Saturday, June 19, 2021

सातमाळ सफर आणि प्रेमगिरी

 

दिवस पहिला (२३ डिसेंबर २०१५)



सातमाळ!!! सुरगाणा तालुक्याच्या एका डोंगररांगेची सुरुवात जेथून होते ती म्हणजे सातमाळ रांग. ही डोगररांग गोदावरी  तापी नदिच्या खोऱ्यांना वेगळी करते. सह्याद्रीच्या पुर्व रांगेतील किल्ले आणि त्यात नाशिक म्हणजे "सोने पे सुहागा", महाराष्ट्राचे हिरेच आहेत जणु. सातमाळ रांगेचे नुसते नाव काढले तरी हुरूप येतो, डोळ्यांसमोर नाशिकचे किल्ले थैमान घालायला लागतात. नुकत्याच केलेल्या भिलाई, चौल्हेर, प्रेमगिरी, पिंपळा आणि मोहनदरी range-trek नंतर मनात पक्के बसलेले, मार्गशीर्ष महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत नाशिकच्या सातमाळ रांगेची वारी करायची. सातमाळ रांगेत एकूण १८ किल्ले आहेत पण चारच दिवस सुट्टी मिळाली असल्याने आम्ही यातील मोठे आणि प्रसिद्ध किल्ले करणार होतो. हातभर पसरलेला "हातगड", द्राक्ष्यांच्या बागांचा पायथा लाभलेला "अचला", भला मोठा विस्तार आणि पसारा असलेला "अहिवंतगड", वणीची देवी "सप्तशृंगी", मार्कंडेय ऋषीमुनींचा "मार्कंड्या", छोटेसे नेढं कुशीत घेऊन असलेला "कण्हेरा", जुळ्या भावांसारखे उभे "रवळ्या आणि जवळ्या" आणि सातमाळचा राजा, धोंडपाय नमः "धोडप".



नाताळच्या सुट्टीला जोडुन तीन दिवस ऑफिसला दांडी मारली आणि २२ डिसेंबर २०१५ च्या रात्री ट्रेकसफर सुरु करायचे ठरले. एवढा मोठा ट्रेक असल्याने व्यवस्थित planning करणे गरजेचे होते. ठिकठिकाणी पुस्तके वाचुन, ब्लॉग वाचुन माहिती गोळा करणे सुरु झाले कारण नाशिकचे किल्ले कितीही परिचित असले तरीही रस्ताभूल करतातच. गुगल बाबाच्या साहाय्याने रस्त्याची मांडणी केली, प्रत्येक गडाच्या पायथ्याचे गाव शोधले. सर्वात लांबचा किल्ला पहिले करायचा हा आमचा प्रत्येक ट्रेकचा नियम. बरोबर न्यावे लागणारे ४ दिवसांचे शिधा साहित्य, स्टोव्ह-रॉकेल, झोपायची सोय, टॉर्च वगैरे सर्व साहित्य गोळा केले अँड सर्व तयारी झाली. २२ डिसेंबरची संध्याकाळ उजाडली, बाईकवर एका बाजुला तंबू सुतळीने बांधला. दोघांच्या पाठीवर मोठी बॅग आणि छातीवर एक छोटी बॅग, डोक्यावर हेल्मेट अशी कसरत करत हर्षलच्या घरापासून बरोब्बर ६ वाजता आम्ही निघालो. एवढ्या मोठ्या बॅग कशासाठी? अहो ४ दिवसांचा संसार सोबत घेऊन चाललो होतो. शनिवारवाडा पार करून पुढे जाताच थंडी अंगात शिरली आणि आमच्या लक्षात आले इथेच हि परिस्थिती तर पुढे आपले काय होणार आहे. मोठे धाडस करून आम्ही निघालो होतो सातमाळ वारीवर तेही बाईकवर.


मजल-दरमजल करत आम्ही पुणे सोडले, नाशिक फाटा सोडला सगळं ट्रॅफिक पार करत पुढे जात होतो आणि बरोब्बर ८ वाजता मंचरला पोहोचलो. येव्हाना थंडी पार अंगात शिरलेली, थंडीने कडकडुन भुक लागलेली. मंचर मधेच आम्ही छोटाश्या हॉटेल मध्ये उच्च दर्जाचे chinese food खाल्ले आणि पुढच्या सफरला सुरुवात केली. नारायणगाव, आळेफाटा, बोटा, नगर बायपास पालथं घालत १०.३० वाजता संगमनेर बायपास फाट्याला पोहोचलो. येथे जरावेळ अराम करून आम्ही सिन्नरच्या दिशेने निघालो. सिन्नर मध्ये जेवण केले आणि १ वाजता नाशिक मध्ये पोहोचलो. कडाक्याच्या थंडीमुळे आमच्या वेळेपेक्षा १ तास उशीर झाला होता. पुढे आम्ही वाणी मार्गे निघालो. वणी, घागबारी, हिरडीपाडा पार करत आम्ही पहाटे २ वाजता बोरगाव मध्ये पोहोचलो. दळवट लिंक रोडमार्गे हातगडवाडी मध्ये पहाटे २.३० वाजता पोहोचते झालो. येथे गावालगत एक गणेशाचे सुंदर मंदिर आहे, या मंदिरात आम्ही आमचा तंबू ठोकला आणि झोपी गेलो.





हातगड



हातगडवाडी हे हातगडाच्या पायथ्याचे गाव आहे, हातगडावर जायला गाडीमार्ग आहे. घाट संपताच पुढे पायऱ्या चालु होतात. पहाटेच्या वेळी, ६ वाजता सुर्यकिरण तंबूच्या खिडकीतून आत शिरू लागले आणि आमची झोप उघडली. आम्ही पटापट सर्व सामान आवरून गावातील एका घरात सगळे सामान ठेवले. छोटीशी एक पिट्टु/बॅग सोबत घेतली आणि गाडीमार्गे पायऱ्यांपर्येंत पोहोचलो. येथे उजव्या हाताला कातळात कोरलेले एक टाके आहे. या गडाला एकात एक असे ४ दरवाजे आहेत. पन्नास एक पायऱ्या चढुन गेल्यावर आपण गडाच्या पहिल्या दरवाज्यातून आत शिरतो. येथे दरवाज्याच्या सुरुवातीलाच खांबावर सिंह कोरला आहे. या दरवाज्याचे फक्त खांब शिल्लक आहे. हे बघुन आम्ही पुढे निघालो आणि गडाच्या दुसऱ्या दरवाज्यात प्रवेश केला. हा दरवाजा पुर्णपणे कातळात कोरलेला आहे. आत प्रवेश केल्यावर उजव्या हाताला एक गुहा आहे, या गुहेत पाण्याची २-३ टाकी आहेत. थोडं पुढे गेल्यावर डाव्या हाताला हनुमानाची मुर्ती कोरली आहे. हे बघुन आम्ही पुढच्या दरवाज्यापाशी निघालो, या दरवाज्याला ग्रीलचे दार बसवले आहे. हा दरवाजा पार करून पुढे गेल्यावर आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो.





हा किल्ला व्यवस्थितरित्या जोपासला आहे. गडावरून सर्पगंगा नदीचे उत्तम दर्शन होत होते. गडावर भरपूर अवशेष आजही बघायला शिल्लक आहेत. गडाच्या शेवटच्या दरवाज्यातून प्रवेश केल्यावर आम्ही गडाच्या माथ्यावर पोहोचलो, सुर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरली होती. समोरच सापुतारा (गुजराथचे थंड हवेचे ठिकाण) धुक्यामध्ये दडून बसलेले होते. माथ्यावर प्रवेश करताच एक वाट डाव्या हाताला घेऊन जाते. येथे अप्रतिम तटबंदी आणि एक पीर आहे. हे बघुन आम्ही परत मागे फिरलो आणि उजव्या हाताच्या वाटेने सरळ निघालो. येथे बाजुलाच एक पाण्याचे टाके आहे आणि पडका बुरुज आहे. हा बुरुज पाहता रतनगडावरील बुरुजाची आठवण होते. थोडासा पुढे गेल्यावर एक मोठे पाण्याचे टाके आहे, यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या टाकायच्या थोडं पुढे गेल्यावर एक बुजलेला दरवाजा दिसतो., तटबंदी वरून वाकुन बघितले असता हा कदाचित चोर दरवाजा असावा असा अंदाज दर्शवता येतो. येथून वाट वरच्या बाजुस जाते, येथे एक इमारत आहे आणि बाजूलाच एक पाण्याचे तलाव आहे. इमारतीचे अवशेष अजूनही शाबुत आहेत, इमारत म्हणजे बहुधा गोडाऊनच असावं. या इमारतीपासुन थोडं वरच्या बाजुस गेल्यावर एक ध्वजस्तंभ आहे. येथून गडाचा पूर्ण पसारा दिसतो. पडक्या बुरुजाच्या बाजूस अजून एक इमारत आहे. हि मारत बघितली की आपली गडफेरी पूर्ण होते. आम्हाला गडफेरी पूर्ण करण्यास १.३० तास लागला. आत्तापार्येंत ८.३० वाजले होते. आम्ही पटापट गड उतरायला लागलो आणि गाडीवरून गावात पोहोचलो. श्रीपाद गवंडे काकांकडे आम्ही आमचा ठेवलेला संसार घेतला आणि पुढे निघालो.






