Monday, July 5, 2021

नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड!

 

सह्याद्रीत ट्रेकिंग करणार्‍या लोकांमध्ये २ प्रकार असतात.
१. हरिश्चंद्रगड पाहण्याची इच्छा असलेले.
२. हरिश्चंद्रगड पुन्हा एकदा पाहण्याची इच्छा असलेले.

ही अतिशयोक्ती नाही. हरिश्चंद्रगड या नावाचं प्रचंड आकर्षण ट्रेकर्सना आहे. माळशेज घाट आणि आजूबाजूच्या परिसराचा संरक्षक अशा या किल्ल्याला "ट्रेकची पंढरी" असेच म्हटले जाते. मत्स्यपुराण, अग्नीपुराण, स्कंदपुराणात या गडाचे उल्लेख आढळतात. ह्या पंढरीची वारी करण्याची प्रत्येक ट्रेकरची इच्छा असते. हरिश्चंद्रेश्वर, केदारेश्वर, तारामती माची आणि कोकणकडा यांना भेट देण्यासाठी न तळमळणारा ट्रेकर हा खरा ट्रेकरच नव्हे. ;)

१,२ सप्टेंबरला हरिश्चंद्रगडाला भेट देण्याचा योग आला त्याचीच ही विस्तृत आणि रटाळ नोंद.

हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी खालील रस्ते आहेत.

१. पुणे-आळेफाटा-खुबीफाटा-खिरेश्वर-तोलार खिंड-हरिश्चंद्रगड:
खुबीफाट्याला उतरून पाच किमी चालत खिरेश्वरमध्ये यावे. तिथून तोलार खिंडीच्या वाटेने साधारण चार ते पाच तास लागतात.
२. पुणे-संगमनेर-राजूर-पाचनई-हरिश्चंद्रगड
३. पुणे-संगमनेर-राजूर-तोलार खिंड-हरिश्चंद्रगड
४. पुणे-आळेफाटा-सावर्णे-बेलपाडा-साधले घाट-हरिश्चंद्रगड
५. पुणे-आळेफाटा-सावर्णे-बेलपाडा-नळीची वाट-हरिश्चंद्रगड

आमची मोहीम होती कोकणकड्याच्या डाव्या बाजूला असलेल्या खाचेतून नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड चढण्याची. उपलब्ध असणार्‍या मार्गांमधला हा बहुधा सर्वात अवघड रस्ता.
ट्रेकची योजना आकार घेत असताना अनेकांनी "पावसाळ्यात नळीच्या वाटेने जाण्याचा धोका पत्करू नका" अशा अर्थाचे अनेक इशारे दिले होते. स्वत: आयोजकांनीही हा ट्रेक "अतिशय अवघड" या प्रकारातला असल्यामुळे नियमित ट्रेकर्स वगळता इतरांनी हे धाडस करू नये असे सुचवले होते. पण अशा सूचना (नेहमीप्रमाणे अतिशहाणपणा करून) धुडकावून लावून शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास आम्ही १२ जण शिवाजीनगर बसस्थानकावर हजर झालो. पुणे-नाशिक आरामगाडीतून साडेदहाला आळेफाट्याला आल्यावर सर्वांनाच भुका लागल्याची जाणीव झाली. कल्याणच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलात खाऊन बाहेर आलो आणि सावर्णे गावाकडे जाणारी गाडी किती वाजेपर्यंत मिळेल याची आजूबाजूला चौकशी केली तर "आताच पाच मिनिटांपूर्वी कल्याण गाडी गेली." असे कळले. ट्रक किंवा जीपने माळशेजचा प्रवास रात्री करणे हे धोक्याचे आहे हे नाणेघाटाच्या वेळी कळले होते. त्यामुळे तो पर्याय स्वीकारण्यास कोणी तयार नव्हते. शिवाय आळेफाट्यावरुन कल्याणला जायला "पाहिजे तेवढ्या" बसगाड्या मिळतात हा एक गोड गैरसमज आमच्या मनात होता. दीडदोन तास एस्टीची वाट बघण्यात गेले. बारा-साडेबाराच्या सुमारास नगर-बोरिवली गाडी मिळाली आणि दीड तासाने माळशेज घाट उतरून सावर्णे गावाबाहेर आम्ही उतरलो. उजव्या बाजूला आत जाणार्‍या रस्त्याने पाच मिनिटे चालल्यावर एक शाळा आहे. व्हरांड्यात आयोजकांचे स्थानिक कार्यकर्ते साबळेमामा आमची वाट पाहत होते. मुंबईचे लोक दोन-अडीचपर्यंत येतील आणि ते येईपर्यंत इथेच बसावे लागेल हे स्पष्ट झाले. . पावसामुळे शाळेचा व्हरांडा ओलसर झाला होता. सर्वांना झोपण्यासाठी पुरेशी जागाही नव्हती. शिवाय तासाभरात मुंबईचे लोक येतील तेव्हा सगळं सामान काढण्यापेक्षा तसंच भिंतीला टेकून बसलो.

