http://barvekedar.blogspot.com/2016/03/whats-app-group.html
एक जंगी ट्रेक असंच खर तर याला म्हणायला पाहिजे, १४, १५, १६ आणि १७ ऑगस्ट २०१४ या जोडून
येणाऱ्या सुट्यांवर आम्हा ट्रेकर मित्रांचे १ महिना आधी पासून लक्ष होते, साधारण इतर सर्व ट्रेक ३,४ दिवस
आधी ठरतात परंतु जास्तीत जास्त जणांना येता यावे त्यामुळे साधारण १ महिना आधी याची तयारी झालेली,
सर्वात प्रथम Whats App Group स्थापन करण्यात आला, आणि तयारीला सुरवात झाली आणि नाशिक
जिल्ह्यात भ्रमंती करायची असा निर्णय झाला, नाशिक जिल्ह्यातील साल्हेर , सालोटा, मुल्हेर, मोरा, हरगड,
न्हावी आणि तांबोळ्या असे ७ किल्ले निवडले गेले, आणि ८ जणांचा संघ अंतिम झाला, त्यातला एक खेळाडू
आम्हाला १५ ऑगस्ट च्या सकाळी येउन मिळणार होता.
पुणे - नाशिक रस्त्याची अवस्था आणि गर्दी याचा विचार करता १४ ऑगस्ट ला पहाटे ४
वाजता पुण्यातून निघायचे ठरले, आणि काय आश्चर्य ४:१५ च्या ठोक्याला सगळे जण ठरलेल्या ठिकाणी हजर,
माझ्या मते सगळ्यांना पुणे - नाशिक रस्त्यांनी प्रत्येकाला चांगलाच हिसका दाखवलेला असल्याने सगळे जण
वेळेत उपस्थित झाले असावेत, ४:१५ ला २ गाड्या सदाशिव पेठेतून मार्गस्थ झाल्या, अजून एका मित्राला पिंपरी
मधून घ्यायचे होते, त्याला सोबत घेऊन गाड्या ५ च्या सुमारास नाशिक महामार्गा वर होत्या, सुरवात तर
खूपच चांगली झालेली, पहाटेची वेळ असल्याने रस्त्याला शुन्य गर्दी होती, ६:३० च्या सुमारास नारायणगाव
गाठले आणि बस थांब्या समोर गाड्या चहा साठी थांबल्या आत्ता उजाडले होते, नारायणगाव जागे होत
होते, ७ जणांच्या संघातले काही जण एकमेकांना अपरिचित होते त्यामुळे चहा बरोबर ओळखीचा कार्येक्रम
झाला त्यानंतर नाशिक गाठायला अजून किती वेळ लागेल, त्यानंतर साल्हेर किल्ल्याचा पायथा म्हणजेच
साल्हेरवाडी गाठायला किती वाजतील आणि मग आपण एकाच दिवशी साल्हेर आणि सालोटा करू शकू या
वर चर्चा सत्र रंगले शेवटी साल्हेर वाडीत पोचायला किती वाजतायत त्यानंतर ठरवू असा निष्कर्ष निघाला
आणि निघालो, जसे नाशिक जवळ येउ लागले तसे भुकेची जाणीव होऊ लागली आणि आमचे कर्णधार (नितीन
तिडके) मुळचे नाशिक चे असल्याने ते ज्या गाडीत होते ती गाडी जागा देऊन पुढे करण्यात आली
आणि त्यांच्या मागे मागे माझी गाडी निघाली फोना फोनी करून आता नाष्ट्या साठी थांबा असे फर्मान
काढण्यात आले, परंतु कर्णधार गाडी थांबूच देत नव्हते नाशिक च्या छोट्या मोठ्या रस्त्यांवरून जात
जात अखेरीस गाडी उपहारगृहा पाशी थांबवली ९:१५ झाले असतील, आम्ही साधारण ४:३० तासात पुणे -
नाशिक प्रवास पूर्ण केला होता, कर्णधार गाडीतून उतरत म्हणाले नाशिक मध्ये आलो आहोत त
नाशिकची मिसळ खाऊनच पुढे जाऊयात, मला कमळगड ची आठवण झाली अशीच मिसळ खाऊन गड चढताना
झालेली वाताहात आठवली आणि खावी कि नाही असे विचार सुरु झाले परंतु……मिसळ ती मिसळच
