
महाबळेश्वरच्या
केट्स पॉइंट व पाचगणी परिसरातून दिसणारा वाई परगण्यातील कृष्णा आणि वाळकी
नदीच्या मध्ये असलेल्या पठारावर उठावदार कातळकड्यांचा, समुद्रसपाटीपासून
सुमारे १३५० मीटर उंचीचा कमळगड किल्ला ( उ. १७° ५८' २" , पू. ७३° ४४' ४१" )
आपलं नेहमीचं लक्ष वेधुन घेतो. हा किल्ला म्हणजे जणू गर्द हिरव्यादाट वनात
फुललेलं लाल दगडाचं कमळचं! चहुबाजूंनी असलेल्या धारधार आणि सरळसोट
कड्यांनी अभेद्य ठरणारा कमळगड उर्फ कमालगड. अठराव्या व एकोणिसाव्या
शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून लौकिक कमावलेले व
दक्षिण काशी म्हणून विख्यात असलेले वाई हे गाव भौगोलिकदृष्ट्या सातारा
जिल्ह्यात आहे. वाई मधील कमळगड, पांडवगड, वैराटगड, चंदन-वंदन या
शिलाहारकालीन ( इ. स. ९०० ते १३०० ) गिरीदुर्गांची सैर करण्यासाठी मी आणि
भोप्या ( रोशन भोपी ) ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी महाड वरून ९० किमी चा
प्रवास करून वाई बस स्थानकाजवळ पोहचलो. समोरच असलेल्या हॉटेलमध्ये गरमागरम
चहा नाष्टा करून सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या वासोळे गावातील तुपेवाडी
गाठली. रस्त्यालगतच लागणाऱ्या मेणवली घाट, नाना फडणवीस वाडा, धोम गावातील
नृसिंह मंदिर या पर्यटन स्थळांना भेटी देत तुपेवडीच्या शेवटी असलेल्या
कोंढाळकर आज्जींच्या घरासमोर गाडी पार्क केली.





दुपारचे
बारा वाजले होते. सूर्य माथ्यावर आला असला तरी हवेत गारवा जाणवत होता.
घराच्या आवारात आज्जी तीळ पाखडत बसल्या होत्या. अवकाळी पावसामुळे त्यांचा
बराचसा तीळ गळून गेल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. आमच्या आजच्या ट्रेकची
त्यांना कल्पना दिली व त्यांच्याकडून गडावर जाणाऱ्या वाटेची इत्यंभूत
माहिती घेत त्यांनी दाखवलेल्या वाटेवर पाऊले टाकायला सुरू केली.
तुपेवाडीच्या मागे दोन्ही डोंगराच्या मधोमध असलेल्या धारेवरून ही वाट वर
जाते. डाव्या बाजूला नवरा नवरी डोंगर, उजव्या बाजूस कोळेश्वर पठार तर
मागच्या बाजूस केंजळगड आणि रायरेश्वर पठार माथ्यावर पोहचेपर्यंत आपल्या
दृष्टिक्षेपात राहतात. गोरक्षनाथ प्रतिष्ठानामार्फत वाटेवर जागोजागी
मार्गदर्शक फलक (मार्किंग) लावलेले दिसून आले. तासाभरातच आम्ही अंगावर
येणारी उभी चढाई करून कोळेश्वर पठारावर जाणाऱ्या वाटेजवळ पोहचलो. समोरची
वाट बलकवडी-वहिगाव कडे खालच्या बाजूस जाते, उजवीकडील वाट
माडगणीकडे/कोळेश्वर पठार, तर डावीकडील वाट कमळमाचीवर जाते. याच दिशेला
दगड-धोंड्यानी रचलेल्या बांधाशेजारून वाट दहा मिनिटांतचं आपल्याला
गोरक्षनाथ मंदिरापाशी पोहचवते. एका लोखंडी कमानीतून मंदिराच्या आवारात आपण
प्रवेश करतो. मध्यवर्ती भागात असलेल्या औंदुंबराच्या झाडाखाली भग्न
अवस्थेतील मुर्त्या पहावयास मिळतात. दोन छोटेखानी खोल्या, विटांच्या भिंती,
त्यावर पत्राचं छप्पर आणि एक कळस अशी मंदिराची रचना. मंदिराला कुलूप
असल्या कारणाने जास्त वेळ न दवडता माचीकडली वाट धरली. दाट जंगलातून
जाणाऱ्या वाटेवर कचरा व्यवस्थापनावर जनजागृती करणारे फलक वाचत एका सपाटीवर
आलो. येथून समोरील वाट थेट कमळमाचीवर जाते तर डावीकडील वाट पिण्याच्या
पाण्याकडे ! गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने आम्ही पाण्याची वाट
धरली. दहा मिनिटांतच आम्ही एका नैसर्गिक झऱ्यापाशी येऊन पोहचलो. कड्याच्या
टोकावर समोरील बाजूस कोळेश्वर आणि रायरेश्वर पठाराची व्याती बघत झऱ्याचे
गारेगार पाणी पीत एक क्षणभर विश्रांती घेतली. कमळमाचीवरील लोकं आणि वन्यजीव
सुद्धा वर्षभर ह्याच पाण्यावर अवलंबून असतात. पाण्याच्या काही अंतरावरचं
आम्हाला बिबट्याची विष्ठा निदर्शनास आली.







पाण्यापासून
दहा मिनिटांतच आपण माचीवर पोहचतो. मध्यभागी एक प्रशस्त घर आहे. बाजूच्या
शेतजमिनीत येथील लोक गव्हाची शेती करतात. घराची व्याप्ती बघता एखादं गाव
राहू शकेल एवढी प्रशस्त जागा. तीन कुटुंब असलेल्या ह्या घराला लागूनच
गुरांचा गोठा आहे. याच घरातील रहिवासी नारायण कचरे (९८३४९५४७४६)
रोज १५ ते २० लिटर दुध वासोळे गावात विक्रीसाठी नेतात शिवाय येथे येणाऱ्या
लोकांची जेवणाची सोय देखील करतात. पण त्याची कल्पना त्यांना आधीच द्यावी.
घरच्या समोरून मळलेल्या वाटेने पंधरा मिनिटांतच गडाच्या तटबंदी जवळ पोहचलो.
गडाचा पहिला दरवाजा याच भागांत असावा. या सपाटीवर कधीकाळी पहारेकऱ्यांच्या
राहण्याची व्यवस्था असावी पण आज मात्र हा सर्व परिसर पडझड झालेल्या आणि
दाट झाडीमध्ये लुप्त झालेला आहे. बालेकिल्ल्यावर जाणारी वाट कोसळली आहे.
दोन दगडांमध्ये तयार झालेल्या खाचेवर पंधरा ते वीस पायऱ्यांची लोखंडी शिडी
लावलेली आहे. या पायऱ्या चढल्यावर बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराचे जोते
दिसतात. आणखी सात पायऱ्या चढून आपला बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. बालेकिल्ला
म्हणजे दीड ते दोन हेक्टरमध्ये पसरलेलं एक पठारचं. चहुबाजूंनी धारधार
ताशीव कडे त्यामुळे तुरळक ठिकाणीच तटबंदीचे अवशेष आढळतात. बालेकिल्ल्याच्या
सुरवातीलाच एक लांबलचक विहीर जांभ्या दगडात कोरलेली दिसते. हा जांभा खडक
पाचगणी- कोळेश्वर- महाबळेश्वर येथील पठारांवर तसेच कोयना नदीच्या दोन्ही
तीरांवरील पठारांवर विस्तृत प्रमाणात दिसून येतो. जांभा खडकाखालील भाग
लिथोमार्ज (चिकण माती) मातीयुक्त असतो. जेव्हा जाभ्यातील लोहाचे प्रमाण ४०%
पेक्षा जास्त होते तेव्हा त्यास 'लोहयुक्त जांभा' असे म्हणतात व जर
अल्युमिनियमचे प्रमाण ४०% पेक्षा जास्त झाल्यास 'अल्युमिनायुक्त जांभा'
किंवा 'बॉक्साईट' म्हंटले जाते. किल्ल्यावरील या जांभ्यात खोदलेल्या सहा
फूट रुंदीच्या व दीड ते दोन फूट कमी-अधिक उंचीच्या ५० पायऱ्या उतरून आपण
विहिरीच्या तळाशी पोहचतो. यातील काही पायऱ्या कातळात कोरलेल्या तर काही
बांधून काढलेल्या आहेत. खाली उतरण्यासाठी एक कायमस्वरूपी स्टील रोप फिक्स
केलेला आहे. विहिरीच्या भिंतींना हात लावला असता लाल रंगाची माती (काव)
आपल्या तळहातांना लागते. ह्यालाच गेरूची किंवा कावेची विहीर अशी सुद्धा ओळख
आहे. विहिरीच्या तळाशी गारवा असल्याने तोंडातून निघणाऱ्या वाफेचे
बाष्पीभवन होताना दिसत होते. विहिरीच्या छताला सूर्यप्रकाश आत येण्यासाठी
तीन झरोके दिसून येतात. मुख्य विहिरीला लागूनच एक मातीने बुजलेली विहीर
आहे. ह्या विहिरीच्या भिंतीत खडकात खोदलेले भव्य कोनाडे होते. यात कैदी
ठेवत असत. त्यांच्यापुढे उपासमारीचे मरण किंवा विहिरीत उडी टाकून मरणे हे
दोनच पर्याय उरत.







किल्ल्याच्या
मध्यभागी एक २० फूट लांबी व ३० फूट रुंदीचे जोत्याचे अवशेष आहेत. त्यातील
प्रत्येक जांभा दगड हा साधारणतः २×२ फुटांचा आहे. चौथऱ्याच्या मध्यभागी एक
लोखंडी खांब झेंड्याकरिता रोवलेला आहे. जोत्याच्या समोरच कातळात पोस्ट
होल्स व शिवलिंग कोरलेलं दिसतं. पूर्वेकडील बाजूस माची निमुळती होत गेलेली
दिसते. त्यात काही ठिकाणी खडक बांधकामासाठी खणून काढलेला दिसतो.
किल्ल्याच्या माथ्यावरून नैऋत्येस महाबळेश्वरचे पठार, वायव्येस कोळेश्वरचे
पठार व मंगळगड, उत्तरेस रायरेश्वर पठार व केंजळगड, ईशान्येकडील बाजूस
मांढरदेवीचा डोंगर व पांडवगड, आग्नेयेस पाचगणी पठार, वैराटगड व चंदन-वंदन
पर्यंतचा सारा परिसर निरभ्र वातावरणात दृष्टिक्षेपात येतो. ट्रेक पूर्ण
करण्यासाठी पाच ते सहा तासांचा कालावधी पुरेसा ठरतो. शिवाजी महाराजांनी सन
१६७०-७१ मध्ये पांडवगड आणि एप्रिल १६७४ मधे
केंजळगड घेतला त्याच दरम्यान या दोन किल्ल्याजवळील कमळगड हा सन १६७० ते
१६७४ दरम्यान घेतला असावा. कमळगडी अंकुशी नावाची नाणी पाडली जात. सन १८०६
च्या दरम्यान ताई तेलीण यांच्या अधिपत्यात हा किल्ला होता. बहुदा याच काळात
ही नाणी येथे पाडली जात असावीत. ही नाणी निश्चितच अंकुशी रुपयांप्रमाणे
असावीत, असे मुद्राशास्त्रज्ञांचे मत आहे. परंतु अद्याप अशा प्रकारची नाणी
इतरत्र सापडली नाहीत. पुढे एप्रिल १८१८ मधे मेजर थॅचर याने फारशी लढाई न
करताच कमळगड ताब्यात घेतला. माथ्यावरून दिसणारे बलकवडी आणि धोम धरणाचं
विहंगम दृश्य पाहताना, दाट झाडं आणि वेलींनी तयार झालेल्या मांडावाखालून
जाणाऱ्या वाटा धुंडाळताना, निसर्गातील वैविध्यपूर्ण वृक्षवल्लींनी,
दऱ्याखोऱ्यांनी आणि पशुपक्ष्यांनी नटलेल्या अश्या गडकोटांची वारी
आत्मसुखाचा केंद्रबिंदू ठरते.

संदर्भ ग्रंथ :-
१) सातारा जिल्हा गॅझेटिअर
२) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे : प्रफुल्लता प्रकाशन
३) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
( ३० ऑक्टोबर २०२१ )
अल्पपरिचित गडकिल्ले - मिरगड

पेण
शहराजवळ असलेल्या महाल मिऱ्या डोंगररांगेच्या शेवटच्या भागांत छोटेखानी
मिरगड किल्ला आहे. मिऱ्या डोंगराचा थंड हवेचे ठिकाण म्हणून वापर करण्याचा
ब्रिटिशांनी विचार केला होता, पण ही कल्पना प्रत्यक्षात येऊ शकली नाही.
मिरगड किल्ल्यावर जाण्यासाठी कोंढवी आणि पाचगणी अशा दोन्ही गावातून वाटा
आहेत. पेण-वडखळ-कासु-पाबळ-कोंढवी ( बिरडावाडी ) असा २७ किलोमीटरचा प्रवास
करून गडाच्या पायथ्याला पोहचता येते. या वाटेने आपण गडाच्या पदरात पोहचतो.
समुद्रसपाटीपासून साधारणतः ३५० मीटर उंचीची गडाची दोन्ही शिखरे समोरूनच
आपलं लक्ष वेधून घेतात. प्रथम डावीकडील शिखरमाथ्याकडे चालायला सुरुवात
केल्यावर तासाभरातच आपण दोन शिखरांमधील खिंडीत पोहचतो. मिऱ्या डोंगराजवळील
कुरवाड या गावाजवळ कलात्मकरीत्या कापलेले दगड सापडतात. नजीकच्या तलावात
अनेक भग्न मूर्ती असल्याचे लोक सांगतात. दुसऱ्या वाटेने गडावर जाण्यासाठी
पेण-बोरगाव-महालमीऱ्या-पाचगणी असा २० किलोमीटरचा प्रवास करून आपण पाचगणी
गावात दाखल होतो. याच वाटेने गडावर जाताना माचीवरील वाघेश्वराचे दर्शन
सुद्धा घेता येते. पाचगणी पठाराच्या शेवटच्या भागात किल्ला असल्याने समोर
दिसणाऱ्या पहिल्या टेकडीला वळसा घालून अर्ध्यातासात आपण खिंडीत येऊन
पोहचतो. याच पहिल्या टेकडीवर झाडाखाली महिषासूरमर्दिनीच्या दोन मुर्त्या
ठेवलेल्या दिसतात. बहुदा गडावरील मंदिर उध्वस्त झाल्यानंतर कोणीतरी त्या
झाडाखाली ठेवल्या असाव्यात.


दुसऱ्या
टेकडीच्या उतारावर बांधकामाचा साधारण अर्धा मीटर उंचीचा पाया दिसतो, तर
माथ्यावरील एका भागात बांधकामाचे जोते दृष्टीस पडते. माथ्यावरील या भागात
पाणी नाही. गडाच्या पुढच्या शिखराकडे चालायला सुरुवात करावी. मिरगडाचा
मुख्य भाग या डोंगरमाथ्यावर आहे. पाच मिनिटांमध्ये गडाच्या तुटलेल्या
तटबंदीमधून आपला किल्ल्यात प्रवेश होतो. गडाच्या माथ्यावर बर्यापैकी सपाटी
आहे. गडमाथ्यावर तटबंदी व बुरुजाचे मोजकेच अवशेष दिसतात. डाव्या बाजुस एक
उंचवटा दिसून येतो. कधीकाळी हा गडाचा सर्वात मोठा आणि भक्कम बुरुज असावा.
याच बुरुजाला खेटून दोन लहान बुरुजांची जोती नजरेस पडतात. येथेच गडाचा
मुख्य दरवाजा असावा, तर खालच्या बाजुस पायऱ्यांचे कोरीव दगड ढासळलेल्या
अवस्थेत दिसून येतात. समोरील बाजूस एका मंदिराचे जोते शिल्लक आहे. २-३
पायऱ्या व अनेक घडीव दगड विखुरलेले जोत्याजवळ दिसतात. मंदिरालगतच एक कातळात
खोदलेलं भलंमोठं टाकं नजरेस पडतं. टाक्याच्या आच्छादनासाठी बाजूलाच
पोस्टहोल्स आहेत. पण पावसाळा व्यतिरिक्त कोणत्याही टाक्यात पाणी नसतं.
गडाच्या मध्यभागात सदरेसारखे बांधकाम आहे. हे बांधकाम गडावरील सर्वात मोठे
बांधकाम आहे. आता या बांधकामाचे फक्त जोतेचं शिल्लक राहिले आहे. या
बांधकामाच्या उत्तरेला कातळात खोदलेले आणखी एक टाके आहे. गडफेरी पूर्ण
करण्यासाठी तासाभराचा वेळ पुरेसा आहे.






