Saturday, April 9, 2022

अंधारबन

 

गेलेला ? ठिकाणाचे नाव पण असे आहे कि एखाद्याला वाटेल आपल्याच मनाची नावे देतो आणि लिहितो.  :) पण खरचं नाव ऐकल्या पासून या ठिकाणी जायची खूप उत्सुकता होती, नेहमीप्रमाणेच अनेक ट्रेक चे नियोजन केल्या नंतर ठरलेले वार रद्द झाल्या नंतर दि. २१ आणि २२ डिसेंबर रोजी  अंधारबन चा Trek निश्चित करण्यात आला.

                         मी, चिराग मुळे आणि नीतीन तिडके असे तिघे जण  जायचे निश्चित झाले. सर्व साधारण नियोजन खालील प्रमाणे केले .

१ - ट्रेक ची  सुरवात पिंप्री या गावापासून करायची. (पिंप्री हे गाव मुळशी रस्त्यावर लोणावळा फाटा वरून आत      गेले कि येते, मूळ  रस्त्यापसून हे अंतर साधारण ८ ते १० km असावे

२ - ट्रेक संपवायचा एकोले या गावी, घनगड किल्ल्याच्या पायथ्याशी हे गाव आहे.

३ - आत्ता प्रश्न असा होता कि स्वताच्या वाहनाने तर जायचे पण trek एका ठिकाणी सुरु करून दुसऱ्या ठिकाणी संपवणार होतो. स्वताच्या वाहनाने जायचे कारण या आडगावात जाणाऱ्या गाड्या फक्त S.T त्याशिवाय सार्वजनिक वाहन व्यवस्था नाही.

४ - हा ट्रेक करून आलेल्यान कडून आणि S.T महामंडळा कडून बरीच माहिती गोळा  केली पण कुठलीच व्यवस्था आमच्या योजनेत बसणारी नव्हती म्हणून शेवटी असे ठरले कि तिघांनी आप आपल्या bikes घ्यायच्या. (खर तर २ गाड्या पुरेश्या होत्या परंतु अंतर तसे जास्त नव्हते आणि Trekking Sack घेऊन गाडीवर प्रवास करणे जरा कठीणच काम.)

५ - १ गाडी पिंप्री या गावी ठेवायची आणि २ गाड्या एकोले या गावी (जिथे ट्रेक संपणार होता ) ठेवायच्या आणि ट्रेक संपल्यावर २ गाड्यांवरून पुन्हा पिंप्री गाठायची आणि पुणे असा थोडासा विचित्र प्लान ठरला.

                     २१ तारखेला पहाटे ५:३० ला चांदणी चौकातील टोल नाक्या पाशी भेटायचे असे ठरले. २० ला दुपारची शिफ्ट करून रात्री ११:५० ला घरी आलॊ बरीचशी तयारी २० च्या सकाळीच केली असल्याने आल्या आल्या झोपून गेलो, सकाळी ४:१५ ला उठून पुन्हा एकदा सर्व साहित्य घेतले कि नाही याची खात्री केली आणि निघालो, आम्ही नेहमीचेच मित्र असल्याने सकाळी उठल्यापासून कोणीही कोणालाही फोन न करता ठरल्या वेळे प्रमाणे निघालो, मी चिरागच्या घरी गेलो, चिराग तयारच होता आम्ही निघणार तेवढ्यात चिराग म्हणाला बर्वे Gloves ? मी म्हणालो माझ्या कडे नाहीयेत चिराग ने लगेच घरून दुसरी जोडी आणली. पुणे शहरात बऱ्यापैकी वाटणारी थंडी टोल नाक्यापर्यंत बोचरी होऊ लागली, Sack मध्ये जास्त वजन वाढू नये म्हणून साधारण असे एक Jerkin घालून मी निघालो होतो, टोल नाका सोडला तेंव्हा साधारण ५:४० झाले असतील थंडीचे दिवस असल्या मुळे सूर्योदय पण उशिराच होणार होता, पिरंगुट चा घाट  सोडल्यावर तर हाडांना पण थंडी वाजायला लागली, वाटे मध्ये प्रचंड धुके पडले होते गाडीच्या प्रकाशात जेमतेम ५ ते ७ फुटांवरचे कसे बसे दिसत होते, बोटांची जाणीव तर पूर्ण पणे गेली होती, अखेरीस सूर्योदय झाला आणि चहा साठी आम्ही गाड्या एका टपरी जवळ थांबवल्या.

