Thursday, September 7, 2023

तोरणा -राजगड २०२२

 https://sudmalgaonkar.blogspot.com/


 या वर्षी दिवाळीच्या आधी किल्ले बांधायला सुरुवात झाली तसा ट्रेकला जाण्याचा विषय सुरू झाला. तोरणा - राजगड, राजगड - रायगड असे अनेक प्लॅन डोक्यात येऊन गेले. शेवटी तोरणा ते राजगड हा ट्रेक करायचे फायनल झाले. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जाऊया असे ठरले. अपूर्वने एक कल्पना दिली आपण ट्रेनने जाण्यापेक्षा बसने जाऊया. नेहमी आम्ही ट्रेनने पुणे, पुणे स्टेशन ते कात्रज रिक्षा, कात्रज ते नसरापूर फाटा पेपर गाडी अथवा वडाप, नसरापूर फाटा ते वेल्हे गाव वडाप असा प्रवास करायचो. पण बसने डायरेक्ट वाशी ते नसरापूर फाटा असा प्रवास होणार होता. तिथून पुढे जाण्यासाठी गाडीची सोय करायची एवढंच राहणार होतं. ओळखी ओळखीतून वेल्हे गावातील एका हॉटेलचा नं. मिळाला. त्यांच्या मदतीने दोन गाडीवाल्यांचे नं. मिळाले. त्यांच्याशी बोलणं झालं. शेवटी हो नाही करता करता आरंभी शूर गळून पडले आणि बाकी सर्वांनी आपले येण्याचे नक्की केले. पण आनंदाची बाब एक होती पन्हाळा ते विशाळगड या ट्रेक (१९) पेक्षा १ जण ह्या वेळेस वाढला होता. तरी पन्हाळा ते विशाळगडसाठी आलेल्यांपैकी २ जण पुढील शिक्षणासाठी परदेशात असल्याने ते (ऋत्विक आणि शुभम बोरवणकर), एकाने काही वैयक्तिक कारणांमुळे (हृषी जोशी), एकजण परीक्षा असल्यामुळे (सुमेध खुजे) आणि एकाच नुकतंच लग्न झालं असल्याने तो (अक्षय रासकर) असे ५ जण कमी झाले होते.

 डिसेंबरच्या सुरुवातीला शुभमने २० जणांची बसची तिकिटं काढली. दिनांक २३/१२/२०२२ रात्रौ ००.४५ ला वाशी येथे बस येणार होती. डिसेंबरच्या मध्यापर्यंत अजून २ जण अजिंक्य खाडिलकर आणि सचिन कुऱ्हाडे यायला तयार झाले. आता २२ जण झालो होतो. पण अचानक आदित्यला काही कौटुंबिक कारणास्तव येणे टाळावे लागले. तो बाहेर पडला तसा वैयक्तिक कारणांमुळे सुरुवातीला कॅन्सल झालेला हृषी येण्यासाठी तयार झाला. त्यामुळे आकडा पुन्हा वाढून २२ झाला. सगळं सुरळीत झालं तर मजा कशी येणार? आपल्याकडे एक म्हण आहे 'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न'. जायच्या ४-५ दिवस आधी राशी आजारी पडली. राशी नाही म्हणून अपूर्वा अशा दोघी कॅन्सल झाल्या. पुन्हा विवेक सिंग अचानक वाढला. शेवटी एकदाचा आकडा २१ वर येऊन स्थिरावला.

