मित्रहो, ब्लॉग लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे, त्यामुळे काही लेखनचुका असतील तरी सांभाळून घ्या.
गेल्या काही वर्षात भटकंती करत असताना ढवळे ते आर्थर सीट या सह्यरांगेतील एक अवघड आणि दमदार ट्रेक बद्दल बरंच ऐकून होतो. आपसूकच या ट्रेकबद्दल मनात बरीच उत्कंठा आणि आकर्षण लागून राहिलेलं. माझ्या मुंबई - पुण्याच्या काही ट्रेकर मित्रांनी डिसेंबर २०१७ साली ट्रेक ठरवला होता, पण हा प्लॅन ठरायच्या आधीच मी पुणे - महाबलेश्वर - सातारा - पुणे या ३०० किमीच्या ब्रेव्हेट (BRM) सायकलिंगला रजिस्टर केलेलं असल्याने मी या ट्रेकला जाऊ शकलो नव्हतो. २ डिसेंबरला माझे हे मित्र ढवळे घाटातून महाबळेश्वरला ट्रेक करून येत होते तर मी पसरणी घाटातून सायकलीवरून येत होतो. त्यावेळी हि घाटवाट ट्रेकची खूप मोठी सुवर्ण संधी वाया घालवली होती. त्यानंतर अजून एक अशीच संधी मी माझ्या वैयक्तिक कारणांमुळे गमावली होती. माझ्या बकेटलिस्ट मधला हा ट्रेक लवकरच पूर्ण करायला पाहिजे असा मनोमन वाटू लागलेलं, पण योग काही जुळून येत नव्हता.
एके दिवशी व्हाट्सऍपवर मेसेज मिळाला कि पुण्याच्या सह्याद्री ट्रेकिंग फाऊंडेशन (STF) या ग्रुपने हा ट्रेक आयोजीत केला आहे. मी मेसेज मिळाल्या मिळाल्या लगेच रजिस्टर केलं. सोबत माझे मित्र सुरेश पोळेकर, आशिष फडणीस, श्रीहरी कुलकर्णी यांनी देखील रजिस्टर केलं. मंगळवारी दुपारी नोंदणी सुरु झाली आणि रात्री १० पर्यत बॅच पूर्ण भरली गेली. घाटवाटेच्या या ट्रेकला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. मी गेल्या १४-१५ वर्षांपासून सह्याद्रीत भटकंती करतोय, पण कधी कोणत्या दुसऱ्या अनोळख्या संस्थेकडून कोणत्या ट्रेकला कधी गेलेलो नव्हतो, पण निव्वळ ढवळे ते आर्थर या घाटवाटेसाठी मी ठरवलेले सर्व नियम बाजूला ठेवून पहिल्यांदाच अशा प्रकारे जात होतो. आजवर जे काही ट्रेक आम्ही करायचो त्याचे सर्व नियोजन आम्ही स्वतःच करायचो आणि निघायचो. दुसऱ्या अनोळखी ग्रुपसोबत ट्रेक करण्याबाबत मनात थोडी धाकधूक होती, पण आता सोबत ओळखीचे तिघे असल्याने मी थोडा रिलॅक्स झालो.
जावळीचा खोरं म्हणजे नेमकं आहे तरी काय?
जावळी हे शब्द जरी आठवलं तर शिवाजी महाराज, प्रतापगड आणि अफजलखानाचा वध हे सारे प्रसंग अगदी डोळ्यासमोर येतात. या इतिहासामुळेच जावळीखोऱ्याला अनन्यसाधारण महत्व आहे.
महाबळेश्वरपासून कोकणात उतरणाऱ्या आंबेनळी घाटात जावळी हे गाव आहे. याच्या आसपासचा जो भूप्रदेश आहे तो जावळीच खोरं म्हणून ओळखलं जातं. जावळीचं हे खोरं म्हणजे एक अद्भुत गूढ आहे. जावळीचा हा मुलुख म्हणजे कांदट, जगबुडी नदीच्या खोऱ्यापासून ते छत्री निजामपूरपर्यत अशी दक्षिणोत्तर आणि पाचगणी, महाबळेश्वरपासून ते पोलादपूर अशी पूर्व – पश्चिम दिशेत पसरलेली आहे.
