२४ नोव्हेंबर २०१९
धवल रामतीर्थकर
पुण्याच्या ‘फिरस्ती महाराष्ट्राची’ या समूहाबरोबर जुलै २०१९ या महिन्यात सज्जनगड वारसा सहलीला गेलो होतो तेव्हा अनुराग वैद्य (फिरस्तीचा तरुण संस्थापक) ने कल्पना दिली होती की पुढच्या महिन्यात राजगडावर मोहीम आखणे चालू आहे. त्यावेळी राजगड हे नाव ऐकताच मी माझा सहभाग निश्चित केला होता. आता मी वकील नाही, की मोठा उद्योजक नाही पण तरीही राजगड मोहिमेशी तारीख जुळणे अवघड होऊन बसले आणि मला स्वस्थ बसावे लागले. योगायोगाने राजगड मोहीमही अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलली गेली आणि मी मनातून प्रफुल्लित झालो, चला अजून एक संधी आपल्याकडे चालून आली आहे.
ऑगस्ट गेला, सप्टेंबर गेला आणि राजगडची पुढची तारीख ठरली रविवार २४ नोव्हेंबर २०१९. वास्तविक अशा ट्रेकसाठी एक-दीड महिन्याचा काळ सहभागी होणाऱ्या व्यक्तींसाठी आयुष्याचे नियोजन करण्यासाठी पुरे होतो, पण माझ्या आयुष्यातील नोव्हेंबर २४चे नियोजन या आधीच झाले होते. मी सहकुटुंब शेगावला जाणार होतो व रेल्वे आरक्षणही करून ठेवले होते. आता त्यातून माघार घ्यायचे माझ्या सौ यांना साधे सुचवणेही धोक्याचे ठरले असते म्हणून मी राजगड वर काट मारली पण मनात त्याची धग राहू दिली. २४ नोव्हेंबर राजगडाची तारीख जवळ येत होती आणि अचानक १३ नोव्हेंबरला ओमचा (माझा मुलगा) सहभाग असलेली अंतर शालेय ‘Dance Competition’, २३ नोव्हेंबरला ठरल्याची बातमी शाळेने धाडली. याचा अर्थ शेगाव कॅन्सल. याचा अर्थ राजगडावर जाण्याची वाट आपसूक मोकळी झाली होती. लगोलग मी आमच्या सौ ची परवानगी घेतली (कशी मिळाली हे माझे मलाच आश्चर्य वाटते… असो मिळाली) आणि अनुरागला मी राजगडावर येतोय अशी वार्ता धाडून माझा सहभाग निश्चित केला.
दुर्गराजाच्या भेटीला…
२४ नोव्हेंबर उजाडला. भल्या पहाटे ५ वाजता कोथरूडहून
निघण्याचे नियोजन होते. पहाटे ४.३० ला अनुरागचा पहिला संदेश व्हाट्सऍप वर
झळकला की तो कोथरूडच्या थांब्याच्या दिशेने निघाला आहे. पाठोपाठ
माझ्याबरोबर येणाऱ्या मित्राचा, सिद्धार्थचा संदेशही झळकला की बरे
नसल्यामुळे तो येत नाही आहे. मग काय, गडबड करून आवरले आणि ५.१५ ला मी K.K.
मार्केट पाशी पोहोचायला घरातून बाहेर पडलो. पहाटेचा अंधार भीत भीत कापत मी
सरळ नजर ठेवून सरळ रस्त्याने चालत सुटलो. भीती अंधाराची नव्हती तर अंधारात
वाघ होणाऱ्या भटक्या कुत्र्यांची होती. त्यात परत ट्रेकला येणारे एक वयस्क
पण उत्साही इसम दीपक फेणे यांना दोन दिवसांपूर्वीच कुत्र चावलं होतं आणि
त्यामुळे त्यांना हा ट्रेक मुकावा लागला होता. तर इतक्या सकाळी रस्त्यावर
माणसे तुरळक म्हणजे कुत्री गब्बर, पण इलाज नव्हता. वाटेत जागोजागी कुत्री
झोपलेली होती किंवा रस्त्याच्या मध्ये येऊन माझ्याकडे टक लावून बघत उभी
राहायची, जणू मला दरडावत होती की, “अब तू मेरे इलाके में है, बचके रेहना
बाबू.” पण मी त्यांच्याकडे लक्ष न द्यायचे ठरवले व मनातली भीती न दाखवता
K.K. मार्केट गाठले. १५-२० मिनिटात फिरस्ती महाराष्ट्राची बस आली आम्ही ठीक
६ वाजता मार्गस्थ झालो.
बसमध्ये माझे आसनमित्र होते मोहन कुमार, एक पन्नाशी उलटलेले पणअंगकाठीने ताठ दिसणारे गृहस्थ. बसताच त्यांनी मला आश्चर्यचकित केले, प्रश्न विचारला, ‘तर तू धवल, दीपक फेणे यांना ओळखतोस ना?’ मी हो म्हटले आणि सहज म्हणालो, “त्यांना तर कुत्रं चावलं आहे नं”, तर म्हणाले, “हो, मी त्यावेळी त्यांच्याबरोबरच होतो.” कसे चावले विचारल्यास म्हणाले, “फेणे को stray कुततोंसे लागावं है नं. He went near a stray dog and it bit him.” व्यक्ती आणि वल्ली फक्त माणसातच नसतात, तर कुत्र्यांमध्येही असतात याची जाणीव झाली. प्रत्येक कुत्र्याची तऱ्हा वेगळी, नाहीतर हेच कुत्रे कशाला आमच्या फास्टर फेणेंना चावले असते. असो, नंतर मोहन कुमार फारसे बोलायच्या मूड मध्ये वाटले नाहीत आणि आम्ही बाजूबाजूला बसून राजगडची वाट पाहू लागलो.
थोड्याच वेळात आमची बस राजगड मार्गावर वळली. अर्धा पाऊण तासाने अचानक बसमध्ये एक हशा पिकली. काही जण डावीकडच्या खिडीतून काहीतरी दाखवत होते. बघितले तर बाहेर उत्तुंग डोंगरावर भक्कम तटबंदी नजरेस पडली. त्याचबरोबर एक अद्वितीय गोष्ट दिसली. तटबंदीमध्ये एक गोल भोक दिसले ज्यातून आरपार दुसऱ्या बाजूचे आकाश दिसत होते. नंतर कळले की हेच ते राजगडावरच प्रसिद्ध ‘नेढे’, जे नैसर्गिकरित्या वाऱ्यामुळे भिंतीत भोक तयार होते. तो राजगडाचा मोहक नजारा टिपत टिपत बस कधी थांबली कळले ही नाही. हॉटेल ‘राजगड निवारा’ येथे नाश्ताचा बेत होता. मुंबईहून येणारी फिरस्तीची दुसरी टीमही तेथे आम्हला येऊन मिळाली. या वेळी पहिल्यांदाच फिरस्ती महाराष्ट्राचीने Packed Breakfast चा प्रयोग केला. मेन्यू होता पोहे आणि चटणी सँडविच. या नाश्त्याला लाईक देत आम्ही तो फस्त केला. खात असताना टेबल वर आम्ही चौघे होतो. त्यात एक कॅप्टन मॉर्गन लिहिलेले लाल रंगाचे जॅकेट घातलेला निखिल देसाई होता. बोलता बोलता लक्षात आले की हा बीड जिल्ह्यात राहतो आणि D.I.Joe या मद्य तयार करणाऱ्या कंपनी मध्ये मार्केटिंग मॅनेजर आहे. त्याचा हा पहिलाच ट्रेक आणि त्याच्या मनातली धाकधूक बोलण्यातून साफ जाणवत होती.
