Friday, January 30, 2026

प्रचितगडाच्या भययुक्त छायेत!

 🚩 प्रचितगडाच्या भययुक्त छायेत!* 🚩
---------------

समीर आराणके
       *भाग पहिला* 

( *जे ऐकायला तयार नाहीत त्यांनी वाचावे म्हणून हा लेखनप्रपंच* )
महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतली तर सह्याद्रीच्या अजस्त्र डोंगररांगाच्या कुशीत तो सुखरूपपणे विसावला आहे. इतिहासाच्या जीर्ण झालेल्या आणि विस्मृतीत गेलेल्या स्मृतींना पुनरुज्जीवन देण्यात सह्याद्रीचे योगदान वादातीत आहे. इतिहास केवळ पुस्तकांच्या वाचनातून समजून घेण्यापेक्षा सह्याद्रीच्या धडकी भरवणाऱ्या कड्याकपारी पायदळी तुडवल्या पाहिजेत.
यौवनी राजसत्तांच्या विरोधात उभे राहून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी याच सह्याद्रीची आळवणी केली. आणि त्यानेही छत्रपतींशी इमान राखत हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ आपल्या शिरावर घेतली. त्यामुळेच छत्रपती शिवरायांचे शौर्य आणि शूरवीर योध्यांच्या यशोगाथा आजही सह्याद्री आपल्या अंतरंगात भरून राहिला आहे. त्या समजून घेण्यासाठी तरी जंगलातील धुळवाटा, स्वच्छ आणि खळाळत वाहणारे पाझर, दमछाक करणारी चढण, डोईवर विस्तीर्ण पसरलेले अवकाश व भुईवर पाठ टेकून सुखात पहुडण्याचे सौभाग्य अनुभवले पाहिजे.
इतिहास वाचन तर करायलाच हवे; परंतु तो *“याची देही याची डोळा”* अनुभवायचा असेल तर आपल्याला गडकिल्ले पादाक्रांत केलेच पाहिजेत. फक्त तिथे जाताना आपल्या हातून कोणत्याही प्रकारचा *प्रमाद* घडणार नाही, याची मात्र दक्षता घ्यायला हवी. पर्यावरण कितीही बदलले, कालची खेडेगाव शहर बनली, पिढ्या, घरदार सगळे गेले पण आजही या गडकोटांनी आपली शर्थीची झुंज कायम राखली आहे. सह्याद्रीच्या भरभक्कम आधारावर आजही ते आपला इतिहास व भगवा ध्वज गर्वाने फडकवत आहेत.
वासोटा किंवा व्याघ्रगडाने आम्हाला अशीच गडकिल्ल्यांची भ्रमंती करण्यासाठी उद्युक्त केले. पहिल्या वेळी उडालेली आमची त्रेधातिरपीट आणि त्यातून शहाणपण शिकत आता आम्ही किमान खबरदारी घेण्यासाठी सज्ज झालो होतो. दुसऱ्या वेळी वासोटा किल्ला निर्विघ्नपणे सर केल्यानंतर आमचा आत्मविश्वास व उत्साह द्विगुणित झाला होता. *“एक से भले दो, दो से भले तीन”,* या न्यायाने आम्ही सवंगडी एकत्र होऊ लागलो.
रोजच्या भेटीत पुढील सुट्टीत कुठे जायचे, याची चर्चा रंगू लागली. आम्हाला फारशी माहिती उपलब्ध होत नसली तरी प्रत्येकजण आपापल्या परीने ती गोळा करण्यासाठी प्रयत्न करत होता. त्यावेळी आमच्या वयाचे इतरही मित्र मंडळ होते पण त्यांना अशा काही आव्हानात्मक गोष्टींमध्ये फारसा रस (इंटरेस्ट) नव्हता. शिवाय त्यांच्या घरच्या मंडळींकडून देखील नकार घंटा वाजत होत्या. पण आम्हाला मात्र दिवसरात्र गडकिल्ले पादाक्रांत करण्याची स्वप्न खुणावत होती.
नेमक्या त्याच वेळी पुन्हा एकदा “दैनिक सकाळचा” अंक आमच्या मदतीला धावून आला. या अंकात प्रचितगड किल्ल्याची माहिती थोडक्यात प्रसिद्ध झाली होती आणि आमची नजर त्याने वेधून घेतली होती. नेमकी मे महिन्याची सुट्टी सुरू होती आणि त्याच वेळी हा अनमोल ठेवा आमच्या हाती गवसला होता. चला आता मोहीम ठरली, निर्धार झाला......प्रचितगड फत्ते करायचा! मुहूर्त ठरला २० मे १९९२!!
दैनिक सकाळच्या अंकातून प्रचितगडावर जाण्यासाठी चांदोली मार्गाने जावे लागते हे लक्षात आले होते. त्यावेळी चांदोली अभयारण्य घोषित झाले होते तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. परंतु अभयारण्याच्या अंतर्गत भागात असणारी बहुतांश गावे, वस्ती विस्थापित झाली होती. अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच वस्ती त्या दुर्गम, डोंगराळ भागात आपले अस्तित्व टिकवून होती.
परंतु या सर्व परिस्थिती विषयी विचार करायला आम्हाला सवड कुठे होती? ठरल्याप्रमाणे मी, अलंकार जोशी, मंदार जोशी (बंड्या, सध्या रा.सातारा), शिरीष जोशी, ऋषिकेश गिजरे, विक्रांत देशपांडे व मंदार मदन जोशी यांनी प्रचितगड पादाक्रांत करण्यासाठी कराडची वेस ओलांडली! सकाळच्या अंकात चांदोली इथून प्रचितगड अशा परतीच्या प्रवासाला तीन दिवसांचा कालावधी लागतो असे नमूद केले होते. त्यानुसार आम्ही तीन दिवस पुरेल असे स्वयंपाक करण्याचे साहित्य सोबत घेतले होते. 
चांदोली येथे पोहचून आम्ही पायवाटेच्या मार्गाची चौकशी केली आणि प्रत्यक्ष प्रचितगडाच्या दिशेने आमची वाटचाल सुरू झाली. जलाशयाच्या उत्तर बाजूकडून आम्ही चढणीला लागलो. फारशी झाडी नसल्याने आणि पायवाट मळणीची असल्याने दिशाभूल होण्याचा संभव नव्हता. संध्याकाळ होइपर्यंत आमची चढाई सुरू होती आणि थोड्या पठार भागावर पोहचल्यावर आम्हाला छोटेखानी वस्ती नजरेस पडली. आजचा मुक्काम इथेच करायचा असे ठरले. मे महिना असल्याने मुक्काम करण्यासाठी आडोसा शोधण्यापेक्षा निरभ्र आभाळाच्या छत्रछायेत रात्र काढण्यात आम्हाला अधिक आनंद मिळत होता. 
डोक्यावर छप्पर नसेल तरी चालेल फक्त पाण्याची व्यवस्था हवी, इतकीच आमची प्राथमिक गरज होती. तशी व्यवस्था पाहून एका मोकळ्या जागेत आम्ही पथारी पसरली. आणि थोडी विश्रांती होताच संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. दगडी चूल मांडली गेली. लाकूडफाटा गोळा झाला आणि बल्लावाचार्य अलंकार स्वयंपाक करण्यासाठी सज्ज झाला. भाताचे आधण रटरटू लागले आणि दुसरीकडे कांदा, बटाटा चिरून सज्ज होता. भात शिजवून झाला आणि अलंकारने दुसऱ्या पातेल्यात तेल ओतून फोडणी टाकली. 
अलंकार पूर्ण एकाग्रतेने रस्सा बनविण्यात मग्न होता आणि त्याचवेळी शिऱ्या (शिरीष) त्याला *“आल्या तिखट जपून घाल”* म्हणून डिवचत होता. पण त्याच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत अलंकार त्याच्या स्टाईलने रस्सा बनवण्यात मग्न होता. स्वयंपाक तयार झाला आणि प्रत्येकाने हाताच्या बाह्या सरसावल्या......चुलीवरचा गरमागरम भात आणि बटाट्याचा रस्सा अशी मेजवानी......हाता तोंडाची जुंपणारच होती......पहिलाच घास घेतला असेल तोच......शिऱ्या मोठयाने खोकला आणि अलंकारचा अगदी एकेरी ‘ *उद्धार* ’ करत त्याने पाण्याचा घोट घेतला......
अलंकारला जे करायचे होते तेच त्याने अगदी मनसोक्तपणे केले होते.......झणझणीत रश्याने आमच्या डोळ्यासमोर चांदणे उभे राहिले होते......कानातून धूर आणि डोळ्यातून पाणी वाहत होते. साखरेच्या मुठी रश्यात टाकून आम्ही त्या दिवशी आमची क्षुधा शमवली होती......पोटात आगीचा डोंब उसळला होता. उद्याची सकाळ आपल्यासाठी नेमकी कशी होईल याचा विचार न करता आम्ही भुईवर पाठ टेकली आणि निद्रादेवीच्या आधिन झालो.
 *क्रमशः* 
समीर श्री. आराणके
सोमवार पेठ, कराड
दूरभाष : ९४०३१६६५५८

🚩 *प्रचितगडाच्या "भययुक्त" छायेत!* 🚩
---------------
समीर आराणके, कराड
       *भाग दुसरा* 

