Wednesday, September 27, 2023

राजगड - तोरणा - रायलिंग पठार - लिंगाणा -

 http://sahyadrichabhatakbhavanya.blogspot.com/

गोष्ट तंगड्यातोड ट्रेकची 
          अखेर लांबून लांबून खूप उशिराने पावसाळा सरला होता आणि आता कुठे चांगल्या मजबूत तंगडतोड करण्याच्या भटकंतीचे दिवस चालू झाले होते, लांबलेल्या पावसामुळे शरदाचं चांदणं वगैरे पार ढगांच्या आडच लपून बसलं होतं. तेच निरभ्र आकाशातील चांदणं अनुभवायला, शेणा मातीने सारवलेल्या अंगणात निजायला आणि दिवसभर एका डोंगर धारेवरून दुसऱ्या डोंगरधारेवर अशी मैला-मैलांची चाल करून वाड्या-वस्त्या-खेडी पार करून ते डोंगर अनुभवायला जायचे हे दिवस.  मग अभ्यास सुरू झाला अशाच मस्त मजबूत रेंज ट्रेकचा. तस म्हणायला खूप अगोदर पासूनच अभ्यास झाला होता त्या अभ्यासाला आता मूर्त रूप देत ठरवलं राजगड-तोरणा-रायलिंग पठार-लिंगाणा-वाळणकोंड आणि दिवस ठरले गुरुवार २१ तारखेला रात्री पनवेल सोडून शुक्रवार, शनिवार, रविवार २२,२३,२४ नोव्हेंबरला हे किल्ले आणि त्यांच्या वाटा पालथ्या घालायच्या. पहिल्यांदाच जंबो ट्रेकची आखणी करत असल्यामुळे जितका होईल तितका अभ्यास करत होतो, याचबरोबर अप्पा(धनंजय मदन), ओंकार ओक, राहुल वारंगे यांचं मार्गदर्शनदेखील घेतलं. हो नाही हो नाही करत माणसं ठरली मी, प्रिसिलिया, सागर बामणे, मनोज म्हात्रे आम्ही पनवेल वरून गुरुवारी निघणार आणि हर्षल दादा आम्हाला शुक्रवारी रात्री जॉईन होणार.
राजगडावरील पद्मावती मंदिराच्या बाहेर (डावीकडून सागर,प्रिसिलिया,मनोज,मी )

शिवशाहीचा शाही प्रवास 
          गुरुवारी रात्री ८ वाजता पनवेल स्टँडला भेटून बस पकडायची आणि पुणे गाठायचं. रात्र असल्यामुळे राजगडाच्या पायथ्याशी जायला गाडी मिळणार नाही, म्हणून हर्षल दादाशी अगोदरच बोलून त्याला आम्हाला सोडायला तयार केलं होत. ठरल्या वेळेला मी, मनोज, सागर आलो होतो, प्रिसिलियाने येता येता उशीर केला आणि गाडी मिळेपर्यंत ८:४० झाले, एक मात्र चांगलं होत गाडी मिळाली ती शिवशाहीच... मस्त एसी मध्ये बसून आमच्या शाही ट्रेकची सुरुवात झाली होती, आता मात्र एकच विचार आम्ही आता लेट पोचणार म्हणजे हर्षल दादाला रात्री यायला उशीर होणार त्याला परत घरी येऊन सकाळी ऑफिसला जाऊन उद्या रात्री आमच्यातच सामील व्हायचं आहे, चांदणी चौकात आम्ही उतरणार होतो, तिथून हर्षल दादासोबत पुढचा प्रवास असणार होता, उशीर झाल्यामुळे पुढचं प्रवासाचं गणित कोलमडल, चांदणी चौकात पोचायला सव्वा अकरा आणि पुढे नसरापूर फाट्यावरून गाडी आत टाकल्यानंतर खराब रस्ता आणि मध्येच आलेल्या धुक्यामुळे जे काही पांढरफटक वातावरण झालं होत त्यामुळे पुढचं काहीच दिसेना, गाडी चालवताना देखील अडचण होत होती.ऑफिसची काम उरकून, रात्रीचा प्रवास आणि पुढचे तीन दिवस मोठा टप्पा असल्याने आज जास्तीत जास्त आराम मिळावा या हेतून वाजेघर गाठून पाली दरवाजाने वर चढायचं अस ठरवलं होत, कारण वाजेघर मधून कच्च्या सडकेने गाडी पार आतपर्यंत जाते जेणेकरून आपले चालायचे श्रम वाचतील आणि आपल्याला आराम पण मिळेल. परंतु निघताना झालेला उशीर, आणि आता आम्ही कापत असलेल्या रस्त्याची अवस्था बघून दादाला वाजेघरला गाडी टाकायला न सांगता गुंजवणेत टाकायला सांगितली, खराब रस्त्याचे ते ५-६ किलोमीटर आणि धुक्याची ती चादर यातून त्याला घरी लवकर पोचायला मदत होईल. दोन तासांचा पल्ला गाठून अखेर सव्वा-दिडच्या सुमारास आम्ही गुंजवणे गावात पोचलो, पटापट गाडीतून सामान बाहेर काढून हर्षल दादाला फ्री केलं, निघाल्यापासून काही खाल्लं नव्हतं आणि वाटेत भूक पण फार लागली होती, पण तरीही हर्षल दादाला जास्त उशीर होऊ नये म्हणून कुठेही थांबा न घेता थेट पायथ्याचं गाव गाठलं होत, हर्षल दादाला रामराम केला आणि सोबत आणलेली भाजी-भाकरी काढून त्यावर यथेच्छ ताव मारून सामान चौघांकडे वाटून आता आम्ही मस्त लोडेड बॅग्स पाठीवर मारून पुढच्या तंगडतोडीला तयार झालो होतो.

चांदण्यांनी भरलेल्या आभाळाखालून चालण्याची मजा काही औरच ! 
        गुंजवणे गावातून आम्ही चोरदारवाजच्या वाटेने पद्मावती माचीवरील पद्मावती मंदिरात जाऊन आराम करणार होतो, चोर दरवाजाची वाट ही संथपणे एका धारेवरून जाते त्यामुळे चढ जरा दमछाक करणारच होता. पाठीवर बॅग लावल्या आणि आमची वारी निघाली, गावातून निघालो, तशी काही कुत्री भुंकण्याचा आवाज येत होता, हळू हळू तो आवाज कमी होऊन आम्ही चढ चढायला सुरुवात केली, गावातल्या लाईट्स आता दूर होत चालल्या होत्या, वर चांदण्यांनी भरलेलं निरभ्र आकाश, हवेची मधेच येणारी झुळूक तर कधी, घाम काढणारे चढ, पाठपिशव्या देखील बऱ्यापैकी जड त्यामुळे हा ट्रेक अजून अवघड होत होता. दर पंधरा मिनिटांमागे पाच मिनिटांचा ब्रेक अशा कुर्मगतीने आम्ही चौघे पादाक्रांत करत होतो. मागच्या वर्षी एवढा मोठा ट्रेक केलाच नव्हता, त्यात सागर आणि मनोजचा एवढा मोठा असा पहिलाच ट्रेक, प्रिसीने देखील खूप महिन्यातून लोडसॅक मारली होती. एकंदरीत सर्वांची हवाच होती. मजल दरमजल करत, हळू हळू सरकत पद्मावती माचीच्या खालच्या अंगाला आलो. एव्हाना घडाळ्यात तीन वाजले होते. हर्षल दादाला सांगून ठेवलं होत की घरी पोचशील तेव्हा मेसेज कर, तीन च्या ठोक्याला मोबाईल वाजला आणि लगेच कळलं की हर्षल दादा पोचला असणार, पण परत विचार की येताना दोन तास लागले होते, तर आता इतक्या लवकर कसा काय? मनातील प्रश्नांच्या सरबत्तीला बाजूला सारून मोबाईल काढला तर खरंच त्याने घरी पोचल्याचा मेसेज केला होता. प्रत्युत्तरादाखल आम्ही देखील अर्ध्या-पाऊण तासात पोचू अस सांगून आम्ही देखील ब्रेक घेत घेत अखेर चोर दरवाजाच्या खाली कातळाला भिडलो, रेलिंग लावल्यामुळे हा मार्ग एकदम सोईस्कर झालेला आहे. त्या निबिड रात्री काळोखात चालताना उंचीची वगैरे काही भिती वाटत नव्हती, चांदण्यांचे दर्शन असे काही विलोभनीय होते, की एखाद ठिकाणी येणारी वाऱ्याची गार झुळूक आम्हाला तिथेच आडवे होण्यास प्रवृत्त करत होती. चोर दरवाजात अखेर प्रवेश केला, त्या दरवाजातून वाकून जाऊन पुढच्या पायऱ्या ओलांडल्या आणि अखेर आमचा राजगडाच्या तटबंदीच्या आत प्रवेश झाला होता. उंचावर आल्यामुळे आणि आता कसलाच अडसर नसल्यामुळे वाऱ्याचा झोत जरा जास्तच होता आणि परिणामतः थंडीचे शहारे अंगावर येत होते. आपण कुठून चढलो, वरून दिसणाऱ्या गुंजवणे गावाच्या लाईट्स यांचा कानोसा घेऊन पावले झपाझप पद्मावती मंदिराकडे वळवली कारण आता आरामाची खरी गरज होती. पुरातन खात्याने काम करून गडाची काही ठिकाणी डागडुजी केली आहे त्याचाच भाग म्हणून चोर दरवाजपासून पद्मावती मंदिरापर्यंत केलेल्या पायऱ्या आणि डाव्या बाजूला राहण्यासाठी केलेली निवास योजना. भल्या पहाटेच्या प्रहरी चारच्या ठोक्याला आम्ही पद्मावती मंदिराच्या प्रांगणात पोचलो, मंदिराच्या बाहेर काही बुटांचे जोड दिसत होते यावरून आपल्या व्यतिरिक्त अजूनही लोक इथं आलेली आहेत, हे जाणून त्यांना त्रास न होता बॅग मधील सामान गुपचूप काढून त्या आत झोपलेल्या मंडळींना हळुवार आवाज देऊन दरवाजा उघडायला सांगितला. बाहेरच जरा वेळ बसून मोकळे होऊन अखेर आम्ही आमचा संसार आत नेऊन मंदिरातील एक कोपरा गाठला आणि सकाळी आरामात उठायच्या ठरावावर निद्राधीन झालो. 
          शुक्रवार तसा रात्री ट्रेक सुरू केला तेव्हाच उजाडला होता पण खऱ्या अर्थाने आमच्या ट्रेकचा पहिला दिवस आता सुरू झाला होता. साडेसातच्या आसपास जाग आली ती मुळातच त्या रात्री लवकर झोपलेल्या मंडळींच्या आवाजाने, तरी देखील स्लीपिंग बॅग मधून बाहेर न पडता अजून पंधरा एक मिनिटे लोळत बसलो, पावणेआठच्या सुमारास उठून बसलो पाहतोय तर मनोज बाहेर गेलेला, प्रिसी आणि सागर झोपलेलेच होते, डोळे पुसत मंदिराच्या बाहेर येतोय तोच मंदिराच्या दरवाजाची उंची खूपच कमी असल्याने खाडकन माझा डोका त्या दारकशीला लागला, सायरन वाजावा तसा तो आवाज मंदिरात घुमला आणि प्रिसिलिया तडक उठून बसली झाली, सागरला देखील त्या आवाजाने जाग आली. माझी झोप तर कुठच्या कुठे पळून गेली, डोका चोळत तिथेच जरा थोडा वेळ बसलो. मंदिराच्या बाहेर पडलो सकाळचा प्रातःविधी उरकेपर्यंत मनोजने त्या दुसऱ्या ग्रुप बरोबर ओळख करून कॉफीचे घोट देखील घेतले होते. आम्ही देखील चहा आणि सॅंडविचने दिवसाची सुरवात करून मंदिर सोडायची तयारी करून बाहेर आलो तोच पाहतोय तर सागरच्या शूजचा सोल पार निखळायला आला होता, माझ्याकडे फेविबॉण्ड होता तो काढून चिकटवूया म्हणून बॅग उपसून बाहेर काढला तर खूप महिने तो तसाच राहिल्यामुळे त्याचा खडा झाला होता. आता आली पंचाईत, वेळ ही चालला होता, आणि पुढचा ट्रेक काय होता हे मला माहीत होत, त्यामुळे आता काय करायचं या विवंचनेत असताना मनोज बोलला शिवूया पूर्ण शूज आणि त्याने त्याच किट काढून पद्धतशीरपणे चांभारी करून चांगल्या प्रकारे शूज शिवून दिला. या सर्व गोंधळात पद्मावती मंदिर सोडायला आम्हाला दहा वाजले. प्लॅन आखताना आम्ही दहा वाजता राजगड सोडायच अस ठरवलं होत. 
दुहेरी तटबंदीने पूर्वेकडे पसरलेली सुवेळा माची 
          यापूर्वी राजगडावर दोनवेळा येणं झालं होत, परंतु वेळे अभावी सुवेळा माची काही बघता आली नाही, आणि आज पण तेच होत होतं तरी म्हटलं पूर्ण सुवेळा माची नाही परंतु नेढ्या पर्यंत तरी जाऊया अस म्हणत पद्मावती मंदिरासमोरील सईबाई राणीसाहेबांच्या समाधीच दर्शन घेतलं, रामेश्वर मंदिर देखील ओलांडून पायऱ्या चढून जुने पडके अवशेष पाहत जीर्णोद्धारीत राज सदरेच्या इथे आलो, सदरेच्या द्वाराला कुलूप लावलं होत, बॅग सर्व तिथेच ठेवल्या हातात एक पाण्याची बाटली घेऊन धावत पळत आमचा चमू आता सुवेळा माचीच्या दिशेने निघालो, बालेकिल्ल्याच्या वाटेकडे जायच्या अगोदरच डावीकडे एक वाट जाते ती सुवेळा माचीकडे. तटबंदीला असलेला छोटेखानी दरवाजा ओलांडून आम्ही चाललो होतो, तर त्या दुसऱ्या ग्रुपने देखील गडाचा निरोप घेतला होता, बोलता बोलता लक्षात आलं की ते काल तोरण्यावरून आले होते, म्हणजे आज आम्हाला जी वाट पकडायची होती, ती त्यांनी कालच केली होती, वाटेबद्दल त्यांच्याशी थोडी चर्चा केली असता ते बोलले की वाट एकदम सोपी आहे फक्त बुधल्याच्या इथे जो खडा चढ आहे तिथे जरा सांभाळून.
पुढे वाट चालतच डाव्या बाजूला असलेल्या गुंजवणे दरवाजाच्या दिशेने जात त्यांनी आमचा निरोप घेतला आणि आम्ही पुढे उजव्या बाजूने बालेकिल्ल्याला ट्रॅव्हर्स मारून सुवेळा माचीकडे चाललो होतो. वरून जाताना गुंजवणे दरवाजा दिसत होता, त्याच्या बाजूला असलेली ताशीव तटबंदी आणि भरभक्कम बुरुज, तर समोरून लांबच्या लांब पसरलेली सुवेळा माची लक्ष वेधून घेत होती, आणि या सर्वात उजव्या बाजूला मोठमोठाल्या प्रस्तरांनी आच्छादलेला बालेकिल्ला छातीत धडकी भरवत होता, त्याच ते अजस्त्र रूप पाहून अंगावर शहारे येत होते.  हे सर्व पाहताना मराठ्यांच्या इतिहासाची पाने झरझर डोळ्यांसमोरून पालटत होती.या गड-किल्ल्याचं हे अजस्त्र रूप पाहून का आपल्या राजांचा इतिहास सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवलाय याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. चालत चालत डुब्याच्या खाली आलो, डुब्याची वाट न पकडता खालच्या अंगाने पुढे सरकलो दाट झाडीतून जाताना पावलांचा वेग दुणावला होता, झाडी पार करतोय तर डाव्या बाजूला पाण्याचं टाक आणि लगेच पुढे मारुतीची मूर्ती होती, दगडी मूर्तीशेजारी कुणीतरी पांढऱ्या मार्बलची मूर्ती देखील आणून ठेवली होती.
झाडातील सावलीचा रस्ता पार करून पुढे चालू लागलो तसा खाली उतरायला एक छोटेखानी दरवाजा देखील दिसला, तटबंदीला असलेली शेंदूर लावलेली गणपतीची मूर्ती देखील लक्ष वेधून घेत होती. सुवेळा माचीवर लक्ष वेधून घेणारा चिलखती बुरुज त्याच्या पायऱ्या आणि दोन्ही बाजूला असलेली दुहेरी तटबंदी हे सर्व न्याहाळत आपण चाललोय हे पाहून उर भरून येत होता. चिलखती बुरुजाच्या पायऱ्या चढून छोटेखानी दरवाजातून बुरुजाच्या वर चढून गेलो. वर्तुळाकार ताशीव बुरुज, अन त्या बुरुजाच्या मध्यभागी अभिमानाने फडकणारा भगवा इतिहासातील स्थापत्यकलेच्या डौलाची साक्ष देत होता. त्या बुरुजावरून पूर्वेला लांब पसरत गेलेली सुवेळा माची, मागे पश्चिमेला उठावलेला बालेकिल्ला, नैऋत्येस धाव घेतलेली संजीवनी माची, तिच्या मागे दिसत असलेला तोरण्याचा बुधला सुळका अन वायव्येकडे विस्तारलेली पद्मावती माची आणि खाली उत्तरेस गुंजवणे गाव देखील त्याच अस्तित्व दाखवून देत होता.
नेढं 
नको म्हणत असताना देखील त्या बुरुजाला रामराम करत खाली उतरून तटबंदीला असलेल्या दरवाजा ओलांडून सुवेळा माचीच्या पुढच्या बाजूला असलेल्या नेढ्याकडे जाऊ लागलो. नेढ्याच्या खाली जाऊन  पुढच्या बुरुजाची वाट सोडून डाव्या बाजूला कातळात चढावं लागत.  निसर्गदेवतेनं केलेला एक अद्भुत अविष्कार म्हणजे नेढं. डोंगराला त्या आरपार पडलेल्या भल्यामोठ्या छिद्रात बसून आरपार जाणारे घोंघावत्या वाऱ्याचे सूर आळवीत बसण्यासारखं सुख नाही, अस नेढ सह्याद्रीतल्या रतनगड, इर्शाळगड या किल्ल्याना देखील आहे. वेळेच भान असल्याकारणाने लगेचच तिथून काढता पाय घेत, आलो त्या वाटेने मध्ये पाण्याच्या टाक्याच्या इथे पाणी पिऊन भराभर बॅगा ठेवलेल्या त्या राजसदरेवर पोचलो.
          आजचा टप्पा हा राजगडावरून अळू दरवाजाने गडउतार होऊन राजगड तोरणा या धारेने तोरणा किल्ल्याच्या बुधला सुळक्याच्या इथून वर चढून वाळंजाई दरवाजाने उतरून भट्टी गाव गाठणे. आता संजीवनी माची गाठून तसाच राजगडाला निरोप देण्याची वेळ आली होती. यावेळेस राजगडावर पाहिजे असा वेळ देता येत नसल्याने आणि यावेळेच उद्दिष्ट किल्ल्यांपेक्षा त्यांना जोडणाऱ्या वाटा हे असल्याने आपसूकच कुमार गंधर्वानी गायलेल्या गीताच्या ओळी मुखी दाटल्या होत्या-
          ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तृष्टता मोठी || 
राजसदर सोडून पुढे येउन डाव्या बाजूची सुवेळा माचीची वाट सोडून पुढे येऊन संजीवनी माचीची उजव्या बाजूची वाट धरून बालेकिल्ला डाव्या अंगाला ठेवून वळसा मारताना घड्याळाचे काटे सव्वा अकराच्या पार गेले होते. संजीवनी माचीचे दणकट रूप आणि चिलखती बुरुज थांबण्या सांगत होते, तर समोर दिसणारा तोरणा देखील आम्हाला हाका मारीत होता. सकाळचा हुरूप असल्याने चाल चांगलीच वेगवान होती, बघता बघता संजीवनी माचीवरील चिलखती बुरुज, पाण्याचे टाके पार करून तटबंदीला असलेल्या अळू दरवाजाने किल्ल्यातून बाहेर पडून, पुढे संजीवनी माचीचा ट्रॅव्हर्स मारून राजगड दूर करू लागलो, लवकरात लवकर अंतर कापावं आणि जास्त थांबे घेऊ नये म्हणून मी या तिघांपासून २००-३०० पावले पुढेच चालत होतो.वाटेत एक गावकरी पाण्याच्या बाटल्यांचा बोजा डोक्यावर मारून गडावर विक्री करण्यासाठी चालले होते, त्यांच्याशी जरा वेळ बोलून निघालो, हा हा म्हणता संजीवनी माचीच्या शेवटच्या बुरुजाखाली आलो. इथून दोन वाटा फुटतात, डावीकडे जाणारी वाट ही भुतोंडे गावाकडे जाते, तर उजवीकडची वाट ही तोरण्याकडे जाते, हीच वाट आम्हाला पकडायची होती. बुरुजाखाली आल्यावर दोन्ही वाटा ठळक दिसत होत्या आणि दोन्ही वाटांवर असलेले मोठे दगड त्यांवरील असलेल्या खुणांमुळे लक्ष वेधून घेत होते.
झूम करून बघितले असता डावीकडच्या दगडावर बाण तर उजवीकडच्या दगडावर X फुल्ली लांबूनच दिसते 
आम्हाला ज्या वाटेने जायचे होते त्या तोरण्याच्या वाटेवरच्या दगडावर x खूण केली होती, तर भुतोंड्याकडे जाणाऱ्या वाटेच्या दगडाला बाणाची खूण केली होती. स्वाभाविकच वाट मोडली असेल किंवा दरड कोसळली असेल किंवा अजून काही कारणाने त्या वाटेने जाऊ नका असा अर्थ घेऊन आम्ही डाव्या बाजूची वाट घेतली.

