http://mazidongaryatra.blogspot.com/2015/07/blog-post.html
प्राजक्ता आणि राहुल हे नेहमीचे सवंगडी तर होतेच, त्यात अजून दोन नव्या दमाचे भिडू जमा झाले. एक प्राजक्ताचा मित्र विनीत उर्फ विन्या आणि दुसरा राहुलचा भाऊ विपुल. विपुलने तर खास आदल्या दिवशी नव्या जोड्यांची खरेदी केली. ट्रेकमधे यथावकाश त्या जोड्यांचा पार निकाल लागला तो भाग निराळा.
वाटेवर लागणारा एक पिटुकला ओढा
किल्ल्याचा माथा समुद्रसपाटीपासून साधारण १४२० मीटर उठवला आहे तर विहिर गावाची उंची साधारण ८६० मीटर आहे. विठ्ठल भांगरेच्या घरासमोर गाड्या लावल्या. विठ्ठलचे चुलते सुरेश मामा आम्हाला गडावर घेऊन जाणार होते. पाण्याच्या बाटल्या आणि थोडा कोरडा खाऊ घेऊन खिंडीची वाट धरली. या वाटेने गडावर जाण्यास साधारण दोन-अडीच तास लागतात. खिंडीच्या थोडं खालच्या अंगाला एका लवणात वाट डावीकडे वळते आणि गर्द झाडोर्यात उघड्यावरच विसावलेल्या मारूती आणि काळोबाच्या मुर्त्यांकडे जाते. त्या मूर्त्या पाहून तसेच सरळ अरूंद पायवाटेवरून गडाला वळसा देत आम्ही कुंजरगडावरील प्रसिध्द अशा आरपार भुयारापाशी आलो.
आमचे प्रेमळ मार्गदर्शक "सुरेशामामा"
खिंडीतून दिसणारं विहिर गाव
गर्द झाडोऱ्यात विसावलेले मारुतीराया आणि काळोबा
आम्ही पाच भटके - डावीकडून विपुल, विनित, अस्मादिक, प्राजक्ता आणि राहुल
वाटेत एका झऱ्यावर पाणपिशव्या भरून घेतल्या
कुंजरगडाच्या पोटात असलेली गुहा
आरपार भुयाराच्या तोंडाशी राहुल
एका मोठ्या चौकोनी गुहेच्या आतल्या भिंतीतून जेमतेम एक मध्यम शरिरयष्टीचा माणूस सरपटत जाऊ शकेल असं भुयार आहे. राहुलने आत डोकावून पाहीलं आणि त्याच्या चेहेर्याला गार हवेचा झोत लागला. पलीकडच्या बाजूने हवा आत खेळती होती. राहुल बॅटरी घेऊन आत शिरला. त्याच्या मागे मी होतो. माझ्या सुढृड बांध्यामुळे मी त्या भुयारातून जाऊ शकेन का याबद्दल थोडी चर्चा करून आम्ही ढोपरांवर पुढे सरकू लागलो. राहुल झटकन पलीकडे गेला आणि मला मार्गदर्शन करू लागला. हळूहळू मी आणि माझ्या पाठोपाठ विनीत आणि विपुल देखील आले. ढोपरं आणि गुढगे सोलून निघाले होते पण समोर आलेला नजारा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. विहिर गावाकडची दरी, डाव्या बाजूचा डोंगर आणि त्यावरून डोकावणारे पावसाळी ढग. ते अप्रतिम दृश्य बरेचसे डोळ्यात आणि थोडेसे कॅमेर्यात साठवून परत फिरलो.
आरपार गुहेच्या दरी कडल्या टोकाला
गुहेतून दिसणारा दरीचा नजारा
राहुल भुयाराच्या एका टोकावर
तसेच पुढे जाऊन उध्वस्त दरवाज्यातून गडावर पोहोचते झालो. पडझड झालेले अवशेष आपलं स्वागत करतात खरे पण त्यापेक्षा जास्त अस्वस्थ करून जातात. माथ्यावरून उजवीकडे चालत गेलो की पाण्याची तीन टाकी लागतात. शेवटच्या टाक्यातील पाणी पिण्याजोगे आहे.