नाश्ता पाणी उरकून पुढे निघायला १०:३० झाले असतील, आत्ता सटाणा गाठून तिथुन पुढे तहरांबाद
मार्गे साल्हेर वाडी गाठायची असा साधारण मार्ग ठरला होता, Google Maps मी बघितलेले त्या नुसार पुणे ते
साल्हेर वाडी हे अंतर ३१८ ते ३३० कि.मी दाखवत होते, आत्ता दुपारचा १ वाजला होता आम्ही सटाणा मध्ये
होतो आणि अजून ५० ते ६० कि.मी अंतर कापायचे होते, आत्ता सगळेच जण कंटाळले होते पहाटे ३ पासून
सगळे जागे होते, आणि आम्ही साधारण ३०० कि.मी अंतर कापून झाले होते. सगळीकडे वेग वेगळ्या
आकाराचे डोंगर दिसत होते, प्रत्येक डोंगर कुठला तरी किल्ला असेल असेच त्यांचे आकार होते, अखेरीस
२:३० च्या सुमारास आम्ही साल्हेर वाडी कडे जाणाऱ्या रस्त्याकडे निघालो सुरवातीलाच एक पाटी दिसली
घाट रस्त्याचे काम चालू असल्याने साल्हेर वाडी येथे जाणारा रस्ता बंद आहे, जुनी पाटी असेल अशी
स्वतःच्या मनाची समजूत घालत गाड्या हाकल्या, आणि अखेरीस पाटी खरी निघाली आणि आमच्या वाहनांना
वाघांबे गावात ब्रेक लागला कारण पुढे घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. साल्हेर गाव अजून ६ कि.मी
होते,
गावात पोचलो तेंव्हा २:१५ झाले असतील, पावसाची चांगली सर आली होती, वाघांबे गावातील एकांच्या
दारातच गाड्या उभ्या केल्या, वाघांबे गावातून गडावर जायला साधारण ३ तास लागतील असे समजले, आणि
साल्हेर गावातूनच जायचे असेल तर दुसऱ्या रस्त्याने ४० कि.मी अजून जायला लागणार होते म्हणजे अजून १
तास गाडीतून प्रवास, वाघांबे गावातूनच वाटाड्या घेतला आणि ३ च्या सुमारास चालायला सुरवात केली, साल्हेर
आणि सालोटा दोन्ही गड ढगात गेलेले, दोन्ही गडांच्या मध्ये एक खिंड दिसत होती त्या खिंडीच्या वाटेला
लाऊन देऊन आमचा वाटाड्या परत फिरणार होता, चालायला सुरवात केलीच तो वाटेत एक ओढा लागला बूट
काढून जाण्याशिवाय पर्याय नव्हता पण कंटाळा आलेला त्यामुळे तसेच पाण्यात शिरलो, बूट मोजे गच्च ओले
झाले, थोडेसे चढून वर आलो पाठीवर ओझे होते, त्यामुळे दम लवकर लागत होता, २ मी थांबून आजूबाजूचा
प्रदेश न्याहाळला, शेतीची कामे जोरात सुरु होती.
दोन्ही किल्ले ढगातच होते, सालोट्या वरचे ढग अधून मधून कमी जास्त होत होते, परंतु साल्हेर किल्ला पुर्ण
ढगातच होता, ५४४१ फुट आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला अजूनही पूर्ण दिसत नव्हता. गड चढायला
सुरवातच उशिराने झाल्याने, जरा वेगाने पावले उचलायचा सर्व जण प्रयत्न करत होते.
आत्ता जरा चढाई सुरु झालेली आणि उन्ह पावसाचा खेळ सुरु होता, त्यामुळे सारख जर्किन काढायला लागत
होते आणि पाउस आला कि परत काढायला लागत होते, आत्ता चढ संपून थोडी सपाट वाट सुरु झालेली, सोबत
आलेला वाटाड्या इथून परत फिरला आणि आम्ही मागे राहिलेल्यान साठी थोडे थांबून निघालो.
