आज
शनिवार (५ सप्टेंबर २०१५) गोपाळ अष्टमी. या वेळेस आमचा ट्रेक शनिवारीच
ठरला. खरतर ट्रेक नाहीच म्हणता येणार कारण रस्ता कोणालाच माहित नव्हता. या
वेळेस आम्ही रेकी किंवा exploration साठी जाणार होतो. खुप planning नंतर
ठरलं गोप्या घाट ते शिवथरघळ करूयात. गोप्या घाट ट्रेक म्हणजे केळद (मढेघाट)
च्यापुढे कुंबळे नावाचे गाव आहे, येथून हा ट्रेक सुरु होतो. एक आठवडा आधी
सगळीकडून माहिती गोळा केली. ट्रेक रूट (नकाशा) तयार केला. तसेच स्वारगेटला
जाऊन st गाड्यांची चौकशी करून आलो. स्वारगेट वरून सकाळी ६.३० वाजता वेल्हा
गावाची बस (पुणे ते धिसर) आहे. पण वेल्ह्यामधुन पुढे कुंबळे गावापार्येंत
जायला सोयीस्कर वाहन नाही, जीप्स असतात पण ते कुंबळेपर्येंत ८०० ते १०००
रुपये मागतात. तसेच अजून एक st स्वारगेट वरून कुंबळेला आहे, पण ती दुपारी
२.३० वाजता. ही st मुक्कामी आहे. त्यामुळे आदल्या दिवशी कुंबळे गावात राहुन
दुसऱ्या दिवशी सकाळी हा ट्रेक सुरु करणे उत्तम. रेकी ट्रेक करायला आम्ही
तिघ जण होतो मी, विवेक आणि श्वेता ताई. आम्ही शनिवारी सकाळी ६.३० च्या बसने
निघायचं ठरवलं. वेल्ह्यामध्ये पोहोचल्यावर पुढचं बघु असं ठरवल. आता उपांडे
घाट ते शिवथरघळ असं का ते पुढे लिहिलं आहे.

ठरल्याप्रमाणे
आम्ही स्वारगेटला सकाळी ६ वाजता जमलो. सकाळी चौकशी केंद्रावर आम्हाला
पाहिजे असलेल्या अजुन थोड्या गाड्यांची माहिती जमा केली आणि बसची वाट बघत
उभे राहिलो. ६.३० वाजताची बस ७ वाजता आली. आम्ही त्या स्वारगेट - धिसर बसने
वेल्ह्याला निघालो. ही बस सर्वजागी थांबत (सर्व थांबा) जाते. साधारणतः
९.१५ वाजता आम्ही वेल्हे गावात पोहोचलो. रस्त्यात आणि प्रवासात खुप मज येत
होती. निरनिराळे दृश्य, शेती, फुले आणि डाव्या बाजुस उभा असा तोरणा गड.
त्यात भूतोंड्याची खिंड स्पष्ट दिसत होती. ही खिंड आपल्याला राजगड - तोरणा
या ट्रेक मध्ये लागते. आता वेल्ह्यात पोहोचल्यावर आम्ही बस conductor शी
थोडा वेळ गप्पा मारल्या आणि नाष्टा केला.
दररोज
केळदला वरती बाजार भरतो तेंव्हा वेल्ह्यामधून गाड्या वर जातात पण आज
शनिवार असल्याने तिथला बाजार बंद असतो, त्यामुळे एकही गाडी वर जात नाही.
आम्ही नाष्टा करून पुढे निघालो. जीप्स वाल्यांना विचारलं. त्यांनी आम्हाला
८००-१००० रुपये घेऊ असे सांगितले. आम्ही क्षणाचाही विलंब न करता त्यांना
नाही म्हणून चालत केळदच्या मार्गे निघालो. आता ठरवलं अगदी ट्रेक नाहीच करता
आला तर मढेघाट पर्येंत जाऊन येऊ. थोडंस पुढे गेल्यावर मागून एक डंपर खडी
भरून येत होता. आम्हाला त्यांनी भट्टी गावाच्या अगदी थोडा अलीकडे सोडलं.
