महीपत गड - सुमारगड -रसाळगड आणि चंद्रगड
ऐन थंडी मध्ये पाऊस पडतो आणि वर्तमान पत्रात बातमी येते कि दुष्काळी भागाला पावसाचा दिलासा, त्याच प्रमाणे एखाद्या गिर्यारोहकाला पण अश्या अचानक आडवाटेवरच्या ठरलेल्या भ्रमंती मुळे असाच काहीसा दिलासा मिळतो.
दि २२,२३,२४ आणि २५ तारखेला रसाळगड सुमारगड आणि महीपतगड या त्रिकुटा वर जायचा बेत ठरला, बहुतेक वेळेस जेंव्हा जेंव्हा जातो त्या वेळेस त्या भागातल्या किल्य्याच्या रस्त्याचा GPS नकाशा आमच्या कडे असतो, पण आमच्या मित्रांपैकी बहुधा कोणी जाऊन आले नसल्या मुळे असा काही नकाशा उपलब्ध झाला नव्हता, त्या मुळे काही blog आणि नकाशे त्या शिवाय google नकाशा या आधारे नियोजन केले होते. हातात ४ दिवस असल्या मुळे रसाळ त्यावरून सुमार आणि मग महिपतगड अशी भ्रमंती करायचा निर्णय नक्की झाला होता. पण जशी काही माहिती गोळा होऊ लागली त्या वरून असे समजले कि रसाळगडावर पर्यंत गाडी रास्ता झालेला आहे, म्हणून मग सर्वात आधी महीपतगड करायचा आणि मग सुमारगड करायचा आणि मग रसाळगड ला जायचे असे नियोजन झाले.
जोडून असलेल्या सुट्ट्या आणि त्या मुळे होणारी गर्दी टाळण्या साठी सकाळी ५:३० लाच कात्रज चा घाट ओलांडला, भल्या पहाटे उठून निघाल्या मुले डोळ्यात झोपेचे ढग जमा होत होते आणि उडून जात होते, म्हणावे तसे अजून उडजाडलेले नव्हते आणि आम्ही एकूण मिळून गाडीत ३ जण असल्या मुळे गप्पा जास्त काही सुरु झाल्या नव्हत्या त्यातच खंबाटकी घाट ओलांडला आणि चालक सोडून आम्हा दोघांचा जरा सावध डोळा लागला पण गाडी काही अजून वाई च्या दिशेने वळली नव्हती म्हणून जरा बाहेर पाट्यान कडे पहिले तर सातारा शहर २४ कि अश्या पाट्या दाखवत होत्या गाडीचा वेग आणि सकाळचा अंधार यात वाई फाटा फाट्यावर मारून भुईंज फाट्या पर्यंत आलो होतो आणि मग चालकाची अक्कल काढून सातारा शहराच्या दिशेने दिशेने येणारा वाई फाटा आहे त्या मार्गे वाई शहरात प्रवेश केला, महाबळेश्वर मध्ये पोचलो तेंव्हा साधारण सकाळचे ७:३० झाले होते, नेहमी गजबजलेले महाबळेश्वर खूपच शांत वाटत होते, प्रतापगड चा घाट उतरून थेट पोलादपूर मध्ये नाष्ट्या साठी थांबलो आणि क्षुधा शांती मध्ये पोटाची शांती करून महीपत गडाच्या दिशेने निघालो.