आजूबाजूचा प्रदेश न्याहाळून घेतला, थोडे फोटो काढले
आत्ता ढग काही क्षणांसाठी बाजूला झाले होते आणि समोर सालोटा किल्ला दिसत होता
तेवढ्यात साल्हेर वरती सुद्धा थोडेसे ढग कमी झाले……………
समोर दोन्ही किल्ल्यांच्या मध्ये असलेली खिंड दिसत होती, त्या खिंडीतूनच साल्हेर आणि
सालोटा किल्ल्यावर जायची वाट वेगळी होते, वेळ भरभर पुढे जात होता, जसे जसे खिंडीच्या जवळ जात होतो
तसा वारा आणि पाउस याचा जोर वाढत होता, खिंडीच्या थोडेसे अलीकडे थांबून सगळे आल्याची खात्री केली
महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्यावर चढायला निघालो, आता पाउल वाट सुरु झालेली ती तशीच हळू हळू वर
चढत कातळात खोदलेल्या पाय्र्यान पर्यंत पोचलो, एक एक पायरी चांगला दम काढत होती,
वर
पोचलो तसा पावसाचा जोर वाढायला लागलेला आणि अंधार पडायला सुरवात झालेली,
पाउस, अंधार आणि ढग या मुळे आमचा ज्या गुहान मध्ये राहण्याचा बेत होता,
त्याच्या शोधात निघालो, मुख्य दरवाजातून आत मध्ये गेल्या नंतर डाव्या
हाताला अनेक छोट्या गुहा होत्या पण त्या मधली एक पण राहण्याच्या सोयीची
नव्हती.
अंधार वाढायला लागला होता, या पूर्वी जाऊन आलेल्या मंडळीचे अंदाज बांधायला सुरवात झाली, डाव्या
बाजूला का उजव्या बाजूला असे करत अखेरीस गुहा दिसली, लांबून पहिल्या वर गुहांचे ३ भाग दिसत होते,
खूप मोठी आहे असे वाचले होते आणि साधारण तसे दिसत पण होते, गुहेच्या सर्वात डाव्या भागात थोडी
हालचाल दिसली म्हणून जाऊन पहिले तर अनेक गायी म्हशी त्या भागात दाटी वाटीने बांधून ठेवल्या होत्या,
त्यामुळे तो भाग सोडून दिला, मधल्या भागातून आत शिरलो तर त्या भागात पण बैल, गायी, बकऱ्या
बांधलेल्या
होत्या आणि त्यांनी सर्व गुहेत खूप घाण करून ठेवलेली आत्ता तिथूनच
गुहेच्या आतल्या बाजूस थोडीशी रिकामी जागा होती, आणि त्यावर एक चौथरा
होता, त्या चौथर्या वर एक गुराखी मस्त आराम करत पहुडला होता आणि त्याच्या
आजूबाजूला उरलेल्या जागेत त्याने बकर्यांची पिल्ले (कोकरू ) बांधून ठेवलेली
त्यांनी पण उरलेल्या रिकाम्या जागेत घाण करून ठेवली होती, व थोड्याश्या
रिकाम्या जागेत आत्ता आम्ही उभे होतो कि आत्ता काय करायचे बाहेर अंधार पडत
आलेला आणि पाउस वाढायला लागलेला शेवटी आमच्या कडची वर्तमान पत्रे बाहेर
काढली आणि उरलेल्या जागेत पसरली आणिएका छोट्या जागेत सगळ्यांनी कपडे बदलले
आणि आहे त्या परिस्थीतीत जेवण करून घेतले, गुहेला एक मोठी खिडकी होती,
दरवाज्यातून गाई गुरांना बाजूला करत जाण्या पेक्षा आम्ही आत्ता खिडकीतूनच
जा ये सुरु केली कारण रात्री पिण्यासाठी पाणी नव्हते, रात्री जेवायच्या आधी
तिडके साहेबांच्या नेतृत्वाखाली एक संघ पाणी आणायच्या मोहिमेवर गेला, बराच
वेळ झाला कोणी येइच ना जरावेळाने गुहे बाहेरउन हाकाट्या सुरु झाल्या ……
अंधारात थोडीशी वाट चुकले होते, अखेरीस रात्रीची जेवणे आटपली आणि तश्याच
पथाऱ्या अंथरल्या आणि आजू बाजूच्या सुगंधी गोमुत्राच्या वासात झोपायचा
प्रयत्न करू लागलो, छोट्या कोकरानच्या आया पलीकडल्या भागात बांधून ठेवल्या
होत्या त्यामुळे ती माय लेक सारखे एक मेकाना बें बें करून हाका मारत
होत्या, आमच्या बाजूलाच त्यांच्या लघु शंका दीर्घ शंका सुरु होत्या पण त्या
रात्री दुसरा काहीच पर्याय नव्हता.
