Friday, July 18, 2025

नग्न शिक्षा

 https://dhavalr.wordpress.com/


-धवल रामतीर्थकर

बुरहानपुर हे मध्य प्रदेश मधलं एक दुर्लक्षित शहर. शीतलच्या ऑफीस मधील सहकरयाच्या लग्नासाठी आमचा बुरहानपुर ला जायचं ठरलं होतं. मलाही जायची उत्सुकता लागून राहिली होती कारण बुरहानपुर बद्दलची माहिती वाचता वाचता ते मध्या प्रदेश चे ‘हिडन सीक्रेट’ आहे असे नजरेस पडलं होतं. ते वाचल्यापासून पुढचे दोन महिने उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली होती. लग्न होतं ६ फेब्रुवरी २०१६ ला. पण दैवी चक्र अशी फिरली की लग्नाच्या दोनच दिवस आधी त्या मित्राकडून निरोप आला.  त्यांचे धर्मगुरू (बोहरी मुस्लिम) फिरती वर असल्यामुळे ६ तारखेला निकाह होईल की नाही हे अनिश्चित आहे. त्यामुळे तुम्ही आला नाही तरी चालेल. या निरोपाचा असा परिणाम झाला की शीतलने यायचे रद्द केले आणि अनायासे मला एकट्याला भ्रमण करायची संधी उपलब्ध झाली.

नवीन परिस्थितीनुसार मी शनिवार ६ फेब्रुवरीला सकाळी सकाळी 7.00 वाजता रेल्वेने बुरहानपुर मध्ये दाखल झालो. बस स्टंड ला जाऊन त्याच्या अगदी मागे ५  मिनिटांच्या अंतरावर पहिलाच लॉज लागला तिथे 350 रुपये भाड्याने एक खोली घेतली. पटापट अवरले आणि ९ वाजता हॉटेलच्या बाहेर असलेल्या हातगाडीवर मध्या प्रदेशच्या खास पोह्यांचा आस्वाद घेतला. शरीरात इंधन पुरेपूर भरल्याची खात्री होताच माझी गाडी सुसाट भ्रमण करण्यास सुटली. त्या दिवशी मी  बुरहानपुर पासून २२ किलोमीटर अंतरावर असलेला प्रख्यात आसिरगड किल्ला सर करून आलो. त्या रोमर्षक अनुभवाकडे मी आता जात नाही. किल्ला सर झाल्यानंतर परत बुरहानपुरला येऊन शहराच्या दुसऱ्या टोककडे असलेल्या आणि अतिशय दुर्गम परिसरात वसलेल्या महल् गुलरा या वास्तूच्या दिशेने प्रयाण केले. ते ठिकाण इतके दुर्गम होते की जर माझी बुरहानपुर ला येणारी शेवटची ६ वाजताची बस सुटली असती तर मला तिथल्या मोडक्या खेड्यात किंवा महल् गुलराच्या उघड्या छतावरच रात्र काढावी लागली असती. पण तसे काहीही झाले नाही आणि मी रात्री ७.३० वाजता बुरहानपुरमध्ये सुखरूप परत आलो. सुस्थितीत असलेल्या, बहुदा एकमेव, आनंद बोजनालाय़ मध्ये गरमागरम बाजरीची रोटीचं चविष्ट जेवण करून मी स्वतःला झोपेच्या स्वाधीन केले.

