Wednesday, September 27, 2023

भुलभुलैयांचा माणिकगड Manikgad trek blog

 http://sahyadrichabhatakbhavanya.blogspot.com/

चला, 
            आता लिहायचं ठरवलच आहे, तर म्हटल जुन्या भटकंतीही लिहाव्या, तेवढीच बोटांना मराठी टाइपिंगची चलाखी येईल. यावर्षीचा ऑगस्ट महिना  तसा खुप गाजवला होता, कारण ही तसाच म्हणा, एक-दोन , एक-दोन  दिवसांचा गॅप  घेत आठ-नऊ  ट्रेक केले होते, सोळा ऑगस्ट ला असाच संध्याकाळी बोलता बोलता संदेशला बोललो उद्या कुठे जायचा का???  कारण सतरा ची नारळी  पोर्णिमेची सुट्टी वाया जाऊ  द्यायची नव्हती, मग काय साहेबांनी लगेच होकार दिला. तशीच पुढे फोनाफोनी करून  आकाश आणि प्रितमला तयार केल, चार जण तर तयार  झालो आता आमच्यातला श्याम राहिला, रात्रभर त्याला फोन करून थकलो, पण  भाईंचा काही कॉंटॅक्टच नाही, शेवटी चौघानिच जायच  ठरवल. माणिकगड हे नवीनच ठिकाण  ठरवल असल्याने अप्पाना(धनंजय मदन, निसर्गमित्र पनवेलचे सर्वेसर्वा) सगळी माहिती विचारुन, तसेच नेटवरून माहिती गोळा करून  निद्रिस्त झालो.

             सकाळी पावणे आठची बस  पकड़ून मि पनवेल गाठल, संदेश आणि आकाशला साडेआठच टाइमिंग दिल होत. नेहमीप्रमाणेच वेळेअगोदरच  सव्वाआठ वाजता मी झेंडा गाड़ायला पोचलो. संदेश  आणि आकाश कुठे आहेत म्हणून त्याना कॉल केला तर संदेश  साहेब कही फोन उचलायलाच तयार नाहीत, तिकडे आकाशही तयार  होऊन त्याची वाट बघत होता. झाल साहेबांनी फोन उचलायला पावणेनवऊ वाजवले, मग काय दोघे येतायेता सवानऊ झाले. ते दोघे येपर्यंत मीही सगळ्यांच्या पोटापाण्याची सोय म्हणून काही खायला घेतला, तो पर्यंत आमचे साहेब गाड़ी घेऊन सेवेत हजर झाले, आले तर आले, दोघे आले, आणि तेदेखील रिकामेच (पाणी सुद्धा नाही, बाकी सोडूनच दया), वर म्हणतात काय तू सगळ  आणणार आम्हाला गारंटी आहे(अगोदरच नविन गड, इंटरनेटवर पन जास्त माहिती नव्हती, आणि बऱ्यापैकी चालयच होत, त्यात हे असे  रिकामें बोलल्यावर आणि लेट आल्यामुळे अगोदरच भड़कलेलो  मी  तळपायाची मस्तकात गेलेली आग शांत करत पुढच्या प्रवासाला निघालो). आता पुढच्या टप्प्यात प्रितमच्या घरून त्याला घेऊन वडगाव(माणिकगडच्या पायथ्याच गाव) गाठायच होत. प्रितमच्या इथे पोचलो तर या साहेबांच्या मातोश्रींनी पाहुणचाराचा आग्रह धरला(तशी  आमची पाहुणचाराला कधी  ना नसते), झाले एव्हाना घड्याळाचा काटा दहा वर पोचला होता. गाडीत प्रितम आणि संदेशची मस्त टर उडवाउडवी चालू होती,प्रितमचा हा पहिलाच ट्रेक असल्याकारणाने संदेश त्याला बोलत होता की तू चालणारच नाही, दमशील, आणि अजून काही कानमंत्र देत होता(जस काय याने शे दोनशे ट्रेक केलेत), आता मात्र भरभर गाडी काढली आणि वडगाव गाठल, तिथे अप्पानी सांगितल्याप्रमाणे राहुल जांभुळकर यांच्या घराजवळ गाडी लावली, सौ. जांभुळकरांनी पाणी वगैरे दिले, आणि गावातल्या एका माणसाला वाट दाखवण्यासाठी आमच्यासोबत पाठवल.

