पुनःश्च हरिओम - बाली पास ट्रेक
" आप बाली पास करके आये है लगता है " यमुनोत्रीच्या मंदिरातले पुजारी आम्हाला विचारत होते. आम्ही सकाळी सकाळी सहा वाजता मंदिर उघडायची वाट पहात थांबलो होतो. ह्यांना कसं कळलं ? हाच प्रश्न खाली उतरतांना वाटेत लागणार्या दुकानातून विचारला गेला, तेव्हाही फार आश्चर्य वाटलं. शेवटी आपले रापलेले चेहरे बघून ह्यांना कळलं असावं अशी समजून करुन घेत होतो ते आमचा एक गाईड म्हणाला, सिर्फ बाली पास करके आने वाले लोग इतने जल्दी यहा पोहोच सकते है. नाहीतर खालून वर चढायला सहा शिवाय सुरुवात करता येत नाही.
२०१७ साली स्टोक कांगरी तर झाला पण पुढे काही ना काही कारणांनी ट्रेकचे प्लॅन्स कॅन्सल होत गेले. शेवटी मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये महेश आणि केदार दोघे ट्रेक द हिमालयाज बरोबर 'केदारकांथा/ केदारकंठा' ह्या ट्रेकला जाऊन आले आणि मी २ महीन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये व्हॅली ऑफ फ्लॉवर, हेमकुंड साहेबला जाऊन आले.
तरी ट्रेक केल्याचं समाधान झालं नव्हतं कारण हे दोन्हीही ट्रेक्स तसे सोपे होते.
तोवर ट्रेकींगचा सिझन संपत आला होता. आता पुढच्या वर्षी बघू असा विचार करतांना अचानकपणे महेशला सुट्टी मिळाली. रोड ट्रीप वगैरे करण्याचा विचार कॅन्सल करुन आम्ही परत ट्रेक करायचं ठरवलं आणि आमच्या सुदैवाने ट्रेक द हिमालयाज मधल्या बाली पासच्या तारखा जमल्या आणि मिळाल्या. महेशच्या बाबांमुळे घरातली सोय झाली आणि आम्ही बुकींग करुन टाकलं.आमच्या ट्रेकची तारीख होती ३० सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर. ही ह्या सीझनची शेवटून दुसरी बॅच होती. ह्या तारखा सुट्टीशी जमणार्या होत्या म्हणून निवडल्या. पण ही निवड किती योग्य ठरली हे नंतर समजलं. blessing in disguise !
बाली पास, सुपीन आणि यमुनोत्री रेंज मध्ये असलेला एक ट्रेक आहे. हा पास आहे, म्हणजे एका बाजूने चढून दुसरीकडून उतरायचं. बाकी ट्रेक्स मध्ये ज्या रस्त्याने समीट करतात, तिथूनच उतरतात. इथेही अर्थात हवा खराब असेल, जास्त बर्फ असेल तर क्वचित त्याच रस्त्याने उतरवतात. हा ट्रेक ' डिफीकल्ट ' ह्या कॅटेगरीत येतो. बाली पासच्या समीटची ऊंची १६,२०० फूट आहे. म्हणजे लेह पेक्षा जवळजवळ ५००० फूट वर. शिवाय इतक्या ऊंचावर असणारी बर्फाची शक्यता. ट्रेक सुरु होतो ते तालुका हे गाव, ( तसा तो सांकरीपासून सुरु होतो, पण चालण्याची सुरुवात होते ती तालुका पासून ) ६५०० फुटावर आहे. तिथून ट्रेक संपतो ते जानकी चट्टी ( जे यमुनोत्री दर्शनाचे सुरुवातीचे ठिकाण आहे ) ते अंतर जवळजवळ ६५ किमी आहे.
ट्रेकींगचं ऑलमोस्ट सगळं सामान होतचं. फक्त प्रवासासाठी खाऊ, चहाचे सॅशे, नेहमीची औषधं वगैरे खरेदी केली. आदल्या दिवशी बॅग भरतांना लक्षात आलं की महेशचा हेड टॉर्च सापडत नाहीये, लकिली जवळच्या एका दुकानात मिळाला आणि तो आणल्यावर अर्ध्या तासात हरवलेलाही सापडला.
ट्रेकची सुरुवात होते डेहराडूनपासून २००/२२५ किमी अंतरावर असलेल्या सांकरी ह्या गावापासून. इथून लहानमोठे असे ७/८ ट्रेक्स सुरु होतात, त्यातले महत्त्वाचे किंवा प्रसिद्ध म्हणजे केदारकंठा, बाली पास, हर की दून, रुईनसारा, ब्लॅक पिक, देव बुग्याल वगैरे.
आदल्या दिवशी डेहराडूनला पोहोचलो आणि TTH (trek the himalayas) च्या नेहमीच्या पिक अप पॉइंटच्या अगदी जवळ असलेल्या सिद्धार्थ पॅलेस मध्ये उतरलो. हॉटेल एका रात्री राहण्यापुरतं चांगलं होतं. दुसर्या दिवशी सहा वाजताचं रिपोर्टींग होतं. आधीचा अनुभव असल्याने पाच मिनीटं उशीरा निघालो. टपरीवर चहा घेतला. काही लोक आलेलेच होते. उरलेले जमून निघेपर्यंत पावणे सात वाजले. एक मिनि बस आणि एक इनोव्हा अशात मिळून आम्ही १८ जण होतो. ब्रेकफास्ट, जेवण वगैरे करत सांकरीला पोहोचायला साडेचार वाजले. ब्रेफा, जेवण सोडल्यास प्रवासात कोणी कोणाशी फारसं बोललं नाही. मी तर अॅव्होमीन घेऊन बराच वेळ डुलक्याच काढल्या.
सांकरीला पोहोचत आलो तसा हवेतला गारवा वाढला. आणि मग पाऊसच सुरु झाला. खरं मला जरा वैताग आला कारण पाऊस म्हणजे चालतांना पाँचो घालावा लागणार आणि गारवाही वाढणार. ड्रायव्हरने घाईने वर ठेवलेल्या बॅगांवर प्लॅस्टीक घातलं. आमच्या ट्रेकींग सॅक्सवर कव्हर्स होतीच म्हणून बरं. शिवाय आम्ही सगळं सामान, कपडे प्लॅस्टीकच्या पिशव्यांमध्ये ठेवले होतं.
सांकरीला पोहोचेपर्यंत पाऊस थांबला. तिथे गेल्यागेल्या आमच्या टुर लिडरनी स्वागत करुन सामान खोल्यांमध्ये टाकून लगेच ब्रिफींग साठी बोलावलं.