महीपत गडावर जाणारी वाट वाडी बेलदार या ठिकाणहून सुरु होते, म्हणून google नकाशा लाऊन निघालो पण त्याने सुद्धा कोणत्या तरी दुसाऱ्याच रस्त्याला लावले ३ ते ४ किमी पुढे जाऊन परत मागे फिरलो, आणि योग्य रस्त्याला लागलो, ११ वाजता आम्ही वाडी जैतापूर ओलांडून धनगराचा वाडा येथे पोचलो तिथून साधारण ६ ते ७ किमी वाडी बेलदार चा घाट रास्ता सुरु होतो पण रस्त्याचे काम अजून पूर्ण झाले नव्हते आणि आमची छोटी गाडी वरून जाईल कि नाही अशी शंका असल्या मुळे गाडी धनगर पाड्या पाशी लावून चालायला सुरवात केली,
११:३० ची वेळ असेल कोकण भागात असल्यामुळे सकाळचे ११:३० सुद्धा नकोसे झाले होते त्यात पाठीवर ओझे आणि चढणीची वाट याने पार दमछाक केली, २ ते ३ किमी टप्पा पार केल्या नंतर चालणे नकोसे झालेले आणि गाडी रास्ता खूप फिरून फिरून वर जात असल्यामुळे डोंगरातील रास्ता सोडून जुन्या पाऊल वाटेने जायचे का असे विचार डोक्यात येऊ लागले कारण त्यामुळे चालायचा वेळ कमी झाला असता पण चढण अंगावर आली असती म्हणून मी तो विचार धुडकावून पुन्हा रस्त्याने चालायला सुरवात केली,
(गडावर जाणारा गाडी रास्ता )
आणि देवा सारखा धावून आलास अशी म्हण आपण म्हणतो त्या प्रमाणे खालून खराब रस्त्याने एक डस्टर गाडी वेगा मध्ये वर येताना दिसली, आणि पुढच्या ५ मी गाडी वर येऊन आमच्या पाशी थांबली आणि आम्ही काही विचारायच्या आत त्याने स्वतःहून विचारले कि मी पण वर जातोय यायचे का तुम्हाला, नाही म्हणायचा प्रश्नच येत नव्हता झटकन गाडीत बसलो आणि या अनोळखी मित्राची ओळख करून घेतली त्याला पण फिरायची आणि off rodes ला गाडी चालवायची आवड असल्या मुळे इकडे आलेला होता, एकदम खराब आणि घाणेरड्या अश्या रस्त्यावर पण तो गाडी एकदम सहज चालवत होता. पुढच्या १५ मि आम्ही वाडी बेलदार ला पोचलो होतो. महीपत गडावर येथून ४५ मी जात येईल हे ऐकून तो पण वर यायला तयार झाला.
(महीपत गडावरून वाडी बेलदार )
वाडी बेलदार हे अगदी छोटे १५ ते २० घरांचे गाव आणि हल्ली गावात बऱ्याच ठिकाणी दिसते तसे फक्त वयस्कर लोकांचे वास्तव्य एकपण ३५ च्या आतील स्त्री किंवा पुरुष किंवा अगदी लहान मूल पण नाही सगळे मुंबई पुणे मध्ये छोट्या मोठ्या नोकरी करता गेलेले, तिथल्याच एका घरात पाणी पिऊन पुढची वाट विचारली आणि कोणी गड दाखवायला येईल का म्हणून विचारले एका काका तयार झाले पण ते जेवण करत होते म्हणून मग आम्ही वर जायला सुरवात केली.
(महिपतगडाच्या वाटेवर )
थोड्याच वेळात वाट दाखवणारे काका पण आले.
महीपत गड १२० एकर परिसरामध्ये विखुरलेला आहे आणि गडावर खूप जंगल वाढलेले असल्याने वाटाड्याची गरज होती. १५ ते २० मी च्या चढाई नंतर आम्ही गडावर पोचलो आणि पारेश्वर देवळाच्या दिशेनं जायला सुरवात केली जाताना वाटेत गडावरील वास्तूंचे अवशेष दिसले.
(भिंत आणि पाणी वाहुन जाण्यासाठी केलेली जागा)
(गडावरील जंगल आणि विहीर)
चढण संपून साधारण २० मी चालल्या नंतर आपण गडावरील पारेश्वर देवळापाशी पोचतो, देवळा मध्ये साधारण २५ ते ३० लोकांची राहण्याची व्यवस्था होऊ शकते.