 ठरल्याप्रमाणे २२ तारखेला रात्रौ १०.०० वा. सहनिवसातील मंदिरात जमा झालो. थोडं फार सामान काही जणांच्या बॅगमध्ये भरायचे होते ते भरून ठाकुर्ली ते वाशी प्रवास सुरु केला. रात्रौ १२.४५ ची बस असल्यामुळे वेळेत तिथे पोहचू यावर भर दिला आणि पोहोचलो. तिथे गेल्यावर समजले बस साधारण एक तास उशिराने आहे. झालं तिथे बसून मच्छर मारण्याव्यतिरिक्त कामंच काय? तरी काही मुलांनी तिथे बुर्जी पाव, आम्लेट यावर ताव मारला तर शाकाहारी मुलांनी शाकाहारी हॉटेल शोधून तिथे ताव मारला. सरतेशेवटी १.३० वाजता आमची बस आली. सर्व मुलांनी आपापल्या जागा घेतल्या आणि विसावले. बस निघाली आणि आमचा प्रवास सुरु झाला. पण सुखकर झाला तर तो आमचा प्रवास कसला? घाट सुरू झाला तसं ट्रॅफिक जॅम झालं. त्यांतच दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसे आमची बस घाटाच्या सुरवातीच्या चढणावरच बंद पडली. साधारण दोन तीन मिनिटे बस सुरूच होईना. मनात विचार आला झालं आपला ट्रेक इथेच होणार बहुतेक. पण सुदैवाने ड्राइवरच्या कौशल्याने बस लवकर सुरू झाली आणि आमचा प्रवास हळूहळू का होईना पण सुरू झाला. पुन्हा घाटात दोन ते तीन वेळा बस बंद पडणार होती पण ड्रायव्हरने बस बंद पडू न देता पुढे नेली. पुणे येईपर्यंत ट्रॅफिक ओसरलं होतं. पुणे पार केल्यावर ड्रायव्हरला डुलकी लागायला लागली पण त्याने कंडक्टरला सांगितले आणि पुढील प्रवासात कंडक्टरने बस चालवली. साधारण एक तास उशिराने आम्ही नसरापूर फाट्याला पोहोचलो होतो. आधीच ठरवलेले वडाप वाले तिथे येऊन अगोदरच उभे होते. बस मधून उतरून अक्षरशः सामानाच्या गोण्या जशा गाडीत कोंबतात तसे बॅगा व स्वतःला कोंबून वेल्हे गावापर्यंतचा प्रवास केला. साधारण ७.१५ पर्यंत वेल्हे गावात पोहोचलो.

 वेल्हे गावात पोहोचलो तर एक गाडीवाला गाडी घेऊन नवीन झालेल्या पार्किंग पर्यंत गेला तर एकाने आम्ही बसलेलो त्या गाडीवाल्याने आम्हाला वेल्हे गावात ज्या हॉटेलवाल्यामुळे त्यांच्या गाड्या मिळाल्या तिथे सोडले. काहीजण डायरेक्ट पार्किंगपर्यंत जाऊन ट्रेक सुरू करावा असे म्हणत होते. पण हॉटेलवाल्याला आधीच नाश्ता आणि चहा घेऊ असे सांगितले असल्याने ते टाळणे मला योग्य वाटले नाही. हॉटेल अजूनही बंदच होते. हॉटेलवाल्याला फोन केल्यावर ५ मिनिटांनी त्याने हॉटेल उघडले. सर्वांसाठी पोहे आणि चहा सांगितलेला होता तो होईपर्यंत दोन तास गेले. साधारण ९.०० ते ९.३० पर्यंत तोरणा किल्ला चढायला सुरुवात केली. पहिला अंगावरचा चढ आज एवढा मोठा वाटत होता की आपल्याने ट्रेक होईल का नाही असे मनात येत होते. याला कारणं पण बरीच होती. एकतर साधारण तीन वर्षांनी ट्रेक करत होतो. वयाची ४० वर्ष पूर्ण होऊन गेलेली आणि प्रवासात रात्रभर बस, ट्रॅफिक च्या समस्या व गाडीवाल्यांशी सतत संपर्कात राहात होतो त्यामुळे झोप झाली नव्हती. यामुळे शरीरात थकवा होता. जो किल्ला चढायला अडीच ते तीन तास लागत होते तिथे आज मला पाच तास लागले. साधारण १.०० वा. सुमारास मी तोरणा किल्ल्यावर पोहोचलो. भर उन्हात चालल्यामुळे डोकं दुखायला लागलं होतं. आम्ही गडावर पोहोचेपर्यंत तरुण मंडळी किल्ल्यावर जाऊन झुंजार माची बघायला गेली सुध्दा होती. आम्ही येऊन स्थिरस्थावर होई पर्यंत मुलं आली. दुपारच्या जेवणासाठी आणलेले पराठे खाऊन थोडा वेळ झोपण्याचा प्रयत्न केला पण झोप काही लागली नाही. त्यामुळे पाहिजे तसा आराम करता आला नाही. संध्याकाळी आम्ही म्हातारी (शब्दशः अर्थ घेऊ नये) मंडळी झुंजार माची बघण्यासाठी गेलो. पण पूर्वीची शरीरातील लवचिकता आणि आताची यात फरक पडला हे जाणवल्यामुळे आमच्यातले फक्त सचिन पूर्ण झुंजार माची बघून आले आणि आम्ही ते आल्यावर अर्धवट माची बघून निघून आलो. तिथून निघून बुधला माचीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कोकण दरवाजावरील बुरुजावरून सूर्यास्त बघायला आलो. सूर्यास्त बघून मंदिरात आलो पण एव्हाना माझं डोकं भयंकर दुखायला लागलं होतं. पित्ताचा त्रास होत होता. असं वाटत होतं की सर्वांना घेऊन इथून तोरणा किल्ल्यावरून राजगडला घेऊन जाणे जमेल की नाही? तसेच मला एवढं चालायला जमेल की नाही? शेवटी जेवणा अगोदर खवळलेलं पित्त बाहेर निघालं तेव्हा कुठे थोडं बरं वाटायला लागलं. मी झोपलेलो असताना सर्वांनी मस्त भेळ करून खाल्ली आणि कांदा बटाटा रस्सा आणि भात जेवणासाठी करून ठेवले. जेवण तयार झाल्यावर जेवण उरकून घेतले. मी औषध घेऊन झोपून गेलो. भांडी घासून, सगळं आवरून सगळे झोपून गेले.

