Friday, July 18, 2025

रायगड परिक्रमा – ‘निसर्गची’ लहर

 https://dhavalr.wordpress.com/


९ जानेवारी माझा प्रकटदिन. याच घटनेचे औचित्य साधून मी आमच्या सौ ला एक प्रदक्षिणा मारली आणि ,मागणी केली – फिरस्ती महाराष्ट्राची रायगड प्रदक्षिणा!  वाढदिवसाची जादू चल गयी आणि त्वरित होकार मिळाला. मी त्याच तत्परतेने उपक्रमासाठी नाव नोंदविले. प्लॅन असा होता की मी ९ जानेवारीलाच रात्री ११.२० वाजता मुंबईहून महाराष्ट महामंडळाच्या लाल परीने पाचाडकडे प्रयाण करणार आणि १० तारखेला ५ पर्यंत पोचणार. पुण्याहून फिरस्तीचा चमू पहाटे ४ वाजतच पोचणार होता.

ठरल्याप्रमाणे मी नेरूळला ११ वाजता पोचलो पण एक तास थांबून आणि इतर बसचे दिवे बघून डोळे दिपले तरी बसचा पत्ताच नाही. मनात शंकेची पाल चुकचुकली, जर बस फ्लायओव्हर वरून निघून गेली असेल तर? माझा बर्थडे ट्रेक होऊ शकला नाही तर? शेवटी बोरिवली कंट्रोल रूम ला फोन केला आणि समजले की मालाडला पुलाचे काम चालू असल्यामुळे ट्रॅफिक होता आणि बस आता वाशीच्या पुढे आहे. हे ऐकून हायसे झाले. ११.२० ला येणारी बस १२.२० वाजता आली आणि मी पाचाडकडे मार्गस्थ झालो.

तास दोन तास झोप लागली असेल आणि ३ वाजताच जाग आली. आणि महाडला पोचेपर्यंत पुढचा एक तास मी लाल परी रात्रीची रस्त्यावरून कशी उडत जाते याचा अनुभव घेतला. भन्नाट वेग, काळोखात वळणावर ओव्हरटेकिंग, काम चाललेल्या रस्त्यावर शूमाकर दिमाखात चालवणे वगैरे मज्जा मज्जा. महाडमध्ये बस विसावली आणि कळले की अजून ५० मिनिटे बस इथेच थांबणार आहे आणि मग पाचाड कडे प्रयाण करणार आहे. लगेच शंतनूला फोन लावला कारण ४ वाजता ते महाडच्या जवळपास असण्याची शक्यता होती. पण फोन काही लागेना. मग निवांतपणे, असहाय्यपणे सीटवर पडून राहिलो. शेवटी सकाळी साडे पाच वाजता मी पाचाडमध्ये देशमुख हॉटेल वर जाऊन पोचलो.

पोचताच समोर शंतनू उभा. बरोबर विनायक. आधी खात्रीच बसेना की हा विनायक आहे, कारण त्याला तब्बल १० किंवा जास्त वर्षांनी प्रत्यक्षात परत भेटलो होतो. माझे स्वागत करत शंतनू म्हणाला, “अगदी वेळेत आलात. नाश्ता सुरु झाला आहे.” पण मला घाई होती सर्वात महत्वाचे काम संपवायची आणि मी ते रांगेत उभे राहून उरकून आलो. आता अक्खा दिवस आपलाच होता. गरम पोह्यांचा नाश्ता खाऊन झाल्यावर आम्ही पुण्याहून आलेल्या बसने रोप-वे पर्यंत गेलो. त्याआधी महत्वाच्या सूचनांबरोबर प्रत्येकाला एनर्जी बुस्टर म्हणून एक रिअल फ्रुट ज्यूसचे पॅक आणि एक छोटे चिक्कीचे पॅकेट देण्यात आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की दुपारच्या जेवणाचे पॅकेट दिले गेले नव्हते. मग दुपारी खायचे काय होते? पण उत्साहात कोणाच्या लक्षात आले नसावे किंवा बाकीच्यांना याचा अंदाज दिला गेला असावा (मी व्हाट्सअप ग्रुप मध्ये नव्हतो).

