शी बालपणापासूनच निसर्गाविषयी नितांत प्रेम असलेली मी ट्रेकिंगच्याही विश्वात सहज रमायला लागले. माझे ट्रेकिंग चे विश्व चांभारलेणी ते हरिहर, दुर्गाभांडार इतकं मर्यादीत होत. हे विश्व विस्तारीत व्हावं असं फार वाटत होतं. शनिवार, १६ जानेवारी ला सकाळी ११ वाजता नानांचा मला कॅाल आला, जवळ जवळ २ वर्षांनी त्याबद्दल लिहायला घेतलय. सगळा योगायोगच आणि काय…!

ठरल्याप्रमाणे २ वाजेपर्यंत किनारा हॅाटेल ला पोहचलो, शेवटी ३.१० पर्यंत सगळी मंडळी आली. मग मी, मम्मी आणि क्षितिजा श्री. प्रकाश व सौ. रेखा पाटील यांच्या गाडीत बसलो. आणि ‘आजोबा’ साठी मार्गस्थ झालो. राजूरला पोहचायला पाच वाजले. तिथे सोनवणे काकांनी किरकोळ भाजीपाला घेतला. आमचा नानांसोबतचा पहिलाच ट्रेक असल्यामुळे आम्ही मनापासुन एन्जॅाय करत होतो. तिथेच हॅाटेल मधे काही जणांनी नाश्ता केला.
राजूर हून निघायला ५.३० झाले. तेथून पुढे पाचनाई कडे जाणाऱ्या रोडने माणिक ओझर मधून उजवीकडे शिरपुंजे कडे वळलो. मग कुमशेत गावात पोहचलो. काही ठिकाणी घाट रस्ता तर काही ठिकाणी गर्द झाडींमधला वळणदार रस्ता होता. सगळं सगळं अप्रतिम होत. सूर्यास्ताचा सुखद सोहळा आकाशात चालू होता. अस्ताला जाण्यापूर्वी सूर्य आपल्या पोतडीतले सगळे रंग मुक्त हस्ताने आकाशात उधळत होता. डोळ्यांचे पारणे फेडणारी ती रंगसंगती बघून मन आणि कॅमेरा दोघेही सुखावत होते. त्याचा निरोप घेऊन आम्ही पुढे कुमशेत ला पोहचलो. गावात शाळेसमोर गाड्या पार्क केल्या तोपर्यंत अंधार पडला होता. आमचं शाळेजवळच मुक्काम करण्याचं नियोजन होतं.

लगेचच जेवणाची तयारी चालू झाली. शाळेच्या पडवीतच तीन टेंट लावले. विटा रचल्या गेल्या, सरपणाची शोधाशोध झाली आणि चूल पेटली. मग वाटाणे सोलणे, कोथिंबीर, तांदूळ निवडणे, कांदे चिरणे, लसूण सोलणे अशी कामे मी, क्षितिजा, तनुजा, मम्मी आणि रेखा काकूने केली. मसाले भात व चुलीवर भाजलेले मस्त नागलीचे पापड असा फर्स्ट क्लास मेन्यू ठरलेला. तोपर्यंत थंडीने चांगलेच मी म्हटले होते. तासाभरात गरमागरम मसाले भात तयार झाला. शाळेच्या अंगणातील सोलर लाईट खालीच चटया अंथरल्या आणि गोल करून जेवायला बसलो. मग काय अनलिमिटेड कॅामेडी गप्पा आणि सोनवणे काकांचे वाण्यांचे किस्से. डबल मेजवानी!
चुलीवरच्या जेवणाची चव म्हणजे माइंड ब्लोइंग !! सेव्हन स्टार हॅाटेललाही लाजवेल असं वातावरण होतं. गावात सगळीकडेच निरव शांतता होती, फक्त आमचाच काय तो आवाज. अजून एक टेंट लावल्यावर शाळेच्या अंगणात कँप फायर सुरू केलं. काळोखाच्या पार्श्वभूमीवर थंडीचे साम्राज्य पसरले होते त्यात शेकोटीच्या उबेचा काय तो सहारा होता. मग प्रत्येक जण सह्यभटकंतीमधले आपले अनुभव शेअर करत होते. सह्राद्री किती उदार आहे याचा प्रत्यय कसलेल्या भटक्यांच्या अनुभवातून येत होता. अकरा वाजता झोपायची तयारी चालू झाली आणि पांघरूणांच्या घड्या मोडल्या गेल्या. मी, मम्मी आणि क्षितिजा एकाच टेंट मधे झोपणार होतो. आमच्यातील काही जण अस्वले आजींच्या घरी झोपायला गेले. टेंट मधे झोपण्याचा अनुभव नसल्यामुळे आणि थंडीचा पारा चांगलाच वाढल्यामुळे निद्रादेवींच्या आगमनाचे कुठलेही चिन्ह नव्हते. पांघरूण घेउन सुद्धा थंडी इतकी वाजत होती की कितीतरी वेळ मी बसूनच होते. मध्यरात्रीनंतर कुत्र्यांच भुंकणं चालू झालं. त्या निरव शांततेत ते भुंकणं हॅारर फिल्म ची आठवण करून देत होतं. पाच वाजता अलार्म वाजला, सगळ्यांनी ऐकला पण जब्बर थंडीत टेंट बाहेर निघण्याची कोणाचीच तयारी नव्हती. रात्रभर झोप लागली नाही म्हणून आमची आणि पाटील काका काकूंची कुरबूर चालू झाली. सोबतच्या भिडूंचा उठल्याचा आवाज आल्यावर आम्हीही टेंट मधून बाहेर आलो तोपर्यंत ६.३० वाजले होते. सोनवणे काकांनी लगेचच शेकोटी पेटवली तेव्हा जरा हायसे वाटले.

