पुर्वार्ध

अहमदनगर जिल्हा!!!! अहमदनगर म्हणजे आमची सासुरवाडी. नुकतीच दिवाळी संपली होती पण कुठल्याही कारणास्तव सासुरवाडीत चकरा काही थांबत नव्हत्या. अहमदनगर जिल्ह्यातील निसर्गाबद्दल लिहावे तेवढे कमीच आहे. अहमदनगरचे नाव घेताच हुरूप येतो. येथील गगनभेदी डोंगररांगा, विख्यात असे राकट, कणखर किल्ले, थाटात उभा असलेला हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा, महाराष्ट्रातील विख्यात त्रिकुट अलंग-मदन-कुलंग, महाराष्ट्रातील उंच शिखर कळसुबाई, वाल्मिकी ऋषींचा आश्रम असलेला आजोबा पर्वत, रुबाबदार भेदक जणु काही कातळात खोदुन काढली आहे अशी सांधण दरी आणि बरंच काही ,अशा सर्व प्रदेशाने नटलेला अहमदनगर जिल्हा. येथील किल्ल्यांचे एक वेगळेच रूप आहे. अश्या ह्या निसर्गाने नटलेल्या जिल्ह्यात आम्ही ट्रेकचा प्लॅन ठरवला.गेल्या आठवड्यातच साम्रदला चक्कर मारली होती, तेंव्हाच ठरवले येथे ट्रेक करायचाच. समीर, अमोल, स्वप्नील, सागर, जयेश, विशाल, प्रसाद, निखिल, yms आणि मी असे आम्ही १० जण या ट्रेकसाठी तयार झालो.
सर्वांच्या
ऑफिसच्या / कामाच्या वेळा संभाळुन दिवस ठरवला १५ नोव्हेंबर. १५
नोव्हेंबरला रात्री पुण्याहून ट्रेनने निघायचे ठरले. एक आठवडा आधीपासुन
माहिती जमवायला सुरुवात केली. ट्रेनच्या वेळापत्रक बघितले, कसे जायचे, शिधा कोणी कसा आणायचा, ट्रेक मध्ये लागणारे सामान या सर्व गोष्टींचे
नियोजन सुरु झाले. नुकतेच साम्रदला जाऊन आलो असल्याने तेथील कॉन्टॅक्ट पण सोबत होतेच.
साम्रद बाजुने रतनगड चढल्यास रतनगडाची फेरी पुर्ण होईल या उद्देशाने आम्ही
साम्रद गावातून रतनगडावर जायचा निर्णय घेतला. रतनगडावरून निघाल्यावर मुक्काम कुठे करायचा, जेवण कुठे बनवायचे, अंदाजे लागणारा वेळ या सगळ्या गोष्टी
लक्षात घेऊन आम्ही ट्रेकचे नियोजन केले. साम्रदला पोहोचायला पहिले ट्रेनने कल्याणला यावे लागते, कल्याणवरून कसारापर्येंत लोकलने प्रवास करावा आणि कसारा पासून पुढे private जीपने जावे लागते. सर्व गोष्टींचे नियोजन झाले, गरज असलेल्या गोष्टींची जमवाजमव झाली आणि
१५ नोव्हेंबरची संध्याकाळ उजाडली. सर्वांची पळापळ सुरु झाली आणि १५ नोव्हेंबरला ७.४५ वाजता सर्व
जण पुणे स्टेशनवर हजार झाले.
