Thursday, December 29, 2022

ऑफबीट ‘कोकणदिवा’ ट्रेक….!!

https://ravindrainamdar.wordpress.com/2018/01/10/%e0%a4%91%e0%a4%ab%e0%a4%ac%e0%a5%80%e0%a4%9f-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%a3%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%95/

DSC_0125

कोकणदिवा शिखरमाथा

वर्षा ऋतू मध्ये एकादा नवखा आणि ऑफबीट ट्रेक करायचा मानस खूप दिवसापासून होता, पण नेमका कोणता ट्रेक आणि कोणती मोहीम आखावी या बाबत मात्र संभ्रमावस्था होती. आणि मगं बऱ्याच शोधाशोधी नंतर शेवटी ठिकाण पक्कं करण्यात आलं ते म्हणजे पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवरील गिरिशिखरांच्या पसाऱ्या मध्ये उठून दिसणारा शिखर माथा म्हणजे ‘कोकणदिवा’, हा टेहळणी गड…!! कोकणात उरतणाऱ्या घाट वाटा आणि किल्ले रायगडावर नजर ठेवून असणारा, थोडासा अपरिचित असा ‘कोकणदिवा’…!!DSC_1091     प्रथमतः गुगल बाबा, ट्रेक क्षितिज वेब साईट आणि इतर जुन्या जाणकार भटक्या मित्रांकडून जितकी जास्त माहिती मिळवता येईल तितकी जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. जसं की, पुण्याहून बेस व्हिलेज पर्यंत पोहोचण्याचा मार्ग, बेस व्हिलेज ते किल्ल्या पर्यंत जाण्याचा वाटा, वाटेत येणारे अडथळे ई. सर्व गोष्टींची माहिती घेऊन शेवटी प्रस्थानाचा दिवस निश्चित केला. दिनांक 9 जुलै सकाळी ८ च्या सुमारास अमोल, श्रीराम, योगेश, स्वप्नील आणि मी अश्या ५ भटक्या मित्रांनी  सिंहगड फाट्यावरून पुण्याला रामराम केला आणि कोकणदिव्याच्या दिशेने गाड्या रेमटवायला सुरवात केली…!!

11235279_1246225308727367_2874024682093215210_o

साभार:- गुगल इमेजेस

Advertisements
Report this ad

कोकणदिव्याला पोहचण्यासाठी पहिला गाठावं लागतं ते ‘घोळ’ (हे गावचं नाव आहे बरं का 😛) पुण्या पासून ७५ किमी अंतरावर असणारं वेल्हा तालुक्यातील शेवटच्या एस टी थांब्याचं गावं…!! खरं तर पुणे जिल्ह्यातील शेवटचे गाव ‘गारजाईवाडी’, पण ही एक दुर्गम डोंगरात वसलेली  छोटीशी वाडी आहे. इकडून पुढे चालू होते ती रायगड जिल्ह्याची हद्द…!! पुण्याहून निघून खडकवासला डॅम आणि किल्ले सिंहगड परिसराचा आनंद लुटत आमचं मार्गक्रमण चालू होतं. सिंहगड ते पानशेत गाव हा रस्ता म्हणजे बाईक राईडिंग करण्याऱ्या लोकांसाठी पर्वणीच म्हणावा लागेल…!!😍😍 DSC_0738     पानशेत गावात पोहोचल्यावर थोडी पोट पूजा उरकून घेतली आणि स्थानिक लोकांच्या कडे दापसरे आणि घोळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची विचारपुस केली. तसं तर गुगल म्यापला लोकेशन सेट केलंच होतं पण “टेक टर्न टू द लेफ्ट अँड टेक टर्न टू द राईट” म्हणत ती गुगल वाली बाई कधी कुठं घेऊन जाईल ह्याच्या काय नेम नसतो. 😜😜 त्या मुळे आपलं इंडियन गुगल म्यापच बेष्ट म्हणत स्थानिक लोकांनी सांगितलेल्या दिशेने प्रवास सुरु केला….!! पानशेत डॅमला लागून आणि वरसगाव डॅम च्या डावीकडून एक फाटा थेट पानशेत बोटिंग क्लब मार्गे दापसरे-घोळ गावात जातो. पानशेत गाव ते दापसरे-घोळ हा जवळपास २० ते २५ किमीचा पट्टा संपूर्णतः पानशेत धरणाच्या बॅक वॉटरला लागून जाणारा कच्चा पण नयनरम्य असा रोड. जागोजागी थांबून फोटो काढण्याचा मोह कोणाला ही आवरता न यईल अगदी असा….!! 😍😍

