बाली पास करत होता. कँपसाईटवर जागा अगदी थोडी असल्यामुळे त्यांच्यात आणि आमच्या गाईड्स मध्ये जागेसाठी जरा चढाओढ झाली. त्यांचा आणि आमचा एकाच छोट्या मैदानावर पुढेमागे कँप लागला. आमचे कँप्स उतारावार होते. त्यामुळे त्या रात्री आम्ही सगळे घसरत टेंट्स च्या दाराशी जात होतो. आणि मग अर्धवट झोपेत स्लिपींग बॅग मध्ये कसंबसं वर सरकत होतो. : हाहा:

आज जरा लवकर पोहोचल्याने लंचच्या वेळेपर्यंत dumb charades खेळलो. प्रचंड धमाल आली. आणि मग रोज कँपवर पोहोचल्यावर हे पण एक रुटीन झालं.

campsite_0.JPG

संध्याकाळी नेहमीप्रमाणे acclamation walk ला नेलं. पावसाळी हवा होती. एव्हाना सगळ्यांशी बर्‍यापैकी ओळखी झाल्या होत्या. चालतांना मागे सप्तचिरंजिव वगैरे ऐकलं., वळून पाहीलं तर जितेंद्र दोघांना सांगत होता आणि त्याला नीट आठवत नव्हतं तर त्यांच्या संभाषणात घुसले. आणि मग आमच्या मस्त गप्पा रंगल्या. जितेंद्र जेमतेम २८/२८ वर्षांचा, पण त्याला बरीच माहिती असल्याचं बघून कौतुक वाटलं.
आज पाऊस होता, त्यामुळे उद्या कसं काय होणार अशी शंका होती.

view from tent.JPG

आज दुपारी चहाबरोबर गरमागरम मठरी आणि रात्री खीर होती.

पहीले दोन दिवस तसे बरे गेले तरी गाईड्स अभी तक ट्रेक शुरुही नही हुआ है ह्यावर अडून होते. Uhoh Uhoh Uhoh

--------------------------------------------------------------------

ट्रेकचा तिसरा दिवस - मुक्काम रुईनसारा ताल

१०,२०० वरुन ११,८०० फूट . अंतर १२ किमी. वेळ ६/७ तास.

उद्याचा मुक्काम असणार होता रुईनसारा ताल. रुईनसारा ताल हा ही एक वेगळा स्वतंत्र ट्रेकच आहे. आता ह्यात एक कॅच होता. उद्या आम्हाला सुपीन नदी ओलांडायची होती. जर दुपारी एक पर्यंत पोहोचू शकलो तरच नदी क्रॉस करायची नाहीतर परवा सकाळी कारण उन्हे जशी चढत जातात तसे वरचे ग्लेशियर वितळतात आणि खाली नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढतो. परवा सकाळी नदी ओलांडायची कोणाचीच तयारी नव्हती कारण सकाळी महा प्रचंड थंड पाणी असणार आणि तसंच पुढे चालत जायचं म्हणून सगळ्यांनी ठरवलं की काहीही झालं तरी उद्याच पलीकडे मुक्काम करायचा. त्यामुळे लवकर, सात वाजता निघायचं ठरलं.

आज बरच चालायचं असल्याने आमच्या कुकने आम्हाला पोटभर पोहे, मॅकरोनी आणि खीर खायला घालून रवाना केलं.

चालण्याची सुरुवात उतारापासून. जवळजवळ अर्धा तास उतरत होतो., ते ही दाट झाडीतून आणि किचकट रस्त्यावरुन. बरेचदा पाय घसरला, कालच्या पावसामुळे चिखलही झाला होता. ह्या उतारावरुन पुढच्या चढांचा अंदाज आला.

उद्यापासून हळू हळू झाडी विरळ होत जाणार.

on the way_0.jpeg

पण आजचा दिवस चालतांना सगळे अनुभव घेऊन आला.
चढ, उतार, तीव्र चढ त्यामुळे तीव्र उतार, झुडूपे, माती, वाळू, मोठे दगड, चिखल, छोटे ओहोळ आणि चक्क धबधबे

waterfall.JPG

ह्या फोटोत नीट दिसत नाहीये पण मस्त धबधबा होता. हा शेवटचा टप्पा होता चालण्याचा पण अर्थात माहिती नव्हतं. फार फार दमले होते आणि अवचित तो समोर आला. मग भिजून ताजंतवानं वाटलं. मला भिजायला अज्जिब्बात आवडत नाही. पण परत, ही अशी संधी कोण सोडेल ? भिजून घेतलं. पण शुज ओले होऊ लागले म्हणून मन आवरलं.
हा आमचा राम तेरी गंगा मैली फोटो Lol

आज चालणं खरंच कठीण वाटत होतं, त्यात वेळेवर पोहोचण्याची घाई होती. ब्रेक्स कमी घेतले जात होते.