ढासळलेल्या पायऱ्या आणि दरवाजा
गडाची उजवीकडची सोंड
सोंडेवरील पाण्याचं टाकं
सोंडेच्या टोकवरील पिण्याच्या पाण्याचं टाकं
ढगात हरवलेला गडमाथा
पडक्या अवशेषांमध्ये उभा असलेला मारुतीराया
तिथे थोडी पोटपूजा आटपून आम्ही गडाच्या दुसर्या टोकाकडे निघालो. आता पावसाने चांगलाच जोर धरला होता. गडाच्या दुसर्या टोकाला पाण्याची टाकी आणि पडके अवशेष आहेत. ते पाहून आम्ही ढासळलेल्या तटबंदीतून गड उतरायला घेतला.
गडाच्या माथ्याजवळ असलेली टाकी
उध्वस्त तटबंदी आणि बुरूज
पावसामुळे घसार्यावरुन पाय चांगलेच घसरत होते. थोडं खाली उतरल्यावर एक पंधरा-वीस फ़ुटांचा खडा रॉकपॅच आडवा आला. त्याच्यावर बरंच शेवाळं साठलं होतं. सुरेश मामा म्हणत होते मागे फिरू, पण राहुलने थोडं पुढे जाऊन पाहिलं. त्याच्या मते आम्ही तो रॉकपॅच उतरू शकत होतो. तो होता तिथेच थांबला. मी त्याच्या जवळ पोहोचून त्याला थोडे होल्ड्स सांगितले. त्याने घेतलेल्या रस्त्यावर त्याला पाच एक फ़ुटांवरुन खाली उडी मारावी लागली. मागे राहिलेल्या प्राजक्ता, विनित आणि विपुलसाठी तो रस्ता योग्य ठरला नसता. मी तसाच थोडा पुढे गेलो, थोडे जास्त होल्ड्स असलेला मार्ग घेतला आणि मग मी आणि राहुलने हळूहळू प्राजक्ता, विनीत आणि विपुलला खाली घेतले. प्राजक्ताचे तर पाय प्रचंड थरथरत होते. अतिशय थरारक असा तो रॉकपॅच आम्ही कोणताही धोका न पत्करता पार केला होता. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर असताना थोडीही चूक किंवा अतिउत्साहीपणा तुमच्या जीवावर बेतू शकतो याचं भान ठेवलं की तुम्ही सुरक्षित राहू शकता.
वीस फ़ुटांचा खडा रॉकपॅच
रॉकपॅच सुखरुप उतरल्यावर
आम्ही परत कुंजरगड आणि त्याच्या शेजारच्या डोंगरात असलेल्या खिंडीच्या माथ्यावर होतो. आता परत खिंडीतली निसरडी वाट न घेता शेजारच्या डोंगराच्या धारेवरून विहिर गावात उतरणार होतो. या मागे दोन उद्देश होते. एक म्हणजे नवीन वाट पायाखालून जाणार होती आणि दुसरं म्हणजे त्या डोंगराच्या पोटात असलेल्या नैसर्गिक गुहा आम्हाला पाहता येणार होत्या. अजून एक छोटा रॉकपॅच उतरुन समोरच्या धारेला भिडलो. तिथेच फ़ोफ़संडीहून येणारी वाट येऊन मिळते. मागल्या खेपेला ही वाट केली असल्याने यावेळी तिन्ही वाट पायाखालून घालता येणार याचा आनंद वेगळाच होता. पाच-एक मिनिटात आम्ही डोंगराच्या पोटातल्या नैसर्गिक गुहांपाशी आलो. गावातले स्थानिक लोक या गुहांना "गडद" असाही शब्द वापरतात. या गुहांचा वापर स्थानिक गुरं बांधण्यासाठी करत असल्याने त्या राहण्यायोग्य राहिल्या नाहीत. गुहांसमोरून पुढे गावात जाणारी धरली.
खिंडीतल्या पठारावर उतरताना लागणारा छोटा रॉकपॅच
कुंजरगडाशेजारच्या डोंगराच्या पोटातल्या नैसर्गिक गुहा किंवा "गडद"
कुंजरगडाशेजारच्या डोंगराच्या पोटातल्या नैसर्गिक गुहा किंवा "गडद"
या वाटेवर फारसा चिखल आणि खिंडीतल्या सारखा तीव्र उतारही
नव्हता. त्यामुळे झपझप पाऊले उचलंत गावाच्या वर असलेल्या शेवटच्या
पठारावर आलो आणि तुफ़ान पाऊस सुरू झाला. सोसाट्याचा वारा देखील होता. थोडं
पलीकडे असलेला भैरोबा दुर्ग मात्र मजेत मावळतीची कोवळी उन्हं खात बसला
होता. हळूहळू ऊन इकडे सरकू लागलं आणि या विरोधाभासातून मग आमच्या समोरच विहिर गावातून एक दुहेरी इंद्रधनुष्य उठावलं. फार अद्भुत होतं ते सगळं. तो नजारा कॅमेर्यामधे साठवायचा प्रयत्न करून गावात पोहोचते झालो.