या संपूर्ण प्रदेशात रायगड, चांभारगड, मंगळगड, चंद्रगड, कमळगड, मकरंदगड, महिपतगड, रसाळगड हे किल्ले तर शेवत्या घाटापासून ते हातलोट घाटापर्यंतचे कित्येक महत्वाचे आणि दिग्गज घाटवाटांचा समावेश होतो.
या सर्व भूभागावर मोरे घराणे राज्य करत होते. मोरे घराण्याची एकूण ७ शाखा होत्या. या सर्व शाखांचा जो प्रमुख असायचा त्यास “चंद्रराव” हा किताब होता. या सात शाखांपैकी जोर येथे हनमंतराव मोरे, जांभळी येथे गोविंदराव मोरे, कोंढवी परगण्यातील वाकण येथे बागराव उर्फ भिकाजीराव मोरे, आटेगाव येथे सूर्याजीराव मोरे, बिरवाडी तर्फेतील शिवथरला यशवंतराव मोरे, हे राज्य करत होते . तर इतर दोन घराण्याबद्दल माहिती मिळाली नाही.
सन १६४९ पासून महाराज जावळीवर लक्ष ठेवून होते. महाराजांनी सन १६५५ सालापासून जावळी ताब्यात घेण्याची मोहीम सुरु केली. जावळी प्रांत वाईच्या सुभ्यात मोडत होता आणि वाईची सुभेदारी अफझलखानाकडे होती. सन.१६५५ -५६ मधे अफझलखान दक्षिण भारतात युद्धात गुंतलेला होता आणि हीच योग्य वेळ साधून महाराजांनी जावळीवर हल्ला चढवला. सर्वात आधी “जोर”वर हल्ला झाला. या मोहिमेत रघुनाथ सबनीस यांनी जोरच्या हणमंत मोरेला मारून जावळीचा काही मुलुख ताब्यात घेतला. नंतर खुद्द शिवरायांनी नंतर रडतोंडी व निसणी घाट येथून हल्ला करून दक्षिणेकडील जावळी जिंकली या पराभवानंतर चंद्रराव मोरे रायरीवर (सध्याचा रायगड) पळाला. जिंकलेल्या प्रदेशाच्या सर्व कारभाराची घडी लावून महाराज स्वतः मार्च १६५६ मध्ये रायारीच्या वेढ्यात आले. मे १६५६ ला रायरी जिंकून मोरे संस्थान स्वराज्यात सामील करून घेतला.
जावळीचा मुलुख जिंकल्यावर महाराजांनी भोरप्या डोंगरावर प्रतापगड किल्ला बांधला.
ढवळे घाट:
सह्याद्रीतील अतिशय सुंदर व उत्तुंग अशी हि घाटवाट. ट्रेकर्सच्या शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारी ही घाटवाट आहे. या घाटातून जाणारा जवळ जवळ ७०% मार्ग दाट जंगलातून जाते. रायगड जिल्ह्यात उमरठ हे नरवीर तानाजी मालुसारे याचं जन्मगाव आहे. या गावात तानाजी मालूसरे आणि शेलार मामा यांची स्मारके आहेत. उमरठ पासून ६ किमी अंतरावर ढवळे नावाचे गाव आहे.
या ढवळे गावातून एक अवघड चढाईची आणि जंगलाने व्यापलेली अशी एक घाटवाट फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. हि घाटवाट कोकणातील पोलादपूरला थेट महाबळेश्वर आणि जोर ला जोडते. कोकणातून या घाटवाटेवर लक्ष ठेवण्यासाठी चंद्रगड किल्ल्या आहे. रायरेश्वर पठारावरून कोकणात उतरणाऱ्या बेलाग कड्यातून उगम पावणारी ढवळी नदी ढवळे गावाच्या बाजूने वाहत पुढे सावित्री नदीला मिळते.