                      चहा बरोबर नाश्ता पण तयारच होताच, बऱ्याच दिवसांनी भेटत असल्यामुळे गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या त्यामुळे नेहमी पेक्षा जरा जास्तच वेळ गेला. गप्पा आटोपत्या घेतल्या आणि गाड्यांना कीक  मारून पुढे निघालो आत्ता उनं पडले होते शिवाय पोटात पण चहा आणि नाश्ता गेल्या मुळे थंडी थोडी कमी झाली होती त्याशिवाय मुळशी धरणाच्या कडे कडेने जाणारा रस्ता कोवळ्या उन्हात खूपच छान वाटत होता. आत्ता कुठेही न थांबता सरळ पिंप्री गाव गाठायचे ठरले त्या प्रमाणे निवे गावाच्या थोड पुढे गेल्यावर लोणावळा पहाता फाटा लागतो त्या दिशेने निघालो आणि सरळ पिंप्री गावात येउन थांबलो.
गावातल्याच एकांच्या घरी सर्व सामान ठेवले आणि तसच पुढे एकोले गावाच्या दिशेने गाड्या ठेवण्यास निघालो. तेंव्हा साधारण ८:४५ झाले असतील पिंप्री ते एकोले अंदाजे १५ ते १७ कि.मी अंतर असेल. परंतु रस्ता काही ठिकाणी खूपच  खराब होता. एकोले गाव जसे जवळ येऊ लागले तसा लोणावळा बाजूचा भाग दिसायला लागला आणि समोरच तैल बैल च्या भिंती दिसायला लागल्या,

                                                                 (फोटो - नितीन तिडके )

तैल बैल च्या या भिंतींचा फोटो सकाळी ९:३० च्या दरम्यान काढलेला आहे, आकाशात चंद्र,बाजूला धुके  केवळ अप्रतिम.  भरपूर फोटो काढून घेतले आणि उशीर झाला असल्या मुळे लगेच निघालो आणि एकोले गाव गाठले आता परत पिंप्री ला जायचे होते २ गाड्या एकोले गावी ठेवून एकागाडीवर ३ जण निघालो, आणि पिंप्री ला येउन पोचलो तिथे माझी गाडी ठेवली सर्व सामान घेतले गावातल्याच एकान कडून वाटेची माहिती करून घेतली त्यांना सोबत घेऊन घेऊन जायचे होते परंतु त्यांना शेतीची कामे असल्याने ते काही आले नाहीत, आम्ही दाखवलेल्या वाटेवरून  चालायला सुरवात केली.

      

  या ठिकाणा पासून  अंधारबनाची  वाट सुरू होते, हे जंगल अंधारबन म्हणून का ओळखले जाते याचा याचा अनुभव आता यायला लागला होता.

तस हे जंगल टप्प्या टप्प्या मध्ये पसरले आहें काही ठिकाणी खूप घनदाट झाडी तर काही ठिकाणी मोकळं किंवा विरळ झाडी.

साधारण १:३० तास चालल्या नंतर भूक खूप लागली होती आत्ता सोबत आणलेले डबे उघडणे गरजेचे होते. १२:४५ झाले असावेत या वेळेस  आम्ही खर हिर्डी या गावी असणे अपेक्षित होते परंतु अजून आम्ही अंधारबनातच होतो, परंतु आत्ता जास्त जंगल उरले नव्हते म्हणून मग जंगलातच जेवण करून पुढे जायचे ठरवले.

                जेवण पटकन उरकले कारण अजून पुढे किती चालायचे आहे काहीच माहित नव्हते बहुतेक गिर्यारोहक अंधारबना  पासून सुरु करून हिर्डी आणि तिथून भिरे या गावी जातात परंतु आमचा मार्ग थोडा वेगळा होता आम्ही हिर्डी पासून पुढे नागोठणे येथे जाऊन तिथून मिळेल त्या वाहनाने खड्साम्बले येथे जाऊन मुक्काम करून तिथून लेणी बघून नाणदांड मार्गे एकोले (घनगड पायथ्याचे गाव) असा मार्ग होता.

             आत्ता जेवण झाले होते अशी शांतता, गार हवा त्यामुळे तिथेच अजून थोडा आराम करून निघालो, आत्ता जंगल संपून मोकळे पठार लागले होते, आत्ता सावली संपली होती उन्हाचे चटके बसायला लागले होते, आपण चालतोय तीच वाट योग्य आहे असे समजून पुढे जात होतो, दोन्ही बाजूस दरी होती आणि अचानक उजव्या बाजूला दूरवर तैल बैल दिसायला लागले आणि आनंद पाळंदे यांच्या डोंगरयात्रा पुस्तकाचे मुखपृष्ठ आठवले त्यांनी पण तो फोटो इथूनच घेतला असेल का ? थोडा वेळ फोटो काढण्यात आणि बरोबर वाटेवर आहोत कि नाही या चर्चेत गेला.