(पारेश्वर मंदिर)
देवळाच्या समोरच पाण्याची विहीर आहे आणि मुबलक पाणी आहे, आता साधारण दुपारचे २:३० झालेले, दुपारचे जेवण असे काही बनवायचे नव्हते त्यामुळे सोबत आणलेली फळे आणि खजूर खाल्ले आणि गड फिरायला निघालो.
गड चढत असतानाच वाटेत बिबट्याची विष्ठा पडलेली दिसली, आमच्या वाटाड्याने पण त्याला दुजोरा दिला आणि म्हणाला देवळाच्या परिसरातच असतो तो ....... !!
आम्ही आता गडावरील कोतवाल दरवाजा बघायला निघालो, वाटेत एक दुभंगलेली मारुतीची मूर्ती दिसली.
(जंगलातील मारुतीची मुर्ती )
(कोतवाल बुरुज आणि जंगल)
कोतवाल बुरुज आणि तिथून दिसणारे संह्याद्रीचे डोंगर पाहून आम्ही ४० मी परत पारेश्वर देवळा पाशी परत आलो, आमचा देवदूत पण तिथून निरोप घेऊन निघाला, आम्ही १५ मी विश्रांती घेऊन मामाना (वाटाड्या) विचारले आता कुठे जायचे, आता यशवंत दिंडी कडे जाऊयात पण जाऊन यायला २ तास लागतील असे मामा म्हणाले, आमच्या कडे वेळ भरपूर होता त्यामुळे आम्ही एकापायावर तयार होतो, आता मामान बरोबर यशवंत दिंडी च्या दिशेने निघालो, इथे पण वाटेत बिबट्याची विष्टा पडलेली दिसली.
यशवंत दिंडीच्या वाटेने जात असतानाच उद्याचे सुमार गडावर कसे जाता येईल याचे नियोजन सुरु होते, वरील फोटोमध्ये सुमारगड दिसत आहे आणि मामा वाट समजावून सांगत आहेत.
( सुमारगड)
यशवंत दिंडी च्या इथे पण असेच काही ढासळेले अवशेष आणि बुरुज दिसले, मामांच्या सोबत त्यांचे लाडके कुत्रे पण आलेले, यशवंत दिंडीच्या इथून ते खाली उतरायला लागले आणि त्यांनी किती वेळा पण बोलालवले तरी वर येईना, त्यावर मामा म्हणाले जा लेका मर ! उचलून नेईल तेव्हा कळेल तुला, हे वाक्य मात्र त्याला कळले असावे कारण त्यानंतर तो लगेचच वर आला.
(यशवंत दिंडी बुरुज)
याठिकाणी थोडावेळ न्याहाळून आम्ही परत मंदिराकडे आलो संध्याकाळचे ५:३० झाले असतील, मामानी पाणी काढून आणले आणि म्हणाले देवळात बुआ असतो पण तो सध्या गावी गेला आहे असे सांगून मामा पण त्यांच्या घरी निघून गेले.