Raigad Pradakshina
एनर्जी बुस्टर आणि दुपारचे जेवण

१० जानेवारीला ठीक सकाळी ६.४५ वाजता आम्ही चिट दरवाज्यापासून, म्हणजेच जिथे रायगडावर चढायला पायऱ्या सुरु होतात तेथून पासून रायगड प्रदक्षिणेला सुरुवात केली. सुरुवातीलाच रायगडच्या भोवती पसरलेल्या परिसराने ढगांनी आच्छादलेला नयनरम्य नजारा सादर करून आमचे स्वागत केले. तेथूनच आम्ही उभ्या खड्या टकमक टोकाकडे टक लावून बघून घेतले.

Raigad Pradakshina2
समोर उभा सुळका दिसत आहे तो आहे टकमक टोक
Raigad Pradakshina Mist
चिट दरवाज्यापासून दिसणारा आमचा ‘स्वागत’ नजारा

खिंड अखंड

सुरुवातीपासून आम्हाला सांगण्यात येत होते की सकाळची वेळ आहे तेव्हा पटापट अंतर कापा म्हणजे आपण जेव्हा खिंडीत पोहोचू तेव्हा ती चढून पार करायला पुरेसा वेळ मिळेल. सुरुवातीलाच वाट एका शेतातून जात होती. शंतनू एका वाटेने गेला पण मी शेवटी असल्यामुळे विनायक दुसऱ्या वाटेने गेलेला बघून त्याच्याबरोबर निघालो. वाटलं की पुढे जाऊन सगळे एकत्र भेटूच, पण तिथून जे शंतनू आणि ग्रुप बरोबर संपर्क तुटला तो बऱ्याच वेळानंतर पुनः प्रस्थापित झाला. आणि त्यानंतर जो संपर्क तुटला तो थेट संध्याकाळी उतरल्यावर देशमुख हॉटेल मध्ये परत भेट झाली . यावरून एक अंदाज बांधता येईल की जावळीचे जंगल केवढे निबिड आणि दाट असू शकेल.

सर्वात मागे मी, विनायक आणि कोल्हापूरचे दोघे तिघे होते. गप्पा मारत मारत, लिंगाणा आणि इतर उत्तुंग पर्वत बघत आम्ही पुढे सरकत होतो, पण विनायकाचा खिंड गाठायची आहे, लवकर जायला हवे हा घोष चालूच होता. बरोबर परांजपे नावाचे स्टार इन्शुरन्स मध्ये काम करणारे गृहस्थ होते. त्यांना पाठीवरची सॅक जड वाटू लागली. सॅक मध्ये काय आहे विचारल्यावर एक भली मोठी यादीच मिळाली. त्यात एक दुर्बीण आणि इअरफोनही होते, मग का नाही सॅक जड होणार.

Raigad Pradakshina Raynak Samadhi
प्रदक्षिणा मार्गावर असणारी रायनाक यांची समाधी

आम्ही आता जावळीच्या जंगलात शिरत होतो, झाडी दाट होत चालली होती, वाट वर खाली, तर झाडे आडवी तिडवी  पडलेली होती. काही वेळातच विनायकशीही संपर्क तुटला आणि मी पुढे दुसऱ्याच चमूबरोबर जावळीत शिरलो. काही वेळातच आम्ही सगळे एकत्र आलो. शंतनू आणि इतर १०-१५ जण एका ठिकाणी खडकावर विसावलेले आढळले. कारण असे होते की जेथे आम्ही थांबलो होतो तेथून पुढचा रास्ता कोणालाच सापडत नव्हता. एखादा कडा खचल्यावर होतो तास तो भाग दिसत होता. नशीबाने आमच्यापुढे एक पिवळे टी-शर्ट घातलेल्या १५ जणांचा ग्रुप गेला होता. त्यांनी पुढे जाऊन रस्ता  शोधला आणि आमची तुकडी पुढे रवाना झाली. या पिवळ्या शर्टवाल्या समूहाची महती आम्हाला लवकरच कळणार होती.

