https://ravindrainamdar.wordpress.com/
नुकतिचं
३ दिवसाची कोकणातील किल्ल्यांची भन्नाट बाइक राइड उरकली होती, पण मन अजून
देखिल तिथल्या नारळा-सुपारीं, पोफळी-फणसांच्या बागांमध्ये आणि निळयाशार
सागराच्या लाटावर हेलकावतं होतं. त्या गोड अविस्मरनीय आठवणींचा ‘हँगओवर’
उतरतोय न उतरतोय तोचं आजुन एक सुखद धक्का म्हणजे ‘सह्याद्री पर्वतरांगेतिल
सर्वात कठिन आणि खडतर ट्रेक’ मानला जाणारा दुर्गत्रिकूट ‘अलंग मदन
कुलंग'(AMK) ‘ड्रीम ट्रेक’…!!
ट्रेकिंगचे कीडे सुचू लागल्या पासून AMK ची मनाला एक वेगळीचं आस आणि ओढ़
लागून राहिली होती, बाकी आता हा ‘ड्रीम ट्रेक’, ड्रीमचं म्हणून राहणार की
सत्यात उतरून स्वप्नपूर्तिची सुखावह अनुभूति देत अविस्मरनीय अश्या आठवणींच
गाठोडं देऊन जाणार या बाबतीत खरं तर काहिचं पूर्वकल्पना न्हवती…
त्याचं झालं असं, अचानक राहुलचा कॉल आला “उद्या परवा अलंग मदन कुलंग ला जातोय, येतोस काय?”
योगा-योगाने ऑफ़ीसला सुट्ट्या देखिल होत्या, मगं काय दुसऱ्या क्षणाला होकार दिला ”भावा डन”
ह्या ट्रेकला अशी अचानक ‘वाइल्ड कार्ड एंट्री’ मिळवणारा मिचं तो शेवटचा
कार्यकर्ता. या मोहिमेत मिलिंद (दादा उर्फ़ मिल्या), दिपक (भाऊ), राहुल (द
अर्नोल्ड) आणि मी स्वत: (दीपक भाऊच्या भाषेत पावशेर ) अशी आमची ही एकंदर
चांडाळ चौकडी. ट्रेकचा सारा प्लान अगदी रेडी होता, बसं आता ‘गेट सेट अँड
गो’ बाकी होतं… २५ जानेवारी रात्री १० वाजता ठरल्याप्रमाने ठरलेल्या ठिकाणी
एकत्र जमलो आणि श्री गणेशाचं नामस्मरण करुन कारचा स्टार्टर मारला तो थेट
अलंग मदन कुलंग च्या दिशेने..!! आम्हा सर्वांच्या ड्रीम ट्रेकच्या
दिशेने..!!
नारायणगाव, आळेफाटा, राजूर मार्गे रात्रीच्या भयाण अंधारातून आणि ‘बिबट्या
प्रवण’ क्षेत्रातून विना थांबा थेट आंबेवाडी गाव गाठलं. सह्याद्रीच्या
पायथ्याला टीम-टीमत्या दिव्यांच्या प्रकाशात छोटसं आंबेवाडी गावं अगदी
निपचित पहुडलं होतं. पोहोचलो तेव्हा मध्यरात्रिची एक घटिका नुसतीचं सरली
होती, जवळ-पास दोन-आडिचचा पहर असेल तो. गावातील एका घरासमोर कार पार्क करून
आम्ही चौघांनी आणि ड्रायवर काकांनी गाडीतचं थोड्या वेळ माना टाकल्या.
चिव-चिवणाऱ्या पक्षांच्या किल-बिलाटाने आणि अधून-मधून एकू येणाऱ्या
कोंबड्याच्या बांगेने, उगवत्या झुंजू-मुंजू पाहाटेची अलगद जाणीव करून दिली.
२६ जानेवारीची पहाट उघडली. धूसर प्रकाश संधिवात, हलकासा गार वारा आणि
बाजुला दिसणारा अंधुकसा सह्यकडा पाहून “दिल अगदी गार्डन-गार्डन हो गया था”
….
प्रजासत्ताक दिन असल्याने गावातील शाळकरी मुलांची सकाळी शाळेत वेळेवर पोहोचण्यासाठी उडालेली एकच लडिवाळ धांदल…. या सार्यांच्या चेहऱ्यावर झळकणारे निरागस भाव व शालेय जीवनातलं एक वेगळंच आत्मीय समाधान पाहून न कळत स्वत:च्या बालपणात हरवल्याच्या हलकासा भास झाला, मनोमन राष्ट्रध्वज तिरंग्याला त्रिवार मानवंदना देत मोहिमेकड़े मोर्चा वळवला..!!

आमच्या सोबत या ट्रेकसाठी ट्रेक गाईड/वाटाड्या म्हणून कैलाश आणि त्याचा
लहान भाऊ तानाजी हे दोघे येणार होते. सकाळी त्यांच्याच घरी चहा-नाष्टा
उकरकला आणि उन्हा-तान्हाच्या आत अलंग सर करुन रात्रीच्या मुक्कामा साठी मदन
गड गाठायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कुलंग वर स्वारी करायची असा एकंदर बेत
आखला. पुढचे दोन दिवस आभाळाच्या छायेत अन् सह्याद्रीच्या कुशीत संसार
थाटण्यासाठी लागणारं सारं साहित्य पाठीवरच्या बोचक्यात गुंडाळून
साडेसात-आठच्या सुमारस आंबेवाडी गावातून काढता पाय घेतला. ‘व्हिट्यामिन डी’
वालं कोवळं ऊन खात झप-झप चालणारी आमची धुडं आता गावा बाहेरची माळराण
पायवाट तुड़वत होतीत… तानाजी समोरची वाट दाखवत तुरू-तुरू चालत होता तर आम्ही
चौघे त्याच्या पाठीमागे हळू-हळू दौडत होतो….!!
एक दोन लहान मोठ्या डेकड्या पार झाल्यानंतर समोर उभा आडवा भला मोठा डोंगर जणू काही आमची वाटचं आड़वतोय की काय अस वाटतं होत. येथून डोंगराच्या कडे-कडेने चालत तास दिड-तासात अलंग किल्ल्याच्या पायथ्यापाशी असणारी कातळातिल गुहा समोर आली. पाठीवरची गाठोडी तेथेचं काडून ठेवत आणि त्या गुहेत थोड़ा विसावा घेत अलंगच्या पहिला रॉक पैचला जाउन भिड्लो. हा रॉक पैच थोड़ा सोपा असल्याने येथे सेफ्टी बेल्ट आणि रस्सीची फारशी गरज भासली नाही. आता ह्या नंतर मात्र पार करायचा होता तो या कील्यांचा सर्वात कठिन रॉक पैच.!! ८० ते ९० फुट उंचीचा, ताशिव आणि कोरीव स्वरूपात दीसणारा ९० अंश कोणाचा सरळ उभा कातळकड़ा, अगदी एकादया भिंती सारखा भासणारा. जेथे जागो-जागी हाताची आणि पायाची ग्रिप पण पकड़ने कठिन जाणार होतं, अश्या या रॉक पैच वर कैलाश डोळयाचं पातं लवायच्या आता एकादया घोरपड़ी प्रमाने चडून मोकळाही झाला होता. हे असलं कौशल्य आणि कसब ही फक्त स्थानिक लोकांच्याच अंगी असू शकते, तुम्हा-आम्हा कोणाच्याच अंगी कदापिही नाही. या रॉक पैच वरती असणाऱ्या गुहेत जाऊन कैलाशने रोप घट्ट बांधला. तो पर्यंत आम्ही इकडे खाली सेफ्टी बेल्ट बांधून तयारचं होतो (अगदी गुडघ्याला बाशिंग बांधतात तसे )..!! पायात कातळाच्या छोट्या-छोट्या खाच-खळग्याचा आधार घेत आणि हातात रस्सीवर तोल सावरत एकदाचा अलंग किल्ल्याचा हा सर्वात टफ रॉक पैच आगदी व्यव्स्थित क्लाइंब केला. यात थोड़ीफार तारेवरची कसरत झाली तो भाग वेगळाचं. ‘अडवेंचरवाला फील’ असा जो काय प्रकार म्हणतात तो हाच ‘कातळारोहण/प्रस्थारारोहणाचा’ थरार..!! आता येथून कातळात खोदलेल्या भल्या मोठ्या तिरप्या वळणाच्या आणि फूट भर ऊँचीच्या पायऱ्या पार करताना धापा टाकण्याशिवाय गत्यंतर राहत नाही.
![DSC_0791[1]](https://ravindrainamdar.files.wordpress.com/2017/05/dsc_07911.jpg?w=676)



८० फुटी कातळकडा



अलंग :-
कळसूबाई डोंगररांगेतील अति दुर्गम दुर्गत्रिकूतांपैकी एक प्रमुख दुर्ग..!!
‘किल्ले अलंग’ उंची ४५०० फूट..!! गडाच्या सुरवातीलाचं दोन पाण्याचा टाक्या
आणि एक महादेवाच मंदीर आहे. जवळचं थोड्या अंतरावर दोन भल्या मोठ्या गुहाही
आहेत. या किल्ल्यावर येणाऱ्या ट्रेकर लोकांच हे आश्रयस्थान, अगदी ४० ते ५०
लोकं आरामात राहु शकतील एवढ्या मोठ्या आकाराच्या. गुहेतून समोर मदन गड आणि
त्याच्या पाठीवरच्या कुलंग गडचा विलोभनीय नजारा दिसतो. येथेचं समोर एक भलं
मोठं नालाकृती पठारही आहे. अलंग गडाचा पसारा इतर दोन्ही गडाच्या तुलनेत
खुपचं मोठा आणि प्रचंड. आता या गुहा पाहून थोडसं वरती चढून गेल्यानंतर एका
विशिष्ट शैलीत बांधलेल्या आणि खोदलेल्या एकत्रित ११ पाण्याच्या टाक्यांचा
संच नजरेत भरतो. उतारावर खोदलेल्या या पाण्याच्या टाक्यांची रचना अशी केलि
आहे की वरचं टाकं पाण्याने ओसंडून वाहू लागलं की त्याचं पाणी खालच्या
टाक्यात जमा व्हावं आणि शेवटी समोर बांधलेली नक्षिदार कमान वजा भिंत या ११
टाक्यांना भल्या मोठ्या तळयाचं स्वरूप प्राप्त करून देते. उन्हाळयात जेथे
सखल भूभागावरील धरणे कोरडी पडन्याच्या मार्गावर आहेत तेथे आजही हजारो फुट
उंचीवरील पाण्याच्या टाक्या काठोकाट भरलेल्या दिसतात. एक मुजरा अप्रतिम
बांधकाम शैलीला एक मुजरा उत्तम पूर्वनियोजनाला..!!




११ पाण्याच्या टाक्यांचा संच
गडाच्या सर्वात वरच्या बाजूला राजवाड्याच्या भल्या मोठ्या भिंती पहावयास
मिळतात, येथेचं आजू बाजुला घराचे अवशेष व कुठेतरी क्वचितचं तटबंदी ही
दिसते. बाकी पूर्वी येथे कोणाची राजवट होती ही माहिती काही भेटू शकली नाही.
आपलं दुर्दैव असं की या तिन्ही गडा विषयी इतिहासात फारश्या नोंदी आढ़ळत
नाहित, आणि गडाचा इतिहासही फारसा ज्ञात नाही त्या मूळेच हे आणि असे
कित्त्येक गड-किल्ले विकासाच्या दृष्टीने उपेक्षित राहिले आहेत…!!




गडावर निवांत फेरफटका मारुन झाल्यानंतर आणि आजुबाजुचा सह्याद्री मनात
भरून घेतल्यानंतर (थोड़या फार प्रोफाइल फोटोची आणि डीपीची सोय करून ) अलंग गड़ाला राम-राम केला….!!
आता येताना ज्या भल्या मोठ्या रॉक पैच वरून क्लायंबिंग करत आलो होतो, त्या
वरून राप्लिंग करत खाली उरतरायचं होतं. म्हणजे पुन्हा एकदा तारेवरची नाही
तर दोरीवरची कसरत आमची वाटचं पाहत होती.! राप्लिंगचा हा मुख्य टप्पा अगदी
बताने आणि सावकाश रित्या पार करून खाली गुहेत ठेवलेल्या बोचक्यां जवळ जाउन
पोहोचलो. मोहिमेतील पहिला गड यशस्वी रित्या सर केल्याचा एक वेगळाचं आनंद
आमच्या चेहऱ्यावरून अगदी ओसंडून वाहत होता..!! एव्हाना आता दोहंपारचे १
वाजले होते, आणि पोटात कावळे चांगलेचं काव-काव करत होते त्यामुळे सकाळी
गावातून निघताना सोबत घेतलेल्या न्याहरी वर मजबूत ताव मारला आणि मोहिमेतील
दुसऱ्या किल्ल्याकडे म्हणजे किल्ले मदन कडे आगेकूच केली..!
अलंग गडाच्या पदरातून आता आम्हाला पुढचे दोन-आडिच तास तरी निरंतर चालत
रहायचं होतं अगदी न थकता, न दमता, न थांबता. ही संपूर्ण वाट
डोंगराच्या खाचेतिल असल्याने उन्हाचा त्रास मात्र जाणवत नव्हता. अलंगाला
वळसा घालत वाटेतील एक छोटीशी नाळ पार केल्यानंतर येथून दोन फाटे फुटतात, एक
पायवाट डावीकडे मदनला वळसा घालत किल्ले कुलंगकडे जाते तर उजवीकडे मदनालाच
वळसा घालत आपणास मदन गडाच्या अवकाशभेदी माथ्यावर घेउन जाते. एका बाजुला
आसणारा उभा कातळकड़ा आणि त्यातिल अचानकचं वळणाऱ्या भल्या मोठ्या पायऱ्या आणि
सभोवतालच्या हजारो फुट खोल दरीच्या तिरावरून चालताना AMK ला ‘मोस्ट
टफेस्ट ट्रेक’ असं का म्हणतात ते मात्र चांगलचं कळून चुकतं..!!




मदन गडाच्या मध्यावरती पोहोचल्यानंतर एक तूटलेला ४० ते ५० फूट उंच कडा पार
करून पुढे सरकावं लागतं. हा पहिल्या दिवसातील दुसरा रॉक पैच क्लायबिंग
स्पॉट..!
अलंगच्या रॉक पैच क्लायबिंग मूळे कॉन्फिडन्स लेवल बऱ्या पैकी चांगलाचं
वाढला होता, त्या मुळे भीती नावाचा जो काही प्रकार होता तो आता आजिबात
जाणवत न्हवता. आणि आता भीती वाटावी तरी ती का आणि कोणाची?? “ज्याच्या
अंगा-खांद्यावर आपण बिंधास्त आणि निर्धोक भटकतो आहोत तो सह्याद्री
सखा-सोबती पाठीराखा असता, आणि कैलाश सारखा मावळा साथीला असता हजारो फुट खोल
दऱ्या-खोऱ्याची भीती ती काय”??? हा रॉक पैच उरकून अर्ध्याएक तासाच्या
पायपिटी नंतर विलोभनीय मदनगडाचा माथा ट्रेक मध्ये घेतलेलं सारं कष्ट
सार्थकी लावतो.