मावळतीची कोवळी उन्हं अंगावर घेणारा भैरोबा दुर्ग
आमच्या डोळ्यांदेखत उठावणारे इंद्रधनुष्य
सुरेशमामांकडे कोरा चहा घेत दिवसभरातल्या घडामोडींवर चर्चा झडल्या आणि जेवायला विठ्ठलदादाच्या घरी आलो. सकाळपासून नीट असं जेवण झालंच नसल्याने गरमागरम पिठलं, पोळ्या, सांडग्याची भाजी आणि भात अगदी पोटाला तडस लागेपर्यंत खाल्ला. ठसठसणारे पाय आणि पोट तुडुंब भरलेलं असताना एकच गोष्ट होऊ शकते ती म्हणजे गाढ झोप.
सकाळी विनितच्या खुडबुडीने जाग आली. झटपट आवरून आम्ही चहाला सुरेशमामांकडे पोहोचलो. चहा घेऊन निघणार तितक्यात मामांनी पिशवीभर तांदूळ माझ्या हवाली केले. चव म्हणून कोणी पाच किलो तांदूळ का बरे देईल ? पण नाही, त्या माणसांची घडणच निराळी होती. पुढल्या खेपेला आलात की नक्की यायचं या तंबीवर आमची पाठवणी केली. त्यांचं आदरातिथ्य पाहून डोळ्यात पाणीच यायचं बाकी होतं. कसाबसा सुरेशमामांच्या परिवाराचा निरोप घेऊन कोथळ्याकडे निघालो.
कोथळे गावाच्या अलीकडेच एक दिशादर्शक पाटी आहे. तिथे गाड्या लावल्या आणि भैरोबा दुर्गाची वाट धरली. वाट अगदी मळलेली आहे. भैरोबा दुर्ग हा हरिश्चंद्रगड आणि कळसूबाई अभयारण्यात येत असल्याची साक्ष जागोजागी पटावी अशी गडद झाडी गडाच्या वाटेवर आहे.
कोथळे गावातून भैरोबा दुर्गावर जाणारा रस्ता
कोथळे गावातून भैरोबा दुर्गावर जाणारा रस्ता
हा किल्ला छोटेखानी असल्याने साधारण अर्ध्या तासात आपण वाटेत लावलेल्या शिडीपाशी पोहोचतो. इथे कातळात खोदलेलं थंडगार पाण्याचं टाकं आहे. इथून गडमाथा गाठण्यासाठी कातळभिंतीत खोदलेल्या पावट्या आणि जुनी शिडी दिसते. आपण नव्या डुगडुगत्या शिडीवरुन गडमाथ्यावर पोहोचतो.
गडावर जाणाऱ्या खोदीव पायऱ्या
वाटेतील पाण्याचे टाके
शिडीचा मार्ग उजव्या बाजूला जुनी गंजकी शिडी पडलेली दिसतेय
शिडीच्या वरच्या बाजूला राहुल
गडाचा माथा आटोपशीर आहे. समोरंच भैरोबाचं ठाणं आहे. त्याच्या समोर एकमेकांना जोडून ३-४ टाकी आहेत. गडाच्या दुसऱ्या टोकालाही अशीच पाण्याची ४-५ टाकी आहेत. त्याव्यतिरिक्त गडावर पाहण्यासारखे असे काही नाही. तरीदेखील गडावर प्रसन्न वाटतं. पावसाळ्यात संपूर्ण गडमाथा टोपली-कारवीने आच्छादलेला असतो. थोडीफ़ार फ़ोटोगिरी करुन गड उतरू लागलो. जेमतेम वीस मिनिटात गाड्यांपाशी पोहोचलो देखील.
टोपली-कारवीने आच्छादलेला गडमाथा
गडाचा प्रवेश मार्ग
टोपली-कारवीने आच्छादलेला गडमाथा
भैरोबाचं ठाणं
दीपमाळ आणि पाण्याची टाकी
यंदाच्या पावसाळ्यातील पहिलीच भटकंती दमदार झाली होती. कुंजरगडाचा जीवघेणा
निसरडा चढ, पावसाची मस्त साथसंगत, आरपार भुयारातला रोमांचकारी थरार,
परतीच्या वाटेवर डोळ्यांदेखत उठावलेलं दुहेरी इंद्रधनुष्य,
सुरेशमामांच्या घरचं प्रेमळ आदरातिथ्य आणि भैरोबा दुर्गावरची सुंदर सकाळ.