शाळा, सावर्णे

मुंबईची वीसेक मंडळी पावणेचार वाजता आली. आधी ठरल्याप्रमाणे आम्ही शनिवारी पहाटे निघणार होतो. आणि आता चार वाजले होते म्हणजे पहाट झालीच होती. तेव्हा विश्रांतीची भानगड न करता चार वाजता आम्ही बेलपाड्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली.

बर्‍यापैकी उंच अशा दोन टेकड्या पार करून आम्ही कोकणकड्याच्या पायथ्याशी असलेल्या बेलपाडा-वाल्हिवरे गावात आलो. तेव्हा सकाळचे साडेसात वाजत आले होते. ढग आणि धुक्यामुळे कोकणकडा पूर्ण दिसत नव्हता पण त्याच्या भव्यतेची कल्पना येत होती. आयोजकांच्या सौजन्याने गावात चहापान व नाश्त्याचा कार्यक्रम उरकून थोडेसे बसून घेतले. गावाबाहेरच्या ओढ्यावर पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. त्यावेळी गावातल्या काही लोकांनी "नळीच्या वाटेने जाऊ नका त्याऐवजी साधले घाटाने जा. थोडे लांब पडेल पण तो मार्ग तुलनेने सुरक्षित आहे. नळीमध्ये उभं राहणंसुद्धा अशक्य आहे. शेवाळामुळं सगळा रस्ता निसरडा झाला आहे" वगैरे सूचना आम्हाला दिल्या. मात्र त्याकडे अर्थातच दुर्लक्ष केलं आणि नळीच्याच वाटेने जायचं असं ठरलं.

सव्वानऊच्या आसपास आम्ही कोकणकड्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली. ऐनवेळी आयोजकांचे अनेक कार्यकर्ते न आल्याने शनिवार दुपार, रात्र आणि रविवार सकाळ यासाठी असलेले स्वयंपाकाचे सामान सर्वांनी वाटून घ्यावे म्हणजे एकाच माणसाला खूप जास्त ओझे येणार नाही असे ठरले. मला मिळालेल्या पिशवीत प्रत्येकी २ लीटर असे दुधाचे साधारण ३-४ टेट्रा पॅक आणि काही छोट्या पुड्या होत्या. त्यामुळे बॅगेचे वजन एकदम आठएक किलोने वाढले. पण त्याला काही पर्यायच नव्हता.
बेलपाड्यावरुन कोकणकड्याच्या डाव्या बाजूला असलेली इंग्रजी व्ही आकाराची खाच स्पष्टपणे दिसते. ह्या खाचेतच नळी लागते. आम्हाला तिथपर्यंत जायचं होतं. बेलपाड्याच्या प्रदेशात अतिशय घनदाट जंगल आहे. झाडाच्या एका प्रकाराने आम्हाला प्रचंड त्रास दिला. या झाडाच्या सर्व फांद्या, खोड वगैरे ठिकाणी बाभळीच्या काट्यांसारखे काटे होते. अशी अनेक झाडे येथे मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे रस्ता निसरडा असला तरी आधारासाठी बर्‍याच झाडांचा काही फायदा होत नव्हता. शिवाय झाड अंगाला लागून खरचटण्याची भीती असल्याने अवधानाने चालावे लागत होते. चार-साडेचार तासांच्या वाटचालीनंतर एक नदी ओलांडून आम्ही थोडी विश्रांती घेतली.

धबधबा
पोहण्याची मजा

कोकणकड्यावरचे ढग थोडेसे विरळ होऊ लागले होते. साधारण ३००० फूट उंचीच्या अनेक भिंती आजूबाजूला दिसू लागल्या. कोकणकडा तर नजर पोचत नव्हती इतका उंच दिसत होता. कड्याच्या उंचीचा अंदाज बांधणे चुकीचे होते. कारण कडा नक्की संपला आहे की त्याचे टोक ढगांमध्ये लपले आहे हेही ठरवता येत नव्हते.