७ फेब्रुवारीचा दिवस उजाडला. आज तर सूर्योदयापासूनंच अनेक प्रेक्षणीय, इतिहासाने डबडबलेल्या स्थळांची मेजवानी माझ्या समोर वाढून ठेवली होती. मी  आतुरतेने वाट बघत असलेला पहिले ऐतिहासिक स्थळ होते  ‘शाही क़िला’ जो बुरहानपुरच्या गावातंच तपती नावाच्या विस्तीरण पात्र असलेल्या नदीच्या काठावर आहे. माझा बेत होता की सकाळी सकाळी ६.३० ला जाऊन किल्ल्याभोवतीचा सूर्योदय बघायचा (जो प्रेक्षणीय मानला जातो). पण लॉजच्या केअरटेकरने आज माझ्याबरोबर नाश्ता कर असा हट्ट धरला आणि माझा सूर्योदय चुकला. हरकत नाही. पोहे-काचोरी चा गरमा गरम नाश्ता झाल्यावर मी तडक किल्ल्याकडे निघालो. बुरहानपुर म्हणजे गल्ल्या गल्ल्यांनी मिळून केलेले एक गाव आहे. त्या गल्ल्यातून रस्ता शोधत शोधत मी ९.०० वाजेपर्यंत कसा बसा किल्ल्यापर्यंत पोहोचलो. किल्ल्याच्या अजूनी भक्कम असलेल्या तटावर पिवळी धमक सुर्यकिरणे अस्तव्यस्त पसरलेली होती. फोटो काढायला हीच वेळ सर्वात चांगली कारण किल्ला प्रकाशात होता. मी ताबडतोब एक नावड्याला पकडले, थोडी घासाघिस केली आणि शेवटी 120 रुपयात मला तपती नदीतून एक चक्कर मारुन आणायचे  ठरले. अशा प्रकारे अर्धी नदीच्या वाळूने भरलेल्या बोटीतून नौकाविहार झाला. त्यानंतर आहुखाना, जिथे मुमताज येऊन बसायची, आणि मुमताजची पहिली समाधी, जिथे तिला आग्राला ताज महाल मध्ये पुरण्याआधी पुरले होते, ही दोन्ही ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची स्थळे बघून झाली. परत येता वेळी मी एका गावकऱ्याच्या  सांगण्यावरून नदीच्या काठा काठाने चालत आलो. येताना दोन चार ठिकाणी मला बायकांचे जत्थे नदीकाठी कपडे धुतना दिसत होते. त्या बिनसंकोच आपले काम करण्यात मग्न होत्या. मी त्यांना पार करून परत किल्ल्याच्या प्रवेशद्वरापाशी पोहोचलो.

आता सुर्य डोक्यावर आला होता. माझ्याकडे वेळ ही कमी राहिला होता. मी झटपट किल्ल्यामध्ये प्रवेश केला. किल्ला म्हणजे काय तर एक सुंदर नक्षीकाम केलेला ‘हमाम’ (पुरातन बाथ टब) आणि अतिशय पडक्या स्थितीत असलेले बुरूज आणि खोल्या. त्या किल्ल्याच्या तटबंदीवरुन खाली वाहणारी तपती नदी विलोभनिय दिसत होती. त्यात तरंगणाऱ्या रबर ट्यूबच्या होड्या, मातीने गच्च असणाऱ्या पाण्याच्या एक इंच वर तरंगणाऱ्या होड्या जागोजागी दिसत होत्या. मी त्यांचे फोटो टिपतच होती की तेवढ्यात माझ्या नझरेस नदीच्या दुसऱ्या काठावर, मी मगाशी बघितलेल्या कपडे धुणाऱ्या बायका पडल्या. त्या अजूनही तिथेच कपडे धुवत बसल्या होत्या. पुणे-मुंबई सारख्या शहरात नदी दिसणे मुश्कील, मग नदीवर पारंपारिक रीत्या कपडे धुणाऱ्या बायका दिसणे तर दुरापास्तच होतं. या गोष्टी फक्त फोटोत पाहिलेल्या होत्या. या नाविन्यामुळे साहजिकच मला त्यांचा फोटो घ्यावासा वाटला. जे मी मगाशी काठवरून जाताना करू शकत नव्हतो ते मी आता शेकडो फ़ूट दुरून, किल्ल्याच्या तटावरून सहज करू शकत होतो.