मिरगड
किल्ल्याचा वापर टेहळणीसाठी किंवा संरक्षक वसाहत म्हणून केला गेला असावा.
मिरगड किल्ल्याला काही पुस्तकांत तसेच शासकीय गॅझेटियरमध्ये सोनगिरी असे
संबोधले आहे. पण सोनगिरी हे या किल्ल्याचे नाव नसून मिरगड हेच योग्य नाव
आहे कारण या किल्ल्याचा मिरगड या नावानेच ऐतिहासिक कागदपत्रांत उल्लेख
आलेला आहे. सोनगिरी हा किल्ला खंडाळा घाटात असून पळसदरी हे गडाच्या
पायथ्याचे गाव आहे. इ.स १६६२ मध्ये मोगल सरदार नामदारखान याने पेण व
आजूबाजूच्या परिसरावर हल्ला केला होता. तेव्हा झालेल्या लढाईत शिवाजी
महाराजांनी भाग घेतला होता. ही लढाई मिरगडच्या परिसरात झाल्याचा उल्लेख
आढळतो. आणखी काही ज्ञात ऐतिहासिक कागदपत्रांतून मिरागडचा उल्लेख दि. २८
मार्च १७४० मध्ये येतो. या दिवशी संभाजी आंग्रे विजयदुर्ग किल्ल्यावरून
आपले आरमार घेऊन समुद्रमार्गे अलिबागजवळील साखर या गावी आले. त्या सुमारास
चिमजीआप्पा व नानासाहेब पेशवे त्यांच्या मदतीस आले व त्यांनी पाली, मिरगड व
उरण हे भूभाग जिंकून घेतले, अशी माहिती आंग्रेकालीन पत्रव्यवहारात मिळते.
मिरगड किल्ल्यावरून वाघेश्वर मंदिराचा परिसर, रत्ना व अंबा नदीचे खोरे,
रत्नगड, सागरगड, कर्नाळा, माणिकगड आणि सरसगड हा सारा परिसर निरभ्र
वातावरणात दृष्टीक्षेपात येतो. किल्ल्यावर राहण्याची व जेवण्याची सोय
उपलब्ध नाही. पायथ्याच्या गावात जेवणाची सोय होऊ शकते, पण त्याची कल्पना
त्यांना आधीच द्यावी. वेळेचे योग्य नियोजन केल्यास मिरगड, रत्नगड आणि
सांकशी ह्या तिन्ही किल्ल्यांची भटकंती एकाच दिवशी करता येऊ शकते. मिऱ्यागड
आणि रत्नगड यांच्या मध्यावर चांदेपट्टी हे गाव असून चांदजी जेधेने
शिवाजीच्या काळात ते वसविले असावे. या उंच पठारावर लॅटेराईट व बॉक्साइट
खडकाचे साठे आढळतात. महालमीऱ्या डोंगरावर अंदाजे ४०० वर्ष जुने
व्याघ्रेश्वराचे मंदिर आहे. देवळाच्या बाजूने वर येण्यासाठी सुबक पायर्या
आहेत. बाजुला लहानसे कुंड आणि गायमुख आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजुस
दीपमाळ, वीरगळ, नंदी आणि काही मूर्तीसदृश्य दगड पाहायला मिळतात. मंदिरात
शिवलिंग, गणेश यांच्या मुर्त्या आहेत. देवळाला वळसा घालून मागील बाजूस
उतरल्यावर पावसाळ्यात १०० फूटावरुन पडणारा धबधबा पर्यटकांचे मन मोहित
करतो.


संदर्भग्रंथ :-
१) रायगड जिल्ह्याचे दुर्ग वैभव - सचिन जोशी
२) रायगड जिल्हा गॅझेटिअर
अल्पपरिचित गडकिल्ले - रत्नगड उर्फ रतनगड
पेण
तालुक्यातील मिऱ्या आणि तिलोरे डोंगररांगेला जोडणाऱ्या टेकडीवर रतनगड उर्फ
रत्नगड नावाचा अपरिचित किल्ला वसलेला आहे. पेण-खोपोली मार्गावर कामार्ली
फाट्यावरून वारवणे-सायमाळ असा १७ किलोमीटरचा प्रवास करून आपण किल्ल्याजवळील
गावात पोहचतो. साय/सैतानमाळ गावाच्या खालच्या बाजूस असलेल्या टेकडीवर आणि
रत्ना नदीकाठी हा किल्ला आहे (उ. १८°४१' २९.४६'' पू. ७३°०९' २८.५३'').
समुद्रसपाटीपासून सुमारे ४०० मी उठवलेला हा किल्ला,त्यावर फडकणाऱ्या भगव्या
झेंड्यामुळे सायमाळ गावातून आपलं लक्ष वेधून घेतो. याच सैतान/सायमाळावर
शिवाजी महाराजांचा सेनापती आबाजी सोनदेव याने कल्याणच्या सुभेदाराचा खजिना
लुटला होता. किल्ल्याचा आकार पाहता याचा वापर संरक्षक वसाहत किंवा
टेहळणीसाठी केला गेला असावा.






रतनगड
उर्फ रत्नगड हा किल्ला बाबूराव पाशीलकर नावाच्या माणसाने बांधला.
शायिस्ताखानाने हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला पण गडाचा किल्लेदार कावजी
कोंढाळकर याने निकराने लढा दिला. मिऱ्या डोंगराच्या या परिसराचा, थंड हवेचे
ठिकाण म्हणून वापर करण्याचा ब्रिटिशांनी विचार केला होता, पण ही कल्पना
प्रत्यक्षात येऊ शकली नाही.
सायमाळ गावातूनच
किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत कच्चा रस्ता जातो. येथूनच साधारणतः १५
मिनिटांमध्ये आपण भैरव मंदिरापाशी पोहचतो. हल्लीच बांधकाम केलेल्या
मंदिराच्या आतील बाजूस तीन, तर बाहेरील बाजूस एक असे शेंदूर लावलेले चार
मूर्तीसदृश्य दगड पहावयास मिळतात. मंदिराच्या डाव्या बाजूने एक तीव्र
घसाऱ्याची वाट अर्ध्या तासातच आपल्याला किल्ल्याच्या पहिल्या सपाटीवर घेऊन
येते. सपाटीवरून किल्ल्याचा माथा नजरेस पडतो. याच भागांत कातळात खोदलेले
काही पोस्ट होल्स दिसून येतात. छप्पर उभारण्यासाठी किंवा झेंडा रोवण्यासाठी
यांचा वापर झाला असावा.







सपाटीवरून
पायवाटेने माथ्यावर जाताना वाटेत पाण्याचे एक खोदीव टाके आहे. टाक्यात
पाणी शिल्लक असले तरी ते पिण्यायोग्य नाही. ज्या ठिकाणी आपला किल्ल्यात
प्रवेश होतो त्या जागी तटबंदीचे अवशेष दिसून येतात. येथेच एक शिवलिंग
ठेवलेलं आहे. किल्याच्या माथ्यावर मध्यभागी रत्नाई देवीची मूर्ती, एक
कोरीवकाम केलेलं पिठ नजरेस पडते. गावकरी देवीच्या दर्शनाला येऊन नारळ अर्पण
करतात. पश्चिमेकडील बाजूस एका बुरुजाचे अवशेष आढळतात. त्याच्या बाजूलाच एक
दगडी पन्हळ पहावयास मिळते. किल्ल्यावरून कामार्ली आणि सायमाळ गावं, हेटवणे
धरण, माणिकगड, भोगेश्वरी नदीचे खोरे दृष्टीक्षेपात येते.
किल्ल्याच्या
मध्यावर दक्षिणोत्तर बाजूस एक कातळात खोदलेले पाणीटाके आहे. पहिल्या
टाक्याच्या शेजारूनच तीव्र घसाऱ्याची वाट इथपर्यंत येते. बारमाही
पाण्याच्या या टाक्यात अतिशय थंडगार पिण्याचे पाणी उपलब्ध असते. किल्ल्याचा
माथा आटोपशीर असल्याने सुमारे दोन तासांतच किल्ल्याची भटकंती पूर्ण होते.
सायमाळ गावातील जिल्हापरिषद शाळेच्या प्रांगणात एक तुटकी तोफ पहावयास
मिळते. वर्षभरात कधीही किल्ल्याला भेट देता येते. किल्ल्याच्या खाली
असलेल्या भैरव मंदिरात किंवा शाळेत राहण्याची सोय होऊ शकते.


संदर्भग्रंथ :-
१) रायगड जिल्ह्याचे दुर्ग वैभव - सचिन जोशी
२) रायगड जिल्हा गॅझेटिअर
किल्ले कोंढवी
रायगड आणि
रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी घाटाजवळ छोटेखानी कोंढवी नावाचा
अपरिचित गिरिदुर्ग आहे. पोलादपूर बस स्थानकापासून ११ किलोमीटरचा धामनदेवी -
फणसकोंड फाटा - तळ्याची वाडी असा खाजगी वाहनाने अथवा बसने प्रवास करून आपण
कोंढवी किल्ल्याजवळ पोहचतो. (उ. १७°५५' २०.७०" पू. ७३°२७' १०.७०" )

तळ्याच्या
वाडीतून जाणारा गाडीरस्ता सुमारे १०० मीटर उंचीच्या गडमाथ्यावर घेऊन जातो.
वाटेच्या मधल्या टप्यात गडाचे पहिले भैरव मंदिर आहे. मंदिर प्रशस्त असून
येथे मुक्काम करता येतो. मंदिरात काही मूर्ती ठेवलेल्या आहेत, पण
शिल्पकलेवरून या मूर्ती ६० ते ७० वार्षपूर्वीच्या असाव्यात असे वाटते.
गडाच्या सुरवातीलाच उजव्या हाताला मंदिराचे अवशेष आणि चौथऱ्यावर रंगरंगोटी
केलेल्या वीर मारुतीच्या दोन मुर्त्या नजरेस पडतात. मंदिराच्या मागील बाजूस
गाळाने भरलेल्या विहिरीचे अवशेष आढळतात. मारुती मंदिरच्या समोर असलेल्या
आठ ते नऊ पायऱ्या चढून आपला कोंढवी किल्ल्यात प्रवेश होतो. कधीकाळी येथे
गडाचे मुख्य प्रवेशद्वार असावे. साधारणतः गडाचा परिसर गोलाकार आकारात पाच
एकरमध्ये दक्षिणोत्तर पसरलेला आहे. कोंढवी किल्ल्याच्या उत्तरेला
घाटमाथ्यावरील सातारा व महाबळेश्वर येथे जाणारा आंबेनळी घाट असुन
कोंढवी-देवपूर दरम्यान एक लहानसा घाटमार्ग या मुख्य घाटमार्गाला मिळतो. या
घाटमार्गाचे रक्षण करण्यासाठी कोंढवी किल्ल्याची बांधणी करण्यात आली
असावी.