आता वाट बिकट होत चालली होती. पावसाळ्यात आलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे रायगड प्रदक्षिणा मार्गाचा नकाशाच बदलल्यासारखा झाला होता. मोठाली झाडे मुळापासून उन्मळून रस्त्यात आडवी झाली होती. रानटी जंगल सगळीकडे माजले होते. जसे एक एक पाऊल पुढे टाकत जात होतो, तसे आम्ही एक एक आडवे पडलेले झाड त्यावर चढून किंवा त्याखालून वाकून जाऊन  पार करत होतो आणि खिंडीच्या दिशेने वाटचाल चालू होती.

Raigad Pradakshina Route1
पूर्ण वाट ही अशीच, झाड वेलीतून, कधी पाय अडकतो तर कधी हात
Raigad Pradakshina Route
निसर्गातून रस्ता काढत वाटचाल सुरु

दगड दगड, लपा दगड

आत इतर जणांबरोबर एक निळा, जाड जॅकेट घालणारा ट्रेकर माझ्यापुढे, माझ्याबरोबर चालत होता. मी आश्चर्य केले की जिथे एवढी आर्द्रता आहे, प्रत्येक पाऊली घाम टपकत आहे तिथे हा इतके जाड जॅकेट घालून कसा चढू शकतो. पुढे बोलता बोलता कळले की त्याचे नाव शिरीष गोडबोले आणि वय ४२, म्हणजे सेम पिंच की! मलाच राहवले नाही म्हणून एक दोनदा त्याला सुचवून बघितले की हे जाड जॅकेट काढले तर बरे वाटेल पण तो काही जॅकेट उतरवायला तयार दिसेना. योगायोग म्हणा पण तेथून पुढे ते पाचाड गाठेपर्यंत आम्ही एकत्र होतो, एका टीम सारखे. हे असे प्रत्येक ट्रेक मध्ये होते. नकळत, आपसूक टीम तयार होतात. त्या त्या वातावरणात लोक जोडले जातात.

आता संपूर्ण चढणच सुरु होती. एका ठिकाणी एक मोठाले झाड आडवे आले. त्याच्यापुढे आणखी खडा चढ दिसत होता. आम्ही वाकून झाडाखालून पुढे जाऊ लागलो तर ‘वॊच आऊट’ असे जोरात ओरडणे कानावर आदळले आणि दणादण दोन मोठाले दगड आमच्या दिशेनं मोठ्या वेगाने पुढच्या उतारावरून गडगडताना येताना दिसले. राजनीकांतलाही लाजवेल अशा चपळतेने (जीवाच्या भीतीने) मी लगेच बाजूला झालो आणि सिनेमात हिरो बंदुकीची गोळी चुकवतो तास दगड चुकवला. दोन मिनिटे थांबून वर बघितले तर भुसभूशीत माती, जमीन आणि दगड गोटे याशिवाय पुढच्या चढणावर काहीच दिसत नव्हते. जो कोण चढून वर जात होते, आणि ज्याच्या बुटांना ग्रीप नव्हती हो हमखास खाली आमच्यादिशेने दगड धाडत होता. मी आणि शिरीष ५-१० मिनिटे तिथेच थांबलो. विचार केला की पुढच्याला पूर्ण वर जाऊ दे मग नंतरच जाऊ नाहीतर आपले कपाळमोक्ष याच ठिकाणी ठरलेले दिसत होते. एका मोठ्या झाडाचा आडोसा घेत आम्ही उभे होतो. वरून दगड घरंगळत येण्याचा क्रम चालूच होता. आमच्यामागून काही तरुण आले आणि थोडी वाट बघून दगडांची पर्वा न करता त्या दगडांमधून आणखी दगड आमच्या दिशेने सोडत वर गेले. मग आम्हीही विचार केला की इथे थांबून काही होणार नाही, दगड तर दगड, आपण वर जाऊयात. शिरीषने मला धक्का दिला आणि आमची चढाई परत सुरु झाली. आधी आम्ही वॉटरफॉल पॅच पार केला होता आणि आता हा ‘रॉकफॉल पॅच’ पार करू लागलो.

