Saturday, October 1, 2022

तोरणा ते राजगड' मोहीम फत्ते

 मायबोलीवर 'तोरणा ते राजगड' भटकंतीचा बाफ झळकला नि माझा काळीज करपटला.. काय करणार.. मला जमण्यासारखे नव्हते.. 'योजना तयार ठेवा.. संधी मिळताच तुमच्यात सामिल होतो' असा संदेश मी या मोहीमेवर जाणार्‍या मायबोलीवीरांना दिला होता.. २१ जानेवारी उजाडला ज्या दिवशी गिरीविहारच्या गाडीतून मायबोलीवीर राजगडाच्या दिशेने कुच करणार होते.. मग तिथेच गाडी पार्क करुन एसटी वा जीप करुन वेल्हेला (तोरण्याच्या पायथ्याकडील गाव) जायचे नि मग तिथूनच 'तोरणा ते राजगड' या मोहीमेस सुरवात करायची अशी योजना आखली गेली होती.. त्याच दिवशी रोहीत, गिरीविहार यांचे फोन आले.. टांगारुंनी ऐनवेळी टांग दिल्याने फक्त तीनच मायबोलीवीर जायला निघाले होते.. रोहीत.. एक मावळा, गिरीविहार नि इंद्रधनुष्य !

माझा सुट्टीचा प्रॉब्लेम होता पण शेवटी राजगड प्रेम पुढे आले नि शेवटच्या क्षणी ऑफिसला टांग देण्याचे ठरवून मोहीमेत सामिल होण्याचा निर्णय घेतला... गाडीत अजुन एक जागा होती सो 'नविन' ला फोन करुन आमंत्रण दिले नि अपेक्षेप्रमाणे त्याने सहर्षाने स्विकारत येण्याचे पक्के केले !

भांडुपला सगळे भेटून तिथूनच मग रात्री १०.३० च्या सुमारास 'गिरीविहार'च्या चारचाकी रथातून पुण्याच्या दिशेने प्रयाण केले.. सध्या थंडीने जोर धरल्याने आम्ही मनाची तयारी केली होतीच.. पण पुण्यात पोहोचलो तरी काहीच गारवा जाणवला नाही.. वाटले सॅकमध्ये थंडीरक्षक वस्त्रांचा काही फायदा नाही.. पहाटे तीन-साडेतीनच्या सुमारास आम्ही गुंजवणे (राजगडाच्या पायथ्याशी असलेले गाव) गाठले.. गाडीतून बाहेर पडलो तोच थंडीने आमच्यावर हल्लाबोल केला नि आतापर्यंत गाफील असलेले मायबोलीवीर आहाहा-हूहूहू करत पटापट आपापल्या सॅकमधून थंडीरोधक वस्त्रे बाहेर काढू लागले..!  त्या पाच-दहा मिनीटात पुरते गारठून गेलो..
आमच्याअगोदर नुकताच एक ग्रुप गाडीने आला होता जो राजगड ते शिवरथळ असा ट्रेक करणार होता..! वेळ रात्रीची असली तरी चंद्राच्या दुधाळ प्रकाशात बर्‍यापैंकी दिसत होते.. आम्हाला आता इथूनच रात्री मुक्कामाला आलेल्या एसटीने पहाटे निघायचे होते त्यामुळे ऐनवेळी घाई नको म्हणून जवळच असलेला ओढा गाठला नि लख्ख चांदण्याप्रकाशात आधी महत्त्वाचे कार्यक्रम उरकून घेतले..