             एकंदरीत नऊला चालू  करायचा ट्रेक साडेदहाला चालू झाला(एकदाचा). त्या  काकांनी  गावाच्या  बाहेर  येऊन आम्हाला वाट दाखवली, आणि पुढील वाटेच वर्णनही सांगितला. आणि आता आमच चौघांचा ट्रेक सुरु झाला.ऑगस्ट महिना असल्याकारणाने वनश्रीने हिरवा शालू पांघरला होता, त्यात दूरवर माणिकगडच टोक दिसत होत. झाली माझ्यावर मस्त शब्दफूले उधळली गेली आणि त्यात नेहमीच "साला हां नेहमी जाम चालवतो...पायांची वाट लावतो ..."(आताशी चालायला सुरुवात झाली होती बस्स !!!). इकडे तिकडे सौंदर्य  बघत फोटो काढत चार अकरा नंबरच्या गाड्या चालल्या होत्या.  गावातून बाहर पडल्यावर एक झोपड़ लागल, त्याच्या मागेच माणिकच टोक दिसत होत
गावाच्या बाहेरची झोपडी आणि मागे दिसणार माणिकच टोक.
  त्याच्या पुढे शेतातून, बांधावरून, चिखलातुन वाट काढत आम्ही माणिकच्या  झाडीत पोचलो, तिथुन थोड़ पुढ गेल्यावर एक आजोबा दिसले, त्यांच्याजवळ अशीच चौकशी(चांभारचौकश्या) करताना समजल  त्यांना  ऐकूच नव्हत येत, मनातूनच  मग त्या आजोबांना  रामराम ठोकला आणि पुढचा चढ़ चढु  लागलो, तेथे खडकात खोदलेल्या पायऱ्या लागल्या, जेमतेम सहा-सात पायऱ्या होत्या, पण  गडावर काही अवशेष आहेत  याची शास्वती त्या देत  होत्या.
खडकात खोदलेल्या पायऱ्या 
               एवढ्यातच आम्हाला एक गोष्ट  जाणवली  होती की प्रत्येक ठिकाणी नवनवी वाट झाली होती, आणि त्या  सगळ्या वाटा  इतक्या मळलेल्या होत्या की कधीही माणूस भरकटू शकतो, या अशा  इतक्या वाटा  बघुन माझ्याही मनात एकशे एक विचार(सैल्युट माझ्या मनाला आणि विचारांना) येत होते. वाटांच्या त्या  महाजालातून सुरुवातच इतकी भारी चालली होती की हा आपला शेवटचाच ट्रेक बहुधा. पायऱ्यांपासून  वर गेल्यावर तीन माणस  दिसली. त्यातल्या एकाने आम्हाला सगळी वाट समजाऊन सांगितली, विशेषत: एक वळण  दाखवण्यासाठी त्याने गवताच्या रोपटयानी  खुणा करून दिशा दाखवली(खुप आभारी त्यांचा).  जंगलातून वाट काढत, पावले टाकत, वाट बरोबरच आहे(माझ मीच ठरवून) या अविर्भावात मी तिघाना  घेऊन चाललो  होतो. एकंदरीत तासाभराची चाल करून आम्ही वर पठारावर धनगरवाडीच्या पुढे पोचलो,येथे आम्हाला पुनः एकजण  भेटला त्याने सांगितल की पुढे काही माणस गेलीत ते तुम्हाला वाट दाखवतील. त्या पठारावरूनच आम्हाला माणिकगडचा दक्षिण भाग़ दृष्टीक्षेपात येत होता.
धनगरवाड्याच्या पुढे आल्यावर दिसणारा गडाचा  दक्षिण भाग 