 (जे ऐकायला तयार नाहीत त्यांनी वाचावे म्हणून हा लेखनप्रपंच)
पहाटेचे तांबडे फुटू लागले होते व कोंबड्यांनी बांग देऊन *“चला उठा”* आता आणि *“निघा”* असेच सूचित केले होते. पथारी गुंडाळून प्रत्येकाने आपापल्या साहित्याची गोळाबेरीज केली. पाठीवरील सॅक पुन्हा एकदा कोंबून तयार झाल्या. रात्री मांडलेल्या चुलीत अजूनही निखारे धगधगत होते. त्यांच्यावर पाणी शिंपडून शांत केले.
आम्ही जेव्हा कधी असे रात्रीचे उघड्यावर झोपत असू तेव्हा शक्यतो चारी बाजूंनी लाकूडफाटा जळत ठेवत असू. त्यामागे साप, विंचू अशा सरपटणाऱ्या प्राण्यांचा उपद्रव होवू नये अशी व एवढीच खबरदारी घेत असू. त्यामुळे चहुबाजूंनी लागलेली विस्तवाची धगही शांत केली. जंगलात किंवा गडकिल्ल्यांवर मुक्काम करताना आम्ही सर्वाधिक काळजी या गोष्टीची घेत होतो. कदाचित आपली पाठ वळल्यानंतर एखादी ठिणगी खूप अक्राळविक्राळ रूप धारण करू शकते. आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची हानी करू शकते, याचे भान होते, म्हणूनच आधी ही खबरदारी!
दुसऱ्या दिवशीची पायपीट सुरू झाली. उन्हाळ्याची तीव्रता अधिक प्रखरतेने जाणवत होती. त्यामुळे चालताना अगदी घामाघूम व्हायला होत होते. वाटेत कुठे पाण्याचा झरा लागला की आम्ही तिथेच काही वेळ विसावत होतो. सकाळच्या व दुपारच्या सत्रात केवळ घरातून आणलेल्या फराळ साहित्यावर उदरभरण पार पडले. अगदी संध्याकाळी उशिरापर्यंत आमची वाटचाल सुरु राहिली. परंतु त्या नंतर मात्र पायांनी *‘विद्रोही’* भूमिका घेतली. आता बास! आणखी नको..... ठरले तर मग इथेच थांबायचे!! दुसऱ्या दिवशी देखील प्रचितगडाचे नामोनिशाण दिसत नसल्याने आम्ही विचारमग्न झालो होतो. 
सकाळच्या अंकात तर  अरत-परत तीन दिवस लागतात असे नमूद केले होते आणि दुसरा दिवस संपला तरी अजूनही आम्हाला गडाचा काही थांगपत्ता किंवा मागमूसही लागला नव्हता. पण आता पुढेच जायचे हा आमचा निर्धार अगदी भक्कम होता. रात्री पुन्हा एकदा भात आणि बटाट्याचा रस्सा ठरलेलाच होता. मात्र आज अलंकारने स्वतःच्या हाताला आवरते घेतले होते. त्यामुळे सगळ्यांचे उदरभरण यथास्थित पार पडले. आमची कितीही दमछाक होत असली तरी स्वयंपाक करताना मात्र प्रत्येकजण स्वतःची जबाबदारी पार पाडत असे. म्हणजे उदा. ऋषिकेश, विक्रांत यांनी लाकूडफाटा गोळा केला तर मंदार (दोन्ही), शिरीष हे पाण्याची व्यवस्था पाहायचे. अलंकार व मी चूल लावणे, साहित्याची मांडामांड करणे अशी जबाबदारी वाटून घेत होतो. याबाबतीत मात्र आम्ही सगळे समान होतो. त्यात लहान मोठा असा भेदभाव कधीच होत नसे व पुढेही कधी झाला नाही.
रात्र सरली आणि तिसऱ्या दिवशीच्या वाटचालीला प्रारंभ झाला. फक्त नवीन दिवस उजाडला होता पण बाकी सगळे कालचेच होते. दुपारपर्यंत पायपीट सुरू होती. मधूनच घनदाट झाडी उन्हापासून संरक्षण करत होती. चढ उतारावरून पूर्वेकडून पश्चिमेला पायवाटीचा मागोवा घेत आम्ही चालत होतो. दुपारच्या वेळी एक घर आमच्या नजरेत आले. केवळ हे एकमेव घरच तिथे शिल्लक उरले होते. आम्ही कुणी आहे का याचा कानोसा घेतला आणि एक वयस्कर व्यक्ती घरातून बाहेर आली. आम्ही तिथेच बसकण मारली.
कुठे निघालात? त्या वयस्काने चौकशी केली. प्रचितगड जायचे आहे हे ऐकून त्या व्यक्तीने आम्हाला नखशिखांत न्याहाळले. *“तुम्ही आज तिथे पोहचू शकत नाही”,* असे म्हणून त्याने पुढील खडतर मार्गाची थोडीशी जाणीव करून दिली. रणरणत्या उन्हात आम्ही परत पुढच्या दिशेने पावले उचलली. त्या वयस्काने सांगितलेल्या मार्गाने आम्ही वाटचाल करीत होतो. दुपारी चारच्या दरम्यान आम्ही उतरणीला लागलो. खाली आलो आणि आता पुन्हा वरच्या दिशेने चढाई सुरू झाली. चांदोली धरणातील पाणी पातळी कमी झाल्याने आम्ही त्या ओसाड चिखल मातीतून पुढे होत गेलो.
चढण सुरू झाली तशी छातीची धडधड अधिक गतीने होत होती. सुमारे एक तासाची ती चढण चढून आम्ही वर आलो आणि समोरच काही घरे (२/३) दृष्टीस पडली. घर पक्की नव्हतीच पण तिथे राहणाऱ्या लोकांनी *‘आसरा’* उभा केला होता. आम्हाला पाहून एक व्यक्ती समोर आली. चौकशी झाली आणि *“तुम्ही पुढे जाऊ नका, आज इथेच मुक्काम करा”,* असे त्याने सुचवले. संपूर्ण दिवसभराच्या वाटचालीने आम्हालाही शिणवटा आला होता. त्यामुळे आता आजची रात्र इथेच विश्रांती घ्यायची हे निश्चित झाले.
 *क्रमशः* 
समीर श्री. आराणके
सोमवार पेठ, कराड
दूरभाष : ९४०३१६६५५८

🚩प्रचितगडाच्या "भययुक्त" छायेत!🚩
–-------------

समीर आराणके
      *भाग तिसरा* 

 (जे ऐकायला तयार नाहीत त्यांनी वाचावे म्हणून हा लेखनप्रपंच)
आजचा दिवस देखील केवळ पायपीट करण्यात गेला होता आणि रात्रीचा स्वयंपाक व जेवण झाल्यावर आम्ही त्या व्यक्तीसोबत गप्पांचा फड जमवला. तो ही जणू आमच्यातील एक असल्यासारखा सहभागी झाला. त्यातून जो काही विचारविमर्श झाला व निष्पन्न असे निघाले की उद्या सकाळी प्रचितगडाचा मार्ग दाखविण्यासाठी तो ‘ *वाटाड्या* ’ म्हणून आमच्या सोबत येण्यास तयार झाला.
आता आम्ही एका अर्थी निश्चित झालो होतो. ठरल्याप्रमाणे पहाटेच्या सुमारास आम्ही प्रचितगडाच्या दिशेने कूच करण्यासाठी सज्ज झालो. ती व्यक्ती देखील तयार झाली आणि आम्ही कदमताल सुरू केले. आज पायवाटेची खातरजमा करण्याची गरजच नव्हती. त्यामुळे साहजिकच वेळेची बचत होणार होती. शिवाय आमचे इप्सित ध्येय पूर्ण होणार होते. पाठीवर साहित्याचा बोझा नव्हता. थोडे फार फराळाचे आणि पिण्याचे पाणी इतकेच साहित्य घेतले होते. ती व्यक्ती त्या परिसराविषयी पूर्ण परिचित होती, त्यामुळे आमची वाटचाल वेगाने सुरू राहिली.
सुमारे दोन अडीच तास पायपीट झाली आणि आता आम्ही उतारावर दाखल झालो. नमूद करण्यासारखी बाब म्हणजे ज्या भागातून आम्ही वाटचाल केली तो संपूर्ण पठार भाग होता. फारसे चढउतार नव्हते. हे बॉक्साईटचे पठार आहे असे म्हणतात. असो! आम्ही अगदी चिंचोळ्या मार्गाने उतरू लागलो. अगदी दगडाच्या अरुंद खोबणीतून खाली येऊन पाहतो तर समोर धडकी भरवणारी खोल दरी आणि दूरवर पसरलेले जंगलाचे साम्राज्य नजरेत भरत होते. तिथूनच थोडे डावीकडे वळण घेतले आणि समोर दोन कपारीत *‘एकोपा’* घडवणारी लोखंडी शिडी टेकवलेली होती. त्या शिडीवर एकामागून एक पायरी चढली आणि आता आमच्या अंगात कापरे भरले. कारण आमच्या वजनाने ती शिडी *‘हिंदळू’* (हेलकावू किंवा हलू) लागली. आता आपली धडगत नाही.......हातपाय लटलटू लागले. पण धीर धरून आम्ही एकदाचे गडाच्या माथ्यावर दाखल झालो.
गडावर एका वाड्याचे भग्नावशेष विखुरलेल्या अवस्थेत दिसून आले. एका दगडाच्या छत्राखाली देवीची मूर्ती विराजमान झाली होती. गडाचा परिसर विस्तीर्ण पसरलेला असला तरी तो ओबडधोबड होता. समतोल जागा त्यामानाने कमी होती. मात्र गडाच्या वैभवशाली इतिहासाला साक्ष देणारी एक वास्तू अगदी गुप्त रीतीने आपले अस्तित्व दडवून बसली होती. ती म्हणजे, दगडाच्या एका खोबणीत पाण्याचा मुबलक साठा असलेले टाके! बाहेरून नजर फिरवली तर आतमध्ये पाण्याचे एवढे भलेमोठे टाके असेल याची यत्किंचितही कल्पना येत नव्हती. पण खोबणीतून आत डोकावून पाहिल्यावर ते टाके जवळपास चार खोल्यांइतके विस्तीर्ण असल्याचे दिसून आले. शिवाय ४/५ तोफा देखील वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्या.
छत्रपती शिवरायांच्या कुशल कारभाराचे ते *‘टाके’* जणू द्योतक म्हणावे लागेल. त्या काळात गडावर राहणाऱ्या लोकांना अन्नधान्य तुटवडा होणार नाही याची खबरदारी घेतानाच जीवनासाठी वरदान असलेल्या पाण्याचाही तुटवडा होणार नाही यासाठी केलेली ही उपाययोजना आजच्या राज्यकर्त्यांनी अंमलात आणली तर महाराष्ट्र खऱ्या अर्थाने *“सुजलाम सुफलाम”* होईल, असे वाटते. या पाण्याच्या टाक्याचा उल्लेख इथे मुद्दाम करून ठेवला आहे. पुढच्या काही भागात त्याचे मोल आणि पाण्याच्या एका थेंबाची किंमत मी अधोरेखित करणार आहे.
आणखी एक स्पष्टीकरण इथेच करून ठेवतो आहे. लेखमालेचे शिर्षक *“प्रचितगडाच्या “भययुक्त” छायेत”* असे केले आहे. परंतु अजूनही भययुक्त प्रसंग कसा काय अधोरेखित झाला नाही, अशी शंका येऊ शकते. तर त्याचाही अगदी सविस्तर खुलासा या लेखमालेत करणार आहे. नाही म्हणायला त्या शिडीवर चढताना व उतरताना आमची झालेली केविलवाणी अवस्था भयसुचकच आहे. गडावरील विस्तृत परिसर न्याहाळून झाला. दूरवर पसरलेल्या निसर्गाने एकीकडे आम्ही मोहित झालो तर दुसरीकडे *‘आ’* वासून गिळंकृत करायला निघालेली खोलवर पसरलेली दरी पाहून अवाक झालो होतो.
अशा दुर्गम, दुर्दम्य गडकोटांवर राहून, प्रसंगी आपल्या जीवाचे बलिदान देऊन स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या शूरवीरांच्या शौर्याची गाथा मांडण्यासाठी शब्द भांडार तोकडेच ठरणार आहे. केवळ कल्पना शक्तीचा आधार घेतला तरी त्यालाही आपली मर्यादा लक्षात येईल. *“आभाळाप्रमाणे विस्तारलेल्या, सागराची खोली असलेल्या आणि पाताळातही पसरलेल्या शूरवीरांच्या यशोगाथा”* अशा गडकोटांवर उभे राहून अनुभवायला हव्यात! आपण आपोआपच नतमस्तक होऊ आणि न कळत *“छत्रपती शिवाजी महाराज की जय”* ही गर्जना आपल्या मुखाद्वारे आसमंत दणाणून सोडेल!!!
 *क्रमशः* 
समीर श्री. आराणके
सोमवार पेठ, कराड
दूरभाष : ९४०३१६६५५८

