भाग १
आजोबा ४००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१-भाग १
गिरीविराज हाईकर्स, डोंबिवलीच्या पहिल्या पिढीतील लढवय्यांची साहसकथा लिहिताना मला स्वतःला खूपच आनंद होत आहे. मी स्वतः या मोहिमेचा साक्षीदार नव्हतो, अर्थात १९९१ साली मी शाळेतले धडे गिरवीत होतो. जबरदस्त इच्छाशक्तीने भरलेली हि चित्तरकथा गेली २३ वर्षे काळाच्या पडद्याआड आठवणींच्या जळमटांखाली दडलेली होती. किरण अडफडकर काकांनी २१ दिवसांच्या मोहिमेदरम्यान घडलेल्या प्रत्येक क्षणाचे अगदी बारीक बारीक तपशील आपल्या दैनंदिनीमध्ये लिहून आपल्या आठवणींच्या कोपऱ्यात जपून ठेवले होते. भारतीय गिर्यारोहण विश्वातील पहिलीच सर्वाधिक उंचीची यशस्वी कृत्रिम प्रस्तरारोहण मोहीम असूनही याची कुठेही म्हणावी तशी वाच्यता झाली नाही. साधनांची कमतरता, मनुष्यबळाची वाणवा, कमकुवत आर्थिक बाजू असूनही केवळ आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीने मोहीम यशस्वी करणाऱ्या या सगळ्या शिलेदारांच कतृत्व काळाच्या पडद्याआड कायमच विस्मृतीच्या खोल गर्तेत विरून जाऊ नये म्हणून आम्हा नवीन पिढीकडून त्यांना हा मानाचा मुजरा!
मोहिमेतले शिलेदार:
किरण अडफडकर, सुभाष पांडियन, अनिल दगडे, अनिल इमारते, मिलिंद आपटे, नंदू
भोसले, आनंद नाकती, अशोक शिबे, पुंडलिक तळेकर, शेखर फाटक, नरेंद्र माळी,
कुट्टीदुरई पांडीयन, दत्ता शिंदे, महेंद्र साटम, शैलेश अमृते, बालाजी
अय्यर, दिनेश रुपारेल.
========================================================================================
http://www.misalpav.com/node/31022 - भाग २
http://www.misalpav.com/node/31023 - भाग ३
http://www.misalpav.com/node/31024 - भाग ४ अंतिम
खरतर या मोहिमेची सुरुवात फेब्रुवारी १९९० पासून झाली असेच म्हणावे लागेल. किरण व इतर सहकाऱ्यांनी रतनगडचा ट्रेक आखला होता. सोबत किरणच्या कंपनीतील सहकारी दिलीप आणि सुराडकर हे दोघेही प्रथमच येत होते. हा ट्रेक आखण्यामागे आमचा मुख्य हेतू म्हणजे रतनगड व सभोवतालचा परिसर नजरेखालून घालणे व त्यातूनच एखादी अवघड मोहीम हाती लागते का ‘ते’ पाहणे. रतनगडाच्या माथ्यावरून सभोवतालचा परिसर पाहून चक्क वेड लागायचीच वेळ येते. एकाहून एक सरस असे थरारक कडे, अगदी ताशीव (गुळगुळीत) स्वरुपात सुमारे २००० ते ३००० फुट खोल दरीत उतरलेले पाहून उरात धडकी न भरली तर नवल! तरीही धुक्यात पहुडलेला परिसर नीट दिसत नव्हता म्हणून बर. पहिल्या प्रथम किरणच लक्ष वेधून घेतलं ते कात्राबाईच्या कड्याने. सुमारे २५०० फुट उंचीचा कडा पाहून आम्हाला इथवर येण्याचं समाधान वाटलं. खर तर खूपच दुरून आम्ही त्याच दर्शन घेत होतो व त्यामुळे नक्की कल्पना येत नव्हती. पण काहीतरी (पूर्वीपेक्षा सरस) थरारक हाती गवसलं होत हे नक्की! तशाच धुकट वातावरणात संधी साधून दोन फोटो काढले. नंतर फोटो पाहिल्यानंतर सदर कड्यावर आरोहण करण्याची मोहीम जवळ जवळ नक्की करण्यात आली व त्या दृष्टीने पुढील तयारी सुरूही झाली.
लगेचच पावसाळ्यात १५ ऑगस्ट १९९० ला डोंबिवलीहून गिरीविराजची टीम रेखी करण्यासाठी रवाना झाली. या वेळी खालून म्हणजे कोकणातून (आसनगाव-शहापूर-डोळखांब-डेहणे-आजोबा-कात्राबाई) कात्राबाईच्या पायथ्याशी पोहोचण्याच ठरलं होत. डेहणे गावाच्या पुढे असलेल्या चिंचपाडा गावातून एक स्थानिक वाटाड्या घेतला आणि कात्राबाईच्या घळीच्या रोखाने निघालो. कात्राबाई आणि रतनगडची मागील बाजू जिथे एकमेकांना मिळतात त्याच घळीतून काळू नदी ओढ्याच्या रुपात बाहेर पडते व पुढे-पुढे तिचे पात्र आणखी रुंदावत जाते. (तसाच एक ओढा शेजारच्या टेकडीच्या मागील बाजूने (बाण/सांधण च्या दिशेने) येऊन डेहणे गावाजवळ एकत्र भेटतात आणि काळू नदीच्या नावाने पुढे प्रवास करतात) पावसाळ्यात चिंचपाडा-डेहणे परिसर संपूर्णपणे पाण्याखाली असतो. पाऊस धो-धो कोसळत होता, सभोवताली दाट धुके पसरल्याने सकाळचे सात कि रात्रीचे सात हेच कळत नव्हत. धुवांधार पावसाने आमची रेखी पार कोलमडून टाकली. वर्षभराच्या दुराव्यानंतर काळू नदीला आता आपल्या प्रियकराच्या अर्थात सागराच्या बाहुपाशात विरघळून जाण्याची घाई झालेली असल्याने तिने आमचे मनसुबे हाणून पाडले. कात्राबाईच्या घळीत निघालेलो आम्ही, दुथडी भरून वाहणारे ओढे, त्यांच्या प्रवाहातून मनाविरुद्ध वाहून जाणारे भलेमोठे दगडधोंडे,वरून मध्येच केंव्हाही गडगडाट करीत कोसळणाऱ्या दरडी व दाट धुक्यामुळे सोबत वाटाड्या असूनही आम्हाला परत फिरावं लागलं. आता पावसाळा थांबेपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्यायच नव्हता.
दरम्यान डिसेंबर-१९९० व मार्च-१९९१ यामधील काळात आम्ही दोन प्रस्तरारोहणाच्या मोहिमा संपवल्या होत्या. शेवटी २९ मार्च, १९९१ ला अशोक शिबेच्या जीपने पुन्हा एकदा डेहणे गाव गाठले. मार्च महिना संपत आलेला होता आणि वैशाखातल्या रणरणत्या उन्हाची चाहुल लागली होती. काळू नदीचा शृंगारही संपलेला असल्याने तिचे पात्र कोरडे पडले होते. नदीच्या शुष्क झालेल्या पात्राचे ओरखडे शेजारच्या डोंगरधारेवर पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा करीत असलेल्या निष्पर्ण झाडांवर उमटलेले दिसत होते.
चिंचपाडा-डेहणे गाव आजा पर्वताच्या पायथ्याशी तर आजासारख्या पुराणपुरुषाच्या शेजारी 'करांडा' आपला गोतावळा घेऊन बसलाय. करांड्याच्या सर्वोच्च माथ्यावरून एक धार खाली काळू नदीच्या पात्रात उतरते. स्थानिक लोक तिला 'चिंधीची धार' म्हणतात. हि 'चिंधीची धार' पार केली की आलीच आपली लाडकी कात्राबाई. हा संपूर्ण प्रवास काळू नदीत पडलेल्या दगडधोंड्यांनी भरलेल्या पात्रातूनच आहे. कात्राबाईची पाहणी करीत असताना एक दिसून आले कि आपण जसा कडा शोधतोय तसा हा नाही. फार तर आठ दिवसात मोहीम संपलीच असती. कारण आम्ही कात्राबाईवरून खाली उतरणारी जी धार आहे तिच्या अगदी समोर होतो. अर्ध्यापेक्षा जास्त भाग हा कारवी आणि मातीच्या घसाऱ्याने भरलेला असल्याने, या धारेवरून चढाई करणे आम्हाला आव्हानात्मक वाटले नाही. (काही वर्षांनंतर पुण्याच्या एका संस्थेने याच धारेवरून चढाई करून कात्राबाई सर केल्याचा दावा केला. कात्राबाईचं खर आव्हान या धारेच्या बाजूला असलेली सरळसोट कातळभिंत, जी आम्हाला धुक्यामुळे दिसली नव्हती) या धारेच्या अगदी विरुद्ध बाजूस हाकेच्या अंतरावर आहे रतनगडाची मागील बाजू. पण आम्ही यापेक्षाही चढाई करण्यास अवघड अशा कड्याच्या शोधात होतो, त्यामुळे कात्राबाईच्या कड्यावर काट मारण्यात आली.
हीच ती कात्राबाईची धार:-
| From Aajoba 1991 |
प्रत्येकवेळी पहिल्यापेक्षा अवघड असाध्य मोहीम आखून तो साध्य करण्याचे जे व्यसन लागले होते त्यामुळे साहजिकच कात्राबाईचा कडा आम्ही बाद ठरविला. आता पुढे काय?
कात्राबाईच्या रेखीसाठी आम्ही डेहणेच्या पुढील चिंचपाडा गावात आमची जीप ठेवली त्याचवेळी गावातच समजले कि मुंबईची काही गिर्यारोहक मंडळी आजोबावर चढाई करण्यास आली आहेत. कात्राबाईला जाणारी वाट पूर्णपणे आजोबाच्या संपूर्ण कड्याला वळसा घालूनच पुढे सरकते त्यामुळे साहजिकच सीतेच्या पाळण्यापासून गुहेरीचे दार नावाने ओळख असलेल्या खिंडीपर्यंत पसरलेल्या आजोबाच्या कड्याचे संपूर्ण दर्शन आम्ही घेतले होते. (त्या खिंडीचे नाव त्यावेळेस आम्हाला माहित नव्हते).
आजोबाने खरोखरच एखाद्या पुराणपुरुषाप्रमाणे आपल्या मुलाबाळांवर लक्ष ठेवण्यासाठी मध्यवर्ती स्थान पटकावलय. याच्या नजरेच्या टप्प्यात काय नाही. पश्चिमेला माहुलीची डोंगररांग, थोडे पूर्वेकडे सरकल्यास दक्षिणेस गोरख-मच्छिंद्र, सिद्धगड हि त्रिमुर्ती, त्यांच्या अलीकडे दुर्ग, ढाकोबा, नाणेघाट आणि जीवधन. तसेच आणखी पूर्वेकडे सरकल्यास माळशेज डोंगररांग, हरिश्चंद्रगड, कलाडगड, नकटा (नाप्ता) आणि परिसर, इथून थोडे उत्तरेकडे सरकल्यास आजोबाच्या पूर्वेला त्याचे सखे सोबती करांडा आणि कात्राबाई, रतनगड, मुडा, घनचक्कर. रतनगडाची शेजारीण सांधण दरी आणि तिच्या पलीकडे अलंग, मदन, कुरंग आणि कळसुबाईची डोंगररांग.
![]() |
| From Aajoba 1991 |
या पर्वताची डेह्णे-चिंचपाडा गावाकडील बाजू एका सरळ रेषेत थेट कोकणात उतरत नाही तर अक्षरशः कोसळते. या आजा पर्वताच्या पायथ्याशी एक टेकडी आहे, टेकडीच्या माथ्यावर वाल्मिकी आश्रमाचा पसारा मांडलेला आहे आणि पायथ्याशी आहे डेहणे-चिंचपाडा गाव. या टेकडीच्या माथ्यापासून सुरु होतो आजोबाचा उत्तुंग कडा. मुंबईची गिर्यारोहक मंडळी कड्यावर दिसतायत का हे पाहण्यासाठी सोबतच्या दुर्बिणीने रॉकपॅच जेव्हढा पाहता येईल तेव्हढा नजरेखालून घातलेला होता. किरणने दुर्बिणीच्या नजरेतून सारा कडा पालथा घातला, कड्याच्या अवघड मार्गावरून पुन्हा पुन्हा नजर फिरवली पण कुणीही नजरेस पडेना. कात्राबाईचा कडा बाद ठरवून फिरताना मुद्दाम आजोबा डोंगराच्या कड्याची संपूर्ण रेखी केली व त्यातूनच एक अवघड मार्ग गिरीविराजच्या मोहिमेसाठी किरणने मनातल्या मनात निवडला. दुपारी चिंचपाडा गावात परत फिरलो व जीप घेऊन वाल्मिकी आश्रमाच्या वाटेला लागलो. कड्याचं आता खूप जवळून दर्शन होत होत, पण कड्यावर गिर्यारोहक मंडळी काही दिसेनात, तसेच पाहत-पाहत वाल्मिकी आश्रमात पोहोचलो. तिथे आश्रमाजवळच स्लीपर हायकर्स व ईगल मोंटेनिअर्स यांचे दोन बॅनर्स लावलेले आढळले. म्हणजेच दोन्ही संस्थांनी मिळून हि मोहीम हाती घेतली होती. काही ओळखीचे चेहरे वाटले पण त्यातील बहुतेक मंडळीनी किरणला ओळखले आणि त्यांच्यात कुजबुज सुरु झाली. त्यांच्या कॅंपवर प्रवेश केला, शिळोप्याच्या गप्पा झाल्यावर त्यातीलच एकाने किरणला त्यांनी निवडलेला चढाईचा मार्ग दाखवण्यास सुरुवात केली. त्यांनी निवडलेला मार्ग पाहून किरणला हायसे वाटले, कारण त्यांनी निवडलेला मार्ग किरणने ठरवलेल्या मार्गापेक्षा पूर्णतः भिन्न होता व कड्याची मध्यवर्ती उंची सोडून सीतेच्या पाळण्याच्या वरच्या बाजूला होता. म्हणजे आजोबाच्या उत्तुंग भिंतीची मध्यवर्ती चढाई अद्यापही अभेद्य होती. किरणने नियोजित केलेला मार्ग आणि या लोकांनी हाती घेतलेला मार्ग या दोहोंमध्ये अक्षरशः जमीन अस्मानाचा फरक होता. त्यांनी निवडलेल्या मार्गाची उंची जास्तीत जास्त ५००-६०० फुट असेल. पण किरणने निवडलेला मार्ग हा आजोबाच्या अगदी मध्य भागातून जात होता आणि उंची ३००० फुटांच्या वर होती.
त्याचवेळी किरणने गिरिविराजचा मार्ग तेथेच बसून नक्की केला. परत जाताना वाटेत सुभाष, नरेंद्र इत्यादींशी चर्चा करून थोडं खाली उतरल्यावर पुन्हा एकवार आम्ही दुर्बिणीच्या साहाय्याने गिरिविराजच्या मोहिमेसाठी संपूर्ण मार्ग नजरेखालून घातला व त्यानुसार जीपमध्येच आखणी करायला सुरुवात केली.
फोटो सौजन्य: यो रॉक्स
![]() |
| From Aajoba 1991 |
![]() |
| From Aajoba 1991 |
मार्गाचे रेखांकन
![]() |
| From Aajoba 1991 |
![]() |
| From Aajoba 1991 |
साधारपणे २० दिवस ह्या अवघड चढाईसाठी लागणार होते.
सतत १०/१२ सपोर्टिंग टीम मेंबर्स, ५/६ बेसकॅम्प मेंबर्स व ६/७ लीड
क्लाइम्बर्स असा सुमारे २५ माणसांचा ताफा लागणार होता. घरी पोहोचल्यावर
त्यानुसार सर्व बजेट बनवायला घेतले. कारण या मोहिमेसाठी आर्थिक मदत पुष्कळ
लागणार होती व त्याची तयारी आत्तापासूनच करावी लागणार होती. आमचे बजेट असे
होते.
अंदाजे कींमत
१. प्रसरणशील खिळे (३०० नग) Expansion bolt - रू. १०,०००/-
२. १००० फुट दोर रु. १२,५००/-
३. रेशनिंग, मेडिकल, वाहतूक व्यवस्था रु. १०,०००/-
४. फोटो व स्लाईड रु. ४,०००/-
५. कॅमेरा आणि उच्च क्षमतेची झूम लेन्स रु. १५,०००/-
६. व्हिडीओ शुटींग रु. ३०,०००/-
छायाचित्रण व व्हिडीओ शुटींगवर खर्च करण्याचे कारण म्हणजे हि मोहीम भारतीय गिर्यारोहणक्षेत्रातील सर्वात मोठी व अवघड मोहीम ठरणार होती त्यामुळे तो खर्च अत्यावशक होता.
तत्कालीन पद्धतीप्रमाणे गिर्यारोहण क्षेत्रात कोणत्याही मोहिमेचा दर्जा हा ती यशस्वी करताना चढाईसाठी घेतलेला मार्ग, म्हणजेच क्लाइम्बिंग रूट हा महत्वाचा असतो . त्यानुसार आतापर्यंत मुंबईकर गिर्यारोहण संस्थांनी साध्य केलेल्या अवघड मोहिमांपैकी पहिले स्थान द्यावे लागते कोकणकड्याच्या मध्यवर्ती चढाईला. सुमारे १४०० फुट उंचीचा हा कडा सर करताना त्याला सुमारे ४२ दिवस लागले व एकूण १४० एक्सपानशन बोल्ट वापरावे लागले होते. मुलुंडच्या समिट हायकर्स व पुण्याच्या 'पुणे वेण्चर्स (टेल्को ग्रुप)' ने मिळून मिलिंद पाठकच्या नेतृत्वाखाली सन १९८८ ऑक्टोबर मध्ये हि मोहीम यशस्वी केली होती.
सर्व प्रथम १९८३ साली ठाण्याच्या गिरीविहार या संस्थेने कृत्रिम प्रस्तरारोहण सुरु केले. चारुहास जोशी यांच्या नेतृत्वाखाली १०० एक्सपानशन बोल्ट वापरून त्यांनी ४०० फुटी जीवधनच्या वानरलिंगी सुळक्यावर प्रथम चढाई केली. त्यानंतर हॉलिडे हायकर्स, केव्ह एक्स्प्लोरर्स, नेचर लवर्स, पुण्याच्या काही संस्थांनी थोड्याफार मोहिमा यशस्वी केल्या. पण ह्या सर्व चढाया करताना कोणत्याही एकाच संस्थेने यांत सातत्य मात्र दाखवलं नाही.
या काळात 'गिरीविराज हायकर्स' म्हणजे आम्ही दोराशिवाय गिर्यारोहण मोहिमांचा सपाटा लावला होता. १९८३ ते १९८६ पर्यंत एकूण २८ मोहिमा दोराशिवायच यशस्वी केल्या त्या देखील कमीत कमी वेळात. पण १९८७ पासून आम्ही देखील एकाहून एक अवघड मोहिम आखून १८ मोहिमा यशस्वी केल्या. न करून सांगणार कोणाला, खिशात दमडीसुद्धा नाही. त्यात सर्वच साहित्य देशाबाहेरून मागवावे लागायचे. पण याचा फायदा हाच कि दोर सोडून इतर साहित्य स्वतःच बनवण्याचे कौशल्य प्राप्त केले. त्यात दोराशिवायच चढाईचा धाडसी प्रकार अंगी बाणवल्यामुळे मोठमोठ्या मोहिमांचे दडपण नाहीसे झाले होते.
ढाक भैरीच्या सुळक्यावर दोराशिवाय चढाई- किरण अडफडकर आणि सारंग अडफडकर
| From Aajoba 1991 |
त्याची खरी पावती मिळाली ती 'हिमालयन क्लब'' च्या ''सह्याद्री बुलेटीन'' या पुस्तकाच्या रूपाने. त्यांनी मेजर रॉक क्लाइम्बिंग इन सह्याद्री १९८५-१९९० या सदरात गिरीविराज हायकर्सचे तब्बल १४ मार्ग देऊन प्रस्तरारोहणातील आमचे सातत्य मान्य केले होते. (संदर्भ: ‘द सह्याद्री बुलेटीन- जुने १९९० नं. २’). त्या नंतर जानेवारी १९९२ च्या आवृत्तीत सुद्धा दोन रूट छापून आले. त्याच वेळी सदर पुस्तकात स्लीपर हायकर्स व ईगल मोंटेनिअर्स या संस्थांच्या आजोबा कड्याच्या क्लाइम्बिंग रूटची माहिती छापून आली होती.
एकूण ३२ एक्सपानशन बोल्ट व ९ पिटॉन वापरून त्यांनी ५५० मीटरचा (म्हणजेच १७८० फुट उंचीचा) कडा २८ मार्च ते ०१ एप्रिल १९९१ मध्ये सर केला होता (फक्त पाच दिवस?). त्यापैकी स्लीपर हायकर्सची हि पहिलीच कृत्रिम प्रस्तरारोहण मोहीम, तर ईगल मोंटेनिअर्सच्या खात्यातील हि सर्वात जास्त बोल्ट असलेली मोहीम. सुमारे २००० फुट उंचीचा कडा सर करताना फक्त ३२ बोल्ट वापरले म्हणजे खरंतर त्यांनी मुख्य मध्यवर्ती चढाईस हात न घालता वेगळाच मार्ग निवडला होता (अर्थात धबधब्याचा). त्यातही शेवटचा १००० फुटांचा तिरकस रेषेतील मार्ग होता त्या मार्गावर कोणीही सामान्य ट्रेकर्स आरामात चालत गेला असता आणि जेंव्हा सिध्द करून दाखवण्याच आव्हान देण्यात आलं तेंव्हा गिर्यारोहण महासंघाच्या भर मिटिंगमधून पळ काढण्यात आला. असो!