आम्ही भट्टी गावापार्येंत चालत गेलो. तिथे लोकांना विचारलं आम्हाला कोणी वर
सोडू शकेल का. त्यांनी पूर्ण प्रयत्न केले पण आम्हाला तिथेच वात बघत उभ
रहाव लागला. तेवढ्यात मागून एक private xylo गाडी आली. त्यांनी आम्हाला
लिफ्ट दिली ती केळदपर्येंत. अशा तर्हेने आमच्या ट्रेक ची (रेकीची) सुरुवात
झाली.
या
xylo मधले चार लोक एका ठिकाणी फोटो काढायला थांबले, आम्हीही त्यांच्या
सोबत गाडीतुन उतरलो. ते लोकं selfies काढत होते आणि अघोरी प्रकार घडलाच.
selfie च्या नादात त्यांच्या सोबत असलेली मुलगी कठड्यावरून तोल जाऊन १५ फुट
रस्त्यावरून खाली पडली. नशीब चांगलं खाली खुप झाड झुडप होती आणि दगडाच्या
बाजूस ती पडली. निव्वळ झाडांमुळे ती वाचली. म्हणुनच सतत सांगितले जाते की
आपण सुरक्षित ठिकाणी आहोत याची दक्षता घ्यावी आणि मगच बाकीची मजा करावी. हा
सगळा प्रकार घडला तिला व्यवस्थित वर आणलं गेला. थोडस खरचटलं होतं म्हणून
नशीब. आम्ही पुढे निघालो. केळदमध्ये त्यांनी आम्हाला सोडलं आणि त्यांचा
आम्ही तुमचा प्रवास सुखाचा होवो असं म्हणत त्यांचा निरोप घेतला. त्यांना
पुढे मध्ये घात ला जायचं होत.
अश्याप्रकारे मजल दरमजल करत आम्ही १०.५० वाजता केळदला पोहोचलो. आता
केळदपासुन कुंबळे गाव ७ किमी अंतरावर आहे. आम्हाला कुंबळे गावापार्येंत
काहीच वाहन न मिळाल्याने आम्ही कर्णवडीच्या मार्गे निघालो. हा रस्ता म्हणजे
उपांडे घाटाचा रस्ता. केळदपासुन उपांडे घाटमार्गे कर्णवडीला पोहोचायला
साधारण १ तास लागतो. या घाटाचा उपयोग कर्णवडीमधील लोकं अजुनही करतात.
त्यांना लागणारे राशन आणण्यासाठी त्यांना केळदला वर चढुन यावे लागते. अगदी
६० -६५ वर्षांची लोकसुद्धा या गावातुन उपांडे मार्गे वर येताना दिसतात. ही
लोकं मनाने खूपच चांगली व प्रामाणिक आहेत. या लोकांच्या मार्गदर्शनाखाली
आम्ही केळदपासुन कर्णवडीच्या मार्गे लागलो.

आता ११ वाजले होते. आम्ही आमचा ट्रेक सुरु केला. डोक्यावर प्रचंड ऊन होत
आणि हवा सुद्धा खुपच दमट होती. पाऊस अजिबातच नव्हता. या मार्गे थोडंस पुढे
गेल्यावर एक ओढा लागतो. यावर असलेल्या पुलावरून आम्ही चालत पुढे निघालो.
साधारण १५ -२० मिनिटे चालत पुढे गेल्यावर उपांडे घाट सुरु होतो. हा घाट
उतरत सरळ कर्णवडीला जातो. या घाटातुन सरळ खाली बघितल्यावर कोकणाचे उत्तम
दर्शन होते. आता हा घाट उतरायला आम्ही सुरुवात केली. या घाटातुन खाली
उतरताना एक पाण्याचा पाईप आपल्या बरोबर खाली उतरलेला दिसतो. तसेच वाटेत
भरपूर पाण्याचे झरे दिसतात. जे उन्हाळ्यात कदाचित सुकत असावेत. साधारण एका
तासात आम्ही कर्णवाडीस पोहोचलो. येथुन एक वाट सरळ खाली रानवाडीस तर डावीकडे
जाणारी वाट आंबेनळीस जाते. आंबेनळी पासून पुढे वाट आंबे शिवथर आणि कुंभे
शिवथर या गावास जाते.
