Saturday, June 17, 2023

भीमाशंकर "- शिडीघाट खांडसमार्गे

https://chaltefirate.blogspot.com/2018/08/blog-post.html

           जुलैचा महिना म्हणजे भर पाऊस त्यात बेभान अश्या पावसात पूर्ण केलेला 'हरिहर' चा थरारक -जबरदस्त असा ट्रेक नंतर लगेचच्या येणाऱ्या पुढच्याच रविवारी 'भीमाशंकर' ट्रेक - माझं नक्की जाणं होतंय कि नाही हि मलाच आलेली शंका , पण मनातून नक्की खात्री होती कि मला जायला मिळेल म्हणून आणि झालं देखील तसंच -छान योग आला होता - श्रावणाची सुरुवात झाली होती अन् येणाऱ्या पहिल्याच श्रावणी रविवारी जाण्याचा हा चान्स मला सोडायचा नव्हताच , भटकंतीच्या चावडीवर जेव्हा आम्हां भटक्यांची भरती सुरु झाली तेव्हाच चाहूल लागली कि एका मस्त -धमाल व मोठ्या आठवणींचा ट्रेक होणार आहे.

                    हरिहरवरून आल्या आल्या एक हक्काची आरामाची सुट्टी घेउन आठवड्यास सुरूवात झाली , तो आठवडा खूपच छान गेला मनासारखा - काही वेळा काहीच न ठरवुन सुध्दा अचानक समोर येणाऱ्या गोष्टी एक वेगळाच आनंद देतात अगदीच तसाच - ज्योतीची अचानक भेट व शुक्रवारी आम्हां शाळेच्या गोड परिवाराचं एका गोड कारणासाठी पुन्हां एकत्र येणं जणू दुग्धशर्करा योगच म्हणावा आणि आठवड्याचा शेवट "भीमाशंकर"ला जाणं सगळचं कसं छान जुळून आलं होतं ,प्रतिकच येणं निश्चित नव्हतं ; मी- मैथिली- विशुच त्रिकुट रतनगडनंतर पुन्हां ट्रेकवर भेटणार हे निश्चित होत होतं पण...शेवटी हा ' पण ' आलाच आडवा ,काही कारणामुळे मैथिलीला येणं अचानक रद्द करावे लागले, आम्हां तिघींचे मन खट्टु झाले खरे पण काय करणार ,शेवटी काही करून जायचंच हि मनाशी केलेली गाठ - मग तर मी जायचं पक्कच केलं.... 

                    काहीपण करून जाण्याचं याचं एक वेगळं कारण होतं म्हणा , कसं होतं ना कधी कधी काही तारखा त्रास देतात मन दुःखी करतात  तर काही आनंद देतात -एखाद्या अचानक घडलेल्या वाईट आठवणींतून बाहेर येणं तसं कठीण -तरी ते महत्वाचं असतं आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आणि म्हणूनच अश्याच काहीश्या जुन्या कारणामुळे मी माझं जाण्याचं निश्चित केलं -आयुष्याला पुन्हा एकदा नव्याने -एखाद्या तारखेभोवती बांधून न ठेवता, पूर्ण नव्याने - नवं आठवणींनी जुन्यावर मात करायचं अन पुढं जायचं- हे  जरी आधीच ठरवलं तरी प्रत्यक्ष तसं करायला स्वतःचीच स्वतःहून साथ देणं हे काय असतं हे शिकले मी ह्या ट्रेकमधून .       

                         तर तो दिवस उजाडला - शनिवारी २९ जुलै २०१७ ला मी office ची कामं भराभर आटोपुन बॅगेचे सोपस्कार पूर्ण करुन १०:३० ची C.S.T वरुन सुटणारी कर्जत train पकडायची असं भटकंतीच्या योजनेप्रमाणे ठरल होतं तशी तयारी करु लागले, अन् मी -एकत्र जाऊ म्हणून विशुसाठी परत दादरवारी केली, तेव्हा मला लक्षात आलं की train fast आहे की slow असा गोंधळ थोड्याच वेळात होणार आहे - हा मला प्रश्न पडण्याच कारणच असं की -तसं काहीच नमूद नव्हतं त्या झुक्याच्या संदेशवहन चावडीवर आलेल्या
संदेशामध्ये, माझ्याप्रमाणे इतरांनाही तेव्हा हा गोंधळ झाला आहे असं समजलं- शेवटी ती train - slow आहे अशी खात्री करून घेतली, तितक्यात समजलं कि आमच्यासोबत येणारा गौरव खोपोली - fast पकडुन पूढे गेला- अश्या त्या पहिल्या वहिल्या गोंधळात - train आल्यावर आम्ही मी -विशू- विपुल आणि इतर भटके दादरवरुन चढलो. मग माझं नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे घरी एकदा ट्रेन पकडली असं कळवून त्यानंतर सर्वप्रथम ज्योतीला दूरचित्रवाणी संपर्क साधत नंतर सोन्याला (सोनल) अन मग मैथिलीशी मी - विशु आरामात  गप्पा मारत होतो असा त्या वेळेत फोना- फोनी चा माझा कार्यक्रम उरकुन घेतला त्यावेळेत मध्ये एक -एक जण चढत गेले तितक्यात विपूलने सांगितलं कि ब्रेड तर आणला पण जॅम आणला नाहीये तर हि मोठी जबाबदारी आमच्यातल्या सगळ्यात छोट्या ( मोठ्या )खादाड व्यक्तीस -दुर्ग्याला दिली कारण तो सर्वात शेवटी चढणार होता -कल्याण वरुन, इतक्या रात्री उशिरा सांगुनपण त्याने ते manage केलं- ह्यानां म्हणतात खरे खादाडी, तर आमची train पोहोचली कल्याणला व आमचे लाडके बंधू दुर्ग्या-छोटू  महाशय त्या डब्ब्यात चढले , ह्याला पाहून "खुशालचेंडू" हा एकच शब्द येतो डोळ्यासमोर- ह्याला पाहिलं जरी तरी आपल्या चेहऱ्यावरची स्मितरेषा कायम उत्तरेसच धावेल हे नक्की -असं हे व्यक्तीमत्व, आता खरी धमाल मस्ती येणार हे निश्चित झालं. त्याआधी सामील झालेले सागर , विशाल दादा , भूषण आणि बरेचसे नवे भटके मंडळी होतीच ह्या सगळ्यांन सोबतच्या गप्पा गोष्टींमध्ये कसा वेळ गेला समजलंच नाही.

