Monday, April 11, 2022

सह्याद्रीतील पाणस्थळे

 डोंगरभ्रमंतीचे वेड
dongar

डोंगरभ्रमंतीचे वेड भरात आल्याचे ते दिवस होते. भीमाशंकर -लोणावळा वाटेवर रंगलेल्या या रात्री आहेत. भीमाशंकर सोडून वांदर खिंडीत पोहोचतो दुपारचा एक वाजला होता.

माळेगावची वाट डाव्या हाताला सोडून उजव्या हाताला शिरगावकडे जाणारी पाऊलवाट धरतानाच टपोरे थेंब तडातडा मार द्यायला लागले होते.वेगेवेगे शिरगाव जवळ करायचं ठरवून, खाल मानेन मार खात शिरगावात शिरलो तेव्हा फक्त आमच्या कपड्याचाच काय तो पावसाचा पुरावा होता.दंगेखोर पाऊस तेथे मात्र गायब झाला होता. पुढेही पावसाची काहीच चिन्ह दिसत नव्हती .दिवसही बाकी होता, म्हणून पुढे जाऊन खंडित मुक्काम करायच ठरवलं .चाल सगळी सपाटीची,ऊजवीकडच्या सह्यरांगेवरुन येणारा सुखद वारा आणि नेत्र सुखद सभोवतालची हिरवी काया,चालण्याचे, ओल्या कपड्याचे कष्ट वाटू देईनात. चालता-चालता कपडेही सुकत होते म्हणून,थांबावेसे वाटत नव्हते.खांडी जवळ आल्यावर, “थांबायलाच पाहिजे का “?असा प्रश्न गजगतीने चालणाऱ्या बाळ जोशीने विचारला. आनंदाचे एकाक्षरी उत्तर होते “हो”. विजय महाजन तोपर्यंत गावाच्या दुसऱ्या टोकाला पोहोचला होता त्या टोकाला, गावाशी पूर्णतः विसंगत अशी शाळेची इमारत होती.ती टाटा ट्रस्टने गावाला बांधून दिली होती.

गाव सगळं झोपड्यांचे तर शाळा दोनच खोल्यांची पण अतिशय टुमदार अशी बांधलेली. जवळ जवळ अर्ध्या भिंती तर काचेच्याच. पाण्यासाठी समोरच विस्तीर्ण आंध्रा तलाव पसरला होता.मुक्कामाच्या जागेविषयी मत -मतांतरास वावच नव्हता. खोगीर उतरल्यानंतर घोडी जशी अंग ताणून,शेपट्या फटकारुन अंग मोकळं करून घेतात, तसं हातपाय ताणून डोक्यावरची टोपी काढून डोकं खसाखसा चोळून, बूट कपडे उतरवून बाजूला फेकले. गुरुजी आणि ग्रामस्थांच्या कृपेने दोन्ही खोल्या एक रात्री करता मिळाल्या. त्यामुळे भराभर उपसल्या सारख्या उध्वस्त करून पसरल्या. गावातच मुक्काम असल्याने जवळपास सरपण मिळणे अवघडच होतं. पण आमच्या भोवती कुतूहलापोटी गोळा झालेल्या पोरांना हाताशी धरून एका रात्रीची सोय करून घेतली. दोघेजण चहाला लागले. मी व विजय फर्लांग भराच्या अंतरावरील आंध्रा तलावाकडे उधळलो .

संध्या छायेत द्या जलाशयाचे रूप देखणं होतं. जलाशयाच्या तिन्ही किनार बाजू दिसत होत्या. पण डोळ्यासमोर क्षितिजात विलीन झालेली,जलरेषा अंत लागू देत नव्हती. पाणी कमालीचे संथ होतं. त्यामुळे हे एक प्रचंड लांबीची काच फक्त समोर पसरलेल्या सारखी दिसत होती. एक ओरखडा दिसत नव्हता त्यावर. पाणवठ्याशेजारी दोन्ही- तिन्ही अंगांचा झाड झाडोरा, संध्यासमयी येणाऱ्या पाखरांच्या वर्दळीने जिवंत झाला होता. हे सारं निरखण्यात कितीतरी वेळ स्तब्धावलो. विजयच्या हाकेने पाण्यात पाय बुडवता झालो. पाण्याचा गारठा सुद्धा सुखद होता. समोर पसरलेल्या काचेवर ओरखडा उमटणार नाही अशा बेतानं ओंजळीत पाणी घेऊन हाता-पायावर सोडत राहिलो. मंद अशा सुखदायी जाणिवा शरीरभर पसरल्या.बराच वेळ हे सुख अंगावर घेत राहिलो.तेवढ्याच संथपणाने अलगद पुन्हा पाण्याबाहेर पडून मुक्कामी आलो.

रात्री पोटपुजा आटोपल्यानंतर पुन्हा बाहेरच्या पायरीवर बसलो होतो. पौर्णिमा होऊन गेली होती त्यामुळे चांदणं फिकट होतं. परिसर कमालीच्या शांततेत पहूडला होता. गाव सगळा मुक्कामी शाळेच्या पाठीमागे असल्याने,शाळेच्या पायऱ्या पासून थेट पाण्यापर्यंत नजर कशालाही अडकत नव्हती. लांबलचक पसरलेल्या या जलाशयाच्या पृष्ठभागावरील लहान-लहान घड्या ही स्पष्ट दिसत होत्या. त्या घड्या,त्या लाटांचा आवाज मात्र होत नव्हता. किंवा होत असेल तर आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता. नियतीच ते देखणं साकार रुप आणि निराकार शांतता मनालाही निराकारी अवस्थेत घेऊन गेलं. स्थळ,काळ,स्व: सगळं काही विसरलो. मात्र समोरच्या जलाशयासारख्या मंदमंद घड्या मनातही पसरत्या झाल्या. ” पुन्हा कधी तरी हे सारं असंच पाहायला मिळेल का”? ” मिळावे ” अशी कामना करीत अलगद आडवे झालो.

यानंतर किती वर्षांनी कोणास ठाऊक मी आणि आनंदा गडदच्या बहिरीला, भीमाशंकर च्या बाजूने चाललो होतो.खांडीतच सांजावलं. त्याच मराठी शाळे पुढे येतात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. पाय रेंगाळले पण आज दोघांचाही मूड चार भिंतीआड रात काढण्याचा नव्हता. म्हणून मग तसेच पुढे पुढे चालत राहिलो. खांडी सोडून अर्धा-एक तास चाललो असू, बेंदवाडीच्या पायवाटेवर – – बेंदवाडी दोन फर्लांग पुढे राहिली असेल- – तेव्हा एक देवराई भेटली. एका अंगास लांब पसरलेला पाणवठा, दुसऱ्या बाजूस ही देवाची बाग .मधून पायवाट रांगत्या मुलासारखी रमत-गमत बेंदवाडी कडे गेलेली.मुक्कामचा मोह टाळवेना. आकाशाखालचा रात्रीची ओढ दोघांनाही अमापच.त्यात ही लोभस जागा सोडवेना.दोघांपैकी कोणीही निर्णय न घेताही पाठीवरच्या सॅक आपोआप खाली आल्या .पायवाट सोडून थोडं पाण्याच्या, बाजूला सॅक उतरवल्या. थंडीचे दिवस होते. रात्र मोठी, आणि थंडीही खूप असणार ,म्हणून मिळेल तेवढं सरपण आधी गोळा केलं. मुक्कामाच्या जागेवर थोडीशी गवताची शय्या तयार केली. तोवर उजेडा विना एकमेकांचे चेहरे दिसेनासे झाले. शेजारीच बख्खळ पाणी असल्याने थंडीला सुरुवात होत असतानाही हातपाय धुतले.धडधडा पेटवलेल्या तीन दगडांच्या चुलीवर चहा खिचडी व्हायला वेळ लागला नाही. खिचडीवर पाणी पिताच थंडीच्या लाटा शरीरभर धावल्या. पुन्हा शेकोटीत ढपल्या सरकवून शेकत राहिलो.एका अंगाने पाण्याच्या दिशेने चांदवा वर यायला लागला होता. त्याच्या तीरप्या किरणांनी पाण्याची हालचाल लक्षात येत होती.

लहान मुलाच्या स्पंदनासारखी अतिशय मंद अशी होणारी ती जलाशयाच्या पृष्ठभागाची हालचाल, सतत नजर दिल्यास जाणवतही नव्हती. जलाशय जणू घड्या-घड्यांचा बनल्या सारखा दिसत होता. पाठीमागची देवराई शांत शांत होती. एका बाजूस खांडी एक्या अंगास बेंदवाडी,चिडीचूप झाल्या होत्या. आनंदाला सूर सापडला आणि त्याच्या मुखे तुकाराम महाराज- ज्ञानेश्वरांचे अभंग -ओव्या अवतरल्या.किती अभंग किती ओव्या आळवल्या कुणास ठाऊक ?बराच वेळ गेला असावा .शेकोटी थंड व्हायला लागली होती. आनंदाचे सूरही निमाले आणिअवतरली ती निराकार शांतता.जलाशयात चंद्र घड्या-घड्यांची दुलई पांघरून पहुडलेला. साऱ्या वातावरणात भरली होती फक्त आणि फक्त शांतता. या आवाजवीरहित दुनियेत थोडीशी गूढता होती, पण भीती नव्हती. थोडीशी निरामयता होती पण पुर्णतः विरक्ती नव्हती. असलीच तर थोडीशी का होईना असक्तीच होती,पुन्हा कधीतरी— पुन्हा कधीतरी हे —-

दिलीप नाईक निंबाळकर
 

सह्याद्रीतील पाण स्थळे (भाग 1)

सह्याद्रीतील पाण स्थळे
कधीतरी आज वरच्या भटकंती कडे मागे वळून पहावेसे वाटते. परत एकदा ते भटकणे न्याहाळण्यासारखे सुख नाही.समस्त डोंगर भाऊंचा (गिरिभ्रमकांमध्ये लिंग भिन्नता नसते त्यामुळे सगळे डोंगर भाऊच )हाचअनुभव असतो. आत्ताच्या बाहेर फिरण्याच्या बंदी काळात हे विशेषतः घडतय स्मरणरंजनाचे सुख- – – – दुसरं काय ?
डोंगर भटक्यांच्या आवडीनुसार स्वभावाप्रमाणे ती ती स्मरणे असणार, हे स्वाभाविक आहे. कोणी इतिहास प्रेमी, कोणी वनस्पती प्रेमी, कोणाच्या मनात कातळभिंतीची आव्हाने, तर कोणी त्या त्या वेळी अनुभवलेल्या थरारक रोमांचक अनुभवात अजूनही अडकलेला.
मला मूकपणाने निसर्गाच्या विविध विविध रुपात सामील व्हायला आवडते. निसर्गाच्या सानिध्यातील माणसे, त्यांचे जीवन व्यवहार, त्यांच्यात प्रदेशानुसार होणारे सांस्कृतिक, स्वभावातील बदल निरखायला आवडते. ती कधीतरी पाहिलेली, वाचलेली माणसे हीच माझी आजवरची कमाई आहे.
तो मार्च 1977 चा पहिला आठवडा होता. भुदरगड ,भैरवगड, सोनगड (म्हणजेच नरसिंह), सिद्धाचा डोंगर, रांगणा, मनोहर, महादेव, नारायण,मनसंतोष असा जंबो ट्रेक होता.
आनंद पाळंदे, उष:प्रभा पागे आणि प्र.के.घाणेकर अशा दिग्गजांसोबत भटकण्याचे सुख होते त्या ट्रेकमध्ये.इतिहास भूगोल आणि वनस्पती शास्त्राचे ज्ञानकोश सोबत असतानाचा तो ट्रेक विस्मरणात जाईलच कसा ?
सोनगडावरून घोटग्याच्या पाजेने घोटगे गावात उतरलो. मार्चमध्ये पेटलेल्या त्या भट्टीत, खाली कोकणात उतरणे म्हणजे आगीतून फुफाट्यात उतरणे होते. शब्दश: तळपायाची आग मस्तकात पोहोचत होती. घोटग्यातल्या फुफाट्याने बुटात तळपायाच्या पेटत्या गोवऱ्या झाल्या होत्या. घोटग्यात थोडीशी पोटपुजा करणे आणि सिद्धाच्या गडद जंगलातून रांगण्याकडे जाण्यासाठी एखादा माहितगार वाटाड्या घेणे हे हेतू होते.गावात शिरण्यापूर्वी “गड” नदीच्या क्षीण पाण्याच्या प्रवाहाचे पात्र ओलांडले. गावाच्या तोंडाशीच असलेल्या एका मंदिराकडे, आवारातील गर्द सावलीच्या वृक्षाकडे लक्ष गेले.तहानल्या -भुकेल्या वासराने गायीकडे धाव घ्यावी तसे धावलो.पाठीवरची सॅकची खोगीरं उतरवली. उन्हाने कावला जीव वृक्षाच्या सावलीत अंथरला.
किती वेळ झाला कुणास ठावूक .देवळातील घंटा वाजली तसे जागे झालो. गुडघ्यापर्यंत धोतर,वर फक्त जानवं,सडसडीत अंगाचे,गव्हाळ रंगाचे, मध्यम उंचीचे गृहस्थ गाभाऱ्याकडे गेले. आम्ही एकमेकांना पाहिले.
मंदिरातील सेवक असावेत,असा अंदाज केला. इतक्या रणरणत्या उन्हात,गावाच्या एका टोकाला असलेल्या देवळात दुसरे कोण येणार ? थोड्या वेळात ते बाहेर आले. थेट आमच्याकडेच आले . जवळ येताना आपले चंद्रकांत गोखलेच वाटले, इतके साम्य होते.
” कोण पावणे ?कुठ जावचाव ?”अशी सुरुवात करून ते जवळच्या एका दगडावर बसले. आनंदाने सविस्तरपणे कुठून आलो, कुठे जायचे ते सांगितले. एखादा वाटाड्या पाहिजे असल्याचेही सांगितले.
” वेड लागला काय तुम्हास ? इतक्या उन्हाच्ं सिद्धाच्या डोंगरात घाट चढून कसे पोहोचणार ? त्या जंगलात दिवसाउजेडी माणूस हरवतंय. तुम्हास पोहोचायला रात्र होणार. सोबत येणारा माणूस कसा येणार ? मुद्द्यात यावेळी कुणी यायलाच तयार होणार नाय. तसला काय करूचा नाय . आजची रात्र हितच राहा. सकाळी दिवस उजाडायला घाटाची वाट धरा. मी बघून देतय तुम्हास माणूस”
एका दमात त्यांनी आमचा वेडेपणा आणि त्यांचा शहाणपणाचा मार्ग आमच्यापुढे मांडला. त्यावर आम्ही थोड्या विचारात पडलेलो पाहून, परत जरा धाकभरल्या भाषेतच त्यांनी सांगितले “त्या जंगलाक एकटेच म्हणजे माहितीचा माणूस न घेता जायचा विचारच करू नका. तसेच जाल तर वेताळभैरीसारखे रात्रभर जागचे जागीच फिरत रहाल,अन गाववाले माझ्याच तोंडाक शेण घालतील, वर म्हणतील “या अण्णा देसायाला तरी काय कळता का नाय.त्याने तुम्हास थांबवूचा नाय काय ” ते काय नाय. तुम्ही आता जाऊचो नाय. काय आंगुळी-बिंगुळी करणार आसचाल तर नदीला जाऊन या. हे समोरचं घर माझाच असा. तुम्ही येईपर्यंत पिठलं भात तयार होईल. खाऊन,या इथेच रात्र काढा. जेवायची वेळ होऊन गेली आहे म्हणून सांगतो. संध्याकाळचे मात्र तुमचं तुम्ही बघा. गावात हॉटेल खानावळ नाय. पण नाक्यावर गेलात तर मिलेल. दुपारंन मी माणूस बघून देतय उद्याच्या सोबतीला.” असे म्हणून ते घराकडे निघालेही. आनंदाने नदीला पाणी नसल्याचे सांगितल्यावर, त्यांनी नदीच्या पाण्यातल्या कोंडीकडे जाण्याची वाटही दाखविली.
तसही त्या तसल्या टाळूफोड उन्हात घाट चढण्याची कल्पना रम्य नक्कीच नव्हती . मुकाट्याने सॅकमधील पाहिजे ते कपडे घेतले. सॅक ठेवण्यासाठी अण्णांच्या घराकडे निघालो. लांबलचक रेल्वेच्या डब्यात सारखे ते घर ओसरी वजा शेड नंतर दोन खणात,एक त्या आडग्या गावाला शोभेलसे, कसाबसा जीव धरून असलेल्या वृद्धा सारखे,धापा टाकत असलेले कपड्याचे दुकान होते.” सॅक ठेवतो” असे सांगून नदीकडे जायला लागलो.
” जास्त वेळ लावू नका. भात शिजायला वेळ लागत नाही. लवकर या ” अण्णा देसायांनी माया भरल्या जरबेने आजोबांचा अधिकार गाजवला.
नदीच्या कोंडीत खरंच बख्खळ पाणी होतं. कोंड खोलही नव्हती.क्षीण धारेने का होईना, वाहती होती.त्यामुळे पाणी घाण झालेले नव्हते. त्या कोंडीतून बाहेर पडणाऱ्या पाण्याने, खाली आणखी दोन छोट्या कोंडी तयार झाल्या होत्या. कोंडीकडे येताना, तापल्या कोरड्या गोट्यांच्या पात्रातून येताना बुटातले पायसुद्धा चटचट उचलत आलो. पाणी भरल्या कोंड पाहून सुद्धा जीव थंड व्हायला लागला .भसभसा घामओले कपडे उपसले अन कोंडीत जीव निवायला घातला. मोक्षप्राप्तीची भावना अंगभर पाझरली. ती तशीच मुरवत राहिलो. खूप वेळ पडून राहिलो.
करवंदाच्या दाट जाळीतून ससा कधी बाहेर येतोय याची वाट पाहणाऱ्या कुत्र्यासारखे, ल्हाय ल्हाय करीत, जीभ बाहेर काढून, उन आमची वाट पहात,कोंडी बाहेर थांबले होते. त्याच्या तोंडी जायला नकोसे झाले होते. मुक्कामच तर करायचा आहे,या निवांत भावनेने वेळेचे भानच सरले.
पण ते अण्णा देसायांचे सरले नव्हते.
” ओ पुणेकर काय आंघोळी करताय का कोंडीत भिजायला घातलय तुम्ही.” डोळ्यापुढे हाताच्या पंज्याची पालं उभी करीत तो म्हातारा अनवाणीच हाका मारत आल्याचे दिसले .शरमेने पाणी झालो. घाईघाईत बाहेर येऊन कपडे बदलले आणि त्यांच्या घरी आलो.
दुकानाचा भाग ओलांडून घरात आलो. एका कोपऱ्यात एक वृद्धा झोपलेल्या दिसल्या. दुसऱ्या कोपऱ्यात आमच्यासाठी अण्णांनी बसकराची पट्टी अंथरली.त्यावर बसलो. अण्णा शेजारी बसतील असे वाटले. पण अण्णा आत गेले. दोन फेऱ्यात आमच्यासाठी त्यांनी ताटं आणली. घरात आणखी कोणाचीही चाहूल लागली नाही. ताटात पातळस पिठलं, वाफाळता भात पाहून भूका जाग्या झाल्या. पाण्याचे तांबे घेऊन अण्णा आले आणी म्हणाले “करा सुरुवात”
अण्णा आमच्या सोबत बसत नाहीत,याचे आमच्या चेहर्यावरचे प्रश्नचिन्ह वाचून ते म्हणाले ” ही आमची मंडळी. आम्ही दोघेच असतो. चार वर्षांपूर्वी तिच्या अंगावरुन वारं गेलं. तेव्हापासून मीच करतो सगळं. मघाशी तुम्हाला भेटलो तेव्हा महापुरुषाला नैवेद्य दाखवायला आलो होतो. मग हीला जेवायला घातलं,मीही जेवलो. मी पहिला घास घेतला नाही तर ती जेवत नाही ना ! मग जेवावं लागतं तिच्यासोबत. नाहीतर थांबलो असतो तुमच्या साठी. पण तुम्ही संकोच करूचा नाय. पोटभर जेवा आणि महापुरुषाच्या सावलीला पडा निवांत. दुपारून माणूस येईल. निरोप दिलाय त्याला . तो आला की येतय तिकडे .”
काय म्हणावे या महापुरुषाला ते कळेना. चौघेही मूकपणाने जेवलो. “दोघेच असतो “हा उल्लेख म्हणजे आयुष्यखोल वेदनेचे मुख असावा. त्या वेदना उकरून काढायला लावण्याचा प्रमाद, आमच्या पुढच्या चौकशातून झाला असता . तो प्रमाद न करण्याइतपत आम्ही सुज्ञ होतो . त्या वेदनांचा डोह किती खोल असावा याचा मात्र अंदाज येत होता .
जेवणानंतर महापुरुषाच्या देवळातील थंडगार सभामंडपात आडवे झालो. पण डोळ्यापुढे अण्णा देसायांचा वावर होता. घरात अर्धांगवायूने अंथरुणाला खिळलेली पत्नी, घरातील सर्वच कामे एकट्याच्या कृश खांद्यावर,न कुरकुरता, कुठलीही रडगाणी न गाता पेलणारे देसाई , याचा आयुष्यात कुठेही कडवटपणा न येऊ देता, करपलेपणा न येऊ देता कसाकाय आयुष्य संगरात स्वतःला लढता ठेवत असेल ? कुठला कर्मयोग हा ? आमच्यासारख्या अनोळखी वाटसरूनाही इतक्या आपुलकीने, आग्रहाने ,वडिलकीच्या धाकाने थांबवतो, खायला घालतो ,जेमतेम चालत असेल नसेल अशी दुकानदारी सांभाळताना, यावरच उपजीविका असणारा माणूस पैशाचे नावही न काढता जेवायला घालतो, हा ही महापुरुषच की .
अण्णा संध्याकाळी वाटाड्याला घेऊन सोबत घेऊन आले. आम्ही रात्रीच्या पोटपूजेसाठी आणि चहासाठी चूल लावत होतो. अण्णा थेट आमच्याकडेच आले. ‘चुलीसाठी दगड कसे लावा, वाऱ्याची दिशा बघा, गोळा केलेल सरपण ओलसर नाही ना, हे पहा ‘ असल्या बारीक सारीक सूचनांचा त्यांचा पट्टा चालूच होता. यातील आमचे अनुभवसिद्ध ज्ञान बाजूला ठेवून, ते सांगण्या यामागील त्यांचा भाव, त्यांची बोलण्याची भूक समजून घेत त्या सूचना आम्ही ऐकत होतो.
अण्णांनी त्या वाटाड्या बरोबर आमची गाठ घालून दिली. आम्ही त्याने सांगितले पैसे देण्यास तयार झालो. फक्त, परत परत सकाळी नक्की आणि लवकर बजावले.
त्यावर” शिंच्या नक्की ये, नायतर माझा नाक कापशील ” हे मात्र अण्णांचे त्या माणसाला उद्देशून होते .
आमचा तयार चहा तयार झाला होता. त्या दोघांनाही चहाचा आग्रह केला.अण्णांनी मात्र तो नाकारला.” रोज एकदाच, सकाळी मंडळी बरोबरच चहा घेतो. परत दुसऱ्या दिवशी. हे आमच्या दोघांचं व्रत असा “असं सांगून ते निघाले. जातेवेळी ‘रात्री अंथरूणात कोठे आणि कसे घालावे’ या सूचना देण्यास मात्र ते विसरले नाहीत.
दुसऱ्या दिवशी उजाडता उजाडता निघालो. बरोबर येणाऱ्या माणसासोबत अण्णाही आले. निरोप घेताना, किमान काल दुपारच्या क्षुधाशांतीचे तरी पैसे द्यावे असे वाटत होते . पण त्यातून त्या वात्सल्यमूर्तीचा अपमान तर होणार नाही ना,या शंकेने,संकोचाने तसे विचारले नाही.
मग प्रत्यक्ष त्या माणुसदेवाच्या हाती पैसे न ठेवता,ते देखभाल करीत असलेल्या मंदिरातील दगडाच्या देवापुढे ठेवले. एका मुक्कामासाठी जडलेल्या पण कधीच न विसरता येणाऱ्या नात्याचा निरोप घेताना, नाही म्हणले तरी पाय घुटमळलेच.अण्णा मात्र पुन्हा पुन्हा ‘सांभाळून जाण्याच्या सूचना आम्हाला,अन पाहुण्यांना नीट काळजीपूर्वक नेण्याच्या सूचना त्या वाट्याड्याला करीत, पाच पावले का होईना, आमच्या बरोबर चालतच होते.
©️दिलीप नाईक निंबाळकर.
बावधन पुणे