रतनगड ते हरिश्चंद्रगड या ट्रेकचे साधारण एकुण अंतर ३८-४० किमी आहे. या ट्रेकचा नेहमीच मार्ग म्हणजे रतनवाडी/साम्रद - रतनगड - कात्राबाई - कुमशेत - पाचनई - हरिश्चंद्रगड असा आहे. आमच्या नियोजनानुसार आम्ही पाचनई मार्गे न जाता वेगळ्या मार्गे (बैलघाटमार्गे) हरिश्चंद्रगड चढायचा असे ठरवले. या संपुर्ण ट्रेकमध्ये आपण चहुबाजुंनी नटलेल्या डोंगररांगेमधे असतो. या ट्रेकचे वैशिष्ट्य असे की प्रत्येक ठिकाणाहून तीच डोंगररांग वेगवेगळ्या दृष्टीकोनातुन आपण बघु शकतो. रतनवाडी मधुन चढताना मध्ये एक चौक लागतो. येथून सरळ जाणारी वाट गडावर घेऊन जाते तर डावीकडे जाणारी वाट आपल्याला कात्राबाईच्या खिंडीत घेऊन जाते. आमचा पचनईचा एक सवंगडी रतनगडाच्या गुहेत आम्हाला भेटणार होता जो पूर्ण ट्रेकभर आमच्या सोबर असणार होता. मी ऑफिसमधुन लवकरच निघाल्याने ७ वाजता स्टेशनवर पोहोचून ७.५० च्या गाडीचे कल्याणचे तिकीट काढले. सर्वजण ७.४५ वाजता स्टेशन वर पोहोचले आणि आम्ही कल्याणचा दिशेने रवाना झालो. गाडीत बसायला जागा नसल्याने ३.३० तास उभं राहून प्रवास करत ११ वाजता कल्याण मध्ये पोहोचते झालो. कल्याण ते कसारा पुढची लोकल १२ वाजताची होती, या लोकलने आम्ही कसाराला निघालो ट्रेनमधेच जेवणाचे डबे उघडले आणि जेवण करून घेतले. साधारण रात्री १.३० वाजता आम्ही कसारा स्टेशनवर पोहोचलो. येथे private जीपने आम्ही पहाटे ५ वाजता साम्रद गावी पोहोचलो. साम्रदमध्ये एका घरातच २ तास विश्रांती घेतली आणि ७ वाजता ऊठून दिनचर्या सुरु झाली.
अर्धवट
झोपेतुन उठून डोळे किलकिले करत उघडले, बाहेर सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरलेली होती. हलकीशी थंडी मध्ये मध्ये बोचत होती. अहमदनगर जिल्ह्यातील थंडी म्हणजे अगदी बोचणारी थंडी. तरीही यावेळेस अजून त्यामानाने काहीच थंडी नव्हती. किलकिल्या डोळ्यांनीच बाहेर आलो आणि समोरच अलंग-मदन-कुलंग त्रिकुट आणि बाजुस असलेले कळसुबाई शिखर सुर्याच्या सोनेरी किरणांमध्ये न्हात होते. असे वाटत होते जाऊन काही या शिखरांवर कोणी
सोनेरी मुकुट चढवले आहे. साम्रद मध्ये पोहोचायला थोडासा उशीर झाल्याकारणाने आणि किमान २ तासांची विश्रांती
आवश्यक असल्याने आम्ही ७ वाजता आवरायला
सुरुवात केली, ८ वाजता नाश्ता
आणि चहा घेतला (आजकाल येथे चहा नाश्ता अगदी सहज उपलब्ध आहे) आणि ९ वाजता रतनगडाच्या
दिशेने निघालो. आज बऱ्याच दिवसांनी
range ट्रेकला निघालेलो. थोड्याश्या थंडीमुळे वातावरणात प्रसन्नता होती पण एकीकडे हळू
हळू रविराज तप्त होऊ लागले होते. शेतातून थोडा पुढे चालत जात रतनगडाची खडी चढाई चढण्यास आम्ही
सुरुवात केली. अलंग-मदन-कुलंग त्रिकुट आणि कळसुबाई आमच्या पाठीशी सतत उभे होते. आम्ही जसजसे वर चढत होतो
तसतसे ते नजरेसमोर दिसत
होते. रतनगडाचा खुटा समोर उभा होता. साधारण एक तासाभरात आम्ही
खुट्यापर्येंत येऊन पोहोचलो. आता सकाळचे १० वाजले होते.