DSC_0932

पानशेत डॅम बॅक वॉटर

DSC_0927    पावसाने पहिल्या टप्प्यात दमदार हजेरी लावल्याने भातखाचरं पाण्याने तुडूंब भरली होती त्यामुळे संपूर्ण मुठा खोरे मावळ प्रांतात भातलागणीच्या कामाला चांगलाच जोर धरला होता. जिकडे तिकडे शेताच्या आवारात बळीराजा आपल्या कामात अगदी व्यस्त दिसत होता, आणि पावसात नाहून निसर्ग हिरवाईचा शालू परिधान करून एकाद्या नव्या नवरी सारखा सजला होता…. 😍😍 जागोजागी खळाळत वाहणारेे नदी, नाले, ओढे आणि धबधबे हे म्हणजे जणू दागिन्यांचा साजचं वाटतं होते. वर्षा ऋतूचा हा सारा सोहळा डोळा भरून अनुभवण्याचं स्वर्ग सुखं काही औरचं असतं…!! ☺️☺️  हे सारं चित्र पाहताना मनातून एकच उदगार निघत होते “अन्नदाता सुखी भव:”….!! 🙏🙏DSC_0935DSC_0946   पानशेत घोळ रस्ता काही जागी रस्ता कच्या लाल मातीचा तर काही जागी बाहेर पडलेल्या खडी आणि सिमेंटचा आहे, काही जागी उंच चढण आहे तर काही जागी तीव्र उतार आहे. विशेषतः ठिप-ठिप्या घाटातील उतार हा खूपच तीव्र स्वरूपाचा आहे.. पानशेत ते दापसरे फाटा हे अंतर कव्हर करण्यासाठी आम्हाला जवळपास पाऊणतास ते तासभराचा वेळ लागला. वाटेत जेथे हवं तेथे थांबत निर्सगाचा आस्वाद घेत आणि फोटोग्राफीचा आनंद लुटत अगदी निवांत असा आमचा प्रवास चालू होता. शेवटी दापसरे फाटा ते घोळ गाव ४ ते ५ किमी अंतर पार करून साडे दहा ते अकराच्या सुमारास एकदाचे आम्ही घोळ गावात पोहोचलो….!!DSC_0981     घोळ गावात पोहोचल्या नंतर एका घरा समोर गाड्या पार्क केल्या आणि कोकण दिव्या विषयी विचारपूस करून तेथीलच एका स्थानिक रहिवाशी काकांना सोबत घेऊन गारजाईवाडीच्या दिशेने वाट चालू लागलो. गारजाईवाडी मार्गे कोकणदिवा हा दोन ते अडीच तासाचा ट्रेक आहे. वाटेत जागोजागी धोधो कोसळणाऱ्या धबधब्याचा पाण्याचा लोट पार करत आणि लाल मातीच्या चढ उतारांच्या पाय वाटेवरून चालताना एक वेगळीच सुखद अनुभूती येत होती…!!