आम्ही आता बऱ्यापैकी दमलेले होतो त्यामुळे सूर्यास्त पाहायला जायची फार अशी काही इच्छा झाली नाही कारण त्यासाठी गडावरील सर्वात उंचावरील जागेवर जाणे आवश्यक होते आणि त्याची वाट कुठून आहे आणि किती वेळ लागेल याचा काहीच अंदाज नव्हता त्यामुळे तो विचार सोडून दिला, थोड्या वेळात अंधार पडायला लागला आणि तेवढयात हातात एक मोठी बॅग आणि खांद्याला कुर्हाड घेऊन एक माणूस आला, एन्ट्री एकदम दमदार होती पण नंतर समजले हेच ते गडावरचे बुआ (ओम नमःशिवाय )
बुवा हा शब्द ऐकल्या वर आपल्या मनात जे विचार येतात किंवा जी एक आकृती आपण तयार करतो तसे काही हे बुआ नव्हते पण एकदम श्रद्धाळू आणि देवाची पूजा अर्चा करणारे होते त्यामुळे त्यांनी आल्या आल्या झाड लोट करून मंदिर स्वच्छ केले आणि बाकी पूजा अर्चा केली, तो पर्यंत अंधार पण पडला होता आणि थंडी पण वाढायला लागली होती, आम्ही पण आमची हांथरुन पांघरून काढून ठेवली आणि जरा पाय पसरून बसलो. इकडे बुवानी चुली वर त्यांच्या साठी भात आणि आमटी चा बेत केला होता आम्हाला पण विचारले तुमच्या साठी पण करू का ? पण आमचे रात्रीचे जेवण आम्ही सोबत आणले होते त्यामुळे त्यांना धन्यवाद म्हणून आम्ही जरा आडवे झालो , थोड्या वेळाने बुवांचा आमटी भात तयार झाला मग आमचे आचारी सुप करण्यासाठी सरसावले थोड्याच वेळात सूप पण तयार झाले, सुपाचे गरम पातेले घेऊन थेट देवळा बाहेर अंगणात येऊन बसलो आकाशात चंद्राचा भरपूर उजेड पडला होता त्या चांदण्यात रात्रीचे जेवण उरकले आणि नंतर परत देवळात येऊन पडलो.
बुवांन बरोबर थोड्या गप्पा मारल्या त्यावर त्यांनी फिरणारा बिबट्या आणि इतर काही किस्से सांगितले, ते ऐकता ऐकता डोळा कधी लागला कळले नाही आणि सकाळी ६ वाजता उठलो कारण आज सुमार गडावर जायचे होते, सकाळी उठल्या उठल्या हात पाय तोंड धुतले चुलीवरचा खास असा चहा करण्यात आला, चहा घेता घेता बाजूच्या झाडीत स्वर्गीय नर्तक (Indian Paradise flycatcher) यांचे अत्यंत सुंदर दर्शन झाले.
(सौजन्य - Google Image )
साधारण सकाळचे ७:४५ झाले होते, सामानाची बांधाबांध केली आणि जवळच असलेल्या एका योध्याच्या स्मारकाचे दर्शन घेऊन निघालो.
आज महिपतगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीबेलदार मधून वाटाड्या घेऊन सुमारगड पहाणे आणि वेळ असल्यास तसेच रसाळगड गाठणे असा उद्देश होता, पुढील ४० मि महीपतगड खेड दरवाजा मार्गे उतरून वाडीत पोचलो पण वाडीतल सर्व पुरुष मंडळी राशन आणायला वाडी जैतापूर ला म्हणजे तिथून साधारण ९ किमी गेले होते, त्यामुळे तिथे कोणी वाटाड्या मिळाला नाही, म्हणून मग तिथेच एकाच्या घरी आमचे ओझे ठेवले पाणी भरून घेतले आणि पुढील वाट तिथल्या आजीनं कडून विचारून घेतली.
वाटेत राया धनगराचा झाप लागतो, हे राया धनगर म्हणजे या परिसरराची खडान खडा माहिती असेलेले गृहस्थ, अनेक गिर्यारोहकांना यांनी वाटेला लावले आहे त्यामुळे ब्लॉगर लोकांचा ब्लॉग यांच्या नावाशिवाय पूर्ण होत नाही. ९ ते ९:१५ च्या सुमारास आम्ही एका ओढ्याची वाट ओलांडून सुमार गडाला जोडणाऱ्या रांगेवर चढायला सुरवात केली. १० च्या सुमारास आम्ही राया धनगराच्या झापा पर्यंत पोचलो होतो, राया धनगराच्या घरी पण छोट्या पोरान शिवाय कोणी नव्हते मोठी मंडळी राशन आणायला गेलेली, त्यामुळे आता आपले आपण वाट शोधत सुमार गड गाठायचा निश्चित केले.