कल्याणला जेव्हा दुर्ग्या ट्रेनला चढला तेव्हा   


                              काहीच वेळात कर्जतला पोहोचलॊ तेव्हा साधारण १ - १:१५ वाजले होते गौरव आमच्या बऱ्याच आधी पोहचला होता ,तर काही भटके पुण्यावरून येणार होते त्यांची वाट पाहत आम्ही जरा वेळ थांबलो साधारण १:३० वाजण्याच्या सुमारास आम्ही गाडीवर स्वार झालो, हा ट्रेक भला मोठा असल्याची पूर्वकल्पना होती म्हणून कमीत कमी २-३ तासांची झोप आवश्यक होतीच. गाडीत बसल्या बसल्या आधी आमच्या गप्पा सुरु झाल्या  - मागच्या सीटवर मी , विशू , दुर्ग्या ,गौरव , तुपे फॅमिली असे बसलो होतो, गप्पा मारीत जराशी डुलकी लागते न लागते तोवर खांडसपर्यंत आम्ही पोहचलो देखील १- १:३० तासात , खांद्यावरची वजन कमी करत आधी झोपायला जागा कुठे मिळते असं झालं होत ,हवेत मस्त गारवा जाणवत होता -पाऊस जरी थांबला तरी त्याची ओलेती स्पर्शणारी थंड हवा मस्त वाटत होती , तसा पाऊस होता सकाळपासूनच पण अधे -मध्ये येणाऱ्या श्रावणसरी आनंद देत होत्या. झोपताना फक्त लक्ष्य भीमाशंकरच्या ट्रेककडे होते - कधी एकदा सुरु होतोय असं झालं होतं माझं,  ह्या ट्रेकसाठी मी आधीच अगदी ठरवूनच जास्त काही फोटो न पाहता अन कोणतीच व्हिडिओही  न पाहता आले .फक्त बऱ्यापैकी थोडंसं  वाचन करून त्याची शब्दरुपी डोळ्यात प्रतिमा उभी करून अन भटकंतीच्या टीमवर पूर्ण भिस्त टाकून हा ट्रेक करायचं ठरवलं होतं - भीमाशंकरसाठी असं करण्याचं माझं कारण असं कि आपण हे जग पाहू शकतो ,वाचू शकतो पण काही जण हे नाही करू शकत नियतीनं  त्यांना दिलेल्या दिव्यदृष्टीने ते दाखवत असते तसच काहीसं- आधीच फोटो मधून सर्वच काही पाहून मग ते पाहणं ह्यावेळी तरी मला तसं करायचं नव्हतं ,जेव्हा एखादं स्वतःहून माहीत नसलेल बी लावलं कि ते कुतूहलाने वाढताना पाहण्याचं सुख- आजच्या आपल्या "download "च्या जगात हरवत चाललं आहे, प्रत्येक गोष्टीतला -कधी कधी आपल्या मनातलं उत्सुकतेचं बीजच मारू पाहतंय असं झालंय आपलं काहीसं आता , काही वेळा गरज म्हणून पाहावे पण अति- आहारी जाऊ नये असं मला तरी वाटत .

                           'खांडस' ला पोहचताच सगळेच आम्ही झोपण्याच्या मार्गी लागलो -आम्हाला  ५:३० ची वेळ दिली होती अन्  ट्रेकला काहीकरून सहा वाजता सुरुवात करायची होती त्या पद्धतीने पुऱ्या -अपुऱ्या निद्रेस आवरतं घेत उठून सकाळची आन्हिक आटपत सर्वचजण तयार झालो देखील , चहा आणि कांदे पोहे- विपुल special - ब्रेड -जॅम -मेयोचा मस्त नाश्ता करत ट्रेकसाठी आम्ही सज्ज झालो. अन् तो दिवस उजाडला ३०जुलै  हाच तो क्षण सकाळच्या मस्त झुंजु -मुंजु होण्याच्यावेळी आम्ही ठीक सहाला सुरुवात देखील केली.

ठीक ६च्या ठोक्याला सुरु झालेला ट्रेक तेव्हा 

---------

हि वाट दूर जाते ... खांडस ते भीमाशंकर पायथा 

खांडस ते भीमाशंकरच्या पायथ्याचा रस्ता बऱ्यापैकी पक्का असल्याने आम्हां  भटक्यांचा असा एकत्र मॉर्निंगवॉक मस्त झाला ५-१० मिनिटे होत ना होत वरुण देवता प्रस्सन झाली ती सुद्धा लपाछपीच्या खेळात- मधेच थांबत रेनकोट चढवत मी -दुर्ग्या -विशू जरा मागे पडलो ,परत सुरुवात करताच आम्हांला एक डाव्या हाताला रो हाऊस दिसलं आणि त्याच्या मालकाची पाटी वाचताच आम्ही हसू लागलो नाव होतं - "प्रकाश पाटील" - भटकंतीचा एक हमखास FP (Full Paid ) सदस्य तसे बरेचसे आहेत पण ह्याचा पहिला नंबर क्वचितच चुकत असेल- ह्या ट्रेकला तो नव्हता म्हणून त्या "प्रकाश " च्या फार्म -हाऊसचा एक विशूसोबत फोटो काढत नंतर मुंबईला गेल्यावर आमच्या प्रकाशला विचारणार होतो -"काय रे बाबा सांगितलं का नाहीस " 😂 😜

एका ' प्रकाश पाटील 'चं फार्म हाऊस- सोबत आमची विशू 

ढगांच्या दुलईत लपलेलं "भीमाशंकर" गिरिशिखर

गिरिशिखर दुरूनपाहताच आम्हां दोघींना झालेला सेल्फीचा मोह 

                        आताशा तोवर "आदित्यरावांनी" क्षितिजावर पूर्णाकृती हजेरी लावलेली आम्ही पाहिली तो देखील आज लपाछपी मध्येच राहील अशी चिन्हं  दिसू लागली. वातावरण मस्त शांत -धुंद आणि दूर ढगांच्या दुलईत लपून गेलेलं भीमाशंकरच ते गिरिशिखर आम्हाला साद देत होतं, अंतर तसं बरंच होत जिथून खरी ट्रेकिंगला सुरुवात होते त्या पायथ्याच्यापूर्वी पक्का रस्ता संपेपर्यंत आम्हांला पावणे सात वाजले मध्ये एक नदी लागली होती व जवळच एक छोटंसं देऊळ होतं, गावातली लोकं विहिरीजवळ पाणी भरायला जमा झालेली दिसत होती ते सकाळचं असं चित्र अजूनही डोळ्यासमोर येतं कधी कधी.


                            दुरून ते गिरिशिखर ढगांमध्ये असं  दडपून  गेलं होतं त्यामुळे त्याची नक्की उंची आम्हाला नजरेने समजूनच येत नव्हती पुढच्या पूर्ण प्रवासात "दुरून डोंगर साजरे " असा गमतीशीर प्रसंग पण अनुभवायला मज्जा आली ,पहिली मजल-दरमजल करत रस्त्याच्या उजव्या बाजूस एक छोट वळण घेत माळरानावर पोहचलो -त्या ठिकाणी एक मोठा फेरा घेत आमची नेहमीसारखी ओळखपरेड झाली, ह्या ट्रेकच्या दरम्यान सत्या गावी गेल्यामुळे त्याच्या अनुपस्थितीतला माझा हा पहिल्यांदाच ट्रेक घडणार होता, तर  ह्या ट्रेकची मुख्य जबाबदारी ही भूषण आणि सागरवर होती सोबतीला विशाल दादा, विपुल आणि गौरव असे मिळून पाचजण ट्रेकलीडर होते. बरोबर ७ वाजता खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्यामुळे आम्ही साधारण ११ ला पोहचू असे वाटले अंतर बरचसं असल्यामुळे जास्त कुठे न थांबता प्रवास सुरु झाला.


