https://mazbhraman.blogspot.com/2018/01/blog-post.html
पाथरा घाट -आजा पर्वत माथा-गुयरीचा दरा
विजयादशमी झाली आणि वेध लागले ते सह्यांकनचे. चक्रम हायकर्सच सह्याकन म्हणजे पाच दिवस शिस्तबद्ध निसर्गाचा आस्वाद घेत सारे नियम पाळत केली जाणारी भटकंती. नाव लगेच नोंदवून टाकलं. डिसेंबर मध्ये होणाऱ्या या भ्रमंतीचा मार्ग खडतर होता
गुंडे गाव ( कोकण ठाणे जिल्हा) - पाथरा घाट- आजा पर्वत माथा(कुमशेत)-गुयरीचं दारा -डेहणे(कोकण)-करवली घाट-साम्रद-घाटघर(नगर जिल्हा)-कुलंग गड-छोटा कुलंग-गाढव घाट-लाधेवाडी (कोकण ठाणे जिल्हा)
आतुरतेने वाट पाहत प्रस्थानाचा दिवस उजाडला. दुसरी बँच हळूहळू चक्रम ऑफिसजवळ जमू लागली. थोड्याच वेळात बस निघाली गुंडेच्या दिशेने. रात्री दोनच्या सुमारास गावात आगमन झालं. एवढ्या रात्री देखील लांबा(विनय नाफडे सर),प्रणव ही टिम स्वागतास तत्पर होती. घराच्या अंगणात पथारी पसरली. व झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी पाचलाच जाग आली. सर्व विधी आटपत गरमागरम पोहे ढकलले. पाथरा घाट बऱ्यापैकी खडतर असल्याने भरपेट नाश्ता केला गेला. सगळ्या मुखड्यांची ओळख परेड झाली. वॉर्म अप झालं. तांबड बऱ्यापैकी फुटत होत.
| तेजोमय |
आदित्य हळूहळू वर येत होता. आजोबा आणि करंधा या उधळलेल्या रंगाच्या पार्श्वभूमीवर अधिकच खुलून दिसत होते. थोडं अंतर जीपनं कापायचं होतं. आता पायगाडी सुरू होणार होती. मध्येच रतनगड खुट्टा अलंग मदन कुलंग नी सुरेथ दर्शन दिलं. आमचे नेते अनुभवी भाऊ सह्याद्रीतला वाटाड्या म्हणून ओळख असणारे. व महेश. थोडं अंतर चालल्यानंतर दोन वाटा फुटतात एक बऱ्यापैकी मोठी इथे चुकण्याचा संभव. मोठ्या वाटेने न जाता उजव्या हाताची वाट धरावी आजोबा डाव्या बाजूस ठेवत. इथपर्यंत वाट दाखवत लाम्बा व प्रणव पुनः कैंप कडे फिरले.
| आजोबा व सीतेचा पाळणा डावीकडे सुळका |
पठारावर जाताच सीतेचा पाळणा सुळक्याने दर्शन दिलं. पुढे जाऊ तसं हा भाग दिसत नाही. मध्ये दोन ओढे ओलांडत वर चढाई केली. तेवढ्यात शिट्टीचा आवाज कानी पडला. तत्पर महेशनी लगेच हेरलं की मधुकर हरवलाय आवाजाच्या दिशेने लगेच शोधण्यात आलं. या घाटात मनुष्यवावर फारच कमी असल्याने काळजी घ्यावी लागते. सहज वर लक्ष गेलं तर पाथरा माथ्याची बेलाग कातळधार नजरेस पडली. बरीच मजल मारायची होती. पुढचा टप्पा गवताळ वळणदार चढाईचा. हा टप्पा काळजीपूर्वक पार करत ओढ्यापाशी आलो. विसाव्यासाठी थांबलो. पुढची वाट ओढ्यातून पुढे सरकत होती. मोठ मोठाले दगड कसोटी पाहण्यास त़यार होते. हाता पायांचा वापर करत माकडयुक्त्या योजत चढाई सुरू झाली.