![]() |
| ढवळे ते आर्थर सीट मार्ग |
ठरल्याप्रमाणे सर्व तयारी करून मी पिंपरीहून दुचाकीने सिंहगड रोडवर हिंगणे कॉर्नरला आलो. तिथे आशिषच्या घरी गाडी लावली. आशिष मला बसपर्यत पोहचवायला आला होता. तो देखील या ट्रेकसाठी येणार होता पण काही वैयक्तिक कारणामुळे त्याचं येणं कॅन्सल झालं होतं. आम्ही दोघे पिक-अप पॉईंटला आलो तर बस तिथे आधीच येऊन उभी होती. क्या बात है.. STF ची बस अगदी ठरवलेल्या वेळेत आली होती. तिथे बसचे समन्वयक गणेश आगाशे भेटले. त्यांनी मला दिलेल्या सीट नंबरवर मी जाऊन बसलो. बरोबर ११ १०.वाजता बस तिथून पुढे निघाली. पुढे आणखी दोन पिक-अप पॉईंटला सदस्यांना घेऊन रात्री १२.०० वाजता आम्ही पुणे सोडले. दोन बसेसमध्ये एकूण ७५ जण ट्रेकसाठी निघालो होतो. थंडीचे दिवस असूनही थंडी जाणवत नव्हती.
भोर – वरंधा घट – उमरठ मार्गे दोन्ही बसेस पहाटे पाचच्या सुमारास ढवळे गावात पोहचले. वरंध घाटात रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे झोपेची पार वाट लागली होती. अपूर्ण झोपेतच गाडीतून उतरलो तर मस्त चंद्रप्रकाश पडला होता. खाली उतरल्यानंतर मला एकूण चार बसेस दिसले. रात्री निघताना दोन होते आता चार कसे झाले? नंतर समजलं कि नगरहून ५० लोकांचा दुसरा एक ग्रुप चंद्रगड-ढवळे घाट ते आर्थर टोक ट्रेकसाठी आला आहे. मनात विचार येऊन गेला कि आज या घाटवाटेवर राजमार्ग तयार होणार.
सकाळची आवारावर करून तयार झालो तर सर्वांसाठी मसाले दुध, चहा, आणि टोस्टचं वाटप सुरु होतं. नगरच्या ग्रुपने त्यांच्या सदस्यांसाठी गुळ-नाचणीची गोड आंबील बनवलेली होती. त्यांनी प्रमाणापेक्षा जास्त बनवल्यामुळे आमच्या ग्रुपमधे ते लोकांना घेण्यासाठी विचारू लागले . मीदेखील दुध-टोस्ट आणि गोड आंबीलची मेजवानी हाणली आणि पुढच्या चालीसाठी एकदम तयार झालो.
साधरणपणे सकाळी ६ वाजता सर्वजन आवरून शाळेसमोर जमले. ट्रेक लीडर सुरेंद्र दुग्गड (भाऊ) यांनी सर्वांना ट्रेकच्या महत्वाच्या आणि आवश्यक सूचना दिल्या आणि आम्ही ट्रेकला निघालो.
यापूर्वी STF ग्रुप चा या वाटेवर ट्रेक झाला होता पण तरीही वाट कमी वापराची असल्याने भाऊंनी सुरक्षिततेसाठी गावातील नामदेव आणि तुकाराम या दोघांना गाईड म्हणून सोबत घेतलं होतं.
वेळ सकाळी ६.३०
बरोबर सात वाजता आम्ही कोळीवाड्यातून पुढे निघालो. शेतातून पुढे जाणारी चांगली रुळलेली पायवाट होती. उजव्या बाजूला चंद्रगड किल्ला, डाव्या बाजूला ढवळी नदीचे कोरडे पात्र आणि त्याच्या पलीकडे महादेव मुऱ्हाचे डोंगर दिसत होते आणि समोर पूर्वेकडे धुके आणि ढगात हरवलेली सह्याद्रीची डोंगर रांग दिसत होती. आज वातावरण किंचितसं ढगाळलेल होतं. त्यामुळे डोंगर रांगेचा अस्पष्ट नजरा दिसत होता. पुढे एका सपाटीवर दोन पायवाटा होत्या, त्यातली एक पायवाट उजव्या बाजूच्या चंद्रगडावर जात होती आणि दुसरी सरळ जाणारी पायवाट चंद्रगडाला वळसा मारून ढवळे घाटात जात होती. साधारण पंधरा मिनिटाच्या सपाटीच्या चालीनंतर आम्ही झाडीतून हलक्या चढला लागलो. आणि मग सुरु झाला चढाईचा खरा थरार. ढवळे घाटाची हि वाट चंद्रगड आणि सह्याद्रीच्या मुख्य धारेला जोडणाऱ्य डोंगराला बिलगून जाणारी होती.