कैलास (स्थानिक गाईड)

मदन गडाचा ४० फुटाचा रॉक पैच

मदन गडाच्या पायऱ्या

मदन गडाच्या वाटेवरून दिसणारा अलंग गड आणि आजूबाजूचा परिसर (माहिती)
गडाच्या सुरवातीला असणाऱ्या दोन काठोकाठ भरलेल्या नितळ थंडगार
पाण्याच्या टाक्या गडावर आपलं जणु काही तृप्त स्वागतचं करतात. यातील
पाण्याचा गोडवा आणि गारवा हा केंव्हा ही एकादया हायफाय एक्वागार्ड आणि
फ्रिजला अगदी फाट्यावर मारेल असा..!! येथूनचं काही पावलांच्या अंतरावरती
असणारी कातळातील एक भली मोठी गुहा समोर येते. नाही म्हणलं तर ३० एक लोकं तर
अगदी आरामात राहु शकतील इतक्या मोठ्या स्वरूपाची. ही गुहा म्हणजे आमच्या
आजच्या निवाऱ्याची अन् मुक्कामाची जागा..!! “आमचा हॉल, आमचं किचन, आणि
बेडरुम. अगदी सुपर डीलक्स नैचरल एसी वालं”



मदनाच्या गुहेत पोहोचल्या नंतर ब्यागा एका कोपऱ्यात टाकल्या आणि थोडावेळ
भुईवर अंग टाकून घेतलेल्या १५ ते २० मिनीटाच्या पॉवर नैप मुळे मन अगदी
ताजं तवानं झालं होतं. तो पर्यंत गुहेबाहेर कैलाशने आणि तानाजीने तीन
दगडांची चूल मांडली होती आणि त्यावर वाफाळणारं सूप आमची वाटचं पाहत होतं.
आता जर चूल पेठवलीच आहे तर पुन्हा रात्रीच्या जेवणाला कश्याला परत हाच
उपद्व्याप करत बसायचा म्हणून लागलीचं रात्रीच्या जेवणाला पण फोडणी
टाकली..!! गरमागरम सूपवर एक म्हणता दोन वेळ ताव मारला आणि सह्याद्रीतली
रम्य संध्याकाळ अनुभवण्यासाठी मदन गडाच्या उंचवट्यावर असणाऱ्या चौकी
पहाऱ्याच्या ठिकाणी ठान मांडलं..!!
पाहता-पाहता दिसव मावळती कड़े झुकला होता आणि दिवसभर आग ओखणाऱ्या
सूर्यदेवांनी जरा नरमाईचं धोरण स्वीकारलं होतं. आकाशात भीर-भीरनाऱ्या
पाखरांचे थवेच्या थवे आपल्या घरटयांच्या दिशेने जाताना दिसत होते तर
गडाच्या सर्वोच्च टेहळणी बुरुजावरुन आजुबाजूला दिसणारा सह्याद्री मनाला
अगदी भुरळ घालून जात होता..!
पूर्वेकडे मोठ्या एटित बसलेला अलंगगड, त्या पाठचा कीरड़ा डोंगर आणि पलिकडचा
कळसूबाई शिखरमाथा सह्याद्रीला आखणीचं रूपवान बनवत होते तर आजून थोड़ीशी
दुरवर नजर भीरकवली असता पुसटसे दिसणारे हरिहरगड, आणि अंजनेरी भटक्यांना साद
घालत होते. नैरुत्येला रतनगड, कात्राबाईचा सुळका, आजोबा पर्वत,
हरिश्चंद्रगड, भंडारदरा, घाटघर आणि सांधन दरी नजर खीळवून धरत होते तर
मदनाच्या पाठीवरती मावळतीच्या तांबुस किरनांना अंगावर झेलत महाकाय कुलंगगड
पश्चिमेला विराजमान होता. मदन गड जरी छोटा असला तरी याच्या माथ्यावरून
सभोवती दिसणाऱ्या सह्याद्रीचा नजारा हा अद्वितीय आणि अतुलनीयचं..!!


कुलंगच्या मागे हळूहळू क्षितिजा पलिकडे लपणाऱ्या सूर्याने आता काळोख्या
रात्रीला अलगद साद घातली होती. भित्री-भागुबाई काळोखी रात्र एकटी येइल तर
ती कशी?? म्हणूनचं सप्तमीच्या चंद्रा सोबत हजारो चांदण्यांचा लखलखाट अन्
शेकड़ो रातकीड्यांची किरकिर घेउन ती सह्याद्रीच्या अंगणी अवतरली होती..!!
नक्षत्रांचा सडा शिपंडलेल्या किल्ले मदनाच्या अंगणात अंगत-पंगत घालून कैलाशच्या हातच्या ऐ वन टेस्टी शेवभाजी आणि वरण-भातावर यथेच्छ आडवा-तिडवा हात मारला आणि कधी न्हवे ते चक्क साडे आठ-नऊ वाजताचं आंथरुन धरलं..!!
मिल्याने येताना सोबत स्लीपिंग ब्याग आणल्या मुळे तो पहाटेच्या
कडाकयाच्या थंडीत तो अगदी जागचा हालत सुद्धा न्हवता आणि आम्ही तिघे मात्र
याचं थोडं-त्याचं थोडं पांघरुन ओढत चांगलेचं कुडकुडत होतो. “मी झोपेत
आजिबात घोरत नाही” असं छाती ठोकपणे सांगणाऱ्या दीपक भाऊला आता फक्त
त्याच्या घोरण्याच्या आवाज रेकोर्ड करून दाखवाचाच बाकी होता…
रानपाखरांच्या मंजूळ किलबिलाट़ाने दऱ्या खोर्यात एकचं कर्णमधुर चिव-चिवाट
गूंजवायला सुरवात केली होती, त्या पुढे मोबाईल नावाच्या डबडयाचा आलार्म
अगदीचं बेसुर आणि भसाड वाटतं होता, कुलंग गड लवकर फत्ते करायच्या या हेतूने
सकाळी पटा-पटा चहा-नाष्टा आवरून साकाळच्या कोवळया उन्हात मदन गड सोडला.
मदनगडावरची ती संध्याकाळ, ती रात्र, ती गुहा आणि तो गारवा चिरकाल मनात ठान
मांडून बसणार होतं यात काहीचं शंका न्हवती..!!


दुसऱ्या दिवसातला पहिला व शेवटचा गड आणि ट्रेक मधला तिसरा किल्ला ‘कुलंग’
मदनापासून तसा जरा दूरचं होता, तीन-साडेतीन तासाचं अंतर सहजचं असेल.
मदनगडावरून खाली उतरताना एकादं जरी पाउलं चुकलं तर विषय जाग्यावर कट होणार
होता, येथे चुकिला कोणतिही माफ़ी न्हवती, त्या मुळे मोजून मापून पावलं टाकण
चालु होत. ४० फुटांचा राप्लिंगचा पॉइंट संपवून मदनाला डाव्या बाजुने वळसा
घालत किल्ले कुलंगची लांबलचक पदरवाट पकडली. या पदरातून चालताना बाजुचे
कातळकडे आणि दऱ्या खोरे पाहताना मनात धडकी भरायला लावतात. कारवीच्या
झुडपांना बाजूला सारत आणि पाण्याचे आठलेले खाच-खळगे ओलांडत ११ च्या सुमारास
कुलंगाच्या पायथ्याला उभे ठाकलो. कुलंग गडाच्या सरळ उभ्या चढ़णीच्या भल्या
मोठ्या पायऱ्या पार करताना चांगलाचं घाम फुटतो, श्वासोंश्वासाची गती भलतीचं
रुंदावते तर काळीज चांगलचं विस्फारतं, थोडेफार हृदयाचे ठोके वाढतात तर
पाय किंचित लटलटू लागतात…!! अभ्यासकांच्या आणि जाणकारांच्या मते “कुलंगच्या
पायऱ्या या महाराष्ट्रातल्या इतर सर्व गडांच्या तुलनेत सर्वाधिक उंच आणि
सरळ उभया चढ़णीच्या पायऱ्या आहेत”. असो, मनात एका क्षणी वाटलं या अश्या
दमछाक करायला लावणाऱ्या पायऱ्यांपेक्षा अलंग आणि मदनच्या
कातळकड्यांवरील प्रस्थरारोहण कधीही परवडलं..!!


कुलंग गड हा अलंग गडाप्रमानेचं मोठा आणि विस्तीर्ण. गडाची ऊँची – ४८०० फुट.
मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील बाजूला पहारेकरांच्या दोन देवड्यां दिसतात,
गडाची तटबंदी आजही बर्यापैकी शाबूत आणि टिकून आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या
बाजूला कातळात लपलेल्या दोन मोठ्या गुहा आहेत. इकडे देखिल राहण्याची उत्तम
सोय होते. कुलंग गडाबाबतीत एक विशेष म्हणजे, इतर गडांच्या तुलनेत या गडावर
असणाऱ्या सर्वाधिक तब्बल २० ते २५ पाण्याच्या टाक्या, त्या ही साऱ्या अगदी
काठोकाट भरलेल्या…!! येथील मुबलक पाणी साठ्यावरून एक गोष्ट ठळक लक्षात
येते ती म्हणजे येथे पूर्वी नक्कीचं एकादी समृद्ध राजवाट राज्य करत आसणार
आणि मोठ्या प्रमाणात लोकांचं वास्तव्य राहिलेलं असणार यात काहिचं शंका
नाही. गडाच्या पश्चिम कड्यावर बऱ्याच जागी वाड्याचे आणि इमारतींचे बरेच
अवशेष व इतर इतिहास खुणा आपणास पहावयास मिळतात. हा परिसर पाहून आपण
पूर्वेकडील ‘पाताळवेरी’ कड्यावर पोहोचण्यास १५ ते २० मिनिटे लागतात. या
कड्यावरून अलंग, मदन, कळसूबाई आणि क़िरडा डोंगराचा खुप सुंदर नजारा पाहवयास
मिळतो.




रिम-झिम सरींमध्ये नाहून जेव्हा सह्याद्री हिरवा शालू परिधान करतो तेव्हा
या तिन्ही गदांचं सौदर्य हे आवर्जून पाहण्यासारखं असेल. सहसा पावसाळयात तर
इकडे येणे शक्यचं नाही त्या मुळे सप्टेंबर आणि ऑक्टोंबर मध्ये एकादी मोहिम
आखायला काहीचं हरकत नसावी. असो पुन्हा कधी नशिबात योग असेल तर नक्कीचं घडेल
ही अलंग-मदन-कुलंग दुर्गत्रिकूट वारी, पाहू पुढचं पुढे..!
बाकी या ‘ट्रेक प्लान मध्ये काही लोकांनी नेहमीप्रमाने कल्टी दिली होती’,
त्या मुळे किंचित रागावलेल्या आमच्या प्रिय मिलिंद दादांनी त्यांना मारलेला
एक ‘प्रेमळ पुणेरी टोमणा’ चांगलाचं आठवणीत राहिला आहे. “बूटांनी साथ दिली पण लोकांनी साथ सोडली” दादांचे ईचार लईचं खोल ओ..!! अगदी कुलंग गडाच्या माथ्यावरून खालच्या दरीच्या टोकापर्यंत..!

“ट्रेक मध्ये बूटांनी साथ दिली, पण लोकांनी साथ सोडली”
जवळपास साडे बारा-एक वाजत आले होते आणि आता सूर्यदेव आमच्या आणि
कुलंगच्या माथ्यावर येउन चांगलेचं आग ओखत होते. त्यामुळे घस्याला सारखीचं
कोरड पडतं होती, आणि त्यातचं आजुन आम्हाला गडउतरून पायथ्याचं आंबेवाडी गाव
गाठायचं होतं.
ही सारी निसरडी पाय वाट, काही-काही जागी तर अगदी सरपटत जावं लागतं. कुठे
बाजुच्या बांबूच्या बेटांचा आधार घेत तर कुठे दगडांच्या फटीमध्ये हात रोवत
गाव जवळ करनं चालू होतं. मागे वळून पाहिलं तर आकाषाशी स्पर्धा करणारे तीन
गड किल्ले आणि कातळकडे सर करून चक्क दिड दिवसात खाली परतलो आहोत यावर खरं
तर विस्श्वासचं बसतं न्हवता..!! सारं काही अगदी कसं स्वप्नवत होतं, अचानक
प्लान काय झाला, अचानक फोन काय आला, आणि अचानक पाहता-पाहता ट्रेक नव्हे तर
आम्हा सर्वांचा ‘ड्रीम ट्रेक’ पूर्ण देखिल झाला…!!
खुप दिवसांपासून उराशी बाळगलेलं एक स्वप्न बघता-बघता पूर्ण झाल्याचं एक
वेगळचं समाधान मनातून ओसंडून वाहत होतं. बॉडीचा स्टेमिना बर्यापैकी संपत
आला होता, कैमेराने तर कधिचं डोळे झाकले होते, आणि आठवणींच गाठोडं हलकसं जड
झालं होतं. एक अविस्मरनीय ट्रेक पूर्णत्व:ला आला होता..!!
त्या वेळी या सिचुएशनला सुटेबल असं एकचं गाणं मनात राहून राहून गुंजत होतं, ते म्हणजे ……..
“स्वप्न चालून आले बघता बघता
माझे होऊन गेले हसता हसता
रंग रंगीत झाले दिसता दिसता
श्वास संगीत झाले जुळता जुळता”
मोहिमेतील सहभागी मावळे मिलिंद, दीपक आणि राहुल.
ट्रेक संक्षिप्त :-
ट्रेक दिनाक:- २६/२७ जानेवारी २०१७
पायथ्याचे गाव:- आंबेवाडी
डोंगररांग:- कळसूबाई
श्रेणी:- अत्यंत कठीण
उंची अनुक्रमे :- अलंग – ४५०० फुट, मदन ४९०० फुट, कुलंग -४८०० फुट
पुण्यापासून अंतर :- २०० किमी.
पोहोचण्याचा मार्ग :- मंचर, आळेफाटा, कोतुळ, राजुर, आंबेवाडी.
ट्रेक साठी लागणारा कालावधी:- २ दिवस
टिप:- हे तिन्ही किल्ले सर करण्यासाठी प्रस्थारारोहणाचे
सुरक्षा साहित्य सोबत असणे व आड़वाटा माहीत असणे आत्यावश्यकच आहे. त्यामुळे
एकाद्या जाणकार व निष्णात ट्रेक ग्रुप सोबत जाणे किंवा एकाद्या स्थानिक
रहिवाश्यासोबत जाणे कधीही सोईस्कर..!!
ट्रेकसाठी आणि आधिक माहिती/मार्गदर्शनासाठी येथे कैलाशचा नंबर शेअर करत आहे.
कैलाश :- ७६२०१२३९२४
खादाडगिरी भटकंतीमधली..!!
“वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे” असं म्हणत, स्वच्छंद भटकंती दरम्यान
ज्या-त्या भागातील ‘स्पेशल डीश’ वर यथेच्छ ‘आडवा-तिडवा’ ताव मारणाऱ्या
‘हौशी खादाड्यांपैकी’ मी ही एक खादाड..!! खादाड नव्हे, ‘भुक्कड़’ म्हणालात
तरी चालेल..!!
महाराष्ट्राला निर्सगाची अनमोल देण लाभलेला राखट रांगडा सह्याद्री, हळवा व
मनाला भुरळ घालणारा नितांत सुंदर कोकण आणि समृद्ध पश्चिम महाराष्ट्र..! या
साऱ्या भागातील त्यांची एक वेगळीच आपली खाद्यसंस्कृति..!!
पुण्या पासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारा निसर्ग म्हणजे ‘खडकवासला आणि
किल्ले सिंहगडचा’ सुंदर परिसर. हा सारा परिसर पावसाळयात जणु काही एकादया
स्वप्ननगरीचा भास करून देतो…!! रोज-रोजच्या रहाट-गाडग्यातून थोड़ा स्वत:
साठी आणि स्वत:च्या कुटुंबासाठी निवांत वेळ काढत पुणेकर आणि बाहेरील
पुणेस्थित मंडळी आवर्जुन इकडे आपली वाट वाकडी करातातचं..!! सिंहगडावर
मिळणारी गरम-गरम कांदा भजी, झण-झणीत पिठलं-भाकरी आणि दही-ठेचा यांची चव
तुम्हाला कुठेही भेटणार नाही . “निसर्गाच्या सानिध्यात दोन घास जरा जास्तचं
जातात” असं का म्हणलं जातं ते सिंहगडावर आल्यावर कळतं..!!


‘भोर’ हे पुण्यापासून जवळचं एक छानसं आणि छोटसं शहर..! नेकलेस पॉइंट, भाटघर
धरण, भोरचा राजवाडा, रोहिडा, केंजळगड, रायरेश्वर, मांढरदेवी आणि नजिकचा
वरंधा घाट अश्या नयनरम्य ठिकाणांनी वेढलेलं सुंदर असं ‘भोर’ !!
येथून जवळचं ७/८ किमी वरती खादाडगिरी साठी एक भन्नाट ठिकाण ‘आपटी’ गाव. ख़ास
‘मटन भाकरी’ साठी फेमस, नदीच्या तिराजवळ बसून मटन भाकरी कुस्करून खाण्याची
मजा काही औरचं..!! विशेष म्हणजे पुण्यावरुन खादाडगिरीसाठी ‘हौशी खादाड’
मंडळी वरचे-वर इकडे फिरकत असतात. शिरवळचा हायवे वरील श्रीराम वडा-पाव
सुद्धा बेस्ट , इथेचं जवळ खेड-शिवापूरला ‘कैलाश भेळ’ ही भारी भेटते..!!