                    दूरवर पसरलेल्या भीमाशंकरचा तो परिसर ,वरून अधून-मधून होणारी वरुणदेवाची हलकीशी श्रावण बरसात -नजर फिरू तिथे फिरणारा हिरवाकंच निसर्ग- डोळ्यांचे अक्षरशः पारणे फेडत होता लांबून दिसणारे ते छोटे छोटे निर्झर झरे मनाला अजून सुखद गारवा देत होते पायाची रपेट सुरूच होती, पुढे काही अंतर पार करताच इंग्रजी आद्याक्षराच्या ' v ' प्रमाणे छोटू छोटुश्या टेकाडे लागत होतते  ते  पार करताना मला तर जाम मजा आली लहानपणी झुल्याचे उंच झोके घेत आपण कसे पुढे जायचो अन परत मागे येत तितकेच झुलायचो त्याचीच आठवण आली पण ह्या टेकाड्यांवर पुढे जाऊन मागे नव्हतं ना जायचं ; मी झोका घ्यायचा तसा धावत धावत ह्या २-३ टेकड्या पार केल्या- पुढे पाहते तर दुर्ग्या आधीच पोहचून आजूबाजूच्या परिसराचे फोटो काढत होता -विशू -मी अन मागे भूषण सोबतीला होता मी धावत शेवटच्या टेकडीवर आल्यावर मस्त मोठंस smile दुर्ग्याला दिलं आणि तेच त्याने त्याच्या कॅमेरात बंदिस्त केलं तेव्हा पुन्हां लहान झाल्यसारखंच मला झालं होतं.


                         पावणे आठच्या दरम्यान पहिल्या चढणीला जंगल झाडीतून सुरुवात झाली , मनात शिडीची वाट नक्की कशी असेल ह्याचं गणित मांडत कळसुबाईला असतील इतक्या शिड्यातर नसतील ना अश्या प्रश्नाची सरबत्ती सुरु होतीच पाऊस थांबल्यामुळे आणि चढणीला चांगलाच जोर धरल्यामुळे अधेमधे दमछाक होत होती ; मग साधणार सव्वा आठच्या दरम्यान एक मनमोहक लांबून धावत येणारा आणि एखाद्या लहान मुलाप्रमाणे खळखळून हसणारा झरा दृष्टीक्षेपात आला ते वातावरण इतकं मोहक होतं कि खरंच वाटतं कि त्या जागेला ईश्वराचा वरदहस्त प्राप्त झालाच असावा.हा झरा पार करण्यापूर्वी मोबाइलला चांगली रेंज होती पुढे सतत चढणीचा मार्ग असल्यामुळे फोन काढणं शक्य नव्हतं म्हणून घरी फोन करून आणि मैथिलीला फोन करून तिची झोपमोड केली ; तो झरा पार करताना विपूलची झालेली गंम्मत गौरव ने मस्त चित्रबध्द केली ती व्हिडिओ पाहतांना धमाल येते.

सर्वात जास्त आवडेला छोटासा झरा 
भटकंतीचा official photographer - विपुल जाधव  
विशूची एका दिवसाची ' मैथिली '

                                  तर तो झरा पार करत मग साधारण अर्धा-पाऊण तासाचं अंतर जंगल झाडीतून -चढणीतून - लहान मोठ्या दगडांना पार केल्यावर शिडीची वाट आणि ती शिडी नजरेसमोर आली. ह्या इतक्या वेळच्या प्रवासात माझ्या आणि विशूच्या बोल -अबोल गप्पा सुरु होत्याच आणि सोबतीला छोटू होताच त्यात आणखीन एक गंम्मत म्हणजे संपूर्ण ट्रेकभर जवळपास ट्रेक संपेपर्यंत विशूने माझं केलेलं अजून एक बारसं म्हणजे " मैथिली " आम्हां दोघींनाही तिची कमी जाणवत होतीच पण विशूला खूप जास्त , मला आवाज द्यायला ती 'मैथिली मैथिली ' करायची आणि मी सुध्दा विशूचा गोंधळ समजून मागे वळून 'ओ 'दयायची त्यात मग आम्ही हसत बसायचो. आणि हो दुर्ग्या सोबतचा हा दुसराच ट्रेक त्यात आम्हा खादाड बंधू भगिनीचा पुन्हां एकदा फोटो झालाच पाहिजे म्हणून काढलेला हा सेल्फी त्यात भूषण मागून कधी येऊन उभा राहिला कळलंच नाही.

  
             

                                                           साधारणपणे ८ ते ८:३०पर्यंत आम्हां सर्वांनी ही शिडी सुरळीत पार केली. प्रथमतः ती शिडी खुप सोप्पी वाटली खरी,  पण दिसतं तसं नसतं अन् म्हणून जग फसतं अश्यातला तो व पुढील शिड्या  पार करताना प्रत्यय आला. पहिल्या शिडीची सुरुवात सोप्पी वाटली पण जेव्हा त्या शिडीची उभी चढण संपली अन् तीच ९०° झुकून त्यावर सुरुवात होताच उजव्या बाजूस उंचपुरा कातळ तर डाव्या बाजूस थेट खोल खोल दिसणारी दरी ते दृश्य तेव्हा शिडी पार करताना थोडसं काळीज धडकवणारं होतं पण ट्रेक लीडरने सांगितले की हे काहीच नाही पुढे एका ठिकाणी आपल्या सर्वांना योग्य काळजी घेउन जायचय हे ऐकून किंचित पोटात छोटा गोळा आला खरा पण इथपर्यंत तर नीट आलोच आहोत पुढे देखील नीट जाऊच ह्या मनात लपत चाललेल्या आत्मविश्वासाला मी बाहेर खेचत होती.

                                            फोटो न पाहिल्यामुळे येणारा प्रत्येक पडाव एक ऊर्जा -एक नवी शिकवण -नवा निसर्ग दाखवत होता, नवी कथा वाचताना कसं अरे आता पुढे काय असणार? कसं असणार? काय होणार ? हिच उत्सुकता ह्या ट्रेक दरम्यान अगदी शेवटपर्यंत टिकून होती म्हणून त्याची आणखीनच गोडी वाढली. ती पहिली शिडी पार झाल्या झाल्या तर फक्त त्या डोंगराच्या भल्या मोठ्या कातळांना सांभाळून त्यात पावसामुळे -काडेकपारीतून वाहणाऱ्या पाण्यातून त्या खाच खळग्यांमध्ये नीट पाय रोवत २०-२५ मिनिटांचा तो मार्ग आम्ही व्यवस्थित सर केला. त्या शिडीनंतरचा एक कातळ तर आम्हां भटक्यांना झोपूनच -त्या काताळाला आलिंगन करतच तो पार करावा लागला होता. अश्यावेळी आम्हां भटकंतीची पूर्ण टीमची हिच जबाबदारी असते कि प्रत्येकजण मग तो जुना असो वा नवखा कोणीही मागे राहता कामा नये तसेच कोणी कुठेही अडखळला वा बिथरला तर प्रत्येकजण हात  दयायला  पुढे येतोच येतो. भीमाशंकर -शिडीवाटेने कठीण समजला जाणारा ट्रेक पण भटकंतीच्या टीममुळे तो सहज पार झाला.



