पण भोरगिरीला पोचलो तेव्हा कळलं की येळवलीपर्यंत चांगला डांबरी रस्ता झाला आहे. हा अजून तरी (म्हणजे जानेवारी २०२६ मध्ये) Google Maps मध्ये दिसत नाही, पण रस्ता छान तयार झाला आहे. मग डांबरी रस्त्याने कशाला चालायचं? म्हणून ड्रायव्हरला म्हणलं चल पुढं. येळवलीला उतरलो.
म्हणजे खरं तर येळवली ते भिमाशंकर ट्रेक झाला असं म्हणलं पाहिजे. चित्रात ट्रेकचा पूर्ण प्रदेश आहे: खालच्या उजव्या कोपऱ्यात येळवली आणि वरच्या कडेजवळ भिमाशंकर.
ड्रायव्हरला समजावून सांगितलं की बाबा तू आता भिमाशंकरला जा. सुमारे २५ किमी. आणि तिथे आमची वाट बघ. आम्ही तिथे चालत येऊ. गाडी असताना आम्ही २५ किमी चालत का येणार हे त्याला कळेना. खरं तर आम्ही जेमतेम १० किमी चालणार आहोत, जंगलातून, हे त्याला कसंबसं समजावलं.
मग चालू लागलो. कमळजाई मंदिराकडे. फोनला सिग्नल नव्हता. पण Google Maps ची offline map सुविधा अशा ठिकाणी उपयोगी पडते.
येळवली गाव हे भिमाशंकरच्या पठारावरच आहे. संपूर्ण पठारावर जंगलाचे
तुकडे आहेत. कोणत्याही दिशेनी सरळ चालत राहिलो तर दर थोड्या वेळानी आपण
जंगलात घुसतो आणि आणखी थोड्या वेळानी जंगलातून बाहेत पडतो. पण तसं करणं
अर्थातच सोयीचं नाही आणि सोपं पण नाही. त्यापेक्षा जंगल तुकडयाच्या
कडेकडेने जाणं सोपं. अशा दोन वाटा आपल्याला येळवली पासून कमळजाई
मंदिरापर्यंत घेऊन जातात:
आम्ही पिवळ्या ठिपक्यांच्या मार्गाने गेलो. १५ मिनिटातच पोचलो. अगदी छोटंसं मंदिर. पण सुंदर परिसर. या ठिकाणी यायची ही तिसरी वेळ. तिन्ही वेळी संपूर्ण परिसरात आम्हीच तेवढे मनुष्यप्राणी होतो. मंदिराजवळच एक छोटासा आडोसा नवीनच बांधलेला दिसला - बहुधा वन खात्याने. तिथे निवांत बसलो. पुढे कसं जायचं हे ठरवायला.
इथून थेट उत्तरेकडे जाणारी रुळलेली पायवाट दोनेक तासात आपल्याला भिमाशंकरला पोचवते. त्या सरळ सोप्या वाटेने मागे एकदा येळवलीतील ग्रामस्थांसोबत गेलेलो होतो. त्याच वाटेने आजही जाऊ शकतो. असं मी म्हणलं खरं, पण मी फारसा सरळ मार्गी नाही हे बाकी तिघांनाही ठाऊक होतं. इतक्या साध्या आणि सरळ मार्गानी आपण जाणार हे कसे? म्हणून मग वेगळा प्रस्ताव दिला:
न मळलेली, आणि थोडीशी जंगलातून जाणारी वाट शोधली तर आपण कदाचित थेट नागफणीला जाऊ शकू. कडयाच्या काठाकाठानी. अन मग तिथून भिमाशंकरला जायची तर रीतसर वाट आहेच. जाऊन बघूयात का?
सुर्या आणि भरत आंध्र प्रदेशातले तर राम तामिळनाडूचा. त्यांना इथला भूगोल फारसा माहिती नाही. त्यात महाराष्ट्रात बिबट्यांच्या बातम्या हल्ली नेहेमीच ऐकायला येतात. त्यामुळे त्यांना थोडी anxiety असणं साहजिक होतं.