                 आता इथून एक कसोटी  होती. कारण आम्ही गडाच्या दक्षिणेला होतो, आम्हाला उत्तरेला जायचा होत, आणि त्यासाठी दोन  वाटा होत्या, पूर्वेकडून गडाला वळसा घालून जाणारी "एक पायाची वाट", तर पश्चिमेकडून जाणारी  दूसरी वाट(थोड़ी खडतर आहे, आणि सहसा या वाटेतुन कोणी जात  नाही,--स्थानिकांच्या मते ) , आम्ही एक पायाच्या वाटेनेच जायच  ठरवल होत. एक पायाच्या वाटेला लागलो आणि थोड़ा पुढे जाऊन  खवळलेल्या आतड्यांना थोड़ शांत केल.
डावीकडून मी , प्रीतम, संदेश , आकाश 

एव्हाना भास्करराव मध्यान्ही आले होते. दहा पंधरा मिनिट चालून गेल्यावर त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे चार-पाच जण लाकडे तोडायला आली होती, त्याना वाट विचारल्यावर त्यानी सांगितल की "बगा, ही वाट अजिबात सोडू नका, सरल चालत रा, तुम्ही बरोबर पोचाल..." मग काय त्या माणसांनी  सांगितल्याप्रमाणे ती एक पायाची वाट तुडविट आम्ही निघालो, आजुबाजूला मस्त हिरवळ, पाखरांचे आवाज ऐकत आम्ही चाललो होतो. त्या दाट झाडीत डोंगराच्या ज़रा कडेकडेनेच चाललो होतो, तेव्हा वाटेत एक छोटा  नाला आला, ज्याने ती  सरळ वाट खंडित  केली होती. आता तो नाला ओलांडून पुढे जंगलात शिरलो, दहा-वीस पावले पुढे आलो आणि वाट असल्याची नीटशी चिन्हे दिसत नव्हती, तरीही वाट असेल वाट असेल या आशेत  मी  पुढे अणि माझ्यामागे तिघे चालत राहिले, गवतातून जाताना, कोळ्यांची जाळी  वगैरे तोंडावर  येत होती, त्यातून वाट काढत मनाशी विचार केला की आपल्याला गडाच्या उत्तरेला जायच  आहे, तर गडाच्या  कातळ टप्प्याला चिकटून आपण  पुढे पुढे गेल्यावर पोचू शकतो. अस म्हणत  म्हणत  आम्ही चाललो  होतो, आता मात्र खुप आत  गेलो होतो आणि जाणवल  की बहुधा आपन वाट चुकलोय, म्हणून थोडा  विचार करत  असताना एक दोन  आवाज दिले, तर प्रत्युत्तरादाखल मला सुद्धा काही आवाज आले, आम्ही खुप आत गेल्या कारणाने आवाज काही स्पष्ट समजत नव्हते, म्हणून त्या आवाजाच्या दिशेने आम्ही खाली उतरलो. झाडीतून थोड़ बाहेर आल्यावर दिसल की दोन गुराखी आम्हाला आवाज देत  होते, त्यानी आम्हाला खाली बोलावलं, खाली गेल्यावर त्यानी सांगितल की तुम्ही कुठली तरी वाट चुकला होतात, मग पुढच्या वाटेच वर्णन त्यानी सांगितला. त्यानी सांगितल्याप्रमाणे एक मारुतीची मूर्ती  असलेला चौथरा लागेल, तेथून पुढे सरळ गेल्यावर डाव्या  बाजूच्या वाटेने चढ़ लागेल, अणि पूर्ण झुडपांनी  भरलेली वाट असेल.त्या गुराख्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही मार्गस्थ झालो, वीसेक मिनिटांच्या चाली नंतर मारुतीच मंदिर लागल, 