                                                                                  पुढे काहीच वेळात पुन्हां एकदा १५-१६ पायऱ्यांची लोखंडी शिडी होती ती अश्याप्रकारे दगडांमध्ये लावून ठेवली होती कि एका वेळेस ३-४ जण सहज मागोमाग चढू शकतील पण जास्तजण चढल्यावर ती हलू लागायची , आमच्यातलेच काहीजण पुढे गेल्यावर मी आणि मागे काहीजण ती शिडी चढायला लागलो, मी पुढे होती चढताना ती शिडी खूप सहज सोप्पी वाटली पण शेवट करताना मला समजलेच नाही काय झाले -काही मिनिटांकरता मी स्तब्ध (ब्लँक) झाली होती अंदाज घेता येत नसल्यामुळे मी पाय उचलून कसा टाकू समजतच नव्हते- मागे विशाखा ,सुनील तुपे , भूषण , दुर्ग्या, गौरव होते आणि नेमकं पुढे कोणीच नसल्यामुळे माझा जरा गोंधळ झाला होता,  तेव्हा मागून सर्वांनी शांत रहा- जरा थांबून सावकाश पुढे जा ,करशील तू असं सांगत माझा आत्मविश्वास वाढवला आणि ती शिडी पार केली एकदाची ; नंतर पूढे कडेकपारीच्या कातळांचा नीट मागोवा घेत पुन्हां एकदा परत तशीच 'तिसरी शिडी' दिसली आता मात्र बिनधास्त हसत हसत ती छोटी शिडी पार केली.  

                               अन् आता तो जरासा कठीण पण अशक्य नसणारा असा patch त्याच्या जवळपास पोहचणार होतो ,त्याआधीच ट्रेकलीडरने नीटशी कल्पना देत तो कसा पार करावा ह्याचं योग्य मार्गदर्शन केल्यामुळे त्यात भीती वाटण्यासारखं राहिलं नव्हतं. तर तो कठीण असा patch म्हणजे -एकावेळी एकानेच त्या भल्या मोठ्या दगडाला आपले हात पसरवून मिठी मारतच अर्धप्रदक्षिणा घातल्याप्रमाणे स्वतःला वळवत पार करायचा तो टप्पा होता;  पाठीवर स्वतःचं बॅगेचं वजन सांभाळत आणि एका बाजूला खोलवर दिसणारी दरी -तर हा असा जरी भयावह वाटणारा टप्पा असला तरी तो पार केल्यांनतरचा आनंद शब्दात मांडणं कठीणच ; तिथून दिसणारा भिमाशंकरच्या आजूबाजूचा परिसर तर खूपच लोभस व आत्तापर्यंतच्या दमछाक झालेल्या त्रासाला क्षणात विसरवून टाकणारा होता.

हि तीच जागा आहे जिथे फक्त पाय राहतील व आपल्याला दगडाला पडकून वळण घेत पार करायचं आहे; कृपया हा फोटो काढलेला नाहीये याची नोंद घ्यावी तर हा गौरव पडवळने बंदिस्त केलेल्या video मधील screenshot आहे. 

                       हा टप्पा पार होताच उजवीकडे वळल्यावर एखाद दोन पाऊले पुढे टाकताच नजरेसमोर येणारा एका कोपऱ्यात कोसळणारा तो छोटासा झरा -सोबत रिमझिम पडणारा हलका पाऊस जणू तिकडेच थांबायला सांगत होता आम्हांला , जास्त थांबणं शकय नव्हते कारण जवळपास आता आम्ही पहिल्या  डोंगराचा टप्पा
पूर्ण करणार होतो. लगेचच तिथून काढता पाय घेत पुढच्या दगडांच्या जरा क्लिष्ट चढणीकडे वळलो तोही टप्पा मनात संयम-जिद्द-चिकाटीची परीक्षा पाहणाराच होता.

ह्या ठिकाणी देखील फोटो काढता येऊ शकत नाही , ती चढण समजून यावी यासाठी पुन्हां एकदा हा फोटो देखील video मधील screenshot आहे याची नोंद घ्यावी 

                        डाव -उजवं -डाव अशी छोटी वळणं घेत ते पार करत असताना एका कोनाडयातून दिसणाऱ्या त्या दरीचं  खोल दृष्य किंचित घाबरावणारं असलं तरी -जेव्हा हा पडाव पार होतो तेव्हा सापशिडीच्या १०० व्या स्थानावर कुठेच गटांगळ्या न खाता दिमाखात पोहचल्यासारखा आंनद होतो , तेव्हा स्वतःलाच पाठीवर शाबासकीची मनातून थाप देत- 'अरेच्या आपण हे नीट पार केलं कि '- म्हणत जरा निवांत होत काहीवेळ आजूबाजूचं सृष्टीसौंदर्य पाहिलं अन् मग आम्ही पोहचलो एका भल्या मोठ्या आडव्या पसरलेल्या धबधब्याजवळ, जरा बसून बॅगेतून लिंबूपाणी -खाऊचे पदार्थ काढत पहिली पेटपूजा केली तेव्हा खुप बरं वाटलं, जवळची एक पाण्याची बाटली संपत आली म्हणून ती त्याच झऱ्या मध्ये भरून घेतली.

      अश्या निसर्गरम्य ठिकाणी तेव्हा त्याक्षणी  मनात घराघरात असणारे 'फिल्टर' किंवा 'प्युरीफायर' आठवत नाही. जेव्हा निसर्ग असं भरभरून देतो ना तेव्हा ते पाणी अन् त्याची चव घरातल्या पाण्यासमोरदेखील फिकी पडते ह्याची जाणीव -जेव्हा तो ट्रेकर वा पर्यटक स्वतःहुन ते पाणी प्यायल्याशिवाय समजणार नाही. महाराजांच्या कित्येक गड -किल्ल्यांवर पाणी हे पिण्यायोग्य आहे पण काही बेजबाबदार नागरिकांच्या सुंदर जागेला अस्वच्छ करण्याच्या मनोवृत्तीमुळे त्याची चव चाखता येत नाही हे आपलं दुर्दैव .

             

दुरून दिसणारं कोथळीगडचं टोक व आजूबाजूचा परिसर -

 दूरवर उन्हाची उघडीप तर अलीकडे दाटून आलेल्या ढगांची पडलेली शाल  

   

