http://nileshbhinge.blogspot.com/
'पृथ्वी आणि अग्नी ह्यांच्या मिलनातून सह्याद्री जन्माला आला',
या वाक्याचा अनुभव घ्यायचा असेल तर दुर्ग ढाकोबा नक्की करायला हवा. कारण
सह्याद्रीच्या कड्यांचे इतके रौद्रमनोहर दर्शन क्वचित इतर दुसरीकडून होत
असेल. दुर्गवरून दिसणारे आहुप्याचे उभेे कडे नि ढाकोबा वरून दिसणारे
दाऱ्या
घाटाची पाताळावेरी पोहोचणारी दरी पहिली कि विस्मय वाटल्याशिवाय रहात नाही.
नावात जरी दुर्ग असला तरी 'दुर्ग ढाकोबा' हे किल्ले नव्हेत. ती आहे दोन
वेगळी शिखरं. पण दोघांची नावं इतकी एकत्र घेतली जातात कि नवख्याला वाटावं कि
हा ढाकोबा नावाचा दुर्गच आहे.एकत्र नावे घ्यायला कारणही तसंच आहे. हि
दोन्ही शिखरं एकमेकांपासून एका रांगेने जोडली आहेत नी दोन्ही ठिकाणांना
भटके एकाचवेळी भेट देतात.
दुर्गच्या मध्यात आहे दुर्गामाऊलीचे मंदिर नि ढाकोबाच्या मध्यावर धाकेश्वराचे देऊळ आहे. दोन्ही माथ्यावर आहे असंख्य अनगड दगडांची रास.पण ह्याच माथ्यावरून दाऱ्या घाटाचे दृश्य पाहताना भान हरपायला होते.
Range ट्रेक म्हणले की आम्हाला अपेक्षा होती जंगलात वाट चुकण्याची नि पुनः वाट शोधत विजयाचा आनंद मिळवायची, पायात गोळे येऊन Glucon -D खात मार्ग तुडवायची. पण हे काही झाले नाही. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण झाली.
दुर्गच्या मध्यात आहे दुर्गामाऊलीचे मंदिर नि ढाकोबाच्या मध्यावर धाकेश्वराचे देऊळ आहे. दोन्ही माथ्यावर आहे असंख्य अनगड दगडांची रास.पण ह्याच माथ्यावरून दाऱ्या घाटाचे दृश्य पाहताना भान हरपायला होते.
Range ट्रेक म्हणले की आम्हाला अपेक्षा होती जंगलात वाट चुकण्याची नि पुनः वाट शोधत विजयाचा आनंद मिळवायची, पायात गोळे येऊन Glucon -D खात मार्ग तुडवायची. पण हे काही झाले नाही. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण झाली.
जावे तेव्हा ठावे :
पुणे ते हातवीज (१३०
km ) : दुर्गला जाण्यासाठी आपणाला प्रथम जुन्नरला जावे लागते. जुन्नरहून
आपटाळे - इंगळूणला जावे. आपटाळे ते इंगळून हा ८ km चा रस्ता अतिशय खराब
आहे. इंगळूणहून घाटाने आपण चढून
जातो . कठडे नसलेला अवघड असा हा घाट जरा जपूनच ड्राईव्ह करावा. घाट
संपल्यानंतर उजवीकडे वळून पसरवाडीमार्गे हातवीज ला जावे लागते. हातवीजवरून
जवळच्याच दुर्गवाडीपर्यंत गाडीमार्ग आहे. रस्ता एका पठारावरून धावत जातो, काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी कच्चा आहे.
दुर्गवाडीमधून दगड धोंडे पसरलेला रस्ता पार करून आपण दुर्गच्या पायथ्याशी
पोचतो. आपल्याकडे जीप सारखे मोठे वाहन असेल तर आपण गाडीनेच येथपर्यंत जाऊ
शकतो.
पुणे-जुन्नर- इंगळूण - हातवीज-दुर्गवाडी हा रस्ता साधारण ३:३० तासाचा आहे.
