जवळपास दिड वर्षानी माझ्या वाढदिवसाचा मुहुर्त साधून कोयनानगरजवळचा भैरवगड आणि पाटणजवळ्चा दातेगड अशी दुहेरी उन्हाळी भटकंती आयोजित केली होती. पुण्यातून पाच जण, सांगलीमधून दोघेजण आणि कराडमधून सहा जण असे तेरा जणांचा चमु कोयनेच्या जंगलाच्या बफर झोनमध्ये वसलेल्या नाव या डोंगराच्या गाभ्यात वसलेल्या निसर्गरम्य गावी एकत्र आला. दुर डोंगरावर गव्यांनी दर्शन दिले आणि भटकंतीच्या दिवसाची उत्तम सुरवात झाली. आनंद विचारे यांच्या होम स्टेमध्ये ओळख परेड व नाष्टा करुन ओपन जीपमधुन आम्ही साधारण सात वाजता भैरवगडाकडे निघालो. वाटेत दाट जंगलात शेकरु खारींनी दर्शन दिले. कोळणे गेटवर वनखात्याची परवानगी घेउन, त्यांचे शुल्क भरुन अजूनही कोयनेच्या घनदाट जंगलात जीव धरुन असणार्या कोळणे, पाथरपुंज आणि मळे या तीन गावाना मागे टाकून आमच्या जीप भैरवगडाच्या वाटेवर निघाल्या. वाटेत अजूनही जैवविवीधता जपणारे जंगल लागले. आता इथे वनपर्यटनासाठी ज्या नवीन सुविधा होणार आहेत, त्याची माहीती घेत एका जुन्या विहीरीपाशी थांबलो, तसेच वाटेत प्राणीगणना करण्याचे ठिकाण पाहिले. लगेचच भैरवगड आणि त्याच्या जवळचे भैरवाचे मंदीर आले. मागे मी आलो होतो तेव्हा मंदीर बांधायचे सुरु होते.आता मात्र सुंदर असे मंदीर एन जंगलात भाविकांच्या प्रतिक्षेत असते. इथेच शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. मंदीरात लक्ष्मी, वाघजाई, जोगेश्वरी आणि विठलाईच्या मुर्ती आहेत. मंदीराच्या आवारात काही शिल्प आणि वीरगळ दिसते. याचा अर्थ इथे एखादे युध्द नक्कीच झाले होते. मात्र आपल्याला तो इतिहास माहीती नाही. मंदीरापासून एक रस्ता खाली उतरतो. इथे पाण्याचे नैसर्गिक कुंड आहे. भैरवगड उर्फ सारंगगडाचा इतिहास आणि इथून दिसणारा परिसर याची माहिती घेतली. रत्नागिरी जिल्ह्याचा चिपळूण, संगमेश्वर तालुका, जंगली जयगड आणि पाली, जुंगटी हे वावर नसलेले कोयनेच्या जंगलातील गड, तसेच प्रचितगड आणि शृंगारपुरचा परिसर याची ओळख करुन दिली.
भैरवगडावर आज दोन बुरुज, उध्वस्त दरवाजा, पाण्याचे कोरीव टाके इतकेच अवशेष बघायला मिळतात. भैरवगड बघून दुपारचे सुग्रास जेवण उरकून आम्ही पाटणच्या दिशेने निघालो. पाटण स्टँडजवळून एक पक्का रस्ता दातेगडाच्या पायथ्याच्या टोळेवाडी गावाच्या दिशेने जातो. या रस्त्यामे आपण दातेगडाच्या अगदी जवळ आपल्या गाडीने पोहचतो. पुर्वी रस्ता टोळेवाडी गावातून होता. मात्र आता दातेगडाकडे जाणारा मुळ वाट सुरु झाली आहे. वनकुसवडे पठाराच्या डोंगराला जोडून असणार्या एल टेकडीवर दातेगड उभारला आहे. कराड-चिपळूण या प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा गड कदाचित शिलाहार कालखंडात उभारला असावा. गडाकडे निघाले कि महादरवाज्याच्या आधी एक नैसर्गिक गुहा दिसते. त्यानंतर कातळकोरीव दरवाजा, पहारेकर्यांच्या अलंगा, त्याला छतासाठी असणार्या खाचा, पाणी वाहून जाण्याची व्यवस्था हे आवर्जून पहाण्यासारखे आहे.
दातेगडाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेली गणपती आणि मारुतीची सुरेख शिल्प ! त्यानंतर कातळकोरीव पायर्या आपल्याला माथ्यावर घेउन जातात. माथ्यावर असलेल्या टेकडीवर भगवा ध्वज फडकत असतो. गडावर काही घरांचे चौथरे आणि जलव्यवस्थापन म्हणजे पाण्याची बरीच टाकी आहेत. मात्र इथली तलवारीच्या आकाराची कातळकोरीव विहीर प्रत्येक दुर्गभटक्याने आवर्जून बघावी अशीच !
विहीर चिंचोळी असून जवळपास पाउणशे कातळकोरीव पायर्या उतरुन आपण आत प्रवेश करतो. तळाशी पाणी असले तरी ते खराब झालेले आहे. एका कोनाड्यत शिवपिंड आणि समोर नंदी आहे. खालून वर बघताना विहीरीचे स्थापत्य बघून दुर्गस्थपतींना सलाम करावासा वाटतो. एन उन्हाळ्यात विहीरीचा गारवा अनुभवून पुन्हा माथ्यावर आल्यास भर्र्राट वार्याचे सुख घेत चौफेर नजर टाकायची. आग्नेयेला पाटण, दक्षिणेला वाहणारी कोयना नदी आणि नैऋत्येला असणारा मोरगिरी उर्फ गुणवंतगड हा नजारा डोळ्यात साठवून घ्यायचा आणि परतीची वाट पकडायची.
एन उन्हाळ्यात दोन किल्ल्यांची भटकंती संपवून आम्ही सगळे परतीच्या वाटेला लागलो.
एन उन्हाळ्यात दोन किल्ल्यांची भटकंती संपवून आम्ही सगळे परतीच्या वाटेला लागलो.
तुम्हाला ही अशीच भटकंती अनुभवायची असेल तर जरुर संपर्क करा.
श्री. स्वप्निल जिरगे
मोबाईल- 9960022621