 सह्याद्रीतील पाणस्थळे (भाग दुसरा)

सेंबर 1975
ऐन पंचविशीत असताना भटकंतीचे वारे कानात भरले होते.बेभानपणे सह्याद्रीत भटकत होतो. या भटकंतीच्या वाऱ्याची ओळख करून देणारा आनंदा (पाळंदे) आणि मी नोकरीनिमित्त एकत्र आलेलो, बीन वेसणीचे होतो, त्या वेळची गोष्ट आहे ही.
पाटण परिसरातील गुणवंत, भैरव,जंगली जयगड आणि दाते ऊर्फ सुंदर गडाच्या तीन दिवसाच्या भ्रमंतीसाठी बाहेर पडलो होतो दोघे. मल्हार पेठे पासून कुंभार्ली घाटापर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही अंगास हे गड उभे आहेत. कोकणातून येणाऱ्यावर नजर रोखून भैरव आणि जंगली जयगड हे रस्त्यापासून थोडे आत आहेत. त्यांची टेहळणी चुकून कोणी आलाच तर त्यावर नजर रोखणारे गुणवंत आणि दातेगड मात्र रस्त्यावरून सहज दिसणाच्या टप्प्यात आहेत.
डिसेंबर मधील त्या कडाक्याच्या थंडीत एका भल्या पहाटे दूध वाहतुकीच्या टेम्पोने गुणवंत गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या मोरगिरीस उतरलो. गडाचा कातळमाथा उठावदार असल्याने लांबूनही दिसतो. सकाळी लवकर आल्याने झपाट्याने गडात पोहोचून गडदर्शन केले.वरून दिसणारी कोयनेच्या दोहो अंगाची समृद्धी डोळे सुखावून गेली. गड पाहून खाली उतरलो तेव्हा दहा वाजले होते. पोटाला किरकोळ खाण्याचा आधार देऊन भैरवगडासाठी पाथरपुंज मार्गे लांबच्या अंतराची तंगडतोड केली. भैरवगडात पोहोचलो तेव्हा, दिवस कलतीला लागला होता .मग रामघळीतील मुक्कामाचा मनसुबा रद्द करून भैरवगडातच पथाऱ्या टाकायचे ठरवले.
रात्री मुक्काम करण्याचे ठरल्यावर सॅकसह जामानिमा उतरवला. बूट काढले तेव्हा पायाची अवस्था लक्षात आली. केलेल्या मूर्खपणाची फळे होती ती. नवे कोरे हंटर्स ( त्याकाळी फक्त बाटा आणि स्वस्तिक या दोनच कंपन्यांचे उपलब्ध असायचे) थेट ट्रेकला वापरू नयेत, हा अनुभवजन्य साधा नियम न पाळण्याचा गाढवपणा केला होता. काही कारणाने तसे करावे लागले होते .बूट काढल्यानंतर लक्षात आले दोन्ही पायाची बोटे,टाचा दिवसभराच्या चालीने बुडाशी घासल्या गेल्याने तेथील कातडी सोलवटुन निघाली होती. सकाळपर्यंत टरारुन फोड येणार याची खात्री झाली. नव्या पायाचा बुटांशी स्नेह जुळून येण्यासाठी काही काळ जावा लागतो, तो द्यावा लागतो हा साधा नियम नाईलाजाने मोडावा लागला होता. पण पायांना आणि बुटांना हे कसे समजावे ?पाय आणि नवे बूट यांच्यातील विसंवादाची फळे मात्र, दोहोंचा मालक असल्याने मलाच चाखावी लागणार हे नक्की झाले.
सकाळी दुखऱ्या फोड आलेल्या पायावरच बुट चढवून चालायला सुरुवात केली. अर्थातच चालण्याचा वेग मंदावला. पण नेटाने चालतच राहिलो. प्रत्येक भटक्याने त्याच्या भटकंतीत कधी ना कधी तरी या किंवा अशाच प्रकारच्या अडथळ्यांना तोंड देत पुढची वाट काढलेली असते.
गिरीभ्रमंती याचा अर्थच शारीरिक, मानसिक सहनशक्तीच्या मर्यादा कमालीचा ताणणे, असा असतो.
भैरवगडातून जुन्या हेळवाक कडे जाताना राम घळ पाहून पुढे जात राहिलो. पायवाट खडकाळ आणि चढ-उताराची होती. हेळवाक मध्ये पोहोचेतो दिवस पार मावळला. थोड्याशा अंधारातच रस्त्यापासून जवळच असणारे मारुती मंदीर मुक्कामासाठी शोधले. मंदिराला पुढे मंडपही होता. मंदिराची देखभाल ,पूजाअर्चा करणारे एक वृद्ध दाम्पत्य मंदिरालगतच्या खोलीत होते. त्यांची परवानगी घेऊन सॅक उतरवल्या. बूट काढण्याचे मात्र धाडस होत नव्हते .पाय कधीचेच ठणाणा करायला लागले होते.
रात्रीच्या पोटपूजेसाठी चूल लावायची जागा निश्चित केली. चुलीसाठी गरजेपुरते तरी सरपण आणणे भाग होते. मुक्कामासाठी येथे येतेवेळीच, रस्त्याच्या कडेला थोडाफार फाटा पाहून ठेवला होता. मुक्कामाची जागा नक्की नसल्याने तो घेऊन आलो नव्हतो इतकेच. सॅक मंदिरात ठेवून तो लाकूड-फाटा आणण्यासाठी म्हणून बाहेर पडत होतो. ते पाहून, आमच्या आजोबाच्या वयाच्या त्या पुजारी बाबांनी विचारले,”काही पडलय कां– येतेवेळी— नाही म्हणजे अंधाराचे परत बाहेर जाताय, म्हणून विचारतोय. “
आम्ही कशासाठी बाहेर जातोय ते त्यांना सांगितले. त्यावर ते मोकळेपणाने हसून म्हणाले, “आता सरपण आणून तुम्ही चूल लावणार, मग शिजवणार, मग जेवणार—- सगळा संन्याशाचा संसार दिसतोय तुमचा. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी म्हणतात तसे—-
” तुम्हाला चालत असेल तर, आमच्या गृहस्थी संसारातील पिठलं भात खा आजच्या रात्रीपुरता”; असं म्हणत आमच्या होकार नकाराची वाट न पाहताच त्यांनी पत्नीला पिठलं भात करायला सांगितलाही.
‘ भटकंतीत आपला कोणालाही त्रास होऊ नये ‘ असेच आपले वागणे असले पाहिजे, या अलिखित नियमाचा भंग आम्ही करीत होतो. मनाला ते फारसे पटतही नव्हते. पण खरं सांगू, त्यावेळी दिवसभराच्या तंगडतोडीने दमलेलो असताना ,त्यांचे ते पिठलं भाताचे आवातन (पाहिजे तर लावून घेतलेले आवातन म्हणा )इतके सुखावणारे होते की, त्यावेळी दुखऱ्या पायांनी सुद्धा उड्या माराव्या वाटल्या होत्या. मंदिराच्या मंडपात एका कोपऱ्यात सॅक उघडल्या, बूट काढले. फोड फुटून बोटा जवळची कातडी पूर्णपणे सोलवटून निघाली होती.जवळच्या प्रथमोपचार साहित्यातून जखमांची साफसफाई करून मलमपट्ट्या केल्या. एव्हाना शिजलेल्या भाताचा वास, भुकेला आमंत्रण देऊन गेला. जवळच्या हापशावर जाऊन जमेल तेवढी शारीर स्वच्छता केली. तोवर अंधार चांगलाच दाटला होता. जेवणासाठी आलेली आजोबांची हाक ऐकण्यात भुकेल्या पोटाने, क्षणाचाही विलंब लावला नाही. त्यांच्या घरी जाऊन दोघांनी वाफाळता भात, त्यावर सुरेख चवीचे पिठलं, पोटात पोहोचवलं, तेव्हा सुखाचा परमावधी झाला होता. एकाच वेळी पोट भरल्याचा ढेकर आणि मनातून त्या आजी आजोबांविषयीच्या कृतज्ञतेचा हुंकार आला.
दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर पडताना, मंदिरातील पाषाण मुर्ती पुढे आम्ही नतमस्तक होताना, मनात ते आजोबा-आजी होते.आदरातिथ्याची किंमत म्हणून नव्हे तर कृतज्ञता म्हणून काही पैसे ठेवले.
आमच्या सह्याद्री भटकंतीत, अशा अनेक माय माऊल्यांचे ( यात घरच्या माऊल्याही आल्याच )हात आमच्या पोटात विसावले आहेत. त्या बळावरच आम्ही त्या भटकंत्या पार पाडल्या आहेत. सुदैवाने त्या काळात, अशा भूक वेळा निभावून नेण्याला व्यवहाराचे वारे लागले नव्हते. त्यावेळी तरी ते, निव्वळ माणसाने माणसाशी केलेले माणुसकीचे नितळ ,निखळ असे वागणे होते.
“आता तसे राहिले नाही” अशी खंत मी करणार नाही. सगळ्यांच्याच जगण्याच्या बदललेल्या मितीतून, बदललेल्या परिस्थितीतून, सह्याद्रीत भटकणाऱ्यांच्या संख्येत झालेल्या वाढीतून,हे बदल अपरिहार्य आहेत, हे उमजतय. दोष कोणा एकाला देता येणार नाही. पण देण्याघेण्यातील नाती कोरडी झाली आहेत, हे नक्की. आता सह्याद्रीत फिरताना तसेच जाणवते.
एखादे मामा, एखादी मावशी निरोप द्यायला, रस्ता दाखवायला कड्यापर्यंत यायची, पुढची वाट बैजवार, खाणाखुणांसह सांगायची, काळजी घेत जाण्याच्या सूचना परत परत करायची, वेळ प्रसंगी दटावायची, आम्ही योग्य वाटेला लागतोय की नाही हे पाहण्यासाठी, डोळ्यावर हाताच्या पंजाची पालव धरून बराच वेळ उभा असल्याच्या मन पटलावरील त्या प्रतिमा अध्यापही ठळक आहेत.
म्हणूनच जगताना इतकं कोरडं होऊन पुढे जात राहणं, प्रत्येक पावलाची, घासाची किंमत मोजतच वावरणं ,हे माणसाचं जगणं कसं असू शकतं ?,असा प्रश्न मला आताशा पडतो.
©️ दिलीप नाईक निंबाळकर.
बावधन .पुणे
 
 

सह्याद्रीतील पाणस्थळे (भाग ४ था)