(राया धनगराचा झाप)
तिथल्या मुलांना विचारून चालायला सुरवात केली वाट तशी मोठी आणि रुळलेली दिसत होती, त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे पुढे चालत होतो, जंगलाच्या मधून वाट जात असल्यामुळे उन्हाचा तसा त्रास होत नव्हता आणि चढण पण नव्हती.
(झाडीतून दिसणारा सुमारगड)
साधारण १ तास चालल्या नंतर थोडी विश्रांती घेतली पाणी आणि संत्रे याचा आहार केला आणि थोडी चर्चा झाली कि आपण बरोबर वाटेवर आहोत ना कारण ब्लॉगर ने लिहिल्या प्रमाणे साधारण आम्ही आता सुमारगडाला जोडणाऱ्या डोंगराच्या धारेवर यायला हवे होते पण हि वाट नुसती कडे कडेने जात होती, कदाचित अजून थोडे पुढे चालून गेल्यावर वाट वर चढेल या आशेने अजून पुढे गेलो पण वाट काही वर चढेना आणि वाट पण चुकलेली वाटत नव्हती कारण मोठी आणि रुळलेली वाटत होती काही ठिकाणी झाडी वाढल्याने ती तोडून वाट पुढे गेलेली होती पण आता आम्ही गडाच्या अगदी खालच्या बाजूला आलेलो होतो त्यामुळे इथून तर नक्की वाट नाहीये हे निश्चित झाले आणि एकतर मागे जाऊन परत वाट शोधायची किंवा समोर असलेल्या ओढ्याच्या वाटेतून डोंगराच्या धारेवर चढायचे असा पर्याय होत , मागे जाऊन परत वाट शोधण्यात खूप वेळ गेला असता म्हणून ओढ्याच्या वाटेने वर चढायला सुरवात केली अनेक मोठे दगड धोंडे वेली ओलांडून थोडे वर आलो पण अजून काही वाट किंवा डोंगरमाथा जवळ येत नव्हता शिवाय अनेक वेली काटे कपड्यांमध्ये घुसत होते, हा मार्ग काही बरोबर नाहि म्हणून परत खाली उतरलो ५ मि शांत बसलो आणि परत मागे जाऊन दुसरीकडून कुठे वर जाता येईल का असे बघायचे ठरले, ५ १० मिन मागे चालत जाऊन मागच्या अडचणीतील चढाई पेक्षा जरा कमी त्रास देईल अश्या वाटेने वर घुसायचे ठरले कारवीचे जंगल कापत आम्ही वर शिरायला सुरवात केली, अर्ध्या पेक्षा जास्त चढून गेल्यावर पण नक्की समजत नव्हते कि हि वाट तरी बरोबर आहे का, शेवटी प्लॅन बी ची तयारी सुरु केली तो म्हणजे पूर्ण मागे जायचे आणि पुन्हा वाट शोधायची किंवा प्लॅन सी वाडी बेलदार गाठून तिथेच मुक्काम करायचा आणि उद्या सकाळी वाटाडया घेऊन यायचा.
थोडे चढून गेल्या सगळ्यात पुढे झाडी कापीत पुढे जाणाऱ्या मित्राने आहे तिथेच थांबण्याची सूचना केली तो बऱ्यापैकी उंचीवर गेला होता तिथून त्याला आकाश दिसायला लागले होते झाडीतूडवत पुढे जात तो अखेर डोंगर माथ्यावर पोचला आणि अखेरीस त्याला मुख्य वाट दिसली तिथूनच ओरडून त्याने सांगितले कि आपण बरोबर आहोत या पुढे, चढण अंगावर घेत कारवी तोडत आम्ही वर शिरत होतो आणि अखेरीस मोकळ्यात आलोच.
(समोरील झाडाच्या खालच्या बाजूने वर मोकळ्यात आलो)
वर आलो तेंव्हा दुपारचा १ वाजलेला, पुन्हा पाणी आणि संत्रे खाऊन ५ मि आराम केला आणि पुढे निघालो.