अचला


आत्तापर्यंत ९.३० झाले होते. आमचे पुढचे लक्ष्य होते अचला किल्ला. दगड पिंपरी हे अचला किल्ल्याच्या पायथ्याचे गाव. आम्ही दळवट लिंक रोड मार्गे बोरगावला आलो, कडकडून भुक लागल्याने यथे वाटेतच एका हॉटेल मध्ये मिसळपावावरती ताव मारला, मस्त गरमागरम चहा प्यायलो आणि पुढे दगड पिंपरी गावाच्या दिशेने निघालो. हातगाडवाडी ते दगड पिंपरी हे अंतर साधारण २४ किमी आहे. साधारण १०.३० वाजता आम्ही दगड पिंपरी गावात पोहोचलो. येथे गावातच ५-६ वीरगळी आपल्या नजरेस पडतात. हे पाहून आम्ही पुढे निघालो, या गावाच्या थोडं पुढे शेतातून चालत गेल्यावर द्राक्षांच्या बाग लागतात. या बागांमधुनच वाट पुढे जाते. अचलाची एक सोंड थेट खालपर्येंत उतरलेली आहे, या सोंडेवरून सरळ चढाई चालु करायची. द्राक्षांच्या बागेतुन एक पत्र्याची शेड आपल्या नजरेस पडते, या शेड च्या दिशेने वाटचाल करायची. ही शेड म्हणजेच एक छोटेसे मंदिर आहे, गावातल्या लोकांना विचारता त्यांनी सांगितले त्याला सतीचे मंदिर म्हणतात. संपुर्ण वाटेत कुठेही सावली किंवा झाडही नाहीये. इथे पोहोचल्यावर आपण गडाचा पहिला टप्पा पार करतो. येथुन थोडंस पुढे गेल्यावर आपण गडाच्या दुसऱ्या टप्प्यात येतो. येथे एक हनुमंताचे सुंदर छोटंस मंदिर केले आहे. या मंदिराला शेड नाही. हनुमंताची मुर्ती शेंदुराने फासली आहे. या मंदिराच्या जवळ एक छोटे झाड होते, हा सावली असलेला शेवटचा टप्पा. आत्तापार्येंत १२ वाजले होते. अजुन बरेच जायचे होते, डोळ्यांना दिसणारी सरळ चढाई नकोशी वाटत होती. रविराज डोक्यावर थैमान घालायला लागले होते. सकाळी असणारी कडाक्याची थंडी आणि आता रणरणते ऊन पण तरीही उन्हाचा चटका लागत नव्ह्ता. जरावेळ विश्रांती घेतली, थोडे आणि प्यायलो आणि पुढे कूच केली.





गडाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्यावर आपण गडाच्या कातळाच्या खालील बाजूस पोहोचतो. येथे कातळात कोरलेल्या पायऱ्या चालु होतात. येथुन थोडं वरती पायऱ्या सोडून गेल्यावर एक मोठी गुहा आहे. हे पाहुन आम्ही खाली आलो आणि पायऱ्यांच्या मार्गे पुढे निघालो. डाव्या बाजूस बुजलेले एक पाण्याचे टाके आहे, ते बघुन आम्ही १० मिनिटात गड माथ्यावर प्रवेश केला. साधारण १२.३० वाजले होते. येथुन मागे नजर टाकल्यास अहिवंतगड, सप्तशृंगी, मार्कंड्या, रवळ्या-जवळ्या, धोडप ही डोंगररांग दिसते. थोडं पुढे गेल्यावर पाण्याची दोन वाळलेली टाके आहेत. या टाक्यांच्या बाजुलाच कपडे टाकलेले दिसतात. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की कुठल्याही मोठ्या आजारातून बरे झाल्यावर या ठिकाणी येऊन स्नान करतात. त्यावेळी ते गावातून घालून आलेले कपडे या ठिकाणी सोडून, नवीन कपडे घालुन जातात." आम्ही येथून थोडे पुढे गेलो, थोडासा खाली उतरून गेले की ५, २ आणि १ अशी पाण्याची टाकी आहेत. येथेही असेच कपडे फेकलेले आपल्याला दिसतात. या टाक्यात गावातील लोक स्नान करत असल्याने यातील पाणी पिण्यालायक नाही. थोडासा वळसा मारून पुढे आल्यावर इमारतींच्या ज्योती आपणास दिसतात. आता पर्येंत १ वाजला होता, एका झाडाखाली बसुन आम्ही सोबत आणलेले खजुर, पराठे वगैरे खाल्ले आणि परतीच्या वाटेल लागलो. परत येताना द्राक्षांच्या बागांमध्ये द्राक्षांचा आस्वाद घेतला. साधारण ३ वाजता आम्ही दगड पिंपरी गावात परतलो. हा संपुर्ण किल्लाभर रवी डांबळे आणि सुनील भुसार आमच्या सोबत होते. त्यांनी आम्हाला थंडगार लिंबुपाणी पाजले आणि आम्ही त्यांचा निरोप घेतला.





सप्तशृंगी

आता आजच्या दिवसातला आमचा तिसरा टप्पा बाकी होता. दुपारचे ३.३० झाले होते, वणीची देवी  "सप्तशृंगी" च्या दिशेने निघालो. कोल्हेर, अहिवंतवाडी, दरेगाव, नांदुरी पेठे घालत आम्ही वाणीच्या मार्गे लागलो. दगड पिंपरी ते वाणी हे साधारण २४ किमीचे अंतर आहे. ४.३० वाजता आम्ही वाणीच्या मंदिरापाशी पोहोचलो. येथे येताना एक सुंदर घाट लागतो, रास्ता एकदम हायवे सारखा चकाचक आणि मोठा. घाट चढुन वरती आल्यावर एक मोठे पठार लागते. येथून समोरच मार्कंड्या, रवळ्या आणि जवळ्याचे उत्तम दर्शन होते. आम्ही आलो तेंव्हा मंदिराचे काम चालू होते. भले मोठे रेलट्रॅक उभे करून सामानाची वाहतुक सुरु होती. आम्ही पायथ्यापासुनच देवीचे दर्शन घेतले आणि परत निघालो.






आत्तापार्येंत ६ वाजले होते, आम्ही दरेगावात पोहोचलो. इथे आम्हाला वेगळाच नजारा दिसला. आत्तापार्येंत ६ वाजले होते, आम्ही दरेगावात पोहोचलो. इथे आम्हाला वेगळाच नजारा दिसला. कुठलातरी सण सोहळा होता, उत्सुकता वाढलेली आणि गावातील लोकांना विचारलं तर त्यांनी सांगितलं ह्याला डोंगरीदेव किंवा डोंगरसण म्हणतात. मोठ्या जल्लोषात तयारी चालु होती. डोंगरीदेव सणाबद्दल खालील ब्लॉगवर सविस्तर माहिती उपलब्ध आहे.






बाहेर येव्हाना ३-४ अंश थंडी होती. आम्हाला थंडीचे कुडकुडत बघुन काशिनाथ गायकवाड यांनी आम्हाला त्यांच्या घरात रहायला जागा दिली. डोंगरीदेवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. आम्ही आनंदी होतो कारण या सणाचे आम्ही साक्षीदार होतो. काशिनाथ गायकवाडांनी आम्हाला ब्लॅंकेट आणून दिले, घरी पांघरुणात आम्ही अगदी मस्तपैकी झोपी गेलो…




- साकेत घाणेकर

संपर्क : (saketghanekar7191@gmail.com)
 
 
 

दिवस दुसरा (२४ डिसेंबर २०१५)



ट्रेकला आल्यावर घरात झोपायचं सुख तसं फारच कमी मिळते आणि वेळेअभावी आम्ही कुठल्याही किल्ल्यावर मुक्काम करू शकत नव्हतो. पहाटे बरोब्बर ५ वाजता कोंबडा आरवला, वेळ न दवडता आम्ही लवकर उठलो आणि आवरायला लागलो. सगळे सामान घरातच ठेवले आणि नेहमीप्रमाणे छोटीशी बॅग पाठीवर घेऊन बाहेर पडलो. गावातील सगळी मंडळी आवराआवर करत होती, आम्ही त्यांचा निरोप घेतला आणि अहिवंतगडाच्या दिशेने निघालो.





