https://www.misalpav.com/node/27761
सह्याद्री मध्ये भटकंती सुरु करून ८-९ वर्षे झाली तरी बागलाणात जायचा योग काही जुळून येत नव्हता. त्यामुळे ह्या वेळेस पावसाळ्याच्या सुरुवाती पासूनच सप्टेंबर च्या सुमारास बागलाणात जायचे नक्की केले होते. बागलाण हा प्रदेश नाशिक-धुळे जिल्ह्यांच्या सीमेवर येतो. भौगोलिक दृष्ट्या सह्याद्री पर्वतरांगेची सुरुवात ह्या प्रांतातून होते. साल्हेर हा महाराष्ट्रातील सर्वोच्च गिरिदुर्ग (आणि दुसऱ्या क्रमांकाचे शिखर) ह्याच भागात येतो. सालोटा, मुल्हेर, हरगड, मांगी-तुंगी, न्हावीगड ही ह्या भागातील इतर काही शिखरे आहेत. भाग १
३-४ महिने आधी पासून बागलाणात जायचे नक्की ठरले असले तरी परंपरेला अनुसरून, बरोबर येणारे सदस्य, भटकंतीच्या तारखा, जायचे किल्ले, वाहन इत्यादी बाबतीत आमचे नियोजन (?) शेवटच्या क्षणा पर्यंत चालू होते. शेवटी अनंतचतुर्दशी च्या दिवशी रात्री पुण्यातून निघायचे नक्की केले. मुंबईहून अनुप एकटाच येणारा उरला असल्याने त्याला पण पुण्यातच यायला सांगितले आणि ३ लोक झाल्यामुळे ST महामंडळाच्या सेवेचा लाभ घेण्याचा बेत रद्द करून प्रशांत ची (भरपूर ट्रेक्सचा अनुभव असणारी) ऐसपैस इंडिका घेण्याचे ठरले. संध्याकळी निघायच्या वेळेस पावसाने साथ दिल्याने विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीचा फारसा त्रास न होता रात्री ९ च्या आत प्रशांत कडे पोहचलो. तिथे आनंद हा चौथा भिडू पण बरोबर येणार असल्याचे कळले. एकूण ट्रेक चा कोरम पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त करत बरोबरचे सामान डिकी मध्ये लोड केले आणि गाडीला स्टार्टर मारला. पावसाने लावलेल्या हजेरी मुळे नृत्यसेवेसाठी अधीर झालेल्या गणेशभक्तांचा जरी हिरेमोड झाला असला तरी त्यामुळेच आम्ही वाटेत आनंद आणि अनुपला घेऊन पटकन नाशिक रस्त्याला लागलो. तोपर्यंत पावसाने पण चांगलाच जोर धरला होत. चाकण च्या अलीकडे तर गाडी च्या काचेवर कोणी तरी बादल्यांनी पाणी ओतावे असा पाउस पडत होता. समोर १० फुटावरचे पण दिसणे मुश्किल झाले. तेव्हा एक बऱ्यापैकी हॉटेल बघून गाडी बाजूला घेतली आणि आत जाउन जेवणाची ऑर्डर दिलि. तेवढ्यात घरून आलेल्या फोन वर प्रशांत ने इकडे पावसाचा मागमूस नसल्याचे सांगून टाकले. ह्यामागे अर्थातच घरच्यांनी उगाचच काळजी करू नये हा उदात्त हेतू होता!!
जेवण करून बाहेर पडेपर्यंत पावसाचा जोर जरा उतरून त्याने संथ लय पकडली होति. तेथून गाडी हायवेला लागली आणि अपेक्षेप्रमाणे गप्पांची गाडी सह्याद्री, आधीचे ट्रेक, त्यांचे गमतीदार अनुभव, फोटोग्राफी ह्या track वर आली. ह्यात अनुप अर्थातच आघाडीवर होता. पुढील गप्पां मध्ये मग आजोबा, कात्राबाई, हरिश्चंद्र, नळीची वाट, कोकणकडा, बोटा, रतनगड, साम्रद, भैरव-प्रचित, AMK, चांदोली, बिबट्या, चोरवणे, कोयना, कास,exposure, light , composition , full frame, दृष्टीकोन असे अनेक उल्लेख येत राहिले. अशा रंगलेल्या गप्पांच्या नादात संगमनेर मागे पडले तसा पाउस एकदम कमी झाल्याचे जाणवले. लगेच imd ची website पाहून बागलाणावर फार ढग नसल्याचे पाहून समाधान व्यक्त केले आणि थकवा दूर करण्या साठी चहाचा ब्रेक घेतला. तेथील हॉटेलच्या मामांशी गप्पा मारून गेले १-२ दिवस तेथील हवामान कसे होते ते जाणून घेतले. तिथेच 'Please Tack Token' हा मनोरंजक बोर्ड पाहून भरपूर हसून घेतले. प्रशांत ने लगेच त्याचा फोटो काढून FB वर टाकून दिला.
पुढचा प्रवास हा नाशिक मधून मुंबई आग्रा महामार्गाने होणार होता. अनुपला ह्या भागात भटकंतीचा दांडगा अनुभव असल्याने मग त्याने ह्या भागातील एक एक किल्ला, त्याचे महत्व, तेथे जायच्या वाट, तेथील लढाया ह्याची माहिती उलगडायला सुरुवात केलि. गेल्या ३ महिन्यात हा प्राणी घरी कमी आणि बागलाणात जास्त राहिला आहे. इकडे यायची ही त्याची ह्या मौसमातील तिसरी कि चौथी वेळ होति. पण त्याचा उत्साह पहिल्या खेपे एवढाच किंबहुना जास्तच होता. आग्रा महामार्गाला गाडी लागल्यावर प्रशांतला थोडी विश्रांती म्हणून मी सुकाणू हातात घेतले. इथून पुढे जेमतेम ८०-९० किमी वर ताहाराबाद होते. मुंबई-आग्रा महामार्ग हा ४ लेन चा प्रशस्त आहे. त्यातून रात्रीची वेळ आणि NH-4 च्या तुलनेत बरेच कमी असलेले traffic त्यामुळे अंतर वेगाने कापले जात होते.
