Saturday, June 19, 2021

भिलाई - चौल्हेर - पिंपळा - प्रेमगिरी - मोहनदरी

 

दिवस पहिला)


दिवस पहिला (२७ नोव्हेंबर २०१५) : भिलाई आणि चौल्हेर









४५ दिवस होऊन गेले पण ट्रेकचा योग काही जुळत नव्हता. इथे एक आठवडा ट्रेकला नाही गेल की अस्वस्थ वाटत पण आता ४५ दिवस होऊन गेलेले. हर्षलला सुद्धा ट्रेक करून बरेच दिवस झालेले. आता बास ! ट्रेक झालाच पाहिजे. मग काय दोघांनाही हुक्की आली आणि टाकली सुट्टी ऑफिसला. माझी यामाहा तयार होतीच. शेवटी काय अंगात किडे आमच्या मग म्हटलं घेऊ बाईक आणि निघू नाशिकला. मोठा ट्रेक करायचं ठरलं. मला तसा नाशिक रिजन नवाच, पण हर्षलचे तसे बरेच किल्ले झाले आहेत. मग काय दोघांचेही न झालेले किल्ले म्हणजेच भिलाई, चौल्हेर, पिंपळा, प्रेमगिरी आणि मोहानदरी करूयात असं ठरलं. तीन दिवस ५ किल्ले. पुन्हा कपाटावरून bag आणि tent काढणे आले. 


आता एवढा मोठा plan ठरल्यावर झोप कसली लागतीये, तयारीला लागलो. तीन दिवसां साठी लागणाऱ्या सामानाची यादी तयार केली. सगळा रस्ता, ठिक-ठिकाणी लागणारी गावं तसेच किल्ल्यांच्या  पायथ्याशी असणारी गावं यांची माहिती जमवली. ट्रेकला लागणारा खर्च काढला. सगळ्या वस्तुंची जमवा-जमव सुरु झाली. अगदी दोर, पाण्याचे कॅन, टेंट सकट सगळी तयारी झाली. शक्य तेवढ्या गावातल्या माणसांचे नंबर जवळ घेतले. आता फक्त गुरुवारची आस लागलेली. गुरुवारी संध्याकाळी ६ वाजता निघायचे ठरले. सगळी तयारी झाली होती, बाईकला किक मारायची बाकी होती. आठवडाभर आधी तयारी झाली होती. आता फक्त दिवस मोजत होतो.


अखेरीस गुरुवार (२६ नोव्हेंबर २०१५) उजाडला. ऑफिसचे काम उरकले. bag तयार होतीच. ५.३० वाजता हर्षलच्या घरी पोचलो तर हा गडी अजुन bag भरत होता. त्याला आवरायला आम्हीच मदत केली. सगळी तयारी केली, देवाला नमस्कार करून ६.३० वाजता आम्ही हर्षलच्या घरून निघालो. एक bag छातीवर, एक छोटी bag पाठीवर, पायापाशी टेंट बांधलेला, गाडी चालवताना जेमतेम समोरच दिसेल एवढीच जागा. अशी कसरत करत सगळ traffic पालथ घालत नाशिक फाट्याला लागलो. मग पुढे चाकणच घाणेरड traffic पार करून मंचरला पोचलो. खूप भुक लागली होती, मस्त पैकी chinese rice खाल्ला आणि पुढे निघालो. पुढचा ब्रेंक घेतला तो थेट सिन्नरला. मस्त पैकी जेवण करून पुढे निघालो. मग संगमनेर पालथे घालून नाशिकमध्ये १२ वाजता पोचलो. डांग सौंदाणेला पोचायला अजून २ तास होते  . आम्ही तडख आग्रा हायवे पकडला आणि सटाणा फाट्यावर येऊन पोचलो. येथे मस्त पैकी चहा मारला आणि पुढे निघालो. साधारण २.३० वाजता आम्ही डांग सौंदाणेला पोचलो.


डांग सौंदाणेला एक श्रीरामाचे मंदिर आहे परंतु हे मंदिर बंद असल्याकारणाने आम्ही येथे थांबु शकलो नाही आणि रात्री २.३० वाजता कोणाला उठवणार. मग आम्ही थोडे पुढे गेलो येथे डांग सौंदाणे गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयाचे ऑफिस आहे. या ऑफिसच्या आवारात भरपुर जागा आहे. आम्ही येथे उतरलो आणि आमच्या सोबत आणलेला तंबु उघडला. मस्त पैकी ऐसपैस तंबूत आम्ही ३-४ तास पडी टाकली. पहाटे ६ ला आम्ही उठलो आणि पटापट सगळे समान आवरले. आता आम्हाला चिंता होती नाश्त्याची कारण आमच्याजवळ स्टोव्ह काढून नाश्ता बनवण्याएवढा वेळ नव्हता. तेवढ्यात सकाळी फेरी मारायला आलेल्या बोरसे काकांनी आम्हाला बघितले आमची विचारपूस केली. अगदी देवासारखे धावुन आले. त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी नेले, मस्त चहा पाजला, आम्ही आमच्या जवळ असलेले समान त्यांच्या घरी ठेवले. छोट्या bag मध्ये थोडेफार खायचे समान आणि पाणी बरोबर घेऊन आम्ही त्यांच्या कडुन निघालो. त्यांनी आम्हाला रस्त्याची पुर्ण माहिती एवढी व्यवस्थित सांगितली की आपण अगदी आपल्याच गावात फिरत आहोत असे वाटत होते. डांग सौंदाणे गावापासुन पुढे दगडी साकोडे गाव पर्येंत जावे लागते. या गावातुन सटाणेला जाणाऱ्या मार्गावर आवळबारी (खिंड) आहे. या खिंडीत गाडी लावुन उजव्या बाजुस असलेल्या सोंडेवरून गडावर जायला वाट आहे.