हे बघ, जंगलाचा कोणताही तुकडा २०० - फार तर ३०० मीटर पेक्षा जास्त रुंद नाहीये. म्हणजे पायवाट नसलीच तरी जास्तीत जास्त ३०० मीटर झाडाझुडुपात घुसून जायला लागेल. जंगल तुकड्यातुन बाहेर आलो की मग सोपंच आहे. पुढच्या जंगल तुकड्यात घुसेपर्यंत.
आणि अगदीच नाही जमलं, तर backtrack करून पुन्हा इथे येऊ, आणि मग शहाण्यासारखे रुळलेल्या वाटेने जाऊ. काहीही झालं तरी अंधार पडायच्या आधी आपण नक्कीच पोचू भिमाशंकरला.
हे शेवटचं वाक्य आश्वासक ठरलं. वेगळी वाट वर शिक्कामोर्तब झालं.
त्यानुसार उत्तरेऐवजी वायव्येला निघालो. त्या दिशेनीपण एक छान पायवाट
जात होती. तीच धरली मग. आश्चर्य म्हणजे या ठिकाणी ती जंगलात घुसत होती:
(गुगल मॅप्स ची लिंक आहे)
https://maps.app.goo.gl/aCmLFLLStbAVu4ubA
जणू काही आमच्याच साठी कुणी वाट तयार केली होती. मग तर आम्ही
निश्चिन्तपणे झाडीत शिरलो. सुरेख, नैसर्गिक जंगल. त्यात काही अशी लक्षणीय
पानं:
काही ठिकाणी शेण पडलेलं होतं, म्हणजे ही गुरांची वाट असणार.
रमतगमत ५ मिनिटात आम्ही पहिल्या जंगल तुकड्यातुन बाहेरही आलो. साधारणपणे इथे:
https://maps.app.goo.gl/hpkZpeP8omP6JpS18
पुढे तर गवताळ माळ होता. थोडा उंचसखल होता. अंधुकशी पायवाट दिसत होती, तिला धरूनच जात राहिलो.
आता भरतची बडबड आणि तेलगू गाणी सुरु झाली. मजा होती.
वाट किंचित डावीकडे वळून उंच चढू लागली. काही मिनिटातच आम्ही वर पोचलो.
पश्चिमेकडे दरी आणि कोकणाचे पहिले दर्शन झाले. अर्थातच फोटो घेणं सुरु
झालं.
वायव्येकडे पदरगडाचा दक्षिण कडा दिसत होता. त्याच्या २-३ सुळक्यांसहित (बाण बघा).
लांबवर गावं अंधुक दिसत होती, कारण हवा धुरकट (hazy) होती.
राजपे गावापासून वर चढणारी आंबेनळी घाटाची वाट कमळजाईच्या पठारावर जिथे
पोचते तो भागही दिसत होता. त्या वाटेने चढायचा एक प्रयत्न २ वर्षांपूर्वी
अयशस्वी झाला होता. ती आठवण आणि बोच पुन्हा जागी झाली. पुन्हा एकदा जाऊन
बघू असं ठरलं खरं पण ते कधी होईल कोण जाणे.
ते असो. आता आज पुढे कसं जायचं हे बघायला हवं.
गूगल मॅप्सच्या सॅटेलाईट व्ह्यू किंवा टेरेन व्ह्यूवरून जमिनीच्या उंचसखलपणाची थोडी कल्पना येते, पण प्रत्यक्ष परिस्थिती त्यापेक्षा बरीच वेगळी असू शकते. त्यात जो थोडासा चढ / उतार वाटतो, तो प्रत्यक्षात पुष्कळ जास्त असू शकतो. त्याचाच प्रत्यय इथे आला. नकाशा पाहून वाटलं होतं की इथपासून नागफणीपर्यंत सलग, सौम्य चढ आहे. पण आता दिसलं की प्रत्यक्षात बराच उतार पण आहे, आणि म्हणूनच त्यापुढे पुष्कळ चढपण आहे.