साम्रद
गावात फोनला नेटवर्क नसते, त्यामुळे इथे एकदम सुख मिळते. आधुनिक उपकरणातून मुक्तता. आमचा सवंगडी बिचारा रतनगडाच्या गुहेत पहाटे येऊन थांबलेला. जसे आम्ही खुंट्याला वळसा घालायला लागलो आणि तेवढ्यात फोन आला, समजले आमचा मित्र परत उलट्या वाटेने निघणार आहे. हे कळताच मी
आणि माझा मित्र पटापट चढत रेलिंगपाशी पोहोचलो. येथे असलेल्या गुडघ्याएवढ्या पायऱ्यांवर जीव काढत त्रिंबक दरवाज्यापाशी दाखल झालो. पुढे आम्ही पटापट चढत १०.३० वाजता
गडावर हजार झालो. निव्वळ अर्ध्या तासात आम्ही खुट्यापासून रातांगडावरील नेढ्यापर्येंत पोहोचलो आणि येथुनच आमच्या मित्राला आवाज दिला. तो बिचारा काही
न खाता पिता निघालेला, आमचा आवाज ऐकून चौकात थांबला. आम्ही आमच्या मागे असलेल्या साथीदारांना फोन करून पटापट शिडी मार्गे खाली उतरत चौकापाशी हजार झालो. तिथे पोहोचताच त्याने आम्हाला मिठीच मारली. रतनगडाच्या पायथ्याशी कात्राबाईच्या मार्गावर असलेल्या कुंडामध्ये आम्ही पाणी प्यायलो. आम्ही रतनगड एकदा बघितला असल्या कारणाने वरून दिसणाऱ्या विहंगमय दृष्यापेक्षा आमच्या मित्राला गाठणे आम्हाला गरजेचे होते. बाकीचे साथीदार येईपर्येंत आम्ही जवळ एका झाडाच्या विसाव्यात जेवायला
बसलो. येथे गार्ड झाडीत बसुन सोबत आणलेला ठेचा आणि भाकरी खायची मजाच वेगळी. सर्व जण चौकात येईपर्येंत
आम्ही तिथेच सोबत आणलेले कॅरीमॅट उघडुन अर्धा तास विश्रांती घेतली.
सर्व
जण येईपर्येंत दुपारचे १२.३० वाजले.
सर्वानी जेवण करायला सुरुवात केली आणि १.३० वाजता
जेवण उरकले. आजपर्येंत केलेल्या ट्रेक मध्ये yms आणि मला पहिल्यांदा दुपारी एक तास झोपायची
संधी मिळाली. अगदी हाडाचे पुणेकर असल्याचा फीलिंग आम्हा दोघांनाही आले, ट्रेकमध्ये एक तास वामकुक्षी
आणि ती सुद्धा भाकर
आणि ठेचा खाल्ल्यावर मग अजुन काय
पाहिजे. १.३० वाजता
सर्वांची जेवणं उरकली आणि आम्ही कात्राबाईच्या दिशेने रवाना झालो. आमच्या मंडळींना वेग लागला कारण सर्वानी रतनगडावर मनसोक्त आनंद लुटला पण चालायचा बाबतीत
सगळे एक से एक.
१.३० वाजता रतनगड
- कात्राबाईचे जंगल पालथे घालत आम्ही पुढे निघालो. नुकत्याच झालेल्या पावसामुळे झाडी खुप वाढली होती, सूर्यकिरणे आतपर्येंत सहज पोहोचू शकत नव्हती. मातीने, झाडांच्या मुळांनी अजूनही पाणी धरून ठेवल्याने अजूनही ओलावा तसाच होता जणू काही नुकताच पाऊस पडून गेला आहे. मातीचा आणि कारवीच्या सुगंध मन मोहुन टाकत
होता. बऱ्याच उंचीवर असल्याने शेजारी असलेली खोल दरी आमच्या डाव्या हातालाच होती. उजव्या हाताला असलेल्या डोंगरकड्यांमध्ये पाणी झिरपुन दगड वेगळे झालेले होते, कड्यांना एक वेगळाच आकार
आला होता. मध्ये लागणारे ओढे आणि तिथून दिसणारे दरीचे, समोरच्या डोंगरांचे दृश्य मनाला आनंद देत होते. प्रत्येक क्षणी, प्रत्येक पावलागणिक निसर्ग आम्हाला वेगळे रूप दाखवत होता. वेगवेगळ्या पक्षांचे आवाज मधेच येत होते, मधूनच एक साप सर्रकन
समोरून निघुन गेला. जंगल एवढे गर्द होते की एकट्या माणसाने
येथे येण्याचे काम नाही. थोडे अंतर कापल्यावर आम्ही कात्राबाईच्या खिंडीची चढाई सुरु केली. जंगलातील प्रत्येक क्षणाचा आम्ही आनंद लुटत होतो. सगळीकडे शांतता, सर्व जण एकदम शांत...
