सह्याद्रीत भटकंती करताना अचानक काहीतरी असे सह्याद्रीचे वेगेळे रूप अनुभवायला मिळते की आपण ते आयुष्यभर विसरू शकत नाही... असाच हा माझा छोटासा ट्रेक जो माझ्या नेहमी स्मरणात राहील...
![]() |
| जगबुडी धरणावरून दिसणारे डोंगर |
कोठेही रस्त्याने एखादा डोंगर आगळा-वेगळा दिसला की लगेच गाडी उभी करून फोटो काढणे नाहीतर गाडी पार्क करून ट्रेक चालू करणे हा जणू काही माझा छंदच... डोंगराचे नाव माहित नाही की त्याचे वेगळे पण... असाच एक सुंदर ट्रेक नुकताच मी अनुभवला... डूबेरे ते ठांणगाव रस्त्याला लागून आणि डूबेरेवाडीपासुन ३ किमी अंतरावर एक सुंदर जोड-डोंगर आहे... गाडग्या डोंगर आणि कुडा डोंगर... हे सुदंर डोंगर मनात भरले ते दुरून दिसणाऱ्या डोंगरातील कपारी/गुहेमुळे... नेहमी माझ्या गावाकडे जाताना या डोंगरावरील गुहा माझ लक्ष वेधून घेत असत... या वेळी इथे जाण्याच्या निश्चय केला... मग काय पायथ्याशी असलेल्या घरापुढे गाडी उभी करून डोंगराच्या दिशेने निघालो... सकाळचे १० वाजले असावेत... रस्ता माहित नाही, कसं जायचं माहीत नाही, काय बघायला मिळेल माहित नाही... बरोबर ट्रेकची बॅग त्यात ४० फुटाचा रोप, पाणी, आणि थोडाफार सुखा खावू, हे नेहमीच बरोबर ठेवतो...
![]() |
| पायथ्या पासून दिसणारा गाडग्या डोंगर |
१५ मिनिटे चालत गेल्यावर धोतर घातलेले साठ-पासष्ट वयाचे बाबा ६-७ गाई घेवुन जाताना दिसले... डोंगराची माहित काढण्याचा प्रयत्न केला... "गाडग्या आणि कुड्या म्हणतात या डोंगरांना..." कुड्या डोंगराच्या दुरून दिसणाऱ्या गुहेचा रस्ता त्यानी मला सांगितला... माझी विचारपूस केली. मी_नाशिकला चालो होतो डोंगराच्या एका बाजुला गुहा दिसतात त्या बघण्यासाठी निघालो आहे. वेळ आहे तर फिरून येतो. "इकडे बिबटे असतात का बाबा" मी सहजच विचारले. बाबा म्हणे_ " ५ - ६ बिबटे आहेत या भागात. पण माणसाला काही नाही करत. शेळ्यावाले जातात शेळ्या घेवून तिकडे कुड्याच्या पोटाने."
डोंगर पाय वाट विचारून घेतली आणि सांगितलेली वाटेने निघालो. गाडग्या डोंगराच्या उंच कड्याखालुन वळसा घालुन पुढे दोन्ही डोंगरांच्या खिंडी मध्ये वाट येते. डोंगराला वळसा घालताना डोंगराचे मोठे कडे तुटुन खाली मोठे दगड पसरलेले दिसतात. त्यातूनच पाय वाटेने पुढे खिंडीत येतो. येथूनच काही अंतरावरच गुहा दिसतात. पुढे जाताना मनात बिबट्या असण्याची शक्यता येऊन गेली..
दोन्हीं डोंगरांच्या खिंडीत पोहोचलो. गाडग्या डोंगर मागे टाकत कुड्याच्या गुहेकडे निघालो... जाताना कानोसा घेत होतो काही आवाज येतो का... आवाज केला आणि गुहेत लांबूनच डोकावून पाहिलं तर कोणी नव्हत... मोठी नैसर्गिक आणि सुंदर गुहा... इथे कधी पावसाचं पाणी आत येत नाही म्हणुन शेळ्या जनावरे यांची विश्रांतीसाठी वापार होत असावा... जनावरांच्या मलमुत्राचा वास गुहेत पसरलेला... एक चुल पण मांडून ठेवलेली आहे...
![]() |
| नैसर्गिक गुफा - कुडा डोंगर |
दगडी चौथऱ्यावर बसुन गुहेच निरीक्षण करत बॅगेतील पाणी बॉटल काढून दोन घोट पाणी प्यालो... गुहेतील काही फोटो आणि बाहेर दिसणाऱ्या निसर्गाला मोबाईल मध्ये टिपत होतो... तेच शेळ्यांचा आवाज आला...