सांकरीहून अनेक ट्रेक्स जात असल्याने TTH नी तिथे एक गेस्ट हाऊस लिजवर घेतलं आहे. त्यात ट्रिपल , चार शेअरींगवर खोल्या आहेत. आमच्या १८ च्या ग्रुप मध्ये आम्ही ४ जणी होतो. आम्हाला एक खोली मिळाली. बाकीच्या तिघी माझ्यापेक्षा १५-२० वर्षांनी लहान होत्या.
हे ते गेस्ट हाऊस.

ब्रिफींगसाठी वर आलो. तिथे चहा वगैरे होता. आधी लिडरनी स्वतःची आणि इतर ३ गाईड्सची ओळख करुन दिली. मग सगळ्यांनी आपापली ओळख करुन देतांना किती ट्रेक्स केलेत हे सांगायचं होतं. प्रत्येकानी किमान ३ तरी केले होतेच. म्हणजे सगळे अनुभवी होते.
आमच्यापैकी तिघांनी BMC ( Basic mountaineering course ) केला होता. अजून दोघांचे नंबर लागले होते. हा कोर्स ३ आठवड्यांचा असतो आणि बराच कठीण असतो.
तिघे जण ( दोन मुली आणि त्यातल्या एकीचा नवरा नॅशनल लेव्हलवर खेळणारे होते. एकीला तर गोल्डही मिळालं आहे. हे दोघे कलकत्त्याहून आले होते, तिथल्या डिकॅथलॉनमध्ये तिचे फोटो आहेत. अर्थात ही माहिती आम्हाला नंतर कळत गेली ) आणि हे सगळे जेमतेम तिशीचे होते. नॅशनल लेव्हलवर सायकलींग करणारी तर वीसच वर्षांची आहे. आम्ही १८ पैकी आम्ही पाच जण चाळिशीपुढचे. आमच्यातला एकजण सिम , कोरीयाहून आला होता आणि तो साठ वर्षांचा होता.
तर आमचा लीडर नविन राणा ह्याने आम्हाला बेसिक नियम सांगीतले. कधिही उशीर करु नका, चहा जेवणालाही नाही कारण ते लगेच थंड होतं. इतरांना त्रास होईल असं वागू नका, स्वच्छता पाळायची आणि मुख्य म्हणजे थोडा जरी त्रास होत असला तर लीडर, गाईड्सपैकी कोणालातरी सांगा म्हणजे वेळेवर मदत करता येईल.
बाकी जुजबी बोलून सात वाजता जेवण आणि दुसर्या दिवशी, रविवारी सकाळी ६ वाजता चहा, ७ ला ब्रेफा आणि ८ ला निघायचं असं सांगून बैठक संपली. ६, ७, ८ हा पॅटर्न पुढच्या दिवासात कायम राहीला, वेळेत थोडाफार बदल होऊन.
सांकरी छोटंस गाव असलं तरी ट्रेकींगला लागणारं ए टु झेड सगळं साहीत्य तिथे मिळतं. विकत आणि रेंटवरही.
थंडी वाढायला लागली होती. एक चक्कर मारुन, जेऊन साडेआठच्या दरम्यान आम्ही पडलो. रात्रीच्या जेवणात रोटी आणि भाताबरोबर दाल मखनी, मिक्स व्हेज आणि गोडात शाही तुकडा असं होतं. त्यापुढे रोज रात्रीच्या जेवणात एक गोड पदार्थ असेच. आणि तो ही रिपीट न होता.
उद्या पहिला मुक्काम सीमा. सगळं मिळून ८/९ किमी चालायचं होतं. पहाडात अंतर किलोमीटर मध्ये नाही तर वेळात मोजतात. त्यामुळे उद्या चार किमी चालायचं आहे असं न म्हणता पाच तास चालायचं आहे असं सांगतात. त्या हिशोबाने उद्या ६/७ तास चालायचं होतं. अंतर जास्त असलं तरी वेळ ओके लागणार होता कारण सुरुवातीचा टप्पा होता. आम्ही सध्या ६००० फुट ऊंचीवर होतो ते उद्या ७००० वर जाणार होतो.
रात्री थंडी चांगलीच वाढली. दोन दोन ब्लँकेट असूनही झेपेना. उद्यापासून टेंट आणि स्लीपींग बॅग्ज. कसं होणार !
रविवारी सगळे वेळेवर तयार होऊन निघालो. अनुभवी लोक बरोबर असल्याचा हा मोठा फायदा असतो. एकही दिवस, एकानेही एक मिनीटही उशीर केला नाही. सगळेच्या सगळे वेळेआधी तयार असत.
आज सुरुवातीला तासभर ट्रॅक्स सदृश्य गाड्यांनी जायचं होतं. मग चालणं सुरु. प्रत्येक गाडीत आत आम्ही ६/७ जण आणि वर गाईड्स, सपोर्ट स्टाफ, सामान आणि चक्क पोतं भरुन कांदे बटाटे भाज्या आणि इतर वस्तू. रस्ता अगदी अरुंद, वळणावळ्णाचा ट्रिकी होता. ड्रायव्हर्स तयारीचे होते. पूर्णवेळ मी, आपल्याला इकडे कधी ड्राईव्ह करता येईल ह्या विचारात मग्न होते.
इकडे सगळीकडे पंतप्रधान ग्रामसडक योजनेची कामं जोरात सुरु आहेत. ह्या पट्ट्यावरच्या ओस्ला नावाच्या शेवटच्या गावापर्यंत हा रस्ता जाणार आहे. त्यामुळे येत्या १/२ वर्षात ह्या ट्रेकचा एक दिवस कमी होईल कारण तिथवर गाडी जाऊ शकेल. ही गावं एवढ्या दुर्गम भागात आहेत की आजवर हे लोक बाहेरच्या जगाशी कसे कनेक्टेड होते हा प्रश्न पडतोच.
तास सव्वा तासाने थांबलो. इथून पुढे चालणे. सगळ्यांना जमा करुन, फार पुढे मागे राहू नका वगैरे सांगून चालायला सुरुवात करायला सांगीतली. गाईड्सपैकी एक जण सगळ्यात पुढे. त्याच्या पुढे जायचं नाही. मुख्य लीडर सगळ्यात मागे, बाकी उरलेले दोघे मधल्या पट्ट्यात असत. सगळ्यात पुढे जो हितेश भाई गाईड होता, त्याच्याकडे त्याच्या स्वतःच्या सॅकव्यतिरीक्त १० किलो वजनाचा ऑक्सीजन सिलींडरही होता. तो त्याने पहील्या दिवसापासून शेवटपर्यंट बाळगला आणि हे आम्हाला शेवटच्या दिवशी कळलं.