नाशिकहून बागलाणात जाण्यासाठी सातमाळा डोंगररांग ओलांडावी लागते. हि सह्याद्रीच्या पश्चिम-पूर्व धावणाऱ्या उपशाखा पैकी एक आहे. (हरिश्चंद्र-बालाघाट आणि शंभू महादेव ह्या इतर दोन). सप्तशृंगगड, मार्कंडेय, धोडप, रवळ्या-जवळ्या, राजधेर, कोळधेर हे ह्या रांगेतील काही प्रमुख किल्ले. आग्रा महामार्ग सोडून भावडबारीच्या (बारी=खिंड) दिशेने गाडी वळविली तेव्हा फक्त मी आणि अनुप जागे होतो.
पहाटे ५ च्या सुमारास मुल्हेर मध्ये पोहचलो. प्रशांतला आणि आनंदला जागे
केले आणि पुढील plan बद्द्ल चर्चा केली. सकाळी उजाडल्यावर वातावरणाचे 'रंग'
बघून पुढील प्लान नक्की करावा असे ठरवून सर्वजण थोडी विश्रांती मिळावी
म्हणून गाडीतच बसल्या बसल्या झोपी गेलो. ६:३० -६:४५ च्या सुमारास जाग आली.
मुल्हेर तसे बऱ्यापैकी मोठे गाव आहे. गावाचे नित्याचे व्यवहार सुरु होत
होते. बाहेर येउन वातावरणाचा अंदाज घेतला. पावासाची लक्षणे काही दिसत
नव्हति. पण वातावरणात बऱ्यापैकी haze होति. जी फोटोग्राफी च्या दृष्टीने
योग्य नव्हती. पण आता त्यात फार काही करता येण्या सारखे नव्हते. त्यामुळे
गावातच चहा मारून मुल्हेरच्या पायथ्या कडे गाडी वळविली. सुरक्षित जागा बघून
गाडी कडेला लावली आणि मोठ्या backpacks, tripod , कॅमेरा bags असे सामान
पाठीवर लादून घेतले. प्रशांत ने नवीन घेतलेली backpack तर खच्चून भरली
होती, त्यातून ३.५ kg चा tripod , 6D , 70 -200 F 2.8 lens अशी pro
सामुग्री पण त्याच्या पाठीवर होती. त्याचा सगळा जामानिमा १५ kg च्या घरात
होता. पण गेले काही महिने treadmill वर भरपूर अंगमेहनत करून त्याने fats
कमी करून muscle मास कमावले असल्याने तो ह्या fitness test साठी उत्सुक
होता.

गाडी लॉक करून चालायला सुरुवात केली तोवर ८ वाजून गेले असावेत. थेट मुल्हेर
कडे जाण्या ऐवजी आधी हरगड करून यावे असे ठरले. त्यानुसार मग हरगड आणि
मुल्हेर ह्यांच्या मधील खिंडीच्या दिशेने चढायला सुरुवात केली. हरगड ची वाट
तशी पटकन सापडावी अशी नाहीये पण अनुप ने GPS वर मागच्या वेळेस तो हरगडला
आला होता त्याचा पाथ मार्क करून आणला होता त्यामुळे त्या भरवशावर बिनधास्त
मार्गक्रमण सुरु केले. वातावरण दमट होते आणि वारा अजिबात नव्हता त्यामुळे
सकाळच्या उन्हाचाही थोडा त्रास होत होता. पहिल्या दांडा पर्यंत येताना
दमछाक सुरु झाली. तेथे काही क्षण थांबून खिंडी पर्यंत च्या रस्त्याचे
अवलोकन केले आणि खिंडीतून पुढे कसा रस्ता आहे ह्याची अनुप कडून माहिती
घेतली आणि पुढे निघालो. खिंडीत पर्यंतच १ तास गेला. खिंडीत आल्यावर जरा गार
वारा लागल्याने तिथे थोडा वेळ ब्रेक घेतला. पाणी पिऊन ताजेतवाने झाल्यावर
पुढील वाटेचा अंदाज घेतला. खिंडीतून मागे जाऊन आडवा traverse आणि मग एकदम
धबधब्यातून वर चढणारी खडी चढण असे वाटेचे स्वरूप लक्षात आले. तिथून गडाचा
आडवा पसरलेला माथा पण दिसत होता. तिथे, निघताना आपण हरगडला छोटे टेकाड
म्हणून 'underestimate' केल्याचे प्रशांत ने मान्य केले.
खिंडीतून निघून आडवा traverse पटकन पार केला. मुख्य चढाईला सुरुवात
करण्या आधी पाठीवरचे अनावश्यक ओझे झाडीत ठेवून दिले, त्याचा GPS Point
मार्क केला आणि मोकळ्या खांद्यानी (आणि मनाने ) मुख्य चढणीला सुरुवात केली.