काहीशी थकवणारी. तिथून दूर उंचावर टेपाड दिसत होत. तिथवर पोचायच होतं. मोठमोठाल्या दगडातून बाजूला होत उजव्या बाजूच्या वाटेवर मोर्चा वळवला. हि चढाई देखील फार सोपी नव्हती. घसरड्या मुरम ,बारीक खडी दगड माती यावरून नेटानं पुढे सरकत होतो. अशी सगळी कसरत करत पाथरा खिंडीत पोहोचलो. पुढे तर वेगळचं प्रकरण वाढून ठेवलं होतं. घसरड्या ,भुसभुशीत मातीवरून अरूंद वाटेवरून खडी चढाई. एव्हाना नारायणराव माथ्यावर आले होते. आतापर्यंतच्या चढाईने घामटा काढला होता. घशाला कोरड पडली होती. शरीर घामेजले होते. वाटेत एकही झाड नाही. पाथराने आपले राखून ठेवलेले रंग दाखवण्यास सुरुवात केली.
| डोळे गरगरुन टाकणारी दरी |
एवढ्याश्या वाटेवर पाय रोवत चढत होतो. खाली छाती दडपून टाकणारी खोल दरी. तोच समोर कातळटप्पा आला. होल्ड्स बऱ्यापैकी आहेत. चक्रमच्या टेक्निकल टिमने दोर लावून सुरक्षित केला होता. हा टप्पा मात्र सावधपणे पार करावा लागतो. हा टप्पा संपतो न संपतो लगेच जेमतेम पाऊल मावेल असा ट्ँव्हर्स. खाली भयावह दरी. चढून वर आलो तरी परीक्षा काही संपत नाही. भुसभुशीत माती गवत पार करत चढायचं. पुढे कोकम सरबत घेत क्षीण दूर केला. ताजतवानं वाटलं. पुढील वाटचाल सुरू झाली. येथून नाफ्ताच दर्शन झाल. वर चढताच कातळाला अरुंद वाटेने एक वळण घेतलं. पुढे जेमतेम पाऊल मावेल असा ट्रँव्हर्स. पाय हळूहळू सरकवत हा टप्पा पार करावा. खाली पाहील तर भयकाप उडवणारी दरी. इथे अडकलो. एम.बी नी लगेच हात देत सोडवल. श्वास वाढला. पुढे पायऱ्यासदृश्य वाट माथ्यावर घेऊन जाते. वर गेल्यावर पाथरा पार केल्याचा आनंद साऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पोटपूजा करत कँपसाईटवर पोहोचलो. येथून आजाेबा करंडा यांच सुरेख दर्शन होत होतं. शमांगी प्रणव यांनी स्वागत केलं. सूप व जेवणावर ताव मारत झोपी गेलो. थंडीचा पारा चांगलाच वाढला होता. पहाटे जाग आली ती कोल्हेकुईने. तयार होत आजोबा सर करण्यास सरसावलो.
| आजा पर्वत |
आजोबा पायथ्याशी भूसलख्खन झालय त्या मातीच्या ढिगाऱ्यातून वाट काढत पुढे निघालो. वाटेत झाडझुडपं. छोटे छोटे कातळटप्पे दगड पार करत उजव्या बाजूस भला मोठा ट्रँव्हर्स मारत पाण्याच्या कुंडापाशी आलो. क्षणभर विश्रांती घेत पुढे निघालो. गतवर्षी केलेल्या आजोबाच्या आठवणी ताज्या झाल्या. अजूनही बऱ्यापैकी चढ बाकी होता. आजोबाच तो. सहजासहजी थोडचं शक्य आहे? आता खडी चढण आणि दगडमातीचा घसारा. पाऊलं रेटीत काठीच्या जोरावर वर यायचं. चढणाऱ्याला बाजूच्या कारवीचा काय तो आधार.
| घसारा |
माथ्यावर येताच लख्खपणे दिसणारे रतनगड,खुट्टा कळसुबाई,त्रिकुट अलंग मदन कुलंग सांधण दरी डोळ्यात साठवल. उतराईस सुरूवात झाली. उतरताना पावल बऱ्यापैकी रोवत उतरावं नाहीतर घसरगुंडीच. दिड दोन तासात खाली उतरलो. जेवण वाट पहात होतं. पाण्याच्या ठिकाणी जेवण करत पाणपिशव्या भरून घेतल्या. कारण गुयरीच्या दारातून डेहणेपर्यंत पाणी नाही. आजोबा व करंधा यांच्यामधून दिसणारी व्ही आकाराची घळ म्हणजे गुयरीच दार.
| व्ही आकारात गुयरीचा दरा आजोबा आणि करंडा च्या मध्ये |
दारात पोहोचेपर्यंत जंगलवाट. मागे आजोबा करताना प्रसादने दाखवली होती. त्या घळीतून खाली निरखलं पार दूरवर कोकण दिसत होतं दाऱ्याघाटासारखं. गावकरी काही प्रमाणात वापरतात. ट्रेकर्स जवळपास नाहीच. घळीत उतरलो. ट्रेक पोल बँगेत टाकला.