आम्ही दोघांनी आणि इतर ४ जणांनी आमच्या मोठ्या सॅक्स ऑफलोडींगसाठी दिल्या होत्या ऑफलोडींग म्हणजे घोड्यावरुन सामान येतं. ह्या ट्रेकमध्ये बेस कँपपर्यंत घोडे असणार होते. पुढे पोर्टर्स. आमच्याकडे छोटी सॅक असे, ज्यात पाणी, थोडा खाऊ, कॅप, गॉगल आणि पॅक्ड लंच असेल तर डबा असायचा. शिवाय फोन, माझा किंडलही माझ्याच सॅक मध्ये असत.
बाकीच्यांनी मात्र थ्रू आऊट स्वतःच्या सॅक्स उचलल्या. त्याबद्दल सतत त्यांचं कौतुक वाटे. खरं म्हणजे हे असं करता येईल हे आमच्या लक्षातही आलं नव्हतं. सुरुवातीला आपल्याला शक्य नाही हा विचार केला कारण कपडे आणि इतर सामानामुळे सॅकच वजन ९/१० किलो तरी भरतं. एवढं वजन उचलून इतकं चालायच आपल्याला जमणार नाही. तरी शेवटी शेवटी, नीट सवय, प्रॅक्टीस केली, सामान कमी केलं तर जमू शकेल ह्या विचारावर आलो आहोत. बघू कसं जमेल ते. ( सामानावरुन, आम्ही नेलेले निम्मे कपडे वापरले गेलेच नाहीत. अगदी फ्लीज जॅकॅट्सही नाहीत. तशीच परत आणली. आता नीट अंदाज आला आहे काय घ्यावं काय नाही याचा. त्यामुळेही सामान कमी होईल. )
तर चालायला सुरुवात केली. रस्त्यात कामे सुरु होती. बुलडोझर वगैरे मुळे काही ठिकाणी थांबायला लागे. साधारण अर्ध्या तासानंतर मोकळा रस्ता लागला. आजचा संपूर्ण रस्ता मोस्टली झाडी असणार होती. सावली, ऊन, सावली.. हळू हळू पुढे जात होतो. एव्हाना थोड्या ओळखी होऊ लागल्या होत्या. पुढे एका गावात एक भुभू आमच्या बरोबर चालू लागला. त्याला बिस्कीटं दिली. काही वेळाने रस्त्याकडेला असलेल्या एका टपरीवर चहा ब्रेक घेतला. खरं तर माझ्या दुसर्या चहाची वेळ होऊन गेली होती तरी मी चक्क चहा घेतला नाही.
रस्त्याच्या कडेला ऊतारांवर कसले कसले मळे होते, वर डोंगरावर तुरळक घरं दिसत होती. मध्ये मध्ये लाल रंगांचे पट्टे असलेली झाडे असत. त्याच्या तुर्यांना वाळवून पीठ काढतात, जे स्वयंपाकात वापरतात.
दररोज ब्रिफींगमध्ये आम्हाला इतर गोष्टींबरोबर उद्या रस्त्यात पाणी मिळेल का तेही सांगत. झरे, पाईप्स मधून येणारं ताजं पाणी.
एका ठिकाणी अजून एक ब्रेक घेतला. हे एक छोटे हॉटेल होते. इथे कोकम सरबत मिळालं. आमच्यात दोन जण कन्नड भाषीक होते, त्यांच्याकडून भाषेचे धडे घेतांना
अख्खा रस्ता नदीच्या कडेने, झाडांच्या सावलीत वर, खाली चढत उतरत जात होता. हवेत मस्त गारवा होता.
साडेबारा दरम्यान जेवायला थांबलो. इकडे चक्क अमूल ताकही मिळालं. मला ह्या बाकड्यांवर बसून झोपून जावंसं वाटत होतं. आज डब्यात पोळ्या आणि कोबीची मस्त भाजी होती. डबे खाल्ले आणि तिथेच झर्यावर धुतले.
हिमाचलमध्ये डोंगराळ भागात आढळणारी अजून एक नवलाईची वास्तू म्हणजे पाण्यावर चालणार्या गिरण्या. अशीच एक गिरणी आम्हाला बघायला मिळाली. पाण्याच्या जोरावर पाती फिरतात आणि दळण दळलं जातं. ती बंद होती म्हणून आतून फोटो घेता आले नाहीत. ही ती गिरणी
अखेरीस अडीचच्या दरम्यान आमची पहिली 'सीमा' कॅंपसाईट आली. दरम्यानच्या काळात घोडे पुढे गेले होते आणि जरा वेळाने, टिम टीटीएच असे टी शर्ट घातलेले दोघे जण, पायात फक्त स्लीपर्स घालून आमच्या पुढे वेगात निघून गेले. ते आमचे मुख्य कुक आणि मदतनीस होते.
आज बाकी स्टाफ पुढे आल्याने तयार सेट केलेले टेंट्स मिळाले. हे टेंट्स अगदी लहान असतात. आत जेमतेम तीन माणसे झोपू शकतात. आणि ऊभं राहीलं तर ते डोक्यावर उचलेले जा ऊ शकतात. सो पँट्स घालणं हे जिकरीचं काम होतं. आमचे डबल शेअरींग होते. सॅक्स आम्ही आतच ठेवल्या कारण मध्येच पाऊस पडत होता. नियमानुसार लगेच टेंटमध्ये जाऊन झोपायचं नव्हतं कारण आत गुदमरल्यासारखं होऊ शकतं. बाहेरच जरा बसून मग आत गेलो. मोठ्या सॅक्सही आत नेल्या . बदललेले कपडे टेंटवर उन्हात पसरून ठेवले. दररोज कँपवर पोहोचल्यावर अंधार पडायच्या आधी आम्ही दुसर्या दिवशीची तयारी करुन ठेवत असू. सांगीतल्याप्रमाणे कपड्यांचे लेयर्स काढून ठेवणे आणि खाऊच्या पिशव्या भरुन घेणे. मी मिक्स ड्रायफ्रुट्स, स्नीकर्सची छोटी चॉकलेट्स, पेपर बोट्सची चिक्की, ड्राईड फ्रुट्स नेले होते. मोठ्या पिशव्यांमधून काढून आमच्या पाठीवरच्या सॅक्समध्ये लहान झिपलॉक पिशवीत ठेवत होतो. चालतांना कधी फारसं खाल्लं नाही, पण कँपवर आल्यावर मात्र भूक लागायची तेव्हा उपयोग व्हायचा.
