Monday, July 5, 2021

विखुरलेल्या पाऊलखुणा

 

दुर्ग-लेणे-घाटवाटांच्या विखुरलेल्या पाऊलखुणा
सुधागड-तेलबैल्याजवळील पुरातन 'ठाणाळेलेणे' आणि सवाष्णी घाट-वाघजाई घाट या घाटवाटांची ट्रेकरदोस्तांसाठी संक्षिप्त माहिती.

... गर्द झाडीतून डोकावत होतं कातळकड्यात खोदलेल्या लेण्याचं विलक्षण दृश्य! भारावून टाकणारं. मोबाईलवरचा गुगल नकाशा झूमआऊट केला. त्या नकाशापल्याड दडलेला भूगोल आणि काळाच्या पडद्यामागे हरवलेल्या इतिहास-संस्कृतीचा सुरेल आकृतीबंध उलगडण्यासाठी आम्ही ट्रेकला निघालेलो. २००० वर्षांपूर्वीच्या महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर (चौल बंदर ते देशावरची गावे) - दुर्ग (सरसगड, सुधागड, तेलबैल, घनगड), घाटवाटा (सवाष्णी, वाघजाई) आणि पावसाळ्यात वर्षावासासाठी खोदलेली लेणी (खडसांबळे, ठाणाळे) अशी नक्षी विखुरलेली. काळाच्या झंझावातासोबत बरंच काही हरवून गेलं असलं, तरी अजूनही जाणवताहेत या दुर्ग-लेणे-घाटवाटांनी अनुभवलेल्या या मातीतल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाची आणि संस्कृतीची स्पंदनं!!!

आमच्या ट्रेकरूटचे हे रेखाटन.

(सवाष्णी-वाघजाईसाठी ठाणाळे गावाचा वळसा टाळता येईल का असे वाटेल, पण अशी वाट नाही. दाट झाडोऱ्यातून घुसाघुशी केली तर कदाचित शक्य.)

सवाष्णी घाट:
- घाटमाथ्यावरचे गाव: तेलबैल, तालुका मावळ, जिल्हा पुणे
- सह्याद्री घाटावरचा दुर्ग: तेलबैला
- कोकणातले गाव: धोंडसे, तालुका सुधागड, जिल्हा रायगड
- कोकणातला दुर्ग: सुधागड
- स्थानवैशिष्ट्य: तेलबैल्याच्या नैऋत्येस. सुधागडच्या ईशान्येला. दुर्ग - लेणी - घाटवाट अशी जोडी
- ऐतिहासिक संदर्भ/ खुणा: माथ्याजवळ खोदीव पायऱ्या
- वाटेत पाणी: नाही
- निवारा: तेलबैला किंवा धोंडसे गावात. दुकाने/ घरगुती हॉटेल्स
- उतराई: ५५० मी
- वेळ: २.५ तास
- घाटवाटेतल्या ठळक खुणा:

तेलबैला गावातून तेलबैल्याला डावीकडे ठेवत सुधागडच्या दिशेने नैऋत्येला शेताडीतून २० मिनिटे चाल.

रानफुलांमध्ये हरवूनच गेलो...

मंद उतार उतरत गेलं की सुधागडचे दांड-उतार दिसू लागतात. उभा खुणेचा दगड म्हणजे सवाष्णी घाटाची सुरुवात.

कातळात खोदलेल्या पायऱ्यांची शृंखला आधी किंचित डावीकडे उतरत जाते.

पावसाचं पाणी झिरपून शेवाळलेल्या, बुळबुळीत झालेल्या. अवघड नाही, पण पाणी असेल तर काळजी आवश्यक.

पाच-पंधरा पायऱ्या उतरल्यावर आता पायऱ्या उजवीकडे उतरू लागतात.

गच्चदाट झाडीतल्या पदरातून वाट उजवीकडे उतरत जाते.

१०० मी उतराई  केल्यावर मोकळवनात धनगराच्या झापापाशी आपण पोहचतो. झापात आता कोणीच राहत नाही.

इथून पुढे २० मी उतरल्यावर खोगीरासारखी खोलगट जागा. समोर किंवा उजवीकडून जाण्याचा प्रयत्न चांगलाच फसला. परत धनगरवाड्यापाशी आलो. हे मामा देवासारखे भेटले. वाट गवसली.

