Tuesday, September 26, 2023

सैर माथेरानची

 https://mazbhraman.blogspot.com/2018/08/blog-post.html

 व्हाया माधवजी पॉईंट


माथेरान म्हटलं की आपल्यासमोर येत ते थंड हवेच ठिकाण ,पर्यटन स्थळ, माथेरानची राणी घोड्यावरील रपेट. पण आम्हा भटक्यांना मात्र माथ्यावर घेऊन जाणाऱ्या घाटवाटा धुंडाळण्यातच आनंद मिळतो. मागच्याच आठवड्यात दिवासोबत केलेल्या माथेरान व्हाया गार्बेट पॉईंटच्या आठवणी ताज्या असतानाच मधू सरांचा प्लॅन व्हाया अलेक्झांडर पॉईंट. म्हटलं या अनवट वाटेनं पुन्हा बिलगू माथेरानला. पावसाळ्यात गडांवर होणारी हंगामी ट्रेकर्सची गर्दी टाळत  आडवाटेला जाणं पसंत केलं.  कर्जतला लोकल ने उतरल्यावर पोहे व वड्याचं इंधन भरत गाडीने पोखरवाडी गाठली. मोरबे धरण काठोकाठ तुडुंब भरलेलं. वर नजर फिरवताच ढंगाच्या आड माथेरान चा माथा दृष्टीस पडला. मी,मधू सर ,अरुणा काकू ,दीप्ती आम्ही माथेरानच्या दिशेत पायगाडी सुरु केली. एक छोटासा ओहोळ पार करत सौम्य चढ पठारावर घेऊन गेला. एका बाजूला हिरवागार सोंडाई किल्ला व गार्बेटची डोंगररांग. हि गार्बेट पर्यंतची डोंगररांग आमची साथ करणार होती. तर दुसऱ्या बाजूला डोकावणारा इर्शाळगडाचा सुळका.

उजवीकडे सोंडाई  किल्ला 

इर्शाळगड 

आज पावसाचा नूर दबादबा ओतण्याचा नव्हता. हलकेच सरी पडत होत्या. मधेच कोवळं ऊन. त्या पठारावरील भाताची खाचर अगदी बालकवींच्या "हिरवे हिरवे गार गालिचे  हरिततृणांच्या मखमालीचे" या उक्तीप्रमाणे. आणि पुढे नेणारी नागमोडी वाट. अत्यंत सुंदर असा माहोल. निसर्गाने कूस बदललेय.  आगेकूच करत बुरुजवाडी गाठली. आमचं पुढचं लक्ष्य होत काटवण. शेताच्या बांधावरून जाणारी सुरेख अशी वाट तुडवत होतो. एव्हाना अलेक्झांडर पॉईंट ची खाली उतरणारी सोंड स्पष्ट दिसू लागली. थोड्याच वेळात खळाळत्या पाण्याच्या आवाजाने शांतता भंग पावली. रम्य झाडीत विसावलेला मोठा ओढा व त्यावर लोखंडी साकव.