जागतिक वारसा स्थळ असणारा सह्याद्री घाट आणि त्यातील एक अविभाज्य घटक
म्हणजे ‘व्हॅली ऑफ़ फ्लावर्स’ म्हणून ओळखला जाणारा सातारचा ‘कास पुष्प
पठार’..!! पावसाच्या हलक्या श्रावण सरी मध्ये हा पठार अगदी पूर्ण क्षमतेने
भरलेला असतो, अश्या वेळी हा नयनरम्य पुष्पोतस्व पहाणे एक पर्वणीचं ठरते..!
कास, ठोसेघर, सज्जनगड असा एक दिवसीय भटकंतीचा झकास बेत आखता येतो. या भागात
भटकंतीसाठी आल्यावर तेजस फ़ार्मची स्पेशल मटन थाळी आवर्जून चाखावी अशी.!!
सज्जनगड आणि सातारा शहरापासून १० ते १२ किमी अंतरावर असणाऱ्या उरमोड़ी
जलाशयाच्या काठावरचं एक मस्त फ़ार्म हाउस, ‘तेजस फ़ार्म हाउस’..!! 
इथलं
खास वैशिष्ट्य म्हणजे सुरवातीला ‘स्टार्टर टाईप’ मध्ये बाउल भरून मिळणारा
आळणीचा रस्सा आणि प्लेट भरून मिळणारं सुक्क मटण. बाकी पुन्हा नंतर
जेवणात ताटा सोबत मिळणार मटण वेगळच..!! तांबडा रस्सा आणि भाकरी…!! अहा,
कडक..!!

नोव्हेंबर-डिसेंबरची बोचरी आणि गुलाबी थंडी जाणवू लागताचं भटक्यांना वेध
लागतं ते ‘महाराष्ट्राचं भरतपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी काठ
‘भिगवणचं’ आणि तेथे येणाऱ्या ‘फ़्लेमिंगोज पक्ष्यांच’ व इतर असंख्य परदेशी
पाहून्यांचं..!!
अर्धा एक दिवस उजनीच्या धरणात विहार करुन पक्ष्यांच्या फोटोजचा मनमुराद
क्लिक-क्लिकाट उरकल्यानंतर परतीच्या प्रवासात भिगवनचे मासे न खाता क्वचितचं
कोणी परत माघारी फिरत असेल..! मासे आणि सोबत ज्वारी/बाजरीची भाकरी हा
इथल्या सर्रास हॉटेल्स मध्ये मिळणारा फक्कड मेन्यू हादडणे हे तुम्हा-आम्हा
सारख्या हौशी खादाडांचे एक ‘परम खाद्य कर्तव्यचं’.!!
सोलापूरला भटकंती वजा काही कामानिमित्त जायचा कधी योग आलाचं तर ‘यवत’
जवळच्या ‘ हॉटेल कांचन’ मध्ये नाष्टा आणि प्युअर व्हेज वर एकदा ताव मारून
बघाचं..! इकडे सगळे पदार्थ बर्यापैकी मातीच्या भाजीव भांड्यात मिळतात,
हॉटेलचा थाट जरी थोड़ा मोठा असला तरी चव मात्र एकदम ‘साधी-सिंपल आणि घरघुती
स्वरूपाची’..! आता जर तुम्ही सोलापूरला गेलाय अन् इकडची ख़ास आणि फेमस
‘शेंगदाणा चटणी’ नाही खाल्ली तर नक्कीचं तुम्ही कुठे तरी भलतिकडे वाट
भटकलाय असं गृहीत धरायला काहीचं हरकत नाही..! पुणे-सोलापूर हायवेवरचं छोटसं
‘कोंडी’ हे गाव ख़ास जुन्या व पारंपारिक पद्धतीने उखळात ठेचलेल्या शेंगदाणा
चटणी साठी प्रसिद्ध..! येथे महामार्गावर गाड्या साईडला घेउन जो-तो
ज्याला-त्याला हवी तेवढी शेंगदाणा चटणी खरेदी करत असतो. या भागात
शेंगदाण्याच्या पोळ्याही खूप छान भेटतात ..!!
‘भटकती आणि खादाडगिरीचा’ विषय आणि त्यात हरिश्चंद्रगडावरचा कोकणकडा व
कोकणकड्यावरील भास्कर दादाच्या टुमदार झोपडीतल्या चवदार जेवणाचा उल्लेख न
करणे हे या ब्लॉगला पूर्णतः अर्धवट ठरवू शकतं..!!
‘ट्रेकर्स पैरेडाइज’ हरिश्चंद्रगड हे प्रत्येक ट्रेकरचं सर्वात आवडतं
ठिकाण. हरिश्चंद्रगड़ाचं प्रमुख आकर्षण इथला रौद्रभीषण कोकणकडा..!
सतत घोंगावत वाहणारा सोसाटयाचा वारा अन् समोर दूरवर पसरलेला अजस्त्र, अचल,
राखट रांगडा शिवसह्याद्री आपल्या विशालतेची आणि भव्यतेची सदैव जाणीव करुन
देत असतो..!
याच कोकणकड्यावर असणारी भास्करदादाची ‘टुमदार झोपडी’ ही आम्हा ट्रेकर्स
लोकांची हक्काची जागा आणि भास्करदादांच्या माय-माउलीच्या हातची गरम-गरम
भाजी-भाकरी, लोणचं, पापड़, वरण आणि कडी-भात तो ही घरच्या इंद्रायणी तांदळाचा
हे सारं जेवण म्हणजे आमचं पंचपक्वानचं..!
कोकण……!! परमेश्वराला
पहाटेच्या वेळी पडलेलं एक सुंदर आणि गोड स्वप्न, निसर्गाची मुक्तहस्ताने
उधळण लाभलेलं व नेहमीचं मनाला भुरळ घालणारं सर्वांग सुदंर असं
कोकण..!! कोकण म्हणजे मासे आणि मासे म्हणजे कोकण असं एक जणु काही समिकरणचं
रुजलेलं..!! ताम्हिनी घाटातून खाली उतरलं की सुरु तो कोकण पट्टा, आलिबाग
पासून पार कुडाळ-सावंतवाडी, वेंगुर्ला पर्यंत कुठे ही निवांत फिरा, यथेच्छ
मासे आणि अस्सल कोकणी थाळी हादडा..!!
मुरुडची ‘पाटिल खानावळ’ ही सर्वात लोकप्रिय खानावळ, सुरमई फ्राय, सोलकडी,
तांदळाची भाकरी किंवा चपाती असा फक्कड बेत असणारी इथली थाळी आवर्जून
खाण्यासारखी..!!

दिवेअगार हे एक सर्वात सुंदर, शांत आणि स्वच्छ समुद्र किनारा असनारं पुण्यापासून अगदी जवळचं ‘बेस्ट टूरिस्ट डेस्टिनेशन’..!
कधी जर कंटाळा आला तर एकादया वीकेंडला भटकंती करायला पटकन बाईक्स काडायच्या
चटकन दिवेअगारला मोर्चा वळवायचा. दिवेअगारात गेल्यावर राहण्याचं अन्
खाण्याचं एक झक्कास आणि निसर्गरम्य ठिकाण, सुमुद्र किनाऱ्या लगतचं जाधव
काका-काकींच ‘ॐ कॉर्नर’ हे कोकणी निवासस्थळ..! घराच्या अंगणात आणि सभोवती
असणारी सुपारीची बाग, आंब्याची अन् फणसाची झाडं, बाहेर पडवित असणारी एक
छोटीशी मोहरी आणि अवती-भवती असणारी कमालीची स्वछता व टाप-टिपपणा मनाला असा
काही भुरळ घालतो की येथुन पुण्यात परत जायची इच्छाचं होत नाही..!!

दिवेअगार
पासून ८/१० किमिवर असणारं ‘भरडखोल’ हे नियमित भरणारं फिश मार्केटचं गाव,
रात्रि मासेमारीसाठी गेलेल्या नावा व होड्या सकाळी हजर झालेल्या असतात.
येथे लीलाव पद्धतित आणि वाट्यावरती (वजनाच्या ऐवजी) एकदम ताजे, स्वस्त आणि
मुबलक प्रमाणात मासे भेटतात..! लिलावात जाऊन हवे तेवढे, हवे ते मासे घेउन
यायचे आणि काकींच्या घरी बनवायला दयायचे व आपण निवांत समुद्रात डूबक्या
मारायला जायचं, १२/१ वाजेपर्यंत पोटात चांगलेचं कावळे ओरडायला लागलेले
असतात, आणि इकडे काकींच्या हातचं गरमा-गरम जेवण तयार होउन वाट पाहत
असतं..! सुरमई, पापलेट, बांगडा फ्राय आणि टिपिकल कोंकणी पद्धतिचा रस-रसित
कोळंबीचा रस्सा, एकचं नंबर..!!कोळंबीच्या रस्स्याची अशी चव या व्यतिरिक्त
आजुन कुठेचं चाखायला भेटली नाही..!!
देवगड, मालवण-सिंधुदुर्ग, तारकर्ली हा कोकणभाग पर्यटकांच प्रमुख आकर्षण
केंद्र…!! आता या भागाचं काही खास वर्णन करायला नको, कारण इथल्या
निसर्गसौदर्याचं जेवढं वर्णन करावं तेवढं कमीचं आहे.
इथलं निसर्ग सौंदर्य हे शब्दांच्या कचाट्यात बांधण्या पलीकडचं आहे..! अगदी
पाहताचं क्षणी प्रेमात पडावं आणि डोळे भरून मनात चिरकाल साठवून ठेवावं असा
हा नयनरम्य परिसर..!!
मालवणात गेल्यावर यथेच्छ खादाडी करायची ती निर्विवादपणे एकाचं गोष्टीची, ती
म्हणजे चम-चमित मसालेदार मालवणी थाळीची …!! सुरमई, पापलेट, बांगडा फ्रायला
इकडे तोड नाही, आणि सोबतचं कोंबडीवडे, अमर्याद थंडगार सोलकडी व कोळंबीचं
लोणचं न चुकता ट्राय करायलाचं हव..! मालवणचा आजून एक आवर्जून चाखण्या सारखा
मेन्यु म्हणजे अप्रतिम असा ‘मालवणी खाजा’..!!
हुश्य…..!! पाहता-पाहता खुपचं खादाड भटकंती झाली राव. खाता-खाता
आणि फिरता-फिरता ‘मन आणि आत्मा’ दोन्ही कधी तृप झाले हे कळलं सुद्धा
नाही..!! अशीच सदैव अन्नपूर्णा मातेची निरंतर कृपादृष्टी
तुम्हा-आम्हावर राहो अशी मनोकामना व्यक्त करून तूर्तास तरी खादाडगिरीच्या
या भागातून तुमची रजा घेतो ..! पुढच्या भागात पाहू ‘जन्मभूमी कोल्हापूर’
आणि ‘कर्मभूमी पुण्यातील’ काही ख़ास-विशेष खादाडीची चम-चमित, चटकदार,
झण-झणीत, मसालेदार काही लोकप्रिय तर नाही नवीन खमंग ठिकाणे..!!
ट्रेक म्हणलं की………!!
ट्रेक म्हणलं की सुरवात होते ती , “जायचं कोठे आणि कसं? जवळचा मार्ग
कोणता? ट्रेक मधील अड़थळे काय? त्या ठीकाणचं एतिहासिक महत्व काय?
पाहण्यासारखी ठिकाणे कोणती? राहण्याची/खाण्याची सोय काय? पायथ्याचे गाव
(बेस व्हिलेज) कोणतं? तेथील एखाद्या स्थानिक गावकऱ्याचा नंबर मीळतो काय?
आणि एवढ्या सगळया प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी मदत घ्यावी लागते ती
‘गुगल बाबांची’, जुन्या जाणकार व मुरलेल्या ‘हार्ड कोअर ट्रेकर मित्रांची’,
‘ट्रेक क्षितिज’ नावाच्या गड-कील्ल्यांची प्रघल्भ आणि प्रचंड माहिती
असलेल्या वेब साईटची, शोधा-शोध सुरु होते ती जेथे जायचं आहे त्या
ठिकाणावरील एकादया ‘मराठी ब्लॉगची’ (कारण ‘इंग्लिश ब्लॉग’ पार डोक्यावरून
जातात)…!!
सह्याद्री मध्ये निरंतर भटकंती करणाऱ्या आणि त्या साऱ्या ट्रेकचा वृतांत
लिहून ठेवणाऱ्या भटक्या लोकांच्या ट्रेक ब्लॉगचा आधार/संदर्भ घेतला
जातो..!! बऱ्याचदा ‘मराठी ट्रेक ब्लॉग’ सर्च केल्यावर ‘साक्षात गुगल बाबा’
misalpav.Com ही वेबसाईट सजेस्ट करतात, कारण त्यांना सुद्धा भटकंतीच्या
दर्जेदार माहितीचा तडका असलेली ही वेब साईट खुप आवडते वाटतं, जशी आम्हाला
ही आवडते..!! आणि आता एवढे सगळे कष्ट (आफाट) घेउन प्लान बनवला जातो आणि मगं
आपल्या नेहमीच्या सवंगड्यांना व्हाट्सअप किंवा फोन कॉल वरून निमंत्रने
धाडली जातात..! सगळे कार्यकर्ते पहिल्या वेळी लगेच घाई-घाई मध्ये कनफर्मेशन
देऊन ही टाकतात, आणि ज्या वेळी ट्रेकला जायची वेळ येते तेव्हा मात्र यातील
काही ‘साले मित्र’ हे हमखास म्हणजे हमखास कल्टी देतात..!! “कोणी स्वत:
आचनकचं आजारी पडतं तर कोणी इतरांना आजारी पाडतं. कधी कोणाच्या घरी अचानकचं
पाहुणे कडमडतात, तर कधी कोणाला रात्रीत अचानकचं ऑफिस मधून कॉल येतो”..!!
येणारे
न चुकता ट्रेकला येतात, ते ही नियोजित वेळे पेक्षा थोड्या फार लेटनेचं बरं
का, बाकी कल्टी देणारे शेवटी हमखास कल्टी देतात, आलेले न आलेल्यांचा
उद्धार करत (प्रेमाने) ट्रेकला निघतात, ट्रेक प्रवासात आणि साऱ्या
ट्रेकमध्ये “आयला, आमुक-आमुक हां यायला हवा होता राव” असं म्हणून त्याची
आठवण काढतात आणि त्याला खुप मिस देखिल करतात..!!
बाकी काही ही म्हणा, ट्रेक मेट्स हे असेचं असतात..!! जरा आगळे, जरा जगावेगळे…!! एकदम भन्नाट असे काही तरी रसायण”..!!
“डेडीकेटेड टू ऑल माय डियर लव्हली ट्रेक मेट्स”..!!
‘कोकणातील किल्ले’ भटकंती तांबड्या मातीच्या आडवाटेवरील (अंतिम भाग)..!!
भाग दोन वरून पुढे……..!!
भटकंती मोहिमेचा अखेरचा दिवस, सोमवार १६ जानेवारी २०१७ सकाळी सात वाजता कुणकेश्वर महादेवाचे दर्शन घेउन मंदिराच्या पाठीमागील समुद्रकिनारी थोड़ा वेळ निवांत फेरफटका मारला. कुणकेश्वर महादेव मंदिराचे छत्रपती शिवरायांनी स्वतः जीर्णोद्धार केला होता. कोकणातील सर्वात फेमस यात्रा म्हणजे आंगणेवाडी आणि महाशिवरात्रीला भरणारी कुणकेश्वर यात्रा…!! पाहू कधी योग जमून आला तर, असो….!!




गेल्या दोन दिवसापासून जवळपास ५०० ते ५२५ किमीचे अतंर पार केलं होतं, आणि
आजुन सिंधुदुर्ग किल्ला पहायचा होता. हा किल्ला याच्या आधी ही पाहिला होता,
आता पुन्हा एकदा हा किल्ला पहायचा योग आला होता..!!
कुणकेश्वर ते सिंधुदुर्ग ४५ किमीचे अंतर. सकाळी साडे दहाच्या सुमारास मालवण
गावात दाखल झालो. जेटीवरून किल्ल्यावर जाणारी बोट लागलीच होती.

जवळ पास १० ते १५ जण बोट मध्ये सवार होतो, नावाडी या भव्य जलदुर्गाच्या दिशेने मोटर बोट हाकू लागला, पूर्वी “वल्हव रे नाखवा हो वल्हव रे रामा” म्हणता तरी येत होतं पण आता मोटर बोट आल्याने हे गाण ही लागू होत नाही..!! असो, काही तरी नवीन रिमिक्स करावं लागेल आता..!!

१५ मिनीटात बोट किल्ल्याच्या तटापाशी जाऊन थांबली, ” बोट फक्त १ तासचं थांबेल, आला तर ठिक नाही तर न घेता निघून जाऊ” अशी सुचना त्या नावाडयाने केली. त्या मुळे एक नक्की होतं की लवकरात लवकर परत यावं लागणार होतं..!! येथेही एक गाईड सोबत घेतला, त्याने देखिल खुप छान माहिती आणि इतिहास सांगीतला..!!