| गुयरीचा दरा |
मोठमोठ्या दगडांवरून चालण्याची कसरतच होती जणू. भलीमोठी बँग सांभाळत दोन दगडांचा आधार घेत पार होणं. कधी बसत पाय सोडत उतरण. कधी दगडाकडे तोंड करून उतरणं. काही ठिकाणी फारच काळजीपूर्वक उतराव लागत होतं. दगड घसरत होते. त्यात तीव्र उतार. तोच वीस एक फुटांचा कातळटप्पा लागला. येथे प्रसादने दोर लावत सुरक्षित केला होता. खाली मंगेश मार्गदर्शन करत होता. हा टप्पा व्यवस्थित पार केला. तरी दगड काही पाठ सोडेनात. पण थंडगार सावलीचा दिलासा होता. तीव्र उतार उतरल्यावर एक वाट डावीकडे जंगलात जाते. ती धरावी. मागे वळून पाहीलं तर करंधा चमचमत होता. हा थोडा जंगलटप्पा. तरीही काही ठिकाणी उतार होताच. तंगडतोड करत पुन्हा उजवीकडे पाण्याच्या वाटेत आलो. पुन्हा दगडांशी मुकाबला. थोडं अंतर कापत उजवीकडे लहानशा वाटेवर चढलो. पुन्हा जंगलवाट. आता मात्र पावलांचा वेग वाढला. अंधारायच्या आत गावात पोहचणं गरजेच होतं. तितक्यात तीव्र उतार घसाऱ्याचा टप्पा आ वासून उभा होता. इथे शूज ला ब्रेक लावत काठीचा आधार घेत आस्ते जावं. हा टप्पा संपतो न संपतो गवताचा घसारा सुरू. तीव्र उतार पाठ काही सोडत नव्हता.
| घसरगुंडी शेवटचा टप्पा |
काळोख पडायच्या आत हा टप्पा सुखरूपपणे खाली उतरलो. डेहणे कँप टिम सरबत घेऊन तयार होतीच. ताजतवानं होत डेहणेची वाट धरली. सपाटीची वाट असल्याने पायांना आराम होता. टॉर्च लावाव्या लागला.नदी काठाने चालत दिड एक तासात डेहणेत आलो. गावातली लोकं पाथरा चढून वर गेलो म्हणून तोंडात बोटं घालत होती. तब्बल १२ तासांची चाल झाली होती. मैत्रीने बनवलेल गरमागरम सूप पोटात जाताच गुयरी उतरतानाचा थकवा निघून गेला. डेहणे छोटसं टुमदार असं गाव. सह्याद्री रांगानी वेढलेलं. सूप पिताना लांबाचे ट्रेकिंग नुस्खे ऐकले. लाम्बा म्हणजे अगदी खेळकर माणूस. थोड्याच वेळात पोटोबा करत झोपी गेलो. दुसऱ्या दिवसाची सांगता झाली.
| कुमशेत छावणी |
घाटमाथ्यावरील गाव: कुमशेत
घाटमाथ्यावरील गाव :कुमशेत
श्रेणी:कठिण
लागणारा अवधी : ६ते ७ तास
पाथरा घाट व गुयरीचा दरा काही नोंदी:
- नवख्या ट्रेकर्सनी शक्यतो टाळावा
- अनुभवी ग्रुप सोबत करावा
- शारिरीक व मानसिक तयारी हवी
- गरज पडल्यास दोराचा वापर जरूर करावा
- पाण्याचा पुरेसा साठा सोबत घ्यावा
- पाथरा घाटच्या वाटा कठिण आहेत पण अशक्य नाहीत माती भुस भुशीत व घसारा असल्याने थोड्या अवघड आहेत घाबरून न जाता सावधपणे पार करावा.
आजा पर्वत माथा :
पायथ्याच गांव:कुमशेत
श्रेणी:मध्यम
लागणारा कालावधी : ४:३० ते ५ तास (चढ़ाई+उतराई )
पायथ्याला पाण्याची सोय आहे. वर चढताना मधे पाणी साठा आहे.
विशेष आभार :चक्रम हाइकर्स
(क्रमशः )
मंतरलेले पाच दिवस (सह्यांकन २०१७) भाग २ रा
तिसरा दिवस उजाडला. डेहणे गावातील प्रसन्न सकाळ. कालच्या गुयरीच्या
दाराने फारच दमछाक केली होती. पायांवर बऱ्यापैकी ताण आला होता. पण
रात्रीच्या सुखद झोपेमुळे टवटवीत होत करवली घाट चढण्यास सज्ज होतो. काही
जणांनी काही कारणास्तव मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला. काही जणांना घाट
चढण्यास तयार केलं. चहा पोहे चा कार्यक्रम आटपत डेहणे छावणीचा निरोप घेतला.
