http://bharatpatilmajhibhramanti.blogspot.com/2019/12/blog-post.html
![]() |
| अगदी समोर अलंग , नंतर उजवीकडे मदन आणि कुलंग |
आकाशाला गवसणी घालणारी गिरीशिखरे , दुर्गम घाटवाटा आणि घनदाट जंगले हि सह्याद्रीची खरी ओळख आहे . सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत महाराष्ट्राचा इतिहास दडला आहे . यापैकी कितीतरी शिखरांवर गडकिल्ले बांधेलेले आहेत . हि उत्तुंग गिरीशिखरे आणि गडकिल्ले गिर्यारोहकांना भुरळ घालतात. काहींच्या वाटा तर अतिशय बिकट . यापैकीच एक सर्वात खडतर आणि दुर्गम वाट म्हणजे अलंग-मदन-कुलंग ची डोंगरयात्रा .
अलंग , मदन आणि कुलंग शॉर्ट मध्ये AMK म्हणून प्रसिद्ध असणारे हे दुर्गत्रिकुट कळसुबाईच्या पर्वतरांगेत नाशिक , नगर आणि ठाणे या जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहे. लिंगाणा केल्यानंतर कित्येक महिने AMK च्या वाटेवर डोळे लावून बसलो होतो . अखेर बा रायगड सोबत जाण्याचे नक्की केले . कसाऱ्याहून आम्ही चाळीसेक जण पायथ्याच्या आंबेवाडी गावात मध्यरात्रीच्या सुमारास पोहोचलो तेव्हा सारं गाव निपचित पहुडलेलं होत . गावातल्या मंदिरातच आमची धूडं विसावली . आणि भल्या पहाटे कोंबडा आरवण्याआधीच आमच्या डोंगरयात्रेला सुरुवात झाली .
![]() |
| अलंग |
अलंग – पहाटेच्या धुरकट अंधारात दूरवर उंच कळसुबाईच्या
मंदिरातला टिमटिमणारा दिवा दिसत होता . लांबूनच हात जोडले आणि चालायला
सुरुवात केली . प्रत्येकाच्या चेहऱ्यावर नुसता उत्साह ओसंडून वाहत होता .
गाव ते प्रत्यक्ष पायथ्यादरम्यान विस्तीर्ण माळ पसरला आहे . माळ पार केला
आणि लगेचच गर्द रानात शिरलो. दोन्ही बाजूंनी दाट झाडी माजलेली . त्यातून
वाट मिळणे महाकठीण . वाटाड्या नसेल वाट चुकलाच म्हणून समजा . त्या झाडीतून
वाट काढत खड्या चढाईने सुरवातीलाच सगळ्यांना धापा टाकायला लावल्या . १
तासानंतर थोडं मोकळं पठार लागतं . परत जंगल – चढ - परत पठार अशी वाट काढत
तुम्ही अलंग च्या पहिल्या गुहेपाशी पोहोचायला ९ वाजले. बोचकी सोडून थोडं
खाऊन घेतलं . आता पुढे प्रस्तरारोहण करायचं होतं .
गुहे नंतर लगेचच २ रॉक पॅच लागतात. पहिला १५ - २० फुटांंचा आहे . तितका अवघड नाही . आणि दुसरा मात्र अत्यंत कठीण . ८० फुटाची सरळ उभी कातळभिंत आणि दुसऱ्या बाजूस जबडा उघडून बसलेली खोल दरी. मध्ये जेमतेम ४ - ५ फुटाची जेमतेम उभे राहायला जागा. इथे rock climbing शिवाय पर्याय नाही. हेल्मेट, हार्नेस घालून सज्ज झालो . कुठे-कुठे खाचा आहेत ते पाहून घेतले. रोपमध्ये carabinar अडकवला. बिले चा रोप बांधला. मनात महाराजांचे स्मरण केले आणि चढाईस सुरुवात केली. लिंगाण्याचा प्रस्तरारोहणाचा अनुभव असल्याने हा सहज पार करू शकू असं वाटलं होतं पण अर्ध्यापर्यंत गेलो आणि पुढे मात्र चांगलेच हात भरले . थोडा वेळ थांबलो . खाली पाहिलं तर काळजाचा ठोका चुकवणारी खोल दरी . आता मात्र धडधड वाढली . त्या सरळसोट उभ्या कातळकड्यात खाचा शोधत रोपने वर जाणे खरोखर जिकीरीचे होते. हळूहळू वर जात राहिलो . मध्ये २ ठिकाणी श्वास घेण्यासाठी थांबावे लागले पण ट्रेक चा जो सर्वात अवघड टप्पा होता तो पार केला. पूर्वी या टप्प्यावर जाण्यासाठी पायऱ्या होत्या . पण ब्रिटिशांनी हे किल्ले जिंकताना या पायऱ्या तोफांनी उडवून दिल्या होत्या. सर्वजण हळूहळू वर आले आणि माथ्याच्या दिशेने सरकू लागले. डोंगराच्या अगदी कडेकडेने वर जाण्यासाठी कातळपायऱ्या खोदल्या आहेत . एकाबाजूला डोंगर दुसऱ्या बाजूला खोल दरी . अगदी कलावंतीण किल्ल्यासारख्या . ( अशाच पायऱ्या पुढे मदन आणि कुलंग लाही आहेत. कलावंतीण पेक्षा कितीतरी जास्त...)