17 मार्च 1984
होळी पौर्णिमा
पौर्णिमेला काहीजणांच्या अंगात येतं असं म्हणतात. प्रकार नेमका काय असतो कुणास ठाऊक ?
पण माझ्याही आयुष्यात काही काळ अशा पौर्णिमा होत्या. फक्त प्रचलित प्रकारांपेक्षा अंगात येण्याचा प्रकार थोडा वेगळा असायचा. पौर्णिमा आल्या की मला डोंगर वाटा बोलावून घ्यायच्या. कोणत्याही परिस्थितीत, सोबत कोणी असले- नसले तरीही मी वस्तीला डोंगरात जायचो. वेळेचे बंधन असले तर, पूर्ण चंद्राच्या दर्शना पुरता का होईना जवळपासच्या टेकडीवर तरी भटकून यायचो. विशिष्ट ठिकाणाचा आग्रह कधीच नसायचा. टेकड्या, गडकोट, दिवसाउजेडी भकास, उजाड भासणारी पण पौर्णिमेच्या रात्री विलक्षण जिवंत असणारी माळराने, पठारे, कड्याच्या खोपी, जलाशयांचे हळूवार गप्पा मारणारे काठ— अगदी काहीही चालायचे त्या रात्री.
पुढेपुढे प्रपंचाचे भूत अधिक प्रबळ झाल्यानंतर भटकंती प्रेमाने माझे झाड सोडले असावे.
ते वेड भरात असलेल्या दिवसातील ही गोष्ट आहे. होळी पौर्णिमेला कुठे जायचे ते निश्चित होत नव्हते. भटकणाऱ्या सोबत्यांच्या रजा, सुट्टीचा मेळ घालण्याचा घोळ काही केल्या संपेना.मग एकटाच बाहेर पडलो. हा प्रकार काही मला नवा नव्हता. सर्वजण पोटार्थी असल्याने नोकरी सांभाळूनच भटकणारे होतो. माझ्या नोकरीतील वरिष्ठ सहकार्य करणारे होते आणि सहनशीलही. त्यामुळे मी खूप वेळा स्वतःच्या सोयीनुसार नोकरीत हजर राहण्याचे गैर स्वातंत्र्य उपभोगीत असे. शिवाय सडाफटिंग होतो .
त्या होळी पौर्णिमेच्या आदल्या रात्री मी लोणावळा रेल्वे स्टेशन वर दिवस उजाडायची वाट पहात होतो. एकट्यानेच गडदच्या बहिरी च्या गुहेतून,कपारीतून पुनवेची रात्र न्याहाळायची या कल्पनेनेही स्टेशनवरचा गोंधळ सहन करीत होतो. फटफटायला लागले तसे लोणावळा सोडले. राजमाचीच्या दिशेला लागलो.
अगदी भल्या पहाटे डोंगर वाटा चालण्यासारखे दुसरे सुख नसते.अवघी गात्रे जागी असतात. कान,नाक,डोळे या इंद्रियांना मेजवान्या मिळत असतात. सर्व इंद्रिये कशी ताजीतवानी असतात.नागरी वस्तीतील सूर्योदय रोज नवा असेलच याची खात्री नसते. रानात मात्र ती असते. असला नवाकोरा दिवस न्याहाळत तुंगारली तलावा पुढची ठाकरवाडी सोडली. राजमाचीचे गडकोट दिसायला लागले. आता पुढचे दीड-दोन तास तरी ते डोळ्यापुढेच राहणार होते.
नकळतच पायाला वेग आला.उजव्या हाताची लांबलचक कातळभिंत ऊन अडवून बसली होती. त्यामुळे मोकळ्या हवेतील त्या सकाळी,थंडीचा हलकासा काटा फुलत होता. चालण्याचा वेग वाढला तशी उब अंगात खेळायला लागली. रात्री अंगात चढविलेला लांब बाह्यांचा शर्ट नकोसा वाटायला लागला. चालीला आलेला ताल मोडावासे वाटेना. म्हणून चालतच राहिलो.एकट्याने भटकण्यातील हा एक आनंद. पावलांच्या आणि जमिनीच्या नात्याची सुखद लय, मन तृप्त होईपर्यंत लांबविता येते. मन चाहेल त्यावेळी हळूहळू त्या लयी चे बोट अलगद सोडता येते. बरोबर कोणी असले तर मात्र, ‘थांबायला लागणे’ म्हणजे लयी वरून धपकन उडी मारून उतरल्यासारखे वाटते.
एका सुकलेल्या वाहळाशी थांबलो.थोडा विसावलो.शर्ट बदलला .पाठ पिशवीतील पाण्याने घसा ओला केला. पाऊस काळात याच वाहळात मिळणाऱ्या निवळशंख पाण्याची आठवण झाली. ती आठवण देखील गारवा देऊन गेली. आज मात्र पाणी पुरवून पुरवून वापरावे लागणार होते. मार्च महिन्यात अवघा सह्याद्री माथा कोरडाच असतो. आता उजव्या हाताच्या कातळभिंतीवरुन नारायणराव डोकावायला लागले होते. गारवा कुठच्या कुठे पळाला. पाठीला सॅक लावली. पायवाट सरधोपट असल्याने, नजर इकडे तिकडे उंडारायला मोकळी होती. डाव्या हाताला लांब वर लोणावळ्यापलिकडील नागफणी पासून ते समोर असणाऱ्या राजमाचीतील गड कोटा पर्यंत नजरेची झूम लेंन्स फिरत होती. उजव्या हाताला गडदेच्या बहिरीच्या दिशेत गेलेल्या रानाला नजरेने कवटाळत पावलांना कधी गती आली ते कळालेही नाही.
वरवंड गावातून आलेल्या एका ओढ्याच्या पलिकडे दोन वाटांचा चिमटा झाला होता. डावीकडील वाट राजमाची कडे जाते तर उजवी वरवंड कडे.
राजमाचीकडे पाठ करीत उजवी वाट धरली. गावाच्या खुणा भेटत होत्या. पाऊलवाटां वरील गुरांचे खुर, शेणाच्या पावट्या, अनवाणी माणसांच्या पाउलखुणा मला थेट गावातील शाळेपर्यंत घेऊन गेल्या. दोन खोल्यांच्या शाळेच्या पडवीत पोहोचलो. घाम पापण्या वरून ठिपकायला लागला होता. पडवीत टेकलो. सॅक उतरवली.पाठ घामाने चिंब झाली होती. सॅक उतरवल्याने पाठीला वारा लागला. खूप बरं वाटलं.मला पाहून शाळेतील पोरांचा गलका थांबला. मास्तरांनी एक पोरगं पाणी आणायला पिटाळलं. गावातील एक मामाही कुतुहलाने जवळ आले. त्यांना व शिक्षकांना राम राम घातला. कुतूहलाला वाट करून देत त्यांनी बोलायला सुरुवात केली. डोंगर भटके त्यांना नवखे नव्हते. पण माझं एकटेपण मात्र त्यांच्या मनात अनेक प्रश्न उभे करीत असावं.”गडदच्या बहिरीला निघालोय ” ,असं सांगितल्यावर तर त्यांच्या चेहऱ्यावर आलेला अविश्वासाचा भाव स्पष्टपणे माझ्यापर्यंत पोहोचला. यापूर्वीही मी बहिरीला गेलो आहे ,असं सांगूनही त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव फारसे बदलले नाहीत.त्याकडे दुर्लक्ष करीत मी पोटात आणि बाटलीत पाणी भरून घेतले. पुढच्या रस्त्याची ,मनातल्या मनात आणि त्या शिक्षकांसह ,मामां बरोबर उघड बोलून एकदा उजळणी करून घेतली.सॅक पाठीला लावली. नेटक्या चालीने चाललो तर, दोन- अडीच तासांची चाल अजून बाकी होती. गाव सुटताच चढणीची पायवाट सुरु झाली.
यापूर्वी या वाटेवरून भीमाशंकरहून येताना आलो होतो.त्या भटकंतीच्या आठवणी मनावर मोरपीस फिरवत होत्या. खांडी जवळच्या तलावाकाठीचा मुक्काम, कुंडेश्वराचे एकांतातील देऊळ—- सुख म्हणजे काय ते त्या भटकंतीत कळाले होते. समोर मांजरसुभ्याची भिंत दिसायला लागली. बहिरीच्या गुहेतून संध्याकाळ निरखायची,म्हणून वेग वाढविला. खाली मुंडी घालुन तडातडा चालायला लागलो. झाड झाडोरा दाटायला लागला. अधून मधून वरचे आभाळ दिसेनासं व्हायचं. अशाच एका झाडीच्या टवक्यातून बाहेर आलो आणि लक्षात आले की वाटेची काहीतरी गफलत होते आहे. संभ्रमावस्थेत दोन-चार मिनिटे थांबलो. माणसांचा वावर कमीच असलेल्या त्या पायवाटेवर, फार फार तर सकाळी डेअरीला दूध घालायला जाणारे आणि लगबगीने परतणारे मावळी भाऊ असतात. पण यावेळी ते भेटण्याची शक्यता कमीच होती. त्यामुळे ‘आपली वाट आपणच शोधायची असते, तयार करायची असते’ हा तत्त्वज्ञानाचा डोस मनाला पाजला. आता पाय वाट सुटली असली तरी पुढे चालतच राहिलो तर परत मुख्य पाय वाट मिळेलही, या विचाराने तसाच पुढे चालत राहिलो.वाट मिळाली असे वाटायचे ,परत मध्येच कुठे तरी गडप व्हायची. पुढे जावे की मागे फिरावे हे नक्की होईना. एका ठिकाणी थांबून घोटभर पाण्याने घसा ओला केला तेव्हा अंगावर सरसरून काटा फुटला ,चक्क थंडी वाजायला लागली.
मार्च महिन्यातील दुपारी, ते देखील एवढ्या चालीने अंग गरम असताना देखील थंडी वाजते, हे लक्षात आल्यानंतर पुढची सगळीच लक्षणं दिसायला लागली. आता अंग थडाथडा उडेपर्यंत थंडी वाजणार, कोणीतरी धोपटून काढल्यासारखं अंग दुखणार, मग सडकून ताप येणार हे सांगायला आता डॉक्टरांची गरज नव्हती. गेले दोन महिन्यात दोन वेळा या आजाराला तोंड दिले होते. ‘हिवतापाचे हे दुखणे परत परत उद्भवते’ या डॉक्टरांच्या सांगण्याची प्रचिती या आडरानात येत होती. नोकरीनिमित्त रहात असलेल्या गावाची तेथील सांडपाणी व्यवस्थेची ही देणगी इतक्या लवकर उद्भवेल असे वाटले नव्हते. पण माझ्या वाटण्याशी देणे-घेणे असायला शरीर आता माझ्या ताब्यात होतेच कुठे ?
कसकस वाढायला लागली. आळोखे पिळोखे द्यावेसे वाटायला लागले. थंडी तर जुमानेनाशी झालेली. आता बहिरीची वाट शोधणे राहिले लांबच,पण कुठेतरी पडून रहावेसे वाटायला लागले. परत फिरायला मन होत नव्हतं आणि तेवढे भानही नव्हते. होळी पौर्णिमेचा देखणा चंद्र आता स्वप्नच ठरणार होता.मध्येच मन उसळी मारून पुढे चल म्हणत होतं. नेमक्या वाटेवर असतो तर तेही केले असते. पण वाटेचा तपास नव्हता, तो बरोबर मिळण्याची शक्यताही धूसर होती. बहिरीला जाताना मांजर सुभ्याची भिंत, रांग डावीकडे ठेवून पुढे जावे लागते. पण आता ती उजव्या हाताला अगदी नजीक दिसत होती. आणि मी नाळेसारख्या –नव्हे –एका नाळेतच होतो. वाट चुकल्याची खात्री झाली. मूळ वाटेच्या खूपच आधी मी डाव्या हाताची एखादी पायवाट घेतली असावी. आता तर माघारी परत जाण्यासाठी देखील वाट सापडेल, असा विश्वास नव्हता. थंडी, अंगदुखी शरीराचा ताबा घ्यायला लागली होती. डोकं भणभणायला लागलं. विचार करण्याचे त्राण फार वेळ तग धरेलसे वाटत नव्हते. कुठूनही ,कसेही करून येथून बाहेर पडायला पाहिजे, एवढेच भान होते .पण त्यासाठी काय करावे, काही सुचेना. शरीराचा कणन् कण, पडून राहण्यासाठी अधीर होता.ढकलल्यासारखा चालतच राहिलो.
आता नाळ उतरायला सुरुवात झाली होती. कुठेतरी गाव, वस्ती, पाडा मिळेल या आशेने पुढे जात राहिलो. संधी मिळेल तेथे रात्र काढायची आणि जवळच्या कोणत्याही गावातून एसटी पकडून परत घरी जायचे असे ठरवले. निर्णय नकळत घेतला गेला होता. पण,’आज रात्री कुठेतरी पडून राहणार आहोत ‘या कल्पनेनेही बरं वाटायला लागलं.विचारात नाळ उतरतच राहिलो. आता त्या कोरड्या नाळे शिवाय वाटच नसल्याने आणखी वाट भरकटण्याची भीती नव्हती. मात्र लहान-मोठ्या गोट्यातून, दगडातून उतरताना गुडघ्याच्या वाट्या बाहेर पडतील असं वाटत होतं.पण नाळ सोडून चालणार नव्हते. बाहेर पडून येथून वाट मिळणार नव्हती. नाळेच्या दोन्ही अंगांनी झाडोरा चांगलाच दाटला होता. त्याची सावली नाळेच्या पात्रात होती. एरवी त्या सावलीने सुखावलो असतो. पण त्यावेळी मात्र अंगात मावेनाशा झालेल्या थंडीमुळे ऊन असतं तर बरं झालं असतं, असं वाटायला लागलं. तहान लागत होती घोटा घोटाने पाणी पुरवून पीत होतो. पण तेवढ्यानेही थडथडायला व्हायचं,अंग पिळवटून निघायचं. आता वेळेचे, जागेचे भान सरले होते. मनात एकच घोष चालू होता, ‘कुठे का होईना भरपूर पांघरून घेऊन झोपायला मिळावे’– मनातल्या त्या विचार क्षणी त्या रानाने, जंगलाने तथास्तु म्हटले असावे.
नाळेच्या डाव्या हाताला, रानाचा टवका उडाल्या सारखी खळाभर जागा उघडी होती. तेवढ्या मोकळवनात एक धनगरी घोडं वाळलेल्या गवतावर तोंड आपटत होतं. थोड्या अंतरावर त्याची मालकीण तीन दगडाच्या चुलीला जाळ घालत, काहीतरी शिजवीत होती. जवळ तिचा संसार पसरला होता त्यावर एक तीन-चार वर्षाच पोरग कोलांट्याउड्या घेत होतं.मी नाळेतून बाहेर पडून जवळ गेलो.मावशी आणि तिचं पोर दोघंच दिसत होते. त्या मावशीला रामराम घालत सॅक उतरवली.किंचीतशी दचकल्यासारखी झाली ती. थोडस आश्चर्य ,थोडसं दुर्लक्ष करण्याच्या नजरेने तिने मला न्याहाळलं, आणि विचारलं “हिकडन कुठन आलास र बाबा “?
“वाट चुकलोय मावशी मी. बहिरीला जायचं होतं, पण आता नाही जात. ही नाळ खाली कुठे उतरते ?त्याला काही दुसरा रस्ता, वाट आहे का? “
“ही काय वाट ” असं म्हणत तिने नाळे पासून विरुद्ध दिशेला दोन तीनशे फुटावर असणाऱ्या गवतातल्या पायवाटेकडे हात दाखवला. खरंच एक ठळक पायवाट दिसत होती. या आधीच मी नाळेतून बाहेर पडून वाट शोधण्याचा प्रयत्न केला असता तर मला ही ती पायवाट सापडली असती कदाचित. खालच्या ठाकूरवाडीत ती वाट जात असल्याचे त्या मावशीने सांगितले.
घाटावरून खाली कोकणात मेंढरे चारायला नेणाऱ्या धनगरी कुटुंबातील ती मावशी नवऱ्याची वाट बघत होती. त्यांचं मेंढरांचं खांड जवळच्या एका रानात आजच्या रात्रीसाठी बसवायला तो गेला होता. त्याचे इतर जोडीदार खांडा सोबत आज थांबणार होते. तो एकटाच आज परत येऊन उद्या तळ उठवून खाली ठाकूरवाडीत जाणार होते. म्हणजे त्यांचा आजचा मुक्काम येथेच होता, हे कळाल्यावर बरं वाटलं. सॅक उतरवल्या बरोबर शर्ट स्वेटर चढविला ,तरी थंडी कमी होत नव्हती.अंग टाकायला जागा आहे ,माणसाची सोबत आहे ही कळाल्यानंतर आतापर्यंत इच्छेविरुद्ध चालणाऱ्या कशाबशा पावलांनी आता बंड पुकारले. पुढे जायला शरीराबरोबरच मनानेही नकार दिला. महत्त्वाचे म्हणजे दिवस कलायला लागला होता. अशा अवस्थेत हट्टाने पुढे चालत राहिलो आणि वाटेने परत दगा दिला तर त्या रानात, ‘घर का ना घाट का ‘ होण्याची भीती होती. यापूर्वीही रानात एकटा राहिलो होतो आणि रात्री काढल्या होत्या. त्यामुळे रानाची, मुक्कामाची भीती वाटत नव्हती. पण आजची परिस्थिती वेगळी होती. मनाने आणि शरीरानेही, इतर विचारांना,पर्यायाना वावच दिला नाही.
त्या मावशीला कोणतीही औपचारिक परवानगीही न मागता मी पटकन सॅक मधले अंथरूण-पांघरूण काढले आणि त्या रात्री पुरता “बिन बुलाया मेहमान “झालो. औषधाच्या डब्यातून गोळ्या काढल्या, पाण्याबरोबर गिळल्या .पोटात पाणी जाताच परत थंडी बळावली. दिवसाउजेडी मी अंथरुणात शिरलो. जवळ होते नव्हते ते सगळे कपडे अंगावर चढवले होते. मुटकुळं करून अंथरुणात पडून राहिलो,तरी थडथडतच होतो. डोक्यात एकाच वेळी कितीतरी विचारांच्या भिंगऱ्या गरगरत होत्या. वेग मंदावताच बाजूला पडत होत्या. त्यांची जागा घ्यायला दुसऱ्या भिंगऱ्या होत्याच. याआधीच्या ट्रेक मधील आठवणी, गेले दोन महिने सतावत असेलेला हा ताप, उद्याच्या परतीचे विचार, एकट्या बाई माणसाचे असल्या रानात थांबण्याचे धाडस असणाऱ्या त्या मावशीचे कौतुक— अशा असंख्य विचारांनी डोक्याला कलकली यायला लागली. हळू हळू चढायला लागलेल्या तापाने त्या गुंगीने मला या विचारापासून दूर नेले.
किती वेळ गेला, अवतीभोवती काय चाललंय– हे काही कळत नव्हते. कुणीतरी हलवून जागं करत असल्याचे जाणवले. कुठे आहे हे उमजायला देखील वेळ लागला. आता थंडी फारशी वाजत नव्हती. ताप येऊन गेल्या
नंतर दाटणारा बेचवपणा, कडवटपणा मात्र शिल्लक होता. रात्रीचे आठ- नऊ वाजले असावेत. पौर्णिमेचा गोल गरगरत चांदवा बराच वर आला होता. आजूबाजूचे किर्र रान एकजीव झाल्या सारखे दिसत होते. नजरेच्या टप्प्यातलं मोकळं रान मात्र, खरपूस तापवलेल्या दुधावरच्या साईचा रंग घेऊन पहुडलं होतं. मावशीच्या चुलीला जाळ नव्हता, पण धगधगीत विस्तव मात्र चुली बाहेर ओढलेला दिसत होता. दोन बाप्ये विस्तवाला पाय देऊन बसले होते. हवेत गारवा फारसा नव्हता. पण अंथरूणाबाहेर यावेसे वाटेना. अंगाभोवती पांघरूण लपेटून बसून बसून रहावेसे वाटत होते. पण त्या दोघांपैकी एकाची हाक आली,”चल रे पोरा,जेऊन घे. मग झोप परत पाहिजे तर “
उठावं असं वाटेना पण आळोखेपिळोखे देत अंथरुणा बाहेर आलो. अंग ठणकत होतं. चार पावलं चाललं तरी भेलकांडणार याची खात्री होती. डोक्यावरची कानटोपी खाली ओढत चुलीजवळ जाऊन बसलो त्या धनगर दादांच्या प्रश्नाना माझी उत्तरे सुसंगतीने बाहेर पडत नसावीत. काय बाय विचारत होते. सगळंच पोहोचत होतं, असं नाही . डोकं अजूनही जड जड होते. थोड्यावेळाने मावशीने पितळ्या पुढे ठेवल्या. जेवायचे हेच आत्तापर्यंत लक्षात नव्हतं. जेवायची इच्छाही नव्हती! सॅक मधला डबा काढावा असं वाटेना. मला नको जेवायला म्हणून पितळी सरकवणार तोच, मावशीने पुरणपोळीचे टोपल पुढं आणलं.
” आटकन लाव “असं म्हणत मावशीने लाकडाची एक ढपली पुढे केली.यांत्रीकपणाने पितळीला एका बाजूने आटकन लावून (पितळी एका बाजूने ऊंच करुन) गुळवणी ताटात घेतले. एऱ्हवी पुरणपोळीचा खमंग वास देखील मला झोपेतून उठायला पुरेसा होतो. आज मात्र काहीच खाण्याची इच्छा होत नव्हती. पण त्या दुकलीने पोळी गुळवणी खायला सुरुवातही केली होती. आख्खी गुळाची ढेप घालून केल्यासारखी ती पुरणपोळी अन् गुळवणी यांत्रिकपणे मी तोंडापर्यंत पोहोचवीत होतो. एक पोळी संपविताना मी बेजार झालो. संपता संपेना. एवढ्या मोठ्या पितळीच्या आकाराची पोळी म्हणजे घरच्या चार पोळ्या झाल्या असत्या. दमविणारे ते काम मी कसेबसे संपविले. तोपर्यंत त्या दोघांनी पोळ्यांचा पाचुंदा संपविला होता. हे येवढसं खाणारं पोर, या रानात कसं काय चालणार याचं आश्चर्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. कटाच्या आमटीने मात्र तोंडाला थोडी चव आली. आता थोडं भान यायला लागलं होतं. चुली पासून चार हात लांब गोधडीवर ते मगाच् खेळणारं लहान पोर गाढ झोपी गेल होतं. पलीकडे घोडं एका मेखेला गुंतवलेले. धनगर दादांनी बटवा काढला, पानाच्या शिरा नखलताना त्यांनी चंची माझ्यापुढे केली. “खात नाही” सांगून मी ती परत केली. परत अंथरुणाकडे वळालो. आता थंडी फारशी वाजत नव्हती. तापही नव्हता. अंग मात्र दुखत होते. अंथरुणातच पडून राहिलो. तळाची जागा थोडीशी बेचक्यात असल्याने वारा फारसा लागत नव्हता. गरगरीत वाटोळा चांदोबा आता आभाळावर अंमल गाजवित होता.एखादा दुसरा चुकारीचा ढग, त्याच्या पुढून चोरट्यासारखा ये जा करीत होता. बाकी आभाळ कोऱ्या करकरीत पीतांबरा सारखे झळझळत होते. त्या आभाळ पाटीवर आकाशाखालचा रात्रींच्या सुखद आठवणींची चित्रे दिसायला लागली. निरंतर सुख म्हणतात ते हेच असावे. भ्रमंतीने मला हे अनेकवेळा मिळवून दिले आहे. मला भूतलावरचा कुबेर बनविणारे निसर्गदर्शन, माणसांच्या अनेक विविध छटा, अनुभव समृद्धी याविषयी कृतज्ञ होत मी हलकेच झोपेत उतरलो.मावशीच्या पुरणपोळीने आणि थंडी तापासाठी घेतल्या औषधाने काम चोखपणाने केले होते.
सकाळी जाग आली तेव्हा किंचित अशक्तपणा जाणवत होता. पण मन प्रसन्न होते. गडदच्या बहिरीने नाही, पण कुठल्या कां होईना माय माऊलीने मला जवळ केले होते. अगदी कोसळून पडण्याच्या वेळी तिचे हात माझ्या पोटात उतरले होते. त्या आधारावर मी लोणावळ्याची वाट धरली.
आजही प्रत्येक होळी पौर्णिमेला मला गडदचा बहिरी आठवतो, आभाळातला चांदोबा आठवतो आणि त्याच्याच
आकाराची त्या माऊलीची पुरणपोळीही आठवते.
(हा माझा अनुभव, ‘साप्ताहिक सकाळ’ मध्ये काही वर्षापूर्वी प्रकाशित झालेला आहे. आज होळी पौर्णिमेनिमित्ताने तो येथे सादर केला आहे.)
दिलीप नाईक निंबाळकर.
 
 
 

सह्याद्रीतील पाणस्थळे (भाग पाचवा)

CreditAvdhootGodboleFb

26, 27 जानेवारी 2013 हातगड, अचलागड, अहिवंतगड. जिल्हा नाशिक.
 
डोंगर भ्रमंतीला बाहेर पडताना एकदा नातीने विचारले, “आजोबा, तुम्ही सारखे सारखे का डोंगरावर फिरायला जाता ?” अत्यंत निरागस असा तिचा प्रश्न मला मात्र गहन कोड्या सारखा वाटला. प्रसिद्ध गिर्यारोहक जॉर्ज मॅलरी ला हाच प्रश्न एव्हरेस्ट संदर्भात अनेक वेळा, अनेक व्यक्तींकडून विचारला गेला होता, “Why you go to Mount Everest ?” त्यावरील त्याचे उत्तरही कालातीत असे आहे, “because it is there”. ते उत्तर त्या महान गिर्यारोहकाच्या एकूण लौकिकास साजेसे आहे. माझ्या एकूण गोळाबेरीज व्यक्तिमत्वा सारखी, एकाच वेळी अनेक उत्तरे माझ्या मनात आली. मात्र ती सारीच त्या निरागस प्रश्नकर्तीच्या आकलना बाहेरची होती. म्हणून आणि गंमत म्हणूनही तिला साजेल, समजेल असे उत्तर ओठी येत होते, “तुझी आजी सारखी सारखी मला रागावते, काम सांगते, म्हणून मी डोंगरात जातो. पण क्षणभरात या धाडसी उत्तराचे भविष्यातील दुष्परिणाम ध्यानात आले आणि मी संयमाने, ते न झेपणारे उत्तर प्रयासाने थांबविले. त्या उत्तराचे परिणाम असे होण्याची शक्यता होती, पहिला परिणाम म्हणजे भटकंतीला बाहेर पडतेवेळी मिळणारा डबा, रेडी टू कूक सारखे घरगुती बनावटीचे पदार्थ मिळाले नसते. दुसरी शक्यता होती,मला कायमचे डोंगरातच रहावे लागले असते. ते परवडणारे नव्हते. मात्र त्यानंतरच्या एका डोंगर भटकंतीत त्या प्रश्नाचे अचूक उत्तर मिळाले.
 
26, 27 जानेवारी 2013 या दोन दिवशी शशी हिरेमठ सह नाशिक जिल्ह्यातील हातगड, अचलागड, अहिवंतगड या ट्रेक ला गेलो होतो. महाराष्ट्र गुजरातच्या सापुतारा सीमेलगतचा हातगड हा दुर्ग प्रथम गाठला. गडात प्रवेश करण्याआधी, पायर्या चढून जात असतानाच, डाव्या हातास, साधारणपणे पुरुषभर उंचीच्या कातळ कड्यावर मराठी भाषेतील एक शिलालेख, हे एक या गडाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. गडाला विस्तार आहे. पाण्याचे मोठे टाके आहे. पूर्वेस अवघ्या दोन-तीन किलोमीटर अंतरावर गुजरातने “सापुतारा” हे नव्याने सजविलेले,नटविलेले सह्याद्री माथ्यावरील पर्यटन केंद्र झगमगताना दिसते. दोन राज्यांच्या व्यक्तिमत्वाचे दर्शनच जणू येथून होते. एक उपभोगवादी, तर दुसरे उपभोगशून्य कर्मवादी.
 
दुर्ग पाहून खाली उतरलो आणि अचल गडासाठी याच डोंगररांगेतून चालायला लागलो, तेव्हा अकरा वाजून गेले होते. झाडी फार नव्हती. गिरणा नदी जवळ पोटपूजा आणि थोडी विश्रांती यात एक तास गेला. नदी ओलांडून पळसदर मार्गे जांभळी गावात पोहोचलो तेव्हा पाच वाजून गेले होते. ताणले असते तर आणखी किमान एक तासभर तरी चालू शकलो असतो. पण गावालगतचा तलाव मुक्कामाचा आग्रह करीत होता. इतका चांगला पाणवठा पुढे भेटेलच याची खात्री नव्हती. आडरानात रात्र काढणे,पाणी शोधत फिरणे हे काही नवे नव्हते. पण समोर इतका छान पाणवठा असताना तो डावलून हट्टाने पुढे जावे हे काही केल्या मन स्वीकारेना. मनाला शरीर कधी फितुर झाले, हे कळलेही नाही. या फितुरीस बळ मिळाले ते, गावाच्या शेवटच्या टोकाला, एक भरपूर मोठे स्वच्छ अंगण असलेले टुमदार घर पाहून. घर खूप मोठे नव्हते. पण महत्त्वाचे म्हणजे तलावाला अगदी जवळ होते आणि एका कोपऱ्यात चूल लावता येईल एवढे मोठे अंगण त्या घराला होते. पाण्यासाठी फार लांब जावे लागणार नव्हते मुख्य गावापासून —-म्हटलं तर गावात –म्हटलं तर गावाबाहेर— अशा अंतरातील ते घर गावापासून थोडस अलिप्तच होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तलावाचा बंधारा ओलांडून सहज अचलगडा साठी मार्गस्थ होणे शक्य होते. मग फार विचार नाही केला.
 
घर धनीण ओसरीतच काही कामात होती. साठीच्या आसपास च्या मावशीना रामराम घालून, मुक्कामासाठी अंगणात राहण्याबद्दल विचारले.थोड्या विस्मयाने त्यांनी पाहिले. आधी सगळी चौकशी केली, “कुठून आलात, कुठे जाणार, कशासाठी, दोघेच का ?” इत्यादी नेहमीच्या सरावाची झालेली ती चौकशी होती. शशीने नेहमीच्या उत्साहाने सगळ्या शंकांचे निराकरण केले. प्रसन्न अशा हास्या सहित त्यांनी रहाण्याची परवानगी दिली. म्हणाल्या, “बाहेर अंगणात कशासाठी वेगळी चूल लावताय ? चालत असेल तर, आमच्या घरातल्या चुलीवरच करा की तुम्हाला काय करायचे ते”. आम्हा भटक्यांच्या संस्कृतीस, असे दुसऱ्यांना काहीही त्रास होईलसे, त्यांच्या रोजच्या व्यवहारात अडथळा होईल असे वागणे – वावरणे मान्य होत नसल्याने, त्यांना नम्रपणाने नकार दिला. पावसाळ्यातील ट्रेक मध्ये अगदीच अपरिहार्य परिस्थितीत, अनेक वेळा आम्ही थेट परक्या घरातही चुलीपर्यंत वावरतो देखील. पण तो शेवटचा पर्याय म्हणून. एरव्ही आपला त्यांना कमीत कमी त्रास होईल असेच वागण्या राहण्याचा आमचा प्रयत्न असतो. अंगणाच्या एका कोपऱ्यात मावशीनी दाखवलेल्या जागी तीन दगड लावले .
तलाव जवळच असल्याने, झकास पैकी गुडघे स्नान करून ताजेतवाने होत, येताना सरपण म्हणून काटक्या फाटा गोळा करीत आलो.चूल पेटवून रिवाजाप्रमाणे प्रथम चहा केला आणि त्याच भांड्यात खिचडीसाठी आधण ठेवले. चहा घेत असतानाच मावशीची मुलं आली. त्यांच्याशी गप्पा मारत खिचडी शिजायला घातली. आता अंधारले होते व्हरांड्यातील बल्बचा फिकट उजेड अंगणातही आपले क्षीण अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करीत होता. आता वारं सुटलं होतं. अंगणात उघड्यावर चूल असल्याने जाळ म्हणावा असे अंग धरीत नव्हता. चुली भोवती दोघेही बसून राहिलो. जेणेकरून वाऱ्याला आडकाठी होईल आणि सरपण समर्पणाला लागेल. पण ‘अग्नीला नमवायचेच’ या जिद्दीने पेटलेल्या वाऱ्याने अनेक चोर वाटांचा खिंडीचा वापर करीत चूल निस्तेज करत आणलीच. अनेक प्रयत्न करूनही चुलीचा रुसवा काही निघेना, खिचडी काही शिजेना. अर्धवट शिजलेली खिचडी, थोड्याश्या जाळाची, धगीची वाट पहात होती.पण घायाळ चूल, चुलीतला अग्नी काही केल्या उठेना. थोडेसे चिंतागती झालो. मावशी चांगल्या म्हणत होत्या, घरात शिजवा तर ते ऐकले नाही. आता ‘न घरका ना घाटका’ अशी अवस्था झाली होती. आता मावशींना म्हणावे तरी कसे, की आम्ही आत शिजवतो खिचडी.
 
