Saturday, June 17, 2023

इन पहाडोंकी हवाओं में एक नशा सा है : लिंगाणा

 http://bharatpatilmajhibhramanti.blogspot.com/2017/12/blog-post.html

bharat patil

सह्याद्रीच्या अफाट पसाऱ्यात पसरलेल्या हजारो रत्नांपैकी एक अतिशय तेजस्वी आणि लखलखीत रत्न रायगड आणि राजगड या दोन राजधान्यांच्या मध्ये वसले आहे . ते म्हणजे लिंगाणा. शिवकाळात लिंगाणा एक किल्ला, कारागृह म्हणून वापरात होते पण आता नुसता सुळकाच उरलाय. आपली गिर्यारोहणाची हौस पुरेपूर फिटवणाऱ्या लिंगाण्यास सर्व गिरीप्रेमींमधे मानाचे स्थान आहे. आठवडा झाला लिंगाणा करून पण तरीही असंच वाटतंय कि अजूनही लिंगाण्यावरच आहे . काही केल्या लिंगाणा काही नजरे समोरून  जात नाहीये. खरंच इतकं भारी आयुष्यात कधी वाटलं नव्हतं राव. लिंगाणा करणं हे माझं स्वप्नं होतं आणि आपण खरंच लिंगाणा सर केलाय यावर अजूनही विश्वास होत नाहीये. कधी वाटलं नव्हतं कि आपण लिंगाणा करू , कारण लिंगाणा हा सह्याद्रीमध्ये अत्यंत कठीण श्रेणीत मोडतो. You tube वर त्याचा विडीओ पाहूनच एवढी फाटते कि करायची हिम्मतच होत नाही .

     ३ - ४ वर्षापासून ट्रेकिंग ला  सुरुवात केलीय . सुरुवातीस फक्त पावसाळ्यातच होणारे ट्रेकिंग मग इतरही ऋतूत व्हायला लागले. ट्रेकिंग मनापासून आवडायला लागलं. शाळेतल्या मित्रांच्या साथीने कधी कॉलेज च्या. हळू हळू हे गळपटायला लागले. मित्रांबरोबर,मित्र नसले कि मित्रांच्या मित्रांबरोबर असं काहीही चालायला लागलं. सुरुवातीस एक दिवसाचे मग नंतर 2 दिवसाचे ,रात्रीचे ट्रेक ,सोपे ,अवघड,अजून अवघड असेही अनुभव घेऊन झाले. पण तरीही मनाचे समाधान होत नव्हते. अजूनही वाटायचे काहीतरी भारी करायचं राहिलं आहे . अशातच लिंगाणा विषयी वाचलं. ३००० फुट उंच,तोरणा-राजगड आणि रायगडच्या मधल्या डोंगररांगातून आभाळ चिरत वर आलेला,आकाशाला आव्हान देणारा, सह्याद्रीतला अत्यंत कठीण मानला गेलेला सुळका. याचा विडीओ पाहून तर असं वाटलं कि सोडा राव लिंगाण्याचा नाद करायचा नाही. यह तो अपने बस कि बात नही है. पण मनात एक सुप्त इच्छा जरूर होती कि खरंच आयुष्यात एकदा तरी लिंगाणा केलाच पाहिजे. अशातच भटकंती महाराष्ट्राची ग्रुपने लिंगाणा लावला. हो नाही म्हणत जायचं नक्की केलं. मोहिमेचा दिवस जसजसा जवळ येत होता तशी मनातली उत्सुकता,धाकधूक वाढत होती .