इथून उजवीकडे थेट ठाणाळे लेण्यांकडे जाणारी वाट असेल का, असं वाटतं पण अशी वाट नाही.
खोगीरावरून डावीकडे गेलो. वाट सुरुवातीला मळलेली नाही, पण पुढे व्यवस्थित. सवाष्णी घाटाला माथ्याकडून आणि पायथ्याकडून निघणाऱ्या वाटा मळलेल्या. मध्ये रानात बुजलेल्या.
डावीकडे सुधागडचे डोंगरउतार सुंदर दिसतात.

धोंडसेजवळ मस्त नदीपात्र. सुधागड आणि सह्याद्रीला जोडणारी धार, त्यावरचे सुळके आणि पाठीमागे खुणावणारा घनगड. पूर्वेला सवाष्णी घाटामागे तेलबैलाच्या जोडभिंती डोकावत होत्या.

धोंडसे गावात न जाता थेट रानातून ठाणाळे गावात जायची वाट आहे, पण आम्हांला मिळाली नाही.
अशक्य थकवणारा दमटपणा. धोंडसे गावात घरगुती हॉटेलमध्ये लिंबू सरबत पिऊन तरतरी आली. इथे जेवणाची सोय होईल, पण वेळ जाईल. धोंडसे ते ठाणाळे हा ४ किमी प्रवास टमटमने.

ठाणाळे लेणी
- पायथ्याचे गाव: ठाणाळे, तालुका सुधागड, जिल्हा रायगड
- सह्याद्री घाटावरचा दुर्ग: तेलबैला
- कोकणातला दुर्ग: सुधागड
- स्थानवैशिष्ट्य: तेलबैल्याच्या वायव्येला. दुर्ग - लेणी - घाटवाट अशी जोडी
- पाणी: लेण्यापाशी

नाही

. १० मिनिटे अंतरावर ओढ्यातून - उपलब्ध असल्यास
- निवारा: ठाणाळे गावात
- वेळ: १.५ तास
- ठळक खुणा:

ठाणाळे गावात लेण्यांना जायच्या वाटेची चौकशी केली, तर गाईड घ्याच असा आग्रह. गाईडने अवाजवी किंमत मागितली. स्वतः जाऊ म्हणल्यावर वाटेची सपशेल चुकीची माहिती दिली. अर्धा तास रीवर्क. परत ठाणाळे गावापाशी येऊन पूर्वेला वाघजाई घाटाची वाट घेतली. एका मिनिटात उजवीकडे काटे-कुंपण घालून बंद केलेली वाट दिसली. मंद चढाची गच्च झाडीतली वाट.

उजवीकडे सवाष्णी घाटाची गर्द झाडीभरली सोंड. पण थेट ठाणाळे लेण्यांकडे उतरणे अवघड. पाऊण तासानंतर सह्यकड्यांच्या कुशीतली ठाणाळे लेणी खुणावू लागली.

मोठ्या ओढ्यापाशी दोन खुणांचे बाण. एक डावीकडे. दुसरा बाण उजवीकडच्या उभ्या चढावर नेणारा. उजवीकडच्या बाणावर मोट्ठी फुली मारून तिकडे जाऊ नये, असं सांगणारा. ओढ्यापासून डावीकडून गेल्यावर ठाणाळे लेणी डोक्यावर आली. चुकीची वाट. परत उलटं ओढ्यापाशी आलो. कदाचित ट्रेकर्सच्या वाटा चुकाव्यात, असा हेतू असेल!??

उजवीकडची वाट उभ्या चढावरून डावीकडे लेण्यांपाशी घेऊन गेली.

सुरेख झाडीचे टप्पे.

ठाणाळे लेणी हीनयान बौद्ध असून इसपू दुसऱ्या शतकात खोदलेली आहेत.

इथे प्रथमच मौर्यकालीन (अशोककालीन) चांदीची नाणी सापडली आहेत.

टूरिष्टांनी जिथेतिथे नावं लिहून अत्यंत वाट लावलेली.

एक चैत्यगृह, एक स्मारक स्तूप व एकवीस विहार.  ब्राम्ही लिपीतील शिलालेखात शिवगण पुत्र गोदत्त याने या लेण्यांसाठी दान केल्याचा मजकूर.