मारुतीच मंदिर 
मंदिर बघून ज़रा हायस वाटल, कि आपण आता जवळ आलोत आणि तेही बरोबर, तिथेच वाटेत असलेल्या ओहोळात जरा तोंड हात धुवून पुढे वाटेला लागलो. येथून माणिकच छान दर्शन झालं, माणिकची लिंगीही टोक काढून प्रचिती देत होती. 
माणिकच दक्षिणोत्तर दर्शन 

मंदिराच्या पुढे डावी वाट पकडून चढ चढल्यावर वाटेच्या दोन्ही बाजूला एक डोकी एवढी वाढलेली हिरवीगार कारवी डोलत होती, सात वर्षांतून फुलणाऱ्या कारविचा फुलोरा यंदा फुलण्याच्या तयारीत होता, गुलाबी निळ्या रंगाच्या कळ्या सर्वत्र लागल्या होत्या, काही ठिकाणी फुले देखील आली होती. 
कारवी (फोटो जरा पुसट आहे)

त्या कारवीतून वाट काढून एकमेकांवर विनोद करत आम्ही चाललो होतो. गाडीमध्ये जी प्रितम आणि संदेशची जुगलबंदी चालू होती त्याला प्रितमने आता बऱ्यापैकी उत्तर दिलं होतं,कारण किती काय झालं तरी गिरवल्याचा गावरान पठ्ठया होता की.  आता गडाच्या शेवटच्या टप्प्यात पोचलो होतो, आणि संदेश जरा जास्तच थकला होता, आणि मागे राहत होता, लीडर या नात्याने सुरुवातीपासून विचार करत होतो, कसा ट्रेक होईल म्हणून, पण आता शेवटचा विचार मनात घोळवू लागलो, आकाशला बोलून पण दाखवल मी कि इथेच थांबूया आणि परतीचा प्रवास सुरु करूया कारण अजून किती वेळ लागेल माहीत नव्हतं, आणि पुन्हा उतरताना तेवढाच वेळ जाणार, आणि अगोदरच एकदा वाट  भरकटलो होतो, म्हणून अंधार व्हायच्या आत खाली गेलेलं बर. मनात काय विचार आला माहीत नाही, आकाशला सांगितलं संदेश येईपर्यंत थांबा इथेच, बसा थोडावेळ, मी पुढे जाऊन किती वेळ लागेल याचा अंदाज घेऊन येतो.
निसर्गदर्शन 

 तशीच आकाशला टांग देऊन लांब टांगा टाकत मी धावतच वाट शोधत निघालो, आता माझी वाट सरळ चालू असताना मध्येच एक डाव्या बाजूला फाटा फुटलेला त्या फाट्यावर कॅरन(दगडांवर दगड ठेऊन वाट ओळखण्यासाठी केलेली खूण) दिसले, त्यावरून लक्षात आले की ही जी सरळ गेलेली वाट आहे ती गडाच्या पश्चिमेला वळसा घालून ये येणारी वाट होती, त्या फाटा फुटलेल्या वाटेतून आत जाऊन वर चढायला लागलो आणि वर चढू लागलो, वर आल्यावर गवत मस्त वाढले होते, आणि वाऱ्याबरोबर मस्त डोलत होते, गार वारा अंगाला लागत असल्याने खूप मस्त वाटत होत.
हिरवे हिरवे गार गालीचे... 