                 भीमाशंकर हे क्षेत्रच असं आहे की एका दिवसात पूर्ण करणं शक्य नाही, ह्या संपूर्ण क्षेत्राला खरोखर ईश्वराचा वरदहस्त आहे हे तेव्हा तिथे जाणवतचं, साधारण हे अभयारण्य सुमारे १३०कि.मी. परिसरात पसरलेले असून  त्यात विविध जातीची प्राणी ,पक्षी, फुलपाखरे ,पतंग व विविध फुलांचा अधिवास आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्याचा प्राणी असलेला शेकरू आणि तेथील विविध प्रजातींच्या संरक्षणासाठी १९८५ मध्ये सरकारने अभयारण्य म्हणून या जागेला मान्यता दिली आहे. बी एन एच एसने गेली कित्येक वर्षे पक्षी - विविधता असलेल्या जागांवर अभ्यास करून काही क्षेत्र ' महत्वाचे पक्षी व जैवविविध क्षेत्र ' घोषित करीत आहेत त्यात"भीमाशंकर अभयारण्य" हे खूप महत्वाचे असे ठिकाण आहे . माहिती मिळल्यानुसार अश्या पद्धतीत एखादी जागा घोषित केली की या क्षेत्राकडे संरक्षणाच्या दृष्टिकोनाने बघितलं जाऊन तिथले पक्षी तसेच  त्यांच्या अधिवासाचं संरक्षण सोपं होतं .
                               भीमाशंकर परिसरात बाकचोच सातभाई (Indian  Scimitar Babbler), कवड्या गप्पीदास (Pied Bushchat ), विगोरचा शिंजीर (Vigor's Sunbird ) मलबारी राखी धनेश ( Malbar  Grey  Hornbill ), स्वर्गीय नर्तक ( Asian  Paradise Flycatcher ) हळद्या ( Golden Oriole ) शिपाई बुलबुल (Red  Whiskered Bulbul), वेडा राघू (Little Green Bee-eater), पिवळ्या कंठाची चिमणी (Yellow -Throated Sparrow ) ,भोगपाडी मैना (Brahminy Myna) , सोनकपाळी  पर्णपक्षी  (Gold - Fronted  Leafbird ) अशा १६०पेक्षा अधिक पक्षांची नोंद झाली आहे .
                            भीमाशंकर अभयारण्यचं नाव हे तिथे असलेल्या  भीमाशंकर देवळावरून ठेवण्यात आलं आहे, याच नावाची देवराईसुद्धा भोवती आहे ,भीमाशंकर देऊळ हे १२ ज्योतीर्लिंगापैकी एक मानलं जातं आणि त्यामुळे अनेक श्रध्दाळू इथे शिवरात्र , श्रावण , तसेच सोमवारी मोठया संख्येने जातात ,भीमाशंकरच्या परिसरात साधारण १४ देवराई आहेत .
                                   आता देवराई म्हणजे नक्की काय तर माहिती अशी आहे कि -  " देवराई " म्हणजे जंगलाचा असा भाग जो तेथील रहिवासी पिढ्यानपिढ्या आध्यात्मिक महत्व लक्षात घेऊन जपतात . देवराईत झाडंच नव्हे तर पूर्ण अधिवास व तेथील सर्व जीवांचं संरक्षण होतं. इतकंच नव्हे तर काही प्रदेशनिष्ठ प्रजाती देवराईत खुलताना आपल्याला दिसतात. भीमाशंकरमधील आहुपे या नावाची देवराई तर १हजार वर्ष जुनी आहे असं म्हटलं जातं. बिबट्या, तरस  स्ट्राईप्ड हायाना, कोल्हा , हरणाच्या प्रजाती आणि आणखीन काही प्रजाती दिसू शकतात. इतकंच नव्हे तर अनेक फुलपाखरे व पतंग आहेत , फुलपाखरांमध्ये एक मोठं काही महिन्यांपूर्वी घोषित केलेलं आपलं राज्य फुलपाखरू म्हणजेच  राणी पाकोळी (Blue mormon ) इथे बघायला मिळतं. याच बरोबर बहुरूपी ( Common Mormon), लिंबाळी  भिरभिरी (Lemon Pansy), प्रवासी (Immigrant ), छोटा चांदवा (Danaid Eggfly )अश्या अनेक प्रजाती दिसतात. भीमाशंकरचा परिसर पिकनिक , ट्रेकिंग आणि भटकंतीसाठी तर उत्तम आहेच पण तेथील जैविविधता देखील अप्रतिम आहे अनेक लोक तिथे आढळणारे पक्षी व इतर जीव बघायला आवर्जून तिथं जातात.    

                            तर आता आम्ही त्या खडतर शेवटच्या अश्या टप्पातून बाहेर पडलो आणि मित्रहो आता तुम्हांला वाटत असेल कि आम्ही गिरिशिखरावर पोहचलो असू पण म्हणतात ना "दुरून डोंगर साजरे " त्यातलाच हा पहिला अनुभव - तर आम्ही ह्या कठीण वाटणाऱ्या मार्गातून बाहेर पडतोच न पडतोच तर समजलं की  ' Picture अभी बाकी है मेरे दोस्त ' आम्ही मोठया अश्या विस्तीर्ण पसरलेल्या पठारावर पोहचलो जिथे नुकतीच भातशेतीची लावणी झाली होती अन् ते हिरवंगार शेत व चार-पाच कौलारू घरे पाहून आत्तापर्यंतचा थकवा कुठंतरी धूम ठोकून पळाला .


          थोडं पाच-एक मिनिटे चालत आम्ही अश्या एका मध्यबिंदूशी- पठारावर पोहचलो जिथे गणेश घाट आणि शिडी घाटचे ट्रेकर- भाविक - पर्यटक एकत्र जोडले जातात आणि सुरु होतो प्रवास भीमाशंकरच्या शेवटच्या टप्प्याचा जो जातो गर्द-घनदाट अश्या वनराईतून - जंगलातून ...त्या पठारावर पोहोचताच जरा हायसं झालं कारण सकाळी सहा वाजता सुरु केलेल्या ट्रेकला थोडावेळ तरीविश्रांतीची गरज होती.  गावकऱ्यांनी पोटापाण्यासाठी आणि आमच्यासारख्या लोकांची क्षुधा भागवण्यासाठी उत्तम बेत ठेवला होता. गरमागरम ज्वारीची भाकरी आणि पिठलं खाऊन आलेला थकवा कुठच्या कुठे पळून गेला होता.

            १०-१५ मिनिटांची विश्रांती घेत मनाचा ठिय्या करुन आता मध्ये कुठेच थांबायच नाही ह्या विचारातच बॅग पाठीवर चढवली, शूजची ढिली पडलेली लेस जरा करकचुनच बांधली काही केल्या तरी ती सुटायची तो भाग वेगळा असो,  तर  पुन्हां आमची सोबतीची तुकडी एकत्र मार्गक्रमणासाठी सज्ज झाली. 

                                 आत्तापर्यंतचा बऱ्यापैकी सुटसुटीत प्रवास अचानक गर्दीचा वाटू लागला याचं मुख्य कारण हे की बरीचशी भाविक आणि इतर संघासोबत आलेली ट्रेकरमंडळी ही गणेशघाटातून आली होती. त्यात भरीसभर  म्हणजे ती वरुन परतणाऱ्यांची संख्या- जसं जसं पुढे होत होतो तस तशी गर्दी वाढत होती , इथेही बऱ्यापैकी चढण होती तसेच ही चढण जास्त दमवणारी नसली तरी आधीच्या शिडीघाट चढणीमुळे आलेला शारीरिक थकवा आम्हां सर्वांच्याच चेहऱ्यावर थोडाअधिक प्रमाणात दिसून येत होता. हि सुरुवात केली तेव्हा काटेकर काकांनी १०:३०ची वेळ दाखवली होती , चढण अंदाजे १:३० ते २ तासाची घडेल असं चित्र दिसून येत होतं. म्हणजे आम्ही ठरलेल्या ११ च्या ऐवजी १२ -१२:३०पर्यंत पोहचू असा अंदाज ठेवत जमेल तशी पावलांची गती वाढवत गेलो.  पण प्रत्येकाच्या मनात तेव्हा हाच भाव येत असावा-  की दररोज तर धावतच असतो की तर आज ह्या मस्त गर्द वनराईतून पाऊलवाटेने जात असता कशाला करावी ती आकड्यांची तंगडतोड भरभरून
मिळणारा तो शुद्ध ऑक्सिजन, ती निरव शांतता , आपला व इतरांच्या पाऊलांनी पानांवर पडणारा आवाज व चालताना फक्त स्वतःलाच आपला श्वासांचा येणारा ध्वनी आणि दुरुन कुठूनसा कुठलासा पक्षी त्याचा आवाज, अधुनमधुन सोबत छोटीछोटी बागडणारी फुलपाखरे, दिसणारे छोटे छोटे झरे खरंच  भीमाशंकर म्हणजे एक जिवंत स्वप्नच असावं असंच आहे,  तेव्हा शरीर जरी थकवा वाटण्यासारखं झालं असलं तरी मनाला हा आजुबाजुचा नितांत सुंदर निसर्ग पाहून मन क्षणोक्षणी प्रस्सन राहत होतं.