तोपर्यंत ‘प्रभा उजळली, किरणांचे झोत क्षितिजावर चढले. उषा किरणांआड दडली आणि आपल्या तेजाचा सुवर्णध्वज फडकवीत तो प्रतापवंत सूर्यनारायण हसत हसत पूर्वेस वर आला.’
मग अस्वले आजींनी फर्स्ट क्लास बिना दुधाचा चहा आणि उकडलेली गावठी अंडी दिली. सगळी आवराआवर झाली, आवश्यक ते सामान बॅगेत भरलं, लाल्या अस्वले नावाचा वाटाड्या सोबत घेऊन गाडी पुढच्याच ठाकुरवाडी गावाकडे वळवली. गाड्या ‘उघडे’ यांच्या अंगणात पार्क केल्या. वातावरण अतिशय अल्हाददायक होतं, गाव अगदीच छोटं. वाडीवर काही लोक बसले होते, बायांचे सडा रांगोळीचे काम चालले होते. एव्हाना सगळ्यांशी चांगलीच ओळख झाली होती. पहिल्यांदा भेटुनही कधीचाच परिचय असल्यासारखे वाटत होते. हीच तर गंमत आहे सह्याद्रीची, त्याच्याकडे जाणाऱ्या प्रत्येकाला तो त्याच्या विशाल ह्रदयात स्थान देतो, ही जाणीव शहरात राहून कधीच होत नाही.

महाराजांचा जयघोष करून पश्चिमेकडे चालायला सुरूवात झाली. उजवीकडे कात्राबाई आणि करंडा डोंगर आपला ठाण मांडून बसलेले. जवळजवळ वीस मिनिटांच्या चालीनंतर उजवीकडे वळलो आणि समोर आजोबांचे दर्शन झाले. आता चढ उताराची वाट चालू झाली. पुढे आल्यावर समोर गुयरीची खिंड, उजवीकडे करंडा डोंगर आणि डावीकडे अजस्त्र आजोबा दिसू लागले. सह्याद्रीत फिरतांना डोळ्यांची आणि मनाची कवाडं सत्ताड उघडी ठेवली ना तर सगळं मिळतं कारण तो सह्याद्री सगळंच उदार मनाने रितं करतो; आपल्याला फक्त आणि फक्त घ्यायचं असतं.


थोडा वेळ चालल्यानंतर स्वच्छ मिनरल वॅाटरच्या साठ्याजवळ थांबलो. पोटभर पाणी पिलं आणि जंगलाची वाट धरली. पुरुषभर उंचीची कारवीची दाट झाडी होती. रानटी झुडुपं त्यांच्या काट्यांच अस्तित्व जाणवून देऊ लागली. पण तरी पुढे तर जायचच होतं. आता खऱ्या अर्थाने आजोबा चढायला सुरूवात झालेली. एकदा लालू कंफ्यूस झाला पण योग्य वाट सापडली. आता चांगलाच चढ लागला. वाट बिलकुल पक्की नव्हती. झुडूपांचा आधार घेउन चढू लागलो, कसाबसा तो पॅच संपला तर पुढे छातीवर येणारी घळई. म्हटलं ठीके हिला पण पार करून टाकू. थ्रील काय असतं हे इथे आल्यावर चांगलच उमजलं. पुढे घसरड्या रॅाक पॅचवर मी अडकली; धड मागे ना पुढे अशी गत झाली. मग प्रशांत दादाने हात दिला आणि मी वर चढली. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरचे असे काही क्षण आपल्या अनमोल आयुष्याची किंमत कळायला पुरेसे असतात. वाटेत सुटुन आलेले मोठ्ठे दगड चॅलेंज करत असल्यासारखे वाटत होते. त्यांचं चॅलेंज स्विकारत आम्ही उजवीकडे वळलो तर हजारो फूट खोल दरी. तिच्यामध्ये कलाडगड, हरिश्चंद्र, करंडा, कात्राबाई, रतनगड हे सह्याद्रीचे अस्सल हिरे उन्हात चमकत होते.