🚩प्रचितगडाच्या “भययुक्त” छायेत!🚩
---------------
समीर आराणके, कराड
      *भाग चवथा* 

 (जे ऐकायला तयार नाहीत त्यांनी वाचावे म्हणून हा लेखनप्रपंच)
छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने आमचे रोम अन रोम जागे व ताजेतवाने झाले. आता गडाला आणि त्या दुर्गामातेला दंडवत घालून आम्ही यथावकाश परत मुक्कामी दाखल झालो. आजचा दिवस अविस्मरणीय ठरला होता. आपण आणखी एक गड सर केला यापेक्षा त्या गडाला वंदन करण्याचे सौभाग्य लाभले याचेच अधिक समाधान होते. गेले तीन दिवस केलेली पायपीट फळास आली होती. सगळ्या कष्टाचा, श्रमाचा परिहार झाला होता. आजची रात्र इथेच मुक्काम करायचा होता आणि मग अलंकारच्या हातचा झणझणीत बटाट्याचा रस्सा, गरमागरम भात यावर ताव मारून आम्ही पथारी पसरल्या.
पहाट होताच परतीच्या प्रवासाला प्रारंभ झाला. त्या व्यक्तीचे मनोमन आभार मानले आणि पावले आल्या मार्गाने उतरणीला लागली. आता पायवाट परिचयाची झाली होती त्यामुळे कुठेही अडथळण्याचा, अडखळण्याचा प्रश्न नव्हता. दुपार होईपर्यंत आम्ही परत त्या वाटेतील एकुलत्या एक घराच्या ओसरीवर दाखल झालो. त्यांना प्रवासाचा वृत्तांत कथन केला आणि पुन्हा एकदा पुढची वाटचाल सुरू झाली. आज जास्तीत जास्त पल्ला गाठायचाच अशी खूणगाठ मनाशी बांधून आम्ही झपाट्याने पुढे सरकत होतो आणि तितक्यात.........
पुढची पायवाट अचानक 'गायब' झाली होती आणि मागे वळून पाहिले तर आपण इथे कसे आलो याचाही सुगावा लागत नव्हता. काही तरी अघटित, विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे हे लक्षात आले. दुतर्फा झाडी होती. एक वृक्ष आपला बडेजाव मिरवत होता. बुद्धी कुंठित झाली होती आणि कुठे व कसे जायचे असा यक्षप्रश्न उभा राहिला होता. काही वेळ आम्ही तिथेच एकत्रित बसून राहिलो. झाडीतून खाली दूरवर पसरलेले चांदोली धरणाचा जलाशय दिसत होते. आता इथून खाली उतरून जलाशयाचा काठ गाठायचा आणि तिथूनच चांदोलीकडे चालत सुटायचे, अशा विचाराप्रत आम्ही आलो. परंतु त्या गर्द झाडीतून खाली उतरणे म्हणजे जणू मृत्यूला 'गळाभेट' घेण्यासारखे होईल हे लक्षात आले.
काही वेळ विचारविमर्श सुरू होता आणि अचानक आमचे लक्ष डाव्या बाजूला असलेल्या चढाकडे वळले. आम्ही तिथून वर चढण्याची शिकस्त केली आणि झाडाझुडुपांमधून वरच्या बाजूला दाखल झालो आणि अगदी स्तब्ध, निश्चल उभे राहून, डोळे विस्फारून समोर पाहत होतो........समोर अगदी स्वच्छ पायवाट दिसत होती. इतकेच नव्हे तर आम्ही ज्या पायवाटेने आलो होतो ती पाठमोरी दृष्टीस पडली. जर आपण या मार्गाने इथे आलो होतो तर मग खाली कसे उतरलो?......केवळ या विचाराने आमची दातखीळ बसली होती.......नेमके काय झाले होते.......आम्हाला जंगलात *‘चकवा’* लागला होता. त्या विषयी आम्ही थोडेफार जाणून होतो पण आता प्रत्यक्षात अनुभवत होतो.
दैव बलवत्तर म्हणूनच त्या चकव्यातून आम्ही सुखरूप बाहेर पडलो आणि पुढे वाटचाल सुरू केली. अगदी सुर्यास्तापर्यंत आम्ही चालण्याची शिकस्त केली पण आता पोटात भुकेने डोंब उसळला होता त्यामुळे पुन्हा एकदा मुक्काम करण्याचा निर्णय झाला. मुक्कामाची सज्जता होताच स्वयंपाक करण्यासाठी तयार झालो. पण हाय रे दैवा! सगळ्यांच्या सॅक रिकाम्या झाल्या होत्या........तांदळाचा एक कणही कुणाकडे शिल्लक नव्हता.......  आपण तीन दिवसाचेच साहित्य आणले होते आणि त्यावर आधीच पोटपूजा करून झाली, हे लक्षात आले. आता पोटातील भूक कशी शमवणार? 
गडकिल्ले भ्रमंती करताना उदरभरण करण्यासाठी योग्य ती खबरदारी कशी घ्यावी याचीच शिकवण किंवा धडा आम्हाला शिकवला होता. प्रत्येकजण स्वतःच्या सॅकचा कोपरा अन कोपरा तपासत होता आणि त्यातून जे निष्पन्न झाले ते म्हणजे.....शिरीषच्या सॅक मधून एक लाल तिखटाची पुरचुंडी आणि आणखी एका सॅक मधून गोडतेलाची छोटीशी बाटली बाहेर पडली. प्रत्येकाने हाताचा तळवा पुढे सरकवला व त्यावर थोडे तिखट व तेल घालण्यात आले. एका बोटाने तो तेलतिखटाचा भाग जिभेवर लावायचा आणि दुसऱ्या बाजूने पाण्याचा घोट रिचवायचा! नुसते पाणी पिऊन पोट भरण्यापेक्षा हा उपाय अधिक प्रभावी ठरला. रात्रीची वेळ मारून नेली होती पण उद्याचा संपूर्ण दिवस रिकाम्या पोटी पायपीट करायची होती.
दिवस उजाडला आणि पुढची चाल सुरू झाली. पण कालच्या तेलतिखटाचा विपरीत परिणाम दिसून येत होता. एकीकडे उकाडा असह्य झाला होता. पोटात भुकेने कावळे ओरडून ओरडून मरणासन्न झाले होते. तेलतिखटाने बाहेर व आतून अंगप्रत्यंग जणू आग ओकत होते. पण चांदोली गाठेपर्यंत पर्याय होताच कुठे? ज्याला सहन होत होते त्याने दिवसभर तोच तेलतिखटाचा आधार घेतला आणि अखेरीस सायंकाळी आम्ही उतारावरून घसरंड करत एकदाचे चांदोली येथे दाखल झालो.
मंदार (बंड्या) याचे नातेवाईक चांदोलीमध्ये होते. रात्री त्यांच्याकडे मुक्काम केला आणि एक छोटेसे हॉटेल पाहून मेजवानीवर मनसोक्त ताव मारला. गप्पांच्या ओघात ऋषिकेश व मंदार यांचा १२वी चा उद्या रिझल्ट आहे हे समजताच आम्ही त्या दोघांची चांगलीच टर उडवली. त्यांनी देखील दिलखुलास दाद देत *“उद्या आमचा निकाल लागणार”* अशी कोटी केली. आणखी एक खडतर पदभ्रमण पार पडले होते. पण हा प्रचितगडाच्या भ्रमणाचा केवळ पूर्वार्ध होता. उत्तरार्धात प्रचितगडाच्या भययुक्त छायेत जे काही घडले ते वाचून तुम्हाला देखील धडकी भरणार हे निश्चित!
 *क्रमशः* 
समीर श्री. आराणके
सोमवार पेठ, कराड
दूरभाष : ९४०३१६६५५८