                                           ह्या शेवटच्या टप्प्यावर त्या घनदाट जंगलातून जाताना दूरवर फक्त अंधारल्यासारखं दिसत होतं साधारणपणे अकरा- साडेअकरा वाजले होते आणि वाटत होतं कि सायंकाळचे पाच -साडेपाच होऊन गेले कि काय.  त्या किर्रर्र घनदाट वनराईतून जाताना चुकण्याचा जरासुद्धा चान्स नव्हता. कारण श्रावण सुरु झाल्यामुळे पर्यटकांपेक्षा हि भाविकांची गर्दी कैकपटीने जास्त होती.  गणेशघाटापासूनचा हा वरचढणीच्या प्रवासात प्रत्येकाच्या मुखात ' बंब बंब भोले '-' बाबा भोलेनाथ कि जय ' तसेच ' ओम नमः शिवाय' चा जयघोष सुरूच होता- त्याला आम्हींही मध्ये- मध्ये साथ द्यायचो- त्या रम्य ठिकाणी ह्या आवाजाचा जराही त्रास न वाटता एक वेगळंच चैतन्य जाणवत होतं. नशिबाने जाताने एकही "बोंबा ठोकणारं यंत्र " (Speaker) घेऊन जात नसल्यामुळे खुप बरं वाटत होतं.

जरावेळ थकलेला छोटू - दुर्ग्या 

        ह्या प्रवासादरम्यान बराच वेळ चालल्यामुळे शारीरिक थकवा चांगलाच जाणवू लागला होता आणि पाय तर आपसूकच पुढे पुढे पडत होते. एव्हाना आमच्या सोबतीच्या गप्पा देखील अबोल झाल्या, प्यायचं पाणी देखील कमी झालं होतं, पुढे एका टप्प्यावर आमचं खुशालचेंडू जरा दमल्यामुळे एका दगडावर विश्रांती घेत बसलेलं दिसलं ,तेव्हा त्याचा गोलू चेहरा इत्तुसा छोटू झाला होता -त्याने नजरेनंच येतो मी व्हा पुढे म्हणून खुणावलं. अधेमधे थांबणं गरजेचं असल्यामुळे आम्ही एक एक जण अशी विश्रांती घेतच होतो .

             आता जंगल संपून शेवटची चढण नजरेसमोर आली होती आणि वरून येणाऱ्या भाविक - पर्यटक व ट्रेकरमंडळींची संख्या वाढायला लागली. पण मित्रहो एक नक्की सांगायचंय १० :३० नंतरच्या प्रवासात आवर्जून नमूद करायला लागावं असं चित्र म्हणजे मोठ्या संख्येने अधूनमधून दिसणारी " तरुण मंडळी"  ह्यांना त्यांचे वय आणि त्यांचा तो जोश -उत्साह पाहता वृध्द ही संकल्पना मनाला  जरासुद्धा पटत नाही . आम्हां भटकंती- ट्रेकरच्या जगात जेव्हा केव्हाही  अश्या  मंडळीना पाहतॊ ना तेव्हा आत दबलेलं मन हेच सांगत असतं - हेच आहे ते जगणं जे आपल्याला शेवटपर्यंत जगायचंय आणि हा tonic याची देही याची डोळा पाहिल्यावर हुरूप येतो असं वाटतं कि खरंच देव आहे आणि तो सदा आपल्यासोबत आहेच आहे. उगाच पालुपद लावायचं म्हणून नाही सांगत पण हि अनुभूती अनुभवल्याशिवाय नाही कळणार आणि ह्या शेवटच्या टप्प्यात खुप काही शिकायला मला मिळालं .

                   कित्येकदा डोळे बंद करून आपणच आपल्या विचारात इतके खोल जातो आणि काहीतरी शोधू लागतो तसंच व तितकंच खोलवर मला ते जंगल पार करताना जाणवलं. डोळे मिटून घेतल्यावर जसा मिट्ट काळोख होतो आणि आपल्या मनाला  विचारचक्रातला प्रकाशाचा प्रवास दिसतो तसंच काहीसं वातावरण त्यावेळी आम्ही  अनुभवत होतो - मोठमोठाले झाडांचे वृक्ष , आकाशाचं छत झाकून टाकणारी त्या वृक्षांची व्याप्ती पाहून मन इतकं हलकं वाटलं कि खरंच रोजच्या त्याच - त्याच रटाळवाण्या जगात आपण नक्की कशात सुख शोधत बसलोय?  असो पण काय करणार ना आपण - जगरहाटी कोणाला चुकलीय सांगा . 

                        एव्हाना मन जरी प्रसन्न असलं तरी पोटातले कावळे, पायाच्या पोटऱ्या चांगल्याच बातचीत वाढवू लागल्या होत्या. जेव्हा सचिनच्या शेवटच्या बॉलवर सिक्सर लागावा  आणि आपण Match जिंकावी असं आता अक्षरशः नजरेसमोर मोजून पाच मिनिटांची चढण दिसत होती अन् तेव्हड्यात एक नवख्या -'ट्रेकर ' प्रचंड वैतागलेल्या मुद्रेतच खाली धाड धाड उतरतच येत होता - त्याची आधीची बडबडीची काही कल्पना नाही पण मित्रहो आम्हांसमोर झालेला किस्सा असा -तो म्हणाला  " ये लोग मुझे पाच मिनिट- पाच मिनिट करके कितना चालाया, ये कोई तरीका है क्या ? " ज्या वैतागलेल्या स्तिथीत त्याने हि जी काही स्तुतीसुमने त्याच्या ट्रेकलीडर वर उधळली ते ऐकनू मला तर पटकन हसूच फुटलं त्याच्यासमोरच -तसंच माझ्यासोबत दुर्ग्या - विशू - विशालदादा आणि काही नवखी मंडळी देखील होती त्यांनाही हसू आवारेना ,चढणीवर हसताना पोटात दुखायला लागलं तरी 'तो एक वैतागलेला ट्रेकर-पर्यटक ' त्याच विचारात बडबड करत उतरून गेला- ह्या छोटीश्या  झालेल्या  गंम्मतीमुळे आम्ही हसत हसत तो टप्पा पूर्ण करून कधी त्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलॊ कळलं देखील नाही. 