वाटेला सुरुवातीला तीव्र उतार आणि घसरण होती, उतरायला मजा येत असली तरी काळजीपूर्वक कारण पाय सरकला की भूमीवर लोटांगण घातलच म्हणून समजा.
संजीवनी माचीच्या शेवटच्या बुरुजाखालची उतरण 
मागे वळून पाहिलं तर बाकीच्यानी देखील चांगला वेग पकडला होता. राजसदर सोडल्यापासून पाठीवर वजन असूनदेखील कोणीसुद्धा मध्ये थांबलं नव्हतं, दिवसाची सुरुवात चांगल्या गतीने चालू होती. मी यांच्यापासून पुढेच चालतोय, उतार संपला आणि सपाटीला लागणार तोच एका झाडाच्या मुळात पाय अडकून तोल गेला आणि मी जोरात सुपरमॅन सारखा सूर मारून खाली आडवा झालो, पाठीवरच्या बॅगच्या वजनामुळे मला नीट उठता येत नव्हतं आणि मी अडकूनच राहिलो होतो. मागच्यांना आवाज द्यावा म्हणून मागे बघतोय तर हे सर्व लांब होते आणि मी ओरडलो तर धावत येतील, आणि तो रस्ता धावत येण्याचा नव्हता म्हणून तसाच अवघडलेला पडून त्यांची येण्याची वाट पाहू लागलो. ढोपर फुटलं होत, हाताचा कोपरा देखील ठणकत होता. बऱ्यापैकी लागलं असणार पुढचा पूर्ण पल्ला माझ्या नजरेसमोरून झरझर जात होता. एवढ्यात मनोज आला, मस्त फोटो काढून त्याने माझ्या पाठीवरची बॅग काढून मला उठायला मदत केली.
बसून बघतोय तर ढोप्यावर ट्रॅक पॅन्ट फाटली होती, आत ढोपर देखील चांगलंच फुटल होतो, रक्त येत होतो, डाव्या हाताच्या कोपऱ्यावरदेखील खरचटलं होतं, टीशर्ट देखील तिथं फाटलं होत. सह्याद्रीला अखेर नतमस्तक होऊन रक्त वाहील होत. आता पर्यंत लोटांगण आणि नतमस्तक बऱ्याच वेळा झालो होतो, पण रक्त येण्याची ही पहिलीच वेळ. फर्स्ट एड काढून जखम साफ वगैरे करून औषध लावलं आणि पुढचा पल्ला गाठायला चालू केला.
              राजगडावरील राजसदर सोडून आता तासभर वेळ झाला होता, आणि मी पडल्यामुळे ब्रेकही चांगलाच मिळाला होता, त्यामुळे परत जोमाने चाल धरली, अजून थोडा वेळ पुढं गेलो असू तर गुगल मॅप बघितला आणि मनात एक शंका आली की आपण वेगळी वाट धरलीय, सागरने मागच्याच वर्षी राजगड तोरणा केला होता म्हणून त्याला विचारलं तुला काय वाटतय वाटेबद्दल तर साहेब म्हणतात- "मला तर हीच वाटते". वाटेवरच्या त्या खुणा आणि सागरदेखील म्हणतोय तर आपण बरोबरच आहोत. वाट मस्त मळलेली आणि बऱ्यापैकी सावलीतून होती आणि आमचं टार्गेट होत चार ते पाच तासात तोरणा गाठायचं.
वाटेने सरळ चालतोय तर आम्ही चालत असलेल्या धारेच्या खालच्या अंगाला डांबरी रस्ता वळसा घालून जात चाललेला दिसत होता, राजगड तोरणा ही रेंज करताना पाली खिंडीत याच रस्त्याला आपण ओलांडतो. त्यामुळे आता आम्ही ठरवलं की पुढे हा रस्ता खाली उतरून डांबरी रस्त्याला मिळेल मग तिथून आपण राजगड तोरण्याचा मुख्य वाटेला लागू. पुढे आलो चालतोय तर एक पठार लागलं, पठारावर एक सायकल आडवी पडलेली आणि एक साडी दिसली, आमच्या चौघांव्यतिरिक्त वेगळ्या मानवी खुणा दिसल्याने आम्हाला जरा हायस वाटलं.
संजीवनी माची - बालेकिल्ला - सुवेळा माची 
आजूबाजूला हाका मारल्या पण प्रत्युत्तरादाखल काहीच उत्तर न आल्याने आम्ही तिथुन काढता पाय घेतला, त्या पठारावरून मागे नजर फेकली असता राजगडाची संजीवनी माची, बालेकिल्ला आणि सुवेळा माची हे सार एका नजरेत दिसत होतं, यावरून आम्ही कुठुन कुठे आलोत याचा अंदाज येत होता. पावलांना परत गती दिली आणि तीच पायवाट धरून सरळ पुढे निघालो, आता आमचा यत्न होता तो डांबरी सडकेला लागण्याचा. एवढ्यात चालताना त्या वाटेवर एक घर दिसलं, वाटेवरती असं घर, झाप किंवा मानवी वस्तीच्या खुणा दिसणं हे एखाद्या भटक्यासाठी खूप मोलाचं असतं. 
वाटेवर लागलेली २ घरं 
आजी मी ब्रम्ह पाहिले, अस काहीस असतं ते. दोन घर होती, त्यातील एका घराच्या बाहेर चप्पल होती, पण दरवाजा लावला होता, हाका मारतोय पण पलीकडून काहीच आवाज येत नव्हता, वाटलं बहुधा ती सायकल दिसली होती, तिकडेच गेले असावेत, राम भरोसे पुन्हा मग पुढे चालू लागलो. ते घर सोडलं आणि आता वाट जरा कमी मळलेली होती, गवत ढोप्याएवढं वाढलं होत आणि त्यातून बारीक पायवाट दिसत होती. राजगड तोरण्याची मुख्य धार देखील इथून आम्हाला दिसत होती, पण तिच्याकडे जायचा रस्ता मात्र काही कळत नव्हता, डांबरी सडक देखील बहुधा आमच्या धारेला खेटून जात असावी त्यामुळे ती देखील दिसत नव्हती, आमचं उद्दिष्ट आता डांबरी रस्ता हेच होतं. गवतातल्या वाटेतून आता परत झाडीत येणार तोच एक डोंगरतल्या पाण्याचा डोह दिसला, तिथेच थांबा घेत पोटभर पाणी पिऊन घेतलं, मस्त चहाचे घुटके घेतले आणि पुढच्या वाटेला निघालो. 
धारेच्या टोकावर लागलेलं देवीचं मंदिर 
             एवढ्यात अप्पांचा फोन आला, चालू घटना अप्पांच्या कानावर घातली त्यांनी सुद्धा आम्हाला डांबरी रस्त्याला उतरण्यास सांगितलं.  चालतोय चालतोय, वाट काही मिळत नव्हती एक वाजून गेला होता, सूर्य देखील डोक्यावर आला होता, त्याची प्रखरता एवढी जाणवत नव्हती ते एक आमच्यासाठी चांगलं होत, इतक्यात लांबूनच एका मंदिराचा कळस दिसला पाहतोय तर समोर छान मंदिर बांधलं होत, त्या मंदिराचं बांधकाम स्लॅब टाकून, टाईल्स वगैरे लावून केलेलं, मंदिराच्या पुढे जेसीबी लावून मातीचा मोठा रस्ता केलेला दिसत होता. हे सर्व दिसताच क्षणी आपण आता लगेच डांबरी रस्त्याला लागणार हे पक्क झालं. मंदिराजवळ गेलो, बॅग्स काढल्या आणि अजीबाजूच्या परिसराचा कानोसा घेऊ लागलो, गाव काही जवळजवळ दिसत नव्हतं, आपलं ध्येय असलेलं डांबरी रस्ताही दूरवर कुठे नजरेत येत नव्हता, प्रिसिलिया आणि सागरला तिथेच बसवून मी आणि मनोज त्या कच्च्या रस्त्याने पुढे काही उतरायला दिसतय का बघायला गेलो. पुढे येऊन एका वळणावर थांबलो आणि पाहतोय तर नजर जाईस्तोवर तो कच्चा रस्ताच दिसत होता, गूगल मॅपवर बघतोय, तर डांबरी रस्ता आम्हाला जायच्या अगदी विरूद्ध अंगाला होता, त्यामुळे तिकडे उतरून परत वळसा मारत चालत येणं म्हणजे मुक्काम आम्हाला कुठे तरी रस्त्यातच करावा लागला असता. 
             तिथून फिरलो मागे आणि ही दोघ बसली होती, त्या मंदिरापाशी आलो आणि आता निर्णय घेण्याची वेळ आली होती, एकंदर परिस्थिती सगळ्यांना महिती होती. घड्याळात दीड वाजले होते. त्या बुरुजापासून आता आहोत त्या मंदिरापर्यंत यायला आम्हाला पावणेदोन तास लागले होते. आता आमच्याकडे दोन पर्याय होते, पहिला- ते घर आणि ती सायकल दिसली होती तिथे कोणी आहे का हे शोधून त्यांना वाट विचारायची किंवा दुसरा- आलो त्या मार्गाने पार बुरुजापर्यंत जायचं जिथे वाट सोडली होती तिथूनच वाट पकडायची. मी जेव्हा पडलो आणि त्यानंतर जेव्हा जाणवलं होत वाट भरकटलो तेव्हा तो चढ चढायला लागू नये म्हणून माघारी न फिरता एवढं अंतर कापलं होत. आता परत त्याच वाटेने जायचं म्हणजे अगदी अंगावर आलं होत.
पाण्याचा डोह 
त्यात तोरणा चढून आम्हाला उतरायच देखील होता, याच कारण म्हणजे हर्षल दादा आम्हाला तोरण्याच्या पायथ्याशी असलेल्या भट्टी गावात भेटणार होता, त्याला देखील यायला रात्र होणार होती, तर त्याला उगाच रात्री का तोरणा चढून दमवायचं, तसाही मागच्या वर्षी त्यानेदेखील राजगड तोरणा केला असल्यामुळे त्याने पहिल्या दिवशी सुट्टी घेणं टाळलं. उद्यासाठी कोणीतरी आपल्यात ताज्या दमाचा असणार या हेतूने सर्वांच एकमत झालं होत. आता भरभर अंतर कापत त्या पाण्याशेजारी आलो, पोटपूजा करून पुढची चाल धरूया म्हणत चटणी भाजी भाकरी लोणचं फरसाण यावर ताव मारला, भरपेट पाणी पिऊन आणि जवळच्या पाणपिशव्या देखील भरून आता समोर काय वाढून ठेवलंय याची चांगलीच कल्पना होती, त्या दृष्टीने पुढची चाल धरली. मंदिर जेव्हा सोडलं तेव्हा संजीवनी माचीचा तो बुरुज आणि त्याच्या खालचा उतार चांगलाच नजरेत भरत होता, त्या उतारावरून तेव्हा एक गुराखी आपल्या गुरांना घेऊन उतरत होते, वाटेत आपल्याला ते मामा भेटू दे, अशी आशा देखील आम्ही बाळगून होतो.
सीट नसलेली सायकल 
पाणवठा सोडून निघालो, ते घर आलं, घराजवळ पुन्हा आवाज दिले, कोणीच नाही, पुढे चाल धरली पठारावर आलो. ती सायकल तिथेच असुदे, म्हणजे कोणीतरी तिथं असणार असं स्वतःशीच बोलत त्या पठारावर पोचलो, लांबूनच ती सायकल दिसली आणि हायसं वाटलं, त्या साडीवर दगड ठेवले होते, म्हणजे ती साडी देखील वाळत टाकली होती, इथे नक्कीच कोणीतरी असणार, आलो सायकलपाशी आलो, पाहतोय तर सायकलला सीटच नाही, म्हणजे ती सायकल तशीच टाकून दिली होती, पुन्हा हिरमोड! का कुणास ठाऊक पण त्या पठाराच्या पुढे अजून एक पठार आहे, तिथे जाऊन खाली उतरायला काही वाट दिसते का बघूया...अजून खुमखुमी गेली नव्हती अस नाही, तर तो शेवटचा चढ खरंच नको वाटत होता, सागरला तिथे थांबवून बॅग्स सोडल्या आणि आम्ही तिघ काही वाट दिसते का बघायला गेलो. दोन्ही पठारांच्या मध्ये वरच्या बाजुने एक काळा पाईप खाली आला होता आणि पाईपच्या या टोकाखाली एक मोठा टोप पाण्याने भरत ठेवला होता, वरच्या बाजूला एक पाण्याचा डोह होता तेथून तो पाईप आणला होता.आता इथे नक्कीच कुणीतरी आहे याची पुष्टी मिळाली पण कोणी कुठेच दिसत नव्हतं. तिथून पुढे त्या दुसऱ्या पठारावर पोचलो आणि प्रिसी, मनोज ला एका बाजूला पाठवले आणि मी एका बाजूला असे विभागून काही वाट मिळते का शोधु लागलो. थोडा आडबाजूला घुसलो आणि मला दगडावर एक बाण दिसला, आता इथून वाट असणार, या आशेने मी पुढे चालू लागलो, वाटेने चालता चालता पठार संपलं आणि उतारावर जंगल चालू झाल आणि वाट त्या झाडीत जात होती, मघाशी येताना या पठाराच्या अलीकडेच खाली डांबरी रस्ता दिसला होता, म्हणजे ही वाट त्या डांबरी रस्त्याला लागणारच, प्रिसी आणि मनोजला लगेच हाक मारून सविस्तर समजावलं आणि आता पुढे जाण्यापेक्षा इथून उतरुया, अस ठरवून सागरला बोलवायला आणि आमच्या बॅग आणायला गेलो. जाता जाता त्या टोपापाशी आलो त्यात अजून एक छोटी टोपशी होती, त्या टोपशीने तिघांनी पाणी प्यायलं. कोरडा घसा ओला केला, उन्हात असल्यामुळे पाणी गरम झालं होत, पण कोरड्या घशाला हे देखील चालणार होतं. 
        सागरजवळ पोचलो, बॅग पाठीला मारल्या आणि सागरला आम्ही खोट सांगणार होतो की वाट नाही, आपल्याला त्या बुरुजाजवळच जायचं आहे, इतक्यात त्या बुरुजाखाली दिसलेले गुराखी मामा आमच्यापाशी येऊन पोचले होते, गुरांसाठी डोक्यावर गवताचा भारा घेऊनच ते आले होते. लगबगीने त्यांच्या जवळ आलो, बुरुजाजवळच्या त्या खुणांपासून ते आम्ही पोचलेल्या मंदिरापर्यंतचा इतिवृत्तांत मामांना सांगितला आणि इथून काही वाट आहे का विचारलं, मामा बोलले त्या बुरुजाच्या खालून एक डावीकडे वाट जाऊन त्या तुम्हाला जायचंय त्या सोंडेला मिळते तर इथून या पठारावरून एक वाट खाली जाऊन डांबरी रस्त्याने तुम्ही पाली खिंडीत पोचू शकता.
मामा वाट दाखवायला येता का अस विचारण्यात तसूभरही उशीर केला नाही, हा गवताचा भारा घरला टाकून येतो अस म्हणत मामांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत ते येण्याची वाट पाहू लागलो. मामा आले, आमची पावले आता त्या दुसऱ्या पठाराकडेच चालली होती, बोलता बोलता मामा बोलून गेले, सकाळपासून काय खाल्लं नाही, बेक्कार भूक लागलीय. पुढे आलो त्या पाण्याने भरलेल्या टोपापाशी आलो पाहतोय तर टोप रिकामा. अरे! इथे आलं तरी कोण इतक्यात? मामा तर आमच्या समोर आले, आणि सोबतच आहेत, मग कोण? इतक्यात मामांची गुर वरच्या डोहात पाणी प्यायला गेलेली दिसली आणि कळलं की हे पाणी देखील गुरांसाठीच ठेवलेलं होतं. गुरांचं पाणी आम्ही प्यायलं होत अस कळल्यावर आम्ही सगळे एकमेकांकडे बघून मनातल्या मनात ओशाळत होतो. झाल्या घटनेवर दुर्लक्ष करून वाटेवर लक्ष केंद्रित करून मामांच्या मागे मागे चाललो होतो, मामांनी आम्हाला मला जी वाट दिसली होती त्याच वाटेवर आणून सोडलं त्याच्या अगोदर त्यांनी आम्हाला पठाराच्या कडेला नेऊन आम्हाला ज्या पाली खिंडीतून मुख्य वाटेला लागायचं होत ती खिंड देखील दाखवली आणि मामांनी आमचा निरोप घेतला, निरोप देताना त्यांचे शब्द मला आठवले आणि आमच्याकडे असलेल्या भाकरी आणि बिस्कीटपुडा त्यांना देऊन त्यांचा रामराम घेतला, मामा म्हणत होते पुढे वाट दाखवायला येऊ का? पण त्यांना तिथेच थांबवत पुढची वाट धरली, मागे वळून बघितलं तर मामा पुढे जाऊन परत आमच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होते. डोंगरातल्या माणसांच्या याच माणुसकीमुळे हे डोंगर आम्हाला पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे येण्यास प्रवृत्त करत होते. लक्ष्मण डेबे हे नाव स्मृतिपटलावर कायमच कोरलं गेलं होतं.
मामांकडून वाट समजून घेताना 
         पुढची वाट ही उतारावरील आणि झाडांच्या सावलीतून आणि महत्वाचं आता योग्य वाटेला लागणार त्यामुळे पुन्हा वेग घेत अवघ्या पंधरा मिनिटात आम्ही डांबरी रस्त्याला येऊन भिडलो होतो, इथून दोन अडीच किलोमीटरचा पल्ला मारून आम्ही पाली खिंडीत पोचणार होतो. डोंगरातील पायवाट तुडवताना काही वाटत नाही, पण मध्येच जेव्हा असा डांबरी रस्ता येतो तेव्हा जीव अक्षरशः मेटाकुटीला येतो. डांबरी रस्त्याने जाताना ऊन देखील जाणवत होतं आणि पाठीवरच वजनसुद्धा! एका ठिकाणी सावलीला थांबून काही गाडी मिळते का बघत होतो. एवढ्यात एका बाईकचा आवाज येऊ लागला. आशेचा पहिला किरण होता तो, पण जशी ती बाईक नजरेच्या टप्प्यात आली आणि त्या बाईक स्वाराची बसण्याची पद्धत बघितली, त्यावरून लगेच अंदाज आला की बाईक पंक्चर आहे. तो जसा जवळ येऊ लागला तसा आमचा कल्लोळ वाढू लागला, त्याने आमच्या जवळून जाता जाता आमच्याकडे कटाक्ष टाकला, त्याला देखील हसू आलं होत आणि आम्ही देखील एकमेकांकडे बघून खिदळत होतो, आणि हे सर्व मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होतो. त्यानंतर अजून एक बाईक वाला आला तर ते दोन जण होते, त्यामुळे काही प्रश्नच नव्हता. चला उठा आणि वाटेला लागा, बॅग पाठीवर मारली आणि तो डांबरी रस्तादेखील आता आम्ही पायाखालून घालू लागलो.
तार रस्त्याची कंटाळवाणी चाल 
डांबरी रस्त्याला एका ठिकाणी वळण घेत असताना समोर एकदम संजीवनी माचीचा चिलखती बुरुज एकदम समोर आला, हा तोच बुरुज जिथे आम्ही वेगळी वाट घेऊन चौऱ्याऐंशीचा फेरा मारून चाललो होतो, त्या बुरुजाकडे पाहून तो बुरुज आम्हाला खिजवीत आहे असच काहीस चित्र आमच्या समोर उभं राहत होतं. येणाऱ्या गाड्यांकडे आशेने बघत बघत, मजल-दरमजल करत अखेर त्या पालिखिंडीत पोचलो.  