मुंबईचा चमू
नाश्ता आटपून बाहेर पडलो तर समोरच पांढरा टी-शर्ट घातलेले डॉ. सचिन विद्याधर जोशी उभे दिसले. जसे एखाद्या महाविद्यालयात आपल्या आवडत्या प्रोफेसरना विद्यार्थी गराडा घालतात तसेच काही इथे दिसत होते. फक्त इथे त्यांना घेरून उभे होते ते होते पोक्त इतिहासप्रेमी. परत आम्ही बस मध्ये बसलो आणि आणखी अर्ध्या तासांच्या प्रवासानंतर राजगडाचा तळ गाठला. एकेक करून सगळे बसमधून उतरले तेव्हा अंदाज आला की आम्ही एकूण ३०-३५ जणांचा समूह असू .
उतरताच एका मोकळ्या जागेत परिचय सत्र पार करायचे ठरले व आम्ही एक मोठ्ठा गोल करून उभे राहिलो. सर्वात पहिला परिचय झाला तो स्वतः डॉ सचिन जोशी यांचा. त्या अल्प परिचयातून या अनुभूतींकडे केवढा प्रचंड ज्ञानाचा साठा असेल याची माझ्यासारख्या नवख्याला पुसटशी कल्पनाही आली नाही.
मुंबईहून आलेल्यांपैकी एकाकडे गो प्रो कॅमेरा होता व तो सेल्फी स्टिकवर विराजमान होता, त्यावरून कळले की राजगडाचे आज LIVE शूटिंग होणार. त्याने शूटिंगला सुरुवात केली डॉ सचिन यांच्या परिचयाने. नंतर एक एक करून सगळ्यांनी आपापले नाव व कर्तृत्व सांगितले. त्यात माझ्या दृष्टीने लक्षवेधी काही म्हणजे शंतनू (आजचा आमचा ग्रुप लीडर) याचे वडील जे पहिल्यांदाच आपल्या २२ वर्षीय मुलाने आयोजित केलेल्या इतिहास सहलीला आले होते. असे कळले की ते भारतभर, हिमालयात, उत्तरांचल मध्ये वगैरे बरीच ठिकाणे फिरले होते. दुसरे होते ते अंदाजे ७० वर्षांचे आजोबा, कडकडीत पांढरा चौकड्यांचा शर्ट व फॉर्मल पॅन्ट असा पोशाख घालून आले होते. यावरून ते हाडाचे ट्रेकर कमी व उत्सुक जास्त असावेत असा मी अंदाज बांधला. अजून एक होत्या त्या संजीवनी गराती, ४-५ क्लासच्या शृंखलेच्या मालकीण होत्या व त्यांनी एक अतिशय उपयुक्त इच्छा प्रकट केली. ती अशी की फिरस्ती महाराष्ट्राने त्यांच्या क्लासमधल्या मुलांसाठी पुण्यात एका ऐतिहासिक स्थळावर सहल आयोजित करावी ज्यामुळे मुलांमध्ये इतिहासाची आवड निर्माण होईल. नंतर मुंबई ग्रुप चा म्होरक्या वाटत असलेल्या सचिन नामजोशी याची भली मोठी ओळख झाली. माझी जेव्हा वेळ आली तेव्हा अल्प ओळखीत मी सांगितले की मला इतिहासाची प्रचंड आवड आहे, पण गुगली असा की माझ्या लक्षात काही राहत नाही. हे प्रामाणिक अज्ञान पाहून डॉ सचिन यांच्या चर्येवर हसू पसरलेले दिसले. सर्वांचा परिचय देऊन झाला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की आमचा ग्रुप वैविध्यपूर्ण क्षेत्रात असलेल्या व्यक्तींनी समृद्ध असा होता.
परिचय आटोपताच चालायला सुरुवात झाली. या राजगड मोहिमेची मी दोन उद्दीष्टे आधीच ठरवून ठेवली होती. सर्वात पहिले म्हणजे डॉ सचिन यांच्या ज्ञानाच्या साठ्यामधून शक्य तेवढे ज्ञान उपसायचे, व दुसरे म्हणजे राजगड हा भव्य गड मन भरेपर्यंत बघायचा. पहिल्या उद्धिष्टाप्रमाणे मी सचिन सरांची शेपूट झालो, म्हणजे त्यांच्या मागे मागे चालू लागलो. बरोबर ८-१० जणांचा गठ्ठा होता ज्यांना माझ्याइतकीच ज्ञानाची भूक होती व सचिन सरांच्या गतीने चालणे शक्यही होते. सुरुवातीलाच काहींची कुरकुर बाजूला सारून सरांनी स्पष्ट केले की आता चढण सुरु होत असल्याकारणाने आपण थेट वरती पाली दरवाज्यापाशी जमा होऊ आणि तेथेच ज्ञान अर्पण होईल. आम्ही जे ८-१० सरांबरोबर होतो, जवळपास तीच मंडळी बालेकिल्ला सर करताना व राजगड उतरतानाही त्यांच्याचबरोबर होती.
आम्ही अंदाजे २ तास चढत असू, मध्ये मध्ये २-३ दा थांबलो ही व सर्व एकत्र आल्यावर सचिन सरांनी काही इतिहास उधळलाही पण एकूण चढण व त्यामधल्या घटना माझ्या स्मृती दालनातून नाहीशा झाल्याचे आता जाणवते. का? याचा विचार करता लक्षात आले की नंतर एवढ्या रोमहर्षक गोष्टी मांडून ठेवल्या होत्या की स्मृती दालनाला सुरवातीचा त्या मानाने सरळसा काळ पडद्याआड ढकलावासा वाटले असणे स्वाभाविक आहे.
पाली दरवाज्यावर धडक
तर २ तासात आम्ही राजगडाच्या मुख्य शाही मार्गावरून पाली
दरवाज्यापाशी पोहोचलो. अंदाजे १ १/२ तासांच्या चढाईनंतर पायऱ्या सुरु होतात
ज्या पहिल्या पाली दरवाज्यापाशी नेऊन पोहोचवतात. दरवाज्याच्या पायऱ्यांवर
उभे राहून खाली नजर टाकली तर विस्तीर्ण महाराष्ट्र प्रदेश नजरेस पडतो व
तात्काळ नजरेत भरतो.