या संकोचात असतानाच मावशी त्यांचा स्वयंपाक आटपून बाहेर आल्या. त्यांनी आमची आणि चुलीची अवस्था पाहिली. अंगणात विजयी उन्मादाने धिंगाणा घालणारा वाराही पाहिला. परिस्थिती त्यांच्या लक्षात आली त्या म्हणाल्या, “बघा, मी ह्यासाठी तुम्हाला म्हणत होते, आत शिजवा काय शिजवायचे ते .आता रातसार वारं हे असंच भरकटत राहील बघा. अजून बी तुम्हाला चालत असेल तर आमच्या चुलीवर करा स्वयंपाक”. आम्ही तर या निमंत्रणाची वाटच पहात होतो. घाईघाईनं मावशीना म्हणालो, “न चालायला काय झालं मावशी. आता तर तुमचा स्वयंपाक पण झालाय.आता तुमच्या चुलीवर शिजवायला काहीच हरकत नाही.” “तसं नाही दादानु, तुमच्या लक्षात आलं नाही किंवा तुम्हाला माहित नाही म्हणून तुम्ही तसं म्हणताय. आता स्पष्टच सांगते, आम्ही बौद्ध आहोत. इतक्या वेळा सांगूनही तुम्ही आत आला नाहीत, म्हणून वाटलं आन विचारलं, आमच्या चुलीवरचा स्वयंपाक चालणार आहे का?” क्षणभर आम्ही दोघेही अवाक झालो. ते बौद्ध आहेत हे कळल्यामुळे नव्हे तर ट्रेकमध्ये इतक्या वर्षानंतर कुणीतरी पहिल्यांदाच जातीच्या भिंतीचा अडथळा इतक्या स्पष्टपणे उभा केला होता. चूक त्यांची अजिबातच नव्हती. चूक होती पिढ्यानपिढ्या असणाऱ्या धारणांची. उलट मावशींनी नितळ प्रामाणिकपणाने वस्तुस्थिती पुढे ठेवली होती. इतकी वर्षे सह्याद्री आणि हिमालयात फिरतो आहे, पण हे असले वास्तव कधी नागडे उघडे पणाने समोर आलेच नव्हते.याचा अर्थ ते नाही असे नाही. पण डोंगरात जातेवेळी रोजच्या नागरी जीवनातील सगळ्याच धारणा, धर्म, जाती, पंथ,सन्मानपदे, चाकरीत भूषवित असलेली पदे , लौकिक, प्रतिष्ठा सारे काही आपोआपच गळून पडतात. आणि हा फक्त आमचा अनुभव नाही, तर एकूण एक डोंगर भटका या अनुभवाचा धनी होत असतो. नागरी जीवनात कितीही वरिष्ठ किंवा कनिष्ठ पदावर असणारी व्यक्ती, डोंगरात फक्त आणि फक्त माणूसच असते. मदत मागणारा आणि मदत करणारा दोघेही निव्वळ माणूस असतात. तेथे कोणीही तंत्रज्ञ, नसतो, विधिज्ञ नसतो वा धन्वंतरी, वरच्या वा खालच्या पदावर नसतो.उच्च वा कनिष्ठ कुळातील नसतो. अगदी स्त्री किंवा पुरुष ही भेदभावही नसतो. निसर्गाशी नाळ पुन्हा जोडण्यासाठी, पर्वत-डोंगर जवळ करणारे ते जीव, शुद्ध माणुसकीच्या दिशेने निघालेले प्रवासी असतात. डोंगरात फिरते वेळी मीच नव्हे तर सगळेच गिर्यारोहक कुठल्याही धर्माचे, जातीचे, पंथाचे, पदावरील व्यक्ती नसतो, तर फक्त गिरीप्रेमी, निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमीच असतो. नागरी जीवनात अपरिहार्यपणे या गोष्टी अंगाला चिकटलेल्या असतात. इच्छा असली किंवा नसली तरी या जंजाळातून बाहेर पडता येत नाही, काही वेळा. डोंगरात असताना कुणा घरचे पाणी, कोणाच्या चुलीवरचा स्वयंपाक हे विचारही मनाच्या आसपास फिरकत नाहीत, हा अनुभव आहे.
 
इतक्या वर्षाच्या भटकंती ने मला हे आचार विचाराचे बावनकशी सोने दिले आहे. आणि त्यासाठीच तर नागर आयुष्यातील हे सगळेच काच मनाला खूपच काचायला लागले की मी सरळ डोंगरांची वाट धरतो. पुन्हा पुन्हा डोंगरात जात असतो. नातीला थोडी समज आल्यानंतर मी तिला याची ओळख करून देईनच. माणूस म्हणून चोखपणे जगण्याचा तो हमरस्ता असेल.
 
त्या रात्री मावशींच्या चुलीवर शिजविलेली खिचडी, दुसऱ्या दिवशी सकाळी केलेले उपीट, चहा यात ते कुटुंब आनंदाने सहभागी झाले होते. त्यामुळे आमच्या ट्रेकला चार चांद लागले होते. रात्री त्या मावशींचे आग्रहाचे सांगणे डावलून आम्ही व्हरांड्यातच पथाऱ्या पसरल्या. घर एकदम बंदिस्त असल्यामुळे आत गुदमरल्यासारखे होईल, म्हणून व्हरांड्यात झोपलो. पण उत्तर रात्री थंडीने दातखीळ बसायची वेळ आली. जेमतेम शंभर फुटावर पाणवठा होता. थंडीने काकडून पाय पोटाशी घेऊन डोक्यावर पांघरूण ओढले. अर्धवट झोप —अर्धवट जाग– यात कधीतरी छान डोळा लागला. सकाळी सवयीप्रमाणे लवकर जाग आली, त्यावेळी त्या छान डोळा लागण्याचे कारण स्पष्ट झाले. मावशींनी त्यांच्या गोधड्या हळुवारपणे आमच्या अंगावर टाकल्या होत्या!आतपर्यंत पोहोचलेली ती ऊब मला अजूनही डोंगरातील मुक्कामात कधीतरी जाणवतेच.
 
लेखक – दिलीप नाईक निंबाळकर 
 

सह्याद्रीतील पाणस्थळे – भाग ६

CreditAvdhootGodboleFb2

दिनांक २९ऑक्‍टोबर ते ६ नोव्हेंबर १९८0
सहकारी :आनंद पाळंदे ,शशी हिरेमठ ,नंदू पागे ,आदित्य पोंक्षे, बाळाजी देशपांडे, हेमंत काशीकर, शेखर कुबेर, आणि दिलीप निंबाळकर.

या भटकंतीत त्यावेळी असणाऱ्या सहकाऱ्यांपैकी आता दोन सहकारी आमच्यात नाहीत.
नंदु पागेचा आज( २१मे १९८६ ) स्मृती दिन आणि (दि. १९ /४/२०२१ ) हेमंत काशीकर, यांच्या स्मृतीस हे स्मृती पुष्प सर्वांच्या वतीने अर्पण.

चाकरीतील सुट्टीची चातकासारखे वाट पाहणारे आम्ही आठ जण ,सलग नऊ दिवसाच्या जम्बो ट्रेकसाठी दिवाळीच्या तोंडावर बाहेर पडलो होतो. दिवाळीची दोन दिवसाची सुट्टी, त्याला जोडून साप्ताहिक सुट्टी आणि इतर दिवसांच्या रजा अशी पूर्ण जबाबदारीने आखणी– जोडणी करून घरच्यांच्या दृष्टीने आम्ही “बेजबाबदार” बाहेर पडलो होतो. भटकंती होती गाळणा कंक्राळा ,डेरमाळ ,पिसोळ, मांगी-तुंगी रतन उर्फ न्हाया, मोरा ,मुल्हेर गड, हरगड, सालोटा आणि साल्हेर. पुणे धुळे रातराणीचा अंग आंबवून टाकणारा प्रवास उरकुन प्रथम गाळणा पाहिला. सह्याद्री माथ्यावरील दुर्गांच्या तुलनेत, हे सुरुवातीचे दुर्ग तसे काहीसे कमी उंचीचे, त्यात ट्रेकचा पहिलाच दिवस त्यामुळे तसे ताजेतवाने होतो. त्या दमातच मग कंक्राळा हि पाहून डेरमाळच्या दिशेने पायपीट सुरू झाली. चाल सपाटीवरची असली तरी अंतर मात्रे बरेच असल्याने रस्ता वेळ घेत होता . (या नऊ दिवसात एकदाही कोणत्याही वाहनाला, –अगदी बैलगाडीला देखील– आमचे पाय लावले नाहीत. ) दिवस मावळण्या आधी डेरमाळ मध्ये मुक्कामाला पोहोचण्याचा हेतू साध्य होणार नाही, हे लक्षात आल्यानंतर पायथ्याशी असलेल्या बिलपुरी गावातच मुक्काम निश्चित केला. नऊ दिवसाच्या ट्रेक साठीच्या राशन–पाण्याच्या ओझ्याने सॅक जडावलेल्या होत्या. ओझ्याने थकली घोडी, चटचटा पाय उचलून बिलपुरी गाठण्यासाठी निघाली. बिलपुरी गावाच्या शिवेवरच एक प्रसन्न खळाळता ओढा आमचे स्वागत करते झाला. पावसाळ्याने नुकताच निरोप घेतला होता. त्यामुळे अध्यापही ओढ्याचे नितळ पाणी स्वतःच्याच तंद्रीत मंद गतीने वाहत होते .बिलपुरी जेमतेम अर्ध्या किलोमीटर अंतरावर असावी ,असे गावातील मंदिराचा कळस सांगत होता. इतके स्वच्छ पाणी, मोकळा परिसर, ओढ्याच्या पात्रात पथार्‍या पसरायला ऐसपैस जागा, आजूबाजूला सरपणाची खात्री –भटक्यांना मुक्कामासाठी आणखी काय हवे असते ? गावात जाऊन एखादे मंदिर किंवा शाळा शोधा, पाण्यासाठी सरपणासाठी परत इकडे तिकडे भटका, त्यात भरीस भर म्हणजे यावेळी आम्हा आठजणांचा थवा होता. ओढा दिसल्याबरोबर सगळ्यांच्याच मनात संभाव्य अडचणींच्या भिंती उभा राहिल्या. अगदी नैसर्गिक शरीर धर्मासाठी जागा पाहण्यापासून ते गावकऱ्यांच्या अनेक शंकांचे चौकशांचे निराकरण करण्यापर्यंत सारेच प्रकार या अडचणीत होते.त्यामुळे मुक्कामाच्या निर्णयावर तात्काळ एकमत झाले.

रस्त्यापासून थोडेसे आतल्या बाजूला जाऊन ऐसपैस जागा पाहून पटपटा सॅक उतरवल्या. दिवस लहान होते. अंधारायला लागण्याआधी सरपण गोळा केले. आज आठ जण असल्याने एका चुलीवर भागणार नव्हते .खिचडी एकत्र शिजविण्याइतके मोठे भांडेही नव्हते, म्हणून मग दोन चुली लावल्या. चहा मात्र एकाच भांड्यात केला. वाहत्या ओढ्यातील पाण्याने पावलांना अमाप सुख दिले. मातकटले चेहरेही थोडेसे उजळले. सगळ्यांच्याच हातात वाफाळत्या चहाचे मग सजले .दोन बल्लवाचार्यांनी, आनंद पाळंदे आणि मिश्किल, हुन्नरी असा सहकारी हेमंत काशीकर यांनी चहा घेतच दोन चुलींचा ताबा घेतला. आता अंधारले. पण शिजत्या खिचडीचा वासाला मात्र तो अंधार थांबू शकला नाही. त्या वासानेच पोटातील अग्नी जागा होत होता. चुली दोन असल्या तरी पंगत मात्र एकच ,यातही मतमतांतरास वाव नव्हता. मंद धगीवर खिचडीची पातेली ठेवून, आज आमच्याच मालकीच्या असणाऱ्या ओढ्यातून पाण्याच्या बाटल्या भरून आणल्या. आपल्या थाळ्या घेऊन सर्वजण बसलो. मध्ये खमंग वासाच्या खिचडीची पातेली खिचडी .आता थाळ्यात खिचडी घेणार तेवढ्यात रस्त्यावरून कोणी तरी आमच्याकडे येत असल्याचे दिसले. थांबणे भागच होते. आता बऱ्याच चौकशांना तोंड द्यावे लागणार, तोपर्यंत खिचडी गार होणार या त्रासदायी मनोवस्थेत सगळे होतो. तोवर ती व्यक्ती जवळ आली. थोड्याशा संशयाने( जे आम्हाला अपेक्षित होते) त्याने, कुठून आलात, कुठे जाणार, कशासाठी जाणार अशा अनेक प्रश्‍नांची सरबत्ती सुरू केली. डेरमाळ मध्ये जाणार आहोत असे सांगितल्यानंतर, “डेरमाळ मध्ये काय हाय बघायला ? दगडं ?” या त्याच्या प्रश्नावरच्या आमच्या ऊत्तराने त्याचे काही समाधान झालेले दिसले नाही. आजच्या इतकी त्या काळात ग्रामीण भागाला डोंगर भटक्यांची ओळख झालेली नव्हती. त्यामुळे शांतपणाने त्यांना सगळे समजावून सांगितले .हे सगळं समजून घेतल्यानंतरही स्पष्टपणाने ,ठामपणाने त्यांनी सांगितले , “हे सगळं जरी खरं आसलं तरी तुम्ही आत्ताच्या आत्ता गावात मुक्कामाला चला. मी तुमची रहाण्याची सोय आमच्या गावातल्या देवळात करतो. मोप जागा हाय तिथं.चला लवकर हितनं”. “अहो पण सकाळी आम्हाला तुमच्या गावातूनच डेरमाळला जावं लागणार आहे, त्यावेळी तुम्हाला भेटून जातो पाहिजे तर ” आनंदा. “नाय नाय ते काय नाय. आत्ताच माझ्या बरुबरच चला तुम्ही. इथं नाय थांबायचं रातच्याला “
अजून त्यांच्या मनातला संशयाग्नी जागाच होता वाटतं. म्हणून तर सगळ्या गावकऱ्यांच्या गराड्यात आम्हाला उभा करायचं, त्यांचा हेतू दिसतोय, –असं आमच्या सगळ्यांच्याच मनात आले. त्याने हट्ट केला असता तर त्या एकट्या माणसापुढे –तो गाववाला असल्याने –आमचं काही चाललं नसतं याचीही जाण आम्हाला होती. त्यामुळेही त्यांना समजावण्याचे आमचे सूर नम्रच ठेवावे लागत होते. ( भटकंतीत असे बरेच काही शिक्षण होत असते. ) म्हणूनच अखेरचा प्रयत्न म्हणून शशी म्हणाला, “दादा आमच्या रात्रीच्या जेवणाचा स्वयंपाक इथेच आम्ही शिजवला आहे. जेवण करून येतो की मग गावात झोपायला. पाहिजे तर तुम्ही ही बसा जेवायला आमच्याबरोबर. मग सगळेच जाऊ या गावात “. दादांनी कपाळावर हात मारून घेतला आणि म्हणाले, “आरं माझ्या कर्मा, म्हणजे तुम्ही हितच शिजावलं आणि हितच खाणार बी ” असं म्हणत ते थोडे मागे सरकले. “तुम्ही कोण माणसं हाय का कोण ?आवं आमच्या गावाचा मसनवटा हाय ह्यो. मेलेल्याला अग्नि देत असतो आम्ही हित ,आन हीत तर तुम्ही अन्न शिजावलं व्हय? तुम्हाला काय आकला हायत्या का न्हाय ? हिकडं तिकडं बघून चौकशी करून तरी मुक्कामाची जागा ठरवायची. तुम्ही शहरातली माणसं हुशारीचा लय टेंभा मिरवता आणि ही अशी तुमची अक्कल शेण खातीया. चला चला आत्ताच्या आत्ता गावात चला. शिजावल्यालं हीतच फेकून द्या. गाव काय तुम्हाला उपाशी ठेवणार नाय. आवरा तुमची बाचकी आन चला माझ्याबरूबर .”

आमच्या अकलेचा इतका मोठा पंचनामा याआधी कधीच झाला नव्हता. सगळेच एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिलो.नेमकं काय करावं हे नक्की करता येईना. आनंदाने तेवढ्यातही किल्ला लढविण्याचा दुबळा प्रयत्न करून पाहिला ,”अहो आम्हाला कसं कळणार ही स्मशानभूमी आहे ते. इथं काही स्मशानभूमीत शेड असते तशी नाही, स्मशानभुमीची काहीच चिन्ह नसल्याने टाकला आम्ही मुक्काम. चूक झालीय खरी आमची पण— ” अव ती शेड बीड असली थेरं तुम्हा पैसेवाल्या शहरातल्या लोकांची.आसलं काय बी नसतय हित. वड्याला पाणी आलं की जुनं सगळं घेऊन जातोय— नव्याला जागा होतीया ” गाववाला चांगलाच तापला होता .आमच्यावर आणि शहरांवरचाही राग काढत होता.

हे सगळं नाट्य चालू असतानाच अत्यंत सालस, पापभिरू असणारे कुबेर आणि काशीकर, “भीमरूपी महारुद्राच्या “मध्यावर पोहोचले होते. इतक्या तापल्या गावकऱ्याला डावलून इथेच मुक्कामाचा हट्ट केला असता, तर गावकऱ्यांच्या अनेक संशयाना जन्मास घालण्यासारखे होते, याची जाणीव आम्हा सर्वांनाच होती. म्हणून मग भुकेल्या पोटी –जड हाताने सॅक परत एकदा भरल्या.

त्या गाववाल्याची समजूत घालून,शिजविलेल्या खिचडीची पातेली मात्र बरोबरच घेतली. त्यासाठी देवळाच्या बाहेरच ती खाण्याची त्याची अटही मान्य केली.त्या आधी त्यांची आणखी एक सुचनाही मान्य करावी लागली. ” हितच खिचडी शिजावलीया तर , घिऊन जायच्या आधी हित,त्या टोपातलं दोन घास का व्हयना हित काढून ठेवा. मगच चला. ” त्यांची श्रध्दा किंवा रीत म्हणा, नाकारण्याचा आम्हाला काही अधिकारही नव्हता आणि तसे करण्यात आमचे काही नुकसानही नव्हते.

दोघा जणांच्या डोक्यावर ,कपड्याच्या चुंबळीवर ती पातेली विराजमान झाली. त्या गाववाल्याचा नेतृत्वाखाली आमची वरात गावाकडे निघाली. तेवढ्यातही खट्याळ शशीने, कोणी सहकारी वाढला तर नाही ना या शंकेने शिरगणती केली. कोणी उलट्या पायाचा तर नाही ना ?,याचीही खात्री करून घेतली.आम्ही आठ जण आणि एक गाववाला अशी नऊ जणांची वरात गावाकडे निघाली. मनात सहज एक विचार तरळून गेला, कायम स्मशानात येतानाच्या संख्येपेक्षा परत जातेवेळीची संख्या एकाने कमी झालेली असते. भले एक वजा झालेला /झालेली खांद्यावरून आला /आली असेल, पण तसेच होत असते .आज मात्र आम्ही येताना आठ जण होतो, आणि परत निघालो त्यावेळेला नऊ जण होतो. विचार आचरट– पण तसे घडत होते खरे.

गावातल्या देवळात पोहोचेतो वरातीत सामील होणाऱ्यांची संख्या वाढतच गेली .गावात आम्हाला घेऊन येणारा गाववाला ,वाघाची शिकार करून आल्याच्या आवेशात एकदाचा देवळात पोहोचला. आमच्या नजरा मात्र ,ज्यांच्या डोक्यावर खिचडीची पातेली होती त्यांना सांभाळून नेण्यात गुंतल्या होत्या.
गाव वाल्याने आम्हाला थेट देवळाच्या मागे असणाऱ्या एका ओसरी वजा पडवीत नेले. “हितं काय तुम्हाला जेवाण- बिवान ऊरकायचं आसल ते ऊरका. मग देवळात झोपायला आला तरी चालतय. मी बी येतोय जेवण करून.सध्या सप्ता चालू हाय देवळात. तुमचं जेवण आटपस्तवर भजनी मंडळ येईलच बघा .काय पाणी- बिनी पायजे आसल तर सांगा ह्या पोरास्नी. ए म्हाद्या ह्या पावन्यास्नी एक घागर भरून आनुन दे रं” असं म्हणून तो गाववाला चालायलाही लागला.

आमच्याभोवती पडलेल्या पोरांच्या गराड्यातच आम्ही गरजेपुरती पडवी साफ करून घेतली. तोपर्यंत त्या महादूने एक भरली घागर आमच्या हवाली केली. आणखी कोणताही अडथळा उदभवण्यापूर्वी आमची पंगत बसली. पोटात खिचडी जाताच, कधी एकदा आडवे होतोय असे झाले होते. तोपर्यंत देवळातून भजनाचे सूर यायला सुरुवातही झाली होती. ‘अरेच्या सप्ता चालू आहे’ असं म्हणाला होता तो गाववाला. म्हणजे आजही मध्यान रात्रीपर्यंत झोपेचं खोबरं होणार तर ! कालची पूर्ण रात्र अर्धवट झोपेतल्या एसटी प्रवासातील, आज दिवसभरातील तंगडतोड चाल, आणि आता ही भजनी रात्र. झोप तर डोळ्या बाहेर झेपावत होती. देवळात मुक्काम आणि भजनाला गेलो नाही तर गावकऱ्यांच्या रोषाचे धनी होणार हे नक्की. मग कोणीतरी ढकलत नेल्यासारखे भजनात सामील झालो.

ते भक्तिमय वातावरण, अभंगांची सुरावट सुखावत होती, हेही खरेच. आमच्यातील फक्त नाट्यकर्मींच नव्हे तर नाट्यधर्मीच असलेल्या बाळाजी देशपांडेला ते वातावरण प्रचंड उत्साहित करते झाले. चाकरीतील काही तास सोडले तर, सर्वार्थाने नाटकच जगणाऱ्या बाळाजी चे ताल सूरही पक्के होते,यात नवल ते काय? भजनी मंडळाची दोन-तीन भजने होईपर्यंत बालाजीची बॅटरी फुल चार्ज झाली. जागरणाची सवय असलेल्या बाळाजीने मग खड्या आवाजात, भजने ,भारुडे, गवळणी यांची झडच लावली. गावकरीही खुश होत गेले .गावातील भजनी मंडळ आणि बाळाजीची जुगलबंदीच सुरू झाली. आम्ही झोपाळलेल्या डोळ्याचे झिलकरी मात्र, बाळाजी वरील वाढता राग सुरांवर काढीत होतो की काय कुणास ठाऊक?