खिंडीतून  वाटेला लागल्यावर वाटेच्या उजव्या बाजूला असलेलं घर 
       राजगडावरून येऊन त्या खिंडीत उतरणारी वाट आणि त्या खिंडीतून तोरण्याकडे जाणारी वाट हे दोन्ही फाटे दिसले तिथेच सा.बां. विभाग वेल्हे हद्द सुरू असा बोर्ड देखील लावला आहे. दीड वाजता परत मागे फिरायचा निर्णय घेऊन दोन वाजता जेवून वगैरे निघून साडेचारच्या ठोक्याला आम्ही राजगड तोरण्याचा वाटेच्या मध्ये त्या पालिखिंडीत पोचलो होतो, एकंदरीत त्या बुरुजाकडे न जाता ही वाट मिळून अर्धा पल्ला गाठला हे आता आमच्यासाठी खूप मोठं सुख होत.खिंडीतून वर चढलो, भराभर पावले टाकीत, तोरणा जवळ करत होतो, खिंडीतून वर चढल्यावर कारवीच्या झाडोऱ्यातून गेल्यावर एका ठिकाणी वाटेच्या उजव्या बाजूला घर लागते ही खूण सागरने सांगितली आणि लगेच ते घर लागलं. चला! आता आपण योग्य वाट पकडलीय, अस म्हणत पावलांनी वेग घेतला. थकलो होतो, पण तरीही पुढचा जो काही पल्ला गाठायचा होता त्यासाठी नव्हतो थकलो. भराभर पावलं टाकत मी आता यांच्यापासून परत दूर झालो, कुठे वाट वाकडी झाली असेल तिथेच थांबायचो, मागे मनोज दिसला की माझी गाडी पुन्हा सुसाट. आता न थांबताच जाता येईल तितकं जायचं. सकाळी त्या मुलांनी सांगितलं होत की बुधल्याच्या इथे चढताना वेळ जाईल, म्हणून उजेडातच तो टप्पा मारुया अस ठरवून पावलांना गती दिली होती.
सुख 
सूर्यनारायण देखील शांत होत चालले होते, तर डोक्यापेक्षा उंच कारवीतून जाताना गारवा लागत होता, त्यामुळे वाट कापण अजून सोईस्कर होत होतं. सूर्याच्या छटा बदलत होत्या तसा माझा वेगही दुणावत होता. माझ्यात आणि मागच्यांमध्ये अंतर वाढत चाललं होत. राजगड तोरणा ही धार चढताना सारख वर खाली वर खाली करावं लागत. एका ठिकाणी आता मला दोन फाटे फुटलेले दिसत होते सरळ जायचं कळत होत, तरी मागच्याना थांबून सागर कडून एकदा पुष्टी करून घ्यावी म्हणून थांबलो. थांबलो, पाहतोय तर माझा वेग जरा जास्तच होता, आणि मला गाठण्याच्या नादात हे तिघेही दमून गेले होते, तिथेच थोडा विसावा घ्यावा म्हणून बसायला सांगितलं, चहा दिला सर्वांना थोडं बर वाटलं आणि पुढे लवकर जाऊया जेणेकरून उजेडात वर पोचलो तर पुढची वाट शोधण्यास चांगला वेळ मिळेल. मोबाईलवर हर्षल दादाचा मेसेज आला होता घडला सर्व वृतांत त्याला सांगितला आणि त्याला भट्टी गावातल्या शाळेतच भेटायचं अस सांगून ठेवलं होत.  