मी कॅमेरा सावरला, श्वासाची गती कमी केली आणि झूम लेन्स ला आदेश दिला. सर्र्रर्र करून लेन्स पुढे सरकली आणि बघता बघता 20x च्या शक्तीने त्या बायकांच्या बाजूला माझी नजर जाऊन पोहोचली. एवढ्या झूम मध्ये चित्र हालत होतं पण मी त्या नदीवरच्या घोळक्याचे बरेच फोटो काढून घेतले, त्यातले बरेचसे अस्पष्ट. साधारण 10-12 बायका दगडावर कपडे आपटात होत्या आणि हा त्यांचा उदयोग हसत खिदळत, निवांतपणे  चालू होतं. सर्व बायकांनी साड्या घातल्या होत्या, काही मुली होत्या त्यांनी पर्कर-ब्लाउस घातला होता आणि सर्वा कपडे धुता धुता चिंब भिजल्या होत्या. अर्थात त्यात अश्लील असे काही नव्हते.

DSC00773

इतक्यात त्यांच्यातलीच एक बाई पुढे आली आणि पाण्यात डुबकी मारली. माझ्या कॅमेरा ने तिचा अचूक वेध घेतला. तिचे कपडे धूवून झाले होते आणि ती अंघोळ करून परत जात होती हे स्पष्ट होते. ती बाई पाण्यातून वाट काढत नदीच्या काठावर गेली आणि मला काही कळायच्या आत तिने आपला ओलाचिंब ब्लाउस काढला आणि सराईतपणे दुसरा ब्लाउज उरावर चढवला. नकळत माझे बोट क्लिक वर दाबले गेले होते आणि तिच्या सर्वांगाच्या सर्व क्रिया माझ्या कॅमेरा मध्ये कैद झाल्या होत्या. कदाचित यालाच ‘फोटोग्राफर्स लक’ म्हणत असतील!

दुपारच्या तळपत्या उन्हात मी कॅमराच्या स्क्रीन वर त्या बायांच्या हालचाली बघत शाही क़िला च्या भक्कम तटावर उभा होतो. आता माझ्यातल्या  फोटोग्राफर च्या मनातील सुप्त इच्छा  जागी झाली. समोरच्या काठावरून जर मी त्या धुणे धुणाऱ्या बायकांचा असा फोटो काढला असता तर मला तपती नदीतच समाधी दिली गेली असती. त्या बायकांचा त्यांच्या मागून फोटो काढला असता तर कपड्यांच्या ऐवजी मलाच नदीच्या दगडावर आपटले गेले असते. पण नदीच्या दुसऱ्या बाजूने, दीड दोनशे फ़ूट उंच तटावरून, 20x  झूम बरोबर सज्ज, फोटो काढायला अडसर काहीच नव्हता. हे म्हणजे घनदाट जंगलात वाघाच्या मागावर असताना एका झाडला शेळी बांधून आपण 20 फ़ूट उंच मचाणावर दबा धरून वाघाची मजा बघणे असे झाले.

पण एकदा चटक लागली की स्वतःला रोखणे अवघड असते. असा आगळावेगळा शॉट मिळणे नेहमीच अवघड, त्यामुळे काय बरोबर आणि काय चूक याचे भान राहत नाही. माझी गत ही तशीच झाली होती. फरक एवढाच होता की मी फोटोंची शिकार करत होतो. त्या स्त्रियांच्या हालचालीवरुन कळत होते की कपडे धुणे आटपत आले आहे. म्हणजे अजून बायका नदीत डुबकी मारून आंघोळ करतील आणि परत काठावर जाऊन  कपडे बदलणार हे नक्की. मी कॅमेरा रोखून पुतळ्यासारखा उभा राहिलो. अपेक्षेप्रमाणे अजून एका बाईने डुबकी मारली आणि काठावर जाऊन मऊसूत वाळूत जाऊन बसली. बसल्या बसल्या तिने आपला ब्लाउज बदलला आणि त्यानंतर साडी. या वेळी जाणीवपूर्वक, हेतूपुरस्सर कॅमेराचे क्लिक बटण दाबले जात होते.  ते क्लिक नाकारण्याचे स्वातंत्र्य कॅमेराच्या मनात नव्हते, त्याच्या हातात फक्त ती चित्रे आपल्या पोटात साठवणे एवढेच होते. माझी इच्छा पूर्ण झाली होती आणि त्यात मी माझ्या कॅमेरा ला ही सहभागी करून घेतलं होतं. वेळ निसटत चालली होती म्हणून मला तिकडून काढता पाय घ्यावा लागला.

