Saturday, June 19, 2021

कुंजरगड आणि भैरवगड (कोथळे)

 



IT मध्ये काम करत असलो तरी नजर सतत सह्याद्रीवर भिरभिरत असते. सतत आस लागलेली असते वीकएंडची. फिरतीचे चक्र सोमवार पासुनच डोक्यात सुरु होते. या वेळेस अशीच नजर भिरभिरत पडली ती अकोले तालुक्यातील कुंजरगड आणि कोथळ्याच्या भैरवगडावर (जिल्हा अहमदनगर). तयारीला सुरुवात झाली सगळ्यांना मेसेज पोहोचते झाले. टाळकी (yms, निखिल, विवेक आणि मी) या ट्रेक साठी तयार झाली. मंगळवार पासुनच माहिती काढणे, गरजेच्या वस्तु जमवणे, मुक्कामाची जागा, पायथ्याचे गाव अशी सगळी माहिती सर्व जण जमवु लागले. दिवस ठरला नोव्हेंबर, शनिवार या दिवशी ट्रेक करायचा आणि नोव्हेंबरला रात्री निघायचे. सगळे जण वाट बघतच होते कोण कधी प्लॅन टाकत आहे. मी माझी गाडी एकदम चकाचक करून घेतली. खुप दिवसांनी ट्रेकला जायचा प्लॅन ठरला होता.

२ नोव्हेंबर, शुक्रवार उजाडला. शुक्रवार संध्याकाळ म्हटलं की लोकांची तयारी होते इकडे जाऊ, त्या हॉटेल ला जाऊ, आज या movie ला जाऊ पण आम्हा ट्रेकर्स ची जमातच वेगळी आहे. आज संध्याकाळी ८ वाजता निघायचे असे ठरवले होते. पण येत्या आठवड्यात दिवाळी आहे हे कोणाच्याच लक्षात आलं नाही, सगळीकडे लोकांची नुसती धावपळ चालु होती. सगळ्या रस्त्यांना गर्दी होती. सर्वजण ठरलेल्या वेळेप्रमाणे ६ वाजता ऑफिस मधुन निघाले खरे पण सर्वजण जमुन निघायला १० वाजले आणि लक्षात आले जाता जाता हर्षलकडे असलेला आमचा टेन्ट घ्यायचा आहे. ट्राफिक असल्याने आम्हाला तोच रस्ता सोयीचा होता. हर्षल कडुन टेन्ट घेतला आणि आळंदी मार्गे आम्ही चाकणच्या दिशेने प्रवास चालु केला. मजल दरमजल करत आम्ही ११ वाजता चाकण मध्ये पोहोचलो. आता सर्वांना भुका लागल्या होत्या. चाकण सोडुन पुढे गेल्यावर मध्ये एका हॉटेलमध्ये सर्वांनी जेवण करून घेतले आणि पुढचा प्रवास सुरु केला. पुढे नारायणगाव, आळेफाटा, ओतुर, ब्राह्मणवाडा, कोतुळ पालथे घालत पहाटे ३ वाजता विहीर गावात पोहोचलो.