आमच्या हातात दिडेक तास होता तेव्हा एक डुलकी होईल म्हणून तिथेच जवळ असलेल्या हनुमान मंदीरात आडवे झालो.. पण अपेक्षेप्रमाणे झोप काही लागली नाही.. तासभरातच कानावर मराठी गाण्यांचा आवाज ऐकू पडला.. या गावात असलेले पुरोहीतांचे "अरण्यधाम" दुकान उघडले होते जिथे चहानाश्त्याची नि जेवणाची सोय होते.. (संपर्क : श्री.चंद्रकांत पुरोहीत , दुरध्वनी क्र.०२१३०-२८०३६३,२८०२५१,२१८०१९, भ्रमणध्वनी क्र. ९४२०८६०६९१) आम्ही तिथे चहाची ऑर्डर देउन लगेच सामान आवरायला घेतले.. गिरीने आपली गाडी एका बाजूला पार्क केली नि काही मिनीटांतच आम्ही गुंजवणे सोडले.. एसटीने बाहेरच्या रस्त्यावर मार्गासनीला उतरलो.. आता इथूनच लिफ्ट मागून पुढे 'वेल्हे'ला जाणार होतो.. लिफ्ट मिळेपर्यंत रस्त्याच्या बाजूला शेकोटी करुन उब घेत बसलो.. अर्ध्यापाउण तासातच आम्हाला जीप मिळाली जी आधीच भरून आली होती... आम्ही पाचजण त्यात मोठ्या सॅक्स.. असे सारेजण मागच्या बाजूने स्वतःला कोंबून बसलो ! इंद्रा ज्या पोझमध्ये होता तो उभा आहे की बसलाय हेच कळत नव्हते..  नशिबाने पुढचे दोघे तिघे काही अंतरावर उतरले तेव्हा कुठे नीट बसायला मिळाले.. (जीपवाल्याचा संपर्क - श्री. सोमनाथ - ०९५७९९१८८७७)

सकाळी सातच्या सुमारास वेल्हेला पोहोचलो नि जवळच्या हॉटेलात नाश्तापाणी करण्यासाठी शिरलो.. हवेत अजुनही गारवा होता.. गावात तशी शाळेत जाणार्‍या मुलांची वर्दळ जास्त होती.. ट्रेकमधला पहिला फोटो या वेल्हे गावातच मिळाला.. दृश्यच तसे खास होते..

<

पोह्यांचा फक्कड नाश्ता झाला नि आम्ही तोरणाच्या दिशेने कूच केले.. याचवेळी स्वारगेटहून वेल्हेकडे येणारी पहिली एसटी पोहोचली नि आमच्यासारखेच 'तोरणा ते राजगड' करणारे दोन तीन ग्रुप उतरले.. गावातून सरळ एक वाट तोरणाच्या दिशेने वरती जाते ती वाट पकडली..

उंचपुरी तोरणा (पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च किल्ला) सुर्याची कोवळी किरणे खात आमच्या स्वागतासाठी सज्ज होताच.. आम्ही उत्साहात पटापट चालू लागलो पण सुरवातीलाच दोन तीन मोठे चढ लागले नि वेग मंदावला..  ही वाट संपुर्ण ओसाड डोंगराची असल्याने आम्ही टप्प्याटप्यावर असणारे झाड बघून थांबत होतो..

हे चढ पार करताच वेल्हे गावचा परिसर नजरेत भरतो तर वरती तोरण्याची तटबंदी सारखी खुणावत होती.. पुढची वाट ही डोंगराच्या सोंडेवरुन कमरेभर उंचीच्या कारवीजंगलातून जाते.. इथूनच मग तोरणा किल्ल्याच्या डोंगरापाशी जवळ येउन पोहोचलो.. इथून खालीच असणार्‍या गुंजवण धरणाचे निळेभोर पाणी अगदी उठून दिसत होते..

<

एका बाजूस तोरणाच्या डोंगरावरील घड्या लक्ष वेधून घेत होते..

तर वरच्या बाजूस पाहिले असता तोरणाचा एका बाजूने घेरा लक्षात येत होता..

आता इथूनच खर्‍या अर्थाने तोरणाची चढाई सुरु होणार होती.. खडकांमधून वर चढणारी वाट आधीच्या वाटेपेक्षा खूप बरी वाटली.. दमही निघत नव्हता नि उंचीही गाठली जात होती.. इथेच अधून मधून कोरलेल्या पायर्‍या लागतात.. काही ठिकाणी रेलिंग लावलेले आहेत.. खाली पाहिले तर आम्ही केलेली वाटचाल नजरेस पडली..

तर वरती तोरणाचा बुरुज आमचा उत्साह वाढवत होता..वाटले इथूनच सरळ वर चढत जायचे असेल..

पण भ्रमनिरास झाला नि वाट उजवीकडे वळाली.. पुन्हा कारवीच्या जंगलातून जाणारी सहज सोप्पीशी वाट.. इथेच डावीकडे एक झरा लागला नि आम्ही पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या.. इथेच रोहीतने फोटोसाठी एक अवतार धारण केला..

