Thursday, July 21, 2022

सातवाहनांच्या संस्कृतीच्या पाऊलखुणा जपणारे भोरांड्याचे दार - नाणेघाट




...चांदण्या राती नाणेघाटातल्या घळीत घुमणारा भर्राट वारा, कोकणात लुकलुकणारे दिवे बघत मारलेल्या गप्पा, गुहेतला मुक्काम, सकाळच्या गारव्यात 'भोरांड्याचे दार' घाटवाटेने उतराई, दोन ठिकाणी गवसलेली कातळकोरीव टाकी, उभ्या नाळेतल्या धोंड्यांमधली कसरत, पदरातला गच्च रानवा, सह्याद्रीचा विस्तीर्ण नजारा, भैरवगडाचं रौद्र रूप, उकळत्या उन्हातली पुरातन नाणेघाटाची वळणदार वाट, पळसाच्या झाडामागे धुम्म पळलेल्या हरणाची जोडी, वाटेतली असंख्य पाण्याची टाकी आणि अखेरीस नाणेघाटाच्या गुहेत स्मरलेलं सातवाहनांचं कर्तृत्व! 'भोरांड्याचे दार आणि नाणेघाट' या घाटवाटांच्या चढाई-उतराईच्या ट्रेकचा 'संक्षिप्त' वृत्तांत...
   
वाटांचा अंदाज यावा, म्हणून कच्चा नकाशा...

भोरांड्याचे दार:
- घाटमाथ्यावरचे गाव: अंजनावळे/ घाटघर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे
- जवळचा दुर्ग: जीवधन
- कोकणातले गाव: भोरांडे, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे
- स्थानवैशिष्ट्य: नाणेघाटाच्या ईशान्येस. पुरातन घाटवाट
- ऐतिहासिक संदर्भ/ खुणा: माथ्याजवळ पाण्याचे दुतोंडी टाके, नाळेमध्ये पाण्याची दोन टाकी
- वाटेत पाणी: घाटाच्या नाळेमधल्या टाक्यांचे पाणी वर्षभर असते, पण नियमित उपसा नाही. टाळलेले बरे.
- निवारा: नाणेघाटाच्या गुहेत, किंवा परिसरातल्या हॉटेल्सजवळ
- उतराई: ५५० मी
- वेळ: २.५ तास
- घाटवाटेतल्या ठळक खुणा:

नाणेघाटाच्या गुहेपासून ईशान्येला निघालो, तेंव्हा नानाचा अंगठा टोक कोवळ्या उन्हात न्हाऊन होतं. वेळ सकाळचे ७:१५.

मंद चढावरून सह्यधारेकडे चालत निघालो. समोर अंजनावळे गावच्या वऱ्हाडी डोंगराची टोके आभाळात घुसलेली.


भोरांड्याच्या दाराची उतराई सुरु व्हायच्या आधी, घाटाच्या माथ्याअलिकडे पाण्याची खोदलेली टाकी आहेत, अशी माहिती दिग्गज ट्रेकर दोस्त दिलीप वाटवे यांच्याकडून मिळालेली. टाकी सापडायची होती, पण माळावर काटेरी झुडुपांवर झोके घेणारे ऑर्किड्सचे झुबके सापडले.
         
टाकी आहेत तरी कुठे असा शोध चालू होता. थोडी शोधाशोध केल्यावर एका बंधाऱ्याजवळ उतरंड्या कातळावर टाकी गवसली. वेळ सकाळचे ८.

नाणेघाट - जीवधन परिसरात अजून काही कातळशिल्पे सापडणे हे आश्चर्य नसले, तरीही कधी न वाचलेले जुनं काही बघता आले, की आनंद वाटतोच.

कातळात खोदलेली तीन टाकी समोर होती. डावीकडे होतं थोडीशी खोदाई करून सुरुवातीलाच सोडून दिलेलं टाकं, तर उजवीकडे एक दुतोंडी टाकं.


दुतोंडी टाकं कातळाच्या आत खोदत नेलेले. पाणी नसलं, तर ओलसर चिखल साचलेला.

कातळखोदीव टाक्यांपासून हाकेच्या अंतरावर सह्यधारेजवळ भोरांड्याच्या दाराची वाट सुरुवात होणार, हा अंदाज अचूक ठरला. वेळ सकाळचे ८:१०.

झुडुपांमधून-धोंड्यांमधून ५० मी उतरल्यावर झालेलं भोरांडयाच्या दाराचं दर्शन.

पावसाळ्यात शिळंधार बरसणाऱ्या पावसाच्या पाण्याने पश्चिमेला कणखर सह्याद्रीमधून अशी घळीची वाट कोरून काढली होती.

अगणित धोंड्या-खडकांतून कातळभितींच्या साथीने उतराई करत होतो.