ऐसपैस पसरलेल्या माळरानावर, मोकाट जनावरे दिसेल त्या दिशेने उंडरावीत, तसे आम्हा झिलकऱ्यांचे सुर दिशाहीन, सुर पट्टीच्या सीमांची फिकीर न करता कुठेही घुसत होते. झोप तर इतकी अनावर होत होती की प्रत्येक भजन हे शेवटचे असू देत म्हणून, आम्ही विठ्ठलाची मनोमन आळवणी करत होतो. बसल्या जागीच पडायची वेळ आली तरी बाळाजीचा उत्साह काही कमी होईना. भजन संपताच त्याला चांगलाच बुकलून काढावा, असे हिंसक विचार भजनाला सूर देतानाही आमच्या सर्वांच्याच मनी येत होते. पण त्याच्या, एखाद्या गडा सारख्या चिरेबंद असणाऱ्या देहयष्टी कडे पाहून तो विचार ओठावर देखील आणण्याचे कोणाचेही धाडस होत नव्हते. गावकरी मंडळी तर काकड आरती करूनच घरी जाण्याच्या उत्साहात होती. शेवटी मार्ग काढला तो आदित्य पोंक्षेने . तो करंगळी वर करून गेला पडवीच्या दिशेने ,तो परत आलाच नाही. त्याने दाखविलेल्या त्या चोर वाटेने थोड्या -थोड्या वेळाने मग सगळेच झिलकरी पडवीत दाखल झालो. बाळाजी येऊन कधी झोपला, ते ही कळाले नाही.

सकाळी गावकऱ्यांनी पुण्यातून आलेल्या आम्हा भजनी मंडळाचा चहा पानाने सत्कार केला. आम्ही डेरमाळ च्या वाटेला लागलो ते मात्र पुढच्या कोणत्याही गावात मंदिरात मुक्काम न करण्याच्या निश्चयानेच. सप्ता तर सगळीकडेच सुरू असणार होता ना ?

लेखक – दिलीप नाईक निंबाळकर.
©️ दि. २१ मे २०२१

 सह्याद्रीतील पाणस्थळे

( भाग सातवा )
दि. १५ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट १९८१
पानशेत पासून सुरुवात —टेक पोवळे -घोळ -कावळ्या घाटातून सांदोशी -रायगड- दापोली -सिंगापूर नाळेने वर- भट्टी -वेल्हे
सहकारी :आनंद पाळंदे ,शशी हिरेमठ ,बाळाजी देशपांडे, दिलीप निंबाळकर
अंगात रग (ज्याला काहीजण मस्ती असेही म्हणतात– —म्हणोत बापडे ) होती, जिद्ध होती त्यावेळी केलेली ही भटकंती.
एऱ्हवी पावसाळी ट्रेक म्हणजे एक दिवसाचा. पण वर म्हटल्याप्रमाणे रग,जिद्ध होतीच. त्याशिवाय पुढच्या काही महिन्यातच एका हिमालयीन शिखर मोहिमेवर जायचे असल्याने, प्रतिकुलतेचा सराव म्हणूनही हा ट्रेक केला होता.
सह्याद्री टाळू माथ्यावरील, जुलै -ऑगस्ट मधील पावसाला तोंड देणे म्हणजे मोगल सैन्याच्या अफाट लाटांना सामोरे जाण्यासारखे होते.पण ते धाडस करण्याचे वयही होते आणि जिद्दही.
पानशेतला एसटीतून उतरल्या क्षणापासून चौथ्या दिवशी वेल्ह्यात एसटीत बसेतोवरचा (रात्रीचे मुक्काम वगळता )प्रत्येक क्षण अंगात पाऊस मुरविणारा ठरला होता. घोळ पासून पुढे कावळ्या घाटाने खाली कोकणात उतरताना पाऊस असा काही चवताळून अंगावर येत होता की, त्या माराने अंग हुळहुळायला लागले होते.निसरड्या, शेवाळलेल्या पाय वाटेवरचा प्रत्येक दगड,आधारासाठी हाती धरायचे ते प्रत्येक झाड आम्हाला आपटी देण्यासाठी उत्सुक होते. स्वतःला सांभाळून उतरताना प्रत्येक अवयवाला जणू डोळा फुटला होता. तरीही काही आपट्या झाल्याच. सांदोशी गावाबाहेरील एका भिंती नसलेल्या, वर फक्त छप्पर असणाऱ्या देवळात मुक्काम केला. पावसाळा असल्याने चूल -सरपण ही भानगडच नव्हती. फोल्डिंग स्टोव्ह जोडणी पासून रॉकेल भरण्या पर्यंतची सर्कस पार पाडून, चहा, खिचडी साग्रसंगीत पार पडली.
घाटावरच्या तुलनेत खाली कोकणात थंडी नव्हती, हे आमचे सुदैव. पाऊस एका संथ लयीत मुक्कामाला असल्याने वारे नव्हते. दिवसभराच्या थकव्याला झोपेचा छान आसरा मिळाला.
सकाळी चहा-खाणे आटोपून,सुके कपडे परत सॅकबंद केले. कालचे ओले कपडे चढवून, ओळखीच्या झालेल्या पावसाला परिचितां सारखे सामोरे गेलो.रायगड चढतीला लागलो. तसल्या महामूर पावसात त्या पुण्यभूला भेटायला जाणारे फक्त आम्हीच होतो. एऱ्हवी गजबजल्या गडावर आज चिटपाखरूही नव्हते. आकाशातून अखंड अभिषेक चालू असलेल्या राजधानीतील धुकट भरल्या त्या वातावरणातच जगदीश्वराचे,सिंहासनाधिश्वरांचे दर्शन घेऊन माघारी फिरलो. आज वरचा या गडावरील सगळ्यात अल्प काळचा सहवास घेऊन गड उतरलो. परततानाही खूप सावधपणे उतरावे लागत होते.
खाली उतरून “छत्री” गावातून फुफाटती, “काळ”नदी ओलांडली. लिंगाण्याला डावी घालून वाळणकोंडी डोहा शेजारील,दापोली गावापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या एका मंदिरात रात्री पथाऱ्या पसरल्या. कालच्या मंदिरापेक्षा हे मंदिर अधिक मोठे आणि पुरेसा आडोसा असणारे होते.गावापासून अंतरावरही होते. रात्र छान उबदार ठरली.
तिसऱ्या दिवशी सकाळी परत एकदा सुकलेल्या उबदार अंगावर,दोन दिवसाचे पाणी मुरविलेले ओले कपडे अंगावर चढविण्याचे दिव्य पार पाडले. एक- दोन -तीन आकडे मोजून मोठ्या धाडसाने, क्षणाचीही उसंत न घेणाऱ्या पावसात स्वत:ला लोटुन दिले. आजच्या चालीचा टप्पा मोठाही होता आणि सह्याद्री चढणीचा होता.लिंगाणा डाव्या हाताला ठेवून सिंगापूर नाळेला भिडलो. एरवी कोरडीठाक असलेली नाळ आज मात्र, नव्या नवरीसारखी फुलारून, सर्वांगानी सजूनधजून एका विलक्षण आवेगाने खाली काळ नदीकडे झेपावत होती. कोणतीही नाळ चढून सह्याद्री माथ्यावर येणे किंवा उतरणे म्हणजे गुडघ्याच्या वाट्या बाहेर आणणारे कष्टप्रद काम असते. त्यात आज भर पडली होती वेगाने खाली उड्या मारत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध ताकद लावून वर सरकत राहण्याचे. त्यामुळे नेहमीच्या अडीच तीन तासाच्या चढतीने जवळजवळ एक तास जास्तच घेतला. त्यात आज कुठेही क्षणभरही विसाव्यासाठी थांबता आले नाही.फक्त आज घामाच्या धारा नव्हत्या, तर थेट आभाळातून संततधार तेवढी चालू होती. डोळ्यांना मात्र आज अपार सुख लुटता येत होते. दोन्ही बाजूंच्या कड्यावरून सहस्त्र धारांच्या जिव्हांनी कोसळणारे लहान-मोठे अगणित धबधबे साऱ्या परिश्रमांचा परिहार करत होते. तहानलेले घसे ओले करण्यासाठी आज सॅक मधील वॉटर बॅग काढाव्या लागत नव्हत्या. कुठल्याही धबधब्याखाली ओंजळ धरली की नितळ शुद्ध पाणी तृष्णा भागवीत होते.
 माथ्यावर आलो तेव्हा हायसे वाटले. आजच्या चालीतील हा महत्त्वाचा टप्पा पार पडला होता. आता चढतीची नाही तर उतरणीची वाट तुडवायची होती. पण मुखी आलेले निश्वासाचे श्वास क्षणार्धात थंडगार वाऱ्याने हिरावून घेतले. पुढे लक्षात आले ती तर फक्त चुणूक होती. खाली कोकणात पाऊस होता पण गारठा नव्हता. येथे माथ्यावर आल्यापासून ते थेट रात्रीच्या मुक्कामापर्यंत बेभान झालेला पाऊस, आणि जोडीला हाडापर्यंत गारठा पोहोचविणारे गार वारे हाल हाल करीत होते.
शाळा चुकवून गावभर उंडारणारं पोर हाती लागल्यावर,क्रोधीत झालेला बाप जसा त्या पोराला बडवून काढतो,तसा आता पाऊस आम्हाला बडवून काढत होता. खाली मान घालून निशब्दपणे चालणाऱ्या निगरगट्ट पोरासारखे आम्हीही तो मार सहन करीतच चालत राहिलो.पण एवढ्याने ही भागले नाही. बापाच्या माराने रडकुंडीला आलेल्या पोराने आईच्या कुशीत शिरायला बघावं, तर तीही पोराच्या वांडपणाला वैतागली असावी. दोन अडीच महिन्याच्या सलग पावसाने पाऊल वाटेवरची माती चोपली गेली होती, गुळगुळीत झाली होती. चिखल बरा पण हे गुळगुळीत पण नको, असं वाटायला लागलं. दर दहा पंधरा पावला नंतर आमच्यापैकी कोणी ना कोणीतरी असा दणकून आपटला जात होता की चारीठाव धरणीमातेला कडकडून अलिंगन घडत होते. बरं तो आपटला म्हणून हसतोय ना हसतोय तोच पुढच्या काही क्षणात आधी आपटलेल्यानाही हसण्याची संधी मिळत होती. सगळेचजण इतक्या वेळा पडलो की, पुढे पुढे हसू देखील येईना.
आधीच नाळ चढून येण्यात नेहमीपेक्षा जास्त वेळ गेला होता. त्यात आता खूप सावधपणे चालावे लागत होते. या सावध चालीने चालण्याचा वेग मंदावत होता. वेळेचे गणित आमच्या हातून पूर्णपणे निसटून गेले. पावसाचा मारा काही केल्या कमी होण्याचे नावच घेत नव्हता. सह्याद्री माथ्यावरुन येणारा झोंबणारा वारा, निसरडी पायवाट यात भर पडायला लागली होती दाटायला सुरुवात झालेल्या अंधाराची. वेल्ह्यात मुक्कामाला पोहोचण्याची शक्यता, आता अस्ताला चाललेल्या दिवसाप्रमाणेच वेगाने घसरत होती. गप गुमान न बोलता खाली मान घालून चालतच राहिलो. शेवटी अंधाराने गाठलेच. तसल्या धुवाधार पावसात आता पायाखालची वाट सुटून कुठेतरी भरकटू नये, हे आणखी एक नवे आव्हान आमच्यापुढे ठाकले. सगळ्या भिडुत अंतर पडू नये याची काळजी घेत सावधपणे चालत राहिलो. सॅक मधील विजेऱ्या काढल्या.दाटला काळोख त्या विजेऱ्यांच्या काजव्यांना दाद देणारा नव्हता. तरी पायाखालचे पाहता येत होते इतकेच. अजून किती अंतर तुटायचे आहे याचा अंदाज लागत नव्हता. कुठेही मनुष्यवस्तीची चाहूल, किंवा उजेडाची तिरीप दिसत नव्हती. आनंदा सारखा कुशल नाविक (Navigator)नसता तर आमची गलबते कुठल्याकुठे भरकटली असती हे नक्की .
आठ वाजून गेले असावेत.
उजेडाची तिरीपही दिसत नव्हती पण चिखल शेणाच्या वासाने गाव जवळ आल्याचे जाणवले. घरांचे आकार अंधारात ही स्पष्ट होत होते. ते तोरण्याच्या पश्चिम पायथ्याशी असणारे “भट्टी”गाव होते. म्हणजे वेल्हे अजून आठ नऊ किलोमीटर आहे हे लक्षात आले. पावसात, अंधारात, वार्‍यात अजून एवढे अंतर तूडवायचे या कल्पनेनेच आतापर्यंत कसेबसे गोळा करून ठेवलेले बळ निसटायला लागले.
आता रंध्रारंध्रातील कण न् कण थांबण्यासाठी, विश्रांतीसाठी कोकलायला लागला होता. म्हणून मग निर्णय घेतला, ‘आजची रात्र भट्टीतच काढूया’.
मुक्कामाच्या कल्पनेनेही हायसे वाटले.पण लक्षात हेही आले की वेल्ह्यातील “तोरणा”हॉटेलमध्ये इतक्या रात्रीही आसरा तर मिळालाच असता पण पोट पूजेचीही मालकाने काहीतरी सोय केलीच असती. ती आता होणार नाही. म्हणजे मुक्कामासाठी मंदिर, शाळा काहीतरी शोधण्यापासून खिचडी शिजविण्याचे पर्यंत सगळेच सायास आलेच. पण एकसुरात सगळ्यांनीच या सायासाची तयारी दाखविली. पाहिजे तर आजच्या रात्री प्रत्येकाच्या सॅक मधील उरल्यासुरल्या तयार खाद्यपदार्थांचा आजच्या रात्री पोटाला आधार देऊया. पोटाचे लाड रोज करतोच की. एखाद्या रात्री दिला थोडासा चटका पोटाला तर बिघडतंय कुठे ?असाही सोईस्कर विचार केला. त्याचीही सवय असल्याने आणि त्याहीपेक्षा कुठेतरी आडोशाला सुक्या,उबदार कपड्यात रात्री आडवे होता येणार होते,ही कल्पनाही उबदार होती, उत्साहित करणारी होती.
गावाकडे चालायला सुरुवात केली, आणि आनंदाला आठवले त्याच्या बँकेतील एका सहकाऱ्याची सासुरवाडी या गावातच आहे. शेतीवाडीवाले प्रतिष्ठित घर होते ते. मुक्कामासाठी ते शोधूया, म्हणत त्याप्रमाणे चिखल शेण तुडवीत ते घर शोधले. गाव तसे लहान असल्याने ते शक्य झाले .ऐसपैस वाडाच होता त्यांचा. घर मालकाला आनंदाने ओळख सांगितली आणि पुढे जाण्यातल्या अडचणीही सांगितल्या.
घर धन्यानाही वेल्ह्यात इतक्या रात्री चालत जाण्यातील वेडेपणा दिसत होता. मधल्या एका ओढ्याला पाणी चढले असण्याची शक्यताही त्यांनी सांगितली,आणि आग्रहाने आजची रात्र त्यांच्याकडेच काढण्यासाठी त्यांनी एक ऐसपैस ओसरीही दिली. एक कंदील आणून ठेवला, आमच्यासाठी घरात स्वयंपाक करण्याची ऑर्डरही सोडली.
बायकोच्या डोळ्याकडे पहात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत कसे करायचे ते ठरविणारे आमच्यातील शहरी नवरे, त्यांच्या घरात गेलेल्या त्या ऑर्डरने थोडेसे बावरले, संकोचले.
माझे आणि शशीचे त्यावेळी लग्न झालेले नव्हते, तरीही घरातल्यांना त्रास देणे आम्हा सर्वांच्याच मनाला पटत नव्हते. त्यामुळे विलक्षण संकोचानेही आणि मनोमनही त्यांना विनंती केली, ‘की स्वयंपाक करायला काही सांगू नका.’ आमच्याबरोबर खाण्याचे पदार्थ तयार असल्याचेही सांगितले.
पण ते काही ऐकायला तयारच नव्हते. “अहो असं कसं होईल? आमच्या जावयांचे बँकेतील मित्र तुम्ही, आमच्या घरी येऊन न जेवता गेला तर बरे वाटेल का आम्हाला? काय म्हणतील जावई आम्हाला? आन् काय पुरण बिरण नाही घालत शिजायला.जे असेल ते साधंच पण तुम्ही जेवलंच पाहिजे “
“नाही तसे नाही पण तुमच्या सगळ्यांची जेवणे झाली आहेत ,झोपायच्या तयारीत असणाऱ्यांना घरातल्यांना परत नका कामाला लावू” असा आनंदाने एक प्रयत्न करून पाहिला.
पण त्यांना काही ते पटले नाही. ग्रामीण भागात शाबूत असणारे ते दातृत्व एकीकडे सुखावत होते, पण त्याच वेळी घरातील स्त्रियांना कामाला लावणे बरेही वाटत नसल्याने मन शरमिंदेही होत होते.त्या कात्रीतून सुटण्यासाठी आनंदाने परत सुचविले, विनंतीच केली, “दिवसभराच्या अतिश्रमाने खरंच जेवण जाणार नाही. फक्त पिठलं भात करायला सांगा. तो पाहूणचारही खूप मोठा आहे आमच्यासाठी”
 घर धन्याचा आम्हाला नसत्या वेळी होणारा आग्रह, त्यामुळे होणारे घरातल्यांच्या किंचितशा नाराजीचे दबले सूरही आमच्यापर्यंत पोहोचत होतेच. आम्हाला समजत होते.
प्रत्यक्ष जावई येणे वेगळे आणि जावयाचे मित्रही नव्हे तर निव्वळ नोकरीतील सहकारी, तेही इतक्या आड वेळेला आगांतूकपणे, उपटसुंभा सारखे हजर होणे यात फरक असतोच. तो आम्हाला समजत होता.पण यजमानांना उमजत नव्हता.
 दिवसभरच्या श्रमलेल्या घरधनिणीचे कान इकडेच असावेत. पटकन त्यांनी ती आमची कळकळीची विनंती मनावर घेतली असावी. त्यामुळे पुढच्या अर्ध्या तासात वाफाळल्या भाताची आणि गरम गरम पिठल्याची डेचकी आमच्या पुढ्यात आली.
तोवर अंगात सुक्या कपड्यांनी उबदार झालेलो आम्ही, त्या माऊलींकडून सक्तीने वसूल केलेल्या त्या पाहूणचाराने मनोमन ओलावलो, सुखावलो.
थोड्याश्या अपराधी भावनेने ते ब्रम्हांन्न उदरी उतरविले. समाधानाने मनोमन दुवाही दिला.
पण खरं सांगायचं झालं तर, दिवसभर पावसाचा आणि न मोजता आलेल्या आपट्या खाऊन माराने कोडगे झालो होतोच. त्यात या अपराधी भावनेची भर पडली होती. त्या थकलेल्या शरीरावर, अपराधी मनावरही मात केली ती दिवसभरच्या श्रमांनी, कुशीत घेतलेल्या गाढ झोपेने.
( रात्री गाढ झोप लागली पण या झोपेवरही कडी झाली ती म्हणजे त्या रात्री आमच्या झालेल्या एका फजितीने. ती परत कधीतरी पुढे सांगेनच.)
©️
दिलीप नाईक निंबाळकर.
२० जून २०२१