मोहारीतून लिंगाण्याकडे


अखेर २ डिसेम्बरला सकाळी ७ वाजता दादरहून बसने आम्ही २५ जण निघालो. लोणावळा घाटातून पुढे वेल्हे मार्गे मोहारी गाठले. वाटेत राजगड-तोरण्याच्या उत्तुंग पर्वतरांगा आडव्या येतात. या रांगा पार करून पुढे येत असतानाच लांबूनच तो लिंगाण्याचा रौद्रभीषण , अजस्त्र सुळका दिसतो. मोहारी गावात पोहोचलो तेव्हा दुपारचे ३ वाजत आले होते. ओळख परेडमध्ये जेव्हा एकाने सांगितलं कि त्याचा जीवनातील पहिलाच ट्रेक आहे तेव्हा सगळ्यांनी त्याच्या तोंडाकडे आ वासून पहिलं. सत्यादादाने ब्रीफिंग केलं. जिद्दी Mountaineering Association रत्नागिरी चा टेक्निकल सपोर्ट होता संध्याकाळी ४ च्या सुमारास कूच केले. थोडसं अंतर चालल्यावर दाट झाडी लागतात . इथे आमच्या ग्रुप मध्ये अंतर पडल्याने अर्धा ग्रुप वाट चुकून रायलिंग पठाराच्या दिशेने गेला. परत पाठी येऊन मूळ मार्गास लागेपर्यंत बराच वेळ गेला.

 आमची पायपीट सुरु झाली.पुढे जाऊन खाली बोराट्याची नाळ लागते. हरीशचंद्राच्या नळीच्या वाटेसारखी पण तुलनेने छोटी असेलेली हि नाळ पार करत पुढे जाऊन डोंगराच्या कडेकडेने चालत,एकेबाजूला खोल दरी आणि जेमतेम पाय ठेवण्यापुरती असलेली हि वाट पार करत आम्ही संध्याकाळी ७.३० च्या सुमारास लिंगाणा बेस कॅम्प ला पोहोचलो. तिकडे जिद्दीची टीम आमची वाटच पाहत होती. त्यांनी आमच्या अगोदर पोहोचून त्यांचे रोप लावून सेट अप रेडी होता. गाववाल्यांनी आणलेल्या भाजी भाकरीवर सगळ्यांनी ताव मारला. आमचं आधी ठरलेलं प्लानिंग होतं कि सकाळी भल्या पहाटे चढाई करायची पण जिद्दी आणि सत्यादादाने ठरवलं कि अर्ध्या ग्रुपने आताच निघायचे आणि अर्ध्याने पहाटे ३ ला. हा निर्णय पुढे एकदम फायदेशीर ठरला  .  

बोराटयाची नाळ 

पहिल्या ग्रुपची चढाई सुरु झाली रात्री १०.३० ला. आम्ही मात्र थंडीचा आस्वाद घेत कुडकुडत झोपी गेलो. पहाटे २.३० लाच सत्यादादाने उठवलं. दिवसभरच्या प्रवासामुळे डोळ्यांवरची झोप आवरत नव्हती. सामान आवरून तयार झालो. गोल चांदणं पडलं होत. नभांगण असंख्य ताऱ्यांनी उजळून निघाले होते. लिंगाण्याच्या शिखराकडे वर पहिले. लिंगाणा जणू काही आम्हाला शुभेच्छाच देत होता. आता तर लिंगाण्याचे पाषाण देखील आपलेसे वाटू लागले. मन एकदम उचंबळून आले. हाच तो सह्याद्रीतला एक उत्तुंग, बेलाग, अद्भुत, सुळका जो सर करायचा असं प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्नं असते त्यावर आम्ही थोड्याच वेळात चढाई करणार होतो. स्लिंग, हार्नेस, कॅराबिनर, हेल्मेट घालून सज्ज झालो. जिद्दी टीम ने आम्हाला सूचना दिल्या. climbing प्रस्तरारोहण चे तंत्र आम्हाला समजावून सांगितलं. जय शिवाजी, जय भवानीच्या जयघोष झाला. हेड टोर्च च्या प्रकाशात आम्ही चढाई ला सुरुवात केली.

