Tuesday, April 12, 2022

भिरा घाट- अंधारबन - सावळघाट - देवकुंड...


शोध भिरा धरणाजवळील घाटवाटांचा 
सहयाद्री मध्ये आजपर्यंत खूप फिरलो पण घाटवाटा करण्याची इच्छा मनात सारखी सलत होती. त्याच वेळी दिपकने अचानक बॉम्ब टाकला घाटवाटा करायला येतोस का लागलीच हो बोलून टाकलं शुक्रवारी ऑफिस ची काम संपून मी आणि दीपक कोपरखेरनेला विश्रामच्या घरी पोहचलो... दीपक जेऊन आला नव्हता त्यामुळे आम्ही जेवायला जवळच्या हॉटेल मध्ये गेलो आणि आमच्या गप्पा रंगल्या. रात्री १२ वाजता आम्ही जेवण करून घरी आलो आणि आता झोपूया ठरवून पडलो पण दिपकची बडबड काही कमी होत नव्हती (या गप्पांमध्ये केदार जाधव पासून ते बुडबुडे पर्यंत सर्व विषय आले :P). .३० ला झोपून सकाळी वाजता उटायचा ठरला होत पण चे झाले... पटापट आवरून घराबाहेर पडलो बाहेर येऊन टपरीवर चहा घेतली आणि पनवेल चा रस्ता धरला आधीच उशीर झाला होता त्यामुळे गाड्या सुसाट चालू होती.. ती पण ट्रिपल सीट पनवेल वरून खोपोलीला आणि थंडी ने आपण आहोत याची जाणीव करायला सुरवात केली होती. खोपोली पाली रस्त्याला लागलो तसा गाडीचा वेग कमी होत गेला... थंडी, मध्येच रस्त्यावर धुकं आणि त्यात थोडी भर म्हणून खड्डे दर मजल करत आम्ही पाली ला पोहचलो, लांबूनच बल्लाळेश्वरच दर्शन घेऊन नेहमीच्या हॉटेल ला पेटपूजा केली.. जास्त टाइमपास करता आम्ही पाली रवाळजे भिरा रस्ता धरला... भिरा गावात पोहचलो तेव्हा वाजले होते.. गाड्या तिथेच ठेऊन आम्ही भिरा डॅम चा रास्ता धरला पुढे गेल्या वर समजला कि डॅम वरून जायला परवानगी नाही.. तिथे उभा राहून थोडी ओळख काढली आणि ते काका जरा जास्तच ओळखीचे निघाले आणि त्यांनी आम्हाला जायला परवानगी दिली...
भिरा धरणाकडे वाटचाल

भिरा धरण
आता आमचा खरा ट्रेक चालू होणार होता.. . ३० होऊन गेले होते आणि आम्हाला ११. ३० ला हिरडी गावात पोहचायचं होता.. सूर्याजी रावाणे आपला अस्तित्व दाखवायला सुरवात केली होती. वाटेत हिर्डी गावातील एक मामा भेटले ते पण हिर्डीला जाणार होते.. त्यांच्या बरोबर गप्पा चालू झाल्या आणि दीपक ने प्रश्नावली चालू केली आणि त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत चालला होता आम्ही विडिओ आणि फोटो मध्ये रमलो होतो...
भिरातून हिर्डी गावाकडील वाट 