DSC_1007

स्लो शटर स्पीडची करामत

DSC_1073DSC_1011    दऱ्या खोऱ्या आणि डोंगरांच्या कुशीत वसलेली जेमतेम २० ते २५ घरांची छोटीशी गारजाईवाडी आम्ही तासाभराच्या पायपीटी नंतर जवळ केली होती. कोकणदिव्याच्या शिखर माथ्याचं पहिलं दर्शन घडतं ते गारजाईवाडी पार केल्यानंतरचं. जंगलातुन आणि घनदाट झाडीतून जाणारा रस्ता हा पावसाळ्याच्या दिवसात उगववलेल्या उंचच उंच गवताच्या सडयांमुळे पूर्णतः नवखा वाटू लागतो. जर तुम्ही पहिल्यांदाच आणि ते ही पावसाळी दिवसात कोकणदिव्यावर जात असाल तर स्थानिक रहिवाश्याच्या मार्गदर्शनाशिवाय जाण्याचा मुर्खपणा न केलेलाच बरा…!!

DSC_1085

गारजाईवाडीतून दिसणारा कोकणदिवा

DSC_1079

DSC_1099

अळवावरचं पाणी

गारजाईवाडीच्या डोंगरातील घनदाट झाडी पार करताना वाटेत एका जागी एक छोटसं मंदिर वजा समाधी लागते. तेथून १० ते १५ मिनिटाच्या अंतरानंतर पठाराचा भूभाग लागतो. येथून एका बाजूला सरळसोट उभा होता तो कोकणदिवा एका बाजूला होती ती खोल दरी कावळ्या घाट…!!DSC_0001DSC_1084DSC_1087DSC_1088    कावळ्या बावळ्या खिंडीच्या बाबतीत वाचनात आलेला इतिहास म्हणजे सर्कले नाईक आणि गोदाजी जकताप यांनी स्वराज्यावर चालून आलेल्या शहाबुद्दीन खाना विरुद्ध निखराने लढवलेली कावळ्या बावळ्या खिंड आणि येथे हाणून पाडलेला शहाबुद्दीन खानाचा हल्ला….!!

DSC_0007

कावळ्या बावळ्या खिंड

कोकणदिव्याच्या पायथ्याला असणाऱ्या  पठारवरती थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही सर्वांनी गड चढायला सुरुवात केली. कोकणदिवा चढाई मार्गात उगवलेल्या गवतामुळे आणि लहान लहान झाडी मुळे गडावर जाणारी पाय वाट सहसा स्पष्ट दिसत नव्हती. आमच्या सोबत असणाऱ्या काकांकडे धारदार विळा असल्याने वाटेत येणार गवत आणि झाडी छाटत जणू या मोसमात नवीन वाट बनवणेचं चालू होतं…!!DSC_0010    पावसांच्या अधून मधून येऊन जाणाऱ्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी आम्हाला चिंब भिजवून जायच्या आणि समोरची वाट आणखीनच निसरडी करून जाण्याचं काम मात्र वेळोवेळी अचूक करत होत्या…!! 😛😛 अगदी बेताने एक एक चढण चढत आणि मोजून मापून पावलं टाकत एकदाचे आम्ही कोकणदिव्याच्या शेवटच्या टप्प्याजवळ असणाऱ्या गुहे पाशी जाऊन पोहोचलो. यथे पाण्याच्या ४ ते ५ टाक्या आहेत आणि ८ ते १० जण राहू शकतील अशी एक गुहा आहे. हा भाग न्याहाळून झाल्यानंतर आम्हाला पार करायचं होतं ते अंतिम आव्हान म्हणजे शेवटचा उभा रॉक पॅच..!!DSC_0025    हा शेवटचा टप्पा पाहिल्यावर पहिल्या क्षणी आठवण झाली ती कलावंतीन दुर्गच्या लास्ट रॉक पॅचची. उभेउभ कलावंतीन दुर्ग सारखा रॉक पॅच, त्या तुलनेने ऊंची थोडी कमी भरेल जेमतेम ७ ते ८ फूट, बस हाच काय तो फरक…!! येथे एक मेकांना आधार देत आणि दगडांच्या फटीचा आधार घेत अगदी उत्तमरीत्या चाढाई करत आम्ही अखेरीस कोकणदिव्याच्या शिखर माथ्यावर जाऊन पोहोचलो…!!DSC_0032     या शिखर माथ्यावरून नजर फिरवताना दक्षिणेला दिसतो तो ‘दुर्गदुर्गेश्वर शिवतीर्थ किल्ले रायगड’ 😍🙏😍  आजूबाजूला दिसणारा काळनदीचा परीसर आणि आग्नेय दिशेला दिसणारा बिकट असा किल्ले लिंगाणा…!! येथून किल्ले रायगडाचा नजारा पाहताना हा ट्रेक सार्थकी लागल्या सारखं वाटतं. पावसाने थोडीशी उघडीप दिली आणि समोरील ढगांची दुलई हटली की रायगडावरील जगदीश्वराचे मंदिर, नगारखाण्याची इमारत स्पष्ट पणे दिसते…..!! शिवाय अवती भवती कधी ढगात हरवलेला तर कधी पावसांच्या धारात न्हाऊन निघालेल्या सह्याद्रीचा नजारा पाहताना न कळत त्यात केव्हा भान हरपून जातं याचा थांगपत्ता ही लागत नाही…!! 😍😍 कोकणदिव्याच्या माथ्यावरून आजूबाजूच्या सह्याद्री पर्वतरांगेची मनासोक्त टेहळणी करून झाल्यानंतर मनात आणि कॅमऱ्यामध्ये हा अविसमरणी असा देखावा साठवत शेवटी रागडावरती चिरनिद्रिस्थ असलेल्या आणि काळाच्या पडद्याआड गेलेल्या त्या महान युग पुरुषाला मनोमन साष्टांग दंडवत घालत आणि मानाचा त्रिवार मुजरा करत 🙏🙏 जड अंतकरणाने कोकणदिवा गड पाय उतार होण्या साठी घेतला….!!