आमच्या ग्रुपच्या मागेपुढे अजुन दोनेक ग्रुप होते.. नि हो जोडीला गावातील कुत्रा नसेल तर नवलच.. पुढे पाचदहा मिनीटांतच पुन्हा पायर्‍या लागल्या.. नि बिनी दरवाज्यातून आम्ही तोरणावर पोहोचलो.. !

सुरवातीलाच दरवाज्यापाशी असणारे भरभक्कम बुरुज नि मग लागणारा कोठी दरवाजा हे जंगी स्वागतासाठी उभे असलेले दिसले..

नेहमीप्रमाणे शिवरायांचा जयजयकार करत आम्ही प्रवेश केला..

याच कोठी दरवाजाच्याबाजूने एक वाट मागे जाते जिथे "तोरणजाई"चे छोटेसे मंदीर पडीकावस्थेत आहे..
उन कडक पडले होते नि पोटात देखील कडक भूक लागली होती.. पण आधी तोरणाची एक बाजू बघून घेउ नि मग थोडे वरती सरकून पेटपूजा उरकुन घेउन असे ठरले..

तोरणाच्या त्या भक्कम बुरुजावरती उभे राहून फोटोसेशन झाले..

आम्ही एका कडेला होतो तर दुसर्‍या कडेला हे साहेब आपल्याच तोर्‍यात वार्‍यावर स्वतःचे डोके डुलवत होते...

माझ्या गेल्या सलग चार ट्रेकमध्ये सर्पदर्शन झाले होते नि आता ही पाचवी वेळ !! (ही बाब माझ्यासाठी तरी अभिमानास्पद नव्हे.. आत्मविश्वासाची बोंब लागते आपली मग पुढे जंगल तुडवताना.. सारखे वाटत राहते पायाखाली काहितरी..!!! ) नि वरील फोटोत साप कितीही सुंदर दिसत असला नि दिसायला तो छोटा वाटत असला तरी मी काय त्याच्या जवळ गेलो नाही.. जल्ला शिस्तीत झूम करुनच काढलाय... Lol गिरीने मात्र अगदी मनासारखे जवळून फोटो काढून घेतले..

त्याचे फोटो काढून झाले नि मग मला 'उडी उडी' आठवले.. Proud बाकी कोणी उडी मारण्याच्या मनस्थितीत नव्हते पण 'नविन' तयार झाला..

----
आमच्यापासून दुसर्‍या ग्रुपमधले प्रेरित झाले.. तेव्हा त्यांच्यातील फोटोग्राफर नि उडीमास्टारचा एक मस्त फोटू घेतला..
<

म्हटले आता मी पण उडून घेतो म्हणून चार-पाच उड्या मारल्या पण जल्ला' नविन'ला काही टिपायला जमले नाही.. शेवटी वैतागून आम्ही पेटपुजेसाठी मार्गी लागलो.. एका पडीक बांधकामाच्या सावलीत बसून पुरणपोळी, ठेपले, बोरं, काकडी इति आहार झाला.. इथे काही नव्याने केलेले बांधकाम दिसले ते कशाला ते कळले नाही.. डोळ्यात खुपते ते.. नुतनीकरण करताना जुनेपणाचा फिल जाणार नाही याकडे पुर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसले.. असो.. आम्ही खात असतानाच तोरणाचा नकाशा पाहून घेतला.. नि एका तासात शक्य तितके फिरुन घ्यायचे नि मग राजगडच्या वाटेला निघायचे असे ठरले.. खाणं उरकताच आम्ही हनुमान बुरुजाकडे वळालो.. इथेच भल्यामोठ्या ढोलकाठीला निशाण फडकावलेले आहे.. इथे जाताना तोरणाची एका बाजूकडील तटबंदी लक्ष वेधुन घेत होती..

----------------------

(बुरुज,"तोरणजाई"चे छोटेसे मंदीर नि तटबंदी)
----------------------

(ढोलकाठी)
----------------------

(बघत रहावे असे..)

इथूनच पुढे आम्ही तोरणा किल्ल्यावरील खास आकर्षण असलेली 'झुंजार माची' बघण्यासाठी कडेला सरकलो..
तोरणाला बिलगून खालच्या बाजूस असणार्‍या डोंगराच्या सोंडेवर बांधलेली ही माची निव्वळ अप्रतिम !