 साधारण सकाळी प्रणवचा आवाज आला, "तेजस काका ६.२० झाले". तसे एकदम जाग आली. तेजस, मी आणि मग हळूहळू सगळेच उठले. सगळ्यांनी पटापट आवरायला सुरुवात केली. तोपर्यंत मी, अभि आणि ऋषी (बिरंबोळे बंधू) यांनी चहा बनवून घेतला. चहा बिस्कीट खाऊन, आवरून, मंदिराची साफसफाई करून साडे आठच्या सुमारास मंदिरातून निघून बुधला माची मार्गे आम्ही राजगडाकडे प्रयाण केले. बुधला माचीवरील एका एक्सपोजर असलेल्या पॅचला अभि (जोशी) आणि शुभम यांनी इतरांना मदत करत पॅच पार करून दिला. तोपर्यंत मी, अक्षय आणि तेजस यांनी रोपचा गुंता झाला होता तो सोडवून नीट बांधून घेतला जेणेकरून पुढे शिडीच्या इथे जास्त वेळ जाणार नाही. पुढे सगळे ज्या बुरुजावरून खाली उतरायचे होते तेथे जाऊन तयार होते. विकी आणि वहिनी शिडीजवळ पोहोचलेले तेव्हा मी आणि अभि (जोशी) शिडीजवळ गेलो. अभिने रोप बांधून घेतला. मी शिडी उतरून शिडीच्या बरोबर खाली उतरून जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी थांबलो. विकी, वहिनी खाली उतरून व्यवस्थित जागेवर गेल्यावर अभि (बिरंबोळे) खाली आला आणि शिडीच्या खालच्या जागेवर रॉक पॅच संपतो तिथे बाकीच्यांना मदत करण्यासाठी उभा राहिला. मग हळूहळू अजिंक्य (खाडिलकर), प्रथमेश, विवेक, सचिन असे करत सगळ्यांनी तो पॅच व्यवस्थित पार केला. शेवटी अभि (जोशी), शुभम आणि अप्पू (देवकर) तिघेच उरले असताना अभिने मला पुढे जायला सांगितले. पहिले उतरलेले सगळे पुढे निघाले होते. मी, तेजस, हृषी (जोशी) आम्ही ही पुढे निघालो. आमच्या मागे अभि (जोशी), श्रेयस, अक्षय, अप्पू आणि शुभम आमच्या मागे होते.