आधी सांगितल्या प्रमाणे मी शाही किल्ला बघण्यापूर्वी नदीच्या पलीकडे आहुखाना बघायला गेलो होतो. ती अतिशय रम्या अशी वाट होती, दोन्ही बाजूला हिरव्यागार पसरलेल्या शेताच्या मधून वाट काढत ती वाट गेली होती. तिथे असताना माझी भेट तिथल्या गाइड-कम-केअरटेकरशी झाली, ज्याने मला एक मोलाचा सल्ला दिला. त्याने मला सांगितले की तू तर एकटाच आहेस, आणि जर तुला स्वस्तात आणि रोमांचकारकरित्या फिरायचे असेल तर तू बस स्थानकावर जा आणि तिथून एक साईकल भाड्याने घे. बरहानपुर सारख्या ठिकाणी साइकल भाड्याने मिळेल याची मी कल्पनाच केली नव्हती.  आता किल्ला बघून झाल्यार मी पटकन अकबर की सराई (त्या काळातील धरमशाला जिथे शिवाजी महाराज आग्रा ला जाताना राहीले होते) बघून घेतली आणि थेट बस स्टंड गाठला. पुढचे स्थळ होते खूनी भंडारा जे बस स्टंड पासून 6-8 केयेम लांब होते… म्हणजे अगदी साइकल च्या टप्प्यात.

साइकलच्या दुकानात कसे बसे त्याला विनवून आणि माझे आधार कार्ड ठेवून मी साइकल 8 रुपये तास या हिशोबने भाड्याने घेतली. दुपारच्या जेवणाला बुट्टी मारून मी साइकल वर टांग मारली, वाटेत शक्तीवर्धक ६ केळी घेतली आणि निघाली स्वारी खूनी भंडाराच्या दिशेने. साधारण तासाभरात (एकदा रस्ता चुकलो म्हणून) मी खूनी भंडाराच्या सुनसान ठिकाणी जाऊन पोहोचलो. दुपारचे ४ वाजले होते.

जाताच माझ्या हातात एक फॉर्म देण्यात आला. जर खूनी भंडारा मध्ये उतरायचं असेल तर हा फॉर्म भरणे अनिवार्य होते. ते प्रतिज्ञापत्र होते की जर माझ्या जीवाला काही झाले तर त्याला मध्या प्रदेश प्रशासन जबाबदार नाही. फॉर्म भरून आणि प्रवेश आकार देताच मी लिफ्ट जवळ आलो. आता खूनी भंडारा म्हणजे नक्की काय हे मला त्या क्षणापर्यंत पुसटसे माहिती होते. मुघालांच्या काळात ही जमिनी खालची भुयारी रचना होती ज्यामधून ते बर्हानपूर शहराला पाणी पुरवत होते. ही व्यवस्था जमिनी खाली असण्याचा मुखय हेतू हा होता की शत्रू जेव्हा आक्रमण करेल तेव्हा त्याला पाण्यात विष टाकून पाणी दुषित करता येऊ नये.