गिरीविराजच्या बाबतीत सांगायचं झाल्यास आम्ही प्रस्तरारोहण किंवा गिर्यारोहणाचं कोणतही शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेतलेलं नाही. पण स्वबळावर एकलव्यासारख खपून आम्ही आज गिर्यारोहणात एव्हढी प्रगती साधली आहे. तसेच आमची एकच संस्था अशी आहे कि ज्यांनी प्रस्तारारोहणास लागणारी सर्व साधने स्वतःच खपून मेहनीतीने तयार केली होती. तसेच कितीही मोठी अवघड मोहीम आम्ही कोणत्याही इतर संस्थेची मदत न घेता व तीही सलगपणे यशस्वी करू शकतो आणि तीही कमीत कमी वेळात. याची साक्ष देतील पांडवकडा, नागफणी अर्थात डयुक्स नोजची पाठीमागील भिंत, ढाक भैरीची भिंत, पालीचा सरसगड, मुंब्रा देवी, इत्यादी मोहिमा.
आमच्या दृष्टीने आम्ही काढलेल्या खर्चाच्या डोंगराकडे पाहता इतकी मोठी रक्कम जमा होणे थोडे कठीणच होते. तरी पण व्हिडीओ शुटींगला काट देणे व छायाचित्रणामध्ये कपात करून साधारण ३० हजार रुपयापर्यंत तरी खर्च अत्यावशक होता. पैसे जमवण्यासाठी प्रत्येक सभासदाकडे डोनेशन बुक दिले गेले व प्रत्येकाने जास्तीत जास्त कितीही पण कमीत कमी १००/- रुपये तरी जमवलेच पाहिजे हे बंधन घातलं. त्या दृष्टीने सर्वचजण प्रयत्नाला लागले, त्यातच अनिल दगडेच्या प्रयत्नांनी त्याचा मित्र जगताप याने प्रवीण खामकर, दूरकुंडे व अपराध साहेबांच्या मदतीने श्री. एकनाथ बांदल यांची भेट घडवली व बांदल साहेबांनी थेट महाराष्ट्राचे तत्कालीन क्रीडामंत्री श्री. शामराव अष्टेकर यांचेपाशीच आम्हाला सर्व लवाजम्यानिशी नेले. अष्टेकर साहेब आमच्या गिर्यारोहाणातील कामगिरीवर खूपच खुष झाले व त्यांच्यामुळे आम्हाला महाराष्ट्र शासनाकडून आजोबा मोहिमेसाठी एकूण रू. १५,०००/- अनुदान त्वरित मंजूर झाले. त्यामुळे आम्ही आर्थिकबाबतीत थोडे निशंक झालो. कारण आता पैशाअभावी आमची मोहीम रद्द होणार नव्हती.
![]() |
| From Aajoba 1991 |
या चढाईसाठी वापरण्यात आलेलं सर्व साहित्य आम्ही स्वतःच बनवलं होत. तो काळच असा होता कि सहजासहजी साहित्य बाजारात उपलब्ध नव्हत, काहीवेळेस ते थेट नेपाळवरून आणावे लागत होते अथवा महागडी आयात करावी लागत होती. साहित्याच्या अभावामुळे एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे आम्ही सह्याद्रीतील तब्बल २८ सुळके दोराशिवायाच सर केले होते. पण मोठी मोहीम हाती घ्यायची तर साहित्य आवश्यक होत. पैसा गाठीशी नव्हता, मग काय? आम्ही खेळाशी प्रामाणिक होतो आणि काहीही करून या खेळात मोठी उंची गाठायची दुर्दम्य इच्छा होती. त्यातच सुभाष लेथ मशीनवर लोखंडाच काम करायचा आणि किरणही कारखान्यात कामाला असल्याने दोघांनाही मशीन हाताळण्याची सवय होती. मग काय लागले कामाला. एक एक करीत दोर सोडून सर्व साहित्यच बनवून टाकल.
त्याचवेळी इतरही बाबींकडे लक्ष पुरविणे आवश्यक होते. आम्ही सर्व कामे प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे वाटून दिलीच होती व प्रत्येकजण स्वतःच्या कुवतीनुसार कामालाही लागला होता. किरणने त्याच्या अंधेरीतील एका पार्टीला भेटून त्याच्याकडून सुमारे १००० एक्सपानशन बोल्ट देणगीच्या रूपाने मिळवले. आता निदान बोल्ट साठी ३/४ वर्षे धावपळ करण्याची आवश्यकता नव्हती. फक्त बोल्टसाठी रींग बनविण्याच काम पुंडलिक तळेकरवर सोपवले. प्रथम आम्ही रिंग बेंड करण्यासाठी एक डाय बनवली आणि नंतर बाजारातून योग्य मापाची सळई घेऊन त्याच्या ३०० रींगा बनवल्या. त्याच्यावर प्लेटिंग करून त्या गंजरोधक बनविल्या.
प्रसरणशील खिळे- Expansion bolt
![]() |
| From Aajoba 1991 |
बोल्ट पाठोपाठ किरण आणि सुभाषने स्वतःच २ कामचलाऊ ‘झुमार’ तयार करून घेतले. त्यासाठी किरणने प्रथम आकारानुसार ड्राईंग बनवले व नंतर लोखंडी जाड पत्रा घेऊन तो वळवून जुमारची प्लेट बनवली व त्यात योग्य ते पार्ट बसवून झुमार तयार केले. मोठमोठ्या मोहिमेसाठी हे जवळ असणे आवश्यक असतात. कमीत कमी वेळात जास्त उंची गाठण्यासाठी यांचा उपयोग होतो. पण तत्कालीन परिस्थितीत तो खूप महाग असल्याने आम्हाला तो विकत घेण शक्यच नव्हत.
(झुमार (Ascender)
![]() |
| From Aajoba 1991 |
(झुमार (Ascender) - दोराच्या साहाय्याने फक्त वर जाण्यासाठी याचा उपयोग होतो. लीड क्लाइम्बर रोप Anchor केल्यावर अर्थात बांधल्यावर सेकंडमॅनला वर येण्याचा इशारा करतो. तिथे पोहोचण्यासाठी सेकंडमॅन, सैनिक जशी कमांडो पद्धत (रोप मोकळ्या हातात धरून) वापरतात तशी इथे वापरू शकत नाही. कारण उंची, सुरक्षितता आणि मानवी शरीराची मर्यादा. अशा वेळेस झुमार हे उपकरण वापरतात. या झुमारच्या उघडणाऱ्या तोंडामध्ये खालील बाजूस वाकलेल्या बारीक दातांची शृंखला असते. रोप या उघडणाऱ्या तोंडामधून पास केला जातो. झुमार रोपच्या तुकड्याने हार्नेसला बांधण्यात येतो. जेंव्हा आपण संपूर्ण वजन त्या झुमारवर देतो त्यावेळेस त्याचे वाकलेले दात रोप मध्ये घुसतात आणि तुम्ही त्याचठिकाणी लॉक होऊन जाता. आता तुम्हाला आणखी वर जायचे असते. त्यासाठी आणखी एक झुमार कंबरेशी बांधलेल्या झुमारच्या खाली रोपवर अडकवतात. तुम्हाला वर जाण्यासाठी तुमच्या कंबरेला बांधलेल्या झुमारवरचे तुमचे वजन खाली असलेल्या झुमारला अडकवलेल्या छोट्याश्या शिडीवर स्थानांतरीत करून उभे राहावे लागते. वरच्या झुमारवरील वजन गेल्यामुळे तो झुमार हलकेच वर सरकवला जातो. असेच वजन स्थानांतरीत करून आपण रोपच्या साहाय्याने इच्छित स्थळी पोहोचतो.)
कॅराबीनर
![]() |
| From Aajoba 1991 |
कॅराबीनर हे कुठेही अडकवता येणारे एक बहुउपयोगी साहित्य आहे. वरच्या फोटोत कंपनी मेड कॅराबीनर मध्ये एक open gate दिसत आहे. ते gate बंद करण्यासाठी तो स्क्रू फिरवावा लागतो. पण एव्हढ बारीक काम करण आमच्या आवाक्याबाहेरच होत. मग एक युक्ती सुचली. डावीकडच्या गिरीविराज मेड कॅराबीनर मध्ये तुम्हाला एक छोटी रिंग दिसत असेल. तीच रिंग आम्ही gate बंद करण्यास वापरली. हि रिंग कोणत्याही दिशेस पडली तरी gate open होत नाही. या कॅराबीनरसाठी आम्ही EN-8 या प्रकारचे लोखंड वापरले आणि जेंव्हा प्रयोगशाळेत याची तपासणी केली तेंव्हा ते १३०० किलो वजनभार दिल्यावर फक्त वाकले, तुटले मात्र नाही. (२००६ मध्ये जेंव्हा आम्ही कोकणकडा सर केला तेंव्हा सुद्धा कंपनी मेड स्क्रू कॅराबीनर आमच्याकडे नसल्याने आम्ही हार्नेसला हेच लोखंडी कॅराबीनर वापरले होते, ज्याची कोणी कधी साधी कल्पना सुद्धा करू शकणार नाही आणि आम्हाला वेड्यातच काढतात.)
पिटॉन/पेग - कपारींमध्ये ठोकून त्यात कॅराबीनर अडकवतात आणि रोप पास करून स्वतःस सुरक्षित करण्यात येते.
![]() |
| From Aajoba 1991 |
चोकनट-छोट्याछोट्या छिद्रांमध्ये अडकवून त्यात कॅराबीनर अडकवतात आणि रोप पास करून स्वतःस 'तात्पुरते' अर्थात कामचलाऊ सुरक्षित करण्यात येते.
![]() |
| From Aajoba 1991 |
हार्नेस अर्थात कमरपट्टा - किरणकाकांनी आपल्या नेहमीच्या शिलाई मशीन वर शिवलेला
![]() |
| From Aajoba 1991 |
तंबू - किरणकाकांनी आपल्या नेहमीच्या शिलाई मशीन वर शिवलेला
![]() |
| From Aajoba 1991 |
पुली - Pulley
| From Aajoba 1991 |
डीसेंडर (Descender) - एखादा कडा नुसत्या हातापायांच्या साहाय्याने आपण उतरू शकलो नाही तर टेक्निकल इक्विपमेण्ट्स वापरून तो उतरणं शक्य असतं. कड्याच्या टोकावर जाऊन थेट खाली उतरणं यालाच डिसेंडिंग म्हणजेच रॅपलिंग म्हणतात. बिले देण्यासाठीसुद्धा याचा उपयोग होतो.
डीसेंडर (Descender)-यातील २ नंबरचा आम्ही बनवलेला आहे ज्याचा य्प्योग आम्ही आजही करतो.
| From Aajoba 1991 |
बिले डिव्हाइस- स्वतःच डोक लाऊन बनवलेलं
| From Aajoba 1991 |
(Belay - लीड क्लाईम्बर स्वतःबरोबर दोन दोर घेऊन जातो. एक Supply दोर असतो ज्याच्या साहाय्याने आवश्यक साधनसामुग्री त्याच्यापर्यंत पोहोचवली जाते. दुसरा मुख्य दोर त्याच्या कंबरेला बांधलेला असतो, हा दोर त्याचा जीवनरक्षक असतो ज्याच नियंत्रण सेकंडमॅनकडे असते. फोटोत दाखवल्याप्रमाणे सेकंडमॅन दोर हळूहळू सोडत राहतो, या दोराचे घर्षण त्या belay device वर होते, त्यामुळे दोर नियंत्रितपणे सोडता येतो. एखादे वेळेस लीड क्लाईम्बर तोल जाऊन खाली पडला तर सेकंडमॅन, दोर त्या belay device भोवती आवळून धरतो. जेणेकरून लीड क्लाईम्बरचे पडणे नियंत्रित होते. दोर तुम्ही जर थेट हातात पकडला तर तुम्हाला ते शक्य होणार नाही. कारण होणाऱ्या आघाताने दोर तुमच्या हातातून सुटणार आणि घर्षणामुळे तुमचा हात भाजून निघणार. यासाठी सेकंड मॅनलाही स्वतःस anchor करून ठेवावे लागते.)
Belay Technique
![]() |
| From Aajoba 1991 |
पुढे:
एक ५०० फुटी दोर विकत घेण्यात आला ते काम दत्ता शिंदेने केले. त्या शिवाय
१००० फुटी दोर नुकताच गेल्या मोसमात आम्ही खरेदी केला होताच सामान वाहून
नेण्यास सॅक अत्यावश्यक होत्या. त्यासाठी अॅसल्युमिनिअमचे पाईप घेऊन ते
वाकवून त्याच्या फ्रेम बनवायचे काम विजय सावंतला देण्यात आले. त्याने एकूण
११ फ्रेम तयार करून दिल्या. फ्रेमही खूप उशिरा मिळाल्याने अगदी जाण्याच्या
दिवसापर्यंत कुट्टी, विजय, पुंडलिक आणि सुभाष त्या पूर्ण करण्याच्या मागे
लागले होते. शेवट पर्यंत सॅक तयार झाल्याच नाहीत, त्यामुळे अक्षरशः
गोण्यांमध्ये सामान भरण्यात आले. आज आपण सॅकशिवाय साधा तासाभराच्या ट्रेकचा
सुद्धा विचार करू शकत नाहीत. त्यात आम्ही धान्याच्या गोण्या वापरल्या
होत्या.
दरम्यान किरणने ४/५ रात्री खपून ७-८ माणसे मावतील एव्हढा एक तंबू स्वतः शिवला. त्याचेही थोडेफार काम शिल्लक होते, ते थेट आजोबाला पोहोचल्यावर करण्याचे ठरले. याशिवाय लाकडे फोडण्यासाठी कुऱ्हाड, टिकाव, कोयता, सुरे व वेळप्रसंगी आत्मसरंक्षणासाठीची सामग्री घेतली. त्याकाळी आजोबाच्या सभोवताली असलेल्या रानात जंगली श्वापदांचा मुक्त संचार असल्याने याची गरज होती.
आम्हीच तयार केलेल्या कॅराबीनर्सची साफसफाईचे काम करण्यात आले, नवीन पिटॉन, चोकनट बनविण्यात आले.
आठ दिवसआधी खाद्यपदार्थांची खरेदी सुरु करण्यात आली. महेंद्र, दत्ता, नंदू,
शैलेश वगेरे मंडळी या कामी जुंपली. क्लाइम्बिंग टीमसाठी लागणारे खास
अन्नपदार्थ ''फास्टफूड'' (सुका मेवा) महेंद्रने भायखळा येथे जाऊन खरेदी
केले. शिवाय डाळी, तांदूळ, गव्हाचे पीठ, साखर, गुळ, चहा, दुध पावडर,
मसाल्याचे पदार्थ, औषधे इत्यदि खरेदी करून झाले.
या मोहिमेस आम्ही एकूण खर्च काढला होता रु. ८१,५००/- . पण आम्ही जास्तीत जास्त २५,०००/- रुपयेच जमवू शकलो होतो. त्यामुळे नवीन कॅमेरा घेणे, व्हिडीओ शुटींग करणे व इतर अवास्तव खर्च यांना काट देणे भाग पडले. अतिशय काटकसर करून जेमतेम कशीबशी आमची मोहीम आम्ही पूर्ण करू शकत होतो. खर तर या मोहिमेच व्हिडीओ शुटींग होणे अत्यंत आवश्यक होत, पण म्हणतात ना, सारी सोंग आणता येतात पण पैशाचं नाही.
क्रमशः
आजोबा ३००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१ - भाग २
http://www.misalpav.com/node/31021 - भाग-१
http://www.misalpav.com/node/31023 - भाग ३
http://www.misalpav.com/node/31024 - भाग ४ अंतिम
अखेर ३० नोव्हेंबर, १९९१ च्या मध्यरात्री किरण अडफडकर, सुभाष पांडीयन, पुंडलिक तळेकर, दत्ता शिंदे, अनिल दगडे, नंदू भोसले, नरेंद्र माळी, महेंद्र साटम, आनंद नाकती, मिलिंद आपटे आणि कुट्टी असे १२/१३ जण डोंबिवलीहून निघालो. कल्याण-आसनगाव-शहापूर-डोळखांब-साकुर्ली-डेहणे असा प्रवास करत पहाटे ५.०० वाजता आजोबाच्या पायथ्याच्या जास्तीत जास्त जवळ पोचलो. पुढे टेम्पो जाणे शक्य नव्हते. तेथेच टेम्पो रिकामा केला व नंतर उतरवलेले सर्व सामान प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार घेऊन आश्रमाच्या दिशेने निघालो. दोन फेऱ्यांमध्ये सर्व सामान वाल्मिकी आश्रमात पोहोचवायला दुपारचे २.०० वाजले. गोण्याच त्या, त्यांना धरायला ना शेंडा ना बुडखा. एकतर डोक्यावर घ्या नाहीतर एका खांद्यावरून दुसऱ्या खांद्यावर फिरवत कसरत करा.
प्रत्येकजण सामान वाहून दमला होता. आश्रमात पोहोचताच प्रथम चहाचे सामान काढून किटलीत चहा टाकला व अनिल इमारतेने मिळवून दिलेली ब्रोकन बिस्कीट व चहा प्रत्येकाने यथेच्छ पोटात ढकलला. वाल्मिकी आश्रमातच गेलो ४० वर्षे वास्तव्य असलेले वृद्ध रामेश्वरबाबा व त्यांच्या सहकाऱ्यानांही चहापाणी दिले. अशाप्रकारे ताजेतवाने झाल्यानंतर आम्ही तंबू लावण्यासाठी जागेच्या शोधत निघालो. आश्रमाच्या शेजारी इतक घनदाट अरण्य आहे की दिवसासुद्धा सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचत नाही. आश्रमाच्या जवळच सपाट जागी प्रथम सगळ्यात मोठा तंबू उभारला. सर्व सामान त्यात क्रमवार वर्गीकरण करून लावले व नंतर किरणने स्वतःच शिवलेला दुसरा तंबू उभारायला घेतला. या तंबूच्या तळाला ब्रासचे आईलेट ठोकायचे राहिले होते. हा नवीन त्रिकोणी आकाराचा तंबू छानच दिसत होता. याच्या दाराला दोन्ही बाजूनी चेन लावल्यामुळे साध्या मुंगीला सुद्धा शिरण्यास वाव नव्हता. तंबू लावेस्तोवर संध्याकाळी ७.०० वाजले.
![]() |
| From Aajoba 1991 |
तेव्हढ्यात आश्रामाशेजारील असलेल्या एका मोठ्या घराच्या (धर्मशाळा) कोपऱ्यात नंदू व अनिलने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने मातीने लिंपून दोन चुली बनवल्या व तेथेच भांडीकुंडी व्यवस्थित रचून आमची किचन रूम बनवली.
![]() |
| From Aajoba 1991 |
आता ते रात्रीच्या जेवणाच्या तयारीला लागले. काहीजण कुऱ्हाड / कोयता घेऊन लाकडे आणण्यास गेले. आजोबाच्या डोंगररांगांमध्ये शाई नदीचे उगमस्थान आहे. त्यामुळे इथे पायथ्याशी वर्षभर झऱ्याचे मुबलक पाणी असते. हेच पाणी एका मोठ्या हौदामध्ये जमवून आंघोळीची सोय होते. मोहिमेविषयीच्या माहितीबद्दल बनवलेले बॅनर आश्रमाच्या प्रवेशद्वारावर आणि एक तंबूजवळ लावला. सर्व कामे करता करता रात्रीचे ९.३० वाजले होते, त्यामुळे रामेश्वरबाबांनासुद्धा बरोबर घेऊन जेवण उरकून घेतलं. त्याना आम्ही सांगूनच ठेवलं होत, जोपर्यंत आम्ही इथे आहोत तोपर्यंत तुम्ही जेवण बनवायचं नाही.
जेवण झाल्याबरोबर उद्याच्या तयारीसाठी परत कॅमेरा चेक करून ठेवले. एक होता मिनोलटा नॉर्मल वाइड अंगल झूमलेन्स आणि दुसरा झेनीत ७०-२०० मिमी झूमलेन्स सहित.
![]() |
| From Aajoba 1991 |
सोमवारी सकाळी लवकर जाग आली. प्रत्येकजण आपले प्रातर्विधी आटोपून तयार झाला. आता सर्व प्रथम आम्ही ठरवलेल्या चढाई मार्गाच्या पायथ्याशी पोहोचायचे होते. आम्ही आमचा चढाईमार्ग पायथ्यापासून ठरवला होता, प्रत्यक्षात तिथे गेलो नव्हतो आणि आमचा बेसकॅंप पायथ्यापासून हजारभर फुट उंचावर वाल्मिकी आश्रमाजवळ होता. आजोबाच्या पायथ्याशी एक टेकडी आहे, त्या टेकडीवरच आश्रम आहे आणि टेकडीच्या मागील बाजूस चिंचपाडा-डेह्णे गाव. त्यामुळे नियोजित मार्गाने चढाई सुरु करण्यासाठी परत पायथ्याला डेहणे-चिंचपाडा गावांच्या दिशेने खाली उतरणे क्रमप्राप्त होते. त्यानंतर किरण, सुभाष, पुंडलिक, दत्ता, मिलिंद, महेंद्र व नरेंद्र ठीक ११ वाजता निघालो. पाण्याच्या हौदाला वळसा घालून पायवाटेने आम्ही सर्वजण पुढे सरकत होतो. वाटेत एक धबधबा लागला, पण तो कड्याच्या म्हणजेच आमच्या चढाईच्या नियोजित मार्गाच्या सरळ रेषेत नव्हता म्हणून पुढे सरकलो. पुन्हा थोड्यावेळाने दुसरा धबधबा लागला, हा धबधबा योग्य होता. प्रथम धबधब्यातून डेहणे-चिंचपाडा गावाच्या दिशेने खाली उतरायला सुरुवात केली. वाटेत गावातली गुरे चरताना दिसली. आता यापुढे खाली उतरण्यात अर्थ नव्हता, म्हणून तेथूनच आम्ही आजोबा कड्याच्या दिशेत वरवर चढण्यास (म्हणजे आमच्या मोहिमेस) सुरुवात केली.