अहिवंतगड आणि बुध्या डोंगर


पहाटेचे ७ वाजले होते, नाश्ता म्हणजे आमच्या जवळ असलेले खजुर आणि बिस्किटं खाऊन आम्ही निघालो. काशिनाथ गायकवाडांच्या घरामागुनच अहिवंतगडाची वाट आहे. पहिले सपाट जमिनीवरून चालत जावे लागते. या वाटेवरून जाताना अहिवंतचा पसारा तिनही दिशांना पसरलेला दिसत होता तर डावीकडे बुध्या डोंगर डौलात उभा होता. थोड्याच वेळात आपण बुध्या डोंगराच्या पायथ्याला येतो, येथुन मळलेल्या वाटेने बुध्या आणि अहिवंतच्या मध्ये असलेल्या खिंडीचे ध्येय समोर ठेऊन आपण चढायला सुरुवात करायची. साधारण तासाभरात आम्ही खिंडीत येऊन पोचलो. अंगावर २ स्वेटर, तोंडाला रुमाल, डोक्यावर कानटोपी एवढं सगळं असताना देखील थंडी वाजत होती. खिंडीत पोहोचताच जोरदार गार वारे सुटलेले, अंगावर शहारे येत होते, परवा पासुन आम्ही बाईक वर फिरत होतो पण या सगळ्याचा शीण अंगावर अजिबातच नव्हता. नाळेच्या एका बाजुला अहिवंतचा भाला मोठा पसारा, बेलवाडी गावात उतरण्यासाठी असणारी खिंड आणि दरेगाव दिसत होते तर दुसऱ्या बाजुस अहिवंतवाडी कडुन येणारी एक वाट होती. या खिंडीतून  डावीकडील वाट आपल्याला बुध्या वर घेऊन जाते तर उजवीकडील वाट थोडं चालून गेल्यावर अहिवंतगडावर घेऊन जाते.




अहिवंतचा पसारा जेवढा मोठा आहे अर्थात तेवढाच मोठा इतिहास या किल्ल्याला लाभला आहे. इसवीसन १६३६ मधे अहिवंतगड निजामशाहीच्या ताब्यात होता. शाहिस्तखानाचा सरदार अलिवर्दीखानाने अहिवंतगड जिंकून घेतला.इसवीसन १६७० मधे शिवाजी महाराजांनी हा किल्ला मुघलांकडून जिंकून घेतला. सुरत, करंजा सारख्या शहरांची लुट, मुघलांचे किल्ले जिंकून घेणे या शिवाजी महारांजांच्या कारवायांमुळे औरंगजेब बादशहा संतापला होता.त्याने आपल्या दक्षिणेत असलेल्या सरदाराला महाबतखानास अहिवंतगड घेण्याची आज्ञा केली.महाबतखान नाशिकला असलेल्या दिलेरखानाला सोबत घेऊन त्याने अहिवंतगडाला वेढा घातला.महाबतखानाने महादरवाजावर तर दिलेरखानाने पिछाडीला मोर्चे लावले.एक महिना झाला तरी अहिवंतगड दाद देत नव्हता.किल्ल्यावरील दारूगोळा, धान्य संपत आले होते.त्यामुळे मराठ्यानी किल्ला सोडण्याचा निर्णय घेतला.महाबतखान निकराने किल्ला लढवत असल्यामुळे त्याच्याकडे जाण्यात अर्थ नव्हता म्हणुन मराठ्यानी आपला दुत दिलेरखानकडे पाठवला व किल्ला देण्याची इच्छा व्यक्त केली.दिलेरखानाने मराठ्यांना किल्ल्या बाहेर सुखरुप जाण्याचा मार्ग दिला आणि किल्ला ताब्यात घेतला.इसवीसन १८१८ मध्ये सर प्रॉथर याने किल्ला मराठ्यांकडून जिंकुन घेतला.


आम्ही प्रथम बुध्या डोंगरावर जाण्याचा निर्णय घेतला आणि खिंडीतून डावीकडील वाट पकडली. थोडासा वळसा मारला की समोरच आपणास कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. हो वाट थोडी बिकट आहे. एक पाऊल मावेल एवढ्या छोट्या पायऱ्या आणि खालच्या बाजुस दरी. इथे खरी शरीराची कस लागते. हातपाय वाकडे करून, जीव मुठीत घेऊन हळू हळू वर जावे लागते. खरंच आश्चर्याची गोष्ट आहे त्या काळात एवढ्याश्या जागेत एवढे बांधकाम करणे म्हणजे कमालच आहे. इथे जास्त लोकांचे येणे जाणे नसते त्यामुळे वाट घसाऱ्याची होती, पायऱ्यांवर माती पडलेली होती. या पायऱ्या चढुन वर आलो की आपण एका बुरुजपाशी पोहोचतो. इथे एक पाण्याचे सुकलेले टाके आहे. अजुन थोडं पुढे गेल्यावर अजून दोन पाण्याची खराब टाकी आहेत. यातील एका टाक्याला उतरून जायला पायऱ्या आहेत. थोडासा वळसा मारून आम्ही पुढे गेलो, डोंगराच्या दुसऱ्या बाजुला अजून एक बुरुज आहे आणि पलीकडील प्रदेश व्यवस्थित न्याहाळता येतो. डोंगराच्या माथ्यावर पाण्याची ४ टाकी आहेत. येथे उन्हात शेकत आम्ही थोडी विश्रांती घेत बसलो पण जास्त वेळ घालवून चालणार नव्हते कारण पुढे बराच प्रवास बाकी होता, अहिवंतगड आम्हाला खुणावत होता.





बुध्याच्या माथ्यावर आम्ही ५ मिनिटे विश्रांती घेतली आणि परत निघालो, सकाळचे ८.३० वाजले होते. अर्ध्या तासात बुध्या डोंगर बघुन, काळजीपूर्वक उतरत आम्ही खिंडीत परत आलो. आता आम्ही अहिवंतगडाची वाट पकडली. १० मिनिटाची चढाई करून अहिवंतच्या माथ्यावर पोहोचते झालो. आता बऱ्यापैकी ऊन होते पण बोचरा वारा सुटलेला, पहाटेच चढायला सुरुवात केल्याने अंगात थंडी भरलेली. ९ वाजताच ऊन सुद्धा कोवळं वाटत होत. माथ्यावर पोहोचताच लांबच्या लांब नुसतं पठार दिसत होत. लांबवर (बहुतेक गडाच्या मध्यावर) एक टेकडी दिसत होती, या टेकडीच्या जवळपास गडाचे बरेच अवशेष आहेत. आम्ही चालायला सुरुवात केली, मागच्या बाजुला वणीच्या देवीचे सुंदर दर्शन होत होते तसेच अचला, मोहनदरी, मार्कंड्या, रवळ्या-जवळ्या, धोडप दिसत होते. पहाटे लवकर निघालेल्या म्हशी इथे येऊन निवांत रवंथ करत होत्या. आमच्या सारख्या त्या सुद्धा ऊन अंगावर घेऊन शरिरात ऊब निर्माण करत होत्या.


१५-२० मिनिटे चालल्यावर आपण वाड्यांच्या/इमारतींच्या अवशेषांपर्येंत येतो. इथे बऱ्याच इमारतींचे अवशेष/ज्योती शिल्लक आहेत. राजमाचीगडावर जसे खांबांचे अवशेष आहेत अगदी तसेच अवशेष पण तुटक्या अवस्थेत येथे शिल्लक आहेत. तसेच जात्याचे आणि अनेक अवशेष बघायला मिळतात. आपण ज्या बाजुने गडावर प्रवेश केला तो गडाचा प्रमुख दरवाजा नसून तो दरवाजा बेलवाडीच्या बाजुस आहे, आपण पुढे बघुयातच. हे अवशेष बघुन अंदाज बांधता येतो की गडावर मोठ्या प्रमाणात वस्ती असणार आणि या किल्ल्याचे महत्व समजते. या अवशेषांच्या पलीकडे लागुनच एक तलाव आहे. या तलावात वाऱ्यामुळे तरंग तयार होत होते आणि त्यावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे ते आणखीनच चमकत होते. या तलावाच्या बाजूला लागुन टेकडी आहे. समोरच आपल्याला शेंदूर फसलेली हनुमंताची आणि सप्तशृंग देवीची मुर्ती दिसते. या मुर्त्या उघड्यावरच आहेत. टेकडीला वळसा घालुन आम्ही दरीच्या दिशेने निघालो. येथे पठाराच्या खालच्या बाजुस एक गुहा आहे. आमच्या सोबत गावातील एक मुलगा होता, त्याच्यामुळे आम्हाला ही गुहा सापडली अन्यथा ही गुहा सापडणे अवघड आहे. या गुहेत उतारण्यापुर्वी कातळ आहे. या कातळाला पुर्वीच्या काळी पायऱ्या असाव्यात ज्या आता नष्ट झाल्या आहेत. गुहेत एक पाण्याचे सुकलेल टाके आहे. या गुहेत मुक्काम करायचे झाल्यास करता येईल पण फक्त या गुहेचा surface थोडा ओबड आहे. गुहा बऱ्यापैकी मोठी आहे. या गुहेतून बराचसा प्रदेश न्याहाळता येतो.