चढण चांगलीच खडी होती. त्यातून ह्या गडाच्या वाटेला फारसे कुणी जात
नसल्याने वाटेत बरेचसे गचपण होते. त्यातील काही झाडांचे काटे टोचून खाज
सुटत होति. त्यातून मी नेमकी half -pant घातली असल्याने अजूनच त्रास होत
होत. त्यामुळे स्वतःला मनोमन शिव्या दिल्या. साधारण तासाभरात गडाचा पहिला
दरवाजा लागला, पण माथा अजून वर होता. एक एक करत ३ दरवाजे पार करत पार करून
माथ्यावर पोहचलो. माथ्यावर एक छोटेसे शंकराचे देऊळ दिसले, तिथून पुढे एका
छोट्या तळ्याकाठी विश्रांती साठी बसलो. बरोबर आणलेली शिदोरी सोडली आणि
पोटपूजा उरकून घेतलि आणि गड प्रदक्षिणेला निघलो. साधारण १ किमी पसरलेला
माथा पार करून गडच्या मुल्हेर बाजू कडील टोकापाशी आलो, इथून मुल्हेर आणि
मोरा समोरच दिसत होते. तेथेच एक पंचधातू पासून बनवलेली तोफ होती. भर उन्हात
देखील ती अजिबात तापलेली नव्हति. तेथून उत्तरेला हरणबारी धरणाच्या पलीकडे
पसरलेली सेलबारी रांग आणि त्यातील न्हावीगड, मांगी-तुंगी हे सुळके दिसत
होते. न्हावीगडाचा सुळका तर आकाशात घुसल्या प्रमाणे दिसत होता. ह्याच
टोकावरून एक वाट थेट खिंडीत उतरते पण वापरा अभावी ती आता बुजलेली आहे.

चढता सूर्य आणि वेळ ह्याचे भान ठेवून टोकावरून मागे फिरलो. परत तळ्यापाशी
येउन पाणी पिउन घेतले आणि उतरायला सुरुवात केलि. सूर्यास्ताच्या golden
hour मध्ये चांगल्या frames मिळवायच्या तर सूर्यास्ताच्या आत मुल्हेर च्या
माथ्यावर पोहचणे क्रमप्राप्त होते. पण त्या आधी खिंडीत उतरून आडवा traverse
मारून तेथून मुल्हेर माचीत पोहचणे असा मोठा टप्पा पार करायचा होता.
घड्याळाच्या काट्यांवर नजर ठेवून मग प्रशांतने पुश करायला सुरुवात केली.
खिंडी पर्यंत उतरून खाली गावात उतरणारी वाट सोडून मुल्हेर माचीच्या दिशेने चालायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात वाटेने चालणे सोडून रांगायला लागेल असे रूप धारण केले. माची वर माजलेली झाडीच एवढी होती . त्यातून ह्या वाटेने फारसे कोण येत नसल्याने काही ठिकाणी तर सरपटत जावे लागत होते. आमचे एक वेळ ठीक होते पण असाधारण उंची च्या अनुपला इथे फारच खालच्या पातळीला यावे लागत होते :-) शेवटी हा झाडी चा टप्पा पार करून बाहेर येउन उभे राहिलो आणि मोकळा श्वास घेतला. तिथून मग सरळ वाटेने जात आधी मोती तलाव आणि मग माचीवरील प्राचीन सोमेश्वर मंदिर गाठले तो पर्यंत २:३० वाजले होते. येथे थोडा वेळ (जेवणासाठी) थांबणे आवश्यक होते. येथून मुल्हेर आणि मोरा ह्यांच्या मध्ये चढणारी वाट दिसत होती. साधारण १ तासाचे अंतर दिसत होते. सूर्यास्ताच्या वेळेस च्या golden hour चा फायदा होण्यासाठी त्यावेळेत मुल्हेर च्या माथ्याला (मुल्हेर चा माथा पश्चिमेला आहे) असणे गरजेचे होते पण गडावर पाणी आणि निवारा नसल्याने तिथे रात्रीचा मुक्काम करता येणार नव्हता. पण हातातील वेळेचा (आणि दमलेल्या लोकांचा) विचार करता सूर्यास्ताच्या आत मोरा वर जाऊन मुल्हेर माथा गाठणे आणि सूर्यास्ता नंतर मुक्कामाला परत माचीत येणे ह्यात बरीच धावपळ होणार होती. त्यातून रात्रीचे driving झाल्यामुळे कुणाचीच झोप नीट झाली नव्हती त्यामुळे मग प्रशांत ने सहानुभूती पूर्वक विचार करून माचीतच थांबण्याला अनुमोदन दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मुल्हेर माथ्यावर जाऊन यावे असे ठरले.
आता माचीतच मुक्काम करायचा म्हंटल्यावर सगळेच थोडे निवांत झाले. पोटपूजा झाल्यावर प्रत्येकाने थोडी डुलकी काढून घेतली. जरा फ्रेश झाल्यवर मंदिर आणि आजूबाजूचा परिसर पाहायला सुरुवात केली. मुल्हेर किल्ला म्हणजे बागलाण प्रदेशाची एकेकाळची राजधानी होती. त्यामुळे येथे बरेच जुने अवशेष दिसतात. बागलाण प्रदेशावर १४ व्या शतका पासून ते १६ व्या शतका पर्यंत बागुल घराण्याची सत्ता होती. त्यावरूनच बागलाण हे नाव पडले असावे. ह्या सत्तेच्या अस्ता नंतर तिथे मोगलांची सत्ता आली. पुढे सुरतेच्या दुसऱ्या स्वारी नंतर महाराजांनी साल्हेर, मुल्हेर हे किल्ले जिंकून तेथे आपला वचक निर्माण केला.