आम्ही सर्वजण भराभर धबधब्यातून वर सरकू लागलो, त्याच वेळी क्लाइम्बिंग व फोटोग्राफी अशी दुहेरी भूमिका किरण पार पाडत होता. या मोहिमेस यावेळी मार्गदर्शन, फोटोग्राफी व क्लाइम्बिंग अशी तिहेरी भूमिका किरणला सोपवण्यात आली होती तर सुभाष आणि दत्ताला संयुक्तपणे मोहिमेचे नेतृत्व करण्याची संधी देण्यात आली होती. आम्ही सर्वजण धबधब्यातून वाट काढत एका ५०-६० फुटी कड्याच्या पायथ्याशी पोहोचलो, इथून पुढे आता प्रस्तरारोहण करावे लागणार होते. पुंडलिकने कंबरेला हार्नेस बांधला, दत्ता व सुभाष बिले देत होते.
हळूहळू पुंडलिक फ्री-क्लाइम्बिंग तंत्राचा उपयोग करीत वरवर सरकू लागला. साधारण ४० फुट वर गेल्यावर त्याने एका कपारीमध्ये पिटॉन (Piton) ठोकला व मदतीसाठी सुभाषला वर घेतले. सुभाष त्याच्यापाशी पोहोचल्यावर पुंडलिक पुन्हा वर सरकू लागला. किरण त्याच्या कुवतीनुसार मिळेल त्या कोनातून फोटो काढत होता. ५०-६० फुट फ्री-मूव्ह करत पुंडलिक आता एका बऱ्यापैकी लेजवर पोहोचला. लागलीच त्याने तिथेच एका कपारीतून उगवलेल्या झाडाला व खडकाला संयुक्तपणे दोर बांधला. आता उरलेली टीम भरभर प्रथम सुभाषपर्यंत व तेथून पुढे पुंडलिकपर्यंत पोहोचली. इथे बसण्यास ऎसपैस जागा होती. इथे बसून सर्वांनी पाणी पिऊन बाटलीचे वजन कमी केले. पुढील ४०-५० फुट चढाई करण्यासाठी मिलिंद सरसावला. सुमारे २० फुट गेल्यावर त्याने महेंद्रला मदतीला बोलावून घेतले व त्यानंतर भरभर वर सरकत मिलिंद दिसेनासा झाला. एक मोठ्या कपारीमधून मिलिंदने हि मूव्ह पूर्ण केली. इथून वर सरकायला पुन्हा मागचाच धबधबा वाटेत आडवा आला. भरपूर वर सरकत सुभाष, दत्ता पाठोपाठ आम्ही सर्वजण बरोबर ४ वाजता वर पोहोचलो. इथून वर पुढे खरी चढाई सुरु होणार होती. आम्ही ज्या लेजवर आता पोहोचलो होतो, तीच लेज उजव्या हाताने बऱ्याच दूर सरकत गेली होती व टोकाला सीतेच्या पाळण्यापाशी संपून एका धबधब्याच्या रूपाने खाली उतरत वाल्मिकी आश्रमापर्यंत गेली होती. म्हणजे तो धबधबा स्लीपर हायकर्स / ईगल मौण्टेनिअर्स यांनी घेतलेल्या क्लाइंबिंग रूटच्या अगदी सरळ रेषेत होता.
(लेज - डोंगरकड्यातून फळीसारखा बाहेर आलेला कमी-जास्त रुंदी असलेला भाग)
![]() |
| From Aajoba 1991 |
![]() |
| From Aajoba 1991 |
आज पहिल्याच दिवशी चढाई साधारण असल्याने आम्ही डेहणे गावापासून सुमारे १८०० फुट तर वाल्मिकी आश्रमापासून सुमारे ८०० फुट उंचीवर पोहोचलो होतो. संध्याकाळ होत आल्यामुळे बेसकॅंपवर परत जाण्यासाठी आम्ही सीतेच्या पाळण्याच्या दिशेने निघालो, सकाळीच आमच्या ठरलेल्या योजनेप्रमाणे (आम्ही सर्वांनी असे ठरवले होते कि प्रथम आमच्या चढाईच्या नियोजित मार्गानेच चढाई करीत लेजपर्यंत जायचे व नंतर सीतेच्या पाळण्याच्या वाटेने खाली वाल्मिकी आश्रमात म्हणजेच आमच्या बेसकॅंपवर जायचे व त्यानंतरच पुढील दिवसात सीतेच्या पाळण्याच्या वाटेचा उपयोग करायचा) ठीक ५.३० वाजता आम्ही लेज वरून उजवीकडे निघालो. वरच्या बाजूला सुमारे २२०० फुट उंचीचा कडा तर खाली सुमारे ८०० फुट खोल दरी. डोळ्यात तेल घालून सर्वजण लगबगीने पुढे सरकत होतो. ६ वाजले तरी सीतेचा पाळणा येण्याचे लक्षण दिसेना. आता अंधार पडू लागला होता. शेवटी आम्ही निर्णय घेतला कि आहोत तेथूनच ८०० फुट खोलीची दरी उतरायला सुरुवात करायची.
हीच ती लेज- कोपऱ्यात सीतेचा पाळणा सुळका आणि आश्रमाच्या दिशेने खाली उतरणारा धबधबा
![]() |
| From Aajoba 1991 |
आम्ही लेजवरून निघाल्यापासून दगडावर मिळेल तिथे खुणा करीतच पुढे सरकत होतो. सर्व प्रथम पुंडलिक, सुभाष, दत्ता, महेंद्र, मिलिंद व शेवटी किरण असा क्रम होता. अतिशय भयानक अवघड वाटेने आम्ही खाली उतरत होतो. कारण पायाखाली कधी दगड गोटे तर कधी माती व त्यातच भरभर पसरत जाणाऱ्या अंधारच भय. करता करता शेवटी एका कड्याच्या टोकाला पोहोचलो. पुंडलिकने डावी-उजवीकडे सरकून दुसरी वाट दिसते का ते पाहिले पण छे, त्या कड्यावरून सरळ रेषेत खाली उतरण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रस्तरारोहणातील (Rock Climbing) मधील सर्व कौशल्य पणाला लावून पुंडलिक खाली सरकू लागला.
![]() |
| From Aajoba 1991 |
वर चढण्यापेक्षा खाली उतरणं कठीण. कारण खाली काय असेल याची पुसटशी कल्पनाही नसते व तशात अंधार! पण अंधार एका अर्थी फायद्याचा झाला कारण दरीची खोली किंवा अवघडपणा समजत नव्हता. शेवटी एकदाचे तो सुमारे ५०-६० फुट रॉकपॅच उतरून खाली प्रचंड उतारावर पोहोचलो. आता तर आम्हाला जेमतेम दिसत होत, तशातच पुंडलिक हिंमतीने वाट काढीत त्या उतारावरून सरकत होता. एव्हढा प्रचंड उतार होता कि धड बसूनही पुढे सरकता येत नव्हत. तो उतार संपला व आम्हाला एक धबधबा लागला आणि सर्वानीच सुटकेचा निःश्वास टाकला. आता आम्ही एकमेकांचे हात धरून साखळी पद्धतीने खाली उतरू लागलो कारण पूर्ण अंधार पसरला होता. कित्येकदा पडणं –धडपडणं चालू होत. जवळ जवळ प्रत्येकाने एक-दोन वेळा साष्टांग नमस्कार घालून झाले होते. आता आम्ही बेसकॅंपवरील सहकाऱ्यांच्या नावाने हाक मारायला सुरुवात केली व तिकडून प्रत्युत्तरही आले. पण आम्हाला दोघानाही एकमेकांची जागा मिळेना. कारण आवाजावरून त्या घनदाट जंगलात कोण कुठे आहे हे समजण कठीणच होत. फक्त आपण पोचलोय हीच समाधानाची बाब. शेवटी एकदाचे ठेचकाळत कसेबसे रात्री ७.३० वाजता तब्बल अडीच तासांनी आम्ही बेसकॅंपवर पोहोचलो.
बेसकॅंपवर पोहोचताच, हौदाच्या पाण्यात दिवसभराचा शिणवटा घालवून मने परत प्रफुल्लीत झाली. काल तंबू उभारताना एक साप फिरता फिरता तिथे आला होता म्हणून आज सकाळी रामेश्वरबाबांनी तंबूच्या आसपासचे गवत संपूर्णपणे कापून-जाळून टाकले होते व भोवतालचा परिसर अतिशय स्वच्छ दिसत होता.
रात्री जेवण झाल्यावर रामेश्वरबाबांच्या झोपडीत गप्पाटप्पाना उत आला होता. किरण आणि सहकारी तंबूमध्ये काहीतरी काम करत होते, किचन ते तंबू यामधील भागात संपूर्ण अंधार होता. काही सहकारी किचनमध्ये होते, त्यांनी चहा करण्यासाठी टॉर्च पेटवली आणि मिलिंद एकदम 'साप-साप' म्हणून ओरडला. हाक ऐकताच चटकन किरण, सुभाष व कुट्टी तंबूच्याबाहेर मिलिंदकडे पळाले. नरेंद्रने टॉर्चच्या प्रकाशाचा झोत सापावरच मारून ठेवला होता. एक काळ्या रंगाचा साधारण दीड फुट लांबीचा साप होता. त्याच स्थानिक नाव खरड्या नाग! हे नाव रामेश्वर बाबांकडून कळल. चटकन किरण व सुभाष पुढे सरसावले. हळुवार हाताने सावधपणे किरणने त्याची मान पकडली. गॅसबत्तीच्या उजेडात त्याच निरीक्षणं केल, काळ्या शरीरावर पिवळे ठिपके होते. नंतर त्याला एका प्लास्टिकच्या बाटलीमध्ये बंद करून ठेवला, जेणेकरून त्याला सकाळी तंबूपासून दूर सोडता येईल.
रात्रीचे अकरा वाजले होते, साप तंबूच्या जवळच सापडल्याने परत एखादा साप तंबूमध्ये घुसण्याची शक्यता होती. परत एकदा सामान हलवून छानणी केली. नंतर तंबूच्या परिघाभोवती वर्तुळाकार चर खणला व त्यात कीटकनाशक फवारले. हे सर्व व्यवस्थित होईपर्यंत रात्रीचे साडेतीन वाजले.
रात्रीच्या जागरणाने सकाळी खूप उशिरा जाग आली. आमची धावपळ चालू असताना शहापूरवरून काही मंडळी, डेहणे गावचे सरपंच व मुंबई सकाळचे उपसंपादक श्री. नार्वेकर इत्यादी वाल्मिकी आश्रमात येऊन थडकले. त्यांच्याशी गप्पा मारता मारता व इतर माहिती देताना ११ वाजले. १२ वाजता आश्रमातून किरण, दत्ता, नंदू व पुंडलिक, आजोबाचा कडा व सीतेचा पाळणा यांच्यामधल्या घळीतून धबधब्याच्या वाटेने सीतेच्या पाळण्याच्या दिशेने निघालो (काल आम्ही याच वाटेने खाली येणार होतो, पण अंधार पसरल्यामुळे आम्हाला मधूनच भलत्याच मार्गाने यावे लागले होते). तासभर वर चढल्यानंतर सीतेचा पाळणा नावाचा जो सुळका आहे त्याच्या पायथ्याला पोहोचलो, तेथून डाव्या हाताला वाट वळली होती, ती कड्याच्या पायथ्याने पुढे सरकत आमच्या चढाईच्या मार्गापर्यंत पोहोचत होती व तेथून अजूनही बरीच पुढे जात खिंडीला जाऊन मिळत होती. हि काही रहदारीची पायवाट नव्हती. एकूण अंतर किती असेल कोण जाणे पण दिसायला खूपच दूर म्हणजे जवळजवळ एक दिवस तरी गेला असता. कड्याच्या पायथ्याच्या अतिशय अरुंद वाटेने आम्ही हळूहळू पुढे सरकायला सुरुवात केली. तस पाहिलं तर ती वाट नव्हतीच, अतिशय अरुंद आणि अवघड मार्ग होता.
कारण उजवीकडे उभा कडा तर डावीकडे सरळ रेषेत खोल दरी. पुन्हा भरीस भर पायाखालून दोन सापही वळवळत गेले. इथे आजोबाला साप-विंचवांचा फारच सुळसुळाट आहे. दुपारी १२ वाजता निघालेलो, आम्ही ३.३० वाजता आमच्या नियोजित मार्गापाशी पोहोचलो, यावरूनच सदर मार्ग किती अवघड असेल याची सहज कल्पना येईल. रोज ये-जा करून हि वेळ अर्थात कमी होणार होती. काल इथेच आम्ही चढाई करत पोहोचलो होतो. वर सुमारे २००० फुटी कडा आम्हाला आव्हान देत उभा होता. सुरुवातीसच फ्री-मूव्ह करण्यास वाव असल्याने सुरुवात पुंडलिकने केली. हळूहळू त्याने वरवर सरकायला सुरुवात केली व किरण ते क्षण कॅमेऱ्यात टिपायला लागला. सुमारे १७५ फुट फ्री-मूव्ह करून पुंडलिक थांबला, तो एका ३५० फुटी ओव्हरहॅन्गच्या पायथ्याशी एका लेज वर पोहोचला होता. खालून किरण, दत्ता व नंदू दोराच्या साहाय्याने पुंडलिकपर्यंत पोहोचले. इथे वावरण्यासाठी चांगली जागा होती म्हणून इथेच आम्ही कॅंप क्र. १ ची स्थापना केली.
(लेज- डोंगरकड्यातून बाहेर आलेला कमीजास्त रुंदी असलेला फळीसारखा भाग. अशा लेजचा उपयोग म्हणजे अस्थायी कॅंप उभारण्यासाठी होतो, जेणेकरून मुख्य बेसकॅंपपर्यंत जाण्या-येण्याचे श्रम वाचतात. थकलेला लीड क्लाईम्बर पुढची चढाई सेकंडमॅनकडे सोपवताना होणाऱ्या अद्लाबदलीसही अशी लेज उपयोगी पडते. काही लेजेसवर फक्त उभे राहण्यास जागा असते, काही ठिकाणी आरामात झोपण्यासही जागा मिळते.)
![]() |
| From Aajoba 1991 |
आता वरील भागात चेन बोल्टिंग करावे लागणार होते, कारण कडाच तसा ताशीव होता. बोल्टिंगचा शुभारंभ नंदूने केला. त्याने अर्धवट मारलेले छिद्र पुंडलिकने पूर्ण केले व पहिला एक्सपान्शन बोल्ट (Expansion Bolt) आजोबाच्या कड्यावर ठोकला गेला. त्यानंतर दत्ताने आणखी एक बोल्ट ठोकला. एव्हाना संध्याकाळचे पाच वाजले होते. दुपारचा वर येतानाचा अनुभव लक्षात असल्यामुळे निदान ७ वाजेपर्यंत म्हणजे अंधार पडायच्या आत बेसकॅंपवर पोहोचता आले पाहिजे या हिशोबाने आम्ही आजच्या दिवसाची चढाई थांबवून परतीच्या वाटेस लागलो. कारण एकतर वाट नवीनच होती, शिवाय वाटेत सापांचा सूळसुळाटही होता.
नेमक परत उतरताना नंदूच्या पायाखालील दगडातून एक साप अचानक बाहेर पडून खालील उतारावर सरपटत दिसेनासा झाला. नशिबानेच नंदू बचावला. सावधपणे भरभर पुढे सरकत आम्ही ७ वाजेपर्यंत बेसकॅंपवर आश्रमात पोचलो. आजोबाला सापांचा सूळसुळाट इतका आहे कि १०/१२ दगड उलट सुलट करा एक तरी साप दर्शन देऊन जाईल.
इकडे बेसकॅंपवर आज सुभाष-नरेंद्रचा सुट्टीचा दिवस होता. टेन्टवरील कामे करता-करताच सहकारी दुपारी कड्यावर चाललेल्या चढाईचे दुर्बिणीच्या साहाय्याने निरीक्षण करीत होते. पाच वाजता आम्ही चढाई थांबवली व परतायला आम्हाला उशीर होणार हे गृहीत धरूनच कुट्टी, सुभाष, नरेंद्र व महेंद्र गॅसबत्ती पेटवून आम्हाला घ्यायला निघाले. वाटेत आमची भेट झाली. टेन्टवर पोहोचताच चहा वगैरे घेऊन आम्ही चौघे अंघोळीस निघालो तर उरलेली मंडळी जेवणाच्या तयारीस लागली. आज बेसकॅम्प टीमने मोठे ओंडके फोडून भरपूर सरपण तयार करून ठेवले होते. जेवणानंतर रात्री एक मिटिंग घेण्यात आली. कारण रोज सकाळी व संध्याकाळी मिळून चार तास तरी जाण्या-येण्यात खर्च होत होते. त्यामुळे नरेंद्र व सुभाष यांनी सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी निघून चढाईला सुरुवात करायची तर कुट्टी व किरणने सीतेच्या पाळण्यापाशी पाण्याची सोय आहे का, ते पाहायचे असे ठरले.
पहिल्या दिवशी चढाईच्या ठिकाणावरून उतरताना आम्ही तयार केलेला शॉर्ट्कट मार्ग खूपच अवघड व धोकादायक असूनही वेळ वाचवण्याकरीता त्याच मार्गाचा अवलंब करायचे आम्ही ठरवले, कारण त्यामुळे आमचे दिवसातले दोन ते अडीच तास वाचणार होते.
पहाटे नरेंद्र व सुभाष ठरल्याप्रमाणे लवकर उठले, सोबत पुंडलिकही होता. चहा, नाश्ता करण्यात बेसकॅंपवरून निघायला सकाळचे नऊ वाजलेच. शॉर्ट्कटच्या वाटेने साधारण तासाभरात ते सगळे चढाईच्या ठिकाणावर पोहोचले. अकरा वाजता नरेंद्रने बोल्टिंगला सुरुवात केली आणि सुभाष व पुंडलिक त्याचे मदतनीस झाले.
दुपारी १ वाजता बेसकॅंपवरून किरण, अनिल, दत्ता, महेंद्र व कुट्टी सीतेच्या पाळण्याच्या दिशेने निघाले. तेथे एक सुळका आहे, तेथे पाणी भरून घेतले व तेथून डाव्या हाताने लेजवरून सर्वजण कॅंप-१ च्या दिशेने निघाले. सीतेच्या पाळण्याची वाट खूप लांबची असल्याने आम्ही कॅंप-१ वरून परत बेसकॅंपवर येण्यासाठी शॉर्ट्कट मार्ग शोधला होता, पण तो मार्ग खुपच धोकादायक व अवघड होता. तेंव्हा दोर बांधून सुरक्षित करण्याचं काम या चौकडीकडे होते.
वाटेत परत एकदा एक साप अनिलच्या पायाखालून वळवळत गेला. मजल दरमजल करत ३ वाजता आम्ही कॅंप-१ वर पोचलो. कॅंप-१ च्या खालील रॉकपॅचवर दोर बांधून खाली उतरण्यासाठी अनिलने एक बोल्ट मारला. एव्हाना नरेंद्र वरील बाजूस चार बोल्ट ठोकून वर सरकला होता. आज पूर्ण दिवस तोच चढाई करणार होता. किरण, नरेंद्र, सुभाष, दत्ता, पुंडलिक, शेखर असे सगळेच जण दिवसभर चढाई करण्यात तरबेज होते. सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नरेंद्रने १४ बोल्ट ठोकून दिवसभराची चढाई थांबवली. चढाईचे सर्व सामान शेवटच्या बोल्टला अडकवून तो परत पायथ्याला कॅंप-१ वर उतरला.
![]() |
| From Aajoba 1991 |
![]() |
| From Aajoba 1991 |
![]() |
| From Aajoba 1991 |
पुंडलिकने तयार केलेल्या शॉर्ट्कटच्या वाटेने बेसकॅंपवर जाण्यास निघाले. सापांनी तर आमची अडवणूकच केली होती. खाली उतरताना परत अनिलला संध्याकाळच्या संधीप्रकाशात एका दगडावर काहीतरी वळवळत असलेलं जाणवलं म्हणून त्याने सुभाषला जवळ बोलावले, सुभाषने तो मण्यार जातीचा साप असल्याच बरोबर ओळखलं. अनिल सापांना खूपच घाबरत असल्याने सुभाषने त्याला तिथे काहीच नाही म्हणून खोटेच सांगितले. एकतर सर्वजण एका कड्यावर उभे होते, खाली सरळ खोल दरी होती व उताराची वाट अवघड होती. त्यामुळे आम्ही सापाला पकडायचं नाही अस ठरवलं. पण अनिलला पक्की खात्री होती कि त्याने सापच पाहिलाय, तेंव्हा त्याने आणखी घाबरू नये म्हणून उलट आम्ही सगळ्यांनी मिळून त्यालाच खोट पाडलं आणि साप नसल्याची बतावणी केली.
एव्हाना अंधारायला सुरुवात झाली होती. सोबत एकच विजेरी (Torch) होती त्यामुळे आठ माणसांना उतरताना खूपच वेळ लागत होता. थोडसं पुढे गेल्यावर एका सपाटीवर महेंद्रचा आवाज आला 'किरण-साप'. किरणने धावत जाऊन विजेरीच्या प्रकाशात न्याहाळून पाहिले तर खरंच हिरव्या रंगाचा घोणस (Pit Viper) तिथे होता. त्याला तिथेच सोडण धोक्याच होत कारण आम्ही आता रोजच या वाटेवरून ये-जा करणार होतो. किरणने त्याला पकडून आपल्या सोबत घेतलं आणि सर्वजण परत पुढच्या वाटेला लागले. अंधाराने आपली तीव्रता आणखीनच वाढवली होती. प्रत्येकाच्या मनात सापाचा धसका होताच कारण हात लावताना किंवा पाय टाकताना प्रथम तोच विचार मनात येई, मध्येच कुठे तरी सळसळ, सरसर ऐकू येई व वातावरणाची भयाणता अधिकच वाढे. मार्ग नीट सापडतच नव्हता, कधी उड्या मारीत, कधी सरपटत, ठेचकाळत एकदाचे बेसकॅंपवर पोचलो. तेंव्हा कुठे जीव भांड्यात पडला. बेसकॅंपवर पोहोचताच प्रथम त्या धरून आणलेल्या सापाला एका बाटलीत ठेवले, जेणेकरून सकाळी उठल्यावर बेसकॅंपपासून दूर सोडून देता येईल हा विचार मनात होता.