पण आता डावीकडे दरी दिसते आहे म्हणून छान वाटत होतं. अंधुक वाट धरून
उत्तरेकडे जात राहिलो. थोड्या वेळानी उतार सुरु झाला. त्यात वाटेच्या कडेला
काटेरी झुडुपं वाढलेली होती. ते काटे पॅन्टमध्ये घुसू लागले. पण ट्रेकला
गेल्यावर या गोष्टींची तक्रार कोणी करत नाही. तक्रार करायचं ठरवलं तरी
कुणाकडे हा प्रश्नच. तेव्हा चालत रहा पुढे तसेच…
उतार संपता संपता पुन्हा झाडी सुरु झाली. पण वाट दिसत होती. लगेचच पुन्हा चढण. जेवढं उतरलो त्याच्या दुप्पटीपेक्षा जास्त वर चढलो.
कमळजाई ते भिमाशंकरच्या रुळलेल्या वाटेपासून फार दूर आम्ही अजून गेलो नव्हतो. ती वाट आमच्या २०० किंवा ३०० मीटरच अंतरावर असेल, पूर्वेकडे. अर्थात मध्ये जंगल असल्यामुळे ती वाट दिसत नव्हती. पण आता आम्ही डावीकडे वळलो आणि त्या वाटेपासून हळू हळू दूर जाऊ लागलो.
इथपासून एक अंधुक वाट सरळ पश्चिमेकडे जात होती. तिकडे चालायला लागलो. पण
लवकरच त्याला उजवीकडे एक फाटा फुटून तो जंगलात घुसत होता. नकाशात बघितलं
तर नागफणी बरंच उत्तरेकडे आणि किंचित पश्चिमेला होतं. म्हणून मग आम्ही
उजवीकडे वळून पुन्हा जंगलात घुसलो. इथे:
https://maps.app.goo.gl/wFRpn1tYCv874EZM7
आणि २-३ मिनिटात पलीकडे बाहेरही पडलो: https://maps.app.goo.gl/S9fUxCXyvjPniZ9N6
आणि अनपेक्षित दृश्य दिसलं. पुढच्या मोकळ्या पठारावर गुरं चरत होती. खूप मोठा कळप होता. आमचा आवाज ऐकून त्यातली बरीच गुरं मान उंचावून आमच्याकडे बघू लागली.
जंगलात अचानक वाघ समोर आला तर कुणाचीही घाबरगुंडी उडणं साहजिक आहे. पण आम्ही तर त्या गायींनाच घाबरलो. अचानक अनेक गायी चरणे थांबवून आपल्याकडे टकमक बघू लागल्या तर … नक्की भीती वाटते. आम्ही थबकलो. पुढं जावं की नाही प्रश्नच पडला. आम्ही अर्थातच त्या गायींना कसलाही त्रास देऊ इच्छित नव्हतो. पण हे त्यांना समजलं पाहिजे नं. गुरांचा मालक असता तर त्याला सांगता आलं असतं का बुवा आम्हाला जाऊ दे. पण माणूस कुणीच नाही. कुणी तरी सकाळी लवकर गुरांना इथे चरायला सोडून गेलं असणार. पण आमची पंचाईत झाली त्याचं काय?
सुदैवानी काही सेकंदात आम्ही अगदी निरूप्रदवी प्राणी आहोत हे गायींनीच ओळखलं. पुन्हा खाली मान घालून चरायला लागल्या. तरी पण धोका नको म्हणून आम्ही त्यांच्यापासून शक्य तेवढं अंतर सोडून पटपट, न बोलता पुढे जात राहिलो. २ मिनिटात पूर्ण कळप ओलांडून पुढे गेलो. हुश्श!
कमळजाई मंदिरापासून इथपर्यंत सतत अंधुक वाट का दिसत होती याचा आता उलगडा झाला. गुरांची चरायला जायची ही रोजची वाट असणार.