दुपारी चार वाजता चहा आणि स्नॅक्स, रोज वेगळं काहीतरी आणि गरमागरम. आज भजी होती. त्यानंतर अॅक्लमटायझेशन वॉक म्हणजे आहोत तिथून अजून पुढे, ऊंचावर अर्धा पाऊण तास जाऊन यायचं. हे गरजेचं असतं कारण एव्हाना तुम्ही आहात त्या ऊंचीला सरावले असता. त्याहीपेक्षा ऊंचावर जाऊन खाली आलं की अजून थोडा सराव होतो. climb high, sleep low हा नियम आहे. आल्यावर सूप असे. रोज वेगळं, गरमागरम. ते पित असतांना आमचा ऑक्सीजन, पल्स रेट चेक करत आणि नोंद करत. त्यानंतर दुसर्या दिवसाचं ब्रिफींग ज्यात मुक्काम कुठे, किती अंतर, किती वेळ लागू शकतो, कधी निघायचं, रस्त्यात पाण्याची सोय काय, लेयरींग कसं करायचं आणि इतर महत्त्वाच्या सुचना. त्यानंतर जरा ब्रेक घेऊन साडेसातला रात्रीचं जेवण आणि मग झोप. हे असं जनरल schedule असे.
आज अॅक्लमटायझेशन वॉकला जातांना आमच्या कॅंपच्या पुढे बिकट अॅडव्हेंचरचा कँप दिसला. येतांना पुणे एअरपोर्टवर आमच्या मागच्या खुर्च्यांवर बसलेल्या मुलींच्या बोलण्यात, सांकरी सांकरी ऐकलं आणि न राहवून त्यांना विचारलं की तुम्हीही ट्रेकला जात आहात का ? त्या बिकट बरोबर ' हर की दुन' ला जात होत्या. त्या कदाचिक इकडे असतील म्हणून बघायचा प्रयत्न केला पण कँपवर शांतता होती. कदाचित अजून आल्या नसतील.
वरुन आमचे टेंट्स दिसत आहेत.
परत आल्यावर रोजचं जर्नल लिहून आजचं राहीलेलं वाचन केलं.
आता इकडे, पाण्यात जाऊन वाचायची गरज होती का असं विचारू नका, कारण होती. : फिदी: रोज रोज थोडीच असं मिळणार आहे !
आज माझा ऑक्सीजन ९८ आला. आणि पल्स ७०.
थंडी चांगलीच वाढली होती. आज जेवणात गोड म्हणून गाजराचा हलवा होता.जेवण झाल्यावर मी लगेच जाऊन आडवी झाले पण गारव्याचा चांगलाच त्रास होत होता. काही वेळानी महेश येऊन मला जरा जबरदस्तीनेच बाहेर घेऊन गेला. बाहेर चक्क आतल्यापेक्षा कंफर्टेबल वाटत होतं शिवाय पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश. बाहेर १५/२० मिनीटे फेर्या मारायला लावल्या आणि मग आता जाऊन झोप म्हणाला. हालचाल करुन शरीरात ऊब निर्माण होते आणि मग झोपलं की ती ऊब स्लिपींग बॅगमध्ये ट्रॅप होते आणि थंडी वाजत नाही. खरोखर मला बर्यापैकी शांत झोप लागली. जाग येत होतीच पण तरीही थंडी कमी वाजली. मी स्लिपींग बॅगमध्ये गुरफटून घेऊन किंडल वाचायची ट्रीक शोधली, फक्त एका हातातला हातमोजा काढावा लागत होता, पण तरी जमलं.
रात्री दिड पावणे दोन दरम्यान टॉयलेट टेंट गाठावा असं वाटू लागलं. वर वर जातांना ams ( altitude mountain sickness ) चा त्रास होऊ नये म्हणून सतत म्हणजे अगदी स त त पाणी पिणे हाच एक ऊपाय आहे. आम्ही डायमॉक्स नेल्या होत्या पण एकदाही घेतल्या नाहीत. पाणी प्यायल्याने आणि जनरलच थंडी असल्याने जावसं वाटणं सहाजिकच होतं. इकडे गेल्या काही आठवड्यात अस्वलाचं सायटींग झाल्याने रात्री एकट्याने बाहेर पडायचं नाही अशी ताकीद मिळाली होती.
मला जायचं होतं आणि महेश गाढ झोपला होता. साडेचारपर्यंत वाट पाहिली आणि मग शेवटी हाक मारलीच त्याला. टेंटच्या बाहेर पडणं हेही एक ड्रीलच असतं. आधी तर (त्यातल्या त्यात ) ऊबदार स्लिपींग बॅगमधून हात बाहेर काढून चाचपून हेडटॉर्च लावायचा, डोक्याचा रुमाल/ टोपी नीट करायची. मग जीवावर येऊन अर्धवट झोपेत बाहेर यायचं, मग टेंटच्या दाराची चेन ऊघडून, ग्लोव्ज काढून फ्लोटर्स घालायचे. पायात वुलन सॉक्स असतात ते फ्लोटर्सच्या वेलक्रो मध्ये अडकतात , ते ओढाताण करत काढायचे, फ्लोटर्स जेमतेम अडकवून, बाहेरची कनात ऊघडून रांगत भेलकांडत बाहेर पडायचं. : राग:
बाहेर थंडीचा जोरदार फटका बसतो.
पण बाहेर चंद्राचा चमकदार प्रकाश पडला होता. गवतातून धडपडत टॉयलेट टेंट गाठला.
हे टेंट म्हणजे एक खड्डा खणलेला असतो, त्यावर लावलेला आडोसा. आमचे २ असत. त्यातल्या एकाची चेन खराब झाली होती, ती एका विशिष्ट जागेपेक्षा जास्त उघडली की पुन्हा लागायची नाही आणि दररोज कोणीतरी एक जण ती पूर्ण उघडायचाच. मग तो टेंट बाद व्हायचा आणि दुसर्यावर सगळी जवाबदारी यायची.
आपलं काम झालं की तो खड्डा खोदतांना जी माती बाजूला काढलेली असे त्यातली थोडी, तिथेच ठेवलेल्या लहानश्या फावड्यानी खड्ड्यात ढकलून द्यायची. फिदी:
आता उठलो आहोतच तर दातही घासून घ्यावेत. दात घासणं पण दिव्य असतं कारण तेच. ग्लोव्ज काढावे लागतात आणि थंडगार पाण्याने चुळा भरणं अवघड होतं. ह्यावर आम्हाला एक उपाय सापडला म्हणजे आमच्या ग्रुपमधल्या एकाने सांगितला, तो म्हणजे माऊथवॉश.
