सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... ! धृ
दिसू लागले अभ्र सभोवती ... विदिर्ण झाली जरीही छाती ... !
अजून जळते आंतरज्योती ... अजून जळते आंतरज्योती ... कसा सावरू देह परी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! १
होय तनूची केवळ चाळण ... प्राण उडाया बघती त्यातून ... !
मिटण्या झाले अधीर लोचन ... मिटण्या झाले अधीर लोचन ... खड्ग गळाले भूमिवरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! २
पावनखिंडित पाउल रोवून ... शरीर पिंजे तो केले रण ... !
शरणागतीचा अखेर येई क्षण ... शरणागतीचा अखेर येई क्षण ... बोलवशील का आता घरी ... !
सरणार कधी रण प्रभू तरी हे ... कुठवर सहु घाव शिरी ... सरणार कधी रण ... ! ३
"पावनखिंड - बाजीप्रभूंच्या रक्ताने पावन झालेली. जेथे बाजीप्रभूंनी देह ठेवला. जेथे त्यांनी मृत्यूला सुद्धा ओशाळवले. "
"इतिहास हा केवळ सांगण्यातून किंवा ऐकण्यातून कळत नसतो तर तो अनुभवायला देखील लागतो."
पावनखिंडीतला हा अविस्मरणीय असा एक अनुभव... लहानपणापासून मनावर कायमचा कोरला गेलेला...
आयुष्यात एकदा तरी या ठिकाणी जावं असं ट्रेकला जायला लागल्यापासून वाटतं होतं. जाऊन आल्यानंतर तर ठिकाणाने मनावर वेगळीच भुरळ घातली.
दिवाळीच्या
दरम्यान आमच्या सहनिवसातील मुलांशी बोलणं झालं या ट्रेकबद्दल, त्यांनीही
लगेच तयारी दर्शवली. त्याप्रमाणे आदित्य (आदि), तेजस, विक्रम (विकी), आशिष
(आशु) यांच्याशी बोलल्यावर त्यांनी देखील येण्याची तयारी दर्शवली. साधारण
१०-१२ मुलं जमा झाली. ट्रेकला आयत्या वेळी टांग देणारे बरेच बघितले होते.
(यात कधीतरी माझं पण नाव असायचं. ट्रेकला कधीच नसेल पण इतर ठिकाणी फिरायला
बऱ्याच वेळा असेल.) पण ऐन वेळी एकदम ४-५ जण येण्यासाठी तयार होतात हे मला
तरी बघितल्याचं आठवत नाही. नाही म्हणता म्हणता या ट्रेकसाठी १९ जण झालो.
आम्ही
२४ डिसेंबरचं सह्याद्री एक्सप्रेसची तिकिटं काढली होती. ही ट्रेन कल्याणला
संध्याकाळी ६.४५च्या आसपास आहे. १९ पैकी आम्ही १५ जणांनी कल्याणवरून ट्रेन
पकडली. दोन जणं पुण्याला गेलेले ते तिथे ही गाडी पकडणार होते. अजुन दोन
म्हणजे माझा मित्र विक्रम आणि त्याची पत्नी विधिश्री हे देखील कल्याणहून
ट्रेन पकडणार होते. पण घरातून उशिरा निघाल्याने त्यांची ट्रेन सुटली.
ट्रेकला यायची दांडगी इच्छा असल्याने त्याने २ तास कल्याण स्टेशनला थांबून
पुढची ट्रेन (महालक्ष्मी एक्सप्रेस) पकडली आणि आम्हाला थेट कोल्हापूरला
भेटले.