शेळ्या घेऊन एक पन्नाशीचा माणूस येताना दिसला... बाबा इकडे रोज येता का मी मुद्दाम गप्पांना सुरुवात केली... तुमचे नाव काय कुठे राहता मी विचारलं... बाबा म्हणाले - मी कारभारी जडगुले येथे खाली डुबेरवाडी जवळ राहतो आणि रोज इकडे शेळ्या घेऊन येतो... दोन्ही डोंगराबद्दल बाबा ला विचारले असता बाबा म्हणाले- कुडा/ कुड्या डोंगराच्या गुहेत आम्ही नेहमी विश्रांतीला थांबतो.. इथ तीन रंगाचे दगड, माती पाहायला मिळते... पश्चिमेला हात करत बाबांनी सांगितल की "ईकडे चालत गेलं दोन डोंगर ओलांडले की आडवाडी येते. या खालच्या नळीत आणि कड्याला बिबटे असतात. परवा एक बकरू बिबट्याने पळवल आणि काही दिवसापूर्वी कड्यावरून शेळी खाली फेकली. आणि त्या नळीत कपारीत खाली त्यांची जागा आहे." बाबाने हातात असलेल्या घुंगराच्या काठीने मला बिबट्याची असण्याची जागा दाखवली. पण बिबट्या माणसावर चाल नाही करत ऐकल्यावर थोड बर वाटलं.
" कुड्या डोंगराला लागुन ह्या गुहा निवाऱ्याठी चांगल्या आहेत डोंगर माथ्यावर बघायला काही नाही पण त्या गाडग्यावर जा तिकडे वर हौद आहेत." काय सांगता पाण्याची टाके आहेत वर? मी आश्चर्याने विचारले... बाबा म्हणाले _ "हा पण गाडग्यावर जायला आवघड आहे... दोन वाटा आहेत पण चढायला जमल पाहिजे.. गावाच्या कडून (उत्तर दिशेने) सोप आहे पण आट दहा फुटाचा कडा आहे आणि पश्चिमेकडू २५-३० फुटाचा अवघड कडा चढुन जावं लागतं... नवीन माणसाला नाही जमणार... आमच्या गावातले पोर जातात वरती." बाबा पुढे निघाले आणि मी त्यांचा निरोप घेत गाडग्या डोंगराच्या दिशेने निघालो... पुन्हा खिंडीत पोहोचलो... आता या खिंडीतुन दोन वाटा आहेत एक डोंगराला वळसा घालुन उत्तरे कडून वर चढणे आणि दुसरी वाट खिंडीतूनच वरती २५ ते ३० फूट वरती कड्यावर चढुण जाणे... कुड्या डोंगराकडे थोड वरती चढुन गाडग्या डोंगराच्या कड्याचा अंदाज घेतला... गाडग्या डोंगराचे काही फोटो घेतले... आणखी थोडे वर जावून कडा चढायला किती अवघड आहे बघितल...
![]() |
| खिंडीतून गाडग्या डोंगरावर जाण्याचा मार्ग |
आजवरच्या अरोहणाच्या मोहिमा बघता सहजच वरती जाऊ असे मनात आले आणि सुरु केली चढाई... तसा बॅगेत 30 फुटाचा रोप होता बरोबर... उतरतांना त्याचा आधार होणार होता... जवळपास ३० फुट वरती गेलो आणि सपाट भाग लागला... तेथेच तीन एका रांगेत ठेवलेले दगड दिसले इथे आधी बुरुंज असेल असे भासवत होते...
![]() |
| गाडग्या डोंगरावरून दिसणारा परिसर |
२५ फूट चालत गेल्यावर पहिले पाण्याचे टाके दिसले आणि पुढे आणखी एक टाके... बघताच खुप आनंद झाला... आजचा अचानक ठरलेला ट्रेक असा सुंदर असेल असे वाटले नव्हते... एक टाके चौरसा कृती १४ X १४ फुटाचे आणि ४ फुटा पर्यन्त खोली असावी... आणि दुसरे टाके काही प्रमाणात तुटलेले अर्धवट कोरलेले होते... पण पाण्यामुळे त्याची खोली आणि आकार अंदाज नाही करता आला.. आयता कृती आकार पण खोली काही लक्षात आली नाही... दोन्ही टाक्यांच्या कडेने गोल खड्डे आहेत... त्यात लाकडे रोवत असावीत... उत्तर दिशेकडे वाट आहे तर ती शोधण्याचा प्रयत्न केला... एका ठिकाणी तीन कोरीव पायऱ्या दिसल्या... लक्षात आले की हीच ती दुसरी वाट असेल... या डोंगरावरून सभोवतालचा परिसर खुप सुंदर दिसतो... डोंगरावर मोठी झाडे नाहीत... साबराची झुडपे सर्वत्र पहायला मिळतात. कड्याला लागून दोन पिंपळाची झाडे आहे.