इथे जरावेळ विश्रांती घेऊन आम्ही पठारावर परत आलो. येथूनthod पुढे गेल्यावर एक पाण्याचे टाके आहे. या टाक्यातील पाणी पिण्यालायक आहे. आम्ही येथे आमची तहान भागवली, गडावरील पाण्याने मन तृप्त झाले. पुन्हा एकदा नवीन ऊर्जा निर्माण झाली,इथे पोहोचेपर्येंत १०.३० वाजले होते. या टाक्याला लागुनच दगडाची तुटलेली ढोणी आहे तसेच खंडोबारायाची आणि रखुमाईची घोड्यावर बसलेली मुर्ती आहे. हे बघुन आम्ही टेकडीच्या माथ्यावर गेलो, येथे इमारतींचे अवशेष आणि सुकलेले पाण्याचे टाके आहे. परत फिरलो टेकडी उतरून झाली आल्यावर थोडसं पुढे आल्यावर आपण उध्वस्त दरवाज्यापाशी येऊन पोहोचतो. येथे संपूर्ण कातळ फोडून काढलेला पायऱ्यांचा मार्ग आपल्या नजरेस पडतो. यावरून अंदाज लावता येतो, ही गडावर येण्याची मुख्य वाट असावी. या मार्गाने आपण खाली उतरून आलो की आपण एका अरुंद पठारावर पोहोचतो. येथे एक सुकलेले मोठे टाके आहे. हे टाके पाहुन पुढे वाट खाली उतरते, येथे एक गुहा आहे. या गुहेला आधार म्हणुन मध्ये खांब उभारले आहेत. ही गुहा बघुन पुढे गेल्यावर आपण अजुन एका उध्वस्त दरवाज्यापाशी येऊन पोहोचतो. इथे आल्यावर आम्ही जरा वेळ विश्रांती घेतली. ही वाट संपूर्ण घसाऱ्याची आहे. इथुन एक वाट डावीकडे बेलवाडीला उतरते तर उजवीकडील वाट दरेगावात उतरते. उजव्या वाटेने आपण खिंडीत येऊन पोचतो. येथे आपण बेलवाडी-दरेगाव रस्त्यावर येतो, आम्ही मधल्या पायवाटांनी दरेगावात दाखल झालो. आता दुपारचे १२ वाजले होते. संपुर्ण गड बघायला आम्हाला ३.१५ तास लागले. दरेगाव ते दरेगाव एकुण पाच तासात आमचा अहिवंतचा प्रवास संपला.




अर्धवट राहिलेला प्रेमगिरी


दुपारचे बारा वाजले होते आता जेवायची वेळ झाली होती, दरेगावात काशिनाथ गायकवाडांचा निरोप घेऊन प्रेमगिरीच्या दिशेने निघालो. मध्ये रस्त्यात नांदुरी, अभोणे, नाकोडे पालथे घालत कळवण लिंक मार्गे पाटविहीर गावी निघालो. कळवण लिंक रोडवर एका हॉटेलमध्ये आम्ही जेवणासाठी थांबलो. मस्त तांबडा रस्सा आणि गरमागरम चिकनवर ताव मारला आणि पुढे निघालो. दरेगाव ते पाटविहीर हे अंतर साधारण २८ किमी आहे. हे अंतर पार करायला आम्हाला ४५ मिनिटे लागली. कळवण-जयदर रस्ता सोडल्यावर रस्ता खराब आणि खडकाळ आहे त्यामुळे या रस्त्यावर जास्त वेळ जातो. अर्धवट राहिलेला प्रेमगिरी असं म्हणालो कारण मागे नोव्हेंबर मध्ये एकदा भिलाई सोबतच्या ट्रेकसफर मध्ये हा किल्ला अपुर्ण राहिला होता पण या वेळेस ठरवुनच आलेलो, वाट थोडी वाकडी करायची आणि हा किल्ला बघुनच जायचं पण या वेळेस पाटविहीर मार्गाने यायचं ठरवलं.


प्रेमगिरी किल्ल्यावर जायला दोन गावातुन वाटा उपलब्ध आहे, एक वाट हिंगुलवाडी मधुन वर येते तर दुसरी वाट पटविहीर गावातून येते. प्रेमगिरी किल्ल्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. हिंगुलवाडी मधुन दोन वाटा आहेत, एक सरळ सोंडेवरून वर चढते तर दुसरी वाट खिंडीतून गडावर घेऊन जाते. पाटविहीर मधुन येणारी वाट किल्ल्याच्या मागच्या टोकावरून किल्ल्यावर घेऊन येते. ही वाट घसाऱ्याची आणि सरळ चढाईची आहे. आम्ही जेवण आवरून, १.४५ वाजता पटविहीर गावात पोहोचलो. येथे भरत भोईर नावाच्या एका गृहस्थाकडे आमचे सामान ठेवले, ते स्वतः आमच्यासोबत किल्ल्यावर यायला तयार झाले. त्यांच्या घराच्या मागील बाजुस एक वाळलेला ओढा आहे हा ओढा पार करून आपण शेतांमध्ये येतो. येथुन समोरच गडाची एक सोंड सरळ खाली उतरलेली दिसते. ही चढाई शेवटपर्येंत खडी आहे, पर्वापासून चाललेल्या परिश्रमामुळे आता थोडा थकवा जाणवत होता पण किल्ला म्हटलं की पाय मात्र चालुच राहतात. आम्ही या सोंडेच्या मार्गाने चढायला सुरुवात केली. वाटेत काळ्या मैनेची (करवंदाची) भरपूर झाडे होती. या करवंदांचा आस्वाद घेत आम्ही पुढे पुढे जात होतो. या वाटेने शेवटच्या टप्प्यात एक १०-१२ फुटाचे कातळारोहण आहे. रोपचा वापर ना करता हा पॅच पार करता येतो. हा शेवटचा पॅच पार करून आम्ही गडाच्या माथ्यावर प्रवेश केला.





येथपर्येंत पोहोचायला आम्हाला १ तास लागला, आता दुपारचे ३ वाजले होते. सर्वत्र सोनेरी गवत पसरले होते. येथील वाट फारशी वापरात नसल्याने आम्ही रस्ता बनवत पुढे जात होतो. थोडासा चढ चढुन पुढे गेल्यावर लांबवर आम्हाला हनुमंताचे मंदिर दिसले. हर्षल आणि मी आम्ही दोघेही खुप आनंदी होतो, मागील खेपेस पुर्ण करू न शकलेलो किल्ला या वेळेस मात्र पुर्ण झाला होता. डाव्या बाजुला सातमाळ रांग उभी होती. आमचे यश धोडप डोकं उंचावुन बघत होता, जणुकाही तो साक्षीदारासारखा उभा होता. डाव्या हाताला बाजुलाच मांगी-तुंगी ची प्रतिकृती असणारा डोंगर दिसत होता. संपुर्ण गडमाथ्यावर नजर फिरवली असता, गडावर कुठेही सावली, झाड नव्हते. फक्त एकच झाड मंदिरापाशी उभे आहे. हनुमंत, शंकरदेव या झाडाच्या सावलीत विश्रांती करत होते. हिंगुलवाडीतून सोंडेने येणारी वाट आपल्याला येथे मिळते, इथे एक ध्वज आहे. हेबघून आम्ही मंदिरापाशी पोचलो. ह्या मंदिराला पत्र्याची शेड आहे, नुकताच मंदिराला रंग दिलेला वाटत होता. संपुर्ण मंदिर दगडाचे आहे. ह्या मंदिराच्या बाहेरील बाजुस श्रीरामांची पाऊले शेंदुराने फासलेली आहेत. आतमध्ये हनुमंताची मुर्ती आहे जी संपुर्ण शेंदुराने फसलेली आहे. मंदिराच्या बाहेरच उजव्या बाजुस २-३ विरगळी आहेत तसेच झाडाखाली एका चौकोनी उंबऱ्यावर शिवलिंग आणि नंदीची मुर्ती आहे.