  गप्पा चालू असताना मामा कडून समजल कि या वाटेवर एका ठिकाणी पिण्याचे पाणीचा छोटासा झरा आहे आणि ते पाणी मे महिन्यात पण असत.. तसा आमचा बैल (विश्राम ने ठेवलेला नाव :p) मामा सांगून पाण्याच्या वाटेवर घेऊन निघाला आणि त्याच्या मागे आम्ही दोघे.. अर्धी वाट चढून वर आलो वाटेत एक मोठा कातळ लागतो तिथून थोडे पुढे गेलो कि वाट थोडी वाकडी करून डाव्या हाताला जाते (आम्ही गेलो होतो तेव्हा वाट नव्हती मामा असल्यामुळे आम्ही तिथे पोहचलो).. आम्ही पाण्याच्या झऱ्या जवळ पोहचलो पण पावसामुळे जिथे माती साचून तो झरा पूर्ण भरला होता पण झरा चालू होता... मामाने त्यांच्या मधली माती कडून साफ केला त्यामुळे पाणी आता त्या खळग्यामध्ये राहायला सुरवात झाली होती.. या पुढे कोणी येईल त्यांना पाणी मिळेल असा मामा बोलत निघाले आणि त्यांच्या मागे आम्ही १०मिन मध्ये आम्ही परत वाटेवर आलो. या वाटेवरचा हा एकच पाण्याचा श्रोत जो बारा महिने असतो.

पाण्याच्या झऱ्याकडील वाट 
आता मध्ये थांबायचं नाही असा ठराव पास करून वाट धरली.. ती वाट चालून वर आल्यावर वाटेत पायऱ्या लागतात आणि तिथूनच खाली भिरा डॅमचा अवाढव्य पसारा पाहायला मिळतो... आता हवेत थोडा गारवा आला होता आणि आमचा चालायचा वेग वाढला होता... पायऱ्या पासून थोडं पुढे गेल्यावर एक वाट नागशेत गावातून वर येते ती वाट म्हणजे गाढवलोट घाट 

 डावीकडे नागशेतला उतरणारी गाढवलोट घाटवाट 
सरळ जाणारी वाट हिर्डी गावाकडे
तिथून काही वेळेतच आपण हिरडी गावात पोहचतो. सह्याद्रीच्या ऐन खांद्यावर हे हिरडी गाव वसले आहे. कधी न पाहणारे जनावरे गावात येत आहेत बघून कुत्र्याने कोणी तरी नवीन येतोय याची बातमी घरात असलेल्या काकांना दिली आणि काका बाहेर आले... आम्हाला बगताच या रे पोरांनो बसा आज परत आलात बोलत घरात आवाज दिला आणि पाणी आणायला सांगितला.. काकांची ओळख अशी कि गेल्याच रविवारी गाढवलोट घाट केला होता तेव्हा पण तिथेच थांबलो होतो आणि त्यावेळी काकांनी एक किटली भरून ताक पियाला दिल होत असो.. पाणी पिऊन आम्ही गावाच्या बाहेर महादेवाचं पांडव कालीन मंदिर आहे तिकडे निघालो...१०-१५ मिनिटात मंदिराच्या समोर आलो, मंदिराच्या समोर एक तलाव आहे. (ज्याला आपण पुष्करणी बोलू शकतो पण आता ते पूर्ण मध्ये मातीने भरला आहे ). 
हिर्डी गावातील पांडवकालीन मंदिर 


मंदिराच्या बाहेर एक मोडी लिपीत शिलालेख आहे पण तो नीट वाचता येत नाही... मंदिर मध्ये महादेवाची मूर्ती, पिंडी आणि बाहेर नंदी आहे.. मंदिरात शिरावं त्याचा डाव्या हाताला पाण्याचं टाक आहे त्या मधल पाणी पिण्यायोग्य आहे... मंदिराचे फोटो घेऊन तिथेच पोट पाणी केला.. एव्हाना १२ वाजले होते सूर्याजी राव डोक्यावर येऊन थांबले होते..बॅगा भरून आम्ही लगेच निघालो पुढे अंधारबन घाट पार करून आम्हाला पिंपरी तलावा जवळ निघायचे होते... 
अंधारबन घाट


अंधारबन हा तसा सर्व पावसामध्ये करतात पण आम्हाला थोडी मस्ती म्हणून आम्ही हा उलटा प्ल्यान केला होता... अंधारबन घाट हा कसा आहे ते आता पर्यंत सर्वांनाच माहित असेल त्यामुळे त्या बद्दल जास्त लिहायचे टाळतो..अंधारबन मधून खाली भिरा आणि कुंडलिका दरी पाहण्यासारखी आहे.. 