दरम्यान . बेसकॅंपवर दुपारी मुलुंडवरून शैलेश, बालाजी व आनंद आले होते. त्यामुळे . बेसकॅंप टीमला थोडी बळकटी मिळाली होती. संध्याकाळी हौदावर आंघोळ करताना चढाईविषयी गप्पा चालू होत्या. विषय होता, बेसकॅंपपासून चढाईच्या ठिकाणावर (कॅंप-१) जाण्यास लागणाऱ्या वेळेबद्दल. जाण्या-येण्यात ३-४ तास जात होते. तेंव्हा असे ठरविण्यात आले कि, दिवसा चढाई करण्याऱ्या टीमने रात्री तिथेच राहायचे आणि त्यांना जेवण-पाणी पुरविण्याच काम दुसऱ्या दिवशी चढाई करणाऱ्या टीमने संध्याकाळी करायचे. म्हणजे दुसऱ्या दिवशी नवीन टीम सकाळी लवकर चढाई सुरु करेल आणि काल थांबलेली टीम परत बेसकॅंपवर निघून येईल. जेणेकरून चढाई सतत चालू राहील.
जेवण तयार झाले होते. पुंडलिक तर रामेश्वरबाबांसोबत पार गप्पांमध्ये रंगून गेला होता. उद्यापासून सर्व टीम एकत्र भेटणार नसल्याने कॅंपफायर करून रात्री एक वाजेपर्यंत सर्वानीच दंगा केला. अनिलच्या खड्या आवाजातल्या गाण्यांनी आणि सोबत माउथ ऑर्गनच्या सुमधुर संगीताने कॅंपफायरला वेगळीच मजा आणली.
आज मोहिमेचा चवथा दिवस होता. किरण, शैलेश, महेंद्र, आनंद, मिलिंद बेसकॅंपवरून, कॅंप-१ च्या दिशेने निघाले. काल नरेंद्रने चढाई थांबवलेल्या ठिकाणी पोहोचून पुढे चढाई सुरु करायला आनंदला ११ वाजले. संपूर्ण कडा ताशीव गुळगुळीत असल्याने फ्री मूव्ह करण्यास वाव नव्हता तेंव्हा आजही चेन बोल्टिंगच करावी लागणार होती. एक एक करत त्याने लागोपाठ पाच बोल्ट ठोकले व खाली उतरला, त्याची जागा घेतली महेंद्रने. एक छान फ्री-मूव्ह करीत तो २५ फुट वर पोहोचला व तेथेच एका कपारीत बसून त्याने एक बोल्ट ठोकला व मिलिंदला मदतीला वर बोलावून घेतले, नंतर आणखी दोन बोल्ट ठोकून पुढच्या चढाईची सूत्रे मिलिंदकडे सोपवली. संध्याकाळचे पाच वाजले होते. काल परतीचा अनुभव लक्षात घेऊन किरण व आनंद परत बेसकॅंपवर जाण्यास निघाले. मिलिंदने चढाई सुरूच ठेवली होती. मिलिंद व महेंद्र आज इथेच मुक्काम करणार होते. दरम्यान संध्याकाळी सुभाष आणि मंडळी मुक्कामासाठी जेवण पाण्यासाहित बेसकॅंपवरून कॅंप-१ वर येण्यास निघाले. मध्येच किरण व आनंद परतत असतांना त्यांना वाटेत सुभाष आणि मंडळी भेटली, आवश्यक निरोप, सूचना करून सर्व मंडळी आपपल्या वाटेने निघून गेली. आज किरण आणि आनंद काळोख पडायच्या आतच बेसकॅंपवर पोहोचले. त्याचप्रमाणे सुभाष आणि मंडळी काळोख पडता पडता कॅम्प-१ वर पोहोचली. दरम्यान मिलिंदने चार बोल्ट आणि एका पिटॉनच्या साहाय्याने बऱ्यापैकी उंची गाठून दिवसभराची चढाई थांबवून परत पायथ्याला आला. आज रात्रीचा हा मोहिमेतला पहिलाच उघड्यावरचा मुक्काम (Bivouac) होता.
![]() |
| From Aajoba 1991 |
दरम्यान आनंद व किरण बेसकॅंपवर पोहोचल्यावर, सुभाष व मंडळी पुरेसं अंथरूण, पांघरूण न घेता गेल्याचे कळले आणि जीव कळवळला. कारण गारठलेल्या आसमंतात त्यांना उघड्यावरच अंथरायला दगडांची गादी व पांघरायला फक्त घोंगडी होती. त्यातच बेसकॅंपवर असलेल्या अनिलला ताप भरून आला, त्याचे विव्हळणे आम्हाला ऐकवत नव्हते. कशीतरी रात्र सरली.
येत्या दोन/तीन दिवसात आम्ही कॅंप १ च्या वर सुमारे ४००-५०० फुटांवर पोहोचणार होतो, त्यामुळे आता वर कॅंप-२ ची स्थापना करावी लागणार होती. तसेच चढाईची साधने व इतर आवश्यक सामग्री खालून वर न्यावी लागणार होती. जसजसे वर पोहोचू तसतसे बेसकॅंपवरून प्रत्येक गोष्ट वर पोहोचवणे अवघड होणार होते. आमच्या पुढे सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता पाण्याचा, सध्या तरी आम्ही बेसकॅंपवरूनच पाणी पुरवीत होतो. वरच्या भागात पाणी जवळपास आढळले, तरच आमचे सर्व प्रश्न सुटणार होते. त्यामुळे आज किरण, नरेंद्र व कुट्टी यांची एक टीम वरच्या भागात पाणी मिळतं का याचा शोध घेणार होते. तसे सीतेच्या पाळण्यापाशी पाणी होते, पण तेथून चढाईच्या ठिकाणापर्यंत पाणी आणण्यास व बेसकॅंपवरून पाणी आणण्यास जवळपास दोन-अडीच तास लागत. त्यामुळे काही उपयोग नव्हता. आम्ही सर्व तयारी करून निघणारच होतो इतक्यात कॅंप-१ वरून मिलिंद व महेंद्र परतले. मग मिलिंदने सांगितल्याप्रमाणे आश्रमातून डावीकडे वरच्या भागात नजर टाकली तर तिथे कड्याच्या उतरत्या बाजूस (सोंडेवर) एक नेढ दिसतं. त्याच्या आसपास भरपूर कडीपत्ता आहे व तो आणावयास गावातली बरीच मंडळी जातात. तो भाग आम्हाला सुरुवातीपासूनच खूप हिरवागार दिसत होता, त्यामुळे मिलिंदच्या खात्रीपूर्वक बोलण्याने आमच्या विचाराला दुजोराच मिळाला. आता आम्ही त्या नेढ्यापाशीच जाऊन पाण्याचा शोध घेण्याचे ठरवले.
हि ती उतरती बाजू चिंचपाडा गावातून
| From Aajoba 1991 |
काल रात्री सुभाष व मंडळीनी चढाईच्या ठिकाणावरच मुक्काम केलेला असल्याने सकाळी लवकरच ९ वाजता चढाई सुरु केली. त्याच दरम्यान किरण व मंडळी सकाळी १० वाजता पाण्याच्या शोधात बेसकॅंपवरून नेढ्याच्या दिशेने निघाले. नेढ्याच्या आसपास अथवा वरच्या भागात पाणी आढळलं तर ते खूपच फायदेशीर होणार होत, कारण तो परिसर आमच्या चढाईच्या ठिकाणापासून वरच्या भागात होता.
त्यामुळे आमचा बराच वेळ वाचला असता. दरम्यान किरण, नरेंद्र व कुट्टी नेढ असलेल्या सोंडेच्या पायथ्याशी (सुमारे १००० फुट खाली) पोहोचले. तेथून एका आडव्या गेलेल्या वाटेचा वापर करत ते पुढे सरकू लागले. मिलिंदने दिलेल्या माहितीनुसार सोंडेच्या पुढे पहिल्याच घळीतून नेढ्याकडे जायला वाट होती. त्यामुळे ते सुद्धा पहिल्याच घळीतून वर सरकू लागले. वाट काढीत ते झपाट्याने पुढे सरकत होते. तस पाहिलं तर वाट अशी नव्हतीच, पण ते तिघेही प्रस्तरारोहक असल्याने नेढ डोळ्यासमोर ठेऊन दोराशिवायाच प्रस्तरारोहण करीतच वरवर सरकत होते. चढताना मध्येच दगडधोंडे लागून अंग खरचटत होत, तर कधी काट्याकुट्यातून जाताना काटे टोचत होते. एव्हढ सर्व करून सुद्धा एका टप्प्यावर आल्यावर आमच्या समोर एक उंच कडा दत्त म्हणून उभा राहिला. आता इथून उजवीकडे नेढ्याच्या दिशेने जाणे अशक्यच होते. थोड थोड पाणी पिऊन मिलिंदच्या नावाने शिव्या घालत आम्ही कड्याच्या डाव्या बाजूला सरकू लागलो. अचानक खाली जंगलातून रानातील श्वापदांचे गुरगुरण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. सोबत माकडे, पक्षी यांच्या कलकल्याने आसमंत दुमदुमून गेला. आमच्यापैकी कुट्टी या क्षेत्रात अनुभवी, त्याने सदर गुरगुरणे वाघाचे असल्याचे ओळखले, पण आम्ही त्या आवाजापासून जवळपास १००० फुट उंचावर असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
बरेच डावीकडे गेल्यावर रांगत-रांगत आम्ही वरच्या दिशेने वर-वर सरकू लागलो. नेढ्याचा तर पत्ताच नव्हता, परंतु तरी त्यांचा निश्चय पक्का होता. थोडं वर गेल्यावर आजोबा व कात्राबाईच्या डोंगराला जोडणारी खिंड दिसू लागली. त्यांचा गिर्यारोहणातील अनुभव त्या खिंडीतूनच मार्ग असल्याचे सांगत होता. खिंडीकडे जायला वरूनच शक्य होणार होते. कारवी आणि गवतातून वाट काढीत शेवटी एकदाचे ते त्या खिंडीत पोहोचले. घड्याळ पाहिले तर दुपारचे २ वाजले होते. अजूनही पाण्याचा कोठेही मागमूस नव्हता. पोटाची आग जाळण्यासाठी जवळ ठेवलेला सुकामेवा व पाणी पिऊन शरीराची गरज भागवली. सकाळी १० ते २ सतत चार तास पायपीट केल्यानंतर प्रथमच आम्ही ढुंगणाला आराम दिला होता. बसल्या बसल्याच आम्ही एकमेकांशी चर्चा केली व परत फिरण्याचा निर्णय घेतला. नेढ्यापर्यंत पोहोचायला आणखी २-३ तास लागले असते. आम्ही बसलो होतो त्या ठिकाणापासून वर चढत जायचे व तेथून जंगलातून वाट तुडवत उजवीकडे नेढ्याच्या दिशेने घुसायचे. बरे तेथपर्यंत पोहोचून पाणी मिळेल किंवा नाही हे हि माहित नव्हते. शिवाय पाणी मिळूनही त्यांना त्याचा काहीच फायदा होणार नव्हता. कारण त्या नेढ्याला जाणारी वाट खूपच जिकिरीची आणि संपूर्ण डोंगर फिरवून आणणारी होती. त्यामुळे पाणी आणण्यात एव्हढा वेळ घालवणे शक्यच नव्हते.
म्हणून आम्ही तिघांनी परत फिरण्याचा निर्णय घेतला. सकाळी आम्ही बेसकॅंपवरून निघालो होतो पण आता बेसकॅंपवर न जाता सुभाष व मंडळीना निरोप देण्यासाठी चढाईच्या ठिकाणावर अर्थात कॅम्प-१ वर जायचे होते, त्यामुळे परत वाट वाकडी करून आम्ही कॅंप-१ च्या दिशेने अंदाजाने निघालो. बरेच खाली आल्यावर मार्गात आता सुमारे २०० फुट कडा आडवा आला, त्याच्या डाव्या बाजूने खाली उतरत गेल्यावर एक वाट डावीकडे जंगलात गेलेली दिसली. वरील बाजूस सोंडेचा अंदाज घेऊन आम्ही त्याच वाटेने पुढे सरकू लागलो. चालताना अचानक सकाळचे गुरगुरणे आठवले….....… अक्षरशः जीव मुठीत घेऊनच वाट काढीत होतो. कसेबसे अंदाजानेच खिंडीत पोहोचलो कारण तो परिसरच इतका भयानक होता की वर्णन करणे शक्य नाही. एखाद्या कैद्याला शिक्षा करण्याऐवजी त्या भागात जिवंत सोडून दिलं तर तो सुद्धा काही दिवसात एकतर वेडा होईल किंवा प्राणास तरी मुकेल. सर्वत्र मोठमोठे कडे त्यांच्या पायथ्याशी घनदाट रान, दरड कोसळून होणारा गडगडाट, जंगली श्वापदांचे गुरगुरणे, किंचाळणे, भरीस भर म्हणून पायाखालून कधीही सरपटत जाणारे साप, त्या जंगलाची भयानकता अधिकच वाढवीत होते.
इतक्यात आमची तंद्री भंगली ती सकाळचीच वाट सापडल्यामुळे, आम्ही योग्य ठिकाणी आहोत हे पाहून जीव थाऱ्यावर आला. घड्याळात पाहिले तर ४ वाजून गेले होते. भरभर पुढे सरकताना कॅंप-१ वर चढाईच्या ठिकाणावरून हातोडीचे आवाज ऐकू येऊ लागले पण कुणीही नजरेस पडत नव्हते. झपाझप पावले उचलत आम्ही अजून पुढे सरकलो. सुभाष व चढाई करणाऱ्या मंडळीना आम्ही कॅंप-१ वर न येता थेट बेसकॅंप वर जात आहोत हा निरोप देणे गरजेच होत. आमच्या नजरेच्या टप्प्यात कोणीही नव्हते. संध्याकाळ झाल्यामुळे आता सुभाष व चढाई करणाऱ्या टीमला परत बेसकॅंपवर निघण्याचा निरोप मिळणे आवश्यक होते, अन्यथा ते आमची वाट पाहत तेथेच राहिले असते. आणखी थोडे पुढे गेल्यावर आम्हाला आता कॅंप-१ अस्पष्ट दिसू लागला होता, किरणने सुभाषला हाका मारायला सुरुवात केली, ५-६ वेळेला हाक दिल्यानंतर सुभाषने प्रतिसाद दिला. दोघांमधील अंतर जास्त असल्याने किरणने एका एका शब्दावर जोर देऊन निरोप सुभाषकडे पोचवला. ''सुssभाssष, आssम्ही, राssत्री येssत नाssही.तुssम्ही साssमाssन पॅssक कssरूssन बेssसssकॅssम्प वssर पssरssत जा''. नशिबाने सुभाषला निरोप कळला.
सुभाषचा ओके सिग्नल मिळाल्यामुळे आम्हीही निर्धास्तपणे बेसकॅंपच्या वाटेला लागलो. दिवसभराच्या अथक परिश्रमानंतरही आम्हाला पाण्याचा शोध काही लागला नव्हता. साधारण साडेपाच वाजता आम्ही बेसकॅंपवर पोहोचलो, पण समोर आमचे डोंबिवलीहून आलेले नवीन सहकारी अशोक, दिनेश, राजू दिसताच राग आवरता घेतला. चहाचे घुटके घेत घेतच सदर घटनेचे स्पष्टीकरण विचारताच, मिलिंद कुमशेतहून परतताना त्याच खिंडीतून तो खाली उतरल्याचे स्पष्ट झाले पण नेढ्याबद्दल त्याने सांगितलेली माहिती गावकऱ्यांकडून कळलेली ऐकीव माहिती होती. तो स्वतः त्या नेढ्यात गेलाच नव्हता, त्यामुळे गफलत झाली होती. सकाळीच जर त्याने हि माहिती आम्हाला दिली असती तर आमचे दिवसभराचे परिश्रम फुकट गेले नसते.
अशोक, राजू, दिनेश यांच्याशी गप्पा चालू असतानाच आज चढाई करणारी टीम रात्रीच्या मुक्कामाकरीता परत बेसकॅंपवर आली. मग त्यांनी आजच्या दिवसभराच्या चढाईची माहिती दिली. सकाळी सुभाषने चढाईला सुरुवात केली, लागोपाठ पाच बोल्ट मारल्यावर त्याला एके ठिकाणी फ्री मूव्हसाठी वाव असल्याच जाणवलं. म्हणून त्याने दत्ता आणि पुंडलिक जे कॅंप-१ वर सुभाषच्या मदतीसाठी होते, त्यांना हाक मारायला सुरुवात केली. पण दोघांकडूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी कंटाळून सुभाषने आवश्यक तेव्हढा दोर खेचून घेऊन त्यानेच मारलेल्या शेवटच्या बोल्टला बांधून टाकला. त्याने आता 'बिलेशिवायच' फ्री मूव्ह केली आणि एका टप्प्यावर थांबून परत एक बोल्ट मारला. या मारलेल्या बोल्टला दोर बांधून सुभाष दोराला धरून (कमांडो पद्धतीने) परत खालच्या बोल्ट वर आला आणि त्याला बांधलेला दोर सोडून मुक्त केला. दोर खालच्या बोल्टपासून मुक्त होताच तो परत दोराला धरून (कमांडो पद्धतीने) वरच्या बोल्टपर्यंत पोहोचला. त्यापुढे आता परत बोल्टिंग करायची होती. सुभाष जेंव्हा दत्ता आणि पुंडलिकला मदतीसाठी हाका मारत होता तेंव्हा ते चक्क कुंभकर्णासारखे झोपले होते. सुभाषने दिवसभरात एकट्यानेच एकूण २० बोल्टच्या साहाय्याने ८० फुटांची चढाई केली होती.
![]() |
| From Aajoba 1991 |
आज सगळेच बेसकॅंपवर होते. शिवाय उद्यापासून किरण, नरेंद्र व इतर चढाईला जाणार होते व उंचीही बरीच वाढली होती. उद्यापासून कदाचित कड्यावरच राहावे लागणार होते, त्यामुळे पुन्हा एकदा बेसकॅंपवर कॅंपफायर करून 'मानसिक बेटरी' चार्ज करून घेतली.
सकाळी नेहमीप्रमाणे उठून नित्यकर्मे आटोपून सर्व साहित्यानिशी बेसकॅंपवरून ठीक ९.३० वाजता किरण, नरेंद्र, दिनेश व आंनंद चढाईच्या ठिकाणावर अर्थात कॅंप १ वर जाण्यासाठी निघाले. शॉर्टकटच्या अवघड वाटेने जाताना नेमके जंगलात वाट चुकले. पुन्हा बेसकॅंपवर हाका मारून मिलिंद व महेंद्रला बोलावून घेतले व त्यांनी या चौघांना बरोबर ११ वाजता कॅंप-१ वर नेउन सोडलं आणि ते दोघे परत बेसकॅंपवर आले. वाटेत येताना ५ लिटरचा पाण्याचा कॅन हातातून सटकून खाली घरंगळत गेला आणि सगळ पाणी सांडल. त्यामुळे आता दिवसभर पाण्याची बोंब होणार होती. आता पर्यंत कॅंप-१ पासून ४७ बोल्ट्स आणि फ्री-मूव्ह करून १७५ फुटांची उंची गाठली होती. त्यांच्यापाशी झुमार नसल्याने कमांडो पद्धतीने दोर पकडूनच काल चढाई थांबवलेल्या ठिकाणापर्यंत जाणे भाग होते (जे कामचलाऊ जुमार बनवले होते ते तकलादू निघाले). फ्री-मूव्ह करण्याची संधी दिसत होती. किरण, पुंडलिक आणि शेखर यापैकी कुणीही तिथे असला कि तो जास्तीत जास्त फ्री-मूव्ह करण्याचा प्रयत्न करतो. किरण शेवटच्या बोल्टवर पोहोचताच फ्री-मूव्ह करत जवळपास ४० फुट वर सरकला, सेकंड मॅन व त्याच्यामधील अंतर वाढल्यामुळे सुरक्षेसाठी तिथेच एक बोल्ट ठोकून त्यातून दोर पास करून आणखी जवळपास ५० फुटांची फ्री-मूव्ह करत वर सरकला. आता अंतर बरेच वाढल्यामुळे सुरक्षेसाठी एक बोल्ट ठोकुन त्यात दोर पास करून पुढे आणखी वीस फुटांची फ्री-मूव्ह केली व सपाट कातळ असल्यामुळे लागोपाठ २ बोल्ट ठोकले. आता तो एका ओव्हरहॅन्गच्या मुळास पोहोचला होता.
त्यामुळे इथून पुढे परत चेन बोल्टिंग करावी लागणार होती. म्हणून किरणने नरेंद्रला वर बोलावून घेतले व पुढची सूत्रे त्याच्या हातात दिली. इथे नरेंद्रने लागोपाठ दोन बोल्ट ठोकले व पुढे फ्री-मूव्हची संधी दिसल्याने त्याने आता किरणला संधी दिली. त्या ओव्हरहॅन्गवर एक सुंदर मूव्ह करत किरणने जवळपास चाळीस फुटांची उंची गाठली आणि नेमका बिलेचा दोर संपला त्यामुळे किरणने समोर असलेल्या एका कपारीत एक पिटोन ठोकून स्वतःला त्यात अडकवून सुरक्षित केले व नरेंद्रकडून दुसरा दोर वर खेचून घेतला आणि त्याच्या साहाय्याने नरेंद्र किरण पर्यंत पोचला. नरेंद्र जवळ पोहोचताच किरण ने परत संधी पाहून फ्री-मूव्ह करत जवळपास आणखी ६० फुटांची उंची गाठत एका लेजवर पोचला. किरणने दोर तेथील एका मोठ्या खडकाला बांधून त्याच्या आधारे नरेंद्रला आपल्यापर्यंत खेचून घेतले. आता कॅंप-१ पासून इथवर खूप उंचावर असल्याने, पुढील चढाईच्या सोयीसाठी नरेंद्रने त्या लेजवरच एक बोल्ट ठोकून कॅंप-२ ची स्थापना केली.