उत्तुंग सह्यकडा

पुढेपुढे चढण त्रासदायक होऊ लागली होती. घनदाट झाडांमधून चालणे अशक्य असल्याने ज्या मार्गाने पाणी वाहते त्याच घसरड्या मार्गाने वर चढणे आवश्यक होते. शिवाय रात्रीची चुकलेली झोप आणि पहाटेपासून झालेली सात तासांची वाटचाल यामुळे चालण्याचा वेगही मंदावला होता. ह्या मार्गात दरडी कोसळण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. प्रत्येक दगडावर पाय ठेवताना तो सटकेल की काय अशी भीती वाटते. तीन तासांच्या वाटचालीनंतर समोर हरिश्चंद्रगडाची "नळी" आता समोर दिसू लागली.

नळीची वाट

अतिप्रचंड उंच अशा दोन डोंगरकड्यांमधील चिंचोळा असा खिंडीसारखा हा भाग आहे. नळीपर्यंत जाण्याचा रस्ता थोडा बिकट होता. कोकणकड्याला चिकटून कपारींचा आधार घेत पुढे पुढे सरकावे लागते. शिवाय हाताने आधार घेतली कपार आणि पाय ठेवलेली खाच कधी निखळून जाईल याचा भरवसा नाही. अगदी मजबूत दिसणार्‍या दगडाला धरावे तर त्याचा मूठभर तुकडाच हातात येईल. अतिशय काळजीपूर्वक चालत नळीच्या सुप्रसिद्ध रॉक पॅचसमोर आलो. पंधरा फूट उंचीचा हा धबधबा आहे. आमच्या मदतीसाठी दोर बांधण्याची व्यवस्था केली होती. नाकातोंडात जाणारे पाणी न जुमानता सगळेजण वर चढून आले.

चढण १

आमचा समज असा होता की हा धबधबा आणि खिंड संपली की एखादा महादरवाजा लागेल आणि आपण थेट किल्ल्यावर प्रवेश करू. पण तसे नव्हते. हा तर पहिलाच पॅच होता. असे सुमारे ४ ते ५ धबधबे आम्हाला चढून पार करावे लागणार होते. प्रत्येक ठिकाणी दोर बांधणे आणि सर्वांना वर घेणे हे काम जोराने वाहणारा वारा, पाऊस, धबधब्यांच्या पाण्याचा जोर यामुळे अतिशय वेळखाऊ होत होते. पावसापासून आडोसा असा कुठेही न मिळाल्याने दुपारचे जेवण शिजवणे व खाणे शक्य झाले नाही. त्यामुळे बिस्किटे, लाडू, चणे, शेंगदाणे अशा गोष्टींवर भूक भागवावी लागली. जसजसे वर जाऊ तसतसा कडाही उंच होतोय की काय असे वाटत होते. अनेक ठिकाणी दोर बांधण्यासाठी आवश्यक असा मजबूत दगड न सापडल्याने एकमेकांना हातानेच आधार देऊन पुढे घ्यावे लागले.

चढण २

शेवटून दुसरा धबधबा ओलांडून वर आलो तेव्हा संध्याकाळचे साडेपाच वाजले होते. झाडीमधून जाणारी चिखलाची निसरडी उंच चढण पार केली आणि एका पठारावर आलो. सर्वजण तिथे जमेपर्यंत साडेसहा वाजून गेले. आता अंधार पडू लागला होता. बर्‍याच जणांनी आवश्यक असलेल्या बॅटर्‍या आणि सेल न आणल्याने एकमेकांना रस्ता दाखवत घनदाट जंगलातून चालायला सुरुवात केली. अडीच तास चालल्यानंतर पुढे शेवटचा पॅच होता.