काही छावणी लीडर्स सोबत होते. डांबरी सडकेने चालण्यास सुरूवात केली. भल्या
थोरल्या आजोबानं दर्शन दिलं. बरेच ट्रेकर्स वाल्मिकी आश्रमापर्यंत जातात
ते डेहणे गावातूनच. काल कुमशेत मधून केला तो आजा पर्वत माथा. कच्च्या
सडकेवर आलो. रतनगड व खुट्टा डोक वर काढत होते. सोबत जाणते ट्रेकर संजय जोशी
काका होते. त्यांच्यासोबत गप्पा मारत पाय चालत होते. त्यांच्यावेळच
ट्रेकिंग व आताच बदललेल ट्रेकिंग यावर गप्पा चालल्या होत्या. बराच अनुभव
त्यांच्या गाठीशी आहे. ते इतके नशीबवान कि गोनीदा त्यांना त्या काळी अनेक
गडकिल्ल्यांवर भेटले. आणि गोनीदांकडून गडकिल्ल्यांचं वर्णन ऐकण त्याहून
दुसरं सुख काय असणार? वाटेत नदीचं पात्र पार कराव लागतं. मागे पावसात आलो
तेव्हा पाण्याचा प्रवाह फारच होता. तेव्हा दुथडी भरून वाहणारी ही नदी आज
फक्त तळाचे दगड गोटे दिसत होते. खडखडाट. पाहून मन विषण्ण झालं.
कोकणातल्या नद्यांच तसचं पावसात दुथडी भरून वाहणार त्यानंतर खडखडाट. असो. नदीपर्यंत सोडायला आलेल्या डेहणे कँप स्वयंसेवकांचा निरोप घेतला. व पुढे निघालो. नदीच्या काठाकाठाने जाणारी वाट. फुलत जाणारी सकाळ. मंद गार वारा शरीरास हवाहवासा वाटणारा एकूणच प्रसन्न करणारा माहोल. रानातली वाट. याआधी हि वाट केल्यामुळे ओळखीची वाटत होती. फक्त पावसात पुरूषभर उंचीच्या माजलेल्या गवतातून वाट काढायची एवढाच काय तो फरक.कानी गुंजणारा पाखरांचा किलबिलाट सोबत होताच. पुढून एक ट्रेकर्सचा ( म्हणणं वावग ठरेल कदाचित) समूह मोबाईलच्या दणदणीत आवाजासहित येत होता. सांधण मारून आले होते कदाचित. मनात प्रश्न आला शहरात राहिलेल्या माणसाला शांतता सहन होत नाही का? गोंगाटाची इतकी सवय झालेय का? शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न. ट्रेकिंग फोफावतय हि गोष्ट चांगली आहे. पण जबाबदारपणाची कुठेतरी उणीव भासते. आमच्या बोलण्याने त्यांनी बंद केलं खरं. असो. पुढच्या टप्प्यावर सह्याद्रिचा एक भव्य नजारा समोर आला. उजवीकडे आकाशात झेपावलेला बाण सुळका मागे खुट्टा व रतनगड.
थोडं अंतर कापताच एका बाजूला काळाकभिन्न साम्रदकडा. या कड्यावरून पावसात पाणी असं काही कोकणात झेपावत ही हे दृश्य त्याचा रोरावणारा आवाज कानात साठवत पहात रहाव. ओढा पार करत साम्रद दिशेत निघालो. एक वाट बाण सुळक्याकडून सांधण दरीत जाते. आम्हाला साम्रद घळीत जायचं होतं. डावीकडची वाट धरली. खडी चढण चढत पहिल्या कातळटप्प्यावर आलो. दोराची गरज भासली नाही.( पावसात लागतो). पाण्याच्या ठिकाणी क्षणभर विश्रांती झाली. इथून पुढे मात्र खडा चढ. मागे वळून पाहीलं तर आजा पर्वत धीरगंभीरपणे पहात होता. सीतेचा पाळणा सुळकाही खूलून दिसत होता.