कोकणातून घाटमाथ्याकडे चाल सुरु झाली , गच्च झाडीतून वाट वर वर जात होती. सकाळी मस्त गारवा होता. पुढे सलग दिड तास चाल करून सगळे एका कोरड्या ओढ्यात विश्रामासाठी थांबले. झाडीतून जाणाऱ्या या वाटेत वारा अजिबातच नसल्याने चांगलाच घामटा निघाला होता. थांबलेल्या ठिकाणी भाऊंनी सर्वांना गरमागरम टोमटो सुपचा एक एक घोट दिला. एवढ्या थकव्या नंतर डोंगरात गरम सूप मिळणे म्हणजे लॉटरी होती. इथे दहा मिनिटांचा ब्रेक घेतला आणि परत चालायला सुरवात केली.
आता इथून पुढची वाट सापळ खिंडीच्या खालच्या बाजूने डावीकडे वळसा मारून बहिरीच्या घुमटीला जाणार होती. वाटेची सुरूवात हि अगदी खडकाळ पायवाटेने झाली. जसजसे पुढे चढू लागलो तसं जंगलातील झाडांची उंची जास्त होत आहे हे जाणवू लागलं. झाडाच्या सावलीतून चालण्यात मजा येत होती पण चढण जास्त असल्याने छातीचा भाता सुरु झाला होता. वाटेत जास्त उंचीची वृक्षराजी पाहून मन सुखावत होतं. जंगलाच्या वरून वाहणाऱ्या जोरदार हवेमुळे होणाऱ्या पानांची सळसळ ऐकत मी, श्रीहरी आणि पोळेकर सर एकत्र चालत होतो. बऱ्यापैकी खड्या चढाईमुळे ग्रुपमधील सदस्यांचा चालण्याचा वेग थोडा मंदावला होता. मग त्यातल्या लोकांशी गप्पा मारत आम्ही पुढे जाऊ लागलो.
पुढे जात असताना सकाळी आमच्या ग्रुपसोबत आलेले दोघे गाईड परत माघारी गावात उतरताना दिसले. ठरल्याप्रमाणे त्यांनी ग्रुपला आडव्या वाटे पर्यंत पोहोच केलं होतं. म्हणजे आम्ही आता सापळखिंडीचा खालच्या बाजूला होतो. पुढे थोडसं चालून वर गेल्यानंतर झाडांच्या झरोक्यातून चंद्रगडचा दर्शन झालं.
एकूण एलेवेशन गेन: ५५८ मीटर्स. वेळ: सकाळचे ०९ .२५
जितेंद्र बंकापुरे यांच्याकडून सापळखिंडीबद्दल मिळालेली काही जुनी माहिती.
सध्या घुमटीला जाणारी जी वाट आहे ती सापळखिंडीच्या थोड्या अलीकडून डाव्या वाजूला आडवी जाते आणि मग पुढे उजवीकडे जात ती कड्यापाशी जाते. हीच वाट १५ -२० वर्षांपूर्वी सध्याच्या वाटेपेक्षा थोडी वेगळी वाट होती. पूर्वी सह्याद्रीचा घाटमाथा आणि चंद्रगड यांना जोडणाऱ्या डोंगराच्या उजव्या बाजूने वर थेट सापळखिंडीत जात होती आणि तिथून पुढे सह्यधारेवरून जात कड्यापर्यत पोहचत होती. पण मध्यंतरी, दरड कोसळून ही वाट बंद झाल्याने, सध्या सापळखिंडीत जाता येत नाही.
