Saturday, April 9, 2022

खुट्टेधारा आणि त्रिगुण घाट

 नमस्कार, गेल्या २ वर्षात जी काही भटकंती झाली ती भीमाशंकर या परिसरातच झाली,

या वेळेस मात्र त्याच रस्त्यावर डिंभे धरणाच्या पलीकडल्या बाजूस दुर्गवाडी या गावाच्या इथून कोकणात

उतरणाऱ्या थोड्या अपरिचित आणि कठीण श्रेणी च्या वाटेने कोकणात उतरायचे आणि परत वर यायचे अशी

योजना होती, १७ डिसेम्बर २०१६ ला सकाळी ४:३० ला मुळे  साहेबांच्या घरापाशी जमलो आणि ५ वाजता

नाशिक रस्त्याच्या दिशेने निघालो, 

सकाळची प्रसन्न वेळ आणि रस्त्यावर नसलेली गर्दी या मुळे ६:१५ च्या सुमारास

मंचर मध्ये पोचलो, भूक लागली होती, मंचर बस स्थानक परिसरात काही खाण्याची सोय होतीये का म्हणून

टेहळणी केली परंतु काहीही हालचाल नव्हती, पुढे बघू असा म्हणून मंचर गावातून निघालो गावात एका हॉटेल

मध्ये हालचाल दिसली आणि गाडी थांबली, मिसळ तयार होती, मिसळ आणि चहा अशी ऑर्डर काही

क्षणात आली, सोबत बशी भर कांदा आणि मग भरून सॅम्पल, आमचा नाशिकचा मित्र बेहद खुश झाला आणि

त्याला बेडेकर मिसळ वाल्याचा उद्धार करण्यावाचून राहवले नाही, सोबत चहा पण आला पण चहा काही पसंत

पडला नाही, असो दुसरीकडे घेऊ म्हणून दुसरी कडे तसाच चहा मिळाला आणि नाशिकचा मित्र काहीसा नाराज

झाला पण पर्याय नसल्याने तसेच पुढे निघालो. 

 वाटेत शाळेत जाणारी मुले लिफ्ट मिळेल का म्हणून थांबली होती, त्यांना जुन्नर फाट्या पर्यंत सोडले आणि आम्ही डिंभे धरणाच्या भिंतीच्या दिशेने निघालो धरणाच्या भिंतीच्या इकडून एक रस्ता आहे असा अभ्यास गुगल मॅप वर करण्यात आला होता परंतु तो काही सापडला नाही शेवटी विचारत विचारत निघालो वाटेत एक मामा म्हणाले इकडून कशाला आला जुन्नर मार्गे यायचे होते पुढचा रस्ता खराब आहे तुमची गाडी जाणार नाही अशी भीती दाखवली, आम्ही ठरवले पुढे जाऊन पाहू आणि मग ठरवू म्हणून निघालो रस्ता सांगितला तेवढा काही खराब नव्हता ट्रॅक्स आणि अन्य गाड्या जाऊन बऱ्यापैकी रुळला होता आणि साधारण ४ ते ५ कि मी एवढाच खराब रस्ता होता. 

 सुटकेचा निश्वास टाकून ९ वाजे पर्यंत दुर्गवाडी मध्ये पोचलो, गावकरी जमा झाले एकांच्या घरा समोर गाडी लावली आणि आमची योजना सांगितली खुटेदरा मार्गे उतरायचे आणि डोणीच्या दाराने वर यायचे, गावकर्यांना काही पटेना त्यांच्या दृष्टीने या गोष्टीला २ दिवस कशाला पाहिजेत एका दिवसात परत येऊ, परंतु आमच्या दृष्टिने ते शक्य नव्हत, अखेरीस यशवंत पारधी यांच्या बरोबर सौदा पक्का केला आणि निघालो.

समोरच दुर्ग किल्ला दिसत होता.

उजव्या बाजूला ढाकोबा किल्ला दिसत होता

दुर्ग किल्याच्या बाजूने पठारावरून वाट जात होती

वाटेत आग्या माशांचे मोहोळ एक्सप्रेस वे ने निघाले होते, त्यामुळे १० मी बाजूला थांबून निघालो.