गुगळे काकांना (google मॅप्स) विचारल्यास एक रस्ता घोडेगाव-डिंभे मार्गे जातो पण हा रस्ता दुरावस्थेत असून घाट मार्ग आहे.
तू चाल गड्या :
दुर्गच्या पायथ्यापासून
आपला ट्रेक चालू होतो. गाडीरस्ता सोडल्यापासून मळलेली वाट २-३ मिनिटात
दुर्गादेवीच्या मंदिरापाशी घेऊन जातो. मंदिरचे नूतनीकरण करण्यात येत असून,
जवळच वन खात्याने शेड आणि बसण्यासाठी चौथरे बांधले आहेत.
| दुर्गकडे जाणारा रस्ता |
मंदिरासमोरूनच एक पायवाट थेट दुर्गच्या माथ्यावर घेऊन जाते. घनदाट जंगलातून जाणारी वाट, नानाविध झाडांच्या मोहरण्यामुळे सुगंधी झालेली आहे. साधारण ५-१० मिनिटात आपण दुर्गचा माथा गाठतो. समोर अहुप्याचे डोंगर दिसतात तर दुसरीकडे ढाकोबाचे शिखर खुणावत असते. दुर्गवर एक ध्वजस्तंभ सोडल्यास काहीही नाही. मात्र अनेक चित्रविचित्र आकारांच्या पत्थरांचा सडा पडलेला आहे. गडफेरी साधारण १५ मिनिटात आटपून आपण परत दुर्गेच्या मंदिरापाशी येतो.
| दुर्गचा माथा नि अंग दगडांची रास |
| रेलिंग्स समोरून दिसणारे दृश्य |
खाली उतरून आल्यावर उजवीकडे वळून आपण पुन्हा एका पठारावर येतो. डावीकडे रेलिंग्स लावलेले दिसतात. येथून अहुपे घाट, खुट्याचे दार दिसते.
सह्याद्रीचा नजारा पाहून पुन्हा आल्या वाटेवर मिळावे. दुर्गला मर्ध्यापर्यंत वेढा मारून येणाऱ्या वाटेने ढाकोबाच्या बरोबर समोर यावे. येथून उतरणाऱ्या वाटेने समोरची झाडी पार करून आपण एक ओढ्यापर्यंत येतो (प्रवाह १) . योग्य उतार पाहून ओढा पार करावा. विशेषतः पावसाळ्यात ओढा पार करताना काळजी घेणे आवश्यक आहे.
ओढा पार केल्यानंतर समोर दिसणारी टेकडी डावीकडे ठेवत ट्रॅव्हर्स करत साधारण ३०-४५ मिनिटात आपण एका प्रवाहापाशी (प्रवाह २) येऊन पोहचतो. येताना प्रवाहात उजवीकडे काही गुहा खोदलेल्या दिसतात. येथे गुरांच्या येण्या- जाण्यामुळे अनेक वाटा तयार झाल्या आहेत. त्यातून योग्य ती वाट पकडून प्रवाह ओलांडावा. येथून जंगलातून खडी चढण चढून साधारण अर्ध्या तासात आपण पुन्हा एका पठारवाजा मोकळ्या जागेत येतो.
| पठारावरून ढाकोबा |
आता ढाकोबा डावीकडे राहतो आणि आपण मळलेल्या वाटेने जंगल पार करत १०-१५ मिनिटात ढाकेश्वर मंदिराच्या मागे येतो.
| ढाकेश्वर मंदिर |
| श्री ढाकेश्वर |
ढाकेश्वर मंदिरासमोर काही वीरगळी आहेत, दिपमाळा आहेत, पाण्यासाठी वापरात येणारे पसरट भांडी आहेत. भिवडे गावातील काहीजण नित्य पूजेसाठी वरपर्यंत येतात. मंदिरात थोडी विश्रांती घेऊन ढाकोबाच्या शिखराकडे कूच करावे.