माचीवर सोमेश्वर मंदिर, मोती तलाव ह्या बरोबरच गणेश मंदिर आणि चंदनबाव (बाव=विहीर) ही पाहण्याची ठिकाणे आहेत. ही चंदनबाव सध्या माजलेल्या झुडुपांच्या गर्दीत लपल्या मुळे पटकन सापडत नाही. येथे पण अनुप चे GPS कामाला आले. ही बांधीव विहीर मूळ तीन माजली होती परंतु आता बुजल्या मुळे एकच मजला दिसू शकतो. विहिरीत प्रवेश करायला दगडी पायऱ्या आणि सुंदर महिरपी प्रवेशद्वार आहे पण झाडी मुळे वाट बुजली आहे.
चंदनबाव बघून सोमेश्वर मंदिरात परत आलो. हे मंदिर देखील प्राचीन
असल्याचे त्याच्या बांधकामाच्या रचने वरून लक्षात येते. बाहेर प्रशस्त
चौकोनी सभामंडप, महिरपी खांब अशी मंदिराची रचना आहे. गाभाऱ्यात उतरायला
अरुंद पायऱ्यांची वाट आहे. बाहेरील बाजूला एक गणेशमूर्ती आणि समोरच शिवलिंग
आहे. ह्या बाहेरील शिवलिंगाचे प्रयोजन मात्र कळात नाही. गणेशमूर्तीच्या
बाजूला मोतीटाक्या पासून आलेला पाण्याचा नळ आहे (हे काम अर्थातच अलीकडच्या
काळातील आहे). मंदिराच्या बाजूलाच एका खोलीत एक साधूबाबा राह्तात.
त्यांच्याशी थोड्या गप्पा गोष्टी केल्या तुम्ही मूळ कुठले हा प्रशांतचा
प्रश्न त्यांनी सरळ धुडकावून लावला (नदी चे मूळ आणि ऋषि चे कुळ शोधू नये
म्हणतात !!). तेथे त्यांनी पाळलेली एक मांजर फिरत होती तिला पाहून आनंदची
फोटोग्राफी आणि भूतदया दोन्ही जागृत झाली आणि त्याने मांजरीचे विविध angles
मधून फोटो घेण्याचा सपाटा लावला. शेवटी मांजरच जरा आक्रमक होऊन लेन्स च्या
दिशेने पंजे मारू लागली तेव्हा तो जरा थांबला.

सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती त्यामुळे मग माचीवारच एखादी चांगली उंच जागा
मिळते का हे बघण्यास बाहेर पडलो पण बरेच फिरून देखील हवी तशी जागा काही
मिळेना. तेव्हा मग परत मंदिरा कडे आलो. पण तोपर्यंत सूर्यास्ताचे रंग बघता
उद्या वातावरण चांगले राहील ह्याची आशा वाटू लागली. त्यामुळे मग दुसऱ्या
दिवशी सूर्यास्ताच्या आत साल्हेरच्या परशुराम टोकावर गेल्यास नक्कीच काही
खास मिळेल असे मत प्रशांतने मांडले. पण मुल्हेर-मोरा हे दोन्ही करून
सूर्यास्ताच्या आता साल्हेर चे सर्वोच्च टोक गाठणे हे परत वेळेच्या गणितात
बसेना. तेव्हा मग सार्वमताचे दान साल्हेरच्या पदरात टाकून रात्रीच्या
जेवणाच्या तयारीला लागलो.
सकाळी तसे निवांतच उठलो. सकाळची आन्हिके उरकली आणि आदल्या रात्रीची
मुद्दामून उरवलेली खिचडी नाश्त्याला खाल्ली. कुठल्याही ट्रेकला स्वैपाकाचा
वेळ वाचाविण्याचा हा नामी उपाय आहे. नाश्त्यानंतर परत जड bags पाठीवर
चढविल्या आणि माचीवरून उतरणारी वाट धरली. ह्याच वाटेवर तळयाकाठी असलेले
सुंदर असे गणेश मंदिर आहे तेथे थोडावेळ थांबून थेट खाली उतरलो.

मुल्हेर बाजारपेठेतून साल्हेरवर रात्रीच्या जेवणात खायला जिलेबी घेतली आणि
गाडी साल्हेर च्या दिशेने वळविली. थोडे पुढे आल्यावर उजवीकडे हरणबारी
धरणाचा मस्त नजारा दिसला. वातावरण पण चांगले होते आणि light पण चांगला होता
म्हणून मग तिथे एक 'फोटोग्राफिक ब्रेक' घेतला. नेहमीच इकडे येत असल्यामुळे
अनुप कडे बरेच चांगले फोटो झाले होते त्यामुळे तो फोटो काढत नव्हता.
थोड्या वेळाने प्रशांत ने pack-up जाहीर केले तेव्हा सगळे गाडीत बसलो आणि
साल्हेरवाडीच्या दिशेने मार्गस्थ झालो. साल्हेर किल्ल्यावर जायच्या दोन
प्रमुख वाटा आहेत त्यातील एक वाघाम्बे गावातून साल्हेर आणि सालोटा
ह्यांच्या मधल्या खिंडीतून जाते तर दुसरी साल्हेरवाडी कडून वर चढते.
पहिल्या वाटेने गेल्यास साल्हेर आणि सालोटा दोन्ही करता येतात, पण
पावसाळ्याचे दिवस असल्याने सालोटा वर जाणे शक्य नव्हते. तसेच अनुपच्या मते
साल्हेरवाडी हून चढणारी वाट जास्त 'भारी' असल्याने वाघाम्बेत न थांबता गाडी
साल्हेर वाडी कडे घातली.

क्रमशः
सुंदर व निसर्गाचे भव्य रूप दाखविणारे फोटो टाकल्याबद्दल धन्यवाद.