पाली दरवाजा
दुर्गसंवर्धन समिती सदस्य व महाराष्ट्रात ६ नवीन किल्ले शोधून काढणारे इतिहास तज्ञ् डॉ सचिन विद्याधर जोशी यांसबरोबर पाली दरवाज्यावर टिपलेले छायाचित्र
एक एक करून सर्वजण पोहोचले आणि डॉ सचिननी माहिती सांगायला सुरुवात केली. सर्व प्रथम सरांनी भिंतीत जी भोके असतात ते बंदुकांसाठी आणि लहान तोफांसाठी हा खुलासा केला. पण पाली दरवाज्यावर फक्त बंदुकांसाठी जांगी आहेत असे आढळले. दुसरी महत्त्वाची माहिती म्हणजे त्या काळी दरवाज्याची आतली बाजू आता आहे तशी उघडी नसायची. त्याला छप्पर असायचे.का? तर सैनिकांना चोवीस तास पहारा द्यायला उन्हापासून आणि पावसापासून रक्षण ते हे छप्पर करायचे. दरवाज्याच्या आतल्या बाजूला खाली जमिनीवर एक चौकोनी भोक होते, व त्याच रेषेत वरती दगडाची गोल ब्रॅकेट दिसत होती त्यात त्याकाळचा भरभक्कम दरवाजा राहत असे. बाजूच्या भिंतीमध्ये मध्यभागी आडव्या खाचा स्पष्ट दिसत होत्या पण त्याकडे यापूर्वी इतक्या गडांच्या भ्रमंती मध्ये कधी लक्ष गेले नव्हते, कारण त्याचे महत्व काय हेच माहित नसायचे, ते आज कळाले. तिथे सैनिकांना उभे राहायला चौथरा असायचा ज्याला फांजी म्हणतात. सचिन सरांनी बारीक बारीक गोष्टी सांगण्यावर भर दिला, जसे की शिकालीन युगात बंदुका होत्या त्यामुळे जांग्या (बंदुकांसाठी भोके) रचना उदयास आली. त्याहून जुन्या काळी जेव्हा धनुष्य बाण वापरायचे तेव्हा चर्या पद्धतीचे दरवाज्यावर व तटबंदीवर रचना आढळायची, ज्याच्या खाचा बाण मारायला उपयुक्त असायच्या. पाली दरवाज्यावर चर्या दिसत नव्हत्या व सचिन सरांनी सांगितले की इथे नाही तरी पुढे चर्या नक्की बघायला मिळतील. हे गडाच्या रचनेविषयी अतिशय उपयुक्त माहिती सत्र झाल्यावर आम्ही पुढे वाटचाल सुरु केली.
पुढचा दुसरा दरवाजा लवकरच आला. त्याला काही नाव नव्हते पण आत गेल्या गेल्या उजव्या बाजूला वरती खांबांचे दालन होते. ते सैनिकांची विश्रांतीची किंवा थांबण्याची खोली.
द्वार रक्षकांना थांबण्यासाठी असलेली खोली ‘देवडी’
तेथेच खाली अक्षरे कोरलेली एक शिळा आढळते. कोणीतरी म्हणाले की ती अक्षरे मराठी आहेत, पण इतकी पुसट झाली होती की काही वाचता येत नव्हते. इथे सचिन सरांनी चऱ्या प्रकाची पट्टी दरवाज्यावर दाखवली व सर्वांसमोर ही जुनी धनुष्य बाण काळातील चऱ्या पट्टी शिवकालीन गडावर काय करत आहे असा KBC श्टाईल पण एकही पर्याय न देता प्रश्न विचारला. टोपीखालचे डोके खाजवूनही कोणालाही त्याचे उत्तर देता आले नाही, याची कदाचित त्यांना अपेक्षा असावी. तर याचे उत्तर असे की ही चऱ्या पट्टी इथे सजावट प्रकार म्हणून वापरली गेली होती, आणि आजकालच्या ज्या गडांवर ही चऱ्या आढळते ती अशीच सजावट कारणासाठी बसवलेली आहे ही इतिहासातील मनोरंजक पण महत्वाची माहिती देऊन हे सत्र समाप्त झाले.
थोडे पुढे जाताच आमचे पाऊल राजगड माथ्यावर पडले. उजव्या बाजूला दोन-चार पायऱ्या चढून गेल्यावर सदर उभी आहे. सदरेबाहेर एक २ जणांचा छोटा तंबू उभा दिसला. इथे राहताही येते तर! डावीकडे मोकळ्याजागेवर ‘दारुगोळा कोठार’ ही ताठ मानेने उभी पाटी आहे. त्याच्या बाजूला एक भक्कम दगडी कोठार आहे ज्याच्या बाहेर मला एक तुकडे तुकडे झाली तोफ आढळली. मी आजपर्यंत गंजलेली, बुजलेली, बुजवलेली, एकटी अशा अनेक तोफा बघितल्या आहेत, पण मातीचे भांडे फुटावे व तुकडे व्हावेत अशी तुकडे पडलेली लोखंडी तोफ पहिल्यांदाच बघत होतो.
ही तोफ खरी की पुठ्याची?
पद्मावती देवीने बोलावले
हा अजब प्रकार बघून पुढे पद्मावती माचीवर पोहोचलो. डावीकडे
प्रसिद्ध पद्मावती देवीचे दगडी देऊळ आहे. हे पुरातन काळातीलच देऊळ आहे हे
सचिन सरांनी पक्के केले. देवळाच्या उजव्या बाजूला डोंगराजाच्या कडेला एक
सुंदर हिरव्या पाण्याने भरलेला तलाव आहे. तो इतक्या कडेला आहे की पलीकडे
सरळ खाली दरीच आहे. याच कारणाने मी त्या तलावाचे ‘Rajgad Infinity Pool’
असे नामकरण केले.
Rajgad Infinity Pool
सहसा मला गडांवरच्या देवळात धावती भेट द्यायला आवडत नाही. मी नास्तिक आहे असे मुळीच नाही, मी बाहेरूनच नमस्कार करतो. याचे खरे कारण पायातले बूट व मोजे काढायचा प्रचंड आळस हेआहे. कारण एकदा काढले की परत ते बूट घालायचे मन करत नाही. तेवढ्यात कोणाचेतरी बोल कानावर पडले, ‘बूट काढायचे म्हणजे पाय जरा मोकळे होतात’, जणू हे माझ्यासाठीच उच्चरले गेले होते. मी निमूटपणे बूट उतरवले आणि पद्मावती देऊळात प्रवेश केला. आत बऱ्यापैकी अंधार होता. पद्मावती देवीपुढे नतमस्तक होऊन आम्ही सगळे देऊळाच्या गारव्यात जमिनीवर विसावलो आणि अक्खे देऊळ फिरस्ती महाराष्ट्र ने व्यापून गेले. दहा मिनिटे होताच शंतनूने डोळ्यांनीच निघायचा इशारा केला व आम्ही बैठक सोडली.
राजगडावरील पद्मावती देवी
येथून पुढे सुरु होतो तो खरा थरार. राजगड ही २६ वर्षे स्वराज्याची राजधानी होती ती का, याचा प्रत्यय मला माझा अनुभव लिहिताना येतोय. एवढ्या भव्य ऐतिहासिक वास्तू वर आलेले अनुभव एका भागात संपता संपत नाही आहेत आणि म्हणूनच या पूर्वार्धाला मी पूर्णविराम देतो.