(सुमारगडाच्या वाटेवर)
जवळ आल्या नंतर सुमारगड साधारण राजगडाच्या बालेकिल्या सारखा दिसतो, किल्ल्या कडे तोंड केल्यावर आपल्या डाव्या हाताच्या बाजूने वाट गडावर जाते, या ठिकाणी वाट बऱ्यापैकी अरुंद आहे (द्रुष्टी भय निर्माण होऊ शकते ☺ !, हा टप्पा अवघड समजला जातो पण जेवढा लोकांनी वर्णन केला आहे तेवढा तो नाहीये.
पुढे एक कातळ टप्पा आहे, पण तिथे आता शिडी लावल्यामुळे ती वाट आता सोपी झालेली आहे.
(शिडीची वाट)
शिडी चढून वर गेल्यावर, वाटेत एक छोटे स्मारक लागते सती शिळा असे तिथे लिहले आहे, कडेच्या डोंगरातच कोरलेले आहे.
(सती शिळा )
तसेच पुढे चढून वर गेलो, वाटेत पडलेले मंदिर आहे मंदिराच्या समोर आणि थोडे बाजूला पिण्याचे पाणी आहे बाजूला असलेले पाण्याचे टाके चांगले आहे.
(मंदिराचे उघड्यावर पडलेले अवशेष)
गडावरील टाके आणि मागच्या बाजूला एक गुहा तिथे राहू शकतो
गुहेच्या आत मध्ये ओंम नमःशिवाय
गुहेच्या बाजूला असलेल्या जवळील टाक्यातुन पाणी भरून घेतले, आणि थोडा वेळ झाडाच्या सावलीत आराम करून सोबत आणलेला खाऊ खाल्ला आणि गडावर फेरी मारायला निघालो, गडावरून समोर महीपतगड, मधुमकरंद, चकदेव आणि पर्बत या गडांचे /डोंगरांचे दर्शन होते.
सुमारगडावरून महिपतगड
गडावर इकडे तिकडे फेरफटका मारला, २० ते २५ मी गडावरचा सर्व परिसर फिरून होतो, गड फिरून झाल्यावर पुन्हा उतरायला सुरवात केली.
(शिडीची वाट उतरताना)
शिडीच्या वाटेवरून उतरल्यावर मधल्या टप्प्यात थोडा उन्हाचा कडक जाणवत होता, आता परत वाडी बेलदार गाठून गावातून आप आपली ओझी घेऊन खाली उतरून गाडी घेऊन रसाळगड गाठायचा होता, एकदा का सोंडे वरची वाट सोडली कि जंगलातून वाट होती उन्हाचा त्रास होणार नव्हता, परत जाताना आम्ही कुठे चुकलो असू याचा अंदाज घेत चाललो होतो आणि सुमारगड आणि दुसरी डोंगररांग यांना जोडणारी एक खिंड येते ती गुइरीची खिंड त्यात येऊन थांबलो जी गडावर चढताना आम्हाला लागली नव्हती, आणि तिथून अगदी व्यवस्थित पाऊल वाट होती. आता भरभर पावले उचलत निघालो कारण समोर वाडीबेलदार मध्ये राशन वर घेऊन आलेली गाडी उभी होती, ती निघायच्या आधी आम्हाला तिथे पोचायचे होते म्हणजे आमचे चालायचे कष्ट कमी होऊन गाडीने धनगरवाड्यावर पोचलो असतो.
थोड्याच वेळात राया धनगराचा झाप आला, स्वतः राया धनगर पण भेटले त्यांच्याशी २ शब्द बोलून निघालो, वाडीबेलदार २० मी च्या अंतरावर होते आणि समोर गाडी पण दिसत होती.
राया धनगराच्या इथून खाली उतरलो आणि वाडीबेलदारचा चढ चढून आलो तर समोर दिसणारी गाडी गायब आता ५ कि मी चालणे निश्चित होते, वाडी बेलदार मध्ये पोचलो पाणी प्यायलो आणि गाडी रस्त्याने ना जाता डोंगरवाटेने जाणारी वाट विचारून घेतली तेव्हां साधारण ५:३० ते ५:४५ झाले असतील थोड्याच वेळात सूर्यास्त होणार होता, एक प्रक्रारे आता तशी घाई नव्हती कारण गाडीतून रसाळगड गाठणे एवढेच काम शिल्लक होते.