थोडा वेळ आराम करून किरणने परत चाचपणी सुरु केली. त्याच्या अगदी नाकासमोर चाळीसेक फुटांचा सरळसोट रॉकपॅच होता आणि त्याच रेषेत जर चढाई करावी म्हटलं तर आणखी ४-५ बोल्ट ठोकावे लागले असते. ते टाळण्यासाठी किरणला उजव्या बाजूस चढाईसाठी योग्य संधी दिसली. सुमारे ३०-४० फुट उजवीकडे सरकून वर जात पुन्हा डावीकडे ३०-४० फुट याव लागणार होत. एका अरुंद लेजच्या साहाय्याने थोडी कसरत करावी लागणार होती, या गडबडीत काही चूक झाली तर ४० फुटांचा फॉल (Fall) ठरलेलाच, पण तरीही ४-५ बोल्ट ठोकण्याचा वेळ वाचवण्यासाठी धोका पत्करायच ठरवलं व उजवीकडे हळूहळू वर सरकू लागला.
तब्बल अर्धा तास प्रयत्न केल्यावर किरण वर जाण्यात यशस्वी झाला. चढाईच्या सरळ रेषेत येण्यासाठी आता परत डावीकडे ३०-४० फुट यावे लागणार होते. लेज खूपच अरुंद म्हणजे ४-५ इंच ते १ इंचापर्यंत रुंद होती. वाटेत दिसणारे गवत, त्यांचे बुंधे इ. पकडत हातापायांचा सावधपणे उपयोग करीत सुमारे २५ मिनिटात किरण परत चढाईच्या सरळ रेषेत आला. इथे त्याला सुरक्षेसाठी एक बोल्ट ठोकावाच लागणार होता. कारण वर मूव्ह करणे खूप धोक्याचे होते. त्या अरुंद लेज वर स्वतःचा तोल सावरत बोल्ट ठोकायला तब्बल अर्धा तास गेला. बोल्ट ठोकल्यावर त्यात स्वतःला अडकवून घेऊन किरणने स्वतःला सुरक्षित करून घेतलं आणि हे कळताच खाली नरेंद्रने सुटकेचा निश्वास टाकला. एव्हाना संध्याकाळचे ६ वाजले होते त्यामुळे दिवसभराची चढाई थांबवून किरण खाली आताच स्थापन केलेल्या कॅंप-२ वर नरेंद्रपाशी पोहोचला. कॅंप-१ पासून जवळपास ४०० फुट उंचीवर कॅंप-२ ची स्थापना करण्यात आली होती. हे सर्व होईस्तोवर सात वाजले व अंधार पडला होता. खाली आश्रमाजवळ बेसकॅंपवर जावं तर पुरेसा अवधी नव्हता. त्यात ४०० फुट खाली कॅंप-१ वर उतरण्यासाठी पुरेसा दोरही त्यांच्यापाशी नव्हता. तेंव्हा नाईलाजाने आजची रात्र कॅंप-२ वर उघड्यावरच काढावी लागणार होती.
![]() |
| From Aajoba 1991 |
![]() |
| From Aajoba 1991 |
![]() |
| From Aajoba 1991 |
क्रमशः
आजोबा ३००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१ - भाग ३
http://www.misalpav.com/node/31021 - भाग १
http://www.misalpav.com/node/31022 - भाग २
http://www.misalpav.com/node/31024 - भाग ४ अंतिम
तेंव्हा नाईलाजाने आजची रात्र कॅंप २ वर उघड्यावरच काढावी लागणार होती.......................
या दरम्यान दिवसभरात बेसकॅंपवर भरपूर घडामोडी घडत होत्या. दुपारी
कुर्ल्याहून दत्ताचे दोन मित्र तातडीचा निरोप घेऊन आले होते. किरण व
नरेंद्रच्या मदतीस खाली कॅंप-१ वर असलेले दिनेश व आनंद किरणच्या
सल्ल्यानुसार संध्याकाळी पाच वाजता परत बेसकॅंपवर निघून गेले होते, कारण
सुभाष, दत्ता व पुंडलिक आज रात्री कॅंप-१ वर मुक्कामाला येणार होते. सोबत
किरण व नरेंद्रला जेवणपाणी व झोपण्यासाठी चादरी आणणार होते. पण रात्री
त्यांच्यापैकी पुंडलिक व दत्ताच कॅंप-१ वर आले होते. किरणने कॅंप-२ वरूनच
सुभाषबद्दल विचारताच त्याच्या कंपनीत काहीतरी तातडीच काम निघाल्यामुळे तो
उद्या सकाळीच डोंबिवलीला परत जाणार होता. किरण खूपच उद्विग्न झाला, कारण
किरण पाठोपाठ दत्ता आणि सुभाषकडे मोहिमेच नेतृत्व होत. पण किरण कॅंप-२ वर
अडकला होता आणि खाली येण्यासाठी पुरेसा दोरही नव्हता. रोज होत असलेल्या
अतिरिक्त परिश्रमामुळे मानसिक आणि शारीरिक ताण पडत होता. बेसकॅंपपासून
चढाईच ठिकाण अर्थात कॅंप-१ जवळपास २ तासावर होता, त्यातच कॅंप-१ जवळ
पाण्याची कुठलीही सोय नव्हती, त्यामुळे बेसकॅंपवरूनच पाणी वाहून न्यावे
लागत होते. या सर्व परिश्रमामुळे सगळ्यांचेच हाल झाले होते.
खाली दत्ता आणि पुंडलिकने किरण व नरेंद्र साठी जेवणपाणी आणि झोपण्यासाठी
चादरी आणल्या होत्या. पण आज सर्व काही असूनही किरण व नरेंद्रला त्यांचा
काहीच उपयोग नव्हता.
कॅंप-२ वरून खाली कॅंप-१ वर उतरण्यास त्यांच्याकडे पुरेसा दोर नसल्याने हे सर्व साहित्य वर खेचून घेऊ शकत नव्हते. टप्प्या-टप्प्याने ते उतरू शकले असते कारण मार्गात मध्ये बोल्ट ठोकलेले होतेच पण काळोख झालेला असल्याने तो धोका पत्करण्यात आला नाही.
किरण व नरेंद्रकडे सुकामेव्याची १०० ग्रामची दोन पाकीट होती व पाण्याची एक बाटली होती. दिवसभराच्या अथक परिश्रमानंतर पोट जाळण्यासाठी फक्त सुकामेवा, त्याच्यावरच थंडीमध्ये कुडकुडत उघड्यावरच संपूर्ण रात्र काढावी लागणार होती. हा मोहिमेतला दुसरा उघड्यावरचा मुक्काम (Bivouac) होता. दिवसभर उपाशीपोटी चढाई केल्यामुळे भूक तर प्रचंड लागली होती. प्रथम सुकामेवा खाऊन त्यावर पाणी पिऊन ‘जेवण’ संपवले. पाणी पिऊन पोट भरावे तर पुरेस पाणी सुद्धा जवळ नव्हत. कारण अवघे दीड लिटर पाणी त्याच्यावर पूर्ण रात्र व कदाचित उद्याचा दिवसही काढावा लागणार होता. थंडी असल्यामुळे जास्त तहान लागत नव्हती हेच त्यातल्या त्यात समाधान. कारण कॅंप-१ वरून दत्ता व पुंडलिक जोवर कॅंप-२ वर येत नाहीत तोवर आम्हाला काहीच मिळणार नव्हते.
हळूहळू रात्र वाढू लागली. सोबत थंडीही कारण आम्ही उंच कड्यावर उघड्यावर होतो. तिन्ही बाजूंनी गार वारा सुटला होता त्यामुळे थंडी आणखीनच वाढली. उब निर्माण करण्यासाठी अंगावरच्या कपड्यांशिवाय काहीच नव्हत. किरणच्या अंगावर फुल बाह्याचे दोन शर्ट होते, तर नरेन्द्रकडे दोन हाफ शर्ट होते. किरणने एक फुल बाह्यांचा शर्ट नरेंद्रला दिला व त्याच्याकडील एक हाफ बाह्यांचा शर्ट स्वतःसाठी घेतला. थोडावेळ बर वाटलं पण तेव्हढ्यापुरतंच. बराच वेळ दोघेही एकमेकांशी बोलत बसूनच होतो. आम्ही बूट न घालता अनवाणीच चढाई करीत असल्याने हातांपायांची उघडी बोट गारठून बधीर झाली होती. पण रात्र वाढू लागल्यावर दातही कडकडू लागले, त्यामुळे गप्पाही बंद झाल्या. हातावर हात घासून तात्पुरती उष्णता निर्माण केली. इतक्यात किरणला काहीतरी आठवले, त्याने कॅमेऱ्याची बॅग उघडून कॅमेरा बांधायचे दोन पिवळे डस्टर्स काढले. एक नरेंद्रने आणि दुसरा किरणने आपल्या डोक्याला बांधला. दोन प्लास्टिकच्या पिशव्या काढून डोक्यात घालून खालपर्यंत ओढून घेतल्या. जास्त लांब नसल्यामुळे त्या मानेपर्यंत पोचल्या पण घट्ट असल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे थोड थांबून पिशवी वर उचलून मोकळा श्वास घ्यावा लागे. काडीचा आधार मिळाला होता. एकमेकांच्या अंगावर पाय टाकून व शर्टच्या आत हात घालून दोघेही झोपण्याचा प्रयत्न करू लागलो. पण झोप कसली येतेय, नुसतेच वेळ संपण्याची वाट पाहत होतो. बराच वेळ झाला अस वाटून घड्याळ पाहिलं तर रात्रीचे आठच वाजत होते. बापरे! अजून तब्बल १०-१२ तास घालवायचे होते. या कल्पनेनेच अंग शहारून निघाल. मध्येच नरेंद्रने आजुबाजूच गवत उपटून जमा केल व ते पेटवून दोघेही हातापायांना शेक देऊ लागलो.
पण शेकोटी संपताच थंडी जास्तच जाणवू लागे. म्हणून तोही प्रयत्न सोडून दिला. पुन्हा कड्यावर बसून सभोवतालचा परिसर पाहू लागलो. नुकतीच अमावस्या होऊन गेली होती. आकाशात सर्वत्र चांदण्यांचा मंद प्रकाश पसरला होता. बहुतेक घाटघर-साम्रद परीसर असावा. डावीकडे मात्र दिव्यांचे बरेच पुंजके दिसत होते, त्याही डावीकडे मोठा हॅलोजनचा प्रकाश पडला होता, कदाचित एखादा कारखाना असावा. त्या उजेडाकडे पाहताना उगीचच अंगात उब आल्यासारखी वाटली. खाली आश्रमाजवळ आमच्या बेसकॅंपमध्ये पेट्रोमॅक्सचे दोन्ही दिवे पेटल्याने बराच भाग प्रकाशित झाला होता. परत घड्याळाकडे पाहिले तर नऊच वाजत होते. सुर्योदयासाठी अद्याप दहा तास वाट पहायची होती. वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. टाईमपास म्हणून पुन्हा गवत पेटवून शेकवून घेण्याचा प्रयत्न केला. मध्येच कधीतरी ओबडधोबड दगडावर आडवे झालो आणी डोळा लागला न लागला तोच वरून लहान लहान दगड खाली पडायला लागले. झोप ती काही लागली नाहीच. अक्षरशः तास/मिनिटे/सेकंद अशा अंतराने घड्याळ पाहत असतानाच पूर्वेकडे तांबड फुटायला लागलं आणि जिवात जिव आला. एखाद्या गोष्टीची वाट पाहण म्हणजे काय ते त्या कालच्या रात्रीने आम्हाला शिकवलं होत.
सकाळी ६ वाजताच दोघांनी हालचाल केली. थोड गवत जमा करून प्रथम अंग शेकून घेतलं व दत्ता व पुंडलिक कॅंप-१ वरून कॅंप-२ वर येण्याची वाट न पाहताच सकाळी ठीक ७ वाजता उपाशीपोटीच चढाईला सुरुवात केली. काल शेवटचा बोल्ट मारला तेथपर्यंत दोर पकडून पोहोचणे आवश्यक होते. हातही गारठून गेले होते. तरीही किरण अनामिक उत्साहाने ‘झुमार’ नसल्याने कमांडो पद्धतीने दोर नुसताच धरून त्या ओव्हरहॅन्गच्यावर काल मारलेल्या शेवटच्या बोल्टपर्यंत जाण्यात सफल झाला. फ्री-मूव्ह करण्यास संधी नसल्याने किरणने एक बोल्ट ठोकला व त्यात दोर पास करून त्याने पुढे चाळीस फुटांची उंची गाठली. त्याचा मदतनीस नरेंद्र खाली कॅम्प-२ वरच्या लेजवरूनच किरणला बिले देत होता. उंची वाढल्याने किरणने सुरक्षेसाठी आणखी एका बोल्टची भर घालून त्याच्यापुढे फ्री-मूव्ह करीत परत चाळीसेक फुटांची उंची गाठली. उंची आणखी वाढल्याने आता त्याला मदतनीस त्याच्याजवळ हवा होता. लागलीच त्याने नरेंद्रला वर येण्यास सांगितले. कमांडो पद्धतीने दोर नुसताच पकडून त्या ओव्हरहॅन्गच्या वर येताना नरेंद्रचा हात चांगलाच खरचटून रक्तबंबाळ झाला. त्याला खालून बिले देण्यासाठी कॅम्प-२ च्या लेजवर कोणीच नव्हते. जखमी झाल्यामुळे नरेंद्र बिलेच्या सुरक्षेशिवाय किरण पर्यंत पोहोचू शकत नव्हता. त्यातच किरणने दोर वर खेचून घेतला होता. स्वतःवरच चरफडत किरणने नरेंद्रला उगीचच बोल लावले. मुंब्य्रात सराव करायला नको वगॆरे…… खरतर चूक किरणचीच होती, फ्री-मूव्ह करण्याच्या नादात दोर खूपच वर खेचून घेतला होता.
शेवटी किरणने दोलायमान स्थितीतच बोल्टिंग करण्याचा निर्णय घेतला, पर्यायही नव्हता. अक्षरशः जिवावर उदार होऊन किरणने सावधपणे पायांच्या आधारावरच पालीप्रमाणे कड्याला चिकटून दोन्ही हात सोडून हातोडीचे घाव घालायला सुरुवात केली. बरे, हात जास्त बाहेर काढून हॅमरींग करणे शक्य नव्हते, अन्यथा तोल जाऊन जवळपास १२५ फुटांचा फॉल निश्चित होता तो हि थेट नरेंद्रपाशीच कॅंप २ वर. फक्त कोपरात उरलेली सगळी ताकद एकवटून २५ मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर किरण बोल्ट ठोकण्यात यशस्वी झाला. सर्प्रथम त्या बोल्ट मधून दोर पास करून स्वतःला सुरक्षित करून घेतले.
![]() |
| From Aajoba 1991 |
एव्हाना ९ वाजले होते. कॅंप-१ वर दत्ता व पुंडलिक कुंभकर्णी झोपेतून उठले होते. तेंव्हा किरणने त्या बोल्टला दोर बांधून त्या दोराच्या साहाय्याने रॅपलिंग करत नरेंद्रपाशी कॅंप-२ वर उतरला. कॅंप-१ वर असलेल्या दत्ता आणि पुंडलिकला आता सामानासहित कॅंप-२ वर घेणे आवश्यक होते. किरण खाली पोहोचताच नरेंद्रची चौकशी केली, त्याचा हात चांगलाच खरचटला होता, किरणने मघाशी त्याच्यावर भडकल्याबद्दल माफी मागितली. वास्तविक नरेंद्रच्या जागी दुसरा कुणीही असता तरी वर येऊ शकला नसता कारण पूर्ण एक दिवसाचा उपास, रात्री धडपणे झोप नाही, प्यायला पुरेसे पाणी नाही अशा परिस्थितीत जवळपास ३६ तास काढले होते. आणि तशातच थंडीने हात गारठून दोर हाताच्या पकडीत येत नव्हता हे विशेष!
तसही जखम होण्याची हि काही पहिलीच वेळ नव्हती, अशा अनुभवांना या आधीहि सामोरे गेलो होतो, त्यामुळे ती जखम कुरवाळत न बसता नरेंद्र परत जोमाने कामाला लागला. नरेंद्रला कॅंप-२ वरच ठेवून किरण उपलब्ध दोराच्या साहाय्याने रॅपलिंग करत जवळपास १०० फुट खाली एका बोल्टवर लटकत थांबला. दरम्यान पुंडलिक खालून नवीन दोर सोबत घेऊन आधी मारलेल्या बोल्टच्या साहाय्याने किरणच्या दिशेने निघाला. पुंडलिक जवळ पोहोचताच, किरण त्याच्याकडून नवीन दोर घेऊन परत वर कॅंप-२ च्या दिशेने निघाला. कॅंप-२ वर पोहोचताच किरण व नरेंद्रने दोराच्या साहाय्याने सर्व सामान वर खेचून घेण्यास सुरुवात केली. जवळपास दीडेकशे किलो साहित्य व खाण्याचे सामान कॅंप-२ वर खेचून घेण्यात आले.
या सर्व उपद्द्व्यापात दुपारचे तीन वाजले. सर्वात शेवटी दत्ता व पुंडलिक कॅम्प-१ सोडून कॅंप-२ वर आले. क्षणभर विश्रांती घेतानाच खाली शैलेश व कुट्टी बेसकॅंपवरून आमच्यासाठी जेवण घेऊन येताना दिसले. परत जेवण घेण्यासाठी खाली उतरावे लागले. दोन दिवसांच्या उपाशीपोटी परिश्रमानंतर शरीर व मन दोन्ही थकली होती. नरेंद्र व किरण तर जवळपास ३६ तासांनंतर जेवत होते.
शरीराला थोडावेळ कुठे आराम मिळत होताच तो आलेल्या बातम्यांनी मनाचा आराम पार उडून गेला. दत्ता व पुंडलिक व शैलेश/कुट्टी यांनी बेसकॅंपवरून आणलेल्या ताज्या बातम्या ऐकून मन सुन्न झाल. पण जे समोर आल होत ते स्विकारण अपरिहार्य होत. त्यात आता काहीच बदल घडू शकत नव्हता. या विषयावर रात्री सविस्तर विचार करू अस म्हणून आम्ही परत चढाई करण्यासाठी सज्ज झालो. किरण त्याने शेवटी मारलेल्या बोल्टवर परत पोहोचला. यावेळेस दत्ताला बिलेसाठी सोबत घेतलं. किरणने दत्ता त्याच्या जवळ पोहोचताच फ्री-मूव्ह करत जवळपास ६० फुटांची उंची गाठली. सुरक्षेसाठी तेथेच एक बोल्ट मारून दत्ताला तिथे बोलवून घेतले. दत्ता तिथे पोहोचताच परत किरणने फ्री-मूव्ह करत आणखी १०० फुटाची उंची गाठली. आता तो आजोबाच्या मुख्य कड्याच्या पायथ्याशी पोहोचला होता. वर नजर फिरवताच त्या कड्याच्या भव्यतेने त्याचे डोळेच दिपले. दोन्ही बाजूना दूरवर पसरत गेलेल्या आजोबाच्या लांबलचक कडा पाहताना डोळ्यांमध्ये काय साठवू आणि काय नको असे झाले होते. जवळ जवळ हजार फुटांचा ताशीव कडा उभा होता. व सर्वात आश्चर्य व आव्हानात्मक गोष्ट म्हणजे शेवटच्या टप्प्यात ५००-६०० फुट उंचीवर मुख्य कड्यापासून ९० अंशाच्या कोनात बाहेर आलेलं एक अभेद्य दगडी छत आमची वाट पाहत होत. ते छत आता दिसायचं कारण कि तो वरचा भाग कायम धुक्यात असायचा. शिवाय आमच्या चढाईच्या मार्गापासून दूर उजवीकडे होता म्हणून आतापर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष झाल होत. आता ते दिसल्यामुळे आमच्या तावडीतून सुटण शक्य नव्हत. या आधी आम्ही १९९० मध्ये पांडवकडा धबधबा येथील ३५ फुटी दगडी छत लीलया पादाक्रांत केल होत. पण ते जमिनीपासून खूपच जवळ होत. इथे मात्र त्याच्या अगदी उलट चित्र होत. हे दगडी छत जमिनीपासून सुमारे ३५०० फुट उंचीवर होत. त्यासाठी किरण आणि दत्ताने तिथेच बसून त्याचा निट अभ्यास केला व दोघांमध्ये चर्चा करून आमच्या आतापर्यंतच्या चढाईच्या मार्गापासून उजवीकडे सुमारे १०० फुट लांब आमचा चढाई मार्ग बदलला.
![]() |
| From Aajoba 1991 |
संध्याकाळचे ६ वाजले होते. दरम्यान किरण व दत्ताने पाण्याच्या शोधात कड्यावरील आजूबाजूचा परिसर पिंजून काढला. एके ठिकाणी खडकावर थोडासा ओलसर भाग दिसला म्हणून फ्री मूव्ह करत ७० फुट उंच त्या खडकापर्यंत पोचले. तेथील ओलसर खडक हातोडीच्या साहाय्याने फोडून काढला पण त्यातून पाण्याचा एक थेंबही ठिबकेना. पाण्याचा एक थेंब जरी ठिबकत असता तरी दिवसभर चार ते पाच लिटर पाणी सहज जमल असत. आजोबाच्या कड्याने जणू आमची परीक्षा घ्यायचीच ठरवलं होत. अतिशय कष्टी मनाने परतायचा निर्णय घेतला. उद्या डावीकडचा परिसर पाहू तिथे पाणी नक्कीच मिळेल हि मनाशी आशा बाळगून ते दोघेही रॅपलिंग करत रात्रीच्या मुक्कामा साठी कॅंप-२ वर दाखल झाले. त्यांचे दोघांचेही चिंताग्रस्त चेहरे पाहून पुंडलिक व नरेंद्र बरेच काही जाणून गेले.