चढण ३

रात्री नऊच्या सुमारास आम्ही त्या पॅचच्या पायथ्याशी पोचलो. दोर बांधणे व त्याची चाचणी घेणे यात तासभर गेला. या वाटेवरचा हा सर्वात उंच पॅच. साधारण २० फूट उंचीचा अर्धवर्तुळाकार दगड चढून वर यायचे होते. अंधारात चढायला खूपच वेळ लागत होता. सर्वजण वर येईपर्यंत अकरा वाजले. एकदाचे आम्ही गडावर येऊन पोचलो होतो. इथे वार्‍याचा वेग फारच जास्त होता. शिवाय पावसाचे थेंबही अतिशय थंडगार होते. चालताना शरीरात उष्णता निर्माण होते तेव्हा चालताना काही वाटत नव्हते. पण इतरांची वाट पाहत थांबलो तेव्हा थंडीने कुडकुडत होतो. आता आम्हाला मुक्कामासाठी आवश्यक असलेल्या गुहा आणि मंदिर शोधणे आवश्यक होते. लवकरच एखादा आडोसा मिळेल आणि पाण्याने निथळणारे कपडे बदलून कोरडे कपडे घालू. शिवाय पाठीवर असलेले तीसएक किलोचे ओझे रात्रभर तरी उचलावे लागणार नाही अशी आशा वाटू लागली. पण दैवाने आमची परीक्षा पाहण्याचेच जणू ठरवले असावे.

हरिश्चंद्रगडाचा विस्तार खूपच मोठा आहे. साबळेमामांसारखा १५-२० वेळा गडावर आलेला अनुभवी माणूसही येथे पावलापावलावर चुकतो. आवश्यक असलेला रस्ता अजिबात सापडत नाही. तीनचार तास किल्ल्यावर कुडकुडत भटकूनही आम्हाला गुहा सापडल्या नाहीत. शिवाय पाठीवरचे सामान कुठेतरी ठेवून गुहा शोधाव्यात म्हटले तर तेही शक्य नव्हते. बॅगा ठेवलेली जागा परत सापडते की नाही अशी भीती. एव्हाना रात्रीचे अडीच वाजून गेले होते. तीनचार तासांनी सकाळ होईल आणि थोडे दिसायला लागेल तेव्हा गुहा शोधता येतील असे ठरले. आयोजकांनी आणलेली ताडपत्री डोक्यावर घेऊन सर्वजण त्याखाली उकिडवे बसून राहिलो. ताडपत्रीतूनही थोडे पाणी झिरपत होते. मात्र वार्‍यापासून थोडेसे संरक्षण मिळत होते. रात्रीचेही जेवण आमच्या नशिबी नव्हते. स्वयंपाक करण्यासाठी आवश्यक तो आडोसा नसल्याने शिल्लक राहिलेल्या बिस्किटांसारख्या पदार्थांवर हात मारला. प्रत्येकाच्या वाट्याला तांदळाची अर्धी भाकरी आणि थोडी चटणी आली. आयोजकांनी श्रीखंड आणले होते ते तसेच खाल्ले. आणि सकाळ होण्याची वाट पाहू लागलो. रात्री काही नशीबवान सदस्यांना ताडपत्रीतून अंगावर पाणी ठिबकत आहे, ताडपत्री धरून हात दुखल्यामुळे हात थोडा हलवावा तर बाजूने थंडगार हवा हळूच आत येत आहे, दिवसभर पावसाने, धबधब्याच्या पाण्याने भिजलेले कपडे अंगावर तसेच आहेत, आणि जागेच्या अभावामुळे आडवे पसरण्याची सोय नसल्याने उकिडवे बसावे लागत आहे अशा परिस्थितीतही घोरावे लागण्याइतक्या शांत झोपेचे सुख अनुभवता येत होते याचा हेवा वाटला. ;) पाचच्या सुमारास एका मित्राने "ताडपत्रीत आपण भिजतच आहोत. अशा अवघडलेल्या परिस्थितीत बसण्यापेक्षा बाहेर छत्री घेऊन उभे राहू. तेव्हढेच पाय मोकळे राहतील." असे सुचवले. बाहेर आलो तर थंडगार वार्‍याने अक्षरश: हुडहुडी भरली. ताबडतोब परत ताडपत्रीमध्ये शिरलो.

बरोबर सहा वाजता आयोजकांनी शिट्टी वाजवून ताडपत्री ओढून घेतली आणि गुहा शोधण्याच्या मोहिमेला पुन्हा प्रारंभ झाला. विश्रांतीसाठी नसल्या तरी आमचा उतरण्याच्या रस्त्यावर असल्याने या गुहा सापडणे आवश्यकच होते. पुन्हा एकदा नळीच्या वाटेने कोकणकडा उतरणे अशक्य होते. शिवाय नळीच्या वाटेचा रस्ताही सापडतो की नाही अशी शंका होतीच. साडेतीन तासांनी गुहा सापडल्या. समोर धुक्यामध्ये हरिश्चंद्रेश्वराचे मंदिरही दिसत होते. गुहेत एकदाचे सामान टाकले आणि गरमागरम चहा घेतला. पाचएक मिनिट थोडे ऊनही पडले तेव्हा बाबूजींच्या

पडसाद कसा आला नकळे, अवसेत कधी का तम उजळे,
संजीवन मिळता आशेचे, निमिषात पुन्हा जग सावरले,
किमया असली केली कुणी

या ओळीच आठवून गेल्या.