मला आता या भुयारांच्या जाळ्यात उतरायचे होते. पहिल्यांदा मला चप्पल काढा म्हणून सांगण्यात आले. मी सूचनेप्रमाणे  चप्पल काढली पण पाठीवरची छोटी  bag बरोबर ठेवली. लिफ्टच्या बाहेर उभ्या असलेल्या माणसाला मी विचारून खात्री करून घेतली की bag खाली घेऊन गेलो तर चालेल ना… आणि त्याने होकारार्थी मान हलवली. दोनच मिनिटात ती अर्धगोलाकार लिफ्ट वर आली आणि दोन माणसांना त्यात उभे राहायला सांगितले गेले. मी आणि बरोबर अजून एक असे दोघे त्यात चिकटून उभे राहीलो. लिफ्टला दरवाजा नाही की जाळी नाही. तशीच ती उघडीबंब लिफ्ट अंधाऱ्या विहिरीत खाली जाऊ लागली. माझ्या २ फ़ूट समोर काळी कुट्ट विहिरीची भिंत माझ्या बरोबर खाली खाली सरकत होती. साधारण ८० फ़ूट जमिनीखाली जाताच लिफ्ट थांबली. समोर एक पांढरा बनियन घातलेला आणि हातात टॉर्च धरलेला माणूस आमची वाट बघत उभा होता. त्याचबरोबर असे दिसले की लिफ्ट मधून बाहेर पाय टाकायचा होता तो सरळ पाण्याने भरलेल्या भुयारातच! समोर मिट्ट काळोख पसरला होता. १ फ़ूटापलिकडे काहीही दिसत नव्हते. बनियन घातलेल्या माणसाने धरलेल्या बॅटरीच्या उजेडात फक्त पांढऱ्या शुभ्रा, गुळगुळीत भुयाराच्या भिंती दिसल्या. त्या भिंती म्हणजे कॅल्शियम आणि मॅग्नीशियम ने तयार झालेले कवच होते. त्यातून सतत पाणी झिरपत होते. अशा भुयारात मी पाय ठेवला. जीन्सची पँट घातली होती, ती वर करून उपयोग नव्हता कारण पाण्याची पातळी गुढग्यापर्यंत होती. म्हणतात की काही दशकांपूर्वी हीच पाण्याची पातळी छातीपर्यंत होती. हळू हळू कमी होत ती आता गुडघ्यापर्यंत आली आहे.

DSC00827त्या बनियनवाल्या गाईडने बॅटरीचा प्रकाश काही अंतरावर सोडला आणि मला सूचना दिली, “वहाँ आगे तक ही जाना और वापस आना. ज्यादा आगे नही जाना वरना खो जाओगे.” मी पाण्यातून पुढे पुढे जाऊ लागलो. भुयाराच्या छतातून पाणी ठिपकत होते आणि त्याने माझा कुर्ता अर्धा भिजला होता. माझ्या कमरेवरच्या बेल्टला कॅमेराचे पाऊच लावलेले होते. ते पाण्यापासून सुरक्षित होते. मी त्या काळोखात बॅटरीच्या प्रकाशात थोडा पुढे गेलो. पायाला बारीक माती लागत होती, मध्येच गुळगुळीत दगड ही होते. बॅटरीच्या अंधूक प्रकाशात मला खाली पाण्यात छोटे छोटे मासे ही दिसले.

माझ्या पुढे एक तरुण मुलांचा घोळका होता. त्या ७-८ जणांपैकी सर्व पंचविशितल्या आतले होते. त्यातल्या एकाने मला बघितले आणि मी न विचारताच मला उद्धेशून म्हणाला, “आइये हमारे साथ चलिये. अकेले जाओगे तो रास्ता चूक जाओगे.” मी काही म्हणायच्या आत त्याने माझा हात धरला आणि मला पुढे ओढले. मी आता माझ्या फोनची बॅटरी सुरू केली. आम्ही तसेच पाण्यातून थोडे पुढे गेलो. तेवढ्यात त्या बॅनियनवाल्या  गाईडने  मागून हाक मारली, “बस्स हो गया, अब और आगे मत जाना… पीछे मुड जाना.” पण ती मुलं काही ऐकायला तयार नव्हती. एकाने उलट उत्तर दिले, “हमने २०० रुपये क्या ऐसे ही दिये है क्या? आए है तो सब देख के ही जायेंगे.” असं  म्हणून त्यांनी गाईडचे म्हणणे साफ धुडकावून लावले. आमचा पुढचा प्रवास सुरू झाला.