DSC_0038

 ‘दुर्गदुर्गेश्वर शिवतीर्थ किल्ले रायगड’

गड उतरताणा अगदी सावकाश पणे निसरड्या मातीचा आणि घसरड्या दगडांचा अंदाज घेत एक एक करत क्रमाने आम्ही सर्वजण पंधरा ते वीस मिनिटात गड उतार होऊन पायथ्याच्या पठारावर येऊन पोहोचलो. आता पुन्हा येथून आम्हला गारजाई वाडी आणि तेथून घोळ गाव गाठायचं होतं, आकाशात ढगांची गर्दी जमू लागली होती त्या मुळे आमची पावलं झपझप निवारा शोधत आणि उघडीप सापडताच बेस व्हिलेज जवळ करण्याच्या हेतूने भरभर चालु लागली होती.  जवळपास चार ते साडे चारच्या सुमारास आम्ही सर्वजण एकदाचे घोळ गावात येऊन पोहोचलो. ट्रेक मध्ये मोलाची साथ दिलेल्या काकांना त्यांच्या आमूलाग्र मार्गदर्शना बद्दल मोबदला देऊन आभार मानत शेवटी त्यांची रजा घेतली आणि आमच्या या युगातील अश्वांवर स्वार होऊन (म्हणजे टू व्हीलर वर बसून) पुण्याच्या दिशेने टाच मारली (गियर टाकला) 😜😀😛

ट्रेक डिटेल्स :-

ट्रेक दिनांक:- ९ जुलै २०१७

बेस व्हिलेज:- घोळ/गारजाईवाडी

समुद्र सपाटी पासूनची उंची:- ९०० मीटर

किल्ल्याचा प्रकार :- गिरिदुर्ग

पोहोचण्याचा मार्ग:- कोकणदिवा ट्रेक दोन मार्गे करता येतो

१. पुण्याहून-पानशेत-दापसरे-घोळ-गारजाईवाडी-कोकणदिवा

२. महाड- पाचाड- सांदोशी- कावळ्या घाट-कोकणदिवा

पुण्यापासून अंतर:- ७५ किमी

राहण्याची आणि खाण्याची सोय :- घोळ गावात स्थानिक लोकांकडून जेवणाची सोय होऊ शकते, आणि गावत राहण्याची सुद्धा शिवाय गडावरील गुहेतही मुक्काम करता येतो…!!

Advertisements
Report this ad

Leave a Reply

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...