सर्व पाहुन मंदिरापाशी झाडाखाली आम्ही जरावेळ विश्रांती घेतली आणि मंदिराच्या उजव्या बाजुने चालायला लागलो. येथे दोन पाण्याची मोठी टाकी आहेत. त्यांना रामकुंड आणि सिताकुंड अशी नवे आहेत. कुंडे म्हटलं कि पाणी पिण्यालायक नक्कीच नाही, एवढं बघितल्यावर गड पुर्ण बघुन होतो. आम्ही उतरताना मात्र खिंडीच्या मार्गाने उतरायला सुरुवात केली. कातळात कोरलेल्या पायऱ्या या वाटेने आपल्याला लागतात जो की या गडावर येण्याचा उत्तम मार्ग आहे. या मार्गाने उतरायला आम्हाला अर्धा तास लागला, वाट थोडी बिकट आहे. या वाटेने आपण शेतात उतरतो आणि पुढे जंगलात चालु लागतो. येथे निरनिराळे पक्षी दिसतात, मोर - लांडोर, विविध साप, पक्ष्यांची घरटे असे बरच काही दिसते. या जंगलातून चालताना थंड वाटत होते, देह थोडे थंड होत होते. आम्ही परत ४.३० वाजता भरत भोईर यांच्या घरी पोचलो, थंडगार पाणी प्यायलो आणि आमचे सामान घेतले. त्याच्या अंगणात आणि शेतात २-३ मोरे होते, त्यांचे फोटो घेतले आणि निरोप घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात केली.






आमचे पुढचे ध्येय होते सादडविहीर या गावी पोहोचणे. सादडविहीर म्हणजे कण्हेरगडाचा पायथा. पटविहीर ते सादडविहीर हे अंतर २४ किमी आहे. आम्ही साधारण ५.३० वाजता सादडविहीर गावी पोचलो. येथे शांताराम भोईर यांच्याशी आमचा संपर्क झालेला, त्यांनी आम्हाला शाळेची चावी दिली. शाळेत मस्त मार्बल टाईल्स टाकलेल्या आहेत, आजही या गावातील लोक डोंगरदेवाच्या सणात व्यस्त होते. आम्ही शाळेत जरावेळ अराम केला सुर्यास्ताचे फोटो काढले. शाळेच्या बाहेर वार्ताफलक लावलेला, त्यावर आजच्या दिवशीचा (२४ डिसेंबर २०१७) दिनविशेष, तिथी, नक्षत्र, सुर्योदय, सुर्यास्ताची वेळ लिहिलेली. तसेच आजच्या बातम्या "थंडीचा पारा वाढला, BCCI ला खेळपट्टीवरून समज" लिहिल्या होत्या. हे बघितल्यावर शाळेचे दिवस आठवले आणि खरंच शाळा का आपुलकीची वाटते हे समजले. रात्री ७ वाजले होते, आता मात्र पोटात कावळे ओरडु लागले. आज पहिल्यांदा आम्ही आमच्या सोबत आणलेला स्टोव्ह बाहेर काढला आणि जिभेचे चोचले पुरवायला सुरुवात केली. पहिल्यांदा hot and sour chicken सुप  आणि मग त्यावर गरम गरम maggie चा ताव मारून भुक भागवली. आमचा बिस्तर म्हणजेच sleeping bag मांडली आणि कधी झोप लागली कळले नाही.
 

दिवस तिसरा (२५ डिसेंबर २०१५)




आज आमच्या सफारीचा तिसरा दिवस. नाशिकमधले जवळपास सर्वच किल्ले समुद्रसपाटीपासुन  उंचावर आहेत. नेहमीच्या सवयीप्रमाणे पहाटे ६ वाजता जाग आली, स्टोव्ह आणि इतर शिधा साहित्य आम्ही बाहेरच ठेवले होते. बाकीचं सर्व सामान आवरून आम्ही गरमागरम शिरा ब्रेकफास्ट साठी बनवला आणि त्यावर एक कप भर चहा घेतला. ३ दिवस सतत फिरत असल्याने आज व्यवस्थित नाश्ता करूनच किल्ल्यावर जायचं आम्ही ठरवलं. गावातील लोक सकाळीच उठुन कामाला लागले होते. डोंगरदेव सणानिमित्त गडबड चालु होती, कण्हेरगडाच्या बाजुस असलेल्या डोंगरात डोंगरदेव वसले होते. सर्वगाव आज तिकडेच जमा होत होते, त्यामुळे आमचा रस्ता चुकायला वावच नव्हता. आमचा नाश्तापाणी आणि इतर विधी उरकले आणि आम्ही छोटी बॅग घेऊन कण्हेरगडाच्या दिशेने निघालो.





कण्हेरगड


कण्हेरगड हा सातमाळ रांगेपासुन थोडा हटके आहे म्हणजेच थोडासा बाजुला/आडवाटेवर आहे. गडावर पोचायला दोन वाटा आहेत. एक वाट कण्हेरवाडी मधुन आहे तर दुसरी वाट सादडविहीर गावातुन आहे. आमच्या planning  प्रमाणे आम्ही सादडविहीर गावातुन चढणार होतो कारण प्रेमगिरी मधुन आम्हाला हे गाव जास्त जवळ होते आणि येथुन वाट जास्त मळलेली आहे, तसेच सादडविहीर मधुन वेळही कमी लागतो. गावातुन एक डांबरी सडक पुढे सरळ जाते, आपण या मार्गावरून चालत जायचे. पुढे सडक उजव्या बाजुस वळते आणि आपल्या डाव्या हाताला कण्हेरगड राहतो. या रस्त्यावरून जाताना आम्हाला बऱ्याच लोकांची गर्दी लागत होती. निरनिराळ्या, आसपासच्या गावातुन लोक डोंगरीदेव उत्सव साजरा करायला येत होते. आम्ही नजर उचलुन वर बघितले तर कण्हेरगडाच्या डाव्या बाजुच्या डोंगरात डोंगरदेव वसलेले. इथे बरेच लोक जमले होते आणि त्याची पूजा करत होते. आम्ही डांबरी रोड सोडुन डाव्या हाताची मळलेली वाट पकडली आणि चढाईला सुरुवात केली. २-३ जणांना विकविचारले असता माहित पडले काही लोक कण्हेरवाडी मधून आले होते. आम्ही डावीकडील डोंगराच्या मध्यावर पोचलो. येथुन डावीकडील वाट डोंगरदेवाकडे घेऊन जाते तर उजवीकडील वाट कण्हेरगडाच्या खिंडीत घेऊन जाते. आम्ही उजवीकडील वाट पकडली आणि खिंडीच्या दिशेने चढायला सुरुवात केली.


वाटेत जाताना मागे वळून बघितले असता समोर डोंगर, सादडविहीर आणि गावात धुकं, पक्ष्यांचे थवे एकदम मस्त नजर दिसत होता, अगदी आपण थंडीतील चित्र काढतो तसच. थंडी तर विचारूच नका, दोन दिवस अंगात घातलेले स्वेटर अजुन उतरवले नव्हते. पायथ्यापासून अर्ध्यातासात आम्ही खिंडीत येऊन पोहोचलो. येथे जरावेळ आम्ही अराम केला. पलीकडे कण्हेरवाडीमधून येणारी वाट या खिंडीत मिळते. कण्हेरवाडी लांबवर उन्हात न्हाऊन निघत होते. कण्हेरवाडी मधुन खिंडीपर्येंत यायला १ तास लागत असावा. खिंडीतुन सरळ वर बघितले असता अजून तासाभराची चढाई बाकी होती. इथुन पुढची सर्व चढाई छातीवर आहे आणि प्रचंड घसाऱ्याची वाट आहे. पण वाट रुंद असल्याने अपघाताची भिती नाही. खिंडीपर्येंत तर नुसता warm up होता खरी कस आता लागणार होती. जरा वेळ विश्रांती घेऊन आम्ही चढायला सुरुवात केली. गडावरच्या महादेवाच्या पाया पडुन बरेच लोक गड उतरून खाली येत होते. आम्ही आपले पावले हळू हळू टाकत, आधार घेत पुढे पुढे जात होतो. समोरच गडाचा एक बुरुज दिसतो. आम्ही या बुरुजाच्या दिशेने चढाई करत होतो. बुरुजाच्या जवळ पोहोचल्यावर आपण कातळात कोरलेल्या पायऱ्यांपाशी येतो.