मंदिराच्या उजव्याबाजूने ट्रॅव्हर्स करत गेल्यावर एक रस्ता झाडीतून वर चढतो. साधारण १५ मिनटात आपण सपाटी वर येतो. येथे असंख्य शिळांची रास पडलेली आहे. पुन्हा थोडे उजवीकडे जात ढाकोबाच्या दुसऱ्या टोकापाशी जावे. येथून समोर दाऱ्या घाटाचे दृश्य दिसायला लागते. धारेवरून सोपे प्रस्तरारोहण करून आपण ढाकोबाच्या माथ्यवर येउन पोचतो.
| सपाटीवरून दिसणारे ढाकोबा आणि पिवळ्या रंगात चढाईचा मार्ग |
शिखरावरून :
ढाकोबा शिखरारून जो नजर पेश होतो तो पाहता मनात हर्षोल्हासाच्या उर्मी
उचंबळू लागतात. रौद्र सह्यद्रीच्या रूपाचं गारुड मनावर राज्य करतं. जीवधन,
नाणेघाट, येथून सुटलेले कडेच कडे, मागे थोड्या दूरवर चावंड, भीमाशंकरचे
हिरवी वनश्री असे अवघे अवघे पाहून मन भरून पावते. रुद्रातील खालील श्लोकाची
अनुभूती जणू समोर उभी ठाकते.
"नम॑ इरि॒ण्या॑य च प्रप॒थ्या॑य च॒ नमः॑ किग्ंशि॒लाय॑ च॒ क्षय॑णाय च॒ नमः॑ कप॒र्दिने॑ च॒ पुल॒स्तये॑ च॒ नमो॒ गोष्ठ्या॑य च॒ गृह्या॑य च॒ नम॒स्-तल्प्या॑य च॒ गेह्या॑य च॒ नमः॑ का॒ट्या॑य च गह्वरे॒ष्ठाय॑ च॒"
| डावीकडून उजवीकडे :: नाणेघाट , जीवधन, दाऱ्या घाट |
परतीच्या वाटेवर :
ढाकोबाहुन पुन्हा दुर्गवाडीत जाण्यासाठी ढाकोबाचे शिखर उतरून पहिल्या सपाटीपाशी यावे. मगाशी वर चढलेला रस्ता ना घेता सरळ जाणारी वाट पकडावी. हि वाट थेट उतरत येत (प्रवाह २) पर्यंत येते. येथून ट्रॅव्हर्स करत पुन्हा (प्रवाह १) पर्यंत यावे. थोडे डावीकडे वळावे. येथे एक झोपडी आहे तिच्या बाजूने दुर्गचे शिखर उजवीकडे ठेवत टेपाड चढावे. हा रस्ता थेट दुर्गवाडीत येतो. ढाकोबाहून निघाल्यापासून २-२:३० तासात आपण दुर्गवाडीत येतो.| परतीचा मार्ग |
ढाकोबा ते दुर्गवाडी रस्ता गुलाबी रंगाने दाखवला आहे
तुम्ही सुज्ञ असा :
हि भटकंती करताना काय काळजी घ्यावी, कुठल्या गोष्टी लक्षात असू द्याव्यात याची छोटीशी यादी :
- पायात बूट असावेत जंगलातून अथवा गावतातून चालताना safety च्या दृष्टीने हे आवश्यक आहे.
- शक्यतो हा ट्रेक पावसाळ्यात करू नये, कारणे दोन. एक म्हणजे धुक्यामुळे दिशाहीन होऊन रस्ता चुकू शकतो, आणि दुर्ग ढाकोबावरून जे भन्नाट दृश्य दिसते ते दिसणार नाही.
- सप्टेंबर ते जानेवारीपर्यंत हा ट्रेक करणे उत्तम.
- पाण्याची उपलब्धता दुर्गवाडीत अथवा रस्त्यात लागणाऱ्या ओढ्यामध्ये होऊ शकते.
- चालताना रस्त्यात कदाचित बाण मारलेले दिसू शकतात, काही ठिकाणी झाडांना चिंध्या बांधून खुणा केलेल्या आहेत, त्याकडे लक्ष असू द्यावे.
- ह्या जंगलात गुराखी गुरे चरायला घेऊन येतात त्यामुळे पुष्कळ ढोरवाटा फुटलेल्या आहेत, त्या वगळून योग्य वाटेवरुन चालावे.
No comments:
Post a Comment