संध्याकाळी ७ वाजताच जेवायला बसलो. अंधार पडल्यावर जेवण शक्य नव्हत कारण बेसकॅंपसारखी इथे दिव्यांची सोय नव्हती. सोबत असलेली मेणबत्ती/काडेपेटी आणीबाणीच्या प्रसंगात जपून ठेवणे आवश्यक होत. जेवताना कुणीच एकमेकांशी बोलत नव्हत. पण प्रत्येकाच्या मनात पाण्याचा प्रश्न थैमान घालत होता. आता जवळ असलेल दोन ते अडीज लिटर पाणी उद्या संध्याकाळपर्यंत पुरवायच होत. जेवण करून प्रथम जमिनीवरचे दगडगोटे साफ करून बऱ्यापैकी जागा समान करून घेतली. काल उघड्यावर काढलेल्या रात्रीच्या आठवणीवर आज मात्र घोंगडीच्या उबदार स्पर्शाने मात केली होती. रात्री झोपताना दिवसभराचा आढावा घेण जरुरी होत.
समजलेल्या बातमीनुसार सुभाष कंपनीतून तातडीचे बोलावणे आल्यामुळे परत घरी जाणार होता. पण अजून किती जण घरी जाणार आहेत हे मात्र माहित नव्हत. दुपारी शैलेश व कुट्टी जेवण घेऊन आले तेंव्हा सर्व स्पष्ट झाले. सुभाष, महेंद्र, दिनेश, मिलिंद, पटेल, अशोक शिबे असे एकूण सहाजण झटकन कमी झाले होते. बेसकॅंपवर आता फक्त नंदू, कुट्टी, शैलेश व बालाजी असे चौघेजणच शिल्लक होते. वास्तविक पाहता प्रत्येकजण बेसकॅंप ते कॅंप १ अशी वर-खाली ये-जा करून कंटाळला (चार तास) होता, आणि महत्वाचे म्हणजे सर्व मनातून घाबरले होते. अर्थात ती वाट पण भयानक होती. महेंद्रची रजा संपली होती. पटेलला कंपनीच्या कुठल्यातरी ट्रेकला जायचे होते. दिनेशचा धंदा होता, त्यामुळे तो बुडवण शक्य नव्हत. मिलींदची १५ दिवसांची सुट्टी होती, पण तोही थकला होता. अशोक तर आमचा सारथी त्याचाही स्वतःचा धंदा होता, तसाही तो मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी होत नसे. पण आमच्यासाठी त्याची गाडी कायमच उपलब्ध असे.
आनंदला गावी जाणे आवश्यक होते. याच्या विरुद्ध परिस्थिती होती दत्ता आणि शैलेशची. शैलेशच्या बहिणीचे लग्न ठरले होते व त्याची सर्व तयारी त्यालाच करायची होती. त्याही पेक्षा वाईट परिस्थितीत दत्ता अडकला होता. या क्षेत्राशी निगडीत नसलेले त्याचे दोन मित्र खास निरोप घेऊन कुर्ल्याहून आले होते. त्याची आई आजारी पडली होती व घरी तिला पाहायला दत्ताशिवाय दुसर कोणीही नव्हत. खरतर असा निरोप मिळाल्यावर एखादा सरळ घरी पळत सुटला असता. पण तो किरणला भेटून परिस्थिती कथन करण्यासाठी २ दिवस थांबला होता. दुसऱ्या दिवशी काळजावर दगड ठेवून सामान वर चढवण्याच्या कामास लागला पण किरणला काहीच कळू दिले नाही. सर्व स्थिरस्थावर झाल्यावर रात्री त्याने किरणकडे विषय काढला. म्हणजे आता किरणचे दोन खंदे वीर सुभाष आणि दत्ता मोहिमेत नसणार होते. शेवटी प्रत्येकाचे हातावर पोट असल्याने कोणाला थांबवूही शकत नव्हतो.
कॅंप-१ वर दत्ता आणि पुंडलिक उद्या हि बातमी किरणला कशी सांगायची या काळजीने त्यांना ग्रासले होते. खरेच एका रात्रीत संपूर्ण परिस्थिती कशी बदलली होती! बेसकॅंपवर उरलेल्या शैलेश, नंदू व कुट्टी व बालाजीला काय करावे तो प्रश्न पडलेला. शेवटी आम्ही चर्चा करून करून कंटाळलो. काय व्हायचे असेल ते होवो उद्या आपण सकाळी आपला दिनक्रम सुरूच ठेवायचा. किरण व पुंडलिक ने उद्या पाणी शोधायला निघायचे तर दत्ता व नरेंद्रने कॅंप २ वरून सामान अजून वर चढवून आज चढाई थांबवलेल्या कड्याच्या पायथ्याशी नेउन ठेवायचे. जर त्यांना जवळपास पाणी मिळाले तर त्याच्या आधारे उरलेली चढाई किरण, पुंडलिक व नरेंद्रने पूर्ण करायची. जेवणासाठी आमच्याकडे कॅंप २ वर असलेले खजूर, सुका मेवा, ग्लुकॉन डी ई. वापरायचे. त्यामुळे आता बेस कॅंप वर अवलंबून राहावे लागणार नव्हते. अशी मनाची तयारी करून आम्ही रात्री कड्यावरच झोपी गेलो. हा कड्यावरील उघड्यावरचा ४ था मुक्काम (Bivouac) होता.
![]() |
| From Aajoba 1991 |
![]() |
| From Aajoba 1991 |
सकाळी उठून पाण्याची १ बाटली व सुका मेवा घेऊन किरण व पुंडलिक काल ठरवल्याप्रमाणे पाण्याच्या शोधात निघून गेले. तर नरेंद्र व दत्ता कॅंप-२ वरून सामान वर आणण्याच्या कामाला लागले. किरण व पुंडलिक डाव्या हाताला फ्री-मूव्ह करत वर वर सरकत कड्याच्या पायथ्याशी पोचले व तेथून डावीकडे नेढ्याच्या दिशेने निघाले. वाटेत सापाने नुकत्याच टाकलेल्या ३ काती मिळाल्या. म्हणजे एव्हढ्या उंचावरसुद्धा साप आमची पाठ सोडणार नव्हते. सावधपणे सरकत दोघेही मिलिंदने सांगितल्याप्रमाणे नेढ्यापाशी पोचले. तेथील परिसर हिरवागार दिसत होता. तो पाहताना १००% पाणी मिळेल हि खात्री पटली. पण तो आनंद थोडाच वेळ टिकला कारण जंग-जंग पछाडूनही पाण्याचा कुठेही मागमूस नव्हता. निराश मनाने नेढ्यावरून डावीकडे सरकलो. डावीकडे आजोबाचा सुमारे ३ हजार फुटी विस्तारीत कडा दिसत होता, त्यापलीकडे तसाच कात्राबाईचा कडा होता व दोघांच्यामध्ये असलेल्या खिंडीतून कुमशेत गाव सुमारे १५/२० मिनिटाच्या अंतरावर आहे, असे मिलिंदनेच आम्हाला सांगितले होते. त्यामुळे कड्याच्या पायथ्याशी खिंडीपर्यंत जाऊन वाटेत पाणी नाही मिळाले तर खिंडीत वरच्या बाजूस पाणी १००% मिळणारच होते, पण ते ठिकाण आमच्या चढाईच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल ते महत्वाचे होते व हा एकच मार्ग सध्या आमच्या समोर होता. दोघेही नेढ्यावरून जवळपास ५० फुटी रॉकपॅच उतरून जंगलात पोचले. डावीकडे कारवीची दाट झाडी तर उजवीकडे उंच कडा यांच्या मधून वाट काढत दोघेही चालले होते. प्रत्येक पावलागणिक वाट तयार करावी लागत होती. इतक्यात पुंडलिकच्या पायाखालून एक पिवळा जर्द सर्प सळसळत खाली जाऊन दिसेनासा झाला. आता दोघांनीही कड्याच्या पायथ्यापासून वरच्या बाजूला चढण्यास सुरुवात केली. कारण शुक्रवारी नरेंद्र, किरण व कुट्टी खालच्या भागातूनच पाण्याच्या शोधात खिंडीत पोचले होते व तेथे कुठेच पाणी सापडले नव्हते. कड्याच्या माथ्यावर पोहोचून सभोवार नजर फिरवली तर समोर साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर काळ्या दगडांच्या मध्ये खड्डया खड्ड्यातून साचलेले पाणी नजरेस पडले. पण संपूर्ण मार्ग कारवीच्या दाट झाडीने गच्च झाला होता. पण त्यातूनच जाणे योग्य होते. पुन्हा चढलेल्या वाटेनेच खाली उतरलो व कारवीच्या रानात घुसलो. दोन्ही हातानी कारवी बाजूला सारत अक्षरशः रांगतच आम्ही पुढे सरकत होतो. तब्बल अर्धा तास या पद्धतीनेच पुढे सरकल्यावर आम्ही मोकळ्या जागी पोचलो. नंतर जरा उजवीकडे सरकून खाली उतरणारा एक रिकामा ओढा पकडला व त्यातून पुढे सरकून सुमारे १५ मिनिटात दोघेही वरून पाहिलेल्या पाण्याच्या जागी पोहोचलो. तब्बल ४ दिवसानंतर पाण्याचा एव्हढा साठा पाहून उड्याच मारायला लागलो.
| From Aajoba 1991 |
![]() |
| From Aajoba 1991 |
हावरटासारखे घटाघटा पाणी पिउन घेतले. दमल्याने अर्धा तास तिथेच आराम केला. इतके पाणी पाहिल्यानंतर पुन्हा आलेल्या मार्गानेच माघारी फिरलो. सकाळी नेढ्यातून इथे येतांना नेढ्याच्या आतमध्ये जायचे राहिले होते, तेंव्हा आता नेढ्यात प्रत्यक्ष शिरून तिथेही पाणी आहे का याचा मागोवा घेतला. तेथे पाणी नसल्याची खातरजमा केल्यावर साधारणपणे ३ वाजता किरण व पुंडलिक दोघेही आमच्या चढाईच्या ठिकाणावर अर्थात कॅंप २ च्या वर पोचले होते. एक कॅन पाणी आणण्यासाठी पाच तास लागले होते. म्हणजे पाण्याच्या या मार्गाचा अवलंब पुढील काळात शक्यच नव्हता. कारण सहकाऱ्यांची अनुपस्थिती! दरम्यान किरण व पुंडलिक पाण्याच्या शोधत गेल्यावर इथे नरेंद्र व दत्ताने सर्व सामान कॅंप २ पासून वर चढवून कड्याच्या पायथ्याशी व्यवस्थित रचून ठेवले होते.
दुपारी जेवण घेऊन शैलेश, शेखर, नंदू आले होते. आज नशिबाने २ सहकारी वाढले होते. चढाई टीमचा शेखर फाटक व बेसकॅंपवरील अनिल इमारते. पण दोन दिवसांनंतर दत्ता, शैलेश व बालाजी परत जाणार होते. शेवटी हिशोब एकच होणार होता. उलट एक माणूस कमीच होणार होता. बेसकॅंप पासून चढाई करत सुमारे १८०० ते २००० फुट उंचीवर पोहोचलो होतो. अद्याप जवळपास १००० फुटी चढाई शिल्लक होती. बेसकॅंप पासून कॅंप-१ चे अंतर सुमारे ८००-१००० फुट. कॅंप-१ पासून कॅंप-२ मधील अंतर सुमारे ३०० फुट. आणि आता जिथे आम्ही होतो त्या कड्याचा पायथा ते कॅंप-२ चे अंतर ७०० फुट होते. पुढील चढाई सुरु ठेवण्यासाठी बेसकॅंपवर कमीत कमी चार सहकारी, कॅंप-१ वर दोन सहकारी, कॅंप २ वर दोन सहकारी व त्याच्यावर दोन सहकारी असे एकूण दहा सहकारी आवश्यक होते. शिवाय चढाई टीममध्ये ४ सदस्य आवश्यक होते. इथे तर बेरीज वजाबाकी केल्यावर आम्ही फक्त सातच जण उरलो होतो. या परिस्थितीत पुढील चढाई थांबवणे हा एकाच पर्याय डोळ्यासमोर दिसत होता. अक्षरशः डोळ्यात पाणी आले.
प्रस्तरारोहण सुरु केल्यापासून गेल्या ७-८ वर्षांच्या कालावधीत हि पहिलीच मोहीम अर्धवट राहण्याची चिन्ह दिसत होती. पुढे काहीच मार्ग दिसत नसल्यामुळे सल्लामसलत करून दुःखी अंतकरणाने शैलेश, नरेंद्र, शेखर यांना परत बेसकॅंपवर पाठवून दिले. आम्ही चढाई स्थगित करतोय या जाणिवेनेच मेल्याहून मेल्यासारखे झाले.
चढाई स्थगित करण्याचे मुख्य कारण पाणी. पाणी आणण्यासाठी व जेवण पुरवण्यासाठी माणसांची गरज होती. कड्यावर चढवलेले सामान उद्या परत जवळपास १००० फुट खाली कॅंप-१ वर उतरावयाचे होते व तेथून चढ उतारावर २ तासांची पायपीट करून बेसकॅंपला पोहोचवायचे होते. सोबत कड्यावर आतापर्यंत ठोकलेल्या ६३ बोल्टमधून जागोजागी अडकवलेले साहित्य काढणे हे एक काम होतच. रात्री जेवताना कोणाचच चित्त थाऱ्यावर नव्हत, ते कधीच कडयावर वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यासोबत अस्पष्ट दिसणाऱ्या क्षितिजापलीकडे उत्तरं शोधण्यास निघून गेल होत. अजूनही चढाई स्थगित करण्यास मन धजावत नव्हत. असंख्य प्रश्नांची उत्तर सापडत नव्हती.
रात्रीच्या आसमंतात विखुरलेल्या चांदण्या पाहतांना किरणच्या मनात एक आशेचा किरण चमकून गेला. परवा पुंडलिक व किरण पाणी आणण्यासाठी गेले होते तेंव्हा त्यांना पाणी मिळाले होते तेथून आजोबाच्या माथ्यावर जाण्यासाठी आणखी एक तास लागला असता. शिवाय गड असल्याने माथ्यावर पाणी मिळण्याची शक्यता होती. फक्त त्यासाठी आश्रमाजवळील बेसकॅंपचा गाशा गुंडाळून तो थेट आजोबाच्या माथ्यावर हलवावा लागणार होता. किरणने हा विचार नरेंद्र व पुंडलिकला सांगितला. तर त्यांच्याही मनात नेमके तसेच विचार चालू होते. त्यामुळे त्वरित होकार आला. आशेचा किरण दिसल्यावर झोपही चांगली आली.
सकाळी उठल्याबरोबर किरण व नरेंद्रने खाली कड्यावर ठोकलेल्या बोल्टला लटकत असलेले सामान काढण्यास सुरुवात केली. तर पुंडलिक व दत्ताने सामान खाली कॅंप-१ वर उतरावयास सुरुवात केली. त्यांचे काम सुरु असतानाच शैलेश, नंदू व कुट्टी कॅंप-१ वर आले होते. अवघड जागी स्वतःला अडकवून हळूहळू सर्व सामान कॅंप-१ वर आणले. उपस्थित ८ जणांनी प्रत्येकाला जास्तीत जास्त जमेल तेव्हढे सामान उचलून बेसकॅंपच्या दिशेने कूच केली. बेसकॅंपवर रामेश्वरबाबा गावचे कोतवाल श्री. सुकऱ्या यांच्या बरोबर आमची वाटच पाहत होते. सलग तीन रात्री आम्ही कड्यावरच असल्याने रामेश्वरबाबांनी काळजी वाटून कोतवालांना पाचारण केले होते. कडाक्याची थंडी, बोचरे वारे व रानातील जिवजंतू यातून सुटून परत सुखरूप आलेले पाहून त्यांनाही समाधान वाटले.
हिच संधी साधून किरणने त्यांच्याशी पाण्याचा विषय काढला. रामेश्वरबाबा आणि कोतवालांनी माथ्यावर पाणी असल्याचे सांगितले. बेसकॅंपवर उरलेल्या इतर सहकाऱ्यांना सर्व योजना समजावताच सर्वांचा एकसाथ होकार आला. मोहीम अर्धवट सोडून नंतर पुढे म्हणजेच मार्चमध्ये पुन्हा येउन पूर्ण करण्यापेक्षा आजोबाच्या माथ्यावर बेसकॅंप स्थापून तिथूनच त्याचे नियंत्रण करायचे. सगळ्यांनाच हुरूप आला, काही झाले तरी आता मोहीम अर्धवट न सोडण्याचा संकल्प केला.
आजोबाच्या माथ्यावर जाण्यासाठी आम्ही योजना तयार केली. दहा दिवसांच्या
धावपळीमुळे सर्व सहकारी अतिशय थकलेले होते. म्हणून सर्व सामान टेंपोमध्ये
घालून आजोबाच्या माथ्यापासून जवळचे गाव कुमशेत येथे न्यायचे. (आजोबा
पायथा-आसनगाव-इगतपुरी-भंडारदरा-राजूर मार्गे). गाडी सोबत दोन सहकारी जातील
तर उरलेले सहकारी कात्राबाई व आजोबा यांच्यामध्ये असलेल्या खिंडीतून चालत
कुमशेत गावी पोहोचतील. तेथून सर्व सामान पाठीवर वाहून आजोबाच्या माथ्यावर
स्थापन करणार असलेल्या नियोजीत बेसकॅंपवर न्यायचे. सध्याचा बेसकॅंप
आजोबाच्या पायथ्याला होता, तर नियोजित बेसकॅंप थेट त्याच्या माथ्यावर होणार
होता. पण रस्त्यावरून जावयाचे म्हटले तर अंतर १५० किमी होत. त्यापैकी
राजूर ते कुमशेत खडीचा कच्चा रस्ता होता. परत यासाठी टेंपो मिळवणे हि अवघड
होणार होत. आता हे सर्व करण्यासाठी आमच्यासमोर एकच व्यक्ती उभी राहिली.
अशोक शिबे! कारण कित्येकदा अडी-अडचणीच्या वेळी ओबडधोबड कच्च्या घाट
रस्त्याने स्वतःची जीप नेऊन त्याने आमचे सामान पोचवले होते, तेही
विनामूल्य! केवळ त्याच्याच भरवशावर आम्ही हा निर्णय घेतला, पण त्यासाठी परत
डोंबिवलीला जाणे क्रमप्राप्त होत.
सगळ्यांची जेवण झाल्यावर रात्री ११ वाजता किरण डोंबिवलीला जाण्यास निघाला
तर सोबत दत्ता व बालाजी परत घरी जाण्यास निघाले. अशा रीतीने सुभाष पाठोपाठ
मोहिमेचा दुसरा नेताही घरी निघाला. किरण व सहकारी १२ वाजता डेहणे गावात
पोचले. तेथे रात्री मुक्कामाची बस हजर होतीच, तिच्यातच जाउन झोपलो मनात
अनेक शंका-कुशंकाचे जाळे घेऊनच.
सकाळी बसने शहापूर-आसनगाव असा प्रवास करून किरण दहा वाजता डोंबिवलीला
पोचला. प्रथम अशोकला फोन करून तो ओफिसमध्ये असल्याच पक्क केल आणि त्याला
कुठेही जाऊ नकोस असा निरोप दिला. आंघोळ करून फ्रेश होताच दारात अशोक आणि
अनिल दगडे दोघेही उभे! मित्राचे लग्न आटोपून अनिल परत आल्यावर तब्येत
बिघडल्यामुळे परत मोहिमेमध्ये सामील होऊ शकला नव्हता. त्यातच अशोकला मी फोन
करून बोलावल्याचे त्याला कळल्यावर काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाल्याने
अनिलसुद्धा तातडीने अशोकबरोबर किरणला भेटायला आला. किरणकडून सर्व हकीकत
कळल्यावर अशोक मदतीस लगेच तयार झाला. अशोकने महेंद्र साटमला हि घरी निरोप
पाठवला होता. दरम्यान किरण परत घरी आल्याचे कळल्यावर सुभाष त्याला भेटायला
आला आणि परत मोहिमेवर निघण्याच्या तयारीला लागला.
जुमार कशाला हवा
![]() |
| From Aajoba 1991 |
![]() |
| From Aajoba 1991 |
क्रमशः
आजोबा ३००० फुटी कातळभिंत - चित्तथरारक चढाईची साहसगाथा- १९९१ - भाग ४ (अंतिम)
http://www.misalpav.com/node/31021 - भाग १
http://www.misalpav.com/node/31022 - भाग २
http://www.misalpav.com/node/31023 - भाग ३
दरम्यान किरण परत घरी आल्याचे कळल्यावर सुभाष त्याला भेटायला आला आणि परत मोहिमेवर निघण्याच्या तयारीला लागला...............................
रात्री ठीक १२ वाजता डोंबिवलीहून अशोकच्या जीपने अशोक, किरण, अनिल, संजय रेडकर, बालाजी, व सुभाष निघालो. साधारण साडेतीनच्या सुमारास आजोबाच्या पायथ्याशी अर्थात बेसकॅंपवर पोचलो.
सकाळी सामानाची बांधाबांध करून जीपमध्ये चढवले व किरण, अनिल दगडे व अशोक दुपारी दोन वाजता आजोबा पायथा-आसनगाव-इगतपुरी-भंडारदरा-राजूर मार्गे कुमशेतच्या दिशेने निघाले. तर शिल्लक राहिलेलं सामान पाठीवर घेऊन पुंडलिक, नरेंद्र, सुभाष, नंदू, शैलेश, शेखर, कुट्टी, अनिल इमारते, संजय वगैरे मंडळी वाट दाखवण्यासाठी गावातील एका ग्रामस्थांना बरोबर घेऊन कात्राबाई आणि आजोबा यांच्यामधील खिंडीतून (गुहेरीचे दार) कुमशेतच्या दिशेने निघाले.