अगदी सुरुवातीलाच २ -३ मिनटामध्येच लिंगाणा काय चीज आहे याची प्रचीती आली . सरळ सरळ उभे कातळ चढायचे होते. त्यातील खाचा शोधून, ज्या रात्रीच्या अंधारात शोधणे  महाकठीण काम होते, त्यांत आपले हात पाय घट्ट रोवून वर चढणे किती कठीण आहे याची जाणीव वारंवार होत होती. जरासुद्धा हात पाय किंवा दगड सरकला तर काय होईल याची कल्पना देखील करवत नव्हती. 
लिंगाणा मोहिमेत सर्वात जास्त लक्षात राहिलं तो म्हणजे गर्जत अंगाला झोंबणारा तुफानी वारा. हिवाळ्यातील रात्री ३ च्या थंडीतील हा तुफानी वारा हाडात जात होता . आमची चढाई आणखी कठीण करत होता . वाऱ्याचा आवाजच इतका होता कि एकमेकांशी मोठ्याने बोलून सुद्धा काही ऐकू येत नव्हते . पण आम्हाला आता कसली तमा नव्हती. काळोख्या रात्रीत, सह्याद्रीला साक्षी ठेवून, रातकिड्यांच्या किर्र आवाजात आम्ही तो भीषण सुळका चढत होतो. शरीरातल्या रक्ताचा वेग देखील वाढलेला जाणवत होता. आयुष्यात पहिल्यांदाच इतका अंगावर शहारे आणणारा, रोमांचकारी, विलक्षण अनुभव घेत होतो.हि वेळ कधी संपूच नये इतकं भारी वाटत होत.

गुहा

दीड-दोन तासांत वर एका गुहेपाशी पोहोचलो. आमचा रात्री आलेला अर्धा ग्रुप हा आम्ही येण्या अगोदरच वर निघून गेला होता . थोडा वेळ विश्रांती करून परत चढाईस सुरुवात केली. चढाई चा सर्वात कठीण टप्पा आता समोर होता. सरळ उभी कातळाची १०० फुटी भिंत आमची वाट पाहत थांबली होती. जिद्दीचे वीर आम्हाला मदतीला सरसावले . हळूहळू एकेक करून आम्ही सर्वांनी मोठ्या हिमतीने तो  टप्पा पार केला. त्या पुढे अजून दोन मोठे रॉक patch आम्ही चढून गेलो.

आभाळात आता तांबडं फुटून सूर्याची किरणे आसमंतात उधळू लागली होती. अप्रतिम, मनमोहक सूर्योदय पाहण्याचे भाग्य आम्हाला मिळाले. वर आल्यावर माथ्यावर जाणारा रस्ता हा फार अरुंद आहे . एकावेळी जेमेतेम एकच जण जाईल एवढीच जागा आहे. जरासुद्धा तोल गेला तर दरीत कोसळलाच म्हणून समजा . शरीराचा तोल सांभाळत तुफान वाऱ्याशी सामना करत रोप पकडून एकेक पाउल सावकाशपणे पुढे सरकवत आम्ही लिंगाण्याचा माथ्यावर पोहोचलो. त्याक्षणीच सगळ्यांनी एकच जल्लोष केला. सगळ्यांच्या आनंदाला नुसते उधाण आले होते . गेल्या कित्येक वर्षापासून मनात दडवून ठेवलेले स्वप्न साकार होत होते. सगळ्यांचे  कॅमेरे पटापट बाहेर निघाले. राजगड ,रायगड , तोरणा , कोकणदिवा, रायलिंग पठार असे अनेक किल्ल्यांनी  लिंगाणाभोवती  नुसती दाटी केली होती . माथ्यावर मोठ्या दिमाखात आणि डौलाने फडकणारा भगवा पाहून मन भरून आलं. भगव्यासमोर खरोखरीच नतमस्तक झालो आणि तोंडातून आपसूकच शब्द बाहेर पडले “छत्रपती शिवाजी महाराज कि जय“ !!!