सिंधुसागर शिवलंका, ‘किल्ले सिंधुदुर्ग‘:- आरमारात विशेष महत्व असणारा हा किल्ला, मालवण शहरापासून अर्ध्या मैल अंतरावर ‘कुरटे बेटावर’ दिमाखात उभा असा सिंधुसागर शिवलंका, ‘किल्ले सिंधुदुर्ग. १६६४ मध्ये शिवरायांनी या किल्ल्याची स्व: शुभास्ते पायाभरणी केली. हा जलदुर्ग शिरोमनी एकूण ४८ एकरात पसरलेला, ५२ साखळी बुरुज, ४५ जिने, जवळपास ३किमी लांबीची तटबंदी, तटाची उंची ३० फुट आणि रुंदी १२ फुट, मुख्य प्रवेशद्वार शिवकालीन स्थापत्य कलेप्रमाने दोन बुरुजांआड गोमुखी स्वरूपाचे आहे..!! या भव्य दिव्य किल्ल्याचे इंजिनियर होते ते म्हणजे अभेद्य दुर्ग-दुर्गेश्वर स्वराज्य राजधानी निर्माते ‘हीरोजी इंदलकर’ कोटी कोटी प्रणाम त्या निर्मात्यास आणि त्याच्या कलाकृतीस..!!

|| चौऱ्यांशी बंदरात हा जंजिरा.. अठरा टोपिकरांचे उरावर.. शिवलंका अजिंक्य जागी निर्माण केला..||
असा उल्लेख इतिहातिल सभासदांच्या बखरीमध्ये पहावयास मीळतो. किल्ल्यावर ३
गोड्या पाण्याच्या विहीरी आहेत दूध बाव, दही बाव आणि साखर बाव.
किल्ल्याच्या बांधकामासाठी लागणारे सर्व दगड येथूनचं या कुरटे बंदरावरील
टेकड्या आणि उंच भूभाग खोदून वापरण्यात आले आहेत आणि त्या जागी झालेल्या
खोलगट भागात शिवरायांच्या सांगण्यावरून तलाव बांधण्यात आले आहेत. यावरूनच
राजांची पाणी या मुलभुत सुविधा विषयी असणारी दूरदृष्टी दिसून येते..!!
किल्ल्याच्या बांधकामात शत्रुपासून व्यतय आणि बाधा येउ नये या साठी ५०००
मावळयांचा अखंड जागता पहारा ठेवन्यात आला होता. या जलदुर्ग बांधणी साठी
हजारो लोक ३ वर्ष दिवसंरात्र झटत होते. किल्ल्याचे बांधकाम १६६७ साली पूर्ण
झाले. महराजांनी या किल्ल्याच्या बांधणी साठी त्या काळचे ‘एक कोटी होन’
ईतका प्रचंड खर्च केला होता आणि त्याचीच फलस्वरूप प्राप्ती म्हणजे हा
बेलाग, अभेद्य, बेजोड़ शिवलंका म्हणजे ‘सिंधुदुर्ग’ होय..!! किल्यावर
महादेवाचे एक मंदिर आहे त्या मंदीराखालून एक भुयारी मार्ग आहे जो
समुद्राखालून बाहेर पडतो.

शिवरायांचे एकमेव मंदिर ही याच किल्ल्यावर आहे, मंदीराच्या बाजूलाच महाराष्ट्रातिल गडकिल्ल्यांची माहिती सांगनारे प्रदर्शन दालन ही आहे एकदा आवश्य या किल्ल्याला आणि दालनाला भेट दयाच..!!

१२ वाजले होते आणि आमचा बोटेचा नावाडी आमच्या नावाने ओरडत होता लवकर या
नाही तर जातो निघून, जाम राग आलता राव त्याचा…!! नावेत बसल्या पासून
नुसत्या सुचना वजा धमक्या देत होता..!!
सलग तिन दिवस कोकण किनार पट्टीलगतचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा पालथा
घातला होता, पण आजुन समुद्राच्या पाण्यात मात्र एकदाही पाय ठेवला न्हवता,
थोडं फार चुकल्या-चुकल्या सारखं वाटतं होतं…!! सूर्य डोक्यावर येउन चांगलाच
तळपायला लागला होता आणि किल्यामागची ५ किमी अंतरावरील ‘तारकर्ली‘
ची स्वच्छ सुंदर निळयाशार पाण्याची किनारपट्टी आम्हाला साद घालत होती..!!
यावेळी सागरी पाण्यात एक वेगळाच थरार अनुभवायचा आणि पाण्याखालील रंगबिरंगी
मासे व जग पाहण्याचा मनसुबा म्हणजेच ‘स्क्यूबा डायविंग‘
करण्याचा मानस मनी होता..!! ‘अमर’ आणि ‘मी’ दोघांनी ‘स्क्यूबा डायविंगचा’
तो अवर्णनीय रोमांच आणि थरार अनुभवला, सुरवातीला थोड़ी भीती वाटली पण खरचं
पाण्याखालील जग, ते प्रवाळ, हजारो रंगबिरंगी मासे पाहून एक वेगळीच अनूभूति
वाटली…!! खरचं एक अविस्मरनीय आणि अवर्णनीय अनुभव..!!

“Life is either a Daring Adventure or Nothing” असं का म्हणतात ते चांगलचं पटलं होतं..!!
या स्क्यूबा डायविंगमध्ये जरा उशीर झाल्याने आमच्या पुणे परतीच्या नियोजनात
थोड़ासा (थोड़ा जास्तचं) विलंब झाला होता, त्यामुळे अभ्या आणि भगवानला एक ते
दिड तास ताटकळत बसावे लागले होते आणि त्याकरण ते दोघेही किंचितसे
(चांगलेच) माझ्यावर आणि अमर वर नारज झाले होते, सॉरी रे भावांनो …!!
सायंकाळचे साडेचार-पाच वाजले होते, तसं तर ही वेळ दुपारच्या जेवणाची
न्हवतीचं, पण सकाळी केलेल्या नाष्ट्यावर आजून किती तग धरुन राहणार होतो.
आणि त्यात स्क्यूबा डायविंग केल्याने तर पोटात चांगलेच कावळे ओरडत होते.
पोटातील कावळयांना चवीष्ट मालवणी थाळी आणि सोलकडी खाऊ घातली आणि
तारकर्लीतून साडेपाचला पुण्याच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु केला..!!
तारकर्ली ते पुणे व्हाया वैभववाडी, गगनबावडा, कोल्हापुर मार्गे जवळपास ४२५
किमीचे अतंर म्हणजे जराकमी रात्रभर बाईक्स चालवायच्या होत्या.
या तीन दिवसांच्या प्रवासात माझ्या मनात घर करून गेलेले कोकण राहून राहून
आठवत होते..!! मनात घर करून राहिलेल्या आणि मी पाहिलेल्या कोकणाला शब्दरुपी
आकार देण्याचा एक प्रयास…!!
कोकण…!!
लांबच लांब पसरलेल्या नारळा सुपारी
पोफळींच्या बागांचे कोकण,
त्या गर्द हिरवाई-वनराईत वसलेल्या
छोट्या-छोट्या कौलारु घरांचे कोकण…..!!
स्वच्छ शुभ्र रेतीचे आणि अथांग क्षितिजापर्यन्त
पसरलेल्या निळयाशार सिंधुसागराचे कोकण,
त्यावर रातंदिन डोलणाऱ्या छोट्या-मोठ्या
अगणित नावा अन् होड्यांचे कोकण…!!
फणसा प्रमाने वरून टनक आणि आतून गोड रसाळ हळव्या मनाच्या माणसांचे कोकण,
‘येवा कोकण आपलोचं असा’ असं हक्काने सांगणाऱ्या आपल्या माणसांचे कोकण….!!
शेकडो वर्षे सागरी तटावर हिंदवी स्वराज्याला
रक्षणाऱ्या अभेद्य भक्कम तटबंदीचे कोकण,
विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग सारख्या अनेक सागरी
तटरक्षक गडकिल्यांचे अन् जलदुर्गांचे कोकण…!!


‘ गोपाळगड ते सिंधुदुर्ग’ कोकण पट्ट्यातील तांबड्या मातीच्या आड़वाटेवरील
भटकंती मोहिमेतील अनेक प्रमुख किल्ले आणि त्यांचा इतिहास मनात साठवत आणि
गोठवत आम्ही परतीच्या प्रवासला लागलो होतो. पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुर, सांगली सातारा आणि शेवठी पुणे असा तीन दिवसात १००० किमीच्या ही वरची बाईक राईड करून पहाटे चारच्या सुमारास असंख्य आठवणी (आणि ढिगभर फोटो ) घेउन एकदाचे चिंचवडला येउन पोहोचलो..!!

…….THE END…….!! पुन्हा भेटू पुढच्या भटकंती कट्ट्यावर ….!!
ट्रेक डिटेल्स :-
ट्रेक दिनांक :- १४/१५/१६ जानेवारी २०१७.
पुणे ते गोपाळगड अंतर :- २७५ किमी (दाभोळ ते वेळादूर जेट्टी,फेरी बोट मार्गे).
गोपाळगड ते अंजनवेल लाईट हाऊस :- ५ किमी.
अंजनवेल लाईट हाऊस ते जयगड लाईट हाऊस :- ५५ किमी (तवसाळ ते जयगड जेट्टी,फेरी बोट मार्गे)
जयगड लाईट हाऊस ते जयगड किल्ला :- ६ किमी
जयगड किल्ला ते गणपतीपुळे :- २० किमी
गणपतीपुळे ते रत्नदुर्ग किल्ला :- २५ किमी
रत्नदुर्ग किल्ला ते थिबा पॅलेस :- ६ किमी
थिबा पॅलेस ते पावस :- २० किमी
पावस ते पूर्णगड :- १० किमी
पूर्णगड ते आंबोळगड :- ३५ किमी
आंबोळगड ते यशवंतगड :- ६ किमी
यशवंतगड ते विजयदुर्ग :- ४५ किमी
विजयदुर्ग ते कुणकेश्ववर :- ४० किमी
कुणकेश्ववर ते सिंधुदुर्ग :- ४६ किमी
सिंधुदुर्ग ते तारकर्ली :- ७ किमी
तारकर्ली ते पुणे व्हाया कोल्हापूर :- ४०० किमी
‘कोकणातील किल्ले’ भटकंती तांबड्या मातीच्या आडवाटेवरील (भाग दोन)..!!
भाग एक वरून पुढे……..!!
दुसरा आणि आमच्या भटकंती मोहिमेचा मुख्य दिवस, ‘रविवार’ १५ जानेवारी २०१७ ‘संकष्टी चतुर्थी’…!!
।। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ:। निर्विघ्नं कुरुमेदेव सर्वकार्येषु सर्वदा ।।


बऱ्याच दिवसापासून केलेला भटकंती प्लान आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी दरम्यान
गणपतीपुळ्यात पोहोचल्यांनंतर आलेला संकष्टी चतुर्थीचा योगायोग म्हणजे अमृत
योगचं म्हणावा लागेल….!!
प्रातःकाळच्या प्रसन्न वातावरणात गणपतीपुळे मंदिरात जाऊन आराध्यदैवत श्री
गणरायचं मनोभावे छानसं दर्शन घेतलं, आणि बाप्पाचा शुभाशिर्वाद घेऊन पुढच्या
प्रवासाला सुरवात केली….!!
मोहिमेतिल तिसरा आणि दुसऱ्या दिवसातील पहिला किल्ला, रत्नागिरीचा
‘रत्नदुर्ग’ उर्फ़ ‘भगवतीचा किल्ला’ ‘गणपतीपुळयावरून’ ‘आरे वारे मार्गे’
रत्नागीरी म्हणजे स्वर्गासम रस्ता, आजुबाजूचा समुद्र आणि त्या काठुन हा
संपूर्ण बाईक प्रवास म्हणजे एक अविस्मरणीय अनुभूतिचं..!
‘किल्ले ‘रत्नदुर्ग‘ / ‘भगवतीचा किल्ला:-
किल्ल्यावरती भगवती मातेचं एक छानसं मंदिर बालेकिल्ल्यात आहे त्या मुळे या
किल्ल्यास भगवतीचा किल्ला असं म्हणतात..!! रत्नागिरी शहरापासून अवघ्या २ ते
३ किमी वर असणारा रत्नदुर्ग हा त्यावरील अत्यंत सुंदर भगवती मंदिर
पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण. येथून दिसणार्या समुद्राच्या विहंगम
दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणार्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे या
आकर्षणात आणखी भर पड़ते. रत्नदुर्ग रत्नांगिरी शहराच्या अत्यंत जवळ असून
अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आला आहे. किल्ल्याचा आकार
घोड्याच्या नालासारखा असून क्षेत्रफळ १२० एकर आहे. रत्नदुर्ग तीनही बाजूंनी
समुद्राने वेढलेला असून याच्या आग्नेय दिशेला जमीन आहे. किल्ल्याच्या
पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे. किल्ल्यावर भगवती मातेच्या मंदिरासमोर
‘सरखेल कान्होजी आंग्रे’ यांचा पुतळा आहे, किल्ल्याच्या दक्षिणेकडे
दीपस्तंभ आहे. त्यावरून रत्नागिरी शहराचे दर्शन घडते.






रत्नदुर्ग उरकून आता पुढचा प्रवास सुरु केला तो म्हणजे अचानकचं भगवान ने सुचवलेल्या रत्नागिरीच्या ‘थिबा पॅलेस’ च्या दिशेने..!!
रत्नागिरीचा एक एतिहासिक वारसा ‘थिबा पॅलेस’..!!
पूर्वीच्या ब्रम्हदेशचा म्हणजे आताच्या म्यानमारचा शेवटचा राजा ‘थिबा मीन’
यास नजरकैद करून ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला रत्नागिरी येथील
राजवाडा. याची बांधणी १९१० मध्ये करण्यात आली. १९१६ पर्यंत या राजवाड्यात
म्यानमारच्या राजा व राणीचं वास्तव्य होतं. या राजवाड्याला दुमजली सागवाणी
लाकडाचे बाधकाम, एकूण १४ खोल्या आणि २ प्रमुख दालने, पुरातत्व विभागाचं एक
सुंदर वस्तू संग्राहालय ही याच राजवाड्यात आहे. या वास्तुला आणि वस्तू
संग्राहालयाला एकदा आवश्य भेट दयाचं…!!

सकाळचं कोवळं उन संपून आता चांगलाचं तावायला लागलं होतं. त्या भर उन्हात
आता आम्हाला पुढच्या प्रवासाच्या दिशेने दिवसभर बाईक्स रेमटायच्या होत्या.
आता वेध लागलं होतं ते ‘किल्ले पूर्णगडचं’
रत्नागिरी ते किल्ले पूर्णगड जवळपास ३० किमी. आणि वाटेत लागणारे तीर्थस्थळ ‘पावस‘.
गौतमीनदीच्या काठावर वसलेलं आणि ‘स्वामी स्वरूपानंद’ याच्या पदस्पर्शाने
पावन झालेले हे निसर्गरम्य गाव ‘पावस’ या ठिकाणी स्वामीजींची समाधि आहे.
स्वामी स्वरूपानंदाच्या मठात जाउन आशिर्वाद आणि थोड़ा प्रसाद घेउन पूर्णगड
कड़े मोर्चा वळवला…!!
‘किल्ले पूर्णगड‘
:- पावस पासून १० ते १२ किमी अंतरावरती ‘मुचकुंदी’ नदीच्या खाड़ीवर अगदी
समुद्र किनारी टेकडीवरती इतिहासाच्या खानाखुणा जपत हा किल्ला उभा आहे,
किल्ल्यावर जाण्यासाठी खाली पूर्णगड गावातून पायवाट आहे, पण आम्ही
समुद्रतटावरून किल्ल्याला वळसा घालत आड़वाटेने अगदी पहिल्या गियर वर बाईक
वरून सरळ उभी चढ़ण चढवत किल्ल्याच्या तटबंदीपाशी पोहोचलो, किल्ला पूर्ण
निर्मनुष्य होता, त्या मुळेच की काय वाटेवर एक भल्या मोठ्या सर्पराजाने
दर्शन देऊन आमचे स्वागत केले. पूर्णगडाच्या मुख्य दरवाज्याजवळ
मारुतीरायांचे एक छानसं मंदिर आहे, स्थानिक गावकऱ्यांनी मंदिराची रंगरंगोटी
केली आहे. मुख्य दरवाजा गोमुखी आहे, दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूस
पहारेकऱ्यांच्या देवडया आहेत. समोरच दिंडी दरवाजा आहे. या दरवजातुन
समुद्रकिनाऱ्याचा विलोभणीय नजारा दिसतो.