![]() |
| अलंग - प्रस्तरारोहण |
कातळपायऱ्या चढून वर आल्यावर १५ - २० मिनिटांत आपण अलंगच्या माथ्यावर पोहोचतो. आणि माथ्यावर आल्यावर मात्र आपण त्या सह्याद्रीच्या अद्भुत स्वर्गीय सौंदर्यात स्वतःला हरवून बसतो. सारं काही धुंद करणारं . निव्वळ अप्रतिम !! अगदी स्वर्ग हि फिका वाटावा. दूर-दूर पसरलेले ते अलंग चे पठार . जणू संपूर्ण पठाराने हिरवी पिवळी गवताची चादर लपेटलेली आहे. वरचं उघडं , असीम , अमर्याद आकाश. अगदी हात वर केला कि स्पर्श होईल इतकं जवळ. एक स्वतःभोवती गिरकी घेतली तर लक्षात येईल कि आपण चहुबाजूनी डोंगरांनी वेढलेले आहोत. पाठीवर मदन आणि कुलंग. डाव्या बाजूला लांबच लांब पसरलेली कळसुबाई ची रांग . उत्तरेला दूरवर हरिहर , त्र्यंबक , अंजनेरी तर दक्षिणेला रतनगड , कात्राबाई , आजोबा , खुट्टयाचा सुळका . हे सर्व डोंगर चिरत अस्ताव्यस्त भंडारदऱ्यात पसरलेलं प्रवरेचं पाणी आणि त्याच्याच पाठीमागे कुठे तरी लपून बसलेला हरिश्चंद्रगड आणि सांधण दरी. अशा महाराष्ट्रातील एकापेक्षा एक दिग्गज मंडळींची इथे डोंगरदाटी . खरोखर हा परिसर म्हणजे अक्षरशः निसर्ग सौंदर्याची खाण आहे.
महाराष्ट्रातले सर्वात उंच शिखर कळसुबाई आमच्या अगदी समोर . पण आता आमच्या बरोबरीचे भासत होते. दुर्बिणीतून कळसुबाईच्या मंदिरातील गर्दी स्पष्ट दिसत होती . कळसुबाईला हात जोडले आणि पुढच्या प्रवासाला लागलो.
वरचा माळ फारच विस्तीर्ण आहे . अगदी तासभर चाललो तरी संपणार नाही एवढा . संपूर्ण माळावर एक हातभर उंचीचं रान माजलंय. त्या गवतातून चालणं हा हि एक विलक्षण अनुभव. सगळी झाडी आपण येताच तरारून उठली आहेत. रानफुले बहरली आहेत. कितीतरी काळ ती आपली वाटच पाहत होती जणू . हि वाट अतिशय दुर्गम. त्यामुळे इथे फारसं कोणी येत नाही. गवतातून शांतपणे चालत रहायचं . फुलांना - पानांना हळुवार स्पर्श करावा . भुंगे - फुलपाखरांचा पाठलाग करावा. सारं कसं अगदी प्रसन्न आणि टवटवीत . जिवंतपणाचा अनुभव देणारं . ते त्यांच्या विश्वात दंग आपण आपल्या विश्वात रममाण . तरीही एकमेकांशी मूक संवाद होतो . जाणीवेतनं कळतं. ते अनुभवता येतं . ते सगळं समजून घ्यायचं . मग मनात हळूच आनंदाची लहर उमटते . शरीरभर विरत जाते . आपण आलोय म्हणून त्यांनाही तसाच आनंद होत असणार . ते आपल्याला कळतं . कारण एक समान तत्व त्यांच्यातही आहे , आपल्यांत देखील आहे . अवघ्या चराचरांंत सामावून आहे . निस्सीम स्तब्धता . कसलीच फिकीर नाही . हरवू द्यायचं स्वतःला स्वतःमध्ये. बस्सं .....