वाटेवर सावली असल्याने झपझप चालत होतो. एक अर्ध्या तासात दुसरा
कातळटप्पा उभा ठाकला. याला व्यवस्थित होल्ड्स आहेत. तरीही काळजी घेत
चढावं.
| दुसरा कातळटप्पा |
वर चढत डावीकडे वळत पठारावरून साम्रदची वाट धरली. पुन्हा रतनगडाने व
पुढे AMK रांगांनी दर्शन दिलंच. गाव नजरेच्या टप्प्यात आलं. घरं दिसू
लागली. पर्यटकांच्या गाड्यांची गर्दी होती. जणू काही साम्रदला जत्रेचं
स्वरूप आलं होतं. तीन चार वर्षापूर्वीच साम्रद आता खूपचं बदललय.
गावकऱ्यांच्या हाती रोजगार आलाय. विकास होतोय. पण जाणीवपूर्वक पर्यटन
नक्कीच झालं पाहिजे.
साम्रदला लवूच्या घरी पाहूणचार झाला. इथून पुढे घाटघरचा प्रवास.
कधीही कुठेही कुणाचीही फिरकी घेणाऱ्या बोलक्या अनिता काकू व काही सहकारी
मुंबईत परतणार होते. त्यांची उणीव नक्कीच भासणार होती. घाटघरकडे चालत
निघालो. मध्ये जंगलवाट. पूर्ण वाटेवर अलंग मदन कुलंग हे त्रिकुट मनास भावत
होत. त्यानंतर पक्की सडक पुन्हा जंगल परत सडकेवर. चालताना भाऊंनी एक सुंदर
अस सौन्दर्य स्थळ दाखवलं ते म्हणजे उंबरदरा मुख्य रस्त्यापासून हाकेच्या
अंतरावर. येथून कोकणातल्या घाटघरच्या धरणाचं अफलातून दृश्य दिसत. याच
भागातून चोंढ्या घाट थेट कोकणात उतरतो.
| उंबरदरा |
इथून बाहेर पडत घाटघरची वाट धरली. वाटेत आणखी एका सौन्दर्यस्थळाने
स्वागत केलं. घाटघर धरण. सह्यरांगांनी वेढलेला असा हा घाटघर जलाशय. धरणाचं
पसरलेलं शांत निळंशार पाणी. मागे अलंग मदन कुलंगची रांग. त्यांचं पाण्यात
पडलेलं लोभसवाणं प्रतिबिंब. पाय हलेचनात जागचे.
| घाटघर जलाशय |
करवली/करोली घाट
पायथ्याचं गाव: डेहणे
घाटमाथ्यावरच गाव: साम्रद
श्रेणी :मध्यम
लागणारा कालावधी: ५ ते ६ तास
आभार: चक्रम हायकर्स
क्रमश:
मंतरलेले पाच दिवस (सह्यांकन २०१७)भाग ३ रा
| सह्याद्रीचे रांगडे गडी |
पहाटे पाच ला गजर वाजला. गारठ्यामुळे स्लिपिंग बँगच्या बाहेर
पडावस वाटत नव्हत. बाहेर आलो. सुटलेला गार वारा बोचकारत होता. कुडकुडत
सगळी कामं आटपत घाटघर छावणीचा निरोप घेत कुलंगकडे प्रस्थान केलं. बऱ्यापैकी
फटफटल होतं. पूर्वेस नारायणरावांची वर येण्याची घाई. विहीरीवर बायांची
लगबग.
| पाणी भरण्याची लगबग |
| रतनगड खुट्टा |
| कुलंगकडे प्रस्थान |
| तेजोमय सकाळ |
समोर दिसणाऱ्या AMK कडे नजर ठेवत चालू लागलो. दूरवर रतनचा खुट्टा अस्तित्व दाखवत होता. तासभर सपाटीवर चालल्यावर आता मात्र चढण दमवणारी कानात सू सू करणारा सुसाट वारा थोडफार कठिण करत होता. बॅग सांभाळत नेटानं वर गेलो. खाली घाटघर जलाशयाचं पाणी चमचमत होतं. एक पठार बघून थोडी विश्रांती झाली. येथून अलंग मदनची खिंड अधिकच स्पष्ट दिसू लागली. जणू काही लवकर येण्याचं निमंत्रण देत होती. आम्हाला खिंड गाठायची होती.