क्रमश:
चला तर, यापुढचा प्रवास… नाही थरार क्रम (शारीरिक व मानसिक) सुरु करूया. खालील लिंकवर क्लीक करा
https://bit.ly/2PunH35
राजगड भरारी – भाग २
धवल रामतीर्थकर
जर तुम्हाला पूर्वार्धाची मज्जा घ्यायची असेल व उत्तरार्ध पुरेपूर
अनुभवायची इच्छा असेल तर कृपया खालील लिंक वरचा पूर्वार्ध आधी नजरेखालून
घालावा:
https://bit.ly/34BBxXM
… उत्तरार्ध
पद्मावती देवीपुढे नतमस्तक होऊन आम्ही सगळे देऊळाच्या गारव्यात जमिनीवर विसावलो आणि अक्खे देऊळ फिरस्ती महाराष्ट्र ने व्यापून गेले. दहा मिनिटे होताच शंतनूने डोळ्यांनीच निघायचा इशारा केला व आम्ही बैठक सोडली.
येथून पुढे सुरु होतो तो खरा थरार
देऊळातून निघण्यापूर्वी एक महत्वाची सूचना झाली. आमच्यापुढे दोन पर्याय
ठेवण्यात आले. ज्यांना आतापर्यंतची चढण व पायऱ्या अवघड वाटल्या असतील
अशांनी शंतनू बरोबर संजीवनी माचीकडे प्रस्थान करावे आणि ज्यांना अजून
परिश्रम करायची इच्छा आहे त्यांनी राजगडाच्या प्रसिद्ध, उंच व खड्या
बालेकिल्ल्यावर कूच करावी. आता बालेकिल्ला चढाई कशी असेल याची पुसटशीही
कल्पना बहुतांश जणांना नव्हती, मी ही त्यातलाच एक होतो. बाहेर आलो आणि आधी
एक ग्रुप फोटो घ्यायचे ठरले, म्हणजे लढाईच्या अगोदर सर्वांना एकत्र
बोलावतात तसे, नंतर कोणी भेटो ना भेटो! फिरस्ती महाराष्ट्राचा फलक घेऊन
आम्ही जय भवानी-जय शिवाजी, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय या
घोषणांच्या साऊंड इफेक्ट सहित फोटो काढला गेला.
पद्मावती देऊळाबाहेर ग्रुप फोटो
नंतर एकाच गोंधळाला सुरुवात झाली. कोण कोठे जाणार हे ठरणे अवघड होऊन बसले कारण बालेकिल्ल्याची कल्पना कोणालाच नव्हती. त्यात शंतनूने सांगितले की बालेकिल्ल्यावर जाताना एक रॉक पॅच लागतो आणि ज्यांना स्वतः वर विश्वास आले त्यांनीच विचार करून जावे. हे ऐकून आणखी संभ्रम पसरला. शेवटी पद्मावती देवी देऊळापासून हलून सदरेवर जमायचे ठरले आणि तेथून पुढे ठरवू असा ठराव झाला.
सदरेवर परत तोच गोंधळ, कोण कुठे चाललंय. आम्ही बालेकिल्ल्यावर जाणार हे निश्चित असलेले १०-१५ जण एका बाजूला जाऊन थांबलो. यात मुंबईचा पूर्ण ग्रुप होता. पाच एक मिनिटांनी एक एक करून संजीवनी माचीला जाणारे बालेकिल्ल्याला यायला तयार झाले. यात मोलाचा वाट होता शंतनूचा आणि कोणा एका मुंबईकराचा ज्यांनी सुचवले की रॉक पॅच पर्यंत चला आणि जर असे वाटले की नाही शक्य होणार तर परत फिरू शकता, याहून जास्त काय होणार. ही शक्कल लागू पडली आणि बघता बघता ३-४ वगळता बाकी सर्वच्या सर्व बालेकिल्ल्यावर जाणाऱ्या समूहात सामील झाले. यात १० वर्षांचा नायक कुटुंबातला मुलगा ही होता. आणि होताच नाही तर सर्वात पुढे होता. त्याच्या चेहऱ्यावर ना भीतीची, काळजीची रेष होती न दमल्याच्या खुणा. तर अशा ३० जणांना संघ बालेकिल्ला चढू लागला. सुरुवातीच्या सपाट वाट सुरु होण्यापूर्वी सचिन सरांनी सर्वांना मधमाशांविषयी सावधान केले. एक अति महत्वाची सूचना दिली. आपल्या नाही तर दुसऱ्या कोणत्या ग्रुप मधल्या कोणाच्या चुकीमुळे मधमाशांनी हल्ला केलाच तर घाबरून जीव मुठीत धरून कोठेही पाळायला लागून नका. आधी काही प्रसंगी गांगरून गेलेल्या काही जणांनी पळत जाऊन तलावात उड्या मारल्या होत्या, किंवा कड्यावरून खाली पडले होते. तसे न करता काय करायचे तर सरळ जमिनीवर आडवे झोपायचे, असे केले तर मधमाशांचा धोका एकदम कमी किंवा नाही ही जाणवत. आदल्या रात्री सूचना दिल्याप्रमाणे जर कोणी चादर किंवा शाल आणली असेल तर स्वात भोवती गुंडाळून घ्यावी आणि आडवे झोपावे. एवढे सांगण्यामागचा उद्धेश होता की घाबरून जाऊन नका व काही झालेच तर खबरदारी घ्या. या सूचना मनात ठेऊन आम्ही मार्गक्रमण सुरु केले. तो पट्टा फार मोठा नव्हता. वाटेत आम्हाला एक मधमाशांचे पोळे दिसलेही पण त्या बिचाऱ्या शांत होत्या आणि आम्ही बिचारे होण्यापासून वाचलो.

फोटो: कौस्तुभ शाळीग्राम
तो पट्टा संपताच उभी चढण सुरु झाली. पण घसरडे कोठेच नव्हते आणि कड्याच्या बाजूला सळ्यांचा भक्कम आधार दिला होता ज्याला पकडून चढणे सोप्पे झाले. काही ठिकाणी जेथे फार उंच चढण होती तेथे बहुतेक करून कोण ना कोण मुंबईकर हात द्यायला (मदतीचा) तयारच होते. हळू हळू का होईना, हाश हूश करत का होईना सर्व चढत होते. मध्येच एक काठी समोर आली. कोण एक महिला हातात काठी घेऊन ती उभी चढण चढायचा प्रयत्न करत होत्या. जेथे दोन्ही हात उपयोगात आणावे लागत होते, अशा ठिकाणी त्या लाकडाच्या काठीची जबाबदारी पुढच्या किंवा मागच्या माणसाकडे तात्पुरती सोपवली जायची आणि ती चढण चढून झाल्यावर काठीचा पुन्हा ताबा घ्यायचा हा क्रम चालू होता. पण काही केल्या ती काठी सोडवत नव्हती. धन्य झाली असेल ती काठी एवढी काठीनिष्ठा अनुभवून.