![]() |
| अलंग पाण्याचे टाके |
![]() |
| वाड्याचे अवशेष |
माळावर सुरुवातीलाच थोडं भग्न बांधकामात असलेलं शिवलिंग आहे.थोडसं पुढे मोठमोठ्या गुहा खोदलेल्या दिसतात.त्यात पन्नासेक जण आरामात राहू शकतात. गुहा पार करून थोडं वर चढून आल्यावर पुढे फार मोठ-मोठी १३ सलग पाण्याची टाकी खोदली आहेत . डोंगराच्या उतारावर खोदलेल्या टाक्यांमध्ये वाहतं पाणी क्रमाक्रमाने जाऊन स्थिरावतं . त्यामुळे वाहत आणलेला गाळ क्रमशः अडवला जाऊन शेवटी टाक्यांमध्ये निसर्गतः शुध्द झालेलं पाणी उपलब्ध होतं . दगडांची चव असलेलं हे पाणी पिण्याची मजाच वेगळी आहे . सगळा क्षीण त्या अमृततुल्य पाण्यासोबत गिळून घेतला . पुढे एका मोठया चिरेबंदी दगडी वाड्याचे अवशेष , २ स्वच्छ पाण्याची टाकी , शिवलिंग, एक राजस्थानी भाषेतील शिलालेख एवढे सगळे पाहून परतीच्या प्रवासाला लागलो. .
उतरताना परत तोच ८० फुटी कातळ टप्पा रोप ने rapelling करत सर्व जण हळूहळू उतरले आणि दुपारी ३ च्या आसपास सगळे मदनकडे निघालो.
![]() |
| अलंग चा ट्रॅव्हर्स |
मदन – AMK च्या डोंगरयात्रेत सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे मोठमोठाले काळजाचा ठोका चुकवणारे ट्रॅव्हर्स ( traverse routes ) . ट्रॅव्हर्स म्हणजे अख्खा अलंग एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कडेकडेने चालत जायचं . अगदी २ - ३ फूटाची वळणावळणाची काय ती वाट .एका बाजूस अलंग चा सरळसोट उभा ठाकलेला कातळकडा . दुसऱ्या बाजूला जबडा उघडून बसलेली खोल खोल दरी. अंगावर अक्षरशः शहारे येतात. खूप चालल्यावर शेवटी आपण अलंग मदन ला जोडणाऱ्या खिंडीत पोहोचतो . इथे अलंगची हद्द समाप्त . आता मदन चालू . परत मदनच्या ट्रॅव्हर्स ने कडेकडेने जात मदनच्या अगदी शेवटच्या टोकाला जाऊन पोहोचायचं . इथून वर जाण्यासाठी कातळपायऱ्या आहेत पण पुढे जाऊन त्या पायऱ्या फोडल्या आहेत .
आता हा ट्रेक चा दुसरा अवघड रॉक पॅच . हा ५० फुटाचा पॅच परत rock climbing करत चढावा लागतो. उभे रहायला जागा नाही आणि खाली खोल दरी. एव्हाना तिकडे पोहोचता पोहोचता पूर्ण अंधार पडला होता . परत हेल्मेट , हार्नेस घातले. हेडटोर्च च्या प्रकाशात rock climbing करत तो अवघड टप्पा सगळ्यांनी पार केला. आता वर जाण्यासाठी पायऱ्या होत्या पण त्या दुसऱ्या टोकाला . डोंगराच्या अगदी कडेकडेने कातळात खोदलेल्या त्या पायऱ्यांनी त्या गडद अंधारात मुंगीच्या पावलांनी सरकत सरकत जवळपास अर्धा-पाऊण तासांनी माथ्यावर आलो तेव्हाच सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. या पायऱ्या कलावंतीणपेक्षा हि कठीण वाटतात. कलावंतीण केलाय फक्त त्यांनाच या पायऱ्या कशा आहेत ते कळू शकेल.
![]() |
| मदन |
मदनचा माथा अलंग च्या मानाने खूप लहान आहे . ३० -४० जण मावतील एवढी गुहा आहे . पाण्याची २ टाकी आहेत . खालून येताना स्वयंपाकाला लाकडं गोळा करून आणली होती . तीन दगड मांडून चूल पेटवली . जेवण बनवायला घेतलं. तिखटजाळ आमटी , भात आणि निखाऱ्यावर भाजलेले पापड . प्रचंड भूक लागली होती. सगळे जेवणावर अक्षरशः तुटून पडले.