बुरुजापाशी पोचल्यावर आम्ही जरा वेळ आराम केला. आत्तापार्येंत ८. वाजले होते. पायऱ्यांच्या मार्गाने आम्ही गडाच्या पहिल्या टप्प्यात आलो, येथे एक पाण्याचे सुकलेले टाके आहे. हे बघुन आम्ही सरळ वर न चढता पायवाटेच्या मार्गाने डावीकडून सरळ चालू लागलो. पुढे परत पायऱ्यांच्या मार्गाने आपण गडाच्या प्रमुख आकर्षणापाशी म्हणजेच नेढ्यापाशी येऊन पोहोचतो. नेढ्यातून पलीकडचा प्रदेश तसेच गडाची माची न्याहाळता येते. गडाचा माथा माचीसारखा पसरला आहे. पत्ता गावाचे doom version अगदी. नेढ्यापाशी आम्ही जरावेळ अराम करून पुढे निघालो, नेढ्याच्या बाजूने जाणारी वाट आपल्याला गडाच्या माथ्यावर घेऊन जाते. येथे दोन फूट उंचीचे दोन खांब बसवले आहेत. इथे पोचलो की आपण गडाच्या माथ्यावर पोचतो. माथ्यावर पोहोचताच मन मोहून जाते. धोडप, रवळ्या-जवळ्या, मार्कंड्या, सप्तशृंगी किल्ले  डोळ्यासमोर दिसतात.


माथ्यावर येथे दोन सुकलेली टाके आहे. थोडस पुढे गेल्यावर झाडांमध्ये जुन्या इमारतींचे बरेच अवशेष पाहायला मिळतात. अजून थोडं पुढे गेल्यावर अजुन एक खराब पाण्याचे टाके आहे. टाक्यांपासून उजवीकडे गेल्यावर एक महादेवाचे उघड्यावर मंदिर आहे, त्याच्या बाजुलाच तुळशी वृंदावन आहे. मागील बाजूस मोठ्या इमारतीचे अवशेष शिल्लक आहेत, तसेच बाजूला पाण्याचे टाके आहे, पाणी पिण्यालायक आहे. हे  बघुन आपण सरळ चालत जायचं माचीच्या दिशेने. गडाची माची अगदी धोडप सारखीच आहे, मध्ये तुटलेली आहे. उलटे येताना आपण धोडपच्या दिशेने चालायचे येथे कड्यात एक गुहा कोरली आहे. गुहेत सहज ४-५ जणांना मुक्काम करता येतो. आत्तापार्येंत ९. वाजले होते, आम्ही सोबत आणलेले खजूर खाऊन घेतले, पाणी प्यायलो आणि परतीच्या वाटेवर निघालो. गडावर गुहा सोडून कोठेही निवारा अथवा सावली नाही. सांभाळत उतरत, तोल सावरत आम्ही खिंडीत येऊन पोचलो. इथून पुढे मळलेल्या वाटेने पटापट उतरत, ११ वाजता सादडविहीर गावात दाखल झालो. सगळं सामान आवरून, शांताराम भोईरांचा निरोप घेतला आणि मार्कंड्या किल्ल्याच्या दिशेने कूच केली.




मार्कंड्या


मार्कंडेय ऋषीमुनींचा "मार्कंड्या"!!! या गडावर पुरातन काळी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते म्हणुन हा किल्ला मार्कंड्या नावाने ओळखला जातो. गडाच्या बालेकिल्ल्यावर मार्कंडेय ऋषींचा प्रसिद्ध आश्रम आहे. सापुतारा रस्त्यावर नाशिकपासून ४० किलोमीटरवर वणी नावाचे गाव आहे. या गावातून एक रस्ता कळवण गावाकडे जातो. या रस्त्यावर वणीपासून ९ किमीवर बाबापूर नावाचे गाव आहे. हे मार्कंड्या किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. या गावापासून रस्ता वर चढत जाऊन २ किमीवरील मुळणबारी खिंडीत येतो. खासगी वाहन असल्यास आपण मुळणबारी खिंडीत गाडी लावू शकतो. या खिंडीतून कळवण गावाकडे जाताना उजव्या बाजूची वाट रवळ्याजावळ्याला तर डाव्या बाजूची मार्कंड्या किल्ल्यावर जाते.शहाजहानच्या काळात दक्षिणसुभा औरंगजेबाच्या ताब्यात होता. औरंगजेबाने अलिवर्दीखानाला नाशिक जिल्ह्यातील किल्ले जिकण्याचा हूकूम दिला. इ.स. १६३९ मध्ये अलिवर्दी खानाने सप्तशृंगीगड, मार्कंड्या, रवळ्याजावळ्या, धोडप हे सर्व किल्ले जिंकून घेतले. याबद्दलचा फारसीतील शिलालेख इंद्राई किल्ल्यावर पाहता येतो. वणी दिंडोरीच्या लढाईनंतर नाशिक परिसरातील किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले. त्यात मार्कंड्याचा समावेश होता. महाराजांच्या निधनानंतर मोगलांनी हे किल्ले परत जिंकले. अखेरीस पुन्हा एकदा मार्कंड्या मराठ्यांच्या ताब्यात आला.


सादडविहीर वरून आम्ही निघालो आता जेवायची वेळ झाली होती. सादडविहीर ते मुळणबारी खिंड अंतर साधारण १० किमी आहे. वाटेत कुठेही हॉटेल नसल्याने आम्ही कळवण ला उलटे गेलो आणि जेवण केले. परत येऊन मुळणबारी मध्ये गाडी लावली. मुळणबारी हे गावाचे नाव नसुन रवळ्या-जवळ्या आणि मार्कंड्या यांच्यामधील खिंड, बारी म्हणजेच खिंड. खिंडीत परत पोचायला आम्हाला १ वाजला. खिंडीतूनच खडी चढण चालू होते. दगडांचा राजमार्ग केला आहे, दोन्हीबाजुंना रेलिंग केले आहे तसेच मधे मधे बसायला बाकडे केले आहेत. गडाच्या पहिल्या टप्प्यात एक शंकराचे छोटे मंदिर पत्र्याच्या शेडमध्ये बनवले आहे आणि पादुका आहेत. येथून धोडप चे उत्तम दर्शन होते. तसेच राहिल्या किल्ल्याचे दर्शन होते. येथून पुढे गेल्यावर आपण गडाच्या पदरात असलेल्या पठारावर पोचतो. सरळ पुढे चालत आल्यावर कातळात बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या पायऱ्या आपल्या नजरेस पडतात. येथून पहिल्या टप्प्यात दोन गुहा कोरल्या आहेत यांना "ध्यान गुंफा" म्हणतात.





या गुहांपाशी आम्ही जरावेळ विश्रांती घेतली आणि पुढे पायऱ्यांच्या मार्गे निघालो. येथे तुलेल्या तटबंदीचे अवशेष नजरेस पडतात तसेच उजच्या बाजुला बुरुजांचे अवशेष दिसतात. खिंडीमध्ये पोचल्यावर समोर सप्तशृंगी गडाचे दर्शन होते. हे पाहुन आपण कातळकोरीव पायऱ्यांनी बालेकिल्ल्याकडे जावे. येथे पहिल्या टप्प्यात एक नव्याने उभारलेला आश्रम आहे. तसेच घुमटाखाली एक टाके आहे. या टाक्याला "शिवकुंड" अथवा "कमंडलु तीर्थ" म्हणतात. या टाक्याला बारमाही पिण्याजोगे पाणी असते. तसेच सामोर एका झाडाखाली गणेशाची, श्रीकृष्णाची आणि शंकराची मूर्ती आहे. थोडंस वर चढुन गेल्यावर ३ पाण्याची टाके आहेत पण यातील पाणी खराब आहे. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर मार्कंडेय ऋषींचे मंदिर आहे. मंदिरासमोर धातूचा नंदी आहे तसेच मंदिरामध्ये ऋषींची मुर्ती, पादुका आणि शिवलिंग आहे. या मंदिरामध्ये एक साधूबाबा असतात. येथे आम्ही जरा वेळ अराम केला आणि बाहेर पडलो. गडाच्या या सर्वोच्च माथ्यावरून धोडप, सप्तशृंगी, रवळ्या-जवळ्या हा प्रदेश न्याहाळता येतो तसेच वातावरण साफ असल्यास सालेर-मुल्हेर डोंगररांग (डोलबारी रांग) दिसते.