      पुढे गेल्यावर एक देवाचं ठाण लागलं, त्याच्याच पुढच्या दिशेने कुत्रा भुंकण्याचे आवाज आला, कुठे तरी जवळपास मनुष्यवस्ती आहे, असा भास झाला, थोडं पुढे आल्यावर एक बोर्ड होता त्यावर तोरण्याकडे आणि राजगडाकडे जाणाऱ्या वाटांचे बाण दाखवले होते, आणि रात्र झाली तरी जेवणाची सोय होईल असा आशय त्यावर लिहिला होता. समोरून एक मावशी चालत आल्या, त्या त्यांच्या गुरांना घेऊन चालल्या होत्या, त्यांच्या अगोदर त्यांचा कुत्रा आमच्या इथे येऊन आम्हाला हुंगायला लागला. मावशी चालत येत असलेल्या दिशेने मागच्या बाजूला त्यांचं घर देखील दिसत होत. मावशींना तोरण्याला पोचायला अजून किती वेळ लागेल विचारलं असता अजून तीन तास लागतील अस मावशींनी सांगितलं आणि आम्ही एक प्रकारे आवंढाच गिळला.
सव्वापाच-साडेपाच झालेले असताना तोरण्याला पोचायला अजून तीन तास लागणार बोलल्यावर पेचातच पडलो होतो. किती काही झालं तरी ठरल्या जागी पोचायचंच असा एक निर्धार करून निघालो, तांबूस रंगाचा गोळा आता हवेत विरण्या चालला होता, त्याचीच गती पकडून पावले आपोआप पुढे ढकलली जात होती.बुधला सुळका आमच्या बरोबर समोर उभा राहून, या पोरांनो, लवकर या असच काहीसा खुणावत होता. तर मागे संजीवनी माचीवरील बुरुज आम्हाला खिजवीत होता. 
        चढ-उतार-कारवी अश्या त्या सोंडेवरून जाताना दिनभास्कर आता त्यांचा कारभार उरकून गुडूप झाले होते, चढायचं उतरायचं एक एक टेपाड मागे सारून बुधला जवळ करायचा हेच काय ते आता उरलं होतं. पाठीवरच्या वजनामुळे आता थकवा जाणवायला लागला आणि काळोख देखील पडायला सुरुवात झाली. बुधल्याच्या फक्त दोन टेपाड मागे असू तर थांबून सर्वाना टॉर्च काढायला सांगून पुढची वाट चालू लागलो. एवढ्यात मी सांगितलं की आता काळोखातच चढायचं आहे तर आता थांबुया जरा जास्त वेळ आणि मग चांगल्या प्रकारे हुरूप मारू, थांबून निघालो आणि समोर आता एकदम उभा चढ लागला, हात टेकत, धापा टाकत तो उभा चढ चढलो आणि वर एकदम बसलो. ही बॅग घेऊन मला काही आता लगेच पुढं सरकण होणार नाही,  आता पार थकलो होतो, सकाळी दहा वाजता सुरू झालेली चाल, काटे आता साडेसहाला टेकले होते. आम्ही अजून तोरण्यावर पण नव्हतो पोचलो. मनाशी ठरवलं होत किती काही झालं तरी मी डगमगणार नाही, जे जस ठरवलंय तसच पूर्णत्वास नेईन. एवढ्यात सागरने माझी बॅग घेण्यास तयारी दाखवली, आमच्या चौघांच्यात सागरचा पहिलाच जंबो ट्रेक असल्याने मी त्याच्या बॅग मध्ये आमच्या चौघांच्या तुलनेत कमी वजन भरले होते, त्याचा फायदा आता झाला. जशी सागर ने माझी बॅग आणि मी सागरची बॅग घेतली तस मी स्वतःला एकदम हवेतच उडतोय अस अनुभवायला लागलो. बुधल्याचा तो रॉकपॅच चढताना आता सागर पुढे तर त्याच्या मागे मी मनोज प्रिसी असे आम्ही चढत होतो. त्या मुलांनी सांगितलं तस कठीण वगैरे काही नव्हतं, सुरक्षितपणे आम्ही वर चढून तोरणा किल्ल्यावर प्रवेश केला. बुधला सुळक्याच्या बाजूने जाताना तिथे एक कॉलेज पोरांचा ग्रुप टेंट आणि शेकोटी लावून कॅम्पिंग करत होते. त्यातल्याच एक दोघांनी आमची विचारपूस केली. त्यांना निरोप देऊन आता आम्ही वाळंजाई दरवाजा शोधू लागला. बुधल्या कडून मेंगाई मंदिरच्या दिशेने चालत जाताना डाव्या बाजूला १०० मीटर च्या आत हा दरवाजा आहे असा माझा अभ्यास सांगत होता. त्या दृष्टीने एका ठिकाणी मी उतरलो तिथे तटबंदी ढासळली होती,मला वाटलं इथून वाट असू शकते, तिथे जाऊन नीटस काही दिसत नव्हतं, मग मनोजला सांगितलं पुढे जाऊन डाव्या बाजूला कुठे वाट जाते का बघ, दरवाजा असणार, १०० पावलांच्या आतच तुला दरवाजा दिसला पाहिजे. आतापर्यंत माझ्याकडे सोलार लाईट होती आणि ती हातात घेऊन चालत होतो, सागर कडून त्याची हेडटॉर्च घेऊन आजूबाजूला कुठे वाट दिसतेय का बघू लागलो, इतक्यात मनोजचा आवाज आला की दरवाजा आहे म्हणून. अंधार पडला होता आणि उशिरही इतका झाला होता की आता फोटो काढायचे देखील कुणाच्यात त्राण नव्हते.
        रात्री दोन वाजता येऊन पहाटे चार पर्यंत राजगड चढलो, आणि सकाळी राजगडावरून निघून ७ वाजेपर्यंत तोरण्यावर पोचलो होतो, पण खरंतर हा आजचा ट्रेक नव्हताच, कारण ही वाट चांगली मळलेली होती, त्यात दुसरी वाट पकडून भरकटलो ही गोष्ट वेगळी. आजच्या दिवसाचा खरा ट्रेक तोरणा किल्ल्यावरील वाळंजाई दरवाजा शोधून त्या वाटेने भट्टी गाव गाठणं हा होता. कारण ओंकार ओक याच्या म्हणण्यावरून त्या वाटेने जास्त कोणी जात नाही, आणि पावसाळा लांबल्यामुळे कारवी भयंकर झाली असणार. ओंकार बोलला ते खरंच होत, दरवाज्यात पोचेपर्यंतच गवत इतक होत आणि पुढे कोणी गेला असेल अस काही वाटत नव्हतं. दरवाज्यात पोचलो सोलार लाईट आता बॅगला लावली हेडटॉर्च काढून डोक्याला लावली आणि निघालो. दरवाजातून निघून सुरुवातीला उजव्या बाजूने ट्रॅव्हर्स मारत हळू हळू चाललो होतो, तण खूप माजलं होत, त्यातून वाट काढत एक एक पाऊल सरकवत चाललो होतो, मध्ये एका ठिकाणी थांबून कोयता काढला आणि वाटेतील गवत कापत मी पुढे आणि मागे सगळा चमू येत होता. इथून पुढे गेल्यावर वाळंजाई देवीचं ठाणं लागतं,तिथून डावीकडे सरळ वाट खाली जाते, हे मला माहीत होतं. मनोजने जेव्हा तोरणा किल्ला केला होता, तेव्हा तो या ठण्यापर्यंत आला होता, तिथं पाण्याचं टाकं देखील आहे अस मनोजने सांगितलं. सावरत-सांभाळत चालता चालता त्या वाळंजाई देवीच्या ठण्यापर्यंत पोचलोदेखील. टाक्यातील त्या पाण्यात छोटे-छोटे मासे मस्त विहार करत होते, त्या टाक्यातील पाणी पिऊन तृषा शांत केली, थांबाही बऱ्यापैकी झाला होता. माझ्याकडे सागरची बॅग असल्याने मी देखील आता पुढची वाट शोधण्यास तयार होतो. देवीच्या ठाण्याच्या इथून खाली भट्टी गावातील लाईट दृष्टीत येत होत्या खाली उतरलेली वाटही दिसत होती. बॅगा लावल्या आणि खाली दोन पावले उतरलो नसू तोच वाट पूर्ण कारवीने झाकलेली. उजेडात असताना ही वाट उतरायला काही वाटलं नसत, पण काळोखात ही वाट उतरण जिकरीचंच होत. कोयता काढला, सपासप कोयता चालवीत मागच्याना वाट करत मी चाललो होतो, चौघांमध्ये जास्त अंतर न ठेवता हळूहळू आम्ही अंतर कापत होतो, एवढ्यात हर्षलदादाचा कॉल आला, त्याला सांगितलं की - "वाळंजाई देवीचं ठाणं ओलांडून गावाकडे येणाऱ्या धारेवरील वाटेला लागलो आहोत, वाट वरून पूर्ण झाकलेली आहे, पण खाली मळलेली वाट आहे, किती लेट झालो तरी तू शाळेतच थांब, आम्ही शाळेतच पोचू." जेवणाचं विचारलं असता, गावात आल्यावरच आता काय ते जेवण असा विचार असताना दादा बोलला की मीच जेवण घेऊन येतो तुमच्यासाठी. दादा आमच्यासाठी जेवण आणतोय बोलला म्हणजे हा काय अजून निघाला नाही, म्हणजे आपण लवकर पोचू आणि त्यामुळे दादाला आपल्याला शोधायला यावं लागणार नाही, यामुळे त्या तशा वेळेसही जरा हायस वाटलं. 
        वाट खरंच कारवी मध्ये अक्षरशः झाकून गेली होती, कोयता चालवायची सवय नसल्याने अवघड होत होतं, पण आल्या वाटेवरून फिरून तोरण्याला मुक्काम करून हर्षल दादाला वर बोलावणं शक्य नव्हतं आणि आम्हाला देखील माघारी जाऊन वेल्हा मार्गे उतरण केवळ अशक्यच! त्यामुळे जे काही आहे ते समोर आहे, त्यातूनच मार्ग काढणे हेच जास्त सोपं होत. आलिया भोगासी अस काही आमचं चालू होत. मागच्याना माहीत असेल की नसेल माहीत नाही, पण मला अजूनही खर वाटत नाही की मी त्या वाटेने खाली उतरलोय आणि बाकीच्यांना देखील सुखरूप खाली उतरवलय. सागरने बॅग घेतल्याचा यात खरच फायदा झाला. भट्टी गाव आता आम्हाला दिसत असलं तरी ते आमच्यापासून दूर होत आणि त्यात काळोख आणि ही अशी दाट कारवी भरली वाट. कोयता चालवून चालवून हात दुखायला लागला होता, शेवटी त्या कारवीतच मधल्या  मध्ये बसून थांबा घेत, पाणी पीत आम्ही आमची वाटचाल करत होतो, मी इतका थकलोय बोलल्यावर बाकीचे पण जाम थकले असणार पण कोणीही तोंडातून ब्र काढत नव्हता. यामुळे आपल्यासोबत जी काय मोजकी लोक आहेत ती खरंच चांगली आहेत, याच सार्थक वाटलं. कारवी संपून आता मोठी झाडी लागली त्यात देखील वाट कारवीने झाकली होती फक्त जे काही गावाच्या लाईट्स दिसायच्या त्या आता मोठ्या झाडांमुळे दिसत नव्हते, परिणामतः दिशा मिळणं जरा कठीण झालं होत. त्या झाडीतून देखील वाट काढत वाट आता हळू हळू डाव्या बाजूला म्हणजेच गावाकडच्या बाजूला कलू लागली आणि एका ओढ्याला येऊन थांबली. ओढ्याला पाणी वाहत होत, तिथे एक थांबा घेऊन माझ्या लक्षात आलं की भट्टी गावाच्या बाजूने ओढा जातो. बऱ्यापैकी आम्ही आता गावाच्या जवळ आलो होतो, पण ओढ्याच्या इथे आल्यावर पुढे कुठल्या बाजूला जायचं अशी पहिल्यासारखी बरी वाट समजतच नव्हती आलो तीच वाट पकडून गेलो तर ती वाट वर चढू लागली आणि परत ओढ्यात मिळाली आणि ओढ्यात तिथे झाडी अशी वाढली होती की इथून पुढे वाट असेल अस काही वाटत नव्हत, माघारी फिरून परत सागर गेलेला तिकडे गेलो, त्या बाजूला ढोप्याएवढं गवत वाढलं होत आणि खूप साऱ्या बारीक बारीक वाटा फुटलेल्या दिसत होत्या. त्यातल्या त्यात सागरला एक वाट चांगली दिसली, त्याने मला आवाज दिला, ती वाट बघून याच वाटेने जाऊया अस म्हणत त्या दोघांना बोलवायला आणि आमच्या बॅग्स आणायला गेलो. सकाळी दहाला चालू झालेली तंगडतोड रात्रीचे दहा वाजले तरी संपण्याच नाव घेत नव्हती. 
        ही वाट आता ओढ्याच्या कडेने जात होती, गवत वाढलेलं असल्यामुळे खाली मळलेली वाट आहे किंवा अशीच तात्पुरती वाट आहे काही कळत नव्हतं, चालता चालता एक निवडुंगाच झाड लागलं आणि तिथे मातीवरून गेलेली मळलेली वाट दिसत होती, आणि गावातल्या लाईट्स देखील आमच्यावर लक्ष ठेवून असलेल्या दिसत होत्या. वाट आता पठारावर आली आणि संपली. आता कुठे जायचं? गाव समोर दिसतोय पण वाट कुठेच नव्हती पठाराच्या कडेला आलो तर तिकडून उतरून काट्याकुट्यातून जाण त्रासदायक  ठरलं असतं, दुसरा पर्याय होता ओढ्यात उतरून ओढ्यातून गावाकडे जाणं. दुसरा पर्याय सोपा वाटत असला तरी त्यात ओढ्यात शूज ओले होणे, एखादा डोह लागणे किंवा धबधबा लागून उतरायला अत्यंत धोकादायक रस्ता लागणे असे संभाव्य धोके येऊ शकतात. इकडे आड तिकडे विहीर अशा गर्तेत असताना ओढ्यातून जाऊया अस ठरवून हळू हळू एक दगड पार करत शूज ओले होण्यापासून वाचवत चौघे एकामागून एक चाललो होतो. आणि अखेर वाटलं तेच झालं आम्ही एक ८-१० फुटी धबधब्याच्या तोंडाशी आलो, आता इथून कुठे जायचं या विवंचनेत असताना आजूबाजूला वाट शोधू लागलो पण गवत इतकं होत की वर चढण नीट दिसत नव्हतं. धबधब्याच्या बाजूला जिथून बॅग घेऊन उतरू शकलो असतो त्या उतारावर निवडुंग चांगलच जोमाने वाढलं होतं, त्यामुळे तिथून उतरायचं रस्ता देखील बंद झाला होता. त्या निवडुंगाच्या थोडं अलीकडे उतरायला जागा होती पण एक दगड सुटावलेला दिसत होता. बॅग काढून तिकडे झुकलो, वर असलेल्या झाडाच्या मुळीचा आधार घेऊन त्या दगडापाशी आलो, पाहतोय तर तो दगड वेगळा झालेला नव्हता, जेणेकरून त्याचा आम्हाला पायरी म्हणून चांगला वापर करता आला. सुरुवातीला सर्वांच्या बॅग खाली उतरवून नंतर एकेकाला हळू हळू खाली उतरवले. बॅग पाठीला लावून पुढे सरकलो तोच स्वागताला एक ३-४ फूट खोलीचा डोह देखील स्वागताला होताच, त्याच्या कडेकडेने जाऊन पुढे आलो. ओढ्यातून चालतोय चालतोय तर एक वाट ओढ्यातून बाहेर निघताना दिसली, ती वाट पकडून ओढ्यातून बाहेर आलो आणि गावाकडे निघालो. आता मनात विचार होत की इतकं खाली उतरलोय आणि बरोबर दिशेने चाललोय तर गाव एकदम समोर येईल.
         वाट चालतोय चालतोय आणि अगदी माझ्या मनात विचार चालू होत तसच झालं मंदिराची भिंत माझ्यापासून अवघ्या १०० फुटांवर दिसू लागली, हे मंदिर ओढ्याला अगदी खेटूनच बांधलं होतं, मंदिराची भिंत बघितली आणि जीव भांड्यात पडला. आलो रे! अस मागच्यांना सांगून त्यांच्यात देखील थोडी अजून पावले टाकण्याचं चैतन्य संचारवलं. मंदिराच्या मागच्या बाजूला आलो, तिथूनच मंदिराला अर्धी प्रदक्षिणा घालून पुढे आलो, हे मंदिर गावाच्या बाहेर असलं तरी ते आमच्यासारख्या भरकटलेल्या लोकांसाठी एक प्रकारची संजीवनी असते. आणि आमच्या आजच्या फरफटीवरून तर हे आम्हाला अमृतासमान होतं.
सकाळी काढलेला राम मंदिराचा फोटो 
मंदिरातील देवाला बाहेरूनच नमस्कार करून गावातून मंदिरापर्यंत आणलेल्या कच्च्या रस्त्याने गावात चालू लागलो, रस्त्याच्या बाजूला विजेच्या खांबांवर लाईट्स देखील होते, गावाची वेस ओलांडून गावात तर प्रवेश केला, आता शाळा शोधायची होती. हर्षल दादा केव्हाचा येऊन थांबला असेल तो आपली वाट बघत असेल, आपल्याला उशीर झाला म्हणून तो आपल्याला शोधायला वर तर गेला नसेल ना, अशा असंख्य प्रश्नांनी डोकं भंडावून निघालं होतं, तितक्यात एक गावकरी दिसला त्यांना शाळा कुठे आहे हे विचारलं आणि त्यांनी सांगितल्या दिशेने पावले वळवली. गाव बऱ्यापैकी मोठं आणि समृद्ध होतं आणि सुधारलेल देखील दिसत होतं. हळू हळू पावले टाकत गावाच्या मागच्या टोकावरून पुढच्या टोकावर आलो होतो. शाळा आणि रामाचं मंदिर एकाच ठिकाणी होत मंदिराच्या इथे पोचलो, आणि दादाला शोधायला लागलो, दादाची कार दिसत नव्हती, बहुधा ड्रायवर दादाला सोडून गेला असावा, एक ना हजार प्रश्न. मी सर्वात पुढे माझ्या मागे मनोज प्रिसी सागर हे देखील येत होते. हर्षल दादा, हर्षल दादा अशा हाका मारत मी पुढे चालतोय तोच मागून गाडीचे लाईट्स दिसले पाहतोय तर दहा-पंधरा सेकंदाच्या फरकाने दादा देखील आला होता. दादाला बघून आणि दादाने मारलेल्या मिठीने दिवसभर केलेल्या १३ तासांच्या तंगडतोडीचा क्षणभर का होईना पण विसर पडला. पाठीवरून बॅग ठेवली तेव्हा घड्याळ अकराचे टोले देत होता. ठरवलेली मोहीम फत्ते झाली होती, एका प्रकारे पुर्णत्व म्हणजे काय याची अनुभूती आम्ही घेत होतो. शुज सॉक्स काढून जसे मोकळे झालो आणि पहिला आजूबाजूला कुठे पाणी आहे का शोधायला गेलो तर शाळेचा नळ होता, वातावरण थंड झालं होतं तरीदेखील त्या थंड पाण्यात हात-पाय-एकंदरीत सर्वांगचं थरथरत होत तरीही त्या कापऱ्या थंडीत गारेगार पाणी अंगावर घेऊन हुडहुड करत रोबोट सारखी चाल करत इकडे आलो, ढोपर देखील दुखत होतं, मांड्या भरल्या होत्या, खांदे बोलत होते, कोयत्यामुळे उजवा हात देखील ठणकत होता. अंघोळी करून सर्वजण एकत्र आलो, दादाने आणलेल्या चिकन बिर्याणी आणि तंदुरीवर यथेच्छ ताव मारला आणि झोपण्यासाठी जागा शोधू लागलो, शाळेच्या प्रांगणात झोपायचं तर उद्या शनिवार सकाळची शाळा, राम मंदिरात झोपायला मंदिराला कुलूप लावलं होतं, बाजूला एक बंद पण एकदम भारी बंगला होता, त्याच्या दारात जातोय तोच बाहेरचा कुत्रा जोरजोरात भुंकायचा. अजून काही आसरा आहे का हे बघायला हर्षल दादा गेला कारण आमच्यात तर आता कुणाच्यात त्राण नव्हते राहिले, तर त्याला मंदिराच्या मागचा दरवाजा उघडा असलेला दिसला. चला सोयच झाली असं म्हणून सर्व सामान मंदिरात हलवलं. ड्रायव्हर काकांना निरोप दिला तर ते म्हणतात मी आता नाही जाणार या रस्त्याने एकटा, मी सकाळीच जाईन, तुम्ही जा आत, मी झोपतो गाडीतच. त्यांना निरोप देऊन मंदिरात गेलो ताडपत्री टाकली, सामान एका कोपऱ्यात ठेवून स्लीपिंग बॅग मध्ये घुसलो तो सकाळीच जाग येण्यासाठी. थोडावेळ गप्पा चालू होत्या पण नंतर कधी झोपलो कळलंच नाही.

राजगड - तोरणा - रायलिंग पठार - लिंगाणा - भाग १ वाचण्यासाठी इथे क्लिक करा  
"मावळतीचा धनी आता रंगांची चौफेर उधळण करीत आमचा निरोप घेत रायगडाच्या मागे गुडूप व्हायला चालला होता. हातात चहाचा प्याला घेऊन एकदम निवांतपणे तो दिनमणी, रौद्रावतारी लिंगाणा आणि पवित्र रायगड यांच्याशी हितगुज साधत एक रम्य संध्याकाळ आयुष्याच्या पटलावर सुवर्णाक्षरांनी कोरण्याचं काम करत होतो, कार्तिकी एकादशीचा आजचा दिवस, ज्ञानोबा माऊलींच्या संजीवन समाधीचा आजचा दिवस आणि त्याच दिवशी आम्ही या लिंगण्यासमोर बसलो होतो जणू काही समाधिस्त होण्यासाठीच."
भट्टी गावातील राम मंदिराच्या बाहेर कोकाटे बंधू आणि आकाश कोकाटे समवेत 
      शनिवार उजाडला तो मुळातच दबकत दबकत, कोंबड्याची बांग देखील ऐकू आली आणि सकाळ झाली. स्लीपिंग बॅग मधून बाहेर आलो, पण मंदिराच्या बाहेर कुणी जायचं हा प्रश्नच होता, कारण काल रात्री उशिरा आलो आणि मंदिराला कुलूप असूनदेखील मागच्या दाराने मंदिरात येऊन झोपलो होतो आणि ते देखील गावातल्या कुणालाही न विचारता. बाहेरचा कानोसा घेतला तर कळलं एक बाई आमच्याच नावाने बोंबा मारत बसली होती-"कोण ही, कुठुन आलीत आणि अशी कशी आपल्या मंदिरात झोपलीत?" काय होईल ते बघूया म्हणत अंथरुणातून बाहेर आलो तस कालचा सगळा ट्रेक अंगावर आलेला जाणवत होता, त्या तेरा तासांच्या चालीने मांड्या चांगल्याच भरल्या होत्या, पुढे नकोच जाऊया असा काहीसा सूर त्या आळवीत होत्या. माझ्यासोबत इतरांची देखील तीच परिस्थिती, हर्षलदादा एकटा तेवढा आमच्यात ताज्या दमाचा होता. मंदिरातून बाहेर पडलो, सकाळचा विधी आटोपून गावातल्या कुणाला तरी वाटेबद्दल विचारावं म्हणून शोधाशोध करू लागलो. कोकाटे बंधू म्हणून पन्नाशीचे दोन भाऊ समोर आले हर्षल दादाला त्यांच्याशी बोलायला सांगून मी नाश्त्याची तयारी करायला आलो, एकंदरीत बाहेेर सगळं काही ठीक होत, त्या मावशीही तिथून गेल्या होत्या, कधी नव्हे ते डोंगरात मी मॅगी घेऊन गेलो होतो, मॅगी झाली आणि चहाला देखील चांगलीच उकळी आली होती, चहात टाकलेल्या वेलचीचा वास मस्त दरवळत होता. आकाश कोकाटे म्हणून सातव्या इयत्तेत शिकणारा त्या कोकाटे बंधूंपैकी एकाचा मुलगा आला त्याला देखील बळजबरीच आमच्या सोबत नाश्ता करायला बसवला, तोच आम्हाला वाट दाखवायला येणार होता. पोट भरण्याच काम चालू आहे तर एक आजी मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या, आकाशची आजी होती ती, ती माऊली आमची चौकशी करू लागली, तर त्यांना आवाज देऊन चहा प्यायला बसवलं. बोलता बोलता त्या पटकन बोलून गेल्या माझी सुनबाई आज असती तर तुम्हाला जेवायला घरी घेऊन गेली असती.त्यांचे ते बोल ऐकून अंगावर काटाच आला. ती आजी आणि ते कोकाटे बंधू यांनी आम्हाला दुपारचं जेऊनच पुढच्या प्रवासाला सुरुवात करा अस सांगत होत्या. त्यांच्या त्या शब्दांच्याच पाहुणचाराने आम्ही तृप्तीचा ढेकर दिला आणि बॅगा भराभर आवरून पाठीला लावून पुढच्या प्रवासाला मार्गस्थ झालो. 