१)हरणबारी धरण आत्ता जिथे आहे त्याच रस्त्याने,मुल्हेर जवळून शिवाजी महाराज सुरतेवर छापा घालण्यास गेले होते.
२)मुल्हेर गावात उद्धव महाराजांचे समाधी मंदिर खूप जुने पौराणिक काळापासून आहे, जिथे एके काळी दुधाची नदी वाहत असे ऐकले आहे.
३)मुल्हेरच्या किल्ल्याची ऐतिहासिक माहिती
४)पुणे येथील धनकवडी भागात समाधी घेतलेले सिद्धयोगी अवलिया शंकर महाराज हे अंतापूर (मुल्हेरच्या ५ किमी आधी असलेले गाव)येथे जन्माला आले होते.
अवांतर: बागलाण तालुक्यातील अंतापूर येथे जन्मलेल्या संत शंकर महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित संत जय शंकर हा चित्रपट महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर रिलीज झाला आहे. प्रसिध्द दिग्दर्शक शेखर नाईक यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात सदगुरु श्री शंकर महाराज यांच्या भूमिकेत हरहुन्नरी कलाकार शरद पोंक्षे दिसणार आहेत. या चित्रपटाची गीते श्री गुरुचरित्र, संत मीराबाई, विजय कुवळेकर यांनी लिहिली असून संगीत आनंद मोडक यांचे आहे. चित्रपटामध्ये नर्मदे हर या पुस्तकामुळे सर्वांना परिचित असलेले जगन्नाथ कुंटे एका गीतामध्ये दिसणार आहेत. हे गीत अजय गोगावले याने गायले असून इतर गीते अमृता काळे, सानिका गोरेगावकर, ज्योती मालशे यांनी गायली आहेत
साल्हेर वाडी मध्ये एका टपरी वजा दुकानात चहा मारला आणि त्याच्याच दारात
गाडी लावली. साल्हेरवर गुहेत मुक्काम करायचा असल्याने त्या दृष्टीने
लागणारी सामुग्री बरोबर घेतली आणि वाटेला लगलो. साल्हेरच्या बाजूला आल्यावर
एक गोष्ट जाणविली ती म्हणजे वातावरणातील बदल. मुल्हेर च्या इथले दमट, वारा
नसलेले दमाविणारे हवामान इथे नव्ह्ते. मस्त गार वारा वाहत होता. उन्हाचा
कडाकाही विशेष नव्हता. गावातून साल्हेर चा सर्वोच्च माथा ढगात लपल्या मुळे
दिसत नव्ह्ता. परत एकदा अनुप च्या मार्गदर्शन खाली वाटचाल सुरु केली. ही
वाट चुकण्या सारखी मुळीच नसल्याने अनुपने GPS आत ठेवून दिले. पहिल्या
दांडावरून चढाई करत २०`-२५ मिनिटात पायऱ्यांची वाट सुरु होते तिथपर्यंत
आलो. वातावरण आल्हाददायक असल्याने थकवा जाणवत नव्हता. तसेच पुढे चालत राहून
साधारण तासाभरात साल्हेर माचीवरील पहिला दरवाजा गाठला. इथून गडाचा प्रचंड
विस्तार लक्षात येत होता. माचीवर मस्त गार वारा सुटला होता. पाऊस नव्हता.
साल्हेर च्या पार्श्वभूमी वर निळे आकाश आणि पांढरे ढग उठून दिसत होते.
तेथेच एक छोटेसे तळे पण होते. तिथे मग आपोआपच एक 'फोटोग्राफिक ब्रेक' झाला.
प्रशांत ने इतक्या वर वाहून आणलेल्या ट्रायपॉडचा उपयोग करत काही 'long
exposure shots' घेतले.

इथून एक आडवा 'traverse' मारत गडाला वळसा घालून वाट वर चढते. साल्हेर चा
सर्वोच्च माथा गाठायची उत्सुकता आणि वातावरणाची अनुकुलता ह्यामुळे पावले
आपोआपच झपाझप पडू लागली. अर्ध्या तासाच्या traverse नंतर वाट वरती चढायला
लागली ह्या वाटेने चढत पुढे आल्यावर थोड्याच वेळात साल्हेरच्या मुख्य
अंगाला लागून असणाऱ्या कातळातील अजस्त्र पायऱ्या लागल्या. थोड्या अंतरात
बरीच उंची गाठली जाणार होती. असे २-३ टप्पे आणि प्रवेशद्वारे पार करत मुख्य
प्रवेशद्वारातून माथ्यावर दाखल झालो. वातावरणातील बदल गाठलेली उंची दाखवत
होते. इथून साधारण अर्ध्या तासावर मुक्कामाची गुहा आहे अशी माहिती अनुप ने
दिली. वर पोहचल्या पोहचल्यावर अनुप, प्रशांत आणि आनंद डावी कडे एका गवताळ
कुरणात घुसले. तेथे आनंद ला एक छोटे सापाचे पिल्लू दिसले. आधी ते मेले आहे
असे वाटून वाटून तो जरा जवळ गेला पण त्याने हालचाल करून आपण जिवंत असल्याचा
पुरावा देताच सगळेच गवतातून बाहेर आले. तिथे मग ते पिल्लू म्हणजे 'Russel
Viper' आहे ही माहिती आनंद ने पुरविली. त्यावरून मग 'Russell Viper' म्हणजे
घोणस की फुरसे ह्या वरून जरा मतभेद झाले. शेवटी मग घोणस असो वा फुरसे
दोन्ही जाती विषारी असल्याने अशा गवतात जाताना (आणि एकूणच ट्रेक मध्ये )
पायात shoes असणे गरजेचे आहे ह्यावर अनुप सोडून सगळ्यांचे एकमत झाले.