| गवताळ टप्प्याची भर्राट वाऱ्यासोबत चढाई |
| चमकणारा घाटघर जलाशय |
| अबब केवढी बॅग.... सामंत काका |
यू आकारात पसरलेला अलंग बलाढ्य भासत होता. बरीच मजल मारायची होती. जाता जाता उजव्या बाजूस अलंगच्या शिड्या दृष्टीस पडतात. या शिड्यांवरूनही अलंगला जाता येतं. भाऊंनी सांगितल १९९९ ला सह्यंकनचा मार्ग होता. पुढे पाण्याच्या ठिकाणी पाणी भरून घेतलं कारण वर पोहोचेपर्यंत मध्ये पाणी नाही. इथून एक वाट शिड्यांकडे घेऊन जाते. जंगलवाटेने पुढे जाताच कातळटप्पा लागला. त्यानंतर पुढे बऱ्यापैकी मोठा ट्रँव्हर्स. दगड धोंड्याच्या खड्या चढणीतून अलंग व मदनच्या खिंडीत पोहोचलो एकदाचे. अलंग व मदन मल्लांसारखे आव्हान देत उभे होते. अवाढव्य अलंग व मदनची सरळसोट काळी भिंत. कुलंग छावणीवरून सुर्या, सुदर्शन आणि सहकारी आवळा सरबत घेऊन प्रतिक्षेत होते. या खिंडीतून अलंग व मदन वर चढाई करता येते. पण आम्हाला गाठायचा होता कुलंग. भोपळ्याचे घारगे व आरोग्यदायी सरबत घेत मदनाला वळसा मारत निघालो. एका बाजूला मदनाची भिंत व दुसऱ्या बाजूला चक्रावून टाकणारी दरी. तोल सावरत बारीक दगड माती मिश्रित वाटेवरून पुढे सरकत होतो. हे कमी कि काय मदन च्या शेवटी ऐंशी अंशातला घसारा. हा टप्पा दोर लावून सुरक्षित केला होता.
| Add caption |
| घसाऱ्यावरची कसरत |
सावकाशपणे खाली मदन आणि कुलंगच्या खिंडीत उतरलो. आता कुलंग व्यवस्थित दिसत होता. अद्याप पायऱ्या दूरच होता. ट्ँव्हर्स काही पाठ सोडत नव्हता. काट्याकुट्यातून ,कधीतरी भितींचा आधार घेत बुटाने वाट जोखत पुढे जायचं. M1 M2 दिसत होते. कडे कडेने चालत एकदाचे कुलंग पायऱ्यांपाशी पोहोचलो. नजर भिरभिरली ती कुलंगच्या माथ्यावर. पूर्ण उभी चढाई होती.
| स्टॉक कांगरी सर केलेले उत्साही श्रीधर सर (अण्णा ) |
उत्साहाने पण थोडी काळजी घेत खोबण्यांचा आधार घेत वर सरकत रहाव. या पायऱ्या म्हणजे आविष्कारच आहे. विशेष म्हणजे इंग्रजांच्या तोफांच्या तडाख्यातून या वाचल्या. या पायऱ्या सोप्या जरी असल्या तरी संपता संपत नाहीत. पार दमछाक करतात. बाजूला कातळात कोरलेल्या गुहा दिसतात. विसाव्यासाठी बसाव थोडा वेळ पाणी प्याव व पुन्हा भिडावं पायऱ्यांना. थोड्याच वेळात प्रवेशद्वार दिसू लागतं. गडमाथा जवळ आला थोडं बरं वाटतं. कमान नसलेलं महाद्वार थोडं खिन्न करतं. पण त्याची ठेवण व बांधकाम पाहून मन अचंबित होतं. वर आल्यावर भलंमोठं कुलंगच पठार. स्वागतासाठी कुलंग छावणी टिम. भूक सपाटून लागली होती. फ्रेश होत गुहेत पानावर बसलो. पोट भरलं. थकलेली शरीरं गुहेच्या थंडाव्यात पहुडली. उन्ह कलताच चहा घेत आदित्यसोबत सारे गडफेरीसाठी बाहेर पडले. कुलंगच पठार भव्य आहे. पाण्याच्या टाक्यांच्या शृंखलाच आहेत. पूर्वेकडे आलो. आजोबा रतनगड कळसुबाई, समोरच मोठ्या पिंपासारखा मदनगड व यू आकारात पसरलेला अलंगचा विस्तार हा सगळा सह्यपट उलगडला होता. ह्या पटावरील अलंग व मदन या राजांना कुलंगच्या माथ्यावरून कुर्निसात केला.
| अलंग आणि मदनाचा भव्य नजारा |
| बंधारा |
थोडं खाली येत बंधाऱ्यापाशी आलो. पाण्याचं नियोजन करण्यासाठी
केलेली रचना, गोमुख(आता फक्त अवशेष) पाहून निव्वळ थक्क व्हायला होतं. आखीव
रेखीव असा हा बंधारा. पावलं वळली पश्चिमेकडे. मध्ये भग्न राजवाड्याचे
अवशेष. या साठी वापरलेल्या विटा नीट निरखल्या. मावळतीकडे क्षितिजावर नजरा
खिळल्या. बरेच विचार मनात सतावत होते. पडक्या वाड्याचे अवशेष गुढतेत रमायला
भाग पाडतात. हे वाडे पाण्याच्या टाक्या पाहून बऱ्यापैकी राबता होता असेल
त्या काळी. सुखाचे भरभराटीचे दिवस पाहिले असतील या गडाने. बराच काळ गेला.