ज्याला जशी जमेल तशी प्रत्येकांनी थोडी थोडी झोप घेतली, सकाळी
लवकर उठून आन्हिके उरकली, आज सकाळी आमचा एक मित्र आम्हाला मोहिमेत सहभागी
होणार होता, आदल्या रात्रीच्या महामंडळाच्या गाडीने येऊन सकाळी साल्हेर वर
आम्हाला मिळणार होता आणि तो येणे आवश्यक सुद्धा होते कारण ठेपले आणि अन्य
खाद्य पदार्थ जे आम्हाला ३ दिवस पुरतील असे सर्व सामान घेऊन तो येणार होता,
गडावर मोबाइलला ही रेंज येत नव्हती, त्यामुळे काहीच संपर्क होत नव्हता एक
दोघं मित्र म्हणाले कि आता तो काही येणार नाही परंतु आमची खात्री होती कि
तो येईलच, शेवटी त्याची वाट पाहून आम्ही गडावरील सर्वात उंच जागा म्हणजेच
परशुरामाचे मंदिर बघायला गेलो, सकाळी खाली जिथे मुक्काम केलेला तिकडे पाऊस
थांबला होता परंतु जसे जस गडावरच्या सर्वात उंच जागी गेलो तिकडे पाऊस आणि
वारा अत्यंत जोरात होता त्यामुळे तिथे काही फोटो घेता आले नाहीत, साधारण
५१०० फूट उंचावर हे छोटे परशुरामाचे मंदिर आहे. जास्त वेळ तिकडे न थांबता
आम्ही परत खाली आलो आणि आवरा आवरी करून आम्ही साल्हेर वरून उतरायला सुरवात
केली.
आज आम्हाला सालोटा किल्ला बघून परत खाली येऊन मुल्हेर मुक्कामी जायचे
होते, साल्हेर आणि सालोटा याच्या मध्ये एक खिंड आहे त्या खिंडीत आम्हाला
लांबून २ माणसे दिसली आणि ती आम्हाला हात करत होती, आमचा जो मित्र आम्हला
साल्हेर किल्यावर सकाळी येऊन भेटणार होता तो एका वाटाड्या बरोबर सकाळी ९
वाजल्या पासून त्या खिंडी मध्ये आमची वाट पाहत थांबला होता, सगळे मित्र
आदल्या दिवशी पुढे निघून गेलेले आणि हा काही पुण्य जवळचा किल्ला नाही कि
गाडीला किक मारली आणि आलो पण हा पठ्या आदल्या रात्री पूर्ण रात्र प्रवास
करून सकाळी गाडी बदलून वाटाड्या घेऊन आला. खरा हाडाचा ट्रेकर फक्त हे करू
शकतो, तो भेटल्या भेटल्या सगळे सामान आणले का आणि बाकी चौकश्या झाल्या,
तुमची केव्हाची वाट पहातोय इथे थांबून आणि इतर गंप्पा टप्पा झाल्या
एकमेकांची खेचून झाली आणि वाटाड्या बरोबर सालोटा बघायला जायचे ठरले परंतु
वाटाड्या तयार होईना, एवढ्या धो धो पावसात आणि वाट निसरडी आहे मी येणार
नाही असे त्याने स्पष्ट सांगितले त्यातच आमचे २ मित्र आदल्या रात्रीच्या
थकव्याने आणि वाटाड्याने लावलेल्या नकारघंटेने त्याच्याच सुरात सूर मिसळून
आम्ही पण येत नाही म्हणाले आणि खाली गाडीत जाऊन थांबतो म्हणाले. त्यांचे
मनोधर्य वाढवायचे प्रयत्न करून झाले पण ते काही ऐकेनात शेवटी ते आणि
वाटाड्या खाली गेले.