![]() |
| From Aajoba 1991 |
इकडे शहापूर बस स्थानकावर रस्त्याची व्यवस्थित चौकशी करून किरण व मंडळी जीपने भंडारदऱ्याच्या दिशेने निघाले. संध्याकाळी साडेसात वाजता राजुरला पोचले. या वेळेस रस्त्यावर चीटपाखरूही नव्हते. तशातच वाटेत धामणगावला राहणारा एक ग्रामस्थ अचानक भेटला, त्यालाही आमच्याबरोबर घेऊन कुमशेतच्या दिशेने निघालो. त्याच्या सल्ल्याप्रमाणे धामणगावापर्यंत तर बिनदिक्कतपणे पोचलो. आता पुढे मात्र त्याने सांगितल्याप्रमाणे पुढचा प्रवास सुरु झाला. धामणगाव सुटल्यावर रस्ता पूर्ण सुनसान होता. विचारपूस करण्यासाठी सुद्धा कोणी नव्हत. त्यामुळे रात्रीच्या या प्रहरात रस्ता चुकलो कि काय असे वाटून गेले. पुढे जातो तर आणखी एक संकट उभे राहिले, आता समोर एकाचे दोन रस्ते झाले होते. त्यामुळे कुठे जावे हेच कळेनासे झाले. कुणी दिसतंय का हे पाहण्यासाठी गाडीतून खाली उतरून पुढे चालत गेलो. खूप चालल्यावर सुद्धा कुणीही सापडले नाही, म्हणून परत फिरलो. इतक्यात अशोकला गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशात मातीवर एका वाहनाच्या पुसटशा खुणा दिसत होत्या बहुतेक रात्री मुक्कामाची बस कुमशेतला गेली असावी असा अंदाज केला आणि आम्ही त्याच वाटेला लागलो.
आमचा अंदाज बरोबर ठरला होता. २ किलोमीटर पुढे गेल्यावर एक आश्रमशाळा लागली. त्यांच्यापाशी चौकशी केल्यावर कुमशेतची वाट बरोबर असल्याचे कळले व हायसे वाटले. नऊ वाजले तरी कुमशेत गावाची काहीच चिन्हे दिसत नव्हती. अशोक तर दिवसभर धुळीच्या रस्त्याने गाडी चालवून थकला होता. याच दरम्यान अचानक गाडीच्या प्रकाशात एक मोठे रानमांजर दर्शन देऊन गेले. भूक सुद्धा लागलेली होती बरोबर आणलेली केळी कधीच संपली होती. साडे दहाच्या सुमारास त्या निर्मनुष्य रत्यावर दूर एका विजेरीचा (Torch) उजेड दिसला आणि जिवात जिव आला. एकदाचे कुमशेतला पोचलो होतो. पण इथेही आमचे नशीब आड आले. आम्ही पोहोचत नाही अशी कल्पना करून सर्वांनी भांडी घासून पुसून ठेवली होती.
दरम्यान सकाळी किरण व मंडळी जीपने कुमशेतच्या दिशेने निघून गेल्यावर दुपारी २ वाजता उपाशीपोटीच पुंडलिक, नरेंद्र, शैलेश, शेखर, नंदू, सुभाष, संजय, अनिल इमारते इत्यादी उरलेलं भरपूर सामान पाठीवर घेऊन वाटाड्यासोबत कुमशेतला येण्यासाठी कात्राबाई व आजोबा डोंगराच्यामध्ये असलेल्या खिंडीच्या दिशेने निघाले (गुहेरीचे दार). वाटाड्याही त्यांना खिंडीपर्यंतच दिशादर्शन करणार होता आणि नंतर परत फिरणार होता, त्या पुढचा सगळा प्रवास अंदाजानेच करायचा होता. भुकेची चिंता करीत बसले असते तर वेळेवर कुमशेतला पोहोचणे अशक्य होते. वाटेत रानकोंबड्या, भेकरांचे भेसूर आवाज रानाची भयानकता वाढवत होते. खिंडीत पोहोचल्यावर वाटाडे सुकऱ्या यांना सुद्धा अंधार पडायच्या आत परत फिरणे आवश्यक असल्याने ते खिंडीतूनच निघून गेले. कधी सरळ चालत तर कधी प्रस्तरारोहण करीत एक एक गडी खिंडीतून वर सरकत होता. वाटेत बऱ्याच ठिकाणी दरडी कोसळल्याच्या खुणा दिसत होत्या. काळोख पडता पडता सर्वजण खिंडीच्यावर पोहोचले. खिंडीच्यावर पोहोचल्यावर पुंडलिक व किरणने काही दिवसांपूर्वी शोधलेल्या पाणवठ्यावर जाउन आपली तृष्णा भागवली. पुंडलिक सोबतच असल्याने शोधाशोध करावी लागली नाही. इथून कुमशेत गाव फक्त १५ मिनिटांवर आहे अशी माहिती मिलिंदने पुरविली होती, जी चुकीची होती हे त्यांना लवकरच कळणार होते. अंधार वाढू लागला आणि पायाखालची वाट अनोळखी झाली. सुमारे अर्धा तास चालूनही गावाच्या काहीच खाणाखुणा दिसत नव्हत्या. उपाशीपोटीच पाच-सहा तास चालल्याने सगळेच थकलेले होते, पावले झिंगल्यासारखी पडत होती. अशाच अवस्थेत समोर दोन वाटा फुटलेल्या आढळल्या. कपाळावर हात मारून स्वतःच्याच नशीबाला दोष देत पुंडलिकने डाव्या वाटेने जाण्याचे सुचवले, कारण तो आणी किरण जेंव्हा पाण्याच्या शोधात आले होते तेंव्हा वरच्या टेकाडावरून गाव डावीकडे असल्याचे पाहिलेले त्याला आठवले.
आणखी अर्धा तास त्याच वाटेवर चालल्यावर दूरवर कुत्रे भुंकण्याचा आवाज आला व सर्वांची मरगळलेली शरीर ताठ झाली. थोड्याच वेळात माणसांचा आवाज कानी पडला आणि त्या आवाजाच्या रोखाने गेल्यावर त्यांना काही गावकरी त्या रानात आपल्या गायीच्या मोडलेल्या पायावर उपचार करताना दिसले. त्या गावकऱ्यांनी दाखवलेल्या वाटेवर गेल्यावर एका गावात पोचले पण ते कुमशेत गाव नसून ठाकूरवाडी गाव होते. मग त्या गावातीलच काही मुलांना घेऊन कुमशेतकडे निघाले. अखेर दुपारी २ वाजता आजोबाच्या पायथ्याकडून निघालेली मंडळी पाठीवर वजन असल्यामुळे रात्री ९ वाजता कुमशेत गावात दाखल झाली होती. एका घरासमोर मुक्कामाची बस उभी होती. रात्री भयानक थंडी असल्याने त्याच घरात रात्रीचा मुक्काम करण्यास घरातल्या मंडळींनी परवानगी दिली. कुमशेत गावात पोहोचल्यावर त्यांनी एखादी जीप आली आहे का याची विचारणा केली, अर्थात नकार आला कारण किरण व अशोक अद्याप जीप घेऊन आलेच नव्हते. त्या मंडळीनी यांना ताजे जेवणसुद्धा बनवून दिले. किरण व मंडळी रात्र वाढू लागली तरी येण्याची काही चिन्हे दिसेनात म्हणून भांडी वगैरे घासून झोपण्याच्या तयारीला लागले. त्याच वेळेला साधारण साडे दहा वाजता किरण व मंडळी जीपने गावात दाखल झाले. एकदाचे सर्वजण कुमशेतला पोहोचले होते.
![]() |
| From Aajoba 1991 |
![]() |
| From Aajoba 1991 |
![]() |
| From Aajoba 1991 |
सकाळी जाग आली ती दातखिळी बसवणाऱ्या थंडीनेच. चहा
पिऊन थंडी घालवण्याचा निरर्थक उपाय करून पाहिला. त्यात कुट्टी व शैलेशला
थंडी भरून आली होती व तापही होता, तरी थांबून चालणार नव्हते. पटापट जीप
मध्ये भरलेले सामान बाहेर काढले गेले. आम्ही एकूण अकरा सहकारी होतो पैकी
अशोक जीप घेऊन त्वरित परतणार होता. त्याच्या सोबत शैलेशही जाणार होता.
त्यात कुट्टी आजारी पण तरीही त्या अवस्थेत कुट्टी आमच्या बरोबर यायला तयार
झाला.
प्रत्येकाने स्वतःच्या खांद्यावर / पाठीवर जास्तीत जास्त सामान घेतले तरीही
भरमसाठ सामान शिल्लक राहिले. त्यामुळे एक-एक करता तब्बल दहा माणसे गावातून
घेतली, तरीही सामान संपेना. गावातली गडीमाणसे शिल्लकच न राहिल्याने अशोक व
शैलेशही शिल्लक सामान घेऊन आमच्या बरोबर निघाले, आजोबाच्या दिशेने. आम्ही
एकूण २१ जण सामान घेऊन पुन्हा परतीच्या वाटेने आजोबाच्या माथ्यावर असलेल्या
पाण्याच्या कुंडापाशी निघालो. काल रात्री कोकणातून वर येताना आमची मंडळी
पाणी पिण्यासाठी याच कुंडावर थांबली होती. आजोबाचा पायथा ठाणे जिल्ह्यात तर
माथा नगर जिल्ह्यात येतो. पुढे ठाकूरवाडीतून २ गडी माणसे घेऊन त्यांच्या
खांद्यावर सामान देऊन त्यांना इतरांबरोबर पुढे पाठवले. तर किरण , नरेंद्र, व
शेखर परत कुमशेतला आले कारण अद्यापही थोडे सामान जीपमध्ये शिल्लक होते.
परत येताना वाटेत त्यांना कुट्टी एका झाडाखाली बसलेला दिसला, त्याला
थकव्यामुळे चक्कर आली होती. त्याच्याकडील सामान या तिघांनी घेतले व वाटेला
लागले. कुंडावर पोहोचल्यावर अशोक व शैलेश परत घरी जाण्यास कुमशेतला उभी
केलेल्या जीपच्या दिशेने निघून गेले. वाटेत त्यांना झाडाखाली बसलेला
कुट्टी भेटला त्यालाही त्यांनी बरोबर घेतले.
इकडे कुंडाजवळ बसून किरण व मंडळी आपल्या इतर सहकाऱ्यांना (जे यांच्या
पुढे निघाले होते) आजोबाच्या सर्वोच्च माथ्यावर मुंगीच्या पावलाने चढताना
पाहत होते. दोन दिवसाच्या अथक परिश्रमानंतर सर्वानीच माना टाकलेल्या
होत्या. एका धबधब्यातून हळूहळू वर चढत गेल्यावर कड्याच्या पायथ्याला लागुनच
वाट आजोबाच्या सर्वोच्च माथ्यावर प्रवेश करत होती. मध्येच एके ठिकाणी
काळ्या कातळात निसर्गनिर्मित पाण्याची कुंडे दिसली, त्यांच्या बाजूलाच
आम्ही बेसकॅंप लावायचा विचार केला व तेथेच सर्व सामान उतरवून गावकऱ्याना
त्यांचा मेहनताना देऊन परत पाठवले. त्यांच्या सोबत संजय रेडकरही मुंबईस
गेला. एव्हाना काळोख व्हायला लागला होता त्यामुळे तंबू ठोकणे आवश्यक होते.
गवत उपटून निघण्यासारखे नव्हते म्हणून ते मर्यादित पेटवले व तंबू पुरती
जागा साफ करून घेतली.
आता सुभाष, पुंडलिक, नरेंद्र, शेखर, अनिल दगडे, किरण, नंदू आणि अनिल इमारते
असे फक्त आठ जण शिल्लक होतो. दरीच्या कडेलाच तंबू असल्याने दरीतून धावत
येणारा वारा त्याचा चांगलाच समाचार घेत होता. गेल्या १०-१२ दिवसातील एकेक
प्रसंग आठवताना कधीतरी झोप लागली.
![]() |
| From Aajoba 1991 |
![]() |
| From Aajoba 1991 |
दरम्यान कुमशेतला परत गेलेले अशोक, कुट्टी व शैलेश जीपने परत डोंबिवलीला जाण्यास निघाले. आजारी असल्याने कुट्टी व शैलेश गाडीतच झोपले, बिचाऱ्या अशोकला एकट्यालाच जागे राहून गाडी चालवावी लागली. अशोकही थकलेला असल्याने इगतपुरीजवळ गाडी थांबवून रस्त्याच्या कडेलाच रात्र काढली व सकाळी सुखरूपपणे डोंबिवलीला पोहोचले. त्यांच्या नंतर निघालेला संजय परत कुमशेतला पोहोचला पण एव्हाना अशोक जीप घेऊन निघून गेल्यामुळे तसेच बसही उपलब्ध नसल्याने रात्री तिथेच मुकाम करून सकाळी मुंबईस रवाना झाला.
![]() |
| From Aajoba 1991 |
सकाळी जाग आली ती तंबूच्या सेंटर पोलच्या थडथड आवाजानेच. पण उठण्याचे त्राण कुणातच नव्हते. २-३ दिवसात धावपळच एव्हढी झाली होती कि प्रत्येक जण आज आराम करण्याच्या इराद्यात होता. त्यामुळे आज सुट्टी जाहीर करण्यात आली. सकाळीच नंदूला ताप आला होता, त्याला गोळ्या देऊन त्याची सोय करण्यात आली. आज फक्त दुपारची जेवण आटोपल्यावर गडाच्या माथ्यावरून आम्ही चढाई अर्धवट ठेवलेल्या कड्याची तपासणी करण्याचे ठरवले होते. दुपारी जेवायला बसलो असताना सुभाष पाणी आणायला कुंडावर गेला होता. तो परत आल्यावर एक गंमत दाखवतो म्हणून सगळ्यांना परत कुंडावर घेऊन गेला. गेले दोन दिवस ज्या कुंडातले पाणी आम्ही पीत होतो त्या कुंडातून सुभाषने एक मेलेला उंदीर बाहेर काढला. ते पाहून आमच्या पोटात मळमळायला लागले. शेखर तर उलटी करयाचाच शिल्लक होता. किरणने खबरदारी म्हणून सर्वांना फ्लूच्या गोळ्या दिल्या. असे प्रसंग पाहण्याची कि काही पहिलीच वेळ नव्हती. १९८८ मध्ये ढाकभैरी चढाईच्या वेळी तर पठारावर रात्री मुक्काम करावा लागला व पाणी कुठेच न मिळाल्याने एका चिखलाच्या डबक्यात बसलेल्या म्हशींना उठवून नंतर तेच पाणी आम्ही पिण्यासाठी वापरले होते.
नियोजित कार्यक्रमाप्रमाणे दुपारी ३ वाजता कड्याच्या तपासणीकरिता निघालो. आजोबाच्या माथ्यावर सगळीकडे पुरुषभर उंचीचे गवत पसरले होते. त्यामुळे अंदाजानेच वाट काढत जाताना खड्ड्यात पडायला होत होते. पुढे काय वाढून ठेवलय या भीतीने हळूहळू पुढे चालत होतो. दीड-एक किलोमीटर विस्तार असलेल्या त्या परिसरात आम्ही कुठे चाललोय आणि दरीचे तोंड कुठे आहे त्याचा पत्ताच लागत नव्हता.
चालता चालता अचानक आम्ही एका उंचवट्यावर येउन दाखल झालो होतो. इथून परिसर बऱ्यापैकी दिसत होता. अंदाज लावून दरीच्या तोंडाशी आलो, पण इथून खाली आमचा चढाईचा मार्ग दिसत नव्हता. आता खाली उतरूनच पाहणी करणे आवश्यक होते.
![]() |
| From Aajoba 1991 |
![]() |
| From Aajoba 1991 |
कड्याच्या उतारावरून बरेच पुढे गेल्यावर तिथून एक वाट खाली उतरली होती म्हणजे एका लेजवर पोहोचली होती आणि अचानक आम्हाला हव ते गवसलं होत! कड्याच्या माथ्यापासून जवळपास ५०० फुट खाली असलेली हि लेज पुढे खूपच अरुंद होत (अर्धा फुटांपर्यंत) गेली होती व याच लेजच्या सुमारे १०० फुट उंचीवर आम्ही ५-६ दिवसांपूर्वी कॅंप २ वरून पाहिलेलं छत दिसत होत. याच छताच्या खाली सरळ रेषेत आमच्या पायाखाली आमचा अर्धवट राहिलेला चढाई मार्ग होता. चढाईचा मार्ग सापडल्याने खुशीतच अंधार पडू लागल्याने परत माथ्यावरील बेसकॅंपच्या दिशेने निघालो. आमचे आनंदित चेहरे पाहून नंदू, व दोन्ही अनिलना कामगिरी फत्ते झाल्याची खात्री पटली. फावल्या वेळेत इतर सहकाऱ्यांनी जळणाचा साठा करून ठेवला होता.
ज्या गोष्टीसाठी परत आजोबाच्या माथ्यावर आम्ही जमा झालो होतो त्या चढाईचे नियोजन करण्यासाठी रात्री एकत्र बसून विचार सुरु झाला. आम्ही आजोबाच्या पायथ्यापासून सुरुवात करून जवळपास २५०० फुटांची गाठली होती आणि चढाई अर्धवट अवस्थेत सोडली होती. ताशीव कड्यावर जवळजवळ १००० फुट चढाई अद्यापही शिल्लक होती. म्हणजे अद्यापही १० ते १२ दिवस लागणार होते. मोहीम सुरु करून १५ दिवस उलटून गेले होते. सर्वांच्या सुट्ट्या पण संपत आल्या होत्या, आता उशीर करून चालण्यासारखे नव्हते.
कारण बहुतेक मंडळी लघु उद्योगात काम करीत असल्यामुळे वाढीव सुट्ट्या मिळणार नव्हत्या. आता आम्हा आठ जणांमध्ये पाच जण चढाई करणारे होते त्यामुळे दोन टीम बनवायचे ठरविण्यात आले. पैकी एक टीम आज संध्याकाळी शोधलेल्या लेजवरून खाली म्हणजे कॅंप-२ वरच्या भागात उतरेल व तेथेच कड्यावर रात्रंदिवस राहून चढाई करीत वर येईल. त्याच वेळी दुसरी टीम लेजच्या वरील छत व सुमारे ५०० फुटी भिंतीचे आव्हान पेलतील. खालील टीमला लागणारे जेवण/पाणी इत्यादी आवश्यक सुविधा लेजच्या वरील टीम पुरवेल. वरील टीम रोज बेसकॅंपवर येउन जाऊन राहील. या योजनेमुळे आम्ही अर्ध्या काळातच मोहीम पूर्ण करू शकणार होतो. याचे पूर्ण श्रेय आम्ही संध्याकाळी शोधलेल्या लेजला द्यावे लागेल त्यामुळे आमचे काम खूपच सोपे झाले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी दरीतून येणाऱ्या जोरदार वाऱ्याने आपला इंगा दाखवला होता. दोन दिवस वाऱ्याशी सामना करून थकलेला आमचा तंबू साफ झोपला होता. तंबू तुटल्याने तो पुन्हा तेथेच लावणे शक्यच नव्हते, म्हणून मोहिमेवर जाण्याचे थांबवून आम्ही तंबू लावायला सुरक्षित जागा शोधण्यास निघालो. शेवटी एके ठिकाणी आम्हाला ती जागा मिळाली. कारवीच्या झाडोऱ्यामध्ये एक मोकळी जागा होती. थोडासा उतार होता तो व्यवस्थित केला. वारा कारवीच्या रानात घुसल्यावर त्याचा जोर कमी होत होता. जुन्या ठिकाणी असलेला तंबूमधील सामान उचलताना नंदूला दोन साप आरामात पहुडलेले दिसले. बापरे! गेले दोन दिवस आमच्यासोबत त्यांनीसुद्धा तंबूमध्ये मुक्काम ठोकला होता. अजून किती संकटाना तोंड द्यावे लागणार होते देव जाणे! या सर्व उपद्द्व्यापात चार वाजले. दिवस जवळपास संपत आला होता.
![]() |
| From Aajoba 1991 |
पण तरीही सुभाष, किरण, पुंडलिक व शेखर असे चौघेजण उद्याचे काम थोडेतरी हलके होईल म्हणून लेजच्या दिशेने निघाले. त्यांना आता मेन लाईन फॉर्म करायची होती. त्यासाठी त्याना काल पाहिलेल्या छताच्या सरळ रेषेत येणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांना अरुंद लेज वरून जवळपास २०० फुटांचा ट्रेवर्स मारून त्या छताच्या बरोबर खाली जाणे भाग होते. मोहीम संपेपर्यंत या अरुंद लेजवर वावर असल्याने तो मार्ग दोर लावून सुरक्षित करणे जरुरी होते. मग किरणने कंबरेला दोर बांधला व रांगत तर कधी सरपटत लेजवर पुढे सरकायला सुरुवात केली. वाटेत त्याला मध्येच एके ठिकाणी माकडांच्या विष्ठेने भरलेली एक गुहा लागली. इथे पोहोचल्यावर त्याने एक बोल्ट ठोकला व नंतर शेखर, सुभाष व पुंडलिक यांना गुहेत घेतले. इतर मंडळी तिथे पोहोचल्यावर किरण छताच्या सरळ रेषेत येण्यासाठी आणखी पुढे सरकला. माथ्यावरून खाली लेजवर उतरल्यावरचे ठिकाण व चढाईचा मार्ग यातील अंतर जवळपास २०० फुट होत आणि आता इथे सारखी धावपळ करावी लागणार होती म्हणून सुरक्षेसाठी एक दोर बांधून टाकला.
![]() |
| From Aajoba 1991 |
![]() |
| From Aajoba 1991 |
![]() |
| From Aajoba 1991 |
उद्यापासून काही सहकारी एकदाचे खालच्या कॅंप-२ वर
उतरल्यावर मोहीम संपेपर्यंत भेटणार नव्हते. त्यामुळे रात्री कॅंप फायर करून
खूप धमाल करून उद्यापासून परत सुरु होणाऱ्या मोहिमेसाठी नवीन मानसिक उर्जा
साठवून घेतली.
सकाळी जाग आली ती थंडीमुळेच, तंबूच्या तीन बाजूस असलेल्या कारवीच्या
झाडोऱ्यामुळे वारा थेट मारा करत नव्हता, पण रात्री दव पडल्याने तंबूवरून
पाणी वाहत होते. आता मोहीम काहीही करून पुढील चार ते पाच दिवसात आटोपायचीच
हा निर्धार करूनच लेजच्या दिशेने प्रयाण केले. लेजवर कालच बांधून ठेवलेल्या
दोरामध्ये स्वतःला अडकवून सर्वजण त्या अरुंद लेजवरून छताच्या खाली
जाण्यासाठी सरकू लागले. काल वाटेत मिळालेल्या गुहेमधील माकडांची विष्ठा साफ
करून तिथे तात्पुरता कॅंप लावला. त्यावेळेत किरण व पुंडलिकने पुढे जाऊन
वाटेमध्ये दोर दरीमध्ये झुलत असल्याने आणखी दोन बोल्ट ठोकून
येण्याजाण्यासाठी मार्ग सुरक्षित केला. गुहेच्या एका खबदाडीतून थेंब थेंब
पाणी ठिबकत होते, तिथे एक कॅन लाऊन पाणी जमा करायची सोय केली, म्हणजे
बेसकॅंप वरून उद्या पाणी आणायची निकड नव्हती.