रायगड
किल्ला व तेथील परिसर शिवाजी महाराजांनी घेतल्यावर कोकणात
स्वराज्यविस्ताराची तयारी सुरू झाली. त्यावेळी महाराजांना सिद्दी, इंग्रज,
पोर्तुगीज, सावंत यांच्याशी दोन हात करावे लागणार होते. याची सुरवात म्हणून
कोकणातील मोऱ्यांचे चंद्रगड व कोंढवी हे दोन किल्ले शिवाजी महाराजांनी
घेतले.
इ. स. १७७६ मध्ये
सदाशिवराव भाऊंच्या तोतयाने बंड केले होते. त्याने वरंध घाटाखाली
पेशव्यांविरुद्ध कट करून दीड हजार माणसे जमविली. तेव्हा त्याने रायगडावरील
चाकर गंगाजी धिंडले याला फितूर केले. त्यामुळे काही काळ रायगडदेखील या
तोतयाकडे होता. या सुमारास मोहोप्रे, बिरवाडी, महाड, नाते व कोंढवी इ.
गावांतील शेकडो लोक त्याला मिळाले. या वेळी कोंढवी किल्ल्याचाही वापर या
तोतयाने केला असावा.
इ. स. १७७८-७९ मध्ये रायगड तालुक्यात २४४ गावे
होती. यामध्ये कोंढवी परगणा होता. या व्यतिरिक्त महाड परगणा, तर्फ बिरवाडी,
तर्फ तुडील, तर्फ विन्हेरे, तर्फ वाळणखोरे असे सहा भाग होते. परगणा कोंढवी
पैकी उमरठ, ढवळे, खोपडी व दांदके ही चार गवे पंतप्रतिनिधींच्या ताब्यात
होती.
गडाच्या
मध्यभागी दुसरे भैरव मंदिर आहे. मंदिराचा जीर्णोद्धार केलेला असून मंदिरात
भैरोबा, भैरी देवी, शिवलिंग व एक महिषासुर मर्दिनीची मुर्ती पाहवयास
मिळते. कोंढवी आणि आजूबाजूच्या परिसरातील फणसकोंड, गांजवणे, खडपी, चोळई,
धामणदेवी, दत्तवाडी, खडकवणे, गोलदरा व तळ्याची वाडी या गावांचे आराध्य
ग्रामदैवत म्हणून आठगाव भैरवनाथ अशी ओळख आहे. मंदिराच्या प्रांगणात काही
दगडी मुर्त्या, तुळशी वृंदावन, दिपस्तंभ, सुंदर नक्षीकाम केलेले आणि
समोरच्या बाजूस कमळ कोरलेले मध्ययुगीन काळातील पीठ नजरेस पडते.
भैरवनाथ मंदिराच्या लगत नवीन
भव्य पाषाण मंदिर बांधण्याचा संकल्प हाती घेतल्यानंतर याकामी पाण्याची
साठवण टाकी खणण्यासाठी खड्ड्यातील माती उपसण्यात आली. या मातीच्या
ढिगार्यामध्ये काही मुर्त्या आढळून आल्याने तालुक्यात या घटनेमुळे
भाविकांमध्ये विशेष कुतूहल निर्माण झाले आहे. या मूर्तींमध्ये श्री गणेश,
भैरी, जोगेश्वरी, वाघजाई आणि एक वीरगळ इत्यादींचा समावेश आहे. कोकणच्या
इतिहासावर अभ्यास करणारे डॉ. अंजय धनावडे यांनी या मूर्तींसंदर्भात त्या
चौदाव्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंतच्या असल्याचे नमूद केले आहे.
मंदिराच्या उजव्या बाजूस एक
कोरडा पडलेला तलाव आहे. याच तलावाच्या बाजूला झाडाखाली भैरव मूर्ती व एक
शिवलिंग दिसून येतात. मंदिराच्या डाव्या बाजूस जोत्यांचे अवशेष व बांध
नजरेस पडतात. याच भागात एक कोरीव ४ X २ फूट आकाराचे शिल्प आहे. अश्या
प्रकारचे शिल्प बहुतेकदा निजामशहाच्या ताब्यातील किल्ल्यावर आढळते. असे
शिल्प मंडणगड किल्ल्यावर देखील पहावयास मिळते.
गडावर तटबंदी, बुरुज, दरवाजा
अशे अवशेष दिसत नाहीत. काही भागांत कोसळलेल्या तटबंदीचा पाया नजरेस पडतो.
गडावर पाण्याची सोय नाही. बहुतेकदा मंदिराला कुलुप लावलेले असते. गडाच्या
पूर्वेकडील बाजूस प्रतापगड आणि कुडपन पर्यंतचा परिसर न्याहाळता येतो. तर
आग्नेय बाजूस मिठखडा, महिपतगड व सुमारगड हे किल्ले नजरेस पडतात. निरभ्र
वातावरणात येथून दुर्गदुर्गेश्वर रायगड आणि कडसरी लिंगाणा यांचे देखील
दर्शन घडू शकते. गड फिरण्यासाठी अर्धा तास पुरेसा ठरतो. वर्षातील बाराही
महिने गडाला भेट देऊ शकता.
संदर्भग्रंथ :-
१ ) रायगड जिल्हा गॅझेटीयर
२) रायगड जिल्ह्याचे दुर्ग वैभव - सचिन जोशी
३) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
अलिबागच्या अथांग सागरावर नजर हेरून असलेला गिरिदुर्ग - सागरगड
पावसाळा
सुरू होताच वेड लागतात ते निसर्गाच्या सानिध्यात मनमुराद भटकंती करण्याचे,
पावसाच्या धारेत ओले चिंब होत गडकिल्यांवरील सोसाट्याचा वारा अंगी
झेलण्याचे. ट्रेक करताना वाटेत लागणाऱ्या धबधब्यात आणि नदीतील डोहात
मनसोक्त डुंबण्यासाठी अलिबाग जवळील सागरगड हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
मुंबई, पुणे किंवा रायगड यांसारख्या कोणत्याही ठिकाणांहून सागरगड आणि
अलिबागचे समुद्रकिनारे यांचा वन-डे विकेंड डेस्टिनेशन म्हणून विचार करता
येईल. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यातचं आम्ही सागरगड आणि
कनकेश्वरचा प्लॅन बनवला. माझा अलिबाग मधील मित्र भोप्या (रोशन भोपी) आणि
त्याचा भाऊ असे तिघेही भल्या पहाटेच त्याच्या बेलोशी गावातून सागरगडाकडे
मार्गस्थ झालो. अलिबागजवळील धरमतर खाडी ते रेवदंडा खाडी पर्यंतच्या
परिसरावर वचक ठेवण्यासाठी सागरगड किल्ल्याची उभारणी केली गेली. सागरावर
लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला असला तरी सागरापासून ८ किलोमीटर लांब आणि
१८°४२' उ., ७३°२०' पू., ४१४ मीटर उंच असलेल्या डोंगरावर हा किल्ला वसलेला
आहे.
● सागरगडाचा इतिहास :-
१)
सागरगड किल्ल्यावरील खांबटाके आणि भुयारे यांवरून याची पायाभरणी शिलाहार
कालीन (इ.स. ९ वे ते १३ वे शतक) असावी. शिलाहार घराण्यांचा उत्तर कोकणचा
पहिला राजा कपर्दी याची राजधानी सागरगडाच्या समोरच्या बाजूस असलेली चौल
येथील दंडाराजपुरी होय. त्यामुळे पहाऱ्यासाठी सागरगडाचा वापर त्याकाळात
नक्कीच झाला असेल.
२)
हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर इ.स १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी
हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. सागरगड उर्फ खेडदुर्ग या गडावर टेहळणी
करताना महाराजांना अलिबाग जवळ समुद्रात दोन बेटं दिसून आली. त्याचं
बेटांवर खांदेरी आणि उंदेरी किल्यांची बांधणी झाली. स्वतंत्र आरमार स्थापन
केल्यानंतर अलिबाग पट्यातील रेवदंडा, कुलाबा, सर्जेकोट, खांदेरी आणि उंदेरी
यांसारख्या किल्यांवर सागरी तटांच्या रक्षणाची भिस्त येईपर्यंत सगळा
कारभार हा सागरगडावरूनच होत असे.
३)
इ.स. १६६५ मध्ये शिवाजी राजांनी मोगलांबरोबर केलेल्या पुरंदरच्या तहात जे
२३ किल्ले मोगलांना दिले त्यात सागरगडचा (खेडदूर्ग) समावेश होता.
आग्र्याहून सुटका झाल्यावर महाराजांनी सागरगड पुन्हा स्वराज्यात आणला.
४)
संभाजी महाराजांना मुघलांनी पकडल्यानंतर माणकोजी सूर्यवंशीने सागरगड ठाणे
सोडून प्रबलगडावर आश्रय घेतला. संभाजीच्या मृत्यूनंतर माजलेल्या अंदाधुंदीत
सागरगड सिध्दीने ताब्यात घेतला. पण कान्होजी आंग्रे, कुलाब्याचे भिवाजी
गुजर, आरमार प्रमुख सिधोजी यांनी १६९८ साली सिध्दीकडून किल्ला जिंकून
घेतला.
५)
छत्रपती शाहू महाराज व ताराराणी यांच्या वादात कान्होजी आंग्रे
ताराराणीच्या बाजूस होते. पण १७१३ मध्ये बाळजी विश्वनाथ पेशवे यांनी
मुसद्देगिरीने छ. शाहू व कान्होजी आंग्रे यांच्यात समेट घडवून आणला.
त्यावेळी १६ किल्ले कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यात
सागरगडचा समावेश होता. कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर सागरगडचा ताबा
येसाजीकडे गेला. मानाजी आंग्रे व यसाजी आंग्रे या भावांच्या भांडणात
पोर्तुगिजांनी मानाजीची बाजू घेतली, मानाजीने येसाजीचा पराभव केला.
त्यावेळी सागरगडाचा ताबा त्यांच्याकडे आला. इ.स. १७३८ मध्ये संभाजी
आंग्रेने सागरगड मानाजी कडून जिंकून घेतला.
६)
१७४० सालीं बाजीरावाचें सैन्य नासिरजंगाशीं लढण्यांत गुंतलें आहे अशी संधी
साधून संभाजी आंगरे यानें एकाएकीं अलीबागेंत उतरून हिराकोट, थलचाकोट,
राजगड, सागरगड व चौलचा कोट हीं स्थळें घेतलीं व अलीबागेंत कुलाब्याचें पाणी
बंद केलें, तेव्हां मानाजीनें, ताबडतोब येऊन आपलें रक्षण करावें अशी
पेशव्यांस विनंति केली. पेशव्यांनीं मानाजीच्या कुमकेस जाण्याविषयीं
इंग्रजांकडे पत्रें रवाना केलीं व बाळाजी बाजीराव व चिमाजी आप्पा हें स्वतः
संभाजीवर चाल करून गेले.
७)
येसाजीचा मुलगा बाबुराव आंगरे कुलाब्याचा सरखेल असताना त्याने शिंदेच्या
सेनेच्या मदतीने मानाजीचा भाऊ जयसिंगाचा पराभव करून त्यास कैद केले व १८००
मध्ये त्याचा सागरगडावरून कडेलोट केला. त्यानंतर जयसिंगाचा मुलगा मुरारने
उठाव केला पण तो फसला. रामजी अंगरेने मुरारला मदत केली होती. त्यामुळे
बाबुरावने रामजीस पकडून त्याचा १८०७ मध्ये सागरगडावरून कडेलोट केला.
८)
इ.स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. इथला रम्य निसर्ग व
अल्हाददायक वातावरण पाहून जनरल फूलर व काही इंग्रज अधिकार्यांनी येथे
विश्रामधामे बांधली होती.
● पोहचण्याच्या वाटा :-
१) सागरगडावर जाण्याची मुख्य
वाट मुंबई-अलिबाग रस्त्यावरील खंडाले गावातून आहे. मुंबई-पुण्यातून येताना
वडखळ-पेझरी-कार्ले खिंड-खंडाले असा प्रवास करून खंडाले गावातून सागरगड फाटा
पकडावा. पावसाळ्याच्या दिवसांत एका फार्महाऊस शेजारून ओढ्याजवळ गाडीरस्ता
जातो. या वाटेने गडावर जायला अडीच तासांचा कालावधी लागतो. पावसात याच
वाटेने धोंदाणे धबधब्याचा आंनद लुटता येईल.
२) सागरगडावर पेझारी गावातूनही
जाता येते. पेझारी गावातूनच नागझिरा गावात पोहचून गावाच्या शेवटी असलेल्या
क्रिशिवन फार्म शेजारून गडावर वाट जाते. या वाटेने दीड तासांचा वेळ लागतो.
वाटेवर काही प्रमाणात मार्किंग केलेली दिसून येते.
( सिद्धेश्वर मंदिर )

अलिबाग
शहरापासून अवघ्या ५ किमी अंतरावर असलेल्या खंडाले गावातून आम्ही गावाच्या
शेवटी असलेल्या ओढ्या जवळ पोहचलो. ओढा पार करताच दगड रचून तयार केलेल्या
पायऱ्यांच्या वाटेला आम्ही लागलो. काही वेळातच टेकडीवर पोहचलो. येथून एक
वाट माचीवर जाते तर दुसरी धोंदाणे धबधब्याकडे. माचीवरच्या वाटेने मोकळ्या
जागेत पोहचल्यावर दोन टाप्यांत कोसळणाऱ्या धोंदाणे धबधब्याचे जलप्रपात
त्याच्या एकसुरी आवाजने आपलं लक्ष वेधून घेतो. वीस मिनिटांची चढाई करून
आम्ही सिद्धेश्वर मंदिराच्या आवारात दाखल झालो. माकडांच्या गदारोळात
मंदिराचा परिसर नेहमीच गजबजून गेलेला असतो. मंदिराच्या खालच्या बाजूस एक
विहीर व मठ दिसून येतो. बाजूनेच वाहणाऱ्या ओढ्याचे जलप्रपात स्वतःला झोकून
देतात तोच हा धोंदाणे धबधबा. मंदिरामुळे ह्यास सिद्धेश्वर धबधबा म्हणुनही
ओळखतात. कौलारू छप्पर,आधाराला लाकडी खांब, गाभाऱ्यात शिवलिंग आणि समोरच्या
बाजूस नंदी अशी मंदिराची रचना आहे. श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्री या
दिवशी दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येथे गर्दी करतात. सिद्धेश्वराचे
दर्शन घेऊन अर्ध्या तासातच आम्ही माचीवर पोहचलो. माचीवर चढताना मागच्या
बाजूस पश्चिमेस खांदेरी आणि उंदेरी जलदुर्ग दिसून येतात.




( पडक्या अवस्थेतील गडाचा महादरवाजा )
( किल्ल्याच्या खाली असलेले भुयार - 📸:- रोहित पाटील )
( तटबंदीमधील चोर दरवाजा )
सपाटीमुळे
माचीवर मोठया प्रमाणात वस्ती दिसून येते. सागरगड व माचीवर पावसाळा वगळता
बाकी दिवसांत गाडीरस्त्याने सगरगडाच्या दरवाजा पर्यंत जाता येऊ शकते.
माचीवरील घरांमध्ये जेवण्याची सोय होऊ शकते, पण त्याची कल्पना त्यांना आधीच
द्यावी. माचीवरून तासाभरात आपण गडाच्या महादरवाजाजवळ पोहचतो. वाट मळलेली
असून जागोजागी वाटेवर मार्किंग केलेली दिसून येते. गडाच्या वाटेवरच डावीकडे
शेंदूर फासलेला कातळ आहे, तर उजवीकडील बाजूस गडाचे सरळसोट कातळकडे,
वानरटोक आणि रेवदंडा खाडीचा परिसर दृष्टीक्षेपात येतो. गडाच्या डाव्या
बाजूस भग्न अवस्थेत असलेला महादरवाजा आहे. येथील तटबंदी सुद्धा मोठ्या
प्रमाणात ढासळलेली आहे. शिवाय काही जांभ्या दगडात (Laterite Stone)
बांधलेली आहे. कोकणात ईतक्या उंचीवर जांभ्या दगडात बांधलेला हा एकमेव
किल्ला असावा. जवळपास चिऱ्याची खान नसताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात
चिरा कोठून व का आणला असेल हाच पहिला प्रश्न उद्भवतो. महादरवाजा च्या
डाव्या बाजूस एक वाट कातळात कोरलेल्या भुयाराकडे जाते. पावसाळ्यात या
वाटेने जाताचं येत नाही. त्या भुयारची माहिती व काही फोटोस आम्हाला माझा
पेझारी मधील मित्र रोहित पाटील यांच्याकडून मिळाली. उजव्या बाजूची वाट
गडाच्या चार मीटर उंच तटबंदीकडे जाते. याच भागात एक भक्कम बांधणीचा बुरुज
नजरेस पडतो. मधील जागेत हत्ती, घोडे ठेवण्याची जागा होती. गडाला महादरवाजा
पासून २०९.७६ मीटर लांब तटबंदी आहे. कधीकाळी तटबंदीच्या लगतच खंदक खोदलेला
होता पण आता तो पूर्णपणे बुजलेला आहे. तटबंदीवरूनसुद्धा झाडाच्या आधारे
गडावर प्रवेश करता येतो. याच तटबंदी मध्ये एक छोटेखानी खिडकी वजा दरवाजा
दिसून येतो त्यास गुप्त दरवाजा किंवा चोर दरवाजा म्हणून ओळखतात.


( पांडवकुंड / पांडवटाके )


गडाच्या
आत प्रवेश करताच वाटेवर उजव्या बाजूस झाडाखाली नंदी ठेवलेला आहे.
त्याबाजूलाच एक भग्न अवस्थेतील गोमुख टाक आहे. पाण्याची गळती होत असल्याने
ह्यात पाणी साठत नाही. त्यापुढेच आणखी एक पाण्याचा झरा दिसून येतो, पण हा
फक्त पावसाळ्यातचं वाहता असावा. हीच वाट आपल्याला बालेकिल्ल्याच्या
आवारातील शिवमंदिरात घेऊन जाते. शिवमंदिरचा हल्लीच जीर्णोद्धार झालेला
दिसून येतो. मंदिरात शिवलिंग, नंदी, गणपतीची मूर्ती, महिषासुरमर्दिनीची
मूर्ती आणि बाहेरच्या बाजूस एका अज्ञात विराची मूर्ती आहे. बालेकिल्ल्याचा
बराचसा भाग हा दाट मोठ्या झाडांनी व्यापलेल्या आहे. याच परिसरात काही
बांधकामाचे अवशेष, किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष आणि भग्न अवस्थेतील तोफ
आढळून येते. बालेकिल्ल्यात पश्चिमेला उंचवट्यावर महाराजांचं स्मारक आहे.
त्याशेजारीच तीन लहान तोफा ठेवलेल्या आहेत. गडाचा पश्चिमेकडील परिसर येथून
न्याहाळता येतो. शिवमंदिरच्या खालच्या बाजूच एक बारमाही पिण्याच्या
पाण्याचे टाके बांधलेलं आहे. यालाच स्थानिक लोकं पांडवकुंड या नावाने देखील
संबोधतात. एका दगडी गोमुखातून खळखळत कोसळणारी पाण्याची संततधार
येणाजणाऱ्यांची तहान भागवते. याशिवाय गडावर मूजांबा, खेरजाबाई व वेतळाची
देवळे होती.


( गडावरील शिवमंदिर )
( सतीच्या माळावरील बांधकामाचे अवशेष )
( गडावरील तलाव )

गडाच्या
पश्चिम बाजूस असलेल्या सतीच्या माळावर बांधकामाचे अवशेष दिसून येतात. येथे
एक भग्न अवस्थेत समाधी आणि दीपमाळ देखील आहे. पश्चिमेकडील बाजूस असणाऱ्या
सरळसोट कड्यामुळे या बाजूस तटबंदी दिसून येत नाही. डावीकडील सोंड लांबवर
गेलेली असून त्याच्या सुरवातीस एक तलाव दिसून येतो. या सोंडेलाच टकमक टोक
किंवा मंकी पॉईंट देखील म्हणतात. येथील शेवटच्या बाजूस असलेला वानरटोक
नावाचा गडापासून विलग झालेला सुकला हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. याच
भागात तासंतास बसून पश्चिमेकडून येणाऱ्या गार वाऱ्याचे झोत अनुभवण्याची
मजा काही औरचं. येथून धरमतर खाडी, सर्जेकोट, खांदेरी, उंदेरी,कुलाबा,
रेवदंडा किल्ला, कोर्लई किल्ला, रेवदंडा खाडी आणि अलिबागचा समुद्रकिनारा
दृष्टीक्षेपात येतो. याच सोंडेवर असलेल्या तलावाच्या बाजूनेच पेझारी गावात
उतरणारी वाट आहे. वाटेच्या मध्यावर कातळात कोरलेली खांब टाकी दिसून येतात.
यांना सोनेरी कुंड या नावाने देखील ओळखतात. बालेकिल्ल्याच्या पूर्वेकडे
भक्कम बांधणीचा बुरुज आहे. या भागातून कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, माथेरान,
सांकशी किल्ला, मिरागड, तैलबैला यांसारखे किल्ले निरभ्र आकाशात पाहता
येतात. गडाचा सर्व परिसर पाहण्यास तासभर वेळ पुरेसा ठरतो. गडफेरी पूर्ण
करून परतीच्या प्रवासात धोंदाणे धबधब्याचे जलप्रपात अंगी झेलताना,
पावसाळ्यात हा एक भन्नाट ट्रेक असल्याची ग्वाही आम्हाला झाली. त्यातील काही
आठवणी मनात आणि कॅमेरात कैद करून आम्ही कनकेश्वर मंदिराकडे प्रस्थान
केले.