साधारण १ ते १.५ तासात आम्ही खालच्या धनगर वाड्यात येऊन पोचलो होतो, तिथे गेल्या गेल्या पहिले बूट काढून टाकले आजच्या दिवसात बरोबर २० किमी चालणे झाले होते गाडी निघे पर्यंत गुडूप अंधार झालेला होता.
GPS आणि रस्त्यावरील फलक माहिती याचा आधार घेत रसाळगड गाठला, रात्रीच्या अंधारात गडाच्या पायऱ्यांची वाट अशी दिसली नाही तेवढ्यात तिथल्या स्थानिक माणसाने हाक मारली आणि कुठे जायचे आहे विचारले आणि पायऱ्यांची वाट इकडे आहे सांगितले, थोड्याच वेळात त्याच्यापाशी पोचलो गडावर राहण्याची वगैरे सोय याची माहिती घेतली आणि निघालो पायरयांन पासून २० ते २५ मी आपण गडावरील झोलाई मंदिरा पाशी पोचतो, देऊळ नवीन आणि छान बांधलेले आहे देवळात विजेची सोय आहे देवळा बाहेर कोणी तरी आधीच चूल मांडलेली असल्यामुळे बाकी त्रास काही झाला नाही लगेच रात्रीच्या जेवणाची सोय करून रात्री ११:३० च्या सुमारास झोपलो पण रात्री चांगलाच वारा सुटल्यामुळे पत्रे आणि इतर अनेक गोष्टीचा आवाज येत होता त्यामुळे शांत झोप अशी लागली नाही सकाळी ८ च्या सुमारास पुजारी मामा आले व उठलो.
बाकी आवरा आवरी करून सकाळी ९:३० ला गड फिरायला निघालो गडावर एका जुनी इमारत आणि तोफा, पडलेले मंदिराचे अवशेष आणि काही स्मारके आहेत.
झोलाई देवीचे मंदिर
देवळा समोरील दीपमाळ
देवळाच्या बाजूचे पाण्याचे टाके
गडावरील जुनी वास्तू
गडाच्या परिसरातील काही पडलेल्या वास्तू
गडावरील पडलेल्या मंदिराचे अवशेष
अर्धा तासात गडाला फेरफटका मारून गड उतरायला सुरवात केली, गडाच्या दरवाजातून दिसणारी बांधलेली वाट.
गडाच्या दरवाजातून दिसणारी पाउल वाट आणि गाडी रास्ता
११ च्या सुमारास गडावरून खाली आलो आणि गाडीत सामान भरून पोलादपूरच्या दिशेने निघालो आजचा तिसरा दिवस, आज चंद्रगड संध्याकाळी करायचा आणि खाली गावात येऊन मुक्काम करून उद्या जमल्यास मंगळगड करून पुण्यात यायचे असा विचार होता.
४५ मि पोलादपूर गाठले आणि थेट स्वीट मार्ट मध्ये जाऊन प्रत्येकी अर्धा लिटर ताकाचे सलाईन दिले तेंव्हा कुठे जरा शरीरातील पाण्याची लेव्हल वाढली. ताक प्यायला मुळे भूक जास्त नव्हती आणि वेळ पण भरपूर होता म्हणून मग पोलादपूर प्रतापगड रस्त्यावरील एका फाट्याने आत वळलो याच रस्त्यावर चंद्रगड आहे आणि याच रस्त्यावर तानाजी मालुसुरे यांचे स्मारक असलेले उंबरठ गाव लागते, वाटेतील एका ठिकाणी मिसळ खाऊन पुढे निघालो.