समोर एक उंच जागा होती. तिकडे उभे राहून आम्ही माझ्या कॅमेराने त्या रोमहर्षक वातावरणात फोटो काढले. फोटो सेशन झाल्यावर आम्ही परत पाण्यात उतरलो आणि त्या भुयाराला लागूनच दुसऱ्या भुयारात घुसलो. जसे जसे पुढे जाऊ लागलो तसे तसे पाण्याची पातळी वाढू लागली होती. एका ठिकाणी तर पाणी कमरेच्या वर येत होते. बरं तो भुयारांचा रस्ता ही इतका अरुंद होता की मला माझ्या पाठीवरच्या bag सकट त्यातून जाणे अवघड झाले होते. कसे बसे पाठीवरची bag ओढत मी पुढे सरकत होतो. भिंतीवरच्या कॅल्शियम आणि मॅग्नीशियमचे टोकदार सुळके अंगभर मला ओरबाडत होते. पण मी नेटाने पुढे सरकत होतो. तशाच पाण्यातून चालत आम्ही अंधार कापत पुढे गेलो. सर्वात पुढे जो मुलगा होता त्याने जोरात आरोळी दिली की पुढे रस्ता बंद आहे. आता मागे फिरण्याशिवाय काही गत्यंतर नव्हतं. आल्या वाटेने परत लिफ्टकडे जायचं होतं. मागे फिरता फिरता मी सहज कॅमेरा पाऊचकडे बघितलं आणि माझे पाय तिथल्या तिथे पाण्यातच रुतले गेले. कॅमेराचे पाऊच सताड उघडे होते आणि त्याहून धक्कादायक बाब म्हणजे ते चक्क रिकामे होते. त्या चिंचोळ्या वाटेने, bag   सावरत सावरत स्वतःला पुढे ओढताना बहुदा त्या कॅल्शियामच्या टोकात अडकून पाऊच उघडले गेले असणार आणि कॅमेरा खाली पडला असणार. आता इथे कॅमेरा पडला म्हणजे नुसता पडला असे नव्हते तर तो माती मिश्रित पाण्यात पडला होता आणि त्याला पडून कमीत कमी ५-१० मिनिटे झाली होती.

मी लगेच त्या सर्व मुलांना कॅमेराची धक्कादायक बातमी सांगितली. दुसऱ्याच क्षणी ते सगळे माझी मदत करायला सज्ज झाले. त्यातल्या एकाने सर्वांना सूचना दिली, “चलो अपने पैरसे जमीन पर कैमेरा ढूणडते वापस उसी रास्ते चलते है.” हा उपाय चांगला होता, कारण एवढ्या अंधारात, त्या गढूळ पाण्यात नुसतं बघून काही सापडणे अशक्य होतं. आता ८ जणांचे १६ पाय खूनी भंडाराची जमीन चाळू लागले. ज्या चिंचचोळ्या वाटेने आम्ही आलो होतो तेथे आम्ही परत गेलो.

शोधता शोधता अचानक एकाने आरोळी दिली, “मिल गया!!!”. ते दोन शब्द ऐकून मला एवढे हायसे झाले की मी पाणी नसते तर तिथेच बसणार होतो. त्या मुलाने  पायाच्या अंग्ठ्यात पकडून एक वस्तू बाहेर काढली. बघतो तर काय, ती बाईकची किल्ली होती. योगायोग असा की किल्ली त्यांच्यातल्याच एका मुलाच्या बाईकची होती. म्हणजे माझा कॅमेरा शोधण्याच्या मोहिमेत त्यांची हरवलेली अनमोल वस्तू मिळाली होती. मोटरसाईकलची किल्लीच हरवली असती तर त्यांना परत जाणे अवघड झाले असते. त्या किल्लीचे हर्षभरित शब्दांनी स्वागत झाले आणि परत माझा कॅमेरा शोधण्याची मोहीम सुरू झाली. खूनी भंडाराच्या गुहा आणि त्या गुहेवर राज्य करणारा काळोख, असे दोघेही आमची मजा बघत होते. पाच एक मिनिटात एका मुलाने विजयी आरोळी दिली आणि आपला हात उंचावला. त्याच्या हातात पाणी गटागट प्यायलेला माझा ओलाचिंब कॅमेरा होता. माझा जीव पाण्यात… म्हणजे भांड्यात पडला. अशा वातावरणात जी गोष्टा मिळण्याची अशा मी सोडून दिली होती तो कॅमेरा कमीत कमी हाती तरी लागला होता. त्या अंधारातही माझ्या डोक्यात तत्क्षणी आशेचे किरण उमटले. मी विचार केला, कॅमेरा खराब झाला तरी चालेल पण बऱ्हाणपूरच्या ज्या अविस्मरणीय आठवणी मेमरी कार्डामध्ये जमा आहेत ते कार्ड सुस्थितीत असले म्हणजे मिळवले. ज्याच्या पायाला तो कॅमेरा लागला होता तो बोलता बोलता मला म्हणाला, “एकच्युअली मेरा पैर कॅमेरा की लेन्स पर पड गया था इसलिये मुझे कॅमेरा मिला.” मी म्हटलं, पाय पडला तर पडला पण कॅमेरा तरी सापडला. आता पुढचं पुढे. आनंदाने आम्ही सगळे आपापले ओले कपडे घेऊन परत त्याच लिफ्ट ने दोघे दोघे करत ८० फुट वर जमिनीवर अवतरलो. बाहेर सूर्याच्या लक्खं उजेडात येताच मी कॅमेरा न्याहळला. पहिले दर्शन काही आशादायक नव्हते. लेन्स बाहेर येऊन अडकली होती. त्यामध्ये बरेच पाणी गेले होते आणि मातीचे काही कण लेन्सच्या आत दिसत होते. याचाच अर्थ प्रकरण अवघड होता. मी पहिल्यांदा बॅटरी आणि मेमरी कार्ड कॅमेरातून बाहेर काढले. कार्ड मधले फोटो सुखरूप ठेवणे आता देवाच्याच हातात होतं.