बालेकिल्ल्च्याची उभी चढण, पण इथेच तर फोटोचा मोह आवारत नाही
त्या निमुळत्या वाटेवर ट्राफिक जॅम ही व्हायचे. वरून खाली उतरणारे आधी बातमी द्यायचे, ‘वरती खूप गर्दी आहे, आम्हाला खाली जाऊ द्या म्हणजेच तुम्हाला वर जायला जागा मिळेल. ही आधी खाली उतरायची युक्ती तर नव्हती ना ही शंका मनात आल्या शिवाय राहिले नाही. काहीही असो पण जे आधी बालेकिल्ल्यावर यायला हो हो नाही नाही करत होते त्यातील प्रत्येक जण यशस्वीपणे बालेकिल्ला चढले. तो रॉक पॅच त्या भक्कम सळ्यांच्या आधारामुळे जणू नाहीसा झाला होता. वर पोहोचल्यावर एक कठीण आव्हान आपण पार केल्याची ख़ुशी सगळ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होती. सचिन सरही खुश वाटत होते आणि स्वतः माहितीची दारे उघडत होते. (आधी त्यांनी सांगितले होते की मी जास्त बोलत नाही, त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारा आणि मी उत्तर देईन) बालेकिल्ल्यानंतर त्यांच्यातला फरक जाणवण्यासारखा होता. इतिहासाची तोफ सतत धडाडत होती आणि सतराशेचा काळ आमच्या डोळ्यासमोर तसाच्या तसा उभा राहायला लागला. बालेकिल्ल्यावर दिसणारे भव्य वास्तूचे अवशेष हा राजांचा राजवाडा आहे हे त्यांना मान्य नव्हते. कोणी म्हणाले की महत्वाच्या व्यक्तींसाठी या खोल्यांचा आकार लहान वाटत आहे. काहींच्या मते इथे इतक्या उंच बालेकिल्ल्यावर राजवाडा कसा काय बांधणार. त्या चौथऱ्यावर उभे राहून मी फक्त ऐकत होतो व शोषून घेत होतो. सचिन सरांनी अजून बऱ्याच काही माझ्या दृष्टीने सूक्ष्म अशा गोष्टी सांगितल्या ज्या साहजिकच मी ‘विसरलो’.
राजगड किल्ला आणि त्याचा उत्तुंग बालेकिल्ला चढून आल्याची माझ्या गुढग्यांनी योग्य ती दाखल घेतली होती. पण माझ्या अपेक्षेप्रमणे उजवा गुडघा न दुखता डावा गुडघा किंचितसा कळ मारायला लागला होता. मी लगेच माझ्या उजव्या पायात असलेला ‘नी बँड’ काढून डाव्या गुडघ्यावर चढवला कारण आता सुरु होणार होता अस्सल रगडा … बालेकिल्ल्याची उतरण. पण त्याआधी बालेकिल्ल्यावर अजून एका रोमहर्षक गोष्ट जाणून घ्यायची शिल्लक होती. अर्थात ते मला त्या क्षणी तरी माहित नव्हते.
बालेकिल्ल्याची गुरुकिल्ली
आता आम्ही बालेकिल्ल्याची त्या भरदार बुरुजावर पोहोचलो होतो जो राजगडाच्या
पायथ्यावर असो वा माथ्यावर, सर्वांना मंत्रमुग्ध केल्याशिवाय राहत नाही.
त्या अर्धगोल दगडांच्या वर्तुळात आम्ही चहुबाजूंचा विस्तीर्ण प्रदेश
न्याहाळत होतो की सचिन सरांनी अजून एक कडकडीत गुगली टाकली. बुरुजाला
बंदुकींसाठी जांघाया अनेक होत्या व मला तरी त्यात वेगळे असे काही वाटले
नाही. पण त्या बुरुजाच्या डाव्या अंगाला खालच्या बाजूला सचिन सरांनी एक
जांघ्या सारखे दिसणारे पण पायऱ्या असलेले भगदाड दाखवले. तो होता
बालेकिल्ल्यावरून निसटून जाण्याचा मार्ग! पुढे येणारा तपशील तर अंगावर काटा
आणणारा होता. सचिन सरांचे माहिती चक्र गरागरा फिरतंच होते. तर जर शत्रूने
आक्रमण केले असेल आणि राजगड किल्लाही काबीज केला असेल तर बालेकिल्ल्यावर
असणाऱ्या मंडळींनी करायचे काय? त्यांना इथून निसटून जाण्यासाठीच तर हा
मार्ग राजगडाच्या सर्वात उंच टोकावर केला गेला होता. त्या काळी या
निमुळत्या जागेतून खाली लाकडाची शिडी सोडायचे आणि एक एक करून त्यावरून खाली
दरडीवर उतरायचे. मग ती दरड आडवी पार करून पसार व्हायचे. मी आ करून ते
ऐकताच राहिलो. आजच्या काळात जिथे कारबाईनर व जाड दोऱ्या कंबरेभोवती मजबूत
बांधून कडे उतरले जातात, हे ज्याला रॅपेलिंग म्हणतात त्या काळात फक्त उभ्या
कड्यावरून लोम्बकळत्या लाकडी शिडीवरून खाली कसे उतरत असतील याची फक्त
कल्पनाच करणे शक्य आहे. आमच्यातल्या कोणी तसा वेडसर प्रयत्न करू नये म्हणून
बहुतेक तो मार्ग मोठा दगड लावून बंद केला गेला होता. या शानदार बुरुजावर
आम्ही बालेकिल्ल्यावाल्यांनी एक ग्रुप फोटो काढला व उतरणीला लागलो.
हॅन्ड्स उप
अजून आम्ही बालेकिल्ल्यावरच भटकत होतो की अचानक सचिन सरांना मातीत काहीतरी
सापडले व त्यांच्या चेहेऱ्यावर धन्य झाल्याचे भाव उमटले. वास्तविक राजगड
चढायला लागल्यापासून सचिन सरांची नजर जमिनीकडे होती. कोणालाही वाटेल की
साहजिकच आहे, चढताना पायात काय येतंय ते तर बघायलाच हवे ना, पण ही झाली
माझ्यासारख्या सामान्य ट्रेककरची विचारसरणी. ज्याने ३० वर्षे (अंदाजे)
इतिहास कोळून प्यायलेला आहे ते त्या मातीत नक्की वेगळे काहीतरी शोधत असणार,
आणि होते. सचिन सर खालूनपासून मातीत कुठे त्या काळातील बंदुकीची गोळी
मिळते का ते पाहत होते आणि ती शेवटी त्यांना बालेकिल्ल्यावर सापडली! एक
गोलसर रा खाड्या रंगाचा दगड त्यांनी तळ हातावर धरला आणि म्हणाले ही बघा
बंदुकीचा छर्रा, त्या काळची गोळी.