🚩प्रचितगडाच्या “भययुक्त” छायेत!🚩* 
---------------

समीर आराणके, कराड
      *भाग पाचवा* 

 (जे ऐकायला तयार नाहीत त्यांनी वाचावे म्हणून हा लेखनप्रपंच)
आमच्या जीवनातील प्रचितगड भ्रमण ही दुसरी मोहीम यशस्वी झाली होती. त्यांनंतरची सलग काही वर्षे आम्ही न चुकता दीपावली व मे महिन्यात वेगवेगळ्या गडांची पदभ्रमंती करण्याची जणू शृंखलाच पूर्ण केली. त्यातील सर्वात मोठी आणि जवळपास एक आठवड्याची तिकोना किल्ला ते भीमाशंकर ही मोहिम विशेषत्वाने स्मरणात राहिली. शिवाय कळसुबाई या महाराष्ट्रातील सर्वाधिक उंच शिखरावर केलेली सफल चढाई हा आमच्या पदभ्रमंतीचा *‘कळस’* ठरला.
पुढे शिक्षण, व्यवसाय निमित्ताने या मोहिमांमध्ये कमी होत गेली. परंतु पदभ्रमंती विषयी आम्हाला लागलेली ओढ तसूभरही कमी झाली नाही. जरी प्रत्येकजण आपापल्या व्यापात *व्यस्त* व *व्यग्र* होत होता तरी कधीही एकत्र आलो की पुन्हा त्याच आठवणींना उजाळा मिळतो. *“बालपणीचा काळ सुखाचा”* असे उगीचच म्हणतात का? त्याची सत्यता आताशी कुठे जाणवू लागली आहे. असो! 
मधला काळ, वर्षे झपाट्याने सरत होती. मी आधी सातारा व पुढे सज्जनगडावर वास्तव्यास गेलो. सातारा येथे असतानाच माधव कुलकर्णी, श्रीधर पेठकर, महेश कुलकर्णी अशा काही मित्रांबरोबर स्नेह निर्माण झाला. मंगळवार तळे परिसरात आम्ही रोजच एकत्र भेटत होतो. तिथेही गप्पांच्या ओघात आमच्या पदभ्रमंतीच्या सुरसरम्य कथा रंगत होत्या. त्यातुनच सज्जनगडावरील वेद पाठशाळेतील विद्यार्थ्यांना जेव्हा मी वासोटा किल्ल्यावर घेऊन गेलो त्यावेळी माधव कुलकर्णी आमच्यामध्ये सहभागी झाला होता.
त्यालाही गडकोट भ्रमणाचा आनंद मिळाला. त्यानंतर अजून कुठे जायचे? अशी चर्चा सुरू झाली. ठिणगी पडली होती. आता त्याचा वणवा पेटण्याची प्रतिक्षा होती. सातारच्या मित्रमंडळाला मी गडकोट भ्रमणासाठी उद्युक्त केलेच होते. त्याची पहिली फलनिष्पत्ती म्हणजे आम्ही रायगडाची चढाई यशस्वी केली. यामुळे त्यांचा उत्साह द्विगुणित तर झाला होताच; पण त्यांच्यात आत्मविश्वास दुणावला होता.
आपल्या आयुष्यात कधी कोणते वळण लागेल किंवा उलथापालथ होईल याची शाश्वती कुणीच देऊ शकत नाही. आमच्या बाबतीत देखील तेच घडत होते. मे महिना सुरू झाला होता आणि आमची गडावर जाण्यासाठी चर्चा सुरू होती. *“कुठे तरी जाऊया”* इतकेच प्रारंभीचे बोलणे झाले. त्यातूनच मी *"प्रचितगड करुया"* असा प्रस्ताव मांडला. माधव, श्रीधर व महेश अशा तिघांनी होकारार्थी संमती दिली. तारीख ठरली २३ मे २००२!! योगायोग कसे असतात ते पहा. १९९२ सालात आम्ही जेव्हा प्रचितगड सर केला तीच तारीख यावेळी जुळून आली होती. फक्त मध्ये दहा वर्षे लोटली होती. त्या दहा वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते.
सातारा येथून रात्री दुचाकीवरती निघायचे असे निश्चित झाले. २३ तारखेचा दिवस अस्ताला गेला आणि आम्ही निघण्याच्या तयारीला लागलो. गडावर मुक्काम करायचा असे ठरल्याने स्वयंपाक साहित्य, पातेलं अशा प्राथमिक गोष्टी सोबत घेतल्या. यावेळी प्रचितगडावर जाण्याचा मार्ग तेवढा बदलला होता. चांदोली मार्गाने जाणं अशक्य होते. त्याऐवजी कराड, कोयनानगर, चिपळूण, संगमेश्वर व तिथून शृंगारपूर अशी दुचाकीवरील सवारी करायची व शृंगारपूर येथूनच प्रचितगडाची चढाई सुरू करायची असे निश्चित झाले.
रात्री नऊच्या सुमारास आम्ही साताऱ्यातून मार्गस्थ झालो. एकेक टप्पा पार करत व संपूर्ण रात्रभर प्रवास करत अखेरीस पहाटेच्या सुमारास आम्ही शृंगारपूर गावात दाखल झालो. दुचाकी लावण्याची व्यवस्था केली आणि गावात जे कोणी भेटले त्यांना प्राथमिक पायवाटेने जाण्यासाठी चौकशी केली. आम्ही सगळे अगदी प्रथमच या मार्गाने जाणार होतो. नेमका मार्ग कसा आहे, कितपत खडतर आहे, चढाईला किती कालावधी लागतो याची तसूभरही माहिती नव्हती.
पाठीवर सॅक चढवल्या. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. आम्ही जी चौकशी केली त्यातून एक गोष्ट लक्षात आली होती की वाटेत कुठेही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध नाही. त्यातच कडक उन्हाळा असल्याने छोटे मोठे ओघळ आटले होते. त्यामुळे ज्या व जेवढ्या पाण्याच्या बाटल्या घेतल्या होत्या त्याच गडावर पोहचेपर्यंत आमची तहान भागवणार होत्या. आता आम्ही गावाची वेस ओलांडून बाहेर पडलो. समोर दूरवर घनदाट जंगल पसरलेले दिसत होते. पहाटेच्या सुमारास चरण्यासाठी सोडलेली गुरेढोरे फिरत होती.
पायवाट अगदी मळलेली होती त्यामुळे तीच गडाच्या दिशेने जात आहे असे वाटल्याने आम्ही चालत होतो. अजून तरी आम्हाला फार चढउतार लागले नव्हते. त्यामुळे चालताना फारशी दमछाक होत नव्हती. सुमारे पाऊण तास आम्ही गडाच्या दिशेने वाटचाल करत होतो. प्रचितगडाचा अजस्त्र विस्तार दृष्टीक्षेपात येत होता. आम्ही योग्य मार्गाने जात असल्याचा समज करून घेतला होता. त्याचवेळी अगदी गर्द झाडीत आम्ही प्रवेश केला. त्यातून वाट काढत पुढे जाण्याची खटपट व धडपड सुरू झाली आणि मग आपण मार्ग चुकल्याचे लक्षात आले. पुन्हा माघारी वळलो आणि पायवाटेचा शोध सुरू केला. या सर्व घडामोडीत व पुन्हा योग्य पायवाट शोधण्यात आमचा एक तास वाया गेला होता. सकाळचे आठ वाजत आले होते आणि अजूनही आम्ही फक्त योग्य मार्गाच्या शोधात गुरफटलेले होतो.
 *क्रमशः* 
समीर श्री. आराणके
सोमवार पेठ, कराड
दूरभाष : ९४०३१६६५५८

🚩प्रचितगडाच्या “भययुक्त”छायेत!🚩
---------------
समीर आराणके, कराड
     *भाग सहावा* 

(जे ऐकायला तयार नाहीत त्यांनी वाचावे म्हणून हा लेखनप्रपंच)
जंगलातील अनोळखी पायवाटांचा सुगावा लागणे दुस्तर असते. काही मळखाऊ वाटा पाळीव जनावरांच्या चारा शोधताना निर्माण झालेल्या असतात. काही जंगलातील प्राण्यांच्या असतात. अशा वेळी अति आत्मविश्वास दाखवला तर आपण संकटात सापडण्याचा धोका संभवतो. शिवाय कालापव्यय होवून आपण भलतीकडेच 'भटकत' व 'भरकटत' जातो. आमच्या बाबतीत नेमके हेच घडत होते. आपण किमान गडाच्या पायथ्याशी पोहचण्यासाठी योग्य व्यक्ती (वाटाड्या) सोबत घ्यायला हवी होती याची जाणीव झाली.
परंतु आता पश्चात्ताप करून उपयोग नव्हता. आठ वाजून गेले होते आणि मे महिना असल्याने सूर्य किरणे अधिक प्रखर होत होती. *“आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुनमास”* या म्हणीनुसार आमची गत झाली होती. जरी चहुबाजूंनी गर्द झाडी दाटलेली होती तरी कोकणातील दमट हवामान आम्हाला सतावू लागले. त्यामुळे थोडी चढण सुरू झाली की छातीचा भाता वेग घेत होता. पाण्याचे घोट रिचवून आम्ही ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील होतो. 
पायथ्यापासून थोडे वरील बाजूस आलो आणि आता खडी चढण सुरू झाली. अजून म्हणावा असा पल्ला गाठला देखील नव्हता आणि त्या चढणीला आम्ही सुरुवातीलाच 'मेटाकुटीला' आलो. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. नशीब म्हणजे मे महिना असल्याने खबरदारी म्हणून मी आधीच डझनभर लिंब सोबत घेतली होती. साखर व मीठही होते. पाण्याच्या बाटलीत रस ओतून साखर, मीठ घातले आणि आता त्याचे घोट घेत एकेक पाऊल वरच्या दिशेने उचलत होतो.
बघता बघता सकाळचे १०, ११ व १२ वाजून गेले होते. *फक्त आमचे १२ वाजायची घटिका यायची होती.* आणि पुढच्या तासाभरात तिने संधी साधून 'दस्तक' दिली. आमच्या जवळचे पाणी संपले होते आणि घशाला कोरड पडली होती. वाटेत कुठेही पाणी नाही हे गावकऱ्यांचे शब्द कानात 'बोचत' व 'टोचत' होते. आपण अधिक प्रमाणात पाणी घ्यायला हवे होते पण त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले याची खंत सलत होती.
पण प्राप्त परिस्थितीला तोंड देण्याखेरीज पर्याय नव्हता. तशीही आम्ही बरीच मजल मारली होती तरीही अजून गडाचा माथा दृष्टीक्षेपात आला नव्हता. त्याचवेळी तिघाही सोबत्यांनी माझी साथ सोडली. *"पाण्याशिवाय आम्ही एकही पाऊल उचलू शकत नाही"* असे त्यांनी ठणकावून सांगितले. पाण्याच्या एका थेंबाची किंमत त्यावेळी कळली होती. पाण्यातून मासा बाहेर काढला तर त्याची जशी तडफड होते तशीच काहीशी अवस्था आमची झाली होती. त्यांची ती केविलवाणी हतबलता पाहून मलाही 'लज्जित' झाल्यासारखे वाटले. आपणच पुढाकार घेऊन यांना इथे घेऊन आलो आणि आता ते हतबल झाले आहेत तर स्वतःलाच पुढे होऊन धैर्य दाखवावे लागणार होते.
पुढचा कोणताही विचार न करता मी सगळ्या पाण्याच्या बाटल्या सोबत घेतल्या आणि एकट्यानेच पुढची चढाई सुरू केली. आता एका वेगळ्याच *'आवेगात'* व *'आवेशात'* मी गडाच्या माथ्याकडे कूच केले. पूर्वी स्मरणात राहिलेली ती लोखंडी शिडी व तिचा मार्ग मात्र सापडला नव्हता. मी भलत्याच दिशेने वरती निघालो होतो. नजरेसमोर फक्त त्या तिघांचे चेहरे तरळत होते. जवळपास अर्धा तास होऊन गेला होता आणि मी मिळेल तिथे पाऊल टाकत पुढे सरकत होतो.
पश्चिमेकडून सूर्य आग ओकत होता पण त्याला न जुमानता गडाची ती घसरडी चढण पायदळी तुडवत वर चढत असताना एक खोबणीची जागा लागली. खाली दूरवर पसरलेली खोल दरी आणि त्या खोबणीत वरच्या हाताने दगडाचा आधार घ्यायचा आणि खालचा पाय वरच्या बाजूस उचलून वरच्या दगडावर ठेवत, तोल सांभाळत वर चढायचे. कुणीही सोबती नसताना केलेले ते धाडस एका क्षणात माझे अस्तित्व संपुष्टात आणण्यासाठी पुरेसे होते.
पण ते दिव्य पार करून मी गडाच्या माथ्यावर पाऊल ठेवले. क्षणाचाही विचार न करता माझी पावले *'त्या'* पाण्याच्या टाक्याच्या दिशेने झेपावली. आत डोकावून पाहिले आणि एका बाटलीत पाणी भरून स्वतःची 'तृष्णा' भागवली. मग सगळ्या बाटल्या भरून घेतल्या आणि माघारी वळलो.
 *क्रमशः* 
समीर श्री. आराणके
सोमवार पेठ, कराड
दूरभाष : ९४०३१६६५५८