आम्ही
डावीकडे जाणारी वाट पकडली आणि आंबेनळीच्या दिशेने निघालो. आता दुपारचे
१२.१५ वाजले होते. वाटेत जाताना डावीकडे उपांडे घाटासारखाच एक घाट खाली
येताना दिसतो. या घाटाला जुना उपांडे घाट असे म्हणतात. कर्णवडी मधील
मंदिराचे आम्ही दर्शन घेतले आणि पुढे निघालो. खुप चालत गेल्यावर आम्ही थोडे
चुकलो. दोन मार्ग लागतात एक मार्ग डाव्या बाजूस असलेल्या कड्याकडे जातो,
पण तो मध्येच संपतो. दुसरा मार्ग शेताच्या बांधावरून सरळ आंबेनळीस जातो.
आम्ही परत मागे फिरून बांधावरच्या मार्गे पुढे निघालो. आत्तापार्येंत १
वाजला होता. मध्येच एका शेतात झाडाखाली बसुन आम्ही जेवण केले.
आता
जेवण करून आम्ही पुढे निघालो आंबेनळीच्या दिशेने. पुढे गेल्यावर डावीकडुन
जुन्या उपांडे घाटातुन एक मार्ग आपल्या वाटेस भिडतो. तसेच उजवीकडे एक मार्ग
जातो. आम्ही उजवीकडच्या मार्गाने निघालो पण हा मार्ग नंतर संपुन गुरांच्या
वाटेस लागतो आणि सरळ दरीत उतरतो. आम्ही परत चुकलो होतो. परत मागे फिरून
आम्ही वरून आलेल्या वाटेस लागलो आणि थोड्याच वेळात उजवीकडे एक वाट लागते.
आम्ही ह्या वाटेने सरळ जायला लागलो आणि समोरच खालच्या बाजुस एका दगडावर
बाणाच्या खुणा आम्ह्च्या दृष्टीस पडल्या. आमच्या जिवात जिव आला आणि आता
पटपट पाऊले पडु लागली. अखेरीस आंबेनळी नजरेस आले. साधारण २.१५ वाजता आम्ही
आंबेनळीस पोहोचलो. येथे थोडा वेळ आराम करून आम्ही २.३० वाजता आंबे शिवथर
गावाच्या दिशेने निघालो. आंबेनळी मधील एक कुत्रं आमच्या सोबत वाटाड्या आणि
आमच्या रक्षणाकरिता म्हणुन येत होतं.
३
वाजता आम्ही आंबे शिवथर मध्ये पोहोचलो आणि थोडा वेळ येथे आराम केला. आंबे
शिवथर मध्ये पोहोचतास ते कुत्रं परत आंबेनळीस निघून गेलं. गावातल्या
लोकांशी गप्पा मारल्या. येथुन त्यांनी आम्हाला गोप्या घाटामधुन येणारा
रस्ता दाखवला. त्यांचा निरोप घेऊन आम्ही कुंभे शिवथर गावाच्या दिशेने
निघालो. येथे वाटेतच आम्हाला एक टेम्पो मिळाला. त्याने आम्हाला बिरवाडी
गावापार्येंत सोडले. बिरवाडी पासुन ते ढालकाठीस आम्ही टमटम करून आलो.
ढालकाठी वरून नशिबाने आम्हाला शेवटची (४.१५ वाजता ) पुण्याची बस (खेड -
महाड - पुणे) मिळाली. ही गाडी वरंधा घाटामधुन भोरमार्गे पुण्यास येते.
रात्री ८.३० वाजता स्वारगेटला परत पोहोचुन आम्ही आमच्या ट्रेकची सांगता
केली.
प्रत्येक ट्रेक आपल्याला काहीतरी नवीन गोष्ट शिकवून जात असतो. जर तुम्ही
वेळेचे योग्य नियोजन केले असेल, जर ट्रेक करते समयी तुमचे तुमच्या
चालण्यावर आणि वेळेवर नियंत्रण असेल, ट्रेकला येताना योग्य तेवढी माहिती
बरोबर घेऊन तुम्ही निघाला असाल, तुमच्याजवळ योग्य तेवढा ट्रेकिंगचा अनुभव
असेल, तर कितीही संकट आली तरी तुम्ही त्याच्यावर मात करून तुमचा ट्रेक
यशस्वीरित्या पार पाडु शकता. वेळेवर नियंत्रण असण गरजेचे आहे, वेळेवर
नियंत्रण असेल तर अपोआप पुढच्या गोष्टी जुळत जातात.
No comments:
Post a Comment