इंग्रजांच्या बंदुकीची शिशा धातूची गोळी व जुन्या काळातला खिळा
आम्हा सर्वांना सुरुवातीला बघून तो एक दगडाचं वाटलं. परत याची जाणीव सरांना असणार. त्यांनी आम्हाला तो दगड हातात घ्यायला सांगितला आणि त्याचे वजन बघायला सांगितले. मग काय, एका हातातून दुसऱ्या हातात असा त्याचा प्रवास सुरु झाला. जसा तो एक हातातून दुसरीकडे जात होता तसे तो हातात घेणाऱ्याच्या चेहेऱ्यावर आश्चर्याचे भाव सोडून जात. खरंच ती गोळी होती आणि सामान्य दगडापेक्षा अनेक पट जड होती. आम्ही मनसोक्तपणे त्या गोळीला हाताळले व नंतर राजेश नायकने ती गोळी त्याच्या खिशात टाकली. टाकली म्हणजे त्याच्या संग्रहात सामील केली. काही वेळापूर्वी सचिन सरांनी त्याला एक त्या काळातला चौकोनी आकाराचा खिळाही शोधून दिला होता. सचिन सरांच्या म्हणण्यानुसार अजूनही राजगडावर अनेक बंदुकीच्या गोळ्या सापडतात कारण लढाईमध्ये व नंतर गडाची तोडफोड करताना इंग्रजांनी एवढ्या गोळ्या मारल्या होत्या की त्यापैकी काही आजही सुस्थिती असणार. आयुष्याच्या गोळाबेरीज प्रकरणात अजून एका गोळीची भर पडली व तो आनंद उरात भरून आम्ही बालेकिल्ला उतरण्यास सुरुवात केली.
८० वर्षांच्या तरुणी
उतरणे संथगतीने चालू झाले. बरेच लोक पहिल्यांदाच ट्रेकला आलेले असल्याने
जपून जपून, जीव मुठीत धरून उतरणे चालू होते. तसे ते होते ही अवघड, पण
गुडघ्यांसाठी. उतरतानाही लोखंडी सळ्यांच्या रेलिंगमुळे काम सोप्पे झाले
होते. तरीही मर्फी भाऊ या बालेकिल्ल्यावरही कडमडले होते. म्हणजे ट्राफिक
जॅम जर व्हायचा असेल तर तो होणारच आणि तो झालाही. हळूहळू आम्ही बालेकिल्ला
उतरण्यात यशस्वी झालो आणि मधमाशांचा पट्टा सुरूहोण्यापूर्वीच्या मोकळ्या
जागेत उभे होतो की वरून एक ८० वर्षांच्या तुकतुकीत, हसऱ्या आजीबाई जॉगिंग
ड्रेस घालून, हातात काठी धरून, डोक्यावर Nike टोपी घालून येताना दिसल्या.
त्यांच्याबरोबर इतर अचंबित झालेले ट्रेककर होते जे त्यांच्यावर प्रश्नांचा व
प्रशंसेची भडीमार करत होते व त्या आजीबाई खुशीने त्याचा स्वीकार करत
होत्या. त्या खाली आल्यावर एक छोटा प्रश्न-उत्तर तास झाला, आणि त्याची
सांगता त्यांच्याबरोबर एक सेल्फी घेऊन झाली. त्यांचे नाव होते गोखले. त्या
वयस्कर ट्रेककरची जिद्द बघून कोणाचीही मरगळ लाजेने पळून जाईल असाच त्यांचा
प्रभाव होता. आम्ही तेथे दम खात उभे असताना त्या ८० वर्षीय गोखलेबाई तरातरा
पुढे निघून गेल्यासुद्धा.

गोखले मॅडम – बालेकिल्ल्यावरच्या सर्वात तरुण गिर्यारोहक (वय वर्ष फक्त ८०)
इथे सर्व जण एकत्र जमले. जे जे सुरुवातीला बालेकिल्ल्यावर यायला कचरत होते, त्यांची भीतीची जागा आता आत्मविश्वासाने जिंकून घेतली होती हे निश्चित. सर्वांच्या चेहेऱ्यावर बालेकिल्ला यशस्वीपणे सर केल्याचे भाव उत्कटपणे प्रकट झाले होते. तो मधमाशांचा पट्टा आम्ही लीलया पार केला आणि जेथे संजीवनी माचीवर जायला फाटा लागतो तेथे आलो तर काय आश्चर्य, शंतनू ज्या काही लोकांना संजीवनी माचीवर घेऊन गेला होता तो ग्रुपही त्याच क्षणी परत आला होता. अनायास दोन्ही ग्रुपची भेट झाली आणि परत फिरस्ती महाराष्ट्राचा एक एकत्र समूह तयार झाला.
एव्हाने दुपारचे २.३० वाजले होते, सचिन सरांनी निर्णय घेतला की आता संजीवनी किंवा सुवेळा माची करता येणार नाही कारण या भागात अंधार लवकर पडतो व खाली पोहोचेपर्यंत ५.३०-६ तरी होणार, म्हणजे आता जेवण उरकून सरळ गड उतरायला पाहिजे. काही काळ आमच्यात निराशा पसरली की राजगड अर्धाच बघून होणार. पण जे जाणते होते त्यांना याची जाणीव होती की एका दिवसात राजधानी बघणे शक्य नाही, आणि जे नवखे होते त्यांना जेवढे बघितले तेवढे पुरे असणार. थकलेली शरीरे सदरेवर विसावली व दुपारचे जेवण सुरु झाले. विशेष म्हणजे कदाचित सर्वांना खूप भूक लागली असणार किंवा सगळे खूप थकले असणार, या दोनच कारणांचा मी विचार करू शकतो ज्यामुळे जेवण मूक झाले. कोणीही काहीही बोलत नव्हते, सर्व शांतपणे packed ठेपले खात होते. योगायोगाने तिथे ताक-दही उपलब्ध होते आणि सर्वांना हायसे झाले व पराठे भरभर संपले.
गोल नाही पण रिंगण तरी होतं
आम्ही रिंगण करून सदरेच्या सावलीत बसलो होतो आणि आमच्याच बाजूला मुंबईचा ग्रुप वेगळा घोळका करून बसला होता. तसे सुरुवातीपासूनच मुंबईकर – पुणेकर टिप्पण्या चालू होत्या, पण ‘फॉर अ चेंज’ मुंबईकर पुणेकरांची भूमिका बजावत होते, म्हणजे पुणेरी टोमणे पुणेकरांनाच मारत होते. पुणेकर बहुदा राजगडाच्या दराऱ्याखाली दबले गेले असावेत म्हणून गप्प होते.