आज आम्ही होतो तिथे जरा मॅनेजेबल होतं. पण जशी थंडी वाढेल तसं हे कठीण होणार होतं. शिवाय प्रत्येक कॅंपवर पाणी मिळेल्च, असलं तरी बर्फ झाला असू शकेल ही शक्यता असते. त्यामुळे आता आमच्या ट्रेकच्या मास्टर लिस्ट मध्ये माऊथवॉश घातला आहे.
बाहेर खूप प्रसन्न वाटत होतं. पण चहाला अजून तासभर होता म्हणून पुन्हा जाऊन झोपलो. एव्हाना २/३ जण उठले होते पण ते कोण आहेत हे कळत नव्हतं. कारण टोप्या, जॅकेट्स मध्ये चेहरा दिसत नव्हता. पुढे पुढे जॅकेट्स बघून कोण आहे हे लक्षात येऊ लागलं.
लवकर उठण्याचा फायदा झाला की टॉयलेट टेंटच्या बाहेर लाईनमध्ये उभं रहायला लागलं नाही. फिदी:
आता आजचा मुक्काम असेल डायरेक्ट १०,२०० फुटावर. देवसु बुग्याल
क्रमश :
बाली पास - पुढचे दिवस
ट्रेकचा दुसरा दिवस - मुक्काम देवसु बुग्याल.
७००० वरुन १०,२०० फूट. अंतर साधारण ८/९ किमी. वेळ ५/६ तास.
आज आम्हाला हॉट लंच होतं. एव्हाना हॉट लंच म्हणजे जास्त चालायचं नाहीये हे लक्षात आलेलं होतं. बरोबर ८ वाजता निघालो.
निघाल्या निघाल्या आमच्या रस्त्यावरचं शेवटचं दुकान लागलं. आणि पाऊसही सुरु झाला म्हणून आम्हाला थोडा वेळ आडोश्याला ऊभं रहायला सांगीतलं आजचाही रस्ता कालसारखाच. फक्त जरा जास्त दाट झाडी लागत होती. बाजूला कालचेच लाल तुरे होतेच. बरोबर खळाळत वाहणारी नदी होतीच. ती कधी डावीकडे, कधी उजवीकडे.

चढ, उतार, लहानमोठे ओढे, दगड , माती चिखल पार करत हळू चालत, मध्ये ब्रेक घेत कँपसाईटवर पोहोचलो. आम्ही वर वर जात होतो. त्यामुळे उतार आला की आता दुप्पट चढ येणार ह्याची धडकी भरायची. इथेच रस्त्यात एका ठिकाणी एका पुलावरुन हर की दुन ट्रेकचा रस्ता वेगळा होतो.
आजपासूनच्या चालण्याचं एक सुख होतं ते म्हणजे स्वर्गरोहिणी पिकचं होणारं दर्शन. पांडव ज्या मार्गावरुन स्वर्गात गेले ते शिखर आजपासून आमच्या बरोबरीने असणार होतं. हे अजून कोणीही सर करु शकलेलं नाहीये, ज्यांनी प्रयत्न केला ते परत आले किंवा नाहीसे झाले.
एका ठिकाणी सरळ उतार उतरुन पुढे तसाच उभा चढ चढून जायचं होतं. उताराच्या टोकाला तळाशी गर्द झाडी आणि प्रचंड गारठा होता आणि बाजूला ऊंच सुळके. तिथे वर मधमाश्यांचा एक मोठ्ठा थवा (?) भिरभिरत होता. हजार दिड हजार तरी असतील आणि प्रचंड मोठी पोळी लागली होती. त्या वरच राहू देत अशी प्रार्थना करत घाईघाईने तो भाग ओलांडला. शेवटचा चढ बराच कठीण होता. त्यानंतर आलेलं पठार कसंबसं पार केलं आणि कँपसाईटवर पोहोचलो.
घळीकडे जाणारा रस्ता
आज रस्त्यात एक गंमत झाली. एका ठिकाणी खूप अरुंद अश्या घळीतून खाली उतरायचं होतं. खूप अंधारी आणि झुडूपांनी गच्च भरलेली. आमचा सगळ्यात पुढचा गाईड आत शिरला आणि लगेच बाहेर आला. जरा थांबा म्हणे. तर दोनच मिनीटात आतून आणि बाकी सगळीकडूनच शेळ्याच शेळ्या बाहेर पडू लागल्या. आणि बाहेर आम्ही सगळे तर त्या बिचकून पुन्हा उलट्या वळून जाऊ लागल्या. मग आम्हाला मागे जा मागे जा करत त्यांना रस्ता दाखवला. जवळजवळ हजाराच्या आसपास असतील. आणि त्यांना सांभाळायला ३/४ जण. मध्येच एक माणूस बाहेर आला तो त्याच्याकडे हे
ह्या बॅगेत किमान ४/५ पिल्ले होती, ती तीन दिवसांची होती. त्यांना आता वर थंडी सहन होणार नाही म्हणून खाली नेत होते. खरं सांगते, ती पिल्ले आणि घाबरुन भराभरा जाणार्या त्या शेळ्या बघून माझा नॉनव्हेज न खाण्याचा निर्णय अजून अजून पक्का होऊ लागला. आणि मी सिरीयसली ह्यावर विचार करते आहे.
कँपवर पोहोचलो . आमच्या पुढे मागे बिकट अॅडव्हेंचर टिम होती. त्यांचा एक ग्रुप बाली पास करत होता. कँपसाईटवर जागा अगदी थोडी असल्यामुळे त्यांच्यात आणि आमच्या गाईड्स मध्ये जागेसाठी जरा चढाओढ झाली. त्यांचा आणि आमचा एकाच छोट्या मैदानावर पुढेमागे कँप लागला. आमचे कँप्स उतारावार होते. त्यामुळे त्या रात्री आम्ही सगळे घसरत टेंट्स च्या दाराशी जात होतो. आणि मग अर्धवट झोपेत स्लिपींग बॅग मध्ये कसंबसं वर सरकत होतो. : हाहा:
आज जरा लवकर पोहोचल्याने लंचच्या वेळेपर्यंत dumb charades खेळलो. प्रचंड धमाल आली. आणि मग रोज कँपवर पोहोचल्यावर हे पण एक रुटीन झालं.
संध्याकाळी नेहमीप्रमाणे acclamation walk ला नेलं. पावसाळी हवा होती.
एव्हाना सगळ्यांशी बर्यापैकी ओळखी झाल्या होत्या. चालतांना मागे
सप्तचिरंजिव वगैरे ऐकलं., वळून पाहीलं तर जितेंद्र दोघांना सांगत होता आणि
त्याला नीट आठवत नव्हतं तर त्यांच्या संभाषणात घुसले. आणि मग आमच्या मस्त
गप्पा रंगल्या. जितेंद्र जेमतेम २८/२८ वर्षांचा, पण त्याला बरीच माहिती
असल्याचं बघून कौतुक वाटलं.