खड्या चढाईनंतर वाट जंगलातून बाहेर पडते आणि दाट करावीतून पुढे वर जाते. सकाळपासून डोक्यावर पूर्णपणे झाडं होती ती आता कमी झाली होती आणि आकाश दिसू लागलं होतं. या घाटवाटेचा मार्ग हा पश्चिमेकडून पूर्वेकडे असा होता त्यामुळे आम्ही अजूनतरी सावलीतूनच चालत होतो. कारवीची झाडी, सावलीतून आम्ही पुढे जाऊ लागलो. या टप्यातली पायवाट वर-खाली अशी जात होती. हा टप्पा अगदी निवांत होता. आमच्या उजव्या हाताला डोंगर आणि डाव्या बाजूला दरी होती. डाव्या हाताला ढवळे खोऱ्यातील अफाट नजरा आता दिसू लागला होता.
एकूण एलेवेशन गेन: ६२२ मीटर्स. वेळ: सकाळचे ०९ .५५
![]() |
| पायऱ्यावरून वर आल्यावर समोर दिसणारा कडा |
इथून पुढची चढाई अगदीच तीव्र आहे. कमी अंतराच्या या तीव्र आणि दमदार चढाईनंतर आपण सह्याधारेच्या एका मस्त टप्प्यावर येतो जिथून एका बाजूला प्रतापगड, त्याच्या मागे धूसर दिसणारा मकरंदगड आणि सावित्री नदीचे खोरे आणि डाव्या बाजूला पसरलेलं ढवळी नदीचे खोरं दिसतं. इथे पाच दहा मिनिटे थांबायचं, अफाट पसरलेल्या जावळीच दर्शन घायचं आणि घुमटी सारख्या दिसणाऱ्या कड्याच्या पोटातून पुढे जाण्यासाठी मनाची तयारी करायची.
एकूण एलेवेशन गेन: ६३३ मीटर्स. वेळ: सकाळचे १०. १५
आता यापुढचा जो टप्पा आहे तो या घाटवाटेचा सर्वात महत्वाचा आणि अगदी थरारक टप्पा आहे. याठिकाणी डोकं अगदी शांत ठेवायचं आणि कड्याच्या पोटातून समोर जात असलेल्या ट्रॅव्हर्सने अजिबात घाई-गडबड न करता पुढे पुढे जात राहायचं. उजव्या बाजूला उंच, अभेद्य कडा आणि डाव्या बाजूला खोल दरी अशा भीतीदायक पायवाटेने आपण एका सपाटीपाशी पोहचतो.
आता यापुढचा जो टप्पा आहे तो या घाटवाटेचा सर्वात महत्वाचा आणि अगदी थरारक टप्पा आहे. याठिकाणी डोकं अगदी शांत ठेवायचं आणि कड्याच्या पोटातून समोर जात असलेल्या ट्रॅव्हर्सने अजिबात घाई-गडबड न करता पुढे पुढे जात राहायचं. उजव्या बाजूला उंच, अभेद्य कडा आणि डाव्या बाजूला खोल दरी अशा भीतीदायक पायवाटेने आपण एका सपाटीपाशी पोहचतो.
एकूण एलेवेशन गेन: ७९८ मीटर्स. वेळ: सकाळचे १०. ४०
समुद्रसपाटीपासूनची उंची -
इथून सह्याद्रीचा जो काही पॅनोरमा दिसतो तो निव्वळ अफाट आणि अवर्णनीय आहे. डावीकडे म्हणजेच दक्षिण दिशेला प्रतापगड किल्ला, समोर दरीत चंद्रगड, त्याच्या पलीकडे महादेव मुऱ्हा, ढवळी नदीचे खोरे, वायव्य दिशेला अस्पष्ट दिसणारा मंगळगड किल्ला तर उजवीकडे म्हणजेच उत्तर दिशेला कोळेश्वर पठार आणि त्याच्या मागे रायरेश्वर पठाराचे नाखिंद टोक, कोळेश्वर पठाराच्या अलीकडे आणि बहिरीच्या ठाण्याच्या मागे एक किंचित टेकडीसारखे नाकाड दिसत होतं. हि टेकडी म्हणजे कोळेश्वर पठाराचे पश्चिम टोक. त्याला सुळकापॉईंट सुद्धा म्हणतात.
सकाळपासूनच्या चालीनंतर प्रचंड भूक लागली होती. इथे आम्ही सोबत आणलेले जेवण करून घेतलं आणि पुढे निघालो.