थोड पुढे जातोय तोच गावातली घरे दिसायला लागली आणि हिर्डी गावात येउन पोचलो, तिथून एक वाटाड्या घेतला आणि त्याने आम्हाला नागोठणे च्या वाटेला लाऊन दिले अजून मोठा पल्ला गाठायचा होता, बरोबर वाटेवर लाऊन दिल्या नंतर सुद्धा वाटेत अनेक अश्या वाटा आल्या कि त्या विचार करायला लावणाऱ्या होत्या, वाटेत एक पण माणूस दिसेना अखेरीस एक पाडा आला जिथे २ , ४ घर होती, परंतु सर्व घर बंद होती.

त्या घरांच्या जवळ विश्रांती घेतली आणि निघालो तेवढ्यात लांब जंगला मधून एका माणसाचा आवाज ऐकू आला, आवाज तर येत होता पण माणूस काही आम्हाला दिसत नव्हता आम्ही पण त्याला हाका देऊन कुठे जायचे आहे ते सांगितले त्याने पण ओरडूनच सांगितले कि बरोबर वाटेवर आहात असेच जात राहा, वाट चुकलेलो नाही हे ऐकल्यावर बरे वाटले आणि चालायला लागलो आत्ता चालून चालून दमलो होतो साधारण ५ वाजले असतील पण नागोठणे गाव काही आले नव्हते, अखेरीस लांब एक घर दिसले आणि त्या दिशेने निघालो, घर पाशी आलो तिथल्या आजी बायीना विचारले हे नागोठणे का तर त्यांनी एका वेगळेच नाव सांगितले आणि म्हणाल्या नागोठणे अजून लई लांब आहे, आत्ता पाय बोलायला लागले होते तिथून पुढे तसेच निघालो वाटेत काही मुले खेळत होती त्यांना पण नागोठणे विचारल्यावर तीच माहिती मिळाली पण आत्ता डांबरी रस्ता समोर दिसत होता गाडी वगेरे मिळाली तर बर होईल कारण डांबरी रस्त्याने अजून २ तास चालायचे म्हणजे खूप कंटाळवाणे काम आहे, वाटेत एक आजोबा भेटले त्यांनी नागोठणे ला जायला एक रस्ता दाखवला जो जंगलातून जात होता, तिकडून लवकर जाल असा ते म्हणाले म्हणून आम्ही डांबरी रस्ता सोडून त्या रस्त्याने निघालो, आत्ता थोड्याच वेळात सूर्यास्त होऊन अंधार पडणार अशी परिस्थिती होती, समोरून एक आजी आजोबा चालत येत होते आजोबांनी विचारले कुठे चाललात ? त्यांना सगळे सांगितल्या वर ते म्हणाले ताडी मिळाली का ?
                                आजोबांचा हा प्रश्न म्हणजे आमच्या डोक्यावरून १५ फुटावरून गेला, आजोबा स्वतः ताडी लाऊन चालतायत हे लवकरच लक्षात आल. आजी म्हणाल्या सध्या इकडे चोऱ्या खूप होतायत जपून जा त्यांच हे वाक्य ऐकून जरा घाबरलो आणि निघालो थोड्या वेळाने एक बाई जोर जोरात शिव्या देत एकटीच येत होती, तिला कुठलच भान नव्हते आम्ही तिच्या शेजारून गेलो तरी ती तिच्याच नादात शिव्या देत गेली, सगळं विचित्र वाटत होत, त्याच वाटेवर थोड पुढे गेल्यावर वाट संपून नदी लागली नदी ओलांडून जायचा प्रयत्न केला पण ओलांडायला काही रस्ता दिसेना इथेच सूर्यास्त झाला. शेवटी ह्या वाटेने पुढे जायचे नाही असे ठरवले आणि परत निघालो आणि डांबरी रस्त्याने चालायला लागलो वाटेत काही कामगार लोक भेटले त्यांनी ह्याच रस्त्याने जायला सांगितले आता पूर्ण अंधार झाला होता पण अजून नागोठणे गाव काही आले नव्हते. चंद्र प्रकाश पुरेसा असल्याने  चालायला अडचण अशी काहीच येत नव्हती.
                                  अखेरीस भरपूर तंगड तोड केल्या वर नागोठणे गावी पोचलो आत्ता इथल्याच शाळेत मुक्काम करून उद्या सकाळी खडसामबळे गावी जायचे नक्की केले पण शाळा तर पोलिसांनी ताब्यात घेतली होती कारण तिथे निवडणूक होती, वाटेत काही गावकरी भेटले त्यांना विचारले दुसरी कडे कुठे राहायची सोय होऊ शकेल का ? कारण गावातील देऊळ पण कुलूप लाऊन बंद होते, गावातले लोक म्हणाले आम्ही तुमची खडसामबळे ला जायची व्यवस्था करतो आणि २ ३ जण गावात ज्याची गाडी होती त्यांना बोलवायला गेले. एकंदरीत गावकर्यांची काही इच्छा नव्हती कि आम्ही गावात मुक्काम करावा, पण त्यांनी आम्हाला चहा वगेरे दिला आणि त्यांना कौतुक पण होते आम्ही एवढ्या लांबून चालून आलो.
                                  नितीन कडे खडसामबळे गावातील पोलिस पाटील धानपुरे यांचा घर अस एक सन्धर्भ त्याच्या एका मित्रान काही अडचण आली तर वापरा म्हणून दिला होता, तो आम्ही वापरला, पोलिस पाटील धानपुरे हे त्यांचा हुद्दा, व्यवसाय आणि एक चांगला माणूस म्हणून सगळ्यांना माहित होते, अखेरीस नागोठणे गावातील लोकांनी आमच बोचकं गाडीत घालून खडसामबळे गावी पाटलांच्या घरी आणून पोचवले. अगदी एखाद्या चित्रपटात शोभेल असा प्रसंग मोठा वाडा, तिथे आधीपासून ४ ५ लोक त्यात आमची भर ………………………… पुढे नितीन ने सर्व सांगिले कि आम्हाला तुमचा संधर्भ कुठून मिळाला वगैरे वगैरे ………………. पाटीलांनी आमची व्यवस्था त्यांच्या शेतावरील बंगल्यात केली, आणि उद्या सकाळी एक माणूस लेणी दाखवायला आणि पुढच्या वाटेला लाऊन द्यायला देतो  असे सांगितले. आम्ही सगळे शेतावरील बंगल्यात तिकडे शेगडी, gas, सोफा अशी सर्व सोय असल्याने रात्रीचे जेवण मस्त झाले आणि सोफ्या वर आडवा झालो ……………।