एक कठीण चढ चढून आल्यावर....... इथेच टाका तंबू

इथेच टाका तंबू.jpeg

एक वाजायला आला तरी टेंट्स काही दिसेनात. आज काही नदी ओलांडता येणार नाही बहुदा. आमच्या गाईड्सनी स्पष्ट सांगितलं होतं की सारखं सारखं, आता किती वेळ विचारु नका. गुड्डूभाई गाईड तर वाटेल ते उत्तर देत. पण आमची अवस्था बघून ह्यावेळी त्यांना दया आली आणि गिनके २० मिनीटमे पोहोच जायेंगे हे ऐकल्यावर आमच्या अंगात त्राण आले.

आणि बरोबर २० मिनीटांनी

camps in sight.JPG

फायनली थकून भागून नदीकाठी पोहोचलो.

पुढे दुसरं दिव्य होतं ते बर्फासारख्या थंडगार पाण्यातून अनवाणी, दोराला धरुन नदी क्रॉस करण्याचं. नदी दोराला धरुन ओलांडायची होती.

river crossing.jpeg

आमचे फ्लोटर्स आम्ही ठेऊन घेतले होते. शुज काढून ते घातले. लेसेस बांधून शुज गळ्यात अडकवले. पँट फोल्ड केली आणि इकडेतिकडे न बघता सरळ काठाशी गेले. इकडेतिकडे, पाण्यात बघू नका, सरळ समोरच्या डोंगरांकडे बघा आणि पाय उचलू नका, सरकवा हे ऐकून पाण्यात पाय घातला. आणि त्याक्षणी काय धक्का बसला ! पाणी अती म्हणजे अतीच थंड होतं, पुढे नदी कशी ओलांडली ते आठवत नाही पण बाहेर आल्यावर पावलं लालभडक झाली होती. पुढे बराच वेळ तो बधिरपणा राहीला.

WhatsApp Image 2023-10-06 at 7.10.51 PM.jpeg

सगळ्यांनी ओरडत, किंचाळत नदी क्रॉस केली आणि मग जल्लोश केला.

हा सगळा वेळ आमचे गाईड्स पाण्यात पाय रोऊन दोर धरुन उभे होते. ज्यांना मदत लागली त्यांच्या बरोबरीने नदी क्रॉस करत होते. आणि आमची अवस्था बघून हसतही होते.

आम्ही रोज निघण्याच्या आधी वॉर्म अप आणि कँपवर पोहोचल्यावर कूल डाऊन करत असू. आज सुट्टी. आज अ‍ॅक्लमटायजेशन वॉकलाही सुट्टी.

दुपारी चहाबरोबर व्हेज चॉप्स चापले.

ही कॅंपसाईट.

campsite.jpeg

आम्ही रोज सकाळी निघतांना स्लिपींग बॅग्ज पॅक करुन ठेवत असू.
आल्यावर टेंट्स लावायला आणि निघतांना डिस्मेंटल करायलाही जमेल तशी मदत करायचो. पण आमची ती मदत म्हणजे लुडबूड होती. तरी शेवटच्या दिवसापर्यंत बर्‍यापैकी तयार झालो.

उद्या सकाळची नदी क्रॉस करायची सर्कस टळल्याने सगळे खुश होते.

बिकटची जी टिम आमच्या मागे पुढे होती ( खरं तर पुढेच असे. ७/८ जण होते आणि हे लोक अगदी टेकण्यापुरते ब्रेक घेत होते. इकडेतिकडे न बघता सतत चालत होते )
त्यांनी नदीच्या पलीकडे मुक्काम केला. दुसर्‍या दिवशी आम्ही नदी क्रॉस करतांनाची त्यांची कसरत पाहून घेतली.