दुर्दैवाने या किल्ल्याच्या इतिहासाची माहिती उपलब्ध नाही पण हा किल्ला डांग सौंदाणे आणि परिसरावर नजर ठेवण्यास उभारण्यास आला असावा. आधी हा किल्ला आहे हे आजूबाजूच्या गावातील लोकांना माहित नव्हते. त्या नंतर बर्याच जुन्या ट्रेकर्सनी या किल्ल्याला भेट दिल्यामुळे  हा किल्ला आता ज्ञात आहे. या गडावर फारसे अवशेष उपलब्ध नाहीत. आवळबारी खिंडीत आम्ही गाडी लावुन साधारण ७.३० वाजता उजव्या बाजूस असलेल्या धारेवर सरळ चढाई सुरु केली. येथून १५ मिनिटात आपण किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात येऊन पोहोचतो. येथे लांबलचक असे पठार आहे. येथून किल्ल्याच्या कातळकड्याचे उत्तम दर्शन होते. तसेच आपल्या डाव्या बाजुस डोलबारी डोंगररांगेचे  उत्तम दर्शन होते. येथे आम्ही आमच्या जवळ असलेले खाद्य पदार्थ काढून नाश्ता करून घेतला. पुढे ४५ मिनिटात गडाच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या टाक्यांपाशी येऊन पोहोचलो. येथुन थोडीशी खडी चढण करून आपण गडाच्या सर्वोच्च माथाय्वर असलेल्या ध्वजापाशी पोहोचतो.



सर्व गड फिरून झाला होता. आम्ही परत खाली उतरून टाक्यांपाशी उतरलो. येथे थोडा वेळ विश्रांती घेतली आणि गड उतरायला सुरुवात केली. आम्हाला आज अजुन चौल्हेर गड पण फिरायचा होता. साधारण ४० मिनिटात गड उतरून आम्ही आवलबारी मध्ये पोहोचलो. येथून परत आम्ही डांग सौंदाणेला आलो. बोरसे काकांकडून आमचं समान घेतलं, त्यांचे आभार मनात त्यांचा निरोप घेतला आणि चौल्हेर किल्ल्याच्या दिशेने रवाना झालो. वाडी चौल्हेर हे गडाच्या पायथ्याचे गाव आहे. फारसा वेळ नसल्या कारणाने आम्ही लवकर निघालो. डांग सौंदाणे ते वाडी चौल्हेर साधारण १ तासाचा रस्ता आहे. डांग सौंदाणे गावातुन आपणास प्रथम तिळवण गावात यावे लागते. येथून १० मिनिटात आपण वाडी चौल्हेर गावात पोहोचतो. वाडी चौल्हेर गावात एक शाळा आहे आणि या शाळेला छोटस पटांगण आहे. आता पर्येंत दुपारचा १ वाजला होता. आम्ही वाडी चौल्हेर मध्ये या शाळेत पाय-उतार झालो. शाळा भरलेली होती. आम्ही येहते पोहोचताच सगळी चिमुरडी कोण आलं असं बघत पळत पळत बाहेर आली. येथे असलेल्या गुंजाळ आणि सोनावणे सरांशी आमचा परिचय झाला. त्यांनी आम्हाला गडाचा नकाशा दाखवला आणि गडावर जाण्याची वाट दाखवली. (अगदी मेगा हायवे आहे.). येथे शाळेत आम्ही आमचे सामान ठेवले आणि आवरलं.