🚩प्रचितगडाच्या “भययुक्त” छायेत!🚩
-------–------
समीर आराणके, कराड
      *भाग सातवा* 

 (जे ऐकायला तयार नाहीत त्यांनी वाचावे म्हणून हा लेखनप्रपंच)
गडावरील पाण्याचे *'गुप्त'* टाके माझ्या पूर्वपरीचयाचे होते. त्यामुळे शोधाशोध करण्याची गरज नव्हती. पाणी हाताशी गवसले होते पण म्हणतात ना *“विपरीत बुद्धी”* तशी काहीशी गत झाली होती. पाण्याच्या बाटल्या होत्या पण त्या सुरक्षित ठेवण्यासाठी सॅक घेण्याचे राहून गेले होते. फक्त *"गडावरून पाणी आणायचे"* या एकाच विचाराने मला झपाटले होते. पण आता या बाटल्या खाली कशा न्यायच्या? अंगात असलेला शर्ट उतरवला आणि त्या बाटल्या कमरेभोवती बांधल्या. *"संकटातून नेहमीच मार्ग निघतो"* असे म्हणतात ते इथे सार्थ ठरत होते.
आता ज्या कपारीतून किंवा खोबणीतून वरती चढलो होतो तिथे दाखल झालो आणि समोरचे ते अक्राळविक्राळ रूप पाहून माझी पाचावर धारण बसली. आपण वरती चढून तर आलो पण त्या खोबणीतून उलटे होवुन खाली उतरू शकत नाही या केवळ जाणिवेनेच अंगात कापरे भरले. हातपाय लटलटू लागले. मी मोठयाने ओरडलो....... माधव, महेश, श्री....... वरती या....... मी इथून खाली उतरू शकत नाही. पण बेंबीच्या देठापासून कितीही ओरडलो तरी त्यांच्या पर्यंत आरोळी पोहचणे अशक्य होते. 
काय करावे? त्या कड्याच्या अगदी टोकावर यायचो आणि पुन्हा माघारी जायचो. दोन वेळा पाऊल पुढे टाकले मात्र धाडस होईना. बहुतेक इथेच आपल्या आयुष्याची अखेर होणार! मृत्यूची घंटा जणू डोक्यात घणघणत होती. आता शेवटचा एकच उपाय शिल्लक होता....... क्षणार्धात मी दुर्गादेवीच्या मंदिराच्या दिशेने साष्टांग लोटांगण घातले. तिला मनोभावे प्रार्थना केली आणि माझ्या *“मनीचे गुज”* तिला कथन केले. त्या मनातील भावना, ते गुज मातेच्या कानी पोहोचले होते कारण पुढच्याच क्षणी मी पाठमोरा होऊन उलट्या दिशेने त्या खोबणीतून खालील बाजूस उतरण्यास सुरुवात केली होती.
एकीकडे कमरेला बांधलेल्या पाण्याने भरलेल्या बाटल्या आणि दुसरीकडे स्वतःचा तोल सांभाळत त्या घसरड्या उतरणीवर वाटचाल सुरू केली. जिथे ते तिघे माझी चातकासारखी वाट पहात होते तिथे येऊन दाखल झालो. ही सर्व घडामोड होत असताना घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. आधी त्या तिघांनी पाणी पिऊन घेतले. मग थोडी लाकडं गोळा करून तिथेच चूल पेटवली व त्यात कॉफी बनवली. ती कोरी कॉफी घेतल्यावर त्यांना जरा हायसे वाटले.
 *“इथून पुढे तुम्ही वरती चढून जाऊ शकत नाही त्यामुळे आपण पुन्हा परतीला सुरुवात करूया”* असे मी स्पष्ट केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनीही होकार दिला आणि आम्ही आल्या पावली माघारी वळलो. तो पर्यंत दुपारचे चार वाजत आले होते. सकाळी चढाईला सुरुवात केली तिथपासून आता जिथे होतो तिथे पोहचण्यास पाच तास वेळ लागला होता म्हणजे पुन्हा गावात पोहचायला किमान तीन तास म्हणजे संध्याकाळचे सात वाजणार होते.
त्यातच आकाशात ढगांची जमवाजमव सुरू झाली होती. आपण आणखी संकटात सापडण्याआधी इथून लवकरात लवकर पायउतार होणे, हेच आमच्या हिताचे होते. श्रीधर व महेश यांची शारीरिक व मानसिक दोन्ही अवस्था बिकट झाली होत्या. *“आम्ही दोघे पुढे होतो तुम्ही सावकाश या व आपण पायथ्याशी भेटू”* असे सांगून ते दोघे उतरणीला लागले. मी व माधव शांतपणे लिंबाच्या फोडी चघळत, एकमेकांशी संवाद साधत खाली उतरू लागलो. 
उतरणीची पायवाट परिचित झाली होती. गर्द झाडी झुडपांनी वेढलेल्या त्या पायवाटेने उतरताना आपण भलतेच साहस करायला निघालो होतो व वाटाड्या न घेता केलेले धाडस आपल्या अंगाशी आले. मी जिथून एकटाच वरती चढून गेलो त्या मार्गातील संकट किती जोखमीचे होते आदी गोष्टी करत आम्ही उतरत होतो. ढगांची दाटी होत असल्याने सूर्यास्त व्हायला किती अवधी उरला आहे याचा अंदाज येत नव्हता.
महेश व श्री आमच्या पूर्णपणे नजरेआड झाले होते. ते दोघे असल्याने आम्हाला फारशी चिंता करण्याची गरज नव्हती. मजल दरमजल करत आम्ही पायथ्याशी उतरलो. महेश व श्री इथेच तर थांबणार होते, पण त्यांचा मागमूस लागत नव्हता. ते दोघे गावाच्या दिशेने पुढे सरकले असतील अशी आमची समजूत झाली. त्यांना मोठयाने हाक मारून पाहिली पण कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. आता आम्ही दोघे पायथ्याची जागा मागे सोडली आणि गावाकडे कूच केले.
दाट झाडीतून वाट काढत असतानाच आमच्या दोघांची पावले एकाच वेळी जागच्याजागी थबकली. समोरचे दृश्य पाहिले मात्र आणि आम्ही एकमेकांचा हात हातात घेऊन होतो त्या जागी अगदी स्तब्धपणे उभे ठाकलो. नेमके काय दिसले होते? 
क्षणभर आमची भीतीने गाळण उडाली होती. समोरच्या मोकळ्या जागेत एक भरभक्कम *‘रेडा’* आमच्या रोखाने नजर वळवून आणि भली मोठी शिंगे आमच्यावर रोखून वाटेत उभा राहिला होता. आमच्यात फार फार तर १५ फुटांचे अंतर होते. त्याने ठरवले असते तर क्षणार्धात आम्हाला भुईवर लोळवणे त्याला शक्य होते.
काही क्षण आम्ही *‘मरणाच्या दारात’* उभे असल्याचा भास झाला होता. पण आम्ही दोघेही त्याच्याकडे तितक्याच रोखाने नजर भिडवली होती. अवघ्या काही क्षणांचा तो नजरेतील खेळ पण काय घडले ते समजण्या आधीच त्या रेड्याने आमच्यावर रोखलेली नजर हटवली. तोंडातून किंचितसा आवाज काढला आणि बाजूच्या झाडीत तो दिसेनासा झाला. तो प्रसंग आठवला तरी आजही अंगावर शहारे उभे राहतात. प्रचितगडाच्या भययुक्त वातावरणाची ती केवळ एक झलक होती. खरा भयावह प्रसंग तर अजून आमच्यावर बेतलाच नव्हता.
तसे पाहिले तर गडावरून पाणी घेऊन खाली उतरताना मला भयाची चुणूक अनुभवायला मिळालीच होती. परंतु *“तीन जणांचे प्राण वाचवायचे”* या एकाच विचाराने त्या भयाच्या जाणिवेवर मात केली होती. आता रेड्याच्या रूपाने पुन्हा एकदा ती झलक ताजी केली होती. जे काही घडले होते, घडत होते त्याकडे कानाडोळा करत आम्ही शृंगारपूर गावाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली.
 *क्रमशः* 
समीर श्री. आराणके
सोमवार पेठ, कराड
दूरभाष : ९४०३१६६५५८

🚩प्रचितगडाच्या "भययुक्त" छायेत!🚩
--------–-----
समीर आराणके, कराड
     *भाग आठवा* 