अलेक्झांडर पॉईंटवरून खाली आलेली सोंड 

 या साकवां. खालून पाणी दरीत झेपावत होत. साकव पार करत टेपाड मागे टाकत मोकळ्या हिरव्यागार पठारावर विसावलो. घाई नव्हतीच मुळी आम्हाला. हि वाट चढून उतरून झालीच पाहिजे हा अट्टाहासही नव्हता. अरुणा काकू व मधू सरानी तर हिरवागार गालिचा नजरेस पडताच अक्षरशः लहान मुलाप्रमाणे लोळण घेतली. निसर्गाचा माहोल वय विसरायला लावतो हे मात्र नक्की. सुंदर पठार तुडवत कातवण मध्ये पोहोचलो एकदाचे. हे इवलंसं  गाव सह्याद्रीच्या बाहुपाशात वसलंय. एका बाजूला  माथेरान दुसऱ्या बाजूला गार्बेट पॉईंट व डोंगररांग. मुलं स्वागताला तयार होतीच. या गावचा बाजार म्हणजे माथेरान. काही विकायचं किंवा घ्यायचं असेल तर आडवाटा तुडवत पायपीट करत वर जायचं. निसर्गानं सौन्दर्याच दान भरभरून झोळीत टाकलेलं पण सुविधांचा अभाव. बहुतांश पुरुष मंडळी बाजाराला गेल्यामुळे वाटाड्या मिळणं अशक्य होत.  तरी एका दादांनी वाट समजावून सांगितली. आमचा प्लॅन बदलला. अलेक्झांडर ने चढण्याऐवजी माधवजी पॉईंट गाठायचा निर्णय झाला. वेळ मिळालाच तर अलेक्झांडर ने उतरू असा विचार केला. हि वाट अलेक्झांडर पॉईंट आणि गार्बेट च्या मधून वर जात होती. मधेच ओढ्याची वाट. आता बऱ्यापैकी चढण. मधेच रिमझिम पाऊस ओलेतं करत होता. पाण्याच्या ठिकाणी चार घटका विश्रांती. समोरच गार्बेट पठार अगदी मनमोहक नटून थटून बसल्यासारखं. चमकत्या उन्हानं तजेलदार. धबधब्याच्या कोसळणाऱ्या शुभ्र धारा. सोंडाई किल्ला फारच दूर गेलाय. सारं कसं विलोभनीय. आम्हा भटक्यांना आणखी काय हवं असत? 

गारबेट पठार 

 या दरीतून एक वाट गार्बेट पॉईंट वर घेऊन जाते. आम्ही ठरवलं कि केव्हातरी आखावी मोहीम  याही आडवाटेसाठी . पुढची वाट दाट हिरवी गच्च वर घेऊन जाणारी. वाटेत मध्ये एक प्लास्टिक टाकलेलं झोपडं व त्यामागे धबधबा. आता मात्र चढण हळू हळू वाढत जाते. मधेच छोटे मोठे ट्रॅव्हर्स. जवळपास गार्बेट पॉईंट च्या समांतर उंचीवर पोहोचतो, गार्बेट वाडी दिसू लागते. पुढचा टप्पा सावधगिरीचा. अरुंद वाट,वरून  पडणार पाणी. एका बाजूला खोल दरी ,दृष्टीभय. सावकाशगतीने एक एक टप्पा पार केला.

माधवजी पॉईंट 

 बाजाराला गेलेले गावकरी परतीच्या  वाटेवर होते.  दाट धुक्याने दरी व्यापून गेली होती. माथेरान टप्प्यात आल होत. नाकात शिरणाऱ्या सांडपाण्याच्या भपकाऱ्याने व कचऱ्याने मानवी वस्तीत आल्याची जाणीव झाली. माधवजी पॉईंट गाठला. वर छान छान कपडे घालून हिंडणारे पर्यटक, आणि आमचे पावसाने व घामाने चिंब झालेले गबाळे अवतार. (ट्रेकर गबाळा दिसला तरी स्मार्ट असतो हे मात्र नक्की). असो दुपार होऊन गेली होती, आम्ही उशीर होईल या कारणाने खाली पायी उतरण्याचा मोह मात्र टाळला.  पुन्हा कधीतरी होईलच कि अलेक्झांडर पॉईंट. एक सुंदर, हिरवाईने नटलेली लोभस अशी वाट सॅकमध्ये अलगद येऊन पडली. 

काही नोंदी:

  • हि वाट वर्षभरात केव्हाही करता येते. उन्हाळ्यात पुरेस पाणी आवश्यक. 
  • वाट कुठेही अवघड नाही. मात्र नवख्या ट्रेकर्सनी घाटवाटांचा अनुभव असल्याखेरीज करू नये. 
  • मध्ये  लागणाऱ्या काही वाड्यात/पाड्यात गावकरी पैसे मागतात. ते  देणं  टाळावं  जेणेकरून  त्यांना वाईट सवयी लागणार नाहीत. 