लिंगाणा माथ्यावर 

 

   पाय भरून आले होते. वर माथ्यावर थोडा वेळ बसकण मारून बसलो आणि पुढ्यात पसरलेला सह्याद्रीचा तो अफाट पसारा नजरेत साठवू लागलो. लिंगाण्याच्या चोहोबाजूनी गिरीशिखरांची मैफिल जमली होती. स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड मोठ्या दिमाखात त्याच्या भव्यतेची साक्ष देत होता .थोड्या वेळात उतरण्यास सुरुवात केली.लिंगाणा चढण्यापेक्षा उतरणे खरे अवघड आहे . रॉक patches वर rappelling करत यावे लागते. rappelling करताना नजर जशी खाली जात होती तसा सरळ पायथाच दिसत होता. हृदयाचे ठोके वाढले होते. २०० फुट सरळ patch rappelling करताना फार अवघड गेलं. पायात अंतर ठेऊन गुडघे न वाकवता शरीराचा कातळाशी ९० अंश कोन करून हळूहळू रोप सोडत उतरता आले पाहिजे नाहीतर तोल जाण्याचा धोका असतो. भुसभुशीत झालेल्या मातीवर उतरताना जपून पाय ठेवावे लागत होते नंतर क्रमाने इतरही patch उतरलो आणि पायथ्यास पोहोचलो तसा सगळ्यांनी एकमेकांना मिठ्या मारल्या. लिंगाणा सर केल्याच्या आनंदात आम्ही सगळे न्हाऊन गेलो होतो .

    आपापले अनुभव सांगताना हास्याचे फवारे उमटत होते. सगळे याची त्याची कशी फाटली , तिकडे मी त्याला कसा चढवला याचे किस्से रंगवून सांगत होते. मित्रामध्ये आता कशी कॉलर टाईट होईल, अब किधर भी जायेगा तो सीना चौडा करके जायेगा, ए हुं मागं लिंगाणा केलाय मी,लिंगाणा बाप आहे यार वगैरे वगैरे. सगळेच सांगत होते कि त्याच्या आयुष्यातील हा सर्वात भारी ट्रेक होता आणि बाकी सगळे ट्रेक त्यांना लिंगाण्यापुढे फिके वाटत होते. लिंगाण्यावर खरोखर सगळ्याचं प्रेम जडले होते.

    आपण सर्वांनी नकळतपणे आपल्याभोवती एक चौकट तयार केलेली असते. तिला भेदून जाण्याचे आपण कधी धाडस करत नाही पण जेव्हा आपण ती चौकट मोडून बाहेर पडतो तेव्हा विलक्षण स्वर्गीय अनुभूती मिळते. लिंगाण्याने मला अशीच स्वर्गीय अनुभूती दिली. प्रचंड आत्मविश्वास दिला. काळ्याकभिन्न रात्री तुफानी थंडी-वाऱ्यात केलेल्या लिंगाण्याच्या चढाईची धुंदी काही केल्या उतरत नाहीये, क्योंकी

 इन पहाडोंकी हवाओं में एक नशा सा है....!!!

विशेष आभार जिद्दी Mountaineering Association रत्नागिरी        

संक्षिप्त    day 1 - ७ वाजता सकाळी दादर -लोणावळा घाट-वेल्हे-मोहारी (दुपारी ३ वाजता )

                             दु .४.३० – मोहारी –बोराटयाची नाळ-२ traverse route –लिंगाणा बेस कॅम्प सायं ७                                    वाजता .

                 day 2 - चढाई - ४ -५ तास    उतराई - ४-५ तास 

महत्वाचे     –   1.टेकनिकल सपोर्ट शिवाय लिंगाणा करू नये. 2.मोहारी सोडून पुढे पाणी नसल्यामुळे                                     दिवसभर पुरेल इतके पाणी सोबत घ्यावे 

                       3.लिंगाणा बेस कॅम्प ला गावातून जेवणाची सोय होते.

पाठी दिसणारा दुर्गराज रायगड 

रायलिंग चे पठार

माथ्यावर

स्वच्छ सह्याद्री ,सुंदर सह्याद्री . जय शिवराय . 

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...