मार्कंड्याच्या बालेकिल्ल्यावरून दिसणारे हे सर्व दृश्य आम्ही मनात साठवलं आणि गाद उतरायला सुरुवात केली. बालेकिल्यापर्येंत पोहोचायला आम्हाला ३ वाजले होते. आता बऱ्यापैकी ऊन होते. गडाच्या पदरात असलेल्या पठारावर सद्गुरू महाराजांचा एक मोठा आश्रम बांधण्यात आला आहे, येथे १०० लोकांची राहायची तसेच जेवणाची सोय होते.या म्हाला थोडा उशीर झाल्याने प्रसादाचा स्वादास्वाद घेता आला नाही. या आश्रमाशेजारीचे सप्तशृंगीचे नव्याने मंदिर उभारले आहे. आश्रमाच्या पटांगणात सद्गुरू रंगनाथ महाराज यांची समाधी आहे.आश्रमामध्ये शिरल्यावर सभामंडपात तीन मंदिरे बनवली आहेत आणि त्या समोर एक तुळशी वृंदावन आहे. एका मंदिरात श्रीकृष्ण, दुसऱ्या मंदिरात गणपती आणि तिसऱ्या मंदिरात श्रीदत्त आहेत. आश्रमाच्या मुख्य दालनात सद्गुरू महाराजांची मुर्ती व इतर देवांचे फोटो आहेत. बाहेर एक शनीची मूर्ती आहे तसेच त्यासमोर  शंकर, नंदी,गणपती आणि हनुमंताचे मंदिर आहे.




आता आम्ही परतीच्या वाटेल लागलो. आत्तापार्येंत दुपारचे ४ वाजले होते, आमच्या हातात बराच वेळ शिल्लक होता. ४.३० वाजता आम्ही मुळणबारी खिंडीत पोचलो. सर्व सामान आवरून आम्ही मुळाणे गावाकडे निघालो. मुळणबारी खिंड ते मुळाणे हे फक्त ४ किमीचे अंतर आहे. आज आमचा मुक्काम मुळाणे गावात होता. ५ वाजता आम्ही मुळाणेमध्ये पोचलो,डांबरी रस्त्याला लागुन गावाच्या सुरुवातीला एक शाळा आहे. या गावात सुभाष ठाकरे यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्याकडुन शाळेची चावी घेतली. शाळेच्या समोरच धोडप दिसत होता, समोर पाण्याचा हापसा होता, अजून काय सुख पाहिजे आयुष्यात. आम्ही सगळ्यात पहिले झोपायची तयारी करून ठेवली , थंडी एवढी होती की आम्हाला शाळेतही टेन्ट उघडावा लागला, शिधा साहित्य बाहेर काढुन ठेवले. चहाचे साहित्य बाहेर काढले आणि चहा बनवला. एकीकडे सुर्य मावळतीला जात होता तर एकीकडे आमच्या हातात चहाचा कप. सूर्यास्ताचा आनंद लुटत असतानाच खबर मिळाली आमचे अजून ३ मित्र आज रात्री येत आहेत. ते आम्हाला उद्याच्या सफर साठी म्हणजेच रवळ्या-जवळ्या साठी साथ देणार आहेत. आम्ही रात्रीचे जेवण बनवले आणि झोपून गेलो. पहाटे ३ वाजता तिघेही मित्र (निलेश, श्री आणि पराग) पोचले. पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत मी आणि हर्षल त्यांना घेऊन आलो आणि मग परत एकदा आम्ही सुप प्यायलो आणि थोडी ऊर्जा अंगात निर्माण करून कुडकुडत झोपुन गेलो.

दिवस चौथा (२६ डिसेंबर २०१५)



२ तासांच्या झोपेनंतर थंडीमुळे झोप आपोआपच उघडली. गोड गुलाबी थंडीत आम्ही sleeping बॅग मध्ये आडवे पडलेलो, डोळे अजिबात उघडत नव्हते, सुर्य उगवायची वाट बघत गप्पा मारत आडवे पडलेलो. हळु हळु वेळ सारत गेली आणि ५ वाजता आम्ही आमचा आळस झटकला. सर्व सामान अस्ताव्यस्त पसरलेले आवरायला घेतले, सर्व आवरून तयार होईपर्येंत बाहेर उजाडले होते. समोरच धोडप डोके वर काढुन आमच्या चाललेल्या खटपटी बघत होता. स्टोव्ह बाहेरच ठेवला होता , आम्ही चहा बनवुन घेतला आणि शेजारी शेकोटी केलेली. सुर्य हळु हळु आमच्या मागुन डोकं वर काढत होता आणि धोडपची शेंडी सोनेरी दिसु लागली. शाळेच्या व्हरांड्यात आम्ही बसलेलो, हातात चहाचा कप होता आणि समोर धोडप सोनेरी रूप धारण करत होता. बस्स!! आमचा ट्रेक सार्थकी लागला, और क्या चाहिये life में! तासंतास त्याच्याकडे बघत राहावसं वाटत होत.





रवळ्या - जवळ्या


रवळ्या - जवळ्या या जोडकिल्ल्यांना दोन वाटा आहेत. एक वाट मुळणबारी खिंडीतुन, मार्कंड्याच्या समोरचा डोंगर चढुन गेल्यावर आहे आणि दुसरी वाट मुळाणे गावातून आहे. आम्ही मुळाणे गावातुन चढणार होतो. चला बराच वेळ आराम झाला, आता निघायला हवे. सोबत खायला, पाण्याच्या बाटल्या वगैरे घेतले आणि चालायला सुरुवात केली. आता पहाटेचे ७ वाजले होते, रविराज बऱ्यापैकी वर आले होते. मुळाणे गावातुन डोंगराच्या डाव्या कोपऱ्यातुन एक सोंड सरळ खाली उतरलेली दिसते. या सोंडेवरून आपण सरळ चढाई सुरु करायची. शेतातून एक पायवाट डोंगराला भिडते आणि हीच वाट सरळ वर चढत जाते. या पायवाटेने आपण थोडं तिरप चढायला सुरुवात करायची. कळसुबाई सारखे या किल्ल्यांना डोंगरांचे ४ टप्पे लागतात. पहिल्या २० मिनिटात आपण पहिल्या पठारावर येतो. मागे नजर टाकल्यास कण्हेरगड दिसतो. आम्ही पायवाट सोडुन थोडी सरळ चढाई चालु केली कारण थोड्या वेळाने पायवाट नाहीशी होते आणि पुर्ण वळसा न मारता सरळ नागमोडी मार्गे चढायला सुरुवात करायची. साधारण तासाभरात आपण गडाच्या पदरात असलेल्या पठारावर पोहोचतो. इथवर आल्यावर एक मार्किंग  करून ठेवावे अन्यथा परत येताना रास्ता चुकण्याचे चान्स जास्त आहेत.


पठारावर भरपुर झाडे आहेत, रवळ्या किल्ला उजव्या हाताला ठेऊन आपण मळलेल्या पायवाटेने चालायला लागायचे. वाटेत जाता जाता आपल्याला बरेच अवशेष बघायला मिळतात जुन्या इमारतींच्या ज्योती, पीर, खांबांचे अवशेष, समाधी आणि इतर अर्धवट तुटलेले अवशेष आहेत. १०-१५ मिनिटे चालले की आपण दोन्ही किल्ल्यांच्या मध्ये असलेल्या पठारावर येऊन पोहोचतो. इथे एक ३-४ घरांची वस्ती आहे याला तिवारी वस्ती म्हणतात. इकडे आम्हाला मुंबईचे काही ट्रेकर्स भेटले,ते सुद्धा नुकतेच आले होते. आमच्या सफरीत ते सुद्धा सहभागी झाले. या वस्तीच्या बाजुलाच एक पुरातन टाके आहे पण यातील पाणी गुरे-ढोरे प्यायला वापरतात त्यामुळे यातील पाणी पिण्यालायक नाही. या वस्तीपासून उजवीकडील वाट आपल्याला रवळ्या किल्ल्यावर घेऊन जाते तर डावीकडील वाट आपल्याला जवळ्यावर घेऊन जाते. पहिले आपण रवळ्याच्या दिशेने निघायचे. इथे एक पाण्याचे कुंड आहे, यातील पाणी पिण्यालायक आहे. किल्ल्यावर जाणारी वाट सुरुवातीला जंगलातून असल्याने पटकन सापडत नाही पण एकदा वाटेल लागलो की २० मिनिटात आपण एका घळीपाशी येऊन पोहोचतो. या घळीतून आपण चिमणी climb करत वर जायचे. इथे कातळात कोरलेली एक गुहा आहे जी दोन्ही बाजूने ओपन आहे. थोडस पुढे चालत गेलं की कातळाच्या दुसया बाजुला ही गुहा उघडते.