आम्ही आमच्या सॅक्स खिंडीतच ठेवून पुढे निघालो, हळू हळू पुढे जायला
लागलो तसे लक्षात आले कि वाटाड्या आमच्या सोबत यायला का तयार नव्हता कारण
वाट तशी थोडी अवघड म्हणण्या पेक्षा निसरडी झालेली आणि एकदा पाय निसटला कि
थेट ३००० फूट खाली आणि ज्याला उंची वरून खाली पहिले कि डोळे फिरतात
अश्या साठी तर नक्कीच अवघड होते, सांभाळत सांभाळत अखेरीस आम्ही सालोटा
किल्य्याच्या कातळात खोदलेल्या पायरी पाशी येऊन पोचलो.
आता
नक्की सांगता येणार नाही पण साधारण १५० च्या आसपास अश्या कातळात खोदलेल्या
पायऱ्या आहेत त्या चढून वर आल्या वर कातळात खोदलेला दरवाजा लागतो.
या
दरवाज्यातून असेच चालत पुढे गेल्या वर अजून एक दार लागते, संपूर्ण
डोंगरच्या कपारीतून वाट आहे, गडावर विशेष पाहण्या सारखे काही नाहीये,
पाण्याची टाकी आहेत आणि इकडून साल्हेर किल्ला दिसतो परंतु साल्हेर किल्ला
पूर्ण ढगात असल्या मुळे तो काही दिसला नाही, थोड्या वेळ वर फिरून आणि
सुकामेवा खाऊन आम्ही सालोटा उतरायला सुरवात केली दुपारची वेळ झालेली
त्यामुळे पावसानी पण जरा उघडीप दिलेली, आम्ही परत खाली गावात आलो आणि आवरा
आवारी करून निघालो आज आम्हाला मुल्हेर गडावर मुक्कामी पोचायचे होते.
बाकी आवरा आवरी करून आम्ही मुल्हेर वाडी कडे निघालो. इथून मुल्हेर वाडी म्हणजे साधारंण एक तासाचा प्रवास
रस्ता हरणबारी धरणाच्या कडे कडेने जातो आणि साधारण ४ ची वेळ असावी त्यावेळी हे काही फोटो घेतले आहेत
मुल्हेर
वाडीचा फाटा येई पर्यंत संध्याकाळचे ५:३० ते ६ वाजले असतील, मुल्हेर
किल्याच्या फाट्या वर एक वडापाव ची गाडी उभी होती तिकडे दोन्ही कार
थांबल्या आणि ९ जणांनी वडापाव च्या गाडी भोवती गराडा घातला मग काय दिवस भर
पावसात भिजल्या नंतर मस्त गरम वडापाव आणि पाव पॅटिस यावर मंडळी तुटून पडली
मग नंतर काहींनी पानाच्या टपऱ्या शोधल्या ....... :) आता संध्याकाळचे ७ ते
७:३० झाले असावेत आता सर्वांचे सर्व काही झाले होते, आता मुल्हेर वाडीत
जायला कोणालाच काही हरकत नव्हती ...