तीच अंधुक वाट धरून पुढे जात राहिलो. लवकरच फाटा होता, इथे: https://maps.app.goo.gl/gu9MN91wrhGtbSno9
डावी-उजवी दोन्ही वाटा अंधूकच होत्या.
नागफणीची दिशा घ्यावी म्हणून आम्ही उजवी वाट धरली. पण वाट जास्तच अंधुक होऊ लागली. आणि तिने आम्हाला कसेबसे इथे आणून पोचवले: https://maps.app.goo.gl/dD3kGPtsQ5pJjeKX9
त्यापुढे मात्र अंधुक सुद्धा वाट नव्हती. आता जरा प्रश्न निर्माण झाला.
डावीकडे गेलो तर आपण कड्याच्या डोक्यावर पोचू आणि मग कडयाच्या कडेकडेने
नागफणीकडे जाऊ शकू असं वाटत होतं. पण डावीकडची झाडी अगदी घट्ट होती. आत
घुसायला कुठेच जागा दिसेना.
डावीकडे आणि उजवीकडे गर्द झाडी आणि मधून एक कोरडा ओढा होता. ओढ्यातून पुढे
जाणं शक्य दिसत होतं , पण बऱ्याचवेळा पुढे जाऊन ओढ्याची वाट बंद होऊ शकते.
कधी दोहीकडची झाडी ओणवून ओढ्यात उतरलेली असते, नाही तर कधी धबधब्याची भिंत
समोर येते.
शेवटी काहीच पर्याय नाही म्हणून ओढ्यात घुसलो, इथे: https://maps.app.goo.gl/XPxZeoU93atRq1ANA
ओढ्यातून पुढे पुढे जाऊ लागलो. जी भीती होती ती दोनच मिनिटात खरी ठरली:
पुढे उभ्या भिंतीसारखा खडक होता. पावसाळ्यात सुरेख धबधबा असणार इथे. खडकाची
भिंत चढून जाणं काही शक्य नव्हतं. आता?
एक मात्र झालं. ओढ्यात घुसायच्या आधी डावीकडे झाडी जेवढी गर्द होती,
त्यामानाने इथे थोडी कमी गर्द होती. म्हणजे डावीकडे घुसणे कसेबसे जमले
असते. मग घुसलोच.
पण ते एवढं सोपं नव्हतं. पायाखाली घट्ट जमीन नव्हती तिथे. छोटे मोठे दगड
होते, पण ते जमिनीत रुतलेले नव्हते. पाय दिला की हलायचे. झाडांचा आधार घेत
कसेबसे जात राहिलो. थोड्या वेळानी झाडी संपली. नुसतीच सैल माती आणि दगड. मग
तर पुढे जाणं अशक्यच झालं. आणि तिथे चढ इतका तीव्र होता की एका जागी उभं
पण राहता येत नव्हतं. मग इकडे तिकडे बघून टेहळणी करणं तर सोडाच. शेवटी
माघार घ्यायचा निर्णय घेतला. घसरत घसरत कसेबसे पुन्हा कोरड्या ओढ्यात येऊन
पोचलो.
आता पुढे काय? हे ठरवण्याआधी जेवण करायचं ठरलं. कारण भूक तर केव्हाचीच लागली होती.
पुढची काही मिनिटं शांततेत गेली. तोंडं फक्त खाण्याचं काम करत होती. ब्रेड,
पीनट बटर, चीज स्लायसेस, बाकरवडी. नुसतं जंक फूड काय खाताय असं कुणी
म्हणू नये म्हणून केळी, सफरचंदही होतीच.
जठराग्नी शांत झाल्यावर मग प्रश्न लगेचच सुटला. आम्ही डावीकडच्या झाडीत
घुसून अयशस्वी होऊन परत आलो होतो. पण उजवीकडची झाडी मात्र सोपी वाटत होती.
एक तर त्याबाजूला चढाची तीव्रता थोडी कमी होती. आणि मोकळे दगड नव्हते,
त्यामुळे पाय घट्ट रोवणं शक्य दिसत होतं. अरेच्चा! आपण आधीच उजवीकडे का
नाही बघितलं?