 आकाशला सोडल्यापासून पाचच मिनिटात मी गडावर पोचलो होतो, तसाच लगेच खाली उतरून तिघांनाही भेटलो, तिघांचा आरामही झाला होता, त्यांना सांगितलं दहाव्या मिनिटाला आपण गडावर असू, असं बोलल्यावर त्यांना पण जरा बर वाटल(आतापर्यंत तीन तासांची तंगडतोड करूनही शेवटचा विराम कुठे आहे कळत नसल्याने माझी आरतीच चालू होती). झाडीतून वर आल्यावर वाऱ्यामुळे त्यांचीही पावले आता भरभर पडत होती. आणि अखेर चौघांनी गडावर बुड टेकवले. मी लगेच पुढे जाऊन पहिल्या टाक्यातून पाणी आणून तीनही साहेबांना दिल, घडाळ्याचा काटा आता दोन वर गेला होता, पावसाळा होता तरी पण भास्करराव जरा तापलेच होते. 
उड चले 
               आता काय चेहरे ताजेतवाने केल्यामुळे फोटोग्राफी जागी झाली, उड्या वगैरे मारून तिघेजण हौस करत होते(मी काय आहे आपला फोटोग्राफर), पहिलं टाकं बघितलं, थंडगार पाण्याने मस्त भरलं होत, पुढे गडावर प्रवेश केल्यावर चूना मळण्याचं दगडात कोरलेलं जात होत, बाजूलाच वाऱ्यावर भगवा डौलाने डोलत होता, 
ही शान भगव्याची 

सावलीचा काही आश्रय नाही हे बघून अंगावरच्या बॅगा जात्याजवळ  टाकून तेथेच ठाण मांडलं. 
चुना मळण्याच जातं 

आता मात्र पोटातील प्राणिसंग्रहालयाने धुमाकूळ घातला होता. बॅग खोलली आणि ब्रेड जाम, लाडू, बिस्किट, ठेपले, फळ सागळ्यांचा अक्षरशः फडशा पाडला. पोटात जरा दोन-चार घास गेल्याने बर वाटल. आणि मस्त गड़फेरीला निघालो, गड दर्शन करता करता आम्हा सगळ्यांमध्ये वेगवेगळे मॉडेल संचारले हे काही नव नव्हतं...कारण वातावरणच इतक अल्हाददायक होत ना, की..."हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे..." या कुसुमाग्रजांच्या ओळीदेखील आठवल्या. 
हिरवाईची नवलाई 

जात्याच्या पुढे गेल्यावर आम्हाला एक दरवाजा दिसला, त्यातून न जाता आम्ही त्याच्या अलिकडूनच उजव्या वाटेने खाली उतरलो, व उजवीकडून गडदर्शनास सुरुवात केली, तिथे खाली उतरल्यावर वडगाव(पायथ्याच गाव) व आजुबाजूची गावे दिसत होती. 
हे सह्यागिरी सह्यपर्वता सत्वर उभा राहीन सेवेस तुझ्या 

पुढे थंडगार पाण्याचे टाके  आमच्या स्वागताला बसले होते.
पाण्याचं टाकं 

 आणि लगेच शंकराची पिंड  होती, टाक्यातले पाणी पिउन मी मस्त फ्रेश झालो, पण  बाकी  संदेश, आकाश, प्रितम ने टाक्यातले पाणी  पिण्यास नकार दिला(नवखे ट्रेकर्स ना, मिनरल वॉटर  पाहिजे होत  साहेबांना), शंकराच्या पिंड़िच  दर्शन घेतल, फोटोग्राफी आणि निसर्गाची नवलाई बघण्यातही आम्ही गुंतून गेलो होतो, 
हर हर महादेव 

एवढ्यात पावसाची एक छोटी सर येता येता गेली,(पाऊस  आला असता तर आमची चांगलीच त्रेधा तिरपिट  उडाली असती , कारण आम्ही आमच्या बॅग्स सुद्धा त्या  जात्याजवळच  ठेवून आलो होतो), पुढे जाऊन  आम्ही गडाच्या दक्षिण टोकाला पोचलो, तेथे मस्त मोठ्या दगडावर फोटोग्राफीची मजा अनुभवली, 
या उत्तुंग नभी  मला झेपाऊ  दे... 