 आता सगळ्यांनी तोरणावरून राजगडला जाणाऱ्या सोंडेवर चालायला सुरुवात केली होती. आशु सगळ्यात पुढे प्रथमेश, विवेक, अजिंक्य, पार्थ, प्रणव, सचिन हे होते. त्यांच्या मागे शौनक, सुमित हे होते. त्यांच्या मागे विकी आणि वहिनी. त्यांच्या मागे मी, तेजस आणि हृषी होतो. आमच्या मागे दोन्ही बिरंबोळे बंधू, अभि, श्रेयस, अप्पू आणि शुभम होते. दोन तीन टेकाडं पार केल्यावर लिंबू सरबत वाला एक मुलगा भेटला त्याच्याकडे लिंबूपाणी पिऊन पुढे चालायला लागलो तेव्हा आमच्या मागे असलेले सहा जण आम्हाला मागे टाकून पुढे निघून गेले. पुढे कचरे मामांच्या घराआधी उतारावर अजून एक घर लागतं तिथे मुलांनी पाणी आणि लिंबूपाणी मागवलेलं ते पिऊन पुढे निघालो. साधारण पंधरा वीस मिनिटे चालल्यावर कचरे मामांच्या घराजवळ पोहोचलो. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत आशु, प्रथमेश, अजिंक्य, पार्थ आणि विवेक तिथून पुढे निघाले होते. तिथे थांबलो तेव्हा सर्वांच्या पोटात कावळ्यांनी कल्ला केला होता म्हणून आमच्या चापचूप गाईजचे सेलेब्रिटी शेफ तेजस दादा बांदेकर यांनी चापचूप स्पेशल भेळ बनवली. ती खाऊन, पाणी पिऊन आणि थोडा आराम करून आम्ही पुढे निघालो.

 अभि (जोशी), शुभम वगैरे आमच्या पुढे निघून गेले. आम्ही जुनी मंडळी आमच्या वेगाने हळूहळू पुढे चालत होतो. तिथून साधारण एक - दीड तासात आम्ही राजगड चढाईच्या आधीच्या खिंडीत येऊन पोहोचलो. एव्हाना विकी आणि वहिनी थोडे मागे पडले होते त्यामुळे आम्ही खिंडीत थोडा आराम केला. तिथून तेजस आणि सचिन यांना हळूहळू पुढे व्हायला सांगितले व मी आणि हृषी विकी आणि वहिनींसाठी मागे थांबलो. ते आल्यावर पाचेक मिनिटे त्यांचा आराम झाल्यावर आम्ही शेवटची चढाई सुरू केली. एकमेकांना मदत करत आम्ही साधारण एका तासात म्हणजे साधारण ५.३० पर्यंत राजगडाच्या संजीवनी माचीवर पोहोचलो.

 राजगडाच्या संजीवनी माचीवर पोहोचल्यावर तेथील एका बुरुजावर बसून मी, तेजस आणि सचिन यांनी सूर्यास्त बघितला. आमच्या पुढच्या बुरुजावर आशु आणि प्रथमेश बसले होते. त्यांच्या थोडं मागे अळू दरवाजातून आत आलेल्या रस्त्यावर विकी, वहिनी आणि हृषी हे आराम करत बसले होते. सूर्यास्त झाल्यावर आम्ही पद्मावती माचीकडे निघालो जिथे बाकीचे टेंट लावण्याची सोय करण्यासाठी पुढे गेले होते. पद्मावती माचीवर पोहोचल्यावर बघतो तर टेंट लावण्यासाठी चांगली जागा न मिळाल्याने मुलं अजूनही जागा शोधत होते. शेवटी आम्ही महाराणी सईबाई साहेबांच्या समाधीजवळ उभारलेल्या नवीन इमारतीच्या मागे थोड्या घाणेरड्या पण टेंट लागेल अश्या जागेवर आमचे टेंट लावले. एवढा ट्रेक केल्यावर जेवण बनवण्याचा कंटाळा आल्यामुळे आम्ही तेथील एका कुटुंबास आमच्याकडील सामान दिले आणि लगेच खायला मॅगी, रात्री जेवणास भाताची खिचडी आणि सकाळी नाश्त्याला पोहे असा मेनू बनवून देण्यास सांगितले. त्यांनी योग्य तो मोबदला घेऊन आम्हाला सर्व गोष्टी बनवून दिल्या. रात्री जेवण झाल्यावर असे लक्षात आले की सकाळी सुवेळा माचीवर जाऊन सूर्योदय बघण्याचा मनसुभा जवळपास बारगळला होता.