आत्तापार्येंत ९.३० वाजले होते. येथे  झाडांच्या थंड सावलीत आम्ही जरावेळ अराम केला आणि परत झाडापाशी आलो. समोर आपण एका rock patch पाशी येतो. क्लाइंबिंग चे ज्ञान आणि सराव असेल तर हा पटच आपण रोपशिवाय चढु शकतो पण शक्यतो रोप सोबत घेतलेला उत्तम. मधल्या भागात एक रोप लावलेली आहे पण त्याच्या भरवश्यावर राहु नये. हा पटच केल्यावर आपण गडाच्या माथ्यावर पोहोचतो. उजव्या हाताने सरळ गेल्यावर २ पाण्याची टाकी आहेत, यातील पाणी पिण्यालायक आहे. गडाचा माथा संपुर्ण चढाईचा आहे. या टाक्यांपाशी आम्ही जरावेळ आराम केला आणि बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो. जाताना वाटेत फक्त एकच झाड आहे आणि बाकी वाळलेले गवत. बालेकिल्ल्याच्या मध्याच्या थोडं वर आल्यावर एक खराब पाण्याचे टाके आहे. हे बघुन आपण सर्वोच माथ्यावर दाखल व्हायचे. येथे गडाचे कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. येथून संपुर्ण सातमाळ डोंगररांगेचे दर्शन उत्तम घडते. रवळ्या किल्ल्याचा माथा जवळ्या किल्ल्यापेक्षा मोठा आहे. सर्व नजारा बघुन मन मोहुन जात होतं, धोडप नजरेला नजर भिडवुन उभा होता. आज तो वेगळ्या रूपात आम्हाला दिसत होता, एकदम देखणा!! हा नजर बघुन आम्ही किल्ला उतरायला सुरुवात केली आणि पुन्हा टाक्यांपाशी येऊन पोहोचलो. टाक्यांपासुन उजवीकडील वाटेने गेल्यावर आपल्याला बुरुजांचे अवशेष दिसतात. येथुन गडावर यायला जुनी वाट असणार कारण पायथ्यापासुन नीट बघितले असता, बुरुजाच्या खालच्या बाजुस कातळात पायऱ्या कोरलेल्या दिसतात. पण या वाटेची पडझड झाल्याने येथून जाण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही परत आल्या वाटेने तिवारी वस्तीमध्ये जायला निघालो आणि ११ वाजता वस्तीत परतलो.


आम्ही तिवारी वस्तीत न थांबता जवळ्या किल्ल्याच्या दिशेने कूच केली. जवळ्या किल्ल्यावर जायला २ वाटा आहेत. एक वाट डावीकडील सोंडेवरून सरळ वर चढते. ही वाट पुर्ण घसाऱ्याची असल्याने शक्यतो टाळावी. दुसरी वाट तिवारी वस्तीमधुन समोर चालत गेल्यावर उजवीकडील सोंडेवरून नागमोडी मार्गे वर चढते. ही वाट मळलेली आहे, सोंडेच्या मध्ये डोंगराच्या पदरात पोहोचल्यावर वाट डावीकडे वळते. या उजवीकडील वाटेने आम्ही सरळ चालु लागलो. कातळ उजव्या हाताला ठेऊन कातळाला लागुन सरळ चालत जावे. थोडं पुढे गेल्यावर उजव्या हाताला गुहा आहे. कदाचित येथे लेण्या कोरण्याचा प्रयत्न केला असावा. अजून थोडं पुढे गेल्यावर डावीकडच्या सोंडेवरून चढून येणारी वाट इथे मिळते. इथे कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात, अगदी तळपायाचा अर्धा भाग मावेल एवढ्या या पायऱ्या आहेत. ही वाट थोडी बिकट आहे. पायऱ्यांचा मार्गे गेल्यावर गडाचा कातळ कोरून काढलेला दरवाजा आहे. दरवाजाच्या उजव्या बाजुला शिलालेख कोरलेला आहे. दरवाज्यातुन सरळ वरती गेले की डावीकडे एक वाट वळते त्या मार्गाने जावे, पुढे गुहा आहेत आणि यातील एका गुहेत पाणी आहे. पाणी स्वछ आणि पिण्याजोगे आहे, गुहेत आत शिरायला खिडकी सुद्धा आहे. हे बघुन आम्ही उलटे फिरलो आणि वर चढु लागलो. समोरच आपण एका बुरुजापाशी येऊन पोचतो अँड गडाच्या माथ्यावर दाखल होतो.





येथुन अप्रतिम नजर पाहायला मिळतो. इंद्राई, चांदवड, कण्हेरा, धोडप, इखारा, कांचन तसेच रवळ्या, मार्कंड्या, सप्तशृंगी सुद्धा दिसतात. बाकीचे मंडळी वर पोहोचेपर्येंत आम्ही या नजाऱ्याचा आनंद लुटत होतो. उंचच्या उंच कातळकडे आणि खोलच्या खोल दऱ्या बघुन मन मोहुन जात होते. या गडांचे एक वैशिट्य असे की प्रत्येक किल्ल्याच्या पदरात मोठे पठार आहे. (रवळ्या - जवळ्या, मार्कंड्या, सप्तशृंगी). असे वाटते जणू काही डोंगरांवर डोंगर चढवले आहेत. गडावरून खाली पदरात असलेल्या पठारावर नजर टाकली असता जुन्या इमारतींच्या ज्योती नजरेस पडतात. गडाच्या माथ्यावर जुन्या इमारतींचे अवशेष आहेत तसेच घोड्यांच्या पागा बघण्यासारख्या आहेत. थोडसं पुढे गेल्यावर पाण्याची तीन टाके आहेत, या पाण्यात थोडं शेवाळ आहे. पण थोडे गाळुन घेतले असता यातील पाणी पिण्यालायक आहे. येथे थोड्या वेळ विश्रांती घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो. परत उतरताना आम्ही पायर्यांचा मार्गे खाली आलो आणि डावीकडे ना जाता उजवीकडे वळुन गुरवाटेने झाडीमधुन पठारावर पोहोचलो आणि आमचा आनंद अगदी पोटात मावेनासा झाला. समोरच एक शिवलिंग उघड्यावर आहे आणि त्याबाजुलाच पाण्याचे छोटे कुंड आहे. गुरे-ढोरे यातील अपनी पीत असल्याने हे पाणी खराब असुन पिण्यालायक नाही. पुन्हा पठारावरून चालत आम्ही तिवारी वस्ती मध्ये परतलो. आत्तापार्येंत दुपारचा १ वाजला होता. आतमधुन दादांनी आम्हाला ताक आणुन दिले. ते पिऊन आम्ही मुंबईकरांचा निरोप घेतला आणि १.३० वाजता परतीच्या वाटेल लागलो. आल्या वाटेने सावकाश उतरत ३.३० वाजता मुळाणे गावात दाखल झालो.





मुळाणे गावात पोचल्यावर हापस्यावर हात-पाय धुतले आणि शाळेच्या आवारात जरावेळ आडवे झालो. येथुन पुढे धोडपला जायचे होते पण आमच्यातील एका मित्राला परत घरी जायचे होते त्यामुळे आम्ही धोडप पुढच्या खेपेस करायचे ठरवले आणि सातमाळ सफरला आळा घातला. तिघंही मित्रांची झोप नीट न झाल्याने हर्षल बाईकवर आणि मी कार घेऊन संध्याकाळी ५ वाजता परतीच्या वाटेवर निघालो. निघताना धोडपला मुळाणे गावामधुन नमस्कार केला आणि पुढच्या खेपेस परत येऊ असे म्हणत त्याचा निरोप घेतला. गेले तीन दिवस आम्ही बाईक वर आणि किल्ले फिरूनसुद्धा गाडी चालवत होतो. वाटेत एका ठिकाणी जेवण करून आम्ही पुण्याचा रास्ता पकडला आणि रात्री १ वाजता बाकीच्या मित्रांचा निरोप घेऊन मी आणि हर्षल, हर्षलच्या घरी मुक्कामाला गेलो. हे ५ दिवस अविस्मरणीय होते/आहेत, आमच्या आयुष्यातले/ ट्रेकिंग लिफे मधले सगळ्यात आठवणींचे दिवस. आज (१९ नोव्हेंबर २०१७) रोजी हा ब्लॉग/आठवण लिहीत असुन सुद्धा एक न एक क्षण जसाच्या तसा आठवत आहे. हे सगळं लिहिताना असा वाट आहे गेल्या आठवड्यातमध्येच आपण सातमाळ सफर करून आलो आहे. पुढे कधी संधी मिळाली तर सातमाळ सफर पुन्हा एकदा नक्कीच करेन आणि या वेळेस धोडपसहित करेन. चला आता निरोप घेतो आणि पुढल्या वारीच्या तयारीला लागतो. :)
 
 
 

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...