कोल्हापूर स्टेशनजवळील बस स्टँडवरून पन्हाळा बस पकडली आणि
पन्हाळ्याला पोहोचलो. खरंतर पन्हाळा आणि विशाळगड हे किल्ले न बघता फक्त
छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याचा सिद्दी जौहरने दिलेला वेढा फोडून
विशाळगड जवळ करताना जो मार्ग वापरला तोच फक्त करण्याचं ठरलं होतं. पण
किल्ल्यावरील सौंदर्य बघून मुलांना मोह आवरता आला नाही. त्यांनी किल्ला
बघायचे ठरवले. सर्व मुलांचा पन्हाळा किल्ला बघून झाल्यावर पुसाटी
बुरुजाजवळील तुटका नंदी येथे जमा झालो. (येथे एक नंदीची भग्न अवस्थेतील
मूर्ती आहे म्हणून या परिसराला तुटका नंदी असे नाव असावे.)
शिवरायांचा जयघोष केला आणि खाली उतरायच्या मार्गाने पन्हाळा किल्ला
उतरण्यास सुरुवात केली. या मार्गाने थोडेच अंतर उतरले असू अचानक थोडा मार्ग
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलनात वाहून गेला होता. पण सुदैवाने
पर्यायी मार्ग बनवण्यात आला होता. तिथून खाली उतरून मसई पठाराकडे वाटचाल
सुरु केल्यावर लक्षात आले वय त्रास द्यायला लागलंय. दुसरी गोष्ट अशी की हा
ट्रेक मी यापूर्वी ३ वेळा केला होता पण पावसाळ्यात तेव्हा हवामान खूपच
सुंदर होतं. पण आता डिसेंबर अखेरीस देखील उन्हाचा जास्त त्रास जाणवत होता.
खरंतर उन्हाचाच त्रास खूप जास्त होता. मसई पठाराजवळील वाडीत आमच्यातील
काहींनी थोडेफार पाणी भरून घेतले आणि चालायला पुन्हा सुरुवात झाली. मसई
पठारावर उन्हाचा त्रास अजूनच जास्त जाणवायला लागला.
चालण्याचा वेग हळूहळू कमी होऊ लागला होता. दुपारी साधारण १ वाजता
खाण्यासाठी कुंभारवाडा येथे थांबण्याचा विचार होता तिथे पोहोचायला आपल्याला
साधारण अडीच तीन वाजले त्यात गावात पाण्याची कमतरता होती. आमच्या पुढे
असलेल्या सर्वांना गावात बसवून आदि ३-४ जणांना घेऊन पाण्याच्या शोधार्थ
पुढच्या मार्गाला लागला. जसे आम्ही गावात आलो आम्हाला पाण्याच्या
कमतरतेबाबत समजले आणि पन्हाळा किल्ल्यावरच पाणी भरून न घेण्याच्या
निर्णयाचा पश्चाताप झाला. तो निर्णय माझाच होता. यावर्षी पाऊस बराच
उशिरापर्यंत पडल्यामुळे वाटेत पाणी सहज उपलब्ध असेल असा माझा अंदाज होता.
म्हणून मी तो निर्णय घेतला होता. पण आता तो आमच्या कष्टात भर घालत होता.
आदिने पुढे असलेल्या शाळेत जेवायला बसायची सोय केली पण आमचं दुर्भाग्य
तिथेही पाणी खूपच कमी होते. हापसा होता पण पाणी खूपचं जड होते. त्यामुळे ते
पाणी न पिता फक्त हात तोंड धुण्यासाठी वापरायचे ठरले. त्यामुळे पिण्याच्या
पाण्याची समस्या तशीच होती. जेवढं होतं तेवढं पाणी सर्वजण पुरवून प्यायलो.
पुढील वाटचाल सुरू केली. खोतवाडी/चाफेवाडी गावं ओलांडून पुढे गेलो तरी
पाणी काही मिळेना. सर्वांनाच थकवा जाणवत होता. चालण्याची ताकतही संपत चालली
होती. केळेवाडी गावाच्या आधी वाटेत एक घर दिसले तिथे पाण्यासाठी विचारणा
केली तेव्हा त्या कुटुंबाने मुबलक पाणी उपलब्ध करून दिले.