कालाय तस्मैः नमः आणि काय. उदया सर करायचा समोरचा छोटा
कुलंग नीट पाहून घेतला. भाऊंनी सांगितल सूर्य मावळतीला जातोय उजव्या
बाजूला कावनाई गड दिसेल. आणि खरचं वातावरणामुळे पुसट का होईना कावनाईनं
दर्शन दिलं. भाऊंच्या अनुभवाला दाद द्यावी तेवढी कमीच. खाली भावली धरणाचं
पाणी दिसत होतं. दिनकराने निरोप घेताच गुहेकडे निघालो. नुसताच भोज्जा न
करता वेळ काढून पाहिल्यास कुलंग काय चीज आहे हे नक्किच कळत.
| राजवाडा अवशेष |
| निरोप |
| कुलंग छावणी |
अंधार पडू लागला. गडावर सरपटणारे प्राणी, विंचू असल्याने काळजी
घ्यावी. कुलंगवरचा हा शेवटचा मुक्काम उद्या सह्यांकन संपणार. प्रशस्तिपत्रक
व सह्यांकन अनुभव कथन झालं. चक्रमच्या शिरस्त्या प्रमाणे "बडा खाना" चं
आयोजन होतं. छोले पुरी पुलाव सार ,गुलाब जामुन असा साग्रसंगीत बेत होता.
विलास काका व बाकिचे आग्रहाने वाढत होते. पानावरून उठूच देत नव्हते. अनिकेत
चे शब्द आठवले "बडा खाना" साठी तयार रहा. खरचं होतं ते. शेवटी तब्बल सात
गुलाबजामुन खात पटकन उठलो नाहीतर दशकपूर्ती झाली असती. बडा खाना जरा जास्तच
झालं. पाय मोकळे करण्यासाठी गुहेच्या वर आलो. रात्रीची निरव शांतता.
नभांगणी चांदण्या. खालच्या गावातील लुकलुकते दिवे. शांत झोपलेलं गाव.
रात्रीचा कुलंग वेगळाच भासत होता. तंबूत झोपी गेलो. पाचवा व निरोपाचा दिवस.
कुलंग छावणीचा निरोप घेतला. रात्रीच्या बडा खाना अन्नदात्यांना सुखी भव
म्हणत पायऱ्या उतरण्यास सुरूवात केली. सकाळच्या सोनेरी सूर्यप्रकाशात अलंग
मदन न्हाऊन निघाले होते. कळसुबाई शिखर उजळून निघालं होत.
पायऱ्या संपल्या. उजव्या हाताला पूर्वेला मदन कडे वाट जाते. समोरील वाट कुरंगवाडीत उतरते. आणि डाव्या बाजूची पश्चिमेकडची वाट छोट्या कुलंगकडे. आता मोर्चा वळवला तो छोटा कुलंगकडे. भल्यामोठ्या कुलंगला वळसा घालायचा होता. मध्येच अरूंद वाट. दगडधोंड्यानी भरलेली वाट,मुरमाड वाट काटेकुटे असं दिव्य पार करत कुलंग आणि छोटा कुलंगच्या बेचक्यात आलो. आता छोटा कुलंगची चढाई. वाट,पायऱ्या नव्हत्याच मुळी. सरळसोट चढाई. कातळारोहण करावे लागणार हे नक्की होतं. दोर बांधला होता. तीन ठिकाणी चक्रमच्या क्लायबिंग टिमने लाकडाच्या बेचक्याचा वापर करून अफलातून शिड्या केल्या होत्या.मात्र या पक्क्या केलेल्या नाहीत.