( सोनेरी कुंड - 📸:- रोहित पाटील )
( मंकी पॉईंट / टकमक टोक )
( धोंदाणे धबधबा )
● महत्वाच्या सूचना :-
१) सागरगड माचीवरील गावात गावकऱ्यांची परवानगी घेऊन दत्त
मंदिरात राहायची सोय होऊ शकते. गावातील घरांमध्ये जेवणाची सोय उपलब्ध आहे
पण त्याची कल्पना त्यांना आधीचं द्यावी. (शिवसमर्थ किराणा स्टोअर - संदीप
पाटील - ७८७५०२३६५८, ९२७३१६८५५४, ९१६८१४९२६४)
२) स्वतःचे वाहन असल्यास सागरगड किल्ल्यासोबतचं कुलाबा,
रामदरने किल्ला, कनकेश्वर मंदिर, अलिबागचा समुद्रकिनारा यांपैकी एक अशी दोन
ठिकाणे एकाच दिवशी करता येऊ शकतात.
३) गडावर पांडवकुंडात बारमाही पिण्याचे पाणी असते. पण नेहमी सोबत आपली पाणी बॉटल बाळगलेली केव्हाही उत्तमचं.
४) सागरगडाला पावसाळा वगळता बाईक वरून गडाच्या तटबंदी पर्यंत जाता येते.
५) निसर्गात फिरताना कुठेही कचरा करू नये. ऐतिहासिक वास्तूंचे
पावित्र्य राखावे. गडावर कोणतेही व्यसन करू नये. वन्य प्राण्यांना
खाद्यपदार्थ देऊ नये, कायद्यानेदेखील गुन्हा आहे.
● संदर्भ ग्रंथ :-
१) कुलाबा गॅझेटिअर
२) भटकंती रायगड जिल्ह्याची - प्र. के. घाणेकर
३) मराठी रियासत मध्यविभाग २ पृ. १
कातळभिंती तैलबैल्याच्या !

सह्याद्री हा ज्वालामुखीचा उद्रेक. उन, वारा, पावसाने झीज होऊन अतिप्रचंड,
अतिराकट, अतिदणकट, काळाकभिन्न अश्या वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार झाल्या.
अतिप्रचंड शिखरे, उंचच उंच सरळ सुळके, भयाण घळी, दाट दाट झाडी, खोल खोल
दऱ्या, भयंकर तुटलेले ताठ कडे, भयाण कपाऱ्या, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे,
आधारशून्य घसरडे उतार, लांबच लांब सोंडा, दुभेद्य चढाव आणि मृत्यूच्या
जबड्यासारख्या गुहा. त्यापैकी एक रचना म्हणजे तैलबैल्याच्या प्रस्तर भिंती.
समुद्रसपाटीपासून १०३० मी उंचीच्या तैलबैला उर्फ कावडीचा डोंगर उर्फ
भैरवनाथाचा डोंगर त्याच्या सरळसोट कड्यामुळे अगदी खोपोली, नागोठणे, पाली,
माणगाव या भागातूनही आपलं लक्ष वेधून घेतो. पुणे शहरापासून ९० किमी वर
असलेल्या कोरबारसे मावळातील हा किल्ला. किल्ल्याचे ठिकाण, अवशेष आणि आकार
पाहता याला टेहळणीची जागा किंवा संरक्षक वसाहत हेच नाव त्यास उत्तम.
प्राचीन काळापासून घाटमाथ्यावरून कोकणात उतरणाऱ्या वाघजाई, चीवर दांड, साव
घाट, बोरघाट, कुरवंड्या घाट, घोडजीनाची वाट/तिवईची वाट, भोरप्याची नाळ,
नाणदांड घाट, डेऱ्या घाट यासारख्या वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी तैलबैला चा
वापर केला गेला. यासोबतच घाटमाथ्यावर तैलबैला, कोरीगड, घनगड, कैलासगड तर
कोकणात सुधागड, अनघाई, सरसगड आणि मृगगड अश्या दुर्गसाखळीतून घाटवाटांवर
पहारे ठेवण्यात आल्याचे दिसून येते. पूर्वापार गावामध्ये बैलांचा तळ
पडायचा. येथून कोकणात बऱ्याच घाटवाटा उतरतात. गावालगत असलेल्या सपाटीमुळे
देशावरून आलेल्या माल वाहतुकीच्या बैलगाड्या इथे लावल्या जात. त्यामुळे
गावाला बैलतळ हे नाव पडले. त्याचा अपभ्रंश होऊन तळबैला किंवा तैलबैला झाले
असावे. कातळभिंतींच्या माथ्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व
गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे. पण आपल्यासारख्या भटक्यांना
भिंतीच्या तळाशी असलेल्या खिंडीतील भैरवनाथाच्या मंदिरापर्यंत जाता येते.
● पोहचण्याच्या वाटा :-
१) तैलबैला गावात पोहोचण्यासाठी प्रथम मुंबई किंवा पुणे येथून
लोणावळा गाठावे. लोणावळ्याहून भांबुर्डे कडे जाणारी एस. टी. पकडावी.
पेठशहापूर (कोरीगडाच्या पायथ्याचे गाव) येथून तैलबैलाचा फाटा अंदाजे ८.५
किमी अंतरावर आहे. मुख्य रस्त्यावरून उजव्या बाजूला वळणार्या रस्त्यावर
तैलबैला उर्फ भैरवनाथाचा डोंगर असा फलक लावलेला आहे. फाट्यापासून तैलबैला
हे गाव साधारण ३ किमी अंतरावर आहे. लोणावळा बस स्थानकातून संध्याकाळी
तैलबैला गावासाठी थेट बस सुटते. ती बस रात्री तैलबैला गावात थांबून सकाळी
परत जाते.
२) पुण्याहून पौड-ताम्हिणी-निवे फाटा-भांबुर्डे-तैलबैला असा ९० किमी
चा प्रवास करून सुद्धा पोहचता येते. या मार्गावर रहदारी जास्त नसल्याने
खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. तसेच येताना कुंडलिका व्हॅलीचा नजारा
अनुभवता येतो.
३) कोकणातील पाली-धोंडसे-ठाणाळे लेणी-वाघजाई घाट-तैलबैला असा पाच-सहा तासांचा ट्रेक करून तैलबैला गाठता येते.
कोरीगड किल्ल्याची मनसोक्त भटकंती करून सालतर खिंड ओलांडून आम्ही तैलबैला
गावी पोहचलो. रस्त्याने जातानाचं लांबसडक पठारावर स्लाईस केकच्या
तुकड्यासारख्या कापून ठेवलेल्या अद्भुत व अफाट भिंती आपल्याला अचंबित
करतात. सह्याद्रीत अश्या जुळ्या आणि एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या भिंती
कुठेचं नसाव्यात. गावाच्या पुढे आलेल्या रस्त्यावर गाड्या पार्क करून
शेताच्या बांधांवरून आणि डोंगराच्या उजवीकडील धारेवरून जाणाऱ्या वाटेने
अर्ध्यातासातच आम्ही कातळभिंतींजवळ पोहचलो. समोरचं असलेल्या पाच फूट उंच
दगडाजवल एक झेंड्याचा खांब उभारलेला दिसतो. मागच्या बाजूस सालतरचा डोंगर
आणि खिंड नजरेस पडत होती. खालच्या बाजूस गुच्छात वसलेल्या तैलबैला गावाचा
परिसर न्याहाळता येतो. समोरच्या बाजूस घनगड किल्ला आणि त्याला खेटूनच
असलेला मारथाणा डोंगररांग दृष्टीक्षेपात येते.



तैलबैला भिंतींच्या शेजारून दोन ते तीन फूट रुंद वाटेने आम्ही खिंडीतील
भैरवनाथ मंदिरात पोहचलो. येथे असलेल्या गुहेत ग्रामस्थांनी मंदिर उभारलं
आहे. उजव्या बाजूस बारमाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. याच भैरवनाथाच्या
मंदिरात काही शेंदूर लावलेले दगड, त्रिशूळ आणि शंख ठेवलेले दिसून येतात.
गुहेत ४ ते ५ लोकांची राहण्याची सोय होऊ शकते. या गुहेवरून पुढे चालत
गेल्यावर कातळावर ३ गिरीदेवातांच्या मूर्ती कोरलेल्या दिसून येतात.
त्यापुढे दुसरी गुहा आहे. गुहेच्या पुढे स्वछ व पिण्यायोग्य असे पाण्याचे
खांब टाके आहे. ह्या टाक्यांच्या पुढे अजून एक टाके आहे. खिंडीतून कोकणातील
पाली शहरात दिमाखात उभा असलेला सरसगड किल्ला लक्ष वेधून घेतो. ह्याच
खिंडीतून कधीकाळी कोरीव पायऱ्यांची वाट तैलबैलाच्या माथ्यावर जात होती. पण
आता मात्र ती अस्तित्वात नाही. माथा गाठण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व
गिर्यारोहण तंत्राचा माहितगार सोबत असावा. आजच्या दिवसातील कोरीगड आणि
तैलबैला किल्यांची भटकंती करून आम्ही ताम्हिणी घाटातील सनसेट पॉईंट वर
पोहचलो. येथून दिसणारा पॅनोरॅमिक व्हीव आम्हाला अचंबित करून टाकत होता.
कोरीगड, मारथाणा डोंगर, घनगड, सालतर डोंगर, तैलबैला, सुधागड, सरसगड,
अवचितगडाची डोंगररांग, सागरगडाची डोंगररांग, सुरगड, तळगड आणि खालच्या बाजूस
असलेलं विळे भागाड गाव असा सगळा परिसर दिसून येत होता.
● महत्वाच्या सूचना :-
१) कातळभिंतींच्या माथ्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्राचा माहितगार सोबत असणे आवश्यक आहे.
२) तैलबैला गावात गावकऱ्यांची परवानगी घेऊन हनुमान मंदिरात राहायची
सोय होऊ शकते. गावातील घरांमध्ये जेवणाची सोय उपलब्ध आहे पण त्याची कल्पना
त्यांना आधीचं द्यावी. वाढत्या पर्यटकांमुळे तैलबैला गावात भरमसाठ पैसे
देऊन जेवण करण्यापेक्षा आपला जेवणाचा डबा आपण घरूनच आणावा.
३) स्वतःचे वाहन असल्यास तैलबैला किल्ल्यासोबतचं कोरीगड, घनगड,
कैलासगड, कुंडलिका व्हॅली, अंधारबन यांपैकी एक अशी दोन ठिकाणे एकाच दिवशी
करता येऊ शकतात.
४) खिंडीतील भैरवनाथाच्या मंदिरात बारमाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. पण नेहमी सोबत आपली पाणी बॉटल बाळगलेली केव्हाही उत्तमचं.
५) साधारणतः दोन तासांत तैलबैला पाहून होतो. याशिवाय वाघजाई घाटाने उतरून ठाणाळे लेणी सुद्धा पाहता येऊ शकते.
६) निसर्गात फिरताना कुठेही कचरा करू नये. ऐतिहासिक वास्तूंचे
पावित्र्य राखावे. गडावर कोणतेही व्यसन करू नये. वन्य प्राण्यांना
खाद्यपदार्थ देऊ नये, कायद्यानेदेखील गुन्हा आहे.
● संदर्भ ग्रंथ :-
१) पुणे जिल्हा गॅझेटियर
२) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
३) साद सह्याद्रीची! भटकंती किल्ल्यांची !! - प्र.के. घाणेकर
४) महाराष्ट्र दर्शन - गो. नी. दांडेकर
५) भटकंती घटवाटांची - डॉ. प्रीती पटेल
सोनकीच्या फुलांचा किल्ला - कोरीगड
श्रावण महिना संपल्यानंतर निसर्गात विविध रंगछटा आपल्याला पाहायला मिळतात.
हिरव्यागार गवताने अच्छादून गेलेल्या डोंगररांगा, त्यातूनच ओसंडून वाहणारे
जलप्रपात, ढगांआडून चालणारा ऊन सावल्यांचा खेळ, सोनकी-तेरडा-कुर्डु-विंचवी
यांसारख्या रानफुलांनी बहारलेली पठारे अश्या आल्हाददायक वातावरणात भटकंती
करताना एक वेगळाच उत्साह अंगी असतो. २७ सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिवस
म्हणून साजरा केला जातो, पण त्या दिवशी सुट्टी नसल्याने वाईट वाटू न घेता
येणाऱ्या रविवारी आम्ही मुळशी खोऱ्यातील कोरबारस मावळातील कोरीगड आणि
तैलबैला किल्यांची भटकंती करण्याची मोहीम आखली. पुण्याहून नितीन आणि दिनेश
थेट पेठ शहापूर या कोरीगड किल्ल्याच्या पायथ्याशी भेटणार होते, तर महाड
वरून मेहुल आणि मी ताम्हिणी घाटाचा प्रवास करून कोरीगड गाठणार होतो.
गडाचा इतिहास :-
१ ) इ.स .१४८२ मध्ये महमदशहा बहमनी (बहमनी साम्राज्याचा प्रमुख)
वारल्याने त्याच्या मृत्युपत्रात त्याने मलिक नायब (मुळ नाव मलिक हसन व
नायब हि त्याची पदवी) बहमनी राज्याचा विश्वस्त याला आपल्या मुलाचा म्हणजे
सुलतान महमुद याचा मुख्य वजीर केला. पुढे मलिक नायब याने आपला मुलगा अहमद
याला जहागिरी लावण्याची जबाबदारी दिली. त्याची दौलताबादहुन जुन्नरकडे
रवानगी केली. त्याने इ. स.
१४८२-८३ च्या मोहिमेत
शिवनेरी, चावंड, लोहगड, तुंग, हे किल्ले जिंकले आणि त्याने त्याचा मोर्चा
कोआर (कोरीगड) येथे वळविला . इ.स. १४९० मध्ये अहमदने बहमनी सुलतानाचा अंमल
झुगारुन स्वतंत्र निजामशाहीची स्थापना केली. तेव्हा कोरीगड निजामशाहीत आला.
पुढे इ.स .१६३६ पर्यत १४६ वर्ष हा किल्ला निजामशाहीत होता.
२ ) इ.स. १६३६ दिल्लीचा बादशहा शहाजहान व विजापुरचा मुहम्मद आदिलशहा
यांनी निजामशाही काबीज केली व निजामशाहीचा मुलुख बाटुन घेतला त्यावेळी
कोरीगड हा आदिलशाहीच्या ताब्यात आला.
३ ) निजामशाहीत कोरीगडाच्या मुलखाला पौड मावळ किंवा कोरबारसे हे नाव
होते. त्यावेळी ढमाले हे देशमुख होते. निजामशाही बुडाल्यानंतर आदिलशाही
सत्ता आली तरी तेथील देशमुखी तसेच कोरीगड व घनगड हे किल्ले ढमाले देशमुख
यांच्याकडेच होते.
४ ) इ.स. १६४७ मध्ये छत्रपती शिवरायांनी कोरीगड स्वराज्यात
आणण्यासाठी दादोजी कोंडदेव यांना मावळात पाठविले. दादोजींनी ढमाले
देशमुखांशी लढून अथवा मुसद्देगीरीने किल्ला स्वराज्यात दाखल केला.
५ ) इ.स. १६६५ मधील मोगल सरदार मिर्झा राजे जयसिंग यांच्या सोबत
झालेल्या पुरंदरच्या तहात तेवीस किल्ले मोगलांना देण्यात आले व जे १२
किल्ले स्वराज्यात होते त्यात कुवारी (कोरीगड) हा स्वराज्यात होता.
६ ) इ.स .१६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराज याच्या निधनानंतर
मोगलानी मराठ्यांचे बहुतांश किल्ले घेतले त्यात कोरीगडही मोगलांच्या
ताब्यात गेला असावा. जेधे शकावली मध्ये "हे वर्षी कुल गड मोगले घेतले" असा
उल्लेख आहे.
७ ) औरंगजेबाने कोरीगड घेण्याचा हुकुम जुन्नरचा किल्लेदार व फौजदार
मन्सुरखान (अलीबेग) याला केला. अलीबेग ने आपला मुलगा मुहम्मद काझिम याला
ही जबाबदारी दिली. मुहम्मद काजिम जुन्नर मार्गे कोरीगडाच्या पायथ्यास येउन
बसला. त्याने किल्ल्याकड़े जाणाऱ्या मुख्य वाटांवर चौक्या बसविल्या. पण
मराठ्यांचा चोर वाटां मार्गे राबता चालूच राहिला. दिवसभर पहारे देऊन
थकलेल्या मोगली छावणीवर, रात्री मराठे छापे टाकित आणि शत्रुंस कापून काढीत.
मोगली सैनिक अनेक वेळेस गड चढून दरवाज्यापाशी येत, पण मराठ्यांच्या
बाणांना, गोफणीच्या दगडाना, आणि बंदुकीच्या गोल्यानां ते बळी पडत. असे अनेक
दिवस सुरु राहिले त्यामुळे काजिम पार चिंतेत पडला. काझिमने लष्करी अधिकारी
रायाजी बाहुलकर यांच्या मदतीने किल्लेदार सोनाजी फर्जत याला फितुर करुन
किल्याला माळा (वेळीच्या फांदीला विशिष्ट ठिकाणी गाठ मारून पाय अडकबुन वर
चढण्यासाठी केलेली दोर) लावुन मोगल सैन्य किल्यात शिरले, किल्यात घनघोर
युद्ध झाले. गिरजोजी निंबाळकर व दिनकरराव यांना वीरमरण आले. शेवटी १२
नोव्हेंबर १६९५ रोजी किल्यावर मोगलांचे निशाण चढले.
८ ) शंकराजी नारायण सचिव यांच्या आज्ञेवरुन नावाजी बलकवडे यांनी
कोरीगड परत मराठ्यांच्या ताब्यात आणला. (वर्ष इ.स. १७०० पुर्वी असावे कारण
१७०० मध्ये नावजी बलकवडे यांचे निधन झाले होते.)
९ ) इ.स .१७१३ मध्ये छत्रपती शाहु महाराजांच्या पश्चिमेकडील
प्रवेशद्वार असलेला कोरीगड सरखेल कान्होजी आंग्रे यांनी घेतला. २८
फेब्रुवारी १७१४ मध्ये कान्होजी आंग्रे यांनी शाहु महाराजांचे मांडलिकत्व
पत्करले व झालेल्या तहानुसार कोरीगड शाहु महाराजांच्या ताब्यात गेला.
१०) पेशवाईच्या अस्तापर्यत पौड मावळवर सरदार रास्ते यांचा अमल होता
त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंडही केले त्यावेळी कोरीगड इंग्रजांनी ताब्यात
घेतला पण रास्ते यांनी पेशव्यांशी बोलणी करून परत कोरीगड आपल्या ताब्यात
घेतला.
११) इ.स .१८१८ मध्ये लेफ्टनंट कर्नल प्रॉथरने लोहगड, विसापुर,
राजमाची, तुंग व तिकोणा हे किल्ले आपल्या ताब्यात घेतल्यावर त्याने आपला
मोर्चा कोरीगडकडे वळविला. इंग्रजाना कोरीगड जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
करावे लागले शेवटी १७ मार्च १८१८ रोजी इंग्रजांनी कोरीगड आपल्या ताब्यात
घेतला.
गडावर पोहचण्याच्या वाटा :-
पेठ-शहापूर :- कोरीगडला जाण्यासाठी मुंबई किंवा पुणेकरांनी प्रथम
लोणावळ्याला यावे. येथून आय. एन. एस. शिवाजीमार्गे आंबवणे किंवा
भांबुर्डेला जाणारी बस पकडावी किंवा सहारा प्रकल्पाकडे जाणारी बस पकडावी
आणि आय.एन.एस. शिवाजीच्या पुढे २२ कि.मी वरील पेठ-शहापूर गावात उतरावे. या
गावातून सरळ गडावर जाणारी मळलेली पायवाट आपल्याला पायऱ्यांशी घेऊन जाते.
पायऱ्यांच्या साहाय्याने साधारण वीस मिनिटांत गडावर पोहचता येते.
आंबवणे गाव :- कोरीगडला आंबवणे गावातूनही जाता येते. ही वाट थोडी
अवघड श्रेणीची आणि मळलेली सुद्धा नाही. या वाटेने जाण्यासाठी लोणावळ्याहून
भांबुर्डेकडे अथवा थेट आंबवणेकडे जाणारी बस पकडावी. गावातून पाऊण तासात
गडावर जाता येते.