आजच्या जमान्यात जिथे नाती सोबत राहात नाहीत तिथे त्या कुटुंबाने
आमच्यासारख्या अनोळखी लोकांना योग्य वेळी मुबलक पाणी उपलब्ध करून दिले
होते. तेव्हा ते कुटुंब साक्षात देवाप्रमाणे भासले. योग्य तेवढे पाणी
प्यायल्यामुळे थकवा निघून गेला होता. तसेच संध्याकाळ होऊ लागल्याने ऊनही
उतरू लागले होते. त्यामुळे पुढील वाटचाल जरा झपाट्याने होत होती तरीही
आम्ही मुक्कामासाठी ठरवलेल्या आंबेवाडी या गावापर्यंत पोहोचणे शक्य नव्हते.
त्यामुळे उजेड असेपर्यंत जितके अंतर कापता येईल तितके अंतर पार करण्याचा
निर्णय केला. कसेबसे आम्ही मांडलईवाडीपर्यंत पोहोचलो.
आदि
सर्वांत पुढे असल्यामुळे ईतर मुलांशी बोलून त्याने एक निर्णय घेतला.
गावातील एक माणुस घेऊन अंधारात विजेरीच्या (torch) साहाय्याने करपेवाडी
अथवा त्याच्या आधीच्या धनगरवाड्यापर्यंत प्रवास लगेच करावा. जेणेकरून उद्या
आम्हाला कमी अंतर पार करावे लागेल. आम्ही पोहोचलो तेव्हा त्याने हा निर्णय
आम्हाला सांगितला. पण तेजसने या निर्णयाला विरोध दर्शवला. त्याचे कारणही
योग्यच होते. आमच्यात असलेल्या लहान मुलांच्या आईवडिलांनी आमच्या
जबाबदारीवर त्यांच्या मुलांना शरीराचा कस लावणाऱ्या या ट्रेकला पाठवले
होते. (शरीराचा कस लावणारा ट्रेक म्हणजे एकूण ६४ किमी चाल, पण आम्ही फक्त
पावनखिंडीपर्यंत म्हणजे साधारण ५५-५६ किमी मार्ग करणार होतो. या मार्गात
मधेच डोंगर चढउतार, मधेच शेतं, मधेच डांबरी रस्ता, मधेच जंगल. आमच्या मागे
कोणी लागले नसल्याने रात्री आराम करून आम्ही दोन दिवसात हा ट्रेक पूर्ण
करणार होतो.) (पण विचार करा महाराजांनी हाच रस्ता भर पावसात, शत्रू मागावर असताना, सलग २१ तासात पार केला होता.)
दुसरे म्हणजे मांडलईवाडी आणि करपेवाडी यातील अंतर ५ किमी होते तसेच
वाटेमध्ये थोडे जंगल होते. आदिचा मुद्दाही बरोबर होता. आज जेवढे अंतर कापले
जाईल तेवढे उद्याचे अंतर कमी होणार होते. दोघांनी माझ्यासमोर स्वतःची मते
मांडल्यानंतर निर्णय माझ्यावर सोपवला. खरंतर आदिचा मुद्दा मला जास्त पटत
होता. पण मी जर तसं सांगितलं असतं तर तेजस माझं डोकं खाणार हे मला माहित
होतं. मी निर्णय मुलांवर सोडला. त्यांनीही चालायची तयारी दर्शवली. करपेवाडी
हे गाव आम्ही मुक्कामासाठी ठरवलेल्या आंबेवाडी गावाच्या आधीचंच गाव होत;
आणि करपेवाडीला जाणाऱ्या रस्त्यात जे जंगल होत तेही घनदाट नाही याचा मला
अंदाज होता. मी स्वतः जंगलात फिरत असल्याने येथे रात्री चालण्यात कोणताही
धोका नाही हे जाणून होतो. एक गावकरी जो करपेवाडीच्या आधी असलेल्या
धनगरवाड्यात राहतो तो तिथे भेटला आणि शेवटी एकदाचा रात्रीचा ट्रेक सुरू
झाला. (Night trek) साधारण एक सव्वा तासात करपेवाडीला पोहोचलो. जसे तिथे
पोहोचल्यावर बॅग काढून ठेवली डोकं सोडून शरीरातील प्रत्येक अवयव दुखायला
लागले होते. हात, पाय, खांदे, कंबर, पाठ सगळंच दुखत होतं. गावातच एका
कुटुंबाला जेवण बनवायला सांगून तेथील शाळेच्या पटांगणात तंबू लावायला
घेतले. तंबू लावून झाल्यावर थोडा आराम करेपर्यंत जेवण आलं. जेवण झाल्यावर
सगळं आवरून झोपायला घेतलं. कारण सकाळी लवकर उठून पुढचा प्रवास चालू करायचा
होता.