चाचपडत, एक एक पाऊल काळजीपूर्वक टाकत, उरल्यासुरल्या वेलींचा आधार घेत आम्ही ते चढण पार केले. पण या चढणीत वेलींचा आधार मोलाचा ठरला, जणू ते नैसर्गिक कलाईम्बिंग रोपच लावले होते. ‘निसर्ग’ चक्रीवादळाने ती एक कृपा आमच्यावर केली होती. एवढे चढण करून आलो तरी आम्हाला पत्ता नव्हता की ती खिंड ज्याचा सकाळपासून बाऊ सुरु होता ती खिंड आहे कुठे, लागणार कधी, आम्ही ती चढणार कधी? पुढे चढ लागत होता, आम्ही चढत होतो एवढेच आम्हाला माहीत होते. जॉर्ज मॅलोरी या प्रसिद्ध ब्रिटिश एवरेस्ट वीराला एकदा विचारले गेले, ” तुम्हाला एव्हरेस्टवर चढण्यासारखे का वाटले?” मॅलोरी ने निवांतपणे उत्तर दिले, “कारण तो तिथे आहे.” तसेच आम्ही तो निरंतर चढ चढत होतो, कारण तो तिथे होता.

Raigad Pradakshina Happy Route

सुरुवातीला बघितले होते की विनायक आणि शंतनू एएएएएए… ओओओओ असे मोठ्याने ओरडून पुढे गेलेल्या तुकडीची चाहूल घेत होते. ते बघून आम्हीही आता मध्ये मध्ये एएएएएए… ओओओओ ओरडून आम्ही जातोय तो रास्ता बरोबर आहे ना याची खात्री करून घेऊ लागलो. पण हळू हळू अंतर वाढू लागले, जावळीचे खोरे दाट होत गेले आणि झाडीत ओरडाही विरून जायला लागला.

पिवळी खिंड

आणि चढता चढता अचानक आम्ही खिंडीत येऊन पोहोचलो. बघितले तर तिथे त्या खिंडीतल्या छोटाशा पठारावर ते १५ पिवळ्या टी शर्ट वाले ट्रेककर निवांत पहुडले होते. मी आणि शिरीश त्यांच्यातच जाऊन विसावलो आणि गप्पांना तोंड फुटले. त्यांच्या ग्रुपचे नाव  ‘Falcon’ आणि सर्व पन्नाशी पार केलेलं तसे वयस्कर ट्रेकर होते. पण त्यांची तडफ, क्षमता आणि ट्रेक करण्याचा आवाका कोणालाही लाजवेल असा होता. त्यांच्याला सर्वात वयस्कर ‘नाना’ ६८ वर्षांचा तरुण होता. बोलता बोलता कळले की त्यांच्यातलाच बरेच टेल्को कंपनी मध्ये काम करतात. लगेच शिरीषची नाळ जुळली कारण तो ही २००७ पर्यंत टेल्को मध्ये होता. भाईबंद भेटताच ते सारे आणखी खुलले.