सकाळपासूनच्या चालीनंतर प्रचंड भूक लागली होती. इथे आम्ही सोबत आणलेले जेवण करून घेतलं आणि पुढे निघालो.
बहिरीची घुमटी हे ठिकाण सातारा जिल्ह्यात येतं, तर सकाळपासून आम्ही जी चढाई करत होतो तो सर्व भाग रायगड जिल्ह्यात येतो. बहिरीच्या या ठिकाणापासून एक वाट पूर्वेकडे म्हणजे डाव्या हाताला जोर गावाकडे जाते तर दुसरी वाट आर्थर सीट टोकाकडे जाते. या ठिकाणाहून अजूनही आर्थर सीट पॉईंट दिसत नव्हता. बाजूच्या गुगल नकाशात दोन्ही वाटांचा अंदाज येईल.
घुमटीपासून मी आणि श्रीहरी, भाऊंसोबत पुढे आर्थर सीटच्या दिशेने निघालो. दाट कारवीतून वाट पार केल्यानंतर पुढे पाचव्या मिनिटांत कातळात खोदलेल्या चार पायऱ्या दिसतात. या पायऱ्यांच्या डाव्या बाजूला पाण्याचं एक खोदीव टाकं आहे. ढवळी गाव ते आर्थर सीट दरम्यान पाण्याचा हा एकमेव स्त्रोत आहे. सकाळपासूनचा ट्रेक हा सावलीतून होता त्यामुळे माझ्याकडे अजून २ लिटर पाणी शिल्लक होते. मी पाणी न भरताच पुढे निघालो.
एकूण एलेवेशन गेन: ८२१ मीटर्स. वेळ: सकाळचे ११. ३०
एकूण एलेवेशन गेन: ८२१ मीटर्स. वेळ: सकाळचे ११. ३०
पुढे दाट कारवी आणि झाडोऱ्यातून वाट पुढे जाते. वीसेक मिनिटाच्या चालीनंतर आम्ही एका झाडीतून बाहेर आलो आणि एका सपाट जागेवर पोहचलो. या सपाट जागेला "गाढवाचा माळा" म्हणतात. झाडोऱ्यातून बाहेर पडताना नेचे या वनस्पतीची कमरेएवढ्या उंचीची बरीच झाडी इथे होती
एकूण एलेवेशन गेन: ९३६ मीटर्स. वेळ: सकाळचे ११. ५२
या गाढवाचा माळ्यापासून दूरवर आमचं टार्गेट आर्थर पॉइंट दिसत होता. डाव्या हाताला कृष्णा नदीचे खोरे तर उजव्या हाताला सावित्री नदीचे खोरे दिसत होते. आजूबाजूला दिसणाऱ्या अफलातून नजाऱ्यामुळे इथून पुढची पायपीट ही लैच भारी असणार होती याचा पुरेपूर अंदाज आला होता. चालताना उजव्या हाताला ऑर्थरसीटच्या दरीत कोसळलेले कडे दिसत होते. कधी दरीच्या काठावरून तर कधी दाट झाडीतून आम्ही पुढे निघालो. बऱ्यापैकी उंची गाठल्यामुळे आता हवेत थोडा गारवा जाणवू लागला होता.
![]() |
| गाढवाचा माळाहुन दूरवर दिसणारा आर्थर सीट |
दरीची सोबत संपून वाट पुढे डावीकडे झाडीत शिरते. तिथून आर्थर सीट पॉइंट अगदी स्पष्ट दिसत होता. थोडा वेळ थांबून आर्थर सीटचा रौद्रविराट, महाकाय कडा पाहत राहिलो. त्याची भव्यता मनात साठवून पुढे दाट कारवी, बांबू आणि लहान उंचीच्या झाडीतून वाट काढत रॉक पॅचपाशी आलो. एकदा मागे वळून कोणत्या मार्गाने आलो याचा अंदाज घेतला.