सह्याद्रीने आणि त्यातल्या निसर्गाने दिलेल्या या दानाने भरलेली झोळी घेउन
परत फिरायची इच्छाच होत नव्हती. येताना वाटेत पुढल्या ट्रेकचे मनसुबे ठरले
हे काही वेगळं सांगायला नकोच.
!! धन्यवाद !!
या फोटोसाठी आभार : प्राजक्ता, विनित, विपुल, राहुल
कुंजरगड -- एक ऑफबीट ट्रेक
आजूबाजूच्या रांगांमुळे दुर्गम झालेला हा दुर्ग आपल्या एकाच जडावामुळे दर्शनीय आहे नि तो जडाव म्हणजे त्यावर कातळात खोदलेली 35-40 फुट लांबीची आरपार गुहा. गुहेच्या सुरवातीला एक मोठी खोलीच आहे पण नंतर अक्षरशः रांगत जाऊन हि गुहा आपणाला पार करावी लागते. हा एक भन्नाट अनुभव आहे.
त्याव्यतिरिक्त गडावर विशेष काही नाही, मात्र गडावरून मांडवी नि मुळा नद्यांची खोरी विलोभनीय दिसतात. एकीकडे हरीश्चंद्र, नाफ्ता, भैरवगड, घनचक्कर यांचे दर्शन होते तर दुसरीकडे सिंदोळा, माळशेज घाट नि क्वचित हडसरचे दृश्य दिसते.
असा हा ऑफबीट किल्ला मला मात्र आठ दिवसांच्या अंतराने दोनदा करायला मिळाला. पहिल्यावेळेचे फोटो पाहून दुसरी टोळीही तयार झाली नि लागोपाठ दोन रविवार मी कुंजारगडाची गुंफा पार केली. एकदा विहीर गावातून तर दुसऱ्यांदा फोफसंडी गावातून.
जावे तेव्हा ठावे :
पर्याय १ - विहीर गावातून:
पर्याय २- फोफसंडी गावातून:
तू चाल गड्या :
पर्याय १ - विहीर गावातून:
![]() | ||
| विहीर गावातून डावीकडे कुंजरगड नि मध्ये खिंड |
पर्याय २ - फोफसंडी गावातून:
![]() |
| Common रस्त्यानंतर समाधी नि Shortcut (पिवळ्या रंगात) |
| Rockpatch |
बुरुजावरून :
प्रत्यक्ष गुहेत :
| डावीकडे दिसणारे विवर म्हणजेच आपला पुढचा मार्ग |
| गुहेची सुरवात |
| गुहेमध्ये |
| दूसरे तोंड |
- गुहेचा हा मार्ग खूप कठीण नसला तरी मानसिक कसोटी पाहणारा नक्कीच आहे.
- मी दोनदा जाऊन मला वटवाघळे, उंदीर, एखादा साप किंवा त्यांच्या काही खुणा असे काही आढळले नाही, पण तरीही सुरुवातीला गुहेत जाणाऱ्याने काळजी घेणे चांगले.
- विहीर गावाच्या बाजूस साधारण ३-४ जणांना व्यवस्थित बसता येते त्यामुळे सर्वानी एकदम न जाता ३-४ जणांच्या ग्रुप ने जावे नि परत यावे.
- गुहेत सरपटल्याने थोडी माती उधळते त्यामुळे एकामागोमाग न जाता थोड्या थोड्या अंतराने जाणे उत्तम.
परतीचा प्रवास :
उतरताना फोफसंडी गावाकडे उतरताना पॉपबाबाच्या रेस्टहाऊसची पडकी इमारत दिसते.वनखात्याने त्याच्याजवळच एक मनोरा उभारला आहे. पावसाळ्यानंतर; साधारण श्रावण-भादव्यात येथून मांडवी नदीचा परिसर सुंदर दिसत असला पाहिजे.
| समोरच्या डोंगरात काही खोदीव गुहा आहेत. मागे दिसणारी हरिश्चंद्राची शिखरें |
![]() |
| घराची ओढ |
http://nileshbhinge.blogspot.com/












































No comments:
Post a Comment