त्याचा 'action floaters' वर दृढ विश्वास आहे!
थोड्याच वेळात उजवीकडे थोडी उंचावर गुहा दिसली समोरील तलावाच्या काठावरून जात गुहेपाशी आलो. गुहेत गावतील ३-४ गुराखी बांधव राहत होते. दर वर्षी बैल पोळ्याच्या सुमारास ३०-४० गुरांना घेऊन हे लोक गावातून गडावर येतात आणि दिवाळीला खाली उतरून जातात. तोपर्यंत त्यांचा मुक्काम गडावरील गुहे मधेच असतो. गडावर उपलब्ध असलेला मुबलक चारा हे वर येउन राहण्या मागचे प्रमुख कारण. ह्यांच्यातील एक जण रोज गड उतरून खाली गावात जातो आणि सर्वांसाठी भाकरी घेऊन येतो. ते पाहून अजूनही सह्याद्रीच्या डोंगररांगेतील ह्या लोकांचे जीवन कसे खडतर आहे ह्याची जाणीव झाली. सूर्यास्ताच्या आत परशुराम टोक गाठायचे असल्याने bags आणि इतर नको असलेले समान गुहेत ठेवून आणि फक्त कॅमरा bags बरोबर घेऊन सड्याने वरती निघालो.
महाराष्ट्रातील सर्वोच्च गिरीदुर्गाच्या सर्वोच्च माथ्यावर जायला सगळेच
खूप उत्सुक होते. माथ्यावरील ढगांमुळे परशुराम टोक दिसत नव्हते. सोप्या
वाटेने चढत २०-२५ मिनिटात माथा गाठला आणि वरती भन्नाट वाऱ्याने आमचे स्वागत
केले. इथून गडाचा खालचा माथा, माची, पाय्थायचे गाव, घाटमाथा आणि दूरवर
कोकण असा मोठा परिसर दिसतो पण सर्वत्र ढगांची दुलई पसरली असल्यामुळे काहीच
दिसत नव्हते. तुफान वाऱ्यामुळे थंडी वाजत होती. इथे परशुरामाचे एक छोटेखानी
मंदिर आहे, त्यात परशुरामाच्या पादुका आणि तुळजाभवानीची मूर्ती पण आहे.
त्याचे दर्शन घेऊन खाली असलेला ढगांचा पडदा बाजूला होऊन निसर्गाचा रंगमंच
खुला होण्याची वाट पाहत बसलो. ह्या अनोख्या प्रेक्षागृहात आम्ही चौघेच
प्रेक्षक होतो पण निसर्गाची तिसरी घंटा व्हायला अजून अवकाश होता.

पोरं एवढ्या लांबून आलीयेत म्हणून की काय पण निसर्गदेवतेने फार काळ
थांबायला लावले नाही. वाऱ्याच्या एका झोताने ढगांची चादर क्षणात बाजूला
केली आणि हिरवाईने नटलेला रंगमंच काही क्षणच खुला केला. पण लगेच दुसऱ्या
क्षणी ढगांचा पडदा परत टाकला गेला. पण त्या निमिषार्धात दिसलेल्या अप्रतिम
दृश्याने आज निसर्गाचे काय काय चमत्कार ह्या नाट्यातून अनुभवायला मिळणार
आहेत ह्याची प्रचीती आली. आज सूर्यास्ता पर्यंत चालणाऱ्या नाट्याची ही एक
झलक होती.
निसर्गदेवता आज आपल्यावर प्रसन्न झाल्याची जाणीव आम्हाला झाली आणि सगळेच
जण पुढील चमत्कार अनुभवायला अधीर झालो. आता निसर्गाने आपल्या नाट्याचा
पहिला अंक सुरु केला होता. तुफानी वाऱ्या बरोबर वाहत येणार ढग मधूनच
समोरच्या दरीला झाकून घेत होते आणि क्षणात बाजूला होऊन समोरील निसर्गचित्र
उलगडत होते. वरील आकाशात सुद्धा सूर्यासमोरील ढगांचे आच्छादन कमी होऊन
त्यातून येणारा सोनसळी प्रकाश दरीतील ढगांवर फाकत होता. एकाहून एक अप्रतिम
अशा निसर्गाच्या frames समोरील रंगमंचावरून सरकत होत्या. स्वर्ग जर कुठे
असेल तर तो ह्याहून फार वेगळा नसावा. जीव ओवाळून टाकावा अशा निसर्गाच्या
लीला समोर सुरु होत्या. पहिले काही क्षण तर त्या दृश्याने मंत्रमुग्ध होऊन
कॅमेरा काढायचे पण लक्षात आले नाही. कितीही डोळ्यात साठविला तरी समाधान न
व्हावे असाच समोरचा नजारा होता. तरी त्यातून आपल्या परीने ते दृश्य
कॅमेऱ्यात बंद करायचा प्रयत्न केला. समोरील frames इतक्या पटापट बदलत
होत्या कि त्या पुढे आमचा click करायचा स्पीड कमी पडत होता. पुढील बराच वेळ
आम्ही सगळेच वेड्या सारखे फोटो काढत होतो. अनुप तर गमतीने म्हणाला कि इथे
आपण wildlife पेक्षाही फास्ट click करत आहोत.