रोज प्यायचं पाणी आम्हाला अश्या नदी, ओढ्यांमधून भरुन घ्यावं लागायचं. फक्त शेवटच्या २ दिवशी एक एक थर्मासभर गरम पाणी मिळालं.
पाण्यासाठी आम्हाला आमच्या हायड्रेशन बॅग्ज ( बॅग्ज म्हणायचं, त्याचं खरं नाव आहे हायड्रेशन ब्लॅडर ) चा खूप उपयोग झाला. अगदी हॅन्ड्स फ्री. ( हा फोटो देता येत नाहीये )

नदीच्या काठावर फोटो काढायलाच हवा. (हे दुसर्‍या दिवशी निघतांना)

us on banks.jpeg

रात्री मजा झाली. एकतर एकही रात्र सलग झोप लागत नव्हती. आज टेंट जरा सपाटीवर होते आणि खाली गवत असल्याने जरा बरं होतं पण थंडी चांगलीच वाढली की शेवटी पायातही थर्मल घालावे लागले.

तर गंमत. रात्री पावणे दोन, दोनच्या दरम्यान शेळ्यांचं ओरडणं ऐकू येऊ लागलं. ६/७ असतील. कँपच्या जवळून आवाज येत होता. बहुदा कळपातून चुकल्या असाव्यात. बराच वेळ आवाज येत होता. खूपच अस्वस्थपणा आला. बिचार्‍यांना भेटू देत आपले भाईबंद.
सकाळी चौकशी केली तर गाईड्स म्हणाले ६/७ नव्हत्या दोनेक हजार असतील, त्या इकडून पुढे जात होत्या.

चला, निम्मा ट्रेक संपला. Happy

उद्यापासून खरी चढाई सुरु. ( म्हणजे गेले ३ दिवस काय करत होतो ?)
-------------------------------------------------------------------

ट्रेकचा चौथा दिवस - मुक्काम ओदारी

११,८०० वरुन १३,१०० फूट. अंतर ४ किमी. वेळ ५ तास.

आज उपमा आणि ब्रेडबटर खाऊन आरामात ८ वाजता निघालो.

आज बराच चढ असल्याने आणि जेवण कँपसाईटवर असल्याने सगळे निवांत होते. आरामात, थांबत फोटो काढत पुढे जात होतो.
स्वर्गरोहिणी आता बाहेर डोकावू लागलं होतं.

swargarohini.JPG

आजूबाजूचा परिसरही बदलायला लागला होता.

ह्या घळीच्या टोकाला, पार पलीकडे कँप होता

camp in sight.JPG

आणि सावकाश कँपसाईटवर पोहोचलो.

DSC05101.JPG

आजचा अ‍ॅक्लमयटाजेशन वॉक म्हणजे दुष्टपणा होता. आधी आम्हाला चविष्ट नुडल्स खायला घातले Lol ( हे नुडल्स उकळत्या पाण्यातून काढतांना आम्ही दुपारीच पाहीले होते. त्यावरुन आजचं जेवण काय ह्याच्या पैजा लागल्या होत्या, ( पैजा काय लावायच्या त्यात, सरळ सरळ दिसत होतं ना ! पण जो हरेल तो पुन्हा सुपीन नदी क्रॉस करुन येईल असं ठरलं ) पण आम्हाला सगळ्यांना क्लिन बोल्ड केलं ! आणि सगळेच हरल्याने सुपीन नदी क्रॉस करण्याचा बेत रद्द केला गेला ) Lol आणि मग कँपच्या मागे एक ऊभा सुळका होता. तिकडे चला म्हणून चालवायला सुरुवात केली तर थांबेचनात.
आजच बाली पासला पोहोचवणार की काय !

शेवटी वर वर नेऊन आता उतरा असं सांगीतलं. उतरणं अजून कठीण. परवा आप्ल्याला अश्याच रस्त्यानी उतरायचं आहे., तो तर जेमतेम पाऊल टेकेल इतका अरुंद आहे, आणि तिकडे थोडंथोडंकं नाही तर पाऊण तास चालायचं आहे शिवाय बाजूला दरी असेल तर आत्ताच जमवून घ्या.

आमचा लीडर एवढंच बोलायचा.

acc walk.JPG

आम्ही ह्याही पेक्षा ऊंचावर होतो. फोटो काढायचे राहीले. दिसतांना, त्यात काय असं वाटेल पण तो सरळ ऊभा ऊंच चढ होता.

आमच्या दु:खावर ऊतारा म्हणून रात्रीच्या जेवणात शिरा होता.