 सकाळी उठलो तेव्हा सूर्योदय होऊन गेला होता. त्यामुळे काहीजण बालेकिल्ला बघायला निघून गेले जाताना ज्या कुटुंबाला पोहे बनवायला सांगितले होते त्यांना आठवण करून दिली. तोपर्यंत आम्ही खाली थांबलेल्यांनी टेंट काढून,  भांडी घासून, बालेकिल्ल्यावर गेलेले सोडून बाकी सर्वांच्या बॅगा भरून घेतल्या. तासाभरात बालेकिल्ला बघायला गेलेले परत आले. ते आल्यावर पोहे खाऊन आम्ही राजगड किल्ला उतरायला सुरुवात केली. उतरताना गाडीवाल्याला फोन करून साधारण २.०० वाजेपर्यंत पायथ्याच्या गुंजवणे गावात येण्यास सांगितले. किल्ल्यावरून उतरताना असे वाटत होते की जसं काही किल्ल्यावर फॅशन शो असावा. कारण किल्ल्यावर चढाई करीत असलेल्या बऱ्याच जणांनी नवनवीन फॅशनेबल कपडे आणि पायताण घातली होती. काही मुलींनी तर one piece आणि तत्सम कपडे व high heels आणि तत्सम फॅशनेबल पायताणे घातली होती. म्हणजे आपण कुठे जातोय? कश्याप्रकारचे कपडे आणि पायताण घालायला हवी याचे ही या लोकांना ज्ञान नसावे याचे नवलच वाटले. साधारण १२.०० ते १२.४५ पर्यंत सर्वजण खालती पोहोचलो. सगळ्यात आधी खालती उतरलेल्या आशुने ट्रेकचे व्यवहार सांभाळणाऱ्या शुभमशी बोलून सर्वांसाठी हॉटेल सुवेळा दर्शन येथे जेवणाची ऑर्डर देऊन ठेवली.
जेवण उरकले तोपर्यंत गाड्या येऊन उभ्या राहिल्या पण हायवेला पोलिस चेकिंग असल्यामुळे गाडीवाल्यांनी आम्हाला कात्रजपर्यंत न सोडता साधारण ९ किमी अंतरावर असलेल्या विंजर गावात सोडतो असे सांगितले तिथून आम्हाला नसरापूर फाटा, कात्रज किंवा स्वारगेट येथे जाण्यास गाडी मिळेल असे सांगितले. इथून बाहेर पडणे गरजेचे होते आमच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने आम्ही विंजर गावापर्यंत गाडीने गेलो. तिथे दहा मिनिटे वाट बघितल्यावर एक बस आली ती आम्हाला नसरापूर फाट्याला सोडणार होती. नसरापूर फाट्याला पोहोचतो न पोहोचतो तोच समोर स्वारगेटला जाणारी बस उभी दिसली ती चुकणार असे वाटल्याने तेजस आणि इतर काही मुलांनी बसमधूनच समोरच्या स्वारगेटला जाणाऱ्या बसच्या दिशेने आवाज देत कल्ला केला. त्यांचा आवाज ऐकून आम्ही असलेल्या बस ड्रायव्हरने पटकन बस स्वारगेट बसच्या बरोबर बाजूला उभी करून त्याला पुढे जाण्यापासून रोखले. त्यामुळे ती स्वारगेट बस आम्हाला मिळाली. बसमध्ये बसून आम्ही स्वारगेटला जाण्यासाठी प्रवास सुरु केला. पुढे कात्रज टोल नाक्याजवळ पोहोचलो असता बाजूने तेजसला परळ बस जाताना दिसली. टोल नाका असल्याने ट्रॅफिक होते. तेजसने आपली बॅग आमच्याकडेच ठेवत धावत चालत्या बसमधून उतरून धावत परेल बस गाठली आणि टोल नाका पार करून ती बस आम्ही येईपर्यंत थांबवून ठेवली. तेजसने इशारा करताच आम्ही सगळे स्वारगेट बसमधून उतरून पटापट परेल बस पकडली. तेजसच्या फुर्तीमुळे आमचे साधारण दोन तास वाचल्यामुळे तेजसच्या नावाने जयजयकार करत मुलांनी बसमध्ये धुमाकूळ घातला. विकी आणि वहिनी घटकोपरला उतरणार असल्याने त्या दोघांचे चेंबूर आणि बाकी आम्ही १९ जणांचे वाशी तिकिट काढले व वाशीपर्यंतचा प्रवास सुरु झाला. ८.३० - ८.४५ च्या आसपास आम्ही वाशीला पोहोचलो. तिथून रेल्वे स्थानकाबाहेरील बस स्टँडवरून डोंबिवली बस पकडण्यास जात होतो. बस स्टँडवरून बस बाहेर पडून हायवेला लागतात तो रस्ता पार करून पुढे जातंच होतो तेवढ्यात सचिनना वाशी ते डोंबिवली बस जाताना दिसली ती थांबवून त्यांनी आम्हा सगळ्यांना आवाज दिला. आणि शेवटचा पण कंटाळवाणा प्रवास सुरु केला. कारण बसमध्ये चढल्यावर समजले की शिळ फाटा येथे भयंकर ट्रॅफिक आहे. साधारण ११.०० च्या सुमारास आम्ही मंजुनाथ शाळेजवळ उतरून पायी सहनिवसातील मंदिर गाठले. एकमेकांचा निरोप घेऊन सर्वजण आपापल्या घरी गेलो.