खिंडीतून एक वाट खाली उतरत जाते. पण या चमूचा विचार वेगळाच होता. उजवीकडे झाडीतून एक वाट (वाट अशी नव्हतीच) वर जात होती ती थेट भवानी टोकाकडे. ती वाट पकडायची, रायगडाचे भवानी टोक गाठायचे आणि परत खिंडीत येऊन खाली उतरायचे. पण ती वाट बिकट असणार कारण त्या योजनेला फार कोणाचा उत्साह दिसला नाही. मग प्लॅन बदलला. खिंड उतरायची, आईसक्रीम खायचे आणि तडक मंडणगड गाठायचा, चढाई करायची आणि मग घराकडे निघायचे असा नवीन प्लॅन ठरला.

इथे अर्धी रायगड प्रदक्षिणा करून आमचा जीव अर्धा झाला होता आणि ही मंडळी प्रदक्षिणा पूर्ण करून त्याच दिवशी आणखी एक गड सर करणार होते. त्यांना मी मनोमन वंदन करत होतो इतक्यात ते सर्व उठले आणि आमचा निरोप घेऊन खिंड उतरायला सुरुवातही केली.

चढाई संपली, आता उतारा!

५ मिनिटे विश्रांती घेऊन, मागून कोणी येत आहे का याची वाट बघून मी आणि शिरीषही निघालो. तिथे खिंडीतच आणखी एक मुलगा आमच्या बरोबर यायला लागला. त्याचे नाव संस्कार पाटील, कोल्हापूरचा गडी. असे आम्ही तिघे खिंड उतरायला लागलो. चढताना जसा भुसभुशीत चढ होता तसा उतरताना ही सगळी सैल माती आणि दगड होते. म्हटलं झालं कल्याण, पण उतरणे भाग होते. जसा चढ होता म्हणून चढत होतो तसेच उतार होता म्हणून उतरायला लागलो. नशीबाने सुरुवातीचा भुसभुशीत पॅच लवकर संपला आणि भक्कम उतार सुरु झाला.

दाट झाडी होती पण आता वाट बरीच सोपी झाली. मध्येच सरळ पायवाट तर कधी थोडा चढ आणि मग उतार. एएएएएए… ओओओओओओ अशी किंकाळी ठोकली तर पुढून काही अंतरावरून त्याची प्रतिध्वनी येऊन थडकली. ५-१० मिनिटात आम्ही त्या आवाजापाशी पोहोचलो. बघितलं  तर खिंडीतून पुढे गेलेले ८-१० जण कोरड्या झऱ्याच्या/धबधब्याच्या दगडांवर आराम करत होते. क्षणाचाही विलंब न लावता आम्ही मिळेल तो दगड मऊ फोम समजून त्यावर अंग टाकले.

Raigad Pradakshina Sleep
दगडी बिछान्यावर विसाव्याची जागा

घाम निरंतर टपकत होता आणि नुसते पाणी पिऊन पिऊन किती पिणार? समतोल बिघडणारच आणि बिघडलाच. उतरताना मला एकदा क्रॅम्प येऊन गेला होता त्यामुळे आता जबरदस्ती पाणी पिऊन थोडी थोडी विश्रांती घेणे क्रमप्राप्त होते. पुढे अजून किमान ३-४ कि.मी. चा उतार पार करायचा होता. दगडांवर पाठ टेकली, पाय ताठ केले, मोकळे सोडले, एका दगडावर डोके विसावले आणि डोळे मिटून क्षणिक स्वर्गात प्रवेश करणार आणि… घुईं घुईं घुईं घुईं

डासांची निरंतर भुणभुण कानाशी सुरु झाली. हातात टोपी होती, तिला वापरून कानाभोवती वारा घालू लागलो. वर आकाशाकडे बघितले तर झाडांच्या हिरव्यागार पानांमधून पलीकडचे पांढरे आकाश आमची मज्जा बघत असलेले जाणवले. माझ्या बाजूलाच पांढरा टी शर्ट घातलेला अमित कुलकर्णी दगडी बिछान्यावर आडवा झाला होता. गप्पा सुरु झाल्या आणि कळले की अमित बिबवेवाडी ला आमच्या घरापासून जेमतेम १०० मीटर अंतरावर राहतो. वाह, गल्लीवाला मिल गया!