दिसायला छोटी दिसत असली तरी आकर्षून घेईल असे ह्या माचीचे बांधकाम.. इथे जाण्याचा मार्ग किंचीतसा अवघड आहे.. इथे उतरण्यासाठी एक शिडी लावलेली दिसली.. तिचा एकंदर मर्यादीत स्वरुपात असलेला विस्तार लक्षात घेता आम्ही वरूनच कड्यावरुन तिचे दर्शन घेण्यात समाधान मानले.. वेळ कमी होता नि ही माची तशी सहजस्पष्टपणे नजरेत भरत होती.. सो जाण्याचे टाळले नि आम्ही मेंगजाई मंदीराच्या दिशेने निघालो..


(मेंगजाई मंदीर)
-------

(मंदीरातील प्राचीन मुर्ती नि राजांचा फोटो)

या परिसरात दोन तीन टाकी नि पडीक बांधकाम आढळते.. या मंदीराची डागडुजी केल्याने आता चांगल्या स्थितीत आहे..

या मेंगजाई देवळाच्या समोरच प्राचीन मंदीर आहे जिथे शिवलिंग आहे नि बाहेर नंदीची प्राचीन मुर्ती आहे.. हे मात्र पडीक अवस्थेत आहे...

दुपारचे बारा वाजून गेले असल्याने उनदेखील आता चटके देउ लागले होते.... तेव्हा तिथेच एका गावकर्‍याकडून लिंबूसरबत घेतले तसेच त्या प्राचिन मंदीराबाजूसच जवळच असणार्‍या पाण्याच्या टाकीतले पाणी पिण्यासाठी भरुन घेतले.. इथे रोहीत आणि इंद्रा या दोघांनी कसोशीने प्रयत्न करुन पाणी भरुन घेतले.. कारण पाणी खूप खालच्या बाजूस होते नि पाणी भरताना कुठे पकडण्यास अशी सोयदेखील नव्हती.. रिकाम्या बाटल्या रिफील झाल्या नि मग इथूनच 'तोरणा-राजगड' वाटेचा अंदाज घेण्यासाठी पुढे एका कड्याकडे सरकलो.. !

(इथेही राजगडाच्या दिशेने फडकणारा भगवा नि मायबोलीवीर )

क्रमश :
 
 
 

तोरणाच्या या कड्यावरून दिसणारा 'तोरणा-राजगड' मार्ग मस्तच !! बुधला माचीपासून डोंगरांची रांग सुरु होते ती थेट राजगडच्या संजीवनी माचीपर्यंत.. ! बघून तरी अंधार पडायच्या आता पार करु असे वाटत होते..

तोरणाच्या बुधलामाचीपासून सुरु होणारी तोरणा-राजगडची वाट.. (सुरवातीचा टप्पा)

वाटेतील मधला टप्पा

वाटेतील अंतिम टप्पा नि डावीकडे दिसतोय तो "राजगड" !!
<

'तोरणा ते राजगड' या वाटेचा अंदाज आला नि आता उशीर करुन चालणार नाही म्हणत आम्ही झपाझप पावले टाकू लागलो.. जबरदस्त तंगडतोड होणार होती.. नि अजून तोरणावरील बुधला माचीकडचा परिसर बघायचा होता... या माचीकडे जाणार्‍या वाटेने कोकण दरवाज्यापाशी आलो नि थांबलोच.. इथून तोरणाची एक महत्त्वाची नि वैशिष्ट्यपुर्ण असलेली बुधला माची संपुर्णपणे नजरेत भरत होती.. !!!

तर दुसर्‍या बाजूस तोरणाची एका बाजूकडील तटबंदी मस्त उठून दिसत होती..

- - - - - - - -

कोकण दरवाज्यासमोर उभे असलेले मायबोलीवीर..

इथूनच दूरवर रायगड नि लिंगाणा डोकावताना दिसले..

सभोवतलाचे सगळे दृश्य कॅमेर्‍यात टिपून आम्ही बुधला माचीच्या दिशेने उतरायला घेतले..

कोकण दरवाज्याकडील बुरुज नि तोरणाची भक्कम अशी तटबंदी..