 १५ ते २० मी चालल्या नंतर खुटेदरा उतरायला सुरवात केली, ३००० फूट खाली इथून उतरायचे आहे, क्षणभर विचार आला जमेल कि नाही, नजर फिरेल एवढी खोल दरी दिसत होती.

अनेक ठिकाणी बसत बसत दगडांचा आधार घेत हळू हळू उतरत होतो, गावातल्या लोकांनी निघताना आमच्या वाटाड्या ला सावकाश घेऊन जा रे असा निरोप का दिला ते आता लक्षात आले.

आमच्या तिडके साहेबाना प्रत्येक अवघड ठिकाणी विचारले हाच का सगळ्यात कठीण टप्पा जिथे खुट्टा आहे, तिडके साहेब म्हणायचे हा नाही :)

अखेरीस खुट्टा असलेला तो टप्पा आला, हात आणि पाय यांच्यावर जोर देऊन ते दुखायला लागले होते.

    अखेरीस हा टप्पा पण पार पडला, आणि खुटेदरा नाव का पडले असेल हे पण लक्षात आले, खालील फोटो मध्ये आलेली झाडाची खुंटी दिसत आहे

कठीण टप्पा पार पडल्या नंतर थोडी विश्रांति आणि पोटपाणी

आता उतरायचा कठीण टप्पा पार पडला होता, आमच्या वाटाड्याने पुढचा थांबा आता पाण्यापाशी घेऊ या , जवळच आहे म्हणून आम्ही पण लगेच निघालो, आता निसरडी वाट होती आणि पाय आणि मांड्या दुखायला लागल्या होत्या, मला सगळ्यान बरोबर वेग संतुलन ठेवणे कठीण जात होते, अखेरीस वाटेत मी १ थांबा घेतला, पाणी पिऊन थोडा ताजा तवाना झालो, खरं  तर थकवा असा आला नव्हता, मात्र मांड्या आणि पायाची बोटं खूप दुखत होती त्यामुळे चालणे अवघड झाले होते.

शेवटी ४५ मि चालल्या नंतर अखेरीस पाण्याचा ओढा आला आणि जेवणाचे डबे उघडले, भरपेट जेवण झाल्या नंतर जागीच आडवे झालो आणि मस्त २ तास विश्रांती घेतली, वेळ दुपारचे १:१५मि.

मस्त विश्रांती घेतल्या नंतर पुढे निघालो ते रामपूर गावात मुक्काम करायला, पटापट उतरून खाली आलो व खुटेदरा  घाटाचे खालून फोटोशूट केले.

खालून पाहिल्यावर वाटत पण नव्हते कि आपण एवढ्या वरून कसे काय आणि कुठून उतरून आलो, रामपूर गावात आमच्या वाटाड्या मित्राचे नातेवाईक होते त्यांच्या घरी गेलो त्यांनी मस्त चहाची सोय केली, त्यांच्या कडे थोड्या गप्पा झाल्या आणि आमचा मुक्काम जिथे करायचा होता तिथे गेलो.

रामपूर गाव बऱ्यापैकी मोठे आहे, भ्रमणध्वनी ला पूर्ण रेंज  आहे आणि विशेष म्हणजे गाव स्वच्छ आहे. वाटेत एका सर्पाने दर्शन दिले, त्याचा फोटो घेई पर्यंत साहेब पसार झाले.

तानाजी मामांच्या घरी साधारण ५:३० ला पोचलो असू, त्यांच्या कडे परत एकदा चहा झाला आणि अंगणात बसून सूर्यास्त पहिला त्याच्या सोबतीला गोरख आणि मछिंद्र गडाचे सुळके दिसले.

तानाजी मामानं बरोबर नोटबंदी आणि थोड्या दिवसांपूर्वी गावात दहशत माजविणाऱ्या बिबटया या विषयांवर भरपूर गप्पा टप्पा झाल्या.