पहाटेचे ६ वाजले आणि गजर झाला, २-३ तासांची झोप घेतली आणि सर्वजण आवरा आवरी करायला लागले. कुंजरगडाच्या मागील बाजुने हळु हळु सुर्य उगवत होता. मी सोबत आणलेला गॅस बाहेर काढला आणि readymade उपमा बनवायला सुरुवात केली. पुढच्या ५ मिनिटांमध्ये उपमा तयार झाला सर्व जणांनी हात पाय धुवून नाश्ता करून घेतला. सर्वांचं यावरून होईपर्येंत ७.३० वाजले, गावात असलेल्या भांगरे काकांचा आम्ही निरोप घेतला आणि कुंजरगडाच्या दिशेने कुच केली. इतिहासात या किल्ल्याला एक विशेष महत्व आहे. कांचनबारीच्या लढाईनंतर शिवाजी राजे १६७० साली येथे काही दिवस विश्रांती साठी होते. अहमदनगरच्या राकट प्रदेशात असलेल्या बेलाग किल्ल्यांपैकी हा एक, जास्ती करून सर्व ट्रेकर्स अलंग-मदन-कुलंग, रतनगड हरिश्चंद्रगड यांना भेट देतात पण त्यात बाजुला राहिलेले किल्ले कलाडगड, कुंजरगड. विहीर गावांमधुन कुंजरगड आडवा पसरलेला दिसतो, या किल्ल्याची एक सोंड विहीर गावाच्या बाजुला उतरते. या किल्ल्याला लागुनच बाळाईचा डोंगर आहे. कुंजरगडाचे दुसरे नाव कोंबड किल्ला. या किल्ल्याची उंची साधारण समुद्रसपाटीपासून ४०००-४५०० फूट आहे. किल्ल्यावर जायला २ वाटा आहेत एक वाट विहीर गावातुन जाते तर दुसरी वाट फोफसंडी गावातुन जाते. विहीर गावातुन दोन वाटा गडावर जातात, एक वाट सरळ खिंडीतून वर चढते, याच मार्गे पलीकडे फोफसंडी गावात जात येते. विहीर गावातील मंडळी लग्नकार्यासाठी, अथवा इतर कार्यक्रमांसाठी फोफसंडी गावात जाण्यासाठी या खिंडीमार्गे जाणाऱ्या वाटेचा वापर करतात. दुसरी वाट गडाला वळसा मारून बाळाई आणि गडाच्या मध्ये असलेल्या खिंडीतून वर गडावर चढते.






विहीर गावात असलेल्या शाळेच्या बाजुने असलेल्या शेतवाडीच्या मार्गाने आम्ही सरळ निघालो. खिंडीला लागुन असलेल्या डोगराचे उद्दिष्ट समोर ठेऊन सरळ चालत जायचे. शेतांवरून चालत जाऊन गडाच्या पायथ्याशी पोहोचायला आपल्याला साधारण अर्धा तास लागतो. येथून पुढे शेवटपर्येंत खडा चढ सुरु होतो. एकूण ४ टप्प्यांमध्ये हा किल्ला आहे. आम्ही खड्या चढणीच्या मार्गे पहिल्या टप्प्यात येऊन पोहोचलो. खिंड आमच्या उजव्या बाजूला ठेवत आम्ही वर चढत होतो. गडाच्या प्रत्येक टप्प्यात आम्हाला विहीर गाव लांब लांब वाटत होते. मजल दरमजल करत आम्ही गडाच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचलो. येथे कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. या मार्गे आम्ही दुसरा टप्पा पार केला. हळु हळु आता खिंडीचा मार्ग दिसत होता. गडाचा तिसरा टप्पा चढुन आम्ही वरच्या बाजुस आलो, येथे थोडं आडवा चालत जायचं. एका झाडाखाली दगडी घुमटी, भैरोबाची आणि मारुतीची मुर्ती आहे तसेच भगवे झेंडे लावले आहेत. येथेच मागे असलेल्या उंच टेकाडावर गडाची तटबंदी दिसते. हे बघुन आपण पुढे जायचं. येथुन पुढे गडाचा कातळकडा उजव्या हाताला ठेऊन आणि दरी डाव्या हाताला ठेऊन आडव सरळ चालत जायचं. १५ मिनिटात आपण बाळाई डोंगर आणि कुंजरगड यामध्ये असलेल्या खिंडीत येऊन पोहोचतो. येथे पोहचल्यावर आम्ही लगेच बाळाई डोंगराच्या दिशेने निघालो. या डोंगरावर २ मोठी मानवनिर्मित भुयारे आहेत. आतमध्ये वटवाघुळे असल्याने काळजीपुर्वक आणि टॉर्च लावून आत जावे लागते. या भुयाराची उंची साधारण ३ फुट आहे, आपण आरामात बसुन भुयाराच्या शेवटपर्येंत जाऊ शकतो. येथे बसता येईल असा एक मोठा खड्डा आहे आणि "T" शेप मध्ये हे भुयार अजुन पसरलेले आहे. तसेच अजुन एक भुयार या डोंगरावर आहे, याच्या शेवटपर्येंत गेल्यावर एक गणपतीची मुर्ती आहे पण या भुयारात पाणी असल्याने शेवटपर्येंत जाता येत नाही.