आवाज होता तो फक्त जंगलाचा,
येथील जीवनाचा.
खिंडीच्या
मुखाशी आम्ही जस जसे पोचत होतो तास तसे हळू हळू वारे लागायला सुरुवात झाली. कात्राबाईच्या
खिंडीत आम्ही साधारण ४ वाजता पोहोचलो. येथुन दिसणारे विहंगमय दृश्य मन मोहून टाकणारे
होते. आम्ही डावीकडील टेकडीवर थोडंस वर चढलो. चारही बाजुस आपल्या ओळखीचे मंडळी होते.
येथे पोहोचताच सर्व शीण उतरला. आम्ही बॅगा टाकल्या आम्ही कॅमेरे काढले. मागील बाजुस
अलंग-मदन-कुलंग त्रिकुट सतत पाठीशी होते, थोडंस उजवीकडे कळसुबाई शिखर उभे दिसते. टेकडीच्या
डाव्या बाजुस गवळदेव डोंगर, त्याचा मागच्या बाजुला घनचक्कर आणि मुडा उभे दिसतात. कुमशेतच्या
बाजुस तोंड करून उभे राहिल्यास डावीकडुन हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला, खाली छोटासा कलाडगड,
तारामती पीक, खालील बाजूस वाकडी पीक, कुमशेटचा कोंबडा असा संपूर्ण नजर दिसतो. थोडा
वेळ इथे घालवून आम्ही परत खिंडीत आलो. खिंडीतून उजव्या बाजूस असलेल्या कात्राबाई डोंगराच्या
वाटेवर असलेल्या एका झाडाच्या खाली कात्राबाई देवीची मूर्ती आहे. हि मूर्ती बघितली
आणि ४.३० वाजता आम्ही कुमशेतच्या दिशेने खिंडीच्या दुसऱ्या बाजूस उतरायला सुरुवात केली.
मध्ये पाण्याचे झरे आहेत त्यातील एका झऱ्यावर आम्ही पाणी प्यायलो आणि पुढच्याच वाटचाल
सुरु केली. ५.१५ वाजता आम्ही कुमशेतच्या अलीकडे असलेल्या पठारावर पोहोचलो. आमच्या चहुबाजुंनी
डोंगररांगा पसरलेल्या होत्या.
या
पठारावर आम्ही जरा वेळ बसलो. काही जणांना नदीत पोहायला जायचे होते तर काही जणांना सुर्यास्त
बघायचा होता. मी, निखिल आणि yms सूर्यास्त बघायला निघालो. कुमशेत गावाला लागूनच एक
छोटासा टेकाड आहे, येथुन सर्व नजर सुरेख दिसतो. आम्ही जसजसे कुमशेत च्या दिशेने जात
होतो तसतसा रविराज अस्ताला जात होता. आता तो
थोडा हलका केशरी होऊ लागला होता पण आम्हाला सुर्यास्त गाठायचाच होता. आमच्या जवळील
पाणी संपलेले, बॅग तशीच पाठीवर होती, सायंकाळचे ६ वाजलेले. आम्ही तशेच बॅग न काढता
एका दमात घराच्या मागील बाजूस असलेल्या बसक्या टेकाडावर चढलो. वर पोहोचताच बॅग काढली,
timelapse एकीकडे सुरु केला. उजव्या बाजुस आज पर्वत, मागच्या बाजुस हरिश्चंद्रगडाचे
दृश्य तर डावीकडे कुमशेतचा कोंबडा आणि एकीकडे अस्ताला जाणारे रविराज. असे वाटत होते
जाऊन काही तिथेच खुर्ची घेऊन बसावे आणि सर्व नजारा चित्राच्या रूपात कागदावर उतरवावा.