GPS Result Day 1 - Pimpri to Khadsamble

Distance - 24.05Km

Total Time - 10:30 Hrs

GPS चा निकाल पाहिल्या नंतर, आमचा आमच्यावर विश्वास बसेना कि आपण एका दिवसात एवढे चाललो, पण शक्यता नाकारायला पण जागा नव्हती कारण साधारण सकाळी १०:१५ ला आम्ही चालायला सुरवात केली असेल आणि थांबलो तेंव्हा साधारण संध्याकाळचे ७:३० झाले असतील.


आत्ता दुसरा दिवस,

धानपुरे पाटलांचा निरोप घेतला आणि त्यांनी दिलेला वाटाड्या घेऊन निघालो वाटाड्या म्हणजे एक आजोबाच सोबत होते, त्यांनी आम्हाला सांगितले कि नाणदांड मार्गे जायला खूप वेळ लागेल आणि वाट पण नाही सापडणार त्यांनी आम्हाला दुसऱ्या घाट वाटेने केवनी च्या पठारावरून जायचा सल्ला दिला आणि आम्ही तो मानला, वाटाड्याच्या मागे आम्ही खडसामळे लेणी बघायला निघालो, वाट थोड्या चढाईची होती, सकाळी ९:३० च्या सुमारास आम्ही लेण्यान मध्ये असू

लेणी आणि परिसर बघून आम्ही दुसऱ्या वाटेने निघालो, वाटेत गवत वाढले होते, आत्ता कोकणातून देशावर जायचे म्हणजे मोठा चढ होताच त्या प्रमाणे वाट हळू हळू चढायला लागली माझा वेग कमी व्हायला लागला वाटाड्या, नितीन, चिराग एकमेकांना दिसतील या अंतरावर चालत होते पण मी खूपच मागे पडलो होतो, हाकाट्या करत होतो जेणे करून चुकणार नाही आणि थोड थांबा अशी पण विनंती करत होतो, अखेरीस सगळे जण थोड्या वेळ थांबले मी पण त्यांना येउन मिळालो आणि मग परत सगळे निघालो, आणि अचानक गवतातून सळ सळ आवाज झाला आणि मोठा साप …………तिडके साहेबाना पाहायला मिळाला.