अरुण सावंत सर आणि आम्ही

हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर, आजूबाजूचा परिसर, केदारेश्वर यांचं वर्णन करायला तर शब्दही अपुरे आहेत. काळ्याभोर दगडातलं हे मंदिर त्याच्या प्राचीन वैभवाची साक्ष देतं. सर्वत्र कोरीव खांब आणि शिला. मंदिराच्या बाजूला असलेली थंडगार पाण्याची तळी, मंदिरासमोरील असलेले पाण्याचे अतिशय सुंदर कुंड. कुंडावरच असलेली लहान खिडक्यांसारखी कोरीव देव्हार्‍यांची रांग, थोडे खाली उतरून गेले लागणारी केदारेश्वराची गुहा यांना "चमत्कार" या एकाच शब्दाने गौरवणे योग्य होईल. केदारेश्वराची गुहा तर अद्भुत म्हणावी इतकी सुंदर आहे. हरिश्चंद्रेश्वर आणि केदारेश्वराच्या दर्शनासाठी - तुम्ही अगदी माझ्याप्रमाणेच नास्तिक असला तरीही - नक्की पुन्हा पुन्हा यावेसे वाटेल.

तळे
हरिश्चंद्रेश्वर मंदिर
केदारेश्वर गुहा

दीड वाजता उतरायला सुरुवात केली. आमचा उतरण्याचा मार्ग तोलार खिंडीवाटे होता. हरिश्चंद्रगडापासून चालत चालत ७ टेकड्या पार केल्या की तोलार खिंड लागते. ही खिंडही पावसाळ्यात पार करणे अशक्य व्हावे इतकी निसरडी होते. जागोजागी असलेले तुटके रेलिंग्ज आणि बाजूला दिसणारी खोल दरी यामुळे धडकी भरते. सुदैवाने पावसाने एखाद्या शहाण्या मित्रासारखे वागून आम्हाला उतरताना अजिबात त्रास दिला नाही. चारएक तासांच्या वाटचालीनंतर एकमेकांच्या आधाराने खिंड पार करून आम्ही व्याघ्रशिल्पापर्यंत येऊन पोचलो.

व्याघ्रशिल्पाकडून डावीकडे जाणार्‍या रस्त्याने रतनगड, राजूर परिसराकडे जाता येते. आम्ही उजवीकडून जाणार्‍या रस्त्याने खिरेश्वराकडे आलो. शेवटच्या एक तासाच्या प्रवासात पायांनी अगदीच असहकार पुकारला. खांदे आणि गुडघे त्यांच्या अस्तित्वाची जाणीव क्षणोक्षणी करून देत होते. पण पुण्यात लवकरात लवकर पोचण्यासाठी घाईने पाय उचलणे आवश्यक होते. घनदाट जंगलातली ही पायवाट पार करून खिरेश्वराला पोचायला सहा वाजले. मुंबईच्या मंडळींच्या बसने खुबीफाट्यापर्यंत आलो. तिथून एक खाजगी जीप करून आळेफाटा आणि आळेफाट्यापासून खचाखच भरलेल्या इंदौर-पुणे एस्टीमध्ये काहीजण पायर्‍यांवर बसून तर काही उभे राहून असा कंटाळवाणा प्रवास करत पुण्यात आलो.

सर्वजण

अंगावर काट्यांनी ओरखडल्याच्या खुणा, सुजलेले पाय, जळवा चावल्याचे दिसणारे फोड, बॅग रुतल्यामुळे खांद्यावर दिसणारे खरचटलेले रक्त, दोन दिवस झोप न झाल्याने तारवटलेले डोळे हे सगळे पाहिल्यावर घरी आल्यावर नेहमीप्रमाणे विचार केला. "काय गरज आहे इतकं सगळं करण्याची?"

पण सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहिती असतात असं थोडंच आहे.

ऋणनिर्देश:
१. हरिश्चंद्रगडाचा नकाशा: सांगाती सह्याद्री व ट्रेक क्षितीज.
२. छायाचित्रे: सागर भोसले


हाच लेख आजानुकर्ण यांच्या माहितीपूर्ण अनुदिनीवरही वाचता येईल. 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...