या हसण्याला काही मोल नाही 
        भट्टी ते गेळगाणी हे ५-६ किमीच अंतर तार रस्त्याने होत. सुरुवातच अशी भयानक होती आजच्या दिवसाची कि बास! एखादी गाडी मिळावी अशी अपेक्षा आणि कोकाटे बंधूनी तिथे एक गाडी थांबवली देखील. ISUZU आमच्या सेवेत दाखल होती, त्या सद्गृहस्थानी आम्हाला कुठे जायच आहे विचारलं, त्यांना जस मोहरी बोललो तर ते म्हणू लागले चला सिंगापूर पर्यंत सोडतो, आम्ही तिकडेच चाललो आहोत. तेव्हा त्यांना सांगितलं आम्ही तिकडे चाललोत पण चालत चाललोय, पुढे २ किमीवर असलेल्या गेळगाणी फाट्यापर्यंत फक्त आम्हाला सोडवा. गाडी मिळत असून देखील चालत यायची आमची खाज ऐकून त्या माणसाला आमच्या बद्दल काय वाटलं असेल ते तोच जाणे. त्या गाडीत सामान असल्याने आमचं सामान आणि सागर, मनोजला तिकडे बसायला सांगून मागे त्यांनी त्यांचाच टेंपो थांबवून त्यात मी, प्रिसिलिया, हर्षल दादा बसलो आणि भट्टी गावाचा आणि कोकाटे बंधूंचा निरोप घेतला. २ किमीपुरती का होईना पण ती तार रस्त्याची कंटाळवाणी चाल वाचली होती, जाता जाता तोरणा चांगलाच नजरेत भरत होता, काल अंधारात ज्या भयानक कारवीतून उतरलो होतो, ती सोंड ठळक दिसत होती. तोरण्याचं ते रूप न्याहाळेपर्यंत गाडी थांबली देखील, पाहतोय तर गेळगाणी फाट्याला आम्ही पोचलो होतो. पुढचा चमू सामान वगैरे उतरवून आमची वाट बघत बसले होते. टेंपोवाल्या दादाचे आभार मानून बॅगा पाठीला लावल्या आणि आजच्या दिवसाच्या तंगडतोडीला प्रारंभ केला.
          दोन किमीची तार रस्त्याची कंटाळवाणी चाल वाचली असली हे सुख असलं तरी अजून गेळगाणी फाटा ते गेळगाणी हे ३-४ किमीचं अंतर आ वासून आमची वाट पाहतच होतं. हा रस्ता धड डांबरीही नव्हता ना धड मातीचा. किती तरी वर्षांपूर्वी रस्त्याचं काम झालं असणार, डांबर आणि बारीक खडी हा प्रकार काही रस्त्यावर दिसत नव्हता. अगदी नामोल्लेख देखील नव्हता. चिखलात बेडकं जशी तोंड वर करून असतात अगदी तसंच कपची आणि दगडगोटे मातीतून वर आलेले दिसत होते. त्यामुळे हा रस्ता अजूनच अवघड झाला होता. कालची झालेली चाल बघता आज सकाळी लवकर उठून ट्रेकला सुरुवात करणं शक्य नव्हतं, त्याच्या मुळेच दहाला झालेली ट्रेकची सुरुवात आपल्याला आज उन्हातून चाल करायला लावणार हे गणित पक्क होत, आणि सुरुवात हि उन्हातुनच झाली होती. रस्त्याच्या बाजूला जास्त काही झाड नव्हती मध्येच कुठे एखादा डेरेदार वृक्ष तर कुठे बांबूची झाड दिसत होती. बिल्डर लोकांनी हा भाग देखील सोडला नव्हता, जागो जागी तारेचे फेन्सिंग लावून सदर मालमत्ता या या मालकाची आहे, असे बोर्ड लावलेले दिसत होते.
मेंढपाळ
रस्ता कापतोय पण संपण्याचं नाव काही घेत नव्हता आणि अलगदपणे आम्ही तीन टीममध्ये विभागलो गेलो, मी आणि हर्षल दा पुढे आमच्या मागे मनोज एकटाच तर सर्वात शेवटी सागर आणि प्रिसी. जो तो आपल्या धुंदीत चालत येत होता. वळणावळणांचा रस्ता आणि रस्त्यावरच्या दगडांशी पायाचं गेळगाणी गाव कधी येईल या विषयावर चाललेलं हितगुज संपायला काही वाव दिसत नव्हता.एवढ्यात गेळगाणी २ किमी अशा रस्त्याच्या कडेला असलेल्या मैलाच्या दगडाने लक्ष वेधून घेतले, तेथेच बाजूला सावलीखाली असलेला मोठा दगड पाहून प्रिसिलियाने मागूनच थांबा असा नारा चालू केला, पण तिच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही पुढची चाल धरली. शेवटी सागर आणि तिने तेथे थांबा घेतलाच.रस्त्यावरून चालता चालता एक दादा त्यांच्या शेळ्या आणि गुरे घेऊन चरायला आले होते, चालत चालतच त्यांच्याशी गाव कुठवर आहे वगैरे गप्पा मारत त्यांना निरोप दिला आणि पुढे चालू लागलो.
पुढे रस्त्याला एक पूल आणि त्याच्या बाजूला एक छोटासा धबधबा चांगलाच पाझरत होता, त्याचं  ते नितळ पाणी बघून त्यात उतरण्याचा मोह होत होता, पण तिथे उतरण्याचा रस्ता चिकट झाला होता आणि वेळ बघता तिथे थांबणं शक्य नव्हतं. पावलं भरभर पुढे रेटत जे गावकरी वाटेवर दिसत त्यांना हसऱ्या चेहऱ्याने उभ्याउभ्याच निरोप देत वाट तुडवत चाललो होतो. असं वाटत होतं कि आपण बहुधा गावाजवळ आलो असू इतक्यात गेळगाणी १ किमी असा दगड दिसला. मागे दिसलेला  २ किमी आणि आताचा १किमीचा दगड यातील अंतर १किमीपेक्षा जास्तच होतं हे नक्की, पण म्हणजे अजून तितकंच अंतर कापायचं आहे असा विचार मनात येऊन हे अंतराचे दगड ज्या कुठल्या माणसाने ठेवले असणार त्याच्या नावाने बोटं मोडून पुढची चाल धरली. चढ, वळणावळणाचा तो घाट रस्ता हे पार करता करता एका बाजूला असलेल्या डोंगररांगा, मागे दिसत असलेला तोरणा  आणि वेल्ह्याच्या अलीकडे असलेला डॅम हे सर्व चित्र डोळ्यांना सुखावणारे होते. समोरच दृश्य टिपण्यासाठी नजरेची दूर पल्याड चाललेली धावाधाव एका सोंडेवरून वर चढत असलेल्या वीजेच्या खांबांवर जाऊन खिळली, वळसा मारून जसा पुढे आलो तसा लाईटचा डीपी दिसला.
वर आलेले विजेचे खांब,डॅम आणि आजूबाजूचा परिसर 
गावाच्या अगदी जवळ आलो हे समजलं होतच पण मागे त्या २किमी च्या दगडापासून १किमीच्या दगडापर्यंतच अंतर आणि १किमीपासून ते गावापर्यंतच अंतर हे तफावत दर्शवणारं होतं. लांबून एक झाडीच्या आड असलेलं घर दिसलं, आणि एकंदरीत गावाच्या वेशीवरून गावात प्रवेश केल्याची चाहूल लागली, ते घर ओलांडून पुढे आलो, रस्त्याच्या बाजूला गावाने बांधलेली भली मोठी विहीर बघून पाणी इथे मुबलक असणार अशी वार्ता करत करत गावात प्रवेश केला आणि बूड टेकवण्यासाठी जागा शोधू लागलो.
          छोटी छोटी कौलारू घरे, लाल मातीची अंगणी, कुठे गोठा, गावातील मातीचा रस्ता, घरासमोर असलेली झाडी, गुरं दावणीची जागा गावाचं गावपण कसं नजरेत भरत होतं. एका घराच्या बाजूला एका झाडाखाली सावली बघून तिथेचं बॅगा पाठीवरून उतरवल्या पाठण मोकळं केलं आणि आम्ही देखील तिथेच तंगड्या पसरल्या. बाजूच्या घरातून पाणी मागायला गेलो तर तिथे कोणीच नव्हतं मग मोर्चा दुसऱ्या घराकडे वळवला तिथे असलेल्या २ लहान पोरींनी दोन तांबे पाणी आणून दिलं. इतकी तासभर उन्हाची चाल करून आल्यावर घशात गेलेल्या त्या थंडगार पाण्याची तुलना अमृतासमानच होती. त्या पोरींच्या हातावर एक बिस्किटचा पुडा टेकवून वाटून खाण्यास सांगितले आणि आम्ही देखील गुळ शेंगदाण्याची पिशवी काढून जठराग्नी थंड करू लागलो. या अशा वणवण चालीनंतर गुळ शेंगदाणे म्हणजे सुखच होतो.
गावातील बच्चेकंपनी 
त्या दोन पोरींना दिलेला खाऊ बघून गावातली इतर बच्चेकंपनीने देखील आम्हाला गराडा घातला. ही सगळी फौज जमा झाली पण आमच्या सेनेतल्या दोन जणांचा काही पत्ता दिसत नव्हता, नाही म्हणता म्हणता बरंच अंतर पडलेलं दिसत होतं. अखेर लांबून ही जोडी गावात प्रवेश करताना दिसली, त्या दोन पोरींना परत पाणी आणायला सांगून त्यांच्या दुसऱ्या फौजेच्या हातावर देखील काही ना काही टेकवून आमची पाच जणांची बैठक बसली. गुळ शेंगदाण्याची यथेच्छ मजा घेत आम्ही एकदम निवांत बसलो होतो. हा निवांतपणा खरंतर भट्टी पासून गेळगाणी फाट्यापर्यंत मिळालेल्या गाडीमुळे होता. त्यामुळेच आम्ही इतके निश्चिंत झालो होतो. सर्व पोरांना आम्ही खाऊ दिला होता, तरी एक पोरगा तिथे आम्ही गुळ-शेंगदाणे खात असताना आमच्याकडे बघत होता, त्यावेळी आमचं अस झालं होत आम्ही तुला दुसरा खाऊ देऊ,पण गुळ शेंगदाणे नाही. अखेर तो देखील मागे होत नाही बघून त्याच्या हातावर चार शेंगदाणे टेकवून आम्ही देखील आमचं दुकान उठवलं आणि पुढची चाल धरली. 
          गेळगाणी पासून पुढे वाट कशी होती याचा कुणालाच अंदाज नव्हता, म्हणून गावातलं कोणी मिळतंय का किंवा वाट दाखवायला तरी कोणी येईल का अशा आशेने बघत होतो, पण मगाशी वाटेवर भेटलेले गुराखी दादा गावात आता कोणी भेटणार नाही असे बोलले होते ते शब्द खरे ठरत होते. तरी त्या दादांकडून वाट समजून घेतली होती, त्या दृष्टीने सरळ गावातून बाहेर पडत प्रत्येक घराचा कानोसा घेत कोणी दिसतय का बघत होतो, इतक्यात एक मावशी दिसल्या त्यांना वाटेबद्दल विचारलं असता त्यांनी घरातील म्हातारीला बोलवलं. आजींनी आम्हाला वाटेबद्दल सरळच जावा अस सांगितलं, वर आजींना जेव्हा विचारलं तुम्ही कधी गेलेलात या वाटेने तर- खूप वर्सा झाली आम्ही तिकडं गेलोच नाय पण आमचे मालक जातात अस सांगितलं. किती वेळ लागेल मोहरीला पोचायला तर आजी बोलतात तासाभरात पोचाल. आजींचं ते उत्तर ऐकून भोवळ यायचीच बाकी होती. माझ्या माहितीप्रमाणे तरी आम्हाला तीन चार तास लागतील अस वाटत असताना आजी म्हणतात तासाभरात! वाटेबद्दलच कोडं थोडंफार का होईना उलगडलं होतं आणि पुढे वाटेत वाड्या वस्त्या आहेत त्यामुळे चिंतेच कारण नव्हतं. विजेच्या तारा आणि खांबांनी आमच्या सोबत वाट धरली होती त्या वाटा आता आपल्याला कुठवर साथ देतात हेच पाहत आम्हाला पुढचं मार्गक्रमण करायच होतं. डांबरी रस्ता, कच्चा रस्ता आणि आता लागलेली गवतातली पायवाट, टेंपो गेलेला असल्यामुळे चाकांमुळे गवतावर झालेले समांतर पट्टे एकप्रकारे पायवाटेची चिन्हे दर्शवीत होते.
भात झोडणी 
गेळगाणी सोडून अवघे दहा पंधरा मिनिटे चाललो असू तोच पुन्हा घरे दिसू लागली, हरपूड वाडी इतक्या लवकर येणार नाही हे माहीत होतं, पण मग ही घर कोणती असे विचार डोक्यात यायलाच लागले होते. त्या घराजवळ गेलो असता तीन चार बाया बापडे भात झोडणीचं काम करत होते. पाऊस रेंगाळल्याने ही कामे देखील चांगलीच रखडली होती आणि बऱ्याच जणांच्या पिकांचं नुकसान देखील झालं होत. त्यांना विचारलं असता कळलं की ही गेळगाणी वाडी आहे. विजेचे खांब इथून देखील पुढे चालले होते, त्यांचाच माग घेत पुढे अजून दोन-चार घरांची गेळगाणी गावाचीच वाडी आहे तिथवर पोहोचलो. तिथे एक कुटुंब भेटले, त्यांना पुढच्या वाटेबद्दल विचारलं, तर पूर्ण वाटेबद्दल कल्पना आली. दोन दिवसांपूर्वी एका ग्रुपला घेऊन ते मोहरीला गेले होते, त्यामुळे त्यांनी इतंभूत माहिती दिली. प्रिसिलियाचं एक महत्वाचं काम होतं आणि नेटवर्क आल्यामुळे त्या दोघांनी वाटेतच थांबून दहा मिनिटे खाल्ली, त्यांना यायला इतका उशीर का होतोय यावर आमचे तर्क वितर्क चालू होते. या वेळेतच त्या काकांकडून माहिती घेता आली.
डोंगराला वळसा मारत जाणारी वाट 
पुढची वाट धरली ती डोंगराला वळसा मारत पुढे अशीच प्रत्येक वर आलेल्या डोंगराला वळसा मारत कारवीतून जात होती. आठ-दहा फुटांच्या कारवीतून जाताना मध्येच गायब व्हायला व्हायचं.
 एका ठिकाणी वाटेवरून चालताना दूर पठारावर मध्येच एक डेरेदार वृक्ष दिसला हर्षल दादा आणि मी लगेच वाट जर तिकडून जात असेल तर थोडी वाट वाकडी करून तिकडे जायचंच अस ठरवून पुढे चालू लागलो. मागच्यानी काही हे झाड बघितलं नव्हतं. वाटेत एका ठिकाणी पाणी पाझरत होतं तिथे पाण्याचे घोट रिचवत पुढे चालतोय तर कधी त्या झाडाजवळ पोचलो हे कळलं देखील नाही, त्यात आमची वाट याच पठारावरून जात असल्याने वाट वाकडी करण्याचा प्रश्नच आला नाही. शूज सॉक्स काढून त्याच झाडाखाली बस्तान मांडलं, विसाव्यासाठी इतकी सुंदर जागा होती की मुक्काम करण्यास देखील काही हरकत नव्हती, थोड्या वेळापूर्वी पाहिलेलं पाणी देखील जवळच होतं.
१. डोंगरात अस पाझरत पाणी पिणं म्हणजे सुख  २. लांबून दिसलेलं पठारावरील झाड ३. झाडाची पडलेली सावली 

लिंबू सरबतासाठी चाललेले कष्ट
बसलोच आहोत, जागा पण छान आहे आणि घड्याळात दिड वाजले होते तर मग पोटपूजा देखील करून घेऊ. लिंबू सरबत साठी सागरची लिंबू कापण्याची पद्धत आणि त्याने केलेला सरबत न पिताच दुपारची न्याहारी आटोपती घेतली आणि दोन वाजता ती झाडाजवळची जागा सोडली. त्या पठारावर गुरांची ये जा दिसत होती तसे त्यांच्या पावलांचे ठसेही दिसत होते, आणि एक अंदाज होता की आपण गावाच्या आसपास असू पाहतोय तर खरंच थोड्याच चालीनंतर एक झाप दिसलं आणि पुढे वस्ती देखील लागली होती, मजल दरमजल करत आम्ही हरपूड वाडी गाठली होती.
टोक वर आलेल्या लिंगाण्याचे पहिले दर्शन (झुम करून पहा)
 तेथे एक आजी भेटल्या त्यांच्याशी बोलता बोलता त्यांनी आम्हाला त्यांच्या नाचणीच्या शेताच्या एका कोपऱ्यातून लिंगण्याचे दर्शन घडवले, उद्या आपल्याला जिथे जायचे आहे आणि आज आपण ज्याच्या सानिध्यात झोपणार आहोत आणि त्याहून महत्वाचं इतके महिने ज्याच स्वप्न बघितलं होत्या त्या लिंगण्याचं इतकं दुरून दर्शन घेताना मनाला खूप उभारी मिळत होती. आता मात्र पावलांनी लगेच वेग घेतला.नजर जिथवर फेकली जायची तिथवर वेगवेगळ्या डोंगररांगांचे रांगडे रूप पाहून ट्रेक सार्थकी लागत असल्याची प्रत्येक पावलागणिक प्रचिती येत होती.