उंबरठ गावात थांबून तानाजी मालुसुरे यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले आणि पुढच्या रस्त्याला लागलो, स्मारकापासून साधारण ८ किमी वर चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेले ढवळे गाव गाठले. ढवळे गावात पोचलो तेंव्हा दुपारचे २:३० वाजले असतील कोकणातील गाव असल्यामुळे ऐन थंडीत पण तिथे उकडत होते.
थोड्या वेळ देवळात आराम करून ४ वाजता गडावर जायचे ठरले. गावातील एकाने म्हंटले पण एवढ्या उशिराने जात आहात रस्ता माहित आहे ना ? पण आमचा मित्र आधी जाऊन आला असल्या मुळे तशी काळजी नव्हती आणि सोबत विजेरी(टॉर्च ) पण होती.
(चंद्रगडाच्या वाटेवर )
चंद्रगड
चंद्रगडाच्या वाटेवर पाण्याचा जिवंत झरा, सोबतच्या बाटल्यां मध्ये पाणी भरून घेतले आणि पुढे निघालो, उन्ह भराभर कलायला लागलेली आम्ही अजून मधल्या खिंडीत पण पोचलो नव्हतो. ३० मि च्या चाले नंतर आम्ही मधल्या खिंडीत पोचलो.
खिडीतुन सरळ वर चंद्रगडाला जाणारी वाट
इथून पुढची वाट सरळ अंगावर येणारी आहे, साधारण ४५ मि ची सरळ खड्या चढाईची वाट आहे भुसभुशीत मातिची आणि त्यावर गवत वाढलेले आहे, त्यामुळे वाट चढायला सोपी वाटत असली तरी ती उतरताना तेवढीच घसरणारी आहे.
याठिकाणी पोचल्यानंतर साधारण गडाचा सगळ्यात वरचा माथा दिसायला लागतो, सरळ रेषेत वर गडाकडे जाणारी पाऊल वाट आहे.
गडावरून समोर सगळ्यात उंच दिसतंय ते महाबळेश्वरचे आर्थर सीट म्हणजेच मढीमहल, गडावर फार मोठी जागा नाहीये एक पाण्याचे टाके आहे शंकराची पिंड आहे.
वर पोचलो तेंव्हा संध्याकाळचे ५:४५ झाले असतील, अंधार पडायच्या आत मधल्या खिंडी पर्यंत पोचायचे लक्ष समोर ठेवले होते.
(गडावरून दिसणाऱ्या डोंगररांगा )
१० मि गडावर थांबलो आजूबाजूचा परिसर न्याहाळून घेतला आणि उतरायला सुरवात केली, आता सूर्य भराभर खाली जात होता.
खिंडी पर्यंत उतरणारी वाट घसरणारी होती त्यामुळे आवश्यक वाटेल तिथे खाली बसून उतरणे हाच पर्याय होता.
शेवटी ६:४५ च्या सुमारास खिंड गाठली आणि गुडूप अंधार झाला, आता अवघड असे काही नव्हते फक्त अंधारातून गावापर्यंत चालत जाणे एवढेच बाकी होते वाटेत ठीक ठिकाणी ओंम नमः शिवाय च्या पाट्या असल्यामुळे आणि वाट चांगली प्रशस्त असल्यामुळे चुकायचा काही प्रश्न नव्हता.
आजचा तिसरा दिवस संपला होता आणि जे ठरवले होते ते सर्व किल्ले पाहून झाले होते उद्याच्या मंगळ गडाच्या मोहिमेला मी नकार दिला होता त्यामुळे आज रात्रीच घरी परत जायचा निर्णय घेतला, रात्री ७:३० पर्यंत गावात पोचलो आणि आवरा आवरी करून ८ च्या सुमारास ढवळे गावातून निघालो ते थेट पारगाव फाट्याला थांबून ढाब्या वर जेवण करून थेट १२:४५ ला घरी आलो.
http://barvekedar.blogspot.com/2018/12/blog-post.html
ओम नमः शिवाय !!!



No comments:
Post a Comment