वाटेत पहिलाच लागलेला बुरुज टेहळणीचा असावा कदाचित.. मस्तच बांधणी आहे.. शिवाय चोर वाट देखील.. !
अगदी सरपटत बाहेर पडावे लागते.. इथून संपूर्ण बुधला माची नजरेखाली राहते..

टेहेळणी बुरुजावर इंद्रा नि नविन -

------
खालील फोटोत रोहीतला शोधा कुठे आहे तो... Happy दिसला का ? चोरमार्ग बघतोय तो..

------
त्या बुरुजामध्येच असणारी चोरवाट..

या बुरुजावर मग गिरीला उडी मारण्यास प्रोस्ताहन दिले.. Proud

(साहेबांनी चक्का हातात कॅम घेउन उडी मारली.. बुधला माचीच्या सुळक्यापेक्षा उंच अशी उडी ;-))

आमच्याबरोबरीने अजून एक सात आठ जणांचा ग्रुप वाटचाल करत होता.. त्यांच्याशी देखील आमच्या गप्पा होत होत्या.. नि हो जोडीला कुत्रा नसेल तर नवलच..
या वाटेत दोन ठिकाणी थोडे ट्रॅफिक जॅम झाले.. पहिले ट्रॅफिक इंद्राने धरुन ठेवले होते.. नेमके त्या क्षणाला त्याचा आत्मविश्वास ढळला होता... कारण होते त्याचे बूट नि तापलेले खडक..

खालील फोटोत डावीकडे खाली इंद्रा लिड करताना.. Wink

पण लवकरच त्याने सावरले नि ट्रॅफिक क्लियर झाले.. पुढचे ट्रॅफीक ठरलेले होते जे म्हणजे बुधला माचीवरून तोरणा-राजगड मार्गावर उतरताना.. त्याआधी वाटेत चिणला, भगत, वकंजाई नावाचे अगदी कडेला असलेले हे तीन दरवाजे दिसतात...बुधला माचीचा पॅच हा अवघड आहे.. ज्याची मजा शिडी लावून घालवली आहे.. Proud मी आणि रोहीत बघतच होतो कुठे शिडीशिवाय उतरायला जमते का ते.. पण पडलेले कडक उन नि वेळेची बचत म्हणून शिडीनेच उतरण्यात धन्यता मानली..

- - - - - -


(इंद्रा नि गिरी खाली उतरताना.. मागे दिसतेय ती राजगडाकडे जाणारी वाट)

- -- - - - -

इथेच बाजूला डोंगरावर हिरवाईची उमटलेली तुरळक रांगोळी छानच भासत होती..

- - - - - - - -


(बुधला माचीवरील सुळका खालून वरती बघताना)

इकडून आता आम्ही आमच्या ट्रेकच्या महत्त्वाच्या टप्प्यावर येउन पोहोचलो..दुपारी दोनच्या सुमारास आम्ही डोंगरवाटेने कूच करायला सुरवात केली..

हे अंतर कापायला सहा तास लागतात ऐकून होतो.. वाटेत आम्ही जवळपास १०-१५ डोंगर पालथे घालणार आहोत हा अंदाज तोरणावरुनच घेतला होता.. आमचे मूळ उद्दीष्ट्य होते की शक्य तेवढ्या लवकर झाडाझुडूपांची वाट गाठायची.. सुरवातीला वाटेत सावली मिळणे अशक्य होते.. नि अंधार होण्याच्या आत आम्हाला त्या जंगलातील वाटेपर्यंत पोहोचायचे होते.. तिथेच वाटेत पुढे एक धनगराचा वाडा आहे हे माहित होते.. सो वेळ अपुरा पडला तर तिकडेच राहू असे ठरले होते.. पण आम्ही घेतलेल्या नकाश्यामध्ये या वाटेत एक डांबरी रस्ता येतो असे दिसले.. ज्याची मला कल्पनाच नव्हती.. मागे राजगडवरुन हा मार्ग पाहिला होता तेव्हाही तो रस्ता काही दिसला नव्हता.. नि तोरणावरुन दिसणे कठीणच कारण तो राजगडाच्या बाजूस पाली खिंडीत आहे.. म्हटले बघू कुठे आहे ते..

