Friday, August 12, 2022

वजीर सुळका, माहुली गड, आसनगाव

 वजीर सुळका


दक्षिणोत्तर पसरलेला माहुली किल्ला आणि त्याच्या दक्षिणेकडील टोकाला (वासिंद रेल्वे स्थानकाच्या दिशेला) मुख्य डोंगररांगेपासून सुटलेला वजीर सुळका.


प्रत्येक प्रस्तारारोहकाच स्वप्न म्हणजे वजीर सुळक्याचा माथा. या सुळक्याविषयी दुर्गप्रेमींमध्ये प्रचंड कुतूहल आहे ते त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे. माझ्या नशिबाने मला सुद्धा वजीर सुळक्याच्या मोहिमे मध्ये सहभागी होण्याचा अनुभव मिळाला. याची उंची साधारण १७५-२०० फुट आहे.

०७ जुलै, २०१२ च्या मध्यरात्री डोंबिवलीहून १६ जण रेल्वेने वासिंद स्थानकात पोहोचलो. गप्पगार पडलेल्या बाजारातून मुख्य रस्त्यावर आलो आणि आणि तिथेच असलेल्या देवळात पथारी पसरून झोपी गेलो. साधारण ५ वाजता आम्ही आधीच सांगून ठेवलेल्या जीपने वासिंद-वांद्री मार्गावरील लोखंडी पुलावर सकाळी ५.३० वाजता वनरक्षकांच्या चौकिवर पायउतार झालो. पावसाळ्याचे दिवस असल्याने आणि सगळीकडे हिरवाई पसरलेली असल्याने डासांनी मस्तपैकी बस्तान बसवलेल. पायथ्याला पोहोचल्यावर परत ताणून द्यायचा बेत उधळला गेला आणि सगळ्यांच्या हातात आल्या झाडांच्या फांद्या. मासे बाजारात कोळणीताई जशा माशा हाकवत बसतात तसेच आम्ही सगळे डास मारत बसलो होतो आणि त्यात अग्रेसर मीच कारण माझ्या शिरस्त्याप्रमाणे या वेळेससुद्धा अर्ध्याच चड्डीवर आलो होतो.

मी मंडळामध्ये नवीनच असल्याने काही अनोळखी चेहरेसुद्धा दिसत होते. या वेळेस कधी नव्हे ते महिलासुद्धा होत्या. ट्रेकक्षितीजची मिनल जोशी, गिरीविराजचे जुने सहकारी संजय लोकरे यांच्या पत्नी माधवी लोकरे या सुद्धा सहभागी होत्या.

आम्ही ज्या ठिकाणी होतो तिथून धुक्यामुळे जास्तीत जास्त १० फुटांपर्यंतच दिसत होत. त्यातच आम्ही नेहमीचा मार्ग जो वांद्री गावातून जातो तो न पकडता उलट वांद्री गावाच्या ३-४ किलोमीटर अलीकडे वेगळाच मार्ग पकडला होता. या मार्गावरून शिकारी आणि स्थानिक गावकऱ्याशिवाय कोणीही जात नाही. पावसामुळे झाडा झुडूपांमध्ये वाट हरवली होती आणि धुक्यामुळे काहीही दिसत नसल्याने अंदाजाने मार्गक्रमण करावे लागणार होते. मी थोडा उशीर केल्याने सगळ्यांनी दुर्लक्षिलेली सर्वात जड बेंग माझ्या नशिबात आली होती. संपूर्ण परिसर धुक्यात हरवलेला असल्याने अंदाजाने वाट पकडून मार्गक्रमण सुरु झाले. सुरुवातीला वाट घनदाट झाडीमधून जात होती, सोबतीला डास होतेच. त्यांनी तर माझ्या हातापायावर सुंदर लाल नक्षी काढली होती. सुरुवातीची झाडी सोडल्यावर एक ओढा आडवा आला, त्याला पार केल्यावर बऱ्यापैकी सपाटी आली. तसेच अर्धा तास सपाटीवर चालल्यावर परत चढण होती.