 (जे ऐकायला तयार नाहीत त्यांनी वाचावे म्हणून हा लेखनप्रपंच )
सूर्यास्त होवून गेला होता. अंधार दाटत होता. आणि मी व माधवने गावाच्या वेशीत पाऊल टाकले. बरेच श्रम झाल्याने आम्ही दोघे जिथे गाड्या लावल्या होत्या थेट तिथे दाखल झालो. शेजारीच असणाऱ्या एका घराच्या ओसरीवर काही मंडळी जमलेली होती. त्यांनी *“या! बसा"* असे म्हणताच आम्ही जणू काही *“आज्ञा शिरसावंद्य”* म्हणत तिथे ठेवलेल्या खुर्चीवर बसलो. पिण्यासाठी पाणी मागून घेतले. गडावर जाऊन आलात का? या प्रश्नाने आम्ही गडबडलो.
काय सांगणार होतो आम्ही? पण त्या प्रश्नाने आम्हाला महेश व श्रीधर यांची आठवण झाली. 
 *“आमच्या सोबत आणखी दोघे जण होते ते आले आहेत का गावात?”* आम्ही विचारणा केली. 
 *“नाही हो अजून तरी गडावरून इथे कुणी आले नाही. तुम्ही दोघेच तर आला आहात की”.* 
त्यांचे हे उत्तर ऐकून जणू धरणीकंप झाल्यासारखे वाटले. आकाशात विजांचा कडकडाट व्हावा आणि तो विजेचा लोळ अंगावर कोसळावा, अशीच एकंदरीत अवस्था! कुठे गेले असतील ते दोघे? आम्ही चौघेजण गेलो होतो आणि दोघेच परतलो आहोत हे ऐकून गावकऱ्यांच्यात *'कुजबूज'* सुरू झाली.
त्यांच्या बोलण्यातून काही तरी अघटित, भयावह घडले आहे किंवा घडणार आहे याची जाणीव झाली. हळूहळू ही वार्ता गावात पसरली आणि तिथे जणू गावकऱ्यांचा जथ्था येऊन उभा राहिला. नेमके काय होत आहे व काय करावे? आमची मती गुंग झाली होती. आता ७ वाजून गेले होते. सगळीकडे अंधार दाटला होता. आम्ही *'विमनस्क'* अवस्थेत बसून राहिलो. त्या दोघांची येण्याची प्रतिक्षा करण्याखेरीज अन्य काही पर्याय नव्हता आणि तितक्यात.......
अंधारातून अतिशय संथ गतीने पावले उचलत महेश एकटाच येताना दिसला. त्याला पाहून थोडा धीर आला. आम्ही बसलो होतो तिथे तो पोहचला आणि आधी पाण्याचा तांब्या तोंडाला लावला. तो पाणी पित होता पण आमच्या अंगातले पाणी आटत होते. त्याचे पाणी पिऊन होताच प्रश्न केला 
 *“अरे तू एकटाच आला आहेस तर श्री कुठे आहे?”* 
त्याचे उत्तर ऐकून आमची बोबडीच वळली. अंगात भीतीने कापरे भरले. जणू धरणीकंप झाला....... भययुक्त विचाराने अंग थरारले!  ऐकणारे गावकरीही निःशब्द झाले होते. असे काय सांगितले होते महेशने?
तर *“श्री जंगलातच पडला आहे. तो चालूच शकत नाही. मी प्रयत्न केला, त्याची विनवणी केली पण त्याने जागा सोडण्यास नकार दिला. मी त्याला उचलून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु श्रीने प्रतिसाद दिला नाही. बराच वेळ वाट पाहून मी एकटाच पुढे आलो आहे.”
हे ऐकून अंगाचा थरकाप उडाला होता. गावकरी आपापसात बोलत होते. *"अनोळखी जागी भलतेच धाडस दाखवले की असेच परिणाम भोगावे लागतात".* मागे घडलेल्या अशाच काही घटनांची ते उजळणी करत होते. इतक्या अंधारात रात्रीच्या वेळी वाट चुकली तर प्रसंगी प्राणावर बेतू शकते. त्यांची ती चर्चा ऐकून आम्ही नुसते *‘सुन्न’* होवून बसलो होतो. पण तेव्हड्यात एक धीर देणारी वाणी ऐकू आली.
अशा प्रसंगात गावातील फक्त एकच व्यक्ती अशी होती जी मदतीला धावून जात होती. ती व्यक्ती पोस्टमन होती आणि आता पर्यंत त्या व्यक्तीला उद्भवलेल्या परिस्थितीची वार्ता पोहचविण्यात आली होती. आता गावकरी त्याच्या येण्याची वाट बघत होते. अंधाऱ्या रस्त्याने एक व्यक्ती हातात बॅटरी घेऊन येताना दिसली. हाच तो आमचा *‘मसीहा’* किंवा *‘तारणहार’* बनून येत होता.
आल्या बरोबर त्याने महेशकडून श्री कुठे पडला आहे वगैरे गोष्टी जाणून घेतल्या. *“तुमच्या माणसाला आणायला मी येतो पण तुमच्या पैकी कुणी तरी माझ्या सोबत चला”* असे त्याने सांगितले. पहा! *"इतरांच्या माना मुरगाळून स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्या काळात ज्याच्याशी आपला काडीमात्र संबंध नाही अशा अनोळखी व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी तो पुढे सरसावला होता. अजूनही माणुसकी जिवंत होती!"
कशाचाही विचार न करता मी खुर्चीतून उठलो. त्याने सांगितले त्या प्रमाणे पिण्याचे पाणी व थोडे खाद्यपदार्थ सोबत घेतले. आता आम्ही दोघेही पुन्हा जंगलाच्या दिशेने मार्गस्थ झालो होतो...... श्रीधरच्या शोधात!!
 *क्रमशः* 
समीर श्री. आराणके
सोमवार पेठ, कराड
दूरभाष : ९४०३१६६५५८

🚩प्रचितगडाच्या "भययुक्त" छायेत!🚩
---------------
समीर आराणके, कराड
      *भाग नववा* 

 ( जे ऐकायला तयार नाहीत त्यांनी वाचावे म्हणून हा लेखनप्रपंच)
श्री म्हणजे श्रीधरच्या काळजीने माझ्या जिवाचा थरकाप उडवला होता. तो नेमका कुठे व कशा अवस्थेत असेल? त्याच्या जीवाचे काही बरे वाईट तर झाले नसेल ना? गावकऱ्यांनी जे सांगितले ते ऐकून तर फक्त *'फेफरे'* भरणेच राहिले होते. पण त्याच वेळी त्या पोस्टमनच्या रूपाने आलेल्या देवदूताने आमच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. आम्ही दोघे जंगलाच्या दिशेने झपाट्याने चालत होतो. काहीही झाले तरी श्रीचे प्राण वाचवायचेच या निर्धाराने मी त्याच्या पाठीमागे धावत होतो.
त्याच्या हातात विजेरी (बॅटरी) होती, शिवाय पायवाट परिचयाची होती. दिवसभराच्या शारीरिक व मानसिक ताणतणावाने माझी अवस्था वाईटाहून वाईट झाली होती. त्यामुळे अंधारातून त्याच्या मागे धावताना मी अडखळत, ठेचकाळत होतो. वेळ खूपच कमी होता आणि त्या चहुबाजूंनी झाडाझुडुपांमध्ये श्री कुठे असेल याचा शोध घेणे म्हणजे सागरातून मोती शोधून काढण्यासारखेच होते.
त्या गर्द अंधारात झाडाझुडपांच्या दाटीतून वाट काढताना भीतीने ग्रासले होते. जणू ते जंगल आपल्याला गिळंकृत करण्यासाठी आसुसलेले आहे आणि आपण *'आयते भक्ष'* बनून त्याला प्रतिसाद देत आहोत असे वाटू लागले. तो झपाझप पावले टाकत होता आणि चालतानाच त्याने मला *“मला माहिती आहे तुमचा मित्र कुठे आहे पण तुम्ही त्याला हाका मारत रहा”* अशी सूचना केली. एकीकडे त्याचे बोलणं ऐकून धीर येत होता तर दुसरीकडे भयसुचक विचारांनी थैमान घातले होते. जवळपास अर्धा तास आम्ही जिवाच्या आकांताने धावत होतो. प्रत्येक पावलागणिक मी श्रीला हाका मारत होतो. स्वतःच्याच आवाजाने स्वतःलाच धीर देत होतो. 
एके ठिकाणी ती व्यक्ती अचानक जागीच थांबली. नेमके काय झाले आहे याचा पाठीमागे असल्याने अंदाज येत नव्हता. बॅटरीचा उजेड समोरच्या मोकळ्या जागेत फिरवून त्याने मला पुढे येण्याची सूचना केली. समोरचे दृश्य पाहून माझा भीतीने थरकाप उडाला.
एका मोकळ्या जागेत श्री पडलेला होता. त्याची दृष्टी आभाळाकडे होती. तो जिवंत आहे की गेला? मनातील कुशंका कधी घात करेल सांगता येणार नाही. पण त्या कुशंकेने माझ्या मनाचा ठाव घेण्याआधीच ती व्यक्ती मला उद्देशून म्हणाली, 
 *“मी इथेच उभा राहतो पुढे येणार नाही. तुम्ही पुढे जा व मित्राला त्या जागेतून उठवून किंवा उचलून इथे आणा”
मी झपाट्याने पुढे सरसावलो. श्रीच्या अगदी जवळ जाऊन त्याला हाक मारली. त्याने फक्त हुंकार दिला. तो जिवंत असल्याची खात्री झाली. मी खाली बसून त्याचा हात धरला आणि *"श्री मी आलो आहे, उठ”* असे म्हटले व त्याने खोलवर गेलेली नजर माझ्याकडे फिरवली. तशाच स्थितीत त्याला पाणी पाजले. तो अगदी बसक्या आवाजात मला म्हणाला, *“माझ्या सभोवती एक रेडा फेऱ्या घालत आहे.”* क्षणभर मी व माधवने अनुभवलेला रेड्याचा प्रसंग डोळ्यासमोर तरळला.
ते ऐकून मेंदूच्या ठिकऱ्या उडाल्या. एक क्षण मी व माधवची रेड्याबरोबर झालेली नजरानजर आठवली. त्याचवेळी जवळच्या झुडुपात काही तरी हालचाल झाली. मी मागे वळून त्यांना हाक मारली व पोस्टमनने चहुबाजूंनी बॅटरीचा प्रकाशझोत टाकला. जवळच्या झुडुपात खसखस झाल्याची जाणीव झाली. केवळ काही मिनिटांचा तो प्रसंग. 
 *"श्री उठून उभा रहा, आपण इथून निघूया”* असे मी म्हटले आणि जवळजवळ त्याला उचलून उभे केले. त्याला पाठकुळीवर घेतले आणि पोस्टमन जिथे उभा होता तिथपर्यंत आणले. 
आम्ही अगदी पोस्टमनच्या नजिक आलो.
 *“आता धोका नाही त्यांना खाली उतरवा”* त्याने सूचित केले. 
 *“त्यांना अजून थोडे पाणी द्या व काही तरी खायला द्या”* असे म्हणताच मी तशी कृती केली. पाणी पिल्यावर व थोडे अन्नपदार्थ पोटात गेल्यावर श्री थोडा ताजातवाना झाला. 
 *"इथे फार वेळ थांबता येणार नाही. आपण थोडे पुढे जाऊया, मग पाहिजे तर बसूया"* असे ती व्यक्ती म्हणाली.  
जरी श्रीच्या अंगात त्राण उरलेले नव्हते तरी तिथून पुढे निघणे अपरिहार्य होते. त्याला आधार देत आम्ही तिघे थोडे पुढे आल्यावर थांबलो. श्रीला पुन्हा पाणी दिले. थोडा वेळ विश्रांती घेतली आणि आता आम्ही अगदी संथगतीने वेस ओलांडून गावात प्रवेश केला.
 *क्रमशः* 
समीर श्री. आराणके
सोमवार पेठ, कराड
दूरभाष : ९४०३१६६५५८

🚩प्रचितगडाच्या "भययुक्त" छायेत!🚩* 
---------------
समीर आराणके,कराड
     *भाग दहावा* 