Raigad Pradakshina Nature
आम्ही दगडांवर झोपलो होतो आणि हे कीटक पानावर सामूहिकरित्या विसावले होते

माश्यांची भुणभुण आणखी सहन करणे अशक्य झाली आणि पाच दहा मिनिटात ती तुकडी जाण्यासाठी उठली. त्यांना इथे झोपून अर्धा तास झाला होता. काही वेळ विश्रांती घेऊन आम्ही तिघेही निघालो. यापुढची वाट काही अवघड नव्हती पण प्रचंड दमछाक करणारी होती कारण उतार काही काळच असायचा, मग परत थोडा चढ, मग परत उतार मग परत थोडा चढ. चढताना खिंडीचा चढ कोणता हे कळत नव्हते, आणि उतरतानाचा उतार कोणता तेही कळेनासे झाले. आता पुढे जवळ कोणी राहिले नव्हते आणि मागे तर कोणाचा पत्ताच नव्हता. झाडी अजूनही दाट होती आणि काही ठिकाणी तर असा भास व्हायचा की लवकरच संध्याकाळ होणार आणि छातीत धस्स व्हायचे. या जंगलात दिवसा रस्ता सापडणे अवघड होते, तिथं अंधार पडल्यावर काय होणार!

अशा वेळी दगडांवर, झाडांवर रंगवलेले दिशादर्शक पिवळे बाण हेच काय आमचे रक्षणकर्ता होते. ते जी दिशा दर्शवतायत ती ब्रम्हदिशा. कधी मी पुढे तर कधी शिरीष पुढे असे उतरू-चढू लागलो.

Raigad Pradakshina Lifeline Arrows
अचूक रस्ता दाखवणारे बाण
Raigad Pradakshina Lifeline Ribbon
रस्ता दर्शवण्यासाठी बांधलेली रिबीन

एव्हाने २ वाजले होते. पोटात प्रचंड भूक लागली. बरोबर पॅकेड जेवण तर मिळाले नव्हतेच. मी ही राजगड अनुभवावर विसंबून दुपारच्या जेवणाची चौकशी केली नव्हती नाहीतर काहीतरी खाणे बरोबर ठेवले असते. सकाळी मिळालेला रिअल ज्यूस आणि चिक्कीचा तुकडा तर कधीच खाऊन फस्त झाला होता. पोट भूक भूक याचना करू लागले पण आम्ही चालताच राहिलो. अर्ध्या तासात माझी भूक अनावर झाली. पण इलाज नव्हता, शेवटी शिरीषकडचे थोडे ड्राय फ्रुट तोंडात टाकले. पण रखरखत्या उन्हात कोरड्या, भेगा पडलेल्या जमिनीवर पाण्याचा एक थेंब पडला तर तो जसा क्षणात विरून जाईल तसेच त्या ड्राय फ्रूटचे झाले. पोटातल्या अग्नीने खाल्ल्याक्षणी ते भस्म करून टाकले. परत भूक एके भूक.

अशा थकलेल्या पायांनी, भुकेल्या शरीराने, शिणलेल्या मानाने मी वाटचाल चालू ठेवली. शिरीषची तर कमालच होती. त्याच्या डाव्या पायाच्या गुडघ्यात एक कृत्रिम लिगामेंट प्रत्यारोपण केली होता, आणि त्याच्यावर भार आणि विश्वास टाकून तो उतरत होता. संस्कार तर एक एक पाऊल असे टाकत होता जसे १०० किलो वजन उचलून चालत आहे. शिरीष पूर्णपणे थकला होता, थांबलो तरी त्याला लागलेला दम थांबत नव्हता. दर १५ मिनिटांनी ब्रेक असे चालले होते पण मी म्हटले की असे थांबत राहिलो तर खाली पोचायला खूप उशीर होईल. मग एकमेकास  सहायय करत, मानसिक धीर देत आम्ही जाऊ लागलो.