आभार: योगेश अहिरे ब्लॉग 
ट्रेक मास्टरमाईंड : मधुकर धुरी(मधू)

 

सैर माथेरानची व्हाया उंबरणे वाडी


                                                                                       
जून महिना सुरु झाला. पावसाळी ट्रेकचे वेध लागले. जून संपायला आला तरी पावसाने दडी मारलेली. चक्रम हायकर्स चा माथेरान ट्रेक मार्गे उंबरणेवाडी. गेल्यावर्षी दोनदा माथेरान सैर झाली होती. म्हटलं यावेळी वेगळ्या मार्गाने जाऊ. तसही हल्ली पावसात गड किल्यांवरची जत्रा पाहता मळलेल्या वाटा सोडून या कमी गर्दीच्या आडवाटांवर  पावलं टाकणं पसंत  करतो. असो. ऑक्टोबर पासून सह्याद्रीची गाठ भेट नव्हती. पावसाळी ट्रेकची चांगली सुरुवात म्हणून जाण्याचं ठरवलं. लोकल ने कर्जत गाठलं. पावसाचा काहीच पत्ता नसल्यानं ऐन जून मध्ये उन्हाळी ट्रेक होणार हे निश्चित होतं. मिसळीचा फडशा पाडत आंबेवाडी कडे कूच केलं . पावसात दुथडी भरून वाहणारा मोरबे जलाशय सुका सुका वाटत होता. पाण्याची पातळी खूपच खाली गेली होती. तोही बिचारा पावसाच्या प्रतिक्षेत .  आंबेवाडीत पोहचल्या पोहोचल्या दूरवर दिसणारा इर्शाळगड स्वागतासाठी तयार  होताच. 

इर्शाळगड आणि आंबेवाडी 


बारकाईनं पाहिल्यास त्याची खिडकीही नजरेस पडत होती. ओळख परेड आणि सूचनांचं सोपस्कार झाल्यावर तडक उंबर्णे वाडीची वाट धरली. आमचा दहा जणांचा छोटासा ग्रुप. नेता व उपनेता अनिकेत. एक मिरवणकर आणि दुसरा रहाळकर. ऊन चांगलंच तापायला लागलं होत.  पानगळ झाल्यामुळे सारंच रुक्ष वाटत होतं. पावसाच्या धारांची जागा घामाच्या धारांनी घेतली होती. इर्शाळ चा सुळका आणि प्रबळ चा काळा  बुरुज आणि काळी कभिन्न भिंत सोबतीला होतेच. 


वाटचाल 


बऱ्याच काळानंतर ट्रेक करत असल्याने सुरुवातीस  वेग मंद होता.थोड्याच वेळात नेहमीच्या लयीत आलो. सपाटीवरून झपझप पावलं पडत होती. झाडाचं एक पान हलेल तर शपथ . मधेच एक गावकरी मामा भेटले उंबर्णे वाडीची विचारणा झाली. म्हणाले पुढे जाऊन डाव्या हाताला  वळा. ओढा पार केलात कि खाली गाव. त्यांच्या सांगण्यावरून पुढे निघालो . डावीकडची वाट गावात घेऊन जाते आणि सरळ गेलात तर माळावर आणि तेथून माथेरान. आम्ही डावीकडे गावात निघालो. वाटेत ओढा. पाणी नसल्याने खडखडाट. खाली टुमदार अश्या मोजकीच घरं असलेल्या उंबर्णे वाडीत पोहोचलो. सूर्यदेव चांगलेच वर आले होते. पाणी भरण्यास विहीर कुठे दिसते का ते पाहू लागलो. एका ताईंनी सांगितल कि विहीर नाही. खाली जाऊन खूप लांबून पाणी आणावं लागत. तरीही एका घरातून आमच्यासाठी हंडा भरून ठेवण्यात आला. भर उन्हाळ्यात पाणी नसताना दाखवलेला हा  मोठेपणा . मन भरून आलं. काही क्षणांची विश्रांती घेत पावलांनी वेग घेतला. एक टेपाड चढत वर आलो. 