सह्याद्रीतील पाण स्थळे -भाग आठवा

Tailbaila-Climbing-1583x600

दि. 12,13 ,14 मार्च 1979
घनगड- तेलबैला- सुधागड- सरसगड -पाली
ही एकल, म्हणजे एकट्याने केलेली डोंगर यात्रा होती. कोजागिरी ,होळी पौर्णिमा या घरी म्हणजे चार भिंतीच्या आत साजऱ्या करायच्या नसतात, हे आता डोक्यात पक्के झाले होते. त्यामुळे नेहमीचे सहकारी या ना त्या कारणामुळे येऊ शकत नाहीत, हे लक्षात आल्यानंतर खूप दिवस डोक्यात असलेल्या या भटकंतीसाठी बाहेर पडलो होतो. नियोजित भटकंती मार्गाची नकाशातून आणि आनंदाच्या मार्गदर्शनातून परत परत उजळणी करत 12 मार्च च्या रात्री मुळशी धरण भिंतीजवळ एसटीतून उतरलो तेव्हा रात्रीचे आठ वाजून गेले होते.
धरण पाणवठ्यापलीकडे असणारा घनगड गाठण्यासाठी बार्पे येथे जाण्यासाठी सकाळी लॉन्च येथूनच मिळणार होती. त्यावेळी अंतर्गत रस्ते नसल्याने हे असे द्राविडी प्राणायाम करीतच भटकायला लागायचे.
धरण भिंतीच्या अलीकडील टोकास,(तेथील रखवालदारा साठी असावी)एक पत्र्याची शेड उभारली दिसली. एसटीतून उतरलो तेव्हा तेथे कोणीही नव्हते. पौर्णिमेचा आदला दिवस असल्यामुळे आभाळातील चांदोबाने परिसरावर आपले साम्राज्य प्रस्थापित केले होते. त्या नेत्रसुखद,मंदसर उजेडातच त्या शेडच्या साफसूफ असलेल्या अंगणवजा जागेतच सॅक उघडली. दशम्या -चटणी ने पोटपुजा करीत असताना, डोळ्यापुढे उलगडत गेलेला तो अंतहीन भासणारा जलसागर,मंदसर वाऱ्याने चुन्या पडत असलेले जळाचे उबदार पांघरुण घेऊन पहुडलेला तो कोणी पुराणपुरुषच भासत होता. वर आभाळात तो चांदवा आणि खाली मी एकुलता एक प्रेक्षक,ती रात्र, ते दृश्य माझ्या मनपटलावरून या जन्मी तरी पुसले जाणार नाही हे नक्की. परिसरात कोणाची चाहूल लागत नव्हती. मनाची पाटी निराकार, निरभ्रशी कोरी होती. अशावेळी आकाशात तो चांदोबा जसे काही कोरा करकरीत, झळाळता पितांबर लेऊन हजर होता. मनही तसेच कोणत्याही भावभावनांच्या गैरहजेरीने निराकार होत जाते. यासाठीच तर पौर्णिमेच्या रात्री उघड्यावर ,नितळ आभाळाखाली का घड्याळाचा मोह होत असतो. कितीही वेळ पहात राहिलो असतो तरी मंतरलेल्या त्या क्षणांची जादू काही ओसरली नसती.
ती ओसरली तेथे हजर झालेल्या रखवालदारामुळे. गावात रात्रीचे जेवण करायला गेलेला तो पहारेकरी खाऊन पिऊन झुलत हजर झाला आणि माझी तंद्री भंगली. सुरुवातीच्या चौकशा त्याने रखवालदाराच्या जरबेतच, अडखळत्या सुरात आणि शब्दात केल्या. कोण, कुठे जाणार, कशासाठी, एकटाच का,अशा त्या नेहमी केल्या जाणाऱ्या चौकशा होत्या. सरावाने मीही त्या संयमित उत्तराने पार पाडल्या. त्याला खात्री पटली असावी. शेडचे कुलूप उघडून तो शेडमधील एकुलत्या एका कॉटवर आडवा झाला.मलाही ‘आत झोपलास तरी चालेल’ म्हणाला.
एवढ्या मोठ्या धरणाला, धरण भिंतीला इतका सक्षम आणि सावध पहारेकरी नेमण्यातील सरकारी विनोद मात्र मला काही कळला नाही.
शेडमधील दर्पयुक्त बडबडीला तोंड देत झोपेची आराधना करण्यापेक्षा बाहेरच्या अंगणातच पथारी पसरणे मी पसंत केले. मार्चमधील उकाड्यात शेडमध्ये झोपण्यापेक्षा आजूबाजूला कसलीच दाटी नसलेल्या त्या मोकळ्या अंगणातला मंद झुळझुळणारा वारा मला रात्रभर जोजवीत राहिला. जाग आली तरी नजरेला सुखावणारा तो जलाशय, आभाळात मंद पावलांनी गस्त घालीत असलेला चांदवा हे दृश्य माझ्या आजवरच्या स्मृतीतील सर्वात मौल्यवान खजिना आहे.
सकाळी सातच्या सुमारास धरणा पलीकडील गावातून दूध घेऊन येणाऱ्यांना, बाजारहाटासाठी येणाऱ्यांना घेऊन येणारी बोट आली. दुधाच्या किटल्या, माळव्याच्या (भाजीपाल्याच्या) टोपल्या घेऊन येणाऱ्या ग्रामस्थांमुळे धक्का थोडा वेळ जिवंत झाल्यासारखे वाटले. कुतूहलाने माझ्याकडे पहात ती मंडळी मार्गस्थ झाली. परत जाणाऱ्या बोटीत मी एकटाच होतो. धरणा पलीकडील गाववाल्यांना धरणपाण्याच्या फुगवट्याच्या शेवटपर्यंत घेऊन जाणारे त्यावेळी तरी ते एकमेव साधन होते.आता वृक्षहीन झालेल्या खड्ड्यांच्या फुफाट्याच्या रस्त्यावरून एसटी,टेम्पो धडधडत असतात.
बार्पे गावात उतरुन मी घनगडासाठी झपझप निघालो.गावातून बाहेर पडतेवेळी एका अंगणात पाणी घेण्यासाठी थांबलो. पाणी भरून घेतले त्या घर धन्याने घनगडासाठी गडाच्या पायथ्याशी असलेल्या येकोले गावाच्या रस्त्याला मला लावून दिले. ‘रस्ता सोडू नकोस’म्हणून परत परत बजावले. सकाळची वेळ आणि एकटाच असल्याने चालीला छान लय होती आणि वेगही.त्यामुळे योजलेल्या वेळेत येकोले गाव गाठता आले. येकोले गावातून बाहेर पडण्याआधी परत एकदा गडाच जाणाऱ्या पाय वाटेची उजळणी करून गाव वाल्याकडून त्याची खात्री करून घेतली. गडाखालील दाट झाडीतल्या गारजाईच्या देवळाने मी बरोबर गडाच्या वाटेवर असल्याची ग्वाही दिली.
चढणीस गड तसा सोपा आहे. गडाचा विस्तारही फार मोठा नाही. मुळशी धरणापासून ते थेट तेलबैला, सुधागड ,पूर्ण मुळा खोऱ्याचा विस्तीर्ण पट नजरेसमोर उलगडलेला पहाणे ही सुखद गोष्ट आहे.गडातून आल्या मार्गे उतरून तेलबैल्याच्या रस्त्याला लागलो. त्यासाठी भांबुर्डे गाव गाठावे लागणार होते.पण खिंडीत उतरत असतानाच भेटलेल्या एका गाववाल्याने भांबुर्डे गावात न जाता मधली एक पाय वाट दाखवली. सपाटीपासून थोड्याशा उंचीवर असल्याने काही ठळक खुणाही नेमकेपणाने समजावून सांगितल्या. या वाटेने गेल्यास तेलबैल्या पर्यंतचे अंतरही कमी होणार असल्याची खात्री दिली. जीपीएस यंत्रणा, भ्रमणध्वनी नसलेल्या त्या काळात अत्यंत निस्वार्थी पणाने त्याने दाखविलेल्या पायवाटेने जावे की न जावे, सरधोपट वाटेने गेलो तर अंतर थोडे वाढणार होते ते कष्ट टाळण्यासाठी या पायवाटेने जावे की न जावे अशी द्विधावस्था होत होती. पण तरीही त्या वयातील बेदरकारी, तोपर्यंत जमा झालेला अनुभव याच्या जोरावर मधली पाय वाट निवडली. एक तर सगळी चाल सपाटीवर ची असल्याने इतर कोणतेही धोके नव्हते. आणि पायवाट सुटली असती तर फार फार तर काय झाले असते, मूळ रस्त्याला लागण्यासाठी आणखी थोडी पायपीट करावी लागली असती. थोडा फाफललो असतो. त्यातही आज एकटाच असल्याने सोय ही होती की मला शिव्या घालायला कोणी सोबत नव्हते.
गाववाल्याने सांगितलेल्या दाखविलेल्या खुणा जपत पुढे जात राहिलो. तेलबैल्याच्या कातळभिंती दिसायला लागल्या आणि निश्चिंत झालो. दुपारी एक वाजला होता तेलबैला येथे पोहोचायला .एका अंगणातील झापा खाली सावलीला थांबून पोटपूजा केली .पुढील वाटेसाठी पाणी भरून घेतले. तासाभराच्या विश्रांतीने ताजातवाना झालो. आता गाठायचा होता आजचा मुक्काम सुधागड तेलबैल्याच्या दोन्ही कातळभिंती उजवीकडे ठेवत सवाष्णी घाटाची वाट धरली. वाट स्थानिकाकडून बर्‍यापैकी वापरात असल्याने आणि झाड झाडोऱ्याची दाटी नसल्याने घाटाच्या तोंडाशी येण्यास काहीही अडचण आली नाही. घाट उतरण्याची सुरुवात पायऱ्यांनी होत असल्याने बरोबर मार्गावर असल्याची खात्री होत गेली. पुढे मात्र पायऱ्या नव्हत्या. नेहमीसारखीच दगड धोंड्यांनी सजलेला, झाडीचे फार गचपण नसलेला तो घाट उतरणे तसे सोपे वाटले. एव्हाना एकटे पण मनात मुरले असल्याने, उतरत असलेली वाट परत-परत सावध पणाने तपासून पहात होतो. घाट उतरल्यावर उजवीकडे सरस गडासाठी जाणारी मळलेली वाट स्पष्ट होत होती.तर किंचित डाव्या हाताला सामोऱ्यात सुधागड आग्रहाचे आमंत्रण देत होता. आता दिवस झुकायला सुरुवात झाली होती. झपाट्याने चाल मारत सुधा गडाच्या पायथ्याशी आलो. गडाची चढण फार खडी नसल्याने गडात प्रवेश करणे फारसे अवघड वाटले नाही.
धोंडसे दरवाजातून गडात प्रवेश केला. गड तसा विस्तारित आहे. पसारा मोठा आहे ,पण बऱ्यापैकी सपाटही आहे. सकाळी सुरुवात केली तो सुधागड ,तेलबैल्याच्या कातळ भिंती दिसत होत्या. आनंदाने सुचविल्याप्रमाणे गडाच्या एका टोकाला असणाऱ्या भोराईच्या देवळात मुक्काम करायचे ठरविले.पण गडाच्या साधारण मध्यावरच लांबून एक वास्तू दिसली.ती पाहून पुढे जावे म्हणून त्या दिशेने चालत राहिलो. जवळ जात असतानाच लक्षात येत होते, तो एक सुस्थितीतील वाडा होता. फार भरभक्कम असावे कधीकाळी त्याचे बांधकाम .पण आता वय झाल्याच्या खुणा दिसत होत्या. चारही बाजूच्या भिंती अध्याप तग धरून होत्या. वर चुनेगच्ची छप्पर असलेल्या त्या वाड्यात कोणी तरी रहात असावे, हा अंदाज खरा ठरला तो वाड्याबाहेर पडलेल्या ताज्या शेणामुळे. चहूबाजूंनी ओसऱ्या असणाऱ्या वाड्यात शिरतानाचा दरवाजा मात्र वाऱ्या पावसाचा मार झेलून वयपरत्वे थकल्या वृद्धा सारखा गलितगात्र झालेला दिसत होता. एका कोपऱ्यात एक कुटुंब वास्तव्यास होते. विरुद्ध दिशेची ओसरी मात्र एवढी सुस्थितीतील दिसत नव्हती.तेथेच गाई वासरे दावणीला होती. मला एकट्यालाच पाहून तेथे राहणाऱ्या नवरा -बायको आणि एका आठ दहा वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावर उमटलेले आश्चर्य ठळक पणाने वाचता येत होते. मलाही एवढ्या विस्तीर्ण गडावर त्या तिघाच जणांचे वास्तव्य अनपेक्षितच होते. तशी माहिती कोणा गडभटक्यांकडून मिळालीही नव्हती. त्यांना रामराम घातला. त्यांनी विचारण्याआधी मी स्वत:च माझा परिचय करुन दिला. कुठून आलो, कुठे जाणार हे सांगितले. भोराईच्या देवळात मुक्कामाचा बेत सांगितला. त्यावर त्यांनी स्पष्टपणाने, ठाम स्वरात याला विरोध केला. त्यांच्या सोबतच होळी साजरी करण्याचा आग्रह केला. त्या मावशीने, होळीला त्यांना पाहूणाच मिळाल्याचे सांगितले. “होळीची पोळी खाऊन उद्या कुठे जायचे तिकडे जा” सांगुन पुढची चर्चा बंद करून ती माऊली स्वयंपाकाला लागली.
नंतर त्या रात्रीच्या मुक्कामातील बोलण्यातून हे कळाले की शिदोरे नावाच्या गड वतनदारांचे कूळ म्हणून असलेले ते मोरे नावाचे कुटुंब होते. अत्यावशक्य बाजारहाटासाठी कधीतरी एकदा गडाखालील गावात जाणारे कुटुंबप्रमुख हाच त्यांचा एकमेव जनसंपर्क. एरव्ही इन -मीन-तीन माणसांचे ते विश्व. अवसे- पुनवेला तिकडे फिरकणारे गड भटके सोडले तर एखाद्या परग्रहावर असेच वास्तव्य होते त्यांचे.
अध्याप त्या न पाहीलेल्या देवळातच मुक्कामाला जाण्याचा माझाही अट्टाहास नव्हता. ते देऊळ शोधायचे, पाणी शोधायचे,या उपद्व्यापा पेक्षा आलेले आमंत्रण नाकारण्याचा करंटेपणा कशाला करा, असा सोयीचा विचार करून मी सॅक उतरवली. ओसरीच्या एका रिकाम्या कोपऱ्यात विसावलो. घरातल्या माऊलीची चुलीजवळ लगबग चालू होती. बापलेक होळी रचण्याच्या कामाला लागले होते. घरचेच एवढे गोधन असल्याने शेणींची कमतरता नव्हतीच. संध्याकाळी सातच्या सुमारास घरातल्या माऊलीने नैवेद्याचे ताट आणले. होळी रचून तयार होतीच. होळीची पूजा झाली .प्रज्वलन झाले. आम्ही सर्वांनी नमस्कार केला. नैवेद्य अर्पिला गेला. नमस्कार करून मी बाजूला येऊन बसलो.
पण कोणत्याही संकोचाचा औपचारिकतेचा वारा न लागलेले ते तीन मुक्त जीव, होळीभोवती फेर धरत गाण्यात रमले होते. कमालीचे सुखावले होते. त्या गाण्यात ताल, सूर ,लय शोधण्याचा वेडेपणा मी केला नाही. गाण्याचे सारेच शब्द मला कळत होते असेही नाही. पण विलक्षण तन्मयतेने, काळजातून वाहत येणारे ते सूर चराचराला स्पर्शिणारे होते. कोणत्याही भौतिक साधना शिवायच्या त्यांच्या जगण्यातील साधेपणाने ,पण परमानंदाने जगण्याच्या,जीवनातील आनंद घेण्याच्या वृत्तीचा हेवा वाटला. असे काय सुख ओसंडत होते त्यांच्या रोजच्या जगण्यात? माझ्यासारख्या नागर मनाला सदैव कमतरतेचा पाढा वाचायची सवय– ज्याचा त्यांच्या जगण्या– वागण्या-बोलण्यात व आता गात असलेल्या गाण्यात लवलेशही नव्हता. होते ते एकमेकांची, आयुष्यातील कमतरतांची थट्टा उडविण्याचे सूर .गाण्यातील शब्दातून व्यक्त होणारे ‘कसा पकडला’ या भावाचे खट्याळ सुर. नागरी जीवनातील स्त्रीचे दबलेपण वा घरधन्याच्या धाकाची सावली, त्या फेर धरण्यात गाण्यात हसण्यात खिदळण्यात कुठेही नव्हती. त्या आनंद क्षणीही व्यक्त होण्याच्या ठरलेल्या चौकटीबाहेर मला जाता येत नव्हते, तो माझा पिंड नाही ही माझी अडचण होती, किंवा कमकुवतपणा होता. केवळ या अदृश्य साखळीत बद्द झालेला मी, त्यांचे नृत्य पाहण्यात मात्र समरस झालो होतो.उद्याची नियोजित भ्रमंती, पुढचा गड, वेळ हे भुंगे त्यावेळी तरी माझ्या जवळ फिरकलेही नाहीत, ही काय कमी प्राप्ती होती ?
त्या रात्री घरातल्या माऊलीने मला सॅकमधील माझ्या दशम्या काढूही दिल्या नाहीत. त्यांच्या पुरणपोळीचा आणि घरच्या दुधाचा स्वाद अजूनही कधीतरी जिभेवर जागा होतो.
मार्च मधील ती सुखद वाऱ्याची, पुरणपोळीची आणि ‘आयुष्य समरसून कसे जगावे हे शिकविणारी’ ती होळी पौर्णिमा माझ्या मनाचा एक कप्पा कायमचा काबीज करून बसली आहे.
सकाळी निघताना मात्र मी त्या घर माऊलीचे न ऐकता माझ्यासाठी सॅक मधील दशम्या काढल्या. घरच्याच गोरसात त्या दशम्यांनी आम्हा चौघांचीही न्याहारी विलक्षण रुचकर झाली होती. त्या कुटुंबाचा असेल त्यात अस्सल आनंदाने जगण्याचा मंत्र मात्र, मनात सरसगडातून पालीत पोहोचलो तरी तरळत होता. त्यामुळे ती रखरखाटी वाटही सहजी तुडविली गेली.
गेल्याच आठवड्यात सुधागडातील ती मावशी निर्वतल्याची बातमी कळाली, आणि माझ्यासारख्या अनेक भटक्यांच्या काळजात काहीतरी हरविल्याची भावना जागी झाली जे आता कधीच सापडणार नाही.

©️दिलीप नाईक निंबाळकर.
२४जुलै २०२१

 https://granthpremi.com/sahyadritil-pansthale-part-8/

सह्याद्रीतील पाणस्थळे(भाग नववा)

सह्याद्रीतील पाणस्थळे
(भाग नववा)
दि. २६,२७ जानेवारी २०१९

सहकारी : शशी हिरेमठ

भ्रमंती :-कुदळी -अस्वल खिंड- नाखिंदा- परत कुदळी.
अस्वल खिंडी मार्गे कामथ्या घाट

फेब्रुवारी १९७४,मध्ये एके दुपारी रायरेश्वरच्या नाखिंदा टोकावर उभा होतो. सोबत साक्षात गुरुजी आनंदा (पाळंदे) आणि सहकारी प्रभाकर साप्ते .
समोर सह्याद्रीचे विराट स्वरूप उलगडले होते. आयुष्यातील पहिलाच ट्रेक. त्यामुळे हे असले राकट, रांगडे, कणखर सह्याद्री रूप पहिल्यांदाच पहात होतो. विस्फारलेले डोळे आणि तोंड मिटतच नव्हते. खालच्या खिंडीतून येणारा भणाणा वारा, फक्त आणि फक्त तेवढाच आवाज. नीरव शांततेची ओळख पहिल्यांदा तेथे झाली. सह्याद्री च्या प्रेमात पडलो तो क्षण होता तो.
‘या टोकावरून खाली उतरल्यास अस्वल खिंडीतून कामथ्या घाटामार्गे कोकणात उतरता येते,’ असे आनंदा सांगत होता. तोंडाचा ‘आ’ वासणे शक्य होते तेवढे झालेच असल्याने फक्त खाली पसरत गेलेल्या त्या अफाट पसाऱ्याकडे आधाशासारखा पहात राहिलो. ‘कधीतरी एकदा ही वाट धरायचीच ‘याची खुणगाठ मनात बसली.

आता २६ जानेवारी २०१९. सह्याद्रीत मनसोक्त आणि हिमालयात थोडीफार भटकंती या मधल्या काळात झाली होती. पण अस्वल खिंड ते नाखिंदा मात्र काही केल्या जमले नाही. मनातल्या मनात ही खूणगाठ मात्र कायमचा चाचपत होतो. इतक्या वर्षांत सह्याद्रीची अगणित रूपे पाहिली. अक्राळ विक्राळ कुलंग, अलंग ते लोभसवाणा रसाळ. जीव ओवाळून टाकावा असा हा माझा सह्याद्री.
या भटकंती काळात शशी सारखा कुठेही,कधीही, कसेही यायला तयार असणारा स्नेही बरोबर असल्याने निर्धास्त पणा आला होता.
२६ आणि २७ जानेवारी २०१९ ला त्याच्यासोबत नाखिंदा ते अस्वल खिंड करायचे नक्की केले.उलट सुलट आराखडे करून पाहिले आणि मार्ग नक्की केला– कुदळी हे भोर तालुक्यातील रायरेश्वरच्या पश्चिम पायथ्याचे शेवटचे गाव. येथून सुरुवात करायची, वाटाड्या घेऊन नाखिंदा गाठायचा, परत खाली येऊन मुक्काम आणि दुसऱ्या दिवशी अस्वल खिंडीतुन कामथे घाट –पोलादपुर अशी भटकंती करण्याचे नक्की केले.

२६ जानेवारीला कुदळीत पोहोचलो तेव्हा नऊ वाजून गेले होते .ग्रामसभा तावातावात चालली होती. आमच्याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नव्हता. तासभर वाटाड्या साठी वणवण केली. पण खालून नाखिंद्याकडे जाणारी एक धार दाखविण्यापेक्षा जास्त काही त्यांनी आमच्या पदरात घातले नाही. वेळ जायला लागला तशी उलघाल व्हायला लागली. मग निर्णय घेतला, ‘आपले आपणच अस्वल खिंडीतून वर जायचे’. खरेतर कुदळीतून एका दांडावरून नाखिंध्याला जाता येते,या माहितीस गावकऱ्यांनीही दुजोरा दिला होता. कुदळी गावातून धार चढून गेल्यानंतर, उजवीकडे फिरत त्याच्या माथ्यावर पोहोचता येते.
पण वाटाड्या असेल तरच हे शक्य होईल,हे लक्षात घेऊन आम्ही अस्वल खिंडीतून जाण्याचा निर्णय घेतला. गावाबाहेरच्या अस्वल खिंडीच्या दिशेने जाणाऱ्या पोळ वस्तीवर सॅक टाकल्या. पाण्याच्या बाटल्या आणि थोडे खाणे बरोबर घेऊन निघालो तेव्हा साडेदहा वाजले होते. सकाळचा महत्त्वाचा वेळ वाया गेला होता. कुदळीतून अस्वल खिंडीकडे जाणारी वाट, सुरुवातीला काही वेळ ओढ्यातून जाते नंतर उजव्या हातास झाडीतून जाते. अप्रतिम असे ते जंगल आहे. उन्हाळ्यातही टोपी घालावी लागणार नाही, असा झाडोरा आहे. खिंडीतून वारा तोंडावर यायला लागला तेव्हा साडेअकरा वाजून गेले होते. खिंडीत आल्यानंतर डावी कडे जाण्यासाठी एका कातळावर खुणेचा बाण चितारलेला पाहिला.
पहिल्या पावला पासून घसरण सुरू होते. आमच्या सुदैवाने एक अदृश्य वाटाड्या मात्र आम्हाला भेटत गेला. कोणीतरी डोंगर बंधूंनी शक्य तेथे कारवीच्या फांद्यांवर रिबनचे तुकडे बांधले होते. (नंतर कळाले कि ते अरुण सावंत आणि रोहन मालुसरे यांच्या टीमने ते काम केले होते )खिंडीतून वर जातेवेळी शक्य असेल तेथे खडकावर दिशादर्शक बाण रंगाने रंगविले होते.त्या अदृष्य डोंगर बंधूंचे आभार मानत, आम्ही ‘हर हर महादेव ‘ करून चढाई सुरू केली. सुरुवातीचा उतार इतका तीव्र होता की त्यावर कारवीही नव्हती. होते ते वाळून मुलायम झालेले पिवळे गवत. त्यावरून पाऊल सुळकन घसरून खाली यायचे.पाऊस बंद होऊनही बराच काळ झाल्याने, उतारावरची माती मोकळी झाली होती. एक पाऊल पुढे टाकले तर दोन पावले खाली येत होतो. त्यामुळे दोघात अंतर ठेवून चालावे लागत होते .काहीवेळा तर चक्क माकड होतं, चारही पॉईंट्सचा वापर करत म्हणजे दोन हात अधिक दोन पावले मातीत रोवत वर सरकत होतो. साधारणपणे दोनशे फूट वर गेल्यानंतर कारवी सुरू झाली तेव्हा थोडेसे हायसे वाटले. आधाराला आता काही तरी हाताशी होते. पण ती कारवीही वाळायला सुरुवात झाली होती.तरीही तिचा आधार मोठा होता. कारवीच्या बुडात हात घालत वर सरकत होतो. काहीवेळा कारवी मुळासकट हातात येत होती. थोडासा उघडा बोडका खडकाळ भाग आला, त्यावेळी नाखिंद्याचे तीन वेगवेगळे होउन पसरत गेलेले, दांड स्पष्ट व्हायला लागले.
आम्ही चढत होतो त्या दांडाचा माथा लक्षात येत होता. त्यावर नाकाडावरुन चढणे शक्य नाही, हेही एका खड्या भिंतीने स्पष्ट केले. मग तो माथा उजव्या हाताला ठेवत, डावीकडून वळण वाटा घेत काहीवेळा कारवीतून, काहीवेळा उघड्यातून, डावीकडे कुदळीत उतरणाऱ्या तीव्र खोलवर उतरणाऱ्या दऱ्या असा पाऊल रस्ता होता. असंख्य वळण वाटांचा, दगड गोट्यांचा तो वळण रस्ता मात्र सोडला नाही.आता मात्र दांडाच्या जवळ, खालच्या टप्प्यात आलो.
तीन दांंडापैकी सर्वात उजवीकडे असणाऱ्या नाखिंद्याचे दर्शन झाले. आम्ही चालत असलेला दांड आणि नाखिंद्यावर पोहोचण्यासाठी वाट असणारा दांड, यात भरपूर अंतर ठेवून असणारी वाट स्पष्टपणे दिसायला लागली. थोडसे थांबलो. एक वाजून गेला होता .आम्ही असलेल्या दांडाचा माथा दिसायला लागला. वर जात असलेली पाऊल वाट ही दूरपर्यंत दिसत होती. खूप वळत वळत जाणारी ती दगड गोट्यांची वाट, आम्हाला माथ्यावर घेऊन जाण्यासाठी आणखी किमान अडीच-तीन तास घेईल याचा अंदाज येत होता.