               

बॅगा काढून कधी एकदा त्या हिरव्या गालिच्यावर - दगडांवर बसतोय असं झालं ,पाच एक मिनिटांची विश्रांती घेत जास्त वेळ न दवडता आम्ही मंदिराच्या दिशेने कूच केली. वर पोहचताच लोखंडी कुंपण लावलेली हद्द दिसून येते त्यालाच डाव्यादिशेने वळण घेत आम्ही मार्गस्थ झालो ते भीमाशंकरच्या मंदिराकडे , श्रावण सुरु झाल्यामुळे आणि वर चढणाऱ्यांची तसेच खाली येणाऱ्यांची संख्या पाहता गर्दी मिळणार याची पुरेपूर कल्पना आधीच आली होती. " श्री क्षेत्र भीमाशंकर " अशी रस्त्यावरून दिसणाऱ्या मंदिराच्या पाटीची प्रवेशद्वाराची  कमान पाहता मन प्रसन्न झालं , आता आम्ही खऱ्या अर्थाने "भीमाशंकर " हे गिरिशिखर चढलो होतो  ! मनात ह्या दिवसाची जशी सुरुवात व्हावी आणि ते विना विघ्न पार पडावं तसंच झालं होतं, जुन्या आठवणींवर  मात करत चढलेली हि नवी पायरी आयुष्यभरासाठी पुरेपूर ठरणार याची खात्री पटली .


               

               मंदिराच्या दिशेने कूच केल्यावर आपल्याला बरीचशी दुकानं लागतात जशी लहान मुलांच्या खेळण्यांची , इतर तत्सम वस्तू , पूजा साहित्य -हार -फुले इत्यादी .... बरंचकाही, ज्याप्रकारे  भारतात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मंदिराबाहेर जसं चित्र दिसतं तसंच ह्या ज्योतिर्लिंग मंदिराबाहेर दिसून येतं .
                 श्रद्धा हा प्रत्येकाच्या  वैयक्तिक  विषयाचा भाग असला तरी आज आपण प्रत्येकजण जे पाहतोय अनुभवतोय ते पाहता ,मला असं वाटतंय कि प्रत्येकाने आपली श्रद्धा पुन्हां एकदा स्वतःच पडताळावी आणि जाणून घ्यावं एक मनापासूनचा नमस्कार आणि निस्वार्थ श्रद्धा हेच तर देव आपल्यापाशी मागतोय कि आणखीन काही ह्या पेक्षा वेगळं ? असो तर आम्ही पोहचलो दर्शनरांगेत श्रावण असल्यामुळे भली मोठी रांग वजा गर्दी होती,  एका दरवाजातून लांबून दर्शन घेत आम्ही  मंदिराच्या बाहेरच्या दिशेने वळलो मंदिराचा परिसर खुप गर्दी असल्यामुळे नीटसा पाहता आला नाही तरी संपूर्ण मंदिर हे दगडात कोरलेलं आहे .बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असल्यामुळे येथे सदा कमी अधिक प्रमाणात गर्दी होतेच होते. कायम गर्दीचे ठिकाण असल्यामुळे प्रशासनाने जरी काही सोय केली असली तरी प्रत्येक नागरिकाने स्वतः जबाबदारी घेणं आणि जागरूक राहणं  हे जास्त महत्वाचं आहे .

                            वाचनात आलेली भीमाशंकर मंदिराबाबतची  माहिती अशी कि - ' कोकणातून गणपती घाट आणि बैलघाट असे दोन घाटरस्ते ह्या भागातून वर येतात. पौषी पौर्णिमेला खाली कोकणात असलेल्या म्हसे या गावात यात्रा भरते.  बैल आणि गुरांचा बाजारही भरतो. तेव्हा या घाट रस्त्यांनी अनेकजण तिथे जातात. तर त्रिपुरी पौर्णिमेला कोकणातील ग्रामस्थ दूध तांदूळ घेऊन देवाचा सण साजरा करायला तेथे येतात उन्मत झालेल्या त्रिपुरासुराचा वध केल्यावर शिवाने या जागी विश्रांती घेतली. त्याच्या घामाच्या धारा खाली निथळू लागल्या. त्यातूनच या पवित्र भीमा नदीचा उगम झाला. हे सारं त्रिपुरी पौर्णिमेला घडलं , म्हणून तो दिवस 'देवाचा सण' !
                      कोणा विनायक सावरकर नामक भक्तानं इ. स. १२००च्या सुमारास इथं मंदिर उभारलं असा उल्लेख मिळतो. समुद्रसपाटीपासून ११५० मी ( ३४५४ फूट ) उंचीवर दुर्गम डोंगराळ प्रदेशात असणाऱ्या या शिवमंदिराचा अनेकदा जीर्णोद्धार झाल्याच्या नोंदी मिळतात. सर्वात अलीकडचा जीर्णोद्धार म्हणजे देवळासमोरच्या सभामंडपाची उभारणी. पुण्यातील सिव्हिल इंजिनियर्स को - ऑपरेटिव्ह असोसिएशनने पुढाकार घेऊन १९६७च्या पुढे १७-१८ वर्षांत हे काम पूर्ण केले. त्यासाठी देवाची उरळी येथून चांगल्या दर्जाचा दगड आणला गेला. लोकवर्गणीतून हे सारं काम उभं राहिलं .'

                    मंदिरातून बाहेर पडल्यावर साधारण दुपारचे दोन वाजले होते ते काटेकर काकांकडे पाहिल्याशिवाय समजून येत नव्हतं , कारण दुपार होऊनसुद्धा इतकं धुकं होतं कि तेव्हा असं वाटतं होतं -कि  आत्ताशी दहा वाजले असावेत , आता मात्र सर्वांनच्याच  भुकेच्या कावळ्यांनी टाहो फोडायला सुरुवात केली होती , मलासुद्धा कधी एकदा जेवायला मिळतंय असं झालं होतं , जेवणाच्या ठिकाणची मज्जातर काय सांगायलाच नको अशी -विशालदादाने तिच्या छोट्या मुलींसाठी घेतलेल्या त्या बाहुल्या -Cartoon सोबत विपुल व विशालदादाने इतकं हसवलं कि माझं पोट हसून हसूनच भरलं आणि माझ्या जेवणाचं अर्ध ताट सार्थकी लावण्यात छोटूचा -दुर्ग्याचा मोठा हातभार लागला. जेवल्यावर सर्वजण जोमाने तयार झाले परतीच्या गणेशघाटासाठी .... परतताना दुरून पाहीलं कि भीमाशंकरच्या मंदिराबाहेरची रांग बरीच लांबलचक दूरपर्यंत गेली होती.

                                 जिथे आम्ही खाणं व विश्रान्ती घेतली होती तो पर्यंतचा प्रवास हा न थांबता करायचा होता , चढणीची जागा आता उतरणीसाठी सज्ज होती , आम्ही साधारण तीन साडेतीनच्या दरम्यान सुरुवात केली चढणीसाठी सहा तासापेक्षा जास्त वेळ लागल्यामुळे परतीचा प्रवास हा त्यात बराचसा लांबचा आणि वेळखाऊपणा असला तरी सृष्टीचा सुरेख नयनरम्य देखावा दाखवणारा आहे. संपूर्ण भीमाशंकर व आजूबाजूचा परिसर हा खूप सुंदर असल्यामुळे त्यात भरीस भर म्हणजे खूप सारे छोटे छोटे झरे नजरेस येतात आणि आपल्याला जणू संदेश देतात कि -जीवनात कुठेही कधीही थबकून न राहता प्रवाहासोबत वाहत राहावं नवं नवीन गोष्टी शिकत राहावं ,  ह्या दिवसाची पुरेपूर आठवण जागी ठेवण्यासाठी मी ते सर्व सृष्टीसौंदर्य मनात साठवत  होते . किर्रर्र जंगलझाडीला न्याहाळत मागे वळून - वळून पाहत ती शांतता अशीच पुढेही अबाधित राहो ही प्रार्थना करत त्या जागेचा निरोप घेतला, मध्यबिंदू असलेल्या ठिकाणी म्हणजेच जिथून भीमाशंकरसाठी दोन मार्ग -गणेशघाट व शिडीघाट एकत्र येतात तिथंपाशी मजल दरमजल करत पोहचलो , पाच दहा मिनिटे आराम करत आता प्रवास सुरु झाला तो गणेश घाटाचा ....







