Friday, May 6, 2022

दाट रानातला सवंगडी - किल्ले भैरवगड

 

दाट रानातला सवंगडी - किल्ले भैरवगड भाग - १

              भाग - १
⛳⛳⛳⛳⛳⛳
राकट .. कणखर सह्याद्री ...



आसमंताला भिडलेल्या उंचच उंच शिखरांचा सह्याद्री .....

खोलच खोल दर्‍या-खोर्‍यांचा सह्याद्री ...

काळजाचा ठोका चुकविणार्‍या कोकणकड्यांचा सह्याद्री...

निसर्गसंपत्तीने नटलेला सह्याद्री.....

सह्याद्री ... बस्स नावात सगळ सामावलेल आहे.

अशा या आपल्या लाडक्या सह्याद्रीत अनेक दुर्गरत्न दडली आहेत.आपल्या सारख्या भटक्यांची पारखी नजर त्याच्यावर आहे.पण ही संपदा आपल्याला चोरायची नाही.तर त्यातुन फक्त निसर्गानुभव घ्यायचा.वार्‍याची गाज कानात भरुन घ्यायची.ढगांशी खेळायचं.पाऊस प्यायचा.डोंगर,किल्ले यांच्याशी गप्पा मारायच्या.आपल्या पूर्वजांच्या पाऊलखुणा शोधायच्या. असा हा अनमोल खजिना काळजाच्या कप्प्यात जतन करुन ठेवायचा.

       आपण कितीही मोठे झाले असलो तरी या सह्याद्रीच्या,निसर्गाच्या पुढे किती खुजे आहोत याची जाणीव यांच्या नुसत्या दर्शनाने आपल्याला होते.

     अवघा सह्याद्री व्यापून टाकलेल्या अनेक गडकोटांच्या अनवट वाटा शोधण्याचं वेडं आहेचं,बरेचसे वाटेवरचे सहजपणे जाता येणारे गडकोट आपण नेहमी पाहतोच.पण आडवाटेवरचे गडकोट दुर्लक्षित रहातात.अशाचं सह्याद्रीच्या पर्वत रांगेत टेहळणी साठी कोकण व पूर्वेकडील भागावर लक्ष ठेवण्यासाठी काही गडांची निर्मिती केली गेली आहे.त्यापैकीच एक म्हणजे पाटण तालुक्यातील भैरवगड.

दाट रानातला सवंगडी - किल्ले भैरवगड भाग - २







दाट रानातला सवंगडी - किल्ले भैरवगड
               भाग - २
⛳⛳⛳⛳⛳⛳

       भैरवगड या नावाचे महाराष्ट्रात एकूण पाच किल्ले आहेत.
१)भैरवगड (ता.पाटण)
२)मोरोशिचा भैरवगड (ठाणे जिल्हा)
३)कणकवली जवळचा नरडव्याचा भैरवगड (सिंधुदूर्ग जिल्हा)
४)कोथळ्याचा भैरवगड (अहमदनगर)
५)शिरपुंजेचा भैरवगड (अहमदनगर)

      या पाच गडांपैकी एक म्हणजेच पाटण तालुक्यातील भैरवगड.ह्या गडाला सारंगगड असंही दुसरं नाव आहे.या भैरवगडाला जायचं म्हणजे दिव्यच.खरंतर या भागात असलेले भैरवगड व जंगली जयगड हे किल्ले पाहण्याची खूप दिवसापासूनची इच्छा.हे गड कालांतराने पाहण्यासाठी बंद होतील.आत्तासुद्धा या गडांना पाहण्यासाठी वनविभागाची रितसर परवानगी घ्यावी लागते.तशी परवानगी नसेल तर दंड व शिक्षेची तरतूद आहे.

        सुमारे दोन हजार वर्षापूर्वीपासून दळणवळणासाठी कोकणातून घाटावर जाणाऱ्या घाटवाटा सह्याद्रीच्या कडेकपारीत अनेक ठिकाणी आढळतात. तत्कालीन राजांनी व्यापारासाठी या वाटांवर घाटरस्ते तयार केले व नंतरच्या काळात या घाटवाटांच्या रक्षणासाठी सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर गड किल्यांचे साज चढले. सारा सह्याद्री टप्प्या-टप्प्यांवरील गडकोटांनी सजला. यातील एक किल्ला म्हणजे गर्द जंगलाने वेढलेला वनदुर्ग भैरवगड.

सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात असलेला भैरवगड सह्याद्रीच्या मुख्य रांगेशी एका लहानशा पायवाटेने जोडलेला आहे. सह्याद्रीच्या या रांगेवर वासोटा, प्रचितगड,पाली किल्ला, जुंगटी किल्ला, जंगली जयगड आणि भैरवगड अशी दुर्गसाखळी पहायला मिळते.

        किल्ले म्हणजे भूतकाळातील घटनांचे साक्षीदार आहेत.हे किल्ले म्हणजे स्वराज्याचे पहारेकरीच.समुद्रावरून स्वराज्यावर आक्रमण होऊ नये म्हणून जलदुर्गाची निर्मिती केली गेली तशीच काही गडांची निर्मिती आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी,टेहळणीसाठी केली.त्यापैकीच हा पाटण तालुक्यातील भैरवगड.

       भैरवगडाला जायचं म्हणजे चांदोली अभयारण्यातला घनदाट जंगलातला प्रवास.या प्रवासासाठी वेगळी वाहनांची व्यवस्था व वनविभागाची रितसर परवानगी या अत्यावश्यक बाबींची पूर्तता होणं आवश्यक.पाटण - संगमनगर धक्का पूल - नाव - कोळणे - मळे - पाथरपुंज ते भैरवगड असा प्रवास.कोळणे - मळे - पाथरपुंज ही पाटण तालुक्यातली अतिदुर्गम गावं.या मधील कोळणे या गावात माझे मित्र प्रदीप सावंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक.अतिदुर्गम गाव,प्रचंड पाऊस,अभयारण्य,जंगली श्वापदांची भिती अशा अनेक अडचणी असूनही अत्यंत निष्ठेने आणी सकारात्मकतेने प्रदीप तेथे काम करतोयं,याचं आम्हा मित्र परिवाराला कौतुक आहेचं.

दाट रानातला सवंगडी - किल्ले भैरवगड भाग - ३

दाट रानातला सवंगडी - किल्ले भैरवगड
              भाग - ३
⛳⛳⛳⛳⛳⛳

       सकाळी लवकरच साता-यातून प्रवास सुरु झाला.तासाभरात पाटणमध्ये पोहोचलो.सकाळी आठ साडे आठची वेळ.सर्वांनी चहा घेतला.पुढच्या प्रवासासंबंधी काही सूचनावजा चर्चा झाली.पुढचा प्रवास सुरु झाला.काही वेळातचं गाड्या संगमनगर धक्का पुलावर थांबल्या.तेथे काही फोटोसेशन झालं.संगमनगर धक्का पूल हा दरवर्षी पावसाळ्यात रोजच्या बातमीचा विषय.हा कोयना नदीवरील पूल.दरवर्षी या पुलावरून पाणी वाहीलं की पलिकडच्या अनेक गावांचा संपर्क तुटतो.तेथे एक लहान व एक मोठा नवीन पूल आहे.तशी नविन पुलाची उंची खूप आहे,तरीही या वर्षी प्रचंड पाऊस झाल्याने मोठ्या नविन पूलावरुनही पाणी गेल्याचे प्रदिपने सांगितले.निसर्गाचं रौद्ररुप म्हणजे काय असतं याची जाणीव झाली.

     पुढचा प्रवास होता नाव या गावापर्यंतचा.पंधरा वीस मिनिटातचं नाव या गावी आमच्या गाड्या पार्क केल्या.पुढचा प्रवास वेगळ्या कमांडर जीप मधून करावयाचा होता.त्या प्रवासासाठी आम्ही तयार झालो.प्रवास सुरु झाला.गाडीतील सर्वांची उचलफेक चालू होती.असा रस्ता कदाचित मी पहिल्यांदाच पहात असेन.काही वेळात पठारावर गाड्या थांबल्या.या पठारावरून बराच दूरचा भाग नजरेच्या टप्प्यात येतो.अगदी कोयना धरणंही येथून खूप जवळ दिसते.सर्वांनी अंगावरची धूळ झटकली.आता पुन्हा कॅमेरे लकाकू लागले.