‘ताक’दूत

पण रायगड आणि जावळी आम्हाला असे असहाय्य राहू देणार नव्हते. पुढे काही अंतरावरून बोलण्याचे आवाज कानावर पडले. पुढे आपलीच तुकडी असेल असे समजून आम्ही आरोळी दिली पण काही उत्तर नाही. अजून पुढे गेलो तर झाडे तोडण्याचा आवाज आला आणि समजले की हे तर गाववाले आहेत. एवढ्यात ‘ताक ताक, ताक… ताक घ्या हो ताक’ हे शब्द कानावर आले आणि आनंद न गगनात मावेना न जावळीच्या दाट जंगलात. एक काळा शर्ट घातलेला माणूस आला आणि विचारले, “ताक इथे आनु, की तुम्ही तिथे याल?” आम्ही लागलीच तिथे गेलो.

तो जवळच्या पाड्यात राहणार एक वयस्कर माणूस होता. एका टोपलीत २ छोटे काचेचे ग्लास आणि काळ्या मडक्यात ताक घेऊन तो आमची वाट बघत बसला होता. २० रुपये ग्लास ताक! आम्ही भराभर २ ग्लास ताक रिचवले. तिसरा ग्लास ताकही पिऊन झाले. आता पैसे द्यायचे, इतक्यात शिरीषने ५०० रुपयाची नोट त्या म्हाताऱ्याच्या हातावर ठेवली आणि पैसे तुम्हीच ठेवा असे सांगितले. एक क्षण त्या आजोबांनाही विश्वास बसेना आणि ते हर्षाचे व कृतज्ञतेचे भाव त्यांच्या डोळ्यात स्पष्ट जाणवले. शिरीषने त्यांचे हाल-अपेष्टांचे जीवन याचे भान ठेवून थोडी मदत केली होती. ताक पिऊन अंगात जरा तरतरी आली. आम्ही जायला निघालो तर ते ताकवाले आजोबाही आवरा आवारी करताना दिसले. बहुतेक ५०० ने त्यांची दिवसाची कमाई झाली होती आणि ते आनंदाने घरी निघाले होते. जाताना विचारले तर आजोबा म्हणाले की पक्का रास्ता १५ मिनिटातच येईल. ही शुभवार्ता घेऊन आम्ही उताराची शेवटची चढाई सुरु केली. खरोखर १५ मिनिटात एक कच्चा रस्ता लागला. ताक प्यायलो होतो तरी भूक काही पूर्ण शामली नव्हती. शेवटी शिरीषकडचा एक बिस्किटाचा पुडाही काढला.

Raigad Pradakshina Taak man
कायम हसरा चेहरा, वय ८०+ असे हे आजोबा आमच्यासाठी देवदूतासमान भासले
Raigad Pradakshina Dhaval Shirish Sanskar
ताक रुपी अमृत प्राशन करणारे धवल, शिरीष आणि संस्कार

तो कच्चा रस्ता पुढे डांबरी रस्त्याला जाऊन मिळाला आणि आम्ही मनोमन हर्षलो. पण ते तेवढ्यापुरतेच. समोर रायगड रोप वे दिसत होता, पण तो बराच लांब दिसत होता. म्हणजे अजून चालायचे होते, ते ही डांबरी रस्त्यावरून. संस्कार सारखा म्हणत होता की कोणती गाडी मागाहून यायला पाहिजे आणि लिफ्ट मिळाली पाहिजे. इच्छाशक्तीने काम केले आणि एक बाइकवाला येताना दिसला. संस्काराने हात केला आणि तो थांबलाही. रोप वे पर्यंत सोडायची विनंती ही मान्य केली. मग सर्वात थकलेल्या शिरीषला बाईकवर बसवले आणि पुढे धाडले. मी आणि संस्कार रस्ता तुडवू लागलो आणि एक एक दुखरे पाऊल पुढे टाकत रोप-वे जवळ करू लागलो. माझा डाव्या पायाची किरंगळी खूप दुखू लागली होती. मला वाटले ब्लिस्टर असणार, पण कळा खूप येत होत्या. १० मिनिटात समोर परत शिरीष, रस्त्याच्या बाजूला एका खुर्चीवर बसलेला दिसला.