भल्या पहाटेच तांबडं फुटायच्या आत आम्ही महाड वरून माणगाव-विळे असा प्रवास
करत ताम्हिणी घाटातून वर आलो. रविवारचा दिवस असूनसुद्धा रस्त्यावर
गाड्यांची रेलचेल दिसत नव्हती. निवे फाट्यावरून वळसा घेत कुंडलिका व्हॅली
व्हिवं पॉईंट जवळ पोहचलो. पावसाळा संपल्यानंतर खूपच कमी पर्यटक इथे फिरकत
असावेत. कारण पावसाळ्यामध्ये धुक्यात आणि धबधब्यात न्हाउन निघालेला प्लस
व्हॅली आणि कुंडलिका व्हॅलीचा नजारा अगदी मन थक्क करणारा असतो. काही फोटोस
काढून आम्ही घनगड, एकोले व्हॅली, मुळाशी जलाशय, तैलबैल्याच्या कातळभिंती
रस्त्यावरून बघत ११० किमी चा प्रवास करून पेठ शहापूर गावात पोहचलो. आंबवणे
गावाजवळून येताना समुद्रसपाटीपासून ९३० मी उंच असेलाला कोरीगड एखाद्या
धरणाच्या भिंतीसारखाचं भासत होता. दोन्ही टोकांना वर आलेले बुरुज तर
रोहिड्या किल्ल्याची आठवण करून देत होते. नितीन आणि दिनेश अर्धातास आधीच
पोहचून आमची वाट पाहत होते. आम्हाला उशीर झाल्याने त्यांची बोलणी ऐकत गडाची
वाट धरली.




बैलगाडी रस्त्याने चालत आम्ही दाट जंगलाच्या वाटेवरून, रान भेंडीच्या
काटेरी पानांपासून स्वतःला वाचवत पायऱ्यांजवळ येऊन ठाकलो. इथेच सह्याद्री
प्रतिष्ठान या संस्थेने किल्याचा इतिहास सांगणारा फलक लावलेला आहे.
पायऱ्यांवर चढत मध्यवर्ती भागात एक कातळात कोरीव दोन खांबांवर उभी असणारी
गुहा नजरेस पडते. गुहेच्या शेजारीच गणेशमूर्तीची ची स्थापना करून त्यावर
छोटेखानी मंदिर उभारलेला आहे. ह्या गुहा मध्ययुगीन काळात कोरल्या असाव्या.
त्यानंतर त्यांचा वापर पहारेकर्यांच्या चौक्या किंवा मेठ म्हणून केला
गेला. थोडं पुढे गेलो असता कातळात कोरलेलं पाण्याचं टाक आहे. इथलं गारेगार
पाणी पिऊन २० मिनिटांतच आम्ही गणेश दरवाजापाशी पोहचलो. डावीकडील उंच भिंत
हल्लीच बांधून त्याची डागडुजी केलेली दिसते. वाटेत असलेल्या गणेश
मंदिरामुळे ह्या दरवाजाचं नाव गणेश दरवाजा ठेवले असावे. दाराच्या वरच्या
बाजूस कमळपुष्प कोरलेली आढळतात. सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेमार्फत
हल्लीच लाकडी दरवाजा बसवलेला आहे. त्यांच्या या संवर्धन कार्याला मानाचा
मुजरा करत आम्ही आतल्या बाजूस आलो. पहारेकऱ्यांच्या देवट्या दोन्ही बाजूंस
येथे दिसून येतात. शिवाय डागडुजीची कामे चालू असल्याचे आढळते. देवट्यांच्या
पुढे काटकोनात ही वाट वळून किल्ल्यात आपला प्रवेश होतो. कधीकाळी येथे आणखी
एक दरवाजा असावा. किल्ल्याचा एवढा सपाट माथा रानफुलांनी बहरलेला बघून जणू
आम्ही कास पठारावरचं आलोय असा भास झाला. चौफेर नजर मारली असता सोनकी,
विंचवी आणि तेरड्याची फुले वाऱ्याच्या तालावर डोलत होती. डाव्या बाजूस एक
भक्कम बांधणीचा बुरुज आजही दिमाखात उभा आहे. ह्या बुरुजावरून दरवाजासमोरील
भाग आणि गडाची वाट अगदी बाणांच्या माऱ्यात आहे. तटबंदीमध्ये असलेल्या
पायऱ्या चढून आम्ही वरच्या बाजूस आलो. ह्याच तटबंदीवरुन गडफेरी पूर्ण करता
येऊ शकते.






दक्षिण बाजूस चालत आम्ही बुरुजापाशी पोहचलो. बुरुजावरून आंबे व्हॅली चा
संपूर्ण परिसर आणि runway दृष्टीक्षेपात येतो. साधारण २००० साली आधुनिक शहर
उभे करावे असे श्री. सुब्रतो राय यांच्या मनात आले आणि लोणावळ्याच्या
निसर्गरम्य परिसरापासून जवळ सहारा ग्रुपने आंबे व्हॅली शहर वसविले. खाली
दिसणारे कारंजे, बंगले, जलतरण तलाव, पाण्याचे मोठे तलाव अतिशय विहंगम
दिसतात. सहारा सिटीने गडावर खालून मोठे लाईट सोडले होते, गडावर शौचकुप
उभारला होता, येणार्या पर्यटकांसाठी वॉच टॉवर उभारले होते. पण
कंपनीविरुध्द गडावर अतिक्रमणाची तक्रार जाताचं हे सर्व काढून घेतले गेले.
त्याच्या खुणा आजही ह्या बुरुजांपाशी पाहायला मिळतात. बुरुजांवरून दिसणारा
आंबवणे दरवाजा आणि त्याची चिलखती तटबंदी आपल्याला लोहगडाची आठवण करून देते.
ह्या वाटेवर बरीच पडझड झालेली असली तरी किल्ल्याच्या दरवाजावरील कमळ पुष्प
लक्ष वेधुन घेतात. बुरुजाच्या पुढे एक तोफ ठेवलेली आहे. त्याखालीच एक पाणी
टाके सुद्धा दिसून येते. याच वाटेने चालत आपण कोराई देवीच्या मंदिरापाशी
येऊन पोहचतो. किल्ल्यावर ऊन आणि पावसापासून बचावासाठी गडावरील एकमात्र
ठिकाण. मंदिराच्या प्रांगणात एक तुळशी रुंदावन, एक दीपमाळ आणि
महिषासुरमर्दिनीची मूर्ती दिसून येते. जीर्णोद्धारीत मंदिरात प्रवेश करून
आम्ही देवीच्या गाभाऱ्यात पोहचलो. एक उत्तर भारतीय इसम ह्या मंदिराचा
पुजारी आहे. गावातून रोज देवीची पूजा करण्यासाठी तो गडावर येतो.
इंग्रजांच्या हाती हा गड आल्यावर त्यांनी गडावर मिळालेले कोराई देवीचे
दागिने मुंबईतील मुंबादेवीला अर्पण केल्याचे बोलले जाते. देवीच्या नावावरून
गडास कोरीगड हे नाव पडले. याशिवाय गडास कुवारीगड, कोराईगड, कोआरी,
कुंवारी, कोटीगड अशी नावे सुद्धा आहेत.



मंदिराच्या मागच्या बाजूस गडावरील सर्वात मोठी लक्ष्मी तोफ आहे. पिकनिकसाठी
आलेल्या मंडळींकडून तोफांवर बसने, त्यांना हलवून पाहणे असे प्रकार आजही
पाहायला मिळतात. इतिहासाची माहिती नसल्यामुळे त्यांच्याकडून अक्षम्य अशा
चुका होतात. गड-किल्ल्यांचे पावित्र्यही जपलं जात नाही हे मात्र दिसून
येतं. किल्ल्याच्या मध्यवर्ती भागांत बरेच बांधकामाचे अवशेष पाहायला
मिळतात. याचं भागात एक हनुमान मंदिर आणि कातळात कोरीव पाण्याचे टाके आहे.
मंदिराच्या समोरच गडावरील सर्वात मोठा पाण्याचा तलाव आहे. तलावाची भिंत
सुद्धा आपलं लक्ष वेधून घेते. तलावांच्या पुढे उत्तरेच्या बाजूला काही गुहा
आहेत. यातील एका गुहेत खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे. यातील पाणी
पिण्यायोग्य आहे. येथेच शंख-चक्र-गदा-पद्मधारी श्री विष्णूची मूर्ती आहे.
गडाच्या तटबंदीची हल्लीच डागडुजी केलेली दिसून येते. तलावाच्या समोरच्या
बाजूस आपण पुन्हा गणेश दरवाजापाशी पोहचतो. दरवाजासमोर महादेव मंदिर आहे.
मंदिराच्या परिसरात चकांवर ४ तोफा ठेवलेल्या आढळतात.