आम्ही सूर्याकडे, त्याचा मावळत्या तेजाकडे एकतातक बघत बसलेलो. हळू हळू तो केशरी झाला,
मग तो संपूर्ण लाल झाला आणि थोड्याच वेळात तो नाहीसा झाला. उगवत्या आणि मावळत्या सूर्याकडे
एकटक बघत राहिल्यावर डोळ्यांची दृष्टी वाढते आणि सगळे त्रास नाहीसे होतात, अगदी चष्मा
असेल तरी तो कालांतराने उतरतो. तहान-भुक विसरून रविराज अस्ताला गेले तरी आम्ही एकटक
बघत बसलेलो. थोड्याच वेळात आम्ही खाली उतरलो आणि घरापाशी दाखल झालो. येथे आम्ही आमच्यासाठी
जेवण बनवले, घरातील ताईंनी आमच्यासाठी १० भाकऱ्या करून दिल्या. रात्री जोरदार भुक लागल्यावर
भाजी-भाकरी, भात यावर ताव मारला आणि १० वाजता झोपी गेलो. पाणी, आवश्यक झोप आणि वेळेवर
खाणे हे ट्रेक मध्ये सर्वात महत्वाचे असते. कारण ६-७ तास चालण्यासाठी energy खुप महत्वाची
असते आणि या तिन्ही गोष्टी वेळेत असतील तर दुसऱ्या दिवशी पण ऊर्जा टिकुन राहते.
टीप :- ट्रेकमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचे असते ते पाणी आणि गावातील लोकांनी
दिलेले प्रेम. त्यामुळे मिळालेल्या पाण्याचा योग्य तो वापर करा आणि गावातील लोकांनी
केलेल्या प्रेमाचा आदर करा. भलेही तुमचे ४ पैसे जात असतील तर जाऊद्यात पण माणसं कमावणं,
टिकवणं आणि माणुसकी जपणं हे जास्त महत्वाचं. आदराची, आपुलकीची आणि माणुसकीची
भावना नेहमी मनात जपा.
उत्तरार्ध
शनिवार दिनांक १७ नोव्हेंबर २०१८, आज आम्ही हरिशचंद्रगडाच्या दिशेने रवाना होणार होतो. या वेळेस हरिश्चंद्रगड थोड्या वेगळ्या वाटेने करूयात असे ठरले. नळीची वाट आणि पाचनई यांच्यामध्ये असलेल्या नाळेची वाट म्हणजे बैलघाट. पूर्वीच्या काळी येथुन मालाची वाहतूक, घोडेस्वार यांची ये जा असे. गडाची या बाजुस असणारी तटबंदी अजूनही टिकुन आहे. हि वाट मुळातच कमी वापरात आहे आणि या वाटेने खुप कमी जण जातात. आमच्या संपुर्ण ट्रेकचे वैशिट्य म्हणजे बैलघाट होते. काळ रात्री १० वाजता आडवे झालो तरी दिवसभरात केलेली पायपीट आणि बघितलेले विहंगमय दृश्य, जंगलात घालवलेला प्रत्येक क्षण, साम्रद ते कुमशेत दिवसभरात घडलेल्या घडामोडी, प्रत्येक क्षण डोळ्यासमोरून जात होता. हा प्रत्येक क्षण आठवताना कधी झोप लागली ते कळले सुद्धा नाही. प्रत्येक वेळेस सह्याद्री नवीन काहीतरी शिकवत असतो, गुरूसारखा सतत पाठीशी उभा असतो आणि मार्ग दाखवत असतो.
पहाटेचे
४ वाजले होते आणि घरातच असलेला कोंबडा आरवला, पहाटेचा गजर झाला. सगळेजण खाड्कन झोपेतून
जागे झाले पण आम्ही तरीही तसाच परत झोपायचा प्रयत्न केला पण प्रत्येक ५ मिनिटागणिक
तो कोंबडा आरवत होता. शेवटी आम्ही ५ वाजता उठलो आणि आवरायला सुरुवात केली. लवकर झोपलो
असल्या कारणाने आमची पुरेशी विश्रांती झाली होती. घरातून बाहेर पडल्यावर वर मस्त चांदणं
पसरलेलं होतं. आज नाश्ता वाटेतच करायचा असे ठरले. सर्वानी पहाटे ६ वाजेपर्येंत आवरले
आणि घरातल्यांचा निरोप घेऊन आम्ही आमची पुढील वाटचाल सुरु केली. कुमशेत मधून एक डांबरी
सडक पाचनई पर्येंत जाते. आम्ही या डांबरी सडकेने चालत पुढे निघालो. काळ संध्याकाळी
निरोप घेऊन अस्ताला गेलेले रविराज आज समोर येऊन आमचे स्वागत करत होते. आम्ही सरळ सरळ
चालत होतो आणि तो समोर लाल मग हळू हळू केशरी होऊ लागला होता. समोरच कलाडगड उंचावलेला
दिसत होता. कुमशेतमध्ये आम्ही २ बाटल्या पाणी घेऊ निघालेलो कारण पुढे मुलं नदीला पाणी
होते. या नदीच्या काठीच आम्ही नाश्ता करायचे ठरवले. डांबरी रस्ता उजवीकडे वळतो तर आपण
उजवीकडे न वळता समोर दिसणाऱ्या कलाडगडाच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवायची. बाजुस असलेल्या
पठारावर थोडा वेळ आम्ही रविराजाचे दर्शन घेतले आणि सगळे आल्यावर दाट झाडीमधुन, दारी
डाव्या हाताला ठेऊन घाट उतरायला सुरुवात केली.