तेवढयात अनुप हळूच सटकला आणि पूर्वे कडील दरीत सालोट्याचे दर्शन होते का ते
बघू लागला. त्याचा अंदाज अचूक होता. इकडे पश्चिमेला जे सुरु होते त्याचाच
एक भाग मागील दरीत पण सुरु होता. ढगातून डोके वर काढणाऱ्या सालोट्याचे
त्याने काही shots काढले आणि थोड्याच वेळात 'इंद्रवज्र, इंद्रवज्र' असे तो
आनंदातिशयाने ओरडला. लगेच आम्ही त्या दिशेने धावलो. तोवर सालोटा परत ढगात
गेला होता, पण समोरील दरीत असलेल्या ढगांवर मावळतीच्या किरणांमुळे पडणारी
आपलीच सावली आणि त्याच्या बाजूचे संपूर्ण गोल सप्तरंगी इंद्रवज्र ह्याचे
दर्शन घडले. ह्या दृश्यासाठी वेळेत बोलाविल्या बद्द्ल अनुपचे मानावे तेवढे
आभार थोडेच आहेत. निसर्गाचा हा चमत्कार तसा खूप दुर्मिळ. त्यातून तो
हरिश्चंद्रगडावर कोकणकड्याच्या बाजूला पश्चिमेला पावसाळ्यात कधी कधी दिसतो
हे माहित होते पण हे पूर्वे कडचे इंद्रवज्र आम्ही सगळेच प्रथमच पाहत होतो.
अनुपला त्याच्या १-२ frames देखील मिळाल्या. सूर्य अस्ताला जाऊ लागला तसे
ढगांचे आच्छादन दाट होऊ लागले आणि आजच्या नाट्यावर पडदा पडत असल्याची जाणीव
झाली. तशा भारावलेल्या अवस्थेत खाली उतरून गुहेत आलो.
गुराखी बांधवांनी तोपर्यंत गुरे आडोशाला बांधून आत स्वैपाकाची तयारी सुरू केली होती. आतील मुख्य गुहेच्या बाहेर एक मोठी गुहा होती त्यातूनच आत येण्याचा रस्ता होता. फारच पाऊस असेल तेव्हा ह्या बाहेरील भागात ते गुरे बांधतात नाहीतर एरवी रात्रीची गुरे बाहेर आडोशालाच असतात. गुहेचे मुख्य तोंड त्यांनी आडवे बांबू आणि पोती लावून बंद केले होते(गुरे आत येऊ नयेत म्हणून). त्यामुळे मग एक खिडकी वजा छोट्या प्रवेशद्वारातून गुहेत आलो. एक कोपरा बघून पथारी मांडली. आज जेवणात मस्त स्वीट कॉर्न सूप, पालक खिचडी आणि जिलेबी असा बेत होता. प्रशांत चे पाक-कौशल्य वादातीत असल्याने (लग्नाआधी पासूनच) आजही स्वैपाकाची धुरा त्याच्यावरच होती. मस्त गरमागरम खिचडी, सूप आणि जिलेबी असे पदार्थ पोटात गेल्यावर आवरा आवर करून झोपेच्या दृष्टीने वळकट्या बाहेर काढल्या. तेवढ्यात आनंद च्या बाजूने कोपऱ्यातून मांजरा सारखा बारीक आवाज येऊ लागला त्यामुळे हा मुल्हेरमाची वरचे मांजर इकडे घेऊन आला कि काय अशी शंका येउन सगळे त्याच्या कडे बघू लागले तेव्हा तो आवाज मांजराचा नसून त्याने आणलेल्या Quechua च्या dynamo वाल्या torch चा आहे हे समजले. झाले मग एकेकाने आपल्या कडील Quechua ची सामुग्री बाहेर काढून त्याची महती सांगायला सुरुवात केली. एकूण ३ ultralight sleeping bags, कंदील, raincover, raincut, हलके सामान ठेवायचा पिट्टू आणि आनंद चा dynamo वाला torch एवढी Quechua ची सामुग्री एकाच ट्रेक मध्ये पाहून ह्या कंपनी ने trekkers करता बरेच चांगले products आणल्याची खात्री पटली.
अलार्म ने पहाटे ५:१५ ला जाग आली. सूर्योदयाला परत परशुराम टोकावर जाऊन सालोटा बाजूकडील फोटो घ्यायचे होते पण प्रशांत ने बाहेर जाऊन अंधारात torch मारून बघितला आणि धुक्या शिवाय काही न दिसल्याने सरळ आत येउन झोपला. सगळे तसे मग निवांतच ७ ला उठलो. धुके काही हटायला तयार नव्हते. 'धुकटी काय आता १० च्या आत जात नाय', असे एका गुराखी बांधवाने सांगितले. मग काय करावे ह्यावर चर्चा झाली. पण काल क्षणार्धात बदलणारा निसर्गाचा चमत्कार बघितला असल्याने आजचा मुक्काम गडावरच करू असे ठरले.
आवरून १० वाजता बाहेर पडलो. आज साल्हेर आणि सालोटा ह्यांच्या मधील खिंडी
च्या बाजूला जायचे होते. धुक्यातून वाट काढत त्या बाजूला उतरणाऱ्या वाटेने
चालू लागलो. साधारण अर्ध्या तासात कड्याच्या पोटातून उतरणारी वाट लागली
ह्या वाटेच्या उजव्या बाजूला सलग खोदलेल्या गुहा आहेत तर डाव्या बाजूला दरी
आहे. अजूनही धुके काही हटले नव्हते. मग तिथेच वाट पाहत बसलो. चांगले
landscpae photo काढायचे तर फोटोग्रफिक कौशल्या बरोबरच हवामानाचा अंदाज आणि
अनुकूल हवामान मिळेपर्यंत थांबून राहण्याचा patience ही कौशल्ये पण आवश्यक
आहेत. तास दीड तास थांबून पण वातावरणात काही फार फरक पडेना. तेव्हा मग
अजून थोडे पुढे उतरून खिंडी पर्यंत जावे असे ठरले. खिंडीच्या दिशेने उतरू
लागताच वातावरणात अनुकूल बदल होत असल्याचे लक्षात आले. खिंडीत उतरणाऱ्या
पायऱ्यांच्या पाशी आलो तेव्हा समोरील धुक्याचे cover हटायला लागले होते आणि
सालोटा आणि आजूबाजूचा परिसर मोकळा होत होता. थोड्याच वेळात येथे मग ढगांचा
ऊन-सावल्यांचा खेळ सुरु झाला आणि इकडे आमचा कॅमेऱ्यांचा क्लिकक्लीकाट सुरु
झाला. बराच वेळ फोटो काढून झाल्यावर भुकेच्या जाणीवेने गुहेकडे परतायला
सुरुवात केली.