गडाच्या उत्तर बाजूस तटबंदीवरुन चालत आम्ही झेंडा बुरुजावर पोहचलो. गडावरील
हा सर्वात उंच बुरुज आहे. किल्ल्याचा संपूर्ण परिसर येथून नजरेस पडतो. पेठ
शहापूर गावातून येणारी पायवाट आणि लोणावळ्याचा बराचसा परिसर न्याहाळता
येतो. संपूर्ण गड पाहण्यासाठी तासभर वेळ पुरेसा आहे. चढाई आणि उतराई करून
संपूर्ण ट्रेक अडीच तासांत पूर्ण करता येईल. निरभ्र आकाशात गडावरून
नागफणीचे टोक, तुंग, तिकोना, मोरगिरी, मृगगड, अनघाई, तोरणा, राजमाची चे
बालेकिल्ले, ढाकचा बहिरी, माथेरान, प्रबळगड, कर्नाळा, मिरगड, सरसगड,
माणिकगड आणि मुळशीचा जलाशय असा सर्व परिसर दिसतो. कोरीगड किल्ल्याजवळून
कोकणात अनघाई घाट, कुरवंड्या घाट, आंबेनळी घाट, बोरघाट, सव घाट, भैरीची
वाट, गवळणीची वाट, काठीची वाट, कोराई घाट आणि वाघजाई अश्या घाटवाटा उतरतात.
घाटमाथा आणि कोकण अश्या दोन्हीबाजूस देखरेखीसाठी या गडाचा वापर केला गेला.
ह्या गडाचा पुरेपूर आनंद लुटण्यासाठी वर्षाऋतुत गडाला भेट नक्कीच द्यावी.
सोनकीनी बहरलेल्या फुलांचा मनमुराद आनंद डोळ्यात आणि कॅमेरात कैद करत आम्ही
तैलबैला च्या मार्गी लागलो.
महत्वाच्या सूचना :-
१) गडावर महादेव मंदिराच्या समोरील टपरित दिवसा नाष्ट्याची सोय होऊ
शकते. राहण्यासाठी कोराई मंदिराचा वापर करता येईल. पण आधी गावकऱ्यांची
परवानगी घ्यावी.
२) स्वतःचे वाहन असल्यास कोरीगड किल्ल्यासोबतचं तैलबैला, घनगड,
मोरगिरी, तुंग, तिकोना यांपैकी एक अशे दोन किल्ले एकाच दिवशी करता येऊ
शकतात. शिवाय लोणावळामधील टुरिस्ट पॉईंट आणि कोरीगड असा प्लॅन ही करता
येईल.
३) वाटेत चढताना गणेश मंदिराजवळ पिण्याच्या पाण्याचे टाके आहे.
फेब्रुवारी नंतर गडावर पाण्याची कमकरता भासते. नेहमी सोबत आपली पाणी बॉटल
बाळगलेली केव्हाही उत्तमचं.
४) पेठ शहापूर गावात भरमसाट पैसे देऊन, चव नसलेले जेवण करण्यापेक्षा आपला जेवणाचा डबा आपण घरूनच आणावा.
५) निसर्गात फिरताना कुठेही कचरा करू नये. ऐतिहासिक वास्तूंचे
पावित्र्य राखावे. गडावर कोणतेही व्यसन करू नये. वन्य प्राण्यांना
खाद्यपदार्थ देऊ नये, कायद्यानेदेखील गुन्हा आहे.
संदर्भ ग्रंथ :-
१) पुणे जिल्हा गॅझेटियर
२) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
३) साद सह्याद्रीची! भटकंती किल्ल्यांची !! - प्र.के. घाणेकर
कावळ्या बावळ्या घाटाचा रक्षक - कोकणदिवा
सह्याद्रीच्या डोंगररांगेतील दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेल्या सुळक्यांवर उभं
राहून दूरवर क्षितिजात विलीन झालेल्या किल्ल्यांची टेहळणी करणे व दुरून
दिसणारं त्यांचं अक्राळ विक्राळ रूप डोळ्यात साठवून घेणे, माझ्यासाठी या
पेक्षा दुसरी कोणती सुखाची व्याख्या असूच शकत नाही. त्याचप्रमाणे
रायगडावरील टकमक टोकावरून आणि त्याच्या समोरच असलेल्या कोकणदिवा वरून
सूर्यास्त अनुभवलेल्या क्षणांना शब्दांच्या ओंजळीत कैद करताच येत नाही.
नुकताच कोकणदिवा वरून तैलबैला बघितल्याचं एक वृत्त माझ्या वाचनात आलं.
तेंव्हापासूनच माझ्या कल्पनेचा Google Earth गरागरा फिरू लागला होता. तसं
पाहता कोकणदिवा हा रायगडाच्या उंची इतकाच आहे. परंतु तैलबैला ते कोकणदिवा
यांच्यामध्ये आडव्या येणाऱ्या कुंभे आणि ताम्हिणी घाटाच्या डोंगररांगेआडून
तैलबैला दिसणे थोडे कठीणच आहे. रायगडावरील नगारखान्यावरून अरबी समुद्र
बघण्याचं स्वप्न कधी पूर्ण होईल हे माहीत नाही, मात्र कोकणदिवा वरून
दिसणारा तैलबैला! या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी मी कावळ्या बावळ्या
घाटाची मोहीम आखली.
जून महिन्याचे ते दिवस होते. १०- १२ दिवसांची जोरदार बॅटिंग करून पावसाने
विश्रांती घेतली होती. सह्याद्रीचा काळा पत्थर हिरव्यागार गवताने नटून गेला
होता. काही प्रमाणात शतजलधारा धबधब्याच्या रूपात ओसंडून वाहू लागल्या
होत्या. सकाळीच घरून दिसणारा राजगड आकाश निरभ्र असल्याची ग्वाही देत होता.
माझ्या ट्रेकर भिडू भवऱ्याला (अक्षय भवरे) कॉल करून कोकणदिवा ला निघण्याची
तयारी करण्यास सांगितले. दोघेही निघेपर्यंत घड्याळात ११ वाजून गेले होते.
दुपारच्या जेवणाचे डबे बॅगेत भरून महाडवरून बाईकने कोकणदिव्याकडे मार्गस्थ
झालो.

रायगड-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर व रायगड किल्ल्याच्या उत्तर बाजूस
"कोकणदिवा" नावाचा बुटाच्या आकाराचा किल्ला आहे. गडावर जाण्यासाठी
पुण्याहून गारजाई वाडी व महाड कडून सांदोशी गावातून चढाई करता येते.
पुण्यातून येणाऱ्यांनी सिंहगड रस्त्याने पानशेत-घोळ-गारजाई वाडी असा ७०
किमी चा प्रवास करून पायथ्याचे गाव गाठावे. दीड तासांची चढाई करून आपण
किल्ल्याच्या माथ्यावर पोहचतो. माणगाव तालुक्यातील कुंभे गावातून एक पायवाट
घोळ-गारजाई वाडीला येते. दाट अरण्यातून ट्रेक करण्याचं थ्रिल अनुभवायचं
असेल तर ह्या वाटेने सुद्धा ट्रेक करता येईल. महाड ते सांदोशी हे अंतर ३०
किमी आहे. कोंजर घाट चढून आम्ही पाचाड ला
पोहचलो. घनांच्या दुलईत सामावलेला रायगड किल्ला त्याच्या अफाट उंचीची जाणीव
करून देत होता. हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी
छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व
सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता जिजाऊंच्या पाचाड येथील समाधीचे
दर्शन घेऊन आम्ही सांदोशी गावाजवळ पोहचलो. पाचाड-माणगाव रस्त्यावर उजवीकडे
सांदोशी गावात जाणारा फाटा आहे. येथून सुळक्यांच्या डोंगरात विलीन झालेला
सुमारे ९०० मीटर उंचीचा कोकणदिवा लक्ष वेधुन घेत होता. गावात गाडी पार्क
करून आम्ही कोकणदिव्याच्या वाटेला चालू पडलो.



सांदोशी गावाच्या पुढे रस्त्यालगत
असलेल्या एका विहिरीसमोरून, डावीकडील शेताच्या बांधांवरून जाणाऱ्या वाटेने
आम्ही चालत राहिलो. काही वेळातच शेतातून गर्द झाडीमध्ये पोहचलो. कावळ्या
घाट हा नेहमीच वर्दळीचा असल्यामुळे वाट चांगलीच मळलेली आहे. त्यामुळे वाट
चुकण्याची शक्यता नाही. पावसामुळे जंगलात एक वेगळीच प्रसन्नता असते.
झाडांच्या फांद्यांवरील कोवळ्या पालवीचा तजेलदार रंग खुलुन आला होता.
पावश्या पक्षी (Brainfever Bird or Common Hawk-Cuckoo) त्याच्या शिट्टीतुन
शेतकऱ्यांना "पेरते व्हा" असा संदेश देत होता. वाटेत चालताना आम्हाला बघून
खेकडे सैरावैरा पळत त्यांच्या बिळामध्ये धूम ठोकत होते. जंगलामुळे उन्हाचा
वर्षाव आमच्यावर होत नव्हता तरी दमछाक आणि सततच्या चालण्याने घामाच्या
धारेने पुरते भिजून गेलो होतो. थोड्याच वेळात आम्ही मोकळ्या माळरानावर आलो.
तेथून निवडुंगाच्या कुंपणामागून ही वाट पुन्हा दाट जंगलात जाते. एका
ओढ्याजवळ आम्हाला कातळात कोरलेल्या तीन पायऱ्या नजरेस पडल्या. जसजसा
घाटाचा चढ तीव्र होत होता, तसतसा आमच्या चढाईचा वेग कमीकमी होत होता. वाटेत
बऱ्याच ठिकाणी किल्ल्याचे मार्किंग (Arrows) दिसून येतात. गारजाई वाडीतील
बरेचशे लोक सामानाची खरेदी करण्यासाठी याच कावळ्या घाटाने सांदोशी गावात
येतात. शिवकाळात पाचाड नंतर दुसरी बाजारपेठ सांदोशी गावात होती. घाटाच्या
मध्यवर्ती भागात तटबंदी सारखी दगडांची रचना केलेली आढळते. कधीकाळी व्यापारी
मार्ग म्हणून प्रचलित असलेला कावळ्या बावळ्या घाट आता मात्र पावसाच्या आणि
सततच्या कोसळणाऱ्या दरडींमुळे दुर्लक्षित झाला आहे. तब्बल दीड तास
बिनाथांबा चढाई करत आमच्या पायांच्या टापा खिंडीत जाऊन पोहचल्या. पाठीवरील
बॅगा बाजूला ठेवून बॉटलमधील पाण्याने घसा ओला केला. खिंडीच्या वरच्या भागात
दोन्ही बाजूस दगडी जोत्यांचे अवशेष व पडक्या अवस्थेत असलेली ताल दिसून
येते. समोरील बाजूस शेंदूर फासलेल्या दगडाला गावकरी टालदेव असे म्हणतात.
याच देवाला गावकऱ्यांनी लग्नपत्रिका वाहुन त्यांची पूजा केलेली दिसून आली.
पावनखिंड आणि नेसरीच्या खिंडीनंतर कावळ्या बावळ्या खिंड सुद्धा अश्याच एका पराक्रमाने पावन झाली आहे.
११ मार्च १६८९ रोजी जेव्हा छत्रपति संभाजी महाराजांचे निधन झाले (फाल्गुन
वाद्य ३०). राजधानी रायगडावर वयाने अवघे लहान असलेले राजाराम महाराज गादीवर
आले, छत्रपति झाले. आता औरंगजेबाने जणूं मराठा साम्राज्य संपवण्याचा पण
केला होता. त्याने कर्तबगार सरदार शहाबुद्दीनला रायगडला वेढा टाकण्यास व
राजाराम राजेंना पकडण्यास पाठवले. जुल्फिकार खानाच्या थोडक्या सैन्यानि
आधीच रायगडला विळखा टाकला होता. हाच वेढा (विळखा) मजबूत करण्यासाठी औरंगजेब
ने तेवढच मोठं सैन्य शहाबुद्दीन सोबत पाठवले.
मुघल सरदार म्हणजे तेव्हढाच् मोठा लवाजमा. शहाबुद्दीन आपले पाच हजाराचे
सैन्यबळ घेऊन निघाला. वाटेत त्याला काही माणकोजी नामक मराठी सरदार सामिल
झाले. सात हजार परियंत असलेलं त्याचं सैन्य रायगड कडे निघालं. ते किल्ले
कोकणदिव्याकडे आलं. आता कावळ्या घाटाच्या काही अंतरावर येऊन ते थांबलं.
डोंगरावरच्या घोळ गारजाईवाड़ी गावात येऊन त्यांनी आपला तळ ठोकला. किल्ले
कोकणदिव्याच्या खिंडीत शिवछत्रपतींचे कुशल सेनानी, खिंडीचे प्रमुख व
रायगडच्या पायथ्याशी असलेले सांदोशी गावचे "जीवाजी सर्कले नाईक" तैनात
होते. सोबत त्यांचे नऊ पाइक असे दहा जण या खिंडीत होते. शिवछत्रपतींच्या
कालखंडात अनेक लढायांत पराक्रमाची शर्थ केल्याने सांदोशी गाव(खोरं) हे
त्यांना इनामी दिलेल वतन. आधी ("सरखेल" नौसेनापरमुख ) या पदावर असलेले नाईक
सर्कले घराणं आता रायगडच्या रक्षणाच्या जवाबदारी साठी किल्ले कोकणदिव्यावर
सज्य होतं. तेंव्हा खान आल्याची बातमी त्यांना कळाली.
पन्हाळ गड़ाला सिद्धि जोहर ने दहा हजार सैनिकांशी वेढा दिला होता.
इतिहासाची पुनरावृत्ति झाली. सुमारे सात हजारां विरुद्ध दहा उभे होते.दिवस
होता २५ मार्च १६८९. बलाढ्य शत्रु डोळ्या समोर उभा होता. विचार
करण्याचीही ऊसंत नव्हती. जीवाजी नाईक सर्कले यांनी नऊ ही जणांना आपली जागा
गाठण्यास सांगितले. त्यांनी नऊ ही जणांना गनीम संपेपर्यत न मरण्याची जणू
ताकित दिली होती, कारण तसं न झाल्यास जर आज खिंड पडली तर आत्ताच उगवतं
स्वराज्य उद्या उभ राहणार नाहीं ऐवढ नक्की होतं. आता दहा ही जण खिंडीत लढाई
साठी सज्ज झाले. अर्ध्या मावळ्यांनी म्हणजेच पाच ते सहा मावळ्यांनी खिंडित
आपल्या गुप्त जागा गाठल्या. जीवाजी नाईक सर्कले , हातात समशेर घेऊन अपल्या
तिन चार मावळ्यांसोबत खिंडीत, मध्येच जणू पर्वतासारखे खिंडीचा रस्ता अडवून
उभे ठाकले...
घोळ गारजाई गावा मधुन शहाबुद्दीने आपली पहिली हजारी तुकड़ी खिंडीत धाडली.
दहा जण विरुद्ध हजारोंची लढाई आता सुरु झाली. क्षणात रणसंग्राम पेटला. दीन
दीन रण शब्दास हर हर महादेव भिडला. कमरेला लटकलेल्या समशेरी शत्रुवर
कोसळल्या. शिवछत्रपतींनी शिकवलेली गनिमिकावा युद्धनिति आता रंग घेऊ लागली
होती. कोण बाणांनी टिपल गेल. तर कोणावर चढ़ावले भाल्यांचे हल्ले.
मराठ्यांच्या गोफणि फेर धरु लागल्या, आकाशातल्या उल्कापाता प्रमाणे गोफणि
आग ओकात होत्या..कोणावर केव्हाही तलवारीचे वार. तर कोण मोठ्या दगडांनी चेचल
गेलं. थोडा थोडक्यांना मधेच जाऊ कापून येऊन आपल्या गुप्त जागि मावळे परत
जात..
अशा रीतीने जीवाजी सर्कले व त्यांच्या नऊ पाइकांनी हजारोंना पाणी
पाजलं...हजारोंना संपवलं. आपली पहिली तुकड़ी परत आली नाहीं म्हणून
शहाबुद्दीन ने दूसरी तुकड़ी खिंडीत पाठवली. परत या दहाही विरांनी
त्यांच्यावर गोफंगोंड्याचा मारा सुरु केला..दगडांचा मारा .. जीवाजी सर्कले
शत्रुवर यमा सारखे कोसळत होते .. त्यांच्या समशेरीच्या वारांनी खिंडीत
मोघलांची दाणादाण उडवली..शवांचा थर रचत चालला होता..आता दुसऱ्या तुकडीची ही
तीच दशा झाली.परत हजार मारले गेले.. दूसरी तुकड़ी लढत असताना मात्र या दहा
जणांच्या गुपित जागा आता गनीमास समजल्या. तुकडीतील काही मागच्या सैनिकांनी
हे खानाला जाऊन कळवल. शहाबुद्दीन ला हे कळताच तो सर्व सैन्य घेऊन खिंडीत
आला... तोपर्यत सुमारे अर्ध्याहुन अधिक सेना या दहा मावळ्यांनी खिंडीत
झोपवली होती.
अखेर आता मावळे आपल्या गुप्त जागा सोडून एकत्र खिंडीत जीवाजी सर्कले
यांच्या सोबत हजारों समोर उतरले. सर्वत्र कापाकापि सुरुचं होती. जो समोर
येईल त्याला फक्त चिरायचं एव्हढच ते करत होते. रक्तानं ते भीजले माकलेले
तासा वर तास उलटले. सुमारे दहा तास सरले होते...जीवाजी सर्कले यांचा हां
महापराक्रम पाहुन मुघल सरदार स्तब्द झाला होता. (जीवाजी सर्कले यांनी
खानाची अर्ध्र्याहून आधिक सेना परास्त केली होती , सुमारे ४००० हुन अधिक ).
काही तासांनी ही गोष्ट खाली सांदोशी गावात समजली. त्यावेळी गावात मुक्कामी
असलेले गोदाजी जगताप काही साठ सत्तर गावातील मावळे घेऊन जीवाजी सर्कले
यांच्या मदतीसाठी त्यानी खिंडीकडे धाव घेतली. आता मराठ्यांची अशी मुठभर
जेमतेम साठ सत्तर ची ही फ़ौज खिंडीत आली.
खिंडीत आता भयानयुद्ध सुरु होत.. रक्ताचे पाट वाहायला लागले. जीवाजी सर्कले
रक्तात भिजुन गेले. तळपत्या सूर्या सारखे ते लालबूंद झाले होते.. या
मराठ्यांनी जणु कहरच केला होता. खिंडीत रक्ताचा अभिषेक झाला. खानाला आता
घाम फुटला, मराठ्यांच्या तूफानी वारांने पठाण कापले गेले.खानाचं सैन्य आता
संपत चाललं होतं. आपली हार होणार हे ख़ानाला आता समजलं.. आपला जीव
वाचवण्यासाठी शहाबुद्दीन खान व राहिलेल्या काही शे दीडशे सैन्याने
खिंडीतून पळ् काढला. मुठभर मराठ्यांनी हजारोंना संपवल. मावळ्यांनी अखेर
युद्ध जिंकल. मात्र ,जीवाजी नाईक सर्कले यांचा या अग्निकुंडात बळी गेला.
जिवाजी नाईक सर्कले यांनि मरेपर्यंत खिंडीतून एकहि गनीम जाऊन दिला
न्हवता..त्यांनी विजयश्री चा झेंडा लावत आपला देह रणी ठेवीला..तब्बल १६ तास
पेटलेलं हे युद्ध शांत झालं.. स्वराज्यावरचं सर्वात मोठं संकट टाळलं
होतं..युद्ध संपल्या वर राहिलेल्या काही मवळ्यांनी ,जीवाजी सर्कले व शहीद
झालेल्या मावळ्यांना ते, त्याचं (प्रेत) घेऊन खाली सांदोशी गावात आले
.गावात जीवाजी नाईक सर्कले व इतर शहीद झालेल्या मवळ्यांचे अंत वीधी पार
पडले...त्यांच्या घरातील स्त्रीया सती गेल्या ..हे त्याग असामान्य होते!!
तब्बल १६ तास पेटलेलं हे युद्ध, १६ तास लढणारे ते मराठे काय असतील आणि अखेर
मराठ्यांच्या बलिदानने व विजयाने ते संपलं. जीवाजी सर्कले नाईक यांच्या
मरणाचं सार्थक झालं कारण छत्रपति राजाराम महाराज सुखरूप दक्षिणेत पोहोचले..
एक मावळा शंभराला भिडला.. दहा मराठे हजारोंशि भिडले हजरोंना चिरले. दहा
जणांनी हजारोंना कंठस्नान घातलं. जेमतेम ६०-७० मावळ्यांनी जवळपास सात हजार
गनीमाला परास्त केले,अखंड सेना पराजीत केली. मणभर मोघली फ़ौजेला कणभर
मराठ्यांनी यंमसदनि धाड़लं... यात काय नाही. ..कोण पराक्रम..ते स्वराज्य
प्रेम ..ती स्वामी निष्ठा..याचा परिणाम म्हणजेच (शके १६११ शुल्क
संवस्तरे,चैत्र वैद्य १०) राजाराम महाराज छत्रपति प्रतापगड करुन पुढे
दक्षिणेत ,सरसेनापति हर्जीराजे परसोजी राजेमहाडिक यांस कड़े सुखरूप
पोहोचले. व पुढच्या काही काळात एक अफट अश्या मराठा साम्राज्याचा उदय झाला.
आजही या लढाईत शहीद झालेल्या वीरांचे, जीवाजी सर्कले नाईक यांची साक्ष
असलेल्या विरगळी ,समाधि ,सतिशिळा गावात आहेत.३५० वर्षांन पूर्वी खिंडीत
कोरलेली त्यांची "मूर्ति " त्यांच्या अतुलनीय पराक्रमाची साक्ष देते. अस
म्हणतात की हा अतुलनीय पराक्रमाने पाहुन छत्रपती घराण्याने सर्कले
घराण्याला ला पंचधातुत कोरलेले इनामी पंचधातु स्तुति पत्र दिले होते (सध्या
ते उपलब्ध नसून ह्याच पुरव्याचा शोध चालू आहे).२५ मार्च हा दिवस शौर्य
दिवस म्हणून सर्कले यांच्या सांदोशी गावी थाटात साजरा केला जातो. वीरांना
श्रद्धांजली अर्पित केली जाते.
°°° [ जेधे शकावलीत ह्या भव्य लढाईची ही ऐतिहासिक नोंद आहे.] °°°
गारजाई वाडीतून येणारी वाट सुद्धा खिंडीतच
येऊन मिळते. उजवीकडील वाटेने झाडीतून मार्ग काढत पुन्हा एका सपाटीवर आलो.
भुकेने व्याकुळ झाल्यामुळे तेथे न थांबता आमच्यापेक्षा दुप्पट उंचीच्या
कारवीतून निसरड्या वाटेने चढत राहिलो. कातळात खोबणीसारख्या केलेल्या
पायऱ्यांनी लेणीपाशी पोहचलो. मागे वळून पाहिले तर दूरवर डोंगरांच्या पलीकडे
पुसटसा साल्तरचा डोंगर आणि त्याबाजूला तैलबैला दृष्टिक्षेपात पडला.
नैसर्गिक डाईक रचनेची तैलबैलाची कातळभिंत इथून मात्र एका सुळक्याप्रमाणे
भासत होती. काही क्षणांतच पावसाची रिपरिप चालू झाली. दिसणारा तैलबैला
मोबाईलच्या कॅमेरात कैद केला पण तो कॅमेऱ्याच्या क्षमतेच्या पलीकडे होता.