फोटोस आणि व्हिडिओस घेऊन तब्बल २ तासात आम्ही पिंपरी तलावाजवळ पोहचलो... हिरडी अंधारबन ते पिंपरी तलाव हा प्रवास खूपच शांत आणि रम्य होता. भयाण शांतता होती. कुंडलिका पॉईंट वरून कुंडलिका दरी आणि आजूबाजूचा परिसर बघुन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.. 

कुंडलिका दरी  
४-५ किलोमीटर डांबरी रोड वर चालत पुढे परातेवाडी गाठायची होती.. पण मध्येच एक ट्रक वाले दादा भेटले आणि त्यांचा सोबत आमचा प्रवास सुरु झाला.. भर उन्हात ट्रक ने सवारी करायची मज्जा वेगळीच होती.. ड्रायव्हर दादा ने विचारला कुठे चाललात आणि आम्ही आमचा प्ल्यान त्यांच्या समोर सादर केला आणि त्या दादांनी डोळे मोठे केले आणि गप्प गाडी चालवायचा सुरवात केली.. 
पराटेवाडीतून सावळघाट वाटेला लागताना 


परातेवाडी ला उतरून परत भेटू बोलून आम्ही गावात शिरलो...गावात वाट कशी आहे विचारणा केली. कोकणात उतरण्यासाठी गावकऱ्यांना ताम्हिणीघाटाच्या गाडी रस्त्याची सोय असल्याने, सावळघाटाची पाऊलवाट अजिबात वापरात नाही. परातेवाडीतून बाहेर पडत पठारावरून पश्चिमेला सह्यधारेकडे उतरत निघालो. घड्याळात २:३० झाले होते.. माळावरच्या करवंदीच्या जाळीमधून बाहेर पडत एका धारेवर आलो आणि आम्ही नक्की कुठे आलो आहोत याचं दृश्य उलगडू लागलं. तिथे घाट उतरायची वाट शोधायला लागलो आणि मग सोबत आणलेल्या माहिती वाचू लागलो तेव्हा समजला कि आपण चुकीच्या धारेवर आलो आहोत... मग तिथून परत परातेवाडीच्या मागे येऊन दुसरी धार पकडून वाटेवर आलो.. दगडावर दगड ठेवलेली दिसली आणि आणि आपण आता बरोबर आहोत यांची खात्री झाली... एव्हाना या मध्ये तास निघून गेला होता... 
सावळघाट वाट

देवकुंड आणि आजूबाजूचा परिसर 
घाट उतरायला सुरवात केली तेव्हा ३:३० झाले होते. वाट गवताने पार बुझून गेली होती थोडी शोधा केली आणि भेटली यावेळी किल्ल्यानपेक्ष्या घाटवाट शोधण्यात काय मज्जा आहे हे यावेळी कळलं.  डोगंराच्या मध्यावर उभे राहून खाली कोकणातला भिरा धरणाचं पाणी चमकत होत. 
भिरा धरण 

Add caption
किंचित उजवीकडे तिरकं उतरत गेल्यावर समोर उभ्या कातळ तासून खोदलेल्या कातळकोरीव पायऱ्यांची माळ पाहून थरारून गेलो. 
बुजलेल्या पाण्याच्या टांक्या

 कोरलेल्या पायऱ्या 
 पुढे आलॊ तर उथळ खोदाईचं आणि कातळाच्या पोटात खोदत नेलेलं टाकं. टाक उघड असल्याने पाणी पिण्यायोग्य नाहीये... टाक्याच्या पलिकडे कातळातून उतरण्यासाठी पुन्हा उभ्या पायऱ्या खोदलेल्या. पायऱ्या उतरून खिंडीत आलो. आता वाट अशी काहीच नाही 
पाण्याच्या टांक

कोरलेल्या पायऱ्या


दिप्या झाडीच्या गचपणात घुसत आणि वाट पुढे आहे सुनिश्चित करत असे वाटेवर प्रचंड घसारा होता. थोडी सुरुवातीला अरुंद बेचक्यातून दगडातून उभी उतरंड उतरणारी पुसट वाट खाली गेली होती. मध्ये मध्ये पिवळ्या ऑईलपेंटने रंगवलेले दिशादर्शक बाण दिसत होते. 