इथे अगदी सोप्या श्रेणीचा १० -१५ फुटांचा एक सोपा रॉक पॅच आहे. हा पॅच चढून आपण एका टप्प्यावर पोहचतो. या टप्प्याला विंडो पॉइंट म्हणतात. विंडो पॉइंट म्हणजे रॉक पॅचच्या वरच्या बाजूस दगडात कोरलेली जागा आहे. सर्वांना इथून चढताना सुरक्षित वाटावं म्हणून एक रोप फिक्स केला होता. आणि STF चे सदस्य इतरांना वर येण्यासाठी मदत करत होते. रॉक पॅचवरून आम्ही विंडो पॉइंटला पोहचलो.
इथे जास्त वेळ न थांबता लगेच पुढे निघालो. उजव्या हाताला आर्थरसीट टोकावरची गॅलरी दिसत होती. त्यावरून बरेच पर्यटक आमच्याकडे विस्मयीत नजरेने पाहत होते. उजव्या बाजूला गॅलरीकडे जाणारा एक शोर्टकट मार्ग दिसत होता, पण तो टाळून आम्ही डावीकडून पुढे गेलो.
पुढे जाताना वाटेत खूप प्लास्टिक कचरा दिसत होता. यामध्ये मिनरल वॉटर आणि शीतपेयांच्या बाटलींची झाकणं जास्त प्रमाणात होती. आर्थर पॉइंटला येणारे पर्यटक अशी झाकणं दरीत टाकत असतात. दरीतून वर येणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे ही झाकणं वर उंच उडत जातात. पर्यटकांना याची वेगळीच गम्मत वाटते पण तो उडून जाणारं झाकण पुढे झाडीत, निसर्गात कुठेतरी पडून राहणार, त्याने प्रदूषण होणार याकडे पर्यटक साफ दुर्लक्ष करुन निघून जातात.
पुढे जाताना वाटेत खूप प्लास्टिक कचरा दिसत होता. यामध्ये मिनरल वॉटर आणि शीतपेयांच्या बाटलींची झाकणं जास्त प्रमाणात होती. आर्थर पॉइंटला येणारे पर्यटक अशी झाकणं दरीत टाकत असतात. दरीतून वर येणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे ही झाकणं वर उंच उडत जातात. पर्यटकांना याची वेगळीच गम्मत वाटते पण तो उडून जाणारं झाकण पुढे झाडीत, निसर्गात कुठेतरी पडून राहणार, त्याने प्रदूषण होणार याकडे पर्यटक साफ दुर्लक्ष करुन निघून जातात.
वर पोहचल्यावर जांभ्या दगडांची सीमाभिंत ओलांडली आणि आर्थर सीटच्या गॅलरीत पोहचलो. सकाळपासून तब्बल साडेसहा तासांची थरारक चढाई करून इथे पोहचलो होतो. आज रविवार असूनही त्यामानाने पर्यटक कमी होते. आता मीदेखील या पर्यटकाच्या गर्दीचाच एक भाग होऊन आर्थरसीट टोकावरून समोर दिसणारा सह्याद्रीचा अनमोल नजराणा समाधानाने डोळ्यात साठवू लागलो. बस्स एवढ्यासाठीच केला हा अट्टाहास.
एकूण एलेवेशन गेन: ११३७ मीटर्स. वेळ: दुपारचे ०१ . ०५
समुद्रसपाटीपासूनची उंची: १२६५ मीटर्स.
मी आणि श्रीहरी थोडा वेळ तिथेच एका झाडाखाली बसून आराम केला आणि बससाठी पार्किंग कडे निघालो. पार्किंगकडे जाताना रस्त्याकडेला स्त्र्वाबेरी आणि अनेक प्रकारच्या रानमेवा विकायला ठेवल्या होत्या. दहा एक मिनिटानंतर बसमध्ये पोहोचलो आणि तिथल्या लिस्टमध्ये असलेल्या नावापुढे सही केली.
ट्रेकचा शेवटचा माणूस आल्यानंतर सर्वांना घेऊन बस “Mahabaleshwar Camps & Resorts” नावाच्या एका प्रशस्त रिसॉर्टला पोहचली. ट्रेक संपवून लवकर पोहोचलेल्यांना घेऊन एक बस आधीच या ठिकाणी आली होती आणि कुकिंग टीमने सर्वांसाठी स्वयपाक बनवून ठेवला होता. परतीच्या प्रवासात सर्वांसाठी चहा लागणार म्हणून तिथेच मसाला चहा बनवून थर्मासमध्ये भरून घेतला. व्हेजिटेबल राईस, बुंदी आणि दही असा चवदार जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.