संपूर्ण किल्ला अर्ध्या तासात पाहून होतो. पूर्णगड नंतर पुढचा मार्ग आडिवारे, ‘यशवंतगड’ मार्गे ‘आंबोळगड’३५ किमी..!!
‘आंबोळगड‘:-
चंद्राकृती सागरी किनारा लाभलेला आंबोळगड, गडावरती गगनगिरी महाराजांचा एक
आश्रम आणि एक दत्त मंदिर. कुठेतरी क्वचित आढ़ळणारी तटबंदी आणि मंदिराच्या
मागील बाजुस एक विहीर बस असा हा आंबोळगड उभ्या माळावरती सागरी किनारी
विसावलेला..!! गगनगिरी महाराजांच्या आश्रमात थोड़ावेळ विसावा घेतला. आणि
येताना वाटेत लागलेल्ल्या ‘किल्ले यशवंतगडाच्या’ दिशेने गाड्या
फिरवल्या..!!


‘किल्ले यशवंतगड‘ :- आडिवरे आंबोळगड मार्गावरील कच्च्या डांबरी रस्त्या लगतचा किल्ला यशंवतगड.
आंबोळगड आणि यशंवतगड हे दोन लगतचे सागरी तटरक्षक किल्ले. गडावर जाण्याची
पायवाट एकदम झाड़ा-झुडपातून जाते. यशवंतगड जैतापुरच्या खाडीच्या काठावर
स्तित हा किल्ला. किल्ल्याच्या समोरील बाजुला संरक्षक खंदक आणि भक्कम
बुरुजाची तटबंदी आहे. महादरवाजा पूर्णत: मोडकळीस आलेल्या स्थितीत. आतील
बाजुस देवडया आणि बालेकिल्ला आहे. बालेकिल्लाची पण खुपचं दुरावस्था झालेली
आहे. आत जंगलाचे स्वरूप प्राप्त झालेला अवस्थेतिल यशवंतगड..!!


किल्ल्याची बाहेरील तटबंदी जांभ्या दगडातील चांगलीच साबूत आणि टिकून
आहे. किल्ल्याच्या आत एक फेरफटका मारून पुढच्या ‘किल्ले विजयदुर्गच्या’
दिशेने बाईक्स वळवल्या.!!
‘गूगल तात्यांना’ यशवंतगड ते किल्ले विजयदुर्ग कडे जाणाऱ्या रस्त्याची
विचारपूस करून ४५ किमी गाड्या रेमटवायला सुरवात केली. रत्नागिरी जिल्ह्या
सोडल्या नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातिल पहिला किल्ला ‘विजयदुर्ग’. पाच ते
साडेपाचच्या सुमारास विजयदुर्गच्या पायथ्याशी येउन पोहोचलो. विजयदुर्ग
लवकरात लवकर आटोपून आजून ‘कुणकेश्वरला’ मुक्कामाला जायचं होतं या नियोनात
आम्ही होतो. विजयदुर्गवर पोहोचल्यावर तेथिल एका स्थानिक गाईडने विचारणी
केली “गाईड हवा आहे काय? किल्ल्याला खुप मोठा आणि प्रघल्भ इतिहास लाभला
आहे, किल्ला चांगल्या अवस्थेत टिकून आहे, किल्ल्यावर बरेच पॉइंट्स
पहाण्यासारखे आहेत” विचार केला किल्ला पहावा गाईड घेउन.!! गाईडचे नाव श्री
‘महेंद्र जावकर’ त्यांनी सांगीतलेली विजयदुर्गाची माहिती आणि इतिहास
जसाच्या तसा डोळ्य़ासमोर उभा राहतो..! मराठी आरमाराच्या इतिहासात मोलाचे
योगदान लाभलेल्या प्रमुख जलदुर्गांपैकी एक ‘किल्ले विजयदुर्ग/घेरिया’..!!

‘किल्ले विजयदुर्ग‘:-
विजयदुर्गची बांधणी ‘भोज’ राजाने १२व्या शतकात केली, त्यानंतर तो बहमनी आणि
नंतर आदिलशाहीच्या ताब्यात गेला. वाघोटन खाडीमध्ये पूर्वी चारी बाजूने
समुद्रात घेरलेल्या या किल्ल्याला ‘घेरिया’ असं ही म्हणत. आता कालांतराने
किल्ल्याच्या एक बाजूचे पाणी हटून जमीनेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
छत्रपति शिवरायांनी हा १६५३ मध्ये हा जिंकला, त्या वेळी विजय संवत्सर चालु
होते त्या मुळे या किल्ल्याला ‘विजयदुर्ग’ नाव देण्यात आले. किल्ल्यावर
इंग्रज आणि पोर्तुगिजांनी अनेक हल्ले चढ़वले आणि तोफांचा भडिमार केला,
तोफांच्या माऱ्याचे निशान आज ही येथील तटबंदीच्या भिंतीवर दिसतायेत.
किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्याला जीबीचा दरवाजा म्हणून संबोधतात.



या दरवाज्याजवळ किल्ल्याचे बलस्थळ मानले जाणाऱ्या मारुतीचे एक जिर्नोद्धारित मंदिर आहे. किल्याच्या तटबंदीवरुन शत्रुवर बाणाने आणि बंदूकीने हल्ला करता यावा या साठी ‘जंग्या’ बनवल्या आहेत, आणि मोठमोठाल्या तोफा ठेवण्यासाठी फांज्या बनवल्या आहेत. बाहेरून किल्याचे मुख्य प्रवेशद्वार दिसत नाही, शत्रुंपासून बचाव व्हावा या साठी दोन बुरुजांच्या मागे आतील वक्र बाजूस मुख्य दरवाजा आहे, या लाकडी दरवाजाचा बराचसा भाग आज ही पहायला मिळतो. आतील बाजुस पहारेकर्यांच्या देवड्या आहेत आणि वरील बाजूस नगारखाना, डाव्या बाजुला खलबतखाना आणि उजव्या बाजुला दारुगोळा साठा आहे. या किल्ल्यावर अनेक तोफगोळे आणि हातगोळे पहायला मिळतात, आणि बाजुलाच ३ तोफा ही ठेवल्या आहेत.


समोरच भली मोठी घोड्याची पागा आहे. किल्ल्याच्या मध्यवर्ती जागी भव्य सदर आहे. किल्याच्या उजव्या बाजुला एक प्रमुख लढाऊ आणि संरक्षक बुरुज आहे, या ‘खूब लढा तोफा बारा’ या नावाने ओळखतात. या बुरुजावर तिन बाजुला ६ फांज्या आहेत आणि यातील प्रत्येक फांजीवर प्रत्येकी दोन तोफा ठेवल्या जायच्या त्या मुळे त्यास ‘खूब लढा तोफा बारा’ असं म्हणले जाते. थोडसं पुढे आल्यानंतर एक चोर दरवाजा आहे जो थेट समुद्रकिनारी असणाऱ्या तटबंदीपाशी जातो. या मार्गे धान्य आणि मावळयांची ये जा होत असे. किल्ल्याच्या ऐकुण २७ बुरुज आहेत. किल्ल्यावर राणी निवासाच्या दोन इमारती आजही पहायला मिळतात, त्या पैकी ३ मजली आणि एक २ मजली आहे. समोरचं उंच टेकडी आहे त्यास निशान टेकडी म्हणतात. जवळच भवानी मातेचे मंदिर आहे.



या किल्ल्याला एतिहासिक महत्व तर आहेचं पण सोबत वैज्ञानिक महत्व ही लाभलं आहे, याच किल्ल्यावर ‘हेलियम’ चा शोध लागला आहे. त्या जागेला साहेबाचे ओठे या नावाने ओळखतात. समोर एक दुसरे भलं मोठं धान्याचे कोठार आहे. त्याला लागुन पाण्याचा हौद आहे आणि थोड्या अंतरावरती नालाकृती विहीर आहे.



या किल्ल्याच्या भोवती वाघोटन खाडी मध्ये एक आश्चर्य लपलं आहे…!! किल्याच्या तटबंदी भोवती अर्ध्या किलोमीटर लांबीची उलट्या व्ही आकाराची दगडी चिऱ्याची संरक्षक भिंत आहे. सुमारे २० ते २५ फुट रुंद आणि १५ फुट उंच पाण्याखलील ही संरक्षक भिंत एतिहासिक अभ्यासक आणि जाणकारांच्या मते १७व्या शतकात बांधली आहे, या भिंतीचे एक वैशिष्ट म्हणजे कितीही ओहोटी आली तरी ही भिंत खुली होत नाही. इंग्रजांच्या हल्ल्या वेळी त्यांची जहाजे या भिंतीवर आदळून फुटली होती..!! खरचं समुद्रदुर्ग बांधनीच्या त्या तंत्राला तोड नाही आणि ज्यांनि बांधले त्यांना ही जोड़ नाही..!! मनाचा मुजरा त्या सर्वांना..!!


अर्ध्या तासात विजयदुर्ग पाहून परतणारे आम्ही त्या किल्ल्याच्या रमणीय
इतिहासात आणि महेंद्र जावकरांच्या कथनी मध्ये एवढे गुंगलो होतो की कळलचं
नाही कधी दिड ते दोन तास होउन गेले होते ते…!!


महेंद्र जावकर यांच्या सोबत एक फोटो आणि थोड़ा चहापान घेउन साडेसात वाजता विजयदुर्गचा निरोप घेतला, आणि नियोजित मुक्काम स्थळ ‘दक्षिन कोकण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवगड जवळील समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या ‘कुणकेश्वर’ च्या दिशेने कूच केली..!! विजयदुर्ग ते कुणकेश्वर ४० किमीचे अंतर. रात्री साडे नऊच्या सुमारास कुणकेश्वर भक्त निवास गाठला..!!
क्रमशः भाग तीन/अंतिम भागात……….
अंतिम भाग:-
https://wordpress.com/post/ravindrainamdar.wordpress.com/676
‘कोकणातील किल्ले’ भटकंती तांबड्या मातीच्या आडवाटेवरील (भाग एक)..!!

‘स्वराज्याच्या अभेद्य आरमाराचे सामर्थ्य असणाऱ्या कोकणातील तांबड्या
मातीच्या आडवाटेवरील रांगडे किल्ले आणि जलदुर्ग’ भटकंतीचं नियोजन आणि
प्रयोजन तर बऱ्याच दिवसासून चाललं होतं, पण सलग सुट्ट्या नसल्याने आणि
बाकीच्या कार्यकर्त्याना वेळ मिळत नसल्या कारण प्रत्यक्ष अमंलबजावणीचा
ताळ-मेळ मात्र काही केल्या जुळत न्हवता…!!
सहजचं एकदा अभयला विचारलं “जायचं का रे अभ्या कोकण बाईक राईडला? कोकणातील
किल्ले पहायला, कोकणात मनसोक्त भटकंती करायला?” आणि कसा काय देव पावला काय
माहीत, चक्क अभ्या तयार झाला..!! तत्पुर्वी मी एकदा ‘अमरला’ हा कोकण प्लान
बोलून दाखवला होता त्यामुळे त्याला थोड़ी पूर्व कल्पना होतीचं, तो ही लगेच
तयार झाला..!! तिकडे अभय ने भगवानला फोन करून निमंत्रण दिलं अन् तो ही तयार
झाला..!! झालं ठरलं, २ बाईक आणि ४ हौशी जिवलग भटके मित्र, कोकणातील प्रमुख
जिल्हे, आणि त्यातील काही प्रमुख किल्ले, सोबतचं काही मंदिरे आणि नितांत
सुंदर समुद्रकिनारे…!! जाउन-येउन हे सारं अंतर म्हणजे जवळपास १०००
किमीच्या ही वरचा पल्ला होणार होता, त्या मुळे शनिवारी दिनांक १४ जानेवारी
२०१७ रोजी सकाळी भल्या पहाटेचं बाईकचा स्टार्टर मारला आणि आमचा कोकणाच्या
दिशेने प्रवास सुरु झाला…!! पुण्याहून ताम्हिनी घाट मार्गे खाली कोकणात
उतरयाचं होतं त्या मुळे पौड-मुळशी डॅम मार्गे ताम्हिनीचा घाट रस्ता पकडला,
मुळशीच्या जलाशयाला लागुन जाणारा आणि फक्त विकेंडलाच बऱ्यापैकी रहदारी
असलेला हौशी फिरस्त्यांच्या आवडता रस्ता….!!“Happiness is A Tank full of petrol + open roads & Best Buddies”
या उक्ती प्रमाणे बाईक रायडिंगचा मनमुराद आनंद लुटत सकाळी साडे सहाच्या
सुमारास घाट संपवून रायगड जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केला, कोकण प्रांतात
प्रवेश केला…!! अंग गोठवणाऱ्या कडाक्याच्या थंडीला फाट्यावर मारण्यासाठी
माणगावात पोहोचल्यानंतर गरमागरम चहा वर ताव मारला आणि पुढचा प्रवास प्रारंभ
केला. येथून आम्हाला ‘मंडणगड’ मार्गे ‘दापोली’ आणि तेथून दाभोळ गाठायचं
होतं, हा सारा नागमोडी वळणा-वळणाचा घाट रस्ता…!! मंडणगड ते दापोली
रस्त्याची पार चाळण झालेली त्यातून 1st, 2nd, 3rd, 4th, 5th आणि क्वचितचं
6th गियर टाकत सरकारचा चांगलाचं उद्धार करत साडे दहाच्या सुमारास दापोली
गाठली, आणि तेथून दाभोळ…!

नियोजित प्लान प्रमाणे दाभोळ गावातून खाड़ी पार करून पलिकडे
वेळदूर/अंजणवेलला जाणारी फेरी बोट पकडायची होती, पण तिथेच जेट्टी जवळ
असणारी एक शाही मश्जिद दिसली खुप जुणी, पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली
असणारी पुरातन वास्तू…. एकदम आखिव आणि रेखीव बाधकाम असणारी ही मश्जिद..!!


हि पुरातन वास्तू पाहून झाल्यांनतर दाभोळ धोपावे फेरी बोट मध्ये बाइक्स चढवल्या आणि आमचा छोटासा सागरी प्रवास सुरु झाला..!! अर्ध्या तासाच्या आत आम्ही वेळदूर गावात पोहोचलो. तेथून सुरु होणार होता आता आमचा गडकिल्यांचा प्रवास…! वेळदूर पासून १० किमीच्या अंतरावरती वसलेला किल्ले गोपाळगड हा आमच्या मोहिमेतील पहिला किल्ला…!!



‘किल्ले गोपाळगड‘:-
छत्रपती शिवरायांनी सन १६६० साली आदिलशाहकडून हा किल्ला जिंकून घेतला,
त्यानंतर गोपाळगड व गोविंदगड असे त्याचे नामकरण करण्यात आले. छत्रपतींच्या
काल- खंडात हा किल्ला जलवाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र होता.
किल्ल्यावरील तटबंदी आणि बुरुज आजही मजबूत अवस्थेत·उभे आहेत. तटबंदीच्या
भोवती मोठाले खंदक आहे, तटबंदीवरून आजूबाजूच्या समुद्राचे विहंगम दृश्य
दिसते. किल्ल्यावर धान्यकोठारे, कातळात खोदलेल्या विहिरी आढळतात.
तटबंदीवरून वसिष्ठि खाडीचे विहंगम दृश्य दिसते . सध्या
गडावर खाजगी मालकाने आंब्याच्या बागा लावल्या आहेत.आणि सोबतच “सदरची जमीन
खाजगी मालकीची असून पर्यटकांस फिरण्यास खुली आहे, पर्यटकांचे हार्दिक
स्वागत” अशी पाटी हि या किल्ल्यावर लावण्यात आली आहे…!!



गोपाळगड नंतर मोर्चा वळवायचा होता तो अजंनवेल लाईट हाउस कड़े, पण तिथे
गेल्यावर आमचा पार पोपट झाला राव, ‘लाईट हाऊस दुपारी 1 ते 4 बंद’ या फलकाने
आमचे सहर्ष स्वागत केले, तो बंदचा बोर्ड पाहिला आणि पार भ्रम निराश झालो . चला
असो, आता पुढचा मार्ग गुहागर मार्गे ‘जयगड किल्ला’ आणि ‘जयगड लाईट’
हाऊस..!! अजंनवेल पासून ५० किमिचा टप्पा, आणि आजच्या दिवसातील दूसरी फेरी
बोट सवारी बाकी होती ती म्हणजे ‘तवसाळ-जयगड फेरी बोट’…!!