लेणीत बसून बॅगेतून जेवणाचे डबे उघडले.
सोबत आणलेल्या चिकन भाकरी आणि बिर्याणी वर ताव मारला. जेवणानंतर ढेकर देत
लेणीत पाऊस कमी होण्याची वाट बघत बसलो. साधारण ८ ते १० जण राहू शकतात इतकी
कातळात कोरलेली ही लेणी आहे. लेणीच्या उजव्या बाजूस पाण्याचे टाके आहे.
बारमाही पिण्याच्या पाण्यासाठी या टाक्याचा वापर होतो. उन्हापासून पाण्याची
वाफ होऊ नये म्हणून भूमिगत हे टाके कोरलेले आहे. पाणी काढण्यासाठी एका
छिद्राची रचना केलेली दिसते. लेणीच्या डाव्या बाजूस सुद्धा एक पाण्याचे
टाके आहे. याच टाक्याशेजारून माथ्यावर जाण्यास वाट आहे.
दुपारचे ४.३० वाजून गेले होते. पाऊस जाण्याची काहीच चिन्ह दिसत नव्हती. मग
भर पावसातच आम्ही माथ्यावर चढाई केली. १० फुटांचा रॉकपॅच चढून आम्ही
माथ्यावर पोहचलो. नवख्या लोकांनी इथे सावधगिरी बाळगावी. माथ्यावर फारच कमी
सपाटीची जागा आहे. बेभान होऊन बरसणाऱ्या पावसांच्या सरींमध्ये विलीन झालेला
रायगड किल्ला नजरेस पडत होता. समोर लावलेल्या झेंड्याच्या मागील बाजूस
लिंगाणा डोकावून पाहत होता. शिवकाळात कोकणदिव्याच्या माथ्यावर मावळे मशाल
पेटवून रायगडाला संकेत देत. दिवसा (चाऱ्याचा) गवताचा धूर करुन रायगडाला
इशारा दिला जाई. निरभ्र वातावरणात माथ्यावरून कांगोरीगड , जननीदुर्ग ,
लिंगाणा , रायलिंग , प्रतापगड, राजगड , तैलबैला , सुधागड यांसारखे किल्ले
दृष्टीक्षेपात येतात. रायगडाचा टकमक टोकापासून ते भवानी टोकापर्यंतचा
संपूर्ण विस्तार कोकणदिवा वरून दिसतो. मावळतीला जाणारा सूर्य आणि किल्ले
रायगड इथून तासंतास बसून बघावं असाच हा कोकणदिवा आहे. कोणत्याही ऋतूत
कितीही वेळा इथे आलो तरी मन भरतचं नाही. पावसाचा वाढता जोर बघता भरभर उतरून
आम्ही घरचा रस्ता धरला. रायगडच्या प्रभावळीतील आणि संरक्षक वसाहत म्हणून
वापरात राहिलेला हा किल्ला आजही रायगडावरून लक्ष वेधून घेतो. जोरदार
बरसणारा पाऊस आम्हाला पहिल्या वहिल्या मान्सून ट्रेकची अनुभूती देऊन गेला.
( पुनाडेवाडीतून दिसणारा कोकणदिवा )
बडदेमाच आणि निवाची वाट
सातवाहन काळापासून कोकणातील बंदरांवर उतरलेल्या व्यापारी मालाची वाहतूक
घाटवाटांमार्फत पैठण सारख्या शहरात होऊ लागली. याच घाटवाटांवर
व्यापाऱ्यांच्या सोईसाठी पाण्याची टाकी , विहरी आणि लेण्यांची सोय झाली.
काही वाटा अगदीच प्राथमिक होत्या तर काही वाटा खास बांधून काढलेल्या.
व्यापारी वाटांसोबतच गावकऱ्यांच्या नेहमीच्या वापरातील गावांना जोडणाऱ्या
वाटा प्रचलित होऊ लागल्या. सह्याद्रीतील अश्याच कुंभे आणि बडदेमाच या
गावांना जोडणाऱ्या वाटेचा मागोवा आम्ही घेतला.
३ जून रोजी आलेल्या ‘निसर्ग’ वादळामुळे अनेक गावेच्या गावे विस्कटून
गेली. वीजपुरवठा पुरता कोलमडून गेला. त्यातच आधीच दुर्गम असलेल्या भागातली
संपर्कयंत्रणाही पार निकामी झाली. सह्याद्रीतील अश्याच दुर्गम आणि
अतिदुर्गम भागात वसलेल्या बदडेमाच गावात तातडीने मदत पोहचवण्याचा निर्णय
अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने घेतला. गूगल मॅपवरही शोधून न
सापडणाऱ्या या गावात महासंघा मार्फत आलेली मदत पोहचविण्याची धुरा डॉ. राहुल
वारंगे आणि सह्याद्रीमित्र संस्थेने त्यांच्या हाती घेतली. महाड वरून
सकाळीच आम्ही ३०० किलो धान्याचा साठा घेऊन माणगाव - निजामपूर - कडापे असा
प्रवास करत टिटवे गावात दाखल झालो. बडदेमाच गावात जाणारा मातीरस्ता
खचल्याने गाड्या रस्त्यावरच पार्क करत आम्ही चढाई सुरू केली. प्रत्येकाच्या
पाठीवर १० ते १५ किलो सामानाची बॅग होती. गावातील लोकांशी संपर्क केल्याने
काही गावकरी आमच्या मदतीस आले होते. वाटेवर चढाई करताना मागच्या बाजूस
धुक्यातून डोकं वर काढणारा कुर्डुगड आणि पायथ्याचे जिते गाव आमचं लक्ष
वेधून घेत होते. गवतांवर उडणारा मोठा चांदवा (Great eggfly) फुलपाखराचे
फोटो काढत आणि दमछाकामुळे पाण्याने घसा ओला करत चढू लागलो. पाउण तासांत
मजल-दरमजल करत आम्ही बडदेमाच गावात पोहचलो. बडदेमाच गावापर्यंत गाडीरस्ता
अजून झालेला नाही.
सह्याद्रिच्या डोंगररांगेतील पदरावर वसलेलं १५ घरांचं हे गाव. गावात
सगळ्यांचीच आडनावे बडदे आहेत म्हणून या गावाला बडदेमाच नाव पडले. गावात
पोहचताच गावकऱ्यांनी आमचे स्वागतच केले. गावकऱ्यांना जमा करून सोबत
आणलेल्या सामानाचे वाटप केले. गावाला खेटूनच उभा असलेला धुक्यात विलीन
झालेला कडा आमच्या नजरा खिळवून टाकत होता. क्लाइंबिंग क्षेत्रातील अवलिया
भूषण आम्हाला कड्यावरील लुस बोल्डर, जेंडाराम (Gendarme) आणि सुळक्यांची
माहिती सांगू लागला. गावात विचारपूस केली असता त्यांनी कुंभे गावात
जाणाऱ्या वाटेबद्दल माहिती दिली. ह्याच वाटेवरून वळसा मारून ह्या कड्याच्या
वरच्या बाजूस पोहचता येते. गावकरी ह्या समोरच्या कड्याला चांदा कडा किंवा
निवाचा कडा तर उजवीकडील उंच डोंगराला धामणदरा म्हणून संबोधतात. महाड वरून
आमच्या सोबत आलेले काही जण माघारी फिरले. आमच्या गाडीतील मंडळींनी निवाच्या
वाटेचा मागोवा घेण्याचे ठरविले. गावातील एक वाटाड्या आम्हाला वाटेच्या
सुरवातीपर्यंत सोडण्यास तयार झाला.
जिते - टिटवे - बडदेमाच - कुंभेवाडी या गावांना जोडणारी ही निवाची वाट.
बदडेमाच हे गाव कुंभलमाच , बोरमाच आणि केळगण ह्या गावांना पदारावरील
पायवाटेने जोडलेले आहे. गावाच्या पुढे वाटेच्या उजव्या बाजूस एका नैसर्गिक
पाण्याच्या झऱ्यावर विहीर बांधलेली आहे. मार्च ते एप्रिल पर्यंत या
विहिरीतील पाणी गावकऱ्यांची तहान भागवते. याच पठाराला गावकरी घाटाचा माळ
म्हणून ओळखतात. मळलेल्या वाटेने शेतावरील बांधांवरून आम्ही घाटाकडे
जाणाऱ्या वाटेवर पोहचलो. एका मोठ्या आंब्याच्या झाडाच्या पलीकडून उजवीकडील
वाट केलगण गावात जाते तर डावीकडील वरच्या बाजूस ही वाट कुंभेवाडी कडे
जाते. डावीकडच्या वाटेवर आम्हाला सोडून आमचा वाटाड्या परत फिरला. दगडांची
विशिष्ट रचना करून बांधलेली आणि गावकऱ्यांना नेहमीच्या वापरासाठी सोईस्कर
पडेल अशीच ही वाट आहे. वाटेवर चढताना मधेच कोणीतरी शिट्टी मारल्याचा आवाज
येऊ लागला. चिन्मय सगळ्यांना सतर्क करत एका झाडाच्या फांदीवर बसलेला शिळकरी
कस्तूर (Malabar whistling thrush) बोटाच्या इशाऱ्याने दाखवू लागला. वाटेत
दुतर्फा लिंबूवर्गीय फळांची झाडे , मिरची आणि कारवीच्या झाडांचं जंगल
माजलेलं आहे.
वाटेच्या मध्यवर्ती भागात वाघजाई देवीचं ठाणं आहे. शेंदूर फासलेल्या
दगडांसमोर घंटा बांधलेली होती. गावकरी वर्षातून एकदा कोंबड्याचा बळी ह्या
देवीस नैवद्य म्हणून देतात. देवीचं दर्शन घेत अर्ध्यातासातच आम्ही
घाटमाथ्याजवळ पोहचलो. डोंगरात खिंडीसारखी खोदून ही वाट तयार केलेली दिसून
येते. पठारावर उजवीकडील वाट कुंभे वाडी कडे जाते तर डावीकडील वाट घोळ
गावाकडे जाते. धरणाचे काम पूर्ण झाल्यावर घोळ कडे जाणारी वाट पाण्याखाली
जाणार हे मात्र नक्की. कुंभेवाडी गावातून कुंभे घाट उतरून मानगड किल्ला
गाठता येतो. घोळ गावी जाऊन गारजाई वाडी मार्गे कोकणदिवा असा ही ट्रेक करता
येतो.