आता खरी चढण सुरु झाली. एव्हाना भट्टी चांगलीच तापली होती.  मधेच येणारी मंद झुळूक फुंकर घालत शरीरास दिलासा देत  होती.  खडी चढण , कडक ऊन ,दमट हवा चांगलीच दमछाक होत होती. छातीचा भाता फुलत होता. एक छोटा कातळटप्पा पार करून वर आलो. नशिबाने वारा  वाहू लागला.  विसाव्यासाठी बसकण मारली. 



समोर दिसणारं दृश्य झिम्माड नसलं तरी मोहित करणारं. मोरबेचा  पसरलेला जलाशय, दिमाखात उभा  इर्शाळ चा सुळका . प्रबळ गड . सोबतीला दिलासा देणारा गार वारा. भान हरपलं. वर चढताना आलेला शीण क्षणात पळाला. सह्याद्रीतला माहोल धुंद करतो.  या सगळ्यात भर पडली  ती केतकीच्या सुरांनी. आम्ही गमतीत मेघ मल्हार म्हणायला सांगितलं जेणेकरून पाऊस तरी पडेल. येथून उठावंसं वाटत नव्हतं पण पुढे जाणं भाग होतं.  थोडं पुढे गेल्यावर बेचक्यात बसवलेली अंधुक शिडी दृष्टीस पडली. म्हटलं चला आता काही क्षणांची दुरी. पहिल्या शिडीपाशी आलो जवळपास पंधरा फुटांची लोखंडी तारांनी बांधलेली लोखंडी शिडी. 

पहिली शिडी 


फारशी मजबूत नसल्याने जरा जपूनच. शिडी पार  करताच पावसाच्या सारी कोसळण्यास सुरुवात झाली. प्रतीक्षा संपली. कदाचित पावसाने मेघ मल्हार ऐकला असावा. उजव्या बाजूला वळत अरुंद ट्रॅव्हर्स पार करायचा. येथे थोडी सावधगिरी ने पावलं टाकावीत. तसच वर मधमाश्यांची पोळी आहेत. आवाज न करता पुढे चालत राहावे. डाव्या बाजूस गुहा आहे. कदाचित पिसारनाथांची असावी. एक मंदिरही आहे. 

ट्रॅव्हर्स 

दुसरी शिडी डाव्या बाजूला धबधब्यात बेचक्यात बसवली आहे.  ट्रॅव्हर्स पार करताना नजरेस पडत नाही. सुमारे ३० फुटांची लोखंडी शिडी. सध्या शिड्यांवरून खूप वाद होतात गर्दी वाढते असं म्हणतात. इथे शिड्या असूनही कोणी फिरकत नाही. सध्या प्रसिद्ध गड किल्ले,वाटांवर  फिरणे, म्हणजे ट्रेक असं समीकरण झालंय. हे कुठेतरी बदललं पाहिजे. एखाद्या ठिकाणी गर्दी करण्यापेक्षा एखादी जंगलवाट देखील सुखावून जाते. 


पावसामुळे इर्शाळगड धूसर झाला होता. आणखी एक छोटीशी शिडी पार केल्यावर खेळ सुरु होतो तो कातळटप्प्यावरील चढाईचा. 