घाट
उतरून आम्ही नदीच्या किनारी पोहोचलो, नदीला फार पाणी नसल्याने आम्ही सहज नदी पार करून
दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचलो. जंगल एकदम शांत होते, सकाळच्या प्रसन्न वातावरणात पक्ष्यांचे
मधुर आवाज कानावर पडत होते. नदीच्या थंड पाण्यातुन वाफ बाहेर पडत होत्या. सुर्याची
सोनेरी किरणे पाण्यावर पसरली होती. मध्येच एखादा पक्षी येऊन पाण्यात सूर मारायचा. सर्व
मंडळी येथे पोहोचेपर्येंत मी आणि yms नदीच्या किनाऱ्यावर साकाचे कोवळे ऊन अंगावर घेत
आणि या क्षणांचा आनंद लुटत शांतपणे बसलो होतो. सर्वजण आवरून आले आणि मग आम्ही चूल पेटवली.
सकाळचा नाश्ता आणि चहा करण्यासाठी याहुन उत्तम जागा असुच शकत नाही. नदीचे पाणी एवढे
स्वच्छ होते की सुर्याची किरणे तळापर्येंत अगदी सहज पोहचत होती. आजचा नाश्त्याचा मेनू
म्हणजे मॅगी, थोड्याच वेळात मॅगी तयार झाली. चुलीवर केलेली मॅगी, नदीचे गोड पाणी, गोड
गुलाबी थंडी, आजुबाजूला असलेले जंगल आणि वन्यजीवन याने मन हरपून जात होते. असे वाट
होते हा इथेच थांबावा, मॅगीच्या प्रत्येक घासाला आम्ही जंगलाचा आनंद लुटत होतो. येथील
हालचाली, मधुर आवाज, नदीचा किनारा, उगवत्या सुर्याची किरणे सर्व काही मन मंत्रमुग्ध
करणारे होते.
सकाळचे
९ वाजले होते, हळू हळू रविराज डोके वर काढु लागले आणि हलकीशी ऊब निर्माण होऊ लागली
होती. आमचा नाश्ता उरकला होता, सर्व भांडी धुवून आणि पाण्याचा बाटल्या भरून आम्ही पुढे
निघालो. नदीकिनाऱ्यावरून कलाडगडाच्या दिशेने आम्ही निघालो, नदीचे पात्र दुसरीवर पसरलेले
होते. समोरच एक टेकाड लागले. हे एकदा चालून गेल्यावर वरच्या बाजूस ठाकूरवाडी नावाचे
गाव लागते. जंगलातील वाट तुडवत आम्ही पुढच्या २० मिनिटात ठाकूरवाडी गावात दाखल झालो.
येथे एका घरात किराणा सामान विकत मिळते. येथे आम्ही आवश्यक असलेल्या किरणाच्या गोष्टी
आणि बिस्किटे घेतली आणि पुढे निघालो. १५ मिनिटात आम्ही कलाडगडाच्या पायथ्याशी पोहोचलो.