जसे पोटात अन्न गेले तसे माच्या फिरायचे विचार नाहीसे झाले. त्या सावलीत निवांतपणे बसून राहावे अशी कोणी न बोलताही जाणवावी अशी सामूहिक इच्छा होती, पण निघणे भाग होते. अशा वेळी अगोदरच्या कोणत्या ट्रेकची आठवण आल्याशिवाय राहत नाही. सकाळी सकाळी गड चढून वर पोहोचेपर्यंत दुपार झालेली असते. मग दुपारच्या रणरणत्या उन्हात एका गुहेत निवांतपणे डब्बे उघडायचे, जे असेल ते अधाशाप्रमाणे खायचा कारण भूकच तेवढी लागलेली असते. पोटभर खाऊन झाले, पाण्याचे घोट रिचवून झाले की त्या गुहेच्या शीतल सावलीत समोरचा अथांग महाराष्ट बघत निवांत बसायचे या सारखे दुसरे सुख क्वचितच कोणते असेल. त्या सुखाची जाणीव मनाला स्पर्श करते आणि तेवढ्यात जाणीवभंग होतो… आवाज येतो, “चला चला, उठा. निघायला हवे” आणि तंद्री तुटते, ऊन जाणवते आणि मन सांगते, चला धवलराव, हीच ती वेळ, हाच तो क्षण…
उतरताना गाठला कळस
उतरताना परत ८-१० जणांचा चमू डॉ सचिन जोशींबरोबर फेविकॉल सारखा चिकटून होता
व ज्ञानाचा एक कणही खाली पडून न देता पकडायला तयार होता. आम्ही परत पाली
दरवाज्यावर पोहोचलो. तेथून बालेकिल्ल्याचा राजबिंडा बुरुज स्पष्ट दिसत
होता. त्याकडे बोट दाखवत सचिन सर म्हणाले की इथूनच शिडी खाली टाकली जायची,
आणि एका निमुळत्या कड्याकडे बोट दाखवले. शिडीवरून या कड्यावर उतरायचे, तो
कडा असा आडवा पार करायचे आणि तिथे पोहोचले की शत्रूच्या तावडीतून सुटले,
आणि मग पसार. त्यांनी आपल्या बोटांच्या हालचालींवर इतिहासाला जागे केले व
माझ्या डोळ्यासमोर चित्र उभे केले. तरी माझ्या बाळबोध मनाला एक प्रश्न
पडला. जर बालेकिल्ल्यावरून पसार व्हायची जागा पाली दरवाज्यावरून स्पष्ट
दिसत होती तर शत्रूलाही ते सहजपणे दिसले असणारच ना. मग त्या चोरवाटेचा
उपयोग तो काय? मी ही शंका सचिन सरांपर्यंत पोहोचवताच लहान मुलाला समजवावे
तसे त्यांनी समजावले, अरे गड घेतल्यावर दरवाज्याच्या बाहेर शत्रू नसतो, तो
आत असतो मग कोणी बघेल कसे. आणि तेथून पुढे आमच्याबरोबर इतिहासाचं चालू
लागला.
बोलता बोलता विषय निघाला औरंगजेबचा मग सचिन सर औरंगजेबाच्या व त्या काळातील मुघलांचा भ्रष्टाचार यावर कोणत्या एका लढाईची गोष्ट सुरु करत व त्यात अशी रंगात आणत की आम्ही सगळे चिडीचूप होऊन उतरत राहू. मुघलांच्या भ्रष्ट्राचाराचा धागा पकडून मग कसे मराठे मुघलांना चूXया बनवत व त्यांच्याकडून बक्कळ पैसे उकळत, किल्ला मुघलांच्या हवाले करत व काही दिवसांनी मुख्य फौज माघारी गेली की कसा किल्ला परत जिंकून घेत याची रोमहर्षक गोष्ट सुरु होई. त्यानंतर कसे मराठे मुघलांचा पाठलाग करत आणि किल्ल्यात लपून बसल्यावर व अन्न पाणी संपल्यावर मुघलांनाच कसे चढ्या भावाने अन्न विकत व पैसे कमवत .त्यानंतर रामशेज किल्ल्याची गोष्ट सुरु होई आणि अक्खा वेढा आणि कसे मुघलांना मराठ्यांनी वेड्यात काढले याचे इतके सुरेख वर्णन होई की आम्ही केव्हा अर्धा गड उतरून खाली पोहोचलो याची आम्हाला जाणीवच झाली नाही. हा तर गनिमी कावा २.० होता आणि याचा प्रत्यय आम्हाला राजगड उतरताना झाला. आम्ही सगळे सचिन सरांच्या कथाकथनात एवढे रंगून गेलो होतो की त्यांची इतिहासवाणी एक क्षण थांबताच कोणीतरी नकळतपणे बोलून जाई, “सर सांगा ना”. मध्ये एका ठिकाणी आम्ही विश्रांती घेण्यासाठी बसलो. तर बसताच कोणीतरी म्हणाले, “सर अजून एक सांगा ना”. जसे लहानपणी आपण आजीच्या किंवा आजोबांच्या मागे लागतो की आणखी एक गोष्ट सांग ना, अगदी तसेच आम्ही सचिन सरांच्या मागे लागलो होतो व ते आमचा बाल इतिहास हट्ट हौशीने पूर्ण करत होते. याहून मोठे आमचे भाग्य काय होऊ शकते.
विश्रांती होती अम्हासाठी, सचिन सरांची इतिहासाची तोफ तर सतत धडाडतच होती
विश्रांती घेऊन उठलो तसे माझ्या दोन्ही पायात अचानक गोळे आले. मी जरा स्ट्रेचिंग केले आणि आजूबाजूला बघितले तर सचिन सर आणि बाकीचे पुढे निघून गेले होते. इतिहास टिपण्याचीची एकही संघी सोडून द्यायची नव्हती म्हणून मी तसेच उतरायला सुरु केले कारण सचिन सरांना गाठणे महत्वाचे होते. योगायोगाने ते क्रॅम्प्स तसे क्षणिक होते, कदाचित वातही असेल, आणि थोड्यात वेळात मी कळपात पोहोचून परत इतिहास जगायला लागलो. पोहोचलो तेव्हाही सचिन सरांचे इतिहासाचे पाठ निरंतर चालूच होते आणि या मंत्रमुग्ध इतिहास पठणात आम्ही राजगडाचा पायथा कधी गाठला हे मला तरी अक्षरश कळालेच नाही.
नवीन गडांची कहाणी
आता सरळ रस्ता सुरु झाला होता.आम्ही चौघे सचिन सरांच्या डावीकडे आणि ४-५
जाणे त्यांच्या उजवीकडे असा चालण्याचा क्रम आपोआप झाला होता. त्यांच्या
मुखातून बाहेर पडणारा इतिहासाचा झरा जमिनीवर पडू न द्यायचा व त्यात
स्वछंद्पणे डुंबून घ्यायचे हा प्रयत्न आमचा निरंतर चालू होता.
कदाचित चालण्याच्या नियमितपणामुळे सचिन सरांच्या बोलण्यात खंड पडला व मी लगेच इतिहासाची दिशा त्यांच्या अद्वितीय गड शोधून काढण्याच्या पराक्रमाकडे वळवली. मग कसा त्यांना गूगल मॅप वर Panhalghar वरून पन्हाळगड सापडला, आणि कसे ते गड शोधायला आलोय हे न सांगता आणखी कोणता तरी विषय काढत म्हणजे स्थानिक लोक न घाबरता माहिती देत, कसे एका गावातले लोक यांना घाबरून पळून गेले, कसे काही गावकऱ्यांनी जुन्या गडाविषयी माहिती देतो असे सांगून त्यांच्याकडून जमिनीचे नकाशे उकळले व नंतर माहिती द्यायला नकार दिला व असे अनेक किस्से आमच्या हवाले केले.
चालता चालता सरळ रस्ताही संपला व आम्ही गावात येऊन पोहोचलो आणि तेव्हा इतिहासाच्या पुस्तकाचे शेवटचे पान उलटून झाले असा भास झाला. पण एवढ्या उतरणीत डॉ सचिन जोशींचे केवढे मोठे कार्य आहे आणि सखोल अभ्यास आहे याची जाणीव झाली.