आणि गडाच्या एकदम वरच्या माथ्यावर आलो, तेथे एक मोठ  तळ  होत आणि बाजूला लागूनच टाक होत , तळ्यातल पाणी हिरवगार असल्यानं पिण्यायोग्य नव्हतं, मनात इथे एक श्रमदान होऊ  शकत  अशी ईच्छा तरळून गेली(बघुया कधी होतय  हे काम ते आता).
गडावरचं छोट  तळं 

  इथेच पुढे एका पुरातन चौथर्याचे अवशेष दिसले, संपूर्ण चौथऱ्यावर गवत वाढले होते, 
गवताने झाकलेला चौथरा 

चौथऱ्यावरून खाली उतरून एका दरवाजातून बाहेर  आलो, हा  तोच दरवाजा ज्याच्या अलिकडून आम्ही गडाला पाहण्यास सुरुवात केलि होती.
दरवाजा 
दरवाजा थोड़ा बाजूने ढासळला होता, दरवाजातून बाहेर आल्यावर उजवीकडे एका चौथऱ्यावर एक देवळिवजा मंदिर होते, अशा  प्रकारे माणिकगडाला आम्ही एक प्रदक्षिणा मारली होती. 
देवळी 

एव्हाना तीन वाजले होते, आता मात्र उतरण्याची घाई  करणे  अपेक्षित होते कारण पनवेल पासून जरी जवळ असलो, तरीही हा  गड पायथ्याच्या गावापासून खुप आटी होता, आणि अनेक वाटा आणि फाटे असल्या कारणाने चुकण्याची भीति देखील होती, म्हणून काळोख होण्याच्या आत  कुठल्याही परिस्थितीत खाली उतरायच  होत. भरभर सामान भरल. त्या ट्रेकपुरत  ग़डाच  अखेरच दर्शन घेतल आणि पावलांना गती  देत  आम्ही उतरण्यास  सुरुवात केली. 
three idiots