माझी बऱ्यापैकी दमछाक सुरु झाली होती. थोडस धुक हटल्यावर सुळका नजरेस पडतो का ते पाहण्याचा निष्फळ कार्यक्रम उरकण्यात आला. सुळक्याने काही दर्शन दिले नाही. परत तंगडतोड करून आणखी उंचावर आलो, आता मात्र डोंगर धारेवर असल्याने थंडगार वारा सोबतीला होता आणि डास मात्र मागे जंगलामध्येच लपलेले होते. चढण मात्र जीव घेत होती, पावसाचे दिवस असून सुद्धा घामाच्या धारा वाहत होत्या.

आता पाऊस सुरु झाला होता त्यामुळे आपण नक्की सुळक्याकडे जात आहोत कि जंगलामध्ये भरकटत आहोत याची शंका आली. पण थोड्याच वेळाने बरेच वर आल्यावर वांद्री गावातून येणारी वाट सापडली आणि आपण बरोबर दिशेस आहोत याची खात्री पटली. आणखी १०० फुट चालल्यावर धुक्यातून वजीर सुळक्याने आपले पहिले दर्शन दिले. एखाद्या उंचवट्यावर ताशीव दगड उभा केल्यागत तो सुळका पाहून माझ तर तोंड सताड उघड पडल. आता पर्यंत वजीर सुळका फक्त फोटो मध्येच पाहीलेला होता, तो सुद्धा उन्हाळ्यातला. उन्हाळ्यात याच सर्व ऐश्वर्य लयास जात आणि उदास रूपड मनात भरत नाही. पण त्याची पावसाळ्यातली मादक अदा पाहून याला सुळका का म्हणावं हाच प्रश्न मला पडला. एखादी षोडश वर्षीय कमनीय बालाच उभी असल्यागत भासत होत.


आता फक्त समोरची टेकडी चढल्यावर सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचणार होतो. किशोर, मनीष, किरण काका वगैरे मंडळी पुढे निघून गेली. माझीतर जड बेंगमुळे हवाच गुल झाली होती. त्यांच्या पाठोपाठ मी सुद्धा ती बेंग घेऊन चढू लागलो आणि प्रत्येक दहा फुटानंतर बसकण मारू लागलो. माझी हि फटफजिती पाहण्यासाठी मागे टेकडीच्या खाली बरोबर असलेला महिला वर्ग होता आणि माझ्याकडे पाहून एकमेकाला टाळ्या देत हसत होत्या.

बरोबर सकाळी ८.४५ वाजता सुळक्याचा पायथा गाठला होता. सुळक्याच्या पाठीमागे असलेल्या डोंगरामध्ये एक गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये आणि आसपास छायाचित्रकारांनी आपापल्या जागा पकडल्या होत्या आणि मी, अनिकेत, सुदर्शन आदि कच्चे लिंबू सामान काढण्याच्या तयारीला लागलो.

परत सुरु:
आमच्याकडे सुद्धा एकच दिवस असल्याने आम्ही सुद्धा हाच पारंपारिक सुरक्षित मार्ग निवडला होता. २००३ मध्ये गिरीविराजच्या मंडळीनी या सूळक्याच्या overhang बाजूने माथा गाठला होता. पण आता अपुऱ्या वेळेमुळे आम्ही पारंपारिक मार्ग निवडला होता. बरोबर सव्वा नऊ वाजता किशोरने चढाईला सुरुवात केली, त्याच्याबरोबर सेकंड मेंन अनुभवी मनीष आणि थर्ड मेंन म्हणून सन्नी होता. किशोरने सुरेख चढाई करत बरोबर बारा वाजता वजीर सुळक्याचा माथा गाठला. त्याच्या पाठोपाठ मनीष, सन्नी आणि हितेशने माथा गाठून एकच जल्लोष केला.












सहभागी मंडळ: किरण अडफडकर, मनीष पिंपळे, किशोर मोरे, अमोल पाटील, मिनल जोशी, प्रवीण घुडे, अनिकेत साळुंखे, सुदर्शन माळगावकर, सनी वैती, आदित्य कानिटकर, पुनीत कुमाल, जितु, माधवी लोकरे, अमोल पाटील, हितेश साठवणे, आणि हमाल सतीश कुडतरकर.          


सतीश कुडतरकर
गिरीविराज हाईकर्स
डोंबिवली  

No comments:

Post a Comment

Bhairavgad-Patharpunj Trek from Helwak-Koyna Nagar.

 http://nitinshitole.blogspot.com/2016/11/bhairavgad-patharpunj-trek-from-helwak.html                                                ...