दिशादर्शक बाण  
काट्या-कुट्यातून वाट काडत उतरत जात होतो. घसाऱ्याने आणि उभ्या उताराने उतरताना पाय घसरला आणि आमचा HTC RE कॅमेराने जीव सोडला. तसाच गप्प बॅग मध्ये टाकून पुढे निघालो... खिंडीतून उतरायला लागल्यापासून तासाभराने सावळ घाटाची घळ थोडी रुंद झाली. आणि समोर उजच्या बाजूला पाण्याचं टाकं (दुतोंडी टाकं) पूर्ण भरलेलं. 
दुतोंडी टाकं
समोर अंधारबन आणि नावजी सुळक्याच दर्शन होत होत सकाळी हिरडी मध्ये थोडा नाश्ता करून निघालो होतो त्यामुळे आता पोटात कावळे ओरडू लागले होते.. पाण्याच्या टाक्याजवळच बॅगा टाकून पोटाची भूक भागवायची ठरवला... पोट पूजा करून आणि थंड गारेगार पाणी पिऊन झोपायचा मूड झाला होता पण आमच्या कडे टाईम खूप कमी होता आणि पुढची वाट कशी आहे याची आम्हांला कल्पना नव्हती त्यामुळे झोपेचा मोह आवरून पाणी भरून पुढे निघालो . 
अंधारबन घाटाचं दर्शन 
समोर कुंडलिका दरी आणि अंधारबन घाटाच्या कड्यांचं विलक्षण सुरेख दर्शन होत होतं. उभ्या उतारावरून उतरून उतरून पाय दुखायला लागले होते. घळीतल्या (दुसऱ्या) पाण्याच्या टाक्यापासून निघाल्यावर अजून एक तास उतरलो आणि आम्ही कुंडलिका दरीच्या तळाशी पोहचलो... दोन तासांची उतराई करून आम्ही नदीच्या पात्रात आलो. 
टाक्यापासून पुढील वाटचाल 
इथून पुढे आम्हाला पात्रातूनच वाटचाल करायची होती. एव्हाना संध्याकाळचे ६:१५ वाजले होते. अजून भिरा गाव गाठायचे होते नदीच्या काठातुन वाट काढत मोकळ्यावर आलो. अंधार जास्त झाल्यामुळे देवकुंड ला परत कधीतरी भेट देऊ असा बोलत आम्ही तिघांनी मागे वळून पाहिलं सह्याद्रीचे उंचच उंच कडे पाहून भारावून गेलो. सह्याद्रीच ते मोहक रूप मनात साठवत पुढे धनगर वाड्यात आलो. गरमा गरम चहाचं डोस घेत असताना दिप्या आपण कुठून चढाई केली आणि कुठून उतराई हे सांगत होता. तसाच पुढील प्लॅन बद्दल चर्चा करता करता भिरा गावाची वाटचाल करू लागलो. एका झऱ्यावर थोडं फ्रेश होऊन भिरा गावात एन्ट्री केली देवकुंड वरून आलेल्या पर्यटक लोकांनमधून वाट काढत गाडी जवळ आलो. दिप्यानं अजून दोन घाटवाटा येथून उतरतात असे सांगितले लगेच पुढील वेळी त्या नक्की करू ठरवत गाडी सुसाट पालीकडे वळवली. गाडी चालवताना दिवसभराची वाटचाल डोळ्यासमोर आली. खोपोली पनवेल करून विश्रामला वाशीला ड्रॉप देऊन अंधेरी गाठायला १०:३० वाजले. दिप्याला घरी सोडून घरची वाट धरली खरं पण मन मात्र त्या घाटवाटा वरच अडकून पडलं होत.

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...