वाटेत गुहागर मध्ये पोहोचल्यानंतर मस्त कोकणी थाळीवर ताव मारला आणि
पुढची ‘तवसाळ’ जेट्टी गाठली. तवसाळ-जयगड फेरी बोट पाउने चारला होती ती
थोडक्यातचं चुकली, मग काय बसा आता माश्या मारत, वाट पाहत आजुन अर्धा पाउन तास
पुढची फेरी बोट येई पर्यंत. त्या नंतर असणारी साडेचारची फेरी बोट पकडली आणि जयगड बंदरावर गेल्या गेल्या पहिला ‘जयगड लाईट हाऊस‘
जवळ केलं..!! म्हणलं दुपारी गेल्याने अजंनवेल लाईट हाऊस मिस झालं आणि आता
वेळ झाला म्हणून जयगड लाईट हाऊस नको मिस व्हयला. जयगड लाईट हाऊस बंदरापासून
आणि जयगड किल्यापासून अगदी जवळ आहे. लाईट हाऊस प्रत्यक्षरित्या समोरा-समोर
पाहण्याची हि पहिलीच वेळ. समुद्रकिनारी लागुन असणाऱ्या जमिनीच्या भूभागावर
उत्तुंग असं विलोभनीय लाईट हाऊस…!


लाईटहाऊस वर जाउन आजूबाजूचा परीसर आणि दर्या न्याहाळण्यात एक वेगळाच
आनंद..!! मराठी ‘किल्ला’ चित्रपटामध्ये चित्रित झालेले हेच ते जयगड लाईट
हाऊस .
सूर्य आता मावळतीला झुकला होता, सुमुद्राच्या पलिकड़े लुप्त होण्याच्या
मार्गावरती होता..!! आणि आम्हाला आजून आजच्या प्लान मधला शेवटाचा स्पॉट आणि
दुसरा किल्ला पहायचा होता, तो म्हणजे ‘किल्ले जयगड’
‘जयगड किल्ला‘:- शास्त्री (जयगड) नदीच्या खाड़ीवर अरबी समुद्रावर नजर ठेवण्यासाठी जयगड गावातील
टेकडी वर बांधण्यात आलेला हा किल्ला, आजही बऱ्यापैकी किल्ल्याची तटबंदी
साबूत आहे, किल्ल्यात दक्षिणेकडील दिंडी आणि पश्चिमेकडील चोर दरवाज्यातून
प्रवेश करता येतो. किल्ला १२ एकर परिसरात पसरलेला असून अजूनही मजबूत
अवस्थेत आहे. बालेकिल्ला आणि परकोट या दोन भागात किल्ल्याची रचना केली आहे.
बालेकिल्ल्यास महाद्वार आहे. किल्ल्याला जांभा पाषाणपासून बनविलेली मजबूत
तटबंदी आहे. तटबंदीच्या बाजूला खंदक कोरलेले आहेत. किल्ल्याला एकूण २८
बुरूज असून या बुरूजावरून समुद्राचे सौंदर्य न्याहाळता येत.
बालेकिल्ल्यातील तटबंदीच्या बाजूस कोठार बांधलेले आहे. त्याच्या बाजूस
तबेले आहेत. मधल्या बाजूस गणपती मंदीर आहे. किल्ल्याच्या बुरुजावरून
संपूर्ण खाडीचा परिसर दृष्टीपथास पडतो.


आता पार दिवेलागणीची वेळ झाली होती आणि आम्हाला पहिल्या दिवसाचं नियोजित
मुक्काम स्थळ ‘गणपतीपुळे’ गाठायचं होतं, जयगड पासून गणपतीपुळे २० किमी,
मुक्कामासाठी गणपतीपुळया पासून २ किमी आलिकडचं सागरी किनारी वसलेलं छानसं
टुमदार ‘मालगुंड’ गाव निवडलं आणि तेथेच ‘गायत्री निवासला’ मुक्काम टाकला.
आजच्या पहिल्या दिवसभरचा प्रवास जवळपास ‘साडेतीनशे ते पाऊणे चारशे किमीचा’
झाला होता, त्या मुळे अंगात चांगलाचं त्राण आला होता. दिवसभर पाठीवर
असणाऱ्या बॅगा रूम मध्ये टाकल्या आणि रात्री फ्रेश होउन थोड़ा वेळ निवांत
फेरफटका लगतच्या समुद्र किनारी मारायला बाहेर पडलो…..
रात्री समुद्र किनारी जे वातावरण होत ते नक्कीचं दिवसभराचा सारा थकवा घालवणार होतं. “आकाशात
नुकत्याच वर आलेल्या लालसर चंद्राची मंद शीतल छाया, सोबत
असंख्य चांदण्यांचा लुकलुकाट, धुंद बेधुंद वाहणारा गार वारा, पाढंऱ्या
शुभ्र रेतीचा स्वच्छ सुंदर किनारा आणि त्यावर फेसाळत येउन धडकणाऱ्या
लाटांचा एकसमान निरंतर मारा…!! बसं त्या अथांग सागराकडे शांत एकाग्र मनाने
पाहता स्वत:च्या मनाने स्वत:चाच घेतलेला ठाव आणि ‘जगदीश खेबुडकरांच्या’
चटकन ओठावर आलेल्या चार ओळी..!!
“हा सागरी किनारा, ओला सुगंध वारा”……….
आणि सोबतचं मनात येऊन गेलेला एक विचार,
‘ती सध्या काय करते?’ असो, यावर आपण एक दुसरा स्वतंत्र्य ब्लॉग लिहू
…!!”
खरंतर हे सारं शांत आणि रम्य वातावरण सोडून रूम वर परतण्याची बिलकुल इच्छा
होत न्हवती. पण काय करणार, दुसऱ्या दिवशीचा बराच मोठा नियोजित भटकंती
पसारा डोळ्यासमोर पडला होता त्या मुळे नाइलाजस्तव तिथून काढता पाय घ्यावा
लागला आणि रात्रीचं जेवण आटोपून लवकरचं पडी मारावी लागली….!!


दुसरा आणि आमच्या भटकंती मोहिमेचा मुख्य दिवस, ‘रविवार’ १५ जानेवारी २०१७ ‘संकष्ट चतुर्थी’…!!
क्रमशः भाग दोन मध्ये…………..
भाग दोन :- https://wordpress.com/post/ravindrainamdar.wordpress.com/665
कातळकड्यांनी वेढलेली ‘सांधण व्हॅली’…!!

पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सिमेवर पसरलेली भव्य-दिव्य अजस्त्र
सह्याद्रीची पर्वत रांग म्हणजे जणू मुक्त सह्यभ्रमण करणाऱ्या हौशी
सह्यभटक्यांची साक्षात ‘पंढरीचं’..!! महाराष्ट्रचं माउंट एवरेस्ट ‘कळसूबाई
शिखर’, ट्रेकर्स पॅरेडाइज मानला जाणारा ‘हरिश्चंद्रगड ‘, नयनरम्य ‘रतनगड’,
‘मोस्ट थ्रिलिंग आणि मोस्ट टफ ट्रेक इन सह्याद्रीज रेंज’ असा बहुमान
दिमाखात मिरवणारा ‘AMK’ (अलंग, मदन आणि कुलंग), लगतचं असलेला महाकाय असा
‘आजा’ उर्फ़ ‘आजोबा डोंगर’ आणि या सार्यांच्या पायथ्याशी अथांग पसरलेला
‘भंडारदऱ्याचा’ विशाल जलाशय, त्यातचं आजुन भर म्हणून की काय तर
भंडारदऱ्याचा शेजारी असलेला छोटेखाणी ‘घाटघरचा’ जलाशय आणि आजूबाजूला
जंगलाने व्यापलेला भूभाग…!! या सार्याँच्या सानिध्यात समावलेला
सह्याद्रितला आजून एक मनाला भुरळ घालणारा सुंदर दागिना म्हणजे ‘सांधण दरी’ /
‘सांधण व्हॅली’ आणि याच दागिन्याचा लख-लखता साज डोळे भरुन पाहण्याचा मेळ
जुळून आला तो “मिस्टेरीयस रेंजर्स” या ट्रेकिंग ग्रुप मुळे…!! धन्यवाद
मित्रांनो



अचानकचं मिळालेल्या शनिवार रविवारच्या सलग सुट्ठीत मनसोक्त आनंद
लूटण्यासाठी ‘कुठे नवख्या ठीकाणी स्वैर-भटकंतीला उनाडता येईल का ?’ या
विचारात असता आठवण झाली ती प्रजेशची आणि राहूल गावडे यांची,
त्यांच्याकडूनचं समजलं की “मिस्टेरीयस रेंजर्स” हा ग्रुप सांधण व्हॅली
ट्रेकला जातोय, झालं मग काय ठरलं मनात एकदाचं “चलो सांधण व्हॅली”…!!
सांधण व्हॅली विषयी तसं फारसं काही जास्त माहीत न्हवतं फक्त एकूनच होतो.
”सह्याद्रिमधली एक भली मोठी भेग आणि महाकाय अरुंद दरी, इतकी अरुंद दरी की
जीच्या तळाशी कधीचं प्रकाश पोहोचतं नाही अश्या व्हॅली मधून केला जाणारा
साहशी ट्रेक आणि रॅप्लिंगचा थरार”…!! काही महीन्या पूर्वी सांधण व्हॅलीचा
‘ABP माझा न्यूज चैनल’ वरती या साऱ्या ट्रेकचा एक विशेष भाग पाहिला होता,
बसं तेचं काय ते चित्र नुसतं आता डोळयासमोर रेंगाळत होतं…!! शनिवारी रात्री
साडे नऊच्या सुमारास ट्रेक साठी लागणारा संसार बॅग मध्ये कोंबून नाशिक
फाटा गाठला. आणि एकदाचा प्रवास सुरु झाला तो मनात आणि डोळयासमोर
रेंगाळणाऱ्या चित्रांचा वेध घेण्यासाठी आणि त्यांना वास्तवात उतरवून बोलकं
करण्याच्या दिशेने, ‘सांधण व्हॅलीच्या’ दिशेने…!!
या ग्रुप बरोबर मी फस्ट टाईमच ट्रेकला जात होतो, नाशिक फाट्यावर पहिला
दर्शन झाले ते या ग्रुपचा लीडर आणि ‘एक मिस्टेरीयस नमूना/कॅरेक्टर’ “द
ग्रेट तेजस मदाळे’ आणि नंतर भेटले माझे तीन जूणे ट्रेक सोल मेट्स ‘मिलिंद’,’किरन’ आणि ‘राहुल’
सोबतचं सुयोग, राहुल गावडे सर देखिल…!!
रात्री आडिच तीनच्या सुमारास साम्रद गावापासून ५ ते १० किमी अंतरावर असणारा
एक बोगदा बंद असल्या कारण मोठा वळसा घेउन लांबचा पल्ला पार करावा लागला.
इगतपूरी – घोटी – भंडारदरा – घाटघर मार्गे सकाळी साडे सात – आठच्या सुमारास
शेवटी एका विस्तीर्ण पठारावर वसलेल्या आणि अवघी ६० ते ७० घरांची वस्ती
असलेल्या छोट्याश्या टुमदार ‘साम्रद’ गावात पोहोचलो. स्थानिक गाईड आणि
वाटाडयाच्या घरी चहा-पान उरकून घेतला, एकमेकांचा परिचय व सूचना पर्व जरा
थोडक्यातचं आटोपून आम्ही ३० जनांनी मोर्चा वळवला तो सांधण व्हॅलीच्या
रोखाने…!!



गावातिल विस्तीर्ण पठार सोडून आता झाड़ा-झुडूपातून जाणारी पायवाट पकडली
होती. अवघ्या अर्ध्या तासातचं सांधण व्हॅलीच्या मुखाशी पोहोचलो…!! “सांधण
व्हॅली” पाहताच क्षणी डोळे चांगलेच विस्फारले, बाप रे काय हा प्रकार ?? एका
महाविशालकाय अजगरा प्रमाने लांबच-लांब पसरलेली खोलगट दरी पाहून चांगलचं
काळजात धस्स झालं..!!
दरीचा पहिलाच एंटरन्स म्हणजे दोन मोठ्या दगडांमधून असलेली एक छोटीशी अरुंद
वाट त्यातून अक्षरश: झुकूनचं पुढे जावं लागतं. जस-जसे पुढे- पुढे जावू
तस-तसे सांधण व्हॅली आधिकाधिक अरुंद होत जाते. दरीत मोठ-मोठाले असंख्य
दगडगोटे पसरलेले आणि त्या वरून तोल सावरत-सावरत आम्ही जावून पोहोचलो ते
मधोमध असलेल्या एका पाण्याच्या साठ्यापाशी, हा पाणसाठा जवळपास ४ फुट खोलीचा
आणि १५ ते २० फुट लांबीचा. आता यातूनच साऱ्यांना पलीकडे जावं लागणार होतं,
पाठीवरचं बोचकं हातात डोक्यावर घेउन आणि पायातले बूट गळयात अडकवून एकदाचे
आम्ही सारे त्या पाण्यात पायउतार झालो. छाती पर्यंत आलेल्या पाण्यातून
तोलून-मापून एक-एक पाय टाकत कसाबसा तो पाणसाठा पार केला. खोलगट सांधण
दरीच्या तळाशी कधीच उन पोहोचत नसल्याने पाणी एवढं गार होतं की जणु
बर्फाच्या लादिवरूनचं चालतोय की काय असा भास् होत होता..!! या पाण्यातून
डोक्यावर हातात बॅग घेउन जाताना “बाहुबली” चित्रपटाचा स्टार्टिंगचा सीन
आठवला…..!! आता जरा कुठे कपड़े सुकतात न सुकतात तोच पुढे आजुन एक पाणसाठा
समोर आला. पहिल्या पाणसाठ्याच्या तुलनेत खोलीने आणि रुंदीने ही कमी, पुन्हा
एकदा बूट गळयात आणि बैग डोक्यावर घेउन पाण्यातून ‘चलो आणि चलतो रहो’…!!


‘सांधण दरीची खोली ४०० ते ५०० फुट खोल, लांबी जवळपास १ किलोमीटर पेक्षाही
जास्त आणि अरुंद तर इतकी, फार-फार तर २० फुट आणि कुठे-कुठे तर रुंदी १० फुट
सुद्धा….!! अशी ही सांधण व्हॅली म्हणजे राकट, अचल आणि अजस्त्र
सह्याद्रीमधला एक आविष्कार आणि चमत्कार म्हणलं तरी काही वावगं ठरणार
नाही…!! सांधण व्हॅलीला व्हॅली ऑफ शॅडो असं हि संबोधलं जातं…!! सांधण
व्हॅली मध्ये बरेच साहसी इव्हेंट्स ऑर्गनाईज केले जातात, जसे कि जायंट
स्विंग, रॅप्लिंग, फ्लाईंग फोक्स, भ्रमः ब्रिज इत्यादी. ते सारे आम्हाला
जवळून पाहता आले.




“सह्याद्रीच्या ऊंचचं-ऊंच कातळकड्यांनी वेढलेली,
दरीच्या पोटातून पाहता जणु आकाशाला भीड़लेली,
ऊन-सावल्यांच्या खेळात कशी धुंद-बेधुंद रमलेली,
सह्याद्रीच्या रांगेत जणु भौगोलिक सौंदर्याने नटलेली”..!!!
अशी ही नितांत सुंदर सांधण व्हॅली…!!

या दरीमध्ये वाटेत असंख्य झुळू-झुळू वाहणारे झरे, दगड-धोंड्यांवरून
कोसाळणारे लहान लहान धबधबे, बर्फा प्रमाने थंडगार गारवा, कुठे पक्षांची
किलबिल तर कुठे गर्द नीरव शांतता. या साऱ्यांचा मनमुराद आनंद लुटत साधारण
एक ते दिड तासात आम्ही येउन पोहोचलो ते या सांधण दरी ट्रेकच्या मुख्य
वळणावर म्हणजे “रॅप्लिंग पॉइंट” वर…!!