या लेण्यांचा नव्याने शोध मिशनरी जे. अ‍ॅबट यांना जानेवारी १८९० मध्ये लागला. क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनीही काही काळ या लेण्यांचा आश्रय घेतला होता.

भिंतींवर विविध प्राणी व मानवी आकृत्या. मोठे नागशिल्प अप्रतिम. गजलक्ष्मीच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.

लेणी मागे ठेवत उत्तरेला वाघजाई घाटाकडे निघालो. पाठीमागे होता लेण्यांचा पॅनोरमा.


वाघजाई घाट:
- घाटमाथ्यावरचे गाव: तेलबैल, तालुका मावळ, जिल्हा पुणे
- सह्याद्री घाटावरचा दुर्ग: तेलबैला
- कोकणातले गाव: ठाणाळे, तालुका सुधागड, जिल्हा रायगड
- कोकणातला दुर्ग: सुधागड
- स्थानवैशिष्ट्य: तेलबैल्याच्या वायव्येला. दुर्ग - लेणी - घाटवाट अशी जोडी
- ऐतिहासिक संदर्भ/ खुणा: ठाणाळे गावाजवळ पाण्याची कातळखोदीव टाकी. माथ्याजवळ खोदीव पायऱ्या. घाटमाथ्याच्या अलिकडे वाघजाई देवीचं राऊळ
- वाटेत पाणी: ठाणाळे गावाजवळच्या टाक्यात
- निवारा: तेलबैला किंवा ठाणाळे गावात. दुकाने/ घरगुती हॉटेल्स
- चढाई: ६०० मी
- वेळ: ३ तास
- घाटवाटेतल्या ठळक खुणा:

वाघजाई घाट गाठण्यासाठी लेण्यांपासून पुढे उत्तरेला अर्धा तास आडवं चाललो आणि पठारावर आलो. (ट्रेक उलट्या दिशेने केल्यास, पठारावरून ठाणाळे लेण्याची वाट शोधण्यासाठी थोडं अवघड आहे. ठळक खुणा नाहीत). पूर्वेला उजवीकडे माथ्यावरून उतरलेली झाडीभरली सोंड आली. त्यावरून वाघजाई घाटाची चढाई सुरू झाली.


पूर्वेला सह्याद्री दर्शन.

उत्तरेला अनघाई घाट आणि दुर्ग.


उभ्या सोंडेवरून दमवणारी वाट. पल्याड दक्षिणेला खुणावणारा सवाष्णी घाट.  

माथ्याजवळ कातळखोदीव रुंद पायऱ्या

माथ्याच्या अलीकडंच धबधब्याच्या पोटात अप्रतिम वाघजाई राऊळ

माथ्यावरून परत एकदा तेलबैल्याचं दर्शन

परतीचा धम्माल प्रवास आणि निसर्गदृश्य!!!

एका दिवसात दहा तासांचा दमवणारा ट्रेक झालेला. बरंच काही हरवून गेलं असलं, तरी जाणवली होती या दुर्ग-लेणे-घाटवाटांनी अनुभवलेल्या या मातीतल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाची आणि संस्कृतीची स्पंदनं!!! We left nothing but footprints. We brought back nothing but memories...

------------------------------------
महत्त्वाच्या नोंदी:
१. ट्रेक मंडळी: साकेत गुडी, साईप्रकाश बेलसरे
२. ब्लॉगवरील फोटो: साकेत गुडी, साईप्रकाश बेलसरे
३. कृतज्ञता: अमेय जोशी - घाटांच्या मार्गासाठी; पुस्तक-सांगती सह्याद्रीचा ठाणाळे लेण्यांच्या माहितीसाठी 
४. सह्याद्रीचा हा संवेदनशील भाग असून, जबाबदारीने ट्रेकिंग करावे अशी विनंती. Leave nothing but footprints. Take nothing but memories.
५. ब्लॉगवरील सह्याद्रीची माहिती वाचून ट्रेक्स करण्याचे मुक्त हक्क सह्यभक्तांना.

ब्लॉगमधील लिखाण आणि छायाचित्रे कॉपीराईट संरक्षित - @साईप्रकाश बेलसरे, २०१७. सर्व हक्क सुरक्षित.

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...