 अश्याप्रकारे आमचा ट्रेक व्यवस्थित पार पडला. या ट्रेकला तेजस बांदेकर, हृषीकेश जोशी, अभिषेक जोशी, शुभम खुजे, अभिषेक बिरंबोळे, ऋषिकेश बिरंबोळे, आशिष बिरंबोळे, प्रथमेश सौंदळकर, अजिंक्य खाडिलकर, विवेक सिंग, सचिन कुऱ्हाडे, सुमित फडके, पार्थ वैष्णव, विक्रम पवार, सौ. विधिश्री विक्रम पवार, श्रेयस वैद्य, शौनक जोशी, अपूर्व देवकर, अक्षय भोसले, प्रणव पाटिल आणि मी असे आम्ही २१ जण होतो.


Wednesday, 12 October 2022

B 70


 साधारण ५-६ ऑक्टोबर २०१२ ला मी एक ट्रेक करायला गेलो होतो. त्या ट्रेकला जाण्या अगोदर मला एक मोठा इव्हेंट आहे हे समजलं होतं. माझे दोन मित्र (अजिंक्य कानेटकर आणि दिनेश रुपारेल) त्या इव्हेंटला जाणार होते. मला त्यांचा अभिमान होता पण मनात कुठे तरी खंत होती त्या इव्हेंटला मला जाता येणार नसल्याची. अर्थात तिथे काम करायला जाणारी सगळी मातब्बर मंडळी होती. त्यामुळे उदास मनाने मी ट्रेकला गेलो. जाताना जरी उदास असलो तरी तिथे गेल्यावर मात्र ट्रेक एन्जॉय केला. ६ ऑक्टोबरला रात्री मी ट्रेक करून थकुन घरी आलो. सगळं आवरून झोपून गेलो. 

  दुसऱ्या दिवशी साधारण ११.०० - १२.०० वाजता माझा एक मित्र (खरं तर गुरू) दिनेश रुपारेल याचा फोन आला. त्याने फोन वर विचारलं, "सुदर्शन, एक इव्हेंट आहे. करशील का?" मी पुढचा मागचा कोणताही विचार न करता त्याला होकार देऊन टाकला. तो म्हणाला, "अरे पण कोणता इव्हेंट आहे? काय काम आहे? किती पैसे मिळणार? हे तर बघ". मी त्याला विचारलं, "तू तिथेच आहेस ना? त्याच इव्हेंटला यायचं आहे ना?" तो म्हणाला," हो". तेव्हा मी त्याला म्हणालो, "मग तर मी नाही म्हणूच शकत नाही. मला माहित आहे कोणता इव्हेंट आहे. पैसे कमी मिळाले तरी काही हरकत नाही". आम्ही दोघं हसलो. तो म्हणाला लगेच आवर आणि संध्याकाळ पर्यंत  रिलायन्स स्टुडिओ, फिल्म सिटीला ये. मी लगेच आईला सांगितलं एक इव्हेंट आला आहे. मला निघायचं आहे. लवकर जेवण वाढ. मी ४-५ दिवसांनी येईन. जेऊन लगेच निघालो. दुपारी लवकरच तिथे पोहोचलो. 