रात्रीचे ८ वाजले असतील डोळ्यात झोप अनावर होत होती आणि पोटात भूक पण लागली होती आणि तेवढ्यात मिसेस तानाजी नि जेवायला वाढू का विचारले, साधा सोपा पण चवदार बेत होता, ९ वाजता जेवण झाले आणि स्लिपींग बॅग आणि कॅरीमॅट यांच्या वळकट्या सोडल्या आणि अंग टाकून दिले, आपसूक १०, १०:३० च्या सुमारास झोप लागून गेली. मध्यरात्री ३ वाजल्या पासूनच कोंबडे केकाटत होते त्यामुळे मधेच जाग आणि झोप अशा अवस्थेत ६:३० ला उठलो, कोरा चहा घेतला आणि आवरा आवरी करून सकाळी ७:३० च्या दरम्यान डोणीच्या दाराच्या दिशेने मार्गस्थ झालो.

  मुख्य वाटेवर लावून द्यायला सोबत तानाजी मामा पण आले होते, वाटेत त्यांचे शिकारी कुत्रे पण सोबतीला आले, १ तास पायपीट केल्या नंतर तानाजी मामा म्हणाले आता हि वाट सोडायची नाय !

आमच्या वाटाड्याला ४ समजुतीचे शब्द सांगून मामा निघून गेले. (सावकाश ने, घाई करू नको, पोरं फोटो काढत्यात त्यांना फिरव सगळीकडून)

आता सपाट पाऊल वाट संपून चढणीची वाट सुरु झाली होती, दम लागायला सुरवात झाली होती, दर ४ पावलांनी थांबावेसे वाटत होते

आता चढण अंगावर यायला लागली होती, दम खात, पाणी पित  सावकाश चढ चढत पुढे पुढे सरकत होतो, आता वाट अशी दिसत नव्हती, मोठा ओढ्याचा रस्ता लागला, तिथेच थोडीशी विश्रान्ती घेतली आणि पुढे निघालो.

 वाटेत ओढ्यातील एका ठिकाणी पाणी दिसले, तेवढ्यात आमच्या तिडके साहेबानी हाकाट्या सुरु केल्या, अरे इकडे या हे बघा AMK (अलंग, मलंग  आणि कुलंग) इथून हे कसे दिसतील या विषयावर चर्चा झाली आणि GPS सुरु करून खात्री केली, डोणीच्या  दाराच्या इथून  अलंग, मलंग ,कुलंग, आजोबा, सीतेचा पाळणा, कळसुबाई, जीवधन अशी मोठी रांग साध्या डोळ्यांनी दिसत होती, पण कॅमेरा साठी जरा अवघड होती त्यामुळे फोटो मध्ये नीट दिसत नाहीये.

वाटेत डोंगरांच्या कपाऱ्यांमध्ये आग्या मधमाशांची पोळी दिसत होती, वाटेवर सर्व कारवी सारखी फुले फुलली होती आणि त्यांचा मध शोशायला आग्या माश्या घोंगावत होत्या.

आता खिंड जवळ यायला लागली होती चढण संपून कधी एकदा पठारावर येतो आहे असे झाले होते, अखेरीस वरती पोचलो.  

आता डोणीच्या दारा पासून दूर्ग वाडी पर्यंत चालत जायचे होते, फार चढणीची वाट नसली तरी दुपारचे १२ वाजून गेलेले आणि अजून साधारण १ ते १.५ तास चालायचे होते.

मधेच कच्चा गाडी रस्ता लागला

आता दुर्गवाडी जवळ येऊ लागले होते, दुर्गवाडीच्या आधी एका ठिकाणाहून खालील दृश्य दिसत होते, अनेक किल्ले आणि डोंगर रांगा दिसत होत्या, पुढचा दौरा कदाचित तिथल्याच एखाद्या ठिकाणी असेल आणि तिकडून हे डोणीचे दार पाहायला मिळेल

अखेरीस २ च्या सुमारास, दुर्गा देवीच्या मंदिरा पाशी पोचलो, बाहेर एक विहीर आहे तिथे हात पाय धुवून मंदिरात गेलो आणि थोडा वेळ विश्रांती घेऊन आमच्या वाटाड्याच्या घरापाशी गाडी लावली होती तिथे पोचलो, वाटाड्याचा निरोप घेतला आणि जुन्नर मार्गे जायचे का डिंभे मार्गे या वर चर्चा केली आणि डिंभे - मंचर - राजगुरूनगर मार्गे अशक्य बेशिस्त गर्दीतून पुण्यात पोचलो. 

वेळ रात्री ९:३०..............................................................समाप्त !

 

http://barvekedar.blogspot.com/2016/12/blog-post.html

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...