सोप्या श्रेणीचा पण पावसामुळे सावध चढाई करावी. होल्ड साठी हातांची  पायांची कसरत करत पोहोचलो बुवा एकदाचे वर. आता दाट जंगलाचा टप्पा. माथेरान आवाक्यात आल्याची खूण . जवळपास पोहोचलोच. या टप्प्यावर अरुंद वाटेवर मी मागे होतो. मागे वळून पाहतो तर एक बऱ्यापैकी मोठं माकड चालत येतंय. वेग वाढवला. बॅगेत खाणं होत. इथल्या माकडांच बॅगेकडे जास्त लक्ष असत. त्यामुळे बॅग्स सांभाळाव्यात. शार्लेट तळ्यावर पोहोचलो .पिसारनाथ मंदिर गर्द झाडीत वसलेलं. दर्शन घेत जेवणाचा कार्यक्रम आटपला. येथील पुजारी काकांशी बोलताना कळलं कि आता आपण माथेरान च जंगल  हे पूर्वीच्या तुलनेत फक्त २५ % शिल्लक आहे. मनात विचार  आला पुढच्या पिढीसाठी हे जंगल असेल कि नाही? काय करणार कालाय तस्मय नमः . 

पिसारनाथ मंदिर 


एव्हाना ३ वाजले . परतीचा प्रवास सुरु करायचा होता. कडक चहा मारत सूर्यास्त बिंदू (सनसेट पॉईंट) कडे निघालो. तिथून खाली उतरायचं होत. माथेरान च्या लाल रस्त्यांवरून गर्द झाडीतून रपेट सुरु झाली. 


सनसेट पॉईंट कडे फारसं कोणी फिरकत नाही. त्यामुळे एकांत अनुभवता येतो. खाली दुधाणे गाव दिसत होत. जिथे आम्हाला उतरायचं होत. आम्हाला सूर्यास्ताआधी खाली उतरायचं होत. रेलिंग च्या बाजूने उतरण्यास सुरुवात केली.  सुरुवातीचा टप्पा बऱ्यापैकी  तीव्र उताराचा. पण फार कठीण नाही. 



उजव्या बाजूस पेब लक्ष वेधून घेत होता. पाय झपझप उतरत होते कारण ६:३० ची शेवटची पनवेल एस टी पकडायची होती.  एका टप्य्यावर उजव्या बाजूस दुधाणे ला वाट जाते. खाली उतरताना बलाढ्य चंदेरी , नाखिंद या रांगा लक्ष वेधतात . 

चंदेरी 
पेब किल्ला 


पेब खुणावत होता . एकंदर सुंदर अशी वाट. अखेर गावात उतरलो. फ्रेश होत ६:३० च्या एस टी  ची वाट पाहत थांबलो. वेळ निघून गेली अनिकेत ने खाजगी वाहनाने पनवेलला जायचा निर्णय घेतला. एक मस्त असा ट्रेक सुखरूप पार पडला. 

काही नोंदी :
कर्जत ते आंबेवाडी : खाजगी वाहन 
आंबेवाडीपासून ३.५-४ तास 
पिसारनाथ मंदिर ते दुधाणे गाव :२.५ तास 
दुधाणे गाव ते पनवेल :एस टी (शेवटची ६:३०) /खाजगी वाहन 
श्रेणी: मध्यम 
वर्षभर जाण्यास अनुकूल (पावसाळा सोडल्यास पुरेसा पाणी साठा सोबत घ्यावा )

विशेष आभार: चक्रम हायकर्स मुलुंड 
२२ जून २०१९

 

वाटा माथेरानच्या (हाशाची पट्टी )


सुरुवात करण्यापूर्वी :

जानेवारी २०२० आम्हा भटक्यांसाठी धक्का देणारा ठरला. जेष्ठ गिर्यारोहक ज्यांनी अवघं आयुष्य सह्याद्रीसाठी वेचलं ,अनेक गिर्यारोहक घडवले असे गुरुवर्य  अरुण सावंत सर यांचा कोकणकड्यावरून अपघात व हरहुन्नरी खेळकर स्वभाव असलेला ट्रेकर मित्र कृष्णा पार्टे किल्ले अनघाई चढताना अनपेक्षित रित्या गमावला. दोन्ही गोष्टी अनाकलनीय. माझं भ्रमण तर्फे दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. सह्याद्रीत भटकताना यांचं स्मरण सदैव राहील. 