एव्हाने ५ वाजले होते. मी पटकन उरल्यासुरल्या सूर्यप्रकाशात कॅमेरा वाळत ठेवला. अर्धा तास झाला तरी कॅमेरा वाळण्याचे चिन्ह दिसत नव्हते. अजून मला बरहानपुर मधले एक ऐतिहासिक स्थळ, राजा जयसिंघ ची छत्री बघायची इच्छा  होती. म्हणजे माझ्याकडे फक्त १ तास उरला होता. जड अंतकरणाने मी खूनी भंडारा ने गिळंकृत केलेला कॅमेरा उचलला आणि साईकल बस स्थानकाच्या दिशेने झपाझाप हाकायला सुरूवात केली.

आखलेले भ्रमण संपवून मी दुसऱ्याच दिवशी मुंबई गाठली. मुंबईला परत आल्यावर मी पहिल्यांदा मेमरी कार्ड तपासले आणि सर्व फोटो स्पष्टपणे जेव्हा दिसले तेव्हा डोळ्यातून फक्त पाणी ओघळायचे  शिल्लक  होते. १७ हजारांचा कॅमेरा कायमचा निकामी झाला होता पण आठवणींचे दान माझ्या पदरात पाडून गेला होता.

एका निवांत क्षणी जेव्हा मी बरहानपुर मधल्या घटनांचा क्रम जोडला तेव्हा लक्षात आले… माझ्या कॅमेराला बहुदा आपल्या पोटात त्या नदीवरच्या बायकांची अर्ध नग्न चित्रे ठेवणे मान्या नसावे. दैवाने त्याचे रास्त म्हणणे ऐकले होते आणि त्याला मोक्ष दिला होता. आणि मला? मला माझ्या काळ्या कृतीबद्दल जळजळीत शिक्षा केली होती. माझ्याकडून कॅमेरा हिरावून घेतला होता. मी कॅमेरा गमावून नग्न प्रवासी झालो होतो. कष्टाने कमावलेले १७ हजार रुपये (कॅमेराची किंमत) अक्षरशः पाण्यात गेले होते. त्याचबरोबर मला त्या दिवशीचे उरलेले भ्रमण माझ्या अनमोल कॅमेरा शिवाय करावे लागले होते. अचानक मला साक्षात्कार झाला.

हीच होती दैवाने मला त्वरित दिलेली नग्न शिक्षा!

WP_20160207_15_26_35_Pro

विशेष : या झटक्यातून बोध घेऊन मी ते फोटो कोणाच्याही नजरेस पडू नयेत याची पुरेपूर खबरदारी घेतली आहे.

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...