ही दोन्ही भुयारे बघुन आम्ही परत खिंडीच्या दिशेने निघालो. उजवीकडे नजर टाकली असता, हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला आणि तारामती शिखर उंच उभे होते. तसेच अजून उजवीकडे कोथळ्याचा भैरवगड, शिरपुंज्याचा भैरवगड, गवळदेव, घनचक्कर-मुडा अशी डोंगररांग दिसत होती. १० मिनिटात आम्ही खिंडीमध्ये परतलो. समोर बघितले असता गडाची तटबंदी दिसते आणि पडका दरवाजा समोरच नजरेस येतो. हा गडाचा शेवटचा टप्पा, येथे थोडासा वळसा घालून आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर प्रवेश करतो. या वाटेवरच कुंजरगडाची प्रसिद्ध गुहा आहे, या गुहेतून आत मध्ये गेल्यावर ४ फुट रुंदीचे भुयार आहे. हे भुयार दुसऱ्या बाजुने उघडे असल्याने येथे वटवाघुळे टिकत नाहीत. या भुयारात कमरेतून अंग वळवत आणि झोपुन पलीकडे जावे लागते. हे भुयार आम्ही बघितले आणि गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे निघालो. शेवटच्या टप्प्यात पायऱ्यांमार्गे आपण गडावर येऊन पोहोचतो. पुढे जाताना वाटेत पाण्याची टाकी लागतात. हे सर्व बघुन आपण थोडं उंचवट्यावर आलो की येथे उघड्यावर शिवलिंग आणि नंदी आहे. थोडस पुढे गेल्यावर मोठ्या इमारतींचे चौथारे, हनुमानाचे शिल्प, राजवाड्यांचा पायऱ्या आणि गढुळ पाण्याचे तलाव बघायला मिळते. येथुन अहमदनगरच्या राकट, उंच कातळकडे असलेल्या डोंगर रांगांचे दर्शन होते. आपल्या नाकासमोर तारामती आणि हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला बघताना वेगळीच मजा येते. तसेच समोर घनचक्कर, गवळदेवची डोंगररांग दिसते. नोव्हेंबर महिना असुनही आज उकडत होते, वरती काळे ढग हळु हळु घिरक्या घालु लागले होते. सर्व दृश्य मनाला वेगळाच आनंद देत होत. निसर्गाची काय ती किमया, वेगळेच त्याचे सौंदर्य. आम्ही आमच्या आनंदाला/मोहाला आवर घातला आणि पुढे निघालो.





आल्यामार्गे परत मागे न जाता गडाची जी सोंड विहीर गावामध्ये उतरते त्या वाटेने आपण चालु लागायचे. या मार्गाने परत जाताना डाव्या हाताला असलेल्या कातळात नैसर्गिक रित्या बनलेल्या गुहा आहेत, ह्या गुहा बघितयल्या की मदन किल्ल्याच्या पोटात असलेल्या गुहांची आठवण येते. सपाटीवर असलेले चौथऱ्यांचे अवशेष बघुन आम्ही पुढे निघालो. आत्तापार्येंत १२ वाजले होते, आम्ही आमची चाल वाढवली कारण अजुन कोथळ्याचा भैरवगड बघायचा होता. गडावरुन उतरणाऱ्या सोंडेमार्गे कातळकडा डाव्या हाताला ठेऊन आपण सरळ चालत जायचे. येथे आधी म्हटल्याप्रमाणे नैसर्गिक गुहा आहेत. त्या बघुन आम्ही पुढे निघालो. येथपर्येंत आम्ही गडाचे २ टप्पे उतरलो होतो. पुढचे २ टप्पे अर्ध्या तासात उतरून दुपारी १ वाजता आम्ही विहीर गावात पोहोचलो. संपुर्ण गड बघुन विहीर गावात यायला आम्हाला ५ तास लागले. सगळ्यांना आता कडकडून भुका लागल्या होत्या. आम्ही गाडी काढुन कोथळे गावाकडे निघालो, कोथळे गाव विहीर पासुन ७ किमी अंतरावर आहे. साधारण १.३० वाजता आम्ही या गावात पोहोचलो. गावात पोहोचताच एक शाळा आहे, या शाळेतील विद्यार्थ्यांचा दिवाळी आधीचा शेवटचा दिवस होता. आम्ही येथे वरंड्यात जेवायला बसलो, आमच्या जवळ असलेले पराठे, ठेचा आणि चटणी. डोंगराच्या सानिध्यात बसुन जेवायची मजाच निराळी. आम्ही पटापट जेवण उरकले आणि भैरवगडाच्या दिशेने निघालो.