        कोळणे हे गाव म्हणजे प्रदीप सरांची शाळा.अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर कोळणे या गावी पोहोचलो.शाळेत गेलो.साधीच पण अत्यंत नीटनेटकी असलेली घरे,शेणाणे सारवलेली गुळगुळीत अंगणे पाहिली.या गावांमधील लोकांच्या कष्टप्रद जीवनाची कल्पना न केलेली बरी.अतिदुर्गम असूनही सुंदर असलेल्या शाळेचं सर्वांनी कौतुक केलं.

         मळे गावावरुन पुढे पाथरपुंज हे गाव.पाथरपुंज हे गाव या वर्षी भारतातील सर्वाधिक पावसाची नोंद झालेलं महाराष्ट्रातील गाव म्हणून चर्चेत आलेलं.त्या कारणाने तिकडे अनेकांच्या भेटीही वाढल्या होत्या.रस्त्याच्या कडेला ISO मानांकित जि.प.प्राथमिक शाळेची इमारत.आमचे मित्र श्री.दिनकर शिर्के यांनी काही काळ सेवा केलेली ही शाळा.

      दोन्ही बाजूंना दाट जंगल,मोठमोठाले दगडधोंडे,खड्डे,चढ उतार असलेला रस्ता.त्यातही कशीबशी एकच गाडी बसेलं एवढीच जागा.त्यातच वन्य श्वापदांची भिती.चालकाचं सगळं कौशल्य पणाला लावून पुढचा प्रवास सुरु होता.पुढे वनविभागाचे कार्यालय,तपासणी नाका,वनविभागाच्या रितसर परवानग्या झाल्यानंतर भैरवगडाच्या दिशेने कूच केले.

                क्रमशः
(दुर्गभ्रमंती रविवार दि.१५ मार्च २०२०)
⛳⛳⛳⛳⛳⛳
श्री.उद्धव पवार,सातारा


भ्रमणध्वनी - ९८८१०७२१३७

दाट रानातला सवंगडी - किल्ले भैरवगड

दाट रानातला सवंगडी - किल्ले भैरवगड





              भाग - ४
⛳⛳⛳⛳⛳⛳
        भैरवगडावर जाण्यासाठी अनेक वाटा असल्या तरी घाटावरून पाथरपुंज येथून तर कोकणातील पाते येथून गडावर जाण्यासाठी दोन मुख्य वाटा आहेत. पहिला मार्ग सातारा-पाटण-गोवारे-पाथरपुंज-भैरवगड असा गाडीमार्ग असून हे अंतर ९० कि.मी.आहे. यातील शेवटचा १५ किमी.रस्ता अभयारण्य असल्याने कच्चा असून केवळ जीपसारखे वाहन या रस्त्याने जाऊ शकते. २०१२ साली भैरवगड अभयारण्य व्याघ्रप्रकल्प घोषित झाल्याने हेळवाकहून पाथरपुंज- भैरवगडकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर वनखात्याने चौकी बसवलेली असून आत प्रवेश करण्यासाठी कडक नियम बनवले आहेत. अभयारण्यात प्लास्टिक वस्तू नेण्यास मनाई असून या ठिकाणी प्रती व्यक्ती काही ठराविक प्रवेश शुल्क भरल्यावर आत प्रवेश दिला जातो. या वाटेने वाहनाने आपण थेट भैरवनाथ मंदीराकडे पोहोचतो. भैरवनाथ मंदीर व भैरवगड ही दोन्ही ठिकाणे अभयारण्यात असल्याने येथे राहण्यासाठी सक्त मनाई असून संध्याकाळी ५.०० नंतर अभयारण्यात थांबल्यास मोठा दंड आकारला जातो. पावसाळा व काही ठराविक दिवशी अभयारण्यात प्रवेश दिला जात नाही. गडावर येणारी दुसरी वाट कोकणातील पाते या पायथ्याच्या गावातून थेट भैरवनाथ मंदिराकडे वर चढते. चिपळूण-आसुर्डे-तळवडे-गोवळपाते असा गाडीमार्ग असून हे अंतर ४५ कि.मी.आहे. यातील शेवटच्या टप्प्यातील ४ कि.मी.रस्ता कच्चा असून उजवीकडील रस्ता गोवळ गावात तर डावीकडील रस्ता पाते गावात जाते. पाते गावापर्यंत जाण्यासाठी चिपळूणहुन एस्.टी.ची सोय आहे. पाते गावात असलेल्या हनुमान मंदिरात राहण्याची सोय होते. या मंदिराच्या आवारात आपल्याला अर्धी तुटलेली तोफ पहायला मिळते. पाते गावातून पायऱ्यांची वाट तासाभरात आपल्याला भैरवगडाखाली असलेल्या पठारावर आणून सोडते.