आत्तापार्येंत १० वाजले होते, ऊन बऱ्यापैकी तापले होते. आम्ही नियोजनानुसार आम्हाला
आजच रात्री हरिश्चंद्रगडावरून खाली उतरायचे होते म्हणून आम्ही कलाडगड आमच्या नियोजनामधून
वगळला होता. कलाडगड करायचा असल्यास सकाळी उन्हाच्या आत करावा म्हणजे कातळ तापलेले नसते
अन्यथा सकाळी ९ वाजल्यानंतर रखरखीत उन्हात खडा चढ चढावा लागतो. येथे जवळ एक पाण्याचे
कुंड आहे, कलाडगाच्या डोंगरांमधून पाणी झिरपून या कुंडामध्ये साचते. येथे आम्ही जरा
वेळ अराम केला आणि पुढे निघालो.
वाटेत
जाताना आपल्याला समोर २-३ घाली दिसतात, यातील मध्ये डोळ्यासमोर दिसणारी घळ म्हणजे बैलघाट.
या वाटेने आपल्याला गडावर पोहोचण्यासाठी साधारण २ तास लागतात. आम्ही कलाडगडाला वळसा
मारून पुढे निघालो. डांबरी वाटेने वळसा ना मारता समोर असलेल्या दरीत एक टेकाड खाली
उतरावे आणि पलीकडे परत चढावे. या वाटेवरून जाताना सर्वात उजवीकडे आपल्याला सादडे घाटाची
वाट दिसते, तसेच विख्यात नळीचा वाटेची मागील बाजू आपणास दिसते. पाचनई गाव आपल्या डाव्या
बाजूस राहते. डांबरी रस्त्याने सरळ न जात एक टेकाड मी सरळ खाली उतरलो (येथे मळलेली
वाट नाही... तर बैलघाट समोर ठेऊन अंदाज घेत जावे). परत वरती एक टेकाड चढल्यावर आपण
पाचनईच्या डांबरी सडकेला येऊन मिळतो. येथून सरळ एक टेकाड अजून चढले की आपण बैल घाटाच्या
पदरात असलेल्या पठारावर येऊन पोहोचतो. या वाटेने आम्ही बैलघाटाच्या पदरात येऊन पोहोचलो.
आत्तापार्येंत ११ वाजले होते. बैलघाटाची वाट जास्त वापरात नसल्याने मळलेली नाही, अंदाज
घेत आपण नाळेच्या दिशेने चालत रहावे. थोडासा पुढे गेल्यावर आम्ही बैलघाटाच्या पायथ्याशी
येऊन पोहोचलो. हरिश्चंद्रगड विस्तीर्ण पसरलेला आपल्याला दिसतो. या घळीच्या मार्गे खडी
चढण आम्ही सुरु केली. मोठमोठाले दगड धोंडे पार करत आम्ही सरळ चढू लागलो. डोक्यावर ऊन
होते पण या घाटात प्रचंड झाडी आहे त्यामुळे ते जाणवत नव्हते. साधारण ४५ मिनिटात आम्ही
७५% घाल चढून वरती आलो आणि येथे एक मोठा दगड आहे जिथे आम्ही विश्रांती घेतली. बाकीची
मंडळी अजून बरीच खाली होती. येथे आम्ही जरा वेळ घालवला, आमच्या जवळ असलेले खजुराचे
लाडू आणि चिक्क्या खाल्ल्या. एकदम थंड अशी ही नाळ, मस्त मंद वर सुटलेला आमच्या दोन्ही
बाजूस नैसर्गिक रित्या बनलेल्या गुहा होत्या.