| छोटा कुलंग थरारक चढाई |
थोडीफार चढाई सोपी झाली. सावधपणे वर चढत होतो. काही ठिकाणी दगड घसरत होते. छोटीशी चूक महागात पडणार होती. सोबत टिम होतीच. शेवटच्या टप्प्यात मोठी शिळा अडकल्याने चिमणी तंत्राने चढाव लागत. म्हणजेच पाठ टेकत व पायाने आधार घेत वर यायचं. वीस एक मिनिटात गडमाथा गाठला. छोटा कुलंगवर पहाण्यासारख असं काहीच नाही. येथून कुलंगचं अफलातून दर्शन होतं. उपमा पोटात ढकलत काळजीपुर्वक खाली उतरलो. खाली गावात उतरता आलं असतं पण चक्रमचा शिरस्ता आणि त्यात सह्यांकन आणखी एखादी घाटवाट होऊन जाऊदे गाढवघाटाने खाली कोकणात उतरायचं होतं. छोटा कुलंग व गाढवघाट बोनस होते. आदित्य,तन्मय,श्रीकांत,चंदरमामा आम्हाला पुढच्या वाटेवर सोडायला आले. पुन्हा तोच सिलसिला. छोट्या कुलंगला वळसा, डावाकडे दरी, झाडाझुडपातून मुरमाड मातीची वाट घसारा. हि वाट वापरात नसल्याने थोडी बिकटचं. एव्हाना उन तापू लागलं. ट्रँव्हर्स संपला आता तीव्र घसरडीचा टप्पा. हा टप्पा पार करत बऱ्यापैकी खाली आलो.
| सरदारजी च्या वेशात वाटाड्या चंदर मामा |
| घसरड ..... केवळ घसारा |
गाढवघाटाने न जाता उजवीकडे पाण्याच्या ठिकाणी जेवण आटपल. दुपारचे दोन वाजले होते. थोडा आराम करत पुन्हा पायपीट सुरू झाली गाढवघाटाच्या दिशेने. आदित्य व टिमने निरोप घेतला व ते कुलंगकडे परतले. आमच्यासोबत चंदर मामा होते. झपाट्याने खाली उतरत होतो. वाट तशी बिकटच आहे. मध्ये एक सोपा कातळटप्पा उतरत ओढ्यात आलो. समोरील टेपाडावर चढलो. थोडं सपाटीवर चालत खाली उतरताच गाढवघाटाच्या मुखाशी पोहोचलो. पार दूरवर कोकण दिसत होत. येथे चढल्यावर/उतरताना गाढवासारखं खाली बघितलं जात म्हणून गाढव घाट इति चंदर मामा. याला पोखेरीचा दरा असही म्हणतात मामांनी माहिती पुरवली. डोंगर पोखरला गेल्यामुळे असेल कदाचित. या वाटेला आम्हाला लावत चंदरमामा माघारी परतले. ही वाट पहाताच गुयरीचा दरा आठवला त्यामानाने सोपी. दगड, धोंडे, उतार होताच. उन चांगलच तापलं होतं. सह्यांकनचा हा शेवटचा टप्पा. खाली झाडोरा दिसत होता. झपझप उतरत झाडीत शिरलो. थोडं हायसं वाटलं. मध्ये थांबत चाल सुरू ठेवली. पठारावर आलो. सपाटीवर चाल. खाली लादेवाडी दिसू लागली. खाली पिनाक व लांबा जीपा घेऊन तयार होतेच. पाच दिवसाची मोहीम संपली होती पण मन मात्र रेंगाळत होत ते सह्याद्रीच्या बाहुपाशात.
खरंच पाच दिवस मंतरलेले होते. एक वेगळ्याच प्रकारचं समाधान होत. सह्यांकन ने २०१७ च्या भटकंतीला चार चाँद लावले. सहसा वापरात नसलेल्या वाटा ,खडतर,कठीण मार्ग. बऱ्याच ठिकाणी कातळटप्पे घसारा , निसरडा रस्ता , पाच दिवसांच पाठीवर ओझं . पण चक्रम टिम ,आमचे नेते व सर्व सहभागी एक से बढकर एक दणकट असल्याने हि यात्रा सुफळ संपूर्ण झाली.
काही नोंदी:
- घाटघर ते कुलंग लागलेला वेळ ६ ते ७ तास(विश्रांतीसह)
- कुलंग ते छोटा कुलंग साधारण तास ते दिड तास
- गाढवघाट चार ते पाच तास
- वाटेवर बऱ्याच ठिकाणी घसारा ,निसरडे कातळटप्पे असल्याने अनुभवी टीम व सुरक्षित साधनांसह जावे.
- शारीरिक व मानसिक बराच कस लागतो. तेव्हा शारीरिक व मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त असणे महत्वाचे.
- कुलंगकडे व छोटा कुलंगकडे जाताना वाटेत मधमाशांची पोळी आहेत. सावधगिरी बाळगावी.
आभार :चक्रम हायकर्स

No comments:
Post a Comment