गुहेत येउन मस्त कांदे पोहे बनवून (Courtesy: अर्थातच प्रशांत ) त्यावर ताव
मारला. थोड्या वेळेच्या विश्रांती नंतर सूर्यास्तासाठी पश्चिमे कडील
टोकाकडे जायला सुरुवात केली. येथील बुरुजापाशी पोहचताच भन्नाट वारा लागला.
वाऱ्याचा जोर कालच्या पेक्षा अधिकच वाटत होता. पण दरीत ढगांचे cover कायम
होते. काल पासून निसर्गाने बरीच साथ दिली असल्याने ते cover हटण्याची वाट
पाहत तिथेच थांबलो. येथून गड, खालील माची, पायथ्याचे गाव, घाटमाथा आणि लांब
गुजरातचा सपाटीवरचा प्रदेश असा मस्त ३-४ टप्प्यात उतरणारा सह्याद्री
दिसणार होता. त्यासाठी वाट बघणे क्रमप्राप्त होते. वारा मात्र पिसाटल्या
सारखा वाहत होता. साल्हेर घाटमाथ्या पासून जवळच असल्याने असा वारा असणे
साहजिक होते. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर जरी असले तरी ते
घाटमाथ्या पासून बरेच आत आहे त्यामुळे तिथे एवढा height difference नाही.
साल्हेरचे हे वेगळेच वैशिष्ट्य असल्याचे ध्यानात आले.
वाऱ्याच्या जोरा पुढे धड उभे ही राहता येत नव्हते. नाका तोंडात वारे जात
होते पण पुढील दृश्य आधी नजरेत आणि मग कॅमेऱ्यात साठवायचा दुर्दम्य उत्साह
मागे हटू देत नव्हता. काहीच वेळात दरीतून वर येणाऱ्या तुफान वाऱ्या बरोबर
ढग रंग उधळल्या सारखे वर फेकले जाऊ लागले आणि कालच्याच नाट्याचा पुढील अंक
सुरु झाला.. जणू रंगलेल्या मैफिलीवर भैरवी ने चढविलेला कळसच!! दूरवर
दिसणारा सह्याद्रीचा राकट प्रदेश आणि त्यावर उधळलेल्या रंगा सारखे ढगाचे
पुंजके!! समोरील दृश्य डोळ्यांचे पारणे फेडत होते. सह्याद्री काय चीज आहे
ह्याची मनोमन खात्री पटत होती. नजरेत आणि कॅमेऱ्यात कितीही साठविले तरी
समाधान होणार नव्हते. निसर्गाच्या सर्जनशीलते पुढे आपण किती तोकडे आहोत
ह्याची जाणीव झाली तेव्हा कॅमेरे बंद केले आणि काही क्षण मुक्त अनुभूती
घेतली.

गुहेकडे परतताना एखाद्या रंगलेल्या मैफिलिहून परतताना मनाची जशी अवस्था
होते तशी झाली. गुहेत परतल्यावर संध्याकाळी गुहेतील गुराखी बांधवांचे काही
candid फोटो घेतले. रात्रीचे जेवण करून विश्रांती साठी पडलो. उद्याचे
हवामान बघून उद्या परत निघावे कि अजून थांबावे हा निर्णय घेण्याचे ठरले.
सकाळी उठलो आणि बाहेर बघितले तर हवामान अजूनच खराब झाले होते. आज धुक्या
बरोबर बारीक पाऊस पण सुरु झाला होता. त्यामुळे pack-up करून तडक उतरायला
लागलो. अर्थात बेत ठरत होते ते पुढच्या ट्रेकचे!!

खाली उतरून आलो तो पर्यंत cloud cover चांगलेच dense झाले होते आणि पाऊस पण
जोर धरू लागला होता. कपडे change करून गाडीत बसलो, मुल्हेर मध्ये मिसळ
पोटात टाकली आणि नाशिक च्या दिशेने प्रयाण केले तिथे अनुपला नाशिक रोडला
सोडले आणि नाशिक highway चा उद्धार करत गाडी पुण्याच्या दिशेला लागली.
ह्या ट्रेक ने आम्हाला काय दिले? एका trekker च्या दृष्टीकोनातून ४ दिवसात २ किल्ले, जे कि ठरविलेल्या plan च्या निम्मेच. फोटोग्राफीच्या दृष्टीने भरपूर वाट पाहून मिळालेले काही निवडक चांगले फोटो. पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मिळाले ते एक अलौकिक समाधान आणि जगण्याला अर्थ देईल अशी उर्जा !!
Mountains are lovely, high and steep
But I have promises to keep
And many to climb, before I sleep
Many to climb before I sleep !!
(Based on original lines from famous poet Robert Frost)
No comments:
Post a Comment