![]() |
| छायाचित्र सौजन्य - गणेश आगाशे |
माझा STF सोबतचा हा पहिलाच ट्रेक होता आणि त्यांच्यासोबतचा अनुभव अगदी भन्नाट होता. संपूर्ण ट्रेकदरम्यान, ट्रेक लीडर आणि रूट मार्किंग करणारी टीम, स्वयंपाकाची टीम, टेक्निकल टीम आणि सपोर्ट टीम सर्वजन अगदी मनापासून काम करत होते. सर्वांचे मनःपूर्वक आभार.
आजच्या या ट्रेकला एकूण ७५ जण सहभागी झाले होते. त्यात ९ वर्षाच्या कृष्णा कोंडे या लहानग्यापासून ते ६७ वर्षांचे विजय बुटाला आणि नीलकण्ठ देशपांडे सारखे तरुण देखील सहभागी झाले होते. महिलावर्गाचा सहभाग देखील अगदी लक्षणीय होता. एकूण १८ जणी या थरारक ट्रेकसाठी आल्या होत्या. त्या सर्वांच्या उत्साहाला आणि सहभागाला प्रणाम.
![]() |
| कोंडे परिवाराचा फोटो. यातल्या मोठ्या मुलाने , ओम (वय-१३) तीन वेळा तर लहानग्या कृष्णाने (वय -०९) दोन वेळा हा ट्रेक पूर्ण केलाय. |
पुण्यात गेल्या २० वर्षापासून हि संस्था ट्रेकिंग क्षेत्रात कार्यरत आहे. सुरवातीला प्रत्येक महिन्यात एक ट्रेक अशी भटकंती करणारी हि संस्था जून २००८ नंतर प्रत्येक रविवारी म्हणजे सलग ५९० आठवडे न चुकता भटकंती करत आहे. “ना नफा ना तोटा” या तत्वावर काम करत असलेल्या या संस्थेच्या प्रत्येक ट्रेकची फी देखील अगदीच नाममात्र असते. मला वाटतं कि अशा पध्दतीने काम करणारी हि महाराष्ट्रातील एकमेव संस्था असावी.
काही महत्वाच्या नोंदी:
१) या घाटवाटेचा मार्ग असा काही विचित्र आहे कि ढवळे गावातून बहिरीची घुमटी दिसत नाही, घुमटीपासून ढवळे गाव आणि आर्थर सीट टोक दोन्हीही दिसत नाहीत आणि आर्थर सीट टोकापासून ढवळे गाव दिसत नाही.
२) जर सापळखिंडीबद्दल विचार केला तर अशी शक्यता वाटते कि पूर्वी जोर किंवा महाबळेश्वर – बहिरीची घुमटी – सापळखिंड - करंजे/दाभीळ मार्गे जावळी किंवा प्रतापगडावर जाणारा मार्ग असावा. या मार्गाची connectivity कदाचित खालील दिलेल्या नकाशाप्रमाणे असण्याची शक्यता आहे.
३) बहिरीच्या घुमटीपासून जोर गावात जी वाट उतरते त्या वाटेवर एका ठिकाणी कातळात खोदलेल्या पाण्याच्या दोन टाक्या आहेत.
४) ढवळे ते घुमटीच्या वाटेवर एका ठिकाणी कातळात हनुमानाची मूर्ती कोरलेली आहे. (आम्हाला तर ती दिसली नाही).
५) या ट्रेकला किमान ५ ते ८ तास लागतात.
© सिद्धू पाटील
दि. २० फेब्रुवारी २०२०.
दि. २० फेब्रुवारी २०२०.
विशेष आभार: चिन्मय कीर्तने .
ऐतिहासिक संदर्भ: श्री राजा शिवछत्रपती पुस्तक - लेखक: गजानन भास्कर मेहंदळे
ऐतिहासिक संदर्भ: श्री राजा शिवछत्रपती पुस्तक - लेखक: गजानन भास्कर मेहंदळे






































No comments:
Post a Comment