त्या गावात आधीच काही जण येऊन बसले होते, जसे की मोहन कुमार, मुंबईचे दोघे तिघे व अजून काही. तिथे पोहोचताच आजचा दिवस संपला, ट्रेक संपला आणि आता ज्ञानाचा ओढा आटणार या दुःखात बुडून मी हॉटेलच्या कठडयावर आपले बूड टेकले. आधीच पोहोचलेल्यांनी चहा व वाडा पाव सांगून ठेवला होता. तेथे बसल्याबसल्या गरमागरम चहा आणि बटाटा वड्यांचा आस्वाद घेत आम्ही मागून येणाऱ्या फिरस्तीवाल्यांची वाट बघत बसलो. काही वेळात बरेच जण पोहोचले पण अजून काही मागे होते. त्यात ते ७० वर्षांचे काका होते व काही महिला होत्या.
डॉक्टरांची कृपा
थोडे पोटपाणी आटोपल्यावर नुसते थांबण्यापेक्षा काहीतरी उपयोगी करावे असे
ठरले. लगेच आमच्यातल्या तरुण फिजिओथेरपीस्ट डॉ चैतन्यने ट्रेक नंतरचे
शरीराला आराम देणारे स्ट्रेटचिंग सगळ्यांना करायला लावले व सगळ्यांनी
त्याचे महत्व जाणून मनापासून ते केलेही. दुसऱ्या दिवशी पाय बोंबलणार होते,
ते काही चुकणार नव्हतं, पण स्ट्रेचिंग करून मनाला तरी अराम मिळाला. आता
दिवस संपण्याच्या काठावर होता, आणि अजूनही शंतनू जो मागे राहिलेल्यांबरोबर
येणार होता तो आला नव्हता.
जोर लगाके स्ट्रेच करा
असे ठरले की मुंबईकरांची व्हॅन छोटी आहे म्हणून त्यांची व्हॅन पायथ्यापर्यंत पाठवावी म्हणजे तेथून तरी बाकीच्यांना बसून येता येईल व मदत होईल.
हवेवर जगणारा मुलगा
व्हॅन गेली आणि एक तास थांबलेली डोकी चोहो दिशात पांगली. कोणी बाजूला उभ्या
ट्रॅक्टरवर जाऊन बसले, कोणी एक छोटी चक्कर मारायला गेले, कोणी तेथेच
बाजूला असलेल्या देवळाच्या काठावर विसावले व बाकीचे आहेत तेथेच हॉटेलात
कायम राहिले. ग्रुप पासून बाजूला एका घराच्या कठड्यावर नायक कुटुंब बसले
होते. कुटुंब म्हणजे राजेश नायक, त्याची सौ व दोन मुले १० वर्षांचा पाचवीत
असलेला अथर्व व नववीत असलेली गौरी. अथर्वने तर कमाल केली होती. हसत हसत तो
राजगड व त्यानंतर बालेकिल्लाही चढला होता, व उतरून खाली आला होता आणि थकवा
काय असतो हे त्याला माहीतच नव्हते. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने
हे सगळे फक्त हवा खाऊन केले होते… हो हो हवा खाऊन. कारण राजेशने
सांगितल्याप्रमाणे अथर्वने न सकाळी नाश्ता केला होता, न दुपारी जेवण केले
होते आणि न आता वडा पाव खाल्ला होता. म्हणजे, तो फक्त हवा खाऊन जगला होता
नाही का? आणि तसे म्हटल्यावर तो फक्त हसला व दोन हातात दोन काठ्या घेऊन एक
कर्तब करून दाखवले. वाह रे पठ्या ! सौ नायक यांचाही हा पहिलाच ट्रेक, पण
हळू हळू का होईना त्यांनी तो पूर्ण केला व आता हसत, खुशीत बसल्या होत्या.
त्यांची मुलगी गौरीही आताच कुठेतरी फिरून आल्यासारखे पाय हलवत आईला चिकटून
बसली होती.
एवढ्यात व्हॅन त्या आजोबांना आणि कृष्णा मॅडमना घेऊन आली. सर्वांना हायसे वाटले की कोणालाही कोणतीही इजा झाली नव्हती. आजोबा फक्त खूपच दमले होते व त्यांना चालवतही नव्हते. व्हॅन तशीच पुढे त्यांना बसपर्यंत घेऊन गेली. सर्वत्र पांगलेले परत एकत्र आले व अंधारात बसकडे शेवटची वाटचाल सुरु झाली. काही अंतरावर शेकोटी पेटलेली दिसली. जवळ पोहोचलो तर आपलीच मंडळी शेकोटीभोवती ऊब घेत उभी होती, डॉ सचिन जोशीही होते. काही मिनिटात शेवटी शकोटीही विजली आणि राजगड अभ्यास सहल औपचारिकरीत्या समाप्त झाली. पण, जशी शेकोटी विजली असली तरी खाली निखाऱ्यांची ऊब कायम असते तसंच राजगड सहल संपली असली तरी फिरस्ती महाराष्ट्र व डॉ सचिन जोशीं यांनी हृदयात जी इतिहासाची शेकोटी पेटवली होती त्याची धग कायम तेवत राहणार याची खात्री झाली.
बस पुण्याच्या दिशेने धावू लागली आणि माझ्या हृदयात जे होते ते बोटांमार्फत व्यक्त झाले…
![]()
राजगड अभ्यास सहलीत खास लक्षात राहिलेले काही क्षण व व्यक्ती…
अपर्णा अभ्यंकर व मुलगी – अनेक सहलीत, ट्रेक मध्ये बाबा-मुलगा/मुलगी किंवा बाबा-आई-मुलगा-मुलगी असे चित्र पाहायला मिळते. पण आई-मुलगी आणि ते ही राजगड सारख्या ट्रेकला म्हणजे एक स्वगताः जोडी होती.
नायक कुटुंब – सदा हसरे, सदा उत्साही. सौ नायक यांच्यामागे चढताना व उतरताना खंबीरपणे उभा राहणारा राजेश (सौ नी हातात घट्ट धरलेल्या काठी या नंतरच राजेशचा नंबर लागतो हं) व त्यांची दोन मुले, हवेवर जगणारा अथर्व व नेहमी पल्लवित असणारी गौरी.
मैत्री – बस मध्ये सुनीता कोल्हटकर माझ्या बाजूच्या सीटवर बसल्या होत्या. सकाळी नाष्ट्यासाठी जेव्हा बस थांबली तेव्हा मागून कोणी मॅडम गडबडीने पुढे आल्या व शब्द कानावर पडले, “तुम्ही इथे बसलाय, आपल्या गप्पा राहिल्याचं हो.” या राहिलेल्या गप्पा राजगडावरती रंगल्या असणार हे नक्की. हो ना?
मुंबई ग्रुप – आल्यापासून आम्ही मुंबईकर, तुम्ही पुणेकर करणारा पण वेळ येईल तेव्हा मदतीला तत्पर असणारा हा चमू. परत भेटू.
डॉ सचिन जोशी – शतशः धन्यवाद सर! राजगड सार्थ झाला तो तुमच्यामुळे
फिरस्ती महाराष्ट्राची – हा अभिनव उपक्रम हाती घेतला व माझे जीवन एका अविस्मरणीय अनुभवाने समृद्ध केले याबद्दल धन्यवाद
No comments:
Post a Comment