नजर जिकडे फेकू तिकडे अशाच डोंगररांगा पसरलेल्या दिसत होत्या 

हरपुड वाडीच्या पुढे असलेला पाण्याचा डोह
चालता बोलता हरपूड वाडी पार केली तर डोंगराच्या खाली डाव्या अंगाला हरपूड गाव आणि गावातील मंदिराचा कळस वरूनच दृष्टीस पडत होता. कधी डोंगराच्या सोंडेवरून तर कधी त्या डोंगराच्या टेपाडाला वळसा मारून कधी उन्हात तर कधी कारवीतून असा आमचा लपाछपीचा खेळ चालू होता. वाटेच्या कडेला एक पाण्याचा हौद दिसला, काळा कातळ फोडून त्याचे त्या हौदाच्या कडेला विखुरलेले दगड एखाद्या कोळशाच्या खाणीचा भास देत होते. थंडगार आणि नितळ पाणी घशाची कोरड जी काही घालवायचा की तृषा शांत होऊन मन अगदी तृप्त व्हायचं. 
वाटेचं बदललेलं रूप 
          त्या हौदाला पार केलं आणि वाटेच गणित परत बदललं. मातीची मळलेली वाट आता बारीक मुरुमाचा दगड पडलेल्या घसाऱ्याच्या वाटेने घेतली. चढणीवर जितकी मजा यायची उतरणीवर तितकीच फसगत व्हायची. वेगाने पावले टाकायच्या नादात कधी पाय घसरायचा ते कळायचं देखील नाही. काल ढोपर फुटलंय तेवढं पुरे असा विचार मनाशी येऊन जपून जपूनच वाट चालत होतो. कधी हर्षल दादा पुढे कधी मी पुढे तर कधी दोघे एकत्र. डोंगरांचा अभ्यास कमी असल्यामुळे त्या डोंगरांबद्दल काहीही न बोलता ते पाहण्याचं सुख तेवढं आम्ही घेत होतो.
एकदम मागे धूसर दिसणारा तोरणा 
दहा वाजता चालू केलेली तंगडतोड तीनच्या पल्याड गेली होती मागे वळून पाहिलं असता दूरवर तोरणा आमच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच होता. एकंदरीच कालपासून आम्ही कुठून निघालो आणि कुठल्या कुठे पोचलो होतो याची चांगलीच कल्पना येत होती. वाट चालत चालत एका छोटासा झाडीभरला टेपाड वर आला होता त्याला वळसा मारत वर चढलो आणि परत दृष्टीस भरला तो लिंगाणा, तासभारपूर्वी हरपूड वाडीतून किंचित टोक दिसणारा लिंगाणा ते आता लांबून पूर्ण सुळका नजरेत भरत होता, आता मात्र कधी प्रवास संपतोय आणि गंतव्यस्थान गाठतोय अशी मनाची घालमेल चालू झालो.
सोबत साथ करणाऱ्या विविध वेड्यावाकड्या डोंगररांगा होत्याच. पाण्याने काय ते या धारांवरून खाली उतरावं आणि वाऱ्याने ते वर चढावं अशा काही त्या डोंगररांगा होत्या. त्यांचं ते अद्वितीय रूप पाहून पुन्हा इकडे कधी येतोय अशी स्वप्न आमच्या उघड्या डोळ्यांना पडू लागली.
हेच सह्याद्रीचं रूप आपल्याला त्याच्याकडे खेचून आणत असतं
          त्या डोंगररांगा न्याहाळत चालत असताना नजर एकाकी समोर झाडावर लावलेल्या भगव्यावर खिळली, त्या भगव्याखाली देवाचं ठाणं होतं आणि तिथूनच दोन वाटा फुटत होत्या. आता झाली पंचाईत, कुठल्या बाजूला जायचं हे पक्के कळत नव्हतं. आतापर्यंत वाट एकसंध होती मध्येच कुठे वाट विभागली की एका बाजूने हर्षल दादा तर एका बाजूने मी असे जाऊन पूढे एकच वाट होई पण आता तस होईल वाटत नव्हतं त्यात कारवी पण बऱ्यापैकी दाट होती. लिंगाण्याचं थोड्या वेळापूर्वी झालेलं दर्शन आठवून त्याच्या दिशेवरून जायचं ठरलं आणि आम्ही उजवीकडे वळलो. त्या वाटेवर पुढे एक मावशी गुरांना चरायला घेऊन आलेल्या दिसल्या. या मावशी कुठे वाट वाकडी करून गुडूप व्हायच्या अगोदर त्यांना गाठून पहिला वाट विचारुया या हेतूने पायगाडी जोरात हाकली. त्या मावशी वळून आम्हाला पाठमोऱ्या होतात हे बघून दुरूनच त्यांना आवाज देऊन थांबायला सांगितलं. त्या मावशींना विचारलं असता आम्ही बरोबर वाटेवर आहोत याची पुष्टी झाली होती, त्या डावीकडच्या वाटेबद्दल विचारणा केली असता ती सिंगापूरला जाते हे कळलं, तसेच मोहरी गाव देखील अवघ्या पाच मिनिटांवर आहे हे देखील मावशींकडून समजलं.
१. देवाचं ठाणं इथून डावीकडे सिंगापूरला तर उजवीकडे मोहरीसाठी वाट जाते  २.सिंगापूर गाव ३. मोहरी गाव आणि लिंगाणा 
          म्हणजे गावाच्या अवघ्या हाकेच्या अंतरावर आहोत हे कळल्यावर पावलांनी आपोआपच वेग घेतला वळण घेऊन पुढे आलो तर खाली डाव्या बाजूला सिंगापूरची लोकवस्ती तर उजवीकडे मोहरी गाव दिसत होता. सिंगापूर पर्यंत येणारा तुळतुळीत डांबरी रस्ता देखील लक्ष वेधून घेत होता.
या गप्पांचा अंतच होऊ नये 
सकाळी जर त्या गाडीत बसून आलो असतो तर याच रस्त्याने आम्ही आलो असतो. हे सगळं पाहता पाहता पावलं कधी मोहरी गावाच्या हद्दीत आली कळलं देखील नाही, गावात आलो तर बऱ्याच गाड्या लागलेल्या दिसल्या त्यांच्या बद्दल विचारणा केली असता कळलं की रायलिंग पठारावर बरीच लोकं येतात. एवढ्या गाड्यांची गर्दी असणार हे पाहून आम्ही अचंबित झालो. पाण्याचा साठा कुठे आहे, हे पाहूया आणि तिथून पाणी लोड करून घेऊया कारण रायलिंग पठारावर पाणी अजिबात नाही म्हणून डांबरी रस्त्यानेच चालत गावातल्या एका कुडाच्या घराच्या सारवलेल्या अंगणात जाऊन विसावलो. तेथे गेलो असता एक चार जणांचा बाईकवरून आलेला ग्रुप भेटला हा तोच ग्रुप जो सकाळी आम्हाला भट्टी गावात भेटला होता आणि ते आम्हाला मोहरी मध्ये जाण्याचा रस्ता विचारत होते, ते बाईकवरून आले होते आणि आम्ही चालत.
या माऊलीच्या चेहऱ्यावरील स्मित खूप काही सांगून जातं
त्या घरातल्या मावशींना पाणी कुठे आहे अस विचारलं असता त्या माऊली त्यांच्या घरातून पाणी देऊ लागल्या पण त्यांना बोललो की आम्हाला जास्त पाणी पाहिजे तुम्ही पाणी कुठून आणता ते सांगा. त्यावर त्या माऊलींचं उत्तर - "अहो दारावर आलेल्याला पाणीही देऊ शकत नाय का". मेहनत करून रापलेला त्यांचा तो चेहरा आणि दारावर आलेल्या माणसांप्रति आदरभाव आणि त्यांच्या चेहऱ्यावर कायम झळाळणार हसू मनात कायम घर करून गेलं. एखाद्या घराजवळ थांबलो तर फक्त पिण्यापूरत पाणी घेतो आपल्या जवळच्या बाटल्या भरून घेत नाही कारण त्या लोकांना पाणी कुठून आणायला लागतं याची कल्पना असते. मावशींशी बोलता बोलता कळलं की तासभर लागतो पाणी आणायला, मग तर ठरवलंच इथून पाणी घ्यायचं नाही, आणि माझ्या या निर्णयाला माझा चमू देखील साथ देईल हे माहीतच होतं. पण मावशी देखील खूप आग्रह करू लागल्या त्यांचा पाणी घ्या यासाठी केविलवाणा झालेला चेहरा गावातल्या लोकांच्या माणुसकीचं दर्शन घडवत होता. त्यात मावशींना जस कळलं की आम्ही राजगड तोरणा करून पायी पायीच आलोत त्यामुळे त्या देखील ऐकायला तयार नव्हत्या, त्या मावशी इकडे आलेल्या लोकांना जेवण बनवून देतात तसेच लिंबू सरबत देखील विकतात, तेव्हा हर्षल दादाने लिंबू सरबत पण घेऊया असं म्हणून मावशींच्या आग्रहाचं मान ठेऊन पाणी घेण्यास होकार दिला. अंगणात आता सारे मस्त बसलो होतो, चारच्या घटकेला आम्ही गावात पोचून आमची आजची चाल संपण्यात आली होती. कालच्या तंगडतोडीच्या तुलनेत आजची चाल नगण्य आणि रमतगमत अशीच होती. मावशी लिंबू सरबत घेऊन आल्या आणि सागरने देखील त्याच्या बॅग मधून लिंबू सरबत काढलं, पण आता देखील त्याच्या व्यतिरिक्त त्या सरबताला कोणी हात लावला नाही. मावशींनी दिलेल्या हंडाभर पाण्याने जवळचा कॅन भरला लिंबू सरबत आणि पाण्याचे पैसे बळजबरीच मावशींच्या हातावर टेकवले आणि त्या माऊलींचं निरोप घेतला. जाता जाता मावशींना बोराट्याच्या नाळेबद्दल विचारलं असता नका जाऊ तिकडून गवत फार झालंय आणि कठीण आहे ती वाट त्यापेक्षा सिंगापूरच्या वाटेने जा असा सल्ला दिला. लिंगाणा करायचा आहे आणि ठरवलंय त्याच वाटेने जाऊ असं म्हणून आम्ही आता रायलिंग पठाराकडे प्रस्थान केलं. 
          मोहरी हे नाव त्या गावाला खरंच सार्थ ठरत होतं कारण अशा चहुबाजुनी वेढलेल्या डोंगररांगांच्या मध्ये अगदी मोहरीच्या दाण्यासमान वाटावं इतकं लहान ते गाव होतं. आणि खरंच गावात प्रवेश करून कधी गावाबाहेर पडलो हे कळलं देखील नाही. मोहरी गावातून रायलिंग पठाराकडे जायला वाट खूप मळलेली आहे यावरून इथे लोकांचा किती राबता आहे हे कळतं. जाता जाता बरीच लोकं पठारावरून परत येताना दिसत होती. एकंदरीत जी काय लोकं आली होती ती परत चाललीत म्हणजे रात्री आपल्या व्यतिरिक्त इथे कोणी नसणार याच मनोमन बरं वाटत होत. पण इतक्यात आमच्या आनंदावर विरजण पडलं, दोन ट्रॅव्हलर गाड्यांमधून आलेली माणसं इथे वस्तीला आहेत हे कळलं आणि आता या लोकांना गाठून त्यांच्या अगोदर पठारावर पोचुया, जेणेकरून एका चांगल्या जागेवर आपल्याला आपला मुक्काम ठोकता येईल.
जस जस पावलांना वेग देऊन त्या माणसांपैकी एकेका माणसाला गाठून पुढे जात होतो तसतसं आमचे डोळे एकदम विस्फारत होते. पाण्याचे जार, मोठी भांडी, आणि प्रत्येकाकडे दोन तीन बॅग किंवा हातात पिशव्या हे सगळं चित्र बघून रात्री पठारावर काय धिंगाणा असेल हे चित्र डोळ्यांसमोर येऊन अंगावर काटाच येत होता. त्या माणसांना बऱ्यापैकी मागे टाकून आता मी आणि हर्षल दादा बऱ्यापैकी पुढे आलो होतो. डोंगरात आता कुठे पाणी दिसतंय का बघत आम्ही चाललो होतो, एका ठिकाणी पाण्याचा छोटा डोह दिसला आणि त्यात खूप चांगलं पाणी होतं, म्हणजे आता कुठे पाणी नाही मिळालं तरी हे पाणी आहे याची शाश्वती मिळाली, तरी पुढे जाताना कुठे अजून पाणी आहे का बघत होतो. एवढ्यात बोराट्याची नाळ जिथे सुरू होते ती वळलेली वाट दिसली, म्हणजे उद्या आपल्याला इथून उतरायचं आहे हे कळलं होतं. वाटेत जाता जाता आता तीन ठिकाणी डोंगरातील पाझरणारं पाणी दिसलं. त्यामुळे पाण्याची चिंता मिटली होती.
वळसा मारून पठारावर पोचताना लिंगाण्याचे हे भेदक रूप जणू अंगावर येत होतं 
पुढे आलो वळसा घातला आणि पाताळ भेदून आभाळाला स्पर्श करणाऱ्या लिंगाण्याचे अक्राळविक्राळ रांगडे रूप समोर आलो, इतकी वर्षे गडकोट फिरताना जाणवलेली स्पंदने आणि हीच गडकोट फिरण्यासाठी जी काही तपश्चर्या केली होती त्याच फलित अस काही समोर दिसत होतं की पावलागणिक समोर येणारा तो लिंगाणा सुळका जणू काही आम्हाला आता मिठीच मारणार आहे अस काहीस चित्र डोळ्यांसमोरून झरझर जात होतं.
पुस्तकात वाचलेलं किंवा लोकांच्या तोंडून ऐकलेलं लिंगण्याचं ते भारदस्त रूप या सह्यकड्याची नव्याने ओळख करून देत होतं. याच्याच सानिध्यात आता पूर्ण रात्र काढायची आहे आणि उद्या याच्यावरच पाय रोवायला जायचं आहे, सुख अक्षरशः पायाखाली लोटांगण घालत होतं. प्रत्येक पावलागणिक जवळ जात होतो तसे त्याच्या कीर्तीचे पोवाडे मनात घर करत होते. नजर थोडी हलवली आणि मागे नेली तर अजून एक साक्षात्कार, या सह्यगिरीच्या सहाय्याने ज्या राजाने हे स्वराज्य घडवले तो आपल्या स्वराज्याचा मानबिंदू किल्ले रायगड लिंगाण्याच्या मागे कणखरपणे उभा होता. एखादं मोरपीस भासावं अस जगदीश्वराचं मंदिर कळून येत होतो. हे सर्व काही अनुभवत असताना पठाराच्या टोकाला पोचलो देखील. 
रायलिंग पठारावर बसलेलो मी, समोर लिंगाणा, त्याच्या मागे रायगड आणि
मागे रंगोत्सव साजरा करणारा दिनभास्कर
          पठारावर पोचलो तेव्हा सात आठ जणांचा वावर होता तिथे, त्यातील एकाचा "गोप्रो, टेक अ फोटो, गोप्रो, टेक अ फोटो" असा उद्घोष चालू होता. बॅगा खाली उतरवल्या आणि जवळपास कुठे पाणी आहे का याच्या शोधात मी आणि हर्षल दादा निघालो. एका ठिकाणी उंबराच्या झाडाच्या जवळ पाणी असेल अशा साशंकतेने त्या झाडीत घुसलो तर तिथे वर थोडं पाणी पाझरत होतं, चिखलही होताच, चिखल बाजूला करून तिथे छोटा डोह तयार केला आणि पाणी निवळायला ठेवून माघारी आलो.पठारावर एकदम समोरच्या खडकावर ती लोकं येतील म्हणून त्यांच्यापासून जरा दूर राहूया म्हणत खडकाच्या उजव्या बाजूला ठरवलेल्या जागेवर आम्ही येईपर्यंत प्रिसी, सागर, मनोजने गवत वगैरे साफ करून ताडपत्री अंथरून जागा निश्चित केली होती. एव्हाना पावणे सहा वगैरे झाले असतील. मावळतीचा धनी आता रंगांची चौफेर उधळण करीत आमचा निरोप घेत रायगडाच्या मागे गुडूप व्हायला चालला होता. हातात चहाचा प्याला घेऊन एकदम निवांतपणे तो दिनमणी, रौद्रावतारी लिंगाणा आणि धारातीर्थ रायगड यांच्याशी हितगुज साधत एक रम्य संध्याकाळ आयुष्याच्या पटलावर सुवर्णाक्षरांनी कोरण्याचं काम करत होतो, कार्तिकी एकादशीचा आजचा दिवस, ज्ञानोबा माऊलींच्या संजीवन समाधीचा आजचा दिवस आणि त्याच दिवशी आम्ही या लिंगण्यासमोर बसलो होतो जणू काही समाधिस्त होण्यासाठीच. दिवसभराचा थकवा कुठच्या कुठे पळून सृष्टीचं सौंदर्य न्याहाळण्यात मी सागर आणि प्रिसिलिया इतके गर्क झालो होतो, तर तिकडे मनोज आणि हर्षलदादा त्यांच्या सृष्टीला फोन लावून बोलण्यात गर्क होते. 
            दिवेलागणीची वेळ होऊन खालच्या गावात एक एक दिवा लागताना दिसला, चहाचे घोट कधी संपले, शक्तीचा स्रोत कधी गुडूप झाला आणि त्याच्या रंगांची उधळण संपून काळ्याकुट्ट अंधाराचे साम्राज्य येऊन एक एक चांदणी लुकलुकू लागली, खालची गावं देखील एखाद्या चांदण्यांच्या पुंजक्याप्रमाणे भासत होती तर समोर रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिरातील लाईट देखील प्रखरतेने जाणवत होती.
अशा अब्जावधी चांदण्या पाहण्याचं दान हा सह्याद्री वेळोवेळी आमच्या पदरात घालत असतो (फुल ब्राईटनेस करून हा फोटो पहा)
संध्यासमय पालटून रजनीने आता सृष्टीचा ताबा घेतला होता. आम्ही देखील निवांत झालो होतो, गप्पा मारता मारताच चूल पेटवली पुन्हा एकदा चहा घेऊन जेवण बनवायला सुरुवात केली. आम्ही ती लोक येतील या हेतून पठाराच्या एकदम कडेला गेलो नाही तर ती लोक देखील मागेच थांबली एकंदरीत आमच्यात आणि त्यांच्यात बऱ्यापैकी अंतर होतं आणि वाटलं होत तसा काही धांगडधिंगा त्यांचा चालू नव्हता त्यामुळे आम्हालाही एकदम सुखकर वाटत होतं. लोणचं, पापड, चटणी, सलाड, डाळ खिचडी यांचा फक्कड बेत तयार झाला होता. गरमागरम डाळ खिचडीचा आस्वाद घेत रीती पोटे तुडुंब भरून घेतली.
चांदण्यांनी न्हाऊन निघालेला लिंगाणा 
आणि मग चांदण्यांच्या प्रकाशात मैफिल बसली गप्पांची, एकेकाचे एकेक किस्से, हे चालू असताना मनोज कधी झोपी गेला कळलं देखील नाही. चांदण्या न्याहळत आकाशदर्शनाच ज्ञान बाहेर निघू लागलं मग मोर्चा एक बॅनर उचलून त्या समोरच्या खडकावर नेला. तिथे पथारी पसरून गप्पांचा फड चांगलाच रंगू लागला होता, वाऱ्याच्या झुळकेसरशी बोचणाऱ्या थंडीला स्लीपिंग बॅगमध्ये गुरफटून गुरफटून आडकाठी करण्याचा फोल प्रयत्न चौघे करत होते. आडवे होऊन आता गप्पा मारुया म्हणता जो तो ज्या ज्या कोनात आडवे होता येईल तसे झालो आणि दुसऱ्याच मिनिटाला आमचे आवाज शांत झाले, आडवे झाल्याझाल्या दिवसभराचा थकवा जाणवू लागला आणि पडल्याक्षणी पापणीवर पापणी चिकटायला लागली. इथे आपण झोपलो तर सकाळशिवाय जाग येणार नाही आणि तिकडे मनोज एकटाच आहे म्हणून इच्छा नसताना देखील तिथून उठून ठरल्या जागेवर आलो आणि स्लीपिंग बॅग मध्ये घुसलो, पुन्हा गप्पा रंगल्या पण आता हळूहळू कधी कुणाचा पत्ता गुल झाला आणि झोपी गेला हे कळायला उसंत देखील मिळाली नाही आणि सगळे निद्रेच्या अधीन झाले. 
            क्रमशः


लिंगाणा 
 
रंगोत्सव 

       अब्जावधी चांदण्यांच्या शीतल प्रकाशात न्हाऊन निघालेल्या रायलिंग पठारावर रात्र घालवणे म्हणजे सुखच. गप्पा मारता मारता रात्री डोळ्याला डोळा कधी लागला ते कळलंच नाही आणि पहाटे जी काही जाग आली ती या अशा पवित्र वातावरणात. एखाद्या तपस्वी साधू पुरुषा सारखा किल्ले लिंगाणा ध्यान लावून बसला आहे मागे स्वराज्याचा मानबिंदू किल्ले रायगड जणू त्यावर आशीर्वादांचा शिडकाव करत आहे, तर पूर्वेला हळुवार रंगांची लकेर पसरताना पाहून वातावरणात पसरलेली चैतन्याची चाहूल पक्षी पाखरांना जागे करताना दिसत होती. आजचा टप्पा होता बोराट्याच्या नाळेने खाली उतरून लिंगाणा किल्ला करायचा आणि लिंगाणा माची गावात उतरायचे तिथून पुढे चालत वाळणकोंड डोह बघून ट्रेकची सांगता करायची आणि परतीचा प्रवास. काल संध्याकाळी अप्पांशी बोलत असताना आप्पांनी आम्हाला लिंगाणा माचीवरील बबन कडू यांची भेट घ्या असं सांगितलं होतं, लिंगाण्याची दरड कोसळून माचीवरील बरीच घरे गाडली गेली, खूप नुकसान झालं होतं, त्यावेळी महाडचे डॉ. राहुल वारंगे(राहुल दादा) आणि अप्पा व इतरांनी मिळून त्यांना घर बांधायला मदत केली होती. 