वाटा माथेरानच्या (५ जानेवारी २०२०):

माथेरान म्हटलं की समोर येतं ते थंड हवेचं ठिकाण, पर्यटन स्थळ. सगळ्या ऋतूत असणारी गर्दी. पण हेच ठिकाण ,याच्या गर्द झाडीतल्या लाल वाटा ट्रेकर्स ना नेहमीच मोहात पाडतात. आणि मुंबईपासून हाकेच्या अंतरावर. कमी पैशात आणि कमी वेळेत होणारा ट्रेक. त्याच असं झालं २०२० चा पहिला शनिवार घाटघर जवळच्या घाटवाटा करण्याचं ठरलं होतं. पण ऐन वेळी तीन जण अपरिहार्य कारणामुळे रद्द. शिल्पाचा फोन झाला . माथेरान जायचं का? थोडावेळ विचार केला म्हटलं रद्द करू प्लॅन... पुढच्या क्षणी माथेरान साठी जाऊ म्हणत हिरवा सिग्नल दिला. नेरळ पोहोचेपर्यंत रात्रीचा एक वाजला. माथेरान ला सोडणारी टॅक्सी मिळणे मुश्कील होतं. आणि वर जाणारे पर्यटक एवढ्या रात्री कुठून येणारं? तोच एक टॅक्सी समोर आली. ड्रायव्हर शेजारी एक व्यक्ती बसली होती. इन्स्पेक्टर आहोत असं सांगत होती. थोडं हायसं वाटलं. त्यांना जवळच जायचं होत. गाडी सुरू झाली. साहेब त्यांचं घर येताच उतरले. त्यांनी ड्रायव्हरला बजावून सांगितलं की सावकाश जा. आम्ही दस्तूरी नाका आधी गारबेट पठारावर जी वाट जाते तिथे उतरलो. आणि जंगलाची वाट तुडवू लागलो. अर्ध्या पाऊण तासात गारबेटच्या पठारावर. असीम शांतता ,दूरवर खाली गावातील लुकलुकणारे दिवे. भर्राट वारं सुटलं होतं. त्यामुळें थंडीचा जोर होताच. पथारी पसरत स्लीपिंग बॅग मध्ये गुंडाळून घेतलं. भव्य आकाशातील चमचमणारे तारे न्याहाळत होतो. लुकलुकणारे असंख्य तारे आणि भवताली डोंगर रांगा यांच्या सानिध्यात झोपी गेलो. सकाळीच गजरा शिवाय जाग आली . छान झोप झाली होती. गारबेटच भलमोठं पठार. दूरवर माथेरान चा माधवजी पॉइंट व वर चढणारी वाट खुणावत होती. मोरबे जलाशाया मागे नारायणराव उगवण्याच्या तयारीत. माथेरानच्या पोटातील गाव/ वाड्या ना जाग येत होती. सकाळची कामं उरकत गारबेट पॉइंट ची खडी चढण चढण्यास सुरुवात केली. गारबेट वाडी तील कौलारू घरं निरखत बाजाराच्या  दिशेत आगेकूच.

गारबेट पठार 
वर माथेरान  खाली गारबेट वाडी 

तिथे पुढच्या प्रवासात कोयल आमच्यात सामील होणार होती. गर्द झाडांनी शाकारलेल्या लाल वाटा नेहमीच मोहात पाडतात. वाटेत खालच्या गावातून येणारे हात रिक्षा चालवणारे गावकरी भेटले. त्यांच्या सोबत माथेरानच्या  वाटा विषयी गप्पा मारत पुढे निघालो. पुढच्या वेळी एखादी नवी वाट करण्याचे विचार मनात घोळू लागले. रविवार असल्याने सकाळीच घोडेवाले, दुकानदार , फेरीवाले यांची लगबग सुरू होती.