डावीकडच्या वाटेने जाताना समोरील पठारावर
दिसणारं कुभेवाडी , कुंभे धरणाची भिंत, धामणदरा डोंगर आणि दूरवर मंडणगड
किल्ला दृष्टीक्षेपात येत होता. चढाई करत असताना आम्हाला बघून झाडावरील
माकडं ह्या न त्या झाडावर उद्या मारत सैरावैरा पळू लागली. आम्ही कड्याच्या
धारेवरून माथ्यावर पोहचलो. डोळ्यांचे पारडे फेडणारा नजरा आम्हाला
कड्यावरून दिसू लागला. समोरील बाजूस कुर्डुगड , जिते, बडदेमाच व टिटवे गाव ,
विळे MIDC, गरूडमाची , घनगड , तैलबैला , सुधागड , सरसगड , सुरगड , तळगड ,
अवचितगड पर्यंतचं विहंगम दृश्य नजरेस पडतं. मागच्या बाजूस दाट जंगलांच्या
डोंगराआड कोकणदिवा किल्ला लक्ष वेधून घेत होता. सोबत आणलेली बिस्किटं खात
तासाभरातचं बडदेमाच गावी पोहचलो. दुपारचे दोन वाजून गेले होते. आमच्यासाठी
विजय बडदे यांनी खास जेवणाची सोय केली होती. गरमागरम जेवणावर मनसोक्त ताव
मारला. एका दिवसाच्या ट्रेक मध्ये इतकं भारी आणि पोटभर दुपारचं जेवण आम्ही
आतापर्यंत कधीचं जेवलो नव्हतो. त्यासाठी त्यांचे आभार व्यक्त करत आम्ही
घरचा रस्ता धरला. जाताना आमच्या चेहऱ्यावर आडवाटेवरचा एक नवीन ट्रेक
केल्याचं समाधान मात्र ओसंडून वाहत होतं.
स्वर्गसुखाचा अनुभव देणारी बोराट्याची नाळ
हरिश्चंद्राच्या नळी च्या वाटेच्या तुलनेत अरुंद, अवघड श्रेणीची, तीव्र
उताराची असणारी, प्रत्येक ट्रेकरचा घामटा काढणारी, लिंगाण्याच्या शेजारील
आणि सह्याद्रीच्या मुखावर आ करून बसलेली बोराट्याची नाळ. रायलिंग पठारावरून
दुर्गदुर्गेश्वर रायगड आणि त्याचा पाठीराखा असलेला लिंगाणा एकत्र
पाहण्यासाठी एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बोराट्याच्या नाळेची
मोहीम आखली. नाळेची चढाई उतराई करण्यासाठी तोडीसतोड पार्टनर असलेला धिरज ला
कॉल करून त्याला ट्रेकची कल्पना दिली. रविवारी सकाळीचं आम्ही महाड वरून
मार्गस्थ झालो. एप्रिल महिना असून देखील हवेत गारवा जाणवत होता.


वाळण गावातून ८२० मी उंचीचा रायगड , ९०५ मी उंच लिंगाणा आणि रायलिंग पठार
एकाच रेषेत दिसून येत होते. त्यांच्या मध्ये असलेल्या डोंगररांगेतील
महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन घेत, ३० किमी अंतर कापून पाने गावात दाखल
झालो. सकाळचे ८.३० वाजले होते. गावकरी शेतीच्या कामात मग्न झाली होती.
गावातून रायगडाचा टकमक टोक , सातविणीचा खळगा, माडाचा खळगा आणि भवानी टोक
किल्ल्याची अभेद्यता दर्शवत होते. गावातील तुकाराम कानोजे यांच्या
दुकानासमोर गाडी पार्क करून आम्ही रायलिंग ला जात असल्याची त्यांना कल्पना
दिली.


पाने गावाच्या पुढे असलेल्या शेताच्या बांधांवरून उड्या ठोकत आम्ही नदीजवळ
पोहचलो. नदीचं पात्र सुकं ठाक पडलेलं होतं. वाहून आलेले दगडधोंडे आणि
विस्तार बघता पावसाळ्यातील नदीच्या प्रवाहाची जाणीव होते. हीच नदी पुढे
जाऊन काळ नदीला मिळते. नदीच्या समोरील बाजूस अजस्त्र, अफाट, गगनात घुसलेला
कडसरी लिंगाण्याचा सुळका मनात धडकी भरवत होता. लिंगाण्याला खेटूनच रायलिंग
पठार, मध्यावर असलेली लिंगाणा माची दिसून येत होती. वाटेवर भेटलेल्या कडू
आजोबांनी वाटेची माहिती त्यांच्या हातातील काठीनेच दर्शवली. त्यांची राणी
नावाची कुत्री आमच्या अवतीभवती फिरू लागली. काही बिस्किटं दिल्यानंतर
आमच्या मागेमागे येऊ लागली. आजोबांनी हाका मारून सुद्धा आमच्या मागे येतच
राहिली. हळूहळू वाटेची चढण वाढत गेली. वाटेवर विजेचे खांब उन्मळून पडलेले
दिसत होते. अर्ध्या तासाची चढाई करून माचीवर पोहचलो.
लिंगाणामाची हे ७ ते ८ घरांचं ओसाड पडलेलं गाव. सततची कोसळणारी दरड आणि
गाडीरस्त्याचा अभाव यांमुळे कडसरी वाडीचे पाने गावाच्या शेजारीच पुर्नवसन
झालेले आहे. सद्य:स्थितीत गावात कोणीच राहत नाही. होळीच्या दिवशी येथे
गावकरी घर आणि जजनी देवीचं मंदिर साफ करून सण साजरा करतात. जननी मंदिराच्या
उजवीकडील वाट लिंगाणा किल्ल्यावर जाते तर डावीकडील वाट बोराट्याच्या
नाळीत. मंदिरात बसून थोडं पाणी पिऊन आम्ही नाळेची वाट धरली. ही वाट दाट
जंगलातून जाणारी होती. काही ठिकाणी कुंपणावरून उडी मारत आम्ही चालत राहिलो.
वाटेवर पुसटशी मार्किंग झाडावर दिसून येत होती. डोंगराच्या कडेकडेने,
घसरड्या वाटेवरून, पायतळीचा पालापाचोळा तुडवत आम्ही नाळेच्या मुखाशी
पोहचलो. पाण्याच्या प्रवाहामुळे ओढ्यातील मोठंमोठाले दगड घरंगळत येऊन
निपचित पडलेले आहेत. त्यांच्यावरून उड्या मारत दगडांतील खाचेचा आधार घेत वर
चढू लागलो. आमच्या मागोमाग राणी सुद्धा वर चढत होती. एव्हाना सूर्य
खिंडीच्या वर आला होता. आमच्याकडे रोखून बघत, आग ओतत असल्याचाच भास होत
होता. आमच्यावर होणार्या उन्हाच्या वर्षावामुळें आम्ही पुरते भिजून गेलो
होतो. बॅगेतील पाण्याच्या बॉटल घटाघटा खाली होऊ लागल्या. काही पाणी आणि
बिस्किटं राणी ला देत आम्ही चढाई चालूच ठेवली. राणीकडे बघून नाळेतील माकड
गोंगाट भरत, ह्या झाडावरून त्या झाडावर उड्या मारू लागली. नाळेच्या मागच्या
बाजूस असलेल्या डोंगरात गायनाळ आणि निसणीच्या नाळेची खाच दिसून येत होती.
तीव्र घसाऱ्याच्या, मुरमाड मातीवरून सोबतीला असलेल्या दाट कारवी आणि
उंबराच्या झाडांचा आधार घेत तासाभरात खिंडीत पोहचलो.
खिंडीतून लिंगाण्याचा सुळका उभ्या भिंतीसारखा भासत होता. लिंगाणा चढाईच्या
मार्गावर रोप लावलेला दिसून आला. सुळक्यावर जाण्यासाठी पुण्याहून लोक याच
खिंडीत येऊन तळ ठोकतात. झाडांच्या सावलीमध्ये थोडी विश्रांती घेऊन, पाणी
पीत वरच्या वाटेवर आलो. उन्हाचा तडाखा पुन्हा जाणवू लागला. लिंगाण्याच्या
मध्यावर चढाई करणारे काही लोकं दिसून आली. चढणाऱ्या लोकांना हातानेच इशारा
करत वाटेवर चालू लागलो. फक्त दोन फूट रुंद वाटेवरून ट्रॅव्हर्स मारत अजुन
एका ओढ्याच्या नाळेशी पोहचलो. शेवटच्या बाजूस जपूनच चाल धरावी. आधारासाठी
इथे काही बोल्ट लावलेले आहेत. ह्या भागातील चढाई अधिकच तीव्र आहे. शिवाय
अरुंद, दमछाक करणारी आणि मोठमोठ्या दगडांवरून जाणारी ही वाट. काही
कातळटप्पे सावधगिरीने चढत आम्ही राणी ला सुद्धा वर घेत होतो. खालच्या बाजूस
इवलासा दिसणारा दापोली गाव आणि रायगडाच्या उंचीचा गुयरी डोंगर प्रखर
उन्हातही लक्ष वेधून घेत होते. जसजसे वर चढत राहिलो तसतसे नाळ अरुंद होत
गेली. मजलदरमजल करत खिंडीपासून तासाभरातच पठारावर दाखल झालो.
पठारावर पोहचताच पहिली नजर गेली ती गरुडाच्या घरट्याकडे (किल्ले तोरणा)
नावाप्रमाणेच प्रचंड ! त्याला मागे टाकत रायलिंग कडे प्रस्थान केले.
उजवीकडील वाट मोहरी आणि सिंगापूर गावात जाते तर डावीकडील वाट रायलिंग
पठारावर. सह्याद्रीच्या कुशीत विहार करणाऱ्या शार्क माश्याचा कल्ला
असल्याचा भास आम्हाला लिंगाण्याकडे बघून झाला. लिंगाण्याचं वैभव पहावं तर
ते इथुनच. पठाराच्या टोकाशी आल्यावर काही वेळ आम्ही स्तब्ध झालो होतो.
समोरून येणारा गार कधी गरम वारा अंगी झेलत होतो. आमच्या नजरा खिळवून
टाकल्या होत्या त्या रायगडावरील राजांच्या समाधी आणि जगदीश्वर मंदिराने. मी
आजवर बऱ्याच ठिकाणाहून लिंगाणा बघितलाय पण रायलिंग वरून दिसणारा लिंगाणा
मनात घर करून गेला. पठारावरून गुयरीचा डोंगर, अड्राईचा डोंगर, दुर्गाचा
माळ, पोटल्याचा डोंगर, तवली डोंगर, कोकणदिवा, निसणीची नाळ व गायनाळ, फणशीची
नाळ, सिंगापूर नाळ, दापोली गाव, पाने गाव हा सगळा परिसर दृष्टीक्षेपात येत
होता.
दुपारचे दोन वाजले होते. फोटो काढण्यात आणि परिसर बघण्यात बराच वेळ वाया
घालवला होता. आमच्याकडील पाणी पुर्णतः संपले होते. त्यामुळे सोबत आणलेली
बिस्किटं सुद्धा घशाखाली उतरत नव्हती. राणी तर टक लावून जीभ बाहेर काढुन
आमच्याकडे बघत होती. तिला सुद्धा तहान लागली होती. तितक्यात धिरज ला एका
दगडाखाली दूध पिशवी नजरेस पडली. तिथेच पडलेल्या भांड्यांत ओतून राणीने
अख्खी दूध पिशवी पिऊन रिकामी केली. घशाला कोरड पडल्यामुळे आम्ही भरभर पावलं
टाकत नाळेच्या मुखाशी पोहचलो. त्याच भागांत एक आज्जी त्यांच्या मेंढ्या
चरायला घेऊन आल्या होत्या. त्यांच्याकडे पाण्याची विचारपूस केली असता
त्यांनी मोहरी गाव लांब असल्याचं सांगितलं. त्यात आमचा बराच वेळ खर्ची पडला
असता. आमची हकीकत ऐकून त्यांनी त्यांच्या बॉटल मधील काही पाणी आम्हाला
दिलं. त्यांचे शतशः आभार व्यक्त करत आम्ही नाळ उतरण्यास सुरवात केली.


उतराई करताना हीच नाळ भीषण, थरकाप उडवणारी वाटत होती. रॉकपॅच उतरून मी खाली
आलो तेव्हा राणी ने पुन्हा वरच्या दिशेने धूम ठोकली. काही केल्या ती खाली
येतच नव्हती. ट्रॅव्हर्स येई पर्यन्त आम्ही तिला उचलूनचं आणलं होत. पाऊण
तासांत खिंडीत पोहचलो. तहानेने व्याकुळ झालो असल्यामुळे खिंडीत न थांबता
माचीवर पोहचण्याचा निर्धार केला. कारवीतून मुरमाड जागी उतरताना अचानक
काहीतरी घरंगळत आल्याचा आवाज झाला. मागे वळून पाहिले तर राणी त्यातून धावत
येत होती. तिच्यासोबत बरीकमोठे दगड सुद्धा खाली येऊ लागले. त्यातला एक ईतभर
दगड माझ्या डाव्या गुडघ्यावर आपटला. अख्खा पाय सुन्न पडला. थोडी विश्रांती
घ्यावीच लागली. Pain Relief Sprey चा फवारा अख्या पायावर मारत, काठीचा
आधार घेत दीड तासांत लिंगाणा माचीवर असलेल्या विहिरीजवळ पोहचलो.
विहिरीच्या शेजारीच असलेल्या काढणं घेऊन गारेगार, गोड पाणी पिऊ लागलो.
पोटभर पाणी प्यायल्याने दोघांचेही चेहरे खुलुन आले होते. बॉटल भरून आम्ही
पाने गावात आलो. संध्याकाळचे साडेपाच वाजून गेले होते. ही सर्व कहाणी
कानोजे काकांना सांगितली. आमच्याकडे माचीवरल्या विहिरीतील पाणी आहे असं
माहीत होताच त्यांनी बॉटल घेऊन त्यातील पाणी पिऊ लागले. कित्येक वर्षात ते
माचीवर फिरकले नसल्याचं त्यांच्याकडून कळालं. त्यांचा निरोप घेत रायगडाला
प्रणाम करत आम्ही सुद्धा घरचा रस्ता धरला. बोराट्याची नाळ ही रांगडी अन
आपली क्षमता जोखायला लावणारीचं आहे. जीवन जगायला शिकवणारी, जिवंतपणी
स्वर्गसुखाचा अनुभव देणारी अशी ही बोराट्याची नाळ. पठारावरून रायगड आणि
लिंगाण्याचे जे काही रूप बघायला मिळाले त्यासाठी शब्दच कमी पडतील. समोरच
अफाट , प्रचंड असा लिंगाणा आणि मागे निःशब्द पणे उभा असलेला रायगड. मन भरत
नाही आणि नजर हटत नाही. सह्याद्रीच हे रौद्र रूप पाहताना , इथला भन्नाट
वारा अंगी झेलताना मनामध्ये एक विचार आला आपण स्वर्ग नाही पहिला पण
रायगडाचा पाठीराखा असलेला लिंगाणा इथून पहिला.....
● सूचना :-
१. लिंगाणामाची ते मोहरी गावादरम्यान कुठेच पाण्याची सोय नाही, त्यामुळे सोबत नेहमीपेक्षा जास्त पाणी बाळगावे.
२. खिंडीजवळ असलेल्या कारवीमध्ये bamboo pit viper जातीचे विषारी साप आहेत. झाडीत हात टाकताना खबरदारी बाळगावी.
३. रॉकपॅच उतरताना नवख्या लोकांनी सावधानता बाळगावी व शक्य असल्यास रोपचा वापर करावा.
४. लिंगाणामाचीवरील वाटेवर गावकऱ्यांनी कुंपण घातलेलं आहे. तर काही
वाटेचे मार्किंग खोडलेलं आहे. कदाचित वाटाड्या घेण्यासाठी गावकऱ्यांनी हे केलं असावं.
५. पावसाळ्यात ह्या नाळेने चढाई / उतराई करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नये.
६. एकट्याने ट्रेकला जाण्याचे धाडस करू नका. सुरक्षित भटकंती करा.
(३ एप्रिल २०१८ )
No comments:
Post a Comment