मुल्हेर गाव येई पर्यंत ८ वाजले आणि गुडूप अंधारात गाड्या
कुठे लावायच्या यात थोडा वेळ गेला काही ठिकाणी पावसामुळे चिखल होऊन चाक
फसेल अशी भीती होती तर एका ठिकाणी दुसर्याने गाड्या लावल्या होत्या शेवटी
जागा मिळाली, आम्ही आलेले पाहून एक माणूस जो गडावर चाललेला तो थांबला,
रात्रीच्या अंधारातच आम्ही गाद चढायला सुरवात केली, साधारण ९ वाजता आम्ही
गडावर पोचलो गडावर एक मोठे मंदिर आहे तिकडे इतर पण गिर्यारोहक मंडळी जमलेली
कोणाची रात्रीच्या जेवणाची तयारी सुरु होती कोणी झोपायची तयारी करत होते
तर कुठे गप्पांचा कार्येक्रम रंगलेला, आम्ही पण एका ठिकाणी जागा पकडली आणि
पथाऱ्या टाकल्या २ दिवसाचा थकवा आणि ओले कपडे याने शीण आलेला पण थोड्याच
वेळात चूल मांडली आणि सूप साठी पातेले चुलीवर गेले तसे एक एक जण आवरून
चुलीच्या भोवती येऊन बसला, चुलीची धग हाता, पायाला खूप बरी वाटत होती
त्यामुळे थोडा थकवा कमी झाला होता, तेवढ्यात गरम गरम सूप तयार
झाले........इकडे पाऊस पण नव्हता त्यामुळे रात्री चा गारठा कमी होता, सोबत
असलेला ठेपले खाऊन जेवण केले आणि गुडूप.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मुल्हेर, मोरा आणि हरगड किल्ले पाहायचे होते,
त्यामुळे सकाळी लवकर उठून आवरले बाकीच्यांचे आवरून होई पर्यंत थोडे फोटो
काढले.
समोर मांगी - तुंगी चे डोंगर आणि आजू बाजूचे काही किल्ले दिसत होते, परत
देवळात येऊनच संध्याकाळी दुसऱ्या गडाकडे निघायचे होते त्या मुळे सर्व सॅक
देवळातच ठेवल्या होत्या आणि एक सॅक घेऊन त्यात सर्व पाणी आणि खायचे सामान
घेतले होते.
वरील फोटो मध्ये मुल्हेर-मोरा जोडगोळी दिसत आहे, दोन्ही किल्ल्याच्या मध्ये एक दगडी भिंत आहे तिच्यावरून चालत आपण जाऊ शकतो.
मुल्हेर किल्य्या कडे तोंड करून उभे राहिल्यास आपल्या उजव्या हाताला आपल्याला हरगड किल्ला दिसतो.
आमचे मार्गदर्शक नितीन तिडके उर्फ मिलिटरी काही महत्वाच्या गोष्टी दाखवताना.
अजून सुद्धा अतिशय मजबूत स्थिती मध्ये हि भिंत टिकून आहे काही ठिकाणी थोडी ढासळली आहे.
संपूर्ण भिंत फोटो मध्ये घेण्याचा प्रयत्न वरच्या फोटो मध्ये केला परंतु संपूर्ण भिंत काही येत नाही
भिंती पासून घेतलेला फोटो, उजव्या बाजूला दिसतोय तो हरगड किल्ला
भिंती पासून थोडे वर चढून गेल्यावर आपल्याला सालोटा किल्ल्या वर आहेत अगदी तश्याच प्रकारे कातळात खोदलेल्या पायऱ्या दिसतात.
या पायऱ्या चढून गेल्या वर आपला मोरा किल्ल्यात प्रवेश होतो, किल्ल्या वर काही पडकी बांधकामे याचे अवशेष शिल्लक आहेत.
मोरा
किल्याच्या प्रवेश द्वारातून मुल्हेर किल्यात जायची वाट दिसत आहे, वरील
फोटोतून ती कळणार नाही पण काय सुंदर नैसर्गिक रचनेचा वापर केलेला आहे ते
खालील काही फोटो पहिले कि आपल्या लक्षात येईल.
वरच्या
फोटो मध्ये आपल्याला उजव्या बाजूला पाण्याचे टाके दिसत आहे, आणि डाव्या
बाजूला एक छोट्या खिडकी सारखी जागा आहे, तिथून आपण आत शिरतो
आमच्यातले काही जण मुद्दामून मागे थांबले होते, त्यामुळे हे फोटो आणि सविस्तर वाट दिसत आहे
या छोट्या खिडकीतून आत गेले कि वरच्या बाजूला जी कातळाची रेघ दिसत आहे त्या बाजूने आपण वरच्या बाजूला जातो.