आज पाऊस होता, त्यामुळे उद्या कसं काय होणार अशी शंका होती.
आज दुपारी चहाबरोबर गरमागरम मठरी आणि रात्री खीर होती.
पहीले दोन दिवस तसे बरे गेले तरी गाईड्स अभी तक ट्रेक शुरुही नही हुआ है ह्यावर अडून होते.

--------------------------------------------------------------------
ट्रेकचा तिसरा दिवस - मुक्काम रुईनसारा ताल
१०,२०० वरुन ११,८०० फूट . अंतर १२ किमी. वेळ ६/७ तास.
उद्याचा मुक्काम असणार होता रुईनसारा ताल. रुईनसारा ताल हा ही एक वेगळा स्वतंत्र ट्रेकच आहे. आता ह्यात एक कॅच होता. उद्या आम्हाला सुपीन नदी ओलांडायची होती. जर दुपारी एक पर्यंत पोहोचू शकलो तरच नदी क्रॉस करायची नाहीतर परवा सकाळी कारण उन्हे जशी चढत जातात तसे वरचे ग्लेशियर वितळतात आणि खाली नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढतो. परवा सकाळी नदी ओलांडायची कोणाचीच तयारी नव्हती कारण सकाळी महा प्रचंड थंड पाणी असणार आणि तसंच पुढे चालत जायचं म्हणून सगळ्यांनी ठरवलं की काहीही झालं तरी उद्याच पलीकडे मुक्काम करायचा. त्यामुळे लवकर, सात वाजता निघायचं ठरलं.
आज बरच चालायचं असल्याने आमच्या कुकने आम्हाला पोटभर पोहे, मॅकरोनी आणि खीर खायला घालून रवाना केलं.
चालण्याची सुरुवात उतारापासून. जवळजवळ अर्धा तास उतरत होतो., ते ही दाट झाडीतून आणि किचकट रस्त्यावरुन. बरेचदा पाय घसरला, कालच्या पावसामुळे चिखलही झाला होता. ह्या उतारावरुन पुढच्या चढांचा अंदाज आला.
उद्यापासून हळू हळू झाडी विरळ होत जाणार.

पण आजचा दिवस चालतांना सगळे अनुभव घेऊन आला.
चढ, उतार, तीव्र चढ त्यामुळे तीव्र उतार, झुडूपे, माती, वाळू, मोठे दगड, चिखल, छोटे ओहोळ आणि चक्क धबधबे
ह्या फोटोत नीट दिसत नाहीये पण मस्त धबधबा होता. हा शेवटचा टप्पा होता
चालण्याचा पण अर्थात माहिती नव्हतं. फार फार दमले होते आणि अवचित तो समोर
आला. मग भिजून ताजंतवानं वाटलं. मला भिजायला अज्जिब्बात आवडत नाही. पण परत,
ही अशी संधी कोण सोडेल ? भिजून घेतलं. पण शुज ओले होऊ लागले म्हणून मन
आवरलं.
हा आमचा राम तेरी गंगा मैली फोटो 
आज चालणं खरंच कठीण वाटत होतं, त्यात वेळेवर पोहोचण्याची घाई होती. ब्रेक्स कमी घेतले जात होते.
एक कठीण चढ चढून आल्यावर....... इथेच टाका तंबू

एक वाजायला आला तरी टेंट्स काही दिसेनात. आज काही नदी ओलांडता येणार नाही बहुदा. आमच्या गाईड्सनी स्पष्ट सांगितलं होतं की सारखं सारखं, आता किती वेळ विचारु नका. गुड्डूभाई गाईड तर वाटेल ते उत्तर देत. पण आमची अवस्था बघून ह्यावेळी त्यांना दया आली आणि गिनके २० मिनीटमे पोहोच जायेंगे हे ऐकल्यावर आमच्या अंगात त्राण आले.
आणि बरोबर २० मिनीटांनी
फायनली थकून भागून नदीकाठी पोहोचलो.
पुढे दुसरं दिव्य होतं ते बर्फासारख्या थंडगार पाण्यातून अनवाणी, दोराला धरुन नदी क्रॉस करण्याचं. नदी दोराला धरुन ओलांडायची होती.

आमचे फ्लोटर्स आम्ही ठेऊन घेतले होते. शुज काढून ते घातले. लेसेस बांधून शुज गळ्यात अडकवले. पँट फोल्ड केली आणि इकडेतिकडे न बघता सरळ काठाशी गेले. इकडेतिकडे, पाण्यात बघू नका, सरळ समोरच्या डोंगरांकडे बघा आणि पाय उचलू नका, सरकवा हे ऐकून पाण्यात पाय घातला. आणि त्याक्षणी काय धक्का बसला ! पाणी अती म्हणजे अतीच थंड होतं, पुढे नदी कशी ओलांडली ते आठवत नाही पण बाहेर आल्यावर पावलं लालभडक झाली होती. पुढे बराच वेळ तो बधिरपणा राहीला.

सगळ्यांनी ओरडत, किंचाळत नदी क्रॉस केली आणि मग जल्लोश केला.
हा सगळा वेळ आमचे गाईड्स पाण्यात पाय रोऊन दोर धरुन उभे होते. ज्यांना मदत लागली त्यांच्या बरोबरीने नदी क्रॉस करत होते. आणि आमची अवस्था बघून हसतही होते.
आम्ही रोज निघण्याच्या आधी वॉर्म अप आणि कँपवर पोहोचल्यावर कूल डाऊन करत असू. आज सुट्टी. आज अॅक्लमटायजेशन वॉकलाही सुट्टी.
दुपारी चहाबरोबर व्हेज चॉप्स चापले.
ही कॅंपसाईट.

आम्ही रोज सकाळी निघतांना स्लिपींग बॅग्ज पॅक करुन ठेवत असू.
आल्यावर टेंट्स लावायला आणि निघतांना डिस्मेंटल करायलाही जमेल तशी मदत
करायचो. पण आमची ती मदत म्हणजे लुडबूड होती. तरी शेवटच्या दिवसापर्यंत
बर्यापैकी तयार झालो.
उद्या सकाळची नदी क्रॉस करायची सर्कस टळल्याने सगळे खुश होते.
बिकटची जी टिम आमच्या मागे पुढे होती ( खरं तर पुढेच असे. ७/८ जण होते
आणि हे लोक अगदी टेकण्यापुरते ब्रेक घेत होते. इकडेतिकडे न बघता सतत चालत
होते )
त्यांनी नदीच्या पलीकडे मुक्काम केला. दुसर्या दिवशी आम्ही नदी क्रॉस करतांनाची त्यांची कसरत पाहून घेतली.