 (जे ऐकायला तयार नाहीत त्यांनी वाचावे म्हणून हा लेखनप्रपंच)
लेखमालेच्या मूळ विषयाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडेसे इतिहासात डोकावून पाहूया! शृंगारपूर हे गाव संगमेश्वर पासून अवघ्या काही कोस लांब आहे. डोंगररांगातून तिथे पोहचण्यासाठी रस्ता तयार झाला आहे. परंतु हे गाव स्वराज्य आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटाशी अगदी एकसंध राहिले आहे. छत्रपती शिवाजी
महाराजांनी शृंगारपुर ताब्यात घेतले त्यावेळी तानाजी मालुसरे यांनी शृंगारपुरच्या बाजुने चाल करुन प्रचितगड ताब्यात घेतला. पुढे पिलाजी शिर्के यांची कन्या जिऊबाई उर्फ़ राजसबाई (येसुबाई) यांच्यांशी छत्रपती संभाजी महाराजांचा विवाह झाला. तसेच शिवाजी महाराजांची मुलगी राजकुंवरबाई हिचा विवाह पिलाजींचा मुलगा गणोजी यांच्याशी झाला. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले तेंव्हा त्यांनी संभाजी महाराजांची शृंगारपूरचा सुभेदार म्हणुन नेमणुक केली. छत्रपती संभाजी महाराजांनी इथेच  त्यांनी  संस्कृत व ब्रज भाषेतील तीन ग्रंथ लिहिले. 
एकंदरीत छत्रपती संभाजी महाराज यांचे शृंगारपूर गावाशी ऋणानुबंध अगदी घट्ट होते. परंतु हा परिसर, विशेषतः संगमेश्वर इतिहासात अधोरेखित झाले कारण याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आले. त्या काळ्याकुट्ट इतिहासात न जाता आपण मूळ विषयाकडे परत वळूया!
श्रीधर नेमका कोणत्या ठिकाणी पडला होता? जिथे मी व माधवची रेड्याबरोबर नजरानजर झाली होती त्याच मोकळ्या जागेत तो पडला होता. घनदाट जंगलात एकाकी पडलेल्या श्रीधरला घेऊन आम्ही गावात प्रवेश केला. त्याला एक जीवनदान मिळाले होते. त्याला सुखरूप परत आल्याचे पाहून माधव व महेशच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटली होती. जवळच असलेल्या एका घरात आम्ही विसावलो. त्या घरात एक वयस्कर आजी बसलेल्या होत्या. आम्ही परत आल्याचे समजताच गावातील आबालवृद्ध मंडळी तिथे येऊन दाखल झाली होती. त्यांच्या चेहऱ्यावर उत्कंठा व विस्मय भरलेला होता.
त्या वयस्कर आजींनी पोस्टमनकडे पाहून प्रश्न केला, *“कुठं सापडला र पोर”. “तिथंच की नेहमीच्या जागवर”.* 
अस नेमके काय होते त्या जागेत? हा प्रश्न मनाला छेदून आरपार गेला. अद्यापही तो अनुत्तरीतच राहिला आहे. आम्ही येत असताना वाटेत भेटलेल्या रेड्याची माहिती दिली. त्यावर तिथे उपस्थित गावकऱ्यांनी आम्हाला आपादमस्तक न्याहाळले. *"आम्ही इतके वर्षे इथे राहत आहोत पण आजपर्यंत आम्हाला या परिसरात कुठेही रेडा दिसलेला नाही. तुम्ही दुसरेच कुठले जनावर पाहिले असेल आणि तुम्हाला तो रेडा वाटला असेल".* 
गावकऱ्यांचा हा खुलासा ऐकून आम्ही शब्दकुंठित झालो. मी व माधवने रेडा तर पाहिला होता. पण गावकऱ्यांना काय व कसे सांगणार आणि सांगितले तरी त्यांना थोडेच पटणार होते?  
पण हे बोलणे सुरू असतानाच त्या आजींनी मला जवळ बोलावले. माझ्या डोक्यावर व चेहऱ्यावर मायेने हात फिरवला आणि म्हटले, *“लेकरा तू होतास म्हणून हे पोरग आज जित हाय. तू गोरागोमटा दिसतोय पन तुझ्यात काही तरी शक्ती हाय”* आजीच्या त्या शब्दांनी अंगात शहारे भरले आणि इतका वेळ दाबून ठेवलेल्या अश्रुधारा डोळ्यातून वाहू लागल्या. अनावर होणारा हुंदका दाबून धरत त्या आजींनी दिलेले आशीर्वाद मनात साठवून ठेवत मी पुन्हा आसनस्थ झालो.
मी केवळ निमित्तमात्र होतो. श्रीच्या आयुष्याची दोर बळकट होती म्हणूनच तो जिवंत परतला होता. थोडे चहापान झाले आणि आम्ही त्या सर्वांचा स्नेहपूर्वक निरोप घेतला. दुचाकी रात्रीच्या अंधारात पुन्हा साताऱ्याच्या दिशेने निघाल्या. पहाटेच्या सुमारास आम्ही सुखरूप सातारला पोहचलो. 
एका भीषण संकटातून आम्ही अगदी सुखरूप परतलो होतो. सातारा पर्यंतच्या प्रवासात आम्ही फारसा संवाद करण्याचे टाळले होते. जे काही घडले त्यावर आता बोलण्यात फारसे काही हशील नव्हते. दुसऱ्या दिवशी सज्जनगडावर जाण्याआधी मी, माधव व महेश काही वेळासाठी एकत्र जमलो. *"महेश तुम्ही तर आमच्या आधी गावात पोहचायला पाहिजे होतात मग परत पायथ्याशी कसे थांबलात?"* 
महेशने जे कथन केले ते ऐकून आमची पाचावर धारण बसली. तो सांगत होता......
 *"आम्ही दोघे खूप दमलो होतो. पायवाट समजत नव्हती. म्हणून जवळच असलेल्या ओढ्याच्या काठाने आम्ही पुढे चालत होतो."* 
(मी व माधवने देखील काही वेळासाठी तोच मार्ग अवलंबिला होता. आम्हीही तहानेने व्याकूळ झालो होतो व ओढ्यात कुठे तरी पाणी मिळेल या आशेने आम्ही काही वेळ वाटचाल केली होती. आम्हाला पाण्याचे एक डबके मिळाले होते. जरी ते पाणी पिण्यायोग्य नव्हते तरी त्यावरच आम्ही आमची तहान भागविली होती. असो!) 
महेश सांगत होता की *"या मार्गाने आपण लवकर गावात पोहचू असे आम्हाला वाटत होते. आम्ही बरेच पुढे आलो होतो आणि गावातील घरांची छप्परे सुद्धा दिसत होती. पण नेमके काय झाले ते समजले नाही. आम्ही अचानक माघारी वळलो आणि पुन्हा पायथ्याशी असलेल्या त्या मोकळ्या जागेत दाखल झालो. तिथेच श्रीने हातपाय गाळले आणि तो जमिनीवर उताणा झाला."* 
ते ऐकून मला प्रचितगडाच्या पहिल्या पदभ्रमंतीची आठवण झाली. आमचीही गत काहीशी अशीच तर झाली होती. मग लक्षात आले आमच्यासारखाच त्यांना देखील जंगलात *“चकवा”* लागला नसेल ना? पण प्रचितगडाचे भय इथेच संपले नाही. मी सज्जनगडावर परतलो आणि दैनंदिन सेवेत रुजू झालो. पण काही दिवसांनी माधवचा दूरध्वनी आला. *“श्रीची प्रकृती खालावली आहे तू भेटून जा”.* 
त्या वाक्याने मी नखशिखांत हादरलो. त्याच दिवशी श्रीला भेटण्यासाठी सातारला आलो. तो अंथरुणाला खिळला होता. जवळ जाऊन त्याचा हात हातात घेतला. *“श्री, मी समीर”.* त्याने खोलवर नजरेतून पाहिले आणि अगदी अस्पष्ट आवाजात मला म्हटले, 
 *“माझ्या कानात आवाज ऐकू येत आहे. मला कुणी तरी बोलावत आहे”* 
शब्दही न उच्चारता मी निमूटपणे त्याचा निरोप घेतला. ती भेट अखेरचीच ठरणार होती. पुढे काही कालावधीनंतर श्रीचे देहावसान झाले. त्याच्या जाण्याने आमच्या मनाला आत्यंतिक वेदना झाल्या. त्याला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहायची असेल तर प्रचितगड गाठला पाहिजे. माझा निर्धार झाला होता. माधव व महेशकडे तुम्ही येता का, म्हणून विचारणा केली. त्यांनी कोपरापासून हात जोडले. पण एक आशेचा किरण चमकला. श्री. नरेंद्र पुराणिक माझ्या समवेत प्रचितगडावर जाण्यासाठी सहमत झाले.
पुन्हा एकदा आम्ही दुचाकीवर स्वार होऊन शृंगारपूरच्या दिशेने निघालो. तो दिवस होता १३ मे २००३!! फक्त प्रवास दिवसा केला आणि रात्रीच्या मुक्कामासाठी शृंगारपूरला दाखल झालो. पहिल्या वेळी केलेली चूक यावेळी करायची नव्हती. मग चौकशी करून एक व्यक्ती आमच्यासोबत  'वाटाड्या' म्हणून येण्यास तयार झाली. त्याच्याच घराच्या ओसरीवर आम्ही रात्री विश्रांती घेतली. पहाटे पाच वाजता आम्ही प्रचितगडाकडे कूच केले. यावेळी भटकंती होणार नव्हती. शिवाय सोबत भरपूर प्रमाणात पाणी व नाश्त्याचे पदार्थ  घेतले होते. ज्या खडतर मार्गाने मी एकाकी चढाई केली त्याच मार्गाने आम्ही गडाच्या माथ्यावर पोचलो तेव्हा दुपारी बारा वाजत आले होते.
आम्ही त्याच टाक्या मधून पाणी भरून घेतले आणि मी त्या दुर्गामातेला रुद्राभिषेक करून श्रीला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली. थोडा वेळ गडाची भ्रमंती करून खाद्यपदार्थ खाऊन घेतले. दुपारी दीडच्या सुमारास पुन्हा गडावरून उतरण्यास सुरुवात केली. सायंकाळी सहाच्या दरम्यान आम्ही शृंगारपूरला परतलो व पुढे रात्री प्रवास करून सातारला आलो. श्री. नरेंद्र पुराणिक यांनी साथसोबत केल्याने माझ्या मनातील भावना कृतीत उतरल्या होत्या व एक आंतरिक समाधान मिळाले होते. एकंदरीत तीन वेळा प्रचितगड सर करण्याचे भाग्य लाभले होते. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या अनुभवातून जावे लागले. परंतु माधव, महेश, श्रीधर यांच्या सोबतच्या अनुभवाने प्रचितगडाची भययुक्त छाया आजही ताजी आहे. इति लेखन सीमा मर्यादा! धन्यवाद!!
समाप्त
 *टीप : आता प्रचितगडावर खूपच सुधारणा व बदल झाले आहेत तरीही योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.* 
समीर श्री. आराणके
सोमवार पेठ, कराड
दूरभाष : ९४०३१६६५५८

🚩प्रचितगडाच्या "भययुक्त" छायेत!🚩* 
---------------
समीर आराणके,कराड
     *भाग दहावा* 