तोरणाकडे पाठ करुन आम्ही आता राजगडावरील संजीवनी माचीला नजरेसमोर ठेवून चालत होतो... बरेचसे अंतर चाललो तरी तोरणा आताच उतरलोय इतका जवळ वाटत होता.. तोरण्याची एक संपूर्ण बाजू नजरेत भरली..

ऊन एकदम कडक पडले असले तरी अधूनमधून येणार्‍या वार्‍यामुळे दिलासा मिळत होता.. अपेक्षेप्रमाणे वाट सुरवातीपासूनच आम्हाला "Up & Down" करायला लागली.. मोठ्या सावलीचा मागमूस नसल्याने वीस पंचवीस मिनीटांनी आम्ही ब्रेक घेत वाटेतच बसत होतो.. जेणेकरुन वाटेच्या दोन्ही बाजूस वाढलेल्या कारवी झाडांची तरी सावली मिळावी.. जसजसे उन्हामध्ये अंतर कापत गेलो तसा घसा वारंवार कोरडा पडू लागला होता.. पाणी जवळ होते पण अजून पाच सहा तासांची वाटचाल बाकी होती नि वाटेत ते एक घर सोडले तर पाण्याची सोय नव्हती त्यामुळे आमची तहान आम्ही घेतलेल्या काकड्या, बोरं नि त्यातल्या त्यात पाण्याचा फक्त एकच घोट यांवर भागवत होतो.. Proud बाकी कुठलाही अडथळा नव्हता तोच गिरीच्या पायाचे अंगठे दुखायला लागले.. साहेबांनी माहित असुनसुद्धा नविन कोरे बुट घालून आले होते.. त्यामुळे जास्त त्रास होउ लागला.. शेवटी वैतागून गिरीने मध्येच सर्वांना थांबवून आपल्या पायाच्या अंगठ्याची वाढलेली नखे कापण्याचा कार्यक्रम हाती घेतला.. Proud आमच्या बरोबरीने असणारा ग्रुप याचवेळी पुढे गेला.. पण त्या कुत्र्याने मात्र आमच्या मायबोली ग्रुपबरोबर राहण्याचा निर्णय घेतला.. पायथ्यापासून गडावर येताना आपणहून सोबत देणारे कुत्रे मी पाहिले होते.. पण हा तर आमच्या सोबत तोरणा-राजगड करायला निघाला होता..

गिरीने 'लेटस गो' ची आज्ञा दिली नि आम्ही पुन्हा चालू लागलो.. पण वेग बराच मंदावला होता.. परिस्थिती तशीच होती.. कारण आम्ही भर दुपारच्या वेळेस वाटचाल करत होतो ते देखील तोरणा सर करून ! दिर्घ विश्रांती घेतलीच नव्हती.. पाठीवर असलेल्या वजनाबद्दल तक्रार नव्हतीच.. एकीकडे गिरीला डोंगर चढण्याऐवजी उतरताना त्रास होत होता.. नि असे अजून बरेच डोंगर आमची वाट बघत होते.. छोटे ब्रेक्स घेऊन आम्ही पुढे सरकत होतो.. दिडदोन तास चाललो तरी आम्ही अजून मध्यभागी देखील पोहोचलो नव्हतो.. वाटेत दोन्ही राजगड तोरणा पुढे मागे दिसत होते.. पण वाट काही संपत नव्हती.. उलट राजगड दुर जातोय असे भासत होते.. Lol तोरणावरुन बघताना जितके सोप्पे वाटले होते ते तसे नव्हते.. नि भर उन्हात इथून चालणे म्हणजे चांगलाच दम निघत होता.. पण काहिही झाले तरी वाट मला आवडली... मस्तच आहे.. अगदी ठळक पाउलवाट.. मध्येच दोन फाटे फुटायचे नि पुन्हा येउन मिळायचे.. इथे हरवण्याचा संभव नव्हताच.. कारण संपूर्ण वाटेत लागणार्‍या डोंगरावरून राजगड दिसतोच.. काही ठिकाणी मात्र वाट अगदीच दरीला बिलगून जाते.. तिथे मात्र काळजी घेतलेली बरी..