रोज प्यायचं पाणी आम्हाला अश्या नदी, ओढ्यांमधून भरुन घ्यावं लागायचं. फक्त शेवटच्या २ दिवशी एक एक थर्मासभर गरम पाणी मिळालं.
पाण्यासाठी आम्हाला आमच्या हायड्रेशन बॅग्ज ( बॅग्ज म्हणायचं, त्याचं खरं
नाव आहे हायड्रेशन ब्लॅडर ) चा खूप उपयोग झाला. अगदी हॅन्ड्स फ्री. ( हा
फोटो देता येत नाहीये )
नदीच्या काठावर फोटो काढायलाच हवा. (हे दुसर्या दिवशी निघतांना)

रात्री मजा झाली. एकतर एकही रात्र सलग झोप लागत नव्हती. आज टेंट जरा सपाटीवर होते आणि खाली गवत असल्याने जरा बरं होतं पण थंडी चांगलीच वाढली की शेवटी पायातही थर्मल घालावे लागले.
तर गंमत. रात्री पावणे दोन, दोनच्या दरम्यान शेळ्यांचं ओरडणं ऐकू येऊ
लागलं. ६/७ असतील. कँपच्या जवळून आवाज येत होता. बहुदा कळपातून चुकल्या
असाव्यात. बराच वेळ आवाज येत होता. खूपच अस्वस्थपणा आला. बिचार्यांना भेटू
देत आपले भाईबंद.
सकाळी चौकशी केली तर गाईड्स म्हणाले ६/७ नव्हत्या दोनेक हजार असतील, त्या इकडून पुढे जात होत्या.
चला, निम्मा ट्रेक संपला. 
उद्यापासून खरी चढाई सुरु. ( म्हणजे गेले ३ दिवस काय करत होतो ?)
-------------------------------------------------------------------
ट्रेकचा चौथा दिवस - मुक्काम ओदारी
११,८०० वरुन १३,१०० फूट. अंतर ४ किमी. वेळ ५ तास.
आज उपमा आणि ब्रेडबटर खाऊन आरामात ८ वाजता निघालो.
आज बराच चढ असल्याने आणि जेवण कँपसाईटवर असल्याने सगळे निवांत होते. आरामात, थांबत फोटो काढत पुढे जात होतो.
स्वर्गरोहिणी आता बाहेर डोकावू लागलं होतं.
आजूबाजूचा परिसरही बदलायला लागला होता.
ह्या घळीच्या टोकाला, पार पलीकडे कँप होता
आणि सावकाश कँपसाईटवर पोहोचलो.
आजचा अॅक्लमयटाजेशन वॉक म्हणजे दुष्टपणा होता. आधी आम्हाला चविष्ट नुडल्स खायला घातले
( हे नुडल्स उकळत्या पाण्यातून काढतांना आम्ही दुपारीच पाहीले होते.
त्यावरुन आजचं जेवण काय ह्याच्या पैजा लागल्या होत्या, ( पैजा काय
लावायच्या त्यात, सरळ सरळ दिसत होतं ना ! पण जो हरेल तो पुन्हा सुपीन नदी
क्रॉस करुन येईल असं ठरलं ) पण आम्हाला सगळ्यांना क्लिन बोल्ड केलं ! आणि
सगळेच हरल्याने सुपीन नदी क्रॉस करण्याचा बेत रद्द केला गेला )
आणि मग कँपच्या मागे एक ऊभा सुळका होता. तिकडे चला म्हणून चालवायला सुरुवात केली तर थांबेचनात.
आजच बाली पासला पोहोचवणार की काय !
शेवटी वर वर नेऊन आता उतरा असं सांगीतलं. उतरणं अजून कठीण. परवा आप्ल्याला अश्याच रस्त्यानी उतरायचं आहे., तो तर जेमतेम पाऊल टेकेल इतका अरुंद आहे, आणि तिकडे थोडंथोडंकं नाही तर पाऊण तास चालायचं आहे शिवाय बाजूला दरी असेल तर आत्ताच जमवून घ्या.
आमचा लीडर एवढंच बोलायचा.
आम्ही ह्याही पेक्षा ऊंचावर होतो. फोटो काढायचे राहीले. दिसतांना, त्यात काय असं वाटेल पण तो सरळ ऊभा ऊंच चढ होता.
आमच्या दु:खावर ऊतारा म्हणून रात्रीच्या जेवणात शिरा होता.
कॅंपसाईट रात्रीच्या वेळी

इकडे थंडी अजून वाढली म्हणून अजून एक थर्मल घालायला सुरुवात केली.
रात्री स्लिंपिंग बॅगमध्ये घालायला वॉर्मर्स मिळाले. हे पातळ पण उबदार,
स्लिपिंग बॅगसारखेच शिवलेले असतात. ते बॅगच्या आत ठेऊन त्यात आधी शिरायचं
आणि मग झटापट करुन दोन्हीच्या चेन्स लावायच्या. वॉर्मर्सची ऊंची बॅगपेक्षा
कमी होती बहुतेक ( किंवा आम्हाला ते जमलं नाही ) मग अती वैतागून ते
पांघरुणासारखे गुंढाळून घेतले.
उद्या बेसकँप. !!!
उद्यासाठीचं ब्रिफींग करतांना, कँपवर जोरदार वारा असतो त्यामुळे टेम्परेचर अजून कमी होतं तेव्हा कान नीट झाकलेले ठेवायला सांगीतले.
उद्याचा हायलाईट होता, नामा कांडी रिज.(ridge)
सकाळी टेंट्स वाईंड अप होतांना
एवढी थंडी होती की उन्हात उभं राहूनही सहन होत नव्हती !!!!
--------------------------------------------------------------------
ट्रेकचा पाचवा दिवस - मुक्काम बाली कोल कँप ( बेस कॅंप )
१३,१०० वरुन १५,१०० फूट. अंतर अंदाजे ४ किमी. वेळ ५ तास.
आज आम्ही बेस कँपला पोहोचणार. 
सुरुवात चढापासून होती. जरावेळात चढाला सरावलो. झाडे जाऊन आता सगळीकडे रेती, सुटे, मोठे दगड दिसायला लागले होते.
हवेत गारवा होताच की आठ वाजताही हातमोजे घातले होते.
पहीला चढ चढून आल्यावर ब्रेक घेतला.
काही वेळात ती रिज (सुळका किंवा कड ) येणार. तो भाग कठीण असणार आहे. चालतांना डावी उजवीकडे बघू नका, पायाखाली बघा. घाबरु नका. हे ऐकून उत्सुकता वाढली होती.