  सुदैवाने मी सगळे तिथे असतांनाच तिथे पोहोचलो. सगळे वाईंड अप करून निघायच्या तयारीत होते. वाईंड अप करून मी सगळ्यांबरोबर रेस्ट घ्यायला ऑफिसला गेलो. जिथे आमची राहण्याची सोय केली होती. थोडा वेळ आराम करून आम्ही सगळे संध्याकाळी ७.०० च्या आसपास परत स्टुडिओला गेलो. आम्ही सेट अप करून रेडी झालो. खालती स्टेजवर काही डान्सर्स डान्सची प्रॅक्टिस करत होते. थोडं या इव्हेंट विषयी सांगतो. हा एक डान्स इव्हेंट होता जिथे डान्सर्स ना (Aerial rigging) सेफ्टीची काळजी घेऊन वरून खाली उतरवायचे, वर घायचे किंवा त्यांच्या डान्स स्टेप्स होई पर्यंत हवेत हँग करून ठेवायचे. तर ह्या सगळ्याची तयारी करून झाल्यावर आम्ही जेवण करून घेतलं. रात्री साधारण १२.०० - १२.१५ वाजता डान्स कोरीओग्राफरने आम्हाला वॉकी टॉकीवर मिटिंगसाठी खालती येण्याचा मेसेज दिला. आम्ही सर्व कामं संपवून लगेच खालती गेलो. कोरीओग्राफरने स्टेजवर कोणता डान्सर कुठून खालती येणार अथवा त्याला कुठे हँग करायचं हे सांगितलं. मग तिथेच स्टेजच्या खालती आम्ही जमिनीवर बसलो. एका खुर्चीवर कोरीओग्राफर (मयुरी उपाध्याय - Nrutrutya Dance Company) आणि एका खुर्चीवर आम्ही ज्या कंपनीसाठी काम करत होतो त्या कंपनीचा मालक (अविष्कार तेंडले - Natura Aerial Rigging Company) असे बसले. कोणत्या क्षणाला कोणत्या डान्सरला खालती घ्यायचे कोणाला वर घ्यायचे हे गाणं ऐकत ऐकत आम्ही लक्षात ठेवत होतो.

  तेव्हढ्यात अचानक बाहेरून डोक्यावर टोपी, ट्रॅक सूट आणि ट्रॅक सूटच्या दोन्ही खिशात हात घालून सव्वा सहा फुटाचा तो कलाकार आला. ज्याला फक्त बघण्यासाठी मी या इव्हेंटला येण्यासाठी होकार दिला होता. जसा हा कलाकार आत आला सगळे उठून उभे राहिले. त्याला कोरीओग्राफरबरोबर काहीतरी बोलायचे होते. तो बोलायला गेला पण जेव्हा त्याच्या लक्षात आले आमची मिटिंग चालू आहे. त्याने क्षमा मागितली व तो बसण्यासाठी जागा शोधू लागला. बरेच जण त्याला बसण्यासाठी सोफा, खुर्ची शोधायला गेले. पण तोपर्यंत हा कलाकार आमच्या सारखा खाली जमिनीवर बसलादेखील. एवढा मोठा कलाकार पण आम्हा सामान्य लोकांबरोबर तो खाली बसला. त्याच्यासाठी नंतर सोफा, खुर्ची सगळं आणलं. पण तरी आमची मिटिंग संपेपर्यंत साधारण अर्धा तास हा कलाकार खालीच बसून राहिला. हा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून सिने सृष्टीचा शहेनशहा जो ८० च्या दशकाच्या सुरुवातीपासून ते आजतागायत सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय तो दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन. ज्यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिम्मित एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्याचं नाव होतं *B 70*. ज्यात त्यांच्या ७० सिनेमांचे मोठे पोस्टर लावले होते. तसेच पंडित हरिवंशराय बच्चन यांची एक प्रसिद्ध कविता *मधुशाला* वर २० मिनिटांचा डान्स होता. जी कविता खुद्द अमिताभजींनी गायली होती. त्यांना बघण्याचं माझं स्वप्न आज खऱ्या अर्थाने सार्थकी लागलं. कलाकार म्हणून अमिताभ जेवढा मोठा तेवढाच माणूस म्हणूनही. 