सूर्याची पश्चिमेकडे झुकण्यासाठी सुरवात झाली.. आमची आतापर्यंत बरीच तंगडतोड झाली होती.. त्यात इंद्रा नि गिरी यांना त्यांची वयोमर्यादा आड येऊ लागली.. बर्‍याच वेळेनंतर आमची वाट उजवीकडे मूळ डोंगर सोडून खाली उतरु लागली तेव्हा चुकलो की काय अशी शंका वाटू लागली.. पण दुसरी ठळक अशी वाट दिसत नव्हतीच.. शिवाय आमच्या पुढे गेलेला ग्रुप मघासपासून दुरवर दिसत होता तोदेखील गडप झाला.. म्हटले ही वाट कुठे घराकडे जात असेल तेव्हा पाणी वगैरे घेउन पुढे जाउ.. इंद्राने आपण दमलोय तेव्हा इथेच कुठेतरी थांबू असे सुचवले.. आम्ही त्याच वाटेने पुढे गेलो तर वाटेपासून काही अंतरावर एका बाजूस घर दिसले.. तिथे जाणार तोच त्याच घराकडून एक गावकरी येताना दिसला जो त्याच घरातला होता.. आमची वाट बरोबर असल्याचे सांगितले.. त्याला विचारले असता कळले की दोन ग्रुप त्याच्याकडे थांबले आहेत..नि पाण्याचे विचारायचे तर तो तेच आणायला कुठेतरी लांब जात होता.. इथे थांबायचे म्हटले तर राजगड कुठच्या कुठे होता.. तेव्हा पुढे वाटेत लागणारा धनगर वाड्याला जाउनच विश्रांती घेउ म्हणत पुढे निघालो.. अर्थातच त्या गावकर्‍याला आधी सगळे विचारुन घेतले.. 'हो.. हे समोरचे दोन डोंगर पार केले की लागेल तो वाडा.. जेवणपाणी राहण्याची सगळी सोय करुन देतील तिथे...' हे असे त्या गावकर्‍याकडून ऐकल्यावर आमचा हुरुप वाढणार नाहितर काय..

एव्हाना थकलेला इंद्रादेखील जोमाने उभा राहिला.. नि आमचे पुन्हा लेफ्ट राईट चालू झाले.. Proud आताची वाट मात्र डोंगरावरुन न जाता त्याच्या खांद्यावरुन जात होती त्यामुळे उन्हाचा त्रास नव्हता.. शिवाय आता सूर्य मावळण्यास जेमतेम दिडेक तास उरला होता.. आम्ही चालत होतो.. जल्ला दोन काय चार डोंगर पार केले पण वाडा काहि लागला नाही.. साहाजिकच पुन्हा सगळ्यांची बॅटरी डाउन होण्यास सुरवात झाली.. पुन्हा एक ब्रेक घेतला तेव्हा दोन- तीन मावश्या कुठूनतरी आल्या.. त्यांना विचारले तर हा काय पुढेच आहे म्हणत त्या पुढे गेल्या.. गेल्या काय गायबच झाल्या.. ह्यांचा वेग पाहून आमची घोडदौड कासवापेक्षा धिमी वाटली..:D आम्ही कसेबसे त्या वाड्यापर्यंत पोहोचलो.. आनंद झाला पण... ! वाडा बंद असलेला पाहून आम्ही संकटात सापडल्याची जाणीव झाली.. प्रश्ण थकण्याचा वा राहण्याचा नव्हता.. पाण्याचा होता.. तीन चार बाटल्या भरलेल्या होत्या.. पण उर्वरीत अंतर बघता पुरेसे नव्हते.. तहान ती तहान .. किती म्हणून संयम बाळगणार... शिवाय जेवणासाठी पाणी लागणार होते.. आता मात्र त्या गावकर्‍याने सांगितले नसते तर त्याच्याकडेच मुक्काम केला असता असे वाटू लागले..

घराच्या आजुबाजूस कोणी दिसतेय का हे बघताना मला हा सुंदर पक्षी दिसला.. शांतपणे बसला होता..

इथून संजीवनी माची बर्‍यापैंकी दिसत होती.. पण अंतर किती असेल याचा अंदाज बांधता येत नव्हता..