Raigad Pradakshina Rope Way
दिसतो समोर खूप गोड
पण चालत जायला आहे १ कि.मी. तंगडीतोड

पोटोबा प्रसन्न

आता काहीही करून काहीही खायचे होते. मागचे येईपर्यंत वाट बघण्यात अर्थ नव्हता. घड्याळात ३.३० वाजले होते. बस कडे जात असताना आम्हाला एक दोन पिवळ्या शर्टवाले falcon ग्रुपचे मेंबर गावातून वर येताना दिसले. परत भेट झाली आणि कळाले की ते गावात एकाकडे जेवण करून येत आहेत. आम्ही लगेच घर विचारले आणि तिकडे जेवणासाठी प्रस्थान केले. मस्त भाकरी, वांगं बटाट्याची भाजी, भात, डाळ, तळलेले पापड असे गरमागरम जेवण झाले आणि जीवात जीव आला.

Raigad Pradakshina Lunch
गावातल्या एका घरात गरमागरम जेवण, पोटोबा प्रसन्न!

आणि मग जाणीव झाली की आपण डोंगर दऱ्यातून १५ कि.मी. ची रायगड प्रदक्षिणा पूर्ण केली आहे आणि खाली मध्ये पोहोचलो आहे. अचानक मन ताजे, पाय तागडे, आणि अंगात स्फूर्ती आली. आम्ही सकाळी ६.४५ वाजता प्रदक्षिणा सुरु केली आणि दुपारी ३.३० वाजता तब्बल ९ तास घाम गाळून जावळी जंगलातून खाली उतरलो होतो.

बस मध्ये जाऊन टी शर्ट बदलला. चांगली गोष्ट अशी की दिवसभर गायब असणारे वारे आता मुक्तपणे वाहू लागले होते. थोड्या वेळातच शंतनू बाकीच्या ग्रुप मेंबर्सना घेऊन खाली उतरला. आम्ही बस घेऊन त्यांना घ्यायला गेलो आणि मग थेट देशमुख हॉटेल वर ५.३० वाजता जेवण!

१० तारखेला संध्याकाळी ठीक ६.४५ वाजता आमची बस पाचाडहून पुण्याच्या दिशेकडे निघाली.

एरवी फिरस्ती महाराष्ट्राची वारसा सहल जेव्हा असते तेव्हा परतीच्या प्रवासात सगळे थोडे तरी उत्साही असतात कारण श्रम फारसे झालेले नसतात. पण या वेळी सगळे इतके थकले होते की बसमध्ये बसल्यापासून कोणीही जास्त बोलायलाच्या स्थितीत नव्हते. सगळे गप सीटवर पडून, झोपून होते, ते थेट पुणे येईपर्यंत. ११ तारखेला मध्यरात्री १२.१५ वाजता बस S.P. कॉलेज चौकात थांबली आणि रायगड प्रदक्षिणेचा अखेर झाला.

प्रदक्षिणा कसली,
जरी अर्थ सारखा असला तरी भाव आणि भव्यता आपसूक वेगवेगळ्या जाणवतात. तसंच ही रायगड प्रदक्षिणा नसून रायगड परिक्रमा होती असे वाटले. वेगळा उपक्रम, वेगळे लोक, वेगळा निसर्ग, वेगळी माती, वेगळे साथी, वेगळी भव्यता, वेगळी आव्हाने, वेगळे वेड, पण सर्वांचे तेच सह्याद्री प्रेम!

Raigad Pradakshina3
Raigad Pradakshina Smoky Mushroom
Raigad Pradakshina View

Share this:

 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...