           पाण्याची कमी असल्याने पठारावर फक्त चहा बिस्कीट खाल्ले आणि पोहे बनवायला पाण्याच्या ठिकाणी जाऊ तिथेच पाणी भरून, फ्रेश वगैरे होऊन पुढच्या वाटेला लागू अस ठरवून वाफळलेल्या चहाने पोटातली आतडी गरम केली.
अमृत 
सर्व पसारा आटपून जागा पूर्ववत केली बॅगा पाठीला लावल्या आणि काल जो बोराट्याची नाळ सुरू व्हायच्या अगोदर पाणवठा पाहिला होता त्याच्या दिशेने निघालो, लिंगाण्याला पाठमोरे होऊन वाट धरली. दहा बारा मिनिटांच्या चालीनंतर पाणवठ्याच्या इथे पोचलो. हा पाणवठा बाकी तिघांना कसा दिसला नाही याचे हर्षल दादा आणि मला नवलच वाटत होते. पाण्याच्या कमतरतेमुळे पाण्याचा कालपासून जपून वापर केला होता, आता मात्र पुरेसं पाणी असल्यामुळे जवळ सगळ्यांनी पाणी भरून घेतलं. फ्रेश वगैरे होऊन पोटभर पाणी पिऊन घेतलं, ठरवलं होत की इथे नाश्ता करायचा पण चहा बिस्कीट आणि इतर सुका खाऊ खादाडल्याने नाश्त्याची काही गरज नव्हती, म्हणून तसाच पुढचा टप्पा चालू केला. नऊ च्या आसपास तो पाणवठा सोडला आणि आता आमचा तिसऱ्या दिवसाचा ट्रेक सुरू झाला. मोहरी मधून रायलिंग पठाराकडे जाताना पठाराच्या दहा मिनिटे अगोदर एक छोटी वाट डावीकडे घळीत उतरते ही खूणगाठ लक्षात ठेऊनच काल संध्याकाळी जात असतानाच आम्हाला ही वाट कुठे आहे ते माहीत झालं होत. तरी देखील पाणवठ्याच्या इथून निघताना वेगळी वाट पकडून शॉर्टकट मारायचा प्रयत्न केला, जो की फसला आणि परत बाहेर येऊन आहे त्या मूळ वाटेने आम्ही मुख्य वाटेला लागलो. 

बोराट्याची नाळ 
         नाळेच्या सुरुवातीला उतार एकदम तीव्र त्यामुळे पुढे नाळेत काय वाढून ठेवलं असेल याची बऱ्यापैकी कल्पना होती. त्यात पाठीला लावलेल्या बॅगा या वजनदार त्यामुळे रस्ता अजूनच खडतर असणार यात वादच नाही. नाळेला लागलो आणि आता आमच्या या जंबो ट्रेक मधला अजून एक नवीन टप्पा चालू झाला.राजगड तोरणा धारेवरची चाल म्हणा, तेथे भरकटलेला रस्ता म्हणा, रात्रीच्या अंधारात उतरलेली कारवीमध्ये लपलेली भट्टी गावाची वाट म्हणा किंवा गेळगाणी पर्यंतचा कच्चा तार रोड तर मोहरीपर्यंत डोंगररांगा न्याहाळत केलेली पायपीट सार सार काही नाविन्यपूर्ण आणि त्यात अजून या बोराट्याच्या नाळेची नवीन वाट. वाटेला लागलो हर्षल दादा पुढे तर मी सर्वात मागे होतो, मी पुढे जाणार तर इतक्यात प्रिसी वजनामुळे गडबडलेली दिसत होती, तिने तिच्याजवलील रोप माझ्याकडे दिला त्यामुळे थोडंफार का होईना वजन कमी झाल्यामुळे तिला चालायला बर पडत होत. नाळेतून उतरताना अंगावर येणारे मोठमोठाले प्रस्तराचे कडे नाळेची भीषणता दाखवत होते. चालताना पायाखाली येणारे सुटावलेले दगड पुढे जाण्यास जणू मज्जाव करत होते. त्यात माझ्याकडून एक दगड सरकलाच दोन ते तीन टप्प्यातच तो थांबला पण त्याच्या टप्प्यांचा आवाज असा काही त्या नाळेत घुमला की बास! अंगावर येणारी ती नाळ, तो तीव्र उतार, मोठमोठाले दगड, तर पूर्ण वाटेमध्ये असणारे लूज दगड सार एकदम भयंकर होत. पावलामागून पाऊल जपून टाकत आमची पायगाडी चालली होती. सागर आणि हर्षल दादा आता इतके खाली उतरले होते की आम्हाला दिसतही नव्हते, मी मध्ये तर मागे प्रिसी एकदम सावकाश येत होती, मनोज तिच्या सोबतच चालत होता. एकंदरीत सारे जण थकले असून सुद्धा बऱ्यापैकी चालत होते. 
           उतरत असताना एका ठिकाणी रोप लावलेला दिसला, त्यावरून लक्षात आलं की लिंगाण्याला एक ग्रुप आला आहे, त्यांनी हा रोप लावून ठेवला असावा, या रोप मुळे आम्हाला देखील मदत झाली, रोपच्या सहाय्याने खाली आलो तर थोड पुढेच सागर आणि दादा आमच्यासाठी थांबले होते. मागे मनोज आणि प्रिसीला जपून या सांगून मी पुढे झालो. ही दोघ जिथे थांबली होती तिथे देखील चांगला रॉक पॅच होता, हे दोघे तिथे आम्हाला मदत करायलाच थांबले होते, बॅग अगोदर खाली देऊन नंतर एक एक करून आम्ही उतरते झालो आणि तिथेच जरा विश्रांती घेऊया म्हणत बुड टेकवल.आतापर्यंत तासभर जास्त चाल होऊन सव्वादाह झाले होते. अप्पा आणि राहुल दादाने अस सांगितलं होतं की नाळेतून उतरताना एका ठिकाणी उजवीकडे वळावं लागत ही वाट लिंगाणा आणि रायलिंग पठार यांच्या घळीत जाते, अजून एक खूण म्हणून या ठिकाणी बोल्ट मारलेला आहे हे मला माहीत होतं.
थोड्याच वेळात आपण इथे पोचू अस सर्वाना सांगितलं, चिक्की खाऊन पाणी पिऊन पुढची वाट धरली. आणि खरंच अवघ्या पाच सात मिनिटांच्या चालीने तो बोल्ट दिसला आणि ती वाट देखील समजली. हा ट्रॅव्हर्स जरा धोकादायकच होता. पाऊल जपून जपून पुढे सरकवत जाव लागणार होतं. एक चांगलं झालं की इथे देखील रोप लावला होता, त्यामुळे आम्हाला रोप लावण्याची गरजच भासली नाही आणि आमचा वेळ देखील वाचला. एक एक करून सर्वांनी तो ट्रॅव्हर्स पार केला आणि पुढे वाटेला लागलो. हा ट्रॅव्हर्स मारल्यानंतर खाली पूर्ण घळ आणि कोकण प्रांत दिसत होता. अखेर घाटावरचा प्रवास संपून आम्ही कोकणात प्रवेश केला होता. खाली दापोली गाव दिसत होत. घाटावरच्या सिंगापूर गावातून उतरणारी सिंगापुरची नाळ ही कोकणातील या दापोली गावातच उतरते. वाट पुढे एकूण कशी आहे हे कुणालाच माहीत नव्हतं आतापर्यंत तरी आपण नीट सर्व केलंय असच प्रत्येकाचं अंतर्मन सांगत असावं.
ट्रॅव्हर्स मारल्यानंतर समोर दिसणारा कोकण प्रांत 
पुढे जसे चालू लागलो तसे त्या ट्रॅव्हर्सवर एक ठळक पायवाट दिसू लागली. नाळेत जो वेग कमी होता, तो या वाटेमुळे आता दुणावला होता. एका मागून एक मुंग्यांची जशी रांग जाते, तसेच आम्ही पाच जण त्या वाटेवरून चाललो होतो. 
           आता एका ठिकाणी परत एक कातळावरून जाणारा ट्रॅव्हर्स आला पण तिथून जायचं की खालून कळत नव्हतं कारण त्याच्या दहा एक फूट खालून पायवाटही जाणवत होती तर काही जण कातळावरून गेलेलंही कळत होतं. हर्षल दादा खालून तर मी वरून अस आम्ही दोन्ही वाटांना लागलो, मी पोचलो पुढच्या टप्प्याला लगेच तर हर्षल दादाला यायला जरा प्रयत्न करावे लागले, त्यामुळे बाकीच्यांना मी आलेल्या वाटेने यायला सांगितलं.

१ अवघड ट्रॅव्हर्स २. ट्रॅव्हर्स मारल्यानंतर समोर दिसणारा लिंगाणा ३. लिंगाण्याच्या घळीत पोचायची वाट 

या वाटेने मी जसा ट्रॅव्हर्स मारून पुढे आलो तस जणूकाही पाताळातून धरणी भेदून वर आलेल्या लिंगण्याचं भेदक रूप अंगावरच येत होतं. याचसाठी केला होता अट्टाहास याची आता पावलोपावली जाणीव होत होती. रायलिंग पठार आणि लिंगाणा यांच्यामधील ती खिंड देखील दिसत होती आणि संपूर्ण लिंगाणा सुळका देखील नजरेत भरत होता. त्या खिंडीत टेंट लावलेले दिसत होते, लिंगाण्यावर आलेल्या ग्रुपचे ते टेंट होते.लिंगाणा आणि रायलिंग पठाराच्या खिंडीच्या अगदी काही मिनिटांवरच आम्ही होतो, इथून वळसा मारत वाट खाली उतरून त्या खिंडीत पोचणार पण या वाटेवर घसरण इतकी होती की पाच पायाने सरकत म्हणा सावरत म्हणा एक एक करत खिंडीत पोहोचलो. बॅगा पाठीवरून उतरवल्या आणि बोराट्याच्या नाळेच्या त्या खडतर टप्प्यातून सुटका झाली अशा अविर्भावाने खाली बैठक मारली.
लिंगाणा चढताना 
सर्वजण आले, मस्त कोकम सरबताचे घोट घेत घसा ओला करून घेतला. लिंगाण्याला एक ग्रुप अगोदरच आला असल्याने त्यांनी रोप लावूनच ठेवले होते, एकंदरीत आम्ही आणलेला रोप कुठे काढायची गरजच भासली नाही. तिथे जे रोप लावलेत तेच वापरूया तर त्याच्या अगोदर हे रोप ज्यांनी लावलेत त्यांच्याशी बोलावं म्हणून टेंट मध्ये असलेल्या दोघांना आम्ही आवाज दिला, त्यांनी आम्हाला लगेच परवानगी दिली. त्यांच्याशी बोलता बोलता कळलं की शिलेदार म्हणून त्यांचा ग्रुप आहे आणि लिंगाणा आरोहण अशी मोहीम त्यांनी ठेवली होती. आता पुढचं ध्येय होत लिंगाणा चढणे. रोप असल्यामुळे मार्ग सुकर होता, वाटेला लागलो आणि जसे चढू लागलो तसे लिंगाण्याची भीषणता समोर दिसू लागली. लिंगाणा चढताना प्रस्तरारोहणच करावे लागते, आणि त्याची माहिती असणे गरजेचं आहे हे माहीत होत आणि त्यामुळेच आम्ही रोपदेखील जवळ बाळगला होता. सत्तर ऐशी फूट वर चढल्यानंतर एका रॉकपॅचला वर चढताना जरा कसरत करावी लागत होती.मी चढलो असतो वर की नाही माहीत नाही, नंतर हर्षल दादा पुढे झाला, त्याला जमत होतं, पण सगळी तीन दिवस चालून चालून थकली होती, सेफ्टी इक्विपमेंट जवळ काहीही नव्हतं, त्यामुळे उतरताना पाचावर धार बसली असती, न जाणे साहस करता करता वेडं साहस होऊ नये, म्हणून तिथूनच सर्वांनी खाली उतरायचं ठरवलं. आल्या पावली माघारी वळलो, खिंडीत पोचलो, बॅगा पाठीला लावल्या आणि साडेअकराच्या सुमारास खाली उतरायची सुरुवात केली.
           लिंगाण्याचा त्या खिंडीतून खाली पाने गावात जाणारी वाट ही पूर्ण कारवीनेच भरलेली आहे, तोरण्यावरून भट्टीच्या वाटेइतकी भयानक नव्हती, पण तरी होती. एक विचित्र गोष्ट म्हणजे लिंगाणा आरोहणाची मोहीम लावणारे जे कोणी या खिंडीत थांबतात त्यांनी या वाटेवर कचरा टाकून टाकून एक प्रकारे डम्पिंग ग्राउंडच केलं आहे, त्या घाणीतून माग काढत समोर येत असलेली कारवी बाजूला सारून वाट उतरू लागलो.
करवीत वेटोळे करून बसलेला चापड्या 
चार पाच पावले उतरलो असेन तर उजव्या हाताला मानेच्या इथे असलेल्या कारवीला काय तरी लुसलुशीत लागलं, हाताचा स्पर्श झाला तसा कीड वगैरे असेल अशा अविर्भावात कशाला हात लागला तिकडे पाहिलं आणि खाडकन खाली बसलो. कारवीवर मस्त वेटोळे करून चापड्या(Bamboo Pit Viper) तिथे बसला होता. अगदी माझ्या मानेच्या इथे असताना माझा हात त्याला लागला होता. अगोदरच वर्षभरापूर्वी घोणस(Russel viper) चा मिळालेला अनुभव तेवढा पुरेसा होता. त्यामुळे माझं काय झालं होतं हे मलाच माहीत होतं. मी चार पावले उतरून हे सगळं झालं, तर मागे यांनी अजून उतरायला सुरवात केली नव्हती, पाहिलं तर सागर येत होता, हर्षल दादाला आवाज देऊन पुढे बोलवलं. दादाला अगोदर कळलं नाही काय झालं म्हणून पण त्याने जेव्हा तो वेटोळे घातलेला चापड्या बघितला तर त्याची पण बोलती बंद झाली. अगोदर मला तोंड न दिसल्यामुळे हरणटोळ वाटला होता पण नंतर तो दादाने ओळखला. चापड्या आहे आणि माझा त्याला हात लागलाय आणि तो माझ्या मानेच्या इथेच होता समजल्यावर त्याची तर बोलतीच बंद झाली. वाटेच्या दोन्ही बाजूंची कारवी एकमेकांना टेकली होती, आणि आता या वाटेने मला परत जाणे शक्य नव्हते, आणि त्यांना देखील खाली उतरणं साधं काम नव्हतं. दादाने आणि मी मग त्या चापड्याच्या अटॅकिंग रेंज पासून थोडी लांब अशी कारवी आडवी करून  वाट बनवली. सागर आला, आला कसला थेट धावतच सुटला पार मला देखील क्रॉस करून खाली असलेली घाण वगैरे न बघताच, त्याच्या मागे मनोज देखील सावकाश आला. प्रिसिलिया यायला घाबरत होती, आकांडतांडव करून तिने जणू ती लिंगाण्याची खिंड उठवली होती. घाबरण्याचं कारण साहजिकच आहे म्हणा. तिचं तर म्हणणं एकच पनवेल ते कन्याकुमारी सायकलने सोलो राईडला नाही घाबरले पण आता मला नाही पुढे जायचं, भीती वाटते मला, मी नाही उतरणार. तिच्या या अशा वागण्याने हसूही येत होतं, आणि काळजीही वाटत होती. हो नाही, हो नाही करून हर्षल दादाने अखेर तिला कसबस आणलं. या सर्वाना समजावताना मी सांगत होतो, "अरे माझा हात लागलाय, माझं काय झालं असेल विचार करा, मी ओके आहे" दिसायला मी ओके दिसत असलो तरी आत जी घालमेल चालू होती, ती बाहेर काढुच शकत नव्हतो. पुढे चालताना आता ठरवलं, आता जर पुढे कुठे साप किंवा काही दिसला तर शक्यतो कुणालाच सांगायचं नाही. 
           बोराट्याच्या नाळेतली पुढची वाट धरली आणि चालू लागलो, आता काय बोलायला आम्हाला विषयच भेटला होता, चांगला त्यावर एखाद कथानक बसेल अशा मागे चर्चा चालू होत्या, मी आपला भरभर पावलं टाकून मागच्यांना भरभर येण्यास प्रवृत्त करत होतो. आता वाटेचा उतार तीव्र घसारा असलेला आणि दोन्ही बाजूला कारवी त्यात त्या चापड्यामुळे कारवीला हात लावून उतरायची कुणाचीच हिम्मत नव्हती,त्यामुळे त्या घसाऱ्यावरून चालताना घसरून पडायला व्हायचं. एकंदरीत चालताना सर्वांनी बुड जमिनीला टेकवलं होतं. ही तीव्र उताराची छोट्या घळीतील वाट उतरताना आणि त्या विषयामुळे आमचा जरा जास्तच गोंगाट चालू होता. आमचा गोंगाट ऐकून, एक ग्रुप घेऊन लिंगाण्यावर गेलेले गृहस्थ आमच्या आवाजाचा माग काढून आमच्या मागे आले आणि त्यांनी आम्हाला गाठलं. त्यांच्याकडून असं कळलं की आम्ही वाट चुकलोत.
बोराट्याची नाळ उतरताना 
"अरे यार! त्या चापड्यामुळे वाट भरभर कापायच्या नादात  वाट कुठे वळलीय हे कळलंच नाही, आणि आपण सरळ घळीचा रस्ता धरला, त्यामुळेच ही वाट इतकी घसाऱ्याची आणि अवघड होती, इथून मागे फिरुया असं त्या मामांना म्हटलं तर "नको, म्होर त्याच वाटेला लागते ही वाट" अस मामांनी सांगितल्यामुळे परत फिरायचं या विचाराने पोटात जो गोळा आला होता तो लगेच गेला देखील. आता सोबत गावकरी असल्यामुळे चालताना धीर आला होता. मामांना सापाचा विषय सांगितला तर मामांनी सांगितलं की ते त्याला मारून आलेत. झाला विषय सोडून पुढची वाट धरली, धडपड करत अखेर जी मुख्य वाट होती त्या वाटेला लागलो आणि दोन क्षण विश्रांतीचे म्हणून तिथे थांबलो.आतापर्यंत मामा मागे होते म्हणून त्यांच्याशी काही बोलता आलं नाही, मामांना त्यांचं नाव विचारलं असता बबन कडू हे सांगितलं, डोक्यात लगेच तार झंकारली प्रिसीला अप्पांनी आपल्याला ज्यांना भेटायला सांगितलं त्यांचं नाव विचारलं असता जेव्हा ती बबन कडू असं बोलली. आणि देव भेटला असं माझं अंतर्मन सांगितलं. त्या बसल्या जागीच मग मामांना आम्ही कोण हे सांगितलं. अप्पा आणि राहुल दादाच नाव सांगितल्यावर आणि खुद्द अप्पांची पोरगी आमच्यासोबत आहे म्हटल्यावर त्यांना देखील इतक्या वर्षांनी ही माणसं आपल्याला विसरली नाहीत याच बरं वाटलं. आता काय पुढच्या संबंध वाटेला मामांशी बोलताना ते अप्पा, चारू काकू(प्रिसिलियाची आई), राहुल दादा यांच्याबद्दल भरभरून बोलत होते. ध्यानीमनी नसताना ज्या माणसाकडे आपण फक्त आवाज द्यायला जाणार आहोत, तो माणूस वाट चुकलेली माणसं आहेत त्यांचा आवाज घेऊन पाठीमागे येतात आणि पुढे संपूर्ण वाट आपल्यासोबत चालतात याच्यासारख भाग्य आमचंच. 