थोड्याच
वेळात सर्वजण येथे पोहोचले, आम्ही पुढे निघालो. यापुढे सावली नव्हती आणि आमच्या जवळील
पाणी सुद्धा संपत आले होते. थोडासा वर गेल्यावर आम्ही गडाच्या पडक्या दरवाज्यापाशी
पोहोचलो, येथे गडाची सुव्यवस्थित स्थितीत असलेली तटबंदी आहे. इथून थोडासा वरच्या बाजूस
गेल्यावर डाव्या हाताला आडवाटेवर असलेल्या नैसर्गिक गुहेमध्ये पाण्याचे छोटे कुंड आहे,
त्यात असलेले पाणी आम्ही भरून घेतले आणि परत घालीत उतरून पुढची चढाई सुरु केली. ५ मिनिटात
आम्ही गडाचा माथा गाठला आणि थोड्याश्या झुडुपांच्या सावलीत विश्रांती घेत पहुडलो. शेजारी
असलेल्या पाचनई मार्गे बरीच माकडं चित्र विचित्र आवाज करत गडावर येत होती. थोड्याच
वेळात सर्व जण गडावर पोहोचले आणि आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो, येथे शेजारी असलेल्या
छोट्या धबधब्यात लोक अंघोळ करत होते. आम्ही पटापट चालून ७० पायऱ्यामार्गे मंदिरापाशी
पोहोचलो. मंदिरामध्ये महादेवाचे दर्शन घेतले आणि पाणी भरून घेतले. वरती असलेल्या आमच्या
मित्राचा हॉटेल मध्ये विश्रांती घेत पडलो. आत्तापार्येंत दुपारचे २ वाजले होते. आमच्या
जवळ असलेले तांदूळ काढले आणि भट बनवायला आम्ही सुरुवात केली. भात शिजत होता तोपर्येंत
आम्ही भेळ बनवून खाल्ली, भात शिजला आणि त्यावर सर्वांनी ताव मारला. ३ वाजता सर्वांची
जेवण उरकली आणि परत एकदा वामकुक्षीची वेळ झाली :) . ३-४ सर्वांनी विश्रांती घेतली आणि
चहा बनवायला सुरुवात केली. मस्त पैकी ब्लॅक टी प्यायला आणि ४.३० वाजता आम्ही निसर्गाची
अद्भुत किमया असलेल्या कोकणकड्याच्या दिशेने निघालो.
साधारण ४.४५ वाजता आम्ही कोकणकड्यावर पोहोचलो, येथे
लोकांनी कॅम्पिंग ची पूर्ण तयारी केलेली होती. काही जणांचा make up चालु होता तर काही
जण चरत होते. आम्ही कोकणकड्यापाशी एका जागेवर जाऊन बसलो आणि सूर्यास्त होईपर्येंत पाळायचे
नाही असे ठरवले. उतरते ऊन डोक्यावर होते भासकराज दिवसभर तापुन आता थंड होत होते. आम्ही
निसर्गाचा आनंद लुटत होतो रविराज हळू हळू अस्ताला जाऊ लागले आणि कोकणकड्यावर गर्दी
वाढू लागली. आजकाल इथे सुद्धा सूर्यास्त बघताना जागा पकडून ठेवावी लागते. अगदी हाजीर
तो वजीर असे फीलिंग येत होते. कोकणकड्यावरून सुर्यास्त बघणे म्हणजे आपला ट्रेक सफल
संपन्न झाला असे वाटत होते. लांबवर शिवनेरी, ढाकोबा दिसत होते. आज वातावरण पूर्णपणे
स्वच्छ होते. रविराज पूर्णपणे दिसेनासे होईपर्येंत आम्ही तिथेच बसुन होतो. सुर्यास्त
पुर्ण होताच खणखणीत आवाजात जयघोष झाला आणि आमची पाऊले पटापट मंदिराच्या दिशेने पडु
लागली. मंदिरात ठेवलेले आमचे सामान आम्ही घेतले आणि पाणी भरून घेतले. पटापट आवरून आम्ही
खिरेश्वरच्या मार्गाने चालु लागलो. कधी चंद्रप्रकाशात तर कधी टॉर्चच्या प्रकाशात आम्ही
एक एक टेकडी पालथी घालू लागलो साधारण ८.३० वाजता आम्ही खिरेश्वरच्या बाजुस असलेल्या
एका टपरीपाशी चहा प्यायलो आणि बिस्किटे घेतली. पुढे कातळकडा उतरून आम्ही खिंडीत दाखल
झालो. येथे अजूनही गडावर चढणाऱ्यांची गर्दी थांबत नव्हती. पटापट उतरून आम्ही साधारण
१० वाजता खिरेश्वर गावात दाखल झालो. येथे एका हॉटेलात डाळ भातावर ताव मारला आणि झोपी
गेलो. पहाटे ६ ची मुक्कामी ST दारात उभी होती. या ST ने आम्ही परतीचा प्रवास सुरु केला
आणि ११ वाजता पुण्यात पोहोचून आमच्या ट्रेकची सांगता केली.









No comments:
Post a Comment