  आमची मिटिंग संपवून आम्ही वर आमच्या कामाच्या ठिकाणी गेलो. अमिताभ पण कोरीओग्राफरबरोबर बोलून थोडी प्रॅक्टिस करून निघून गेला. पहाटे ४.०० वाजता सगळं आवरून आम्ही आमच्या राहायच्या ठिकाणी झोपायला निघून गेलो. पुढचे दोन दिवस दुपारी आम्ही पुन्हा जेवणाच्या वेळेस स्टुडिओला जायचो. जेवण झाल्यावर आम्ही कामाला सुरुवात करायचो. रात्री साधारण पावणे दोनला अमिताभ बच्चन यायचे. ४.०० वाजेपर्यंत प्रॅक्टिस करून अमिताभ निघून जायचे. ९ तारखेला रात्री फायनल रिहर्सल होती तेव्हा सर्व डान्सर्स आणि अमिताभ यांनी एकत्र डान्स केला. दोनदा रिहर्सल केल्यावर सर्व डान्स टीम, मॅनेजमेंट टीम इतर सर्व अमिताभ बच्चन यांच्यासोबत फोटो काढून घेत होते. आम्ही बिचारे वाईंड अप करण्यात व्यस्त होतो. तेव्हा आमच्यातील खाली उभे असलेले सहकारी अविष्कारला म्हणाले आपल्या टीमचा पण फोटो काढायचा आहे. कोरीओग्राफरला सांगून आमच्या टीमचा पण फोटो काढण्यासाठी विचारणा केली. अमिताभ स्टेजवर होते आणि आम्ही खाली उभे होतो. जसा होकार मिळाला आम्ही स्टेजवर गेलो. जात असताना दिनेश भाई माझ्याजवळ येऊन म्हणाला, "सुदर्शन तू त्याच्या बाजूला उभा रहा. छान दिसेल लंबू टिंगू". का कोणास ठाऊक पण मला वाटत होतं की अमिताभजींने ते ऐकले असावे कारण दिनेश भाई एकतर एकदम हळू आवाजात बोलला नाही आणि त्याने असे म्हटल्यावर अमिताभजींनी मला वरून खालपर्यंत बघितलं आणि हलकीशी स्माईल दिली. पण मी काही त्यांच्या बाजूला उभं राहायची हिम्मत केली नाही. फोटो सेशन झाल्यावर आम्ही वाईंड अपचं काम संपवून निघून गेलो. 

  दुसऱ्या दिवशी म्हणजेच १० तारखेला प्रॅक्टिस नव्हती. रात्री ११.०० ला आम्हाला परफॉर्मन्स करायचा होता. पण गेस्ट एवढे जास्त होते की दोनदा परफॉर्म करायचं ठरलं. दुपारी सर्व तयारी करून आम्ही परफॉर्मन्सच्या वेळेची वाट बघू लागलो. परफॉर्मन्स व्यवस्थित झाला. डान्सर्सने सुंदर डान्स केला आणि आमच्या टीमने पण त्यांना उत्कृष्ठ सहकार्य केलं. गेस्टस असल्यामुळे आम्ही वाईंड अप करून वरतीच बसून राहिलो. प्रोग्रॅम संपल्यावर सगळं सामान गाडीत भरून ऑफिसमध्ये पाठवून देऊन आम्ही घरी यायला निघालो. घरी आल्यावर स्वप्नपूर्ती झाल्यामुळे सुखाने झोपलो.

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...