 *(जे ऐकायला तयार नाहीत त्यांनी वाचावे म्हणून हा लेखनप्रपंच)* 

लेखमालेच्या मूळ विषयाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडेसे इतिहासात डोकावून पाहूया! शृंगारपूर हे गाव संगमेश्वर पासून अवघ्या काही कोस लांब आहे. डोंगररांगातून तिथे पोहचण्यासाठी रस्ता तयार झाला आहे. परंतु हे गाव स्वराज्य आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटाशी अगदी एकसंध राहिले आहे. छत्रपती शिवाजी
महाराजांनी शृंगारपुर ताब्यात घेतले त्यावेळी तानाजी मालुसरे यांनी शृंगारपुरच्या बाजुने चाल करुन प्रचितगड ताब्यात घेतला. पुढे पिलाजी शिर्के यांची कन्या जिऊबाई उर्फ़ राजसबाई (येसुबाई) यांच्यांशी छत्रपती संभाजी महाराजांचा विवाह झाला. तसेच शिवाजी महाराजांची मुलगी राजकुंवरबाई हिचा विवाह पिलाजींचा मुलगा गणोजी यांच्याशी झाला. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले तेंव्हा त्यांनी संभाजी महाराजांची शृंगारपूरचा सुभेदार म्हणुन नेमणुक केली. छत्रपती संभाजी महाराजांनी इथेच  त्यांनी  संस्कृत व ब्रज भाषेतील तीन ग्रंथ लिहिले. 
एकंदरीत छत्रपती संभाजी महाराज यांचे शृंगारपूर गावाशी ऋणानुबंध अगदी घट्ट होते. परंतु हा परिसर, विशेषतः संगमेश्वर इतिहासात अधोरेखित झाले कारण याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आले. त्या काळ्याकुट्ट इतिहासात न जाता आपण मूळ विषयाकडे परत वळूया!
श्रीधर नेमका कोणत्या ठिकाणी पडला होता? जिथे मी व माधवची रेड्याबरोबर नजरानजर झाली होती त्याच मोकळ्या जागेत तो पडला होता. घनदाट जंगलात एकाकी पडलेल्या श्रीधरला घेऊन आम्ही गावात प्रवेश केला. त्याला एक जीवनदान मिळाले होते. त्याला सुखरूप परत आल्याचे पाहून माधव व महेशच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटली होती. जवळच असलेल्या एका घरात आम्ही विसावलो. त्या घरात एक वयस्कर आजी बसलेल्या होत्या. आम्ही परत आल्याचे समजताच गावातील आबालवृद्ध मंडळी तिथे येऊन दाखल झाली होती. त्यांच्या चेहऱ्यावर उत्कंठा व विस्मय भरलेला होता.
त्या वयस्कर आजींनी पोस्टमनकडे पाहून प्रश्न केला, *“कुठं सापडला र पोर”. “तिथंच की नेहमीच्या जागवर”.* 
अस नेमके काय होते त्या जागेत? हा प्रश्न मनाला छेदून आरपार गेला. अद्यापही तो अनुत्तरीतच राहिला आहे. आम्ही येत असताना वाटेत भेटलेल्या रेड्याची माहिती दिली. त्यावर तिथे उपस्थित गावकऱ्यांनी आम्हाला आपादमस्तक न्याहाळले. *"आम्ही इतके वर्षे इथे राहत आहोत पण आजपर्यंत आम्हाला या परिसरात कुठेही रेडा दिसलेला नाही. तुम्ही दुसरेच कुठले जनावर पाहिले असेल आणि तुम्हाला तो रेडा वाटला असेल".* 
गावकऱ्यांचा हा खुलासा ऐकून आम्ही शब्दकुंठित झालो. मी व माधवने रेडा तर पाहिला होता. पण गावकऱ्यांना काय व कसे सांगणार आणि सांगितले तरी त्यांना थोडेच पटणार होते?  
पण हे बोलणे सुरू असतानाच त्या आजींनी मला जवळ बोलावले. माझ्या डोक्यावर व चेहऱ्यावर मायेने हात फिरवला आणि म्हटले, *“लेकरा तू होतास म्हणून हे पोरग आज जित हाय. तू गोरागोमटा दिसतोय पन तुझ्यात काही तरी शक्ती हाय”* आजीच्या त्या शब्दांनी अंगात शहारे भरले आणि इतका वेळ दाबून ठेवलेल्या अश्रुधारा डोळ्यातून वाहू लागल्या. अनावर होणारा हुंदका दाबून धरत त्या आजींनी दिलेले आशीर्वाद मनात साठवून ठेवत मी पुन्हा आसनस्थ झालो.
मी केवळ निमित्तमात्र होतो. श्रीच्या आयुष्याची दोर बळकट होती म्हणूनच तो जिवंत परतला होता. थोडे चहापान झाले आणि आम्ही त्या सर्वांचा स्नेहपूर्वक निरोप घेतला. दुचाकी रात्रीच्या अंधारात पुन्हा साताऱ्याच्या दिशेने निघाल्या. पहाटेच्या सुमारास आम्ही सुखरूप सातारला पोहचलो. 
एका भीषण संकटातून आम्ही अगदी सुखरूप परतलो होतो. सातारा पर्यंतच्या प्रवासात आम्ही फारसा संवाद करण्याचे टाळले होते. जे काही घडले त्यावर आता बोलण्यात फारसे काही हशील नव्हते. दुसऱ्या दिवशी सज्जनगडावर जाण्याआधी मी, माधव व महेश काही वेळासाठी एकत्र जमलो. *"महेश तुम्ही तर आमच्या आधी गावात पोहचायला पाहिजे होतात मग परत पायथ्याशी कसे थांबलात?"* 
महेशने जे कथन केले ते ऐकून आमची पाचावर धारण बसली. तो सांगत होता......
 *"आम्ही दोघे खूप दमलो होतो. पायवाट समजत नव्हती. म्हणून जवळच असलेल्या ओढ्याच्या काठाने आम्ही पुढे चालत होतो."* 
(मी व माधवने देखील काही वेळासाठी तोच मार्ग अवलंबिला होता. आम्हीही तहानेने व्याकूळ झालो होतो व ओढ्यात कुठे तरी पाणी मिळेल या आशेने आम्ही काही वेळ वाटचाल केली होती. आम्हाला पाण्याचे एक डबके मिळाले होते. जरी ते पाणी पिण्यायोग्य नव्हते तरी त्यावरच आम्ही आमची तहान भागविली होती. असो!) 

महेश सांगत होता की *"या मार्गाने आपण लवकर गावात पोहचू असे आम्हाला वाटत होते. आम्ही बरेच पुढे आलो होतो आणि गावातील घरांची छप्परे सुद्धा दिसत होती. पण नेमके काय झाले ते समजले नाही. आम्ही अचानक माघारी वळलो आणि पुन्हा पायथ्याशी असलेल्या त्या मोकळ्या जागेत दाखल झालो. तिथेच श्रीने हातपाय गाळले आणि तो जमिनीवर उताणा झाला."* 
ते ऐकून मला प्रचितगडाच्या पहिल्या पदभ्रमंतीची आठवण झाली. आमचीही गत काहीशी अशीच तर झाली होती. मग लक्षात आले आमच्यासारखाच त्यांना देखील जंगलात *“चकवा”* लागला नसेल ना? पण प्रचितगडाचे भय इथेच संपले नाही. मी सज्जनगडावर परतलो आणि दैनंदिन सेवेत रुजू झालो. पण काही दिवसांनी माधवचा दूरध्वनी आला. *“श्रीची प्रकृती खालावली आहे तू भेटून जा”.* 
त्या वाक्याने मी नखशिखांत हादरलो. त्याच दिवशी श्रीला भेटण्यासाठी सातारला आलो. तो अंथरुणाला खिळला होता. जवळ जाऊन त्याचा हात हातात घेतला. *“श्री, मी समीर”.* त्याने खोलवर नजरेतून पाहिले आणि अगदी अस्पष्ट आवाजात मला म्हटले, 
 “माझ्या कानात आवाज ऐकू येत आहे. मला कुणी तरी बोलावत आहे”
शब्दही न उच्चारता मी निमूटपणे त्याचा निरोप घेतला. ती भेट अखेरचीच ठरणार होती. पुढे काही कालावधीनंतर श्रीचे देहावसान झाले. त्याच्या जाण्याने आमच्या मनाला आत्यंतिक वेदना झाल्या. त्याला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहायची असेल तर प्रचितगड गाठला पाहिजे. माझा निर्धार झाला होता. माधव व महेशकडे तुम्ही येता का, म्हणून विचारणा केली. त्यांनी कोपरापासून हात जोडले. पण एक आशेचा किरण चमकला. श्री. नरेंद्र पुराणिक माझ्या समवेत प्रचितगडावर जाण्यासाठी सहमत झाले.
पुन्हा एकदा आम्ही दुचाकीवर स्वार होऊन शृंगारपूरच्या दिशेने निघालो. तो दिवस होता १३ मे २००३!! फक्त प्रवास दिवसा केला आणि रात्रीच्या मुक्कामासाठी शृंगारपूरला दाखल झालो. पहिल्या वेळी केलेली चूक यावेळी करायची नव्हती. मग चौकशी करून एक व्यक्ती आमच्यासोबत  'वाटाड्या' म्हणून येण्यास तयार झाली. त्याच्याच घराच्या ओसरीवर आम्ही रात्री विश्रांती घेतली. पहाटे पाच वाजता आम्ही प्रचितगडाकडे कूच केले. यावेळी भटकंती होणार नव्हती. शिवाय सोबत भरपूर प्रमाणात पाणी व नाश्त्याचे पदार्थ  घेतले होते. ज्या खडतर मार्गाने मी एकाकी चढाई केली त्याच मार्गाने आम्ही गडाच्या माथ्यावर पोचलो तेव्हा दुपारी बारा वाजत आले होते.
आम्ही त्याच टाक्या मधून पाणी भरून घेतले आणि मी त्या दुर्गामातेला रुद्राभिषेक करून श्रीला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली. थोडा वेळ गडाची भ्रमंती करून खाद्यपदार्थ खाऊन घेतले. दुपारी दीडच्या सुमारास पुन्हा गडावरून उतरण्यास सुरुवात केली. सायंकाळी सहाच्या दरम्यान आम्ही शृंगारपूरला परतलो व पुढे रात्री प्रवास करून सातारला आलो. श्री. नरेंद्र पुराणिक यांनी साथसोबत केल्याने माझ्या मनातील भावना कृतीत उतरल्या होत्या व एक आंतरिक समाधान मिळाले होते. एकंदरीत तीन वेळा प्रचितगड सर करण्याचे भाग्य लाभले होते. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या अनुभवातून जावे लागले. परंतु माधव, महेश, श्रीधर यांच्या सोबतच्या अनुभवाने प्रचितगडाची भययुक्त छाया आजही ताजी आहे. इति लेखन सीमा मर्यादा! धन्यवाद!!
समाप्त
 *टीप : आता प्रचितगडावर खूपच सुधारणा व बदल झाले आहेत तरीही योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.* 
समीर श्री. आराणके
सोमवार पेठ, कराड
दूरभाष : ९४०३१६६५५८







































No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...