                         

          दूरवरचा प्रवास असल्यामुळे जास्तकुठेही न थांबता  पावलांचा वेग वाढवायचा होता , हा प्रवास पुन्हां एकदा आपल्या मनाची व शरीराची परीक्षा घेणारा ठरतो , एका ठिकाणी आम्हांला छानसा छोटा धबधबा  दष्टीक्षेपात आल्यामुळे तो आलेला क्षीण आम्ही त्या प्रवाहात धुवून टाकला - हात पाय तोंडावर पाणी मारत जरा ताजेतवाने झालो ; गौरव - विपुल -भूषण -दुर्ग्या - मी असा शेवटपर्यत एकत्र असलेला मस्त ग्रुपफोटॊ झाला.

           त्या झऱ्यापाशी खाली कातळावर जिथे एकत्र उभे होतो तिकडे गुळगुळीतपणा जास्त असल्यामुळे सावकाश सांभाळून उभे होतो आणि अचानक ग्रुप फोटो काढल्यानंतर जरासा पाय त्या दगडांवरून सरकल्याने दुर्ग्या तिथल्यातिथे  फतकल मारत घसरला , सुदैवाने जास्त कुठेही न लागता थॊडाक्यावर  निभावलं - त्यानंतर दोन आठवडे लागलेल्या मुक्या माराची दुर्ग्याला चांगलीच परिणीती आली , मग मी -विशु - दुर्ग्या - विपुल असे सोबत आता भीमाशंकरच्या गिरिशिखराला मागे टाकत गणेशघाटाचं कधी एकदा अंतिम टोक गाठतोय असं झालं .

          सोबत एकत्र असलो तरी मागे पुढे होत होतो -कधी विशू तर कधी दुर्ग्या , भूषण, विपुल - गौरव असं कोणी ना कोणी सोबत होतंच परतीच्या ह्या मार्गावर विपुलचा आवाज जणू गायबच झाला होता,मला बडबडीची सवय लागल्यामुळे हा का गप्प झाला काही कळत नव्हतं, त्याच्यासोबत असणारी त्याची स्टिक पण त्याने बॅगेत टाकल्यामुळे हे बडबड महाशय गप का झाले समजलेच नाही असो , आता शेवट -शेवटला दिसणाऱ्या झऱ्यांना तर विशू पार वैतागून गेली होती , मग आम्ही जमेल तशी झपाझप पाउले उचलली. साधारण संध्याकाळचे  ४:३० वाजून गेले असतील तेव्हाच जरा गती वाढवून ५- ५:३० पर्यंत खांडस गावी पोहचू असं मनाशी ठरवतच झपझप चालू लागलो, आता नजरसमोर छोटंसं कौलारू छत असलेलं गणपती मंदिर समोर आलं , बरोबर त्या आधी जवळपास साडेचार - पाच फूट इतकं खोली असलेली उतरण लागली ती पाहता कसे उतरू झाले तरी भटकंतीच्याटीमने चांगली तिथेही चांगली साथ दिली.


गणेशमंदिर - गणेशघाट 

          गणेश मंदिर दर्शन घेत त्यानंतर कुठेही न थांबता आम्ही  जिथून सुरुवात केली त्या रस्त्यापाशी पोहचताच गाडी पाहून खूप हायसं वाटलं, आता खऱ्या अर्थाने जमिनीवर येताच सर्वांनीच सरळ  तिथेच बॅगा टाकत पाठ आडवी केली . प्रत्येकाचे चेहरे तेव्हा पाहण्यासारखे झाले होते- त्यात जवळचं पाणी संपल्यागत जमा झालं असता कोणाकडून प्याऊ आणि उरला सुरला खाऊ बाहेर येतो याची काही क्षणांपुरता लोळपाट्या घालत वाट पाहत होतो - खरंच दिवस खुप्पच भन्नाट गेला होता  आणि नव्याने जुन्यावर यशस्वी चढाई केल्यामुळे मन देखील हलकं आणि प्रसन्न झालं होतं, काही क्षण वर आकाशाकडे पाहत हास्य देत मी मनोमन  देवाचे आभार मानले .

ट्रेक संपल्यानंतरचे आम्ही

कसला ट्रेक होता - एक नंबर इति दुर्ग्या 😃👌👍

       मग काहीच क्षणांत सगळ्यांची स्वारी गाडीवर स्वार होऊन खांडसकडे रवाना झाली तिकडून कर्जतसाठीची लोकल गाठायची व पुढची गणितं मांडत आम्ही पुन्हां त्याच रुळांवर धावू लागलो
                   अश्याप्रकारे चढतांना शिडीच्या वाटेने व उतरतांना  गणेश मंदिर वाटेने भेटलेला तो निसर्ग , तो आनंद खरंच अविस्मरणीय आहे ;👌👌👌👍 सोबतीने मिळालेल्या श्रावण धारेमुळे तो अजूनच सुंदर झाला  दरवेळी जवळपास प्रत्येक ट्रेकवर सोबत असणारे -काही अचानक कारणामुळे येऊ न शकलेल्या  'प्रतिकराजे' व  'मैथिली ' या दोन 'रत्नांना' मी संपूर्ण ट्रेकवर  खूप खूप खूपच missss केलं😞😞  आणि हो सत्या सुरुवात ते शेवट प्रत्येकाने तूझी आठवण काढली तूला कोण विसरणार 😄 खरंच भटकंतीटीमचे अभिनंदन तूम्ही सर्वानी छान पद्धतीने हा ट्रेक सफल केलात , असंच सातत्य कायम ठेवा.

[ विशेष आभार
  १. वाचनात आलेली  भीमाशंकर अभयारण्य माहिती: 'खास मित्र '- महाराष्ट्र टाइम्स -बिल्वदा काळे यांचा लेख
  २. भीमाशंकर मंदिर माहिती :पुस्तक -'सहली एका दिवसाच्या -परिसरात पुण्याच्या' - प्र. के. घाणेकर.
  ३. भीमाशंकर शिडीघाट व गणेशघाटच्या ट्रेक दरम्यान चित्रित झालेली Video - Vlogger - गौरव पडवळ ]

छायाचित्र सौजन्य :

 दुर्गेश महाजन - गौरव पडवळ- विपुल जाधव

                               खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आम्ही अनुभवलेला भीमाशंकर जरूर पहा .

https://youtu.be/mOpT_knnuNA  - भीमाशंकर शिडीघाट - भाग पहिला

https://youtu.be/oF-FYUf6BNE   - भीमाशंकर गणेशघाट- भाग दुसरा व अंतिम.

तसेच सर्वांनी वेळात वेळ काढून हा माझा लेख वाचल्याबद्दल खुप खुप धन्यवाद .
- स्वानी
(स्वानंदी हाटकर. )

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...