जेथे आम्ही सकाळी परत  फिरण्याचा विचार करत होतो, तिथेच आम्हाला दूसरा ग्रुप गडावर येत असताना भेटला, सव्वातीन झाले होते आतापर्यंत, ते दूरच होते, तेव्हा मनात विचार आला, काय हे लोक एवढ्या लेट आलेत, हे वर पोचणार  कधी  आणि पुन्हा  परतीला  यांना  किती वेळ लगणार? एवढ्यात तो ग्रुप आमच्या समोर आला आणि पाहतो तर त्यात माझीच दोन  परममित्र प्राग्वंश पाटील  आणि गणेश दुस्मान(दोघे अतरंगी नावांचे) आणि सोबत त्यांच्या अजुन दोघे जण होते.त्यांची चौकशी करता समजले की यांची टोळी  तर आठ-नऊ  वेळा  रस्ता  भरकटली होती, आम्हाला बघुन नक्कीच त्यांना  हायस वाटल असणार, त्यांना  भेटून त्यांचा समाचार  घेतला आणि आम्ही पुढे निघालो. वाट आता परिचयाची असल्या कारणाने पावलांनी  वेग घेतला होता, जिथे एक ठिकाणी रस्ता  भरकटलो  होतो, तो शोधत आम्ही भरभर खाली येत होतो, एका छोट्या नाल्याजवळ आम्ही पोचलो, तेथे समजल की आम्ही आहोत ती  वाट आणि ज्या वाटेला पुढे मिळते ती  वाट यांमध्ये  चांगलच दुभाजकाच काम केला आहे, ज्यामुळे आम्ही आणि अजुनसुद्धा भरपूर जणांनी माणिकच्या भुलभुलैयात प्रवेश केला असणार. नाल्यामध्ये छान अंघोळ  करून आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो, पुढे धनगराच्या  माळावर  येऊन बॅगमधून राहिलेल्या खाऊचा धुव्वा उड़वला, आणि हळू हळू करत संपूर्ण माणिकगड पायाखाली आणला. उतरताना पायऱ्या खोदलेल्या खड़काजवळ संदेशची गाडी जरा घरंगळली, एवढाच एक काय तो त्याचा एकट्याचा मातीशी संपर्क आला. वडगाव च्या वेशीवर आम्ही आता पोचलो, हात  पाय धुवून गावात  शिरलो, पन गावात शिरताना आम्ही पुनः भलत्याच वाटेने शिरलो त्यामुळे आम्ही गाडी लावलेल  जांभुळकरांच  घर शोधताना पुन्हा थोड़ी पंचाइत  झाली. जांभुळकरांच्या घरापासून तीस पस्तीस  फुटांवर असताना आम्हाला आमची गाडी दिसली, गाडीच्या आजूबाजूला माणस  होती, आणि गाडीची पार्किंग लाइट चालू  होती, हां जरा एक धक्काच होता, कारण नक्की काय झाल आणि कशामुळे लाइट चालू राहिली हे काही  समजण्याच्या आत गाडीची बॅटरी  उतरली असणार आणि आता गाडी नेणार कशी ही शंकेची पाल मनात चुकचुकली. गाडी जवळ गेलो तेवढ्यात राहुल जांभुळकर हे सुद्धा घरी आले होते, त्यांची भेट झाली. गाडीची लाइट चालू राहण्यामागच कारण अंधारातच राहिल, आम्ही आता  निघत होतो, की जांभुळकरांनी  चहाचा  आग्रह केला, सुरुवातीला नाही म्हटल आम्ही पण  ते सुद्धा एक ट्रेकर्स असल्या कारणाने त्यांनी  आमचे भाव जाणले  होते. छानपैकी त्यांच्या ओसरीवर जाऊन चहा  येईपर्यंत आमच्या गप्पा रंगल्या. गप्पा इतक्या रंगल्या की ओळखी पाळखी  निघुन अस समजल की  जांभुळकरांच्या सौ च्या मावशीची मुलगी आमच्याच गावात माझ्या भावाच्या मित्राला दिलेली.(ही अशी काही नाती गोती , ओळखी-पाळखी निघाल्या की मला माझ्या मित्रांची आठवण  येते, जे म्हणतात कुठे पण  जा याचा  कोणीतरी  भेटणारच). जांभुळकरांच पाहुणचार  स्वीकारून आम्ही आता  मार्गस्थ झालो, सकाळपासून चटर-फटर खाण चालू  असल्याने आता कडकडून भूक लागली होती, एका ढाब्यावर  गाडी थांबवून यथेच्छ भोजन आटोपल आणि परत  एक फजिती  झाली, आम्हा सगळ्यांकडे एटीएम कार्ड होते, कॅश कुणाजवळच  नव्हती, आणि ढाब्यावरती कार्ड घेण्याची पद्धत नव्हती, आता झाली पंचाइत. मग काय सगळ्यांनी पाकिटातील दहा -दहा रुपये खाली करून बिलाची रक्कम जमा केली  आणि बिल भरल.
अशा  प्रकारे भुलभुलैयांचा माणिकगड आम्हा सर्वांच्या लक्षात राहिला.

आमच्या कडून घडलेल्या चूका तुमच्याकडून होउ नये म्हणून या गोष्टि लक्षात ठेवा:
माणिकगड ट्रेक ला जाताना शक्यतो लवकरच निघा  कारण जंगल आणि खुप वाटा असल्याने हरवण्याची तसेच उशीर होण्याची शक्यता असते. 
उन्हाळ्यात पायथा सोडल्यास गडावर पोचेपर्यंत पाण्याची काहीच सोय नाही, म्हणून पुरेस पाणी जवळ ठेवा. 
घरुन निघतांनाच खाण्याच सामान जवळ ठेवा. 
घरच्यांना पूर्ण ट्रेक बद्दल माहिती देऊन ठेवावी.
राहुल जांभुळकर हे ट्रेकला  येणाऱ्या प्रत्येकाला मदत  करायला तत्पर असतात, त्यांचा संपर्क :9011807551
अंधार  होण्याची शक्यता असते म्हणून टॉर्च जवळ ठेवावी


सहभागी मेंबर: संदेश गोंधळी, आकाश लोखंडे, प्रितम तारे


भेटूया पुढच्या ट्रेकला...

 धन्यवाद!
आपलाच
सह्याद्रीचा भटकभवान्या   

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...