       थोड्या वेळात आपण दरीच्या काठावर असलेल्या प्रशस्त भैरवनाथ मंदिरासमोर पोहोचतो. कोकणातील पाते गावातून इथवर येण्यास दोन तास पुरेसे होतात. कधीकाळी कौलारू असलेल्या या पुरातन मंदिराने आता सिमेंट-कॉन्क्रीटचे रूप धारण केले आहे.यात्रा जवळ आली असल्याने काहीजण या मंदीर परिसराची सफाई करीत होते. या भैरवनाथा मुळेच हा गड भैरवगड म्हणून ओळखला जातो. मंदिरात दोन गाभारे असून एका गाभाऱ्यात कालभैरव व जोगेश्वरी देवीची मुर्ती असून दुसऱ्या गाभाऱ्यात विठलाई,लक्ष्मी व वाघजई देवीची मुर्ती आहे. काळ्या पाषाणात घडवलेल्या या मुर्ती साधारण २.५ ते ३ फुट उंच आहेत. मंदिराच्या आवारात एक लहान तुळशीवृंदावन असून मंदिराच्या उजव्या बाजूला दुर्गप्रेमी शिवभक्तांनी एका खडकावर शिवरायांचा छोटा धातूचा पुतळा उभारला आहे.

     वनखात्याच्या कारवाईस सामोरे जाण्याची तयारी असल्यास या मंदिरात ३०-४० जण सहज राहू शकतात. वन्यजीवांचा येथे मोठया प्रमाणात वावर असल्याने बाहेर थांबणे धोकादायक आहे. नीलगाई व गवे येथे सहजपणे दर्शन देऊन जातात. मंदिराच्या मागे कोकणातील दुर्गवाडी गावात उतरणारी वाट असून या वाटेने काही अंतर खाली आल्यावर एक बारमाही पाणी असलेली लहान चौकोनी विहिर आहे. याशिवाय पाथरपुंजकडून मंदिराकडे येणाऱ्या कच्च्या रस्त्याने चालत गेल्यास डावीकडे दरीत उतरणारी वाट दिसते.या वाटेने काही अंतर खाली उतरल्यावर एक पाण्याचं टाकं पहायला मिळते.

               क्रमशः
(दुर्गभ्रमंती रविवार दि.१५ मार्च २०२०)
दाट रानातला सवंगडी - किल्ले भैरवगड
              भाग - ५







⛳⛳⛳⛳⛳⛳

      भैरवगड किल्ला मंदिरासमोरील डोंगरावर असून एका चिंचोळ्या धारेने सह्याद्रीच्या मुख्य रांगेला जोडलेला आहे. मंदिराच्या डाव्या बाजूने पाते गावाकडे खाली उतरणाऱ्या पायवाटेने किल्ल्याच्या डोंगरावर पोहचल्यावर एक बांधीव बुरुज दिसतो. हा बुरुज व गडाचा डोंगर याला लागून गडाचा पहिला उत्तराभिमुख दरवाजा असावा पण आज मात्र या दरवाजाचे कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. येथून डोंगराला वळसा मारत पुढे आल्यावर दरीच्या काठावर बुरुज असलेला ढासळलेल्या अवस्थेतील दुसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. या दरवाजाचा आज केवळ तळातील पायाच शिल्लक आहे. या दरवाजातून पुढे आल्यावर टेकडीच्या चढावावर तिसरा दक्षिणाभिमुख दरवाजा आहे. या दरवाजा शेजारील केवळ भिंती शिल्लक असुन वरील कमान पुर्णपणे ढासळली आहे. टेकाडाला वळसा मारून जाताना वाटेच्या डाव्या बाजुस उतारावर खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे पण ते केवळ समोरच्या टेकडावर गेल्यावरच नजरेस पडते. गडाच्या मागील बाजूस गेल्यावर येथे पाण्याची दोन जोडटाकी आहेत. यातील एक टाके कोरडे पडले असुन दुसऱ्या टाक्यातील पाणी शेवाळलेले आहे.