“रॅप्लिंग पॉइंट” :-‘फुल्ल ऑफ ऍडवेंचर’, ‘फुल्ल ऑफ थ्रिल’ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ‘ फुल्ल ऑफ ‘घाबरगुंडी’ ने भरलेला हा जवळपास ७० ते ८० फुटांचा,आणि १८० अंश कोनातील एकदम सरळ उभा असा आखीव दिसणारा भयाण कातळकडा….!!
आमच्या सोबत असणाऱ्या स्थानिक गाईडने राप्लिंग साठी लागणारी सर्व साधन
सामग्री सोबत घेतली होती. लांब रोप, सेफ्टी हार्नेस, हेल्मेट, केरिबीनर,
ग्लोव्हज इत्यादी साऱ्या वस्तुंचा दोन-दोन सेट सोबत होता त्या मुळेच ३०
जणांना कमीवेळेत खाली उतरता आले. बरेच जण फस्ट टाईम राप्लिंग करत होते ( मी
पण त्या पैकीच एक) त्या मुळे सार्यांची चांगलीच “तंतरली” होती,
प्रत्येकाच्या चेहऱ्यावरच्या एक्प्रेशन्स या अक्षरश: पाहण्या सारख्या
होत्या .
गाइड ने आणि बाकीच्या को-ऑर्डिरेटर्सनी राप्लिंग विषयी साऱ्या सुचना आणि
राप्लिंग कसं करयाचं, बॉडी बैलेंस कसा राखायचा, फुट मूवमेंट्स कश्या
असाव्यात या सगळयाची ट्रिक संगीतली होती, त्या मुळे खुपच फायदा झाला, त्या
बद्दल त्यांचे विशेष आभार कारण त्याच्या मुळेच तर राप्लिंगचा एक अविस्मरणीय
थरार खुप छानपणे अनुभवता आला..!! या व्यतिरीक्त आजून एका पाठोपाठ एक
(अंदाजे) अनुक्रमे ४० फुट, १५ फुट, आणि २५ फुट असे राप्लिंग पॉइंट आहेत..!!
या साऱ्यांना पार करत-करत मोठ मोठाल्या शिळांना पार करत हळूहळू दरी रुंद
होत जाते तेथे येउन पोहोचलो. समोर आता सह्याद्रीची डोंगररांग दिसत होती..!!
चालत चालत पुढे आल्यानंतर एका ठिकाणी खळाळत वाहत्या ओढयाकिनारी मस्त भोजन
व्यवस्था केली होती. एवढी सारी दिव्य पार करून आल्यामूळे भूक तर चापून
लागली होती, मग आता काय “वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे” असं म्हणत
जेवणावर यथेच्छ ताव मारला..!!





दिवस बर्यापैकी मावळतीकड़े झुकला होता, आणि आता येथून आम्हाला जायचं होते ते
“डेहने” गावच्या दिशेने, जवळपास ७ ते ८ किमीचे अंतर. म्हणजे काय तर आजून
तीन-साडेतीन तासांची पायपीट बाकीच होती..!!
मागे वळून पाहिलं तर बाणाचा सुळका आणि त्याच्या जवळ असणारा चंद्र मनाला
भुरळ घालत होता, राहून राहून मागे वळून पाहण्यास भाग पाडत होता इतकं छान ते
दृष्य…!!


सांधण दरीच्या शेवटी असणाऱ्या ओढ्यातून सरळ ५०० मीटर अंतरावर एक चढण
लागते. तेथून दोन फाटे फुटतात उजवीकडे पुन्हा साम्रद गावात तर डावीकडे सरळ
‘डेहणे’ गाव. या पायवाटेवरील दगडांवरती जागोजागी दिशादर्शक बाण आहेत. या
बाणांना फॉलो करत करत दिवेलागणीच्या वेळी किंबहुना त्या पेक्षाही जास्त
वेळाने आम्ही सारे ‘डेहणे’ गावात पोहोचलो..!!
मनातून एक थ्रिलफुल आनंद ओसंडून वाहत होता आणि त्याच आनंदात रमत पुण्याचा रस्ता पकड़ला…!!
खरं तर ब्लॉग मध्ये शब्दांच्या चौकटीत हिचं वर्णन कधीचं न समावणारी अशी ही
सांधण दरी. किमान एकदा तरी येथील ट्रेकचा आणि राप्लिंगचा रोमहर्षक थरार
स्वत: ‘याची देहि याची डोळा’ आवर्जून पाहून यावा आणि स्वत: अनुभवून
यावा….!!
रविंद्र इनामदार
ट्रेक डिटेल्स :-
ट्रेक दिनांक:- ११ डिसेंबर २०१६
समुद्रसपाटी पासून उंची:- ४२५५ फुट
ट्रेक सुरवात ठिकाण:- साम्रद
ट्रेक शेवट ठिकाण:- डेहणे
ट्रेक मधील एकूण अंतर:- ७ ते ८ किमी
सह्याद्री पर्वतरांग:- कळसूबाई/हरिश्चंद्रगड
पोहोचण्याचा मार्ग:- पुणे- मंचर- नारायणगाव – ओतुर – राजुर – भंडारदरा – साम्रद (१९०किमी)
परतीचा मार्ग:- डेहणे – शिरशोळी – मोरोशी – माळशेज घाट – जुन्नर – नारायणगाव – मंचर – पुणे (१६०किमी) Photo Credits :- Aman, Saurav (& How Should i Forget myself
)
राजगड ते तोरणा रेंज ट्रेक…!!
‘राजगड’ नावातचं सारं काही समावलेलं, ‘गडांचा राजा, राजियांचा गड’ म्हणजे किल्ले ‘राजगड’. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी. शिवाजी महाराजांचे जवळ-पास २५ वर्षे येथे वास्त्यव्य…!! अनेक सुख दुःखाचे प्रसंग ज्या किल्ल्याने पाहिले आणि अनुभवले असा ‘किल्ले राजगड’…!! ‘शंभूराजांचे बालपण’, ‘राजाराम महाराजांचा जन्म’, ‘शेकडो यशस्वी मोहिमागनिक अथांग पसरणारे हिंदवी स्वराज्य’ उभ्या डोळयांनी पाहणारा बुलंद, बेलाग, अफाट आणि बळकट किल्ला म्हणजे ‘किल्ले राजगड’. (पूर्वीचे नाव ‘मुरुंबदेव’) आजही त्या अजरामर इतिहासाची साक्ष देत इथली पत्येक वास्तू खंबीरपणे उभी आहे…!! पुण्यापासून ५५ ते ६० किमी नैऋत्येला असणाऱ्या निरा, कानंदी, गुंजवणी या नद्यांच्या खोर्यात दिमाखात उभा गगनचुंबी ‘किल्ले राजगड’. याचे वर्णन जितके करावे, आणि गोडवे जितके गावेत तितके कमीच..!!
याच राजगडावरून किल्ले तोरणा असा आमचा रेंज ट्रेक..!! ‘रेंज
ट्रेक’ म्हणजे काय तर, दोन (कींबहुना जास्तही) किल्ल्यांना जोडणारी एक
डोंगररांग आणि त्याच्या आधारे एका किल्ल्यावरून वरून दुसऱ्या
किल्ल्यापर्यंत केलेला ट्रेक म्हणजे ‘रेंज ट्रेक’. ‘राजगड ते तोरणा रेंज
ट्रेक’ हा माझा ‘SG Trekkers’ (स्वच्छंद गिर्यारोहक) सोबतचा पहिला ट्रेक.
एक अविस्मरणीय अनुभव. पुण्याहून या मोहिमेच्या दिशेने आगेकूच केली ती
दीनांक – ५ डिसेंबर २०१५ शनिवारी रात्री ९ च्या सुमारास. या ट्रेक मध्ये
भगवान सोडला तर बाकी सारे अनोळखीच होते, प्रवासात बस मध्ये विशाल, राहुल
आणि शिव सर यांच्याशी ओळख झाली. हे तिघे SG ट्रेकर्सचे को-ऑर्डिनेटर्स…!!

Vishal (GPS Guru)

Rahul ( The Arnold)

Shiv Sir ( The Motivator)

Sachin Sir
रात्री साडे अकरा ते बाराच्या सुमारास राजगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या ‘गूंजवणे’ गावात पोहोचल्यावर ओळख आणि सुचना परेड आटोपून ट्रेक ला सुरवात झाली. तेथे प्रथम ओळख झाली ती १९९५ पासून अखंड ट्रेक करणाऱ्या ‘सचिन दगडे सरांसोबत’..!! विशाल ट्रेक लीडला होता, राहुल मिडलला आणि शिव सर बॅकएन्डला होते. मी आणि भगवान सचिन सरांनी आता पर्यंत केलेल्या ट्रेक विषयी गुज-गोष्टी करीत या ट्रेकिंगचा आनंद लुटत होतो. ट्रेकिंग दरम्यान थंडीचे दिवस असून पण चांगलाच घाम फुटत होता. आकाशात चंद्राची कोर चकाकत होती आणि सोबतीला असंख्य लुक-लुकणार्या चांदण्या त्याच्या सौंदर्यात आजून भर घालत होत्या..!! अधून-मधून येणारी वाऱ्याची झूळूक थकलेल्या जिवाला अगदी सुखावून जात होती…!! हळू-हळू गडावरील दिसणारी लाईट जवळ-जवळ येत होती. गडाच्या शेवटच्या काही पैचेसला लोखंडी शिडया आणि रेलिंग आहेत त्या मुळे बराच आधार मिळाला नाही तर ही वाट एकंदरित खुपच अवघड. तीन- साडेतीन तासात आम्ही गडाच्या ‘चोर दरवाज्यामार्गे’ पद्मावती तलावा जवळ पोहोचलो, रात्र असल्याने तलावाच्या बस संरक्षक भिंतीच दिसत होत्या. पहाटे साडे-तीन चारच्या सुमारास आम्ही राजगडाच्या प्रमुख माची असणाऱ्या ‘पद्मावती माची’ वर होतो. आमच्या आधीच बरेच ट्रेकर्स आले होते. भेटेल तसा आसरा शोधून ट्रेकर्स मंडळी विसावली होती. आमच्या सोबत असणाऱ्या काही लोकांनी पद्मावती मंदिरात आश्रय घेतला होता. बाकी आम्ही सारे राजगडावरचा गार वारा काय असतो ते चांगलाच अनुभवत होतो. कारण आम्हाला काही थारा भेटलाच न्हवता. त्या गार वाऱ्यात निभाव लागला तो शेकोटी मुळेच, आख्खी पहाट शेकोटीसमोरच घालवली…!! राजगडावरचा तो गार वारा आजही आठवला तरी थंडी भरून येते…!!

जश-जशी सकाळ होत गेली तस-तसा समोरचा पद्मावती तलाव स्पष्ट दिसू लागला.
तलावातील त्या थंड-गार पाण्याने फ्रेश होउन (पार झोपच उडाली) पद्मावती
माचीवर एक फेर फटका मारला. आजूबाजूचा संपूर्ण गुंजण मावळ प्रांत गर्द
धुक्यात हरवला होता…!! राजगडाला एकूण तीन माच्या. ‘संजीवनी’, ‘पद्मावती’
आणि ‘सुवेळा’. त्या पैकी पद्मावती ही प्रमुख माची मानली जाते. इतर माचीच्या
तुलनेने सर्वात विस्तीर्ण अशी ही माची. समोरच असणारा सुबक ‘पद्मावती तलाव’
या माचीचे सौंदर्य आजून खुलवतो. माचीवर ‘पद्मावती देवीचे मंदिर’ आहे. १५
ते २० जण अगदी आरामात बसू शकतील येवढं मोठं मंदिर. जवळच ‘महादेवाचे
(रामेश्वर) मंदिर’ आहे. त्याच्या बाजूलाच ‘सदर’ आणि सोबतच ‘राजवाडयाचे काही
अवषेशही’ आहेत. ‘थोरल्या राणी सरकार’, ‘शंभूराजांच्या मातोश्री सईबाईंची
समाधी’ ही याच पद्मावती माची वर आहे. येथूनच वरती बालेकिल्ल्यावर जाणारा
मार्ग ही आहे…!!


Padmavati Goddess


आता आमच्या रेंज ट्रेकचा प्रमुख भाग होता तो म्हणजे याच पद्मावती माचीला
वळसा घालून संजीवनी माचीमार्गे ‘तोरणा किल्ल्यावर’ पोहोचायचं. पद्मावती
माचीवर सकाळचा चहा आणि नाष्टा, नाष्टा कसला न्ह्यारी म्हणलं तरी चालेल,
गरमा गरम पिठलं भाकरी आणि दही ठेचा अहा..!! एकचं नंबर..!!
पेट पूजेचा कार्यक्रम आटोपून पद्मावती माचीवरून बाहेर पडलो. बालेकिल्ल्यावर फडकणाऱ्या भगव्याचरणी
नतमस्तक होउन ।। जय भवानी, जय शिवाजी ।। अशी आसमंत दणानून सोडणारी किलकारी
गर्जून संजीवनी माचीच्या दिशेने प्रस्थान केले. पद्मावती माचीला वळसा घालत
आणि बालेकिल्ल्याला लागून जी एक पाय वाट जाते ती सरळ ‘संजीवनी माचीवर’
पोहोचते.




‘संजीवनी माची’ म्हणजे शिवकालीन स्थापत्य कलेचा एक अप्रतिम नमूना, पहाताच
क्षणी नजरेत भरणारी आणि मनाला नवचैतन्य देणारी ‘संजीवनी माची’…!! दुहेरी
तटबंदी असणारी चिलखती माची, आकाराने अरुंद, लांबीने पसरट आणि
निमुळत्या स्वरूपात असणाऱ्या या माचीवर आज ही पाण्याची टाके आणि घरांचे
अवषेश आढळून येतात. संजीवनी माचीला लागून एक दरवाजा आहे. या दरवाज्यास ‘अळू
दरवाजा’ म्हणतात. या दरवाज्यामार्गे पूर्वी तोरणा किल्ल्यावरून राजगडावर
ये-जा होत असे. असा उल्लेख ही बऱ्याच जागी आढळतो.




आम्ही आठ ते साडे आठच्या सुमारास संजीवनी माची गाठली होती. तेथे
फोटोग्राफिचा कार्यक्रम थोडा लवकरचं उरकता घेतला. माचीवरील वाळलेले गवत
सुर्याच्या त्या कोवळया किरणांनी अगदी सोन्यासारखे पिवळे धम्मक चकाकत होते.
‘अळू दरवाज्यामार्गे’ बाहेर पडल्यानंतर लागते ती एक डोंगररांग आणि याच
डोंगररांगेवरून केला तो ‘राजगड ते तोरणा रेंज ट्रेक’. अंतर जवळपास १४ ते १५
किमी. लागणारा वेळ ६ ते ७ तासांचा. या वाटेतील पहिले तीन चार टप्पे सरळ
उतरणीचे असल्या कारण जरा अवघडच, मातीवरून पाय घरसण्याचे प्रकार वारंवार
घडायचे. तोल सांभाळत-संभाळत कसा बसा तो घरगुंडीचा टप्पा एकदाचा पार केला.
ही पायवाट तशी एकंदरित नियमित वहिवाटाचीच दिसत होती. गडाखालील लोकांची ये
जा होत असल्या कारण चांगलीच मळलेली आणि रूळलेली.


वाटेत गडाखालील गावकरी महिला डोक्यावर ताकाचे माठ घेउन अर्थार्जनासाठी
राजगडावर जाताना दिसत होत्या. जेथे आमच्या रिकाम्या हाताने चालायचे वांदे
होते तेथे हे लोकं अगदी लीलया डोक्यावरील माठ सांभाळत भर-भर अंतर कापत
होते. हे पाहून नवलचं वाटत होते…!! कसली ती कसब, कसली ती कसरत आणि कसले ते
कष्ट…!! त्यांची ती जीवन जगण्यासाठी केलेली धडपड आणि घेतलेले कष्ट या ट्रेक
मध्ये खुप काही शिकवून गेले…!! या ट्रेक मध्ये संपूर्ण वाटेत आजुबाजूला
होती ती बसं कारवीची झुडपे आणि वाळलेली गवताची पाती.

जस जसा उनाचा कडाका वाढत गेला तस तसे घामाचे लोट सुटू लागले आणि
श्वासोंश्वासाची गतीही वाढली. या ट्रेक मध्ये पाण्याच्या किमान तीन ते चार
बाटल्या सोबत आणा असा विशालचा हुकुमच होता आता मात्र चांगलचं कळत होत असा
हुकुम त्याने का सोडला होता ते..!! जवळपास बारा ते साडे बाराच्या सुमारास
आम्ही सारे वाटेत लागणाऱ्या ‘पालच्या खिंडित’ जाऊन पोहोचलो तेथून एक डांबरी
रस्ता खाली गावत जातो. मध्ये त्या डांबरी रस्त्यावरचं गार सावलीला थोड़ा
वेळ विसावा घेतला आणि सोबत आणलेल्या खाऊ वर ताव मारुन जरा ‘एनर्जी बूस्ट’
केली. आणि पुढचा रस्ता पकडला…!!