कॅंपसाईट रात्रीच्या वेळी

campsite at nite.jpeg

इकडे थंडी अजून वाढली म्हणून अजून एक थर्मल घालायला सुरुवात केली.
रात्री स्लिंपिंग बॅगमध्ये घालायला वॉर्मर्स मिळाले. हे पातळ पण उबदार, स्लिपिंग बॅगसारखेच शिवलेले असतात. ते बॅगच्या आत ठेऊन त्यात आधी शिरायचं आणि मग झटापट करुन दोन्हीच्या चेन्स लावायच्या. वॉर्मर्सची ऊंची बॅगपेक्षा कमी होती बहुतेक ( किंवा आम्हाला ते जमलं नाही ) मग अती वैतागून ते पांघरुणासारखे गुंढाळून घेतले.

उद्या बेसकँप. !!!

उद्यासाठीचं ब्रिफींग करतांना, कँपवर जोरदार वारा असतो त्यामुळे टेम्परेचर अजून कमी होतं तेव्हा कान नीट झाकलेले ठेवायला सांगीतले.

उद्याचा हायलाईट होता, नामा कांडी रिज.(ridge)

सकाळी टेंट्स वाईंड अप होतांना

wind up.JPG

एवढी थंडी होती की उन्हात उभं राहूनही सहन होत नव्हती !!!!
--------------------------------------------------------------------
ट्रेकचा पाचवा दिवस - मुक्काम बाली कोल कँप ( बेस कॅंप )

१३,१०० वरुन १५,१०० फूट. अंतर अंदाजे ४ किमी. वेळ ५ तास.

आज आम्ही बेस कँपला पोहोचणार. Happy

सुरुवात चढापासून होती. जरावेळात चढाला सरावलो. झाडे जाऊन आता सगळीकडे रेती, सुटे, मोठे दगड दिसायला लागले होते.

scene.JPG

हवेत गारवा होताच की आठ वाजताही हातमोजे घातले होते.

पहीला चढ चढून आल्यावर ब्रेक घेतला.

break_0.JPG

काही वेळात ती रिज (सुळका किंवा कड ) येणार. तो भाग कठीण असणार आहे. चालतांना डावी उजवीकडे बघू नका, पायाखाली बघा. घाबरु नका. हे ऐकून उत्सुकता वाढली होती.

पलीकडे लगेच टेंट्स असणार हे ही सांगीतलं होतं म्हणून,काय एवढं, थोडाच वेळ चालायचं असेल असंही वाटत होतं
चालायला सुरुवात केली.
तर पुढचा चढ चढल्यावर

ridge.JPG

बघितल्यावर एकदम छाती दडपल्याची भावना निर्माण झाली. फोटोत दिसतांना जरी असं वाटत असलं की ही कड सरळ आहे, चढ नाहीये तरी तसं नाहीये. हा सरळ ७० अंशाच्या कोनात चढणारा रस्ता होता. आणि दोन्हीकडचे उतार सरळसोट खाली गेलेले होते. जेमतेम एक पाऊल मावेल एवढीच पायवाट. मी आधी अंदाज घेतला. इकडे पाय बिय घसरला तर काय होऊ शकेल. जास्तीत जास्त काही हाडं मोडतील.
चालायला सुरुवात केली.

ridge 2.JPG

हे संपल्यावर टेंटस येतील ह्या आशेवर होतो तो पुढे किंचीत उतार आला आणि दुसरा चढ. पुढे तिसरा, चौथा. संपेचनात. सगळे दमले होते, वैतागले होते. चौदा साडेचौदा हजारावर आल्याने दम लागत होता. आणि टेंट्सचा पत्ताच नाही. एव्हाना घोडे आणि सपोर्ट स्टाफ पुढे गेले होते. हे कुक आणि हेल्पर्स पायात क्रॉक्स, साध्या स्लिपर्स घालून अश्या वेगात चालत जायचे की आम्हाला लाज वाटायची.

scene_0.JPG

पाच चढ क्रॉस केल्यावर शेवटी टेंट दिसले.

चालण्याच्या शेवटच्या ट्प्प्यात आमच्या गृपमधला सनी माझ्याबरोबर होता. तो नॅशनल लेव्हलवर नऊ वेळा मार्शल आर्ट्स वगैरे खेळात खेळला आहे. त्याशिवाय ब्राझिलियन जिजुत्सू वगैरे अचाट नावांचे खेळही तो खेळतो. त्याची बायको अनन्या एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलीस्ट आहे. ती पण होतीच आमच्याबरोबर. दोघेही जेमतेम तिशीचे.

company on ridge.JPG

कॅम्पला पोहोचल्यावर हुश्श झालं.