                      वाटाड्याने आम्हाला वाटेला लावले, आम्ही पण तिथेच दुपारचे जेवण करून चढाई सुरु करायचे ठरले कारण आम्ही आता डोंगरच्या कुशीत आलो होतो आत्ता पूढे जले होते खडी चढण होती म्हणून पोटात इंधन टाकूनच सुरु करायचे ठरवले, भरपूर खाऊन पोट भरल्या नंतर विश्रांती घेतली आणि चालायला सुरवात केली गावत खूपच होते, पाऊल वाट सुधा नव्हती गवत तुडवत आम्ही पुढे सरकत होतो, आत्ता मात्र चांगली चढण सुरु झाली सुर्य डोक्यावर आला होता पाठीवरच ओझ ४ पावल टाकल्यानंतर जाणवत होत, पावल जर बस म्हणत होती पण मेंदू परवानगी देत नव्हता कारण अजून खूप जायच होत.

                               साधारण निम्म अंतर चढून आल्यावर आत्ता थांबण्या शिवाय पर्याय नव्हता मोठ सावली असलेल झाड बघितले आणि पाठीवरचे ओझे फेकून देऊन त्याचीच उशी करून आडवे पडलो, ३० मी नंतर आता निघूया अस म्हणायची इच्छा कोणाची होत नव्हती …पण पर्याय पण नव्हता, चढण अंगावर येत होती, पाऊल वाट मधेच दिसत होती परत गायब होत होती आम्ही आमच्या अंदाजा प्रमाणे चालत होतो आणि एका ठिकाणी वाट गायब झाली एकतर आम्ही तरी वाट चुकलो होतो किंवा हीच बरोबर वाट होती पण ती वाट असण्याची शक्यता कमी होती कारण पुढे कारवीचे दाट जंगल होते, आम्ही अगदी शेवटच्या ठिकाणी येउन अडकलो होतो, एकदम समोर कारवीचे जंगल डाव्या आणि उजव्या बाजूला उंच कातळ आणि खाली खोल दरी नितीन ने कारवीच्या जंगलात घुसायचा पण प्रयत्न केला पण जेवढा आत जाऊ तेवढे दाट होत जात होते, सगळ्यात खालच्या टप्प्यात मी होतो त्यामुळे चिराग मला म्हणाला बर्वे जर मागे जाऊन बघता का आपण कुठे चुकलो वाट कुठे दुसरी कडे गेलीये का ? माझ्या अंगात आधीच त्राण नव्हता त्यात परत मागे जायचे म्हणजे …… नितीन दुसऱ्या बाजूने वाट शोधत होता, त्यामुळे मी काही जागचा हललो नाही चिराग वैतागला कारण त्याला वरून खालच्या बाजूला एक वाटे सारखे दिसत होते जे आम्ही सोडले होते, त्यामुळे तो मला म्हणाला जर तिकडे जाऊन बघून ये पण मी तसाच ……आत्ता चिराग वैतागला आणिस्वतःच त्या दिशेने उतरायला लागला, पण माझा हि नाईलाज होता पण चिराग चा निर्णय योग्य होता कारण आम्ही एका ठिकाणी अडकलो होतो सूर्यास्त व्हायला आलेला, शेवटी वाट सापडली चिराग ला दिसलेली तीच वाट योग्य होती तेवढ्यात खालून एक गाववाले वर येत होते त्यांना राम राम केला आणि वाटेची खात्री करून त्यांच्या मागे निघालो, आणि शेवटी पूर्ण चढ संपला आम्ही कोकणातून देशावर आलो , केवणी च्या पठारावर आलो सूर्यास्त व्हायला २० ते २५ मी वेळ असेल काय सुंदर दृश्य होते, समोर तैलबैल आणि घनगड दिसत होते.

केवणी च्या पठारावरच त्या गाववाल्याचे घर होते त्यांचा अंगणात गेलो जर बसलो त्यांनी थंडगार पाणी दिले, खूपच मस्त जागा आहे. आमच्या गाड्या जिथे ठेवल्या होत्या तिथे जाण्यासाठी अजून बरीच तंगड तोड करायची होती, त्यांच्या घरून निघालो सूर्यास्त झाला होता पावल भरा भरा उचलायला सुरवात केली............................................

अखेरीस रात्री ८ वाजता एकोले गावात पोचलो तिथून गाड्या घेतल्या परत पिंप्री गाठले माझी गाडी घेतली आणि रात्री १०:४५ वाजता पुणे ……………………

GPS Result Day 2 - Khadasamble to Ekole

Distance - 17.52 Km

Total time - 09:27 Hrs

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...