सूर्य चांगलाच माथ्यावर आला होता आणि पूर्ण क्षमतेने आग ओकत होता, यात आधार
काय तो बसं कारवीच्या झुडपांचा आणि क्वचित येणाऱ्या वाऱ्याच्या
झुळूकाचा..!! येथून पुढचा ट्रेक चांगलीच परीक्षा घेणारा होता. विशाल,
राहुल, शिव सर आणि सचिन सर एक सारखे मोटिवेट करत होते आणि सांगत होते “चला
बसं २०% उरला आहे ट्रेक”. शिव सरांच्या भाषेतलं ते २०% म्हणजे नेमकं किती
असतं ते आम्हाला तोरण्यावर गेल्यावर चागलचं कळलं
पालच्या खिंडी पासून तोरणा जवळ-पास तीन ते साडे तीन तासाचा पल्ला. येथून
फक्त एकच करायचं होतं ते म्हणजे दूर वर दिसणारा तोरणा जवळ येई पर्यंत न
थकता चालत रहायचं होतं. जस जस तोरणा किल्ला जवळ-जवळ येत गेला तस-तसं मनात
हुरूप भरत गेलं आणि आलेला त्राण कुठल्या कुठे पळाला…!!







वाटेतून नजरेत न समावणारा ‘किल्ले तोरणा’ पाहता यास ‘प्रचंडगड’ (गडाचा तो
अवाढव्य पसारा पाहता शिवाजी महाराजांनी ठेवलेले हे नाव ‘किल्ले प्रचंडगड’)
असं का म्हणतात याची प्रचीती आली. खरचं नावा प्रमाणे तोरणा अती
‘प्रचंडगड’..!! शेवटच्या टप्प्यात तोरण्याची चढाई एकदम तीव्र आणि कठीन, सरळ
उभ्या स्वरूपातील. ही चढ़ण पार केल्यानंतर ‘बुधला माचीच्या’ तटाला लावलेली
शिडी समोर येते आणि ही पार केल्यावर आपण पाय ठेवतो तो ‘स्वराज्याचे तोरण
असलेल्या तोरणा किल्ल्यावर’, पुणे जिल्ह्यातील सर्वात ऊंचापूरा किल्ला
‘तोरणा'(ऊंची १४०३ मीटर) तो एक अविस्मरणीय क्षण..!! बसं एवढं पार केलं
म्हणजे किल्यावर पूर्णत: पोहोचलो असं नाही, आजून दोन तीन ठिकाणच्या चढाइंनी
चागलचं मेटा कुटिला आणलं..!! वाटेत जाताना एक दोन ठिकाणी ढासळलेल्या
बुरुजांची डागडूजीची कामं सुरु होती. गडकिल्ले जतन आणि संवर्धनीची कामं
पाहून खुप छान वाटलं. आपला एतिहासिक वारसा आणि अलौकिक वैभव जतन करण्याचा
असा प्रयत्न प्रत्येक गडकिल्ल्यावर नक्कीच व्हायला हवा..!!

माध्यान्ह टळून सूर्य कधीच उतरणीला लागला होता. तोरण्यावरील ‘मेंगाई
मंदिरात’ जाऊन आम्ही जरा पाठ टेकली. बऱ्यापैकी सर्वांच्या जवळचे पाणी
संपलेच होते. मेंगाई मंदिराच्या मागील बाजुस एक ‘चौकोनी विहीर’ आहे.
आमच्यातल्या एक दोन जनांनी खाली उतरुन झऱ्याच्या पाण्याने बॉट्ल्स भरून वर
दिल्या. ते पाणी इतके थंड होते की जणू फ्रिज मधूनच बाहेर काढलं आहे असं,
आणि चव तर अशी, ‘बिसलेरी’ पण फीकी पडेल त्या पाण्या पुढे…!!
विशाल आम्हा सर्वांना ‘झुंजार माची’ पहायला चला असा आग्रह करत होता, पण सात
ते आठ तासांच्या ट्रेक मूळे अंगात जिवच राहिला न्हवता आणि आजून तोरणा
उतरुन पुणे ही गाठायचं होतं. शेवटी मेंगाई मंदिरासमोर एक ग्रुप फोटो घेउन
मेंगाई मातेला नमस्कार करून ‘बिनी दरवाज्या’ मार्गे तोरण्याची उतरण सुरु
केली. गड उतरत असताना तोरण्यावरून दिसणारा ‘वेल्ह्याचा प्रदेश’ आणि
‘गुंजवणे धरण’ मनात घर करून गेले..!!



शनिवार रात्री ‘राजगड किल्ला’ चढण्यापासून ते रविवारी संध्याकाळी ‘तोरणा’
उतरेपर्यंत जवळपास २०किमी चे अंतर तर सहजचं झाले असेल. हा रेंज ट्रेक
असल्याने बऱ्याच गोष्टी पाहायच्या राहून गेल्या, ‘राजगडाचा बालेकिल्ला’,
‘नेढे’, ‘सुवेळा माची’, ‘तोरण्याची झुंजार माची’ अशी अनेक ठिकाणे वेळे
अभावी राहून गेली होती. आता पुन्हा एकदा या किल्ल्यांवर यायचं आणि उरलेला
बॅक लॉग भरून काढायचा असा मनात विचार करून ‘स्वराज्याच्या पहिल्या
राजधानीला आणि स्वराज्याचे तोरण असलेल्या तोरण्याला मनोमन त्रिवार मुजरा
करून’ निरोप घेतला…!!
⇒ थोडीशी उपयुक्त माहिती :-
राजगड ते तोरणा अंतर– अंदाजे १५ किमी
ट्रेक दिनांक – ५/६ डिसेंबर २०१५
राजगड ऊंची – १३९४ मीटर
तोरणा ऊंची – १४०३ मीटर (पुणे जिल्हातील सर्वात ऊंच किल्ला)
पोहोचण्याचा मार्ग–
किल्ले राजगड – पायथ्याचे गाव- गुंजवणे
पुणे – खेड-शिवापूर- नसरापूर- गुंजवणे. (६०किमी)
राहण्याची सोय– पद्मावती मंदिर.
किल्ले तोरणा– पायथ्याचे गाव- वेल्हे
पुणे – खेड-शिवापूर- नसरापूर- वेल्हे.(७० किमी)
राहण्याची सोय– मेंगाई मंदिर.
गवसणी कळसूबाई शिखराला…!!
तसं तर कळसूबाई शिखराची एक अंतरीक ओढ लहानपणा पासूनच मनात होती.
इयत्ता ४ थी भूगोलाच्या पेपरात हमखास विचारला जाणारा प्रश्न –
“महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आणि त्यांची उंची किती?” उत्तर
आम्हाला तोंडपाठ असायचं “महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई आणि उंची
१६४६ मीटर” बाकी आता ते नेमकं महाराष्ट्रात कुठे आहे पूर्वेला, पश्चिमेला,
दक्षिणेला की उत्तरेला हे काय आम्हाला ठाउक नव्हतं..!! तेव्हा पासूनच
कळसूबाई शिखर हे मनात घर करून होते. या शिखराला सह्याद्रीचं एव्हरेस्टदेखील
म्हणतात. अश्या या कळसूबाई शिखराला गवसणी घालायचा योग २० डिसेंबर २०१५ ला
जमून आला तो ही SG Trekkers मूळे, त्या बद्दल त्यांचे खूप खूप आभार, आणि विशेषत: विशाल काकडे याचे..!!
पुण्याहून कळसूबाईच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला तो शनिवार १९ डिसेंबर
२०१५ च्या रात्री १०.३० वाजता. बस मध्ये प्रवासात गप्पा-टप्पा, दंगा-मस्ती,
गाण्याच्या भेंड्या खेळत-खेळत रात्री २ ते २.३० च्या सुमारास आम्ही
कळसूबाईच्या पायथ्याशी असलेल्या ‘बारी’ या गावात येउन पोहोचलो. गावातील एका
मंदिरात थोडा वेळ विसावा घेतला. जवळ पास २५ ते ३० जनांचा ग्रुप होता आमचा.
नेहमी प्रमाने प्रत्येकाने आप-आपला परिचय आणि थोडक्यात या पूर्वीच्या
ट्रेकिंगचा अनुभव देखिल शेअर केला. ज्योती कारंडे यांनी नुकत्याच जाउन
आलेल्या आणि प्रत्येक ‘हार्ड कोअर ट्रेकरचे’ स्वप्न असलेल्या ‘A.M.K’
(अलंग, मदन आणि कुलंग) ट्रेकचा खूप छान अनुभव शेअर केला होता. पाहू आता
आमचा AMK चा योग कधी जूळून येतो ते…!! मंदिरा जवळील एका घरात चहा आणि
नाष्ट्याची उत्तम सोय करण्यात आली होती. गरमा-गरम चहा आणि पोह्यावर यथेच्छ
ताव मारून ३ ते ३.३० च्या सुमारास कळसूबाई शिखर मोहिमेची सुरवात झाली.
डिसेंबर महीना असल्याने थंडीचा कडाका तर चांगलाच होता, या बोचऱ्या थंडीत
कसं आणि काय होणार ट्रेकचं असचं वाटत होते. पण एकदा भर-भर चालायला सुरवात
केल्यावर पहिल्या अर्ध्या तासात थंडी कुठच्या कुठे पळून गेली काही कळलच
नाही. ट्रेक फ्रंट लीडला विशाल होता आणि बेक एंड ला आलेख होता, मध्ये मी
आणि भगवान चंगू-मंगू आणि बाकीचे सर्वजण..!!
पहाटेच्या त्या नीरव शातंतेला भंग करणारी रातकिड्यांच्या कीर-किर, आमच्या
सर्वांच्या बोलण्याचा आवाज, सोबतीला असंख्य चांदण्याचा शीतल प्रकाश आणि
समोरच्या पाय वाटांवरचा काळोख चिरणाऱ्या आमच्या सर्वांच्या हातातील
भीर-भीरणाऱ्या टॉर्चची लाईट..!! असा एकंदरीत अप्रतिम नजारा होता.
खाली पाऊल वाटांवरच्या दगड धोंड्यांकडे लक्ष देत आणि वरती आभाळातील अगणित
चांदण्यांना निरखत आमचा मार्गक्रमण सुरु होता. वातावरण इतके स्वच्छ होते
की आकाशगंगेतील छोट्या-छोट्या चांदण्या देखिल अगदी स्पष्ट दिसत होत्या.
शहरात कुठली आलीये असली पर्वणी म्हणूनच असं आड-वाटांवरील भटकंती मनाला अगदी
स्पर्षून जाते..!!
कळसूबाई शिखराला प्रामुख्याने तीन ते चार मोठ्या-मोठ्या लोखंडी शिड्या
आहेत, त्या शिड्या जरा हलत्या आणि काही ठिकाणच्या पायऱ्या मोडकळीस आलेल्या
अस्वथेतल्या आहेत त्या मूळे अगदी बेताने आणि निरखून असा आमचा मार्गक्रमन
चालू होता. ‘बारी’ गावातून कळसुबाई शिखरावर पोहोचण्या साठी साधारणत: तीन
तासाचा अवधी लागतो. पहिल्या दोन शिड्या पार केल्यावर थोडा वेळ विश्रांती
घेउन पुन्हा कळसूबाईच्या दिशेने आम्ही आगेकूच केली…!!
आडिच-तीन तासाने आम्ही बऱ्यापैकी कळसूबाई ट्रेक च्या उत्तरार्धात पोहोचलो
होतो. शेवटच्या एक दोन शिड्या आम्ही जरा घाई घाईने चढ़ल्या कारण आम्हाला
महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावरून सुर्योदयाचा तो अप्रतिम नजारा पहायचा
होता. शिखराची शेवटची चढण जरा अवघडच होती इतर सर्व चढणीच्या मानाने. आम्हा
सर्वांची लगबग चालू होती आणि इकडे नेहमी प्रमाने सूर्यदेव आपल्या नित्य
नियमाच्या ड्युटी वर येण्याच्या मार्गावर होते, गावरान भाषेत सांगायचं झालं
तर ‘तांबडं फूटण्याचा तो काळ’ अश्या प्रसन्न प्रात:काळी महाराष्ट्राच्या
एव्हरेस्टवरून अवती-भवतीचा नवचैतन्याने बहारलेला अजस्त्र आणि रांगडा
सह्याद्रि न्याहाळताना एका वेगळयाच आनंदलहरींचा संचार मानत होत होता..!!
सहा ते सव्वा सहाच्या सुमारास आम्ही सर्वजण कळसूबाई शिखरावर पोहोचलो. आणि
आम्हाला हवं आसलेला सूर्योदयाचा अभुतपूर्व नजारा डोळयात, मनात आणि कैमेरात
टिपत होतो..!! खरचं खुप मनमोहक नजारा होता तो. दिवसभर आग ओखणाऱ्या
सूर्य-नारायणांची ती एक वेगळीच छटा..!! सर्वजण तो नजारा पाहण्यात कसे अगदी
दंग होउन गेले होते..!! Mind Refreshment आणि Mind Relaxation म्हणजे काय? ते नेमकं हेच असावं बहुदा..!!
कळसूबाई शिखरावरती ‘कळसूआईचे’ एक छोटसं आणि छानसं मंदिर आहे, जेम-तेम
तीन-चारजण आत बसतील एवढसं. कळसूआईचे दर्शन घेउन, महाराष्ट्रातील सर्वोच्च
शिखराला गवसणी घातल्याचे एक वेगळचं समाधान मानत येउन गेलं..!! कळसूबाई
मंदिराच्या अवती-भोवती थोडीशी विस्तीर्ण जागा आहे आणि आजुबाजुने संरक्षक
लोखंडी रेलिंग आहेत. समोरच भंडारदऱ्याचा प्रचंड असा पसरलेला जलाशय आहे,
पूर्वेला अलंग,मदन,कुलंग आणि हरिश्चंद्रगड दृष्टीक्षेपात पडतो अणि
अवती-भोवतीचे सह्याद्रिचे कातळकडे, सुळके डोंगर रांगा लक्ष वेधून घेतात.


आम्ही बराच वेळ शिखरावरुन आजुबाजूचा निसर्ग आणि सह्याद्रिच्या लांबच-लांब
पसरलेल्या पर्वत रांगा न्याहाळत होतो. आणि मनमुराद फोटोग्राफिचा आनंद लूटत
होतो. नेचर फोटो, ग्रुप फोटो, सेल्फी, सोलो पिक आणि ज्याला जसे योग्य वाटेल
तश्या त्या सर्व आठवणी कैमेरात कैद करत होते..!! सविता मैमचा मी क्लिक
केलेला एक फोटो त्यांना खुप आवडला. त्यानी खुप कौतुक ही केलं.
थोरा-मोठ्यांकडून अश्या प्रकारचं कौतुक म्हणजे आपल्या छंदाला दीलेलं एक
प्रोत्साहनच नाही का..!!



साडे ९ ते १० च्या सुमारास आम्ही शिखरावरून खाली उतरण्यास सुरवात केली.
पहिल्याच उतरणीनंतर एक विहीर लागली, तेथील थंडगार पाणी प्राशन करून एक-एक
करत लोखंडी जीणे उतरायला सुरवात केली. दोन आडिच तासात आम्ही खाली ‘बारी’
गावात पहोचलो.!!


गावातून परतत असताना वाटेत एका जागी भोजन उरकून पुण्याचा रस्ता पकडला.
महाराष्ट्रातील एव्हरेस्टला गवसणी घातल्याचा एक वेगळाच आनंद त्या संपूर्ण
परतीच्या प्रवासात ओसंडून वाहत होता..!!
आनंद कळसूबाई शिखराला गवसणी घातल्याचा,
आनंद लहानपणीच्या स्वप्नांना गवसणी घातल्याचा..!!
रविंद्र इनामदार
थोडीशी उपयुक्त माहिती:-
ठिकाण – कळसूबाई शिखर
पायथ्याचे गाव – बारी
समुद्र सपाटी पासूनची उंची -१६४६ मीटर
ट्रेक दिनांक – २० डिसेंबर २०१५
पोहचण्याचा मार्ग –
पुण्याहून :- नारायणगाव – आळेफाटा – संगमनेर – आकोले – राजूर – बारी
एकूण अंतर १७० किमी.
मुंबईहून :- कसारा – इगतपुरी – घाटी – बारी
एकूण अंतर १५५ किमी.
जवळचे प्रेक्षणीय स्थळ – भंडारदरा (शेंडी गाव)
एकूण अंतर १० किमी बारी गावापासून.





No comments:
Post a Comment