आज इकडे वेगळंच द्रुश्य होतं. बर्‍याच जणांना काही ना काही त्रास होत होता. डोकं तर बहुतेक सगळ्यांचचं दुखत होतं. मळमळणं, गरगरणं. गाईड्स त्यांना भरपूर पाणी प्या असं सारखं सांगत होते. मला चक्क उकडत होतं. नशिबानी महेशला किंचीत डोकं दुखण्यापलीकडे काही होत नव्हतं आणि मी अगदी बरी होते. त्यावरुन ' आम्हाला डोकं आहे वगैरे नेहमीचे जोक करुन झाले ). आज दुपारी टेंटमध्ये अजिबात जायचं नाही अशी सक्त ताकीद होती. त्यांनी सांगितल्याप्रमाणे वारा बिरा नव्हता म्हणून गारवाही सहन करण्याइतपत होता.

जेवण झाल्यावर आम्ही काही जण असच चालायला गेलो. समोरच पास दिसत होता. हा तर सहज क्रॉस करु शकू.

चहा झाल्यावर ( चहा बरोबर फ्रायम्स होते ) वॉकसाठी त्याच रस्त्याने पुन्हा नेलं.

वरुन दिसणारं दृश्य

acc walk view.JPG

आणि हे झळाळतं स्वर्गरोहिणी.

swargarohini in evening.jpeg

खाली आल्यावर ऑक्सीजन चेक. आजपर्यंत रोज माझा ऑक्सीजन ९६-९८ असे. पल्सही ७० च्या आसपास. बरेच जण ९० च्या वर किंवा ८८-९० पर्यंत असत. पण आज हायेस्ट मार्क्स ९० आले. माझा ऑक्सीजन ८८ आणि पल्स चक्क ७९. ते साहाजिकच होतं.

आज शेवटचं ब्रिफींग.

उद्या एकूण १४ किमी चालायचं आहे. पोहोचायला उशीर होईल.

पहाटे २ ला उठायचं. ३ ला चहा ब्रेफा आणि ४ ला निघायचं.

भरपूर पाणी भरुन घ्या

नीट लेयरींग करा

कान नीट झाकलेले ठेवा

आम्ही सांगू त्याच क्रमाने चालायचं. एकानेही लाइन सोडायची नाही.

समीटवर जास्तीत जास्त ५ मिनीटं थांबायला मिळेत त्यात काय ते फोटो काढून घ्या.

पुढे किचकट उतार असतील तिथे, आता उतरायचं आहे म्हणून घाई गडबड करु नका वगैरे वगैरे.

वातावरणात थोडी अ‍ॅन्झायटी, थोडं टेन्शन होतं.

जेवणाआधीच आम्ही उद्याचे कपडे घातले. पहाटे २ वाजता कपडे बदलण्याची हिंमत नव्हती.

मी वर एकूण ६ लेयर्स ( थर्मल, वर ट्रेकींगचा फूल स्लिव्ज टी शर्ट, त्यावर रनिंगचा ड्रायफीट टी शर्ट,त्यावर पुन्हा थर्मल, त्यावर साधा कॉटनचा टी शर्ट, आणि वर नेहमीचं डाऊन+ फ्लिज जॅकेट )
आणि पायात ३ लेयर्स ( थर्मल, कॉटन पँट त्यावर ट्रेकींगची पँट )
डोक्याला रुमाल, मला रुमाल आवडतो, हवा तसा सैल घट्ट करता येतो आणि त्यावर लोकरी कान झाकणारा पट्टा.
मला एकावर एक २ सॉक्स लेयर्स हवे होते पण ते फार घट्ट झाले असते म्हणून एकच घातले, शिवाय हातमोजे.

सॅकमध्ये अजून एक थर्मल ठेऊन घेतला. झिपलॉक पाऊचेस मध्ये भरपूर खाऊ ठेऊन घेतला.

जेवायला गोडात कस्टर्ड होतं लवकर जेऊन, नेहमीप्रमाणे फेर्‍या मारुन थोड्या अस्वस्थतेत, थोड्या उत्सुकतेने झोपायला गेलो.

समीट तर होऊन जाईल. समोरच दिसतय. चढ असला तरी पसरट आहे. धडपडण्याची भिती नाही. पण पुढे हे म्हणत आहेत तो उतार कसा असेल?

क्रमशः

https://www.maayboli.com/node/84297

 

 

 

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...