आता सूर्यदेखील मावळ्याची वेळ झाली होती.. त्यामुळे संजीवनी माची पोहोचेस्तोवर अंधार पडणारच होता.. इथे राहण्यासाठी बरीच मोकळी जागा आहे.. पण पाणी नाही तर थांबून चालणार नव्हते. सो नाईलाजास्तव पुढे निघालो.. तरीसुद्धा आम्ही पाण्याने भरलेल्या शिल्लक बाटल्यांना हात लावला नव्हता.. पुढे वाट उतरणीची लागली.. उतरणीची म्हणजे अगदीच खाली.. म्हटले आता जितके उतरतोय तेवढेच चढावेदेखील लागेल.. उतरणीची वाट शेवटी' त्या' डांबरी रस्त्यावर उतरली.. ! च्यामारी हीच ती पाली खिंड.. डावीकडे गेलो तर पाली गाव लागेल नि उजवीकडे 'यसाजी कंक' यांचे भुर्तंडे गाव.. रस्त्याच्या पलीकडे 'राजगडकडे' असा बाण दिसला.. पण त्याची दिशा आम्ही जितके अंतर खाली उतरलो तितकेच वरती चढायचेय असे सुचवित होते.. बरं इतके चढूनसुद्धा राजगड गाठायचे म्हटले तर अजुन किती डोंगर असतील याची कल्पना नव्हती..

झाले इंद्राने आपला स्टॉप इथेच जाहीर केला.. ! Proud 'तुम्हाला पुढे जायचे असेल तर जा.. मी जातो पाली गावात' असा पवित्रा घेतला.. तर दुसरीकडे 'नविन' राजगड गाठण्यास भलताच उस्तुक झाला होता.. 'जाउ रे. हा चढ पार केला की राजगड लवकरच गाठू'.. एकीकडे 'गिरी'ला बुटांचा त्रास होत असल्यामुळे त्यालाही विश्रांती गरजेची होती..सो तो इंद्राबरोबर.. नि आमची भर रस्त्यात (त्या खिंडीत चिटपाखरुदेखील नव्हते) मध्येच बसून चर्चा सुरु झाली.. तिथे सुर्य अस्ताला जात होता.. 'पाली गावात जाउ नि दुसर्‍या दिवशी पालीच्या दरवाज्याने राजगड करू..' असे इंद्रा नि गिरीचे मत होते.. तर 'एकदा पाली गावात गेलो की मग दुसर्‍या दिवशी राजगड न करता तिकडूनच मी मुंबईला परतेन' हे माझे मत... कारण मला त्या पाली गावातून जाणार्‍या वाटेत जराही स्वारस्य नव्हते नि दुसरे हे माझ्या ट्रेकींगच्या तत्त्वात बसणारे नव्हते.... दुसरीकडे 'माझं ऐका.. थोडा धीर धरा.. टॉर्च तर आहेत.. तेव्हा आपण आजच राजगड गाठू' असे नविनचे मत.. आमच्यामध्ये फक्त रोहीतने राजगड पाहिला नव्हता त्यामुळे 'तुम्हीच काय ते बोला काय करायचे' असे रोहीतचे मत होते.. Lol बरं एवढी भिन्न मतं असूनही जर फक्त जिद्दीवर पुढे वाटचाल करायची तर इंद्रा सोडून सगळे तयार होते.. Proud आमचा इथे अर्धातास तरी वाया गेला.. पण योग्य निर्णय घेणे गरजेचे होते.. शिवाय या निमित्ताने पायांना थोडा आराम मिळतच होता..

अखेरीस सर्वांनुमते पाली गावात चलण्याचा निर्णय घेतला गेला.. कारण म्हणावे तर इंद्राला शक्य नसल्याने ग्रुपमध्ये फाळणी पडणार होती जे पटणारे नव्हते.. दुसरे म्हणजे नुसते संजीवनी माची गाठून आमची तहान भागणार नव्हती.. पाण्यासाठी पद्मावती माची गाठावी लागणार होती.. हे अंतर ३-४ किमीचे.!! नि उगीच जीवाचे हाल करत अंधारात रिस्क घेत पुढे जाण्यात पॉईंट नव्हता.. शेवटी आम्ही त्या डांबरी रस्त्याने पाली गावाच्या दिशेने उतरु लागलो.. उतरताना मात्र ट्रेक अर्धवट सुटतोय याची मला खूप रुखरुख लागली होती.. माझ्यासाठी तरी ट्रेक इथेच संपला होता.. ' बघू, उद्या पाली गावातूनच सकाळी मुंबईला रिटर्न जाउ' हे मनाशी पक्के केले !

क्रमश :






No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...