भरपेट जेवण झालं होतं. मस्त थंडी पडली होती. दिवसभराच्या श्रमांनी अंग ठणकत होतं. पाय तर प्रचंड दुखत होते. थोडीशी मोकळी जागा पाहून तेथेच सैलावलो. बॅग उशाशी घेतली. रात्रीची नीरव शांतता . कसलीच हालचाल नाही. सोबतीला मंद वारा . संपूर्ण वातावरणाला जणू एक प्रकारची गुंगी आलेली. रात्रीचा पट हळूहळू उलगडत होता . पोतडीतून एकेक रत्न बाहेर पडत डोळे दिपून येत होते. आभाळ चांदण्यांनी भरून गेलं . असं वाटत होतं कि दिवस उगवूच नये . हि रात्र अशीच राहावी कायमसाठी . कितीतरी वेळ टक लाऊन ते अंतराळ न्याहाळत राहिलो . हळहळू पापण्या जड होत गेल्या आणि कधी झोप लागली ते कळलंच नाही. सह्याद्रीने आम्हाला मायेने आपल्या कुशीत घेतले होते.
![]() |
| मदन वरून पाहिलेला नयनरम्य सूर्योदय |
कितीही थकलेलो असलो तरी सूर्योदय चुकवायचा नाही म्हणून आपोआप जाग येते. कुडकुडत अंगाचं मुटकुळ करून एका उंच टेपाडावर जाऊन बसलो. तांबडं फुटलं होतं. दूर डोंगराआडून ते सूर्यबिंब हळूहळू वर येत होतं. आसमंतात लाल रंगाची उधळण होत होती. आजूबाजूच्या दरीत सूर्याचा उजेड सांडला होता. भंडारदऱ्याचं पाणी त्या तांबड्या उन्हात झळाळून उठलं होतं. सारं काही अतिशय मनमोहक आणि रोमांचक . ते चैतन्य अंगात मुरवत कितीतरी वेळ असाच बसून राहीलो . पूर्ण शांतता . आत आणि बाहेर दोन्हीकडे. शरीर त्या अपार आनंदात न्हाऊन निघतं . कदाचित हा सह्याद्रीतील सर्वात नयनरम्य सूर्योदय असावा .
सूर्योदयाची धुंदी हळूहळू उतरत गेली आणि प्रचंड भूकेची जाणीव झाली . चहा आणि गरमागरम पोह्यावर खच्चून ताव मारला आणि मदन चा निरोप घेतला.
![]() |
| कुलंग |
कुलंग - मदनचा कातळटप्पा rapelling करत आल्या वाटेने परत माघारी फिरून अलंग-मदन ला जोडणाऱ्या खिंडीत यायचं . तिथून पलीकडच्या बाजूला उतरतीची वाट कुलंग ला जाते. आधी मदनला कडेकडेने पूर्ण गिरकी घेत पुढे २ सुळके पास करत आधी छोटा कुलंग नंतर कुलंग च्या मुख्य रांगेत शिरतो . हा सगळा एक भला मोठा, लांबलचक ट्रॅव्हर्स आहे . सुरवातीला पाय दुखायला लागतात. पण एकदा चालायला लागल्यावर त्याचीच नशा चढते. कुठे कुठे वाटेत कातळातून थंडगार पाणी झिरपत असत . त्यात ओंजळ लावून पाणी पोटभर प्यायलं कि तरतरी येते. मग पुन्हा चालायला लागायचं. दाट कारवीतून माग काढत डोंगर-दरी असा तोल सांभाळत जवळ जवळ ३ तासांची तंगडतोड केल्यानंतर आपण कुलंगच्या पायथ्याशी पोहोचतो . इथवर येताना जवळपास सगळ्यांचेच पाणी संपले होते . बहुतेक जण तिथेच थांबले . इथून कुलंगला वर जायला वाट थोडी घसरणीची आहे. ती संपल्यावर मात्र सुंदर कातळपायऱ्या लागतात . इतक्या सुंदर आणि जास्त पायऱ्या कदाचित एखाद्या किल्ल्यावर आढळतील. एकेक पायरी २-३ फुटाची. एक गुहा , पहारेकऱ्यांची देवडी आणि २ सुंदर बऱ्यापैकी शाबूत दरवाजे पार करून आपण अर्धा-पाउण तासात माथ्यावर पोहोचतो .