वाडी चौल्हेर हे जरी गडाच्या पायथ्याचे गाव असले तरी हा किल्ला तिळवणचा किल्ला म्हणुन प्रसिद्ध आहे. या किल्ल्याला शिवरायांच्या काळात फार महत्व होते. वाडी चौल्हेर गावातुन या किल्ल्यास पोहोचायला दोन टेकड्या पार करून जावे लागते. पहिली टेकडी पार केल्यावर खडी चढण (छातीवर) सुरु होते. हा किल्ला गिरणा आणि आरम नद्यांना विभागुन त्यांच्या मध्यस्थी उभा आहे. किल्ल्यावर पोहोचायला जरी वेळ लागत असला तरी किल्ल्याचा माथा फार मोठा नाही. वाडी चौल्हेर गावातून या किल्ल्यावर पोहोचायला साधारण १.३० तास लागतो. आम्ही पटापट आवरून १.३० वाजता गड चढायला सुरुवात केली. उन्हाची तिरीप लागत होती, जेवायचे भान नव्हते. भूक तर लागलेली पण किल्ल्याच्या माथ्यावर लवकरात लवकर पोहोचायचे होते. आमच्याजवळ असलेले खजूर खाऊन आम्ही गड चढत होतो. पहिली टेकडी पार केली - दुसरी टेकडी पार केली नंतर समोर एक विश्रांतीसाठी एक झाड नजरेस आले. झाप झाप पाऊले पडू लागली. त्या झाडाच्या सावलीत बसून मागे वळून पाहिलं. रम्य ते गाव दूरवर कुठेतरी टेकडीच्या  पल्याड दिसत होत. निव्वळ ५० मिनिटात आम्ही येथवर येऊन पोहोचलो होतो. वर बघितले आता सगळी खडी चढण होती. पार तुमची छाती फुललीच पाहिजे. ५ मिनिटे येथे विश्रांती घेऊन आम्ही गडाचा राहिलेला शेवटचा टप्पा चढायला लागलो. आमच्या उजव्या बाजुसच दीर-भाऊजय डोंगर दिसत होता. सुर्य डोक्यावर होता फार तापला होता. आम्ही चेहरा आणि मन रुमालाने झाकुन चढत होतो. साधारण २५ मिनिटात आम्ही गडाच्या पहिल्या दरवाज्यापाशी येऊन पोहोचलो.







चौल्हेर किल्ल्यावरून साल्हेर सालोट्यासकट सर्व डोलबारीचे दर्शन होत होते. खूप ऊन असल्या कारणाने  स्पष्ट असे काही दिसत नव्हते. मागील बाजूस अगदी फुसट असा मांगी तुंगीचे दर्शन झाले. तर खूप धुक असल्या कारणाने सातमाळ पर्वत रांगेचे दर्शन आम्हास झाले नाही. पोटात काही नसताना आम्ही तब्बल १.१५ तासात गडाच्या पहिल्या दरवाज्यापाशी येऊन पोहोचलो. या दरवाज्याला जोडून उत्तम अश्या पायऱ्या आहेत. गडाच्या या टप्प्या पासुन ते माथ्य पर्येंत पोहोचेसतोर एकूण सात दरवाजे आहेत. अतिशय सुस्थितीत हे दरवाजे आहेत. या दरवाज्यांची रचना बघुन तुम्हाला आलेला थकवा आणि शीण कुठच्या कुठे पळून जाते. या दरवाज्यांची रचना, यावरील नक्षीकाम, कोरीवकाम अतिशय सुंदर असे आहे. बारकाईने पहिले असता प्रत्येक दरवाज्यात काही न काही वेगळे असे नक्षीकाम दिसते. हे सर्व बघत असता भूक पार पळून गेली होती. हे दरवाजे पार करत आम्ही गडाच्या माथ्यावर दाखल झालो. यथील शेवटच्या दरवाज्याच्या माथ्यावर एक बुरुज बांधला आहे. या बुरुजावरील सपाट जागेवर एक तंबू मावेल एवढी जागा आहे. या बुराजाच्या बाजूसच उघड्यावर शंकराची पिंड आहे. शेवटच्या दरवाज्यापासून दोन वाटा आहेत.  डावीकडील वाट गडाच्या एक माची वर तर उजवीकडील वाट गडाच्या बालेकिल्ल्यावर घेऊन जाते. म्ही प्रथम डावीकडील वाटेने गडाच्या माचीवर गेलो. येथे शवाल साठलेल्या पाण्याची दोन टाके आहेत तसेच एक कोरडा पडलेला छोटा तलाव आहे. माचीच्या शेवटी दुरावस्थेत एक बुरुज आपणास दिसतो. येथून समोरच एक अनोळखी डोंगररांग दिसते. यातील समोरच असलेल्या डोंगराचा लांबलचक कडा आपणास हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याची आठवण करून देतो. 


हे बहुन आम्ही माघारी फिरलो. आता मात्र खूप भूक लागली होती. आम्ही माघारी फिरून दरवाज्यापाशी पोहोचलो. येथून समोर नजर टाकली असता चौरंगनाथाची, गणेशाची मुर्ती असलेले पत्र्याने झाकलेले छोटे मंदिर दिसते. बालेकिल्ल्याचे कातळाच्या डाव्या बाजूस असलेल्या पायवाटेने आम्ही पुढे गेलो. येथे एक छोटास सुंदर अस मंदिर आहे, ते बघून आम्ही माघारी फिरलो आणि दरवाज्यापाशी आलो. येथुन उजव्या बाजूस असलेली पायऱ्यांची वाट आपणास बालेकिल्ल्यावर घेऊन जाते. या वाटेवरून थोडस वरच्या बाजुस आल्यावर क्रमशः ४-५ पाण्याचे टाके आहेत. यातील पहिल्या (मोती) टाक्याचे पाणी पिण्याजोगे आहे. आम्ही येथे थोडा वेळ विश्रांती घेतली, आमच्या जवळ असलेल्या खाद्य पदार्थावर ताव मारला आणि पायऱ्यांच्या मार्गे बालेकिल्ल्याच्या दिशेने कुच केली. येथे आपणास बालेकिल्ल्याचा पडका दरवाजा लागतो. या दरवाज्यातुन आतमध्ये प्रवेश केल्यावर समोरच राजवाड्याचे अवशेष आढळून येतात. यापुढे येथे पाण्याची तीन टाके आहेत. यातील पाणी पिण्याजोगे नाही. येथुन पुढे समोरच ध्वजस्तंभ आपल्या दृष्टीक्षेपास येतो. एवढे सगळे बघून आम्ही माघारी फिरलो.