सकाळी उठलो तेव्हा एकदम प्रसन्न वाटत होतं. हवेत थोडा
गारठा होता पण अपेक्षेप्रमाणे थंडी नव्हती. हात पाय तोंड धुवून सकाळचे सर्व
विधी आटोपून नाश्ता झाला. तरी नाश्ता उशिरा आल्यामुळे सकाळी निघायला उशीर
झालाच. सुरुवातीला सर्वांची पावलं पटापट पडत होती. ऊन पडेपर्यंत सर्वांनी
चांगला वेग पकडला. पण जसे ऊन वाढायला सुरुवात झाली तसा कालच्याप्रमाणे वेग
कमी व्हायला लागला. रिंगेवाडीला पोहोचायला एक दीड वाजला.
जेवण उरकून पुन्हा चालायला सुरुवात केली. (जेवण म्हणजे काय तर उरलेले
थेपले आणि लोणचं व मॅगी) साधारण पावणे चारच्या आसपास म्हसवडे गावात
पोहोचलो. सगळेच थकलेले कारण या मुलांनी एवढा मोठा ट्रेक कधी केला नव्हता.
आम्ही मोठे बऱ्याच वर्षांनी ट्रेक करत असल्याने आम्ही पण थकलेलो. थोडा वेळ
आराम केला. म्हसवडे गावानंतर थोड्याच अंतरावर पांढरपाणी हे गाव लागते. पण
वाटेत एक डांबरी रस्ता लागतो तिथे उभे राहून गाडीची वाट बघू लागलो जी
आम्हाला पांढरपाणी गावात सोडेल. वडाप तर मिळाली नाही पण सुदैवाने एक ट्रक
थांबला. त्यामुळे डांबरी रस्त्यावरील चार पाच किमीची चाल वाचली. त्या पाच
मिनिटाच्या प्रवासात सर्व थकवा निघून गेला. पांढरपाणीच्या चौकात एका
हॉटेलमध्ये चहा, कॉफी, शीतपेय प्यायलो. याच हॉटेलात रात्रीच्या जेवणाची आणि
हॉटेलाच्या पटांगणात रात्रीच्या झोपेची सोय केली. पावनखिंडीला जाण्यासाठी
चौकशी केल्यावर असे समजले की पाचला शेवटची बस विशाळगडला जाते. ही बस
आम्हाला पावनखिंडीजवळील बस स्टॉपवर सोडेल. बसची वाट बघत साडेपाच होऊन गेले
होते. शेवटी एकदाची बस आली आणि शेवटच्या टप्प्याला सुरुवात केली. पांढरपाणी
येथून पावनखिंडीच्या जवळील बसथांब्यापर्यंत बसने गेलो.
पावनखिंड ही जागाच अशी आहे की जिथे गेल्यावर
सर्वांगावर काटा उभा राहतो. दि. १२ जुलै १६६० आषाढी पौर्णिमेची रात्र
मुसळधार पडणारा पाऊस, मधूनच चमकणाऱ्या विजा आणि सोबत होणारा त्यांचा
कडकडाट. आजूबाजूला दाट झाडी पसरलेली. त्यातही श्वापदे.. पायाखाली धड रस्ता
नाही. अरण्यातलीच वाट ती. अन् अशा वाटेने चाललेली ती ६०० मंडळी आणि दोन
पालख्या! काय करत होती आणि कुठे निघाली होती अशा आडवेळेला आणि आडरानाला?