पण तरी एक प्रश्न होताच. नागफणी आणि कडा तर डावीकडे होता. उजवीकडे नाही. मग
असं ठरलं की उजव्या बाजूनी वर चढायचं, पण नंतर पुन्हा वळून ओढ्याच्या
दिशेलाच जायचं. ओढ्याच्या शक्य तितक्या जवळनंच जायचं.
केली मग सुरुवात. थोडं वर गेल्यावर लक्षात आलं की आता आम्ही कोरड्या
धबधब्याच्या भिंतीपेक्षा जास्त उंचावर आलो आहोत. मग लगेच वळून पुन्हा ओढा
गाठला. भिंतीच्या वर. मग थेट ओढ्यातूनच चालायला लागलो. थोड्या वेळानी पुढे
झाडीतून निळ्या आकाशाचे तुकडे दिसू लागले.
म्हणजे जंगल तुकड्यातुन बाहेर पडणार लवकरच.
बघता बघता इथे बाहेर पडलो: https://maps.app.goo.gl/Zg5fHHGmoFxbm3nB6
आता डावीकडे चढण होती. पाच मिनिटात ती चढून कड्याच्या डोक्यावर पोचलो, इथे: https://maps.app.goo.gl/AEupERbhobimPXTN6
म्हणजे जवळ जवळ जमलंच म्हणा की! नकाशानुसार इथून नागफणी काही फार दूर नव्हतं. शिवाय आता पश्चिमेकडे दरी आणि कोंकण पुन्हा एकदा दिसायला लागलं. अहाहा! ऐन दुपारचं ऊन असलं तरी गार वाऱ्यामुळे छान वाटत होतं. पुष्कळ वेळ तिथेच बसलो मग.
इथून उत्तरेकडे दरीच्या काठानीच चालत राहिलो तर नागफणीला पोचू असं
अपेक्षित होतं. पण उत्तरेकडे एक टेकाड दिसत होतं. ते टेकाड चढायला लागलो
मग. टेकाडावर पोचताच दूरवर नागफणी दिसायला लागलं की! भिमाशंकरला येणारे
बरेच भाविक नागफणीला पण येतात. म्हणून सुरक्षेसाठी तिथे लोखंडी पायपांचा
कठडा बांधलेला आहे. तो दिसू लागला.
भिमाशंकरच्या पश्चिमेला कड्याच्या सर्वोच्च ठिकाणी आम्ही उभे होतो!
मघाशी दक्षिणेकडून बघितलेला पदरगड आता उत्तरेकडून बघत होतो:
पुढे नागफणीकडे जाणारी वाट अशी होती:
खाली पदरवाडी आणि त्याच्याही खाली कोंकण:
आणखी थोडं पुढे गेल्यावर नागफणीचा कडा सुरेख दिसत होता:
थोडं दक्षिणेकडे बघितलं तर पेठचा कोथळीगड खूप अंधुक दिसत होता, घंटेसारख्या आकाराचा:
बघता बघता नागफणीला पोचलो देखील. तेव्हा मग थोडी विश्रांती घ्यायचा मोह आवरला नाही. कुणी झोपून, तर कुणी नुसतं बसून:

मागे वळून बघितलं तर आम्ही ज्या कड्याच्या काठानी आलो तो कडा आणि डावीकडे हनुमान मंदिर छोटंसं दिसत होतं:
आता इथून पुढे भिमाशंकरला जायला चांगली रुळलेली वाट होती. त्यामुळे ट्रेक इथे पूर्ण झाला. तेव्हा एक सेल्फी काढणं अटळ:
लोक भिमाशंकरला जातात, आणि मग वेळ आणि हौस असेल तर नागफणीला भेट देतात. आम्ही आधी नागफणीला पोचलो आणि मग भिमाशंकरला. असा आमचा उफराटा ट्रेक आनंदात पार पडला.
समाप्त
No comments:
Post a Comment