आता पर्येंत दुपारचे ३.४५ वाजले होते. आम्ही पटापट खाली उतरायला लागलो. दुपारचे जेवण नीटसे झाले नव्हते त्यामुळे भूक लागली होती. डोळ्यासमोर दिसत होता स्टोव्ह आणि त्यावर शिजणारी maggie. maggie च्या वासाने पाऊले झप झप पडत होती. तोंडाला साधारण तासाभरात म्हणजेच ४.४५ ला आम्ही वाडी चौल्हेर गावात परतलो. येथे आम्हाला एवढ्या लवकर आलेले बघून सोनावणे आणि गुंजाळ सर आश्चर्यचकित झाले. त्यांच्याशी आता आम्ही निवांत गप्पा मारत बसलो. आता भरपूर वेळ हातात होता त्यामुळे पडी मारायची गरज होती. आम्ही आमच्याजवळ असलेला तंबू बाहेर घेऊन आलो. सगळी चिमुरडी परत येउन आमच्या सभोवती गोळा झाली. बारकाईने निरीक्षण करत होती आता आम्ही नक्की काय करतोय. आम्ही त्यांना तंबू कसा लावायचा, त्याचा उपयोग काय याची सर्व माहिती दिली. चल आता भूक तर होतीच, झोपायची तयारी सुद्धा झाली होती. आता पर्येंत ५.१५ वाजलेले. शाळा सुटली आणि गुंजाळ सरांनी शाळेच्या चाव्या आमच्या हातात दिल्या आणि आमचा निरोप घेऊन ते निघुन गेले. आम्ही आता मस्तपैकी स्टोव्ह काढुन maggie बनवले आणि २ मिनिटात सगळे maggie फस्त. मग मस्तपैकी बाहेर तंबुत २ तास झोप काढली. ८.३० वाजता उठून परत जेवणाची तयारी सुरु केली. ९.३० वाजता जेवण आटपून परत झोपी गेलो.
 
 

दिवस दुसरा)


दिवस दुसरा (२८ नोव्हेंबर २०१५) : पिंपळा आणि प्रेमगिरी









३ दिवसांचा ट्रेक म्हटलं की पुरेशी झोप आणि खाणे आलंच. काल बराच वेळ हाताशी असल्याने खूप वेळ आराम करता आला. पहाट झाली, ५.३० वाजले. बाहेर अजुनही अंधार होता, आम्ही तंबुत थंडीने गेलेलो. पण आम्हाला १ तासाचा प्रवास करून सावरपाडा (पिंपळा किल्ल्याच्या पायथ्याचे गावं) ला पोहोचायचे होते. आम्ही तसेच थंडीत कुडकुडत उठलो आणि आवरायला लागलो. मी सर्व तंबु आवरेपर्येंत या पट्ठ्याने मस्त गरमागरम चहा बनवला वाह!! चहा पिऊन आम्ही बाकीचे समान पटापट आवरले आणि शाळेला कुलूप लावून, सर्वांचा निरोप घेऊन ७.१५ वाजता सावरपाडाच्या दिशेने रवाना झालो. वाटेत जाताना आम्हाला डोलबारी रांगेचे उत्तम दर्शन झाले. साल्हेर-सालोट्या पासून ते मुल्हेर-मोरा पर्येंतची डोंगररांग उत्तम दिसत होती. आज आकाश साफ होते. दूरदूर वरचे सर्व किल्ले आज दिसणार याची खात्री हर्शल आणि मला आता पटली होती. आम्ही पटापट गाडी चालवत पुढे निघालो. पुढे गेल्यावर एक छोटाश्या घाटात डाव्या बाजूस सातमाळ रांगेचे दर्शन झाले. समोरच रौद्र रुपात उभा होता धोडप. आमचा अंदाज बरोबर ठरला. दुरदूरवरचे किल्ले स्पष्ट दिसत होते.


साधारण ८.१५ वाजता आम्ही सावरपाडामध्ये पोहोचलो. ह्या गावात आदिवासी लोकांची वस्ती आहे पण तरीही गाव बरेच मोठे आहे. आम्ही येथे पोहोचताच ४-५ चिमुरडी आमच्या गाडीच्या मागे धावत आली. आम्ही कोण आहोत कुठून आलो आहोत हे सर्व ते कुतूहलाने पाहत होते. आमची रमेशचे घर शोधत होतो. पिंपळयाची वाट थोडी फसवी असल्याने तुम्ही रमेशला सोबत घेऊन जा असे ओंकारने आम्हाला सांगितले होते. शोधत शोधत आम्ही रमेशच्या किराणाच्या दुकानात येऊन पोहोचलो. आम्ही येताच हा गडी बाहेर धावत आला आमच्याकडचे सर्व सामान त्याने त्याच्या दुकानात ठेऊन घेतलं. हा सर्व प्रकार घडत असताना आजूबाजूच्या घरातील ३० - ४० लोक आमच्या भोवती जमा झाली होती. सर्व सामान पटापट आवरून आम्ही गडाच्या दिशेने निघण्यास तयार झालो.