![]() |
| सुंदर कातळपायऱ्या (नेट साभार) |
कुलंगचाही पसारा फार मोठा आहे . उजव्या बाजूस फिरून २ – ३ गुहांचा समूह , मोठ्या वाड्याचे अवशेष पाहून घेतले. तीनही गडांवर कुठेही तटबंदीची भिंत बांधलेली नाही कारण सरळसोट उभ्या दगडी कड्यांचे नैसर्गिक संरक्षण लाभल्यामुळे तटबंदीची गरज नाही. डाव्या बाजूने पुढे गेल्यावर अलंग सारखंच पाणी साठवण्यासाठी सुंदर बांधकाम पाहायला मिळतं . दगडांच्या घळीतून वाहतं पाणी टाक्यात साठून त्यापुढे दगडी बंधाऱ्याने अडवलं आहे. दुसऱ्या बाजूला जास्तीचं पाणी गोमुखाद्वारे बाहेर पाठवण्याची व्यवस्था केली आहे. १० टाकी तुडुंब भरलेली . टाक्यांची साफसफाई कोणातरी ग्रुप ने केलेली होती त्यामुळे पाणी एकदम स्वच्छ आणि थंडगार . अरुण सावंत सरांनी रंगीबेरंगी मासे सोडले होते . पाण्यात हात बुडवल्यावर सगळे हाताभोवती गोळा होत चुटूपुटू करायचे . ओंजळीत घेऊन परत पाण्यात सोडताना खूप मजा येत होती. टाक्यांच्या मधोमध एक कडेला सुंदर गणेशमूर्ती कोरलेली आहे . हा अद्भुत जलाविष्कार पाहून थक्क व्हायला होतं . टाक्यांपलीकडे जमिनीवरच एक शिवलिंग कोरलेले आहे . कितीतरी काळापासून किल्ल्यावर घडलेल्या इतिहासाची साक्ष देत आहेत.
![]() |
| कुलंग पाण्याचे टाके |
| गणेशशिल्प |
हे सगळं डोळ्यांंत साठवून गड उतरायला सुरुवात केली . कुलंग वरून सरळ खाली पायथ्याची वाट गच्च रानातून जाते . मध्ये उजव्या बाजूला मदनवरून येणारी रानातील वाट येऊन मिळते. उतरताना पावलं आपसूकच पडतात. झपझप रान तुडवत २ तासांंत खाली कुलंगवाडीत पोहोचलो. गाडी सावकाश धावू लागली . जड मनाने त्या डोंगररांगांचा निरोप घेत परतीच्या प्रवासाला लागलो . डोंगर हळूहळू पाठी पडत गेले . तरी मन काही त्या वातावरणातून बाहेर पडायला मागत नव्हते . पुढचे काही दिवस असेच त्या डोंगररांगांभोवती घुटमळत राहणार होते .
AMK ची भटकंती म्हणजे एक परिपूर्ण ट्रेक आहे ज्यात भटकंतीचे जवळपास सर्व पैलू अनुभवता येतात. पायथ्याचं घनदाट जंगल , अलंग व मदनच साहसी प्रस्तरारोहण , कस पाहणारी ५००० फुटांची बिकट चढाई , माथ्यावरचं नयनरम्य विस्तीर्ण पठार , चारही दिशांना वेढा देऊन बसलेल्या पर्वतरांगा , पाणी साठवण्याची अद्वितीय रचना , ऐतिहासिक वास्तूंचे अवशेष , मोठमोठ्या खोदलेल्या गुहा , लांबच लांब ट्रॅव्हर्सेस ची तंगडतोड , रात्री माथ्यावरचं दगड मांडून शिजवलेलं जेवण, लक्षावधी तारकांनी भरलेलं अंतराळ , ऐन हिवाळ्यातील कुडकुडत घालवलेली ती रात्र आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा मदन वरचा मनमोहक सूर्योदय यांनी हि AMK ची खडतर डोंगरयात्रा आपल्याला अविस्मरणीय असा अनुभव देऊन जाते .
- भरत पाटील .
महत्वाचे - अलंग आणि मदन चे रॉक पॅच रोप लावल्याशिवाय पार करता
येत नाहीत . अलंग आणि मदन ला वर गुहेजवळ , पाण्याच्या टाक्याच्या आसपास
विषारी साप असतात. त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी. झोपताना टेंट लावावेत.
मदन ला rock patch अगोदर traverse ला थोडं तुटलेल्या कड्यावरून जायला लागत .
तिकडे रोप बांधावा . वाट अतिशय दुर्गम असल्यामुळे खाली गावातून वाटाड्या
घेऊन जावे.
आभार - बा रायगड परिवार
छत्रपती शिवाजी महाराज की जय !!



















No comments:
Post a Comment