पश्चिमेकडे आडगड उत्तरेस डुबेरगड आणि पूर्वेस सोनगड, पर्वतगड दिसतात. पूर्वेकडे कौल्या नावाचा डोंगर आहे. त्या डोंगरावर रिव्हर्स धबधबा बघण्यास मिळतो.. गाडग्या डोंगर टेहळणी साठी वापरात असावा आणि याचे स्थान महत्वाचे असेल. डूबेरगड, सिन्नर, आडगड आणि ठांणगाव यांच्या वाटेवर लक्ष ठेवणे येथुन सहज शक्य आहे.
तब्बल दोन तास उलटले होते हि भटकंती सुरू होऊन. आता गाडग्या डोंगर कडा उतरून खाली जाण्याचा प्रश्न होता. वरती आलो त्या वाटेने उतरण अवघड होत. मग दुसरा मार्ग शोधत हळू हळू खाली उतरत होतो. आता छोटा अवघड पॅच सात-आठ फुटाचा असेल. तिथे सुरक्षेसाठी रोप झाडाला यु केला आणि हळू उतरुन आलो.
तेथे पुर्वी पायरी मार्ग असवा पण कडा तुटल्याने तेथे रस्ता बंद झाला असेल. सहसा या डोंगरावर कोणी जात नाही हेच कारण असेल. तेव्हढा कडा सोडला तर डोंगर चढने उतरणे अवघड नाही. या डोंगराचा आकार एका मडक्या सारखा/ गाडग्या सारखा गोलाकार आहे म्हणुन याला गाडग्या म्हणत असावेत... डूबेरे गावापासून ३ किमी अंतरावर असलेला हा डोंगर गड असल्यास गिरी दुर्ग प्रकारातील किल्ला असावा की जेथून डूबेरगड, आडगड, पर्वतगड, सोनगड, सिन्नर यावर दृष्टिक्षेप टाकता येतो. तसेच ईतिहास काळात हा टेहळणी दुर्ग असण्याची दाट शक्यता आहे. डोंगराचा तसा काही ईतिहास वाचण्यात नाही. हा दुर्लक्षित गाडग्या डोंगर गाडग्यागड म्हणुन नाशिकच्या गडकिल्ल्यांच्या यादीत का असु नये असं सहजच मनात येवून गेले. या डोंगराचा ईतिहास कोणाकडे असेल तर नक्की कळवा.
असा हा सुंदर ट्रेक आणि आनंदी क्षण डोळ्यात मनात साठवुन नागमोडी वळणं पार करत झुडपातून पायथ्याशी आलो... दुपारचे साडे बारा वाजले... मग एकदा दोन्हीं डोंगराला डोळ्यात साठवून नाशिकच्या दिशेने निघालो...
स्थान आणि क्षेत्रफळ:
गाडग्या - अक्षांश: १९.७५१०१ आणि रेखांश: ७३.९६३११
क्ष- ६२३० चौ. मी.
कुड्या - अक्षांश: १९.७५०१८ आणि रेखांश: ७३.९६०६४
क्ष- ३२३०० चौ. मी.
पायथ्याचे गाव: डूबेरवाडी (कृष्णनगर)
शिवार: डूबेरवाडी, तालुका - सिन्नर, जिल्हा - नाशिक.
डूबेरगड ते गाडग्या डोंगर अंतर: ६ कि मी
आडगड ते गाडग्या डोंगर अंतर: ७ कि मी
🚶ट्रेक लेखन ✍️- भिमाशंकर सहाणे (३० जुलै २०२२)
मो. ९०९६९६५५९८
एक ट्रेक - गाडग्या आणि कुड्या डोंगराचा
![]() |
| सिन्नर बायपास हायवे वरून दिसणारा गाडग्या आणि कुड्या डोंगर |
http://bhimashankarsahane.blogspot.com/2023/05/blog-post.html












No comments:
Post a Comment