आता ९.१५ वाजले होते. रमेशच्या दुकानाच्या मागील बाजूसच एक वाट किल्ल्याकडे जाते. आम्ही निघालो. एक वळण घेऊन एक छोट्याश्या पठारावर आम्ही आलो. येथून समोरच अडवा पसरलेला पिंपळा आणि त्यावरील नेढे समोरच दिसत होते. हे नेढे साधारण ५५ फुट असुन सह्याद्रीतील सर्वात मोठे नेढे आहे. येथून मागे वळून बघताच अहिवंत गडाचे दर्शन झाले. जाता जाता रमेशने आम्हाला सांगितले कालच येथे पाऊस होऊन गेला होता. अर्थात का नाही? एवढ्या डोंगराच्या कुशीत वसलेले हे गाव आणि आजूबाजूला घनदाट जंगल.  वरती बघितले तर काळे ढग आमच्या डोक्यावर भिरभिरत होते. ढग डोक्यावर असुनसुद्धा समोर उभा असलेला पिंपळा स्पष्ट दिसत होता. त्याकडे बघून आज पाऊस येईल असे काही वाटत नव्हते. आम्ही पुढे चालू लागलो, थोडस पुढे गेल्यावर समोरच एक मोठे तळे होते. त्यात बसलेले बगळे, वर उडणारे निरनिराळे पक्षी, आजूबाजूचे जंगल आणि समोर उभा पिंपळा. वाह!! सगळ दृश्य बघून तिथेच बसून रहावस वाटत होत. मजल दरमजल करत आम्ही पहिली टेकडी पार केली. पोटात अन्नाचा कण नव्हता. आमच्याजवळ असलेली बिस्किटे आणि ओमानचे खजूर बाहेर काढले. थोडीशी पेट- पुजा केली आणि पुढे चालू लागलो. खाल्ल्यावर अंगावर तरतरी आली. समोर बघितले तर अजून दोन टेकड्या पार करून शेवटच्या टप्प्यात असलेली खडी चढण पार करायची होती.


आम्ही पुढे चालू लागलो. संपूर्ण जंगल असून सुद्धा एकही जंगली शाश्वत दिसत नव्हत. रात्रीच्या वेळी कदाचित दिसत असाव. बिबट्या वगैरे तर अगदी सहजच असतील. वाटेत असलेले काटे pant आणि बुटांमध्ये घुसत होते. आता ते आरपार घुसून टोचत होते. dry fit pant वापरली पाहिजे हे मला कळुन चुकले होते. अखंड वळसा घालून आम्ही दुसऱ्या टेकडीवर पोहोचलो. येथे पोहोचताच आम्ही दोघे थक्क झालो. पटापट bag मधून कॅमेरा बाहेर काढला. कारण येथुन समोरच सातमाळ रांगेचे उत्तम दर्शन होत होते. हर्शलने मला एक - एक किल्ला दाखवायला सुरुवात केली. अहिवंत पासून ते धोडप तसेच चौल्हेर किल्ले अगदी स्पष्ट दिसत होते. आम्ही खूपच नशीबवान होतो, आम्हाला एवढे स्वच्छ वातावरण मिळाले होते. आम्ही जसजसे वरती जाऊ लागलो तसतसे रवळ्या अन जावळ्या किल्ले आपली मन उंचावत होते. आता आमची पाऊले पटापट पडू लागली कारण नेढ्याच्या पलीकडे असाच डोलबारी रांगेचे दर्शन होणार होते. आम्ही तिसऱ्या टेकडीवर येऊन पोहोचलो. येथुन रवळ्या आणि जावळ्या स्पष्ट दिसत होते.आम्ही माना उंचावुन वर बघितले तर आता शेवटच्या टप्प्यातील खडे चढण बाकी होते. हे चढण चढायला वाट संपूर्ण घसाऱ्याची होती. येताना आम्ही दुसऱ्या वाटेने येणार होतो.