        भैरवगड दोन टेकड्यांचा मिळून बनला असुन दक्षिणोत्तर पसरलेल्या या दोन्ही टेकडाना जोडणारी निमूळती खिंड आहे. या दोन्ही टेकडीचा माथा साधारण १४ एकरवर पसरलेला असुन किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून २९१० फुट आहे. या सोंडेवरील वाटेने पलीकडे पश्चिमेच्या टेकडीवर जाता येते. या वाटेवर खडक खोदून बांधकामासाठी काढलेल्या दगडाची खाण व पाते गावात उतरणारी कड्यावरील वाट दिसते. या टेकडीचा माथा फारच लहान असुन त्याच्या माथ्यावर एक व वाटेवर एक असे दोन लहान चौथरे पहायला मिळतात. टेकडाच्या पश्चिम बाजुला डोंगर उतारावर खडकात खोदलेले अजून एक टाके पहायला मिळते. उर्वरीत अवशेष असल्यास झाडीत हरवले आहेत. ही टेकडी पाहुन पाण्याच्या जोडटाक्याकडे आल्यावर या टाक्याच्या मागील वाटेने किल्ल्याच्या दुसऱ्या टेकडीच्या माथ्यावर जावे. या टेकडीच्या माथ्यावर बऱ्यापैकी सपाटी असुन गडाची मुख्य वस्ती याच भागात असावी कारण येथे मोठया प्रमाणात घरांची जोती दिसुन येतात. गडाचा हा माथा तटबंदीने बंदीस्त केला असुन त्यात एका वाड्याचा चौथरा व भिंती पहायला मिळतात. या टेकडीला वळसा मारून उतरताना उतारावर आज ही भिंतीसकट उभी असलेली वास्तु पहायला मिळते. या वाटेने टेकडीला वळसा मारत आपण प्रवेश केलेल्या तिसऱ्या दरवाजाच्या वरील बाजुस येतो व आपली गडफेरी पुर्ण होते.

      गडावरून लांबवर पसरलेलं कोयनेचं दाट जंगल तसेच प्रचितगड,जंगली जयगड, वासोटा, गुणवंतगड, दातेगड हे किल्ले नजरेस पडतात. संपुर्ण गड फिरण्यास २ तास पुरेसे होतात. १२ व्या शतकात शिलाहार राजा भोज याने या किल्ल्याची बांधणी केल्याचे मानले जाते. ह्या गडाला सारंगगड असे दुसरे नाव असुन ते फारसे प्रचलित नाही. गडाचे भौगोलिक स्थान व आकार पहाता याचा वापर केवळ टेहळणीसाठी होत असावा. बहामनी काळात शिर्के घराण्याच्या ताब्यातील हा किल्ला इ.स.१४५३ मध्ये मलिक उत्तुजार याने घेतला. शिवाजी महाराजांनी सन १६६१ च्या सुमारास दक्षिण कोकणावर स्वारी केली असता शृंगारपुर ताब्यात घेतले. त्याच काळात भैरवगड देखील त्यांच्या ताब्यात आला असावा.

      किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे.त्याचे जतन,संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे.भैरवगड हा तसा टेहळणीसाठी बांधलेला गड.त्यावर थोडीफार बांधकामं,तटबंदी,बुरूज,दरवाजे,पाण्याची टाकी हे अवशेष असणार,मात्र आज ते उरलेचं नाहीत,अशी स्थिती आहे.इतिहासाचे हे साक्षीदार,वैभव नष्ट होत आहे याची खंत मनोमन वाटत राहते.


                समाप्त







No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...