वरच्या फोटोतून साधारण अंदाज येत असेल आत जाणारी वाट आणि तिथून पुढचा रस्ता
मुल्हेर किल्ल्यावर गेल्या नंतर मागे वळून पहिल्यावर दिसणाऱ्या मोरा किल्याच्या पायऱ्या
मुल्हेर
किल्ल्यावर पोचायला दुपारचे १२ वाजले, वरच्या फोटोत समोर दिसतोय तो हरगड
किल्ला, गडावर २ ४ वास्तू चे पडके अवशेष शिल्लक राहिले आहेत.
भरपूर पायपीट झालेली होती आणि सूर्यदेव डोकयावर आलेले होते, एका ठिकाणी छोटा पार आणि मंदिर दिसले आणि तिथेच जरा विसावा घेतला.
वरच्या फोटो मध्ये दूरवर एक छोटे दार दिसत आहे त्याच्या जवळूनच हरगड किल्ल्या कडे जाणारी वाट आहे आणि एक दरवाजा सुद्धा आहे
पॅनोरमा क्लिक
या दरवाज्याने हरगड किल्ल्याच्या दिशेने जाणारी वाट आहे.
किल्ल्याचा दरवाजा अश्या प्रकारे लपवला आहे.
हरगड च्या वाटेवर दगडात कोरलेले बजरंगबली
हरगड किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यात आल्यावर मागे दिसणारे मुल्हेर मोरा
काहीठिकाणी
वाट नक्कीच अवघड आहे, पावसामुळे निसरडे झालेले असते आणि आपले रबरी बूट
कातळावर पकड ठेवत नाहीत अश्या वेळेस शरीराचा तोल सांभाळून काळजी पूर्वक
जावे लागते
अवघड
असा छोटा टप्पा पार करून आल्या नंतर किल्ल्याचा दरवाजा आणि त्या खालची
बांधलेली भिंत दिसते. अतिशय सुंदर असा पूर्ण दगडात कोरलेला हा दरवाजा आहे
त्याच्या पायऱ्या फोडल्या आहेत किंवा ढासळून गेल्या आहेत, तसेच अनेक झाडे
वेळी यांनी सुद्धा आत मध्ये शिरकाव केला आहे त्यामुळे अजून किती वर्ष हे
बांधकाम टिकेल सांगता येत नाही.
वरच्या फोटो मध्ये आपल्याला झाडांची मुळे वेली बाहेर आलेल्या दिसतात
दरवाज्याच्या पायऱ्या नसल्या मुळे अशी कसरत करून वर चढून जावे लागते
वर चढून गेल्यावर पुढील पायऱ्या चांगल्या स्थितीत आहेत.
वर चढून गेल्यावर बऱ्यापैकी मोठे पठार आहे, त्या पठारावर मारुती राय आणि एका जबरदस्त तोफ पडलेली आहे
बेरी बुश सारखी दिसणारी अनेक छोटी छोटी झुडुपे पठारावर दिसतात आणि एका पॅटर्न मध्ये ती चांगली दिसतात.
हरगड किल्ल्यावरून मुल्हेर आणि मोरा
गडावर
थोडे खालच्या बाजूला एक पाण्याचे टाके पण दिसत होते पण आज दिवस भर भरपूर
पायपीट झाल्या मुळे तिकडे जाण्याची ताकद अंगात उरली नव्हती आणि अजून गड
उतरून पुढच्या प्रवास साठी निघायचे होते.
मुल्हेर
किल्ल्या वर परत आलो तो पर्यन्त संध्याकाळ होत आलेली, मुल्हेर गडावरील
ज्या देवळात आमचा मुक्काम होता तिकडून सर्व बांधा बांध करून आम्ही खाली
उतरलो, आज रात्री इकडेच मुक्काम करून उद्या सकाळी उठून न्हावी आणि
तांबोळ्या करावे असा पण विषय झाला पण तो फेटाळण्यात आला कारण सकाळी उठून
उतरून उशीर झाला असता म्हणून आजच रात्री किल्ल्याच्या पायथ्याला जाऊन
मुक्काम करायचा असे ठरले आणि त्याप्रमाणे रात्रीच्या अंधारात रस्ते शोधत
आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी येऊन पोचलो एक छोट्या गावातील एका खोलीत राहायची
व्यवस्था झाली आणि थोडे खाऊन सगळे लगेच झोपून गेलो कारण दिवस भरझालेली
पायपीट.