भोरांड्याच्या दारात अजून एके ठिकाणी पाण्याची टाकी आहेत, असं कुठेसं वाचलेलं. टाक्यांच्या स्थानाबद्दल मुंबईच्या ट्रेकर साधना चंदनशिवे यांच्याकडून थोडकी माहिती अमेयला मिळाली होती. "पाण्याची टाकी ना. हायेत की इथेच थोरल्या झाडापाशी. खोटं नाही सांगायचो...", एका मामांनी सांगितलं.

नाळेतले धोंडे संपत आले. थोरल्या झाडापाशी आलो. उजवीकडच्या कातळभिंतीत ७० फूट उंचावर टाकी होती. अर्थात, माहिती नसेल आणि मुद्दाम लक्ष नाही ठेवलं, तर घाटाच्या वाहत्या वाटेवरून त्या तिथे कातळभिंतीत पाण्याची टाकी असतील, हे कळणं तसं अवघडंच!

अलिकडच्या दरडीवरून वळसा घालून दरड चढून टाक्यांपाशी पोहोचलो. हेही दुतोंडी टाकं. कदाचित उपसा नसल्याने, उन्हाळ्यातही पाणी गच्च भरलेलं. थंडगार! आम्ही टाक्यांपाशी विसावलो असताना, खाली घाटवाटेने एक ट्रेकर ग्रुप वाटाड्यासह उतरत गेला. शेजारच्या कातळभिंतीवर पाण्याचं टाकं असेल, याचा त्यांना पत्ताही लागला नाही. वेळ सकाळचे ९.

आम्ही टाक्यांपासून उतरून परत मुख्य घाटवाटेवर आल्यावर, पदरातल्या रानाचा सुरेख टप्पा सुरु झाला. उंचच उंच वृक्ष!

समोर विखुरलेलं झाडीभरलं कोकण.

           
भोरांड्याच्या दारातून उतरत माळशेज घाटाच्या गाडीरस्त्यापर्यंत लांब चालत जाण्यापेक्षा, नैऋत्येला जात झाडीभरली सोंड पार करून थेट नाणेघाटाकडे वळसा घेत जाणारी वाट असेल का, याच्यावर ट्रेकर्सची चर्चा. स्थानिक लोकांना मात्र अश्या वाटेची गरज असेल, असं नाही वाटत. धोपट मार्गा सोडू नको, यावर एकमत झालं.
         
घाटातून उतरणारा ओढा समोर - वायव्येला निघाला, मात्र घाटवाट ओढ्याची साथ सोडून उत्तरेला भोरांडे गावाच्या दिशेने निघाली. झाडीच्या टप्प्यातून बाहेर आल्यावर मागे बघितलं, तर भोरांड्याच्या दाराची घळ लक्षवेधक होती.

किंचित चढावरून वाटेनं लपेटदार वळण घेतलं, आणि समोर उत्तरेला सामोरं सह्याद्रीचं भव्य दृश्य! कुलंग-मदन-अलंग-आजोबा-कात्राबाई आणि पायथ्याच्या कोकणातल्या वाड्या वस्त्या चढउतार... विलक्षण सुरेख दृश्य!

घाटाची उरलेली उतराई म्हणजे पदरातून लांबच लांब आडवी वाट, अलगत उतरणारी वळणां-वळणांची. एव्हाना समोर वायव्येला न्हाप्ता-हरिश्चन्द्रगडाचा कोकणकडा-तारामती-हरिश्चन्द्र शिखरे खुणावू लागली. 

पदरातला सुरेख पानझडी रानवा.

उजवीकडे सह्यमाथ्याच्या भिंतीवर सूर्य तळपू लागलेला. सह्यधारेपासून सुटावलेला मोरोशी भैरवगडाची कातळभिंत खुणावू लागली. या भिंतींमधून चढाई-उतराई करणाऱ्या कुठल्या घाटवाटा असतील, याच्यावर चर्चासत्र झालं.


भैरवगडाचं भेदक पण देखणं रूप.

वाट अखेरीस पोहोचली कल्याण - अणे माळशेज गाडीरस्त्यावर. भोरांड्याच्या दाराची वाट सुरेख मळलेली, अजिबात न दमवणारी. वेळ सकाळचे १०:३०.
       
भोरांड्याच्या दाराने सह्याद्रीच्या उतराईनंतर चढाईसाठी दुसरी वाट हवीच की. वाट होती सुपरिचित नाणेघाटाची. घाटाचा पायथा गाठण्यासाठी जिपडं मिळालं...

No comments:

Post a Comment

किल्ले बहुला.

 आयुष्यात पाहिल्यांदा आपल्या आर्मीला घाबरून जीव मुठीत धरून केलेला एक अविस्मरणीय ट्रेक - किल्ले बहुला.   ✍️ मेघन तारिहाळकर पाटील (चौफेर भटकंत...