साधारण शेवटच्या १५ मिनिटात आम्ही खाडी चढण पार करून नेढ्यापाशी पोहोचलो. येथे पोहोचताच थंड वारा आमच्या दिशेने धावून आला आणि ठंडक देत होता. नेढ्यातून समोर डोकावून पाहताच समोरच दर्शन झाले ते साल्हेर आणि सालोट्याचे. मग न राहवून आम्ही कॅमेरा बाहेर काढला आणि मस्त क्लिक मारला. साल्हेर वरील परशुरामाचे मंदिर कॅमेरामधुन अगदी स्पष्ट दिसत होते. भल्यामोठ्या नेढ्यातून मागील बाजुस डोलबारी तसेच पुढील बाजूस सातमाळ रांगेचे उत्तम दर्शन होत होते. आत्ता पर्येंत ११ वाजले. होते. आम्हाला अजून किल्ल्याच्या वरच्या बाजूस जायचे होते. या नेढ्यातच एक गुहा आहे, येथे साधू तपस्चर्येला बसत असे रमेशने आम्हाला सांगितले. आम्ही डावीकडच्या बाजुस असलेल्या टाक्यांच्या दिशेने निघालो. येथे असलेली ३-४ टाके बघून आम्ही परत माघारी फिरलो (पाणी पिण्याजोगे नाही.) आता गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जायचे होते. आम्ही फिरून परत नेढ्यापाशी आलो. pant आणि पायात असलेले काटे अजूनही तसेच टोचत होते. पण सर्व गड फिरताना त्याचे भान नव्हते. गडाच्या वरील बाजुस जायला एक सोप्प्या श्रेणीतील कातळारोहण करावे लागते. 






हे कातळारोहण पार करून आम्ही वरच्या बाजूस आलो. येथुन डाव्या बाजुस पाण्याची ३ टाके आहेत तर उजव्या बाजूस गडाची माची आहे. आम्ही प्रथम टाक्यांपाशी गेलो पण याही टाक्यातील पाणी पिण्याजोगे नाही. आम्ही येथे बसून आमच्या जवळ असलेले खाद्यपदार्थ बाहेर काढले आणि ताव मारला. येथे थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही माचीच्या दिशेने निघालो. येथे कुठलेही अवशेष नसले तरी येथून दिसणारे दृश्य रम्य आहे. आता पर्येंत १२. ३० वाजले होते. आता आम्हाला उतरायला लागणे भाग होते. अजून प्रेमगिरी किल्ला पहायचा होता. आम्ही झप झप खाली उतरू लागलो. पहिला टप्पा पार करून एध्यच्य मागील बाजूस असलेल्या वाटेने उतरू लागलो. साधारण .३० वाजता आम्ही सावरपाडा मध्ये परतलो. 



सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण नीटसे झाले नसल्याने आम्हाला खूप भुक लागल्या होत्या. सावरपाडा ते हिंगुळ वाडी साधारण एक तासाचा रस्ता. आम्ही वाटेत होटल बघत बघत चाललो होतो. दोन ठिकाणी जेवण तयार नव्हते आणि किंमत तर विचारूच नका जणू काही ५ स्टार हॉटेल. आम्ही ठरवले आता मध्ये न थांबता सरळ कळवणला जाणे. २. वाजता आम्ही कळवणला पोहोचलो. समोरच एक मस्त हॉटेल दिसले. दोघांनी जोरदार तंगडी तोडली आणि पटापट आवरून हिंगुळवाडीच्या दिशेने निघालो. येथे एका गृहस्थांकडे आम्ही आमचे समान ठेवले आणि गडाच्या खिंडीच्या दिशेने निघालो. प्रेमगिरीवर जायला हिंगुळवाडी आणि पाठविहार या दोन गावातून जाता येते. आम्ही हिंगुळवाडी मध्ये असलेल्या खिंडीजवळ पोहोचलो (येथपर्येंत गाडी येते). येथून गडावर पोहोचायला ४५ मिनिटे लागतात. पण सुरुवातीची वाट जंगलातील आहे. आतापर्येंत ३.३० वाजले होते. अंधारून आले होते, जंगलात वाट सापडणे अवघड होते. आम्ही उलटे फिरलो आणि सरळ सोंडेवरून चढाई सुरु केली. येथे पाऊण किल्ला पार केल्यावर आपण एका ध्वजापाशी पोहोचतो. आम्ही येथे पोहोचल्यावर येथे थांबलो कारण इथपर्येंत पोचायला आम्हाला ४ वाजले होते आणि पुढे थोड्या अवघड श्रेणीतील कातळारोहण करून गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहचायचे होते. उशीर झाल्याने आमचा हा किल्ला अर्धवट राहिला. असो हा आपण सातमाळ सोबत करू असे ठरवले आणि थोडा वेळ येथेच आराम केला. येथुन सुद्धा सातमाळचे उत्तम दर्शन होत होते. धोडप सतत आमच्या पाठीशी होता.