सकाळी उठल्या उठल्या न्हावी किल्ल्याचे दर्शन झाले, गडाचे शिखर तर ढगातच होते, आज दोन किल्ले करायचे होते न्हावी आणि तांबोळ्या.
न्हावी आणि तांबोळ्या
आज
या भ्रमंतीचा शेवटचा दिवस आणि शेवटचे दोन किल्ले, भरा भर सगळ्यांनी आवरले
सामान गाड्यां मध्ये भरून ठेवले आणि न्हावी किल्ल्याच्या दिशेने निघालो.
न्हावी किल्ल्याच्या वाटेवर (न्हावी गड रतनगड नावाने पण ओळखला जातो)
वरच्या पठारावरून न्हावी किल्ला एका अजस्त्र हत्ती सारखा दिसतो.
गडावर
जाण्यासाठी एक शॉर्ट-कट पण आहे आणि दुसरी वाट थोडी फिरून जाते, काही जण
शॉर्टकट कडे वळले आणि काहीजण नेहमीच्या मार्गाने चालू लागले.
गडाच्या माथ्यवर
गडावरून
उतरायला सुरवात केली कारण अजून दुसरा किल्ला पण बघायचा होता वेळ भराभर
सरकत होती, काहीजणांनी वरच्या शेवटच्या टप्प्यात यायचा कंटाळा केला कारण
वाट थोडी कठीण पण होती आणि ३ दिवसाचा थकवा आता जाणवायला लागला होता, आता
खाली उतरताना सर्वानीच शॉर्टकट वापरायच ठरवले होते.
बऱ्याच वेळेला शॉर्टकट सुद्धा खूप वेळ खातात कारण उतरताना शरीराचे वजन खालच्या बाजूला असते त्यामुळे विशेष काळजी घेऊन उतरावे लागते.
डावीकडे तांबोळ्या आणि उजवी कडे मांगी तुंगी
खाली
येईपर्यँत बराच उशीर झाला आणि दुसऱ्या किल्ल्याचा म्हणजेच तांबोळ्या
किल्ल्यावर जायचा बेत रद्द केला, कारण आज शेवटचा दिवस होता आणि इथून पुढे
साधारण ३५० कि मी गाडी चालवत जायचे होते आणि साधारण दुपारचे १२ वाजले होते
त्यामुळे अजून एक किल्ला होणे शक्य नव्हते काही जणांना दुसऱ्या दिवशी ऑफिस
ला जायचे होते मी मात्र आधीच सिक लिव्ह चा मेसेज draft करून ठेवला
होता.......
डावीकडून - मी बकरे,घाटपांडे , मुळे , बारटक्के , वाटाड्या आणि पेठे
बाकी तिडके आणि भावे नाहीत.
हा
ट्रेक २०१४ साली १४,१५,१६ आणि १७ ऑगस्ट ला केला ब्लॉग लिहायचे खूप दिवस
नाही म्हणता येणार खूप वर्षे राहिले होते. अर्धवट ब्लॉग लिहून पण झालेला
पण माझ्या कडे सगळे किंवा चांगले फोटो नव्हते, मध्यंतरी विक्रम पेठे ने या
ट्रेक चे फोटो पाठवले त्यामुळे काही आठवणी पण जाग्या झाल्या त्यामुळे हा
ब्लॉग पण पूर्ण करता आला, खूप वर्षांन पूर्वी केलेला ट्रेक असल्या मुळे खूप
गमती जमती लक्षात नाहीत त्यामुळे लिखाण कमी आणि फोटो जास्त आहेत.



















No comments:
Post a Comment