भैरवगडावर जाण्याचा मार्ग कोथळे गावाच्या अलीकडुन आहे. येथे वनक्षेत्र विभागाचा बोर्ड आहे. येथुन गडावर पोहोचण्यासाठी ४५ मिनिटे लागतात. गडावर जाताना छोटेशे जंगल लागते, मध्ये वाटेत २ शिड्या लागतात, गडावर पाण्याची टाकी आणि भैरोबाचे एक मंदिर आहे तसेच एक दीपस्तंभ आहे. हरिश्चंद्रगड-कळसुबाई वनक्षेत्रातील सर्वात मोठा बुंदा असलेले झाड येथे आहे. आत्तापार्येंत दुपारचे ३ वाजले होते, संपुर्ण किल्ला बघून आम्हाला ५ पर्येंत पायथ्याशी पोहोचायचे होते. थोडंस चालत गेल्यावर २-३ कुंटी लागतात आणि त्यापुढे जंगल सुरु होते. गर्द आणि शांत जंगलातून आपण चढायला सुरुवात करतो. खिंडीच्या मार्गे आपण वर वर चढत जातो. साधारण अर्धा तास पायपीट केल्यावर आम्ही शिडीपाशी येऊन पोहोचलो. येथुन मागे बघितले असता खिंडीचा आणि समोरील डोंगरांचा नजारा सुरेख दिसतो. शिडीमार्गे आपण १५ मिनिटात गडाच्या सर्वोच्च माथ्यावर पोहोचतो. येथुन उजव्या बाजुस चालत जायचे, येथे वनविभागाने रेलिंग लावलेले आहेत. थोडंस उजवीकडे गेलं की भैरोबाचे छोटसं मंदिर आहे, त्या समोरच एक दोन मुर्त्या आणि वीरगळ आहे. मंदिराच्या उजव्या बाजुस दीपस्तंभ आहे. थोडंसं पुढे गेल्यावर आपण गडाच्या उजव्या टोकास पोहोचतो. येथुन घनचक्कर, गवळदेव, शिरपुंजे भैरवगड डोंगररांग दिसते. हे बघुन आपण आपण गडाच्या दुसऱ्या टोकाकडे यायचे येथे ४-५ पाण्याचा टाक्यांचा समुह आहे, उजव्या बाजुस टोलार खिंड दिसते आणि पलीकडे बालेकिल्ला आणि तारामती शिखर दिसते. तर खालील बाजूस अकोले कडुन टोलार खिंडीकडे जाणारा मार्ग दिसतो. हा सर्व निसर्ग बघताना मन हरपून जात होते. असे वाटत होते आज येथेच थांबावे, आजुबाजूच्या दऱ्या डोंगर आणि येथील जीवन, हालचाली तासंतास बघत बसावं.... पण डोक्यावर काळ्या ढगांचा घेर वाढत होता आणि २ दिवसांवर दिवाळी होती. आम्ही आमचा मोह आवरला आणि परत निघालो, पटापट खाली उतरत ४.४५ वाजता गाडीपाशी परतलो.





भैरवगडाचा निरोप घेऊन कोतुळच्या घाटातून आम्ही परत पुण्याचा दिशेने निघालो. वाटेतच मातीचा सुगंध दरवळला आणि हलकासा पाऊस सुरु झाला. ऊन आणि पावसाचा खेळ सुरु झाला आणि समोरच निसर्गाने इंद्रधनुष्य उमटवले. आम्ही अर्धा तास गाडी बाजूला लावून त्याकडे बघत बसलो आणि पुढे निघालो. पुढे ब्राह्मणवाड्यामध्ये थांबुन हलके खाऊन घेतले आणि बोटामार्गे पुढे निघालो. चाकांचे घाणेरडे ट्राफिक मागे टाकत निखिलने सुचवलेल्या आळंदीमधील एका हॉटेलात रात्रीचे जेवण केले आणि रात्री १०.३० वाजता घरी पोहोचून आमच्या ट्रेकची सांगता केली.

लेखन सौजन्य - साकेत घाणेकर 

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...