पलीकडे लगेच टेंट्स असणार हे ही सांगीतलं होतं म्हणून,काय एवढं, थोडाच वेळ चालायचं असेल असंही वाटत होतं
चालायला सुरुवात केली.
तर पुढचा चढ चढल्यावर
बघितल्यावर एकदम छाती दडपल्याची भावना निर्माण झाली. फोटोत दिसतांना जरी
असं वाटत असलं की ही कड सरळ आहे, चढ नाहीये तरी तसं नाहीये. हा सरळ ७०
अंशाच्या कोनात चढणारा रस्ता होता. आणि दोन्हीकडचे उतार सरळसोट खाली गेलेले
होते. जेमतेम एक पाऊल मावेल एवढीच पायवाट. मी आधी अंदाज घेतला. इकडे पाय
बिय घसरला तर काय होऊ शकेल. जास्तीत जास्त काही हाडं मोडतील.
चालायला सुरुवात केली.
हे संपल्यावर टेंटस येतील ह्या आशेवर होतो तो पुढे किंचीत उतार आला आणि दुसरा चढ. पुढे तिसरा, चौथा. संपेचनात. सगळे दमले होते, वैतागले होते. चौदा साडेचौदा हजारावर आल्याने दम लागत होता. आणि टेंट्सचा पत्ताच नाही. एव्हाना घोडे आणि सपोर्ट स्टाफ पुढे गेले होते. हे कुक आणि हेल्पर्स पायात क्रॉक्स, साध्या स्लिपर्स घालून अश्या वेगात चालत जायचे की आम्हाला लाज वाटायची.
पाच चढ क्रॉस केल्यावर शेवटी टेंट दिसले.
चालण्याच्या शेवटच्या ट्प्प्यात आमच्या गृपमधला सनी माझ्याबरोबर होता. तो नॅशनल लेव्हलवर नऊ वेळा मार्शल आर्ट्स वगैरे खेळात खेळला आहे. त्याशिवाय ब्राझिलियन जिजुत्सू वगैरे अचाट नावांचे खेळही तो खेळतो. त्याची बायको अनन्या एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडलीस्ट आहे. ती पण होतीच आमच्याबरोबर. दोघेही जेमतेम तिशीचे.
कॅम्पला पोहोचल्यावर हुश्श झालं.
आज इकडे वेगळंच द्रुश्य होतं. बर्याच जणांना काही ना काही त्रास होत होता. डोकं तर बहुतेक सगळ्यांचचं दुखत होतं. मळमळणं, गरगरणं. गाईड्स त्यांना भरपूर पाणी प्या असं सारखं सांगत होते. मला चक्क उकडत होतं. नशिबानी महेशला किंचीत डोकं दुखण्यापलीकडे काही होत नव्हतं आणि मी अगदी बरी होते. त्यावरुन ' आम्हाला डोकं आहे वगैरे नेहमीचे जोक करुन झाले ). आज दुपारी टेंटमध्ये अजिबात जायचं नाही अशी सक्त ताकीद होती. त्यांनी सांगितल्याप्रमाणे वारा बिरा नव्हता म्हणून गारवाही सहन करण्याइतपत होता.
जेवण झाल्यावर आम्ही काही जण असच चालायला गेलो. समोरच पास दिसत होता. हा तर सहज क्रॉस करु शकू.
चहा झाल्यावर ( चहा बरोबर फ्रायम्स होते ) वॉकसाठी त्याच रस्त्याने पुन्हा नेलं.
वरुन दिसणारं दृश्य
आणि हे झळाळतं स्वर्गरोहिणी.

खाली आल्यावर ऑक्सीजन चेक. आजपर्यंत रोज माझा ऑक्सीजन ९६-९८ असे. पल्सही ७० च्या आसपास. बरेच जण ९० च्या वर किंवा ८८-९० पर्यंत असत. पण आज हायेस्ट मार्क्स ९० आले. माझा ऑक्सीजन ८८ आणि पल्स चक्क ७९. ते साहाजिकच होतं.
आज शेवटचं ब्रिफींग.
उद्या एकूण १४ किमी चालायचं आहे. पोहोचायला उशीर होईल.
पहाटे २ ला उठायचं. ३ ला चहा ब्रेफा आणि ४ ला निघायचं.
भरपूर पाणी भरुन घ्या
नीट लेयरींग करा
कान नीट झाकलेले ठेवा
आम्ही सांगू त्याच क्रमाने चालायचं. एकानेही लाइन सोडायची नाही.
समीटवर जास्तीत जास्त ५ मिनीटं थांबायला मिळेत त्यात काय ते फोटो काढून घ्या.
पुढे किचकट उतार असतील तिथे, आता उतरायचं आहे म्हणून घाई गडबड करु नका वगैरे वगैरे.
वातावरणात थोडी अॅन्झायटी, थोडं टेन्शन होतं.
जेवणाआधीच आम्ही उद्याचे कपडे घातले. पहाटे २ वाजता कपडे बदलण्याची हिंमत नव्हती.
मी वर एकूण ६ लेयर्स ( थर्मल, वर ट्रेकींगचा फूल स्लिव्ज टी शर्ट,
त्यावर रनिंगचा ड्रायफीट टी शर्ट,त्यावर पुन्हा थर्मल, त्यावर साधा कॉटनचा
टी शर्ट, आणि वर नेहमीचं डाऊन+ फ्लिज जॅकेट )
आणि पायात ३ लेयर्स ( थर्मल, कॉटन पँट त्यावर ट्रेकींगची पँट )
डोक्याला रुमाल, मला रुमाल आवडतो, हवा तसा सैल घट्ट करता येतो आणि त्यावर लोकरी कान झाकणारा पट्टा.
मला एकावर एक २ सॉक्स लेयर्स हवे होते पण ते फार घट्ट झाले असते म्हणून एकच घातले, शिवाय हातमोजे.
सॅकमध्ये अजून एक थर्मल ठेऊन घेतला. झिपलॉक पाऊचेस मध्ये भरपूर खाऊ ठेऊन घेतला.
जेवायला गोडात कस्टर्ड होतं लवकर जेऊन, नेहमीप्रमाणे फेर्या मारुन थोड्या अस्वस्थतेत, थोड्या उत्सुकतेने झोपायला गेलो.
समीट तर होऊन जाईल. समोरच दिसतय. चढ असला तरी पसरट आहे. धडपडण्याची भिती नाही. पण पुढे हे म्हणत आहेत तो उतार कसा असेल?
क्रमशः
https://www.maayboli.com/node/84297
No comments:
Post a Comment