आता सूर्यास्त व्हायची वेळ आलेली. आम्ही खाली उतरू लागलो आणि साधारण ६ वाजता मुख्य रस्त्याला लागलो. आता आम्हाला पोचायचे होते मोहनदरी गावात. आता आम्ही निवांत होतो. जाता जाता वाटेतच आम्ही सुर्यास्त पाहत होतो. मधेच थांबून आम्ही फोटोस घेतले. आम्ही मोहनदरच्या जवळ पोचलो. रस्त्यावरून मोहनदरचे नेढे साफ दिसत होते. संधी प्रकाशात ते नेढे सुदर केसरी रंगात न्हायले होते. सुंदर ते रूप. ७ वाजता आम्ही मोहनदरी गावात पोहोचलो. आता सूर्यास्त व्हायची वेळ आलेली. आम्ही खाली उतरू लागलो आणि साधारण ६ वाजता मुख्य रस्त्याला लागलो. आता आम्हाला पोचायचे होते मोहनदरी गावात. आता आम्ही निवांत होतो. जाता जाता वाटेतच आम्ही सुर्यास्त पाहत होतो. मधेच थांबून आम्ही फोटोस घेतले. आम्ही मोहनदरच्या जवळ पोचलो. रस्त्यावरून मोहनदरचे नेढे साफ दिसत होते. संधी प्रकाशात ते नेढे सुदर केसरी रंगात न्हायले होते. सुंदर ते रूप. ७ वाजता आम्ही मोहनदरी गावात पोहोचलो. या गावात एक मोठी शाळा आहे. येथे आम्ही मुक्काम करणार होतो. या शाळेत आम्ही पोचलो. येथे आम्ही वाघमारे सारान्नाशोधात होतो तेवढ्यात वाघमारे सर समोरून आले. त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी नेऊन चहा पाजला आणि शाळेची माहिती दिली. वातावरण मस्त थंड होते. आम्ही शाळेत समान ठेऊन बाहेर आलो आणि वाघमारे सरांशी गप्पा मारू लागलो. आम्हाला ओंकारने सांगितले होते की मुंबईचा प्रसिद्ध समुह trekshitiz अचला आणि अहिवंतगड करून दरेगाव मध्ये थांबले आहेत आणि तेही उद्या मोहनदरी किल्ल्यावर येणार आहेत. आमची अजून जेवण व्हायची होती. दरेगाव हे मोहनदरी पासून फक्त ४-५ किमी च्या अंतरावर आहे. रात्री ९ वाजता आम्ही गाडीला किक मारली आणि नांदुरी-वणी रस्त्याने दरेगाव मध्ये हजार झालो.


दरेगाव मध्ये ओंकार ने सांगितल्याप्रमाणे हनुमान मंदिरात trekshitiz हजर होते. येथे आम्ही अमित सामंत, निमिष जोशी आणि प्रसिद्ध पुस्तक नकाशातून दुर्गभ्रमंतीचे लेखक महेंद्र गोवेकर यांच्याशी संवाद साधला. तेवढ्यात त्यांनी गरमागरम manchow  सुप आणले आणि आमचा आत्मा शांत झाला. त्यांचा निरोप घेऊन वणी-नांदुरी रस्त्यावर असलेल्या सौरभ हॉटेल मध्ये आम्ही जेवण केले आणि मोहनदरी मध्ये परतलो. येथे मोठी रूम असतानाही आम्ही शाळेच्या आवारात तंबु मांडला आणि ऐट बघा म्हणजे तंबू असा मांडला की सकाळी जाग  येताच समोर नेढे दिसले पाहिजे. पण रात्री १२ वाजता पाऊसाने दगा दिला. रात्री बारा वाजता आमची झोपमोड करून आम्हाला आतमध्ये (शाळेत) पळवून लावले. मग निमुटपणे आम्ही शाळेतच आमची गाडी पसरली आणि झोपी गेलो.

दिवस तिसरा)


दिवस तिसरा (२९ नोव्हेंबर २०१५) : मोहनदरी









आज आमच्या प्रवासाचा शेवटचा दिवस, दिवस तिसरा. पाहते ६. ला आरामात उठुयात असे ठरवले पण छे ५.३० लाच जाग आली. आता जाग आलीच आहे तर उशीर कशाला असे म्हणून आम्ही उठलो आणि सर्व समान आवरायला लागलो. हर्शल चहा बनवत होता तो पर्येंत मी समान आवरत होतो. आम्ही मस्त पैकी साजूक तुपातल्या शिऱ्याचा आणि सोसायटी चहाचा आस्वाद घेतला. मी पटेल आणि भांडे धुवायला लागलो तोपर्येंत हर्शल बाहेर जाऊन बाकीचे लोक आले का ते बघत होता. तो त्याची bag आवरून पटपट पुढे निघून गेला. मी माझी bag आवरून मागुन आलो आणि तेवढ्यात हर्शल म्हणाला साकेत बघ कोण आलाय. मी बघितलं तर काय खुद्द नाना (संजय अमृतकर) आमच्या समोर होते आणि सोबतीला मयुरेश जोशी सुद्धा होता. आज आमचे भाग्य उजळले होते. नानांसोबत ट्रेक करण भाग्यात/नशि
बात असाव लागत. सर्व मोठी मंडळी आज आमच्या सोबत होती.