रायाजी बांदल, फुलाजी प्रभू, बाजी प्रभू सोबत ६०० मावळे, एका पालखीत
शिवाजी महाराज आणि दुसऱ्या पालखीत महाराजांची वस्त्र अलंकार घालून शिवा
काशिद. निघाले होते सिद्दी जौहरचा वेढा फोडून विशाळगड जवळ करायला. पण
जौहरच्या हेरांनी पालखी हेरली. आता काय होणार?
हेरलेली पालखी
घेऊन १५-२० मावळे मुख्य रस्त्याने धावू लागले आणि महाराजांची पालखी आड
रस्त्याने विशाळगड जवळ करू लागली. पाठलाग अटळ होता, अन झालाच. सिद्दी
जौहरचा जावई सिद्दी मसूद काही फौज घेऊन पाठलाग करू लागला. थोड्याच वेळात
त्याने पालखीला गराडा घातला. त्याने मावळ्यांना विचारले आत कोण आहे? उत्तर
मिळाले महाराज आहेत. पालखी सकट महाराज कैद झाले. पालखी पन्हाळगडी नेण्यात
आली. काही जाणकारांनी ओळखले. काहीतरी गडबड आहे. चौकशी झाली आणि कळले की हा
तर शिवा काशिद. शिवा काशिदचे शीर कलम करण्याचा आदेश देण्यात आला.
तो पर्यंत बाकीची मंडळी पुढे निघून गेली. सिद्दी मसूदने पुन्हा पाठलाग
सुरू केला. गजापुरच्या आसपास सिद्दी मसूद जवळ पोहोचला. पुढे त्यातली अर्धी
मंडळी पुढे गेली आणि अर्धी एका ठिकाणी थांबली. थांबलेल्यांनी केलं काय?
येणाऱ्या शत्रूला तेसुद्धा ताज्या दमाच्या शत्रूला या थकल्या भागल्या
जिवांनी पुढे कित्येक तास झुंजवलं एका खिंडीत आणि आपल्यासोबत त्या
खिंडीलासुद्धा अजरामर केलं..
पावनखिंड!
बाजीप्रभू, फुलाजी प्रभू अन् त्यांच्या मावळ्यांनी सिद्दी
मसूदच्या सैनिकांना जिथे रोखून धरलं ती पावनखिंड. रात्रभर चालून दमलेली ही
लोकं कसल्या शक्तीने भारलेली होती की एवढय़ा अविश्रांत श्रमांनंतरसुद्धा
पुढे सलग १०-१२ तास ती शत्रूशी झुंजली.. त्यांच्या राजासाठी त्यानं
मांडलेल्या स्वराज्याच्या खेळासाठी स्वत:च्या जीवावर उदार होऊन गजापूरच्या
खिंडीत ते लढले. ही गजापूर खिंड म्हणजेच 'पावनखिंड'.
तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला!!!
पावनखिंड
बघून ते क्षण डोळ्यासमोर आणून बाजी, फुलाजी यांच्यासह प्राणाची बाजीलावून
लढलेल्या प्रत्येक मावळ्याचं स्मरण करून त्यांना मनोमन वंदन करून परतीचा
मार्ग पकडला.
या ट्रेकला माझ्यासोबत
तेजस बांदेकर, आदित्य कानेटकर, विक्रम पवार, सौ. विधिश्री पवार, आशिष
बिरंबोळे, अक्षय रासकर, शुभम खुजे, सुमेध खुजे, हृरिकेश जोशी, शुभम
बोरवणकर, सुमित फडके, ऋत्विक लाड, अभिषेक बिरंबोळे, ऋषिकेश बिरंबोळे,
अपुर्व देवकर, अक्षय भोसले, श्रेयस वैद्य आणि पार्थ वैष्णव हे माझे सवंगडी
होते.
ऐतिहासिक माहिती स्रोत -: Google
फोटो स्रोत -: Google, आणि थोडे फार आम्ही काढलेले
No comments:
Post a Comment