माथ्यावरून परत खाली जाण्यासाठी किमान चार तास तरी लागतीलच, दाट झाडीतून डोंगर रांगेतील उतरणीची ती वाट, त्यात आमच्या जवळ असणारे पाणी मोजकेच होते. महत्त्वाचे म्हणजे सॅक खाली ठेवून आल्याने, रात्रीच्या खाण्यापासून अंथरूण-पांघरूण,गरम कपडे हे सगळेच प्रश्न होते. माथ्यावर पाण्याची काहीही उपलब्धता नाही हे ही माहीत होते. हे सर्व विचारात घेऊन, येथूनच परत फिरावे असे माझे मत होते, तर शक्य तेवढे पुढे जाऊन पाहूया हे शशीचे मत. दोघांच्याही मतातील उणे-जमा मुद्दे लक्षात घेत, खालील उतरण्यास लागणारा वेळ, त्यातून वाढणारे धोके या सर्वांचा विचार करून, असेल तेथून दुपारी तीन, ही परत फिरण्याची अंतिम वेळ ठरविली.आणि परत पुढे चालायला सुरुवात केली.कधी उघड्या कारवीतून तर कधी मध्येच एखाद्या ओढ्यातून वाट हरवायची.परत शोधाशोध करून पायवाटेला लागताना वेळेच्या बंधनाचा काच जाणवत होता. त्यापेक्षा जाणवत होते ते जवळ जवळ आयुष्यभराच्या अर्धशतक भर जपलेली खुणगाठ.
नाखिंदा ते अस्वल खिंड, किंवा उलट — खरतर इतक्या वर्षात सहज शक्य असणारे ते साधे सोपे स्वप्न होते. त्यात आव्हान असे काहीही नव्हते. पण राहून गेले होते,हेही खरेच. एखाद्या सश्रद्ध
सुवासिनीने गावातल्या देवीला खणा नारळाच्या ओटीचा नवस बोलावा आणि काही ना काही कारणाने तो राहून जावा,त्याचा रेशीम काटाच चुभत राहावा, असे हे माझे सह्याद्रीच्या प्रथम दर्शनातील बाळबोध स्वप्न.
ते पूर्ण करण्याची एक कडी, –फक्त एक कडी बाकी असताना सोडावे लागणार होते. वाईट वाटत नव्हते, पण हसू मात्र येत होते.
मोठी गंमत असते माणसाच्या मनाची, पंचपक्वान्नाचे भरपेट जेवण झाल्यावर ताटात राहून गेलेल्या एखाद्या गोड पदार्थाची आठवण यावी, तसे हे स्वप्न. या विचारात पावणेतीन वाजता एका छोट्या नाळेत खाण्यापिण्यासाठी विसावलो.
माथा अजूनही दीड-दोन तास चालीवर असणार याचा अंदाज आला. त्याच्या पश्चिमेकडील टोकावर असतानादेखील सूर्यप्रकाश मात्र दिसेनासा झाला. याचे कारण होते, समोर असणारा दुर्गाडी पासून अस्वल खिंडीपर्यंत आलेल्या एक उंच डोंगर. सूर्य त्याच्या आड गेला आणि त्या खोऱ्यात उजेड लवकर कमी होणार याचा अंदाज आला. आता माघारी फिरावे हे दोघांनीही ठरविले. वळण वाटा घेतेवेळी एका वळणाच्या तोंडावर एका दगडावर ‘कुदळीकडे’ असा एक दिशादर्शक बाण दगडावर होता. परतताना ती वाट घ्यावी असे ठरविले. कदाचित ती कुदळीत थेट उतरणारी वाट असावी, ती कुदळीच्या नाकाडावरुन जाणारी वाट मिळाली तर उत्तमच. नाही मिळाली तर थेट नाळेतूनच खाली उतरण्याचा पर्याय हाती होताच. त्यातून वेळ आणि अंतर दोन्ही वाचणार होते. जे ठरविले त्यासाठी पुरेसा वेळ हाती असणे आवश्यक होते. मग माघारी फिरलो.
नाखिंद्याच्या माथ्यावरुन कोकण दर्शन व भणाणता वारा,या अनुभवासाठी आसुसलेला जीव नाराज झाला. संधी थोड्यासाठी सोडावी लागली. पण या मोहिमेवर लवकरच परत यायचे,ही खूणगाठ बांधून परतलो. खाली उतरते वेळी कुदळीत जात असणाऱ्या दांडा ची वाट धरली. त्यासाठी ओळखीची आणि खात्रीची असलेली अस्वल खिंडीची वाट सोडावी लागली.
गिरीभ्रमंतीची हीच तर मजा असते, आव्हाने स्वीकारून त्याच्याशी दोन हात करताना स्वतःचा कस तपासता येतो. हार -जीत काहीतरी होतच असते.काहीही झाले तरी लढल्याचे समाधान तर आपलेच असते.
अपेक्षेप्रमाणे कुदळीच्या दांडाने गुंगारा दिलाच. मग नाळ मात्र अजिबात सोडली नाही. सुदैवाने नाळ बऱ्यापैकी रुंद असल्याने, दोन्ही अंगाचा झाड झाडोरा त्यात डोकावत नसल्याने उजेड होता. काहीवेळा मोठे फाॅल आले. ते येणार याची खात्री होतीच. आजवरच्या अनुभवाच्या जोरावर त्यातून मार्ग काढत, काही वेळा आपट्या खात, नडगी शेकून घेत झपाट्याने खाली उतरत राहिलो. अखेर अस्वल खिंडीतून कुदळीत येणार्‍या वाटेस एकदाचे मिळालो, आणि दिवसाउजेडी मुक्कामी पोळ वस्तीवर पोहोचलो.

सॅक ठेवल्या होत्या त्या पोळ वस्तीवर पोहोचलो तेव्हा कडूस पडायला लागलं होतं. वस्ती दोन घरांचीच. शेजारीच कुणा नव श्रीमंताच्या शेत घराचे (farm house) बांधकाम सुरू होते. प्रथमदर्शनी सहज लक्षात आलेली एक गोष्ट, त्या बांधकाम सुरू असलेल्या शेत घराची सुरुवात, चारही बाजूंनी पक्के सुरक्षित असणाऱ्या कुंपण भिंतीपासून सुरुवात झालेली दिसत होती. कधीतरी सुट्टीच्या वेळ येऊन राहणाऱ्यांसाठी ती आवश्यक बाब असणार, हे तर नक्कीच. पण त्यातून नकळत एका स्वतंत्र बेटाची निर्मिती होत असते. स्थानिकांशी फटकून, अलिप्तपणे राहण्याची एक विसंगत जीवनशैली रुजली जाते, हे माझ्यासारख्या गावात वाढलेल्याला स्वीकारणे जड होते.

कुंपणच नसणाऱ्या पोळ मावशींच्या घराने मात्र आमचे स्वागत केले. मावशी, मावशींचा वृद्ध सासरा, शाळेत जाणारा एक मुलगा आणि एक मुलगी, एवढे जण तेथे राहत होते. नवरा चाकरी निमित्त बाहेरगावी.
आमचे थकलेले, धूळ माखले चेहरे पाहून मावशींनी न मागता पाण्याचे तांबे पुढे ठेवले. त्या राहत्या घरापासून पाणवठा अर्धा एक किलोमीटर अंतरावर होता. सकाळी अस्वल खिंडीकडे जातानाच्या रस्त्यावर असणारा तो पाणवठा पाहिला होता. रात्री मुक्काम येथेच होणार हे नक्की असल्याने पाणी पिऊन लगेच, रात्री लागणारे पाणी आणण्यासाठी त्या पाणवठ्याकडे धावलो. अंधार पडायच्या आत पाणी आणणे भाग होते. मावशी आग्रह करत करत होत्या, ‘घरातले पाणी वापरा’
पण त्या माऊलीचे पाणी आणतानाचे सायास सकाळी पाहिले होते. त्यामुळे त्यांनी इतक्या लांबून कष्टाने आणलेले पाणी वापरण्याइतके निर्ढावलेले पर्यटक आम्ही नक्कीच नव्हतो. पाणवठ्यावर जाऊन ताजेतवाने झालो. रात्रीची खिचडी शिजविण्यासाठी, सकाळचा नाष्टा- चहा करण्याइतके पाणी घेऊन परतलो ते बॅटरीच्या उजेडातच. सह्याद्री माथ्याच्या अगदीच जवळ असल्याने झोंबरे वारे अंगावर आत्ताच काटा फुलवीत होते. यामुळे अंगणात चूल लावायचा आमचा विचार आम्हाला सोडून द्यावा लागला. वाऱ्यामुळे चूल धड पणाने शिस्तशीर वागली असती याची खात्री नव्हती. त्यात गुरांसाठीच्या वर्षभराच्या चाऱ्याची गंज ही जवळच होती. मग घर माऊलीने त्यांची चूल वापरण्याची परवानगी दिल्याने सगळ्यांसाठीच चहा करून घेतला. चूल परत मावशींच्या ताब्यात दिली.
चहाचे सुखद घोट घेत अंगणात विसावलो.आता वारे इतके वाढले होते की बाहेर अंगणात बसणेही शक्य होईना जेमतेम चहा घेऊनच परत चुलीजवळ येऊन बसलो.
सह्याद्रीत नियमितपणे फिरणार्‍या गिरी भ्रमकांची आणि त्या त्या ठिकाणच्या स्थानिकांची नाळ जुळायला काही मिनिटाचा संवाद ही पुरेसा होतो, याचाच अनुभव घेत सुखदुःखाच्या देवाण-घेवाणीत आमची खिचडी कधी उमलून आली ते लक्षातही आले नाही. अर्थात आमच्या दोन जणांच्या संघात याचे श्रेय शशीच्या बोलक्या स्वभावास.

रात्री प्रचंड वारा आणि तेवढेच कडाक्याची थंडी असल्याने झोप नीट झाली नाहीच.
पण सकाळी ही लवकर निघता आले नाही. कधी नव्हे ते उशिरा म्हणजे, सकाळी नऊ वाजता बाहेर पडलो. आंघोळीसाठी पाणी तापवायला मोठे पातेलेहीं घरात नसणाऱ्या मावशींनी, लोखंडी घमेल्यात आमच्यासाठी पाणी तापविले होते.त्यांचा आंघोळीचा आग्रह मोडून आम्ही कामथ्या घाटातून कोकणात उतरण्यासाठी परत अस्वल खिंडीचा रस्ता धरला.
वाट सौम्य उताराची, छान झाड -झाडोऱ्याची होती.
रान कोंबडा, क्वचितच दर्शन देणारा काळा पांढरा ट्री पाय ही या घाटातील मेजवानीच होती .तसेच नाकीद्याचे आग्रही निमंत्रणही, (जे पुढच्या पंधरा दिवसानंतर लगेचच आम्ही स्विकारुन पार पाडले, इतक्या वर्षाचा चुकता रेशीम काटा काढला.) कामथ्या घाटाची नेत्र सुखद वाट उतरताना मला, यापूर्वीच्या सह्याद्रीतील भटकंतीत आसरा देणाऱ्या अनेक माय माऊल्यांची,वाट चुकलो, भरकटलो त्यावेळी निरपेक्ष भावनेने योग्य वाटेवर आणुन सोडणाऱ्या मामा-दादांची आठवण येत होती. त्यांच्यामुळेच आमच्या डोंगरयात्रा सुफल-संपन्न झाल्याच्या कृतज्ञ भावनांनी मन प्रसन्न होत होते.
येथे मला, कधीतरी वाचलेल्या रवींद्रनाथ टागोरांच्या ओळी आठवत होत्या.
“मी दूरवर भटकलो. दिशाहीन फिरलो. कितीतरी अनोळखी घरांची दारे ठोठावली. त्या घरातल्यांनी दार उघडून माझे स्वागत केले. ते म्हणाले, “मित्रा ये तुझे स्वागत आहे”
©️
दिलीप नाईक निंबाळकर.
२३ ऑगस्ट २०२१.

पाणस्थळ (भाग दहावा) सह्याद्री बाहेरचे

काळ:-१९८५, मे महिन्याचा दुसरा आठवडा

सहकारी :- नंदू पागे, शशी हिरेमठ, रवी पालकर,शरद नाटेकर.

सह्याद्री भ्रमंतीत तेथील भूमिपुत्रांच्या सहृदयतेच्या अनेक अनुभवांनी आमची आयुष्ये काठोकाठ भरलेली आहेत. त्यातील काही अनुभव मी याआधी शब्दबद्ध केलेही आहेत.
एक कृतज्ञ माणूस म्हणून मला माझे ते कर्तव्यच वाटते. खरेतर त्या सह्याद्री निवासकांच्या मदतीमुळेच आमच्या आजवरच्या सह्याद्री यात्रा सफल, संपन्न झाल्या आहेत. मदत करणारे ते हात आणि मदत घेणारे आमचे हात, याच मातीतील असल्याने ही नाळ-नाती स्वाभाविकरित्या तयार झाली असावीत.

पण ही माती, हे डोंगर, हे दुर्ग ओलांडून गेल्यानंतरही त्या हिमभूमीत आलेला अनुभव एकूणच माणसाचे माणूसपण उजळवून गेला. तो अधिक भावला. त्याचे कारण, मदत करणारे आणि त्या मदतीमुळे सावरणारे दोन्ही हात स्थानिक भूमिपुत्रांचे नव्हते. दोघेही तेथे परके असताना, केवळ नितळ, निरपेक्ष माणुसकीच्या नात्याने जवळ आलेले, आधार देते-घेते हात समानशील होते इतकेच. मदत घेणारे मोठ्या आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी झगडत असताना मदत करणारेही खूप सुस्थितीत, सुरक्षित अवस्थेत नव्हते. तरीही त्याप्रसंगी आपल्यापेक्षा समोरच्याचे संकट अधिक गहिरे आहे, त्याला आधाराची नितांत गरज आहे हे समजून-उमजून पुढे केलेला तो मदतीचा हात माणुसकीचे निखळ दर्शन देऊन गेला.

अनुभव आहे “श्री कैलास” या हिमालयातील शिखर मोहिमेतील. (त्या शिखर मोहिमेचा सविस्तर वृत्तांत “बेस कॅम्पवरून” या पुस्तकात आला असल्याने त्याची पुनरावृत्ती येथे करत नाही. हा प्रसंग मात्र त्या पुस्तकाच्या विषय चौकटीतील नसल्याने, तेथे उद्धृत केलेला नसल्याने येथे कथन करतो आहे.)

मे १९८५ चा दुसरा आठवडा—-
“श्री कैलास” या आमच्या अयशस्वी झालेल्या शिखर मोहिमेच्या परतीच्या प्रवासात आम्ही होतो. समिट कॅम्प वर सलग बहात्तर तासांचे हिमवादळ झेलण्यात आम्हा सर्वांचाच शक्तिपात तर झाला होताच. अपुरे पडलेले रेशन-खाणे, स्टोव्हसाठी रॉकेलचे अपुरे इंधन, (त्याकाळी छोटे व मोठे गॅस सिलेंडर, भारवाहक, इत्यादी सुविधा आमच्यासाठी चैनीच्या सदरात मोडत होत्या. त्याचे कारण असायचे, कसाबसा जमा केलेला मोहिम निधी.अर्थातच त्यामुळे, गॅस सिलेंडर,भरपुर भारवाहक, यावर फुली.
शिखर मोहिमा आयोजित करणाऱ्या एजन्सीज हा प्रकारही अध्याप सुरू व्हायचा होता,किंवा अगदी मोठ्या म्हणजे अष्ट हजारी शिखर मोहिमांसाठी भरपूर निधी असणाऱ्या संघांसाठी तो होता.)
इकडून तिकडून गोळा केलेले मोजके भारवाहक फार-फार तर बेस कॅंपपर्यत, तेथून पुढे एकच अति उंचीवरील मार्गदर्शक (High altitude porter) तोच भारवाहक, आणि तोच स्वयंपाकी असा आमचा थाट असायचा.

समिट कॅम्प वर नियोजित दिवसापेक्षा जास्त दिवस अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रहावे लागल्याने, रॉकेल अगदीच जेमतेम उरले होते. चहा आणि पाणी तयार करण्यासाठी ते जपून वापरत होतो.
मोहिमेतून दुःखद माघार घेतेवेळी निसर्गाने आणखी एक मोठा तडाखा दिला होता. Crevasse म्हणजे हिम खाचेत सहकारी शरद नाटेकर पडला होता. शब्दश: ती मृत्यूची दाढ होती. गुडघ्या येवढ्या उंचीच्या बर्फात पाय रोऊन आम्ही सर्वांनी अथक प्रयासाने नाटेकराना त्या दाढेतून खेचून सुखरूप बाहेर काढले होते, ही वाईटातील चांगली बाजू. पण त्या सुटका नाट्यात आणि आधीच्या सलग तीन दिवसाच्या वादळात पायाला हिमदंशाची (frostbite) सुरुवात झाली होती. त्याआधीच्या शिखर मोहीमेतही थोडासा हिमदंशाचा अनुभव घेतला होता. पण महिनाभरात त्यातून बाहेरही पडलो होतो. या वेळच्या हिमदंशाच्या जखमा मात्र इतक्या किरकोळ नाहीत, याची जाणीव मनावरचे दडपण वाढवीत होती. पायाचे किती नुकसान होणार आहे, कोणास ठाऊक या अनिश्चिततेचे दडपण होते. जीवाच्या आकांताने झगडून हिमखाचांच्या भागाबाहेर पडलो होतो.
याची आणखी एक काजळलेली बाजू म्हणजे, वर जाते वेळी परतीच्या प्रवासासाठी तरतूद म्हणून ठेवलेले रेशन- अन्नपदार्थ, खाली जाणारे भारवाहक घेऊन गेले होते. त्यामुळे पोटात गेलेले अन्न आणि शारीरिक कष्ट यांचे प्रमाण कमालीचे व्यस्त झाले होते. लोडफेरी करतेवेळी सॅकच्या तळाशी पडलेले काही बिस्किटाचे तुकडे, एक मूठभर कोरडे पोहे, त्यात थोडीशी शिल्लक राहिलेली शेंगदाण्याची चटणी पाण्यात कालवून तयार झालेला काला एवढेच आम्हा सहाजणांच्या (पाच मोहिम सदस्य आणि एक भारवाहक) पोटात छत्तीस तासापूर्वी गेले होते. त्या आधारावर आमचा परतीचा कमालीचा वेदनादायी खडतर प्रवास चालू होता. रक्तवर्ण हिमनदी (glacier) मधील तो मोरेन मधील (मोरेन:- एखाद्या बॉम्बस्फोटात उध्वस्त झाल्या सारखा दगड, माती, मोठ्या शिळांचा भूभाग) उतार उतरते वेळी केवळ ग्लानीमुळे ही बऱ्याच आपट्या रवी आणि नाटेकर यांनी खाल्ल्यामुळे ते चिरडीला आले होते. त्यांना सांभाळून आणणे हे आणखी एक नवे आव्हान उभे राहिले होते. आता बर्फातून बाहेर पडलो होतो हीच एक दिलासादायक बाब होती.

कोरड्या खडकाळ हिमोढातून (morain) शक्य तेवढ्या वेगाने मी आणि शशी पुढे जात होतो, ते खालच्या तळावर तरी खाण्यासाठी काही मिळेल, भार वाहकांची मदत मिळेल या आशेने. शरद आणि रवीला सांभाळून खाली आणण्याचे सहनशक्तीचा कस पहाणारे काम नंदूने स्वीकारले होते.

याच ग्लेशीयर मध्ये “थेलू” आणि “कोटेश्वर” या शिखरावर जाण्यासाठीचा बेस कॅम्प आहे. खाली उतरते वेळी दूरवर खोलात तेथे उभारलेले तंबू दिसायला लागले आणि आठवडाभराच्या काळोख भरल्या आमच्या मनात थोडसं उजाडायला लागलं. तेथे कोणी तरी भेटणार, त्यांच्याकडे काहीतरी खायला मिळणार ही प्रज्वलित झालेली आशा उत्साह देऊन गेली. केवळ माणसाच्या अस्तित्वाची चाहूल, त्यात गर्भित असलेली अन्नाची आशा, बळ देऊन गेली. वेगेवेगे तो तळ गाठला. राजकोट (गुजरात) येथून आलेल्या गिर्यारोहक संघाने तो तळ उभारला होता. तेही “श्रीकैलास” साठीच निघाले होते. मागील तीन दिवसाच्या हिमवृष्टीमुळे त्यांनाही फार प्रगती करता आली नव्हती. खालच्या कॅम्प वरून फक्त लोड फेऱ्या त्यांनी केल्या होत्या. ते हिमरेषेबाहेर (snowline) असल्याने त्यांचे हाल आमच्यापेक्षा थोडे बरे होते इतकेच .

त्यांच्या तंबू जवळ जाऊन आम्ही जवळजवळ कोसळलोच. सलग चार दिवसानंतर सूर्यदर्शन झाले होते. त्या उबदार उन्हात, कितीतरी वेळ ग्लानीत नुसते पडूनच राहिलो. त्या संघातील सदस्यांनी आमची आपुलकीने चौकशी केली. आमच्या शारीरिक अवस्था त्यांच्या लक्षात आल्या असाव्यात. त्यामुळेच लगबगीने आमच्यासाठी मोठे मग भरून चहा आणि थाळी भर बिस्किटे पुढ्यात आली. ते सारे आमच्यासाठीच आहे, हे कळायलाही क्षणभराचा काळ गेला असावा. मात्र ज्या क्षणी लक्षात आले त्या क्षणी, आमच्या दोघांच्याही मनावरचे सभ्यतेचे असणारे काही संकेत, संस्कार, संकोच, औपचारिकतेचे उपचार, सारे –सारे भिरकावले गेले. आम्ही अधाशासारखे, कधीही, काहीही खायला न मिळाल्यासारखे त्या उबदार उत्साहवर्धक पेयावर आणि बिस्कीटांवर अक्षरशः तुटून पडलो. क्षुधा शांतीचा तो स्वर्गीय स्वाद घेत असताना, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठीही थांबावेसे वाटत नव्हते, इतके आम्ही त्यावेळी खाण्यात मग्न झालो होतो. नंतर ते सारे आठवले त्यावेळी शरमलोही. पण त्यावेळी तरी तसे वागलो होतो हेही खरेच!