आता मुख्य लढाईसाठी परत सज्ज झालो. कालच ठरवल्याप्रमाणे २ टीम केल्या. पुंडलिक व शेखर खाली रॅपलिंग करत आम्ही शेवटी कॅंप-२ वर जिथे चढाई थांबवली होती तिथे जाऊन चढाईला सुरुवात करणार होते. तर वरच्या बाजूला सुभाष चढाई करणार होता. दोन्ही टीमच्या मध्ये लेजवर किरण व नरेंद्र होते. नरेंद्रला लेजवर ठेवण्याचे एक कारण म्हणजे आमच्या डोक्यावर असलेले दगडी छत. दगडी छत कसे पार करायचे याचा अनुभव फक्त किरण व नरेंद्रलाच होता.
पुंडलिक रॅपलिंग करत खाली कॅंप-२ वर उतरला व पाठोपाठ शेखर ही. इथेच आम्ही दि. १० डिसेंबरला चढाई थांबवली होती व आज म्हणजे दि.१६ डिसेंबर म्हणजे तब्बल ६ दिवसांनी पुन्हा कॅंप-२ वर पोहोचू शकलो होतो. ते दोघेही खाली पोहोचताच नरेंद्र व किरण तंबूच्या दिशेने निघून गेले कारण संध्याकाळी खालील टीमला जेवण पाणी पुरवायचे होते. पुंडलिक व शेखरने कॅंप-२ वरून चढाई सुरु केली आणि त्याच वेळेला सुभाषने लेजच्या वरच्या भागात छताच्या दिशेने चढाई सुरु केली. सुभाषला सुरुवातीला बोल्टिंग करावी लागणार असल्याने त्याला एकट्यालाच आव्हान पेलावे लागणार होते. तंबूच्या दिशेने जाताना किरण व नरेंद्रची चर्चा चालू होती. खाली कॅम्प-२ पासून वर पुंडलिक व शेखर यांना जवळपास ५०० फुट चढाई करायची होती आणि त्यासाठी त्यांना रात्रंदिवस उघड्यावरच मुक्काम करायचा होता. शेवटी त्यांच्या सोबतीला किरणने सुद्धा खाली जाण्याचा निर्णय घेतला.
इथे बेसकॅंपवर नंदू, अनिलने जेवण तयार करून ठेवले होते, ते सर्व घेऊन किरण परत लेजवर एकटाच निघाला. दरम्यान सुभाषने सकाळी ११.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत एकट्यानेच सोलो क्लाइम्बिंग पद्धतीने एकूण १२ बोल्टच्या साहायाने लेजपासून सुमारे ४० फुटांची उंची गाठली होती. तर लेजच्या खाली शेखर व पुंडलिक यांनी १० डिसेंबरला चढाई थांबवलेल्या ठिकाणापासून सुरुवात करून ४ बोल्ट, १ पिटोन, १ चोकनट यांचा वापर करत सुमारे ८० फुटांची उंची गाठली होती. ते आता एका अरुंद लेज वर पोहोचले होते. इथे त्यांनी कॅंप-३ ची स्थापना केली आणि किरणची वाट पाहत राहिले. किरण लेज वर पोहोचताच आणलेले सामान घेऊन रॅपलिंग करत खाली पुंडलिक व शेखरकडे उतरण्यास सुरुवात केली. पाठीवर वजन असल्यामुळे अतिरक्त भार हातावर पडत होता आणि त्यातच वाटेत ओव्हरहेंग असल्यामुळे कड्यापासून विलग होऊन हवेतच रॅपलिंग कराव लागलं, तरीही दोर हातावर चांगलाच घासला गेला. खाली गेल्यावर किरणला कळल की त्या दोराचे टोक पुंडलिक व शेखरकडे नव्हतेच, ते तर त्यांच्यापासून विसेक फुट दूर हवेतच लटकत होते. मग पुंडलिकने त्याच्याकडे असलेला अतिरिक्त दोर किरणकडे फेकायला सुरुवात केली. किरणने तिसऱ्या प्रयत्नात तो दातांमध्ये पकडला आणि पुंडलिकने किरणला त्या लेजवर (कॅंप-३) वर खेचून घेतले. झाल्याप्रकाराने किरणची बोटे भाजून आतली कातडी सुद्धा दिसायला लागली. आजची रात्र आम्ही तिघे जमिनीपासून ३००० फुट उंचीवर असलेल्या याच अरुंद लेजवर (कॅम्प-३) उघड्यावरच मुक्काम करणार होतो. तर सुभाष व नरेंद्र वरच्या लेजवरून परत बेसकॅंपवर निघून गेले.
रात्री लवकरच मेणबत्तीच्या उजेडात जेवण करून घेतले. जेवायला काय जागा पकडली होती आम्ही व्वा! लेज इतकी अरुंद कि आळसावलेले हात पाय लांब केले तर सरळ हवेतच लटकायचे. झोप तर येतच नव्हती. वर आकाशात चांदणे पसरले होते, चंद्र प्रकाशही खाली पायथ्यापर्यंत झाडा-झुडपांवर पसरला होता. वरून झाडे झुडूपांसारखीच भासत होती. संपूर्ण दृश्यच अवर्णनीय होते, आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी याचा अनुभव घ्यावाच! इकडे आम्ही झोपेची वाट पाहत असताना तिकडे बेसकॅंप वरील नंदू आणि अनिल दुसऱ्या दिवशीच्या जेवणाची तयारी करीत होते. कारण सुभाष व नरेंद्र सकाळीच चढाईसाठी निघतांना सोबत तयार जेवण सुद्धा घेऊन येणार होते.
हीच ती लेज
![]() |
| From Aajoba 1991 |
सुभाष व नरेंद्रने मेन लेजवर येऊन सकाळीच सुरुवात केली. काल सुभाषने चढाई थांबवलेल्या ठिकाणापासून नरेंद्रने सुरुवात केली. सलग ७ बोल्ट ठोकल्यावर त्याला फ्री मूव्ह करण्याची संधी दिसली. जवळपास ३० फुटांची उंची गाठत तो आता जवळपास त्या दगडी छताखाली आला होता.
इकडे लेजच्या खाली अर्थात कॅंप ३ वर रात्रीच्या भयानक थंडीने किरण, पुंडलिक व शेखर चांगलेच गारठून गेले होते. सुरुवातीलाच ओव्हरहेंग असल्याने चेन बोल्टिंगशिवाय पर्याय नव्हता. शेखरने ५ बोल्टच्या साहाय्याने तो पार केला व पुढची चढाई किरणने आपल्या हाती घेतली. किरणने सुद्धा ५ बोल्ट मारल्यावर फ्री मूव्हची संधी दिसताच बिलेसाठी पुंडलिकला वर घेतले.
किरणच्या उजव्या हाताला ५-६ फुट अंतरावर एक मोठा दगड वरून खाली येऊन
मध्येच एका कपारीत अडकला होता. अंग ताणून किरणने हळूहळू त्या दगडाला मिठीच
मारली, आता त्याच संपूर्ण अंग हवेत लटकत होत. हळूहळू स्वतःचा तोल सावरत
किरण त्या दगडावर चढला. तिथेच दोर बांधून पुंडलिकलाही त्याने तिथे खेचून
घेतले. वरसुद्धा फ्री मूव्ह करण्याची संधी दिसत होती, पण वरचा होल्ड
पकडण्याएव्हढी उंची किरणची नव्हती. त्यामुळे त्याने प्रथम पुंडलिकच्या
खांद्यावर पाय ठेवला पण तरीही त्याचा हात पोहोचत नव्हता तेंव्हा त्याने थेट
त्याच्या डोक्यावरच पाय देऊन वरचा होल्ड पकडला व वर सरकला. आता परत बोल्ट
मारावा लागणार होता. पण त्यासाठी आधी तोल जाऊ नये म्हणून स्वतःला कुठे तरी
जखडून घ्यावे लागणार होते. आजूबाजूस पाहिल्यावर कड्यापासून एक छोटा दगड
बाहेरच्या बाजूस आला होता. त्याच्या चहुबाजूनी एक स्लिंग बांधून तिच्यातून
कंबरेचा दोर पास करून स्वतःला तात्पुरत जखडून घेतलं. पुढे संध्याकाळ होई
पर्यंत किरण ने १६ बोल्ट ठोकले. आज कॅंप ३ पासून जवळपास ८० फुटांची उंची
गाठली होती.
आज दगडी छताचा निकाल लावायचा होता. जमिनीपासून जवळपास ३६०० फुट उंचीवर
असलेल्या छतावर नरेंद्रने सकाळीच बोल्टिंगला सुरुवात केली. हवेत संपूर्ण
झोपण्याच्या स्थितीत आडवे होऊन त्याने लागोपाठ अकरा बोल्ट ठोकले आणि ३५ फुट
रुंद असलेल्या त्या छताचा निकाल लावला. शाब्बास नरेंद्र!!
![]() |
| From Aajoba 1991 |
![]() |
| From Aajoba 1991 |
![]() |
| From Aajoba 1991 |
त्याने कड्यावर ठोकलेल्या शेवटच्या बोल्टला खुणेसाठी एक कॅन अडकवला. कारण उद्या लेजवर न येता थेट माथ्यावरूनच रॅपलिंग करत तो इथे पोहोचणार होता. वेळ वाचवण्यासाठी ते आवश्यक होत. खरतर आज नरेंद्रची अग्नीपरीक्षाच ठरली कारण दीड तासाला एक या हिशोबाने त्याने उलट्या अवस्थेत ११ बोल्ट ठोकले होते (वटवाघळासारखे). अनैसर्गिक अवस्थेत दिवसभर लटकून राहिल्यामुळे अंगावर भयंकर ताण पडलेला, तरीही नरेंद्रने त्याची पर्वा न करता कामगिरी फत्ते केली होती. दिवसभराची चढाई थांबवून नरेंद्र परत खाली लेजवर सुभाषकडे पोहोचला. बेसकॅंपकडे निघणार इतक्यात खालून शेखरची हाक एकू आली……………………
इकडे खाली किरणने काल चढाई थांबवलेल्या ठिकाणापासून आज पुंडलिकने सुरुवात केली, सोबतीला शेखर होता, तर किरण खाली अरुंद लेजवर (कॅंप ३) होता. तीन वाजेपर्यंत पुंडलिकने चेन बोल्टिंग करत ११ बोल्ट ठोकले. पुढील चढाई शेखरने आपल्या हातात घेतली आणि संध्याकाळपर्यंत ६ बोल्ट ठोकले. आज जवळपास ५५ फुटांची उंची गाठली होती. म्हणजे कॅंप ३ पासून जवळपास २२५ फुट उंचीवर पोहोचलो होतो. आणखी ५०-६० फुट उंचीवर एक छान प्रशस्त गुहा आहे हे शेखर व पुंडलिकने पहिल्याच दिवशी रॅपलिंग करत खाली येताना पाहिली होती. आमची सध्याची कॅंप-३ वरील मुक्कामाची लेज खूपच अरुंद होती, त्यातच बोचऱ्या थंडीमुळे दोन रात्री झोपही येत नव्हती. एकमेकांना खेटून झोपत असल्याने कुसही बदलता येत नव्हती. म्हणून तिघांनीही वरच्या गुहेत जाण्याचा निर्णय घेतला. पण त्यासाठी वरच्या लेजवर हजर असलेल्या मंडळीनी खाली दोर सोडावा लागणार होता. शेखरने आवाज देताच वरच्या लेजवरून दोराच्या साहाय्याने जेवण व पाणी खाली सोडले. या खाली सोडलेल्या दोराच्या साहाय्याने शेखर कमांडो पद्धतीने दोर पकडून त्या गुहेत पोहोचला.
शेखर गुहेत पोहोचताच पाठोपाठ पुंडलिक व किरण कॅंप ३ ला कायमचा रामराम करून सर्व साहित्य घेऊन गुहेत पोहोचले. किरणच्या अंगावर सर्व साहित्य आणि त्यातच त्यांच्याकडे झुमार नसल्याने लेजवर उभ्या असलेल्या सुभाष व नरेंद्रने किरणला अक्षरशः खेचून वर घेतले. या खटाटोपात सात वाजले. सुभाष व नरेंद्र काळोखातच लेजवरून बेस कॅंपच्या दिशेने निघून गेले. तिकडे बेसकॅंपवर नंदू, व अनिल त्यांच्याच काळजीत बसले होते. ज्या लेजवरून दिवसा उजेडीदेखील जीव मुठीत धरून चालावे लागे त्याच लेजवरून अंधारात चाचपडत पुढे सरकताना त्यांना खूपच त्रास झाला. कड्याच्या वर आल्यावर मात्र लख्ख चंद्र प्रकाशात परिसर न्हाऊन निघाला होता. बेसकॅंपवर पोहोचताच सर्वांचा जीव भांड्यात पडला.
![]() |
| From Aajoba 1991 |
इकडे कड्यावरच्या गुहेतच पुंडलिक, शेखर व किरणने कॅंप-४ स्थापन केला. खालील कॅंप-३ च्या अरुंद लेजपेक्षा हि गुहा थोडी प्रशस्त होती. रात्री मेणबत्तीच्या उजेडात जेवण करून घेतलं आणि झोपण्यासाठी जागा थोडीशी ठाकठीक करून घेतली. रात्री कधीतरी काहीतरी चावल्याने पुंडलिक जागा झाला तर एक उंदीर त्याच्यापासून थोडासा दूर अंतरावर उभा राहून याच्याकडेच टकामका पाहत होता. रात्रभर २-३ उंदरांनी अंगावर उड्या मारून भंडावून सोडले. खरतर आम्हीच त्यांच्या घरात घुसखोरी केली होती आणि आता आम्हीच त्याना त्यांच्याच घरातून हुसकावण्याचा प्रयत्न करीत होतो.
सकाळी ठीक ८.३० वाजता शेखरने रॅपलिंग करत खाली जात काल चढाई थांबवलेल्या ठिकाणापासून सोलो क्लाईम्ब सुरु केले. तर गुहेच्यावर पुंडलिकने सुरुवात केली. पुंडलिकला मेन लेज पर्यंतच २०० फुट अंतर पार करायचं होत तर शेखरला ८० फुटांचा कातळ टप्पा पार करत गुहेपर्यंत पोहोचायचं होत. दरम्यान किरणला गुहेतील दगड बाजूला सारताना एक काळी इंगळी दिसली, त्याने थोडा विचार करून तिला ठार मारलं. तिला खाली फेकता येत नव्हत कारण शेखर चढाई करीत होता आणि तिला गुहेतच ठेवताही येत नव्हत. म्हणून तिघांच्याही सुरक्षिततेचा विचार करून पहिल्यांदाच जीव हत्या केली होती. दरम्यान बोल्टिंग करताना शेखरच्या हातातून हातोडी सुटून थेट खाली कॅंप ३ वर असलेल्या झाडी मध्ये पडली. दुसरी हातोडी नव्हती आणि त्यातच संपूर्ण बोल्टिंग करायचे असल्याने शेखरला तिथेच ठेऊन सुद्धा काहीच उपयोग नव्हता, म्हणून त्याला परत गुहेत खेचून घेतले. एव्हाना वरच्या बाजूला पुंडलिकने सोलो क्लाइंब करत २ बोल्ट व १ पिटॉन च्या साहाय्याने फ्री मूव्ह करत सुमारे ८० फुटांची उंची गाठली होती. शेखर गुहेत पोहोचताच किरण पुंडलिकच्या मदतीला त्याच्यापर्यंत पोहोचला व पुढील चढाई आपल्या हाती घेतली. ३ बोल्ट व १ पिटॉनच्या साहाय्याने दुपारी १.३० वाजेपर्यंत फ्री मूव्ह करत त्याने जवळपास १२० फुटांची उंची गाठत सुभाष व नरेंद्र असलेल्या मेन लेजवर पोहोचला. सकाळ पासून २०० फुटांच्या भिंतीवर फक्त ५ बोल्ट वापरण्यात आले होते. हा संपूर्ण मार्ग भुसभुशीत मातीने अस्थिर खडकांनी भरलेला होता. खाली उभ्या असलेल्या पुंडलिकच्या अंगावर अक्षरशः किलो किलोने माती पडत होती.
![]() |
| From Aajoba 1991 |
किरण व पुंडलिक मेन लेजवर पोहोचताच खाली गुहेत बसलेल्या शेखरकडे हातोडी पोचवण्यात आली. कारण सकाळी हातोडी खाली पडल्याने गुहेच्या खालील जवळपास ६० फुटांच्या रॉकपॅचवर चढाई अद्याप शिल्लक होती. त्याला सोलो क्लाइंब करायला सांगून किरण व पुंडलिक मेन लेजवरून जेवण व पाणी आणण्यासाठी बेसकॅंपच्या दिशेने निघून गेले. चार दिवस त्यांनी कड्यावरच मुक्काम केलेला असल्याने त्यांच्या अंगावर आज प्रथमच उन्ह पडत होती. आम्ही चार दिवसानंतर दर्शन दिल्याने बेसकॅंप वरील सहकारी सुद्धा हरखून गेले. विश्रांती घेण्यसाठी सुद्धा वेळ नव्हता, लगेच रात्रीच्या मुक्कामासाठी जेवण व पाणी घेऊन परत कड्यावर येण्यासाठी निघालो. इथे शेखर एकटाच कड्यावर लटकून बोल्टिंग करत होता. त्यातच त्याच्याकडील वेज (बोल्टच्या फटीमध्ये टाकण्यात येणारी पाचर) संपल्याने नाईलाजाने बोल्टिंग थांबवावे लागले.
कॅंप-४ च्या खाली अद्यापही २०-२५ फुट चढाई शिल्लक होती. आता त्याला किरण व पुंडलिक परत येईपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता, शेवटी कड्यावर लटकून त्यालाही कंटाळा आला म्हणून खाली उतरून सरळ गुहा गाठली आणि मस्तपैकी ताणून दिली. संध्याकाळी ५.३० वाजता किरण व पुंडलिक बेसकॅंपवरून परत लेजवर आले आणि रॅपलिंग करत परत कॅंप ४ वर उतरले. आज कसेही करून कॅंप ४ खालील उरलेली २०-२५ फुटांची चढाई पूर्ण करायचीच होती. शेखरला आणखी विश्रांती देऊन त्याने जिथे चढाई थांबवली होती तिथे किरण व पुंडलिक खाली उतरले. प्रथम किरण ने १० फुटांची फ्री मूव्ह करीत एक बोल्ट ठोकला व त्या बोल्ट च्या आधारे उभे राहून जवळपास ६ फुटांवर दुसरा बोल्ट ठोकला. फ्री मूव्हची संधी होती, पुंडलिकला सावध राहायला सांगून किरणने झटकन मूव्ह करत उरलेलं अंतर पार करून संध्याकाळी ६.४५ वाजता कॅंप-४ वर पोहोचला.
मेन लेजच्या खालील चढाई संपल्याने तिघेही खुश होते. बेस कॅंप वरून अनिल इमारते परत घरी गेल्याने आम्ही आता सात जण उरलो होतो. किरण, पुंडलिक व शेखरने तब्बल पाच रात्री कड्यावरच्या सांदी-कोपऱ्यात घालवल्या होत्या. बेसकॅंप वरील मंडळीना आम्हाला पाहून अक्षरशः गहिवरून आले.
![]() |
| From Aajoba 1991 |
दरम्यान सुभाष व नरेंद्रने छताच आव्हान मोडीत काढल्यावर आपल्या नियोजित कार्यक्रमाप्रमाणे लेजच्यावर माथ्याच्या दिशेने आगेकूच चालूच ठेवली होती. आजोबाचा माथा आता अगदीच आवाक्यात आला होता. काही दिवसांपूर्वी जे अशक्य वाटत होत ते अगदी काही फुटांवर दिसत होत. या नंतरची चढाई आता माथ्यावरूनच नियंत्रित करणार होतो. त्यामुळे बेसकॅंपवरून परत लेजवर येण्याजाण्याचा त्रास वाचणार होता. चढाई जवळजवळ पूर्ण होत आली होती. सुभाषने ३ बोल्ट व ३ पिटॉनच्या सहाय्याने बहुतेक चढाई संपवत आणली होती. त्यात नरेंद्रने १ बोल्ट व १ पिटॉनची भर घातली. शेवटची मुव्ह करण्यास पुंडलिक खाली उतरला. शेवटची फ्री मूव्ह करत २० दिवसांच्या परिश्रमाचे कोणतेही परिणाम न जाणवता पुंडलिकने ठीक १.३० वाजता आजोबाचा माथा गाठला आणि एका खडतर मोहिमेची सांगता झाली. फक्त आमच्या ७ जणांच्या आयुष्यातीलच नव्हे तर भारतीय प्रस्तरारोहण क्षेत्रातील आजवरची सर्वात मोठी मोहीम पूर्ण झाली होती. डेहणे गावापासून १ डिसेंबर १९९१ रोजी सुरुवात करून साथीदारांची कमी, पाण्याचे दुर्भिक्ष, साप, विंचू यांचा त्रास इ. अडचणीवर मात करून एकूण १८३ expanasion बोल्ट, १९ पिटॉन, दोन पेग व एक चोक नट वापरून २० डिसेंबर १९९१ रोजी आजोबावर अगदी मध्य भागातून अत्यंत अवघड मार्गाने चढाई केली होती.
![]() |
| From Aajoba 1991 |
![]() |
| From Aajoba 1991 |
![]() |
| From Aajoba 1991 |
![]() |
| From Aajoba 1991 |
समाप्त!





























































No comments:
Post a Comment