         मुख्य वाटेल लागलो आणि बोराट्याच्या नाळेची दगड भरली वाट परत चालू झाली, उतरताना जपून जपून उतरत असताना दोन्ही बाजूना जंगल असल्यामुळे ती नाळ चिंचोळी भासत होती. रॉकपॅच असल्यामुळे आमची पायगाडी हळूहळू चालत होती. नाळेत काही ठिकाणी पाणी झिरपत असल्यामुळे दगडावर शेवाळ लागलेली दिसत होती, तर काही ठिकाणी पाणी देखील साठलेल होतं. दोन चार ठिकाणी पाण्याच्या बॉटल, प्लॅस्टिक कागदाचे कपटे असा काही काही मानवनिर्मित कचरा दिसत होता. अशा सुंदर निसर्गाच्या या अनवट वाटांची ज्यांनी कोणी घाण केली असेल त्यांचा मनोमन उद्धार करत पुढे वाट चालूच ठेवली. कातळावरून उतरताना एका ठिकाणी उतार इतका होता आणि आधाराला जागा नसल्याने बॅगा अगोदर उतरवून नंतर आम्ही उतरलो. बोराट्याची नाळ ही थेट पाने गावात उतरते, कडसरी लिंगाणा(लिंगाणा माची) या गावात जायचे झाल्यास वाट एका ठिकाणी वळते हे आम्हाला माहीत नव्हतं. मामांनी एकाएकी आम्हाला नाळेच्या वाटेला काटकोनात वळून वर चढायला सांगितलं. 
गवताने भरलेली वाट 

इथे वाट आहे? असा काही प्रश्नच उद्भवत नव्हता, कारण आम्हाला माहीतही नव्हता की असा काही वळण असेल, त्यामुळे ही वाट आम्हाला मिळाली असती असा विचार देखील आमच्या मनाला शिवला नाही. तो वळणच इतका वाकडा होता आणि तिथे काहीच खूण नव्हती, त्यामुळे काहीतरी खूण करावी या हेतून तिथे एक दगडाचा कॅरन रचला आणि पुढची वाट धरली. गवताने अजून जोम धरलेला असल्याने वाट काही झाली नव्हती, गवत आडवं झालं होत पण ते देखील हिरवंच असल्याने या वाटेवरून कुणाचा राबता नसल्याचे कळत होते. त्यात हल्ली शिकारीवर बंदी असल्यामुळे शिकऱ्यांचा देखील वावर नव्हता. मामा सोबत असल्याने धास्ती, भीती हे काही राहील नव्हतं. सुखरूपपणे आपण गावात पोचू हे नक्की झालं होत. घड्याळाच्या काट्यांनी देखील आता वेग घेतला होता, काटे एकच्या पार गेले होते.   गवत वाढलेलं आणि राबता नसलेली वाट आमच्या चालीमुळे आता बऱ्यापैकी ओळखेल अशी होत होती. 
उध्वस्त झालेलं जुनं लिंगाणा माची गाव 

ट्रॅव्हर्स मारत वळण घेत गवतातून चाललेली वाट बोराट्याच्या नाळेच्या दगडांच्या खडतर प्रवसापेक्षा खूप सुखावणारी वाटत होती. जंगल दाट असल्यामुळे सावली देखील होती. वाट चालता चालता पडक्या घरांच्या इथे आलो, हेच ते जुनं लिंगाणा माची(कडसरी लिंगाणा) गाव. दरड कोसळल्याने संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गेलं. अगदी वीजेचे पोल होते, ते देखील वाकून जमिनीला टेकले होते, यावरून त्यावेळेस काय झालं असेल याची कल्पनाही करवत नाही. प्रत्येक घराची ढासळलेली भिंत खूप काही सांगू इच्छित होती. मामा तर त्या गावचे रहिवाशी, प्रत्येक वेळी या वाटेवरून जाताना त्यांना काय वाटत असेल हा विचार सुद्धा मन हेलावून काढतो. मामांकडून कळलं की होळीच्या वेळेस पाच दिवस सगळे ग्रामस्थ इथे राहायला येतात आणि इथेच शिमगा साजरा करतात, ते पाच दिवस इकडेच मुक्काम ठोकून राहतात, यामुळेच काही घरांची डागडुजी झालेली दिसत होती. मामांची परिस्थती तशी बेताची असल्यामुळे त्यांनी काही त्यांचं घर नीट केलं नव्हतं, त्यांचं ढासळलेल घर त्यांनी आम्हाला बोट करून दाखवलं आणि आम्ही पुढे वाट चालू लागलो. पुढे अजून काही वीजेचे खांब पडलेले दिसत होते.
मामांना आता आमच्यामुळे किती तरी उशीर झाला होता, त्यांना मगाशीच बोललो होतो की तुम्ही जा पूढे आम्ही येतो मागून पण त्यांना उशीर झाला तरी चालणार होतं,आणि त्यांच्या हट्टापुढे आम्ही माघार घेऊन त्यांच्या आमच्याबरोबर थांबण्यास राजी झालो. 
           पुढची वाट कापू लागलो, पाय देखील आता बोंबलत होते. त्यात सकाळी फक्त चहा आणि सुका खाऊ खाल्ला होता, त्यामुळे पोटात भुकेचा कल्लोळ माजला होता. पोट म्हणत होत मी, पाय म्हणत होते मी, पाठीवरची बॅग देखील चांगलीच बोलत होती. चालता चालता वाटेत एक ओढा लागला त्यात आडवे होऊनच पाणी पिऊन पाण्याने पोटाला आधार दिला. डोंगरतल्या झिरपणाऱ्या पाण्यामुळे वाटेत एका ठिकाणी छोटा धबधबा दिसला तेव्हा त्याखाली भिजण्याचा मोह होत होता, पण वेळेच गणित बघता पुढे चालू लागलो. सकाळी नऊ च्या आसपास चालू केलेली तंगडतोड दुपारच्या दोनच्या पल्याड गेली,थांबणं नव्हतं ना काही पोटाला आधार,त्यात बोराट्याची नाळ उतरून जे काही थकलो होतो त्यामुळे एक सावलीची जागा पाहून बसलोच.
 
१. चेहऱ्यावरचे भाव सारं काही सांगून जातात २. दूर दिसणारा लिंगाणा 
परवा रात्री भट्टीत उतरलो तेव्हा अंघोळ केली होती, त्यानंतर तोंडाला काही पाणी लागलं नव्हतं, त्यामुळे चेहरे जे काही रापले होते की काय बोलू नका. हर्षलदादाच्या बॅग मधून चिक्की काढून जरा पोटाला आधार दिला. गाव जवळ आलं होत पण थकवाही इतका होता की त्या झाडाखालून आता हलायची देखील इच्छा नव्हती. परत पुढची वाट चालू लागलो वाट चालता चालता एकाकी चढ लागला, अनपेक्षित असा चढ लागल्याने गाड्या जणू काही ढेपाळायला लागल्या होत्या, बरं झालं अगदी काही मिनिटांपूर्वी जरा थांबा घेतला होता, नाहीतर आता हा चढ चढताना आमची पुरती हौस झाली असती.
काळ नदीचं पात्र 
चढ चढत चढत एक माळरान गाठलं पुढे आलो आणि उतरणीला लागलो उतार उतरून थोडं पुढे आलो आणि खाली दूर आम्हाला वाळणकोंड डोह, काळ नदीच पात्र आणि मध्येमध्ये डांबरी रस्ता दिसत होता. वाटेला आता उतार लागला, समोर नवीन लिंगाणा माची गाव दिसू लागलं, गाव जस जवळ येत होतं तसे पायांचे सूर देखील जास्त जोरात आळवीत होते. वळणावळणांचा उतार उतरत एका मागून एका असे उतरत अखेर अडीच पावणे तीन च्या सुमारास आम्ही नवीन लिंगाणामाची गावात प्रवेश केला. आम्ही आलेल्या वाटेवरून उतरल्यावर बबन मामाचं घर लगेच लागलं. सारवलेल्या अंगणात प्रवेश केला आणि एकच सुटकेचा निःश्वास सोडला. 
           भूक इतकी प्रचंड लागली होती की अंगणात बसल्या बसल्या शूज वगैरे काढून मोकळे झालो, बबन मामांच्या घरातून पाणी मागितलं, बबन मामांचा मुलगा नरेशने एवढ्यात आमच्यासाठी चटई देखील अंथरली. हर्षल दादाने आणलेल्या पराठ्यांवर आणि बॅगेत उरल्या सुरल्या सुक्या खाऊवर बकासुरासारखे सगळे तुटून पडलो होतो, पोटात जसे ते पराठे गेले तशी पोटातली आग शांत झाली, अंगण्यात बसल्यामुळे पायांना सुख मिळालं तर पोटात अन्न गेल्याने आतड्यांच्या आनंदाला देखील पारावर उरला नव्हता.
बबन मामांचं घर 
इतक्या तंगडतोडी नंतर निवांत बसून जेवताना "आता विसाव्याचे क्षण,माझे सोनियाचे मणी, सुखे ओवीत ओवीत, त्याची ओढतो स्मरणी" हे लतादीदींच्या गाण्याचे स्वर ओठी येऊ लागले. पोटातला आगडोंब आता शांत झाला होता, विश्रामही झाला होता, आता पाय काढता घेण्याची गरज होती, तीन वाजून गेले होते, मामांसोबत एक फोटो काढून त्यांचा आणि लिंगाणा माची गावाचा निरोप घेऊन गावाबाहेर पडलो. गावाच्या बाहेरपर्यंत सोडायला देखील मामा आले होते, त्यांच्या त्या पाहुणचाराने आम्ही अगदी कृतकृत्य झालो. गावाच्या बाहेर आल्यावर डांबरी रस्त्याला यायला काळ नदीचं पात्र ओलांडून बाहेर जावं लागत.
जलक्रीडा 
अरे बापरे दोन दिवसांनी इतकं पाणी पाहिल्यावर आता त्या पाण्यात उतरण्यापासून आम्हाला कोणीही आवरू शकत नव्हतं. पाण्यात उतरण्यायोग्य जागा पहिली आणि आम्ही पाण्यात उतरलो देखील. नदीच पात्र पूर्णत: दगडगोट्यानी भरलेले होत, परिणामतः पाणी इतकं नितळ की खालचा तळ दिसत होता.दहा मिनिटांच्या ऐवजी अर्धा पाऊण तास जास्त वेळ पाण्यात कधी गेला हे कळलं देखील नाही, यथेच्छ डुंबून शरीर आता एकदम हलकं झालं होत. आता ट्रेकच्या एकदम शेवटच्या टप्प्यात होतो, डांबरी रस्त्याला लागून वाळणकोंडपर्यंत जायचं, तिथून काय मिळेल ती गाडी पकडून महाड गाठायचं. 
           नदीच्या पात्रातून दगड गोट्यांची कसरत करत पात्राबाहेर आलो आणि डांबरी रस्त्याला लागलो. पुन्हा एकदा डांबरी रस्त्याची कंटाळवाणी चाल अस असलं तरी आता ट्रेक यथोचित पार पडल्यामुळे एक समाधानाची लकेर सर्वांच्या चेहऱ्यावर होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी असल्यामुळे आणि सूर्य देखील पश्चिमेला कलला असल्याने रस्त्यात आता सावली होती, त्या थंडगार सावलीतून चालताना हायस वाटत होतं. आता परत आमचे दोन ग्रुप झाले, मी आणि हर्षल दादा पुढे तर उर्वरीत तिघे मागे. नदीपात्रापासून दोनएक किलोमीटर चालून आम्ही वाळणकोंड डोहाजवळ आलो.


रांजणखळग्यांमुळे तयार झालेलं हे वाळणकोंड डोह म्हणजे निसर्ग नामक किमयागाराने केलेली एक अद्भुत किमयाच होती. त्या ठिकाणी नदीपात्र ओलांडण्यासाठी केलेला पूल आणि खाली डोहात शेकड्यांनी विहंग करणारे मासे, येथील स्थानिक लोकांचं हे श्रद्धास्थान असल्यामुळे ही लोक या पुलावरून चपला घालून जात नाहीत. पात्राच्या बाजूला देवाचं मंदिर देखील आहे. तिथली फेरी आटोपती घेतली आणि आम्ही निघालो आम्ही निघतोय तर हे तिघे तिथे आले, त्यांना देखील लवकर निघायचं सांगून काही टमटम किंवा कुठली गाडी मिळेल या आशेने वाट चालू लागलो. इथे आता टमटम फक्त मांगरुण गावाच्या इथे मिळेल अस वाळणकोंडच्या इथे एका मावशींनी सांगितलं. म्हणजे अजून तीन चार किमीचा फेरा. काही आढेवेढे न घेता निघालो. मजल दरमजल करत चालतोय. सावली असल्यामुळे खरंच बरं वाटत होतं. नाहीतर या एवढ्या चालीला ऊन असत तर चांगलीच हालत झाली असती आमची.
महाड दापोली रस्त्याला दापोलीच्या अलीकडे एक फाटा फुटून हा रस्ता पाने गावात येतो, याच रस्त्याने चालत आम्ही पुढे चाललो होतो, तर दापोली कडे जाणारे रस्त्यावरून दापोली वरून एक टमटम येताना दिसली, ही टमटम आपल्याला भेटली पाहिजे म्हणून पाठीवर वजन असून देखील मी आणि हर्षल दादा असे काही धावलो होतो आणि ती टमटम आता जाणार म्हणून जीवाच्या आकांताने दोघ एकसाथ "रिक्षाsss..." अस जोरात ओरडलो की तो रिक्षावाला पुढे गेलेला थांबला आणि आम्ही धावत येतोय हे पाहून त्याने रिक्षा मागे आमच्यापर्यंत आणली. रिक्षावाल्या दादांशी बोलता ते बोलले की ते महाड ला नाही येऊ शकत, बिरवाडीला सोडायचे पाचशे रुपये घेऊ. मांगरूण ते बिरवाडी एवढ्या अंतराचे 20 रुपये घेतात हे मला माहीत होत, आणि मी हे हर्षल दादाला देखील सांगून ठेवलं होतं. त्यामुळे त्या रिक्षावाल्याला कमी वगैरे न करता थेट नको बोलून टाकलं. परत पुढे पायगाडी धरली, मांगरूण गावाच्या हद्दीत आलो, तीन पोर भेटली, तर त्यांनी आपणहून आमची चौकशी केली तर त्यांना घडला वृत्तांत सांगितला तर ते बोलले एवढे पैसे कोणी सांगत नाही, जरा जास्तच पैसे सांगितले त्याने. मिळेल तुम्हाला काहीतरी गाडी हा विश्वास देखील त्यांनी दिला त्यांना निरोप देऊन पुढे चालतोय, तोच मागून एक टेम्पो आला. टेम्पोवाल्याला हात केल्या केल्या तो थांबला देखील, त्यांनी कुठे चाललात विचारलं तर पटदिशी महाड, बिरवाडी दोन नाव सांगून मोकळा झालो. बिरवाडी सांगायचं कारण म्हणजे मांगरूण वरून बिरवाडी व नंतर महाड असा प्रवास करावा लागतो, आणि बिरवाडीला खूप उशिरापर्यंत गाड्या असतात. टेम्पोवाले दादा महाडला चालले होते पण त्यांचा खिडक्यांचा धंदा असल्याने त्यांना दोन ठिकाणी खिडक्या लावायला थांबावं लागणार होतं. त्यांनी सांगितलं या आमच्यासोबत वाटेत काही गाडी मिळाली तर जा. आम्ही दोघ आता गाडीत बसलो, मागच्या तिघांना मेसेज टाकून ठेवला जो काही त्यांना गेलाच नाही. आणि अपेक्षेनुसार एका ठिकाणी टेम्पो थांबला तिथे उतरून ते दादा काम करायला गेले, तर आम्ही रस्त्यात थांबलो.आमच्या टेम्पोच्या मागून एक टेम्पो गेला आम्हाला वाटलं की हे सर्व त्या टेम्पोने गेले असणार. नंतर एक रिक्षा आली, त्या रिक्षाला हात केला ती रिक्षा थांबल्यावर आत डोकावून बघतोय तर आत आमचीच जत्रा होती. एकंदरीत सगळे एकत्र आलो आणि पुढचा प्रवास एकत्र चालू झाला. बिरवाडीला पोचलो, तिथून लगेच महाडला यायला पण रिक्षा मिळाली. महाडमध्ये पोचलो तर तिथे राहुल दादाचा भाऊ अमोल वारंगे भेटला. काळोख पडला होता आणि महाड स्टँड मध्ये गर्दी पण होती त्यामुळे अमोलने गाडी शोधून आम्हाला त्यात बसवलं आणि आमचा परतीचा प्रवास चालू झाला. हर्षल दादाला उशिराने बस होती पण अमोलची कंपनी असल्यामुळे त्याचदेखील आता काही टेन्शन नव्हतं. एकंदरीत तीन दिवसांचा भन्नाट जंबो ट्रेक खूप काही आठवणी गोळा करून यशस्वीरीत्या संपन्न झाला. 
           
           समाप्त.
           कसा वाटलं ब्लॉग नक्की सांगा, वाट पाहतोय तुमच्या कमेंट्सची. 


No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...