पोटाला थोडीशी धुगधुगी आल्यानंतर, त्यांच्या प्रश्नांना, शंकांना सविस्तर उत्तरे देते झालो. वरच्या तळाची, खड्या हिमगलीची, हिमखाचा असलेल्या भागाची, हिमखाचेत पडलेल्या आमच्या सहकाऱ्याची, त्याच्या सुटकेची सविस्तर माहिती आम्ही त्यांना दिली. अध्याप मागे असलेल्या आमच्या चार मोहीम सदस्यां विषयी सांगितले. त्यात थोडा स्वार्थही होताच. तोवर जागा झालेल्या संकोचामुळे, मागे असलेल्या आमच्या सहकाऱ्यांनाही अन्नाची तीव्र गरज आहे हे त्यांना कसे सांगायचे ते कळत नव्हते. पण आमच्या वृत्तांत कथनातून ते आपोआपच त्यांच्यापर्यंत पोहोचले. शेवटी तेही अनुभवी गिर्यारोहक, डोंगर भाऊच होते ना !

वरच्या सगळ्या तळांची झालेली वाताहत, प्रत्यक्ष पाहिलेल्या आमच्या शारीरिक अवस्था आणि मागे राहिलेल्या आमच्या सदस्यांच्या अवस्थांची त्यांना आलेली कल्पना, यातून पुढे जावे की न जावे याविषयी त्यांचे मंथन चालू असतानाच, आणखी थोडे तयार अन्नपदार्थ पुढ्यात आले. चहा बिस्कीटांचा आणखी एक राउंड झाला.

पोटातील वडवानल अध्यापही शमला नव्हताच. पण मागे राहिलेल्या सहकाऱ्यानाही येथेच काही का होईना खायला मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन, भूक असताही थांबलो. पुढे गंगोत्री पर्यंत किमान चोवीस-पंचवीस किलोमीटरची मजल आजच मारायची होती. वैद्यकीय आणि इतरही मदत मिळवण्यासाठी ते अंतर पार करण्याची निकड होती. हिमदंशीत झालेल्या पायावर लवकर उपचार झाले नाहीत तर, पायाचे आणखी जास्त नुकसान होणार होते हे सांगायला आता डॉक्टरांचीही गरज नव्हती, इतके ते स्वच्छ दिसत होते. ( पुढच्याच तासाभरात, सतोपंथ शिखर मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी जात असलेल्या डॉक्टर मीनू मेहताने आमचे हिमदंशीत पाय पाहून आमच्या भीतीवर शिक्कामोर्तबही केले.) तोपर्यंत मागे राहिलेले आमचे सहकारी तेथे पोहोचले. पुढील अंतराच्या चालीचे नियोजन करून त्यांनी आम्हाला खो दिला.

मी आणि शशी परत एकदा ओठात दात रुतवत, जीवघेण्या कळा मागे सारत, दुखऱ्या पायांनी “रक्तवर्ण” चा हिमोढ उतरायला लागलो. आता मात्र आमच्यावर रुसलेली दैव थोडेसे हसते झाले. गोमुख पासून गंगोत्री पर्यंतची उतरती पायवाट मळलेली, फारशा दगडधोंड्यांची नाही. खडतर चढ-उतार संपले होते. कालपासून उतरत असलेल्या वाटेच्या तुलनेत ही वाट चक्क राष्ट्रीय हमरस्ता वाटत होती.
त्यामुळे आणि शारीरिक दुखणे विसरण्यासाठीची युक्ती म्हणून आम्ही नेहमीप्रमाणे मनावरचे सगळे लगाम काढून घेतले. मन एकदा स्वैरपणे उंडारायला सोडून दिले की तात्कालिक मानसिक, शारीरिक वेदनांचा विसर पडतो, हा अनुभव असल्याने मोकळ्या मनाने यांत्रिकपणे पाय उचलत राहिलो.

स्वैरावल्या मनाला, आजवर कधीही न अनुभवलेल्या माणसाच्या एका आदिम प्रेरणेचे, म्हणजे भुकेचे झालेले दर्शन अचंबित करणारे होते. भूक ही किती मूलभूत, प्रथम प्रेरणा आहे, मूलभूत गरज आहे हे इतक्या तीव्रतेने त्या पूर्वीच्या आयुष्यात आजपर्यंत कधीही लक्षात आले नव्हते, जाणवले नव्हते. तोपर्यंतच्या आयुष्यात सहज सुलभतेने, कधीही ,कुठेही, कितीही प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या अन्नामुळे ती एक मूलभूत गरज आहे, अस्तित्व राखण्याची प्रेरणा आहे हे ही लक्षात आले नव्हते. ती माणसाला किती अगतिक, असंस्कृत बनविते याचे दर्शन तोपर्यंत फक्त साहित्य, चित्रपटातून झाले होते. यावेळी ते अनुभवले.

तसेच भुकेलेल्याला, ओळख पाळख, धर्म, जात, प्रांत, देश या मानवनिर्मित अडथळ्यांना न जुमानता घासातला घास काढून देण्याच्या माणसाच्या संस्कृतीचे ही दर्शन झाले. मानवी स्वभावाची कोवळीक, ऋजुता सुसंस्कारीतता दाखविणारे गिर्यारोहणातील हे अनुभव मला कायमच मरूभूमीतील पाणस्थळे वाटतं आली आहेत.
किमान लेखनातून त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हेही मला माणूस म्हणून माझे कर्तव्य वाटते. गिर्यारोहण अधिक लोभसवाणे होते ते या अनुभव समृद्धी मुळेच.

©️
दिलीप नाईक निंबाळकर.
२६ सप्टेंबर २०२१

सह्याद्रीतील मंतरलेले क्षण

“सह्याद्रीतील मंतरलेले क्षण”
कोंडीवलीला उतरलो.कृष्णा सागर ,धोम धरणाचा जलाशय ओलांडायचा होता.पुढे जाऊन नाळे वाडीतून बस पकडायची होती. जुवा खाली मान द्यायला मन फार उत्सुक नसतेच कधी. तरी पण चाकरी साठी जाणे भागच होते म्हणून परत फिरलो ईतकेच.—
होडी तर जागेवरच होती. नावाडी मात्र नव्हता. त्याला शोधायला तास गेला. कसाबसा दादा बाबा करून त्याला शोधून आणला. यायला राजी नव्हताच. म्हटलं ,”का रे बाबा काय दुखत बिखत तर नाही ना?”
“नाय बा ! तब्येतीचा काय घोटाळा नाय. पर देव आल्यात घरी वर्साचं. अजून आरती व्हायचीया. “
“आरती –कसली रे ? “
“साहेब आरती कसली विचारणार तुम्ही ,आलायसा तरी कुठनं ? गणपती बसून दोन दिवस झालं नव्हं ? “
म्हणजे गणपती येऊन दोन दिवस होऊन गेले. मग मी गेले दोन दिवस उत्सव साजरा करतोय, तो कसला ? नेत्र सोहळे पार पडले ते कसले ?
दोन दिवसांपूर्वी धोम पाठीमागे असणाऱ्या आसरा गावातून धोम धरणाचा जलाशय ओलांडला, त्याच वेळी वेळ -काळाचे भान सुटले होते. होडीतून कमळ गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या वासोळी गावात उतरताना हिरव्यागार तृणपात्यांनी माझ्या पायाला गुदगुल्या केल्या. खूप दिवसांनी घरी आलेल्या पोराचा, आईने घेतल्या आला- बल्या सारखा हा स्पर्श. या गुदगुल्या बोलत्या झाल्या, “आलास न्हवं . लई उशीर केलास ह्या वक्ताला ?”
” उशीर करू नको तर काय ? गेल्या वर्षी तुझ्याच अंगणात माझी झालेली फजिती अजून विसरलो नाही. पावसाने झोडपल्याने सुसाट वाऱ्याने बसलेले माझ्या कानाचे दडे अद्याप उचकटलेले नाहीत. म्हणून यावर्षी थोडसं उशीराच यायचं ठरवलं होतं.”
” असू दे उशिरा का होईना आलास नव्हं! आल्यासरशी आता रहा दोन-चार दिवस “
माझ्या स्वागताची ही भलामण ऐकताना मी विरघळायला लागलो होतो. हे उभा उभी भेटणं काही खरं नाही, असं वाटायला लागलं. पायातळी असून येवढ्या आपुलकीने स्वागत करती हिरवी माया पाहून, ती तृणपाती पाहून एक झकास लोळण घेतली. उरात खोलवर खूप काळ राहील असा, मायच्या मांडीवर पहुडलेल्या लेकराने मायच्या ओटीचा घ्यावा, तसा एक दीर्घ श्वास घेतला. गडबडा लोळून चहूअंगी भेटल्यानं थोडं बरं वाटलं .
आता दोन दिवस तरी याची सोबत आहेच, म्हणून हळूच मिठीतून मोकळा होत, कमळगडाकडच्या खिंडीच्या कुशीत शिरलो.
चिंचोळ्या पांदीत शिरतानाच एक हिरवं तोरण डोक्यावरून झेपावत गेलं. लख्ख निळ्या आभाळातून हिरव्या गर्द हिरव्या पोपटांची माळ– पोराटोरांसह –बहुदा कमळगडाकडेच निघाली असावी .खिंडीच्या पायवाटेला लागतानाच एक खळाळता, झळाळता ओढा आडवा आला .पायी पाणी मुरवत मुरवत हळूहळू ओढ्यात शिरलो. डोंगराच्या या लेकराच, –ओढ्याचं– दिलखुलास हसणं मन प्रसन्न करून गेलं.
ओठी आपोआप शब्द आले अन् पाण्याचे झाले,
“हे मुक्त स्वच्छंद जीवा , ‘तुझा संग माझ्या बेड्या पडल्या पायाना होऊ देत. त्यायोगे मलाही थोडा काळ तरी मुक्तता, स्वच्छंदता मिळू दे.’
थोडावेळ स्थिरावून त्या स्वच्छंदी जीवाकडे केलेली याचना त्यानेही मानली असावी. निसर्गाचच लेकरू ते. उदार व्हावं त्यानेच. मनोभावे केलेली प्रार्थना त्याने मानली असावी. वाहत्या पाण्याबरोबरच खरोखरच सारी बंधने, अपेक्षा, ओढ हळूहळू सुटत गेल्याची ,मुक्ततेची भावना मनी अवतरली. मनाची पाटी लख्ख कोरी झाल्याची जाणीव झाली.
आभाळ आणखी निरभ्र कोरं करकरीत झालं .
ओठी शब्द पाझरले ,
“मुक्त मी– मुक्त मी– अव्यक्त मी –तृणांकुर मी
बेधुंद मी– बेबंद मी
जल थेंब मी –थेंब थेंब मी “
गुरुद्वारात प्रवेश करण्यापूर्वी मलीन पाय स्वच्छ करूनच आत जावे लागते, या प्रघाताची उगाचच आठवण झाली. गाभार्‍यात शिरत असल्याची एक गंभीर जाण अंगातून वाहत गेली. पावसाळा नुकताच संपून गेला असल्याने रान वाट्टेल तसं माजलं होतं . हिरव्या रंगाचा कल्लोळ उसळला होता. भुईचा तांबूसपणा शोधावा लागत होता.वाढल्या राना बरोबरच दोन हात करीत, कधी कवटाळीत, कधी मिठ्या मारून वर चढत खिंडीशी आलो, तेव्हा थोडंस दमल्याच लक्षात आलं. खिंडीत शिरल्यावर एकदम गार गार वारा अंगाशी भिडला. थंडीचा किंचितसा शहारा अंगी आला, पण बरं वाटलं. उजवी पायवाट कोळेश्वर पठारात चढत गेली होती. डावीकडे शेण पावट्यांची ओळ राईत शिरली होती. त्या वाटेने कमळ गडाच्या माचीत जाण्यासाठी शिरलो. खिंडीचा पसाराही बराच मोठा आणि रानही गच्च– चिक्कार माजलेलं — दुपार झाली तरी उन्हाचा पत्ता लागत नाही ,पायवाट मात्र शेणानं माखून गेलेली असल्यामुळे सुटत नव्हती. माचीतल्या विठोबा धनगराच्या वाडीची चाहूल दिली ती आडव्या पळत गेलेल्या एका कोंबड्यानं.
रान संपलं होतं.मोकळं वन लागलं. विठोबाच्या घरा मागचं हे मोकळं वन म्हणजे नवीनच रान काढलेले दिसतय. एवढ्या मोठ्या पठारात हे मोकळ वन –दोनच घरं कुठूनही दिसायला हरकत नव्हती. विठोबाचा लेक औत हाकताना दिसत होता .मागे एक शेंबडं पोरगं उगाचच
लूडबुडत होतं.
रान संपून मोकळ्या वावरात शिरतानाच पावसाची एक जोरदार चळक आली. विठोबाच्या घरात शिरेतो पार ओला चिंब झालो. वळचणीला उभा राहून चिखलाने माखलेले बूट काढून घरात शिरलो. डोक्यावरचं, अंगावरचं पाणी निसळलं. थोडावेळ थांबलो. पाऊस उघडताच चिंचोळ्या वाटेनं ,हिरव्या रानातून गडाच्या वाटेला लागलो. गडात पोहोचलो आणि मी गडाचा झालो, कसला गडच झालो. गडाचा विस्तार तसा कमीच आहे .तरीदेखील चारीठाव गडाचा शेंडा बुडखा गवतानं माखलाय. हिरवं गवत, -कोवळसर हिरवं– पिवळसर हिरवा–गर्द हिरवा– पोपटी हिरवा– मखमली हिरवा–गर्भरेशमी हिरवा –सारा हिरवा समुद्रच. या हिरवेपणाला म्हणावं तरी काय ? कुठलं हिरवाईचं भांडार लुटलय गडानं कुणास ठाऊक ?
जीव खुळावतोय नुसता. पिंढरीला लागणारं मऊशार गवत, मधुनच गौराईची, तेरड्याची फुलं, –सुरकं टोपड्याला आईनं लावलेल्या फिकट जांभळ्या, गुलाबी, पिवळसर चांदण्यासारखी दिसतायत. तेरडा, पारदर्शी जांभूळसर दांडीवर हिरवी पोपटी पानं लेऊन ,जांभळी, फिकट जांभळी फुलं झूलवतोय. खाली वाकून गोंजारलं तर हात मोहरला.
या हिरव्या दुपट्याचे काही खरं नाही. बघता बघता आडवारलो ,गडबडा लोळलो. अंग ओलकच्च झालं तरी उठावसं वाटेना. शरीरभर मऊशार गुदगुल्या होतायत.रेशीम स्पर्श म्हणतात तो हाच. या परीस आणखी मऊ काय असते ? उठावसं वाटेना. मनसोक्त लोळलो.
थोड्या वेळानं माथ्याला प्रदक्षिणा पूर्ण करावी म्हणून उठलो. कड्याच्या टोका टोकाने हिंडत आलो. खालच्या माचीत भरगच्च रान दाटलंय. उघडा टवका दिसतोय तो विठोबाच्या धनगर वाड्याचा. लांबच्या एकाद्या परग्रहावरून त्या झोपड्या, ते निसर्ग चित्र पाहिल्यासारखे वाटत होते. काल्पनिक चित्रासारखे वाटणारे ते दृष्य प्रत्यक्षात जिवंत चित्र पुढे होते. आतापावेतो सत्य आणि स्वप्नाची सरमिसळ इतकी कुठेच जाणवली नाही.
इथे एक गेरुची खाण दिसतेय. आहे खूप खोलवर गेलेली आहे . खाण कसली पाताळाचा वेध घेत, पाताळाचाही तळ शोधत जात असल्यासारखी. दोहो बाजूंनी रेखीव चिऱ्याच्या भिंती आणि चिऱ्याच्याच पायऱ्या. उंचच उंच त्या आडव्या पायऱ्या उतरताना आभाळाची उंची आणि पोटातला खड्डा वाढतोय. एवढ्या खाली खोलवर, कुठवर पोहोचली असेल ही खाण ? काय लपलं असेल याच्यात ?की खाणच काही शोधत खाली गेलीय? सारंच अद्भुत गूढ विलक्षण आहे. जी. ए. कुलकर्णींच्या कथे सारखं—-उंच टेकडी त्यावरील खोल-खोल गुहा— इथे पायऱ्या संपल्यात. पाणी दिसतय.इतक्या खोलवर असूनही निवळ, नितळ पाणी कसे काय?हे पारदर्शी पाणी जादूचे तर नसेल –?
फड -फड -फड- फड — अरेच्च्या !
हे पाखरू पाण्यातून उगवलं की काय ? पारव्याचे पिल्लू दिसतय हे. खरंच पाखरू असेल का हे ?,की जादूचे पाणी ही गोष्ट खरी ठरतेय ?
‘ एक दिवस माणसाचे पिल्लू येईल– टेकडी खालच्या ओढ्याने त्याला पाय धुऊ दिले तरच ते टेकडीवर पोहोचेल –गडा वरच्या तृणपात्यांचे स्पर्श त्याच्यासाठी मखमली झाले तरच ते या पाताळात एकटे देखील उतरेल. पाण्याला त्याचा स्पर्श होताच, एका शापित पाखराला पुनर्जन्म मिळेल.’
कथा जिवंत होतेय. एक पाखरू हळूच बाहेर काठाला आलं. पायापाशी धडपडलं. हात लावायला वाकलो तोच अंधारल्या जिन्यातून बाहेर झेपावलं. खरच विलक्षण आहे ही गुहा ,गेरूची खाण, विहीर ,पाताळ –काय म्हणाल ते .फक्त विशेषण अद्भुत.
मान तुटून पडेतो ताणून वर पाहिलं. आभाळ आणखी वर वर गेले होते. अंतच नाही त्याला आणि या पाताळालाही. एखादा चुकारीचा ढग सरकताना दिसतोय म्हणून आभाळ आहे, हे लक्षात येतंय. गेरुच्या भिंतींनी आयताकृती बांधून काढलेले ते आयताकृती आभाळ पाहताना दचकलोच. भिंतीतून हिरव्या तलवारी उगवल्या आहेत. हात हात झेपावत आहेत. तलवारीची वेडीवाकडी, नागडी पाती तळपतायत.
खरच, ‘पाखराला मुक्ती आणि माणसाच्या पिलाचा गुहेला घास’ काय विलक्षण कथा साकारतेय. मान ताणाने अवघडली. नजर खाली कोसळताना तलवारीच्या पात्यांची म्हणजे हिरव्या नेच्याची पाने हसती झाली. आभाळातुन येणाऱ्या उजेडाने सूर्यप्रकाशात आणखी हसती झाली. त्यांच हिरवळ सोनेरीपण झळाळलं.
“भेल रे भेलं वेड कोकरू कुठलं ! चल निघ आता बाहेर पुन्हा येऊ नकोस इकडे” ती गेरुची खाण दटावती झाली. थंडगार पायऱ्या, मखमली शेवाळ्याची शाल पांघरून बसलेल्या, तळहाताला नेच्याची झुडपे गुदगुल्या करीत असतानाही झपाझप वर आलो .तरी पुन्हा एकदा मागं बघावसं वाटतंय.
रात्री विठोबाच्या घरी पडशी टाकली. सकाळी परत एकदा गड प्रदक्षिणा करुन आज डोंगर उतरतोय. गड उतरताना नाही म्हटलं तरी थोडसं अस्वस्थच वाटतंय. दोन दिवस कुठे सरले, ते कळले नाही. मावळती- उगवतीचा हिशोब मायच्या मांडीवर लोळताना कसा करावा ? मुक्कामात मन कसं तृप्ततेने तुडुंब भरलय. मनात रेशीम स्पर्शांची,नयन उत्सवांची गर्दी दाटलीय. पोपटांच्या शाळा, डोंगर पुत्र ओढ्याचं खळाळतं रुप, रानाच गच्चपण, मार्जोरी राॅनन किलींग्जच्या “पाडस” मधल्या बॅक्स्टर वाडी सारखा असणारा विठोबाचा धनगर वाडा, गडातील हिरवाईची उधळण, तेरड्याचे ताजेपण, नुसत्या आठवणींच्या भिंगऱ्या घुमताहेत मनात.
या सर्वांच्या रेशमी स्मृती झोपाळ्या सारख्या मनात झुलताहेत.
खाली उतरताना, गडाने– कृष्णामाईच्या खोऱ्याने माझ्या दोन्ही डोळ्यांची धांदल उडवून दिली. पार रायरेश्वराच्या पायाला स्पर्श करणारा अथांग जलाशय, साऱ्या खोऱ्याचा आयना झालाय .पलिकडची महाबळेश्वरची रांग या आयन्यात डोकावतेय. ते पाहू की सोनकीचा हा डोंगर पाहू ?
चि.त्र्यं. खानोलकरांच्या
” हळदीवे ” शब्द पलीकडच्या भात खाचरातून जिवंत झालाय. तर माझ्या पायाशी वर्डसवर्थच्या “डॅफोडील्स” चा गालिचा पसरलाय.
आकाशात सदैव असणाऱ्या चांदण्या, दिवसा सूर्याच्या प्रखरतेने दिसत नाहीत, म्हणे. मी तरी आकाशात कुठे पाहतोय वरचा निळा घुमट कोरा करकरीतच आहे. पण भुई–नव्हे अवघा डोंगरच — पिवळ्या चांदण्यांनी माखलाय. साऱ्या डोंगरावरच कुणी भंडारा उधळलाय जणू. मंदसर सूर्यप्रकाशात देखील सोन्यासारखा झळाळतोय. हळूवार झुळकेने देखील सारा पिवळा डोंगर झुलत असल्याचा भास होतोय. शरीराचा कण न् कण हे दृश्य पिण्यासाठी आधाशी झालाय. सोनकी,सोनसळी मलाच प्राशून टाकील, असे हे दृश्य डोंगराचे हे रूप न्यारे आहे,नवखे आहे .मी कधी पाहिलेलं नाही.
“डॅफोडिल्स” कविता आज मला आता समजली. शाळेत भरपूर छड्या खाऊनही “डॅफोडिल्स ” लक्षात राहिली नाही. तीच आता मात्र सर्वव्यापी झाली आहे. माझे गात्र गात्र व्यापून आहे.
” जोशी सर खरंच कां हो तुम्हाला हा सोनकीचा डोंगर माहित नव्हता ?”
ही सोनसळ, पिवळी वर्दळ, गौराई थेट तळात कृष्णा मायला भिडली आहे. इथे पायवाटा नाहीत, रस्ता नाहीच थेट पिवळा पुष्प सागर संपला की निळा जलसागर सुरू होतोय. त्या सीमारेषाही अंधुक आहेत.
कमळ गडाला मी हळूच हात पालवला.पुन्हा येईन म्हणालो.
“चला ओ साहेब, येळ व्हतोय मला .आरती ला जायचय अजून. ” नावाडी घाई करत होता.
मी मनात म्हणतो,”जा बापड्या जा .तुझा उत्सव सुरू झाला आहे .माझा संपलाय .
आरतीचे सूर,सोनकीच्या निरांजनाची वात माझ्या डोळ्यापुढे रेंगाळतेय.
“मुक्त मी –मुक्त मी
अव्यक्त मी –सोनकीचा मी”
हा माझा लेख,
दि. १७ मे १९८१ च्या, “सकाळ” मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. आज गणपती उत्सवाप्रसंगी आठवला. ते “क्षण” परत अनुभवण्यासाठी येथे उद्घृत केला आहे.
©️
दिलीप नाईक निंबाळकर.
9822437297

 

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...