सगळ्यांशी गाठ-भेट झाली, गप्पा झाल्या आता आम्ही सर्वांसोबत चढायला सुरुवात केली. आता ८ वाजले होते. आम्हाला किल्ला पूर्ण बघून पुण्याला परत जायचे होते. साधारण ८. वाजता आम्ही वरच्या बाजूस असलेल्या नेढ्यापर्येंत पोहोचलो. येथे नेढे चढायला १६ फुटांचा कातळ टप्पा पार करावा लागतो. तसेच वरती आग्या मधमाश्यांचे साधारण २-३ फुटांचे पोळे होते. जास्त आवाज करून चालणार नव्हते. नशिबाने आमच्या जवळ रोप होते. आम्ही त्या रोपला गाठी मारून ते वरती लावले. साधारण ४५ लोक त्या कातळ टप्प्यावरून येणार होते. त्यांना साधारण १ तास लागेल म्हणून आम्ही नेढ्याला डाव्या बाजूस वळसा घालून पुढे गेलो. डाव्या बाजूस दरी तर उजव्या बाजूस मोहनदरीचा कातळ टप्पा. साधारण २० मिनिटे चालत गेल्यावर आम्ही खिंडीपाशी येऊन पोहोचलो. ही वाट जर बरी असून डाव्या बाजूस खूप exposure आहे. या खिंडीतून वळसा घालून नेढ्याच्या दुसऱ्या बाजूस जायचे होते. हि वाट अजिबात चांगली नाही. नशिबाने काल पाऊस पडल्याने सगळी माती बसली होती. या वाटेने नेढ्यापर्येंत पोहोचायला ४० मिनिटे लागली. या वाटेने नेढ्यापर्येंत पोहोचेपार्येंत सर्व लोक नेढे चढुन आले होते. आम्ही नवीन वाट explore केली होती.








मोहनदरीचे नेढे म्हणजे पिंपळा किल्ल्या नंतरचे सह्याद्रीमधील दुसरे मोठे नेढे आहे. नेढयामध्ये पोहोचून आम्ही बराच वेळ विश्रांती घेतली. आता किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर जाण्यास हालचाल केली. नाना आणि मंडळी आधीच वरती गेलेले. आम्ही trekshitiz सोबत वरती जाऊ लागलो. सर्वोच्च माथ्यावर पोहोचल्यावर डाव्या बाजुस आणि उजव्या बाजुस माची लांबवर पसरलेली आहे. समोरच सप्तशृंगी तसेच धोडपचे उत्तम दर्शन होते. आम्ही आधी उजव्या बाजूस असलेल्या माचीवर गेलो. येथे एक पाण्याचे टाके आहे आणि ध्वजस्तंभ आहे. या टाक्यातील पाणी पिण्याजोगे नाही. येथून मोहनदरीच्या दुसऱ्या बाजूचे उत्तम दर्शन होते. हे बघून आम्ही दुसऱ्या माचीच्या दिशेने निघालो येथे मध्ये पाण्याचे ३ टाके आहेत. यातील एका टाक्याचे पाणी पिण्याजोगे आहे. येथून सरळ आम्ही दुसऱ्या माचीवर गेलो. येथून सातमाळ रांगेचे उत्तम दर्शन होते. हे बघून आम्ही टाक्यांपाशी परतलो आणि नानांसोबत जेवण करायला बसलो. आता पर्येंत १ वाजला होता. आमचे जेवण उरकले आणि आम्ही परतीच्या वाटेवर लागलो.


परत जाताना मोहनदर आणि त्याच्या बाजुस असलेल्या डोंगराच्या मध्ये असलेल्या नाळेतून आम्ही उतरू लागलो. वाट फारसी वापरात नाही पण तरीही पायवाट आहे. या वाटेने आम्ही पहिली टेकडी पार करून आम्ही वळसे घालत पुढच्या बाजुस आलो. येथील वाट थोडी घसाऱ्याची असल्याने जर जपूनच जावे लागते. साधारण १.५० ला आम्ही पायथ्याशी पोहोचलो. आम्ही थेट शाळेत जाऊन पटापट समान आवरले आणि बाईक घेऊन सर्वांच्या गाडीपाशी आलो. येथे आम्ही सर्वांचा निरोप घेतला आणि परतीच्या वाटेला लागलो. आजपण जेवण नीटसे झाले नसल्याने खूप भूक लागली होती म्हणून वणी-नांदुरी रस्त्यावरील सौरभ हॉटेल मध्ये जेवण उरकले. आता आम्हाला २९० किमीचा प्रवास करायचा होता. आम्हाला हॉटेल मधून निघायला दुपारचे ३ वाजले. नाशिक सोडताच एका टपरीवर मस्तपैकी चहा मारला आणि बाईकला किक मारली. मी एकदाच मागे वळून बघितलं आणि मनात म्हटले सातमाळ करण्यासाठी परत येईन आणि पुण्याच्या दिशेने वाट धरली. मजल दरमजल करत आम्ही रात्री १० वाजता पुण्यात परतलो आणि आमच्या प्रवासाची सांगता केली.


आमचा हा plan पुर्ण व्हावा या साठी ओंकार आणि विकास ने मदत केली या बद्दल त्यांचे शतशः आभार अर्थात मला नाशिकचे वेड लावणाऱ्या हर्षलचे लाख आभार. आता आमचा किडा एवढा वाढला आहे की सातमाळ ५ दिवसात करायचे स्वप्न आहे. बस आता डोळ्यासमोर, स्वप्नामध्ये सतत दिसत आहे ती सातमाळ डोंगररांग.





- साकेत घाणेकर

संपर्क : (saketghanekar7191@gmail.com)
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...