माथेरान च्या लाल वाटा 

उदर भरण करत मलंग पॉइंट ची वाट विचारत  आम्ही तिघ निघालो.  सरळ चालत मलंग पॉइंट गाठला. समोरच प्रबळ गडाचं भलं मोठ्ठं धुड. बाजूला कलावंतीण. डाव्या बाजूला दूरवर दिमाखात ईर्शाळगड. प्रबळ कलावंतीण मधली खिंड स्पष्ट दिसत होती. उजवीकडे खाली हाश्या ची पट्टी तली घरं खुणावू लागली. मलंग पॉइंट वरून मुख्य रस्त्याला खाली येत सनसेट पॉईंट कडे निघालो. थोड चालल्यावर लगेचच उतरण्यास पायऱ्या दिसतात. हीच ती हाशा च्या पट्टीत उतरणारी वाट. सह्याद्रीच्या आडवाटांवर फिरणाऱ्या शिल्पाच्या डोक्यातील वाट. 

डावीकडे प्रशस्त  प्रबळगड व कलावंतीण 

हाशा च्या पट्टीत उतरणारी वाट 


हाशाची पट्टी प्राथमिक शाळा 
बच्चे कंपनी 

उतरण्यास सुरुवात केली. पूर्ण बांधीव वळणाची वाट. उतरताना म्हैसमाळ ,चंदेरी यांनी सुरेख दर्शन दिलं. उजव्या बाजूस पेब डोकं वर काढत होता. पोहोचताच मारुती च मंदिर व स्वच्छ पटांगण असलेली प्राथमिक शाळा. तिथे खेळणारी मुलं चिक्की दिल्यावर फार खुश झाली. खाली एका घरी विसाव्यासाठी थांबलो. चहापाणी व हवा पाण्याच्या गप्पा झाल्यावर मावशींनी दाखवलेल्या वाटेने खाली उतरू लागलो. 

एका सोंडेवर चालू लागलो. सरळ जाणारी वाट न घेता उजव्या बाजूची खाली उतरणारी वाट घेतली(बाकाच्या बाजूची).  चिंचवाडीत जाणारी. खडकात पायऱ्या खोदलेली थोडी उताराची वाट. काही ठिकाणी जास्तच तीव्र आहे पण धोका नाही. थोड्याच वेळात डाव्या बाजूस झाडोऱ्यात घुसलो. दगडातून वाट काढत ओढ्याच्या पात्रात पोहोचलो. मागून एक ताई जेवण घेवून चालल्या होत्या. त्यांच्या सोबत पलीकडील पाऊल वाट पकडली. पुढे गावकरी रस्त्याच्या कामासाठी श्रमदान करत होते. गावातील लोकांना वाहनं जाण्यास रस्ता नाही. जो काही प्रवास तो पायी पायी. अडचणीच्या वेळ खूप हाल होत. काम करताना आता यापुढे गावात गाडी येईल व हाल दूर होतील याच समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं. मुख्य म्हणजे ते सांगत होते. जंगलातील मोठी झाडं गरज वाटली तरच तोडणार नाही तर हात देखील लावणार नाही. ऐकून बरं वाटलं. निरोप घेत निघालो. चिंचवाडीत पोहोचलो.  चंदेरी म्हैसमाळ गाढेश्वर  तलाव स्पष्ट नजरेच्या टप्प्यात होतें. दिड ची एस टी मिळायची आशा संपली होती. मुख्य रस्त्याला आलो तोच एक क्रिकेट टीम घेऊन जाणारा टेम्पो मिळाला. थांबवत पटापट चढलो. त्याने दुधाणी बसस्टॉप वर सोडलं. तिथून पुढं पनवेल. आणि साडे तीन चार पर्यंत मुंबईत. सुंदर असा रमत गमत केलेला छोटेखानी ट्रेक भटकंतीच्या गाठोड्यात जमा. 

म्हैसमाळ, चंदेरी ,गाढेश्वर तलाव 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...