आता एकेरी वाट आणि त्यात विरळ काटेरी झुडुपांची सोबत होतीच. आताशा थोडा विकनेस जाणवू लागला मग काय चॅाकलेट खात पुढे… काटे आणि उन्हापासून बचावासाठी नेहमी पूर्ण कपडे आणि ग्रीप चे शुज घालूनच ट्रेक ला जावं. उजवीकडे दरी आणि डावीकडे आजोबांच्या पोटाचा आधार घेत पुन्हा चढाई सुरू झाली. काही वेळात पठार लागलं, सूर्य अजून डोक्यावर नसल्यामुळे आजोबांची गार सावली सुखावत होती. आत्तापर्यंत इतकी मोकळी जागा न दिसल्यामुळे आम्ही खुश. पाण्याच्या कुंडाजवळ बसून सोनवणे काकांनी आणलेल्या रसदार संत्रीचा आस्वाद घेतला. पंधरा-वीस मिनिटांनंतर पुन्हा घसरडी चढाई सुरू झाली. उजवीकडे आता ‘आजोबा टॅाप’ दिसू लागला पण तो काही केल्या येत नव्हता, जितकं जवळ जावं तितका अजून लांब जात होता. आता पश्चिमेकडची अजूनच घसरणारी वाट लहानश्या पठारावर थांबली. आणि समोरचा सह्याद्रीचा बावनकशी सोन्याचा भव्य नजराणा डोळे दिपवून गेला. सगळ्यांनी मनमुराद कॅमेरा वर्क आटोपले. आणि पुन्हा पुढची चढाई सुरू केली. माथा काही यायचं नाव घेत नव्हता. तोपर्यंत जल्लोष ग्रुप चे मेंबर्स देखील आम्हाला जॉईन झाले होते.

शेवटची चढाई पार केली आणि माथ्यावर पोहोचलो. आता सह्याद्रीचा 360 डिग्री चा व्ह्यू पाच तासांची दमछाक सार्थकी लागल्याची पावती देत होता. तिथेच एका दगडावर बसकण मारली आणि ते सौंदर्य घटाघटा पिऊन घेतलं. कॅमेरा काढून फोटो काढण्याची सुध्दा इच्छा होत नव्हती. कॅमेऱ्याला आनंद देण्याच्या नादात स्वतःचा आनंद हिरावला जाऊ नये इतकाच स्वार्थी हेतू…. समोरच करोले घाट आणि संधान व्हॅली निपचीत पडले होते. किती किती वेळ त्या रांगड्या सह्यद्रीकडे बघू असं झालं होतं. अलंग, मदन, कुलंग हे दुर्ग त्रिकुट तर लाजवाब दिसत होतं. नजर पोहचते तोपर्यंतचा सुजलाम सह्याद्री मनात साठवला आणि परतीला निघालो. खालच्या मोकळ्या टप्प्यावर सावली नव्हती तरीही डबे उघडले आणि डब्यांचा आस्वाद घेतला. आता जरा रिलॅक्स वाटत होतं, थोडी विश्रांती झाल्यावर पुन्हा आलो त्याच वाटेने उतरू लागलो.


पुन्हा ती घसरण आणि कारवीचा आधार. सगळे जण स्पीड मेंटेन ठेवला म्हणून आमचे कौतुक करत होते. पुढे ट्रॅव्हर्स मारून उतरलो. जवळ जवळ ८० डिग्री ची उतरण होती. काटे कुटे कशाचच भान नव्हतं. मजा-मस्ती करण्यात कधी उतरलो कळलंच नाही. चार वाजेपर्यंत ठाकुरवाडीत पोहोचलो. जल्लोष ग्रुप मेंबर्स लगेच रवाना झाले. आम्ही मात्र नळावर हात-पाय धुऊन उघडेंच्याच अंगणात भेळ बनवून त्यावर मनसोक्त ताव मारला. परतण्याची वेळ आली पण तिथून निघावसच वाटत नव्हतं. मन ‘आजोबांच्या अंगणात’ असं काही रमलं होतं की त्याची समजूत काढावी लागली; आपण पुन्हा लवकरच आजोबांच्या भेटीला येऊ म्हणून, तेव्हा ते बापडं तयार झालं.
परतीच्या प्रवासासाठी मी प्रशांत दादांच्या गाडीत बसली. तोपर्यंत सूर्यदेवांची निरोप घटीका समीप आली होती. एका पठाराजवळ गाडी थांबवून पुन्हा काही फोटोज काढले. दूरवर ‘आजोबा’ दिसतच होते, एकदा पुन्हा ते दृश्य मनात साठवले आणि खऱ्या अर्थाने परतीला लागलो. निरोपाची एक वेगळीच मजा असते, तेव्हा शब्दही सुचत नाहीत, सुचले तरी कोणाला सांगावेसे वाटत नाहीत. निरोप फक्त ह्रदयात पहायचा, ह्रदयात लिहायचा आणि ह्रदयातच साठवायचा…
आजोबांच्या आठवणीत नाशिक कधी आलं कळलंच नाही. सुरूवात तर एकदमच जबरदस्त झाली, आता थांबायचं नाही असं वचन स्वत:लाच दिलं. कारण आज माझ्या पुढे एक नविनच विश्व खुलं झालं होतं… कायमचं.







ट्रेक दिनांक- १६/१७ जानेवारी २०१६
शनिवार/रविवार
जवळचे गाव- कुमशेत, राजूर
जिल्हा – ठाणे
योग्य काळ- सप्टेंबर ते फेब्रुवारी
No comments:
Post a Comment